''मराठी साहित्यातील स्त्रीवाद ''

स्त्रीवरील अन्याय हा सनातन विषय आहे.स्त्री परिवारात वेगवेगळ्या भुमिकेत दिसते.मानवाच्या इतिहासात स्त्रीयांचे दु:ख विश्वात सर्वदुर दिसते.पण भारतीय स्त्रीवरील,अन्याय,विषमता,आणि गुलामगिरीच्या बाबतीत भारतीय त्या विषयांची निंदा करतात आणि त्याच वेळी नैतिक समर्थन येथे करतांना दिसतात त्याबाबतीत आपल्या भारतीय स्त्रीयांची स्थिती तर फारच भयानक अशी होती.

भारतीय स्वातंत्र्यानंतर १९७५ साली युनो ने ते वर्ष स्त्री मुक्ती वर्ष म्हणून साजरे करावयाचे ठरवले,सर्व सदस्य देशांना युनोने पत्र पाठवून विचारले की,तुमच्या देशातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे,याचा अहवाल आमच्याकडे पाठवा.भारताच्या समाज कल्याण
( आता सामाजिक न्याय विभाग) खात्याकडेही असे पत्र आले.तेव्हा असे लक्षात आले की,समाज कल्याण खात्यात दलित,युवक,अदिवासी,असे निरनिराळे विभाग होते,पण स्त्रीयांच्या बाबतीत स्वतंत्र असा कोणताही विभाग नव्हता.पुढे हे पत्र या विभागातून त्या विभागात फिरत राहिले.शेवटी समाज कल्याण खात्यातल्या श्रीमती फुलरेणू गुहा यांच्या अध्येक्षेतेखाली एक समिती नेमली गेली,या समितीने भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीविषयी माहिती गोळा केली.आणि त्या समितीचा अहवाल म्हणजेच "समानतेकडे वाटचाल" या नावाने तो प्रसिध्द झाला, असे वाचनात आहे.

तेव्हाच येथील समाजमनात राजकीय,सामाजिक आकाक्षा,वाढल्या.शिक्षण,आणि लोकशाहीचे,महत्व लोकांना पटू लागल्यामुळे जे वेगवेगळे बदल होऊ लागले,त्यात भारतीय स्रीयांमधेही फार मोठा बदल झाला.भारतीय स्त्रियांच्या बाबतीत भारतीय परंपरेच्या दृष्टीने जी विषमता होती,त्या विषमतेच्या व्यवस्थेमुळे "स्त्रियांच्या मनातील वेदना आणि विद्रोहाने पेट घेतला व त्याचे वाड्मयीन रुप म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय.

मराठी साहित्यातील स्त्रीवाद समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा पुरुष प्रधान संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान, त्याचाही विचार केला पाहिजे. स्त्रीकडे माणूस म्हणून पाहतांना स्त्रीला स्वत्वाची जाणीव तसेच तिच्यावरील अन्यायाची जाणीव होऊन ,स्वत:च्याच अस्मितेसाठी ती संघर्ष करते, मानवतेबद्दल आत्मियता वाटणे याला स्त्रीवाद म्हणता येईल.स्त्रीवादी लेखन केवळ स्त्रीयांनीच करावे असे काही नाही.मराठी साहित्यात तर अनेक पुरुषांनीच स्त्रीयांची दु:खे प्रकट केली आहेत.

भारतीय समाजातील कुटुंब व्यवस्थेमुळे काही अपरिहार्य नाती संबधातून कधी स्त्रीने मोकळा श्वास घेतला तर काही बंधनेही तिच्यावर आली,बंधने मर्यादीत स्वरुपात होती तोपर्यंत ती आनंदीत होती.पण स्त्रियांच्या बाबतीत अतिरिक्त बंधनामुळे,तीचा श्वास गुदमरु लागला.एकत्र कुटुंबप्रमुख सर्व निर्णय घेत,तोपर्यंत सर्व सुरळीत चालू होते,जुन्याकाळच्या संस्कृतीची सवय स्त्रियांनाही झाली होती.या स्त्रीयांना कोणतेही स्वातंत्र्य उपभोगता येत नव्हते.पुढे,स्त्री शिक्षित झाली,अर्थाजन करु लागली.त्यामुळे मालकीची भावना,आणि स्वातंत्र्य, या जाणीवेमुळे,एकत्र कुटुंब पध्द्तीची बंधने तीला नकोसे वाटु लागले, मग कुटुंबे विभक्त झालीया व्यवस्थेतूनही स्त्रीवादाचा जन्म झाला.

विभक्त कुटुंबे काहींना लाभदायक वाटले,पारिवारिक घुसमट संपली,मोकळा श्वास घेता येऊ लागला,पण पुढे अर्थाजनामुळे स्त्री-पुरुष दोघेही घरा बाहेर पडले, आजी, आजोबांना वृध्दाश्रमाची वाट धरावी लागली.मुलांना दारे,खिडक्यांच्या सोबतीमुळे ती भावनिकदृष्टया विकलांग होऊ लागली.मग पारिवारीक संबधात केवळ अर्थकारणच महत्त्वाचे नसते याची जाणीव झाली.भारतीय समाजातील स्त्रीवादाला अशा भावनिक गुंता गुंतीचे अधिष्ठान आहे.त्याचे चित्रच आजच्या मराठी साहित्यातुन दिसून येते.

मराठी साहित्यात अनेक स्त्री, पुरुषांनी स्त्रीवाद रेखाटला आहे, बाबूराव बागूल,पारु मदन नाईक,अनुराधा पाटील ,प्रतिभा अहिरे ,ललिता गादगे, आणि कितीतरी नावे सांगता येतील पण आमचा प्रश्न आहे, तो स्त्रीवाद संपला का ? या युगातील स्त्रीया लिहिताहेत पण त्यांचे लेखनाचे विषय कोणते आहेत ? किंवा अजूनही पुरुषी वर्चस्वामुळे तीचे लेखन मी भली आणि माझी अनुदिनी भली असे आहे का ? आपल्याला काय वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

मदतही करावी !

चर्चाप्रस्ताव जरी मराठी साहित्याशी संबधीत वाटत असला तरी,आपल्या आजूबाजूला लिहित असलेल्या,पत्रकार,सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पण वैचारिक भुमिका स्पष्ट असलेल्या स्त्रीया,डॉक्टर,वकील,अभियंत्या, प्राध्यापीका किंवा परदेशातील स्त्रीयांचे लेखन,पुरुषांची दृष्टी, ते अगदी सिमॉन द बेव्हे ( बरोबर आहे का उच्चार) यांचा स्त्रीवादी चळवळीवर झालेला परिणाम, इंग्रजी साहित्यातील स्त्रीवाद( फॅमिनिझम) असे या आणि सर्वच विषयाच्या सबंधी चर्चा झाली तर त्या आधारे एक चांगला लेख तयार होईल या अपेक्षेने हा चर्चा प्रस्ताव टाकला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी साहित्यातील स्रीवाद

स्त्रीवादाची पाश्चात्य तत्त्वे आणि भारतीय संदर्भ; यश आणि अपयश.
या विषयावरील माझ्या संशोधनाकरीता मला यचममु विद्यापीठाने नुकतीच एम्.फिल्. प्रदान केली आहे. जिज्ञासूंना हा प्रबंध http://www.marathimaitree.blogspot.com/ येथे वाचता येईल. प्रतिक्रियांचे स्वागत.

हम्म्!

बिरुटे सर,

चर्चेचा विषय आवडला पण इतके माझे वाचन नाही हो! त्यामुळे या मूळ विषयावर अक्कल पाजळणे योग्य नाही. तरीही,

अजूनही पुरुषी वर्चस्वामुळे तीचे लेखन मी भली आणि माझी अनुदिनी भली असे आहे का ?

या वाक्याबद्दल काहीसे खरडावेसे वाटले. मराठी अनुदिनीवरील अनुदिनी लक्षात घेऊ येथे. काही पाककृती, शोन्याने काल अस्सा त्राश दिला, आईची आठवण, खाऊची आठवण, लहानपण देगा देवा, प्रवासवर्णने या पलिकडे लेखन गेलेले दिसत नाही. यात स्त्रियाच नाही तर पुरुषही तितकेच मिळतात. काही अनुदिनी क्वचित वेगळ्या दिसतात पण कालांतराने तेथील लेखन बंद झालेले दिसते. याला केवळ पुरुषी वर्चस्व असे म्हणता येत नाही. हे एकंदरीतच आपले सामाजिक वर्चस्व आहे. (पर्यायाने, पुरुषी वर्चस्वाकडे अंगुलीनिर्देश होत असेल तर नाइलाज आहे.)

यांत विद्रोह, घुसमट होणारे किती असतील ते सांगता येत नाही. असावेत, परंतु त्यांची घुसमट शब्दांवाटे बाहेर येईल इतकी नसावी आणि असली तरी समोरचा वाचकवर्ग स्वीकारेल का?, आपल्या आयुष्यावर त्यामुळे काही नवे तरंग उठतील का? इ. इ. भीतीतून ती व्यक्त होत नसावी.

नाही बॉ!

अर्थातच जिजाबाई, शातकर्णी, अप्सरा, वगैरे विखुरलेले मोती ह्याला अपवाद आहेत :-)

तो प्रकारच वेगळा आहे. ते काही माझे अनुभव नाहीत. माझे अनुभव सांगणारी 'मनात आलं...' अनुदिनी यापेक्षा फार वेगळी नाही.

साधा घरगुती अनुभव लिहिताना 'बीअरचा शेवटचा घोट घेतला आणि सांगितलं चल आता झोपायला, मला मूड आहे, किती वेळ टिव्ही बघतोस?' (एक उदाहरण) असे साधे वाक्य लिहिताना देखील संस्कृती रक्षक वाचकांचा विचार एकदा तरी करावा लागतो तर सेक्स, मानसिक आणि आर्थिक कुचंबणा इ. अनुभव लिहिताना किती विचार करावा लागत असेल. कुठेतरी मराठी पांढरपेशं मध्यमवर्गीय मन आडवं येताना दिसतं आणि हे फक्त बायकांचचं नाही तर पुरुषांचही.

