जनम जनम के फेरे

माणूस मृत्युपश्चात अनेक कामना, आशा, आकांक्षा, भावना, वासना, जबाबदा‍र्‍या मागे ठेवून जातो. त्याच्यामागे राहणारे सगेसोयरे त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे त्या जवळच्या माणसाच्या कायम वियोगाची ही कल्पना सहजासहजी सहन होणारी नसते. म्हणूनच भारतीय परंपरेनी याची सोय पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांच्या आधारे केली आहे. आपली परंपरा, आपल्या धर्मकल्पना ठामपणाने आत्मा मानतात. आत्मा अविनाशी असतो, शस्त्राने न मारला जाणारा, पावसाने न भिजणारा, अग्नीने न पोळणारा असा तो असतो. ही परंपरागत भावना आपल्या मनात पक्की रुजलेली आहे. याचबरोबर 84 लक्ष योनींचा जन्म-मृत्यूचा फेरा जोडीला आहेच. हा फेरा छेदून स्वर्गात जाणारे पुण्यात्मे वा नरकात जाणारे पापात्मे वा परमेश्वराच्या सानिध्यात जाण्यासाठी मोक्ष मिळविणारे यांची संख्या फारच थोडी असणार. इतर मात्र या जनम जनम के फेरेमध्ये अडकतात. हा फेरा मानण्यासाठी पुनर्जन्म मानल्यावाचून गत्यंतर नाही.

मृतव्यक्तीचा आत्मा मागे राहून तो काही काळाने प्रगट होतो हे मान्य केल्यास काही प्रश्न विचारावेसे वाटतात. मधल्या काळात हे आत्मे कोठे राहतात? हवेत भटकतात की वेताळाच्या टेकडीवर? वाढत्या जनसंख्येसाठी लागणार्‍या आत्म्यांचा पुरवठा कोण करतो? त्याचा काही ठराविक कोटा असतो का? आत्म्याला पुनर्जन्म मिळत असल्यास कोणत्या आधारावर? कुठल्या आत्म्यानी कोठे जावे हो कोण ठरवतो? या व अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर म्हणून पूर्वसंचित व कर्मविपाक सिद्धात पुढे आले असावेत. या जन्मीचा पाप-पुण्याचा हिशेब होणार, त्याआधारे कुठल्या योनीत पुनर्जन्म येणार की स्वर्ग, नरक वा मोक्ष हे ठरणार. हीच पुनर्जन्माची कल्पना या जगातील विषमतेचे समर्थन करणार, चातुर्वर्ण्याला मान्यता देणार, स्त्रियांवरील अत्याचाराला क्षुल्लक ठरविणार, दैववाद बळकट करणार, प्रारब्ध माथी मारून माणसांना निष्क्रीय करणार. मुळातच आत्मा म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये कोणती? याचे विवेकी विश्लेषण उपलब्ध नाही. फक्त कल्पनाशक्तीच्या जोरावर पुनर्जन्माची संकल्पना गेली शेकडो वर्षे टिकून आहे. हे फक्त हिंदू धर्मात नव्हे तर भारतात उगम पावलेल्या इतर धर्मातसुद्धा आहे.

