विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात

विवेकवाद,अध्यात्म आणि आत्मघात

"काय हो,तुम्ही स्वत:ला मोठे नास्तिक आणि विवेकवादी समजता काय?"
" नास्तिक आहे.जगनिर्माता-जगन्नियंता असा अलौकिक देव अस्तित्वात नाही असे ठाम मत आहे. विवेकवादी विचारसरणी पटते.पण इथे ’मोठे’ हे विशेषण अयोग्य आहे.मोठा नास्तिक,छोटा नास्तिक असे नसते."
.
"काय ते दिसतेच आहे, तुमच्या या छिद्रान्वेषी वृत्तीवरून.तुम्हाला वाटते नास्तिक तेवढे बुद्धिमंत,विचारवंत,तर्कनिष्ठ. आस्तिक म्हणजे भोळसट,श्रद्धाळू,मंदबुद्धी."
.
"छे छे ! असे विधान कधी केले आहे का ? उच्चशिक्षित,बुद्धिमान अशा अनेक व्यक्ती आस्तिक असतात.सश्रद्ध धार्मिक असतात.सज्जन,सदाचरणी,उदारमतवादी असतात. हे वास्तव कसे नाकारता येईल?"
"अहो,ज्या ईश्वराने हे विश्व निर्माण केले ,ज्याच्या कृपेने हे सर्व चालते, त्याचे ऋण सोडा, साधे अस्तित्वही तुम्ही मानत नाही.कधी प्रार्थना नाही, हात जोडणे नाही. कशाला हा एवढा अहंकार?"
.
"ज्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही अशा काल्पनिक देवाला हात जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यात अहंकाराचा संबंध नाही."
.
"असमंजसपणा? अ-स-मंजसपणा?? म्हणजे देवाला हात जोडतात ते असमंजस आणि तुम्ही आढ्यताखोर तेवढे समंजस? हा तर महागर्व झाला.केवढा मोठा ताठा! देवाचे नामस्मरण नाही.पूजा-अर्चा नाही.कसला नेमधर्म नाही.व्रत-वैकल्य नाही.देवा-धर्माचे काहीच नाही.नुसते आपले जगायचे.अर्थ काय या अशा जगण्याचा? हेतू काय तुमच्या जीवनाचा? उपयोग काय असल्या आयुष्याचा? देव-धर्म न मानणार्‍या तुम्हा नास्तिकांचे आयुष्य व्यर्थ आहे व्यर्थ ! मी म्हणतो, तुम्ही सगळे ते विवेकवादी आणि नास्तिक लोक जीव का देत नाही एकदाचे? म्हणे असमंजसपणा! जीव देऊन थोडा समंजसपणा दाखवा."
.
"असा त्रागा नसावा.विचार करावा.वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज), श्री.ना.पेंडसे, वि.स.खांडेकर,पु.ल.देशपांडे असे अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक पूर्णतया नास्तिक होते.त्यांच्या साहित्यकृतींनी आपल्याला आनंद मिळत नाही काय? श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,अशा अनेक नास्तिक कलावंतांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे रंजन केले नाही काय? उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर,समाजसेवक बाबा आमटे या नास्तिकांचे कार्य समाजोपयोगी नाही काय? देवाची भक्ती केली नाही,श्रद्धा ठेवली नाही,त्याला हात जोडले नाहीत म्हणून आयुष्य वाया जात नाही. फुले,आगरकर,लोकहितवादी,डॉ.आंबेडकर,स्वा.सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, महर्षीकर्वे अशा अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे. ते नास्तिक असल्याने त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले म्हणणे योग्य होईल काय? विचार करा."
"म्हणजे जे जे चांगले ते सर्व नास्तिकांनी केले असे म्हणायचे काय? आस्तिकांनी काहीच लोकोपयोगी कार्य केले नाही?"
" असे कोण म्हणतो? अहो, हा वाद-संवाद आहे,चर्चा आहे. इथे युक्तिवाद करायचा तो तर्कसुसंगत हवा. नास्तिकांचे जीवन व्यर्थ असते असे तुम्ही विधान केले. त्याचे मी खंडन केले. ते खोडून काढले. आता तुम्ही प्रतिवाद करावा.तुमच्या विधानाचे समर्थन करावे. ते सोडून काहीतरी तर्कविहीन निष्कर्ष काढण्यात काय अर्थ? हे भांडण आहे का? "
" पण तुम्ही आस्तिकांच्या चांगल्या कार्याविषयी काहीच बोलत नाही हे कसे?"
"पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! समाजात आस्तिकांचे प्रमाण ९०% हून अधिक आहे.तेव्हा चांगल्या समाजसेवकांत त्यांची संख्या मोठी असणार हे उघड आहे.बरे.ते असो.नास्तिकांनी जीव द्यावा असे मत तुम्ही व्यक्त केले आहे.आत्मघात करणे हे विवेकवादी विचारसरणीशी सुसंगत नाही. ते आध्यात्मिक विचारसरणीत बसते, हे मला दाखवून द्यायचे आहे."
"असे? मग बोला तर."
"अनेक सर्वसामान्य नास्तिक लोक देवपूजा अथवा कोणताही धार्मिक विधी न करता चांगले सुखा-समाधानाचे,कौटुंबिक प्रेमाचे,सौहार्दाचे जीवन आनंदाने जगतात.ते चित्रपटगीते,नाट्यगीते आणि भक्तिगीतेही आवडीने ऐकतात.
नास्तिक, म्हणजे विवेकवादी, मानतो की त्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.मृत्यू अटळ आहे. त्यानंतर जीवन नाही. म्हणून मरेपर्यंत शक्य होईल तेवढे ज्ञान त्याला मिळवायचे असते.या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो.समाजासाठी तसेच पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन अधिक सुखकर होईल ,सुरक्षित होईल यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काम करायचे असते.निसर्गाचे संवर्धन करण्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जगायचे असते. मात्र आजार ,वय यांमुळे अंथरुणाला खिळळा, तर जीवन निरुपयोगी होईल.अशा प्रसंगी तो इच्छामरण पत्करील. पण जोवर काही उपयुक्त काम करणे शक्य आहे तोवर तो जगणारच. आत्मघात करणे त्याच्या मनातही येणार नाही.ते विवेकवादी विचारसरणीशी विसंगत आहे."
"बरे.या संदर्भात आध्यात्मिक विचारसरणी काय आहे ?"
"मृत्यू म्हणजे जीवनाची समाप्ती नव्हे.मरणोत्तर जीवन असते.यावर तुमची श्रद्धा आहे ना? मृत्युनंतर मोक्ष मिळतो अथवा स्वर्ग प्राप्त होतो असे तुम्ही मानता ना?"
"हो.आत्मा अमर आहे.मरणोत्तर जीवन असते.पण मोक्ष,स्वर्ग,नरक किंवा भुवर्लोक असे चार पर्याय आहेत.ज्यांच्या पाप-पुण्याचे सर्व फलभोग भोगून संपलेले असतात,संचितात काही शिल्लक नसते, त्या आत्म्यांना मोक्ष मिळतो.पण असे अगदी क्वचित घडते.मोक्ष दुष्प्राप्य आहे.ज्यांच्या संचितात केवळ पुण्यच असते त्यांना स्वर्ग प्राप्त होतो.या उलट ज्यांच्या संचितात केवळ पापच शिल्लक असते त्यांना नरकात जावे लागते. तर ज्यांच्या संचितात पाप आणि पुण्य या दोहींचे भोग बाकी असतात ते आत्मे पुनर्जन्म होईपर्यंत काही काळ भुवर्लोकात राहतात किंवा तिथे भटकत असतात."
"चांगली माहिती सांगितली."भूर्भुव: स्व:"या गायत्री मंत्रात भुवर्लोकाचा उल्लेख आहे.तेथे सिद्ध योगी राहतात.पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत असलेले आत्मे तिथे वास करतात.असे वाचले आहे.आता मला सांगा गीतेतील विचार तसेच संत महात्म्यांची वचने तुम्हाला मान्य आहेत ना?"
"गीता तर ...या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनि:सृता "... अशी आहे.ती मानणारा नमानणारा मी कोण? "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती..." असे म्हटले आहे.म्हणून संतवचने मी शिरोधार्य मानतो."
" हे ठीक झाले. गीतेत म्हटले आहे:"सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।" [काही चिंता करू नकोस.इतर सगळे सोडून तू मला शरण ये.मी तुला सर्व पापांतून मुक्त करीन."] तसेच संतांनी लिहिले आहे,"हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे" "नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची.".....यावरून स्पष्ट होते की पापक्षालन फारसे अवघड नाही.शिवाय विविध व्रत-वैकल्ये,पूजा-अर्चा,दान-धर्म,पर्वकाळी पवित्र क्षेत्री स्नान,इत्यादि अनेक प्रकारांनी पाप धुता येते.तसेच बुवा-बापू-श्रीश्रीश्री-स्वामी-आध्यात्मिक गुरू यांचा "भिऊं नकोस.मी आहे ना ?" असा आधार असतो. त्यामुळे नरकवास टाळता येतो.हो ना?"
"बहुतेक सदाचरणी धार्मिक लोक नरकवास टाळू शकतात हे खरे आहे.मात्र तुमच्यासारख्या अधार्मिक,अश्रद्ध नास्तिकांना तो,म्हणजे नरकवास, अटळ आहे."
" ते ठीक आहे.आता पाहा,श्रद्धाळू धार्मिकांना मृत्युनंतर दोनच पर्याय राहिले.त्यांतील मोक्ष अत्यंत दुर्मिळ. त्याचा विचार सोडून देऊ. म्हणून आस्तिकांना मरणोत्तर स्वर्ग प्राप्त होणार हे निश्चित.
स्वर्गात तर सुखच सुख असते.ते सदा प्रफुल्लित नंदनवन काय,ती कामधेनूंची खिल्लारे काय, कल्पतरूंच्या राया काय, अमृताचे कुंभ काय, त्या चिरयौवना,नृत्यगाननिपुणा, स्पर्शानंदा, देवांगना अप्सरा काय ! सुखाची परमावधीच! ते सुख सोडून जिथे दु:ख पर्वताएवढे असते त्या इहलोकात तुम्ही का राहावे? एखाद्या पुण्यक्षेत्री जाऊन प्राणत्याग करावा. म्हणजे ज्याच्याकडे तुमचे डोळे सदैव लागलेले असतात त्या तुमच्या परमप्रिय परलोकात तुम्हाला सहजतेने जाता येईल. हे सगळे तुम्हाला मान्य असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीत बसणारे आहे ना? मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव ? ते तुमच्या हिताचे आहे हे सप्रमाण दाखवले आहे.
कर्मविपाक,पापक्षालन,मरणोत्तर जीवन,स्वर्गसुख या तत्त्वांवर ज्यांची खरी श्रद्धा आहे त्यांनी पुण्यक्षेत्री जाऊन जीव देणे हे श्रेयस्कर, असा निष्कर्ष अपरिहार्यपणे निघतो.जीव देणे हा शब्दप्रयोग आवडत नसेल तर प्राणार्पण, जलसमाधी, भूसमाधी, ब्रह्मीभूतकाया, पंचत्वात विलीनीकरण असा कोणताही शब्दप्रयोग वापरावा, पण इहलोकी राहू नये....पण तसे घडताना दिसत नाही.कारण धर्मशास्त्रावर, धार्मिक विचारसरणीवर तुमची खरी श्रद्धा नाही. असे असून तुम्ही स्वत:ला सश्रद्ध धार्मिक म्हणवता. म्हणजे तुम्ही ढोंगी आहात.दांभिक आहात.खोटारडे आहात. आता बोला."
"सध्यातरी आम्ही निरुत्तर झालो आहोत.थोडा वैचारिक गोंधळ आहे."
"तो मिटण्यासाठी श्रद्धा सोडावी.विवेकवाद स्वीकारावा.म्हणजे डोक्यात सगळे कसे स्पष्ट,स्वच्छ,तर्कसुसंगत होईल.वैचारिक गोंधळ संपेल"
"श्रद्धा अढळ आहे. ती कदापि सोडणार नाही.तुमच्या युक्तिवादावर काही प्रतिवाद सापडेल तेव्हा अवश्य बोलू."
"कधीही यावे.स्वागत आहे."
**********************************************************************************************

Comments

स्पष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रस्तुत लेखाचा विषय म्हणून तत्त्वज्ञान, धर्म हे शब्द निवडले होते.असे असता मनोरंजन,विनोद,विरंगुळा हे शब्द कसे आले नकळे.प्रकार म्हणून विचार,स्फुट हे निवडलेले शब्द बरोबर आले.

आता वरील विषय लेखासाठी निवडले आहेत. - संपादन मंडळ

मंत्रचळ

'नास्तिक' असो वा 'अस्तिक' जगायला काहीतरी 'मंत्रचळ' लागतोच.
प्रकाश घाटपांडे

सहमत

सहमत आहे

असहमत

जगनिर्माता-जगन्नियंता असा अलौकिक देव अस्तित्वात नाही असे ठाम मत आहे.

तात्पुरते नाही?

मोठा नास्तिक,छोटा नास्तिक असे नसते.

नास्तिक तो मोठा, आस्तिक तो छोटा, असा तर अर्थ नव्हे?

ज्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही अशा काल्पनिक देवाला हात जोडणे असमंजसपणाचे आहे. त्यात अहंकाराचा संबंध नाही.

अहंकार आणि आत्मविश्वास यांच्यात काय फरक आहे? स्वतःला शाणे न समजणार्‍यांना ग्रंथप्रामाण्य, व्यक्तिप्रामाण्याची घृणा वाटत नसावी.

मी म्हणतो, तुम्ही सगळे ते विवेकवादी आणि नास्तिक लोक जीव का देत नाही एकदाचे?

गंभीर प्रश्न आहे आणि त्याला उत्तरही नाही. अधिक माहिती निरर्थकतावाद या विषयात सापडेल.

अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे.

आमटे, फुले, आंबेडकर, हे नक्की नास्तिक होते काय? आंबेडकरांनी नास्तिकांची हेटाळणी करण्यासाठी त्यांची तुलना वेश्यांशी केलेली आहे.

मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव ?

रांग मोडून पुढे घुसणार्‍यांना रांगेत सर्वात मागे टाकणार्‍या बाऊंसरांची भीती घालण्यात आलेली आहे.

स्पष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

,"जगनिर्माता-जगन्नियंता असा अलौकिक देव अस्तित्वात नाही असे ठाम मत आहे."

यावर श्री. निखिल जोशी विचारतात,
(ठाम मत) तात्पुरते नाही?

..अशा अलौकिक देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही. म्हणून तो नाही असे ठाम मत आहे. मी अज्ञेयवादी नाही. जर कधी देवाचे अस्तित्व नि;संदिग्धपणे सिद्ध झाले तर कोणीही विवेकवादी ते आनंदाने मान्य करील. कोणत्याही तत्त्वाशी त्याची भावनिक गुंतवणूक नसते.जे बुद्धीला पटेल ते सत्य मानायचे.विवेकवादी व्यक्तीच्या भावना दुखावल्या जात नाहीत.भावनांवर बुद्धीचे नियंत्रण असते.
*

गंभीर प्रश्न आहे आणि त्याला उत्तरही नाही. अधिक माहिती निरर्थकतावाद या विषयात सापडेल

.
विवेकवादी विचारसरणी वास्तवाधिष्ठित असते.ती केवळ सिद्धान्तवादी नसून धादान्तवादी आहे. पलायनवादाला स्थान नाही. विवेकवाद आत्मघाताला का धिक्कारतो ते लेखात स्पष्ट केले आहे.
*जो अस्तित्त्वातच नाही असे ठाम मत आहे, त्या काल्पनिक देवाला हात जोडणे मला असमंजसपणाचे(खरेतर वेडेपणाचे) वाटते. ते मी करीत नाही. त्यात अहंकार दिसतो असे म्हणणे अयोग्य (तर्कविसंगत) आहे.

*.आमटे, फुले, आंबेडकर, हे नक्की नास्तिक होते काय?

..माझ्या समजुतीप्रमाणे म.फुले हे अज्ञेयवादी होते.डॉ.आंबेडकर हे विवेकवादीच होते. बाबा आमटे नास्तिक होते.
"मुक्त मानव कोण" याविषयीं डॉ.आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे त्यांतील दोन लक्षणे अशी:"विवेकाची ज्योत मनात सदैव तेवत असल्याने जो निरर्थक रूढी,परंपरा,उत्सव,अंधश्रद्धा यांचा गुलाम नसतो. जो चिकित्सा केल्याविना केवळ आंधळेपणाने कोणतीही स्वीकारत नाही....तो मुक्त मानव होय.

पटले नाही

म्हणून तो नाही असे ठाम मत आहे. मी अज्ञेयवादी नाही. जर कधी देवाचे अस्तित्व नि;संदिग्धपणे सिद्ध झाले तर कोणीही विवेकवादी ते आनंदाने मान्य करील.

'जर-तर' वर अवलंबून असलेल्या मताला ठाम म्हणू नये इतकीच माझी अपेक्षा आहे.

विवेकवादी विचारसरणी वास्तवाधिष्ठित असते.ती केवळ सिद्धान्तवादी नसून धादान्तवादी आहे. पलायनवादाला स्थान नाही. विवेकवाद आत्मघाताला का धिक्कारतो ते लेखात स्पष्ट केले आहे.
*जो अस्तित्त्वातच नाही असे ठाम मत आहे, त्या काल्पनिक देवाला हात जोडणे मला असमंजसपणाचे(खरेतर वेडेपणाचे) वाटते. ते मी करीत नाही. त्यात अहंकार दिसतो असे म्हणणे अयोग्य (तर्कविसंगत) आहे.

देवाला हात जोडणे वेडेपणाचे असल्याच्या प्रतिपादनाला माझा आक्षेप नाही. परंतु, आत्मा नाकारला की शरीर हेच सर्वस्व उरते आणि त्यात 'जीव' असा काही नसल्याचेही दिसते. शेवटी, अणुरेणूंचा एक गोळा म्हणजे जिवंत देह आणि थोडासा बदल झाला की मृतदेह, इतकाच फरक असतो. त्याच्या इच्छा, आकांक्षा, लालसा, वेदना, सारेच विद्युतरासायनिक संदेश आहेत, त्यांची पत्रास का ठेवावी? मुळात, देह असेही काही कायम नसते, शरीरातील बहुतेक सर्व अणुरेणू काही वर्षांतच बदलले जातात. आज जो 'आत्म' आहे तो दहा वर्षांनी वेगळाच 'आत्म' असेल, त्याची पर्वा आजच्या 'आत्म' ने का करावी? आत्मघातात पलायन असे काही नाही, पलायन करणाराही कोणी नाही आणि पळून जाण्याचे गन्तव्यही नाही. मुद्दा असा आहे की एकदा आत्मा नाकारला की "पुढचा घास तरी तोंडात का सारावा?" असा प्रश्न निर्माण होतो आणि माझ्याकडे त्याचे काहीही समर्थन नाही.

म.फुले हे अज्ञेयवादी होते.डॉ.आंबेडकर हे विवेकवादीच होते. बाबा आमटे नास्तिक होते.

फुलेंना केवळ पुरोहित हटविण्यात रस होता, निर्मिकाशी त्यांचे वाकडे नव्हते.
टेंपलटन पुरस्कार फुक्टात मिळत नाही, आमटेंच्या विचारांना ख्रिश्चन वास येतो.
आंबेडकर तर नक्कीच धार्मिक होते, नागपूरच्या भाषणात त्यांनी पुढील विचार मांडले:

...
खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते; आमच्या मुंबईत व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी आठला उठल्या की न्याहरीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, सुलेमान अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. तो सुलेमान ते घेऊन येतो. शिवाय चहा, पाव-केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरीदेखील मिळत नाही; त्या मात्र इज्जतीने राहतात. आम्ही झगडतो आहोत ते याच इज्जतीकरिता!
...
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की, कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहरी) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपलं. हे त्यांचं तत्त्वज्ञान! मी त्या मताचा नाही.
...
माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.
पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की, रेडा व बैल यांना मन नाही; मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.
...

संदर्भ: बौद्ध धर्मच का? (हा दुवा फायरफॉक्समध्ये वाचण्यासाठी काहीएक फाँट लागतो, इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये तो फाँट आपोआप इन्स्टॉल करण्याची सोय मिळते.)
रशियाशी फारकत घेऊन बहुदा त्यांना सीआयए/सीआयडी यांचा ससेमिरा टाळावयाचा असावा ;)

अ-विवेक

इतरांना आत्महत्या करण्यास सांगणे हा विवेक आहे काय?

नास्तिक, म्हणजे विवेकवादी, मानतो की त्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.मृत्यू अटळ आहे. त्यानंतर जीवन नाही. म्हणून मरेपर्यंत शक्य होईल तेवढे ज्ञान त्याला मिळवायचे असते.या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो.समाजासाठी तसेच पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन अधिक सुखकर होईल ,सुरक्षित होईल यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काम करायचे असते.निसर्गाचे संवर्धन करण्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जगायचे असते. मात्र आजार ,वय यांमुळे अंथरुणाला खिळळा, तर जीवन निरुपयोगी होईल.अशा प्रसंगी तो इच्छामरण पत्करील. पण जोवर काही उपयुक्त काम करणे शक्य आहे तोवर तो जगणारच. आत्मघात करणे त्याच्या मनातही येणार नाही.ते विवेकवादी विचारसरणीशी विसंगत आहे.

पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन सुखकर होईल असे काम करण्यामागचा विवेक काय आहे? एकच आयुष्य आहे ते जमेल तेवढे मजेत का घालवू नये?

