सुमारीकरणाचा उत्कर्षबिंदू की उथळीकरणाची नीचतम पातळीँ?

आजकाल जिथेतिथे 'विद्वान', 'व्यासंग' आणि 'व्यासंगी' हे शब्द प्रतिसादांतून लिखाणांतून मुक्तपणे फेकण्यात -- राजेश खन्नाच्या शैलीत सुपरफॉस्फेट, युरिया फेकावी तसे -- येतात. असे करण्यामागे एखाद्याची पाठ थोपटणे एवढाच उद्देश दिसतो. एखाद्याने आपल्या लिखाणात कसले तरी ४-५ दाखले किंवा संदर्भ टाकले, ४-५ लेखकांची आणि पुस्तकांची नावे दिली की लगेच तो व्यासंगी होते. म्हणजे कसं मधेच पुलं, बळंच दुर्गाबाई, हळूच कुरुंदकर असे यायला हवे. म्हणजे कसं की ज्ञानाचा पैस दिसतो. बरं ह्या व्यासंगी जनांना फक्त दाखलेच देता येतात. नाही. लगेच "माझ्या आवडत्या लेखनात ह्याला समाविष्ट केले आहे", "माहितीने ओतप्रोत भरलेले हे लिखाण संग्रही ठेवावे इतके मोलाचे आहे" आणि "तुमचे लेख म्हणजे पर्वणीच' छाप पाडू प्रतिसादांपासून एका शब्दाचे लोटांगणी प्रतिसादही येतात. म्हणजे कुर्निसात, नतमस्तक वगैरे वगैरे वगैरे. या लोटांगणघालू प्रतिसादार्थींना मूळ लेखनातले काहीएक कळलेले नसते असे लक्षात येते.

अच्छा, कौतुक करायची एवढी उथळ घाई झाली असते की दिलेले दाखले कुणी तपासत नाही, प्रश्न विचारत नाहीत. आपण ज्या लेखनाला (किंवा लेखकाला) "कौतुकभरल्या" प्रतिसादांनी मखरात बसवतो आहोत ते किती पोकळ, तकलादू, हास्यास्पद, खोट्या, पूर्वग्रहदूषित, कलुषित -- तशी यादी जरा छोटीच आहे-- अशा बादरायण संबंधांनी, मुद्द्यांनी, युक्तिवादांनी, दाखल्यांनी नटलेले आहे, हे बहुतेकांना बरेचदा कळत नाही काय?

बरं, कोणी किती पुस्तके (की लिहवून घेतली) ह्यावरूनही त्याचा उदोउदो करण्याची प्रथा आहे. मग त्या पुस्तकांचा दर्जा पुस्तिकांपेक्षाही सुमार का असेना! कोसंबीनी काही ढीगभर पुस्तके पाडली नाहीत पण त्यांचे पुस्तक वाचून राचिं ढेरे एवढे प्रभावित झाले की म्हणाले ह्यातले एकेक वाक्य एका स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. आणि हे खुद्द कुरुंदकरांनी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. (चला मीही माझ्या व्यासंगाचा फ्लॅश मारून घेतला ) पण सांगायचा मुद्दा असा की खर्‍या अभ्यासकाला आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन आणि जाहिरात करावी लागत नाही.

असो. आणि हे आंतरजालापुरते मर्यादित नाही बरं का. हे चित्र सार्वत्रिक आहे.तर मुद्दा असा आहे की व्यासंग म्हणजे काय, विद्वत्ता म्हणजे काय हे आजकाल लोकांना कळत नाही काय? आजकालचा वाचक/दर्शक/ग्राहकच एवढा उथळ झाला आहे की त्याला सकस-निकस, चांगले-वाईट ह्यातला फरक कळेनासा झाला आहे? अशा पाठी थोपटण्याची गरज का भासते? अशा नतमस्तक होणार्‍यांमुळे टीकाकाराकडे खलनायकाप्रमाणे पाहिले जाते का? आम्ही "सुमारसद्दी"च्या उत्कर्षबिंदूला पोचलो आहोत काय? की ही उथळीकरणाची नीचतम पातळी आम्ही गाठतो आहोत? ३.की हे प्रत्येक काळातच असे होते, असते? म्हणजे प्रत्येक जाणाऱ्याला येणारा काळ अधिक उथळ, अधिक सुमार वाटत असतो?