भारतात उगम पावलेले हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्म व पश्चिम आशियातील पारसी, ज्यू, ख्रिश्चन व इस्लाम हे आठ धर्म जगभर पसरलेले आहेत. हेच आठ धर्म जगातील बहुतांश लोकसंख्येच्या आध्यात्मिक आचार-विचारांचे नियंत्रण करतात. गंमत म्हणजे मानवी जीवनातील या सर्व धर्मामध्ये आत्मा व मृत्युनंतरचे जीवनसातत्य या बाबी अवश्य व काही अंशी समान आहेत. हे सगळे आठही धर्म मानवी जीवन सुखसमाधानाने जगण्यासाठी नियमन केल्याचे दावे करत असतात. विशेषत: मृत्युनंतरचे 'जीवन' दीर्घतम असल्यामुळे त्याला धर्मामध्ये महत्वाचे स्थान आहे. मृत्युनंतरचे जीवन म्हणजे स्वर्ग, नरक, मुक्ती, मोक्ष. जे मेल्याशिवाय दिसत नाही. जीवनसातत्यासाठी मृत्यूने नष्ट होत नाही अशी काही तरी वस्तू हवी आणि अशी ही अमर वस्तू आहे 'आत्मा'. ऐहिक सुख दु:खासाठी शरीर व मन व मृत्युनंतरच्या जीवनासाठी आत्मा अशी ही विभागणी आहे. म्हणूनच हा आत्मा आठही धर्मात आहे; अगदी ईश्वर नाकारणार्‍या बौद्ध व जैन धर्मातही. हिंदू, बौद्ध, जैन व शीख धर्मात पुनर्जन्म आहे व इतर धर्मात त्याऐवजी सैतानाचे अस्तित्व गृहित धरले जात आहे.

जगात असलेल्या अपरिमित दु:खाच्या उत्तरदायित्वातून परमेश्वराला मोकळे करण्यासाठी भारतात उगम पावलेल्या या चारी धर्मांनी अत्यंत धूर्तपणे पुनर्जन्म या संकल्पनांचा घाट घातला आहे. सर्वांची दु:खे ज्याच्या त्याच्या पूर्वजन्मीच्या पापाची फळे आहेत असे म्हटल्यावर ईश्वराला दोषमुक्त करण्यास आस्तिक मोकळे. कर्मफळ व पुनर्जन्म या दोन सिद्धांतामुळे पुष्कळच स्पष्टीकरण मिळू लागतात. कर्मफल हा स्वयंचलित नियम आहे; या नियमाप्रमाणे प्रत्येक मनुष्य (व इतर प्राणीमात्रसुद्धा!) आपापल्या चांगल्या - वाईट कर्मांची फळे याजन्मात किंवा पुढील जन्मात भोगतो; परमेश्वर निष्पक्षपाती असून या नियमात ढवळा ढवळ करत नाही; कुणाला उगाच पाप पुण्य देत नाही, किंवा कुणाचे घेत नाही. त्याच्यावर श्रद्धा ठेवल्यामुळे फार फार तर दु:खाचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल वा दु:ख सहन करण्याची ताकद वाढू शकेल वा मानसिक समाधान मिळेल. (व हेसुद्धा तुमच्या पापपुण्याच्या हिशेबानुसारच घडेल.) त्यामुळे नैसर्गिक आपत्ती, बालमृत्यू, अकाली मृत्यू, दारिद्र्य, रोगराई इत्यादीसाठी ईश्वराला वेठीस धरण्याचे कारण नाही.

आत्मा, पुनर्जन्म वा सैतान इत्यादी सर्वच केवळ कपोल कल्पित गोष्टी आहेत असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. भूलोकी मृत्यू आहे म्हणून अमर आत्म्याची कल्पना; सर्वत्र अन्याय, विषमता आहे म्हणून पुनर्जन्म, सैतान, निवाड्याचा दिवस या कल्पना. या सर्व कल्पना विसंगत व परस्पर विरोधीसुद्धा आहेत. पुनर्जन्माला किंवा कुठल्याही स्वरूपातील जीवनसातत्याला कुठलाही तार्किक आधार नाही. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे अधून मधून जिवंत 'पुरावे' सादर करत असतात. अमुक अमुक मुलीला पूर्वजन्मातील एकूण एक गोष्टी आठवतात म्हणून डांगोरा पिटला जातो. परंतु या मंडळीना एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्या धर्मशास्त्रानुसार मृत मनुष्य माणसाच्याच जन्माला येईल याची खात्री नसते. त्याने/तिने केलेल्या पापपुण्यनुसार 84 लक्ष योनींपैकी कोणताही जन्म लाभू शकतो. मग या गतजन्माच्या बातमीतील माणसं कोणी मी मागल्या जन्मी डुक्कर किंवा गांडूळ होतो असे का बरे सांगत नाहीत?

चार्वाक दर्शन सोडले तर सर्व भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धांत स्वीकारला आहे. त्याचे विवरणही थोड्याफार फरकाने सर्वांनी सारखे केले आहे. आपल्या या जन्मातील बर्‍यावाईट कर्मांची भलीबुरी फळे आपल्याला मरणोत्तर मिळतात, हे मत अन्य धर्मातही आढळते. परंतु यासाठीचा भारतीयांची कर्मसिद्धांताची कल्पना अन्यत्र कोठेही आढळत नाही. कर्म सिद्धांत हा वैश्विक नियम आहे, असे येथे मानले जात आहे. चांगल्या कर्मांना मधुर फळे आणि वाईट कर्मांना कटू फळे येतात. हे कोणा ईश्वराचे किंवा अन्य शक्तीचे कार्य नव्हे. तो श्रृष्टीच्या नैसर्गिक क्रमाचा भाग आहे, असे हिंदू धर्म मानतो. भौतिक जगात सर्वत्र लागू पडणारा कार्यकारणाचा अटळ सिद्धांत कर्माच्या सिद्धांतामध्ये मानसिक आणि नैतिक कृत्यांना लावण्याचा प्रयत्न यात केला आहे. परंतु हा सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर बनविलेला आहे असे म्हणता येणार नाही. अथवा प्रयोग करून त्या सिद्धांताचा पडताळा पाहता येईल असेही म्हणता येणार नाही.

कर्मसिद्धांताचे परिणाम फार दूरगामी आहेत. जीवांचे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे कर्मसिद्धांताचे उपसिद्धांत असावेत. आपल्याला भोगावी लागणारी सुखदु:खे आपण स्वकर्माने कमावलेली किंवा ओढवून घेतलेली असतात, असे कर्मसिद्धांताचे प्रतिपादन आहे. त्यामुळे कोणतेही कर्म करण्याआधीच जी सुखदु:खे भोगावी लागतात त्याची तार्किक सुसंगती लावण्यासाठी, तिच्यातून सुटण्याचा उपाय म्हणून पूर्वजन्म ही संकल्पना रूढ झाली असावी. त्यामुळे आपल्याला जन्मत:च येणारे सुखदु:खानुभव पूर्वजन्मीची फळे आहेत, असे म्हणणे तर्कशुद्ध वाटू लागते.

मुळात प्रत्येकाला त्याच्या कर्माची योग्य व न्याय फळ मिळाली पाहिजे ही एक रास्त मागणी असते. सत्कर्माबद्धल प्रशंसा, पारितोषक व दुष्कर्माबद्दल दंड व शिक्षा याची अपेक्षा असते. परंतु हे आपोआप, नैसर्गिकरित्या घडू शकत नाही. यावर उपाय म्हणून कर्मसिद्धांताचा प्रस्ताव पुढे आला असावा. मुळातच न्याय ही गोष्ट मानवनिर्मित आहे. त्यात नैसर्गिक असे काही नाही. न्याय - अन्याय या संकल्पना माणसांना जेव्हा समज आली तेव्हा अस्तित्वात आल्या. परंतु कर्मसिद्धांतात आपल्याला नेमके काय करावे व काय टाळावे याचा उल्लेख नाही. फक्त मोघमपणे सत्कर्म करण्याची व दुष्कर्म न करण्याची विधानं आहेत. सत्कर्म कोणती व त्या सत्कर्माची नेमकी फळे कोणती हे सांगितले जात नाही. त्यामुळे हा सिद्धांत अत्यंत अन्यायकारक आहे असे म्हणता येईल. अपराध्याला शिक्षा कोणत्या दुष्कृत्याबद्दल झाली आहे हेच जर त्याला कळले नसेल तर तो ते कसे काय टाळू शकणार?