असा त्रागा नसावा.विचार करावा.वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज), श्री.ना.पेंडसे, वि.स.खांडेकर,पु.ल.देशपांडे असे अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक पूर्णतया नास्तिक होते.त्यांच्या साहित्यकृतींनी आपल्याला आनंद मिळत नाही काय? श्रीराम लागू,निळू फुले,सदाशिव अमरापूरकर,अशा अनेक नास्तिक कलावंतांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे रंजन केले नाही काय? उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर,समाजसेवक बाबा आमटे या नास्तिकांचे कार्य समाजोपयोगी नाही काय? देवाची भक्ती केली नाही,श्रद्धा ठेवली नाही,त्याला हात जोडले नाहीत म्हणून आयुष्य वाया जात नाही. फुले,आगरकर,लोकहितवादी,डॉ.आंबेडकर,स्वा.सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, महर्षीकर्वे अशा अनेकांचे समाजकार्य कितीतरी मोलाचे आहे. ते नास्तिक असल्याने त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले म्हणणे योग्य होईल काय? विचार करा.

आयुष्य व्यर्थ गेल्याची व्याख्या काहीप्रमाणात आस्तिकाची व नास्तिकाची वेगळी असल्याने हा विचार इथे गैरलागू होतो.

पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! समाजात आस्तिकांचे प्रमाण ९०% हून अधिक आहे.तेव्हा चांगल्या समाजसेवकांत त्यांची संख्या मोठी असणार हे उघड आहे.

असे असल्यास आस्तिक असणे गैर आहे हे कसे सिद्ध होते?

कर्मविपाक,पापक्षालन,मरणोत्तर जीवन,स्वर्गसुख या तत्त्वांवर ज्यांची खरी श्रद्धा आहे त्यांनी पुण्यक्षेत्री जाऊन जीव देणे हे श्रेयस्कर

कर्मविपाक समजून घ्यावा अशी विनंती करेन, आत्महत्येचे गमक निखिल जोशी ह्यांनी सांगितले आहे.

हा लेख वाचून लेखकाला अपेक्षित नास्तिकता धर्म आहे की वृत्ती ह्याबद्दल शंका निर्माण होते.

दांभिकता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आजूनकोणमी म्हणतात,"

इतरांना आत्महत्या करण्यास सांगणे हा विवेक आहे काय? "

आस्तिकांनी आत्महत्या करावी असे म्हटलेले नाही.त्यांनी करूं नयेच. पण त्यांना मान्य असलेल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि धार्मिक कल्पना यांचा विचार करता त्यांनी आत्महत्या करणे श्रेयस्कर ठरते,हे दाखवून दिले आहे.त्यांच्या धार्मिक (स्वर्गसुखप्राप्ती इ.)खोट्या आहेत.
स्वर्ग अस्तित्त्वात नाहीच. या भ्रामक कल्पना ते खर्‍या मानतात. मात्र तदनुसार आचरण करीत नाहीत. म्हणूत ते ढोंगी आहेत असे म्हटले आहे.ते तर्कसुसंगत आहे.

डिफेन्स

आस्तिकांनी आत्महत्या न करण्याची संभाव्य कारणे-

१) आत्महत्या हेच आमच्यात मोठे पातक मानले गेले आहे. या पापाचे ओझे असल्यास सर्व सोयींनी युक्त अशा स्वर्गात आम्हाला प्रवेश मिळणार नाही.
२) संचिताचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी भोग भोगणे क्रमप्राप्त आहे. सध्या आम्ही तेच करत आहोत !

गुंडोपंतांची आठवण झाली

वरचा संवाद वाचून गुंडोपंतांची आठवण झाली. गेले ते दिन गेले! यनांच्या लेखाला हा माझा "आठवा" प्रतिसाद.

सुरुवात मस्त...

अगदी अर्ध्या भागापर्यंतचा संवाद छान जमला आहे. पण पुढचा भाग फसला आहे असं वाटलं.

उलट,

म्हणून मरेपर्यंत शक्य होईल तेवढे ज्ञान त्याला मिळवायचे असते.या जीवनाचा आनंद उपभोगायचा असतो.समाजासाठी तसेच पुढील पिढ्यांसाठी इथले जीवन अधिक सुखकर होईल ,सुरक्षित होईल यासाठी यथाशक्ती, यथाबुद्धी काम करायचे असते.निसर्गाचे संवर्धन करण्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जगायचे असते.

नास्तिकतेचा आणि वरच्या गोष्टींचा संबंध लागला नाही. उलट अजुनकोणमीनी म्हटल्यासारखं "खा,प्या आणि मजा करा" असं का असू नये?

दूरदृष्टी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.दादा कोंडके लिहितात,

नास्तिकतेचा आणि वरच्या गोष्टींचा संबंध लागला नाही. उलट अजुनकोणमीनी म्हटल्यासारखं "खा,प्या आणि मजा करा" असं का असू नये?

»

..
विवेकवादी व्यक्तीला जीवनातील आनंद उपभोगायचा असतोच.पण केवळ खा,प्या,मजा करा म्हणजेच आनंद नव्हे.सत्यज्ञानप्राप्तीचा आनंद मोठा असतो.तसेच विवेकवादी व्यक्ती दूरच्या भविष्यकाळाचा विचार करते. जनुकसातत्य राखणार्‍या पुढच्या पिढ्या इथे वाढणार आहेत.म्हणून पर्यावरणाचा र्‍हास होऊ देता नये.पुढची पुढची पिढी अधिकाधिक नवनवीन ज्ञान मिळविणार आहे.त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी पर्यावरणाचे जतन करायला हवे याची जाणीव मानवाला झाली आहे. विज्ञानावर आधारित हा विचार विवेकवादींना पटणे स्वाभाविक आहे.

ह्म्म्. पटण्यासारखं आहे खरं.

पाप, पुण्यांपासून अगदी सण-उत्सवां पर्यंत सगळ्या (धार्मिक) गोष्टी फक्त आणि फक्त मानवजात आणि त्यांच्याच पुढच्या पिढ्या याचाच विचार करून त्याच्याच भोवती फिरतात हे पचवणं त्यावेळीही लोकांना अवघड गेलं असतं.

अर्थात हा मीच मला प्रश्न विचारतोय. :)

आत्महत्या

>>>>>>>>>>।।।।।।स्वर्गात तर सुखच सुख असते.ते सदा प्रफुल्लित नंदनवन काय,ती कामधेनूंची खिल्लारे काय, कल्पतरूंच्या राया काय, अमृताचे कुंभ काय, त्या चिरयौवना,नृत्यगाननिपुणा, स्पर्शानंदा, देवांगना अप्सरा काय ! सुखाची परमावधीच! ते सुख सोडून जिथे दु:ख पर्वताएवढे असते त्या इहलोकात तुम्ही का राहावे? एखाद्या पुण्यक्षेत्री जाऊन प्राणत्याग करावा. म्हणजे ज्याच्याकडे तुमचे डोळे सदैव लागलेले असतात त्या तुमच्या परमप्रिय परलोकात तुम्हाला सहजतेने जाता येईल. हे सगळे तुम्हाला मान्य असलेल्या आध्यात्मिक विचारसरणीत बसणारे आहे ना? मग तुम्ही सारे आस्तिक लोक जीव का देत नाही जीव ? ते तुमच्या हिताचे आहे हे सप्रमाण दाखवले आहे.>>>>>>>>>>>

लेख आवडला.
अस्तिकता व नास्तिकता ह्या मानसिक विचारांच्या दशा आहेत असे माझे मत आहे. माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. आपल्या जिवनाचा अर्थ शोधता शोधता तो आस्तिक होतो किंवा नास्तिक होतो. त्याच्या विचार शक्तिवर अवलंबून आहेत ह्या गोष्टी. सगळेच आस्तिक अंधश्रद्धी नसतात.

जे विचार करुन नास्तिक असतात ते गीतेत नमुद केलेल्या ज्ञानयोग मार्गी जातात. काही आस्तिक, भक्ती मार्गी लागतात. विचार न करता जे आस्तिक वा नास्तिक असतात त्यांना ह्या जीवना बद्दल बरेच काही अजून शिकण्यासारखे असते. पुढे ते ही विचार करतात व आपली मते बदलतात किंवा असलेली वृद्धींगत करतात.

कर्मविपाक व त्या बद्दलचे चिंतन लोकमान्य टिळक ह्यांनी सुंदर त-हेने गीता रहस्यात करुन ठेवलेच आहे. त्यात लोंकं आत्महत्या का करत नाहीत व का करु नये ह्यावर छान निबंध लिहून ठेवलेला आहे. आपल्या आध्यात्मात तरी आत्महत्या करा असे कधी ही सांगितलेले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com

अस्तिक अंधश्रद्ध !

सगळेच आस्तिक अंधश्रद्धी नसतात.

कडव्या नास्तिकांच्या मते अस्तिक असणे म्हणजेच अंधश्रद्ध असण होय. \\\'अस्तित्वात नसलेल्या ईश्वराचे अस्तित्व मानणे ही आंधळेपणाने ठेवलेली श्रद्धा होय\\\' असा तो विचारप्रवाह आहे.

प्रकाश घाटपांडे

नास्तिकांच्या मते

कडव्या नास्तिकांच्या मते .......................

कडवे नास्तिक व थोडे नास्तिक ह्यात काय फरक आहे.
नास्तिकांच्या मते.. असेल असेल.

कडवे नास्तिक

जे स्वतः नास्तिक आहेत व ज्यांना इतर अस्तिक असण सहन होत नाही असे ते कडवे नास्तिक. साधे नास्तिक म्हणजे जे नास्तिक आहे पण इतरांच अस्तिक असण त्यांना मान्य आहे, मतभिन्नता व्यक्त करुन देखील जे आदर राखतात असे.
प्रकाश घाटपांडे

समजले

कडव्या नास्तिकांची वाख्या समजली :)

अपरिहार्य निष्कर्ष

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

\\\"आपल्या आध्यात्मात तरी आत्महत्या करा असे कधी ही सांगितलेले नाही किंवा त्याचे समर्थनही केलेले नाही.\\\"

....श्री.रणजित चितळे यांच्या प्रतिसादातून.
..आत्महत्या करा असे अध्यात्मात सांगितलेले नाही हे खरे.तसे असते तर सरळ उद्धृत केले असते. पण आत्मा,पुनर्जन्म,कर्मविपाक,स्वर्ग,मोक्ष
या संकल्पनांच्या संबंधी जी आध्यात्मिक तत्त्वे आहेत त्यांचा साकल्याने विचार केला असता असा निष्कर्ष अपरिहार्यपणे निघतो की
ही तत्त्वे सत्य मानणार्‍या श्रद्धावंतानी आत्महत्या करणे हे त्यांच्या हिताचे आहे.लेखात हे दाखवून दिले आहे.त्याचा प्रतिवाद कोणीच करीत नाही.एकीकडे अध्यात्मावर श्रद्धा आहे म्हणायचे आणि दुसरीकडे त्या आध्यात्मिक तत्त्वांवरून निघणारा निष्कर्ष धुडकावून लावायचा यात विचारांची सुसंगतता,एकवाक्यता
दिसत नाही.म्हणून अध्यात्मवादी दांभिक ठरतात.

लोकमान्य

>>>>>>>ही तत्त्वे सत्य मानणार्‍या श्रद्धावंतानी आत्महत्या करणे हे त्यांच्या हिताचे आहे.लेखात हे दाखवून दिले आहे.त्याचा प्रतिवाद कोणीच करीत नाही.>>>>>>>>>>>>>>>

आत्महत्या ह्यावर त्या गीतारहस्यातल्या लोकमान्यांच्या निबंधात ह्या संबंधाने विचार ठेवलेला आहे. इच्छुक लोकांनी तो वाचावा.

एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.

प्रतिवाद

त्याचा प्रतिवाद कोणीच करीत नाही.

कृपया माझा आधीचा \\\'डिफेन्स\\\' पहावा. :)

दोन मूलभूत गोष्टी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ज्ञानेश लिहितात,:

"१) आत्महत्या हेच आमच्यात मोठे पातक मानले गेले आहे. या पापाचे ओझे असल्यास सर्व सोयींनी युक्त अशा स्वर्गात आम्हाला प्रवेश मिळणार नाही.
२) संचिताचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी भोग भोगणे क्रमप्राप्त आहे. सध्या आम्ही तेच करत आहोत !"

»
..प्रस्तुत लेखात दोन मूलभूत गोष्टी आहेतः १)"आध्यात्मवाद्यांनी आत्मघात करणे त्यांच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे " हे त्यांना मान्य असलेल्या तत्त्वांनुसार सिद्ध केले आहे. त्याचा कोणी प्रतिवाद केलेला नाही.(म्हणजे असे सिद्ध होत नाही असे कोणी दाखवून दिले नाही.)
२) वरील गोष्ट सिद्ध केली असूनही आध्यात्मिक तत्त्वांवर श्रद्धा असणारे कोणी आत्मघात करीत नाहीत.म्हणून ते दांभिक आहेत. असे लेखात म्हटले आहे.
श्री.ज्ञानेश यांनी या दुसर्‍या मुद्द्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रतिवादाची पूर्वकल्पना असल्याने पुण्यक्षेत्री जाऊन जलसमाधी,भूसमाधी घ्यावी.अथवा प्रायोपवेशन करून देह पंचतत्त्वांत विलीन करावा असे सुचविले आहे. या मार्गांचा अवलंब केल्यास आत्मघाताचे पातक लागणार नाही.संचिताचा बॅकलॉग असणार हे खरे. पण श्रद्धावंत धार्मिक धर्मशास्त्रानुसार आचरण करीत असल्याने त्यांच्या संचितात पापकर्मांचे फलभोग नसतात.त्यामुळे मृत्यूनंतर त्यांना स्वर्गप्राप्ती होणार हे निश्चित.हे लेखात दाखविले आहे.

 
^ वर