समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४
सदर लेखातून मुंबईतील एका जुन्या पद्धतीच्या खानावळीवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, व त्याकरता संपादन मंडळाची व्य नि द्वारा रीतसर परवानगी घेतली आहे. परंतु लेखकाला केवळ माहिती देणारे औपचारिक लेखन करता येत नाही, त्यामुळे सदर लेखन केवळ माहितीपूर्ण न राहता किंचित ललित लेखनाकडेही झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच 'व्यक्तिचित्र लेखन' हा लेखकाचा अत्यंत आवडता लेखनप्रकार असल्यामुळे या लेखातील खानावळीच्या चालकांचा आणि मालकांचा उल्लेख किंचित व्यक्तिचित्र रंगवण्याकडेदेखील होऊ शकतो हे नमूद करतो. लेखाला पूरक अशी छायाचित्रेही टाकली आहेत. संपादन मंडळाच्या सहकार्याबद्दल लेखक आभारी आहे! :)
राम राम मंडळी,
रामचंद्र सहदेव प्रभू, ऊर्फ रामभाऊ प्रभू!
हे नांव म्हणजे काही लोकमान्य टिळकांचे नांव नव्हे की ते सर्वांना माहीत असायला हवे! :) परंतु तरीही हे नांव माझ्याकरता खूप मोठे आहे. माझ्याकरताच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक मत्स्यप्रेमींकरता, खानावळीच्या जेवणावर दोन टाईम अवलंबून असण्यार्यांकरता या नांवाचे महत्व आहे.
रामभाऊ हे मुळचे आमच्या कोकणातल्या कुडाळचे! पत्ता- मुक्कामपोष्ट पाट, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग! रामभाऊ हे कुडाळदेशकर, परंतु कोकणातल्या 'बाल्या' समाजातले! कोकणातले बाले! :)
साठाच्या दशकात पोटापाण्याच्या उद्योगाकरता रामभाऊ कोकणातून मुंबईस आले अन् मुंबईत बाँबेडाईंग कंपनीत गिरणी कामगार म्हणून कामावर रुजू झाले. कोकणातला बाल्या आता मुंबईकर 'बाल्या' झाला! :) गिरगावातील दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत रामभाऊंचा संसार सुरू झाला. रामभाऊंच्या पत्नी रजनीबाई म्हणजे साक्षात मालवणी अन्नपूर्णा! त्यांच्या हाताला जबरदस्त चव. मच्छीमटणाचे प्रकार तर सोडाच, पण रजनीबाईंनी साधा आमटीभात जरी केला तरी साक्षात भगवंत जगाच्या पाठीवर जिथे कुठे असेल तिथून रामभाऊंच्या गिरगावातल्या घरी जेवायला येईल! :)
रामभाऊंना तीन मुलं. एकट्याच्या पगारात भागेना म्हणून १९७२ साली रामभाऊंनी राहत्या घरातच पत्नीच्या मदतीने घरगुती स्वरुपाची खानावळ सुरू केली. स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी अर्थातच रजनीबाईंनीं आपल्या अंगावर घेतली आणि अगदी घरगुती स्वरुपाच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची ही खानावळ उत्तम तर्हेने सुरू झाली. जेवायला येणारी गिर्हाईकं म्हणजे आजुबाजूचे सर्व मध्यमवर्गीय मराठी गिरगावकर चाकरमानी! बरीचशी कनिष्ठ मध्यमवर्गीयच मंडळी. त्या काळात गिरगावात मराठी माणसांची वस्ती बर्यापैकी होती. आजुबाजूच्या चाळी बर्यायचश्या चाकरमानी मराठी कुटुंबियांनी भरलेल्या होत्या. त्या काळात गुजराती, मारवाडी समाजाचा गिरगावातील शिरकाव आजच्या मानाने अगदीच कमी होता. असो! तर काय सांगत होतो?
तर 'समर्थ भोजनालय' या नांवाने ही खानवळ सुरू झाली. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या, आदी मत्स्यप्रकार तसेच मटणवडे, कोंबडी, सुकं मटण, कोकम कढी असा न्यारा बेत ह्या खानावळीत शिजू लागला. अप्रतिम अशी घरगुती चव, वातावरणही घरगुती, आणि दरही वाजवी, त्यामुळे रामभाऊंची ही खानावळ अगदी उत्तम रितीने चालू लागली. आजतागायत अनेक मंडळी येथून जेवून, पोटातला अग्नी शांत करून गेली आहेत/आजही जात आहेत!