कर्मसिद्धांतानुसार आपण केलेल्या कर्माची नैतिक दृष्ट्या योग्य किंवा उचित फळे मिळतात, असेही सांगितले जात असते. परंतु नीतीकल्पना आणि नैतिक नियम, स्थळ-काळ-सापेक्ष असल्यामुळे नेमके काही सांगता येत नाही. यात सदाचार म्हणजे कोणता आचार हेच माहित नसल्यामुळे मनुष्य गोंधळतो.

कर्मसिद्धांत उघडपणे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली सामाजिक अवस्था अत्यंत योग्य आहे अशी भलावण करू शकते. अन्यायकारक गोष्टींना नाहिसे करण्याची प्रेरणा नाहिशी करते. आपले दु:ख, वेदना, आपल्यावर होत असलेले अन्याय, अत्याचार यास आपण स्वत:च जबाबदार आहोत हे एकदा मान्य केले की तक्रार करता येत नाही. दु:ख, दारिद्र्य, दुष्टाचार, भ्रष्टाचार, इत्यादींना नावे ठेवता येत नाही. गैर मानता येत नाही. कारण हे सर्व पूर्वजन्मातील दुष्कृत्याची फळे ठरतात. असे करणार्‍यांना या जन्मी दंड शिक्षा करण्याचे कारण नाही. कारण पुढच्या जन्मी त्यांना या दुष्कृत्याची फळे भोगावी लागणार याबद्दल आपल्या मनात शंकाच नसते. म्हणूनच या तत्वज्ञानातून मानवाच्या हातातील उपक्रमशीलता, प्रयत्नशीलता हिरावून घेतल्या जातात व उरते ती फक्त उदासीन निष्क्रीयता.

आपल्या देशातील मागासलेपणाचे आणि अवनतीचे एक प्रमुख कारण कर्मसिद्धांत व पुनर्जन्म यावर असलेली आपल्या समाजाची नितांत श्रद्धा! दैववादी विचारसरणीचा इतका जबरदस्त पगडा भारतीय समाजमनावर आहे की गुलामापेक्षा काय, पशूपेक्षाही लाजिरवाणे जिणे पिढ्या न् पिढ्या जगत राहणार्‍या या माणसांच्या मेलेल्या मनामध्ये बंडाची आग कधीच लागणार नाही. पूर्वजन्मातील कर्मानुसार आपले आयुष्य जाणार, त्यात फेरफार करण्याचा आपल्याला हक्क नाही, हीच मानसिकता मूळ धरल्यामुळे हा जन्म सुखी कसा होईल हे पाहण्यापेक्षा, या जन्म मरणाच्या फेर्‍यातून कायमची सुटका कशी होईल, ते पाहण्यातच सर्व वेळ, श्रम खर्ची घातले जात आहेत. (त्याकरता सर्वात सोपा मार्ग म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत आकंठ बुडून जाणे!)

गतजन्मीचे भोग विनातक्रार भोगत राहणे हीच आपल्या आयुष्याची इतीकर्तव्यता असा जो समाज मानतो तो समाज अंधाराकडे जाणार हे मात्र नक्की!

संदर्भ:
भ्रम आणि निरास, डॉ. नरेंद्र दाभोलकर
ईश्वरविरहित जीवन, शरद बेडेकर
जरा शहाणे होऊ, डॉ. शरद अभ्यंकर
विवेकवाद, दि. य. देशपांडे
धर्मशास्त्राचा इतिहास, अनु: यशवंत आबाजी भट

लेखनविषय: दुवे:

Comments

व्वा !

अतिशय उत्तम लेख. झणझणीत अंजन !
वाचनातून कसा काय सुटला होता न कळे. या लेखाला काहीही प्रतिसाद मिळाले नाहीत, याचे आश्चर्य वाटते.

 
^ वर