श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव
www.jejuri,in च्या सहकार्याने
Martand Bhairav Shadratrotsav |
चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ।।
ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म ।
त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।
-- संत मध्वमुनीश्वर
श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव अर्थात चंपाषष्ठी उत्सव दिनांक २६/११/२०११ रोजी सुरु होत आहे. अश्विन महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या कुलस्वामिनी देवीचे नवरात्र असते, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये, कुलस्वामी खंडोबाचे षडःरात्र असते, बोलीभाषेमध्ये याला श्रीखंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. या उत्सवाविषयी "मार्तंड विजय" ग्रंथामध्ये पार्श्वभूमी सांगितली आहे ती थोडक्यात अशी 'उन्मत्त झालेल्या मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला व त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. त्यावेळी सप्तऋषींनी मार्तंड भैरवाच्या विजयासाठी प्रतिष्ठाण स्थापण केले व जसे जसे देवसेनेला विजय मिळू लागला त्या समयी स्थापित केलेल्या प्रतिष्ठाणवर विजयमाला चढू लागल्या, सहा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये सहाव्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त झाल्यानंतर प्रतिष्ठाण विसर्जित करण्यात आले. याच प्रतिष्ठाणचा विधी आपण षडःरात्रोत्सव स्वरूपामध्ये साजरा करीत असतो.
श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये षडःरात्रोत्सव कालावधीत विविध प्रकारच्या पूजा आणि कुलाचार केले जातात. यामध्ये
पंचामृत अभिषेक,
भंडारपुजा,
दहीभात पुजा,
वस्त्रालंकार पुजा,
पुष्पपुजा,
तैलस्नान (तेलवण)
जागरण, गोंधळ, लंगर,
नैवेद्य
आणि अन्नदान
Martand Bhairav Shadratrotsav |
दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी श्रीमार्तंड भैरव अवतार झाला, त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ( एक वेळ आहार, गोड आहार, तिखट आहार किंवा फलाहार ) आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, दिनांक २६/११/२०११रोजी
आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे. सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे. नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ताम्हणामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी.
मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी
रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा. फुलांची माळ तयार करून घटावर लावावी. शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी, आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे. मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे,
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी दिनांक २९/११/२०११ रोजी
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्हीसांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी दिनांक ३०/११/२०११ रोजी
चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.
देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी, चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलांची माळ लावावी.दिवटी प्रज्वलीत करून देवांना ओवाळावी. पुरणा - वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा. घटोत्थापन करून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळीभंडार करावा, उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे.
श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव, जेजुरी आणि श्रीखंडोबाविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
www.jejuri.in/kuldharma-kulachar#shadratr
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा.......
Comments
चुकुन
चुकुन षडयंत्रोत्सव असे वाचले.
नितिन थत्ते
चुकुन षडयंत्रोत्सव असे वाचले.
हा हा हा हा हा
अ: विसरला
रा आणि य मध्ये तसे खूप साम्य आहे.
Shadratrotsav हे स्पेलिंग करताना षडःमधला अ: विसरला गेला असे दिसते आहे.--वाचक्नवी
खंडोबा
खंडोबा हे आमचे कुलदैवत असल्याने चित्रात दाखवलेले 'टाक' यांची पुजा मी करीत असे. चंपाषष्ठी तर आमच्याकडे धार्मिक सणाचा अपरिहार्य भाग असायचा. तळीभंडार नंतर खोबर खायला मिळायचं. वाचल्यावर जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला.
प्रकाश घाटपांडे
लेख आवडला नाही.
लेख आवडला नाही. लेखातून संकेतस्थळाचे इटिकेट्स पाळले गेलेले नाहीत.
लेखा मागची मानसिकता देखील आवडली नाही. वाचकांना काहिशी घाबरवणारी व त्या बदल्यात मला शरण या! असे सांगणारी मानसिकता वाटली.
माहितीपर लेख लिहीताना,
'अमुक गोश्ट केली जाते.' अथवा 'तमुक गोश्ट करावी. असे मानले जाते.' अशी वाक्यरचना असायला हवी होती. ती तशी पुढील लेखात असेल अशी आशा आहे.
देवावर विश्वास ठेवणारा
सतीश रावले
भातुकलीचा खेळ
<आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे. सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे. नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ताम्हणामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी.>
हे (आणि अशा प्रकारचे अन्य) विधि आणि भातुकलीचा खेळ ह्यात काही फरक आहे काय?
षडःरात्रोत्सावाचा? 'षड्रात्र्युत्सवाचा' असे म्हणायचे असावे असे दिसते.
धागा सुरू करणार्या सदस्याने जो दुवा दिला आहे त्या पृष्ठावर सरळसरळ स्वत:चा व्यावसायिक प्रस्ताव, संपर्कासह, मांडलेला दिसतो. उपक्रमाच्या व्यासपीठाचा असा वापर नियमबाह्य नाही काय?
