२२ जून

कालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.

आधुनिक भारतीय इतिहासाला कलाटणी देणारी एक घटना याच दिवशी घडली. सध्याच्या आर्थिक, राजकीय, आणि सामाजिक रचनेमध्ये ह्या घटनेचे महत्त्व विस्मरणात ढकलले गेले आहे. तरीही तब्बल ११० वर्षांपूर्वी याच दिवशी आजच्या भारताच्या पायाभरणीची मुहूर्तमेढ रोवली गेली असे अनेक अर्थांनी म्हणता येईल.

याच दिवशी पुण्यामध्ये चाफेकर बंधूंनी रॅन्ड साहेबाला यमसदनास पाठविले.

पुण्याला त्या काळी प्लेगच्या रोगाने विळखा घातला होता. रॅन्डसाहेबाने टोकाच्या बेदरकारपणे हा रोग आणि रोगी माणसे निपटून काढण्याचा खटाटोप मांडला होता. लोकांच्या देवधर्माच्या भावनांना लाथाडणे, मुलीबाळींना घराबाहेर ओढणे आणि पुरुषवर्गाला अनेकप्रकारे अपमानित करणे याचा उच्छाद मांडला गेला होता. एकदा परकीय राजवटीच्या वृक्षाचे वास्तव्य स्वीकारले की मग गुलामगिरीच्या अशा या फळांना "आलिया भोगासी" म्हणून सामोरे जाणे एव्हढेच ना हाती राहते. नाही! निमूटपणे सहन करणे हे काहीजणांना मान्य नव्हते.

विशीच्या जवळपास असणार्‍या या चाफेकर बंधूंनी आणि त्याच्या बरोबरीच्या तरुणांनी मात्र याला प्रत्युत्तर देण्याचे ठरविले. त्यांनी कट रचला, शस्त्रे मिळविली. २२ जून १८९७ च्या रात्री व्हिक्टोरिआ राणीच्या जुलमी राजवटीची डायमन्ड ज्युबिली साजरी करण्यासाठी रॅन्ड जातीने हजर राहणार होता. तो मुहूर्त साधायचे ठरले आणि परतीच्या मार्गावर असलेल्या रॅन्डला टिपण्यासाठी "गोंद्या आला रे" ही परवलीची आरोळी ठरली. नेमकी बग्गी ओळखताना थोडा घोटाळा झाला पण अखेरीस गणेशखिंडीत गोळ्या झाडून रॅन्डचा वध केला गेला.

१८५७ च्या संघर्षानंतर इंग्रजी अमलावर झालेला पहिला खळबळजनक आघात या घटनेने झाला. भारतीय क्रांतिकारकांनी केलेल्या पहिल्या राजकीय हत्येची नोंद या दिवशी झाली. ब्रिटिश राजवटीने चवताळून प्रतिहल्ला केला. जागोजागी छापे घातले. त्या काळी २०००० रुपयांचे बक्षीस माहितीसाठी जाहीर केले. फितुरीच्या आणि गफलतीच्या फंदात सापडल्याने सर्व क्रांतिकारक एकामागून एक पकडले गेले.

१८ एप्रिल १८९८ या दिवशी येरवडा तुरुंगात दामोदर चाफेकर फासावर गेले. थोर राजकीय नेते टिळक यांना चाफेकर बंधूंना प्रोत्साहन देण्याच्या आणि समाजात क्रांतिकारी विचारांचे वारे निर्माण करण्याच्या आरोपाखाली याच तुरुंगात १८ महिन्यांच्या सक्त मजुरीसाठी धाडण्यात आले. अंतिम घडीच्या काही काळ आधी चाफेकरांनी टिळकांकडून त्यांची भगवद्गीता वाचण्यासाठी मागितल्याची आठवण सांगितली जाते. १८९९ च्या मे महिन्यामध्ये वासुदेव चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि महादेव रानडे या कटातील अन्य तीन क्रांतिकारकांनाही फासावर चढविले गेले. चाफेकरांनी पेटविलेली ज्वाला मात्र विझली नाही.