इथे एक उदाहरण आठवलं, मराठी विकिवर एक सदस्या लैंगिक शिक्षणावर लेख लिहित होत्या. त्याची मांडणी ज्ञानकोशाच्या तोडीची नव्हती. ती तशी असावी म्हणून लेखिकेला मदत करावी असे ठरले. हे करण्यास कोणीही पुरुष पुढे आला नाही! यावरून जालावर ही समस्या केवळ स्त्रियांत आहे असे नाही तर पुरुषांतही आहे असे वाटते.

जाणीवा

लेखनापुरताच विचार करायचा झाल्यास मला फार जास्त बोलता येणार नाही कारण सध्या नवीन लेखिकांचे जास्त वाचले नाही आहे. त्यामुळे माहिती नाही. माझा पुढचा सर्व प्रतिसाद त्यामुळे पूर्णपणे अस्थानी आणि विस्कळीत असण्याची शक्यता आहे.

स्त्रीवाद म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे माहिती नाही. पण स्त्रीविषयक लिखाण संपलेले वाटत नाही. एकेकाळी काही मासिके (उदा. स्त्री) सातत्याने स्त्रियांविषयी लेखन करीत. मिळून सार्‍याजणीत अजूनही असे लेखन छापून येत असते - ते वाचणारे स्त्री-पुरुष मला माहिती आहेत. स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बायका जास्त करून समाजवादी चळवळींमधल्याच असल्याने समाजवादी विचारांचा तसेच बाहेरच्या (पाश्चात्य) देशातील चळवळी/सेमिनार यातील अनुभव आणि पगडा त्यांच्या लेखनात दिसतो. पण माझ्यापुरते सांगायचे तर मला ते वाचायचा शेवटी वीट आला - शिवाय प्रत्येक दु:खाचे कारण कोणता ना कोणता पुरुष. शेवटी तर त्यांतील कथांतल्या बर्‍या-वाईट पुरुषांचीही दया यायला लागली.

पण तसेच नंतर मी स्वत: माझ्या डोळ्यांनी शिक्षण, पैसा, डोक्यावरचे छप्पर, मान आणि प्रतिष्ठा, पदरची मुले असे सर्व बघून बायका तशाच त्याच संसारात अन्याय सोसत राहिलेल्या पाहिल्या. काही थोड्याच मात्र त्यातून बाहेर पडल्या. पण माझ्या ओळखीतील अशा कुठच्याही स्त्रीने काहीही लिहीलेले नाही - घरात राहिलेल्या स्त्रीने नाहीच पण बाहेर पडलेल्या स्त्रीनेही नाही. पण हे सर्व गेल्या १० वर्षांतले.

आता मात्र मराठी आणि एकंदरीतच भारतीय समाज जागतिकीकरणातल्या एका लाटेवर स्वार असल्याचे वाटते. त्यामुळे पैसा आणि एकंदरीतच भौतिक सुखांच्या जाणिवा वाढलेल्या आहेत. जो पैसा कधी दिसला नव्हता तो आज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामाच्या ठिकाणच्या जाणिवा/जबाबदार्‍या वाढलेल्या आहेत. त्यात काही गोष्टी मनासारख्या होत नसल्या तरी नवरा-नातेवाईक- आईवडिल वगैरे अन्याय करतायत असा विचार करण्याइतका वेळही तरूण स्त्रियांना नसावा किंवा त्या नंतर बघून घेऊ म्हणून दुर्लक्ष करत असाव्यात. तसेच आता काळाप्रमाणे अनेक पुरुषही जास्त समजूतदार झाले आहेत असे दिसते. बायकाही जास्त बोलक्या झाल्या आहेत. (ह्यात गरीब कामकरी बायकांबद्दल बोलायचे नाही). त्यातील अनेकजणी अन्याय झाला तर वाद घालतात, भांडतात किंवा गेला बाजार जे अन्याय करतात त्यांना "सरळ" करायचा प्रयत्न करतात. आता एवढी जेथे उलथापालथ चालली आहे तेथे लिहायला वेळ कोणाला आहे? लिहीले तर पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगला संदर्भ तयार होईल हे मात्र खरे.

पण अजून जाणवते ते असे की अजूनही तंत्रज्ञान आणि एकंदरीतच "माहितीपूर्ण" लिहीणार्‍यांमध्ये बायका कमी आहेत. अगदी या संकेतस्थळांवर लिहीणार्‍यांमध्ये बायका किती आहेत? तसेच अनुदिन्यांवर/ लिखाणात प्रियाली म्हणतात तसेच मोकळेपणाचा अभाव असल्यासारखे वाटते. आपल्याविषयीच्या माहितीचा वापर कोण कसा करेल ह्याची साधार/ निराधार भितीही मनात असावी. काही बायकांनी ही कोंडी झाल्याने काही मासिकांमध्येही अनामिका म्हणून असे काही अनुभव लिहीलेले पूर्वी वाचलेले आठवतात.

अस्थाई

आपला प्रतिसाद सुसंगतच वाटला... अस्थाई वगैरे काही वाटला नाही.

शेवटी तर त्यांतील कथांतल्या बर्‍या-वाईट पुरुषांचीही दया यायला लागली.

अनेकदा आपल्या कडच्या कायद्यांच्या आधारे स्त्रीया घरात अनिर्बंध सत्ता गाजवतांनाही पाहिल्या आहेत. अगदी अकारण त्रास देतांनाही!

बाकी आपण म्हणता तसे लेखन चारचौघी व मिळून सार्‍याजणी मध्ये वगैरे आले आहे, येत असते. पण त्याची पोहोच पुणे मुंबई अशीच राहीली आहे.
अजूनही मी मनमोकळे (प्रक्षोभक?) वगैरे लिखाण करणारी लेखिका आठवली तर सहजपणे आठवत नाही. (फक्त प्रोतिमा बेदींचे नाव डोळ्यासमोर येते!)

तसेच मागच्या (मागच्याच्या मागच्या) पीढी मध्ये संतती नियमनावर बिंधास्तपणे मोकळे पणाने विचार करणार्‍या व काम करणार्‍या ज्येष्ठ महिला होवून गेल्या आहेत. पण त्या नंतर अशा (अवघड) विषयावर सहजेते मोकळेपणाने काम केलेल्या स्त्रीया दिसत नाहीत हेही खरेच.

आज अमेरिकेतल्या स्त्रीलाही 'बीयर चा घोट घेवून' हे शब्द टाकायचे की नाही याचा विचार करावाच लागतो आहे. सेक्स वगैरे तर लांबच आहे!
पण यात फक्त स्त्रीयाच का? किती पुरुष यावर लिखाण करतांना दिसतात? मी तर एकही मराठी अनुदिनी माझे शृंगारीक आयुष्य अश्या वगरे लेखनासाठी असलेली दिसली नाही. हा विषय चेष्टा करायला किंवा छी काहीतरीच काय म्हणून झटकून टाकायला सोपाच आहे. पण बारकावे टिपून दोन पानं लिहायला तितकाच अवघड आहे असे वाटते.

मलाही या विषयावर लिहायचे म्हंटले तर आधी स्वतःच्या मनातल्या एका मोठ्या 'ब्लॉकशी डिल करावे' लागेल असे वाटते.

आवांतरः
पण यावर लेखन करायला काय हरकत आहे असाही विचार आत्ता मनात डोकावला. जर अशी शृंगाराची / आपापसातल्या संबंधाची/(पॉवर गेमची पण्?) मानसीक स्पंदनं मी टिपली नि लिहीली तर ते लिखाण माहितीपूर्ण असेल का? मानसशाश्त्राच्या दृष्टीने नक्कीच असेल पण तरी उपक्रमावर राहील का? की त्याची 'काय फालतुपणा आहे हा?' अशी संभावना होईल? किती सदस्य यावर प्रतिक्रीया देतील?

आपल्याला काय वाटते?

आपला
गुंडोपंत

असे लेखन...

मानसशाश्त्राच्या दृष्टीने नक्कीच असेल पण तरी उपक्रमावर राहील का?

राहील की. न राहायला काय झाले? ऋतुजा आणि बच्चे कंपनीला दाखवायचं की नाही इतकंच ठरवावं लागेल. ;-)

इथे माझ्याबाबत बोलायचं झालं तर शिव्या आणि लैंगिक शिक्षण या दोन्ही लेखांना मी विकिवर बरीच मदत केली. त्यातून असं जाणवलं की माझ्या मनात लेखनाबद्दल ब्लॉक नाही परंतु असे लेखन प्रेझेंट करून स्वीकारायची अनेक वाचकांची तयारी नसते हे मनोगतावरील अनुभवांवरून म्हणता येईल त्यामुळे लिहावे तर कोणासाठी असा प्रश्न पडतो.

उपक्रमावर कोणी प्रयत्न करणार आहे का? गुंडो, तुम्ही कराच. पहिला प्रतिसाद माझा.

अवघड आहे!

गुंडो, तुम्ही कराच. पहिला प्रतिसाद माझा.

वा! प्रोत्साहना बद्दल आभारी आहे.
पण खरंच हा विषय सहजतेने मांडणे जमत नाहीये. प्रयत्न करून पाहीन!
इतरांनीही प्रयत्न करायला हरकत नाही.

आपला
गुंडोपंत

डीलींग

मलाही या विषयावर लिहायचे म्हंटले तर आधी स्वतःच्या मनातल्या एका मोठ्या 'ब्लॉकशी डिल करावे' लागेल असे वाटते.