विधि आणि भातुकली
हा हा हा हा हा हा
लेखन आणि व्यवसाय
आपल्या व्यवसायाचे समर्थन करणार्या, आपल्या व्यवसायाची जाहिरात करणार्या लेखांना 'उपक्रमा' वर बंदी असावी असे वाटते. उद्या मी शिकवण्या घ्यायला लागलो आणि माझ्या शिकवणीला या, नाहीतर नापास व्हाल अशा आशयाचा लेख लिहिला तर तो संपादक मडळाने स्वीकारावा काय? बाकी हे सगळे विधी वाचून 'सीन् इट ऑल, डन इट ऑल' असे वाटले. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्या पाण्यात असली निरर्थक कर्मकांडांचीही धूप झाली आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा
लेखन आणि व्यवसाय
बन्दि असविच्!!!
का?
उपक्रमावर दिलेला लेख/चर्चाप्रस्ताव माहितीपूर्ण किंवा वैचारिक असावा असा संकेत आहे. जाहिरातीकडे झुकणारा धागा जर् अत्यंत माहितीपूर्ण असेल तर त्यालाही विरोधच करणार का?
उपक्रमावर ह्याबद्दल् स्पष्ट असे काही अजून दिसले नाही.
--मनोबा
तर्क कर्कश
हल्ली उपक्रमावरील प्रतिक्रिया तर्ककर्कश बनत चालल्या आहेत. केवळ पौराणिक माहिती म्हणुन याकडे तटस्थपणे बघता येते. प्रतिक्रिया न देण्याची मुभा आहेच. हा लेख म्हणजे जणुकाही मार्केटिंग चा गळ टाकला आहे व त्या जाळ्यात उपक्रमाचे (श्रद्धाळू? )वाचक अडकणार आहेत . त्यांची फसवणूक टाळणे हे आपले आद्य कर्तव्य आहे अशा थाटात प्रतिक्रिया वाटल्या.
खरे म्हणजे अरेरे किती अज्ञानी आपण? साध्या संस्कृतोत्भव संधी ग्रह/ विग्रह माहित नाही. मिष्टर, उपक्रमावर लिहिताय? ऐर्या गैर्या संकेतस्थळावर लिहित नाही आहात? इथले वाचक लेखक किती प्रगल्भ आहेत हे कळत नाही का आपल्याला? बरं बरं ठीक आहे आम्ही तुमचे लिखाण दुरुस्त करुन वाचतो. छोड दिया! हा नसलेल्या पांढर्या ठशातील न उमटलेला मजकूर माझ्या नजरेसमोर तरळून गेला.
उपक्रमावरील औनाड्य कधी येणार परत?
प्रकाश घाटपांडे
+१
केवळ पौराणिक माहिती म्हणुन याकडे तटस्थपणे बघता येते. प्रतिक्रिया न देण्याची मुभा आहेच.
असेच काहिसे समजून , वाइड बॉल म्हणून धागा फक्त वाचत होतो. आम्ही चिन्यांच्या, मध्यपूर्वेच्या,युरोपातील ख्रिस्तपूर्व मूर्तीपूजक पेगन धर्मांच्या लोककथा वाचतो तशाच ह्याही वाचू म्हटले. त्याने साधारण त्या समाजाची सद्य् मनःस्थिती व एकूण जडणघडण सम़जण्यास मदत तरी होते.
असो. पण "औनाड्या"चा धागा वाचण्यात आला आणि इथे यायचे पैसे वसूल झाले. उपाध्यांना त्याबद्दल पेश्शल थँक्स.
तर्ककर्कश्श असा शब्द अजून एका धाग्यावर आलाय, जिथे माझे प्रतिसाद बरेच आहेत्. तर्कशास्त्र व तार्किक गोष्टी ह्यात माझा कधीही हातखंडा वगैरे नव्हता, नाही. माझ्या प्रतिसादातूनही तर्क,वाद वगैरे आढळणार नाहित. हो, अनुभव्, उदाहरणे आहेत्, घडलेल्या गोष्टींनी आलेला वैतागसुद्धा आहे. पण वाद घालने अजून नीट शिकलेलो नाही.
तस्मात् तो आरोप माझ्यावर असेल तर नम्रपणे व ठामपणे नाकारत आहे.
--मनोबा
संस्कृतोत्भव ?
संस्कृतोद्भव. आणि ग्रह/विग्रह नसावे, फक्त संधि आणि विग्रह...वाचक्नवी
भिऊ नकोस.. मी तुझ्या पाठीशी आहे..
वाचकांना काहिशी घाबरवणारी व त्या बदल्यात मला शरण या! असे सांगणारी मानसिकता वाटली.
हा एक मार्ग आणि दुसरा
भिऊ नकोस.. मी तुझ्या पाठीशी आहे..
(तुझ्या पाठीशी आणि माझ्या पोटाशी)