सावरकरांनी या घटनेने प्रत्यक्ष प्रेरणा घेतली हे तर सर्वश्रुत आहेच. त्यानंतर अवघ्या दहा वर्षांत "१८५७ चे स्वातंत्र्यसमर" हा भारतीय मानसिकता आणि राजकारण प्रभावित करणारा ग्रंथ सावरकरांनी लिहिला. अनेकानेक क्रांतिकारकांचे जाळे उभे केले. चाफेकरांनी स्थापन केलेली "हिंदू धर्म संरक्षिणी सभा", "व्यायामशाळा", चालविलेले शिवजयंती आणि गणेशोत्सव या बीजांचा विस्तार स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही वेगवेगळ्या दिशांनी झालेला दिसतो.

१८५७ मधील मंगल पांडेची बंदूक आणि राणी लक्ष्मीबाईची तलवार ही जुने ते टिकविण्यासाठी होती, तर १८९७ ची चाफेकरांची गोळी आणि टिळकांची लेखणी ही नव्या भारताची नांदी होती.

(ऋणी) एकलव्य

अधिक ऋणनिर्देश -माझे कर्मपिता आणि काही जीवलग यांच्याशी वर्षानुवर्षे होत असलेला संवाद

Comments

आई अंबे जगदंबे जातो..

II श्री II
आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे,
रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे!

चाफेकर बंधुंचे स्मरण करून देणार्‍या लेखाबद्दल एकलव्यरावांचे आभार..

आपला,
(नतमस्तक) तात्या.

उपक्रमराव,

शक्य झाल्यास, सदर लेखातील '१८ एप्रिल १९९८ या दिवशी येरवडा तुरुंगात दामोदर चाफेकर फासावर गेले' या वाक्यात आणि '१९९९ च्या मे महिन्यामध्ये वासुदेव चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि महादेव रानडे या कटातील अन्य तीन..' या वाक्यात अनुक्रमे १८९८ व १८९९ असे बदल करावेत. एका उत्तम लेखात अनवधानाने झालेल्या चुका नसाव्यात असे वाटले म्हणून ही विनंती.' -- तात्या.

सदर बदल करून दिले आहेत. चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. -- संपादन मंडळ.

चित्रे

या दिवसाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. या वीरांना प्रणाम करायचा झाल्यास चित्रे असल्यास उत्तमच.

दामोदर चाफेकर
दामोदर चाफेकर
वासुदेव चाफेकर
वासुदेव चाफेकर
महादेव रानडे
महादेव रानडे

.
.
.
.
.
.
.
.

ही तीन चित्रे सहज मिळाली.

***

दामोदर हरी चाफेकरांच्या बोटांचे ठसे (भगवद्गीतेच्या प्रतीवरील)

अंतिम घडीच्या काही काळ आधी चाफेकरांनी टिळकांकडून त्यांची भगवद्गीता वाचण्यासाठी मागितल्याची आठवण सांगितली जाते.

या संदर्भातीतल् सकाळमधील खालील बातमी पहा...

चापेकरांचा प्रेरणाग्रंथ एकशेदहा वर्षांनी प्रकाशात
आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये ज्या पवित्र ग्रंथाने महान क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांना साथ केली, तो ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल एकशेदहा वर्षांनी प्रकाशात आला आहे. १८ एप्रिल १८९८ या दिवशी मृत्यूला सामोरे जाताना हातामध्ये गीतेची प्रत असावी म्हणून चापेकरांनी लोकमान्य टिळकांकडे त्यांच्याकडील गीतेची प्रत मागितली होती. ती प्रत हातात घेऊनच ते निधड्या छातीने मृत्यूला सामोरे गेले.
या प्रसंगाचे हृदयद्रावक वर्णन वि. श्री. जोशींनी "कंठस्नान आणि बलिदान' या चापेकरांच्या चरित्रात केले आहे. ""नियमानुसार चापेकरांचे हात मागे बांधण्यात आले व चेहऱ्यावर बुरखा घालण्यात आला. हात मागे बांधलेले असतानाही चापेकरांनी हातामध्ये गीतेची प्रत घट्ट धरली होती. फाशी दिल्यानंतर तासाभराने जेव्हा त्यांना खाली उतरवण्यात आले तेव्हा महत्प्रयासाने ती गीता त्यांच्या हातातून सोडवण्यात आली,'' असे जोशींनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