नक्कीच करावं लागेल. मनात आलं... लिहिलं. इतक सोप नाही. स्वत:च्या मनात आलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्या अनुदिनीवर तरी लिहीता येतात का? प्रत्येकान आपल्या मनाला विचारुन बघावं. सामाजिक संकेत, लोक काय म्हणतील?, शी! काय संकुचित, घाणेरडे विचार आहेत. आम्ही तर तुम्हाला सज्जन समजत होतो. छे! काय विकृतपणा हा? छे बुवा आपण पापी! कुठे गेले तुमचे संस्कार? हेच का शिकवलं आई बापांनी? मग तुमच्यात आणि जनावरात काही फरक आहे कि नाही? लागलात का लाळघोटेपणा करायला? शेवटी गेलाच ना जातीवर ( पुरुष ही पण एक जातच बरं का?) किती ही सुधारले तरी मूळ पिंड काही जात नाही. आणिक बर्‍याच गोष्टींशी डील करावे लागेल . बाकी गोष्टी फील करता येतील. फड सांभाळ तुर्‍याला रे आला तुझ्या डीलींगला लागेल कोल्हा!

चित्त चळले ! चित्त चळले! रामाशिवा हरी मुकुंद मुरारी

प्रकाश घाटपांडे

लोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील?
हा मुख्य विषय या संदर्भात येतोच.
जी क्रिया करण्याच्या भागांनाच 'गुप्तभाग' म्हणतात, तर ती क्रिया गुप्त ठेवण्याचाच कल असणार ना? असो,
तरीही यावरचे लिखाण वाचले जाणारच आहे यात शंका नाही. प्रत्येकाला 'आपण केले' तरी दुसरे कसे करतात याचे अनादी आकर्षण आहेच.
आपला
गुंडोपंत

पुरवठा

हो असते. कितीही नाही म्हटले तरी सुप्तपणे असते. परंतु मागणी आहे म्हणून प्रत्येक मागणीसाठी पुरवठा हा झालाच पाहिजे का, हा प्रश्न आहे.

मागणी वाढली आणि पुरवठा मात्र् झालाच नाही तर तो प्रश्न न बनता समस्या होते. समाज हा व्यक्तींचा समूह आहे. त्यामुळे अशा समस्यांची संख्या वाढत गेली कि त्या व्यक्तिगत न बनता सामाजिक बनतात. त्याची सोडवणुक जर कुणी समाजाला मान्य नसलेल्या पद्धतीने केली कि तो गुन्हा ठरतो. गुन्ह्याची सार्वत्रिक व्याख्या करता आलेली नाही. ती संकल्पना म्हणुनच आहे. एखादा 'शिष्टसंमत' आचार स्थलकाल समाज सापेक्षतेने 'भ्रष्टसंमत' होतो. सगळेच चोर झाले तर साव कुणाला म्हणायच? कुणीतरी 'साव' आहे म्हणुन कुणीतरी 'चोर' आहे.

प्रकाश घाटपांडे

सही!

सिग्निफिकंट अदर
हे सही! :)

एकदम पोलिटिकली करेक्ट हां!!

आपला
गुंडोपंत

धरु

खरंय! धरू नयेत!

आपला
गुंडोपंत

करा मग सुरुवात!

पुरुषलेखकांकडून का नाही? होऊन जाऊ द्या की!

चला करा मग सुरुवात!
:)
आम्ही आहोतच प्रतिसाद् द्यायला
आपला
गुंडोपंत

काही कारण

मुळात मला 'इतके माहीतीपुर्ण' लिखाण करणे जमत नाही!
'माहितीपूर्ण लेखा'च्या नुसत्या फॉर्मॅटातच नव्हे, तर

हा फॉर्मॅट कसा असतो हे आम्हाला माहीती नाही.
असा कुठे आम्हाला इथे तरी दिसला नाही. असल्यास द्यावा आम्हाला जेंव्हा कधी काही माहीती मिळेल ती त्या फॉर्म्याटात बसत असेल तर आम्ही नक्कीच लिहु.

केवळ माहिती देणे या विशुद्ध हेतूतून स्रवलेले असेल, आणि ऍनालिटिकल

माहीती देण्याच्या विशुद्ध हेतुतून स्रवलेले इतर ऍनेलेटिकल लेखन वगैरे जड शब्द आम्हाला काही झेपत नाहीत बॉ.

तुम्हीच लिहा हे माहीती देण्याच्या विशुद्ध हेतुतून स्रवलेले इतर ऍनेलेटिकल लेखन!

मग आमच्यासारख्या माठांनाही कळेल की कसे लिहितात ते!

आपला
कच्चा माठ
गुंडोपंत

मला भेदरवणारा स्त्रीवाद

कदाचीत अवांतर वाटेल (तसे वाटल्यास क्षमस्व आणि दुर्लक्ष करू शकता)

झी टि. व्ही. वरील मालीका पाहील्या की मी भारतीय स्त्रीया म्हणजे (सरसकट), काय डेंजर काम आहे या कल्पनेने मी गांगरून जातो!

मजा म्हणजे या मालीकांमधे कायम, चांगल्या वाटणार्‍या सगळ्याच स्त्रीया अतिशय वाईट असतात पण रावण मालीकेतील कैकयी मात्र सज्जन आणि विचारी आहे. ती गोष्ट कदाचीत लॉजीकल असेलही, पण शुर्पणखा पण चंद्रनखा म्हणून चांगलीच घेतली आहे.

स्त्रीचे इतके व्हिलनीश रूप सतत टि. व्ही मालीकांमधे (त्यात वेषभूषा तर विचारूच नका!) दाखवून आजकालचे हे जबरदस्तीने फेमस झालेले सोप्स नक्की काय मिळवतात?

झी टीव्ही वर ?

नुसत्याच झी टीव्ही वर नाही तर तमाम हिंदी-मराठी मालिकांमधली जवळजवळ प्रत्येक स्त्री खुनशी आहे. गंगाधर टिपर्‍यांची सून श्यामल सोडली तर!--वाचक्‍नवी

पिंक

''मराठी साहित्यातील स्त्रीवाद '' ह्या विषयामूळे गोची झाली आहे म्हणजे नेमकी ''मराठी साहित्यातील " ह्या भागामूळे. जास्त अभ्यास् नाही. (मी वाचक्‍नवी यांच्या उत्तराची वाट पहात् आहे. त्यांच्याकडे कठीण वाटणार्‍या प्रश्राची माहीती / उकल फटकन होते. बोलून चालून आम्ही पडलो वाचन्कमी)

तर मी फक्त जमेल तसे ह्या पानावर आलेले शब्द घेऊन बोलतो. स्त्रीवाद, प्रत्येकाच्या (पुरूषाच्या) आयूष्यात हे होतेच. आधी आई, आज्जी, बहीण प्रॅक्टीस झाली की आयुष्यभर बायको नंतर मूलगी. बहूदा तोवर वादाची इच्छा इतकी क्षीण झाली असते की मूलगी बरोबर सगळी फळे घेऊन जाते, ज्याला बायको बर्‍याचदा मुकली असते.

सरासरी विचारकरता, पुरूषाने जगभर जसे बाहेरचे जग चालवले तसे स्त्रीने पडद्यामागचे. लेखनात पण शिक्षण पुरूषांचे जास्त म्हणून लेखनपण जास्त. ज्या स्त्रीला जेव्हा जशी संधी मिळाली तिने त्याचे सोने केलेच. स्त्रीयांना जेव्हा अन्याया विरूध्द सामना करावा लागला तेव्हा बर्‍याचदा हार किंवा तडजोडच केली. म्हणजे जेव्हा तिने आपल्या अन्यायाला वाचा फोडली तर अन्याय दूर् झाल्यावर समजोता, माफी करून विसरून गेली. लिहावे, इतरांना जाण करून द्यावी असे काही जास्त घडले नाही जेवढे कदाचीत पाश्चीमात्य देशात घडले.

सामाजीक दडपण म्हणू शकता की स्त्रीने जास्त वाद होणार नाही असे काव्य, पाककृती, धार्मीक, घरगूती असेच लेखन केले. कदाचीत आपल्यामूळे आपल्या घराची/घराण्याची/लोकांची बदनामी नको म्हणून देखील असेल. कारण घराचे घरपण बाईमूळेच हा नियम. पण वेळोवेळी कोणानकोणत्या "ज्योती"ने असंख्य भगीनींना अंधारातून वाट दाखवलीच. (प्रत्यक्ष म्हणजे शिक्षीका म्हणून किंवा वक्त्या म्हणून, पेपर मधून, रेडीओ, दूरर्दशन, नाटक, सिनेमा माध्यमातून, झाशीची राणी ते इंदीराजी ते यशस्वी उद्योजीका. फक्त मुलींच्या शाळेत शिकलेल्यांना आठवत असेल दरवर्षी कोणतरी प्रमूख पाहूण्या..)

आत्ताचे लेखन म्हणाल तर नाव् आठवत नाही पण त्या रिर्झव्ह बँकेत नोकरी करणार्‍या (बहूदा ३ का ४ अक्षरी आडनाव असलेल्या) लेखीका वेगवेगळे विषय हाताळत आहेत. स्त्रीवाद -दु:खाचे कारण कोणता ना कोणता पुरुष असे लेखन जास्त काळ टीकणार नाही. स्त्रीया जेव्हा वेगवेगळ्या विषयावर निसंकोचपणे लेखन करून स्त्री म्हणून एक वेगळा प्रकाश टाकतील तेव्हा साहीत्यात खरा स्त्रीवाद (का स्त्रीमूक्ती) म्हणायचे?

आंतरजालावरील स्त्री साहीत्याला पण नाही म्हणले तरी काव्य, अनूभव, स्त्रीयांच्या प्रश्रांची उकल (agony aunt type) असे नक्कीच तरी महत्व आहे. कारण त्याचा वापर खूप आहे. जागतीककरणाच्या काळात बरेचसे असे बायकांचे ब्लॉग्ज् आहेत की त्यांच्या लिखाणामूळे (अगदी वैयक्तिक ते फॅशन) दरमहा काही हजार डॉलर्स् ब्लॉग्ज् जाहीरतींमूळे उत्पन्न आहे.

