पुन्हा कर्मसिद्धान्त
कर्मफल सिद्धान्त (पुन्हा एकदा)
कर्मविपाक,कर्मफलसिद्धान्त हे शब्द जरी काही जणांना अपरिचित वाटत असले तरी हा सिद्धान्त बहुपरिचित आहे." हे कर्मभोग आहेत.यांतून सुटका नाही." "काय करणार? मागच्या जन्मी काही पाप घडले असेल हातून.त्याची फळे आता भोगतोय","या जन्मी तरी काही पुण्य कर. म्हणजे पुढच्या जन्मी सुख मिळेल" - असे शब्दप्रयोग अनेकजण करतात. दु:खाची गोष्ट अशी की पुनर्जन्म आहेच. या जन्मातील कृतकर्मांची फळे पुढच्या जन्मी भोगावीच लागतात. हें, त्यावर किंचितही विचार न करता ,अनेकजण खरेच मानतात. या सिद्धान्ताची गृहीतके अशी:
*प्रत्येक कृतकर्माचे फळ मिळतेच. ते कर्त्याला भोगावे लागते.
*सत्कर्माचे फळ चांगले म्हणजे कर्त्याला सुखदायक असते.
*दुष्कर्माचे फळ वाईट म्हणजे कर्त्याला दु:खदायक असते.
* केलेल्या कर्मांची फळे या जन्मी भोगून संपली नाहीत तर ते संचित होते.त्याची फळे पुढच्या जन्मात भोगावी लागतात.किंबहुना संचित भोगण्यासाठी पुनर्जन्म होतो.
*निष्कामकर्मयोग आचरल्यास कर्त्याला कृतकर्मांची फळे भोगावी लागत नाहीत.ती ईश्वरार्पण होतात.
*जगातील सर्व कर्त्यांच्या कर्मफलांचे आणि पुनर्जन्माचे नियमन परमात्मा करतो.
..
कर्मफलसिद्धान्ताची तत्त्वे कितीही योग्य, न्यायोचित असली, आपल्याला हवीहवीशी वाटत असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात ती खरी नसल्याचा अनुभव अनेकदा येतो
समजा एका मंत्र्याने भ्रष्टाचार करून गडगंज संपत्ती मिळवली.(या--म्हणजे मागच्या--वाक्यात समजा हा शब्द उगीच आपली एक पद्धत म्हणून वापरला आहे.) या अवैध संपत्तीतून त्याने भव्य बंगला बांधला.आलिशान गाड्या घेतल्या.आता तो सर्व सुखसोईंनी परिपूर्ण असे वैभवशाली,ऐश्वर्ययुक्त जीवन जगत आहे. हे सुखासीनतेचे आनंददायी फळ त्याच्या कोणत्या कर्माचे आहे? यासाठी लागलेला सर्व पैसा त्याने भ्रष्टाचारातून मिळवला आहे. म्हणजे हे त्याच्या दुष्कर्माचे फळ आहे, हे स्पष्ट आहे.ते उत्तम फळ तो या जन्मी सुखेनैव भोगतो आहे.हे उदाहरण अवास्तव नाही.सर्वपरिचित आहे. यावरून कर्मफलसिद्धान्त खोटा आहे हे दिसून येते.कारण दुष्कर्माचे सुखकारक फळ तो कर्ता (मंत्री) याच जन्मात भोगतो आहे.
कोणी म्हणतील गतजन्मी त्याने पुष्कळ पुण्यसंचय केला.म्हणून या जन्मी तो असे सुखद जीवन जगतो आहे.या जन्मी तो जी दुष्कर्मे करीत आहे त्याची फळे त्याला पुढच्या जन्मी भोगावी लागतीलच. (हे खोटे असल्याचे वरील वास्तव उदाहरणावरून स्पष्ट दिसते.) तरी पण विचार करावा. अशा पुण्यवान माणसाला या जन्मी भ्रष्टाचार करण्याची दुर्बुद्धी का व्हावी? येथे "अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम्।" या गीता वचनाची सांगड कशी घालायची? असे अनेक प्रश्न उद्भवतातच ना? अर्थात विचार केला तरच.नाहीतर धर्मग्रंथात आहे म्हणून नुसत्या माना डोलवायच्या असल्या तर प्रश्नच मिटला.
...
या कर्मफलसिद्धान्ताविषयी संवादरूपाने आणखी थोडा विचार करू.
...
"भाऊराव सर्वसाधारण आयुष्य जगले.त्यांनी काही सत्कर्मे केली.काही दुष्कर्मेही त्यांच्या हातून घडली. त्यामुळे पाप-पुण्याचा संचय झाला.आता त्यांचा पुनर्जन्म कोणत्या योनीत होईल?"
.
" ते निश्चितपणे सांगता येणार नाही.संचिताचे भोग आणि पुनर्जन्म यांचे नियंत्रण परमात्म्याकडे असते"
.
"त्यांचा पुनर्जन्म पक्षियोनीत होईल काय?"
.
"होऊ शकेल.चौर्याऐशी लक्ष योनी असतात असे म्हटले आहे."
.
"समजा भाऊरावांचा जन्म पक्षियोनीत झाला.बालपणी पालन-पोषण चांगले झाले. मोठेपणी, विपुल फळे आणि पाणी असलेल्या अरण्यात एका उंच वृक्षावर सुरक्षित ठिकाणी जागा मिळाली.घरटे केले.मादी मिळाली.पिल्लांना जन्म दिला.वाढवले. पुन्हा घरटे बांधले.मादी मिळाली. पिल्लांना जन्म दिला."
.
"हा भाऊरावांच्या पुण्यकृत्यांचा फलभोग आहे. पुण्यसंचय संपल्यावर दुष्कर्मांची दु:खदायक फळे भोगावीच लागतील.कारण पक्षाचा आत्मा भाऊरावांचा आहे."
.
"हो.एकदा पिल्लांना भरवत असता रानात अचानक वणवा लागला.पिल्ले तिथेच सोडून पक्षाला उडून जाणे भाग पडले.तो एका बागेत पेरूच्या झाडावर बसला.माळ्याने दगड मारला.पंख दुखावला. नीट उडता येईना.अन्न मिळेना. हे पूर्वजन्मीच्या पापाचे फळ.पण त्याच्या या जन्मीच्या क्रियमाणाचे म्हणजे केलेल्या कर्मांचे(घरटे बांधणे,पिल्लांना जन्म देणे इ.) काय?"
.
"काही कल्पना नाही.धर्मशास्त्रात या विषयी काही असेल असे वाटत नाही.काही वाचले ,ऐकले नाही."
.
"म्हणजे? असा काही विचार न करता तुम्ही कर्मफलसिद्धान्तावर श्रद्धा कशी ठेवता? "
.
"अहो,हा सिद्धान्त आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे. सर्वमान्य आहे.तो खरा असणारच. खरा मानलाच पाहिजे.त्यावर विचार कसला करायचा? श्रद्धा ठेवायची."
.
" श्रद्धा म्हटली की विचार खुंटलाच.श्रद्धाळू व्यक्ती विचार करत नाही हे खरे.श्रद्धा नसेल तर देव आणि धर्म यांचे अस्तित्वच संपुष्टात येईल.ते असो.
माझ्या मते माणसाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सजीवाला पाप-पुण्य,नीती-अनीती,सत्य-असत्य यांची जाणीव नसते.त्यांची कर्मे नैसर्गिक प्रेरणेने होतात.त्यांत सत्कर्म-दुष्कर्म नसते. त्यामुळे पाप-पुण्याचा संचय होत नसावा.कर्माचे जे काय फळ मिळायचे ते त्याच जन्मी मिळते.त्यामुळे भाऊरावांचे संचित पक्षाच्या जन्मी भोगून संपले तर पुनर्जन्माची आवश्यकता नाही.म्हणजे त्यांना मोक्ष मिळणार."
.
"पण त्या पक्षाचा पुनर्जन्म मनुष्य योनीत झाला तर हातून दुष्कर्मे घडू शकतील आणि पापसंचय वाढेल.त्याच्या फलभोगार्थ पुनर्जन्म घ्यावा लागेल."
.
"हे खरे. पण पुनर्जन्माचे नियंत्रण परमात्म्याकडे असते. पक्षाच्या जन्मी भाऊरावांचे संचित कमी झाले हे निश्चित. मनुष्यजन्म मिळाला तर ते वाढू शकेल.तसे होऊन एका आत्म्याचा मोक्ष लांबणीवर पडावा असे त्या परमात्म्याला का वाटावे ? आत्मा परमात्म्यातच तर विलीन होणार असतो. त्यामुळे अधिकाधिक प्राण्यांनी मुक्ती मिळवावी असाच त्या परमात्म्याला विचार असणार.त्यामुळे पक्षाचा पुनर्जन्म मानवेतर योनीत होईल हे अधिक संभवनीय वाटते."
.
"हे पटण्यासारखे आहे खरे."
.
"भाऊंच्या मृत्युनंतर त्यांच्या आत्म्याने पक्षाचे शरीर धारण केले.त्या जन्मात काही संचित भोगले.पूर्वसंचित कमी झाले.पक्षिजन्मातील क्रियमाण नैसर्गिक प्रेरणे अनुसार असल्याने पाप-पुण्याचे संचित वाढले नाही.मग समजा तो आत्मा सशाच्या योनीत जन्मला.त्या जन्मात पूर्वसंचितातील उर्वरित फळे भोगली.ससा काही सत्कृत्य-दुष्कृत्य करणार नाही.त्यामुळे कर्मफळांचा संचय होणार नाही.म्हणून सशाचा मृत्यू झाला की भाऊरावांचा आत्मा मुक्त होणार.म्हणजे त्याला मोक्ष मिळणार.हे उघड आहे."
.
"असे कसे? मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यजन्म,त्यातही नरजन्म हवा असे शास्त्रात म्हटले आहे."
.
"ते ठावूक आहे.पण माझ्या युक्तिवादात कुठे दोष असेल तर दाखवा. तुम्हाला मान्य असलेली धर्मशास्त्रातील तत्त्वेच गृहीतके म्हणून वापरली आहेत."
.
"मी प्रारंभापासून लक्षपूर्वक ऐकतो आहे..तशी चूक,दोष काही कुठे दिसत नाही.उलट मनुष्यजन्म मिळाला की पाप-पुण्याचे संचित वाढते आणि मोक्ष दूर जातो. तर मनुष्येतर योनीत जन्म झाला की संचित कमी होत होत शेवटी संपुष्टात येते. असा विपरीत निष्कर्ष कसा काय निघतो समजत नाही."
.
" तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही विपरीत निष्कर्ष निघतो. त्याचे कारण आपली गृहीतके चुकीची आहेत.आत्मा,पुनर्जन्म,स्वर्ग ,मोक्ष या संकल्पना तसेच कर्मफलसिद्धान्ताची तत्त्वे खरी नाहीत.त्यांत एकवाक्यता नाही.असत्य गृहीतके सत्य मानून त्या आधारे केलेल्या युक्तिवादातून असे विपरीत निष्कर्ष निघणारच. आणि तुमच्या धर्मशास्त्राचा बोजवारा वाजणारच."
.
"उपनिषदे,ब्रह्मसूत्रे,गीता यांत जे लिहिले आहे ते खरे असलेच पाहिजे. गीतेत तर साक्षात भगवंतांनी स्वमुखे सांगितले आहे ते खोटे कसे म्हणायचे?"
.
ग्रंथवचने प्रमाण मानून तुम्हाला या संकल्पना आणि तत्त्वे सत्य आहेत असे मानायचे असेल तर श्रद्धेच्या आधारे तुम्ही तसे म्हणू शकता.मग ही चर्चा विसरायची."माझी या धर्मवचनांवर श्रद्धा आहे" असे म्हटले की चर्चा संपते.युक्तिवाद ठप्प होतो.पण या श्रद्धेपोटी तुम्ही तुमच्या स्वत्वाला म्हणजे बुद्धीला आणि विचारशक्तीला दडपून ठेवता याची जाणीव असावी."
..............................................................................................
Comments
शंका
धार्मिक पापकृत्ये ही ऐहिक गुन्ह्यांपेक्षा वेगळी नसणे आवश्यक आहे काय?
? 'पुढल्या जन्मात न भोगावी लागल्याचे' वास्तव उदाहरण?
ज्योत नाही का मोठी होऊन विझत? टेंप्टेशन असते - कच्चे भक्त बहकतात!
हे कसे समजले?
तुम्ही कधी भिंगाने किडेमुंग्या जाळल्या नाहीत काय?
It is entirely possible that God exists and he is just a nasty bastard that likes to screw up people's lives. -- Michael Shermer
संचित हे नेहमी पापसंचितच असते असे का?
पुण्यसंचित खरचले (पक्षी जन्म ऐषाआरामाचा मिळून) गेले असेल तर?
शंकानिरसन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. निखिल जोशी विचारतात."धार्मिक पापकृत्ये ही ऐहिक गुन्ह्यांपेक्षा वेगळी नसणे आवश्यक आहे काय?"
या वाक्याचा अर्थ नीट समजला नाही. माझ्या मते ऐहिक गुन्हे म्हणजे दुष्कर्मेच होत.कायद्यात पळवाटा असतत हे खरे पण मूळ कायदे(विधी) नीतीला धरून असतात. म्हणून जे अवैध(बेकायदेशीर) ते अनैतिक अतएव पापमूलक.
..
या जन्मी तो जी दुष्कर्मे करीत आहे त्याची फळे त्याला पुढच्या जन्मी भोगावी लागतीलच. (हे खोटे असल्याचे वरील वास्तव उदाहरणावरून स्पष्ट दिसते.)
..
<? 'पुढल्या जन्मात न भोगावी लागल्याचे' वास्तव उदाहरण?
मुद्दा असा आहे की या जन्मी केलेल्या दुष्कर्माची( भ्रष्टाचाराची) सुखकारक,आनंददायक फळे तो या जन्मीच भोगतो आहे. हे उदाहरणात दाखवले आहे. यावरून कर्मफलसिद्धान्ताची तत्त्वे खोटी आहेत हे सिद्ध होते. त्यामुळे "या जन्मीच्या पापांची फळे पुढच्या जन्मी भोगावी लागतील " हे केवळ विशफुल थिंकिंग ठरते. असे म्हणायचे आहे.
..
जो पूर्वजन्मात सत्कृत्ये करतो त्याचा पुनर्जन्म "शुचीनां श्रीमतां गेहे" होतो.पुढे अनेक जन्मांत शुद्ध होत होत तो अंती परागतीला म्हणजे मोक्षाला जातो.असा समज आहे. दिलेल्या वास्तव उदाहरणामुळे या आध्यात्मिक समजाला छेद जातो.
..
em>संचित हे नेहमी पापसंचितच असते असे का?
नाही.लेखात असे कुठे म्हटलेले नाही.दुष्कर्मांचे भोग भोगायचे उरले तरी ते संचित.सत्कर्मांचे भोग पूर्ण झाले नाहीत तरी ते संचितच.जोवर संचित आहे तोवर पुनर्जन्म होत राहाणार. संचित संपले की मोक्ष.
खुलासा
ऐहिक सरकारने गुन्हा ठरविलेली कृत्ये आणि धर्मसंस्थेने पाप ठरविलेली कृत्ये वेगवेगळी असू शकतील. बालविवाह, सती, इ. धर्मात सांगितले असले तरी गुन्हे आहेत तर उलट, मांसाहार करणे, समुद्र ओलांडणे ही पापे असली तरी सरकारच्या लेखी गुन्हे नाहीत. मंत्री भ्रष्टाचारी आहे ही बाब चित्रगुप्ताच्या लेखी पाप असेलच असे नव्हे. मंत्र्याने कोठे सोन्याचा मुकुट दान केला असेल तर तो स्वर्गात जाऊही शकेल ना?
केवळ तितक्याच कारणाने ते नाकारणे मला पटले नाही.
आलेख मोनोटोनस नसून खालीवर होतच पुण्ण्याकडे जात असेल किंवा मोक्षाविषयीचा समज चुकीचा असूही शकेल. परंतु त्याने कर्मविपाक खोटे ठरू नये.
सत्कर्माचे भोग उरून पुण्ण्यसंचित जमले आणि पुढील जन्मात "काही संचित भोगले.पूर्वसंचित कमी झाले." असे घडले तर ती व्यक्ती मोक्षापासून दूर जाईल.
प्रयत्नाद्यतमानस्तु योगी
?? फल न्यायोचित असेल तर कर्मसिद्धांत चांगला असल्याची ही कबूली आहे काय? असे असल्यास केवळ भ्रष्ट जिवन जगणारे कसे आनंदात जगतात त्यामुळे हे न्यायोचित जगणे सोडून आपण पापकृत्ये करण्यास प्रवृत्त करत आहात काय?
आणि हो - "प्रयत्नाद्यतमानस्तु योगी" सोयिस्कर विसरलात की काय?
सिद्धान्तच खोटा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजूनकोणमी विचारतात," फल न्यायोचित असेल तर कर्मसिद्धांत चांगला असल्याची ही कबूली आहे काय? "
..
कर्मफलसिद्धान्ताची तत्त्वे न्यायोचित आहेतच.सर्वसामान्यांना खरी वाटावी म्हणून ती तशी बनवली आहेत.कर्मसिद्धान्त खरा असला तर किती चांगले होईल असे लोकांना वाटते म्हणून तो खराच आहे असे त्यांना भासते आणि ते श्रद्धा ठेवतात. एकदा कर्मफलसिद्धान्त खरा मानला की अन्याय या संकल्पनेला अस्तित्वच उरत नाही. माझ्यावर कोणी अन्याय करतो असे कोणी म्हणू शकत नाही. कारण प्रत्येकाच्या बाबतीत जे घडत असते ते त्याच्या संचिताचे फळ असते.मग अन्याय कसला?
...
आपले रक्षण करणारा,संकटातून तारणारा, नवसाला पावणारा असा कोणीतरी अलौकिक असेल तर किती चांगले होईल असे लोकांना वाटते. म्हणून ते देवावर श्रद्धा ठेवतात. देवकल्पनासुद्धा चांगली आहे. पण ती खोटी आहे.
..
तसेच प्रत्यक्षात पूर्वजन्म,पुनर्जन्म इ.सर्व कल्पना भ्रामक आहेत. कर्मफलसिद्धान्त खोटा आहे. त्यांची भलावण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
श्रद्धा एक समस्या
कर्मसिद्धांत एकापेक्षा अनेक जन्माशी निगडित असल्याने त्याचा खरे-खोटेपणा तर्कपातळीवर सिद्ध करणे शक्य नाही, त्यामुळे ही चर्चा 'कर्मसिद्धांत खरा/खोटा' ह्यापेक्षा 'श्रद्धा एक समस्या" ह्यावर व्हावी.
पूरक वाचन
अवांतरः उपक्रमवरील (थोडाफार दुर्लक्षित झालेला!) हा लेख पूरक वाचन म्हणून कृपया वाचावे.
कल्पना
वरील असे नाही पण इन जनरल, कल्पनेशिवाय मनुष्य जगू शकतो ही कल्पनाच भ्रामक नव्हे काय?
चुकीचा निष्कर्ष
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली लिहितातः
...
"कल्पनांचा त्याग करावा. कल्पना नकोतच.कल्पनांविना माणूस जगू शकतो" असे या लेखात कुठे म्हटले आहे? कुठे सुचवले आहे? तसा निष्कर्ष निघतो अशी वाक्ये कोणती?
कल्पनांना विरोध नाही. खोट्या भ्रामक कल्पना खर्या मानून त्याप्रमाणे आपले व्यवहार ,आपले आचरण ठेवणे योग्य नव्हे असे म्हटले आहे.पुनर्जन्म,कर्मफलसिद्धान्त अगदी खरेच आहेत असे लोक मानतात आणि तदनुसार आचरण करतात हे चुकीचे आहे.
कल्पना
कल्पना ही तात्पुरत्या काळासाठी का होईना पण खरी मानावी लागते. त्याशिवाय त्या कल्पनेशी समरस होणे शक्य नाही. पडद्यावर एक नट, नटीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या कल्पनेत समरस होऊन कथानकात गुंतून पडणे प्रेक्षकांकडून अपेक्षित असते. त्याचप्रमाणे कर्मसिद्धांत, पुनर्जन्म या कल्पना आहेत हे अनेकांना माहित असावे त्यामुळे कर्मसिद्धांताप्रमाणे आचरण आहे असे भासवणारे प्रत्यक्षात मंत्र्याप्रमाणे वेडेवाकडे उद्योग करतही असावे.
जगात कर्मफलसिद्धान्तानुसार आचरण करणारे फार कमी असावे. आपण चुकीचे वागतोय हे माहित असूनही ते आचरण बिनदिक्कत करणारे मंत्र्यासारखे लोक अधिक असावे.
उत्तम लेख!
यनावाला यांचा (नेहमीप्रमाणे) अजून एक उत्तम लेख!
भर घालण्या इतका अभ्यास नाही मात्र, पटला.. आवडला..
या निमित्ताने होणारी चर्चा वाचण्यास उत्सूक आहे
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
अरेरे
ह्याच विषयाच्या दुसर्या बाजूने तूफ्फान बॅटिंग करणारे गुंडोपंत् आज आपल्यात नाहित ह्याबद्दल वाईट वाटते.
अन्यथा पुन्हा एकदा तस्साच जोरदार सामना बघावयास मिळाला असता.
सारेच एकाच बाजूने बोलत असल्याने चर्चा रंगणार कशी?
असो. लेख चांगला आहेच.शंका नाही.
--मनोबा
संचित,प्रारब्ध आणि क्रियामान
आजच्या ढोबळ कर्मसिद्धांताचे मूळ मक्खली गोसाल (आत्म्याचा ८४लक्ष योनीतून दु:खद संचार - नंतर आपोआप मुक्ती) आणि मुख्यत्वे निगंठ(निर्ग्रंथ) नाथपुत्त यांच्या तत्त्वज्ञानात (पापक्षय आणि कर्मक्षय - निज्जरेथ) आहे.
जैन धर्माने (महावीर) हा नाथपुत्ताचा विचार पुढे चालवला आणि तपश्चर्येने एका जीवनातच सारे पाप धुवून टाकून मुक्ती मिळवता येते या मताचा पुरस्कार केला.
अजित केसकंबल याला चार्वाकवादी मानले तरी त्याला एका जन्मापुरता तरी आत्मा मान्य होता.
भग्वद्गीतेत सांख्यमताला (कोई मारता नही, कोई मरता नही) बरेच महत्त्व दिलेले आहे.
अन्यथा पुरातन वैदिक धर्मात असल्या मागच्या/पुढच्या जन्मांना थारा नव्हता. त्यांचे फक्त 'यज्ञ करा- स्वर्ग मिळवा' एवढेच म्हणणे होते.
बुद्ध गोतमाला मात्र यातील काहीच मान्य नव्हते (पुनर्जन्म नाही म्हणून चैन कर किंवा पुनर्जन्म आहे म्हणून तप कर).त्याचा मध्यममार्ग याच एका जीवनात संयमाने रहावे म्हणजे दु:खनिरोध होतो असे सांगतो. {हा संपूर्ण बुद्धीवादी मार्ग आहे. पण त्याकाळीच काय तर अजूनही (आमच्यासारख्या) सामान्य माणसांना अंगिकारणे अवघड जाते.}
हा कर्मविपाक सिद्धांत(?) आज कालबाह्य झाला असला तरी सर्वसामान्य बुद्धीच्या माणसांना अजूनही 'एथिकली' आणि 'मोरली' (नीतीने आणि न्यायाने) वागण्यासाठी एका छडीचे काम करतो.
अवांतर : मुळात श्रीमद्भग्वद्गीता कधी निर्माण झाली? गोतम बुद्धाच्या आधी की नंतर?
प्रा.कोसंबी यांचे मत
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
श्री.विसुनाना यांचा प्रश्न.
...
गीता ही गौतम बुद्धांनंतर रचली गेली असे मत प्रा.दामोदर धर्मानन्द कोसंबी यांनी मांडल्याचे वाचले आहे."ब्रह्मनिर्वाण" हा शब्द गीतेत आहे.तो बौद्ध साहित्यातील आहे. हा त्यांच्या अनेक मुद्द्यांतील एक. पण त्यांचे हे मत कोणी उचलून धरल्याचे फारसे वाचनात/ऐकिवात नाही.काही असले तरी गीतेचे अठरा अध्याय रणभूमीवर सांगितले असतील हे संभवनीय वाटत नाही हे खरे.
गीता
मी वाचलेल्या माहितीनुसार भगवद्गीता ही शंकराचार्यांनीच (इस आठवे शतक?) रचली + प्रसारली असावी. ती महाभारताचा भाग नाही असे वाटते. संशोधित आवृत्तीत गीता आहे काय?