संदर्भ- इ-सकाळ, २२-जून-२००७

सदर गीतेची प्रत लोकहितवादी देशमुखांचे खापरपणतू व शिवरामपंत परांजपे यांचे नातू डॉ. यशवंत देशमुख यांच्याकडे असल्याचे "सीओईपी'तील निवृत्त प्रा. आनंद रेणावीकर यांनी सांगितले व २२ जूनच्या सुमारासच या अमूल्य ग्रंथाच्या दर्शनाचा योग आला. ही प्रत हस्तलिखित असून, त्याची लांबी सुमारे सहा इंच, तर रुंदी सुमारे चार इंच आहे. सदर प्रत पुठ्ठ्याने व्यवस्थित बांधलेली आहे. काळी व लाल शाई लिहिण्यास वापरलेली असून, अक्षर सुरेख व पहिल्या पानापासून शेवटपर्यंत सारखे आहे. यात पहिल्या १५५ पानांवर संपूर्ण गीता व त्यानंतर विष्णू सहस्रनाम, गजेंद्रमोक्ष ही स्तोत्रे आहेत. संपूर्ण ग्रंथ आजही सुस्थितीत आहे. मागील हातामध्ये घट्ट पकडल्यामुळे दोन्ही हातांच्या अंगठ्यांच्या खुणा गीतेच्या वरील भागात आजही दिसून येतात.

याविषयी माहिती देताना डॉ. देशमुख व त्यांच्या पत्नी सुमित्रा यांनी सांगितले, की डॉ. देशमुखांच्या वडिलांना त्यांचे मामा सोहोनी यांच्याकडून १९०१ मध्ये ही प्रत मिळाली. हातामध्ये घट्ट पकडल्याने हा ग्रंथ वाकलेला होता तो जड पुस्तकांखाली ठेवून सरळ करावा लागला. १९७० मध्ये डॉ. देशमुखांकडे त्यांच्या वडिलांनी हा ठेवा सुपूर्त केला. आजपर्यंत हा ठेवा जपला गेला आहे. घराण्याची अमूल्य ठेव असल्याने कुठल्याही संग्रहालयास देण्याचा विचार केला नाही, तसेच हाताळल्यास खराब होऊ नये म्हणून मोजक्‍याच लोकांना ही प्रत दाखविली, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

अथक परिश्रम करून १९७१ च्या सुमारास वि. श्री. जोशींनी चापेकर बंधूंचे चरित्र लिहिले. त्यामध्ये तिन्ही बंधू हातात गीता घेऊन मृत्यूस सामोरे गेले, असे लिहिले आहे. तीन पैकी इतर दोन गीता कुठे आहेत, तसेच उपरोक्त गीता सोहोनींकडे कोठून आली असावी, हे प्रश्‍न आजही अनुत्तरितच आहेत.

- मंदार लवाटे

अभिवादन

चाफेकर बंधूंच्या स्मृतीस अभिवादन.
अतिशय थोड्या शब्दात प्रभावीपणे या दिवसाचे महात्म्य सांगणार्‍या एकलव्यांचे कौतुक.

अधिक माहिती आणि चुका दुरूस्तीबद्दल...

... मनःपूर्वक आभार!

विचार पुढे धावत राहिले आणि शब्द मागे पडत गेले असे काहीसे झाले. आणखीही माहिती मिळाल्यास जरूर पुरवावी ही विनंती.