इज्जत, आब्रू, बदनामी ह्यामूळे अनामीक स्त्रीसाहीत्याचे आजवर नेहमीच जास्त योगदान राहीले आहे. पण काळ बदलतो आहे अमेरीकेत टॉकशोज् मधे कित्येकजण स्वतःहून आपली कथा सांगायला येतात, पुस्तके लिहतात त्यातले सगळेच फक्त पैसे, प्रसिध्दीच्या मोहाने येत असतील असे नक्कीच नाही. जागतीककरणाचा असाही फायदा दिसून येईल येत्या काही वर्षात आपल्या मराठी साहीत्यात.

सहीच!

बहूदा तोवर वादाची इच्छा इतकी क्षीण झाली असते की मूलगी बरोबर सगळी फळे घेऊन जाते, ज्याला बायको बर्‍याचदा मुकली असते.
हे सहीच!

पण यात् आई आज्जी पण येते का? मला तरी नाही जाणवले असे.
असो,

पण हे वाद का होतात हा ही प्रश्नच आहे.
बायको आधी नवर्‍याला आपल्या मनासारखे वागायला भाग पाडून बदलते नि मग म्हणते की "लग्नाआधी किती वेगळा होता!" मी ज्याच्याशी लग्न केले तो हा नव्हेच! ;)

आपला
गुंडोपंत

मेघना पेठे

आत्ताचे लेखन म्हणाल तर नाव् आठवत नाही पण त्या रिर्झव्ह बँकेत नोकरी करणार्‍या (बहूदा ३ का ४ अक्षरी आडनाव असलेल्या) लेखीका वेगवेगळे विषय हाताळत आहेत.

म्हणजे तुम्हाला मेघना पेठे म्हणायचय का?
प्रकाश घाटपांडे

यस

बरोब्बर

सहज सुंदर प्रतिसाद !

सहजराव,
प्रतिसाद सहीच आहे !

इज्जत, आब्रू, बदनामी ह्यामूळे अनामीक स्त्रीसाहीत्याचे आजवर नेहमीच जास्त योगदान राहीले आहे. पण काळ बदलतो आहे अमेरीकेत टॉकशोज् मधे कित्येकजण स्वतःहून आपली कथा सांगायला येतात, पुस्तके लिहतात त्यातले सगळेच फक्त पैसे, प्रसिध्दीच्या मोहाने येत असतील असे नक्कीच नाही. जागतीककरणाचा असाही फायदा दिसून येईल येत्या काही वर्षात आपल्या मराठी साहीत्यात.

सही ! तसेच लेखन मराठी साहित्यात आणि जालावरील लेखनात व्हावे ही अपेक्षा.

सामाजीक दडपण म्हणू शकता की स्त्रीने जास्त वाद होणार नाही असे काव्य, पाककृती, धार्मीक, घरगूती असेच लेखन केले. कदाचीत आपल्यामूळे आपल्या घराची/घराण्याची/लोकांची बदनामी नको म्हणून देखील असेल.

जालावरील स्त्रीयांच्या लेखनामागे हेही एक कारण असेल म्हणूनही तसे होत असेल ! खरे तर आणखी काही विचार याबरोबर मांडू शकला असता तर या विषयाला आणखी गती आली असती असे वाटते !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो

अशी शृंगाराची / आपापसातल्या संबंधाची/(पॉवर गेमची पण्?) मानसीक स्पंदनं मी टिपली नि लिहीली तर ते लिखाण माहितीपूर्ण असेल का?
माहितीपूर्ण नक्कीच असेल! उपक्रमावरच्या खरडवह्याही माहितीपूर्ण असतात!!

उपक्रमावर राहील का? की त्याची 'काय फालतुपणा आहे हा?' अशी संभावना होईल? किती सदस्य यावर प्रतिक्रीया देतील?
लेख राहील असे वाटते ('उपक्रम" च यावर जास्त बोलू शकतील).- पण एकंदर लेखनाचा कल आणि भाषा कशी आहे त्यावर अवलंबून राहील असे वाटते. प्रतिक्रिया देणे, न देणे हे सदस्यांच्या आवडीवर अवलंबून आहे (आणि वेळेवरही).

जागा चुकली

प्रतिसादाची जागा चुकली. माझा वरील प्रतिसाद गुंडोपंतांना आहे.

अच्छा

माहितीपूर्ण नक्कीच असेल! उपक्रमावरच्या खरडवह्याही माहितीपूर्ण असतात!!

म्हणजे तेव्हढ्याच लायकीचे वाटू शकेल असे दिसते आहे :(
जावू देत मग हा 'सेल्फ इन्क्वायरीचा' मार्ग नकोच ;))

आपला
गुंडोपंत

नाही नाही

अहो, गंमत केली.
तुम्ही असा लेख नक्की लिहा, आम्ही वाचू आणि प्रतिसादही देऊ.

पण उपक्रमावरच्या खरडवह्या खरोखरच माहितीपूर्ण असतात असा माझा निष्कर्ष आहे.

सही !

काही पाककृती, शोन्याने काल अस्सा त्राश दिला, आईची आठवण, खाऊची आठवण, लहानपण देगा देवा, प्रवासवर्णने या पलिकडे लेखन गेलेले दिसत नाही.

प्रियालीजी,
हेच तर महत्वाचे आहे,याचे एक कारण स्त्रीत्वाच्या आणि पुरुषत्वाच्या या चौकटी समाजाने तयार केल्या आहेत आणि स्त्री, पुरुषांनी लादलेल्या चौकटीप्रमाणे न वागणा-या स्त्रीला पुरुषी समजले जाते. नैसर्गिक फरक सोडला तर स्त्री पुरुषाच्या इतकीच किंवा पुढेही तीचा विकास करु शकते पण तीचे पंख छाटण्याचे काम समाजातून होत असते आणि आताही होत आहे असे वाटते.त्याचे आणखी एक कारण स्त्रीचा विकास स्रीच रोखते ? आणि तीच तीला घडवते म्हणून काही पाककृती, शोन्याने काल अस्सा त्राश दिला, आईची आठवण, खाऊची आठवण, लहानपण देगा देवा, प्रवासवर्णने या पलिकडे लेखन गेलेले दिसत नाही.
सिमॉन द बॉव्हा या फ्रेंच स्त्रीवाद लेखिकेने आपल्या 'द सेकंड सेक्स'(१९५३) या गाजलेल्या पुस्तकात म्हटले आहे की,स्री ही कधी जन्माला येत नाहे,तर स्त्रीकडूनच स्त्री घडवली जाते.स्त्रीवादाचे मर्म या वाक्यात दिसते.

चित्राजी,
आपण स्त्रीवाद म्हणजे काय विचारुन स्वतःच त्याचे उत्तर दिले आहे. स्वतःच्या समाजातील स्थानाचा शोध घेणे आणि तो साहित्यातुन मांडणे.पुरुषप्रधानतेच्या समाजातील जागा व स्तर शोधणे आणि त्याविरुध्द लेखन करणे त्यांच्या लेखनात पुरुषप्रधानतेविरुद्ध लेखन करुन चळवळीतून संघर्षाचा विडा उचलणे.स्त्री पुरुष समानतेवर आधारलेले नवे विश्व निर्माण करावे हा स्त्रीवादी विचाराचा उद्देश असावा.

पण तसेच नंतर मी स्वत: माझ्या डोळ्यांनी शिक्षण, पैसा, डोक्यावरचे छप्पर, मान आणि प्रतिष्ठा, पदरची मुले असे सर्व बघून बायका तशाच त्याच संसारात अन्याय सोसत राहिलेल्या पाहिल्या. काही थोड्याच मात्र त्यातून बाहेर पडल्या. पण माझ्या ओळखीतील अशा कुठच्याही स्त्रीने काहीही लिहीलेले नाही - घरात राहिलेल्या स्त्रीने नाहीच पण बाहेर पडलेल्या स्त्रीनेही नाही. पण हे सर्व गेल्या १० वर्षांतले.
हे चित्र फारसे बदलले आहे असे वाटत नाही. काही स्त्री आणि पुरुषाच्या अनुदिन्या असू दे की, सार्वजनिक लेखन. स्त्री स्वतःपुरतेच विचार करतांना दिसते, त्याचबरोबर सामाजिक चौकटीबाहेर लिहितांना दिसत नाही आणि पुरुष म्हणून आमचे लेखन पुरुषीवर्चस्वाच्या अहंकाराने भरलेली दिसतात.
पण अजून जाणवते ते असे की अजूनही तंत्रज्ञान आणि एकंदरीतच "माहितीपूर्ण" लिहीणार्‍यांमध्ये बायका कमी आहेत. अगदी या संकेतस्थळांवर लिहीणार्‍यांमध्ये बायका किती आहेत? तसेच अनुदिन्यांवर/ लिखाणात प्रियाली म्हणतात तसेच मोकळेपणाचा अभाव असल्यासारखे वाटते. आपल्याविषयीच्या माहितीचा वापर कोण कसा करेल ह्याची साधार/ निराधार भितीही मनात असावी.

चर्चाप्रस्तावाचे समाधान करणारे उत्तर आहे की,अजूनही या दशकातील स्त्री, लेखन करतांना मनात एक भिती बाळगून वावरतांना दिसते.म्हणजे समाज कितीही प्रगत होऊ दे,मात्र स्त्री अजूनही फार बदललेली नाही. आपल्या प्रतिक्रियबद्दल धन्यवाद. अजून काही मुद्दे असतील तर येऊ द्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्री ही कधी जन्माला येत नाही

One is not born a woman but made. - हे तर ते वाक्य नाही? अगदी तसेच नसेल तरी अर्थ तसाच आहे. हे मी मागे मनोगतावरही लिहिले होते. मला पटते.

ह्म्म

,स्री ही कधी जन्माला येत नाहे,तर स्त्रीकडूनच स्त्री घडवली जाते.
खरं आहे.