कृपया आपली मते मांडावीत.


१. वरील शब्दांऐवजी दुसरे शब्ददेखील असू शकतात. मुद्दा असा आहे की स्तुती स्वस्त झाली आहे. जिथे तिथे 'सुमार गौरव' होतो आहे.
२. 'लोकायत' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बहुधा.
३.दुसरीकडे तंत्रज्ञानातील आणि विज्ञानातील वगैरे प्रगतीच्या बाबतीत सध्याच्या काळाहून बेहत्तर काळ बहुधा कधी आला नसावा.
४. अशाच आशयाचे पण ह्याहून अर्थातच अधिक मौलिक असे काहीसे धनंजय ह्यांनी कुठल्याशा प्रतिसादात लिहिले होते. त्याचा दुवा सापडला नाही.

शेवटीँ: खरे तर हा चर्चाप्रस्ताव मांडायला थोडा उशीरच झाला. पण भावना दुखावल्या जाऊ शकतील अशा सर्वांची आगाऊ माफी मागतो बरं का.

Comments

चर्चाप्रस्ताव

चांगला चर्चाप्रस्ताव आहे. जरा गरमागरम चर्चा होऊ द्या.

हा हा हा

विद्वत्ता म्हणजे काय हे आजकाल लोकांना कळत नाही काय?

या प्रश्नाच्या उत्तराआधी चर्चाप्रस्तावकाच्या मते विद्वत्ता म्हणजे काय? हे वाचायला आवडेल.

आजकालचा वाचक/दर्शक/ग्राहकच एवढा उथळ झाला आहे की त्याला सकस-निकस, चांगले-वाईट ह्यातला फरक कळेनासा झाला आहे?

चांगले-वाईट असे काही असते का? का फक्त आवडलेले-नावडलेले असते?

की हे प्रत्येक काळातच असे होते, असते? म्हणजे प्रत्येक जाणाऱ्याला येणारा काळ अधिक उथळ, अधिक सुमार वाटत असतो?

याबाबतीत सहमत आहे. हे प्रत्येक काळात होत असावे. प्रत्येक वयस्कर माणसाला नवी पिढी ही उथळ वाटत आली आहे. (प्रत्यक्षात ती असो वा नसो तो वेगळा मुद्दा झाला). मात्र असे वाटु लागले की आपले वय झाले असे समजायला हरकत नसावी का? ;)

------------------
ऋषिकेश
------------------

चांगले-वाईट, सुंदर-कुरूप

या प्रश्नाच्या उत्तराआधी चर्चाप्रस्तावकाच्या मते विद्वत्ता म्हणजे काय? हे वाचायला आवडेल.
अहो, व्याख्या ह्या लहान मुलांसाठी असतात. माझे म्हणणे असे की विद्वत्ता, व्यासंग असला की दिसतोच. आता इथलेच बघा ना. उपक्रमावर धनंजय, विसुनाना, यनावाला, कोल्हटकर, चंद्रशेखर वगैरे प्रभृतींचे प्रतिसाद (चला इतक्या लोकांना तर पॅक केले. अरे हो थत्ते, प्रियाली ह्यांना विसरलोच की. सॉरी हं) किंवा लेखन वाचले की कळतेच. हे उगाच दाखले देऊन, वाचन दाखवून विद्वत्तेचे किंवा व्यासंगाचे आणलेले सोंग नाही. उगाच कुठल्या तरी पुराणातून कुठले तरी काही तरी फालतू दाखले द्यायचे आणि त्यावर कुणी काही यथोचित टीका केलीच तर मग हिरमुसायचे असला बालिशपणा ते करत नाहीत. (आता इतर त्यांना 'तुम्ही किती व्यासंगी, अहाहा') असे म्हणून त्यांची मलमपट्टी करत आपली विद्वत्ता दाखवतात तो भाग वेगळा) तर माझ्यामते विद्वान हे प्रामाणिक शिकण्याच्या तयारीतच (लर्निंग मोड) असतात. बाप दाखवता आला नाही तर ते लगेच त्याचे श्राद्धही करून टाकतात.