अवांतर - मराठी विकिवरही २२ जून १८९७ किंवा दामोदर चाफेकर यांच्याविषयी फारशी माहिती नजरेस पडली नाही.

आपण घालू की.

मराठी विकिवरही २२ जून १८९७ किंवा दामोदर चाफेकर यांच्याविषयी फारशी माहिती नजरेस पडली नाही.

म्हणजे मी घालते वेळ झाला की. ही इथली माहिती उचलते, तुमची परवानगी असेल तर.

हरकत नाही...

... तसे मीही तेथे खाते उघडले आहे पण कधीही वावरलेलो नाही. परवलीच्या शब्दापासून सुरुवात करावी लागेल. तेव्हा आपण तेथे उतरावयला हरकत नाही.

(नेहमीप्रमाणेच प्रियालीताईंवर विसंबणारा) एकलव्य

चाफेकर की चापेकर?

तसे मीही तेथे खाते उघडले आहे पण कधीही वावरलेलो नाही. परवलीच्या शब्दापासून सुरुवात करावी लागेल. तेव्हा आपण तेथे उतरावयला हरकत नाही.

धन्यवाद. वेळ झाला की करतेच.

एक प्रश्न... इंग्रजीत आणि काही ठिकाणी इतरत्र स्पेलिंग चापेकर असे दिसते, तेव्हा योग्य शब्द कोणता? चापेकर की चाफेकर?

एकलव्या,

विचार पुढे धावत राहिले आणि शब्द मागे पडत गेले असे काहीसे झाले.

अरे मेल्या एकलव्या, कसली रे पुस्तकी भाषा तुझी! ;)
लिहिण्याच्या नादात सनावळीचा चक्क वेंधळेपणा केलास असं प्रांजळपणे सांग की! ;)

असो! लेख मात्र खरंच छान लिहिला आहेस हो..

तुझा,
(घरगुती!) तात्या.

आता तात्या काय सांगू...

... शब्द मागे पडत राहिले हे सनावळींच्या घोळाबद्दल नाही, तर जे लिहायचे राहून गेले अशा काही विचारांबद्दल आहे. आता तो मूड, ती तिरीमिरी आणि क्षणही गेला.

अजूनही..

आता तो मूड, ती तिरीमिरी आणि क्षणही गेला.

हे मात्र खरं. एकदा ती तिरिमिरी आणि मूड गेला की परत लिहिता येत नाही हा अनुभव मलाही आहे! असो..

तात्या.

२२ जून,सुंदर लेख.

एकलव्य साहेब,

क्रांतिकारी इतिहासाचे विस्मरण होऊच शकत नाही,त्याचे प्रत्यय म्हणजे हा लेख.तसेच या लेखाला लाभलेल्या चित्रांमुळे या लेखाला एक तेजोवलय निर्माण झाले आहे.

क्रांतिकारकांच्या इतिहासाने,
भारावलेला एक विनम्र भारतीय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सावरकरांचा पोवाडा

वीर सावरकरांनी लिहिलेला चाफेकरांचा / रँड-वधाचा पोवाडा त्या काळात लोकप्रिय झाला होता. खुनी शोधताना इंग्रजांचे पुणेरी कोकणस्थांवर विशेष लक्ष असे हे त्यांचे धोरण दर्शवणार्‍या खालील ओळी लक्षात राहिल्या आहेत --
"आधी पुणेकर, तशात ब्राह्मण, त्यातहि कोकणस्थांसि धरा |
याने गोरा ठार मारिला, कोणाला तरि कैद करा |"

दिगम्भा

अभिवादन्

चाफेकरांच्या स्मृतिला अभिवादन्.
त्यांच्यावर् एक् नाटक् निघाले होते असे आठवते. नाव् कोणाला आठवत् आहे का?

नाटक की सिनेमा?

त्यांच्यावर् एक् नाटक् निघाले होते असे आठवते. नाव् कोणाला आठवत् आहे का?

त्यांच्यावर '२२ जून १८९७' हा चित्रपट निघाला होता. नाटकाबद्दल माहीत नाही.

तात्या.

आवडला - काही मतभेद

१८५७ च्या संघर्षानंतर इंग्रजी अमलावर झालेला पहिला खळबळजनक आघात या घटनेने झाला. भारतीय क्रांतिकारकांनी केलेल्या पहिल्या राजकीय हत्येची नोंद या दिवशी झाली.
यातले दुसरे वाक्य खरे असले तरी पहिले वाक्य तितकेसे बरोबर वाटत नाही. म्हणजे दुसरे वाक्य खरे आहे म्हणून पहिले खरे आहे असा युक्तिवाद असेल तर ठीक आहे. पण इंग्रजी सत्तेवर पहिला खळबळजनक आघात होता तो वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडाचा. ते साधारण १८७८ - ८३ च्या सुमारास झाले. त्याचे मुख्य स्वरूप सावकारांना लुटायचे होते. १८७८ साली पुण्याच्या विश्रामबागवाड्याला कोणीतरी आग लावली. सरकारचा संशय वासुदेव बळवंतांवर होता आणि त्याला चिथावणी न्यायमूर्ति रानड्यांनी दिली या संशयावरून त्यांची बदली पुण्याहून धुळ्याला तातडीने केली.

चापेकर बंधूंनी केलेल्या हत्यांमुळे सरकारची परत पुण्यातल्या ब्राह्मणांवर वक्रदृष्टी वळली आणि त्यामुळे टिळकांनी गाजलेला "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" हा अग्रलेख लिहिला. बहुधा त्या लेखामुळेच टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन शिक्षा झाली. हा अग्रलेख काही दिवसांपूर्वी दैनिक सकाळच्या आवृत्तीत प्रसाद पुरंदरे यांच्या आवाजात ऐकता येत होता.

१८५७ मधील मंगल पांडेची बंदूक आणि राणी लक्ष्मीबाईची तलवार ही जुने ते टिकविण्यासाठी होती, तर १८९७ ची चाफेकरांची गोळी आणि टिळकांची लेखणी ही नव्या भारताची नांदी होती.

यातही माझा मतभेद आहे. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई व टिळक यांच्याबद्दलची वाक्ये खरी आहेत. पण चापेकर बंधूंनी या आधी काय काय कृत्ये केली ती पाहिली तर ते नव्या युगाचे पाईक म्हणण्यापेक्षा राणी लक्ष्मीबाई व मंगल पांडे यांचेच वारसदार होते असे म्हणणे योग्य ठरेल.

"सुधारक" नावाचे वर्तमानपत्र आगरकरांनी सुरू केले होते. आगरकरांच्या मृत्यूनंतर देवधर नावाचे गृहस्थ त्याचे संपादक झाले त्यांना चापेकर बंधूंनी मारहाण केली. त्यावेळी ते आगरकरांबद्दल असे म्हणाले होते " तो पापी आमच्या हातून सुटला पण याला (देवधर) आम्ही सोडला नाही." ही मानसिकता नव्या युगाची नक्की नाही. चापेकर बंधूंनी केलेल्या अशा प्रकारच्या कृत्यांना टिळकांची संमती असेलच असे नाही. पण बरेचसे संशोधक याचा दोष टिळकांना देऊन त्यांना प्रतिगामी, सनातनी ठरवतात - अगदी य. दि. फडक्यांसकट- हे मला पटत नाही.

जाता जाता - इंग्रजांनी महाराष्ट्रातून ब्राह्मणांच्या हातून घेतल्याने तसेच१८५७ च्या बंडातही नानासाहेब, रावसाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे ही ब्राह्मण मंडळी आघाडीवर असल्याने इंग्रजांनी ब्राह्मणांचा धसका घेणे साहजिक होते. पुढे वासुदेव बळवंतांचे बंड झाले. त्यामुळे शिक्षण घेतलेली रानडे, टिळक, आगरकर मंडळी इंग्रजी राज्याविरुद्ध असंतोष कशावरून पसरवणार नाहीत याची पण भीति होतीच.

