आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष: एक "थैल्लर्ययुक्त" लेख

आमचा यापूर्वीचा लेख गांभीर्यपूर्ण असला तरी त्यात अनवधानाने पण उत्स्फूर्तपणे "थैल्लर्ययुक्त" हा शब्दप्रयोग आल्याने उगीच वाद निर्माण झाला. काही लोक तो वाचून चमत्कारले, तर आमच्या वैयाकरण तर्कगुरूंनी त्या शब्दाच्या व्याकरण-अशुद्धतेबद्दल आमची कानउघाडणी केली.
[टीपः तो शब्द व्याकरणशुद्ध आहे असे आमचे मुळीच म्हणणे नाही याची नोंद घ्यावी.]
अर्थात आम्ही ती फारशी मनावर घेतली नाही, मनात म्हटले "यांना काय माहीत हे आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष आहेत ते" आणि सोडून दिले.
मग विचार केला लोकांना तरी त्याच्या मागील बृहत्तर-चित्र ("बिगर पिक्चर") कसे कळणार. म्हणून हा लेख.
[आता हा लेख थैल्लर्यपूर्ण आहे, तो गांभीर्याने घेऊ नये ही विनंती.]

वीर सावरकर हे अष्टपैलू लेखक होते, ते सर्वकाळ फक्त देशभक्तिपर किंवा समाजप्रबोधनपर गंभीर लेखच लिहीत नसत. कधीकधी थोडाफार विनोदही त्यांना वर्ज्य नव्हता. त्यांनी जी अनेक नाटके लिहिली आहेत त्यापैकी एकात (नाव आठवत नाही) महात्मा गांधींचे विडंबन करणारे एक अतिसत्यवादी पात्र दाखवले आहे. आपल्या आश्रमात येणार्‍या भक्तांनी आत्यंतिक सत्याचरणी असावे असा त्या आचार्यांचा आग्रह. "तुझे नाव सोनूबाई असे खोटे चालणार नाही, सोन्याची आहेस का तू? तू ठेंगू आहेस हेच सत्य, ते दाखवणारे ठेंगूबाई हेच नाव आजपासून धारण कर. आणि तुझा तो मुलगा, त्याचे नाव आजपासून ठैंग्य". या रीतीने ठैंग्य व औंच्य (उंचबाईचा मुलगा) हे त्या गुरुजींचे दोन पट्टशिष्य. आयांवरून नावे का, कारण खरा बाप अमुकच आहे की नाही हे सत्य कळणे - निदान त्या काळी - अशक्य म्हणून.
आता दैवदुर्विलास असा की हे सावरकरांचे लिखाण मी पौगंडावस्थेत असताना माझ्या वाचनात आले आणि त्याचा चोखपणे प्रभाव पडला हे सांगायला नकोच.
पुढे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहासारख्या उनाडपणा करण्यासाठी सर्वथैव योग्य अशा जागी आम्ही दाखल झालो. एकदा माझ्या तोंडून उद्गार निघाले, "आज उंदर्‍याच्या तासाला भयानक बौर्य झाले." झाले! बोअर होण्यापासून उत्पन्न झालेला हा शब्द दोस्तांनी उचलून धरला व अशा शब्द-औनाड्याला (उनाडपणाला) सुरुवात झाली. एक "मोडक्या" मला नेहमी त्रास देत असे, त्याला मी एकदा म्हणालो, "अरे, आवर, आवर तुझे हे मौडक्य! मला ते अत्यंत त्रासदायक होत आहे" या वाक्याने तो इतका काही नामोहरम झाला व या प्रसंगाला इतकी प्रसिद्धी मिळाली की असे शब्द अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागले. आवश्यक-अनावश्यक, योग्य-अयोग्य, याचा काही विवेक न बाळगता जिथून तिथून असल्या शब्दांचे अनियंत्रित वारेमाप पीक येऊ लागले.
कटूपासून काटव काय, मोरूपासून मौरव काय, वाट्टेल ते शब्द उत्पन्न होऊ लागले, उदा. कोणी गेले तरी त्यांचे गैल्य झाले, एखाद्याचा चेहरा "लांब" झाला की त्याला "लौबल्य" आले, अशी भाषा म्हशीची शेपूट पिरगाळून वळल्यासारखी वळली जाऊ लागली.
अर्थात प्रत्येक फ्याडला मर्यादित आयुष्य असते त्याप्रमाणे कधीतरी हे बंद झाले असणार, पण मी तिथे असेपर्यंत तरी हा भाषाविस्तार अबाधित चालूच होता.