चांगले-वाईट असे काही असते का? का फक्त आवडलेले-नावडलेले असते?
शब्दांत अडकू किंवा अडकवू नका. चांगले-वाईट काही असते का हा प्रश्न एखाद्याला पडणे हे माझ्यामते बहुधा गोंधळाचेच चिन्ह आहे. सुंदर-कुरूप, चांगले-वाईट, सकस-निकस वगैरे असतात की. अहो हे ऍनिमल इन्स्टिन्क्ट्स असतात. अगदी लहान बाळेही सिंडी क्रॉफर्ड आणि व्हूपी गोल्डबर्ग ह्यांत फरक करू शकतात. (दुवा 1, दुवा 2 वाचावे.) बाकी इथले तज्ज्ञ ह्याबाबतीत अधिक सांगतीलच.

असो. मौलिक भर घालण्याची अपेक्षा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आम्हाला वगळा, हतप्रभ 'ना' होतील तारांगणे :)

त्या तारामंडळात आमचे नाव नको. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी?

वाचन दाखवून विद्वत्तेचे किंवा व्यासंगाचे आणलेले सोंग नाही.

-सोंगच हो. आम्ही कसले विद्वान आणि आमचे कसले वाचन? आम्ही आपले शामभटच, बरें.
चार-सहा विद्वान लोकांमध्ये उठले, बसले की आपलेही ज्ञान वाढते असे पूर्वी कुणीतरी म्हटले आहे. त्याचेच पालन करतो.

हॅहॅहॅ

याला म्हणायचे विद्या विनयेन शोभते|
प्रकाश घाटपांडे

विद्या विनये न शोभते

अवांतर पीजे :

विद्या विनये न शोभते - विद्या विनयला शोभत नाही. ;)

आता कळला का आमचा व्यासंग? :)

कशाला कशाला

हेहेहे. कसे कसे. अहो ज्याचे श्रेय त्याला लाभायलाच हवे. ह्याला म्हणतात फिल्डिंग लावणे.

अवांतर पीजेवर अतिशय अवांतर:
विद्या हा पुरुषही असू शकतो. आमचे दोन मित्र आहेत. एक विद्याधर, दुसरे विद्यावत्सल. दोघांना आम्ही विद्याच म्हणतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असं वाटतं खरं

इथल्या लेखनावरूनच नाही, पण अगदी बर्‍याचदा असं वाटतं खरं!
कालचीच गोष्ट. घरी मुले टीव्हीवर एक कार्यक्रम बघत होती. मुलांचा विनोदी रियालिटी शो. आणि त्यातले संवाद, शाब्दीक विनोद ईतके मोठ्यांचे होते की बस्स! कितीही आय क्यू असलेले लहान मूल तसे संवाद बोलू शकणार नाही, असे वाटले. लेखन अर्थातच मोठ्यांनी केलेले होते. प्रत्येक फालतू, पाचकळ कोटीवर त्यातले परिक्षक (?) गगनभेदी हसत होते, दाद देत होते. त्या लेखनाचा दर्जा वगैरे सोडून देऊ, कारण टीव्हीवरचे फार म्हणजे फारच कमी कार्यक्रम बघण्यायोग्य दर्जाचे वाटतात. मला वाईट याचे वाटले की, माझ्या मुलांना खरचं हे आवडतंय! आणि मग जरा विचार केल्यावर लक्षात आलं की अरे, बहुसंख्य लोक अगदी आवर्जून बघत असलेल्या मालिकाही अगदी तद्दन आहेत. आणि तरीही लोक आवडीने पाहतात. पूर्वी येथेच्छ टिंगल करायचो, आता वाटतं कशाला त्यांची मजा घालवायची?
कदाचित हे माझं व्यक्तीगत पर्सेप्शन असेलही, पण हळूहळू त्यांना (निदान मुलांना) दर्जा म्हणजे काय ते कळेल ही आशा.

-स्वधर्म

.

आमचे नाव व्यासंगी प्रतिसादकांच्या यादीत घातल्याने पंचाईत झाली आहे.

काही प्रतिसाद द्यायचा म्हटले तर कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट संभवतो म्हणून पास.

नितिन थत्ते

आडनाव घेतले आहे

अहो पास कशाला करता. थत्ते ह्या आडनावावर नितिन ह्या नावाची मक्तेदारी नाही. त्यामुळे कॉन्‌फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्टचा प्रश्न उद्भवत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+

सहमत आहे.

थत्ते आडनाव अनेक लोक लावतात. त्यांच्यातले बरेचसे (माझ्यासह ? ) विक्षिप्त समजले जातात.

नितिन थत्ते

कर्तारसिंगांना विसरलात काय?

हाहाहाहा. भारी आहे फोटो. बाकी तेंडुलकरांवर हल्ला करणाऱ्या कर्तारसिंग थत्त्यांना कसे विसरलात? बाकी आम्हाला हे थत्ते आवडतात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बळचकर सिद्धांत

बळचकर सिद्धांताप्रमाणे "विद्वत्ता म्हणजे काय?" असे प्रश्न अनाधिकार्‍यांनी विचारू नयेत. मी माझी कुवत जाणून असल्याने गप्प राहणे ठीक समजतो.

सहमत

अशा नतमस्तक होणार्‍यांमुळे टीकाकाराकडे खलनायकाप्रमाणे पाहिले जाते का?

हा मुद्दा खूप आवडला.
मी "ऑफीस एटीकेट्" चे लेख वाचत असे त्यातदेखील हेच वाचले की कचेरीमध्ये कोणाही व्यक्तीची बाजू घेणे टाळा/ स्तुती करणे तर वर्ज्यच. याचा अनुभव आहे. कारण जे लोक बाजू घेतात त्यांच्यामुळे उगाचच बाजू न घेणारे पण "उसदासीन" (न्यूट्रल) लोक खलनायकी ठरतात.
एकमेकांची पाठ खाजवायची तर - खाजगीत काय ते करा ना. प्रदर्शन कशाला?
सार्वजनिक - संयत मतेच मांडावीत.
________________________________

जाणार्‍या प्रत्येक पीढीला येणारी पीढी उथळ वाटते हेदेखील खरे असावे - स्वानुभव!! पण येणारी पीढी उथळच असेल असे नाही तर "टेस्ट्" (रुची) भिन्न असू शकते.

मार्केटिंग

पण सांगायचा मुद्दा असा की खर्‍या अभ्यासकाला आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन आणि जाहिरात करावी लागत नाही.

कळीचा मुद्दा आहे ब्वॉ! मार्केटिंग च्या जमान्यात नुसती गुणवत्ता असून चालत नाही. लोकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंगही लागत. नाहीतर तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी.
एके काळी विद्वानांनी फार माज केला त्याचा परिणाम म्हणून सुमारीकरण झाले असावे. शब्दजाड्य वा शब्दबांबळ्य वापरुन वाचकांना आपल्या विद्वत्तेची झलक दाखवणार्‍या लेखकांना जर कोणी त्याच आशयाचे विचार सुलभ शब्दात मांडले तर अर्थहानी झाल्यासारखे वाटते. वाचकांना आपल्या भाषेत संवाद साधणारा लेखक जवळचा वाटतो. त्याची पुस्तके त्याला सहज उपलब्ध झाली तर अधिकच जवळचा वाटतो. सुलभीकरणाने अशा विद्वानांची महती कमी होउ लागल्याने त्यांनी त्याला तुच्छतेने सुमारीकरण म्हणायला सुरवात केली. गोविंद तळवलकरांनी एकदा मटात एका साहित्याला वा साहित्यिकाला झोडपताना बालसाहित्य असे म्हणुन संभावना केली होती. त्यावर नंतर अनेक नाराजीचे सूर उमटले. बालसाहित्याला कमी लेखता का? त्यातुनच भावी पिढी निर्माण होणार आहे. सकस बालसाहित्य असणे वा निर्माण करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. खरतर तळवलकरांना बालसाहित्याला कमी लेखायचे नसावे पण त्यांनी तो शब्द वापरल्याने वाचकांनी वा (सुमार साहित्यिकांनी ?) त्यांना झापले.
विद्वानांनी वा ज्ञानदांडग्यांनी जसजसा माज करायला सुरवात केली तस तसे वाचकांनी त्यांच्याकडे पाठ करायला सुरवात केली. पुर्वी अन्य पर्यायच उपलब्ध नसल्याने वाचक या विद्वनांना सहन करीत असत. पण नंतर जेव्हा अशा साहित्याला वा साहित्यिकांना, विचारांना वा विचारवंतांना पर्याय तयार व्हायला लागले तस तसे लोक त्याकडे वळू लागले. क्रमिक पुस्तकांना पर्याय म्हणुन गाईड लोकप्रिय झालेच ना! परिक्षेच्या काळात तर झटपट संदर्भ म्हणुन गाईडच विद्यार्थ्यांना जवळचे वाटू लागले.
असो!

प्रकाश घाटपांडे

तळटीप ४- असे काही म्हटल्याचे आठवते

तळटीप ४ सारखे माझे मत आहे खरे.* पण मलाही कुठल्या परिस्थितीत म्हटले त्याचा दुवा सापडत नाही. (विजय तेंडुलकरांची नाटके मध्यमवर्गीयांच्या नजरेत सवंग->अभिजात असा प्रवास करती झाली, त्या बाबतीत असे कधीतरी म्हटले होते - पण उपक्रमावरील चर्चेत तसे नेमके म्हटलेले सापडले नाही.)

डग्लस ऍडम्स या लेखकाने मजेदार तर्‍हेने मत मांडले आहे (अर्धवट आठवते त्यानुसार सारांश लिहितो आहे) : मी जन्मण्याआधीचे जग जुनाट होते. माझे वय वर्षे पस्तीस होईपर्यंत प्रचंड आणि प्रशंसनीय प्रगती झाली. त्यानंतर मात्र अखंड अधोगती चालू आहे. (साल्मन ऑफ डाउट संग्रहात हे वाक्य शोधल्यास सापडेल.)

- - -
*मात्र सॉक्रेटीसने आपल्या काळातल्या तरुण पिढीला दूषणे दिलीत, अशा आशयाचे उद्धरण काही ठिकाणी माझ्या मताच्या समर्थनासाठी अन्य लोक मांडतात. हे उद्धरण सॉक्रेटीसच्या मताच्या विपरित आहे. या खोट्या आणि फाजिल उद्धरणाच्या विरोधात मी काहीतरी लिहिले होते.

उथळीकरणामध्येही फॅशनेबल

उथळीकरणामध्येही काही उथळ गोष्टी फॅशनेबल होतात आणि काही ओल्ड फॅशन्ड होतात. उदा. मराठी वृत्तवाहिन्यांवर (माझा, आय लो, २४ ता.) तोंडाचा चंबू करून बोलण्याची आणि 'श' आणि 'ष' या दोन्हींचा उच्चार 'ष' असा ओढून ताणून करण्याची (अतिशय अनॉइंग) पद्धत सध्या फॅशनेबल आहे.

चर्चा

चांगली चर्चा आहे.
चर्चा = वाद असे काहीसे चित्र हल्ली रंगवले जाते. प्रत्येकाला पॉलिटिकली करेक्ट रहायचे असते आणि मग त्यातुन या सुमारीकरणाचा जन्म होतो असे माझे वैयक्तिक मत आहे. तुम्ही मांडलेला लेखन हा एक मुद्दा झाला. पण हल्ली सर्वत्र हाच प्रकार दिसतो. काही उदाहरणे द्यायची म्हटली तर महागुरु, अमुकतमुक सम्राट हे शब्द प्रयोग एकदम सामान्य झाले आहेत. किंबहुना अनेक स्पर्धांच्या अतिंम फेरीला महाअंतिम फेरी म्ह्टले जाते. मला तर हे कळतच नाही कि महाअंतिम म्हणजे नक्की काय? अंतिम आणि महाअंतिममध्ये काय फरक काय आहे? आता शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करणार्‍या मनसेच्या राज ठाकरेंना मराठी हृदयसम्राट म्हणणे याचे हसु आल्याशिवाय राहवत नाही.

उद्या एखाद्याला वाचन सम्राट, प्रतिसाद सम्राट म्हटल्यास आश्चर्य वाटणार नाही. :) बाकी हे मात्र खरे की उपक्रमावरचे काही सदस्य खरेच दर्जेदार लेखन करतात. मग ते लेख असोत वा प्रतिसाद.






चांगला मुद्दा

चर्चा = वाद असे काहीसे चित्र हल्ली रंगवले जाते. प्रत्येकाला पॉलिटिकली करेक्ट रहायचे असते आणि मग त्यातुन या सुमारीकरणाचा जन्म होतो असे माझे वैयक्तिक मत आहे.

अतिशय चांगला मुद्दा. कुणाला न दुखावता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता केलेली टीकाटिप्पणी ही कवडीमोलाची असते असेही नाही. पण कुठलीही समीक्षा/चिकित्सा न करता अगदी मिळमिळीतपणे एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणेही चांगले नाही.

तसेही जगण्याच्या अजिबात आशा नसलेल्या एखाद्या मरतुकड्याला कृत्रिम श्वसनाच्या (छान-छान-अप्रतिम प्रतिसाद, स्तुती वगैरे) आधारे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कशाला करायचा? पण साहित्य, सिनेमा आणि ललित कलांच्या बाबतीत कशाला हवी दया, करुणा, मदर टेरेसा वगैरे.

जाता जाता : पोलिटिकल करेक्टनेसवरून ही चर्चा आठवली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

केवळ संस्थळ प्रतिसादकांबद्दल नव्हे

सर्वसाधारणपणे -

व्यासंग म्हणजे काय हे कळायला जी वैचारीक पात्रता लागते ती सर्वांकडे सुरुवातीला असतेच असे नाही. सुरुवातीला कशालाही वा,वा म्हणणारे हळूहळू प्रगल्भ होत जातात आणि खरे सकस काय ते आपोआपच कळू लागते. व्यक्तीच्या वयावर, बौद्धिक कुवतीवर आणि अनुभवावर हे अवलंबून असते.
प्रत्येक काळातच हे घडत असते. व्यक्तीच्या मानसिक वयावर त्याचा उथळपणा-सखोलपणा अवलंबून आहे.

मस्त चर्चा

अशा नतमस्तक होणार्‍यांमुळे टीकाकाराकडे खलनायकाप्रमाणे पाहिले जाते का?

तुम्हाला समाज नावाची गुंतागुंत समजलेली दिसत नाही :)

सुमारांची सद्दी

विचार, ज्ञान यांचा वणवा आता आपल्याला जाणवायला लागला आहे. काऱण सुमारांचीच सर्व (मोक्याच्या) ठिकाणी वर्णी लागलेली आहे. साधेपणा व अभावग्रस्त दारिद्र्य यातील भेद पुसटशी झालेले आहेत. सुमारांची सद्दी म्हणण्यासाठी वैचारिक बैठक नसणे हे एकमेव कारण पुरेसे आहे. राजकारणी आणि सुशिक्षित पदवीधर या दोन्ही वर्गानी अभ्यास व विचार पूर्णपणे सोडून दिलेले आहे. नोकर्‍यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे राजकारण वर्ज्य मानून सुशिक्षित वर्ग नोकर्‍यांच्या मागे लागला. अभ्यास, ज्ञानसाधना, चिंतन, संशोधन, हे ध्यासविषय म्हणून राहिले नाहीत. अशा गोष्टींनासुद्धा नोकरीचे लेबल चिकटले. राजकारण्यांना तर तत्वज्ञान, अभ्यास, विचार करण्यापेक्षा सत्ता हातात ठेवणं व पिढ्यान पिढ्या ते टिकवणं हेच सोईच होतं. व ते कसे करावे याचे तंत्रही त्यानी आत्मसात केले आहे. राजकारण व अर्थकारण एकत्र करून व्यापक समाजकारण करण्यापेक्षा सत्ता हातात ठेवणं यालाच चलाखी (street smartness) म्हणू लागले. सर्व अधिकार पदावर नालायकांची नेमणूक करून आपले वर्चस्व गाजवत राहिले.

सुशिक्षितांकडे काही करून दाखवण्याची धमक नाही, पराक्रम नाही, दर्जा टिकवण्याची आस नाही, जागतिक स्तरावर पोचण्याची मनीषा नाही. एकाही ज्वलंत प्रश्नाचे प्रभावी उत्तर शोधून काढता येत नाही. नोकरीतील स्थिरता हेच मूल्य असे त्यांना वाटत आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची त्यांचा तयारी आहे. स्वत:चे उपद्रवमूल्य वाढवून पदं संभाळली जात आहेत. राजकारण्यांचे, वरिष्ठांचे लांगूलचालन नित्याची बाब ठरत आहे.

खराखुरा अभ्यास करणारा मागे पडू लागला. तो निरुपद्रवी राहिला. अभ्यास मागे पडू लागला. ज्ञानमार्गीयांची सद्दी संपली. मुळातच फक्त एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो या भ्रमेत असतात आणि उरलेले नव्वद टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत. यांना फक्त आयुष्यभर मनोरंजक उचापती लागतात. मनोरंजनासाठी हे लोक वाटेल तेवढे पैसे खर्च करतील पण पैसे देऊन विचारात पडणं, परिस्थिती वाईट आहे हे ऐकणं, वाचन करणं म्हणजे या वर्गाला विकतच श्राद्ध वाटतं. धकाधकीच्या जीवघेण्या आर्थिक स्पर्धेच्या तणावाखाली टिकून राहण्यासाठी आणि आर्थिक फायदे आपल्या हातातून निसटणार नाहीत ना या भीतीशी या वर्गाचा आंतरिक झगडा चालू असतो. ही भीती लपविण्यासाठी सर्व काही ठीकठाक, आबादी आबाद याच गुंगीमध्ये राहणे ते पसंत करतील. याच वृत्तीच्या ते आता संपूर्ण आहारी गेलेले आहेत.

- विनय हर्डीकर यांच्या विठ्ठलाची आंगी या पुस्तकतील सुमारांची सद्दी या लेखाचा आशय

हा हा..

मुळातच फक्त एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो या भ्रमेत असतात आणि उरलेले नव्वद टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत.

हा हा.. ढोबळ का असेना पण निरिक्षण अगदी पटले!
या चर्चेतील हा सर्वोत्तम प्रतिसाद ठरावा.

------------------
ऋषिकेश
------------------

अचूक विवेचन

सद्यस्थितीचे अगदी अचूक विवेचन आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

अवांतर - शक्य असल्यास सदर पुस्तकाविषयी काही लिहावे.

'विठ्ठलाची आंगी' या पुस्तकाबद्दल

विनय हर्डीकर यांच्या विठ्ठलाची आंगी या पुस्तकाबद्दल येथे वाचता येईल.

योग्य विवेचन

तुमचे विवेचन योग्यच आहे. नवीन ह्यांच्याप्रमाणेच पुस्तकाबद्दल माहिती द्यावी अशी मागणी करतो. ज्ञानमार्गीयांची सद्दी संपली आहे, अशी स्थिती वाटते आहे खरी. आणि आजकाल सगळे काही च्यानेले ठरवतात असेही वाटते कधीकधी. नीतिमत्ता, भलेबुरे वगैरे वगैर. ह्यावरून आठवले की टाइम्ज़ नाऊवर अर्णब गोस्वामी नावाचे पत्रकार Newshour नावाचा कार्यक्रमाचे अँकर आहेत.

बाकी 'मुळातच फक्त एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो या भ्रमेत असतात आणि उरलेले नव्वद टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत.' हा विदा कुठून जमवला बरे असा प्रश्न कुणी कसा विचारला नाही अजून. एकेकाळी यनांना असाच प्रश्न विचारला होता.

अवांतर: 'सुमारसुद्दी' हा हर्डीकरांकडून उसना घेतला आहे. म्हणूनच अवतरण चिन्हे दिली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

राजेश खन्ना

राजेश खन्नाचे नाव या चर्चेत कसे काय आले ते कळले नाही. कदाचित साधे उदाहरण असेल पण म्हणे की राजेश खन्ना प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्याच्या आजूबाजूला "सुमार" ऍक्टर्स चमचेगिरी करत. राजेश खन्ना या चमच्यांसकट सतत नजरेस येई आणि या चमच्यांच्या सुरस कथा रंगवून सांगितल्या जात.

एखाद्याला व्यासंगी म्हणून मोठा बनवणे हा या चमचेगिरीचाच (व्यावसायिक सभ्य शब्दांत मार्केटिंग म्हणता येईल) भाग असतो. अशी चमचेगिरी करणारे दोन प्रकारचे असावे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लांगुलचालन करणारे किंवा सुमार समज असणारे. कसेही का असेना, सुमारसद्दी ही फार पूर्वीपासूनच चालत असावी परंतु ती सर्वसामान्य लोकांच्या नजरेस तितकीशी पडली नसावी. ती उणीव टिव्ही चॅनेल्स आणि इंटरनेट भरून काढते आहे.

व्वा..

व्वा.... खुपच व्यासंगी आणि मनन करायला प्रवृत्त कऱणारे लेखन आपण केले आहे. बऱ्याच दिवसांनी इतके मूलगामी लेखन वाचायला मिळाले.

आम्ही "सुमारसद्दी"च्या उत्कर्षबिंदूला पोचलो आहोत काय? की ही उथळीकरणाची नीचतम पातळी आम्ही गाठतो आहोत?

धन्यवाद

अरे! चक्क बाबासाहेबांकडून पसंतीची पावती मिळाली. धन्य झालो;) असो. लेखातल्या काही मुद्द्यांचे समर्थन करणारे काही धागे:

1. दुवा 1
2. दुवा 2

व्यासंग म्हणजे काय ते कळले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लोकप्रिय संस्थळ

सायटेशनची फ्रीक्वेन्सी काढली तर सदर प्रतिसादातील ज्या संस्थळाचे दुवे दिले आहेत ते संस्थळ उपक्रमावर खूपच पापुलर वाटते.

नितिन थत्ते

नव्हे नव्हे

नव्हे नव्हे, संकेतस्थळापेक्षा तेथे वावरणारे लोकप्रिय लेखक महाशय आणि त्यांना ऊठसूठ व्यासंगी म्हणून हरबऱ्याच्या झाडावर चढवणारे कच्चेबच्चे उपक्रमीत पापुलर आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नव्हे नव्हे....

हा हा हा..... (इति फेसबूकी प्रतिक्रीया..)

टेकडी

टेकडीला हिमालय असल्याचा भास व्हायला लागला की प्रगती खुंटलीच म्हणून समजा.
हल्ली तर शेणाच्या गोळ्यालाही हिमालयाची उपमा द्यायला मागे पुढे पाहीले जात नाही.

--मनोबा

टेकडीला हिमालय

टेकडीला हिमालय असल्याचा भास होण्यासाठी मूठभर माती घालणारेही मुबलक असतात. ती मूठ-मूठभर माती जेव्हा घातली जाते तेव्हा अशी "मूठमाती" घालणार्‍याचा स्वार्थ अधिक असतो. अर्थात, तो कधीतरी अंगाशी येतो ही गोष्ट वेगळी.

हल्ली तर शेणाच्या गोळ्यालाही हिमालयाची उपमा द्यायला मागे पुढे पाहीले जात नाही.

अगदी!

 
^ वर