कामधंद्याच्या निमित्ताने मला बरीचशी मुंबई फिरण्याचा योग आला. मासे, मटण खायची आवड असल्यामुळे बोरीबंदर जवळच्या पलटणरोड पोलिस ठाण्याजवळचं उत्तम खिमा मिळणारं आमच्या लक्ष्मणशेठचं 'ग्रँट हाऊस कँटीन', गिरगावातलंच ठाकुरद्वारचं 'सत्कार हॉटेल', त्याच्याच भावाचं डोंबिवलीतलं हॉटेल 'श्रीसत्कार', गिरगावातलंच उत्तम मटण-भाकरी मिळणारं 'भारतीय लंच होम', लालबागेतील गिरण्यांमधल्या कोकणी चाकरमानी गिरणी कामगारांचं आश्रयस्थान असलेलं 'क्षिरसागर हाटेल', बजारगेट स्ट्रीटवरचं 'संदीप भोजनालय', त्याच्याच भावाचं हॉर्निमन सर्कलचं 'प्रदीप भोजनालय', खोताच्या वाडीतलं खडपेबंधुंचं 'अनंताश्रम' (येथे प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी नेहमी जेवायला यायचे. दळवी हे आमच्या कोकणभूमीचेच सुपुत्र! :) अश्या अनेक ठिकाणी माझा नेहमीचा राबता असे. (या सगळ्या हॉटेलांवर मी सवडीने, परंतु अगदी भरभरून माहितीपूर्ण लेखन करणारच आहे!)
अश्यातच एके दिवशी गिरगावातील गायवाडी बस स्टॉप जवळच्या गल्लीतील 'समर्थ भोजनालयात' जेवायचा योग आला आणि जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं! मी समर्थ भोजनालयाचा झालो आणि समर्थ भोजनालय माझं झालं! तिथली माशाची आमटी खाल्ली, तळलेली मांदेली खाल्ली अन् अण्णांच्या अभंगातील,
'याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा'
च्या ऐवजी 'शेवटचा दिस गोड झाला!' असे म्हणावेसे वाटले! :)
मंडळी, आमचे रामभाऊ हा वृत्तीने देव माणूस! खानावळ चांगली चालली आहे म्हणून हावरेपणाने वाट्टेल तसे दर वाढवणारा, जेवणात काहीतरी चालू माल वापरून गिर्हाईकांना फसवणारा किंवा लुटणारा नव्हे! सगळ्यांशी आपलेपणाने वागणारा, प्रसंगी दाराशी आलेल्या एखाद्या गरीबाला स्वतः आस्थेने जेवू घालणारा! कधी कधी पुढे बरीच कामाची गडबड असे म्हणून मी सकाळी ११ वाजताच त्यांच्या खानवळीत जेवायला जायचो. त्या सुमारास फारशी गर्दी नसायची. मग रामभाऊ हळूच गल्ल्यावरून उठून माझ्या शेजारी येऊन बसायचे. "काय तात्या, आज लवकर? आज सुरमई अगदी ताजी फडफडीत मिळाली आहे. देऊ?" मग माझ्या उत्तराची वाट न पाहताच, "अरे संज्या, तात्याला एक सुरमई ताट आण रे" असा मुदपाकखान्यातील त्यांचा मुलाला, संजयला हुकूम सोडायचे! :)
मंडळी, शेवटी काहीही झालं तरी रामभाऊ हा आमच्या कोकणातला. त्यामुळे कोर्टकचेर्या न करेल तरच नवल! रामभाऊचा आणि त्यांच्या भाड्याच्या जागेच्या मालकाचा काही कारणावरून कोर्टात खटला सुरू होताच! 'मग आता मी अन् माझा वकील काय काय कारवाया करणार आहोत, 'ही केस आपणच कशी जिंकणार', 'आपले सगळे मुद्दे कसे स्ट्राँग आहेत', हे सगळं सांगायला रामभाऊंना आस्थेने ऐकणारं कुणीतरी हवं असे! मी ते काम जेवता जेवता एकदम चोख करीत असे! :) मग मध्येच बोलण्याच्या भरात रामभाऊंचं माझ्या पानाकडे लक्ष जात असे. "अरे तात्या, अजून चपाती घे रे. हे काय? फक्त दोनच चपात्या? अरे संज्या, तात्याला गरम गरम चपाती आण रे. आणि थोडंसं कोलंबीचं कालवण पण घेऊन ये. बघ तरी तात्या, आज कोलंबी किती छान मिळाली आहे ती. अरे बाबा, कोलंबीच्या कालवणाचे पैशे नको देऊ फार तर! ते वाटल्यास माझ्याकडून भेट समज!" असं हसून म्हणायचे! आणि बिल देतेवेळी खरोखरंच ते पैसे रामभाऊ माझ्याकडून घेत नसत! आज रामभाऊ या जगात नाहीत. १९९९ साली रामभाऊ वारले. ती बातमी समजल्यावर घरचंच कुणीतरी गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप भरून आलं!
रामभाऊ प्रभू. मुंबईच्या खानावळ संस्कृतीचे एक प्रतिनिधी!