बिचार्‍या सावरकरांनी कल्पनाही केली नसेल की त्यांच्या चार ओळींचा असा विचित्र परिणामही होऊ शकेल.

तळटीपः मा. भगवानचा "अलबेला" हा चित्रपट दोन वेळ हिट्ट झाला: पहिल्यांदा आला तेव्हा व कित्येक वर्षांनी पुन्हा ७५-७६ च्या सुमाराला.
आमचा "हा" पिक्चर पुन्हा हिट्ट होईल अशी काही आशा नाही. याउप्पर मराठी भाषेचे काय व्हायचे असेल तसे होईलच म्हणा.

Comments

वाङमयकंड्व्य

आपल्या लेखाने लोकांचे ज्ञानपैपास्य वाढून वाङमय कंडव्याचे नैर्माण्य होईल्. त्याचे शैमन्य कसे करावे?आपले लैख्य वाचव्य असते
प्रकाश घाटपांडे

शाम्पू?

पुण्याचे अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे ज्याला आम्ही शा.अ.म.पु. - शाम्पू म्हणत होतो तेच का?

आम्ही एच ब्लॉक, सी ब्लॉक, एफ ब्लॉक व ई ब्लॉकचे रहिवाशी.

आता एच ब्लॉक मुलींना दिला आहे. आणि ब्लॉकची नावे जिजाऊ, पन्हाळगड वगैरे केली आहेत.

(शाम्पूवाला) योगेश.

अवांतरः शाम्पूवाल्या मुलींनी जिजाऊचा अर्थ "जि"ला बाहेर "जाऊ" देत नाहीत ती जिजाऊ असा केला आहे. :)


येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

एकमेवाद्वितीय सी.ओ.ई.पी.

हो. तेच ते.
पण आमच्या काळी "शासकीय" अशी शेंडी त्याच्या नावाला नव्हती.
ए, बी, सी या ब्लॉकांत मी राहिलो व व एच् क्लबात जेवलो. ए ब्लॉक वरून रस्त्याच्या पलीकडे "चिल्ड्रन्स् ऍकॅडमी" नावाची शाळा दिसत असे (पण त्या विषयावर यापेक्षा अधिक लिहिण्यासाठी औचित्याला सोडावे लागेल ते येथे नको).
"शाम्पू" त्याकाळी अज्ञात असले तरी आमचे प्राचार्य ग. पु. नगरकर होते त्यांना मागून लोक गंपू म्हणायचे.
- दिगम्भा

गौंप्य

गंपूंना कधी आदराने गौंप्य म्हणालात का?

दैगम्भ्य

दिगम्भा ला आम्ही (प्रथमपुरुषी एक वचनी आदरार्थी) आदराने(तसा आव आणून नव्हे बरं का?) दैगम्भ्य म्हणतो.
प्रकाश घाटपांडे

प्रैकाश्य सैहेब्य

प्रतिसाद आवडला.



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

दैगम्भ्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
'दैगम्भ्य' या शब्दाचा अर्थ "श्री.दिगम्भा यांच्याशी संबंधित,दिगम्भा यांचे ( लेखन इ.) असा होतो.

आणखी एक उरलेला अर्थ

"दैगम्भ्य" या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे
दिगम्भांचा मुलगा.
- दिगम्भा

ए ब्लॉक बी ब्लॉक

आम्ही प्रथम वर्षाला असताना हे ब्लॉक मुलींसाठी होते व एच ब्लॉक मुलांसाठी. आता ए-बी ब्लॉक मुलांना व एच ब्लॉक मुलींना दिला आहे असे कळते.

या ब्लॉकांच्या खिडक्यातून बाहेर आता कलासागर हे साड्यांचे दुकान व श्रीकल्प हे चहाचे दुकान दिसते.
कलासागर बद्दल अधिक बोलणे नको. पण तुमच्या लेखाने श्रीकल्प मध्ये मिळणारा मलईदांडू (मराठीत क्रीमरोल) व चहा, समोरच्या फूटपाथवरचा भुर्जीपाव, एफएक्स क्लबमधली ग्र्यांड फीष्ट, बोटक्लबवरचा बाबू आणि सामोसापाव, मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातला भलाथोरला बॉयलर, आणि ष्ट्युडंट सेक्शनमधले जोशी सगळे एकदम आठवले... :)



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

अभियांत्रि़की आणि भौतिकशास्त्र

अभियांत्रि़की आणि भौतिकशास्त्र यात फरक काय?