नितिन थत्ते
बहुधा त्याआधी
बहुधा त्याआधी. त्यातील काही महत्त्वाचा भाग ब्रह्मसूत्राच्या नंतर रचला गेला असावा.
शंकराचार्य-काळापर्यंत (आधीच) आज उपलब्ध संस्करण तयार झालेले होते.
तत्त्वज्ञानासाठी एक प्रमाणग्रंथ म्हणून गीता वापरली जाण्याकरिता गीतेवरील शांकरभाष्याचे स्थान मोठे आहे.
कठिण आहे....
बुद्धाने सांगितलेल्या गोष्टिंना "मध्यममार्ग" म्हटले जाते; पण तो खरेच मध्यमवमार्ग आहे काय् ह्याचा विचार व्हावा.
यम/नियम् ,अष्टांग योग असे सर्व काही त्याने सांगितले आहे. ते एक प्रकारचे तपाचरणच नाही काय?
कित्येक भिख्खू संसार करायच्या वयात एकाएकी संन्यास घेउन अलिप्त वृत्तीने राहतात/रहायचा प्रयत्न करतात/करायचे.
तरुणपणीच संन्यास घेणे म्हणजे मध्यममार्ग कसा? आहे त्याच संसारात योग्य ते करीत राहणे म्हणजे मध्यममार्ग नव्हे काय?
प्रामाणिक शंका आहेत, म्हणून् विचारतो आहे.
--मनोबा
बुध्दाचा मध्यममार्ग
सध्या डॉ. आ. ह. साळुंखे यांचे सर्वोत्तम भूमीपुत्र - गोतम बुध्द हे पुस्तक वाचतो आहे. यापैकी काही प्रश्नांची चर्चा त्यात नक्कीच आहे. कर्मयोगाबाबतच्या भागापर्यंत अजून वाचले नाही. पण तरी एवढे नक्की, की बुध्दाने सर्वांना भिख्खूच झाले पाहिजे असे नक्कीच सांगितले नाही. परंतु सर्व काळात समाजात जीवनाविषयी मूलभूत प्रश्न पडणारी माणसे असतात व ती अध्यात्मिक शोध घेऊ पाहतात. या अर्थाने सन्यास घेणार्यांसाठी बुध्दाने काही नियम व मार्गदर्शन केले आहेत. संन्यास घेणे हाच मुळात मध्यममार्ग नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी बुध्दाने सांगितलेले नियम मध्यममार्गाचे वाटत नाहीत. बुध्दाने संसारी माणसे, राजे यांच्यासाठीही कसे वागावे, कसे बोलावे, जीवन कसे जगावे हे सांगितले आहे, त्यास स्थूलमानाने मध्यममार्ग म्हणता येईल.
टीप: भरपूर संदर्भासहित, खूप माहिती मिळवून लिहिलेले साळुखे यांचे पुस्तक अभ्यासूंना आवडण्यासारखे आहे.
-स्वधर्म
कम्युनिस्ट, आरएसएस् आणि भिक्खुसंघ
- हे फक्त भिक्खुंपुरते मर्यादित आहे. बाकीच्या सर्वसाधारण समाजाला गोतमाने मध्यममार्गच सांगितलेला आहे - अनंत फंदींच्या शब्दात : "बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको , संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको.."
अवांतर :
तसे पाहिले तर कम्युनिस्ट, आरसेस् (रास्वसंघ) आणि गोतमाचे भिक्खुसंघ यांच्यात फारसे अंतर नाही.
कोणत्याही मतप्रणालीचा प्रचार करण्यासाठी अत्यंत नि:स्पृह, अहंभाव विसरून तळागाळात काम करणारे कार्यकर्ते (केडर) लागतात.
हे संघाच्या भाषेतले संघ प्रचारक किंवा गोतमाचे भिक्खु - एका ध्येयाने प्रेरीत होऊन (कदाचित आंधळ्या विश्वासाने) आपल्या संघाने दिलेले काम पार पाडत असतात.
त्यांच्यासाठी असलेले यम/नियम (उदा. जन्मभर अविवाहीत रहाण्याचे व्रत, एका गावात एकाच भिक्खुने/प्रचारकाने रहाणे, भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करणे इ.) त्या मतप्रणालीत सामिल होणार्या सामान्यांसाठी नसतात.