आज रामभाऊंच्या पश्चात आमच्या रजनीमावशी अन् त्यांची दोन मुलं संजय (संज्या) आणि विश्वनाथ (नाथा) आता ही खानावळ चालवतात. मंडळी, ही सगळी मंडळी त्यांच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं मला वागवतात. संज्याचं तर माझ्यावर भारी प्रेम. मी अजून लग्न केलं नाही याची माझ्यापेक्षा संज्यालाच अधिक चिंता! :) अगदी आजही कधी त्यांच्या खानावळीत जेवायला गेलो की संज्या मला मुली सुचवतो. "तात्या, अरे अमूक अमूक मुलगी आहे. आमच्या नात्यातलीच आहे. तुला चांगली मच्छी करून खाऊ घालेल आणि तुझ्या आईचीही काळजी घेईल. लग्न करून टाक बाबा आता. किती दिवस असा राहणार?!":)
माझ्या लग्नाच्या चिंतेत असलेला आमचा देवभोळा संज्या! :)
मंडळी, रामभाऊ, रजनीमावशी, संज्या, नाथा, ही सगळी कोण आहेत माझी? ना रक्ताच्या नात्याची, ना गोत्याची! पण एक धागा आहे ज्याने मला व त्यांना जोडलं आहे, अगदी घट्ट बांधून ठेवलं आहे. तो धागा आहे परब्रह्म अश्या अन्नाचा, घरगुती चवीचा, अन् खानावळ संस्कृतीचा! आजच्या लोप पावत चाललेल्या या खानावळ संस्कृतीत हा धागा अजूनच घट्ट होत जाईल याची मला खात्री आहे!
तात्या जेवायला बसला आहे. तो मुंबईच्या खानावळ संस्कृतीचा एक वारकरी आहे!
आज मुंबईतच काय, तर सार्या जगात शेट्टी हाटेलांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत महाग दर आणि तीच तीच पंजाबी चव! कधी टॉमेटोच्या मिश्रणात काजू पेस्ट, तर कधी काजूपेस्टमध्ये टोमेटो प्युरी वापरून केलेल्या त्या महागड्या पंजाबी भाज्या! मंडळी, हे सगळं पाहिलं की गिर्हाईकाला आस्थेने, घरगुती चवीचे पदार्थ वाजवी दरात जेवू घालणार्या रामभाऊंसारख्या किंवा अनंताश्रमच्या खडप्यांसारख्या खानावळवाल्यांचं महत्व लक्षात येतं. आजही अशी अनेक मंडळी आहेत की काही कारणांमुळे त्यांना घरचं जेवण मिळत नाही. अश्या मंडळींचं समर्थ भोजनालय सारख्या घरगुती खानावळी म्हणजे एक मोठं आश्रयस्थान आहे, आधार आहे. अहो नाहीतर रोज रोज पोटातली आग विझवायची कुठे? शेट्टीच्या हॉटेलातील महागड्या सोडा मारून केलेल्या पदार्थांनी तर साली पोटाची वाट लागायची!
असो, आता पुन्हा एकदा समर्थ भोजनालयात जाईन आणि आमचा नाथा मला फक्कडसं बोंबलाचं कालवण वाढेल, अन् संज्या पुन्हा एखादी चांगल्याश्या सालस, सोज्वळ अश्या मुलीचं स्थळ मला सुचवेल! मी 'अन्न हे पूर्णब्रह्म' असं म्हणत जेवून तृप्त होईन आणि नकळत माझं लक्ष भिंतीवरील रामभाऊंच्या तसबिरीकडे जाईल आणि त्यांच्या आठवणीने मन भरून येईल!
--तात्या अभ्यंकर.
Comments
वा! वा!
तोंडाला पाणी सुटलं. आज मासे खावेच लागणार. ;-) मी कधीही या किंवा इतर मालवणी खानावळीत गेले नाही कारण घरात हेच तर जेवतो. ;-) साध्या काळ्या वाटाण्याच्या खोबरं आणि आख्खे काजू घालून केलेल्या अस्सल कुडाळदेशकर आमटीची, ओल्या काजूच्या उसळीची चवही इतर कशाला नाही. (इथे अमेरिकेत काळे वाटाणे मिळत नाहीत म्हणून मागे भारतातून खास घेऊन आले होते. उद्या करावी म्हणते!!! ;-))
काय म्हणता? सर्वच कुडाळदेशकरांकडे हिच कथा बरं का!!
गोरेगाव पूर्वेची सत्कार खानावळही छान आहे म्हणे! प्रत्यक्षात मी आजपर्यंत कधीही पायरी चढलेली नाही पण लोक म्हणतात बॉ! असे अस्सल मराठी लेख अजून येऊ द्यात.
भुक लागली हो ...
काय तात्या हे? तुम्ही आमचा श्रावण बुडवायला निघाला अहात बहूतेक.
तसा मांसाहारी पुर्णब्रम्हाचा मी चाहता. आताश्या देवाच्या पहिल्या अवतारावर सुध्दा मनापासून प्रेम करायला लागलो.
अर्थात हे प्रेम पुण्यात आल्यापासूनचे. विदर्भात मात्र तिखट वर्हाडी मसाल्याचं मटन आणि गावराण चिकन असाच बेत असायचा.
लेख बाकी झकास झालाय. तुम्ही स्वतः ह्या खानावळीत जेवताय म्हटल्यावर लेख मनापासून लिहीलाय. माझा अनुभव सांगतो , लोकसत्ताच्या पुण्याच्या आवृत्तीमधे असंच पुण्यातील खानावळींची ओळख करून देनारं सदर असतं. एकदा त्यात वाचून डेक्कनवर एका हॉटेलात मासे खायला म्हणून गेलो. काय काय वाचलं होतं त्या लेखात आणि प्रत्यक्षात अनुभव मात्र असा आला की.... असो.
मुंबईत जमल्यास नक्की या हॉटेलात जाईल.
नीलकांत
मस्त!
तात्या,
लेख एकदम आवडला आणि मुंबईत असलो की या समर्थभोजनालयातील चविष्ठ आणि खमंग पदार्थ पण नक्की आवडतील याची खात्री आहे त्यामुळे हा पत्ता आता आम्ही आमच्या बुकात नोंदून ठेवतो! अजूनही असे पत्ते तुमच्याकडून अशाच छान लेखांमधून मिळतील अशी आशा करतो!
आभार/उत्तरे..
प्रियाली, नीलकांत, आणि विकास या तिघांचेही आभार...
प्रियाली,
साध्या काळ्या वाटाण्याच्या खोबरं आणि आख्खे काजू घालून केलेल्या अस्सल कुडाळदेशकर आमटीची, ओल्या काजूच्या उसळीची चवही इतर कशाला नाही. (इथे अमेरिकेत काळे वाटाणे मिळत नाहीत म्हणून मागे भारतातून खास घेऊन आले होते. उद्या करावी म्हणते!!! ;-))
माझ्याकरताही शिल्लक ठेव. अमेरिकेचं विमान पकडून तुझ्या घरी जेवायला येतोच आहे! :)
काय म्हणता? सर्वच कुडाळदेशकरांकडे हिच कथा बरं का!!
असं का? बरं बरं! :)
नीलकांता,
लोकसत्ताच्या पुण्याच्या आवृत्तीमधे असंच पुण्यातील खानावळींची ओळख करून देनारं सदर असतं. एकदा त्यात वाचून डेक्कनवर एका हॉटेलात मासे खायला म्हणून गेलो. काय काय वाचलं होतं त्या लेखात आणि प्रत्यक्षात अनुभव मात्र असा आला की.... असो.
अरे मासे तुझ्या पुण्यात नाही चांगले मिळत रे! ते खायला तुला मुंबईतच आलं पाहिजे किंवा कोकणात तरी गेलं पाहिजे!
मुंबईत जमल्यास नक्की या हॉटेलात जाईल.
मुंबईत आलास की मला फोन कर. नंदनशेठनेपण खरडीतून कळवले आहे. आपण तिघेही जाऊ आणि यथेच्छ जेवू! मला तुम्हा दोघांसोबत यायला आवडेल. तेवढीच माझ्यासारख्या दुर्जनाला तुम्हा दोघा सज्जनांच्या संगतीने सुधारायची संधी! कसें? :)
विकासराव,
अजूनही असे पत्ते तुमच्याकडून अशाच छान लेखांमधून मिळतील अशी आशा करतो!
नक्की. सवड मिळेल तसे लिहिनच. आपण समर्थ भोजनालयात अवश्य चक्कर टाकावी. जाण्याआधी जमल्यास व्य नि ने कळवावे! मी, नंदन आणि नीलकांत जाणार आहोत. जमल्यास एक उपक्रमीय कट्टा समर्थ भोजनालयातच जमवू! :)
तात्या.
--
विशाल सागरतीर आहे, नारळीची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत, साऽऽरं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्य असं विलक्षण छेद देऊन जातं, आणि मग उरतं काय, एक भयाण विनोदाचं अभेद्य असं कवच! - गुरुवर्य भाईकाका, अंतुबर्वा!
तात्या
मुंबईचा आणि आमचा संबंध मे महिन्याच्या सुट्टीपुरताच.
पण चपात्यांच्या कच्च्या असलेल्या कडा, वरणातील पाणी व डाळ यांचे १०००:१ असे प्रमाण, मऊ पडलेले पापड, न धुतलेले ग्लास आणि जिरेभातात जिर्याऐवजी निघणारे किडे, पावभाजीचे बटाटे धुपाटण्याने आपटून स्म्याश करणे, फीस्ट च्या नावाखाली शिर्याचा गोळा देऊन नंतर दोन दिवस पगारी बुट्टी मारणे अशा असंख्य पुणेरी खाणावळींचा अनुभव असल्याने मुंबईतील खानावळग्राहकांचा हेवा वाटतो.
आमच्या एका मित्राला एकदा वरणात डाळ सापडली तेव्हा त्याने संभाजी बागेसमोरील दुकानात सर्व मित्रांना सॉफ्टीची पार्टी दिली होती हे आठवले.
लेख मस्त.
आमटी
आमच्या सप महाविद्यालयाच्या मेस मध्ये आम्ही आमटीत डाळ शोधण्याची स्पर्धा लावत असू. या शोध मोहिमेत प्रथम एक मोकळी वाटी घ्यायची. त्यात आमटीच्या वाटीतील निवळलेले पाणी टाकत असू, पुन्हा आंमटी मागावयाची , ती निवळू द्यायची ,पुन्हा तसे करायचे त्यामूळे राहिलेल्या रेसिडयु मध्ये डाळीचा अंश सापडत असे. ही प्रक्रिया सोनार आपल्या केरातून फुंकताना उधळलेले सोन्याचे काही कण परत मिळवतो तशी आहे.
प्रकाश घाटपांडे
हा हा
ही प्रक्रिया सोनार आपल्या केरातून फुंकताना उधळलेले सोन्याचे काही कण परत मिळवतो तशी आहे.
चपखल ;)
छान
तात्या, भोजन (चरणे) हा माझा एक अत्यंत "जिव्हा"ळ्या विषय आहे म्हणून मला खाण्यासंबधीचे सगळे लेख-दृक-श्राव्य प्रकार आवडतात. अजुन येऊ देत.
जमले तर आम्हाला तात्या सुरमई फस्त करताना, आमटी भुरक्या (??) मारत पिताना एक तुकडा / चीज् अशी एक युट्यूब वर चढवा की हो... ह.घ्या.
मला समर्थभोजनालयात जायची वेळ येईल की नाही माहीत नाही (तसेच खाणावळ हा शब्द, खाण्याची अशी वेळ येऊ नये या अर्थी वाटतो) पण मालवणी जेवण हा प्रकार बाहेर मिळणार्या कुठल्याही पंजाबी खाद्यप्रकारापेक्षा कधीच वाईट होऊ शकणार नाही ह्याची खात्री आहे. :-)
असो नशिबाने मालवण, गोवा, अलीबाग येथील काही मित्रपरीवार आहे (ज्यांच्याकडे देखिल भगवंत जेवायच्या वेळेला येतो. नाही म्हणायला आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत की हो.. :-) )ज्यांच्याकडे २४ बाय ७, ओपन इनव्हीटेश असते.
बाकी असे स्वप्न आहे की बिनचूकपणे हे सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या इ. (मासळीबाजारात) ओळखता यावेत. पापलेट हमखास ओळखता येतो. मोरी म्हणजे शार्क असे ऐकले आहे. (खरे का?) मासे आम्ही गरुपा, मॅकरेल, सालमन्, सार्डीन्, स्टींग रे असेच ओळखतो पण बोक्याला लाजवेल असे फस्त करतो. ;-) काय करणार समीष आहार ओळख घराबाहेरच ना..
गाबोळी
= माशाची अंडी
हम्म....
मांसाहार जरी प्रिय असला तरी मत्स्याहाराची गोडी बाकी विकसित झाली नाही. (बघू पुढच्या जन्मी!). 'दादरचे दिवस' हा दळवींचा लेख बाकी मिटक्या मारत वाचला होता, त्याची आठवण झाली.
मुंबईतल्या इतर खाद्यमंदिरांवर पण लिहा. असेच मिटक्या मारत वाचू!
सन्जोप राव
वा!
'ही केस आपणच कशी जिंकणार', 'आपले सगळे मुद्दे कसे स्ट्राँग आहेत', हे सगळं सांगायला रामभाऊंना आस्थेने ऐकणारं कुणीतरी हवं असे!
वा तात्या, साधी परंतु सुरेख शब्दरचना! लेख नेहमीप्रमाणेच सहजसुंदर उतरला आहे. आता एकदा समर्थ भोजनालयात जायलाच हवे. -:)
अवांतर - तुम्ही मायबोलीच्या दिवाळी अंकात लिहिणार आहात असे कळले. तुमचा लेख नि:संशय सर्वोत्तम असेल याची खात्री आहे, त्याकरता शुभेच्छा! उपक्रमावर गीत मेघदूताचा तिसरा भाग केव्हा लिहिणार? तुमचं मिसळपाव डॉट कॉम बारगळलं की काय? -:)
--ईश्वरी.
आभार/उत्तरे..
आजानुकर्ण, सहज, संजोपशेठ, ईश्वरी,
लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार..
आजानुकर्ण,
पण चपात्यांच्या कच्च्या असलेल्या कडा, वरणातील पाणी व डाळ यांचे १०००:१ असे प्रमाण, मऊ पडलेले पापड, न धुतलेले ग्लास आणि जिरेभातात जिर्याऐवजी निघणारे किडे, पावभाजीचे बटाटे धुपाटण्याने आपटून स्म्याश करणे, फीस्ट च्या नावाखाली शिर्याचा गोळा देऊन नंतर दोन दिवस पगारी बुट्टी मारणे अशा असंख्य पुणेरी खाणावळींचा अनुभव
पुणेरी खाणावळींचे वर्णन बाकी छानच केले आहेस हो! :) पण बादशाही, आणि पेरुगेट पोलिस चौकीजवळचं सदाशिव पेठेतलं पुना गेस्ट हाऊस याला अपवाद आहेत! बादशाहीची आमटी अप्रतिम असते, आणि पुना गेस्ट हाऊसचा स्वयंपाकदेखील सुरेख असतो. पण तिथेदेखील आमटीतल्या डाळीचं प्रमाण अंमळ कमीच असतं हे मात्र खरं आहे! :)
सहजराव,
बाकी असे स्वप्न आहे की बिनचूकपणे हे सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या इ. (मासळीबाजारात) ओळखता यावेत.