आजच एक अमेरिकन गोरी मुलगी पाय फताडे ठेवून मैत्रिणीबरोबर चकाट्या पिटत सबवे मध्ये उभी होती. आपल्याकडची मुलगी असती तर तिला नक्की आई-आजीने हटकले असते.
काही गोष्टींचे काही ठिकाणचे संकेत असतात तसे न वागल्यास ते चुकीचे समजले जाते. मुलांकडूनही अशीच एक प्रकारच्या टगेपणाची कल्पना केलेली असते. त्यात न बसणारे व्यक्तिमत्व असले की त्रास होतो. भिती असते ते असे संकेत तुडवण्याची आणि त्यामुळे समाजाकडून तिरस्काराची वागणूक मिळायची. ही भिती माझ्या मते स्त्री आणि पुरुष दोघांनाही असते, त्यातही स्त्रियांची कुचंबणा अधिक होते. जातायेता पुरुषाप्रमाणे च्यायला आयला म्हणणार्‍या स्त्रियाही मी पाहिल्या आहेत. सुरुवातीला गंमत वाटली तरी नंतर त्याही "चौकटी"तून बाहेर पडता येत नसले तर तेही चांगले नाही.

माझ्या (सध्याच्या) मते स्त्रीला आपला असा एकतरी छंद, विरंगुळा, हक्काचे स्थान असले पाहिजे की ज्यात/जेथे ती थोडा वेळ का होईना स्वतः स्वतःला पूर्ण "एक्स्प्रेस" करू शकेल आणि तिच्या त्या वेळावर कोणाचाही अधिकार नाही. लेखनातूनच असे झाले पाहिजे असे नाही. मुक्ती म्हणजे तरी काय? स्वतःला हवे तसे असणे असेच ना? मग माझ्या मते भारतीय स्त्री आणि पुरुष दोघांनाही अशा मुक्तीची गरज आहे. नुसती स्त्रियांनाच नाही. अर्थात बदल झाले पाहिजेत प्रथम ते बायकांमध्येच, कारण त्या बर्‍याच मागे आहेत.

माझी सध्याची मते जरा गोंधळात टाकणारीच आहेत. त्यामुळे मूर्खपणाची वाटण्याची दाट (आणि योग्य) शक्यता आहे.

बाथरूम सिंगर्स्

>>स्वतःला पूर्ण "एक्स्प्रेस" करू शकेल

असे हक्काचे ठीकाण म्हणजे आपला ब्लॉगच असू शकते बाकी मनन चिंतनच.

इतर सार्वजनीक जागी कधी लाज आडवी येते किंवा प्रशासन.

------------------------------------------------------------------------------------------
जेव्हा स्वतःची ओळख पूर्ण झाली नसते तेव्हा दुसर्‍याला अनकंर्फटेबल करण्याची प्रबळ इच्छा असते, नंतर मग सगळा वेडेपणा वाटतो.

प्रामाणिक मत

माझी सध्याची मते जरा गोंधळात टाकणारीच आहेत. त्यामुळे मूर्खपणाची वाटण्याची दाट (आणि योग्य) शक्यता आहे.

आपले मत आम्हाला प्रामाणिक वाटते. इतरांना गोंधळात टाकणारी असतील तर ते मंथन समजावे

प्रकाश घाटपांडे

असेच नाही...

त्यातही स्त्रियांची कुचंबणा अधिक होते.

असं कशा वरून? किती मुलांना १००% 'सध्याची पुरुष असण्याची' व्याख्या हवी आहे? कशा वरून त्यांना कुटूंबाचा प्रमुख हीच भुमीका हवी आहे असाही प्रश्न येवूच शकतो ना?

जसे बायका बिछान्यात नि एकट्यात असतांना काय करतात हे लिहित नाहीयेत, तसेच पुरषही लिहीत नाहीयेत. संकोच नि भीड दोघांचीही सारखीच आहे.

बायका, आई, घर, प्रवास, मायग्रेशन यावर लिहीत आहेत तसेच पुरुषही त्याच विषयांवर लिहीत आहेत. शेअर्स सारख्या विषयांत स्त्री व पुरुष 'दोघेही' रुचि दाखवत आहेत. इंटरनेट सिक्युरीटीची काळजी दोघांनाही तितकीच वाटते आहे. विकास यांनी म्हंटलेल्या मालिकांमध्ये पुरुषही वाईट नि पाताळयंत्री नाहीयेत का? (मालिकेवर व कथेवर आधारीत सापेक्षता गृहीत धरून!)
जालावरील लेखनाचा मागोवा घेतांना या गोष्टी विचारात घेणे अपरिहार्य आहे.

असो, मला इतकेच म्हणायचे आहे की, बदललेल्या वास्तवाचे भान ठेवता, स्त्रीवाद हा आता फक्त स्त्रीवाद या दृष्टीकोनातून न पाहता, व्यक्तीवादाच्या दृष्टीकोनातून पाहणे अधीक योग्य ठरेल.

आपला
गुंडोपंत

होय पण

त्यातही स्त्रियांची कुचंबणा अधिक होते.
सामाजिक नियम हे स्त्रियांना जास्त पाळावे लागतात, हे तर खरे? नियम अधिक, स्वातंत्र्य कमी, हे असल्याने असे म्हटले.

किती मुलांना १००% 'सध्याची पुरुष असण्याची' व्याख्या हवी आहे? कशा वरून त्यांना कुटूंबाचा प्रमुख हीच भुमीका हवी आहे असाही प्रश्न येवूच शकतो ना?

हे मान्य.

स्त्रीवाद हा आता फक्त स्त्रीवाद या दृष्टीकोनातून न पाहता, व्यक्तीवादाच्या दृष्टीकोनातून पाहणे अधीक योग्य ठरेल.

मला वाटते मलाही असेच काही म्हणायचे आहे.

गोंधळात टाकणारी ?

गोंधळात टाकणारी कसली ? चित्राबाईंच्या मताशी मी तंतोतंत सहमत आहे.

जातायेता पुरुषाप्रमाणे च्यायला आयला म्हणणार्‍या स्त्रियाही मी पाहिल्या आहेत.
दर दोनचार वाक्यांनंतर "माणसाची विष्ठा" किवा "बैलाची विष्ठा" तर ठरलेली!--वाचक्‍नवी

पटले

शिव्यांचा भावनिक उपयोग लक्षात घेता, तो उपयोग स्त्रिया आणि पुरुष दोघे योग्य ठिकाणी करून घेणार. स्त्रैण बोलीतल्या आणि पुरुषी बोलीतल्या शिव्या वेगळ्या होत्या कारण ते दोन समाज दिवसभर तरी वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत. दोन समाज एकत्र आले की शिव्या प्रमाणीकृत ("स्टँडर्डाइझ") होतील हे नैसर्गिक आहे. त्या मानाने स्त्रैण बोलीतून फारच थोड्या शिव्या एकत्रित बोलीत आल्या आहेत.

अगदी ओढूनताणून उदहरण द्यावे तर इंग्रजीतल्या कुत्रिणीचे. हिचा अर्थ (म्हणजे ज्या भावनावशतेत वापरायची ती जागा, प्रसंग, संदर्भ) हा स्त्री-पुरुषांत वेगवेगळा होता. पण हल्ली पुरुषही पूर्वीच्या स्त्रैण संदर्भात वापरतात. पण असे अपवाद खूप कमी. साधारणपणे स्त्री-पुरुष एकत्रित समाजात पूर्वीच्या स्त्रैण शिव्या बादच झालेल्या आपल्याला दिसते. "कार्टा" सारखा बोचरा, खरखरीत उच्चारासारखा, मूळ अर्थाच्या दृष्टीने भयंकर, असा सणसणीत शब्द सामान्य एकत्रित बोलीतून शिवी म्हणून बाद व्हावा, यात त्या शब्दाची चूक नाही. याला जबाबदार स्त्री-पुरुषांचे समाजातले वेगवेगळे स्थान आहे, असे वाटते. हे स्त्री-पुरुष समाजांचे एकत्रीकरण समसमानांचे नाही. इथे बहुतेक स्त्रियांना पुरुष समाजात सामावून जावे लागते (ऍसिमिलेट), त्यामुळे पुरुषांची बोली स्वीकारावी लागते. पुरुषांना मात्र स्त्रियांच्या दर्जेदार शिव्या आपल्या बोलीत घेण्यात कमीपणा वाटत असावा. दर्जेदार माल असेल तर वापरण्याबाबत असा वृथाभिमान तोट्याचा आहे.

मग

अजूनही या दशकातील स्त्री, लेखन करतांना मनात एक भिती बाळगून वावरतांना दिसते.
मग पुरुष अशी भीती बाळगतच नाहीयेत का?
कशावरून? असे स्टेटमेंट आपण करू शकलात असे वाटते?

मला वाटते की तंत्रज्ञान 'आधी' कळण्यामुळे काही फायदे काही लोक घेत असणार... पण त्यात स्त्रीया नाहीतच का?

मागे जालवर लिहीतांना पुरुष स्त्रीयांची नावे घेवून लिहीतात असे काहीसे वाचले होते, कशावरून स्त्रीयाही पुरुषांच्या नावाने लिहीत नाहीयेत?
आपली अभिव्यक्ती कशी एक्सप्रेस करावी याला असलेले बंधन आता या आंतर जालाने काढून टाकले आहे. बॉद्रीयार्दचे सिम्युलक्रा सिम्युलेशन आता प्रत्य्क्षात उतरले आहे.

'सेकंड लाईफ' कसे असावे हे ठरवण्याची मुभा जालामुळे मिळाली आहे, मग ही आपण उल्लेखलेली भीती फक्त सेकंड व फर्स्ट लाईफ 'एकत्र' तर होत नाहीये ना इतके पाहण्यापुरतीच उरली आहे असे वाटते.

आपला
सिम्युलेटेड गुंडोपंत

आमचे म्हणने !

पंत,
हा चर्चा प्रस्ताव टाकण्यापुर्वी काही अनुदिन्या चाळल्या,काही लेखन वाचले आणि आलेल्या काही प्रतिसादावरुन
अजूनही या दशकातील स्त्री, लेखन करतांना मनात एक भिती बाळगून वावरतांना दिसते. असे आमचे स्वतंत्र मत व्यक्त केले आणि ते अंतिम मानण्याची गरज नाही ! आम्ही केलेले विधान चूकही असू शकते.