पोटभेद

विनायकराव - लेख आवडल्याचे समाधान आहे. सविस्तर मतभेद मांडल्याबद्दल आभार.

माझी भूमिका -

  1. वासुदेव बळवंतांचे आद्य क्रांतिकारक हे स्थान मान्य आहे. फडक्यांच्या युद्धाची आणि चाफेकरांच्या कटांची जातकुळी वेगळी आहे. २२ जून च्या घटनेने -- मोठ्या गोर्‍या अधिकार्‍याची हत्या आणि राजकीय नेतृत्वाची साथ -- इंग्रजी सत्ता हादरून गेली होती हे नमूद करण्याचा मुख्य हेतू आहे.
  2. टिळकांना रॅन्ड हत्येसंदर्भात शिक्षा झाल्याचा उल्लेख वाचल्याचे आठवते आहे. कटास हातभार, भाषणे आणि लिखाण हे तिन्ही आरोप खटल्यामध्ये होते. येथे मूळ लिखाण याक्षणी उपलब्ध नाही. जी काही खातरजमा होईल ती कळवितो. किंवा अन्य अभ्यासकांनी कळवावी ही विनंती.
  3. चाफेकरांच्या प्रेरणेने क्रांतिकार्याची ठिणगी पेटली हे बर्‍याचदा मान्य होते. तो मांडलाच आहे. आणखीही नोंद केली आहे.
    हिंदुधर्माभिमानावर आधारित राष्ट्रप्रेमी संघटनांची अनेक उदाहरणे भारतात देता येतील. समाजशास्त्रामध्ये अ ते ज्ञ असा प्रवास दाखविणे अवघड आहे. त्यामुळे कारण परिणाम असा संबंध लावला नाही. तरीही चाफेकर आणि टिळक यांच्या जहाल राजकारणात येऊ घातलेल्या काळाची चिह्ने दिसली होती असे नक्कीच म्हणावेसे वाटते. जहाल राजकारण चांगले की वाईट, आजच्या भारतावरील त्याचा बरावाईट परिणाम हा स्वतंत्र विषय आहे.

(कालपुरुषाय नमः - इति) एकलव्य

लेख आवडला

लेख आवडला.

अभिवादन आणि खेद!

चाफेकर बंधुंना विनम्र अभिवादन!
गेल्या अनेक वर्षांपासूनचे ते आजपर्यंतचे घाणरडे राजकारण पाहता, सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार पाहता, हसत हसत फासावर गेलेल्या क्रांतिविरांची आपण काहीही किंमत ठेवलेली नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते! आपल्याला स्वातंत्र्य फार स्वस्तात मिळाले आहे अशीच आपली वागणूक आहे.

--ईश्वरी.

स्वातंत्र्याची किंमत

आपल्याला स्वातंत्र्य फार स्वस्तात मिळाले आहे अशीच आपली वागणूक आहे.

कॉलेजमध्ये एक किस्सा ऐकला होता. पंडित नेहरु एकदा चिंताग्रस्त होउन बसले होते. लेडी माउंट बॅटनने विचारले, " जवाहर, का रे बाबा असा चिंताग्रस्त ? " त्यावर नेहरुंनी स्वातंत्र्याबद्द्ल चिंता व्यक्त केली. " हात्तिच्या एवढच ना! मी सांगते माउंटबॅटनना, स्वातंत्र्य का काय ते देउन टाकायला."
(लघु व सौम्य रुपात मांडणी)
प्रकाश घाटपांडे

विनायकरावांच्या विचारांशी सहमत्

मी आतापर्यंत् वाचलेल्या अनेक् लेखांमधून् मलाही असेच् जाणवते की चापेकर् (चाफेकर् नव्हे) बंधूंनी रॅन्डचा केलेला खून् (किंवा वध् म्हणा) हा देशाला स्वातंत्र्य् मिळवून् देण्याच्या राजकीय् प्रेरणेपे़क्षा धार्मिक् कारणांनी अधिक् प्रेरित् होता असे वाटते. कुणी परकीय् आपल्यावर् राज्य् करतय् यापेक्षा आपला धर्म् कुणीतरी बुडवतोय् याची सल् अधिक् होती असे वाटते.

आपल्याकडे इतिहासातील् घटनांचे व् व्यक्तिंचे तटस्थपणे चित्रण् होण्यापेक्षा ते भावनेवर् आधारित् झाल्याचे ठऴकपणे जाणवते. एखाद्या ऍतिहासिक् व्यक्तिकडून् झालेल्या चुका तटस्थपणे मांडण्याने त्या व्यक्तिचे मोठेपण् कमी होत् नाही.

-जयेश्

ह्म्म्म्म्..

इकडचे तिकडचे सोडा..नीरक्षीरविवेक पणास लावून अलिकडील आणि पलिकडील पहाल अशी अपेक्षा.

अलिकडील आणि पलिकडील मध्ये काल आणि विचार दोहोंचा समावेश अपेक्षित!

जयेश -सहमत

एखाद्या ऍतिहासिक् व्यक्तिकडून् झालेल्या चुका तटस्थपणे मांडण्याने त्या व्यक्तिचे मोठेपण् कमी होत् नाही.

अगदी सहमत आहे. इतिहासातून बोध घेण्याऐवजी सूडाची प्रेरणा घेतली जाते.
प्रकाश घाटपांडे

शेरेबाजी

आपला तटस्थतेचा शेरा एकूणच जगातील लेखकांना आहे की या लेखाला आहे ते माहीत नाही. सदर लेखाला असेल तर लिखाण तटस्थपणेच केलेले आहे... पण कोरडेपणाने करण्याची गरज वाटलेली नाही.

तसेच क्रांतिकार्य हीच मोठी चूक ते इंग्रजच बरा होता असे चुका दाखविणारे अनेक पातळींवरील गट आहेत. त्यांतीलही काही मुद्दे वादविवादास योग्य आहेत, योग्य त्या स्थळी ती जरूर मांडावीत. येथे आपण कोणती चूक दाखविता आहात ते समजले नाही.

परक्यांचा हात डोक्यावर नको ही भावना चाफेकरांच्या धर्मप्रेमातून आलेली असेल तर चूक धरावी हे आपण सुचवू नयेत. प्रेरणांचे रसायन मोठे क्लिष्ट आहे... कोणतेही कार्य हे अनेक प्रेरणांचा परिपाक असते. क्रातिकारकांमध्ये काहीजण धर्मप्रेमाने सामील झाले तर काहीजण डाव्या विचारसरणीने उत्तेजित होउन तिकडे वळले. अहिंसात्मक मार्गावर चालणार्‍या काहींची प्रेरणा धर्मापोटी उपजली होती, तर काहींची निधर्मवादावर आधारित होती. शेवटी कोणताही स्वातंत्रलढा हा माझ्या माणसांसाठी किंवा मला जे पवित्र वाटते त्यासाठी उभे राहणार्‍यांच्या हिंमतीवरच पुढे रेटला जातो.

माझी माणसे म्हणताना "माझी बायकामुले" हा गट मात्र वगळला गेल्याचेच बर्‍याचदा दिसते. नजीकच्या कुटुंबीयांनी पिढ्यानुपिढ्या सोसलेल्या हालअपेष्टांचा विसर आम्हाला कधी पडू नये हीच प्रार्थना. हे भावनाशील लिखाण नाही तर मनातील भावना आहे. येथे तटस्थपणा दाखविण्याची कोणतीही गरज आम्हाला वाटत नाही.

माझा हा प्रतिसाद धर्मांधतेचे समर्थन करतो आहे असा कोणाचा दावा असेल तर माझी वाद घालण्याचीही इच्छा नाही. सूज्ञांवर सोडून द्यायची तयारी आहे.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

एकलव्य यांस,
तटस्थते बाबत मी आपल्याकडील ऐतिहासिक लेखन म्हटले आहे याचा अर्थ हा शेरा सर्व जगातील लेखकांना नक्कीच नाही तसेच सर्वच भारतीय लेखकांनाही नाही.
प्रेरणांचे रसायन मोठे क्लिष्ट आहे. या आपल्या मताशी मी सहमत आहे. त्यातच धर्म व राजकारण हे दोन विषय हजारो वर्षांपासून एकमेकांशी अतिशय क्लिष्टरीत्या जोडले गेले आहेत. इथे वादाचा मुद्दा एवढाच होता की चापेकर बंधुंनी केलेली कृती निव्वळ राजकीय होती की धार्मिक.
मी काही इतिहास तज्ञ नाही. उपक्रमावर येऊन विचारांच्या आदान प्रदानातून आणि वाद विवादातून आपले ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करणार्‍यांपैकी एक आहे. आपल्या लेखनावर कोणताही व्यक्तिगत रोष नाही.
अंदाजे ७/८ वर्षांपूर्वी अंमळनेरला एका विद्यार्थी साहित्य संमेलानामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक सुंदर विचार मांडला होता. ते म्हणाले होते " कोणतीही नवीन गोष्ट किंवा विचार आत्मसात करण्यापूर्वी तुमचे मन रिते (Blank) करा, तरच तुम्ही ती गोष्ट किंवा विचार कोणत्याही पुर्वग्रहा शिवाय सहजपणे आत्मसात करू शकाल. परंतु मनाचा हा रितेपणा कोरडा नसावा" या रितेपणाला पाडगावकरांनी फार सुंदर उपमा दिली आहे. ती म्हणजे "Creative Blankness". आपल्या विचारांच्या विरोधी विचारांकडेही आपण अशाच "Creative Blankness" ने पहाल अशी अपेक्षा.
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

-जयेश्

रिते मन

जयेश् - आपला प्रतिसाद आवडला.

रित्या मनाची कल्पना सुंदर आहे. धन्यवाद! आता प्रत्येक वेळी लिहिताना कोठेतरी "क्रियेटिव्ह ब्लँकनेस" मनाला स्पर्श करून जाईल.

स्नेहपूर्वक - एकलव्य

(कोरी पाटी घेऊन बसलो आहे!)

मस्त!

या रितेपणाला पाडगावकरांनी फार सुंदर उपमा दिली आहे. ती म्हणजे "Creative Blankness".

आवडले!
असं करता येणं म्हणजे तर एकदम झकास! पण जमणं सोपं नाही!
आपला
(विचारांचे चिवडेवाला)
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

भावना आणि तटस्थता

विनायकराव, युयुत्सु महाराज, आणि जयेश महोदय -

आज सुप्रभाती आपले प्रतिसाद पाहिले. मतभेदांचे स्वागत आहे. कमी अधिक प्रमाणात भावनेचा प्रभाव मला आपल्या लिखाणांमध्ये दिसतो आहे. भावना हे झटकून द्यावे असे झुरळ हे मी मानत नाही... तेव्हा काळजी नसावी.

आपल्या बहुतेक सर्व आक्षेपांची उत्तरे माझ्या लेखातच आहेत असे वाटते. वेळ होईल तसे सविस्तर लिहीन. आता मात्र पळतो आहे.

(भावनाशील तटस्थ) एकलव्य

२२ जून (विस्मरण)

गेल्या आठवड्यात एका स्नेह्याने "अमेरिकन सामर्थ्याचे भवितव्य" (fareed-zakaria/the-future-of-american-power) हा प्रदीर्घ लेख पाठविला.

लेख बाजूला राहिला पण त्यातील "२२ जून १८९७" चा ढळढळीत उल्लेख मात्र या दिवसाचे (मलाच) झालेल्या विस्मरणाची बोच अजूनही देतो आहे.

(@@) एकलव्य

 
^ वर