त्याकरता मासळीबाजारात जाऊन एखाद्या कोळणीच्या हाताखाली ट्रेनिंग घ्यायला लागतं! :) गुरुशिवाय विद्या नाही बाबा! मी अश्याच एका कोळणीला माझा गुरू केलं आहे, तूही कर! :)
संजोपशेठ,
मुंबईतल्या इतर खाद्यमंदिरांवर पण लिहा. असेच मिटक्या मारत वाचू!
नक्की लिहीन..
बाय द वे रावशेठ, आज सकाळी माझ्या पहिल्या प्रेमावर चक्कर मारली असता आपला शौकीन चित्रपटावरचा लेख वाचनात आला. सुंदर लिहिलं आहे तुम्ही. काही काही सिनेमे मनाला फक्त निखळ आनंद आणि आनंदच देतात त्यापैकी शौकिन एक! :)
ईश्वरी,
अवांतर - तुम्ही मायबोलीच्या दिवाळी अंकात लिहिणार आहात असे कळले. तुमचा लेख नि:संशय सर्वोत्तम असेल याची खात्री आहे, त्याकरता शुभेच्छा!
अजून विषय डोक्यात घोळतो आहे, परंतु कागदावर निश्चित असं अजून तरी काही उतरलेलं नाही. असो, शुभेच्छांकरता धन्यवाद..
उपक्रमावर गीत मेघदूताचा तिसरा भाग केव्हा लिहिणार?
आजउद्याकडे लिहायचा विचार आहे. सवड मिळाल्यास लिहीन..
तुमचं मिसळपाव डॉट कॉम बारगळलं की काय? -:)
काम सुरू आहे..:)
आपला,
(शौकिनमधला उत्पल दत्त!:) तात्या.
पुणेरी खाणावळी
खरं आहे हे. पण पुणे शहरातले वास्तव्य हे प्रामुख्याने भांबुर्ड्याच्या आसपास झाल्यामुळे बादशाही आणि पेरुगेट पोलीस चौकी नाही म्हटली रोजच्या वापरासाठी जरा लांबच होती. कडांचा भाग पूर्ण कच्चा आणि उरलेला भाग तीन चतुर्थांश कच्चा अशा हॉस्टेलच्या मेसच्या चपात्यांचा दरवळ खोलीपर्यंत आला की आम्हाला पोटात अक्षरशः ढवळून येत असे. (आजही मॉडर्न कॅफेसमोरच्या सिग्नलजवळून गेलो की थोडावेळ भूक मरते) पावभाजीचे बटाटे स्म्याश करताना कपडे धुवायच्या धुपाटण्याचा वापर घामाने निथळणार्या अंगाने करणारे आचारी महाराज याची डोळा पाहिल्यानंतर हॉस्टेलच्या मेसमध्ये अगदीच नाईलाज असेल तरच खायचे असे ठरवले आणि त्यामुळे जंगली महाराज मंदिरासमोरील शिवाजीनगर गावठाणातल्या "घरगुती" या नावाखाली काहीही खपवणार्या सुमारे २७ खाणावळींबद्दलच्या अनुभवावर लिहिले आहे. सगळ्या खाणावळींचे अनुभव वेगळे असले तरी जेवणाची चव मात्र सारखीच असायची ;) उल्लेखनीय अनुभव म्हणजे एक शहा आँटी म्हणून होत्या त्यांना आमचे वजन वाढेल याची फार काळजी त्यामुळे पुरीच्या आकाराचे मोजून ३ फुलके वाढत असत.
शनिवार रविवार वेळ मिळाला की बादशाही, जनसेवा वगैरे खाणावळींकडे मोर्चा जायचा. पण "बाहेर पैसे घालवून घासफूस काय खायची" या मुद्यावर सर्वांचे एकमत असल्यामुळे शक्यतो हाडे फोडण्याचाच कार्यक्रम व्हायचा.
आमच्या काही निगरगट्ट मित्रांनी त्यांचे सोशल व पर्सनल कॉन्टॅक्ट्स वापरुन ओळखीच्या लोकांच्या मंगलप्रसंगी भोजनसमारंभास हजेरी लावणे वगैरे युक्त्या शोधल्या होत्या. ;)
असो.
आचारी
हे महाराज तवा किती तापला आहे हे ओळखण्यासाठी तॊ घाम बोटांवर गोळा करुन त्याचा सपका तव्यावर मारतात आणि होणार्या चर्रर्र आवाजावरुन ठरवतात. गावाकड रेवड्या (तिळगुळाची किंचित ढेपेसारखी आकाराची पण लहान ) तयार करताना आचारी गुळ व तिळ यांचे मिश्रणावर चक्क पायाने चिखल तुडवल्या सारखे नाचतात. हगाम्याच्या (मातीतल्या कुस्तीचा फड)वेळी मुलांना रेवड्या फुकट भेटायच्या. चित झाला तरी बी अन जिंकला तरी बी.
प्रकाश घाटपांडे
या दृष्टीनेही विचार व्हावा!
आज मुंबईतच काय, तर सार्या जगात शेट्टी हाटेलांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत महाग दर आणि तीच तीच पंजाबी चव! कधी टॉमेटोच्या मिश्रणात काजू पेस्ट, तर कधी काजूपेस्टमध्ये टोमेटो प्युरी वापरून केलेल्या त्या महागड्या पंजाबी भाज्या! मंडळी, हे सगळं पाहिलं की गिर्हाईकाला आस्थेने, घरगुती चवीचे पदार्थ वाजवी दरात जेवू घालणार्या रामभाऊंसारख्या किंवा अनंताश्रमच्या खडप्यांसारख्या खानावळवाल्यांचं महत्व लक्षात येतं.
वा तात्या काय सत्य बोललात!
तेच ते खाऊन पार कंटाळा येतो. पण मराठी माणूस त्याची चव सगळीकडे देईल तर मग तो मराठी माणूस कसा हो? या चवी ची चव जगाला मिळावी, या दृष्टीनेही विचार व्हावा!
आशा आहे, समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४ हे गिरगाव, मुंबई-४ न राहता, जगभर पसरावे ह्याच आमच्या शुभेच्छा!!
बाकी आपल्या चविष्ट लिखाणाबद्दल आम्ही काय बोलणार? आपण तर सिद्धहस्त आहात!
लेखमाला लवकर येवू देत मुंबईतल्या मराठी खाण्याची ओळख करून देणारी इतकेच!
आपला
खाऊगुल्ल्या
गुंडोपंत
गुंड्याभाऊ,
आशा आहे, समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४ हे गिरगाव, मुंबई-४ न राहता, जगभर पसरावे ह्याच आमच्या शुभेच्छा!!
क्या बात है..
बाकी आपल्या चविष्ट लिखाणाबद्दल आम्ही काय बोलणार? आपण तर सिद्धहस्त आहात!
लेखमाला लवकर येवू देत मुंबईतल्या मराठी खाण्याची ओळख करून देणारी इतकेच!
हो, सवड मिळेल तसं लिहीन रे. प्रतिसादाबद्दल तुझे आभार..
तात्या.
--
शुद्धीचिकित्सक वापरणे हे आम्ही आमच्या 'शान के खिलाफ' समजतो! भेंडी, काय शुद्ध अन् काय अशुद्ध हे आम्हाला सांगणारा शुद्धीचिकित्सक कोण लागून गेला आहे?:) इतरांनी बनवलेल्या शुद्धलेखनाच्या नियमांना आम्ही जुमानत नाही/जुमानणार नाही आणि आम्ही जे लिहू ते शुद्धच असते असेच आम्ही मानतो!
छान
'तीन नट्यांचा फोटो आणि एका ओळीचे लेखन' हे चर्चा म्हणून जिथल्या ध्येय धोरणांमध्ये खपत असेल तिथे तात्याला इतका मोठा डिस्क्लेमर का लिहावा लागतो?
बाकी लेख आणि छायाचित्रे छानच!
वरूणदेवा,
वरूणदेवा, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
'तीन नट्यांचा फोटो आणि एका ओळीचे लेखन' हे चर्चा म्हणून जिथल्या ध्येय धोरणांमध्ये खपत असेल तिथे तात्याला इतका मोठा डिस्क्लेमर का लिहावा लागतो?
पाहिलंस ना वरूणदेवा, हे असंच आहे बघ! अरे बाबा न्यायाचा जमाना राहिला नाही हल्ली! काय सांगावं, नेमका माझाच लेख उडवायचे, म्हणूनच आधी व्य नि पाठवून परवानगीही घेतली होती आणि शिवाय डिस्क्लेमरही लिहिला!
असो, आपलं मिसळपाव डॉट कॉम सुरू होईपर्यंत हा अन्याय सहन करायचा! ते एकदा सुरू झालं की तिथे हव्वी ती धमाल करू. आपल्या धन्याशेठला मी मिसळपावचा 'व्याकरण-प्रमुख' करणार आहे! :)
तात्या.
--
अब्दुलकलाम यांच्या केशरचनेचा एक तेवढा मुद्दा सोडला तर तात्या आणि वरूणचे एकमेकांशी पटते! :)
पत्ता पुरा द्या
तात्याबा समर्थ भोजनालय चा लेख लयी आवल्डा पर एड्रेस जरा डिटेलमधी द्या राव गिरगाव चौपाटीला एक चक्कर झाला पन नयी सापल्ड राव !
अब्दुलकलाम यांच्या केशरचनेचा एक तेवढा मुद्दा सोडला तर तात्या आणि वरूणचे एकमेकांशी पटते! :)महा बी तेव्हढाच मुद्दा असतो बॉ
बाबूराव
लाळेरे लावून वाचन ;)
वा वा तात्या,
नेहमी प्रमाणेच चविष्ट लेख आहे. वाचून तोंडाला पाणी सुटले.
इकडे जिथे साधा वडापाव नशिबी नाही तेथे बसून असले लेख वाचायला लागणे म्हणजे..असो :)
असेच नेहमी चविष्ट लेख येवू द्या..आम्ही 'मं म्म्' असे लिहिलेले लाळेरे लावून ते आनंदाने वाचू.
-- (खदाड) लिखाळ.
नेहमी फॉरिनच्या देशांत टूर चे दौरे करित असल्याने मी मराठी फारसे वाचत नाही :) (वार्यावरची वरात -पुल)
आवडला
लेख् काय आणि माहिती काय पण् ती तुमच्या सारख्या अस्सल खवय्याच्या लेखणी मुळे वाचायला मिळाले हेच् माझे भाग्य.
मनोगता वरून तर गायब आहात त्यामुळे असे अचानक तुमचा लेख् वाचायला मिळतो आणि ते पण जगप्रसिद्ध् खाणावळी वर म्हणजे मला पर्वणीच.
मामलेदार् ची मिसळ् कधी खिलवताय्, वाट बघतोय तुमच्या निमंत्रणाची, अहो वर्ष होत् आले.
तात्या भक्त
सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"
बाबुराव, लिखाळ, सुमीत,
बाबुराव,
पर एड्रेस जरा डिटेलमधी द्या राव गिरगाव चौपाटीला एक चक्कर झाला पन नयी सापल्ड राव !
अरे चौपाटीच्या बाजूला जायचंच नाही. जगन्नाथ शंकरशेठ रस्त्यावरील एका गल्लीत ही खानावळ आहे. गायवाडी बस स्टॉपवर उतरलास की कुणीही आजुबाजूचे दुकानदार पत्ता सांगतील. व्हीटीहून, महापालिका कार्यालयासमोरून तुला ६५, ६६, ६९, १२६ या गिरगावात जाणार्या बसेस तुला मिळतील. या सर्व बसेस गायवाडी बसस्टॉपवर थांबतात.
लिखाळराव,
असेच नेहमी चविष्ट लेख येवू द्या..आम्ही 'मं म्म्' असे लिहिलेले लाळेरे लावून ते आनंदाने वाचू.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लिखाळशेठ. 'लाळेरे लावणे' हा वाक्प्रचार आवडला. अधिक माहितीकरता आमच्या धन्याला गाठला पाहिजे! :)
सुमीतशेठ,
लेख् काय आणि माहिती काय पण् ती तुमच्या सारख्या अस्सल खवय्याच्या लेखणी मुळे वाचायला मिळाले हेच् माझे भाग्य.
प्रतिसादाबद्दल तुझा आभारी आहे, पण भाग्य, पर्वणी असले शब्द वापरून कौतुक जरा जास्तच केले आहेस हो! :)
मनोगता वरून तर गायब आहात त्यामुळे असे अचानक तुमचा लेख् वाचायला मिळतो
अरे बाबा! ते सृजनशील, सर्जनशील, प्रतिभावंत, सात्विक, सभ्य आणि सुसंस्कृत मंडळींचं संकेतस्थळ आहे! आमच्यासारख्या वेड्याबागड्या, शिवराळ अन् असंस्कृत माणसांचं तिथे काय काम? :)
असो,
आपल्या सर्वांचा,
(आभारी) तात्या.
वा तात्या ! क्या बात है !
तात्या,
लेख आवडला क्या बात है, हा लेख मुंबईत असतांना वाचायला मिळाला असता तर तात्या कितने दिनो तक 'समर्थ भोजनालय' याद राहिला असता,असो खाण्यालाही नशीब लागते.पुढच्या वेळेस जाईन तर तुमच्या संजयसेठला भेटेन (आणखी काही मुलींची स्थळे आतून त्यांच्याकडे सरकून येईन :) ) मस्त बोटे चाटे पर्यंत खाणावळीत तब्येतीने जेऊन येईन. रामभाऊ,रजनीमावशी,विश्वनाथ्,संजय, कोर्ट कचेरी,कोकणातील माणसे त्यांच्याबद्दलचे लेखन वाचतांना त्यांच्याशी संवाद करतोय असं वाटलं ! खाणावळ संस्कृतीवरचा फारच सुंदर लेख.
तात्या प्राधान्यक्रमाने म्हणाल तर मला ही सारीच माणसं आवडली आणि नंतर माहिती, अर्थात लेखकाची कोणत्याही माणसांवर अन विषयांवर लिहिण्याची ताकद मोठी आहे, हे तर आम्ही केव्हाच मान्य केलं आहे !
खाणावळ संस्कृतीवरचे लेख येऊ द्या तब्येतीने !
बिरुटेशेठ,
मस्त बोटे चाटे पर्यंत खाणावळीत तब्येतीने जेऊन येईन.
ये हुई ना बात! मी पण येईन आपल्यासोबत! :)
भरभरून लिहिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद बिरुटेशेठ..
तात्या.
समर्थ आता विकिवर..;)
मराठी विकिपिडियावर या दुव्यावर समर्थ भोजनालयाची माहिती चढवली आहे. एका कोकणी बाल्याला, मुंबईतील एक कष्टकरी गिरणी कामगार असलेल्या आमच्या रामभाऊंना आम्ही आता आंतरजालाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेले आहे, हीच त्या पुण्यात्म्याला आमची श्रद्धांजली!
सदर लेखकाने विकिपिडियाच्या संदर्भात 'त्या'चे शिष्यत्व पत्करले आहे! :)
तात्या.