स्त्री दु:खाचा एक वेगळा पराकोटीची वेदना आणि येणा-या दिवसाची वाट पाहणे आणि तिन्ही सांजेला हायब्रीडच्या भाकरी बडवणे एवढे झाल्यावर शिणलेला देह जमिनीवर टेकवावा म्हटलं तर " कामाला जातीस का मिस्तरीसंग नखरे करायला जातीस ?" असे म्हणत नवरा कंबरेत लाथ हाणतो,ललिता गादगेची कविता ती वेदना प्रकट करते,

" वाटलं तोडून मोडून खोपटं
पळत जावं झनान कुठंबी
पर म्हंत्यात नव्हं
बाई म्हणजे कणकीचा गोळा
मदी ठिवांव तर उंदरं टोकरत्यात
भाईर ठेवावं तर कावळं
रोजचंच हाय मनले नि
गपगार निजले
पर डॊळ्याच्या पान्यात
रातर भिजायची ती भिजलीच "
बाईला कनकीचा गोळा म्हणन्यात जो स्त्रीवाद दडलेला आहे तो अस्वस्थ करणारा आहे, इतकेच आमचे म्हणने आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवघड

विषय महत्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. मला वाटते यात वेगवेगळ्या देशांच्या संस्कृती(कल्चर)चा मोठा वाटा आहे. पाश्चात्य देशांचा विचार केल्यास अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सार्वजनिक आचारांबद्दल काही बंधने आहेत. त्यामानाने इटली, फ्रान्स, हॉलंड यासारख्या देशात लैंगिकतेच्या अभिव्यक्तीला मोकळीक आहे. आणि भारतातील परिस्थिती आपल्याला माहीतच आहे. ढोबळमानाने विचार करताना लैंगिकतेची मोकळीक हा निकष धरल्यास मिडल इस्ट सारखे देश एका टोकाला, मग भारत, चीन, मग अमेरिका, ब्रिटन आणि शेवटी इटली, हॉलंड वगैरे.
इथले उदाहरण द्यायचे झाले तर इथे बरीच मोकळीक आहे असे वाटते. उदाहरणार्थ मागे एका पार्टीमध्ये सहकार्‍यांबरोबर गप्पा चालल्या होत्या (यात स्त्री-पुरुष दोन्ही होते.) एका सहकार्‍याच्या टीन-एजर मुलीचा नुकताच मासिकधर्म सुरू झाला होता आणि तो याबद्दल सांगत होता. "कालपर्यंत एवढीशी मुलगी आणि आता एकदम मोठी झाली हे स्वीकारायला अवघड आहे, वगैरे". सांगायचा मुद्दा हा की ही सर्व चर्चा मोकळेपणाने आणि नैसर्गिक वाटावी अशी होती. हीच गोष्ट सेक्स किंवा इतर लैंगिकतेच्या गोष्टींबाबत दिसते. स्त्री आणि पुरूष यावर मोकळेपणाने चर्चा करतात, कुठेही संकोच वाटू न देता.
मला वाटते स्त्रियांची अनुदीनीही बदलते आहे. बर्‍याच अमेरिकन किंवा युरोपिअन स्त्रियांच्या अनुदिन्यांवर सेक्स किंवा इतर गोष्टींचा उल्लेख आढळतो. भारतीय स्त्रियांच्या बाबतीत प्रियाली यांनी म्हटल्याप्रमाणे चाकोरीच्या बाहेर लिखाण फारसे आढळत नाही. भारताबाबत बोलायचे तर गाडी पुन्हा त्याच मुद्यावर येते, लैगिकतेच्या बाबतीत आपले दुटप्पी धोरण, यावर बर्‍याचदा चर्चा झाली आहे.
हे विषयांतर झाले नसावे अशी आशा करतो.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद

बिरुटेसाहेब, माझा प्रतिसाद लिहिताना लांबला म्हणून वेगळ्या लेखात येथे लिहिला आहे. आपल्याला न विचारताच, तसे स्वातंत्र्य घेतले त्याबद्दल क्षमस्व.

आभार !


साहित्यातील स्त्रीवादाच्या निमित्ताने चर्चेत सहभागी झालेल्या प्रियाली,सर्किट,चित्राजी,गुंडोपंत,घाटपांडे साहेब,विकास,सहज,राजेंद्र आणि नंदन आपले सर्वांचे आभार मानतो, पण अजूनही ही चर्चा संपलेली नाही असे अनेक मुद्दे आहेत ज्याची चर्चा कधीतरी आणखी होऊ शकेल आम्हाला मात्र लेखनासाठी विचारांचे अनेक दरवाजे यानिमित्ताने उघडले गेले आहेत असे वाटते ! धन्यवाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेशेठ,

लय भारी अन् वैचारिक लेख. आपलं तर काय बा एवढं वाचनच नाही त्यामुळे लेख समजायला थोडा कठीणच गेला..

ह्या चर्चेला आलेले प्रतिसादही खूप वैचारिक वाटले. आपला तर काय बा एवढा व्यासंगच नाही त्यामुळे अधिक काही लिहू शकत नाही..

तात्या.

खास आग्रहास्तव

स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे अशी समाज सुधारकांनी कितीही मागणी केली तरी, स्त्रिया आणि पुरुष मूलतः वेगळे आहेत हे त्यांना मनोमन माहीत असते. अपत्यधारणेसाठी स्त्रियांना दिलेल्या खास शरीरामुळे त्या निसर्गत:च थोड्या नाजूक असतात. या नाजूकपणातूनच त्या लाजाळू होतात. नाजूक देहावरच लज्जा शोभून दिसते. संकोच, लज्जा, शरम आणि लाजलज्जा या पायर्‍यांपैकी पहिल्या दोनच , सुसंस्कृत स्त्री चढते. शरमेने मान खाली घालायला लागणारे काम आपल्या हातून होऊ नये याबद्दल तिचे संस्कार तिला मदत करतात. लाजलज्जा कोळून पिणे तिच्या कल्पनेतही नसते.
मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे नटणे, मुरडणे, भ्रुकुटिविलास, भ्रुकुटिभंग करणे, नाक उडवणे, गाल लाल करणे, किंचित हसणे, हळूच लाजणे, नजर चुकवणे, मान वेळावणे, पायाच्या अंगठ्याने जमीन उकरण्याचा अभिनय करणे, अंगावरल्या वस्त्राशी चाळा करणे इत्यादी अनेकानेक आयुधे असताना ती मागताना संकोच वाटेल अशी मागणी करताना शब्द कशाला वाया घालवेल?
अंगुर चित्रपटातली मौशुमी चटर्जी आपल्या नवर्‍यासारख्या दिसणार्‍या संजीवकुमारला, तिच्यासमोर कपडे बदलताना आढेवेढे घेताना पाहून म्हणते, "जैसे मैने आपको कभी 'वैसे' देखाही नही!" "'वैसे' यानी? आपने हमे 'नंगा' देखा हैं? या संजीवकुमारच्या पृच्छेला लाजून, "छीः! ऐसे बोलते नही." म्हणते. एकांतातदेखील 'असभ्य' शब्दाचा वापर ती स्वत: तर करीत नाहीच, पण नवर्‍यानेपण केलेला तिला आवडत नाही. ही भारतीय स्त्री!
घटस्फोटाच्या एका खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ति सत्यरंजन धर्माधिकारींनी नुकतेच एका आदेशानुसार पतिपत्‍नींच्या खासगी बाबींचा असभ्य भाषेत केलेला उल्लेख बेकायदेशीर ठरवला आहे. नाहीतरी त्या दोघांनी आपापसात केलेला संवाद गुन्ह्याच्या खटल्यात साक्ष म्हणून ग्राह्य धरला जातच नाही.

मुलगा आणि मुलगी यातला फरक वयाच्या दुसर्‍या तिसर्‍या वर्षीच जाणवतो. घरातल्या मोठ्या माणसाच्या किंवा पाव्हण्याच्या चपला घालून घरभर फिरणे हे प्रकर्षाने मुलीच करतात. आईच्या कपाळीची टिकली पळवून स्वतःच्या कपाळाला चिकटवणे, तिने खाली काढून ठेवलेले मंगळसूत्र गळ्यात घालून आपण कसे दिसतो ते आरशासमोर जाऊन बघणे, हे मुलीच करू जाणे. बाहुलीशी गोडगोड बोलणे आणि तिला रागावणे तर मुलीच करतात. आता आईने कुंकू, मंगळसूत्र वापरणे सोडून दिले असेल आणि सगळी पादत्राणे बुटाळ्यात
बंदिस्त असतील तर बिचारीचा नाइलाज होत असेल. इश्य आणि अय्या सारखे गोड शब्द जर तिच्या कानावरच पडत नसतील तर तिने बिचारीने काय करावे?
शृंगार म्हटले की आमच्यासारख्याच्या मनात चंदनाची उटी लावून अभ्यंगस्नान केलेली व केशशृंगार करणारी नवोढा डोळ्यापुढे येते. डोळ्यात काजळ, कपाळाला टिळा, हातापायावर मेंदी, तळपायाला आळता आणि वस्त्रालंकाराने नटून सोळा शृंगार केलेली स्त्री दिसली की डोळ्याला सुख वाटते. याउलट काही पाश्चात्त्य देशात शृंगार या शब्दाचे भाषांतर सेक्स किंवा टॉयलेट या दोनच शब्दांनी होते.

संस्कृत काव्यात काय कमी शृंगार होता? जयदेवाचे गीतगोविंद, भानुभटाचे शिशुपालवध, हाल सातवाहनाने संपादित केलेली गाथा सप्तशती इत्यादी काव्यांतून स्त्रीपुरुषांच्या कामभावना, मुग्धा, प्रौढा यांच्या भावना, कनिष्ठ प्रेम, व्यभिचारी प्रेम अशा शृंगार रसाच्या सर्व छटा दृष्टीस पडतात. पण ही काव्ये वाचताना किळस येत नाही. तसे नामदेव ढसाळांच्या पत्‍नीचे-मल्लिका अमरशेख यांचे लिखाण वाचताना होत नाही.

आत्मप्रकाशित मुक्त स्त्रीचे स्वप्न पाहणारे गो. गं. आगरकर, लोकहितवादी, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्यांचे लिखाण १८३२ पासून दर्पण, ज्ञानसंग्रह, मराठी ज्ञानप्रसारक इत्यादी नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहे. ही माणसे, ह.ना आपटे आणि श्री. म. माटे हे खरे स्त्रीवादी लेखक!
स्त्रीलेखिकांतल्या मुक्ताबाई, जनाबाई, राजाई, गोणाई, तुकारामशिष्या बहिणाबाई या तर संत कवयित्री. त्यांचे लिखाण भक्तिरसपूर्ण असणारच. पण त्यासुद्धा कशा स्त्रीवादी होत्या ते पहा:
नामदेवांची दासी जनाबाई लिहिते: आम्ही बळवंताच्या दासी । कोण गर्भवास सोसी ॥
राजाई लिहिते: घरधन्यांनी केला गुरू । बाई आता मी काय करूं ॥
असून नाही हा संसार । चमत्कारू कृपेचा ॥
गोणाई राजाबाईबद्दल लिहिते : दोन प्रहर रात्र पाहून एकांत । राजाई वृत्तान्त सांगे मातें ॥
अहो रखुमाई विठोबासी सांगा । भ्रतारासी कां गा वेडें केलें ॥
वस्त्र पात्र नाही खाया जेवायासी । नाचे अहर्निश निर्लज्जसा ॥
चवदा मनुष्यें आहेत माझ्या घरीं । हिंडतो दारोदारी अन्नासाठी ॥
मुक्ताबाई म्हणते: बाई मी निसंग धगडी, नाकी नाही नथ काडी॥
किंवा, सद्‌गुरु माझा चंद्रमौळी, माझ्या कांखें देउन झोळी, मजला हिंडवी आळीआळी ॥

१९१० नंतरच्या लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे, कमलाबाई टिळक, गीता साने गोपिकातनया ऊर्फ मनोरमाबाई रानडे(द्वारकाबाई हिवरकर), काशीबाई कानिटकर या वृत्तिगांभीर्याने लिहिणार्‍या. १९३३ मध्ये विभावरी शिरूरकरांचा 'कळ्यांचे निश्वास' प्रसिद्ध झाला. त्यांनी स्त्रियांना सोसाव्या लागणार्‍या दुःखांना धीटपणे वेशीवर टांगले. प्रौढ कुमारिकांच्या व्यथा, कुरूप मुलीच्या व्यथा, पतितांच्या व्यथा त्यांनी स्पष्टपणे समाजापुढे मांडल्या. अशी संवेदनाशील लेखन करणारी लेखिका यापूर्वी झाली नव्हती. कलात्मकतेची समज व मूल्यविषयक जाणीव असणार्‍या दुर्गा भागवत, इरावती कर्वे, कमल देसाई, सरोजिनी बाबर, इंदिरा संत, गौरी देशपांडे, अंबिका सरकार, कुसुमावती देशपांडे, ज्योत्स्‍ना देवधर या लेखिका, आणि आजच्या मेघना पेठे, अरुणा ढेरे, (कै)प्रिया तेंडुलकर, इंद्रायणी सावकार, शिरीष पै, मीना प्रभु आणि कविता महाजन यांचे लिखाण स्त्रीवादी आणि शिवाय वास्तववादी असते. याउलट ना.सी .फडक्यांवर वरताण करणार्‍या शृंगार लेखिका शुभांगी भडभडे, शकुंतला गोगटे, शैलजा राजे, कुसुम अभ्यंकर, लीला श्रीवास्तव, स्नेहलता दसनूरकर, नयना आचार्य यांचा सगळा भर स्त्रियांची कामवासना, त्यांचा व्यभिचार आणि वेश्यावृत्ती यावरच आहे असे कधीकधी वाटते.

बहुसंख्य लेखिकांना मुक्त स्त्रीचे केवळ स्वप्नच पडले आहे. त्यांना त्या कल्पनेचे आकलन झालेले नाही. मी वाचकांसाठी लिहिते, मला टीकाकारांची पर्वा नाही असे लेखिका जेव्हा म्हणतात, तेव्हा वाईट वाटते.

लेखनाच्या श्रेष्ठतेचे लक्षण केवळ उत्तेजकता आहे का? अशाच प्रवृत्तीमुळे आज आंतरजालावर लाखोंच्या संखेने 'प्रौढ' संकेतस्थळे आहेत. स्त्रियांच्या सक्रिय सहभागाखेरीज हे शक्य आहे का?
------------------------------------------------------------------------------------------------

या विषयावर प्रतिसाद लिहिण्याचा माझा मुळीच इरादा नव्हता. वाटले की काही उलटसुलट लिहिले गेले तर आधीच्या लेखकांचा उगाच अधिक्षेप होईल. पण सहजानंदांनी माझ्यावर ठेवलेल्या अनाठायी विश्वासाला, अंशमात्र का होईना पण, जागावे म्हणून खास लोकाग्रहास्तव हा प्रतिसादप्रपंच!
--वाचक्‍नवी

खल्लास

ह्याला म्हणतात सुस्पष्ट, सहज प्रतिसाद. आमचा विश्वास अनाठायी नव्हता. सहज आज खरोखर आनंदी झाले आहेत.

वरील उल्लेख केलेल्या लेखीकांचे लेखन इच्छूकांनी वाचन करावे व हा चर्चाविषय खर्‍या अर्थाने येथेच पाचाउत्तरी सफळ संपूर्ण करावा. बाकीचे नुसते चर्वीतचर्वणच असेल.

आदर्श

माफ करा पण आदर्श भारतीय स्त्री कशी असावी याविषयीच्या अपेक्षा थोड्या एकांगी वाटतात. अशी स्त्री असेल तर आवडेल असे म्हटले तर ठीक आहे, पण सर्व स्त्रिया अशाच असतील/असल्या पाहिजेत असे म्हणणे स्त्रियांवर अन्यायकारक वाटते. ज्या गुलजारच्या अंगूरमधल्या मौसमीचे उदाहरण दिले आहे, त्याच गुलजारच्या एका चित्रपटात तब्बू म्हणते (नाव आठवत नाही), "शिव्या फक्त पुरूष का देतात? स्त्रियांनी का नाही द्यायच्या?" हा चित्रपट नक्कीच अंगूरच्या नंतरचा होता आणि यात गुलजारला स्त्रीची प्रतिमा बदलावीशी वाटली हे विशेष. शिवाय ही समजा आदर्श भारतीय स्त्रीची लक्षणे धरली, तर आदर्श भारतीय पुरूषाची लक्षणे काय असावीत हे भारतीय स्त्रियांना विचारायलाही हरकत नसावी. याच्या उत्तरादाखल घरातील कुठल्याही कामात मदत न करणारा, फक्त तीन वेळा गिळायला स्वैपाकघरात येणारा आणि सदासर्वदा टीव्हीपुढे ठाण मांडून बसणारा पुरूष भारतातीलच काय, पण जगातील कुठल्याही स्त्रीला आदर्श वाटणे शक्य नाही.

स्त्री आणि पुरूष यांच्यातील नैसर्गिक फरकामुळे त्यांच्या मानसिकतेमध्येही फरक असतो, हे काही अंशी खरे आहे. हजारो वर्षांपूर्वी पुरूष शिकार करायला बाहेर पडत असत आणि स्त्रिया त्यांनी आणलेले अन्न शिजवणे, मुलांचे संगोपन करणे अशी कामे करत असत. त्या काळानुसार ही स्वभावाची वैशिष्ट्ये अनुरूप होती. पण आत्ताच्या आधुनिक जगात स्त्रिया आणि पुरूष सर्व क्षेत्रांमध्ये बरोबरीने वावरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्त्रिया त्यांच्या स्टिरीओटाइप स्वभावाच्या चाकोरीतच राहतील हे शक्य नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वालाही पुरूषांइतकेच स्वातंत्र्य मिळायला हवे. दिवसभर पुरूषांइतकेच काम करून (मुले असतील तर बहुतेकवेळा जास्त) संध्याकाळी घरी आल्यावर स्त्रियांनी शालीन, कुलीन होऊन पतीला परमेश्वर मानावे अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. जेव्हा स्त्रीच्या आदर्शतेची व्याख्या केली जाते, तेव्हा नकळत आपण तिला एक माणूस या दृष्टीकोनातून बघायचे थांबवत असतो.

जुन्या संस्कॄत साहित्यामध्ये शृंगाररस होता, पण मधल्या काही शतकांमध्ये तो अचानक लुप्त का झाला याचे उत्तर शोधणे मनोरंजक ठरावे. प्रणयभावनेच्या खुल्या अभिव्यक्तीपासून शृंगार म्हणजे काहीतरी घाणेरडे, लज्जास्पद किंवा ज्याच्यावर बोलायचे झाले तर फक्त पांचट विनोद हाच एक मार्ग उरतो ही आपल्या समाजाची अधोगती का आणि कशी झाली असावी? कामसूत्र ज्या देशात लिहीले गेले, खजुराहोची शिल्पे ज्या देशात घडवली गेली त्याच देशातील चित्रपटांमध्ये नायक-नायिका जवळ आले की झाडावरच्या कबूतरांवर क्यामेरा फिरवण्याची गरज आपल्याला का भासली असावी? याच्याशीच निगडीत आपल्या तथाकथित** संस्कृतीरक्षकांचाही प्रश्न आहे, पण तो वेगळा विषय आहे.

मराठी साहित्याबद्दल काही लिहीण्याइतकी माझी योग्यता नाही, विशेषत: नंदनसारखे व्यासंगी इथे असताना. फक्त इतकेच सांगावेसे वाटते की स्त्री साहित्यामध्ये जर काही कथा स्त्रियांच्या कामवासनेबाबत असतील तर त्यात फार वावगे वाटायचे कारण नाही. अनादिकाळापासूनचे साहित्य पुरूषांच्या कामवासनेवर आधारलेले आहे, त्यात काळानुसार बदल झाला तर तो स्वागतार्हच आहे. आणि यातून स्त्रियांनाही अशाच नैसर्गिक भावना असतात, हा प्रकाश पुरूषांच्या डोक्यात पडेल ही आशा बाळगायलाही हरकत नाही.

हा प्रतिसाद थोडा कठोर वाटत असल्यास क्षमस्व. यामागे कुठलाही वैयक्तिक हेतू नाही याची खात्री बाळगावी.

**इथे तथाकथित दोन्ही शब्दांना लागू आहे, तथाकथित संस्कृतीचे तथाकथित रक्षक.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हे मुलगेही करतात.

मुलगा आणि मुलगी यातला फरक वयाच्या दुसर्‍या तिसर्‍या वर्षीच जाणवतो. घरातल्या मोठ्या माणसाच्या किंवा पाव्हण्याच्या चपला घालून घरभर फिरणे हे प्रकर्षाने मुलीच करतात. आईच्या कपाळीची टिकली पळवून स्वतःच्या कपाळाला चिकटवणे, तिने खाली काढून ठेवलेले मंगळसूत्र गळ्यात घालून आपण कसे दिसतो ते आरशासमोर जाऊन बघणे, हे मुलीच करू जाणे

वाचक्नवींचा प्रतिसाद फारसा पटला नाही. आदर्शाच्या कल्पना लादल्या तर बंडखोरी निर्माण होते. असो.

आईचे मंगळसूत्र आणि टिकली पळवणे हे दोन-तीन वर्षांचे मुलगेही लीलया करतात. इतकेच नव्हे तर आईच्या लिपस्टीक्स, नेलपॉलिश यांच्याविषयी त्यांच्यात अतिशय आकर्षण असते. मी पाहिलेले ९९% लहान मुलगे असेच आहेत. स्वयंपाकघरातील भांड्यांनी खेळणे हा ही मुलांचा आवडता छंद.

प्रतिसाद सहीच आहे, पण...?

आपल्या प्रतिसादातून पारंपारिक स्त्री, तसेच स्त्रीवादाची परंपरा, विचारवंत ते अगदी अंजली कुलकर्णी पर्यंतच्या सर्वांनी स्त्रीमुक्ती चळवळीचा, सामाजिकतेचा विचार आपल्या लेखनातून मांडला यात आता तरी काही शंका राहिलेली नाही, पण आमचा मुख्य प्रश्न आहे तो हा की, या दशकातील जालावर वावरणा-या, लिहिणा-या स्त्रीया, अजूनही पारंपारिक विचाराच्या चौकटीतून बाहेर येऊन लिहीत आहेत का नाही ?

( उत्तम लेखिका असूनही केवळ पुरुषांनी केलेली टिंगल सहन न झाल्यामुळे, सार्वजनिक संकेतस्थळावर लेखन बंद करणारी स्त्री जेव्हा आम्ही पाहतो , तेव्हा मात्र आम्हाला अजूनही या दशकातील लेखन करणारी स्त्री, वैचारिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्टीनेही फारच मागे आहे असे वाटायला लागते ! )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैंगिक

गुजराथी त 'लैंगिक' या अर्थाने 'जातीय' हा शब्द वापरतात. हा शब्द उच्चारताना लहान वयाच्या तरुण मुलींना आणि शिक्षकांना संकोच वाटत नाही. सजातीय, विजातीय, पुरुष-जात, स्त्री-जात यांत सेक्स हाच अर्थ अभिप्रेत आहे. जातीय दंगलीला गुजराथीत कौमी झगडा म्हणतात. त्यामुळे तिथे जातीय शब्द आडवा येत नाही. मराठीतसुद्धा सेक्स-एज्युकेशनला 'लैंगिक शिक्षण' म्हणण्याऐवजी जातीय शिक्षण म्हटले तर विरोधाची धार थोडी बोथट होईल. अर्थात हे शिक्षण सभ्य आणि संयमित भाषेत असावे, पण 'सखोल' नसावे.
अवांतर:- जातवाद किंवा जातभेद या शब्दांसाठी अनेक मराठीभाषक जातीयवाद किंवा जातीयभेद असे चुकीचे शब्द वापरतात. जात म्हणजे सेक्स किंवा जेन्डर असे एकदा ठरले की असे चुकीचे प्रयोग होणार नाहीत. --वाचक्‍नवी

असहमत

मराठीतसुद्धा सेक्स-एज्युकेशनला 'लैंगिक शिक्षण' म्हणण्याऐवजी जातीय शिक्षण म्हटले तर विरोधाची धार थोडी बोथट होईल

जातीय हा शब्द जनमानसात एवढा रुजला आहे कि त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करताना खुपच तारांबळ होईल . मूळ विषय बाजुला राहिल आणि वितंड वाद चालू होतील.

प्रकाश घाटपांडे

जातीय

मराठी वर्तमानपत्रात अजून शुद्धलेखनाच्या चुका सापडत असतील, पण चुकीचे शब्द लिहिण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. पारंपरिक, तज्ज्ञ, महत्त्व, तत्त्व, प्रेक्षक, मराठी भाषक, कोट्यवधी, जातवाद हे शब्द आता पूर्वी लिहीत असत तसे चुकीच्या पद्धतीने लिहिले जात नाहीत. जातीयवाद या शब्दाची तर पूर्ण हकालपट्टी झाली आहे, त्यामुळे जातीयशिक्षण हा शब्द त्याच्या मूळ आणि योग्य अर्थाने रूढ होण्यास काहीच प्रत्यवाय नाही. --वाचक्‍नवी

श्री.नंदन यांचा लेख

भारतीय स्वातंत्र्यानंतर १९७५ साली युनो ने ते वर्ष स्त्री मुक्ती वर्ष म्हणून साजरे करावयाचे ठरवले, तेव्हाच येथील समाजमनात राजकीय,सामाजिक आकाक्षा,वाढल्या.शिक्षण,आणि लोकशाहीचे,महत्व लोकांना पटू लागल्यामुळे जे वेगवेगळे बदल होऊ लागले,त्यात भारतीय स्रीयांमधेही फार मोठा बदल झाला.भारतीय स्त्रियांच्या बाबतीत भारतीय परंपरेच्या दृष्टीने जी विषमता होती,त्या विषमतेच्या व्यवस्थेमुळे "स्त्रियांच्या मनातील वेदना आणि विद्रोहाने पेट घेतला व त्याचे वाड्मयीन रुप म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय.

श्री नंदन आणि इतरांच्या लेख-प्रतिसादांवरून वरील विधान किती गैरसमजुतीवर आधारित आहे हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात स्त्रीवादी म्हणता येईल असे लिखाण, भले ते पुरुषांनी लिहिले असेल, एकोणिसाव्या शतकापासून प्रसिद्ध होत आले आहे.
"स्त्रियांस वागविण्याची पद्धती" या लेखात (मराठी ज्ञानप्रसारक-डिसेंबर १८५३) म्हटले आहे की "ईश्वरी नियमाप्रमाणे पाहिले असता स्त्री-पुरुषांत थोडाच भेद आहे असे दिसून येते.... त्यांस आपण बहुतेक प्रकरणी आपल्या बरोबरीच्या नात्याने वागवून त्यांस सर्व प्रकारच्या सुखांच्या चमत्काराचा लाभ होईल असे करावे".
"आपलेकडील स्त्रियांची स्थिती रानातील श्वापदांसारखी आहे. पुरुषांस त्यांची अज्ञानाची अवस्था फायदेशीरच आहे कारण त्यामुळे त्यांना दास्यात ठेवून लाथाबुक्क्या मारता येतात. जणू ईश्वराने त्यांना त्यासाठीच निर्मिले आहे अशी पुरुषांची वृत्ती आहे."---'एतद्देशीय स्त्रियांची स्थिती' -लेखक नारायण रघुनाथ (मराठी ज्ञानप्रसारक-ऑगस्ट १८५५).
"ह्या देशात जसजशी विद्यावृद्धी होईल तसतशी सुधारणा आपोआप होणे आहे आणि सर्व पुरुषांस जर विद्या शिकविणे आहे तर स्त्रियांस ती प्रथम आली पाहिजे."--'सुधारणा' (ज्ञानसंग्रह मासिक-१ जून १८७३).
श्री. नंदन यांचा प्रतिसादात्मक लेख मी माझा प्रतिसाद लिहिण्याआधी वाचला नव्हता. तसे असते तर मी माझ्या प्रतिसादात मी त्यांनी उल्लेखिलेल्या विभावरी शिरूरकर(बाळूताई खरे) सारख्या स्त्री-लेखिकांऐवजी इतर अनेक -सुलभा ब्रह्मे, वसुधा माने, 'बिचारी आनंदीबाई'(१८९६) लिहिणार्‍या शांताबाई, 'सद्यस्थिती' ह्या कथासंग्रहाच्या लेखिका 'लक्ष्मीतनया', गिरिजाबाई केळकर, बोधामृत पाजणार्‍या कथा लिहिणार्‍या -आनंदीबाई शिर्के(कथासंग्रह -कथाकुंज(१९१६), कुंजविकास(१९३९), भावनांचे खेळ(१९४३), तृणपुष्पे(१९५८), साखरपुडा(१९६४)), कमलाबाई टिळक, क्षमा राव, आनंदीबाई किर्लोस्कर, पिरोज आनंदकर, कुसुमावती देशपांडे , कृष्णाबाई ऊर्फ मुक्ताबाई दीक्षित, वसुंधराबाई पटवर्धन, सुधा नरवणे, वसुधा पाटील, पद्‌मजा फाटक, मोहिनी वर्दे इत्यादी लेखिकांविषयी लिहिले असते.
श्री. नंदन म्हणतात तसा त्यांचा प्रतिसादात्मक लेख मुळीच मोठा नव्हता. त्यांनी या विषयावर असेच आणखी काही लिहिले असते तरी आवडले असते. --वाचक्‍नवी

 
^ वर