भिक्खु किंवा प्रचारक कधीच झुंडीने लोकांमध्ये जात नाहीत. ते एकत्र येतात ते केवळ त्यांच्या शिक्षणासाठी भरलेल्या वर्गांवेळी.
ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्या गणवेशामुळे त्यांची संख्या नजरेत भरते आणि ते एकत्र नसतात तेव्हा ते सर्वत्र तितक्याच मोठ्या संख्येने पसरलेले आहेत असा समज होतो. त्याचा समाजावर योग्य तो मानसिक परिणाम होतो.
म्हणूनच बौद्ध धर्माची तिसरी घोषणा आहे - 'संघं शरणं गच्छामि' |
संघं सरणं
या वाक्याची इतकी विनोदी 'फोड' ऐकून हताहत झालो आहे..
एकवेळ प्रेग्नंट् शीमेल मिळेल, पण कम्युनिस्ट बौद्ध् संघिष्ट ही व्यक्ती असू शकते असला कल्पनाविलास फक्त तर्कदुष्ट संघिष्टच करू शकतात.
-सर्वत्र तितक्याच संख्येने पसरलेला. आडकित्ता
समजले नाही
एकतर तुमचा हा प्रतिसाद मला समजलेला नाही किंवा माझा ('संघं शरणं' ) प्रतिसाद तुमच्या मनात काही गैरसमज निर्माण करता झाला आहे.
म्हणूनच बौद्ध धर्माची तिसरी घोषणा आहे - "संघं शरणं गच्छामि" या माझ्या वाक्याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ असा -
बुद्धं सरणं - तो तर संस्थापकच , धम्मं सरणं - विचारप्रणालीवर नो अपील. पण संघं सरणं अशी वेगळी घोषणा का? तर -
कोणतीही विचारप्रणाली लोकांमध्ये रुजवायची असेल तर त्या मतप्रणालीचा प्रचार करणार्या प्रचारकांबद्दलही हेतुपुरस्सर एक आदरभाव निर्माण केला जातो - ते सन्मान्य आहेत, पूजनीय आहेत, आदरणीय आहेत वगैरे वगैरे. ते जसे आहेत तसेच त्यांना स्विकारा, त्यांना शरण जा. संस्थापक उपस्थित नसेल तर त्याच्याइतकेच संघटनेला माना - अशा रितीने विचारप्रणाली मजबूत करता येते.
मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरे आहे.
उत्तराबद्दल धन्यवाद्!
(चष्मा* काढून ठेवण्यात आला आहे अशी नोंद करतो.) माझ्या मनातील आपल्या या वरील प्रतिसादाबद्दलचा गैरसमज दूर झाला आहे.
ब्रेनवॉशिंग
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पुनर्जन्म,कर्मविपाक,इ.ईश्वरनिर्मित आहेत या समजामुळे अस्पृश्यांचे किती ब्रेनवॉशिंग झाले होते याचा नमुना म्हणून संत चोखामेळा यांचे दोन अभंग:
१)मज दूर दूर हो म्हणती। तुझी भेटी कवण्या रीती।
माझा लागताची कर। सिंतोडा घेती अंगावर।
माझ्या गोविंदा गोपाळा। करुणा भाकी चोखामेळा॥
दर्शनाची ओढ लागली आहे.पण दर्शन शक्य नाही. हिडीस फिडीस करतात.माझा स्पर्श झाल्यास अंगावर पाणी शिंपडून घेतात.या अवहेलनेचे दु:ख आहे.
..
२)शुद्ध चोखामेळा करी नामाचा सोहळा।
मी हीनयाती महार पूर्वी नीळाचा अवतार।
कृष्णनिंदा घडली होती म्हणुनी महार जन्मजाती।
चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ॥
या अन्यायाचे मूळ समाजव्यवस्थेत आहे असे त्यांना वाटत नाही.पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून महारजातीत जन्मलो.असा त्यांचा दृढ समज आहे.माझ्याच कर्माची फळे मी भोगत आहे मग अन्याय कसला?
कसला नीळाचा अवतार आणि कसली कृष्णनिंदा! धर्माच्या नावावर काही खपवायचे झाले!
.