सम्राट अशोकाचा शिलालेख क्रमांक ४

सम्राट अशोक हा प्राचीन भारतात कल्याणकारी राज्यशासन मोजायचा मानदंडच होय. इतकेच नव्हे, तर प्रचंड क्षेत्र एका छत्राखाली आणणारा तो पहिला सम्राट होता. त्याचे साम्राज्य किती दूरदूरवर पसरले होते, त्याची साक्ष देणारे शिलालेख पूर्व-पश्चिमेकडे सुदूर सापडतात. शिलालेखांवरती सम्राटाची प्रशंसा अर्थातच अपेक्षित आहे. सम्राट कृतीमध्ये आदर्श असणार-नसणार, हे तर आलेच. परंतु अशा शिलालेखांमध्ये सम्राटाचे आदर्श काय होते, ते कळू शकते. अथवा वर्धिष्णू राज्यामधील प्रतिष्ठित लोकांच्या सम्राटाकडून काय अपेक्षा होत्या? त्याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते. ("आपण अमुक केले" असा डंका कधी फायद्याचा असणार आहे? लोकांना त्या अमुक बाबतीत स्वारस्य असेल तरच.)

अशोकाच्या शिलालेखांचे महत्त्व एका वेगळ्याच अभ्यासशाखेतही जाणवते. शिलालेखांचा प्राथमिक हेतू म्हणजे सुशिक्षित-साक्षरांना काही संदेश पोचवणे. अलंकारिक शैली असण्याचा हेतू दुय्यम. म्हणूनच प्राकृत भाषेच्या स्थानिक प्रकारांमध्ये लेखन झालेले दिसते. संशोधनासाठी ही साधनसामग्री अधिक "थेट" आहे. संस्कृत नाटकांमध्येही वेगवेगळ्या प्रकारची प्राकृत भाषा आपल्याला सापडते. परंतु त्यात लोकांच्या खर्‍याखुर्‍या वापरापेक्षा रूढ-अलंकारिक वापराचे संकेत होते. राजा-ब्राह्मण संस्कृतात बोलणार, उच्चवर्गीय स्त्रिया आणि राजा-ब्राह्मण सोडून अन्य पुरुष शौरसेनी प्राकृतात बोलणार, गाणी गाणार महाराष्ट्री प्राकृतात, शूद्र किंवा खलनायक बोलणार ते मागधी प्राकृतात. मग नायिका मगधातली असो, आणि शूद्र मध्यभारतातला असो - ती बोलणार शौरसेनी, तो बोलणार मागधी!

येथे संदर्भासाठी अशोकाच्या शिलालेख क्रमांक ४च्या दोन आवृत्ती देत आहे - गिरनार (गुजरात) आणि धौली (उडिसा). यांच्यात प्राकृत भाषा भिन्न दिसते. मला तरी सध्या प्राकृतापेक्षा संस्कृत कळायला सोपे जाते. (खरे तर असा खूप लोकांचा अनुभव आहे. संस्कृतात अधिक विपुल साहित्य उपलब्ध आहे, आणि पठन-पाठन परंपरा अव्याहत आहे. प्राकृत ही जरी मराठीला अधिक "जवळची" - खापरपणजी नव्हे तर आजी लागते - तरी प्राकृत समजायला जड जाते.) म्हणून प्राकृताबरोबर संस्कृत"छाया" दिलेली आहे. शिवाय मराठी भाषांतरही दिलेले आहे.

पाठ्य मला वुलनरच्या प्राकृत पाठ्यपुस्तकात मिळाले. (संदर्भ खाली दिलेला आहे.) मात्र छपाईत अनेक चुका असाव्या असे वाटते. शिवाय माझ्या संस्कृतछायेतही काही प्रामादिक प्रयोग आहेत. क्षमस्व.