भौतिकशास्त्र
आरशावर पडणारे प्रकाशाचे किरण कुठल्या कोनातून परावर्तीत होतात त्याचा अभ्यास

अभियांत्रिकी
एफ किंवा जी ब्लॉक मधे उन्हाळ्यात , मागच्या रसवंतीवाल्याच्या चेहर्‍यावर आरशाचा कवडसा पाडून हव्या त्या रूममधे
उसाचा रस खोलीवर कसा मागवायचा याचा सराव.

(हे वाटते तितके सोपे नाही. कारण त्या गुर्‍हाळात बाकावर बसलेल्या, शेजारच्या चौकीतल्या स्त्री पोलीसाच्या चेहर्‍यावर कवडसा पडल्यावर विषय बदलून कायद्याचा श्रीगणेशा कसा सुरू होतो हे मी याची देही याची डोळा पाहिले आहे).

खर्ंच ! किती रम्य होते ते दिवस ! ( गोल चुईंगमची परीकथा , फिरोदिया )

हा हा :)

रेगाटा, पंट फॉर्मेशन, अभियंता म्यागझिन, ग्यादरिंग आणि हॉष्टेल सगळ्याच गोष्टी क्लास :))



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

दैगम्भ्य,

तुम्ही लैख्य छान्य लिहिला आहे, :)

आपलाच,
तातव्य!

योगायोग

तात्याला व मला एकाच वेळी दैगम्भ्य लिहावेसे वाटले हा योगायोग. तांत्रिकदृष्ट्या दोन मिनिटाचा फरक् आहे.

प्रकाश घाटपांडे

तारा जुळल्या

तातव्य आणि प्रैकाश्य यांच्या वारंवारता जुळतात..

आभ्यजित

ऐभिजित्य

असे हवे.

यौगेश्य...



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

द्या टाळ्य!

घाटपांडेसाहेब,

द्या टाळ्य! ;)

आज्य

आज्य काम्यात खौप्य कंटाळ्य आले होते. आपल्या लेख्याने वैरंगुळ्य लाभले.

चाणक्य?

'चाणक्य'चं चाणक्यच राहील ना? :)

हालक्य घ्याव्य! (= ह घ्या!)

आपला,
तातव्य!

चैणक्य

चैणक्य होऊ शकते..

ऐभ्यजित(भजी वगैरे वाटते)

छ्या बुवा!

छया बुवा दिगम्भा,

कुठली भाषा शोधून काढलीत ही? चुकून मी आत्ता आईला 'दूरदर्शन लाव' च्या ऐवजी 'दुर्दैव्यदार्शन्य लाव्य' असं म्हणालो! :))

बाय द वे, ही भाषा संस्कृतला फारच जवळची वाटते! त्यामुळे आम्ही सांस्कृत्य लवकर शिकू असे वाट्यं! ;)

तातव्य.

भाषा, कला आणि माहिती...

मराठीत तो विनोदाचा भाग का व्हावा? अहो, जिथे शिवराळ भाषा आणि शिवराळ लोक हे कलेचा एक मापदंड होउ शकतात तर जे उर्दूत चालते ते मराठीत विनोदाचा भाग काय, तर काहीही होउ शकते. उद्या येथे नग्न बारबालांची चित्रे सुद्धा माहितीपुर्ण आणि अभिजात छायाचित्रण कलेचा एक उत्तम नमुना म्हणून चमकतील. उपक्रमरावांना ते चालेल. मग येथे इतर गोष्टी विनोदाचा भाग का होउ नये?





मराठीत लिहा. वापरा.

नग्न की अर्धनग्न?

उद्या येथे नग्न बारबालांची चित्रे सुद्धा माहितीपुर्ण आणि अभिजात छायाचित्रण कलेचा एक उत्तम नमुना म्हणून चमकतील. उपक्रमरावांना ते चालेल.

आपल्याला 'अर्धनग्न बारबाला' असे म्हणावयाचे आहे का? कारण 'नग्न बारबाले'चं छायाचित्र हा थोडासा कठीण प्रकार वाटतो. 'अर्धनग्न बारबले'चं छायाचित्र मिळणे मात्र सहज शक्य आहे.

असो, बाकी चालू द्या!

अवांतर - 'बारबाल्य' हा शब्द मस्त वाटतो! ;)

तातव्य.

सौम्य

उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्राचे लवकरच जंगी उद्घाटन !

अनुषंग्य :- सौम्यरस प्राशनार्थाय संभवामि युग्य युगे ||
प्रकाश घाटपांडे

ब्राह्मण्य

ब्राह्मणांवर टीका करताना पुरोगामी वर्तुळात ती टीका ब्राह्मण्यावर
वर केली की ती व्य़क्ती वर नसून वृत्तीवर होते. त्याप्रमाणे इतर जातींवर टीका करताना आमची टीका त्या जातव्यावर आहे असे केले तर काय होईल?
अवांतर-आणखी ब्राह्मणांना किती झोडपणार लेखक ह.मो.मराठे हे पुस्तक वाचण्यासारखे आहे
(दिली का पुडी सोडून)

(अजातव्यवादी)
प्रकाश घाटपांडे

छान चालू आहे.

चालू द्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडला!

आपले लैखन्य आवडले!
प्रतिसादांसकट वाचायला तर धमाल आली!
आपला
गौंडव्य
(सीव्य. इव्य. ओव्य. - उल्लासनगर्य वडापावै आणव्य बारचिवडौय केंद्रव्य)

धमाड्य काव्य

अलाड्य म्याव्य पलाड्य भ्याव्य
बलाढ्य एक अन् भलाड्य लव्य

दैगम्भ्य वा वा!!

वा वा/ऐश्वर्य

लेख आणि प्रतिसाद वाचून मजा आली. मराठीचे शब्द-'ऐश्वर्य' जाणवले :). [अवांतर -ईश्वरता वरून ऐश्वर्य हा शब्द आला आहे का?]

ऐश्वर्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ऐश्वर्य
इथे ' ईश्वर' हे विशेषण असून त्याचा अर्थ (ईश् + वर) म्हणजे श्रेष्ठ धनी,श्रेष्ठ स्वामी असा आहे.याचे 'य ' प्रत्ययान्त भाववाचक नाम ऐश्वर्य असे आहे.त्याचा अर्थ "ईश्वरत्व,ईश्वरता,ईश्वरपणा" असा आहे.

विचार आवडला!

[अवांतर -ईश्वरता वरून ऐश्वर्य हा शब्द आला आहे का?]

व्याकरण दृष्ट्या चूक की बरोबर हे माहीत नाही, तो प्रांत आमच्या वालावलकरशेठचा. परंतु या प्रश्नामागचा विचार आणि आशय आवडला.

तात्या.

--
'जे जे उत्तम उदात्त उन्नत, महन्मधुर ते ते....'

धन्यवाद/पु.लं.

शंकानिरसन केल्याबद्दल आभार, श्री. यनावाला. तात्या/मिलिंदराव, खरं तर हा विचार माझा नाही. पु.लं.चे कानडी साहित्य मंडळातील भाषण ऐकत होतो. (ते या दुव्यावरून उतरवून घेता येईल.) त्यात ते बोलताना "ही जी ईश्वरता आहे - ऐश्वर्य आहे", असे म्हणाले त्यावरून डोक्यात ही शंका आली. एकाच शब्दाचे विशेषण पारलौकिक आणि भाववाचक नाम पाऽर लौकिक, असला विरोधाभास पाहून गंमत वाटली, एवढंच.

वैचारिक!

"ही जी ईश्वरता आहे - ऐश्वर्य आहे", असे म्हणाले त्यावरून डोक्यात ही शंका आली.

आणि आम्हाला त्यांचं भाषण न ऐकता नेमके तेच वाक्य वैचारिक वाटले!

आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.

चाँदभाई

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चाँदभाई
श्री.दिगम्भा यांनी "थैल्लर्य, औनाड्य, बौर्य, मौडक्य " असे शब्द घडवले आहेत.ते रूढ नसले तरी व्याकरणनियमांत बसणारे आहेत.तसेच त्यांचा वाक्यात उपयोग योग्य प्रकारे केला आहे.'थैल्लर्य" म्हणजे 'थिल्लरता, थिल्लरपणा,' याची त्यांना कल्पना आहे. मात्र प्रतिसादांतील अनेक शब्द नियमांनुसार नाहीत.विशेषणा पासून'य' प्रत्ययान्त भाववाचक नामे करण्याचा नियम असा:
..*शब्दातील अन्त्य अ,इ हे स्वर जाऊन त्या जागी 'य' हे अक्षर येते.
..* शब्दातील पहिल्या स्वराची वृद्धी होते.
वृद्धी: (अ,आ)-->आ; (इ,ई)--> ऐ ; (उ,ऊ)--> औ; ऋ-->आर् .
उदा.: विषम-->वैषम्य; उद्धत--->औधत्य; मूढ-->मौढ्य, दृढ--->दार्ढ्य इ.
......... त्य प्रत्यय लावतान सुद्धा प्रथम स्वराची अशीच वृद्धी होते.मात्र शेवटचा 'अ' नजाता तिथे आणखी एक 'अ' येतो. जसे: दक्षिण-->दाक्षिणात्य, पूर्व-->पौर्वात्य. इ.
......मात्र त्व,ता,पणा हे प्रत्यय लागताना काहीच परिवर्तन होत नाही.(गुरु-->गुरुत्व, महत्-->महत्त्व इ.)
.....नामांना 'इक' प्रत्यय लागून विशेषणे होताना सुद्धा अशीच स्वरवृद्धी होते. (अध्यात्म-->आध्यात्मिक इ.)
.....'बारबाला' हे नाम आहे त्याचे बारबाल्य असे भाववाचक संभवत नाही.त्याचे विशेषण 'बारबालिक'
(बाल याविशेषणाचे भाववाचक बाल्य आहे.)
... कुणी म्हणेल "आम्ही हवे ते शब्द करू. तुम्ही कोण सांगणार?"
अवश्य, अवश्य. माझी लापणिका आवरती घेतो. चर्चा चांगली आहे. चालूं दे.
......यनावाला

लापणिका

म्हणजे लेखणी तर म्हणायचं नाही ना तुम्हाला?

ऐश्वर्यः आता बच्चनच्या घरात ऐश्वर्याच्या रुपात ईश्वरी सामर्थ्य(अजून एक बौर्यगटातला शब्द) आले आहे.

अभिजित

लापणिका

लापणिका, लापण्णिका, लाफण्णिका, लापटणिका , लापणीक, लांबण हे सर्व समानार्थी शब्द लापनिका या संस्कृत शब्दावरून आले आहेत. अर्थ- लांबलेली गोष्ट, चर्‍हाट, गुर्‍हाळ.

आणखी समानार्थी शब्दः चर्पटिका, चर्पटपंजरी.
--वाचक्नवी

चाँदभाई

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. दिगम्भा यांच्या लेखावरील प्रतिसादाला मी 'चाँदभाई 'असे शीर्षक दिले. या लेखावर खुसखुशीत ,गमतीदार चर्चा चालली होती. अनेक जण सीओईपी संबंधीच्या स्मृतिरंजनात दंग होते.अशा चर्चेत मी माझे व्याकरणाचे घोडे मधेच दामटले.या प्रकाराला "बीच मे मेरा चाँदभाई" असे म्हणतात, हे आपण जाणताच. ती म्हण सूचित करण्यासाठी हे शीर्षक दिले. सुज्ञांना ते समजलेच असेल. पण कोणताही संदेह राहू नये म्हणून हे स्पष्टीकरण.
.....................
त्याच प्रतिसादात 'लापणिका'असा शब्द योजला आहे. त्याचा अर्थः"कंटाळवाणी लांबण,चर्‍हाट "असा आहे.
लापणिका-->लापणी-->लापण (यावरून 'लापणदीप'--मराठीत लामण दिवा--तो लांब साखळीने टांगलेला असतो)
लापण-->लामण-->लांबण. अशी व्युत्पत्ती संभवते.

बारबालिक?

बारबालिक कसेतरीच वाटते. आकारान्त स्त्रीलिंगी नामाला इक(ठक्) प्रत्यय लागतो?
शालीय, मालीयसारखे छण् प्रत्यय लागून झालेले बारबालीय अधिक योग्य वाटते.
"शालेय "शब्द संस्कृत नसावा, पण जर बरोबर असेल तर बारबालेय करायला हरकत नाही.
--वाचक्नवी

बारबालिक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्‍नवी यांस,
मग;
........... भाषा---> भाषिक
............परंपरा---> पारंपरिक
.............इच्छा----> ऐच्छिक
ही रूपे कशी सिद्ध होतात? माझा व्याकरण विषयाचा तसा अभ्यास नाही. चुकत असल्यास कळवावे.
......यनावाला

बारबालिक

आपले म्हणणे मान्य. आकारान्त स्त्रीलिंगी नामांना इक प्रत्यय लागू शकतो. पण अर्थ-- (अ)नुसार असा होतो. भाषिक-भाषेनुसार. पारंपरिक-परंपरेनुसार. ऐच्छिक- इच्छेनुसार. बारबालिक म्हणजे बारबालेनुसार? शालीय म्हणजी शाळेसंबंधी. तसेच बारबालीय म्हणजे बारबालांसंबंधी. मला वाटते आपल्याला हाच अर्थ अभिप्रेत असावा. --वाचक्नवी

चौर्य

चोरी ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? मागे थैल्लर्याच्या चर्चेत

पण ही पद्धत केवळ संस्कृत तत्सम विशेषणांसाठी वापरतात. शुद्ध मराठी अथवा प्राकृत शब्दांसाठी नाही

असे आले होते. चौर्य हा तसा रूढ शब्द आहे, म्हणजे चोरी हा तत्सम शब्द आहे का? की खास या शब्दासाठी अपवाद केला आहे? कृपया अधिक माहिती द्यावी.
आपला
(जिज्ञासू) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

चौर्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

श्री वासुदेव यांस;
' चोरः ' हा संस्कृत शब्द आहे.( इथे च चा उच्चार चटकन् मधील च सारखा नाही, चमत्कार मधील च सारखा आहे.)' चोर:' हे विशेषण आहे. त्याचे भाववाचक नाम चौर्य असे होते.या चौर्य शब्दाचा अपभ्रंश होऊन चोरी हा मराठी शब्द आला असावा. चोरी हा संस्कृत शब्द नाही.

धन्यवाद!

यनावाला महोदय,
आमच्या शंकेची दखल घेऊन तिचे यथोचित निवारण केल्याबद्दल धन्यवाद!
आपला
(आभारी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

उपसंहार

हो, हो, अगदी असंच झालं होतं तेव्हाही!

जनतेच्या डोक्याचे फैर्य झाले होते, पब्लिकला खौळ्य आले होते!
मागे पेशवाईत जसे भाऊसाहेब व जानकोजी यांच्या तोतयांचे बंड झाले होते तसे येथे तोतया भाववाचक नामांचे पुरते बंड उफाळले होते!
तेव्हा तोतयांच्या एकदोन जोडगोळ्या असतील, येथे वसतिगृहापासून मॉडर्न कॅफेपर्यंतच्या पाच मिनिटाच्या चाल्यात ५ भाऊसाहेब आणि ७ जानकोजी भेटू लागले.
लैक्चर्याचे औफ्य करून हेच; जैम्यात व्यायाम्याऐवजी असेच; क्लाब्यातील बौट्य घेऊन नदिमौळ्यावर (म्ह. मुळा नदीवर) जावे तरी सौटक्य नाही. सगळीकडून भांडाव्य होऊन जिवाचे नाकोनाक्व (=नकोनको) झाले.
संवाद , विवाद राहिले बाजूला. अपवाद, परिवाद, छळवाद सुरू झाले. कोणाचे बौलण्य कोणाला समजेना. काय करावे अजिबात असौच्य (सुचेनासे) झाले.
शेवटी, सर्वत्र गौप्त्यपूर्ण सामझोत्य झाले, पौरेपौर्यावर (पुरे पुरे करण्यावर) ऐकमत्य होऊन पाडद्य पडले एकदाचे.
हौश्श्य! हौश्श्य !

असो. हा मराठी भाषेच्या ऐतिहास्याचा एक महत्वाचा भाग आहे.
मराठी भाषेच्या सूक्ष्म-इतिहासकारांनी किंवा मराठी सूक्ष्मभाषेच्या इतिहासकारांनी या प्रकरणाचे सोयीस्कर औलांड्य न करता आपल्या अभ्यासाला पुरेसे साखोल्य, सौक्ष्म्य व तापशिल्य आणून याची दखल घ्यावी एवढेच नम्र वैनंत्य.

मंडळी, टाळ्या वाजवा, आम्ही आता खाली बसतो आहोत.
-दिगम्भा

आभार्य

आजच्या भाषेतल्या शब्दांचे थोडे सौधार्य किंवा रैमिक्ष्य करून म्हणायचे तर

"खात्तर्य!" किंवा "जाबर्य!"
किंवा आमच्याच जुन्या भाषेत बोलायचे तर "धान्य! धान्य!"
असे असावे रासिक्य!
जरा स्थौल्य आलेल्या आमच्या भगवानदादांचे कंबरेवर हात ठेवून व आपल्या खास ष्टायलीत देहाच्या सूक्ष्म हालचाली करत

"शाम ढले, खिडकी तले, तुम सीटी बजाना छोड दो"

हे गाणे सुरू होताच रसिकांच्या शिट्ट्या वाजतील की नाही ही शंकाच आम्ही बाळगायला नको होती.
आमचा हा "अलबेला" तिसर्‍या रनमध्येसुद्धा हिट्ट झाला की वो!
(पहिला रन सावरकरांचा, दुसरा अभियांत्रिकी वसतिगृहीयांचा व हा तिसरा उपक्रमावरील मैत्राचा)
मित्रहो धन्यवाद.

तात्या, प्रकाश, अभिजित, अनुताई, मिलिंद, नंदन, गुंडो, आर्य, प्रा. डॉ., एकलव्य, सर्वासर्वांचे आभार.
विशेष आभार यनावालाजींचे, त्यांच्या सौहार्दाचे व ऋजुत्वाचे आम्ही अंकित झालो आहोत.

योगेश, जितेन्, आपण त्या अंगणात मनसोक्त खेळलो, आपण लोक त्या जागेचे निरंतर ऋणी आहोत, आणखी काय लिहिणार?

आमच्या टग्यादादांच्या नुसत्या नावातच टाग्य आहे, बाकी स्वभाव गांभीर्यपूर्णच आहे, नाही का?.
पण टगेरावांचे मत विचार करण्याजोगे आहे. उर्दूत फलसफा (फिलसॉफी/फिलॉसफी?) असतो, हिंदीत त्रासदी (ट्रॅजेडी), कामदी (कॉमेडी), प्रावधान (प्रोविजन्) असतात तर मराठीतच एवढे असहिष्णुत्व का? मला वाटते जेवढा विविधांगी पण एका भागात एका समाजात फोकस्ड् भाषिक व्यवहार चालतो तेवढी त्या भाषेत अलवचिकता वाढत असेल. कदाचित अति-पुणेकेंद्रितपणा, फार ब्राह्मणीपणासुद्धा मराठीची मर्यादा बनला असेल.
मला वाटते आपल्याकडे योग्य वाटणार्‍या नव्या शब्दांचा सार्वजनिक पुरस्कार करणे व त्याज्य शब्दांचा सार्वजनिक धिक्कार करणे यासाठी एखादी केंद्रीभूत समिती/संस्था हवी आहे. पूर्वी ब्राह्मणांनी सांगितले तर/ते बरोबर अशी समाजाची (योग्य अथवा अयोग्य पण) धारणा असे, तशी विश्वासार्हता या नव्या संस्थेने मिळवली पाहिजे. शिवाय ती संस्था भाषासंवर्धनाच्या कामी उदारमतवादी असली पाहिजे. करील का कोणी अशी संस्था स्थापन?
आपल्याला आठवते का मी फार पूर्वी मनोगतावर एक "यशस्वी शब्दांचे कौतुक" या शीर्षकाचा लेख लिहिला होता तो - त्यामागे असाच काहीसा विचार होता.
- दिगम्भा

मस्त

इथे केम्ब्रिजात मराठी बोलण्याचे दुर्भिक्ष्य आहे, पण दैगम्भ्य कविधावि आवडले. (की हे कभू?)

ना कविधावी ना कभू

दैगम्भ्य हे तद्धित प्रत्यय लागून झालेले भाववाचक नाम!
--वाचक्नवी

छान

लेख आणि प्रतिसाद वाचून मौज्य आले :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

शेवटीं आवाज्य सीओईपीचेंच!!

आहों शेवटीं आवाज्य तें सीओईपीचेंच! त्याचे नाद्य केल्यास साकल्याने मैन्दव ग्रंथींना खौळ्य हे येणारच! आम्हीदेखील असले खैळिक कारनामे त्या हाष्टेलात बहुत करीत असू. अनुक्रमें ए, आय, डी आणि डी "ब्लॉक्य" येथे वास्तव्य. हे वाचोन अस्मादिकांस येका मित्राने दिधलेले पादव्य(पदवी पासून?) आठवले "यमक हराम" :D :D

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर