अशोककालीन स्तूप आणि आर्थिक, सामाजिक संबंध

उपक्रमावर इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन तसेच्या तसे प्रसिद्ध करता येत नसल्याने (थोडे बदल करून) एक चर्चा सुरु करते. मू़ळ लेखन इतरत्र विस्ताराने वाचता येईल.

अजातशत्रूची कथा -

अजातशत्रूची थोडक्यात गोष्ट सांगायची तर अशी की हा मगधाच्या बिंबिसार राजाचा मुलगा. अजातशत्रू बिंबिसाराला मारून (किंवा तुरुंगात घालून) सत्तेवर आला, बरीच वर्षे राज्य केले आणि पुढे पश्चात्ताप होऊन तो बुद्धाला भेटला. बुद्धाने राजाच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. बुद्धाबद्दल खात्री पटल्यानंतर अजातशत्रूने स्वतःच आपल्या वडिलांना मारल्याचे बुद्धाजवळ कबूल केले. बुद्धाने आपल्याकडून चूक झाली ही प्रगती आहे असे म्हटले. आपले दुष्कृत्य सांगितल्यानंतर अजातशत्रूच्या मनावरचे ओझे हलके झाले. मात्र कथा सांगते की यानंतर अजातशत्रूने पुढे बुद्धमार्गाकडे वळण्याचा निर्णय घेण्याऐवजी हे सांगून बुद्धाचा निरोप घेतला. पुढे या अजातशत्रूच्या मुलाने (उदयभद्राने) अजातशत्रूला ठार मारून सत्ता बळकावली असा उल्लेख आहे. उदयभद्राबद्दल विशेष माहिती मिळत नाही. पण बुद्धाच्या नंतरच्या धम्मप्रसारात अजातशत्रूचा अडथळा झाला नसावा.

अजातशत्रू आणि सम्राट अशोकाच्या आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. पण महास्तूपवंशातली एक कथा त्यांना दोघांना जोडते ती अशी:

बुद्धाच्या मृत्युनंतर त्याच्या अस्थिंचे काय करायचे, त्यावर कोणाचा अधिकार असा वाद झाला. पुढे सामंजस्याने त्यांचे दहा भाग करण्यात आले, आणि दहा अधिकारी धरून बुद्धाच्या अस्थिंवर वेगवेगळ्या नगरांमध्ये दहा स्तूप बांधण्यात आले. मात्र तरी पुढे ही भांडणे परत लागतील या भितीने महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितले की ह्या सर्व अस्थि परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने अस्थि चंदनी पेट्यांमध्ये भरल्या, त्यावर सुवर्णाचे पान ठोकले आणि त्यावर भविष्य लिहीले की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल. त्यानंतर त्या खोलीबाहेर रत्नांचा एक ढीग ठेवून त्यावर लिहीले की पुढे जे गरीब राजपुत्र येतील त्यांना अस्थिंची काळजी घेणे सोपे जावे म्हणून हा निधी ठेवत आहे! नंतर शाक्याने विश्वकर्म्यास पाठवले. येथून स्तूपवंशातले पुढचे वर्णन थोडे विचित्र आहे. विश्वकर्म्याने या खोलीत वन्य प्राण्यांना मारणारे एक यंत्र (हा उल्लेख कळत नाही) बसवले, स्फटिकासारख्या तलवारी/जांबिये घेतलेल्या लाकडी मूर्ती बसवल्या (लोकपाल?) आणि त्यानंतर हे सर्व विटांच्या, दगडाच्या स्तूपाने झाकून टाकले, त्यावर माती पसरली. अशी बरीच वर्षे लोटली. सत्तापालट होत होत अशोक सम्राट झाला. पुढे अशोकाने बुद्धमार्गाकडे कल झाल्यानंतर ८४, ००० स्तूप बांधायचे ठरवले. कोणा जुन्या माणसाने त्याला ही जागा दाखवली, अशोकाने मग प्रयत्नपूर्वक अस्थि परत बाहेर काढल्या. ते करताना रत्नांबद्दल अजातशत्रूने लिहीलेली गरीब राजपुत्रांबद्दलची टीप वाचून तो वैतागला असाही गंमतीदार उल्लेख आहे, पण त्याने स्तूपांचे काम पूर्ण केले.

अशोक आणि अजातशत्रू दोघेही आपापल्या वडिलांना मारून सत्तेवर आले. दोघांच्या सुरुवातीच्या प्रवासात बरेच साम्य आहे. अजातशत्रूच्या वडिलांचे नाव बिंबिसार, तर अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार असे सांगितले जाते. अजातशत्रू आणि अशोक हे दोघेही युद्धखोर सत्ताधीश होते. दोघांनीही सुरुवातीच्या काळात सत्तेसाठी वाटेल ते प्रयत्न केले, सत्ता काबीज केली, आणि नंतरच्या काळात धार्मिकांना जवळ केले होते. पण नंतर मात्र वरील कथा खरी मानली तर अजातशत्रूने मुलाच्या सत्तालोलुपतेला आळा घातला नाही. अशोकाने मात्र मुलांच्या सत्तालोलुपतेला आळा घातला म्हणण्यापेक्षा लक्ष मगधापासून बाहेर वळवले. संघमित्रा, आणि महिंद्र या दोन्ही मुलांना दूर श्रीलंकेत पाठवले. त्याचा अजून एक मुलगा कुणाल हा काही काळ अशोकाच्या मर्जीबाहेर होता, पण नंतर अशोकाला चूक कळल्यावर त्याने मुलाला परत राजदरबारी आणले असे दिसते. अशोकाच्या उत्तर आयुष्यात त्याला फारसे विरोधक उरले नसावेत असे वाटते. म्हणून या काळात भव्यदिव्यतेच्या कल्पना स्तूपांच्या संख्येशी जोडल्या गेल्या असे दिसते. मात्र अशोकाच्या काळात जर ८४,००० स्तूप बांधून झाले असले तर नंतर शुंग आणि इतर राजांनी काय केले असा प्रश्न पडतो. यावरून एवढेच म्हणता येईल की अशोकाच्या काळात स्तूपांच्या बांधकामाची चलती झाली. अशोकाच्या शिलालेखांमधून त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते पण ती तो सत्ताधीश म्हणून स्थिर झाल्यानंतरची. त्याआधीची माहिती ही अशा कथा-कहाण्यांमधूनच मिळते. ती कितपत खरी धरायची, आणि किती खोटी हे ठरवणे अवघड आहे. काही कपोलकल्पित कथा (उदा. अजातशत्रूने लिहून ठेवलेले भविष्य) या स्तूप खणून आधीचे पुरून ठेवलेले अवयव काढले यावरून गहजब होऊ नये म्हणून किंवा अजातशत्रूशी अशोकाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी रचल्या गेल्या असाव्यात*.

भविष्य आदी गोष्टी पुराणातली वांगी म्हणून सोडून दिली तरी अनेक गोष्टी विचारांना खाद्य असल्याप्रमाणे आहेत. यावरून चर्चा व्हावी.

१. राजेरजवाड्यांना (किंवा सत्ताधीशांना) भविष्य पाहणारे आपले हेतू साध्य करण्यासाठी महत्त्वाचे वाटत आले आहेत, असे इतर कुठच्या देशातील कथांमध्ये उल्लेख आढळतात का?

२. अशोकाच्या काळात यज्ञयाग राजकीय हस्तक्षेपाने कमी झाले असे म्हणतात. यज्ञांनी होणारा तोटा, नुकसान टळले हे उत्तमच झाले, पण लोकांचा यज्ञयागांवर खर्च होणारा पैसा आणि लक्ष इतरत्र वळले असावे, त्याला आळा घातला गेला नाही. उलट प्रोत्साहन दिले गेले. अर्थात त्यामुळेच स्तूपांसारखी स्थाने आज भारतीय इतिहासाची माहिती देत उभी आहेत हा झालेला फायदा. पण तोटेही बरेच असावेत. मुख्य तोटा असा की अशोकाच्या काळात यज्ञांना आळा बसला म्हणून नंतरच्या शुंगांनी आणि सातवाहनांनी जरी लेणी कोरणे, आणि स्तूप उभारणे सुरूच ठेवले तरी यज्ञयागांचेही थोडेफार पुनरुत्थान केले. जरी नंतर त्यात प्राण्यांचे बळी देण्याचे प्रमाण कमी झाले, तरी पैसा आणि शक्तीचा अपव्यय टळला नाही. मुळात अर्थव्यवस्थेचा भाग झालेली कोणतीही वाईट पद्धत मोडकळीला आणायची असल्यास तिला अनेक पर्याय तयार करायला हवेत. पर्याय तयार करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक जाण अशोकाने दाखवली (स्तूपांची बांधकामे हा त्याचाच प्रकार), पण अनेक पर्याय तयार झाले नसल्याने ही जाण समाज पूर्ण बदलण्यास पुरेशी पडली नाही असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

३. अस्थिंबरोबर पुरण्याच्या गोष्टींबद्दल जे काही लिहून ठेवले गेले आहे त्यापैकी काही पद्धती पाहून जुन्या चिनी संस्कृतींशी त्यांचा काही संबंध आला असावा का असे वाटते. इजिप्तमध्ये लाकडी मानवी बाहुल्या शवपेटिकेबरोबर पुरण्याची पद्धत होती. तशीच लाकडी बाहुल्या पुरण्याची पद्धत चीनमध्येही होती असे दिसते. (पूर्वी या देशांमध्ये एखादा राजा मरण पावला की त्याच्याबरोबर नोकरचाकर, घोडे, रथ पुरले जात, नंतर ती पद्धत सोडून बहुदा लाकडी वस्तू पुरल्या जाऊ लागल्या). http://history.cultural-china.com/en/56History9562.html हे सांगण्याचे कारण म्हणजे हे वर्णन श्रीलंकेच्या महावंसामध्येही सापडते. उदा. महावंसातील लेखनात स्तूपातील 'स्वर्गाचे' वर्णन करताना चार टोकांना चार राजे (बहुदा लोकपाल) आहेत असे म्हटले आहे. मला अलिकडेच यावरून एक अजून (Xinjiang) प्रांतातील हूणांच्या कबरीचा दुवा मिळाला जो येथे देत आहे. http://history.cultural-china.com/en/56History9802.html ह्या कबरींमध्ये काय मिळाले ह्याची अधिक माहिती मिळाली नाही. पण हुणांच्या कबरीचे वर्णन हे वरील वर्णनातील विटा बसवल्या या वर्णनाशी थोडेसे जुळते. हूण आणि बौद्ध यांचे काही संबंध आले होते का इ. प्रश्न तपासण्यासारखे असतील असे वाटते.
यावरून आठवण झाली ती मागे उपक्रमाचे एक सदस्य चंद्रशेखर यांनी चीनमध्ये सापडलेल्या लाकडी टॅबलेटांचा लेख उपक्रमावर प्रकाशित केला होता अथवा त्याचा दुवा दिला होता. याबद्दल उपक्रमींनी, विशेषतः बौद्ध लेखनाशी परिचित असलेल्या उपक्रमींनी भर घालावी असे वाटते.

४. बुद्धाचा जन्म उत्तरेत लुंबिनीला झाला आणि त्याच्या हयातीतला धम्मप्रसार हाही बिहारच्या (मगधाच्या आजूबाजूच्या परिसरात) झाला. यानंतर भारतातील धर्म प्रसाराचे काम हे विविध नगरांमधील भिक्षूंनी केले. माझे मत जर मोठ्या प्रमाणात धर्म प्रसार करायचा असला तर त्या त्या भागातले भिक्षू असणे गरजेचे झाले असावे. अशा भिक्षूंना शिक्षित करणे, त्यांची राहण्याची सोय करणे इ. व्यवस्था करण्यासाठी स्तूप बांधले गेले असावे. याला एक शिस्त जाणवते. म्हणून नुसताच तळागाळातून बुद्धाचा धर्म उचलून धरला गेला असे म्हणण्यापेक्षा हा धर्मप्रसार सत्ताधार्‍यांनी (कदाचित अशोकानेच) राजकीय हेतूने केला होता अशी माझी समजूत आहे. ह्याविरुद्ध काही पुरावे आहेत का?

----------------------------------
टीपा:
* याचे कारण समजत नाही.
** माझ्या हे स्पष्ट करण्यामागचा संदर्भ आहे तो खट्टामिठा या ब्लॉगचा. या ब्लॉगकर्त्याने http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_07.html भास्कर जाधव यांनी दिलेले रामायणातील दशरथाच्या अंत्यसंस्कारांचे वर्णन दिले आहे. जाधव यांचा रामकथा ही इजिप्तमधली आहे असा निष्कर्ष घाईने काढल्यासारखा वाटतो.
------------------------------------

जालावरील संदर्भः

Indian Kavya literature:The wheel of time, Volume 7, Part 1
Anthony Kennedy Warder, Motilal Banarsidass Publ., Apr 30, 2004.

http://history.cultural-china.com/en/56History9562.html

Mahavamsa:Great Chronicle of Ceylon
Wilhelm Geiger
Asian Educational Services, Dec 1, 1996 - 300 pages

Comments

चांगली चर्चा

१. राजेरजवाड्यांना (किंवा सत्ताधीशांना) भविष्य पाहणारे आपले हेतू साध्य करण्यासाठी महत्त्वाचे वाटत आले आहेत, असे इतर कुठच्या देशातील कथांमध्ये उल्लेख आढळतात का?

अर्थातच. असे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतील. सिवा आणि डेल्फायच्या चेटक्या, स्वप्नांतून भविष्य दिसणे वगैरेचा वापर अनेक राजांनी केला आहे. भविष्यकालीन घटनांची आधीच माहिती देऊन ठेवणे हा आपल्याला होणारा विरोध कमी करण्याची युक्ती आहे. थोड्याफार फरकाने, "राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!" असे म्हणणे ही आपल्या राज्याला आणि कार्याला अद्भूत, अमानवी पाठिंबा आहे असे दर्शवणे आणि त्यातून विरोधकांचा विरोध मोडून काढणे हा आहे.

अलेक्झांडरने सिवाच्या चेटक्याच्या भविष्यवाणीचा उपयोग कसा केला त्याची कथा सुप्रसिद्ध आहे.

नुसताच तळागाळातून बुद्धाचा धर्म उचलून धरला गेला असे म्हणण्यापेक्षा हा धर्मप्रसार सत्ताधार्‍यांनी (कदाचित अशोकानेच) राजकीय हेतूने केला होता अशी माझी समजूत आहे. ह्याविरुद्ध काही पुरावे आहेत का?

अशोकाच्या काळात वर्णव्यवस्था फोफावली असावी. किंबहुना, निम्नवर्णीय लोक आणि उच्चवर्णीय लोकांमधील दरी वाढली असावी. अशाप्रकारे सामाजिक दरी जेव्हा वाढते त्यावेळी एकंदरीतच अंदाधुंदीची परिस्थिती निर्माण होणे शक्य असते. मौर्य हे घराणे काही उच्च क्षत्रिय कुलीन नव्हते. चाणक्य चंद्रगुप्ताचा उल्लेख करताना त्याचा शूद्रवर्ण नेहमी जाणवून देत असे.* हे प्रत्यक्ष हिणवण्यासाठी केले नसले तरी ही तत्कालीन पद्धती असावी, ज्यातून माणसाचा नीच-वर्ण दाखवून दिला जात असावा. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात/ बाबींत स्वतःच्याच राज्यात त्यांना दबून राहावे लागत असावे. यावर बौद्ध धर्माचा उपाय चपखल होता कारण त्यात वर्णव्यवस्थेला स्थान नव्हते आणि या धर्माच्या स्वीकाराने राजापेक्षा वरचढ कोणी राहण्याची गरज नव्हती.

कलिंग युद्धातून अशोकाचे परिवर्तन झाले वगैरे भाकडकथा आहेत.

बायदवे, अशोकाने बिंदुसाराला कधी ठार केले? बिंदुसाराच्या वृद्धापकाळी किंवा मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी बंड केले होते आणि अशोक वरचढ ठरल्याने त्याने बंड मोडून काढले आणि त्यात आपला वडिलभाऊ सुशीम याला ठार केले.

बौद्धकथांनुसार अशोक हा बिंदूसाराचा १०० वा पुत्र असून नावडता होता. त्यामुळे बिंदुसार त्याला सतत दूर ठेवत असे. बिंदुसाराच्या मृत्यूनंतर आपल्या ९९ मोठ्या भावांना ठार करून अशोक गादीवर चढला. या कथेतही किती तथ्य आहे हे माहित नाही परंतु बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी अशोक हा क्रूरकर्मा होता आणि नंतर त्याचा कायापालट झाला हे दाखवण्यासाठी बौद्ध साहित्य अशोकाचे क्रौर्य वाढवून चढवून सांगतात असा आरोप होतो.

* याबद्दल अधिक माहिती नंतर देते.

धन्यवाद

अशोकाची मोठीच चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. चूक मूळ लेखात दुरुस्त करता येत नाही.

बाकी नंतर.

विचार करण्यासारखे आहे,

>अशोकाच्या काळात वर्णव्यवस्था फोफावली असावी. किंबहुना, निम्नवर्णीय लोक आणि उच्चवर्णीय लोकांमधील दरी वाढली असावी. अशाप्रकारे >सामाजिक दरी जेव्हा वाढते त्यावेळी एकंदरीतच अंदाधुंदीची परिस्थिती निर्माण होणे शक्य असते. ... यावर बौद्ध धर्माचा उपाय चपखल होता
> कारण त्यात वर्णव्यवस्थेला स्थान नव्हते आणि या धर्माच्या स्वीकाराने राजापेक्षा वरचढ कोणी राहण्याची गरज नव्हती.

हा विचार करण्यासारखा आहेच. पण वर्णव्यवस्थेला पर्याय म्हणून बौद्ध धर्म अशोकाने स्विकारला, पुढे केला, या म्हणण्याने थोडा घोटाळा होऊ शकतो.
रोमिला थापर म्हणतात - अशोकाच्या काळात वर्ण दिसत नाहीत, तर कुटुंबे, आणि पंथ हे अधिक दिसतात. (अशोकाच्या शिलालेखांमध्ये वर्णांचा उल्लेख आढळत नाही). त्या असेही म्हणतात की "There is little evidence to suggest that Vedic Brahmanism was the prevalent religion in the Indian Subcontinent at the time. It was still the religion of a small minority, although gradually becoming more powerful".

अशोकाचे खुद्द शिलालेख ब्राह्मणांना आणि श्रमणांना त्रास होतो आहे असे दर्शवतात. असे दिसते की अशोकाच्या काळातील अंदाधुंदी ही वैदिक ब्राह्मणांमुळे नव्हती तर एकंदरीतच नागरिकांच्या बेशिस्त, किंवा अशोकाच्या दृष्टीने गैरव्यवहाराच्या वागण्यामुळे होती. अशोकाच्या दृष्टीने नागरिकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे होते.

अशोकाने म्हटले आहे की-
गेली शेकडो वर्षे सजीव प्राण्यांना त्रास देणे किंवा ठार मारणे, नातेवाईकांशी गैरव्यवहार, ब्राह्मण आणि श्रमणांशी गैरव्यवहार वाढले होते. आता पियदसी येथे विवेकाने वागण्यास प्रोत्साहन देत असल्याने (नागरिकांकडून) नातेवाईकांशी योग्य व्यवहार, ब्राह्मण-श्रमणांशी चांगले व्यवहार होत आहेत आई-वडिलांना आणि वडिलधार्‍यांचा मान राखला जात आहे. ... पूर्वी धम्म महामात्र हे अधिकारी पद नव्हते, आता धम्माच्या प्रसारासाठी, धम्माच्या अनुयायांच्या कल्याणासाठी हे अधिकारी लोकांमध्ये काम करतात. पूर्वी राज्यकारभारात काय चालले आहे हे राजालाच कळत नव्हते, पण आता मी कुठेही असलो तरी माझ्यापर्यंत बातम्या याव्यात ही सूचना अधिकार्‍यांना दिली गेली आहे..

यावरून असे वाटते की अशोकाच्या दृष्टीने राज्यकारभाराची घडी बसणे महत्त्वाचे होते. याचे कारण कदाचित युद्धामध्ये व्यग्र असल्याने त्याने राज्याकडे दुर्लक्ष झालेले असू शकते. कदाचित बिंदुसाराच्या काळात राज्याची घडी विस्कळित असू शकते. पुढील वर्णनातून हे स्पष्टपणे दिसते. वर्णव्यवस्थेचे उच्चाटन करणे हा त्याचा हेतू नसावा.


कुटुंब, पंथ, वर्णव्यवस्था

रोमिला थापर म्हणतात - अशोकाच्या काळात वर्ण दिसत नाहीत, तर कुटुंबे, आणि पंथ हे अधिक दिसतात. (अशोकाच्या शिलालेखांमध्ये वर्णांचा उल्लेख आढळत नाही). त्या असेही म्हणतात की "There is little evidence to suggest that Vedic Brahmanism was the prevalent religion in the Indian Subcontinent at the time. It was still the religion of a small minority, although gradually becoming more powerful".

अशोकाचे शिलालेख हे बहुतेककरून त्याच्या नागरिकांसाठी नोटीसा आहेत. त्यात वर्णव्यवस्थेचा उल्लेख नसणे शक्य आहे पण अशोकाच्या काळात वर्ण दिसत नाही, कुटंबे आणि पंथ अधिक दिसतात म्हणजे काय यावर अधिक वाचायला आवडेल.

या मताविपरित मत वि. का. राजवाड्यांचे आहे. जे मी वर दिले आहे. शूद्रादिंना वेगळ्या संबोधनांनी संबोधणे किंवा त्यांच्याशी बोलताना आदरार्थी उच्चार न करणे वगैरेचे अनेक दाखले ते देतात. खाली मुद्राराक्षस नाटकात वृषल असा उल्लेख असल्याने ते ग्राह्य मानता येणार नाही असे खाली मत दिसते ते योग्य आहे पण राजवाडे केवळ एका नाटकाच्या संदर्भाने मत मांडतात असे दिसत नाही. शतपथ ब्राह्मण, पाणिनीचे व्याकरण, आणि इतर ग्रंथांचा आधार घेतात. वृषल हे संबोधन हे एक उदाहरण झाले. महाभारतातही कर्णाला सूतपुत्र, त्याच्या पत्नीला वृषाली आणि विदुराला शूद्र म्हटले गेले आहे. ते प्रत्येक ठिकाणी जाणूनबुजून हिणवण्यासाठी नसावे परंतु तशी प्रचलित पद्धती होते हे महाभारत कधी नंतर लिहिले गेल्याने त्यात घुसडले असेल असे म्हणून नाकारता येत नाही. याकडे प्रत्यक्ष इतिहास म्हणून न बघता भाषिक संस्कृतीकडे राजवाडे लक्ष वेधतात. पुढे राजवाड्यांच्यामते वर्णव्यवस्था हे एकच कारण बौद्ध आणि जैन धर्मांची उन्नती होण्यास आहे. भारतीय वर्णव्यवस्थेबद्दल मेगॅस्थेनिसनेही स्वतःच्या मगदुराप्रमाणे लिहून ठेवले आहे. तर मग १०० एक वर्षात वर्णव्यवस्था न दिसण्याचे कारण कळत नाही.

बौद्ध धर्म हा वैदिक व्यवस्थेला शह देण्यासाठी निर्माण झाला होता याबाबत अनेकांचे एकमत दिसते. (मला वाटत होते की रोमिला थापर यांचेही असेच मत असावे. मागे ऐकलेल्या एका मुलाखतीच्या संदर्भाने असे म्हणत आहे.) बौद्धधर्माचा स्वीकार क्षत्रिय आणि वैश्य यांनी सर्वप्रथम केल्याचे दिसते. याची अनेक कारणे असावी. पैकी एक कारण "नातेवाईकांशी योग्य व्यवहार" या विषयी लिहिताना राजवाडे म्हणतात की अशोकाच्या राजवटीपर्यंत वैदिक व्यवस्था ही अशी झाली होती -

ब्राह्मण पुरुष इतर वर्णांतील बायकांशी संबंध ठेवू शकत असे परंतु त्यातून झालेल्या संततीस नेहमीच औरस संततीचा मान मिळत असे, असे नाही. किंबहुना, शूद्र स्त्रीशी लग्न केल्यावर ती शूद्रभार्या आहे असे तिला संबोधले जात असे. असाच प्रकार क्षत्रियांनी आणि वैश्यांनी केलेल्या संबंधांतून होत असे. यातून वर्णंसंकर वाढला होता पण त्याचसोबत औरस-अनौरस तसेच श्रेष्ठ-नीच या कल्पनांतून अंदाधुंदी वाढली होती. क्षत्रिय आणि वैश्य यांचे अनेक कारणाने इतर जमाती, परदेशी वगैरेंशी संबंध येत असत. त्या संकरातून निर्माण होणार्‍या संततीस जन्मानुसार बापाचा वर्ण लाभला तरी त्यांना हीनदर्जा दिला जाई. अशा अनेक कारणांनी कुटुंबव्यवस्थेवर परिणाम झाला असावा.

अहिंसेच्या काटेकोर पालनाने यज्ञयागादी संस्कृतीला तडा गेला ही गोष्ट नाकारता येत नाही. अशोकाने नागरिकांवर अहिंसा लादली तरी राज्याची सुव्यवस्था राखण्यासाठी हिंसात्मक शिक्षा दिल्या जात नव्हत्या असे वाटत नाही. त्यामुळे अहिंसेचे नियम हे प्रजेसाठी प्रामुख्याने असावे ते त्यांच्या सामाजिक चालीरिती बदलण्याकरता असे मानता येईल (?)

युद्धामुळे स्वभूमीकडे दुर्लक्ष झाल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात परंतु म्हणून तेथील शासकांनी धर्मपालट केल्याचे दिसत नाही. या उलट, ग्रीकोबौद्ध राजांच्या संदर्भात बघायचे झाले तर मूठभर ग्रीक राजे इतर धर्मीय लोकांवर राज्य करू शकत नाहीत हे लक्षात आल्यावर धर्मबदल झालेले आहेत. इतरत्र, अखनेतनने प्रजेशी फारकत घेऊन नवा धर्म स्थापन केला असता तसे करणे प्रजेला रुचले नाही असे दिसते. तेव्हा अशोकाने धर्मबदल करण्यामागे त्याला मोठा जनाधार प्राप्त असावा असे मला वाटते.

धन्यवाद

>युद्धामुळे स्वभूमीकडे दुर्लक्ष झाल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात परंतु म्हणून तेथील शासकांनी धर्मपालट केल्याचे दिसत नाही. ... अशोकाने धर्मबदल करण्यामागे त्याला मोठा जनाधार प्राप्त असावा असे मला वाटते.

हा मुद्दा चर्चेशी संबंधितच आहे. धन्यवाद.

माझे मतः स्वतःच्या भूमीकडे दुर्लक्ष झाले म्हणून घडी विस्कटली. घडी सुरळीत करण्यासाठी म्हणून धर्म प्रसार केला. येथे धर्म हा शब्द कायदा, सुव्यवस्था या अर्थाने घ्यावा. अशोकाने अनेक पदे तयार केली (धम्म महामात्र हे नक्की एक नवीन पद होते). त्याखेरीज युक्त, राज्जुक, प्रादेशिक अशी साखळीच तयार केली. अशोकाचे शिलालेख हे त्याच्या पॉलिसी सांगतात. त्यात जे नाही ते त्याकाळी अस्तित्वातच नव्हते असे म्हणण्याचा हेतू नाही, पण त्यात जे आहे ते अशोकाच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचे आहे असे मात्र म्हणावेसे वाटते. म्हणून त्याने केलेले लिखित नियम बघता त्याने प्रामुख्याने वर्णव्यवस्थेला शह देण्यासाठी बौद्ध धर्म तयार केला असे दिसत नाही. त्याऐवजी ठरवून आचारसंहिता ठरवणारी, आणि तपासणारी साखळीच तयार केली असे दिसते. याचाच अर्थ असा की समाजाची घडी बसवणे हे त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. देवळे हा प्रकार तेव्हा नव्हताच. पण स्तूप बांधले गेले. यामुळे स्तूपांच्या बांधकामावर आधारित अर्थव्यवस्था तयार झाली आणि त्यातून अर्थातच लोकांना कामे मिळाली असतील.

तसेच आपण तत्कालिन भारताचा विचार करताना त्यातील प्रादेशिक भिन्नता विसरतो. सगळीकडे वर्णव्यवस्थेचा बुजबुजाट होता असे म्हणताना कदाचित प्रादेशिक प्रभाव लक्षात घ्यावे लागावेत. रोमिला थापर यांच्या पुस्तकात हे थोडेसे आले आहे असे वाटते.

अधिक लिहायला सध्या वेळ नाही. आज-उद्या वेळ मिळाला की लिहीते.

अशोकाचे शिलालेख

माझ्या माहितीनुसार/आठवणीनुसार अशोकाचे शिलालेख दोन प्रकारचे होते:

1. संघसंबंधी शिलालेख
एक बौद्ध म्हणून सम्राट अशोकाने केलेल्या घोषणा, बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची कहाणी आणि त्याचे संघांसोबत असलेले नाते वगैरे ह्या शिलालेखांचे विषय आहेत. उदा. एका शिलालेखात बंडखोर भिक्कूंना संघामधून काढून टाकण्यात यावे, असे म्हटले आहे. दुसऱ्या एका शिलालेखत धर्माचरणी बौद्धांनी कुठले कुठले धार्मिक ग्रंध वाचायला हवेत, हे नमूद केले आहे. ह्या शिलालेखांची संख्या कमीच आहे.

2. धम्मसंबंधी शिलालेख
हे शिलालेख आम जनतेसाठी होते. धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) होते. उदा. त्यात सामाजिक बांधिलकी, नागरिकांनी एकंदरच आणि एकमेकांशी कसे वागावे, ह्याबाबत युक्तीच्या चार गोष्टी त्यात होत्या. अशोकाचे राज्य फक्त बौद्ध धर्मीयांचे राज्य नव्हते. मौर्य साम्राज्याचा प्रचंड विस्तार त्याच्या काळात झाला होता. अगदी पाटण्यापासून काबूलपर्यत ते होते. कंबोजांपासून, गांधारांपासून थेट चोल-पांड्य लोकांचा उल्लेख अशोकाच्या राजाज्ञांत (ईडिक्ट) आहे. इतकी विविधता आणि विस्तार जपण्यासाठी हा 'धम्म' आवश्यकच होता.

बौद्ध धर्म हा वैदिक व्यवस्थेला शह देण्यासाठी निर्माण झाला होता याबाबत अनेकांचे एकमत दिसते.

ह्यावर गंभीर इतिहासकारांचे एकमत आहे असे वाटते. उत्तर वैदिक काळात पुरोहित वर्गाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जैन, बौद्ध इत्यादी धर्म-पंथ हे व्यवस्थेविरुद्धची प्रतिक्रिया होती. उदा. तांत्रिकदृष्ट्या द्विज असूनही वैश्यांना हवा तो मान मिळत नव्हता. खरे तर अर्थव्यवस्थेतील बदलामुळे1 त्या काळात व्यापारउदिम भरभराटीस आला होता. वैश्यांचे महत्त्वही वाढले होते. त्यामुळे वैश्य हे नव्या पंथांकडे वळले.

असो. तूर्तास घाईत एवढेच. चर्चेचा विषय चांगला आहे आणि ह्यातून आणखी विषय निघू शकतात.

1 निम-भटकी पशुपालनावर आधारित अर्थव्यवस्था ते शेतीप्रधान अर्थव्यवस्था.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

विषय पुन्हा व्यापाराकडे

प्रतिसादासाठी धन्यवाद.

विषय पुन्हा व्यापाराकडे वळतो आहे. भारतात एकेकाळी व्यापारउदिमाने चांगला जोम धरला होता पण पुढील काळात ही क्रिया मंदावली असे दिसते. याची नेमकी कारणे कोणती? (यनांच्या म्हणण्याप्रमाणे - असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी - किंवा अध्यात्म, कर्मसिद्धांत, संतपरंपरा यामुळे या प्रक्रियेस खीळ बसली.) वगैरेवर वेगळी चर्चा व्हायला हवी.

गुप्त

(माझी दिव्य स्मरणशक्ती दगा देत नसेल तर) गुप्त काळानंतर भारताचा देशाबाहेर होणारा व्यापार उदीम खोळंबला
याचे मुख्य कारण ग्रीकोरोमनांचे एकछत्री राज्य नाहीसे होऊन त्याची अनेक शकले उडणे आणि टोळ्यांनी 'सिल्क रूट' विस्कळीत करणे हे होय असे
रोमिला थापरबाईंच्या पुस्तकात वाचले होते.

यज्ञयाग आणि संपत्तीचा नाश

< यज्ञांनी होणारा तोटा, नुकसान टळले हे उत्तमच झाले, पण लोकांचा यज्ञयागांवर खर्च होणारा पैसा आणि लक्ष इतरत्र वळले असावे, त्याला आळा घातला गेला नाही. उलट प्रोत्साहन दिले गेले. अर्थात त्यामुळेच स्तूपांसारखी स्थाने आज भारतीय इतिहासाची माहिती देत उभी आहेत हा झालेला फायदा. पण तोटेही बरेच असावेत. मुख्य तोटा असा की अशोकाच्या काळात यज्ञांना आळा बसला म्हणून नंतरच्या शुंगांनी आणि सातवाहनांनी जरी लेणी कोरणे, आणि स्तूप उभारणे सुरूच ठेवले तरी यज्ञयागांचेही थोडेफार पुनरुत्थान केले. जरी नंतर त्यात प्राण्यांचे बळी देण्याचे प्रमाण कमी झाले, तरी पैसा आणि शक्तीचा अपव्यय टळला नाही.>

आजच्या काळात कोणी यज्ञयागांवर आणि पशुबलींवर संपत्ति उधळू लागला तर आपण निश्चितच त्याला उधळमाधळ म्हणू पण २००० वर्षांपूर्वीच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाहता राहावा म्हणून अन्य कोणती साधने उपलब्ध होती ह्याचा विचार केल्याशिवाय त्या काळाबद्दल असे सरसकट विधान करता येईल काय ह्याविषयी मी साशंक आहे. शक्यता अशीहि असू शकेल की ह्या यज्ञयागांवरच्या व्ययामधूनच पुरोहितांपासून ते लाकुडतोडयांपर्यंत आणि आचारी-मोलकरणींपर्यंत अनेकांना उपजीविका मिळत असेल. आजच्या काळात सिनेमा-नाटकांवर आणि बाहेर खाण्यावर केला जाणारा व्यय काहींना उधळमाधळीसारखा वाटतो पण त्यामुळेच फार मोठया प्रमाणात tertiary sectorची वाढ होते असेहि अर्थशास्त्री सांगतात.

म्रुत्यूनंतर सेवकवर्ग - खराखुरा किंवा प्रतीकात्मक - आणि राजाला मरणोत्तर लागू शकणार्‍या गोष्टी राजाबरोबर पुरण्याची प्रथा जगभर आढळली आहे - उदा. ईजिप्त, वायकिंग कबरी, मध्य-अमेरिकी संस्कृति, रशियाच्या स्टेप्स भागात उत्खनन केलेली काही स्थाने इ. फार दूर कशाला, आपल्याकडे श्राद्धसमयी ब्राह्मणाला दिलेले पितरांपर्यंत पोहोचते ही समजूत आहेच. अशा चालींचा केवळ चीनशी संबंध लावण्याची आवश्यकता नाही असे वाटते.

आपल्या प्रतिसादात प्रियाली म्हणतातः <चाणक्य चंद्रगुप्ताचा उल्लेख करताना त्याचा शूद्रवर्ण नेहमी जाणवून देत असे.> खरोखरीच चाणक्य चन्द्रगुप्ताला असे हिणवत असे का नाही ह्याविषयी प्रत्यक्ष पुरावा कोठे आहे असे वाटत नाही. सम्राटाला त्याच्या सेवकांसमोर अपमानित करू नये, त्याचा आब राखावा एव्हढा सारासार विचार राजनीतिपटु चाणक्यामध्ये निश्चितच असावा.

मुद्राराक्षस नाटकातील (इ.स. ७वे वा ८वे शतक) चाणक्य मात्र चंद्रगुप्ताला वृषल (दासीपुत्र) असे सारखेच संबोधतो, 'तुझे राज्य माझ्यामुळे तुला मिळाले आहे' (विनयालङ्कृतं ते प्रभुत्वम्) असे बजावतो कारण नाटककाराने रंगविलेला चाणक्य तसा आहे. 'गोष्टी घडवून आणण्याच्या बाबतीत जी एकटी सेनांच्या शतकांपेक्षा समर्थ आहे आणि नंदांच्या उन्मूलनामध्ये जिचा प्रभाव दिसून आलेला आहे ती माझी बुद्धि मला सोडून जाऊ नये' (एका केवलमेव साधनविधौ सेनाशतेभ्योऽधिका| नन्दोन्मूलनदृष्टवीर्यमहिमा बुद्धिस्तु मा गान्मम||) अशी त्याची प्रार्थना आहे, 'नामान्येषां लिखामि ध्रुवमहमधुना चित्रगुप्तः प्रमार्ष्टु' ( ह्या राजांची नावे मी लिहिली आहेत आणि त्यांचा नाश आता अटळ आहे, चित्रगुप्तामध्ये सामर्थ्य असेल तर त्याने ही नावे पुसावी.) असे आह्वान तो देतो. चन्द्रगुप्ताला असे हिणविण्यामागे त्याचे कारस्थान आहे कारण आपण आणि चन्द्रगुप्त ह्यांमध्ये बेबनाव आहे असे राक्षसाला वाटावे असा त्याचा डाव आहे.

धन्यवाद.

आजच्या काळात सिनेमा-नाटकांवर आणि बाहेर खाण्यावर केला जाणारा व्यय काहींना उधळमाधळीसारखा वाटतो पण त्यामुळेच फार मोठया प्रमाणात tertiary sectorची वाढ होते असेहि अर्थशास्त्री सांगतात.
हे मला मान्यच आहे. म्हणूनच मी लेखात म्हटले आहे की:
मुळात अर्थव्यवस्थेचा भाग झालेली कोणतीही वाईट पद्धत मोडकळीला आणायची असल्यास तिला अनेक पर्याय तयार करायला हवेत. अनेक म्हणण्याचे कारण एवढेच की एकच पर्याय एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी कधीच उपयोगाचा नसतो.

चीनशी केवळ संबंध लावल्यासारखा वाटला असल्यास क्षमस्व. किंबहुना असा घाईने संबंध लावायला माझीच तयारी नाही.
वरील चर्चेत गोष्टी इतर ठिकाणांहून कट अँड पेस्ट करताना हे वाक्य काढले गेले असे दिसते आहे.

" चीनमधील या नवीन उत्खननांबद्दल कोणाला काही दुवे मिळाल्यास ते जरूर द्यावे. ह्यामध्ये काही संबंध आहेत का हे अभ्यसनीय असावे. मात्र यावरून या कथा किंवा व्यक्ती भारतातल्या नाहीत किंवा आहेतच अशा पद्धतीचे निष्कर्ष काढणे मला योग्य वाटत नाही**. "

** माझ्या हे स्पष्ट करण्यामागचा संदर्भ आहे तो खट्टामिठा या ब्लॉगचा. या ब्लॉगकर्त्याने http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_07.html भास्कर जाधव यांनी दिलेले रामायणातील दशरथाच्या अंत्यसंस्कारांचे वर्णन दिले आहे. जाधव यांचा रामकथा ही इजिप्तमधली आहे असा निष्कर्ष घाईने काढल्यासारखा वाटतो.

वृषल

खरोखरीच चाणक्य चन्द्रगुप्ताला असे हिणवत असे का नाही ह्याविषयी प्रत्यक्ष पुरावा कोठे आहे असे वाटत नाही. सम्राटाला त्याच्या सेवकांसमोर अपमानित करू नये, त्याचा आब राखावा एव्हढा सारासार विचार राजनीतिपटु चाणक्यामध्ये निश्चितच असावा.

चंद्रगुप्ताबद्दल जी थोडकी माहिती आहे तो इतिहास नाही त्यामुळे पुरावा शोधणे कठिण आहे. येथे चाणक्याच्या सारासार विचाराबद्दल बोलायचे नसून तत्कालिन पद्धतीविषयी भाष्य करायचे आहे. चंद्रगुप्ताला वृषल संबोधणे ही सामान्य रीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुधा त्याप्रकारेच नीचस्तरीय लोकांना संबोधण्याची पद्धत असू शकेल.

बर्‍याचदा उच्चवर्णीयांनी तयार केलेल्या संबोधनांचा वापर इतरांना त्रास देण्यासाठी होत असावा अशी त्यांची कल्पना नसतेही. "चांभार चौकशा" किंवा धेडगुजरी वगैरे सारखे वाक्प्रचार वापरताना आपण एखाद्या जातीवर टिप्पणी करतो अशी भावना नसेलही पण त्या जातीतील माणसाला ती टिप्पणी त्रासदायक वाटू शकते.

तत्कालीन अर्थव्यवस्थेचा तपशील अर्थशास्त्रात आहे...

यज्ञयाग हे अर्थव्यवस्थेतील पैसा प्रवाही करण्याचे साधन होते, असे नाही. यज्ञयाग हे मुख्यत्वे ब्राह्मण/पुरोहित वर्गाचे काम असले तरी त्यासाठीचा खर्च राजा किंवा धनवान यजमानांनी दिल्याखेरीज तो व्याप सांभाळणे कठीण असे. पुन्हा य़ज्ञांचे स्वरुप पाहाता एक वाजपेय (दुष्काळावर मात करण्यासाठी पाऊस पाडण्याच्या हेतूने) यज्ञ सोडता बहुतेक मोठे यज्ञ (अश्वमेध, राजसूय, पुत्रकामेष्टि) हे वैयक्तिक इच्छा/आकांक्षा पूर्तीसाठी केले जात. त्याचा सामान्य समाजाला काहीही उपयोग नसे. हजार ब्राह्मण आणि पाच हजार गरीब जेवले किंवा आचारी/लाकूडतोडे यांना काही दिवसांसाठी रोजगार मिळाला म्हणजे त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे म्हणता येत नाही.
अर्थव्यवस्था प्रवाही राहण्यासाठी कृषी व कृषीआधारित व्यापार ही प्रणाली अत्यंत ताकदवान होती आणि त्याचा तपशील चाणक्याच्या अर्थशास्त्रात मिळतो. ही व्यवस्था पुढेही अभेद्य राहिली आहे. धार्मिक स्थित्यंतराच्या काळातही व्यापारावर लक्षणीय परिणाम झालेला नाही. तो पूर्वीप्रमाणेच सुरु होता. त्यामुळे समजून घेण्याची बाब अशी, की धार्मिक आणि सामाजिक इतिहासाइतकाच समांतर आणि ताकदवान असा व्यापारी इतिहासही भारताला आहे.

* चाणक्य चंद्रगुप्ताला हिणवत असे, यावर आपले मत पटते. नाटककारांचा कल्पनाविलास आणि भाषेचा अभिनिवेश हे पुराव्याचे साधन ठरु शकत नाही. त्यातून हे नाटककार चाणक्यानंतर भिन्न भिन्न काळात होऊन गेले आहेत. विशाखादत्त हा चाणक्याचा समकालीन नव्हे. चाणक्याच्या अर्थशास्त्रातील संकल्पना भास, कालिदास, बाणभट्ट यांनी आपल्या साहित्यकृतींत वापरल्या आहेत. पंचतंत्र व दंडीच्या काव्यातही अर्थशास्त्राचा उल्लेख आढळतो. बाणभट्टाने तर चाणक्याला कुटील कारस्थानी म्हटले आहे आणि बाणभट्टानंतरच्या काळात चाणक्य व अर्थशास्त्र हळूहळू लोकांच्या विस्मरणात जाऊ लागले. एखाद्या व्यक्तीमत्वाचे मूल्यमापन दुसर्‍यांनी त्याच्याबद्दल काय म्हटले आहे, यापेक्षाही त्या व्यक्तीच्या स्वतःच्या लेखनातून जास्त अचूक करता येईल. याचाच अर्थ आपल्याला अर्थशास्त्राच्या प्रकाशातच चाणक्याला जोखावे लागेल. जो चाणक्य राजाबद्दल बोलताना स्पष्ट म्हणतो...
राज्ञः प्रतिकूलं नाचरेत् - राजाच्या मर्जीविरुद्ध आचरण करु नये.
दुर्बलोपि राजा नावमन्तव्यः - राजा दुर्बळ असला तरी त्याचा अपमान करु नये
न महाजनहासः कर्तव्यः - थोर पुरुषांचा उपहास करु नये
न राज्ञः परं दैवतम् - राजासारखे दुसरे दैवत नाही
राज्ञो भेतव्यं सार्वकालम् - राजाला नेहमी भिऊन वागावे
राजद्विष्टं न च वक्तव्यम् - राजाला अप्रिय असे भाषण बोलू नये

तो स्वतः ही (जरी सम्राट चंद्रगुप्ताचा मार्गदर्शक असला तरी) तत्त्वे मोडणार नाही, इतके निश्चित.

खायचे आणि दाखवायचे दात

राज्ञः प्रतिकूलं नाचरेत् - राजाच्या मर्जीविरुद्ध आचरण करु नये.
दुर्बलोपि राजा नावमन्तव्यः - राजा दुर्बळ असला तरी त्याचा अपमान करु नये
न महाजनहासः कर्तव्यः - थोर पुरुषांचा उपहास करु नये
न राज्ञः परं दैवतम् - राजासारखे दुसरे दैवत नाही
राज्ञो भेतव्यं सार्वकालम् - राजाला नेहमी भिऊन वागावे
राजद्विष्टं न च वक्तव्यम् - राजाला अप्रिय असे भाषण बोलू नये

तो स्वतः ही (जरी सम्राट चंद्रगुप्ताचा मार्गदर्शक असला तरी) तत्त्वे मोडणार नाही, इतके निश्चित.

आणि तरीही चाणक्याने नंदाची वर्तणूक सहन न करता त्याची सत्ता उलथवली? :-)

मला वाटतं, राजकारणी लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात त्याकाळीही वेगळेच असावे.

अवांतरः अर्थशास्त्राचा लेखक कौटिल्य किंवा विष्णुगुप्त हा चाणक्य आहे/नाही यावर अनेक तज्ज्ञांत मतभेद दिसतात. याविषयी काही माहिती असल्यास उपक्रमींना वेगळी चर्चा करता येईल.

चाणक्य कुटील नीतीत प्रवीणच होता..

....राजकारणी लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात त्याकाळीही वेगळेच असावे....

असू शकेल. त्यातून चाणक्य हा तर कुटील नीतीचा समर्थकच होता. पण राजशिष्टाचाराप्रमाणेच त्याने सत्ता उलथवून लावण्याची तंत्रे, घातपात, राजाने बाळगायची खबरदारत घाताविरुद्ध प्रतिघात, व्यूहरचना या सर्वांचे तपशीलवार वर्णन अर्थशास्त्रात केले आहे. किमान त्याच्या लेखनावरुन त्याला प्रामाणिक अभ्यासक/लेखक म्हणता येईल.

चाणक्य आणि महापद्म धनानंद यांच्यातील वैराची सुरवात नंदानेच केली होती. दरबारात चाणक्याच्या बोळक्या (पुढील दात पडलेले असल्याने) तोंडावरुन सम्राटाने काही व्यंगनिदर्शक आणि कुत्सित टिप्पणी केली. तेव्हा चाणक्याने त्याची ती प्रसिद्ध प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर तो कधीत नंदाच्या दरबारात गेलेला नाही. राजासमोरच जाण्याचा प्रश्न नव्हता तर शिष्टाचार पाळणे लांबच.

अर्थात स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील मानापमान आणि क्रिया-प्रतिक्रिया यांचे प्रतिबिंब त्याने लेखनात पडू दिलेले नाही अन्यथा अर्थशास्त्र हा राज्यशास्त्राचा ग्रंथ न ठरता चाणक्याचा कल्पनाविलास ठरला असता.

बरोबर, पण

त्यातून चाणक्य हा तर कुटील नीतीचा समर्थकच होता. पण राजशिष्टाचाराप्रमाणेच त्याने सत्ता उलथवून लावण्याची तंत्रे, घातपात, राजाने बाळगायची खबरदारत घाताविरुद्ध प्रतिघात, व्यूहरचना या सर्वांचे तपशीलवार वर्णन अर्थशास्त्रात केले आहे. किमान त्याच्या लेखनावरुन त्याला प्रामाणिक अभ्यासक/लेखक म्हणता येईल.

प्रामाणिक लेखक हे योग्य पण म्हणून तो स्वतः तसेच आचरण करत होता हे असत्य ही असू शकेल. राजकारण्यांचा उत्तम स्वभाव!

चाणक्य आणि महापद्म धनानंद यांच्यातील वैराची सुरवात नंदानेच केली होती. दरबारात चाणक्याच्या बोळक्या (पुढील दात पडलेले असल्याने) तोंडावरुन सम्राटाने काही व्यंगनिदर्शक आणि कुत्सित टिप्पणी केली. तेव्हा चाणक्याने त्याची ती प्रसिद्ध प्रतिज्ञा केली आणि त्यानंतर तो कधीत नंदाच्या दरबारात गेलेला नाही. राजासमोरच जाण्याचा प्रश्न नव्हता तर शिष्टाचार पाळणे लांबच.

बघा! हा ही इतिहास नाही पण पुराणांवरून किंवा नाटकांतून घेतलेला भागच ना! :-) अर्थशास्त्रात वरील उल्लेख नसावा. किंबहुना अर्थशास्त्रात नंद, चंद्रगुप्त किंवा बिंदुसार (त्याच्या कारकिर्दीत चाणक्य जिवंत होता असे म्हणतात) यांचेही नाव नाही.

तुमचा मुद्दा रास्तच, पण...

चाणक्य चंद्रगुप्ताला खालच्या जातीच्या नावाने हिणवत असे, हा मूळ मुद्दाच नाटकाच्या भाषेतून उभा राहिला होता. त्याचे उत्तर केवळ इतिहासाशी संलग्न राहून देताच येणार नाही. कारण इतिहासात तशी काही नोंद नाही, हे आपणच प्रतिसादात मान्य केले आहे.

तर्काच्या आधारे कोणताही मुद्दा वादग्रस्त बनवता येतो. गीतेत भगवान कृष्ण हतबल अर्जुनाला 'क्लैब्य' (नपुंसक) असे संबोधन वापरतात. त्या एका शब्दावरुन किती तरी व्युत्पत्त्या काढता येतात.
१) कृष्णाला घाणेरड्या शिव्या द्यायची सवय होती.
२) गुरु रागावला, की शिष्याचा सर्वांसमक्ष 'षंढा' (आजच्या भाषेत हिजड्या) म्हणून उल्लेख करायचा.
३) अर्जुनाला ही शिवी तीनदा मिळाली आहे. शिवाय तो 'बृहन्नडा' म्हणून वावरला आहेच. त्यामुळे तो खराच तसा असू शकेल.

नाटकांप्रमाणेच पुराणांतही अतिशयोक्ती, अनैतिक कथाकल्पनांचा सुकाळ आहे. भागवत पुराणातील श्लोकांत 'वृषल किंवा शूद्र' या शब्दांचा उल्लेख आहे. आता गीता किंवा भागवत पुराण हे साहित्य ब्राह्मणांनी लिहिले असल्याने असा निष्कर्ष निघू शकतो, की तत्कालीन ब्राह्मण आणि क्षत्रियांना अखेरच्या वर्णाला असे हिणवण्याची सवयच होती.

इत्यलम्

उत्तम लेखन

अतिशय उत्तम लेखन. अनेक दिवसांनी तुमचे लेखन वाचुन बरे वाटले :)
मुळ लेख आणि वरचे प्रियालीतैंच्या प्रतिसादातून नवी माहिती मिळाली.. आभार!

अरविंदरावांनी मांडलेला यज्ञयाग आणि अर्थकारणाचा संबंध विचार करण्यासारखा आहे. त्याला पर्याय म्हणून अर्थकारण वाहते रहावे म्हणूनच अशोकाने ते काहि हजार स्तूप बांधायला काढले असावेत का खरेच धार्मिक कारण असावे?

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

उत्तम चर्चा...

प्रियाली, अरविंदजी व योगप्रभू ह्यांचे प्रतिसाद वाचनीय.
हात शिवशिवत असूनही वेळेअभावी काही लिहू शकत नाही.

@प्रियली:-
कलिंग युद्धातून अशोकाचे परिवर्तन झाले वगैरे भाकडकथा आहेत ह्याबद्द्दल् अधिक वाचायला आवडेल.

@योगप्रभू:- भारताच्या "व्यापारी इतिहासाचा" फारच रोचक मुद्दा सादर केलात. ह्याबद्दल् एक अत्यंत माहितीपूर्ण असा स्वतंत्र धागा सुरु केलात तर फारच बरे होइल. मीही जमेल तशी भर घालेनच.

--मनोबा

+१

भारताच्या "व्यापारी इतिहासाचा" फारच रोचक मुद्दा सादर केलात. ह्याबद्दल् एक अत्यंत माहितीपूर्ण असा स्वतंत्र धागा सुरु केलात तर फारच बरे होइल.

+१ असेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

प्रामाणिकपणे सांगू का?

श्री. मन व ऋषिकेश,
सूचनेबद्दल आभार, पण भारताचा व्यापारी इतिहास हा खूप मोठ्या आवाक्याचा विषय असल्याने एका धाग्यात मावणार नाही. मलाही इतके तपशीलवार लिहिण्याइतका वेळ मिळू शकणार नाही. त्याऐवजी मी माझ्याकडील विविध संदर्भ असाच पुढेही शेअर करण्याचा प्रयत्न करेन.

एक करता येईल

तपशीलवार आणि मुद्देसूद लेख टंकणे वेळेअभावी कठीण असणे समजून येते पण इतका आग्रह होतो आहे (त्यात माझाही सहभाग समजावा) तर काही मुद्दे लिहून एक चर्चा सुरू करता येईल. चर्चेच्या निमित्ताने जे प्रश्न पुढे येतील किंवा मुद्दे मांडले जातील त्या अनुषंगाने वेळ होईल त्याप्रमाणे उत्तरे, प्रतिसाद देऊन चर्चा चालवून माहिती देता येईल.

+१

+१
किंवा दुसरा पर्याय त्याचा सबसेट निवडावा, त्यावर लेखन करावे व नंतर वेळ मिळेल तसे त्याच विषयाशी संबंधीत किंवा दुसर्‍या एखाद्या सबसेटवर वेगळ्या लेखांकात लिहावे.. वेळ मिळेल तशी लेखमाला पुढे चालवावी

या विषयवर पुढे माहिती शोधाविशी वाटल्यास, वेगवेगळ्या धाग्यांत तुमच्या विखुरलेल्या प्रतिक्रीया शोधण्यापेक्षा एकाच लेखांकात व खालील प्रतिक्रीयांत शोधणे सोपे जाईल

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

ढाचा...

प्लीज...लिहाच.
हे घ्या. मी काही महत्वाचे ठळक् मुद्दे, बुलेट पॉइंटस् देतोय्.

१.वैदिक् वाङ्मयातील समुद्राचे "नौकांनी भरलेला " असे वर्णन्.

२.रामायण्-महाभारतादी ग्रांथातील् उल्लेख्(राम् अयन हे अयोध्या ते लंकेपर्यंत झालेले असल्याने तुरळक् तुरळक् का असेना आजचा उत्तर भारत व दक्षिण भारत+लंका असा व्यापार दिसतो, त्याची उदाहरणे.)

३.ग्रीस च्या "डार्क एज" ला समांतर काळात भारताची स्थिती.
४.ज्यू व इतर मध्यपूर्व वस्त्यातील भारतीय व्यापाराचे उल्लेख्(मेसोपोटेमिया,इस्राइल, लॅटर किंगडम् ऑफ् इजिप्त मधील् उल्लेख.)

५.शिशुनाग, नंद घराण्यांचा काळ.
६.चीनशी व्यापाराची सुरुवात(ही मध्य् आशियामार्गे झाली, नथु-ला व हिमालय् ओलांडून् नाही.)
७.इराणशी सातत्याने असलेले भू-राजकिय्,सांस्कृतिक (व पर्यायाने व्यापारी)संबंध
८.सोळा महाजनपदांचा, बुद्धाचा काळ. (तल्वारीच्या निमित्ताने लोह् खनिजाचा मोठ्या प्रमाणात् व्यापार सुरु. धान्य व्यापार क्वचितच् दिसतो. रेशिम् वगैरे वस्तू अधिक्.कलाकुसरीच्या वस्तू अधिक.)
९.अलेक्झांडरच्या स्वारीने तत्कालीन् ज्ञात जगातील् फार मोठ्या भूभागातील् जनतेचे अभिसरण. थेट ग्रीसपासून भारताच्या पूर्व किनार्‍यापर्यंतची एकमेकांना (वेगवेगळ्या साम्राज्यांना) माहिती होणे.(मसाल्याच्या व्यापारास चालना मिळणे व पर्यायाने जागतिक इतिहासातील माइल् स्टोन)
९.५ मौर्य काळात राजसत्तेचे भक्कम पाठबळ लाभल्याने दक्षिण् -उत्तर भारत असा व्यापार् प्रथमच मोठ्या प्रमानावर सुरु होणे.
(चंद्रगुप्त कर्नाटकातील श्रवनबेळगोळ येथे राहिला. अशोकाची मुले लंकेत गेली. खुद्द् राजघराण्यातील व्यक्तीचे असे येणे-जाणे वाढल्याने प्रवासे व इतर वाहतूकीची सपोर्ट् सिस्टिम् हळूहळू उभी राहू लागली. अगदि दिग्गज प्रशासक, व्हिजनरी शेर शाह सूरी ह्याने ग्रँड् ट्रंक् रोड् बांधून ढाका/कोलकाता - मथुरा- दिल्ली -पेशावर-काबूल जोडले काहिसे त्याच धर्तीवर)
१०.कनिष्क काळातील लढाया.शक-कुषाण्-हूण ह्यांचा सुरुवातीचा उपद्रव. पण् त्यानिमित्ताने त्यांच्या भूभागाचे भारताशी संबंध सुरु.(मथुरा-काश्मीर- अफगाणीस्तानच्या पलिकडले पामिर पठार-सिंधु खोरे हे सर्व एकाच छत्राखाली, पूर्व चीनशी थेट संपर्क. चंद्रशेखर ह्यांनी वर्णन् केलेला काळ/भूभाग)

११.सातवाहन गुप्त काळातील व्यापार.(खरे वाटणार नाही पण त्याही काळात भारताची पश्चिम् किनारपट्टी व्यापाराशी घनिष्ठपणे जोडली गेलेली होती. अगदि ख्रिस्त् धर्माचा उदय् झाल्य् झाल्या थेट सिरिअन् ख्रिश्चनांचा एक् समूह समुद्रमार्गे केरळात आला. काही ज्यूंची जहाजेही कोकण किनार्‍यास लागली.) कोकणपट्टीतील् दाभोळ्, डिचोली,मुरुड-हर्णे व् इतर ठिकाणे जी आज पारंपरिक बंदरे म्हणून् ओळखली जातात् ती प्रथमच उदयास येणे. व त्यामुळे मध्य्-पूर्व(आजचे अरब-पर्शिअन् जगत) कोकणास व्यापारास जोडले जाणे.

१२.कोकण् ते देश (महाराष्ट्रिय पठार) हा तत्कालीएन् व्यापाराचा अतिमहत्वाचा मार्ग( ह्यालाच नाणेघाट म्हणतात. ह्याच्या सुरक्षिततेसाठी सह्याद्रीच्या आडोश्याने शेकडो किल्ले, छावण्या ह्यांची उभारणी) जुन्नरचे "प्रतिष्ठाण/पैठण"सत्तेसाठी व्यापारी महत्व.

१३.मला वाटते सूरतही (किंवा अजून कुठले तरी गुजराती बंदर)तेव्हापासूनच जगाला जोडलेले होते.

१४.अरबांशी चलणारा व्यापार(खूप जणांना वाटते तसे इस्लामच्या उदयानंतर "अचानक" अरब् जगभर फिरु लागले असे नाही. ते पूर्वीपासूनच समुद्री व्यापरात सहभागी असत. पार चीनपर्यंत अरब व्यापारी गेलेल् होते. त्यात भारतही आलाच.)
अगदि आजचे कराची,तत्कालीन सिंधी राजाचे "देबल" नामक् बंदर इस्लामच्या उदयापूर्वीही तत्कालीन जगात नावाजलेले होते, क्त्येक इस्लामपूर्व अरब व्यापारी तिथे येते व् पुढे अधिक व्यापारासाठी जात.

१५.हर्षवर्धन, व त्यानंतर् वाकाटक-चालुक्य-राष्ट्रकूट घराण्यांचा काळ, त्यादरम्यानचा व्यापार.

१६.दक्षिणेत चोल-पांड्य-पल्लव ह्या घराण्यांच्या व्यापाराची भरभराट(मसल्याच्या व्यापारातून् उत्तर भारतापेक्षाही कैकपट दक्षिणभारताने कमावलेले आहे. पिढिजात संपत्ती ह्यामुळेच दक्षिण भारतीयांची इतरांपेक्षा लाखपट आजही मोठी सापडते. एक सर्वसाधारण् उदाहरण म्हणजे दाक्षिणात्य मंदिरात,संस्थानात सापडणारी संपत्ती; विवाहादरम्यान होणारी उलाढाल. पंजाब्यांसारखे तेलगु लोक् नुसतेच कर्ज् काढून् दिखावा करीत नाहित; ढोल ताशांवर व फाय् स्टार हॉटेलवर खर्च करण्यापेक्षा ते किलो-किलोने सोने विवाहात देवाण्-घेवाअण् करतात्. कुठून् आणले त्यांनी हे? मसाल्याच्या पिढीजात व्यापारातून!) ह्यांनी पश्चिमेशी व शेजारच्या लंकेशी व्यापार केला तसेच पूर्वेकडेही बस्तान् बसवले. पूर्व् आशियात भारताच्या कॉलोनिज् तयार झाल्या.लाओस-कंबोडिया-थायलंड्-इंडोनेशिया -सिंगापूर इथे स्पष्ट दिसनारी भारताची छाप.

१७.ह्या प्रक्रियेस बौद्ध धर्मप्रसाराचे मिळालेले पाठबळ.
१८.इस्लामचा उदय्. भारताचा व्यापार् काहिसा आकुंचन पावणे(आधुनिक् हिंदु धर्माची मुहूर्तमेढ्, आठवे-नववे शतक)

बस्स्. इतकेच कव्हर केलेत तरी भरपूर होइल. आपण् फक्त् प्राचीन काळच्या शेवटापर्यंत पोचलोत्. ह्यापुढे भारताचे मध्ययुग सुरु होते.

ह्यातल्या हरेक मुद्द्यावर तुम्हाला जे काही माहिती आहे ते सरल सरळ् लिहित गेला तरी बक्कळ मटेरिअल् तयार होइल.
किती लांब अन् किती लहान होइल त्याची आधीच फिकिर कशाला? तुम्ही भसाभसा वाढत रहा , आम्ही बकाबका खात राहू. उगाच मोजमाप करण्यात कष्ट का घालवा?

--मनोबा

बरं ठीक आहे. आपण सगळे मिळून या पैलूंवर लिहूया...

ठीक आहे. तुमचे मुद्दे मी टिपून घेत आहे.
एक एक छोटा विषय घेऊन सुरवात करु या आणि सगळ्यांनीच आपल्याजवळील माहितीची देवाणघेवाण करु या. त्यानिमित्त आपल्याला त्या त्या कालखंडात एक फेरफटकाही मारता येईल.
श्री. चंद्रशेखर यांचाही या विषयावर चांगला अभ्यास आहे. त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी सिल्क रुटविषयी वाचनीय माहिती दिली आहे. ते वाचत असल्यास सहभागाची विनंती.
(प्रियाली : दुवे जुळवण्यास थोडा वेळ द्यावा, ही विनंती)

जुन्या करारातील जोसेफची कथा

ज्यू/ख्रिस्ती लोकांच्या तोरा/जुन्या करारातली जोसेफची कथा अशी आहे. इजिप्तच्या फारो-सम्राटाला स्वप्न पडते की नदीतून सात खंगलेल्या गायी बाहेर पडतात, आणि किनार्‍यावरच्या सात पुष्ट गायींना खाऊन टाकतात. सात किडकी कणसे उद्भवतात आणि सात चांगल्या कणसांना फस्त करतात. जोसेफ भविष्य वर्तवतो की सात सुकाळाची वर्षे येणार आहेत, आणि मग सात दुष्काळाची वर्षे येणार आहेत. या भविष्याच्या जोरावर सम्राटाचे चांगलेच फावते. सुकाळाच्या वर्षांत धान्याची कोठारे तुडुंब भरून सात दुष्काळाच्या वर्षांत प्रजेचे सर्व काही सम्राटाचे होते. जोसेफच्या प्रधानकीने हे साध्य होते. प्रजा स्वतःचे सर्व काही (गुलाम बनून स्वातंत्र्य विकण्यासह) अन्नाकरिता सम्राटाच्या स्वाधीन करते.

जॉन रॉकेफेलर हा १९०० काळात अमेरिकेतला श्रीमंत माणूस होता. स्वतःला धर्मशास्त्रीसुद्धा माने. बायबलमधील जोसेफने एकाधिकारी-श्रीमंत होण्याचा धर्ममार्ग दाखवलेला आहे, अशा प्रकारे त्याने कथेचे विश्लेषण केलेले आहे. त्याचे उत्तर म्हणून मार्क ट्वेनने मात्र जोसेफचे प्रजेला नागवणारा असे विश्लेषण केलेले आहे. (दुवा १, पहिले पान मोफत असावे. दुवा २, या गूगलपुस्तकात पृष्ठ १४९(शेवटचा परिच्छेद)-१५० बघावे.)

तळागाळातल्यांचे आर्थिक बळ नसावे

बुद्धाच्या आयुष्यकाळातही श्रीमंत व्यापार्‍यांनी धर्मप्रसारात फार मदत केली अशा कथा आहेत. (उदाहरणार्थ : जेतवनाची कथा. एका व्यापार्‍याने संपूर्ण उद्यानातील जमीन सोन्याने मढवली, आणि या किमतीला उद्यानविकत घेऊन बुद्धाला दिले. ही कथा बौद्ध चित्रांत पुष्कळदा दिसते. अर्थात या कथा बुद्धाच्या मृत्यूनंतर पुष्कळ पुढेसुद्धा रचल्या गेल्या असू शकतील.)

परंतु राजाश्रयाच्या काळात राजाच्या आर्थिक बळावर आणि व्यापार्‍यांच्या देणग्यांवर विहार चालले. लेण्या बांधायसाठी देणग्या देणार्‍याचे शिलालेख वगैरे सापडतात.

मात्र शुंगांच्या धोरणाखाली भरभराट झालेले अभिजन आणि अशोकाच्या धोरणाखाली भरभराट झालेले अभिजन वेगळे असावे.

(बुद्धाचा धर्म तळागाळातल्यांचा विशेष करून उद्धार करणारा नसावा. पण तळागाळातल्यांचा उद्धार आडवण्यासाठी बुद्धाच्या धर्मात फारशा तरतुदी नाहीत. कदाचित कुठल्याच तरतुदी नसतील. म्हणून कदाचित आंबेडकरांनी तो निवडला असावा. आंबेडकर हे बुद्धाच्या धर्माचे तटस्थ अभ्यासक नसून नवबौद्धपंथाचे संस्थापकही होते. त्यामुळे या नव्या पंथात त्यांनी तळागाळातल्यांचा उद्धार धर्माच्या तत्त्वांतच समाविष्ट केला असावा.)

गंडलय...

दोन्ही प्रतिसाद उत्तम.
पण शेवटच्या प्रतिसादात कंसात दिलेली वाक्ये एकमेकांसोबत समजून घेताना कठिण जाते आहे.

--मनोबा

कंसातली वाक्ये

बुद्धाचा धर्म तळागाळातल्यांचा विशेष करून उद्धार करणारा नसावा

-बुद्धाचा धर्म बुद्धीवाद्यांसाठी होता. तळागाळातल्या/सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना तो अंगिकारणेच काय पण समजावून घेणेही अवघड होते. (आजही आहे.) तरीही तो यशस्वी आणि जनमान्य धर्म-संस्थापक झाला याचे कारण कळत नाही. कदाचित धनवान आणि राज्यकर्त्या लोकांना त्याचे आकर्षण वाटले असावे.

पण तळागाळातल्यांचा उद्धार आडवण्यासाठी बुद्धाच्या धर्मात फारशा तरतुदी नाहीत. कदाचित कुठल्याच तरतुदी नसतील.

- तळागाळातलेच काय पण कुणाचाही उद्धार आडवणार्‍या किंवा उद्धार करणार्‍या कोणत्याच 'स्पेशल' तरतुदी नाहीत. तो मध्यममार्ग आहे. तो झुंडमार्ग/संप्रदाय नाही. तो एकट्याचा एकाकी मार्ग आहे. स्वतः समजून घेऊन स्वतः आचरण्याचा मार्ग आहे. पण हे किती जणांना खरे समजले (होते) कुणास माहीत?

आंबेडकर हे बुद्धाच्या धर्माचे तटस्थ अभ्यासक नसून नवबौद्धपंथाचे संस्थापकही होते. त्यामुळे या नव्या पंथात त्यांनी तळागाळातल्यांचा उद्धार धर्माच्या तत्त्वांतच समाविष्ट केला असावा.

-संप्रदाय अशा अर्थी बुद्ध धर्माचे रूप आंबेडकरांनाही अभिप्रेत नसावे. 'शिका, समजा, मोठे व्हा' हा त्यांना अभिप्रेत असलेला बौद्ध धर्म दिसतो.

+१ -१

म्हणजे होही आणि नाहीही.
तो एकट्याचा एकाकी मार्ग आहे. स्वतः समजून घेऊन स्वतः आचरण्याचा मार्ग आहे.
भिख्खूंचा "संघ" स्वतः गौतम् बुद्धाच्या काळातच स्थापन झाला होता.(की त्याने स्वतः केला होता?)
संघ हाही साधकांचा समूह किंवा झुंडच म्हणता यावी. isn't it?
ह्याकारणामुळे "नाही " म्हणालो.

आणि "हो" ह्यासाठी की बुद्धाची स्वतःची उद्घोषणा :-
"इतर कुणीही कुणाला मदत करु श्कणार नाही.
ज्याने त्याने स्वतःचा उद्धार् स्वतःच करणे भाग आहे" वगैरे स्टाइलचा आर्यसत्यांचा भाग.
नुसते "माझे दर्शन घ्या, सात जन्माची पापे धुवून काढा"सासे म्हणरृया झुंडी त्याने उभ्या केल्या नाहित हेही खरेच.

धनंजयांचे प्रतिसाद सुंदरच असतात, पण त्यास मानवी चेहरा* देणे गरजेचे वाटते.समजण्यास मग ते सोपे ठरतील.

*म्हणजे आपण सहज बोलतो तसे.

--मनोबा

पटण्यासारखे

बुद्धाचा धर्म तळागाळातल्यांचा विशेष करून उद्धार करणारा नसावा. पण तळागाळातल्यांचा उद्धार आडवण्यासाठी बुद्धाच्या धर्मात फारशा तरतुदी नाहीत. कदाचित कुठल्याच तरतुदी नसतील.

बुद्धाने आत्म्याचे किंवा देवाचे अस्तित्व नाकबूल केले होते. पण असे असले तरी बौद्ध धर्माने वर्णाश्रमाविरुद्ध भूमिका घेतली नव्हती. बहुधा धनंजय ह्यांचा इशारा तिकडेच असावा. बौद्ध साहित्य वाचल्यास बुद्धाने त्याच्या क्षत्रिय असण्याबद्दलचा अभिमान अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

नाही,

पण असे असले तरी बौद्ध धर्माने वर्णाश्रमाविरुद्ध भूमिका घेतली नव्हती. बहुधा धनंजय ह्यांचा इशारा तिकडेच असावा. बौद्ध साहित्य वाचल्यास बुद्धाने त्याच्या क्षत्रिय असण्याबद्दलचा अभिमान अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो.

नाही. बुद्धाने वर्णाश्रमाविरुद्ध भूमिका घेतली नव्हती, पण धनंजय यांचा इशारा हिंदू आणि बौद्ध धर्मांच्या तुलनेकडे असावा. धनंजय यांच्या मते इतर धर्मांनी तळागाळातल्यांचा उद्धार आडवण्यासाठी तरतुदी केल्या असतील असे वाटते. पण एक तो विषय वेगळाच ठेवावा, असे वाटते.

वर चित्तरंजन भट म्हणतात -
बौद्ध धर्म हा वैदिक व्यवस्थेला शह देण्यासाठी निर्माण झाला होता याबाबत अनेकांचे एकमत दिसते.

ह्यावर गंभीर इतिहासकारांचे एकमत आहे असे वाटते. उत्तर वैदिक काळात पुरोहित वर्गाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जैन, बौद्ध इत्यादी धर्म-पंथ हे व्यवस्थेविरुद्धची प्रतिक्रिया होती. उदा. तांत्रिकदृष्ट्या द्विज असूनही वैश्यांना हवा तो मान मिळत नव्हता. खरे तर अर्थव्यवस्थेतील बदलामुळे त्या काळात व्यापारउदिम भरभराटीस आला होता. वैश्यांचे महत्त्वही वाढले होते. त्यामुळे वैश्य हे नव्या पंथांकडे वळले.

बुद्धाने यज्ञयाग आणि यज्ञात होणार्‍या हिंसेवरून जेवढी स्पष्ट भूमिका घेतली आहे तेवढी स्पष्ट भूमिका वर्णाश्रमाविरुद्ध घेतली नव्हती असे वाटते. अशोकानेही अशी भूमिका ठळकपणे घेतलेली दिसत नाही. त्याकाळी इतर बहुदा सहा विचारप्रवाह अस्तित्वात होते असे वाटते. बुद्धाने आपला वेगळा पंथ तरीही तयार केला. त्यात वर्णव्यवस्थेबद्दल विशेष भाष्य केलेले नाही. मात्र यज्ञात होणार्‍या हिंसेचा विरोध केला आहे. असे असतानाही वरील विषयावर गंभीर इतिहासकारांचे एकमत झाले हे आश्चर्यकारक आहे.

अनाथपिंडकाची गोष्ट वाचली तर http://www.accesstoinsight.org/lib/authors/hecker/wheel334.html#part1 एकाने दुसर्‍याला सांगणे याखेरीज काही झालेले दिसत नाही. आजही स्वामींचे कल्ट पाहिले तर असेच दिसते की स्वामींचे भक्त होण्याची प्रक्रिया मौखिक प्रसिद्धीने होते. (कृपया याचा अर्थ मी बुद्धाची तुलना स्वामी-महाराजांशी करते आहे असे समजू नये. आंबेडकरांनी दलितांना जे बौद्धमार्गाकडे येण्यास सांगितले ते वर्णाश्रमाविरूद्ध आहे हे नक्की आणि मला मान्य आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की हेच २००० वर्षांपूर्वी झाले असे गंभीर इतिहासकार म्हणत असतीलही पण मला अजून ते तितकेसे पचनी पडलेले नाही.).

यावरून दोन प्रश्न पडतातः
वैदिक पुरोहित वर्ग हा वर्णाने ब्राह्मणच होता अशी एक समजूत कितपत खरी आहे? नंतरच्या काळातील जटील आणि रिजिड वर्णव्यवस्थेचा चष्मा घालून अशोकाच्या किंवा त्याच्याही आधीच्या बुद्धाच्या काळाकडे बघितले जाते आहे का असे वाटते.

हे शिलालेख आम जनतेसाठी होते. धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) होते. उदा. त्यात सामाजिक बांधिलकी, नागरिकांनी एकंदरच आणि एकमेकांशी कसे वागावे, ह्याबाबत युक्तीच्या चार गोष्टी त्यात होत्या. अशोकाचे राज्य फक्त बौद्ध धर्मीयांचे राज्य नव्हते. मौर्य साम्राज्याचा प्रचंड विस्तार त्याच्या काळात झाला होता. अगदी पाटण्यापासून काबूलपर्यत ते होते. कंबोजांपासून, गांधारांपासून थेट चोल-पांड्य लोकांचा उल्लेख अशोकाच्या राजाज्ञांत (ईडिक्ट) आहे. इतकी विविधता आणि विस्तार जपण्यासाठी हा 'धम्म' आवश्यकच होता.

नंतरच्या काळातील अशोकाला मर्यादित सेक्युलर म्हणायला माझी हरकत नाही.
विस्तार जपण्यासाठी धम्म आवश्यकच होता म्हणताना अलिकडच्या काळात मात्र असा ऑरगनाईज्ड धम्म आज अशोकाची स्तुती करणार्‍यांना विशेष चालत नाही असे दिसते :-) अशोकाच्या धर्मात सुव्यवस्थेसाठी आईवडिलांचा, नातेवाईकांचा आदर करावा, मोठ्यांचा आदर करावा असे आले आहे. हे लहानांनी आपल्या कंट्रोलमध्ये रहावे यासाठी शिकवलेले असते असे अलिकडेच कुठेसे वाचले. मिळाल्यास दुवा देईनच. अशोकाचे सर्व योगदान धरूनही तो कंट्रोलिंग राजा होता याबद्दल मला शंका वाटत नाही. (पण यात तो जगावेगळे काही वागत होता असे मला वाटत नाही).

अशोकाच्या शिलालेखात कलिंगाच्या युद्धावरून म्हटले आहे:
संदर्भः
http://www.cs.colostate.edu/~malaiya/ashoka.html#FOURTEEN

"There is no country, except among the Greeks, where these two groups, Brahmans and ascetics, are not found, and there is no country where people are not devoted to one or another religion. Therefore the killing, death or.... who died during the conquest of Kalinga now pains Beloved-of-the-Gods. Now Beloved-of-the-Gods thinks that even those who do wrong should be forgiven where forgiveness is possible."

पण हे करताना अशोकाने वनवासी/आदिवासी लोकांना सांगितले आहे की -
"Even the forest people, ... are told that despite his remorse Beloved-of-the-Gods has the power to punish them if necessary, so that they should be ashamed of their wrong and not be killed. Truly, Beloved-of-the-Gods desires non-injury, restraint and impartiality to all beings, even where wrong has been done".

असे दिसते की वनवासी लोकांनी (कदाचित कलिंगाशी संबंधित) अशोकाच्या दृष्टीने बरेच चुकीचे वागणे केले असावे. इतर देशांमध्येही धर्म आहे, ब्राह्मण आणि श्रमणांप्रमाणे लोक आहेत याची जाणीव होऊन त्याने अशा देशीच्या लोकांच्या चुका असल्या तरी त्याबद्दल क्षमा करावी असे म्हटलेले दिसते. याचा अर्थ (इतरांचाही) धर्म हा त्याला या युद्धाच्या हानीनंतर महत्त्वाचा वाटला. ब्राह्मण-श्रमणांबद्दल त्याला आदर आहे असे दिसते. ही हानी दु:खदायक वाटली तरी साम्राज्य एकत्र ठेवण्याची, वाढवण्याची, टिकवण्याची, प्रदेशावर अधिकार गाजवण्याची त्याची इच्छा कमी झाली नाही. अपरिग्रहाच्या अर्थाने तो बौद्ध कधीच झाला नाही. म्हणून त्याच्या शिलालेखांमध्ये अहिंसेचा संदेश येतो. पण वर्णाश्रमाला तोडण्याचा संदेश येत नाही. त्याअर्थाने त्याच्या वेळी वर्ण तुम्हाला-मला आता वाटतात तेवढे जाचक झाले नसावेत असे वाटते.

शिवाय कायदा, सुव्यवस्था अशा अर्थाने धम्म जपण्यासाठी स्तूप बांधणे आवश्यक नव्हते असे वाटते. स्तूपांना प्रोत्साहन दिले गेले त्याची कारणे मला वाटतात ती मी दिली आहेतच.

स्तूपांचा संबंध धम्माशी नव्हे

वैदिक पुरोहित वर्ग हा वर्णाने ब्राह्मणच होता अशी एक समजूत कितपत खरी आहे?

ब्राह्मणाचे काम पौरोहित्य करणे होते. पण एकाच कुटुंबात वेगवेगळी कामे1 करणारे सदस्य करणारे असू शकत असत. त्या काळात जातींचे अश्मीकरण 2 3 झालेले नव्हते.

नंतरच्या काळातील अशोकाला मर्यादित सेक्युलर म्हणायला माझी हरकत नाही.

दुसऱ्या प्रकारचे शिलालेख हे सेक्युलर (ज्यांचा धर्माशी संबंध नाही अशा) गोष्टींबाबत होते एवढेच. अशोक धर्मनिरपेक्ष होता किंवा नव्हता ह्याबाबत निष्कर्ष काढायला वेगळी चर्चा हवी. सध्याच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांशी तुलनाही योग्य वाटत नाही.

विस्तार जपण्यासाठी धम्म आवश्यकच होता म्हणताना अलिकडच्या काळात मात्र असा ऑरगनाईज्ड धम्म आज अशोकाची स्तुती करणार्‍यांना विशेष चालत नाही असे दिसते :-)

फारसे कळले नाही. कृपया नीट समजावून सांगावे. तुम्हाला अलिकडच्या काळातील कुठला ऑर्गनाइज्ड धम्म अभिप्रेत आहे?

अशोकाचे सर्व योगदान धरूनही तो कंट्रोलिंग राजा होता याबद्दल मला शंका वाटत नाही. (पण यात तो जगावेगळे काही वागत होता असे मला वाटत नाही).

हो. बरोबर. नसल्यास नवल. अशोकाच्या राज्यात अहिंसेचे स्तोम माजले/माजवले जात होते असेही वाटत नाही. त्याला काही दिव्य दैवी ज्ञानाची दीप्ती प्राप्त झालेली नव्हती.

कायदा, सुव्यवस्था अशा अर्थाने धम्म जपण्यासाठी स्तूप बांधणे आवश्यक नव्हते असे वाटते

गल्लत होते आहे. स्तूपांचा संबंध बौद्ध धर्माशी आहे. अशोकाच्या धम्माशी नव्हे.

1 कारुरहं ततो भिषगुपलप्रक्षिणी नना । (ऋग्वेद: सूक्तं ९.११२) अर्थ: माझा बाप वैद्यकी करतो, आई कणसं कांडते आणि मी कवी आहे.

2 टॉयनबीने पेट्रिफिकेशन ऑफ कास्ट म्हटले आहे त्यावरून.

3जातिसंस्थेच्या किंवा वर्णव्यवस्थेच्या उगमाविषयी मतभेद आहेत. काहींच्या मते ऋग्वेदपूर्वकाळात भारतात आक्रमक आर्य जमाती आल्या. भारतातील आर्येतरांना त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले. आर्येतर (दास आणि दस्यू) आणि आर्य यांच्यात रंगाचा भेद होता. ह्या वंशभेदाच्या जोरावर आर्य आणि अनार्य असा सामाजिक भेद अस्तित्वात आला. पण पुढे जाऊन आर्य आणि दास एकमेकांत मिसळले. दुसरे मत असे म्हणते की, मुळात अभारतीय आर्यांना जातिसंस्था माहीत नव्हती. जातिसंस्थेचं प्राथमिक स्वरूप भारतीय आहे. इथे आल्यावर अभारतीय आर्यांनी जातिसंस्थेशी जुळवून घेतले. आर्यांमध्ये पुरोहितवर्ग होता. पण पुरोहितवर्गाची जात नव्हती.

धन्यवाद.

>तुम्हाला अलिकडच्या काळातील कुठला ऑर्गनाइज्ड धम्म अभिप्रेत आहे?
इतक्या विविधतेसाठी "धम्म" महत्त्वाचा वाटला असे तुम्ही म्हटले आहे. अशोकाला अभिप्रेत धम्म हा केवळ नागरिकांनी आपापसात नीट वागण्यापुरताच मर्यादित असला तर वेगळी गोष्ट आहे. पण अशोकाचा धम्म हा धम्म-महामात्रांनी नियंत्रित करण्याचा धर्म होता. त्या अर्थाने तो ऑरगनाईज्ड होता. आज नागरिकांच्या रोजच्या आपापसातील व्यवहारांवर अशी देखरेख आणि नियंत्रण आले तर कोणाला हवे आहे? मला तरी नाही. तुम्हालाही नसेल असे वाटते. म्हणूनच त्याने धर्माचा उपयोग प्रामुख्याने राज्यविस्तारासाठी आणि राज्य स्थिर करण्यासाठी केला असे वाटते.

>स्तूपांचा संबंध बौद्ध धर्माशी आहे. अशोकाच्या धम्माशी नव्हे.
बरोबर. पण अशोकाने स्तूप बांधण्यास प्रोत्साहन दिले असे दिसते. निदान बौद्ध कथांवरून. सरकारी तिजोरीतील खजिना, सरकारी व्यक्ती यांनी हे काम केले असल्यास अशोकाचा धम्म हा बौद्ध धर्माशी संलग्न होतो असे वाटते.

धम्म-महामात्त

इतक्या विविधतेसाठी "धम्म" महत्त्वाचा वाटला असे तुम्ही म्हटले आहे. अशोकाला अभिप्रेत धम्म हा केवळ नागरिकांनी आपापसात नीट वागण्यापुरताच मर्यादित असला तर वेगळी गोष्ट आहे.

ह्याबाबत रोमिला थापर ह्यांनी मांडलेले विचार मला पटतात. थापर ह्यांच्या म्हणण्यानुसार अशोकाचा 'धम्म' हा त्याचा स्वतःचा आविष्कार होता. बौद्ध आणि हिंदू विचारसरणींतून त्याने काही गोष्टी घेतल्या. पण त्याचा धम्म हा मूलतः जीवन जगण्याचा एक नैतिक, व्यवहारी व सोयीस्कर मार्ग होता. त्याला त्याच्या धम्मातून बौद्ध धर्मांची तत्त्वेच सांगायची असती, तर त्याने तसे उघडपणे केले असते. कारण त्याने बौद्धधर्माला त्याचा असलेला पाठिंबा छुपा नव्हता. स्वतःकडे देवत्व घेत लष्करी सामर्थ्याच्या आणि कठोर नियंत्रणाच्या जोरावर तक्षशिला ते सुवर्णगिरी असा प्रचंड वैविध्यपूर्ण विस्तार एकसंध ठेवण्याची कवायत करण्यापेक्षा अशोकाने धम्माचे नीती-धोरण स्वीकारले.

पण अशोकाचा धम्म हा धम्म-महामात्रांनी नियंत्रित करण्याचा धर्म होता. त्या अर्थाने तो ऑरगनाईज्ड होता. आज नागरिकांच्या रोजच्या आपापसातील व्यवहारांवर अशी देखरेख आणि नियंत्रण आले तर कोणाला हवे आहे?

अशोकाच्या केंद्रीकृत साम्राज्याचे धम्म-महामात्त हे समाजकल्याण अधिकारी म्हणता येतील. ती एकाप्रकारे अशोकाची केंद्रीय प्रशासकीय सेवा होती. अशोकाचा धम्म बौद्ध धर्माला अनुरूप असता तर ह्या धम्म-महामात्तांची वेगळी गरज राहिली नसती. असो. नियंत्रणाचे म्हणाल तर अजूनही प्रगत देशांत सोशल सर्विसवाले काही बाबतीत देखरेख आणि नियंत्रण ठेवत असावेत, असे वाटते. चूभूदेघे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

धम्म महामात्र

सोशल सर्विसवाले कारण नसताना घरात येऊ लागले तर बहुदा जागरूक नागरिकांना चालणार नाही.

>अशोकाचा धम्म बौद्ध धर्माला अनुरूप किंवा अभिसंगत असता तर ह्या धम्म-महामात्तांची गरज राहिली नसती.

महामात्र ह्या पदाचे काय काम होते यावरून माझी असहमती दर्शवते.

महामात्रांचे काम सोशल वेलफेअरचे म्हणालात म्हणून मी शोध घेतला. येथील पान १६७, १६८ पहा. चंद्रगुप्ताच्या काळचे हे वर्णन आहे.

ह्या शासकीय अधिकार्‍यांच्या पद्धतीत बदल झाले. अशोकाच्या काळात धम्म महामात्र पद तयार झाले. वरील दुव्यावरील पान क्र. १७७ पहा. त्याबरोबर चंद्रगुप्ताच्या काळातील थोडीफार स्वायत्तता जाऊन अधिक नियंत्रण आले. हे नियंत्रण कशा स्वरूपाचे होते याबद्दल पुस्तकाचा जो भाग उपलब्ध आहे त्यावरून चार्ल्स ड्रेकमायर यांनी वरील पुस्तकात थोडी शंकाच व्यक्त केली आहे असे वाटते.

ते या महामात्रांची तुलना misi dominici शी करतात पण त्याचबरोबर महामात्रांचे काम तेवढेसे सेक्युलर नव्हते असेही सुचवतात. http://en.wikipedia.org/wiki/Missus_dominicus

येथील पान १७६ वाचण्यासारखे वाटले.

बाकी कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून (प्रियाली म्हणतात तशी), वर्णव्यवस्थेच्या अश्मीकरणावरून आणि काळावरून वेगळी चर्चा होऊ शकते.

वैदिक पुरोहित वर्ग

वैदिक पुरोहित वर्ग हा वर्णाने ब्राह्मणच होता अशी एक समजूत कितपत खरी आहे?

धर्मानंद कोसंबींच्या "हिन्दी संस्कृति व अहिंसा" या दीर्घ लेखात खालील उतारा मिळाला.

ब्राम्हणकालीन जातिभेद ’ हा लेख मननीय आहे. प्रो० राजवाडे यांचा वैदिक वाङ्मयाचा व्यासंग दांडगा आहे, व त्यांचा निःपक्षपातीपणा आणि समतोलपणा सर्वत्र प्रसिद्ध आहे. तेव्हां त्यांच्या लेखांतील कांहीं उतारे येथें देणें योग्य वाटतें. ज्या वाचकांना मूळ लेख वाचणें शक्य असेल, त्यांनी तो अवश्य वाचावा.

९७. प्रो० राजवाडे म्हणतात, “ यज्ञक्रिया व पौरोहित्य हीं ब्राम्हणांकडेच रहावीं अशी सारखी खटपट.... ज्या राजापाशीं पुरोहित नसेल त्याचें अन्न देव खात नाहींत. तेव्हां यज्ञ करूं इच्छिणार्‍या राजानें कोण्या तरी ब्राम्हणाला पुरोहित करावें. पुरोहित संपादन केल्यानें स्वर्गास नेणारे अग्निच तो संपादन करतो. सर्व अग्नि तृप्त होऊन त्याला स्वर्गाला नेतात. त्याचें क्षात्रतेज, बल, वीर्य व राष्ट्र वाढतें. पुरोहित नसेल तर हें सर्व नष्ट होतें व त्याला स्वर्गांतून हांकलून लावतात. पुरोहिताच्या वाणींत, पायांत, कातडींत, हृदयांत व आणखी एके ठिकाणीं असे पांच क्रोधाग्नि असतात. या बसा म्हणण्यानें, पाद्यानें, वस्त्रांनी व अलंकारांनी, धनानें व राजवाड्यांत ऐषआरामांत राहूं दिल्यानें हे अग्नि शांत होतात. ( शत० ब्रा० ३।२।४०-१ ) व त्याच्या राज्याला बळकटी येऊन सर्व त्याच्या ताब्यांत रहातात. ( ३।२।४०-२) [ पृष्ठ ४१०-११]

९८. “क्षत्रियाला ताब्यांत ठेवण्याकरतां आपण देव आहोंत असेंहि म्हणावयाला ब्राम्हण चुकले नाहींत. देव दोन प्रकारचे—एक ज्यांना आपण नेहमीं देव म्हणतों ते. पढित विद्वान् ब्राम्हण हे मनुष्यदेव. आहुतींनी देवांना खूष केलें पाहिजे, दक्षिणा देऊन मनुष्यदेवांचें समाधान केलें पाहिजे. दोन्हीं देव तृप्त होऊन यजमानाला सुस्थितींत ठेवतात. ( शत० ब्रा० २।२।२।६ ) व त्याला स्वर्गाला पोंचवितात ( शत० ब्रा० ४।३।४।४ ) [ पृष्ठ ४१२ ]

http://dharmanandkosambi.com येथून साभार

धन्यवाद.

शतपथ ब्राह्मणांचा काळ मला वाटते बुद्धाच्या आधीचाच होता, तेव्हा हे योग्यच धरायला हरकत नाही.
यावर असे म्हणता येऊ शकते की क्षत्रिय इतर कोणाला पुरोहित करू लागले असावेत म्हणून ब्राह्मणांनी भिती घातलेली दिसते :)

धन्यवाद

चर्चेत भाग घेतलेल्या सर्वांचे आभार.

धनंजय आणि प्रियाली यांनी भविष्य कथनाबद्दल उदाहरणे दिली आहेत ती माहिती नव्हती. धन्यवाद. ह्यावरून भविष्यकथनाचा धंदा फार जुना आहे असे दिसते. फरक एवढाच दिसतो की भविष्यकथन पूर्वी राजे वापरून घेत असावेत. आपल्याला हवे त्या व्यक्तीचे दैवतीकरण किंवा राक्षसीकरण करण्यासाठी या अशा क्लुप्त्या मोठे लोक वापरून घेतच असावेत. पण त्याही काळात भविष्यावर विश्वास ठेवणारेही होते असा त्याचा अर्थ आहे. इतिहासातील, पुराणांमधील आणि अशा ग्रंथांचे वाचन केल्यास अशा भविष्यवेत्त्यांवर विश्वास ठेवण्याच्या चुका लोक कमी करतील असे वाटते. अर्थात एक स्तूप खणून काढला म्हणून होणारा असंतोष टाळण्यासाठी असे करणे विचार केल्यास फारसे वाईट नाही, पण अशा क्लुप्त्यांची गरज नसावी.

वरील लेखात श्रीलंकेतील बौद्ध लेखनात सापडलेल्या उल्लेखांवरून जो विषय निघाला त्यात येथे (आणि मिसळपावावर) असे मत दिसले की मृत व्यक्तीबरोबर वस्तू पुरण्याची पद्धत सगळीकडे होती त्यामुळे चीनचा संबंध नसावा.

अशोकाचे साम्राज्य स्थिर होण्यास, आणि त्याला इतरत्र प्रवेश मिळण्यास त्याला संघाचा फायदा झाला असे वाटते. विसुनाना यांनी इतर ठिकाणी दिलेल्या प्रतिसादात हा मुद्दा अतिशय योग्य प्रकारे मांडला आहे. अशोकाचे साम्राज्य कल्याणकारी, आणि सेक्युलर होते अशी एक कल्पना आहे. ते कल्याणकारी नक्कीच असावे यात शंका नाही. पण सेक्युलर कितपत असावे?

आजच काही शोध घेताना धनंजय यांनीच केलेला अशोकाचा शिलालेखाचा अनुवाद पुन्हा एकदा दिसला. त्यात धनंजय यांनी इंग्लंडच्या विक्टोरिया राणीच्या पत्राचा भाग प्रतिसादात दिला आहे आणि अशोकात आणि राणीच्या पत्रात साम्यस्थळे असू शकतात असे सुचवले आहे. पण त्यावर फारशी चर्चा झालेली दिसली नाही... कदाचित विक्टोरियाच्या काळात ब्रिटिश जेवढे सेक्युलर होते तेवढा अशोकही असेल. ब्रिटिशांनी देवळे बांधली नाहीत असे वाटते, चर्च बांधली असावीत. ब्रिटिशांनी देवळांना जागा, देणग्या दिल्या होत्या का?

असो. मी एकटी चर्चा पुढे नेऊ शकत नाही. पण यावरून पुन्हा एकदा इतिहासाचे अवलोकन झाल्यास, जुनेच काही संदर्भ नव्याने वर आल्यास बरे होईल.

धन्यवाद.

धार्मिक अध्यापन करणार्‍या संस्कृत शाळांना देणग्या दिल्या

ब्रिटिशांनी (हिंदू) धार्मिक अध्यापन करणार्‍या संस्कृत शाळांना (वैदिक पाठशाळांना) देणग्या दिल्या. शाळा स्थापनही केल्या. (का. वा. अभ्यंकरांनी महाभाष्याच्या प्रस्तावनेत इतिहास संक्षेपाने दिलेला आहे.)

खालसा केलेल्या राज्यांतल्या देवळांना दिलेली वर्षासने चालू ठेवली असतील असा कयास आहे. (राजकरणाकरिता तरी असे काहीसे केले असेल असे वाटते.) असे काहीतरी वाचल्यासारखे वाटते, पण नेमके संदर्भ आठवत नाहीत.

बुद्धगयेतील महाबोधी देवळाचा जीर्णोद्धार ब्रिटिशांनी केला, असे आंतरजालावर दिसते.

पोर्तुगिजांनी जुन्या कोन्क्विस्तीत हिंदू देवळांचा नायनाट केला. पण नव्या कोन्क्विस्तींत देवळांचे उत्पन्न, जमिनी वगैरे यथास्थित चालू ठेवल्या. सरकार मोठ्या जमीनदारांशी जितपत दोस्ती करून वागते, तितपत दोस्तीने पोर्तुगीज सरकार नव्या कोन्क्विस्तीतील देवळांच्या चालकांशी वागले असावे.

रोमन सम्राट थियोडोसियसकडून पशुबळींचा प्रतिबंध

ई.स. ३९१ साली थियोडोसियस या रोमन सम्राटाने पशुबळींच्या बंदीचा आदेश दिला. मात्र या घटनेचे अर्थशास्त्रीय विश्लेषण मी वाचलेले नाही.

थियोडोसियसच्या काळाच्या आधी (सम्राट कॉन्स्टॅन्टाईनच्या काळापासून) सम्राटांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे ख्रिस्ती धर्माची सद्दी चालू होती. तरी थियोडोसियसच्या काळापर्यंत रोमन राज्याचा अधिकृत धर्म पूर्वीच्या देवांचा ("पेगन") होता. थियोडोसियसच्या वटहुकुमांमुळे व त्याने सेनेटकडून बनवून घेतलेल्या कायद्यांमुळे जुना धर्म बेकायदा झाला.

थियोडोसियसच्या काळात जुन्या देवांच्या देवळांवर बंदी आली, आणि त्यांची संपत्ती बळकावली गेली. पण काही उदाहरणांत ती संपत्ती त्या-त्या गावच्या ख्रिस्ती बिशपने चर्चकडे घेतली.

सम्राट जसे ख्रिस्ती झाले, तसे प्रमुख उमरावही ख्रिस्ती झाले. धर्माच्या बदलामुळे भरभराट होणार्‍या अभिजनांचा वर्ग बदलला नसावा. (थियोडोसियसच्या काळात पेगन धर्मांचे उच्चाटन करण्याच्या घटनांचा विकिपेडिया दुवा.)

अशोक आणि थियोडोसियस

भरपूर शक्यता दिसत आहेत..

http://penelope.uchicago.edu/~grout/encyclopaedia_romana/greece/paganism...
येथे थियोडोसियस राजावर मिलानच्या ख्रिश्चन धर्मगुरुचा पगडा होता, या धर्मगुरुने थियोडोसियस राजाला दंगलीत झालेल्या ७,००० माणसांच्या मृत्यूला जबाबदार धरून ख्रिश्चन धर्मातून काढून टाकण्याची धमकी दिली होती. म्हणून थियोडोसियसने प्रायश्चित्त घेतले. ह्यामुळे थियोडोसियसने पेगन धर्माचे आचरण थांबवण्यावरून बरेच आदेश काढले असे दिसते.

अशोकावर कोणा बौद्ध धर्मगुरुचा पगडा असू शकेल का? शक्यता आहे असे वाटते, पण अशोकाचे कोणी गुरु असले तर माहिती नाही. ज्या युद्धात प्रचंड हानी झाली त्या कलिंग युद्धाआधी अशोक बौद्ध झाला होता का? मी पूर्वी अशोक युद्धानंतर पश्चात्तापाने बौद्ध झाला असे वाचले आहे. बौद्धांच्या दृष्टीने पाहायला गेल्यास तो युद्धाआधी बौद्ध असणे गैरसोयीचे आहे, कारण त्याच्यावर हिंसा करताना धर्माचा काहीही परिणाम झाला नव्हता असे म्हणावे लागले असते. असो. मात्र त्याचबरोबर अशोकाने शेवटपर्यंत स्पष्टपणे वैदिक धर्म हे बेकायदा आहेत असे निदान शिलालेखांमध्ये म्हटलेले नाही (जसे थियोडोसियस ने म्हटले आहे). त्याच्यावर कोणा धर्मगुरुचा पगडा असणे शक्य आहे. पण हा पगडा अशोकाला बौद्ध धर्मातून काढून टाकण्याची धमकी (किंवा तत्सम धमकी) देण्याइतका आणि अशोकाने त्याला बधण्याइतका होता ह्याबद्दल मात्र शंका वाटते. उपगुप्त नामक भिक्षूचे नाव अशोकाचा गुरू किंवा अशाच प्रकारे प्रसिद्ध आहे, पण कुठच्याही शिलालेखांमध्ये उपगुप्ताचा किंवा कोणाच भिक्षूच्या नावाचा उल्लेख नाही.

मात्र प्रियाली यांनी वर "या धर्माच्या स्वीकाराने राजापेक्षा वरचढ कोणी राहण्याची गरज नव्हती" जे म्हटले आहे, ते खरे असू शकते असे दिसते. पण वर्णभेद नष्ट करणे हा अशोकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भागच नव्हता असे मला वाटते. चंद्रगुप्ताच्या काळात राजाने कायदे करावेत पण ते मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने आणि त्यांच्या सहमतीने अंमलात आणावे अशी पद्धत होती. ही पद्धत अशोकाच्या काळात बंद झाली असे दिसते. (याला अशोकाला आलेले वैयक्तिक अनुभवही तात्कालिक कारण झालेले असू शकतात असे वाटते. उदा. अशोकवंदनेत मंत्र्यांनी अशोकाने बौद्ध गुरूकडे जावे, का बौद्ध भिक्षूने त्याच्याकडे यावे, त्याला आधी नमस्कार करावा का नाही अशा प्रकारचे प्रोटोकॉल लावण्याचा प्रयत्न केला असे दिसते. अशोकवंदनेतील बर्‍याच गोष्टी कपोलकल्पित आहेत पण मंत्र्यांनी असे वर्तनावर ठेवलेले अंकुश त्याला नको झाले असू शकतात असे समजण्यास जागा आहे.) आधीच्या सहकार्‍यांना (किंवा मंत्र्यांना) बाजूला सारून त्याने वेगळे प्रभावशाली सहकारी हाताशी धरले असावेत. धम्म महामात्रांच्या नवीन तयार केलेल्या अधिकारीपदाने हे नवीन प्रभाव दिसून येतात असेही धरता येऊ शकते असे वाटते. त्याचे धम्म महामात्र हे बौद्ध असावेत. आता मंत्रीमंडळाऐवजी धम्म महामात्र महत्त्वाचे झाले. अशोकाने कायदे करून धम्म महामात्रांना लोकांच्या थेट घरांत प्रवेश दिला. अशोकाने कामकाजासाठी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याची गरज संपवली असे चार्ल्स ड्रेकमायर यांच्या पुस्तकातही आले आहे.

म्हणून एकंदरीत अशोकाच्या राज्यकारभाराच्या पद्धतीचा दोन प्रकारे विचार करता येईल असे वाटते. आपल्याकडे अशोकाची प्रचलित प्रतिमा एक कल्याणकारी राजा अशी आहे- ज्याने ठरवून बौद्ध धर्म स्विकारला, सेक्युलर राज्यकारभाराची पद्धती स्विकारली, आणि वर्णभेद नष्ट करणार्‍या बौद्ध धर्माचा प्रसार केला. दुसरा थोडा विरोधी विचार म्हणजे (कदाचित बौद्ध धर्माने/धर्मगुरुंनी नियंत्रित केलेला आणि) नियंत्रक (कंट्रोलिंग) राजा ज्याने बौद्ध धर्माचा राज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, समाजाची घडी बसवण्यासाठी (आचारपद्धती ठरवून दिली, त्यावर देखरेख/निरीक्षण ठेवणारा अधिकारी वर्ग तयार केला), सत्तेवर नियंत्रण आणणार्‍या गटांचे महत्त्व कमी करण्यासाठी (जे ब्राह्मण असू शकतील) वापर केला, तसेच जनतेची राजाविरुद्ध जाण्याची शक्ती कमी केली आणि अशोकाचे राज्य वाटते तेवढे सेक्युलर नसावे असाही अर्थ काढता येऊ शकतो.

शूद्रांच्या अवस्थेत अशोकाने विशेष बदल करण्याचा प्रयत्न केला नाही असे स्विकारल्यास अशोकाची जी प्रतिमा उरते ती नियंत्रक, डोळ्यांत तेल घालून स्वतःचे राज्य सांभाळणारा पण प्रजा जोवर विशिष्ट चौकटीत वागते आहे तोवर तिचे रक्षण करणारा राजा असे वाटते. त्याच्याएवढी लष्करी क्षमता, राजकीय इच्छाशक्ती आणि नवीन कायदे राबवण्याचे सामर्थ्य असलेला इतर कोणी राजा भारतात बहुतेक आधी किंवा नंतरही होऊन गेला नसावा.

नक्की माहित नाही परंतु

नक्की माहित नाही परंतु अशोकाची पत्नी देवी ही बौद्ध व्यापार्‍याची कन्या होती असे कुठेसे वाचले होते. अशोका या शाहरुखपटातही ती बहुधा आधीपासूनच बौद्ध असल्याचे दाखवले आहे. यातला खरेखोटेपणा मला माहित नाही परंतु देवीची मुले महेंद्र आणि संघमित्रा असल्याचे म्हटले जाते. याचा अर्थ ती प्रमुख किंवा पट्टराणी असू शकेल आणि असे असल्यास तिचा अशोकावर प्रभाव (इन्फ्ल्युएन्स) असणे किंवा तिच्यामार्फत बौद्ध धर्मगुरूंशी संबंधितही असू शकतो. तरीही, त्याच्यावर धर्मगुरूचा पगडा वगैरे असेल असे वाटत नाही परंतु बौद्धधर्म स्वीकारणे ही त्याची भविष्यकालिन योजना आधीपासून तयारही असेल. चू. भू.द्या.घ्या.

मोगलीपुत्त तिस्स

मोगलीपुत्त तिस्स आणि उपगुप्त हे एकच व्यक्ती आहेत असा समज आहे.
या उपगुप्ताला भेटण्यासाठी अशोकाने बोलावले हे अशोकवंदनेत आले आहे. पण श्रीलंकेतील कथेत तिस्साचा संबंध अशोकाशी कसा आला आणि काय ह्याबद्दलची माहिती वरच्या थियोडोसियस राजाशी आश्चर्यकारक रित्या जुळते असे दिसते :-) उदा. थियोडोसियसला अँब्रोजने ७००० लोकांच्या दंगलीत झालेल्या मृत्यूच्या पापातून मुक्त करणे आणि उपगुप्त/मोगलीपुत्त तिस्साने अशोकाला संधीसाधूंना (लिटरली!) त्याच्या मंत्र्याने रागाच्या भरात मारल्याच्या पापातून मुक्त करणे ह्या अगदी एकसारख्या गोष्टी घडलेल्या दिसतात.. तिसर्‍या बौद्ध धम्म परिषदेआधीची ही कथा कलिंगयुद्धाखेरीज जी हिंसा झाली तिचे वेगळेच चित्र समोर आणते.

a href="http://books.google.com/books?id=Q6dOAAAAMAAJ&dq=Devi%20Asoka&pg=PA171&ci=47%2C185%2C790%2C623&source=bookclip">

अशोकाची पत्नी

माझ्या वाचनाप्रमाणे राजपुत्र असताना अशोकाला विदिशा (मध्य प्रदेशातील भिलसा या गावाजवळील भाग) येथील राज्यप्रमुख म्हणून नेमले गेले. तेथे त्याने एका श्रीमंत व्यापार्‍याच्या कन्येशी विवाह केला होता. हा व्यापारी बौद्ध होता का नाही या बद्दल कोठे वाचनात आलेले नाही. अशोकाचा पुत्र महेन्द्र हा याच विवाहसंबंधातून जन्मला होता. या विवाहाच्या वेळी अशोकाच्या मनात सम्राट बनण्याची अभिलाषा असली तरी तो पुढचा सम्राट बनणारच अशी खात्री त्यालाही देता आली नसती. त्यामुळे त्याने पुढे बौद्ध धर्म स्वीकारण्याशी या विवाहाचा संबंध जोडता येईल की नाही हे सांगणे कठिण आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

निया येथील लाकडी पाट्या

चित्रा ताईंनी निया येथील लाकडी पाट्यांचा आपल्या लेखात उल्लेख केला आहे. या निया जवळ असलेल्या खोतान राज्याचा, सम्राट अशोकाचे वंशज व बौद्ध धर्म यांच्याशी निकट संबंध होता असे दिसते.
लडाखच्या पूर्वेला असलेल्या अक्साईचिन या भारताच्या मालकीच्या परंतु चीनने बळकवलेल्या भूभागाच्या पूर्वेस कुनलुन पर्वतराजीचा भाग येतो. ही कुनलुन पर्वतराजी व तिच्या साधारण ईशान्येस असलेले टाकलामाकन हे वाळवंट यांच्या मध्ये खोतान या नावाचे एक विशाल मरूस्थल किंवा ओऍसिस आहे.
उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यावरून असे मानले जाते की सम्राट अशोकाचा एक पुत्र कुस्तन याने इ.स.पूर्व 240 मध्ये खोतान मध्ये आपली राजवट स्थापली होती. या कुस्तन राजाचा नातू विजयसंभव याने वैरोचन या बौद्ध पंडिताला खोतानला आमंत्रित करून खोतानमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचाराचे कार्य सुरू केले होते. इ.स.पूर्व 211 मध्ये खोतान मधील पहिला बौद्ध विहार व मठ स्थापला गेला. विजयसंभव राजाच्या अनेक पिढ्यांनी ( 56) खोतानवर राज्य केले. पुढे चिनी सेनानी बरोबरच्या लढाईत या राजवंशाचा पराभव झाला व चिनी राजाची सत्ता स्थापन झाली. बौद्ध धर्माच्या उत्कर्षाच्या कालात खोतान मध्ये मठ, मंदिरे, विहार व प्रार्थनागृहे या सारखी 4 हजाराहून अधिक धार्मिक स्थळे होती. 8व्या शतकापर्यंत खोतान मधील बौद्ध धर्माचा उत्कर्ष चालू होता. चिनी प्रवासी फा-शियान, शुएन-झांग यांनी खोतान बद्दल बारकाईने लिहून ठेवलेले आहे. ख़ोतान मधील धर्मपीठाच्या अंमलाखाली पूर्वेला असलेल्या निया, चेर्चेन, लाऊलान व काशगर या ठिकाणचे बौद्ध मठ होते. (यातल्या बहुतेक स्थानांवर ऑरेल स्टाईन यांनी उत्खनन केलेले आहे.)

सम्राट अशोक व बौद्ध धर्म यावर बरेच लिहिण्यासारखे आहे. .
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सम्राट अशोक व बौद्ध धर्म यावर बरेच लिहिण्यासारखे आहे. .

>सम्राट अशोक व बौद्ध धर्म यावर बरेच लिहिण्यासारखे आहे. .

जरूर लिहा. ह्या चर्चेतील अंत्यसंस्कारावरची चर्चा दुसरीकडे हलवल्याने येथे अशोकाबद्दल अधिक चर्चा करायला वाव आहे.

एक अजून दुवा - अंत्यसंस्काराबद्दल

This comment has been moved here.

 
^ वर