गिरनार शिलालेख [पश्चिम भारतातले प्राकृत] धौली शिलालेख [पूर्व भारतातले प्राकृत] संस्कृत छाया मराठी
अतिकांतं अंतरं बहूनि वाससतानि वढितो एव प्राणारंभो विहिंसा च भूतानं ञातिसु असंप्रतिपत् ब्राह्मणस्रमणानं असंप्रतिपति । अतिकंतं अंतलं बहूनि वस सतानि वढिते व पानालंभे विहिसा च भूतानं नातिसु असंप्रतिपति समनबाभनेसु संपटिपति । अतिक्रान्तम् अन्तरंबहूनि वर्षशतानि वर्धितो एव प्राणारम्भो विहिंसा च भूतानां ज्ञातिषु असम्प्रतिपति ब्राह्मणश्रमणानां असंप्रतिपति: । गेल्या काळात शेकडो वर्षे प्राणहत्या, भूतमात्रांची हिंसा, ज्ञातींचा तसेच साधु(श्रमण)-ब्राह्मणांचा अ-सन्मान वाढतच चालला होता.
त अज देवानं प्रियस प्रियदसिनो राञो धंमचरणेन भेरीघोसो अहो धंमघोसो विमानदसणा च हस्तिदसणा अगिखंधानि च अञानि च दिव्यानि रूपानि च दसयित्पा जनं । से अज देवानं पियस पियदसिने लाजिने धंमचलनेन भेलिघोसं अहो धंमघोसं विमानदसनं हथीनि अगिकंधानि अंनानि च दिवियानि लूपानि दसयितु मुनिसानं । तद् अद्य देवानां प्रियस्य प्रियदर्शिनो राज्ञो धर्माचरणेन भेरीघोषो अभवत् धर्मघोषः, विमानदर्शनात् च हस्तिदर्शनात्, अग्निस्कंधानि च अन्यानि दिव्यानि रूपाणि च दर्शयित्वा जनम् । तेव्हा आज देवांच्या आवडत्या प्रियदर्शी राजाच्या धर्माचरणाने धर्माचा घोष नगार्‍याच्या घोषासारखा झाला. विमानदर्शन [विमान म्हणजे देवळाचे उत्तुंग शिखर असावे], हत्तीदर्शन, अग्नि-स्कंध आणि अन्य दिव्य रूपे लोकांना दाखवून (घोष झाला).
यारिसे बहूहि वाससतेहि न भूतपूवे तारिसे अज वढिते देवानं प्रियस प्रियदसिनो राञो धंमानुसस्टिया अनारंभो प्राणानं अविहिसा भूतानं ञातीनं संपटिपति (?संप्रतिपति) ब्राह्मणसमणानं संपटिपति (?संप्रतिपति) मातरि पितरि सुस्रुसा थैरसुस्रुसा । आदिसे बहूहि वससतेहि नो हूतपुलुवे तादिसे अज वढिते देवानं पियस पियदसिने लाजिने धंमानुसस्थिया अनालंभे पानानं अविहिसा भूतानं नातिसु संपटिपति समनबंभनेसु संपटिपति मातिपितुसुसूसा वुढसुसूसा । यादृशं बहूभि: वर्षशतै: न, तादृशं अद्य वर्धिता: देवानां प्रियस्य प्रियदर्शिनः राज्ञः धर्मानुशासनेन अनारम्भः प्राणानाम्, अविहिंसा भूतानां, ज्ञातीनां सम्प्रतिपति, ब्राह्मणश्रमणानां सम्प्रतिपति, मातरि-पितरि शुश्रूषा, स्थविर/वृद्धशुश्रूषा । जसे अनेक शेकडो वर्षांसाठी नव्हते, असे आज देवांना प्रिय प्रियदर्शी राजाच्या धर्मानुशासनामुळे वाढलेले आहे - प्राणांची हत्या नाही, भूतमात्राबाबत अहिंसा, ज्ञातींचा आदर, श्रमण-ब्राह्मणांचा आदर, मातापित्यांची शुश्रूषा, वृद्धांची शुश्रूषा.
एस अञे च बहुविधे धंमचरणे वढिते वढयिसति चेव देवानं प्रियो प्रियदसी राजा धंमचरणं इदं । एस अंने च बहुविधे धंमचलने वढिते वढयिसति चेव देवानं पिये पियदसी लाजा धंमचलनं इदं । एतानि अन्यानि च बहुविधानि धर्माचरणानि वर्धितानि, वर्धयिष्यति चैव देवानां प्रियः प्रियदर्शी राजा धर्माचरणम् इदम् । ही आणि बहुविध अन्य धर्माचरणे वाढलेली आहेत, आणि तसेच देवांना प्रिय प्रियदर्शी राजा हे धर्माचरण भविष्यातही वाढवेल.
पुत्रा च पोत्रा च प्रपोत्रा च देवानं प्रियस प्रियदसिनो राञो वढयिसंति इदं धंमचरणं आव संवटकपा । पुता पि च नतिपनति च देवानं पियस पियदसिने लाजिने पवढयिसंति येव धंमचलनं इमं आकपं । पुत्रा च पौत्रा च प्रपौत्रा च (नप्तृ-प्रनप्तारः च) देवानां प्रियस्य प्रियदर्शिनः [प्र]वर्धयिष्यन्ति [एव] इमं धर्माचरणं यावत् संवर्तकल्पात् [आ कल्पात्] । देवांना प्रिय प्रियदर्शी राजाचे पुत्र, नातू आणि पणतू कल्पांतापर्यंत हे धर्माचरण वाढवतील.
धंमम्हि सीलम्हि तिस्टंतो धंमं अनुसासिसंति । धंमसि सीलसि च चिठितु धंमं अनुसासिसंति । धर्मे शीले च तिष्ठन्तो धर्मम् अनुशासयिष्यन्ति । धर्मात आणि शीलात राहून धर्माचे अनुशासन करतील.
एस हि सेस्टे कंमे य धंमानुसासनं । एस हि सेठे कंमे या धंमानुसासना एतद् हि श्रेष्ठे कर्मणि यद् धर्मानुशासनम् । हे धर्मानुशासनच श्रेष्ठ कर्म होय.
धंमचरणे पि न भवति असीलस । त इमम्हि अथम्हि वधी (?वढी) अहीनी च साधु । धंमचलने पि च नो होति असीलस । से इमस अथस वढी अहीनी च साधु । धर्माचरणम् अपि न भवति अशीलस्य । तद् अस्य अर्थस्य वृद्धि: अहीना च साधु [च] । शील नसलेल्याकडून धर्माचरणसुद्धा होऊ शकत नाही. म्हणून या हेतूची वृद्धी हीन नाही, सुयोग्य आहे.
एताय अथाय इदं लेखापितं इमस अथस वढि युजंतु हीनि च मा लोचेतव्या । द्वादसवासाभिसितेन देवानं प्रियेन प्रियदशिना राञा इदं लेखापितं । एताये अठाये इयं लिखिते इमस अठस वढी युजंतू हीनि च मा लोचयिसू । दुवादसवसानि अभिसितस देवानं पियस पियदसिने लाजिने यं इध लिखिते । एतस्मै अर्थाय इदं लिखितम् [लेखयितम् - ?संस्कृत रूप चुकले असावे?] अस्य अर्थस्य वृध्यै युजन्तु हीना च मा द्रष्टव्या । द्वादशवर्षाभिषिक्तेन देवानां प्रियेण प्रियदर्सिना राज्ञा इदं लिखितम् । या कारणासाठी हे लिहविले आहे. या अर्थाच्या वृद्धीस जुटावे, हीन मानू नये. अभिषिक्त होऊन बारा वर्षे झालेल्या देवांना प्रिय प्रियदर्शी राजाने हे लिहविले आहे.

*लेखनात अशुद्ध/चुकलेली रूपे असल्यास सांगावे. खालील पहिल्या प्रतिसादात शुद्धिपत्र आहे, तिथे नोंद केली जाईल.
** प्राकृत मूलपाठ्याचा स्रोत : Alfred C. Woolner. Introduction to Prakrit. मूळ प्रकाशनाची दुसरी आवृत्ती १९२८, पुनर्मुद्रण : मोतिलाल बनारसीदास प्रकाशन, दिल्ली १९९९

Comments

शुद्धिपत्र

वरील लेखात अनेक शब्द अशुद्ध असण्याची शक्यता आहे. या प्रतिसादात शुद्धरूपे दिली जातील. कृपा करून या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये. चुका सापडल्यास खरडवहीत सांगावे, मग मला हा प्रतिसाद संपादित करून नोंद करता येईल.

देवानां प्रियः प्रियदर्शी

या अर्थाच्या वृद्धीस जुटावे, हीन मानू नये.

अशोकाच्या शिलालेखाचे भाषांतर दिल्याबद्दल धन्यवाद. शेवटच्या पंक्तींमध्ये (हे भाग तक्त्यानुसार का पाडले आहेत ते कळले नाही) राजाची प्रजेकडून अपेक्षा आहे परंतु ती न जुमानणार्‍यास होणार्‍या शिक्षेबद्दल शिलालेख काही सांगत नाही. यावरून, केवळ डंका पिटणे एवढाच उद्देश असावा का असे वाटते. असो.

अहिंसेचा पाठपुरावा करणारा अशोक अपराध्यांना देण्यात येणार्‍या शिक्षांच्या बाबत अहिंसक नव्हता असे ऐकून आहे; म्हणूनच राज्य टिकले. चू. भू. दे. घे.

सम्राट (चंड)अशोक

अहिंसेचा पाठपुरावा करणारा अशोक अपराध्यांना देण्यात येणार्‍या शिक्षांच्या बाबत अहिंसक नव्हता असे ऐकून आहे; म्हणूनच राज्य टिकले.

साधु, साधु!

सत्तेवर आल्यावर पहिली आठ-दहा वर्षे तो सतत युद्धमान होता.(इ.स.पू. २७५ ते इ.स.पू. २६५,कलिंगाचे युद्ध इ.स.पू. २६५, बौद्ध धर्म परिवर्तन - इ. स.पू. २६०)
अभिषेकानंतर १२ वर्षे म्हणजे हा शीलालेख इ.स.पू. २६३ सालचा असणार. तेव्हा तो बौद्ध नव्हता. म्हणून या शीलालेखात ब्राह्मण-श्रमणांच्या पंक्तीत बौद्ध भिक्खू दिसत नाहीत- असे वाटते.
चंड अशोकाचा दराराच इतका असावा (त्याच्या क्रूरकृत्यांची कहाणी अशोकवंदनेप्रमाणे अगदीच वेगळी आहे - 'चंडगिरिका' हे पात्र पहा)की कुणाची टाप होती त्या आज्ञा न मानण्याची?

पटले नाही

सत्तेवर आल्यावर पहिली आठ-दहा वर्षे तो सतत युद्धमान होता.(इ.स.पू. २७५ ते इ.स.पू. २६५,कलिंगाचे युद्ध इ.स.पू. २६५, बौद्ध धर्म परिवर्तन - इ. स.पू. २६०)
अभिषेकानंतर १२ वर्षे म्हणजे हा शीलालेख इ.स.पू. २६३ सालचा असणार. तेव्हा तो बौद्ध नव्हता. म्हणून या शीलालेखात ब्राह्मण-श्रमणांच्या पंक्तीत बौद्ध भिक्खू दिसत नाहीत- असे वाटते.

विकीवर सनावळ्या शोधल्या त्यात अशोकाचा राज्याभिषेक इ.स.पू.२७० असा आहे. त्यानंतर १२ वर्षे म्हणजे सुमारे इ.स.पू. २५८. अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारला इ.स.पू. २६० मध्ये म्हणजे हा शिलालेख आला तेव्हा अशोक बौद्धच होता असे वाटते.

गंमत म्हणजे अशोकाचा हा शिलालेख म्हणतो की त्याने बौद्ध धर्म इ.स.पू. २६४ मध्ये स्वीकारला. (सध्या मी गोंधळात आहे. पुन्हा वाचून प्रतिसाद बदलेन; पण मला वाटते की या शिलालेखाची निर्मिती करताना अशोक बौद्धच होता.)

श्रमण ही संज्ञा जैन आणि बौद्ध भिख्खू दोघांनाही वापरली जात होती ना(?)

फरक

मी विकिपिडिआवर वाचले की -२६४ नंतर कधीतरी त्याने स्वतःचा धर्म बदलला आणि -२६० मध्ये राज्याचा अधिकृत धर्म बदलला.

बरोबर

मी विकिपिडिआवर वाचले की -२६४ नंतर कधीतरी त्याने स्वतःचा धर्म बदलला आणि -२६० मध्ये राज्याचा अधिकृत धर्म बदलला.

तुम्ही म्हणता तसेच आहे.

अजून निश्चिती नाही.

सत्तेवर आल्यावर पहिली आठ-दहा वर्षे तो सतत युद्धमान होता.(इ.स.पू. २७५ ते इ.स.पू. २६५,कलिंगाचे युद्ध इ.स.पू. २६५, बौद्ध धर्म परिवर्तन - इ. स.पू. २६०)
अभिषेकानंतर १२ वर्षे म्हणजे हा शीलालेख इ.स.पू. २६३ सालचा असणार. तेव्हा तो बौद्ध नव्हता. म्हणून या शीलालेखात ब्राह्मण-श्रमणांच्या पंक्तीत बौद्ध भिक्खू दिसत नाहीत- असे वाटते.

-या वाक्यांबाबत "असे वाटते" असे म्हटलेले आहे.
विकीच्या सनावळ्या आणि इतर संस्थळावरील सनावळ्या यात थोडाफार फरक आहे. त्या कालाबद्दल अजूनही (माझीतरी )निश्चिती होत नाही. आणि वरील वाक्यांनंतर लिहीलेले वाक्य (दरार्‍यासंदर्भात) नक्कीच योग्य आहे असे वाटते. कारण असे समजले की त्याने उल्लिखित शीलालेख खरोखरच बौद्ध धर्म स्वीकारून शांततेचा मार्ग स्वीकारला असेल तरी जनतेच्या मनात त्या काळात (एक दोन वर्षे इतक्या कमी वेळात)त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल खात्री पटली असेल असे वाटत नाही.कदाचित म्हणूनच आपण धर्मशील झालो आहोत, आपण हिंसा सोडली आहे असे जनतेस वारंवार जाहीर करण्यासाठी आणि तिचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने हे शीलालेख साम्राज्यात ठिकठिकाणी खोदवले असावेत. -असे वाटते.;)

तसे नसावे

प्राणांची हत्या नाही, भूतमात्राबाबत अहिंसा, ज्ञातींचा आदर, श्रमण-ब्राह्मणांचा आदर, मातापित्यांची शुश्रूषा, वृद्धांची शुश्रूषा.

अशोकाचे राज्य प्रामुख्याने बौद्ध असले तरी श्रमण (जैन) आणि ब्राह्मणांना त्रास देणारे ठरू नये/नाही हे स्पष्ट करण्यासाठी हे उल्लेख असावेत. सत्ता अशोकाच्या मुलांकडेच राहील असेही दिसते. पणा त्यासाठी त्याच्या नंतरच्या पिढ्यांनी वरील आदर्शांचे आचरण करावे अशी अपेक्षा असावी किंवा जाहिरात असावी.

मला आठवते त्याप्रमाणे अशोकाचे शिलालेख अशा ठिकाणी आहेत की ज्या अशोकाच्या राज्यातील दळणवळणाचे मुख्य रस्ते आणि सीमा असाव्यात. सीमेवरील लोकांना, प्रवाशांना अशोकाच्या राज्यविषयक धोरणांची माहिती व्हावी (थोडी जाहिरात, थोडा विश्वास, आणि थोडा धोरणीपणा) असे हेतू दिसतात.

वेगळा विषय

अभिजात संस्कृत भाषा ही ज्या एका विशिष्ठ वेदकालीन बोलीवरून "घडवण्यात" आली, बहुधा त्याच बोलीतून शौरसेनी जन्माला आली. गंगा-यमुनेचे खोरे हे तिचे जन्मस्थान. मागधी बोली ही आजच्या बिहार परिसरात बोलली जाणारी. शौरसेनी आणि मागधी यांच्यात उच्चार पद्धतीखेरीज फारसा फरक नाही. दुर्दैवाने निर्जीव शिलालेखातून आपल्याला उच्चार पद्धती समजत नाहीत (नक्की आघात कोठे होता).

शेवटचे व्यंज्यन गाळण्याच्या महाराष्ट्रीच्या वैशिष्ठ्यामुळे बहुधा तिच्यावर "गाणे गाण्यास योग्य" असा शिक्का पडला असावा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इतिहासात

शिलालेख नेमके कधी (जसे वरचा शीलालेख बाराव्या वर्धापनदीना निमित्त असावा??) व कशाकरता (कुठले नियम जनतेला कळावे) व कोणी (फक्त राजाच्या आदेशावरुन की ??) केले पाहीजे याचे काही नियम होते का?

हटके संदेश देणारे उदा. दोन् नेहमी युद्ध करणार्‍या राज्यांच्या वेशीवर असलेल्या गावात मालकी सांगणारे शिलालेख, किंवा प्रजेला उद्देशुन काही नियम, कधी खेळांच्या स्पर्धा झाल्या असतील आंतर राज्य इ .

असे काही रोचक शिलालेख सापडले आहेत?

अशोकाच्या कोरीव लेखांचे वर्गीकरण

अतिशय अभ्यासपूर्ण लेख. धन्यवाद.

इतिहासकारांनी अशोकाचे कोरीव लेख (इनस्क्रिप्शन) तीन वर्गांत विभागिले आहेत:

१. प्रमुख शिलालेख (मेजर रॉक ईडिक्ट)
प्रमुख शिलालेख सर्वसामान्य जनतेला उद्देशून होते. अशोकाची धोरणे, विशेषतः त्याच्या धम्माची शिकवण, जनतेपर्यंत पोचवणे हा त्यांचा हेतू होता. उदा. पहिल्या प्रमुख शिलालेखात प्राणीहत्या करू नये असा आदेश दिला आहे. आणि प्रियदर्शी अशोकाच्या स्वयंपाकघरात ह्यापूर्वी दररोज शेकडो पशूंची मांसासाठी कत्तल होत असे. पण प्रस्तुत शिलालेख लिहिताना फक्त तीनच प्राण्यांची (२ मोर आणि एक हरीण) हत्या झालेली आहे. भविष्यात मात्र हे ३ प्राणीही मारले जाणार नाहीत, अशी ग्वाहीदेखील हा शिलालेख देतो.

२. दुय्यम शिलालेख (मायनर रॉक ईडिक्ट)
दुय्यम शिलालेख हे बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी होते.

३. स्तंभलेख (पिलर ईडिक्ट)

स्रोत: रोमिला थापर ह्यांचे 'अशोक अँड दी डिक्लाइन ऑफ़ मोर्याज़'. इथे थापरबाईंनी केलेला प्रमुख शिलालेखांचा अनुवाद त्यांना श्रेय न देता दिलेला आहे. ह्या अनुवादात त्यांना प्राध्यापक ए. एल बाशम ह्यांनी मदत केली होती. दुव्यावरील इतर शिलालेखांचे अनुवाद तपासलेले नाहीत. तेदेखील थापरबाईँच्या पुस्तकातूनच उचललेले असावेत.

अपेक्षा

माझा भाषेचा अभ्यास नसल्याने संस्कृत - प्राकृत तुलना डोक्यावरून गेली. पण

वर्धिष्णू राज्यामधील प्रतिष्ठित लोकांच्या सम्राटाकडून काय अपेक्षा होत्या? त्याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते.

हे आवडलं. या कल्पनांवर अधिक प्रकाश टाकलेला आवडेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

व्हिक्टोरिया राणीचे घोषणापत्र

या घोषणापत्राचा काळ वेगळा आहे, काळानुसार संदर्भ वेगळे आहेत, पण काही ठळक बाबतीत सामांतर्यही दिसते आहे. मुख्यतः "टोन"मध्ये.
- - -
Queen Victoria's Proclamation
From Wikisource
Wikisource:Historical documents
Proclamation by the Queen in Council, to the princes, chiefs, and people of India
by Victoria of the United Kingdom
Delivered on November 1, 1858.
...
We hold ourselves bound to the natives of our Indian territories by the same obligations of duty which bind us to all our other subjects, and those obligations, by the blessings of Almighty God, we shall faithfully and conscientiously fulfill.

Firmly relying ourselves on the truth of Christianity, and acknowledging with gratitude the solace of religion, we disclaim alike the right and desire to impose our convictions on any of our subjects. We declare it to be our royal will and pleasure that none be in anywise favoured, none molested or disquieted, by reason of their religious faith or observances, but that all alike shall enjoy the equal and impartial protection of the law; and we do strictly charge and enjoin all those who may be in authority under us that they abstain from all interference with the religious belief or worship of any of our subjects on pain of our highest displeasure.

...

When, by the blessing of Providence, internal tranquility shall be restored, it is our earnest duty to stimulate the peaceful industry of India, to promote works of public utility and improvement, and to administer its government for the benefit of all our subjects resident therein. In their prosperity will be our strength; in their contentment our security, and in their gratitude our best reward. And may the God of all power grant to us, and to those in authority under us, strength to carry out our wishes for the good of our people.क्ष् (श्री. रिकामटेकडा यांना रोमन अक्षरे टंकण्याच्या "चीट"बद्दल धन्यवाद)

समान टोन पण कारणं वेगळी

दोन्ही घोषणापत्रांचा उद्देस्श सारखा दिसत असला तरीही हे घोषणापत्र काढण्यामागं राणीचा उद्देश वेगळा होता.
"नेटीव्हज्" आपाल्याला पुन्हा बम्कावु(१८५७) नये म्हणून, त्यांचा राग शांत करायला हे पत्रक काढलं होतं.
अशोकानं कुणालाही घाबरायची गरज नसावी असं वाटतं.

मूळ् लेख आणि प्रतिक्रिया (नेहमीप्रमाणेच)उत्तम आणी माहितीपूर्ण.

मन

वा!

रोचक माहिती. माहिती देण्यामागचे कष्ट जाणवतात.
धन्यवाद!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर