रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना
दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता. मूळ निबंध येथे वाचता येईल.
शतकानुशतके तयार होत गेलेल्या, निरनिराळ्या भाषांमधल्या रामायणाच्या उपलब्ध वर्शन्स मधली भिन्नता, आणि पात्रांच्या व्यक्तीरेखांमधली विविधता यावर हा निबंध आहे. रामानुजन स्वतः कन्नड, तमिळ व इंग्रजीतील कवि, समीक्षक, भाषांतरकार व लोककथा संग्राहक होते. एका भाषेतली लोककथा दुसर्या भाषेत कशी निराळी सांगितली जाते, तिचे स्वरूप कसे बदलते त्यावर त्यांचे मार्मिक लेखन आहे. रामायणासारख्या महाकाव्यतले कथानक देखील भारतभर आणि दक्षिण-पूर्व एशियात वेगवेगळ्या भाषांमध्ये कसे बदलत गेले, याचा ते आढावा घेतात. एकच घटना किंवा व्यक्ती दोन वर्शन्स मध्ये कशी वेगळी उमटते, हे पाहतात. हा अभ्यास एक वर्शन प्रमाण ठरविण्याचा नाही, तर भाषाशास्त्रीय आहे. भाषांतरातून कथानकाच्या ओघावर, रूपरेखेवर होणार्या परिणामावर आहे.
२००८ साली अभाविप च्या काही कार्यकर्त्यांनी इतिहासविभागावर मोर्चा काढून नासधूस केली. या निबंधात राम, सीता व हनुमान विरुद्ध अपमानकारक विधाने असल्याने तो काढून टाकण्यात यावा अशी दिल्ली हाय कोर्टात याचिका केली गेली, पण कोर्टाने ती फेटाळली. काही दिवसांपूर्वी विश्वविद्यालयाच्या ऍकॅडेमिक काउंसिलने तो निबंधच नाही तर संपूर्ण कोर्सच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. निबंधच काढून टाकण्यात आला आहे. इतिहासविभागाचा या निर्णयास विरोध असूनही, काउंसिलचेच मत निर्णायक आहे.
३० पानांचा हा मूळ लेख वाचून, (किमान) पुढील मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे:
१. निबंधाचा युक्तीवाद काय आहे? धार्मिक भावनांशी, किंवा राम-लक्ष्मण-सीता यांच्या दैवी रूपाशी त्याचे काय संबंध आहेत?
२. यात विवाद्य असे काही आहे काय? तो अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे असे तुम्हाला वाटते काय?
३. हा लेख कॉलेजात इतिहास ऑनर्स शिकणार्या मुला-मुलींना, व त्यांना शिकवणार्या दिल्ली विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांमा खूप जड जाण्यासारखा आहे का?
४. निबंध वाचल्यावर तो "भारतीय संस्कृती: एक ऐतिहासिक अभ्यास" नामक कोर्स मध्ये योगदान काय असू शकेल? असे लेख वाचून भारतीय संस्कृतीच्या इतिहासाबद्दल काय शिकायला मिळू शकेल?
५. एखाद्या लेखातील मजकूर आणि लेखकाचा युक्तीवाद कसा समजून घ्यावा? कॉलेजात निबंध वाचणे म्हणजे नेमके काय करणे अभिप्रेत असते?
६. एखाद्या लेखातील, पुस्तकातील मजकूर व तर्क न पटल्यास, विवाद्य वाटल्यास, काय करावे?
७. निबंध व कोर्स काढून टाकण्याने काय सिद्ध होते? हा फक्त राजकारणाचा भाग आहे, की अभ्यासक्रमातून मजकूर काढून घेण्याला सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व देखील आहे?
Comments
कालच बातमी वाचली
कालच बातमी वाचून निबंधाचा दुवा हुडकून काढला होता.
निबंध वरवर चाळला. :-) तरीही पूर्ण वाचन न केल्याने मूळ विषयावर भाष्य करता येत नाही परंतु निबंधाचा कल कळला. रोचक वाटला आणि पूर्ण वाचायला आवडेल असे वाटते.
मध्यंतरी ऑलिवर स्टोनने काढलेला ऍलेक्झांडर आणि डॅन ब्राउनचे सुप्रसिद्ध दा विंची कोड यांची आठवण झाली. प्रस्थापित कल्पनांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडल्या गेल्याने किंवा आपल्या पूजनीय व्यक्तींची वेगळी बाजू मांडल्याने नाराज झालेले लोक खूप होते. त्याबद्दल उलटसुलट चर्चा आणि वादविवाद ऐकू येत. टीव्हीवर कार्यक्रम होत परंतु कोणी कोणाच्या तोंडाला काळे फासले, ऑफिसात जाऊन नासधूस केली, पुस्तके जाळली असे प्रकार येथे ऐकले नाहीत. चू. भू. द्या. घ्या.
बाकी बातमी वाचून विशेष आश्चर्य वाटलं नाही. पुढली बातमी संथाळांना किंवा वेगळे रामायण मांडणार्यांना मारहाणीची असेल तरीही आश्चर्य वाटणार नाही. आमच्या श्रद्धास्थानांवर टीका केलीत तर तुम्हाला बघून घेऊ छाप धमक्या भारतात देण्याची फॅशन असावी आणि अशा दहशतवादापुढे झुकणारेच जास्त आढळतात.
तूर्तास, नासधूस करणार्या झुंडशाहीचा निषेध असो.
:(
चर्चेत भाग घेण्याइतकी मुळ विषयावबद्दल माहित नाहि.
मात्र केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र 'संस्कृतीरक्षण' या गोंडस नावाखाली अनेक दुर्दैवी घटना घडत असतात. मग वर उल्लेखलेली घटना असो, भांडारकर प्राच्यविद्या असो नाहीतर अफगाणिस्तानातील शिल्पं असोत नाहितर अजून काही :(
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
रामायण इतिहास?
रामायण इतिहास केव्हापासून झाला. मुळात रामायणारचे लेखन बी. ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमात आलेच कसे?अभाविपचे लोक "त्या" लोकांपैकी असल्याने त्यांचा निषेध योग्यच आहे. तसेच रामानुजम बहुधा "आपले"असल्याने मुळात हा निबंध इतिहासाच्या अभ्यासक्रमात लावल्याबद्दल मौन धरावे हेही योग्यच आहे.
चर्चा
१. मूळ निबंध वाचायला कंटाळा आला म्हणून पूर्णपणे वाचला नाही. निबंधाची जातकुळी आणि मुख्य विचार मात्र समजला.
या निबंधात प्रसिध्द होण्यास अटकाव व्हावा इतके विवाद्य असे काही आढळले नाही.
२. अभ्यासक्रमातून काढून टाकावा असेही वाटले नाही. शाळा कॉलेजसमधले विद्यार्थी 'संस्कारक्षम' असतात. आणि अशांच्या समोर चांगले चांगले (वेळ पडल्यास खोटेनाटे) विषय ठेवावेत असा काहीसा विचार राजकारण्यांचा दिसतो. यातील संस्कारक्षम गृहितक फारसे मोलाचे नाही. त्यामुळे फक्त चांगलेच ठेवावे याला काही अर्थ नाही. 'चांगले काय' हे ठरवण्याचा एकाधिकार काही जण घेतात हे त्यातले अधिक वाईट.
३. हा विषय जड जातो म्हणून तो काढून टाकला असे वाटत नाही. म्हणून हा प्रश्न गैरलागू आहे. जड जाते म्हणून शिक्षण नाकारणे हे देखील मूल्य समजण्यासारखे नाही. (उपयोगी नाही म्हणून नको हे पटण्यासारखे आहे.)
४., ५. पास (हा विषय माझ्या अभ्यासाचा नाही.)
६. हा कोर्स असावा की नाही या बद्दल माझे काही मत नाही. या विषयाऐवजी दुसरे जे शिकणार, ते महत्वाचे आहे की नाही यावरून त्याबद्दल मत देता येईल. कौन्सिल वगैरे मंडळी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतात अशा मताला मला फारसा आधार दिसला नाही.
७. निबंधामुळे कोर्स गेला हे मला फारसे समजले नाही. (कदाचित बातम्यांच्या दुव्यात ते असेल.) मात्र निबंध वा कोर्स काढण्यात शैक्षणिक समित्यांवरील मंडळींनी भीतिपोटी केले असू शकते. फक्त राजकारणच असेल असे नाही. अभ्यासक्रमातून मजकूर काढण्यास शैक्षणिक महत्व आहेच कदाचित थोडेफार सांस्कृतिक महत्व असेल. (त्यामुळे राजकारण येऊ शकते.)
आता निबंधाबद्दल. हा निबंध या विषयाची जाण असणार्यांसाठी आहे. जाण नसणार्यांसाठी लिहिला असता तर तीनशे रामायणे कुठली, त्यांचा निर्मितीकाळ कुठला, या निबंधासाठी अमकीच का निवडली असे काहीसे त्यात आले असते. यातील काहीतरी रामायणे ही कुठल्यातरी इतर रामायणावर बेतली असण्याची कबुली कदाचित लेखकांनीच दिली असेल.
रामायणाला मोठी मौखिक परंपरा आहे, एवढेच नव्हे तर त्यास नाटकीय रूप दिले गेलेले आहे. (आजही रामायण हे नृत्यनाटिकेच्या स्वरुपात परिचित आहे.) या नाट्यपरंपरेमुळे कथानक वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे असू शकतात. (जसे श्रोत्यांना रुचते तसा बदल करणे.) हल्लीचे सिनेमे सिरियल्स आणि रामलीला हे देखिल काही रामकथा सांगतात. या कथांमधील भेद हा देखिल अभ्यासाचा विषय होऊ शकतो.
रामकथेतील भेदांबरोबर, महाभारतातील, जातककथांमधील भेद, बायबल कुराणांमधील मधील भेद ... असा एक समग्र स्फोटक विषय असता तर कदाचित मी हा विषय शिकवाच अशा पत्रावर स्वाक्षरी केली असती.
प्रमोद
रामायण हा इतिहास असण्या/नसण्याचा
रामायण हा इतिहास असण्या/नसण्याचा बी.ए.च्या इतिहासात समाविष्ट असण्यावर प्रभाव पडत नाही. रामायण हे महाकाव्य असले तरी ते प्राचीन महाकाव्य आपल्या देशाची संस्कृती आणि ऐतिहासिक काव्य आहे. त्याच्या प्रवासाचा तेथपासून येथपर्यंत लेखाजोखा इतिहासाच्या अभ्यासाचा निश्चितच विषय आहे/ असावा.
ए. के. रामानुजन
(मुद्द्यांवर स्वतंत्र लिहित आहे)
~ कन्नड आणि तमिळ साहित्य विश्वात अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव 'ए.के.रामानुजन' यांच्याविषयी [जरी एका विशिष्ट निबंधाविषयी असली तरी] इथे 'उपक्रम' वर चर्चा होत आहे हे पाहून अतिशय आनंद झाला. मी तुलना करण्याच्या मोहाने म्हणत नाही, पण आपले साहित्यिक प्रसिद्ध आहेत ते फक्त मराठी भाषेतील त्यांच्या लिखाणामुळे पण रामानुजन जितके कन्नडमधील लिखाणामुळे तितकेच तमिळ आणि इंग्लिशमधील त्यांच्या योगदानाने. फार मानले जातात ते त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणामुळे त्या त्या प्रांतात.
लोककथेच्या अभ्यासामध्ये तर त्याना गुरु असेच संबोधिले जाते. गिरीश कर्नाड यानी आपले नाटक 'नागमंडल' हे ए.के.रामानुजन यानी सांगितलेल्या लोककथांवरच बेतले आहे. कृतज्ञतेने ते नाटक त्यानी 'गुरु रामानुजन' यानाच अर्पण केले आहे.
रोचना यानी उल्लेख केलेल्या विद्यापीठीय सिलॅबसमधील रामानुजन यांचा तो निबंध आणि त्याबद्दल अ.भा.वि.प. चे आंदोलन याला फक्त निबंधातील रामायण-पात्रांविषयीचे [आंदोलकांच्या दृष्टीने] आक्षेपार्ह असणारे उल्लेख कारणीभूत होते की अन्यही हिडन अजेंडा होता याचाही त्या आंदोलनानंतर छडा लावण्यात आला होता. त्यातून बाहेर आलेले सत्य म्हणजे मुळात ते पुस्तक एकट्या ए.के.रामानुजन यांचे नसून सिलॅबसच्या गरजेनुसार अनेक निबंधांचे केलेले ते एक संकलन होते आणि त्यांचे संपादन केले होते श्रीमती उपिंदर सिंग यानी ज्या दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख आहेत. डॉ.उपिंदर सिंग यांची एवढीच ओळख नसून एक जास्तीची म्हणजे त्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या आहेत. त्यामुळे राजकीय दृष्ट्या अभाविपला रामानुजन यांच्या निबंधाचे निमित्त पुढे करून नेमके काय साध्य करायचे होते ते राजकीय विश्लेषकांनी वेळीच ओळखलेही होते.
असो. पण इथे मात्र त्या निमित्ताने पटलावरील तो निबंध इथल्या सदस्यांनी वाचून रोचना यानी मांडलेल्या मुद्द्यावर मत प्रदर्शित केले तर एक चांगली अकॅडेमिक चर्चा घडू शकेल असे वाटते.
(@ रोचना ~ पण मला आजही वाटते की डीयू अकॅडेमिक कौन्सिलने फक्त 'तोच' निबंध अभ्यासक्रमातून वगळला असून पुस्तक आणि कोर्स् इनटॅक्ट आहेत. अर्थात माझी माहिती ऐकीव आहे, तुम्ही तेथील घडामोडीशी थेट संबंधित असाल तर तुमची माहिती अचूक असणार.)
रामानुजन्
निबंध, आणि रामानुजन् यांच्यावर अजून काही लिहाल याची अपेक्षा आहे!
कोर्स काढून टाकला असे मी एका वृत्तात वाचल्याचे आठवते. पण पुन्हा शोधून पाहते.
निबंधच, कोर्स नव्हे
अशोक, तुमचे बरोबर आहे - डी०यू च्या इतिहास प्राध्यापकाकडून माहिती मिळविली, की संपूर्ण कोर्स नाही, फक्त निबंधच काढून टाकण्यात आला आहे.
संपादकांना विनंती: चर्चा प्रस्तावात मजकूरावरून रेघ मारून (स्ट्राइकआउट) ही माहिती घालता येईल का? आणि शीर्षकात रामानुजन् ऐवजी रामानुजम् आले आहे. ते सुधारता येईल का?
माझे मत
निबंधाचा मुद्दा लक्षात आला(काही प्रमाणात वाचला).
तुम्ही तुमची मते न देऊन एक चर्चेला एक विशिष्ठ वळण देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते, तरी देखील तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवरून तुमच्या मताचा एक अंदाज येतो, या चर्चेच्या शेवटी तुम्ही तुमचे मत द्याल हि अपेक्षा आहे.
१.निबंधाचा युक्तीवाद काय आहे? धार्मिक भावनांशी, किंवा राम-लक्ष्मण-सीता यांच्या दैवी रूपाशी त्याचे काय संबंध आहेत?
१.१ निबंधाचा ज्ञात/लिखित युक्तिवाद हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाषा-शास्त्रीय अभ्यास आणि रामायणाची अनेक रूपे आणि त्याचे भाषा-शास्त्रीय+सामाजिक(काही अंशी) विश्लेषण.
१.२ रामायणा बद्दल लिहिणे म्हणजेचे धार्मिक गोष्टींबद्दल लिहिणे असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल, तो उद्देश असो अथवा नसो.
१.३ राम-लक्ष्मण-सीता ह्यांच्या भूमिकेशीच ह्या निबंधाचा संबंध येतो, त्यांच्या प्रचलित भूमिका ठळकपणे मांडणे किंवा खोडून काढणे असे एक अन-उद्देशीत अर्थ निघू शकतो, किंवा तो अर्थ निघतोच. त्यावरून तो निबंध वाचणार्याने कसे वागावे ह्याबद्दल मी पुढे
मत दिले आहे.
२. यात विवाद्य असे काही आहे काय? तो अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे असे तुम्हाला वाटते काय?
२.१ विवाद्य म्हणजे काय हे आधी व्याख्यीत केले पाहिजे, रूढ अर्थी राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, राम हा पूजनीय आहे, त्याबद्दल ह्याविरुद्ध लिहिले असता तो निंदनीय होईल, हे कदाचित विवाद्य मानले जाऊ शकते.
२.२ तुमच्या प्रस्तावनेला धरून - "हा निबंध केवळ भाषा-शास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रमात टाकण्यात आला आहे, त्याचा रामायणाशी किंवा राम-सीता-लक्ष्मण ह्यांच्या भूमिकेशी काहीही संबंध नाही" असे श्रेय-अव्हेर दिल्यास काही
प्रमाणात गुंता कमी होईल...पण तो निबंध खरेच भाषा-शास्त्रीय अभ्यासासाठी आहे काय? हा निबंध/पुस्तक म्हणजे रामानुजन+इतर ह्यांनी विविध रामायणांचा अभ्यास करून त्यांना लहानपणी घालून दिलेल्या 'आदर्शाची' सत्यतापडताळणी असू शकते, ती एक शक्यता, पण
ह्या निबंधाचे महत्व अधोरेखित करता आले तर जरूर हा निबंध अभ्यासक्रमात असावा असे माझे मत असेल.
३. हा लेख कॉलेजात इतिहास ऑनर्स शिकणार्या मुला-मुलींना, व त्यांना शिकवणार्या दिल्ली विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांमा खूप जड जाण्यासारखा आहे का?
३.१ नाही.
४. निबंध वाचल्यावर तो "भारतीय संस्कृती: एक ऐतिहासिक अभ्यास" नामक कोर्स मध्ये योगदान काय असू शकेल? असे लेख वाचून भारतीय संस्कृतीच्या इतिहासाबद्दल काय शिकायला मिळू शकेल?
४.१ भाषा-शास्त्रीय अभ्यास आहे असे आपण म्हंटले आहे, तरी "bharatiy संस्कृती - एक ऐतिहासिक अभ्यास" अशा कोर्स मध्ये ह्याचे योगदान कदाचित "भारतीय संस्कृती म्हणजे एक मोठ्ठी गुंता-गुन्त" असे होण्याची शक्यता अधिक,
किंवा "समस्त उपलब्ध रामायाणांचा एक सारांश" असे मत देखील होऊ शकते, त्यावरून संस्कृती कशी आहे हा निष्कर्ष व्यक्तिगत असेल असे मला वाटते.
५. एखाद्या लेखातील मजकूर आणि लेखकाचा युक्तीवाद कसा समजून घ्यावा? कॉलेजात निबंध वाचणे म्हणजे नेमके काय करणे अभिप्रेत असते?
५.१. युक्तीवाद कसा समजून घ्यावा ? - जसे लेखकाने इतर लेखकांच्या (वाल्मिकी, tulsidas wagaire) लेखाचा अभ्यास करून युक्तिवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तसा? पण युक्तीवाद्च असेल तर तो का समजावून घ्यावा?
६. एखाद्या लेखातील, पुस्तकातील मजकूर व तर्क न पटल्यास, विवाद्य वाटल्यास, काय करावे?
६.१ झुंडशाही करू नये, मनु-स्मुर्ती जाळली तसे पुस्तक देखील जाळू नये, शांततामय मार्गाने चर्चा/मागण्या/आंदोलन wagaire प्रकार करावे.
७. निबंध व कोर्स काढून टाकण्याने काय सिद्ध होते? हा फक्त राजकारणाचा भाग आहे, की अभ्यासक्रमातून मजकूर काढून घेण्याला सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व देखील आहे?
७.१ निबंध व कोर्स काढून "लोकशाही मार्गाने मला वाटते तेच करा" असे करण्याचा प्रयत्न असावा.
ह्या व्यतिरिक्त माझे मत - राम हा माणूस होता, माणूस स्खलनशील आहे, पण समाज अतिशय गुंतागुंतीचा आहे, अशा समाजाला बांधून ठेवण्यासाठी काही व्हीजनरी लोकांनी मिथ्या कथांचा वापर केला असेल (दुर्गा भागवत म्हणतात त्याप्रमाणे), ह्याची अनेक उदाहरणे बघावयास मिळतात, जसे टिळकांनी सुरु केलेला गणेश-उत्सव किंवा पंढरीची वारी, ह्या श्रद्धेशी निगडीत गोष्टी कुठलाही वैज्ञानिक शोध लावत नाहीत किंवा अन्न-धान्य तयार करत नाहीत पण त्या बहुतेक समाजाला बांधून ठेवण्याचे काम करतात, असे असेल तर ह्या श्रद्धेला कसे आणि कुठे वळवायचे हे करण्यासाठी पण एक व्हीजनरीच पाहिजे असे वाटते. ह्यासाठी देव/श्रद्धा म्हणजे नक्की काय ह्या व्याख्येवर जावे लागेल जी मागे उपक्रमवर झाली आहे.
तरी देखील, दुसऱ्याचे मत पटले नाही म्हणून मारहाण करणे निंदनीय आहे.
तसे पाहता प्रत्येकाची एक विशीष्ठ श्रद्धा असते, देव/गुरु/आई/वडील/मित्र/पुस्तके, तांत्रिक दृष्ट्या फक्त काळे आणि पांढरे असते, पण वस्ताविकात बरेचसे काळ्या-आणि-पांढरयाच्या मध्ये असते, अभिव्यक्ती जपताना त्याचा विचार होणे गरजेचे आहे.
मनुस्मृतीचे दहन
मनुस्मृतीचे समारंभपूर्वक विधिवत दहन करण्यात आले होते. तो साधासुधा पुस्तक जाळण्याचा प्रकार नव्हता. ते ब्राह्मणवादाचे आणि अस्पृश्यतेचे प्रतीकात्मक दहन होते. त्यासाठी खास पंडाल टाकण्यात आला होता. वेदी उभारण्यात आली होती. असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
पाठींबा ?
साग्र संगीत 'दहन' करण्यास आपला पाठींबा आहे असे आपल्या प्रतिसादातून जाणवते आहे, असो.
हं
मनुस्मृतीच्या दहनाला एक खास पार्श्वभूमी होती. माझ्या प्रतिसादातून मी दहनाला कुठलाही पाठिंबा दिलेला नाही किंवा त्याचा विरोधही केलेला नाही. तुमच्या जाणिवांवर माझे नियंत्रण नाही.
हाहाहा. असे म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणे सोपे आहे. असो. प्रशांत भूषण ह्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर इतस्त: काही शिकल्यासवरलेल्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, प्रतिसाद वाचून एकंदरच आपण अजून मोठे झालेलो नाही हे कळते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ठीक
ठीक,तुमची भूमिका समजली.
गुंतागुंतीचा विषय!
"लीडिंग" प्रश्न (मराठीत कसे म्हणायचे?) टाकायचे टाळत होते, म्हणून माझे मत मी सुरुवातीलाच स्पष्ट केले नाही. पण ते उघडच आहे; खाली तोडे विस्तारित सांगायचा प्रयत्न करते.
लेख भाषाशास्त्रीयच आहे, असे मला वाटते. पण "केवळ" भाषाशास्त्रीय आहे, म्हणजे ऐतिहासिक नाही, असे मुळीच नाही. भारताच्या प्रचंड सांस्कृतिक भंडाराचे विश्लेषण करणे म्हणजे त्याला ऐतिहासिक स्वरूप देणे आलेच. संहितांमधले, प्रतींमधले, भाषिक वर्शन्समधले फरक पडताळणे, अंतर्विरोधांना समजून घेणे, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ व कारणे शोधणे, सर्व आलेच. आणि म्हणून, "मोठ्ठा गुंतागुंतीचा प्रकार" ही व्याख्या भारतीय संस्कृतीला चांगली लागू आहे - आणि हे गौरवास्पद आहे असे मी समजते. काही अभ्यासक ऐतिहासिक मुद्द्यांवर जास्त भर देऊ शकतील (रामायण दक्षिण आशियाला कसे गेले? दाक्षिणात्य परंपरेतल्या रामकथा वेगळ्या का आहेत? वगैरे). पण रामानुजन् यांनी भाषाशास्त्रीय मुद्द्यांवर - भाषांतर, वाक्यातले ठसे व ओघ, मांडणी, वातावरण - यावर भर दिला आहे. शीर्षकावरूनही जाणवते, की ३०० रामकथांच्या मजकूराद्वारा भाषांतरवरचे ३ स्वतंत्र मुद्दे निबंधाचा मूळ विषय आहे.
युक्तीवाद - इथे परत माझे मराठी कच्चे पडते असे दिसतेय! युक्तीवाद म्हणजे "आर्ग्युमेंट" किंवा तर्क, मतमांडणी, या अर्थाने वापरला. युक्तीवादात "असे म्हटले आहे तरी खरा गूढार्थ वेगळाच" असा होतो का? तसे असल्यास माझा शब्दवापर चुकला आहे. मला रामानुजन यांचा हिडन अजेंडा आहे हे सुचवायचे नव्हते!
देव-श्रद्धांचा या निबंधाच्या संदर्भात तरी प्रश्न उद्भवतच नाही असे मला वाटते. रामानुजन् तसा उल्लेख करतच नाहीत - रामकथांमध्ये फरक आहेत हे ही ते गृहितच धरतात - त्याची सनसनाटी मांडणी करून त्यावरून मूळ कथेचा, किंवा मूळ पात्रांचा निकाल लावण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे अशा सेन्सिटिव्ह विषयांच्या विचारपूर्वक हाताळणीचा हा निबंध आदर्श उदाहरण आहे असे मला वाटते.
सहमत
सहमत.
>>संहितांमधले, प्रतींमधले, भाषिक वर्शन्समधले फरक पडताळणे, अंतर्विरोधांना समजून घेणे, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ व कारणे शोधणे, सर्व आलेच. आणि म्हणून, "मोठ्ठा गुंतागुंतीचा प्रकार" ही व्याख्या भारतीय संस्कृतीला चांगली लागू आहे - आणि हे गौरवास्पद आहे असे मी समजते.
मान्य.
माझे मत
चर्चेचा विषय आवडला. निबंध धावतपळत वाचला. अजिबात जड वाटला नाही. वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि धार्मिक परंपरांनुसार रामायणाची अनेक कथने (टेलिंग्ज़) उपलब्ध आहेत. ह्या कथनांवर रामानुजन ह्यांचा हा अभ्यासपूर्ण निबंध दिसतो. मला तरी राम-लक्ष्मण-सीता यांच्या दैवी रूपाशी कुठलाही संबंध दिसला नाही. विवाद्य असे काही आढळले नाही. अहल्येसंबंधीची दोन्ही वर्जने मी ह्यापूर्वीही वाचली होती. असो. लोकांना काय आवडते किंवा नावडते ह्यावरून अभ्यासक्रमात काय असावे हे ठरवायला नको. उदा. अहल्येला गौतम ऋषींच्या रूपात इंद्र आला आहे माहीत असून ती रत होते हे काहींना कदाचित आवडणारे नसावे. पण असल्या अभाविपच्या गुंडांना घाबरून हा निबंध अभ्यासक्रमातून काढून टाकणे योग्य नाही. एखादी पौराणिक कथा वेगवेगळ्या संस्कृतीतून, भाषांतून, परंपंरातून वावरताना तिच्यात होणारे सूक्ष्मातिसूक्ष्म बदल अभ्यासणे भारतीय संस्कृतीच्या इतिहासाच्या अभ्यासात असायला नको तर मग काय असायला हवे? असो. तूर्तास एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आपल्या अजेंडयाची वळकटी अडकवायला कोणतीहि खुंटी चालते.
निबंध वाचला. संपूर्ण पुस्तक वाचले नाही तरीहि हा निबंधसंग्रह निर्माण करण्यामागची विचारधारा समजण्यासाठी भाग १ चाळला. संग्रहाच्या संपादिका पॉला रिचमन ह्यांच्या शब्दात ती अशी आहे:
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइ
तदनंतर रामानुजन् ह्यांचा निबंध वाचला. त्यावर आधारित अशी माझी पुढील उत्तरे रोचनाबाईंच्या प्रश्नांना उद्देशून आहेत.
१. निबंधाचा युक्तीवाद काय आहे? धार्मिक भावनांशी, किंवा राम-लक्ष्मण-सीता यांच्या दैवी रूपाशी त्याचे काय संबंध आहेत?
युक्तिवाद असाच दिसतो की देशकालानुसार आणि लिहिणार्यांच्या श्रद्धांनुसार रामायणाची गोष्ट बदलत आलेली आहे. राम-लक्ष्मण-सीता ह्यांचे दैवी स्वरूप अबाधित ठेवूनहि त्या स्वरूपाचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळया निर्मात्यांनी लावले आहेत. रामायणाकडे श्रद्धेने पाहणार्यांच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा प्रयत्न कोठेच दिसत नाही कारण धार्मिक भावनांवर काही चर्चा करणे हा लेखाचा हेतूच नाही.
२. यात विवाद्य असे काही आहे काय? तो अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे असे तुम्हाला वाटते काय?
ह्यात विवाद्य काहीच आढळत नाही. सर्व निबंधाचे स्वरूप वस्तुस्थितीचे वर्णन करणे आणि ती स्थिति तशी का आहे ह्याची कारणमीमांसा करणे अशा स्वरूपाचे आहे. उदा. जैन परंपरेतील रामायण हिंदु परंपरेतील रामायणाहून वेगळे का आहे हे स्पष्ट करण्यासाठी जैन आणि हिंदु विचारातील सर्वमान्य अंतर हेच कारण दिले आहे. रामानुजन् ह्यांच्या शब्दात अभ्यासक्रमातून हा निबंध का काढला जावा हे कळत नाही. 'काय करायची ही कटकट? दुसरे शंभर निबंध पडले आहेत त्यातला एखादा लावा आणि शांतता स्थापन करा' असा establishment कडून बहुशः घेतला जाणारा path of least resistance प्रकारातील हा निर्णय दिसतो. (त्यांचेहि बरोबरच आहे म्हणा. त्यांना विद्यापीठ चालवायचे आहे. उद्या ह्या निबंधावरून वातावरण पेटले आणि परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत तर आपण त्यांनाच दोष देणार! त्या बिचार्यांनी करावे तरी काय? 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी त्यांची स्थिति आहे.
३. हा लेख कॉलेजात इतिहास ऑनर्स शिकणार्या मुला-मुलींना, व त्यांना शिकवणार्या दिल्ली विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांमा खूप जड जाण्यासारखा आहे का?
विद्यार्थ्यांना हा निबंध जड वाटत असेल तर नवनीत कॉमिक्सद्वारा त्यांना इतिहास शिकवावा किंवा त्यांनी विद्यापीठाची पदवी मिळवण्यामागे आपली बालबुद्धि व्यय न करता आपल्याला पेलेल असा सोपा व्यवसाय शोधावा. प्राध्यापकांनाहि जड वाटत असेल तर विद्यापीठे बंद करून टाकावीत.
४. निबंध वाचल्यावर तो "भारतीय संस्कृती: एक ऐतिहासिक अभ्यास" नामक कोर्स मध्ये योगदान काय असू शकेल? असे लेख वाचून भारतीय संस्कृतीच्या इतिहासाबद्दल काय शिकायला मिळू शकेल?
संस्कृति ही मृत वस्तु नसून नित्य वर्धिष्णु असते आणि देशकालानुरूप ती कशी वेगवेगळी भासते ह्याचे दर्शन अशा लेखातून होते.
५. एखाद्या लेखातील मजकूर आणि लेखकाचा युक्तीवाद कसा समजून घ्यावा? कॉलेजात निबंध वाचणे म्हणजे नेमके काय करणे अभिप्रेत असते?
प्रश्नाच्या पहिल्या भागाला काय उत्तर देणार? दुसर्याबद्दल असे म्हणता येईल की परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे ते असा निबंध स्वत: लिहिण्यायोग्य स्वतःची प्रगति करवून आणणे अशा अनेक गोष्टी अभ्यासकाच्या इच्छा आणि विचारक्षमता ह्यांनुसार करता येतील.
६. एखाद्या लेखातील, पुस्तकातील मजकूर व तर्क न पटल्यास, विवाद्य वाटल्यास, काय करावे?
ह्याचे उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. विचारी व्यक्ति उलटया विचारांचे दर्शन घडवणारा स्वतःचा निबंध लिहील. राडा केल्यानेच प्रश्न सुटतो असे गृहीतकृत्य मानणारे राडा करतील. ही दोन टोके झाली. बहुसंख्य काहीच करणार नाहीत.
७. निबंध व कोर्स काढून टाकण्याने काय सिद्ध होते? हा फक्त राजकारणाचा भाग आहे, की अभ्यासक्रमातून मजकूर काढून घेण्याला सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व देखील आहे?
सिद्ध काय होते हे मी वर लिहिलेच आहे. ते इतकेच की विद्यापीठ चालविणार्या pragmatism चांगला कळतो. Discretion is the better part of valor ह्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. आपल्यावर सध्या कोणतेच उत्तरदायित्व नसल्याने आपण येथे जे लिहीत आहोत त्यांना पटतच नाही किंवा माहीतच नाही असे आपण म्हणू शकत नाही. त्यांची compulsions वेगळी आहेत हे उघड आहे. निबंध अथवा कोर्स काढून टाकला ह्यातून मी विद्यापीठीय अधिकार्यांच्यावर राजकारण केल्याचा आरोप करणार नाही. पण असेहि दिसते की काही गटांना राजकारण करायला काहीतरी सबब लागते ती ह्या निबंधातून त्यांना मिळाली. तो ह्या निबंधाचा काही स्वयंभूत दोष आहे असेहि नाही. ज्यांना राजकारण करून हिंदुत्ववादी अजेंडा येन केन प्रकारेण पुढे रेटायचा आहे त्यांना अन्यहि कारणे शोधता किंवा manufacture करता येतात. ह्या प्रकरणात कारणे manufacture केलेली आहेत असे स्पष्ट दिसते. निबंधाच्या विरोधकांचे grievances दिल्ली उच्च न्यायालयासमोरील याचिकेवरून स्पष्ट दिसून येतात. पहा:
http://hindutva97.blogspot.com/2008/05/indian-judiciarys-savage-attack-o...
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइइइ
अर्थाचा अनर्थ करणे, वेड घेऊन पेडगावला जाणे अशा अनेक युक्त्या वापरून हे तथाकथित grievances manufacture करण्यात आलेले आहेत. वानगीदाखल त्यातील काहींचे परीक्षण करतो. हनुमानाला लेखात tiny monkey असे संबोधून हनुमानाचे 'चारित्र्यहनन' करण्यात आले आहे. आता हे वर्णन एका पारंपारिक लोककथेचा भाग म्हणून तेथे आलेले आहे. मूळ लोककथेमध्ये हेच वर्णन कसे केले आहे हे आपणांस ठाऊक नाही. पण हनुमानाचे आपल्या डोळयासमोरील चित्र महाकाय आणि शक्तिमान् असे असल्यामुळे त्याला ह्या गोष्टीच्या इंग्रजीकरणामध्ये तुम्ही tiny, small, minuscule, diminutive असे काहीहि म्हटले तर 'तू नाही तर तुझ्या काकाने' अशा प्रकारची सबब शोधणार्यांना त्यात दोषच दिसणार. (रामानुजन् ह्यांनी stature-challeged असा politically correct शब्दप्रयोग केला असता तर ह्या आरोपात तरी ते अडकले नसते असे वाटते!) रावणाला दिवस गेले आणि त्यातून सीता जन्मली ह्या 'विपर्यासा'चे खापर लेखाच्या माथी मारण्यात आले आहे. वस्तुतः त्या गोष्टीचे जनकत्व कन्नड लोककथेकडे आहे पण याचिकेमध्ये ते लेखाकडेच देण्यात आले आहे, जणू काय रामानुजन् ह्या हिंदुद्वेष्टया व्यक्तीने रावणाचे 'चारित्र्यहनन' करण्यासाठी बुद्ध्याच ही कपोलकल्पित कथा रचली आहे. इंद्राचेहि 'चारित्र्यहनन' असेच अहल्येच्या गोष्टीमधून केले गेले आहे असा दावा करण्यात आला आहे. वस्तुतः आपल्या अन्य देवांप्रमाणेच इंद्रहि कधीकधी स्खलनशील आणि देवादिकांना न शोभणारे वर्तन करणारा असाच देव आहे. अहल्येबरोबर त्याने संग केला ही गोष्टहि आपल्या पौराणिक परंपरेचाच भाग आहे. (ह्यावरून एक श्लोक आठवतो: शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी| विचारवान्पाणिनिरेकसूत्रे स्वानं युवानां मघवानमाह|| तरुण कुत्राप्रमाणे इंद्राने गौतमाच्या धर्मपत्नीला भ्रष्ट केले म्हणुन विचारी अशा पाणिनीने श्वान, तरुण आणि मघवान इंद्र ह्यांना एकाच सूत्रात गोवले आहे.) अशी ख्याति असलेल्या इंद्राचे हि कथा पुनः सांगण्याने काय नवे चारित्र्यहनन होणार आहे?
असे वाद पूर्वीहि झाले आहेत आणि पुढेहि होतील एव्हढेच म्हणून हा लांबलेला प्रतिसाद आवरता घेतो.
अखेर एक अवांतर. निबंधलेखकाचे नाव 'रामानुजन्' असे आहे, 'रामानुजम' नाही.
अरविंद कोल्हटकर,
माझी उत्तरे
वेगवेगळ्या रामकथा, त्यांतील साम्ये आणि भेद यांचे विश्लेषण आहे. प्रभावी लोककथा-परंपरा म्हणजे कथानकाच्या "भूमिती"त लक्षणीय साम्य असलेल्या पण स्थल-काल-कथाकरी यांच्या नीती-रूढी-सौंदर्यकल्पनांच्या अनुसार (कधीकधी भरपूर) फरक असलेल्या कथनांचा संच असतो. धार्मिक भावना किंवा राम-लक्ष्मण-सीता यांच्या देवत्वाचा गौण उल्लेख आहे. म्हणजे कंपन (?कंबन?) याच्या तमिळ रामायणाच्या रचनेच्या काळात "भक्ती"ची संतपरंपरा चालू होती, वाल्मिकीच्या काळात नव्हती, त्या अनुषंगाने त्यांच्या कथेत फरक आलेला आहे. जैनांच्या कथेत रावण मुळात चांगला, पण एका पातकामुळे पतित आहे... वगैरे.
काहीही विवाद्य नाही. अभ्यासक्रमासाठी सुयोग्य आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना भारतातील वेगवेगळ्या प्रादेशिक कथांचा समन्वय साधायचा आहे, त्यांच्यासाठी उपयोगी निबंध आहे. (दुर्गाबाई भागवतांनी वाल्मिकी रामायण आणि माडिया-गोंडांचे रामायण यांच्यामधील साम्य-फरक सांगितले आहेत. ते लिखाण सुद्धा याच पठडीतले आहे.)
जड जाऊ नये.
वरील उत्तरे क्रमांक १ आणि २ बघावीत.
हा प्रश्न थोडा जास्तच व्यापक आहे. या चर्चेच्या अंतर्गत त्याचे उत्तर थोडक्यात काय द्यावे, ते मला कळत नाही.
लेखी खंडन करणारा निबंध लिहावा. ज्यांना निबंध पटला आहे, त्यांच्याशी संवाद किंवा विवाद करून तोंडी खंडन करावे. लेखातील संशोधन त्या विषयाच्या संशोधनाच्या चौकटीला धरून नसेल - म्हणजे जे संदर्भ दिले आहेत तसे संदर्भ मुळात उपलब्धच नसतील, कंबनच्या किंवा कृत्तिवासाच्या रामायणातले संदर्भ त्या-त्या ग्रंथांत मसून ते खोटेच दिले असतील तर - तर तो निबंध शिकवण्यास लावू नये.
दिल्लीतच्या अभाविपच्या छात्रांना वेगवेगळ्या रामकथांच्या साहित्यिक इतिहासाबाबत शिकायचे नाही, असे सिद्ध होते. त्यांनी "इतिहास" या शाखेत या बाबतीत शिकूसुद्धा नये, हे ऍकॅडेमिक कौन्सिलच्या सदस्यांचे बहुमत आहे, असे सिद्ध होते. (तरी बरे, निबंधात वाल्मिकी आणि तुलसी यांच्या रामायणांमधील फरकांची चर्चा नव्हती. दिल्लीमध्ये बहुसंख्य हिंदीभाषक विद्यार्थी असतील, असे वाटते. परंतु बहुधा निबंध न-वाचताच बहुतेक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असावे. त्यामुळे "वाल्मिकी आणि तुलसी यांच्या रामायणात फरक आहेत" या तोकड्या साउंड-बाईटनेच काही लोक भडकतील.) सांस्कृतिक/कायदेशीर महत्त्व असे, की सरकारी संस्थांकडून "अमुक पंथाच्या कथा म्हणजे प्रमाण हिंदू कथा" असे मान्य केले जाते आहे.
(खरे तर प्रमाण परंपरा म्हणजे माझ्या कुटुंबात सांगितलेल्या कथांची आहे. त्यातही माझ्या पैतृक कुटुंबातल्या कथांमध्ये काही दोष होते, आणि माझ्या मातृक कुटुंबातल्या कथांमध्ये काही दोष होते. परंतु माझ्यापर्यंत पोचलेल्या कथांमध्ये समन्वयामुळे सर्वच दोष नाहिसे झाले आहेत. ते कंबन आणि तुलसीदास आणि कृत्तिवास गावंढळ लोक होत, हे तमिळ, पुरभैया आणि बंगाली लोकांच्या हास्यास्पद उच्चारांमुळे आणि शिमगा साजरा न-करण्यामुळे सिद्धच आहे. पण त्या सगळ्या प्रादेशिक लोकांच्या व्होटबँकचे राजकारण... नाहीतर त्या करामकथा कशा आणि किती चुकलेल्या आहेत, असा कोर्स भारतातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेत शिकवायला हवा.)
शेवटचा मुद्दा..
...उत्तम! :-)
दोन पैसे
निबंध चाळला. प्रस्तावात विचारल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे न देता एक-दोन मते मांडून ठेवतो. रामानुजन् यांनी त्यांचा उद्देश सुरूवातीला स्पष्ट केला आहे. '...how these hundreds of tellings of a story in different cultures, languages, and religious traditions relate to each other: what gets translated, transplanted, transposed. (तिरपा ठसा माझा)
रामायण इतिहास नसले तरी रामायणाच्या कथेचा इतिहासकालीन प्रवास हा इतिहास आहे. तेव्हा इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी हा निबंध अभ्यासायला हवा. प्राध्यापकांना हा विषय शिकवायला जड जात असल्यास आश्चर्य वाटणार नाही. पण त्याची कारणे भारतात ह्युमॅनिटीजच्या अभ्यासक्रमांची झालेली दुर्दशा आहे, निबंधाची जटीलता नाही. महाविद्यालयांत इतिहास, साहित्य वगैरे शिकवणारे काही निर्बुद्ध लोक चांगलेच पाहण्यात आहेत.
कॉलेजात माहिती आणि कौशल्य या गोष्टीही असायला हव्यात पण मूख्यतः एखाद्या विषयाकडे टिकात्मक दृष्टीकोनातून (क्रिटिकली) कसे पाहावे हे शिकवले जावे. तशाच प्रकारचे निबंधही असावेत. इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विचारांना विशेष संरक्षण दिले जावे. पाच-पंचवीस जणांनी मिळून काही हिंसक कृत्य केल्याने पुस्तक किंवा अभ्यासक्रम निबंधातून काढणे यामुळे चुकीचे पायंडे पडतात. भारतात याविषयी आधीच आनंदी-आनंद असल्याने ऍकॅडमिक काउन्सिलच्या निर्णयाचे फारसे आश्चर्य वाटले नाही. पुस्तक काढून टा़कणे किंवा निबंध वगळणे हे सोपे मार्ग आहेत. अशा अनेक सोप्या नजिकदर्शी (मायॉपिक) निर्णयांमुळे भारतात कला शाखेतील अभ्यासक्रमांची वाट लागलेली आहे तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येत आहे.
माझे थोडे विचार
निबंध वाचलेला नाही, चाळला आहे. पण हेडिंग्जवरून निबंध वाचायला आवडेल असे वाटते.
अभाविपच्या विद्यार्थ्यांचे वागणे अक्षम्य आहे हे नक्कीच.
माझ्या मते असा विरोध का होतो? तर न वाचता (आत्ता मी करते आहे तसे!) लोक मते ठरवून टाकतात. वाचायचे कष्ट नकोत. आणि त्यापुढे म्हणजे नुसते मत नव्हे तर त्यावर कृतीही करतात.
पण त्याहून महत्त्वाचे असे की लोकांना (अगदी विश्वविद्यालयातील तरुणांनाही) क्रिटिकल थिंकींगची सवय लागलेली नसते. सवय नसताना नवीन विचार मांडणे हे परंपरागत समजुतींना जोरदार धक्का लावण्यासारखे असते. माझे मत शाळेपासून ही सवय लागली, तर मोठेपणी समजुतीत बदल घडून येण्यास त्रास होणार नाही. (अर्थात प्राध्यापकांकडे यासाठी वेळ नसतो असे वाटते. ) प्राध्यापकांनी असे निबंध लावण्याचे काम करायलाच पाहिजे.
मात्र अजून एक - (इथल्या काहींना हा दृष्टीकोन पटणार नाही पण) तुलसी किंवा वाल्मिकी रामायण हे आपण मराठी मुलुखात वावरलेल्या लोकांना लक्षात येणार नाही पण अनेक हिंदू सुशिक्षित धर्मियांनाही अतिशय जवळचे वाटते हे माझ्या अलिकडच्या एका अनुभवावरून सांगते आहे. अशा हजारोंच्या समजुतींना धक्के मारण्याचे काम होत राहिले पाहिजे, पण ते करताना प्राध्यापकांनी आपल्या आयवरी टॉवरमधून थोडे जमिनीवरही यावे. रस्त्यावरच्या माणसाचा विचार हा आमच्या साहित्याला तेवढी नावे ठेवता, मग बाकीच्यांच्या साहित्याला का नाही, असा असतो. आपल्यावरच तेवढा अन्याय होतो आहे ह्या भावनेचा हा एक पदर या गुंडपणामागच्या काहीशा साध्या, चिडक्या भावनेत असतो. म्हणून अशा प्रकारचा विविध ऐतिहासिक काळांमधल्या आणि धर्मांमधल्या साहित्याचा अभ्यास विश्वविद्यालयांमध्ये नियमितपणे लावत गेल्यास तर असे मारण्याचे-धक्काबुक्कीचे प्रकार कमी होत जातील असा माझा भाबडा आशावाद आहे. तसेच क्लासमध्ये विविध विचारांचे असे नुसते तटस्थ समालोचन होऊन चालणार नाही, तर असे तटस्थ समालोचन होते आहे याचे सतत प्रदर्शनही करावे लागेल असेही वाटते. :)
कोर्स काढून टाकण्याचा कौन्सिलचा निर्णय हा शहाणपणाचा वाटत नाही.
Prof Pramesh Ratnakar, who teaches History at the Deen Dayal Upadhyay college, also expressed unhappiness over the issue.
"Scholars like Ramanujan are world renowned. If they have come up with an argument, you don't just throw it out because it is inconvenient to you politically," he said.
असे विचार लोकांपर्यंत पोचत राहिले तर बरे होईल.
वाह!
मस्त, विचारपूर्वक प्रतिसाद. सर्वांचे आभार. मूळ लेखाबद्दलही चर्चा झाली तर फार आवडेल. रामानुजन् यांच्या बद्दलही तेच म्हणते. तूर्तास काही विचार-उत्तरेः
@विनायक गोरे:
"त्या" व "आपल्या" चा संदर्भ लागला नाही. पन अनेकांनी सांगितल्याप्रमाणे निबंध रामायणाला इतिहास ठरवत नाही, तर रामकथेच्या ऐतिहासिक प्रवासावर आहे. वेळ मिळाल्यास निबंध जरूर वाचावा.
@ प्रमोद व अर्विंद:
निबंध अन्य संशोधकांना समोर ठेवून लिहीला गेला असला तरी डी-यू सारख्या संस्थेच्या ऑनर्स विद्यार्थ्यांना तो जड जाऊ नये हे उघड आहे. मी प्रश्न #३ टाकला होता, कारण विश्वविद्यालयानेच नेमेलेल्या एका तज्ञसमितीच्या सदस्याने प्राध्यापक, खासकरून बिगर-हिंदू शिक्षक, मुलांना निबंध व्यवस्थित शिकवू शकतील की नाही याबद्दल शंका दर्शविली होती.
बाकी कॉमिक्स बद्दल :-) असेच चालू राहिले तर ती परिस्थिती फार लांब नाही असेच समजावे लागेल.
@चित्रा & क्रेमर
क्रिटिकल वाचनाबद्दल १००% सहमत, आणि आयवरी टॉवरवरून उतरण्याबद्दलही. निबंध वाचणे म्हणजे नक्की काय, त्यातील माहितीमांडणी कशी समजून घ्यावी, लेखात कुठल्या मजकूराचे समर्थन आहे, कुठले विधान फॅक्ट म्हणून मानले आहे - हे सगळे सूक्ष्मरित्या ओळखणे खूप आधीपासून शाळेत शिकवले गेले पाहिजे. मुलांना प्राथमिक साधने वाचून त्यांबद्दल स्वत:चे विचार आणि तर्क मांडायला, ते लिहून काढायला शिकवले पाहिजे. म्हणजेच पानावर दिसते ते, आणि त्यामागचा विचार यामध्ये फरक करायला जमते. पण आपल्या शिक्षण तत्त्वांमध्ये, खासकरून मानवविद्या शाखांमध्ये "टेक्स्टबुक कल्चरचे" - म्हणजे मोजका मजकूर पाठ करणे व मूक गिळून परीक्षेत पेपरावर ओकणे - राज्य आहे, तोवर क्रिटिकल वाचन किंवा क्रिटिसिझम म्हणजे निंदा किंवा अवहेलना हाच अर्थ निघेल. पुस्तकात अखादा उल्लेख केला म्हणजे त्याचे समर्थनच आहे ही कल्पना चालूच राहील. या केसमध्ये असेच झाले आहे हे अरविंद यांनी दिलेल्या उतार्यावरून स्पष्ट दिसते.
मुद्यानुसार
१. निबंधाचा युक्तीवाद काय आहे? धार्मिक भावनांशी, किंवा राम-लक्ष्मण-सीता यांच्या दैवी रूपाशी त्याचे काय संबंध आहेत?
~ विविध संस्कृतीमध्ये [वा भाषांमध्ये म्हणू या हवेतर] "दैवत" गणल्या गेलेल्या व्यक्तीरेखांकडे कोणत्या भावनेने पाहिले जाते याचा साधार घेतलेला आढावा त्या निबंधात रामानुजन मांडतात. वाल्मिकी जे मांडतात तसे जर कंपन यानी तामिळमध्ये मांडले नसेल तर ते तसे का आहेत याचा उलगडा इंग्लिशमधून व्हावा असाही एक युक्तीवाद होऊ शकतो. आज आपण विविध माध्यमातून रामायण-महाभारतांचे वाचन करून आपापल्या मगदुराप्रमाणे अर्थ लावू शकतो, पण एक काळ असा होता की केवळ मौखिक माध्यमातूनच त्यांची महती पसरवली जात असल्याने, जितके सांगणारे तितक्या वेगवेगळा प्रवृत्ती आणि मग त्याचे इंटरप्रिटेशन कसे करायचे हे त्या त्या काळातील जनपदच ठरवीत आला असल्याने त्या त्या मातीतून लिखित स्वरूपात त्याची रुपे प्रकटली आहेत. उत्तर भारतात इन्द्राच्या अंगावर शापामुळे सहस्त्र अक्ष निर्माण झाले याच्यापुढे त्या शापाची व्याप्ती गेलेली दिसत नाही, पण कंपन म्हणतात त्याप्रमाणे प्रथम त्या सहस्त्र योनी होत्या, मग उ:शापाने अक्ष झाले. महाकाव्याच्या संदर्भात अशा उपकथा असणे वावगे वाटत नाही. धार्मिक भावना वाचनाभोवती गुंडाळूनच जर त्या घटनाकडे पाहाण्याचे ठरले तर मग कथानकाकडे निर्लेपतेने पाहता येणे अवघड आहे. राम-लक्ष्मण्-सीता याना "पूर्ण देव" न मानण्याकडेही बर्याच विद्वानांचा कल आहे हे स्पष्टच आहे. या तिघांचाही मानवयोनीप्रमाणेच पृथ्वीवरच अंत झाल्याचा दाखलाच असल्याने याना 'देव' मानू नये असाही सूर निघतो. मग तसे असेल तर त्यांच्याविषयीच्या लेखनामुळे आपल्या भावना कोणत्या सीमेपर्यंत् दुखवून घेणे गरजेचे आहे हेही समजून येते. या निबंधाने ते साध्य होते असे माझे मत आहे.
२. यात विवाद्य असे काही आहे काय? तो अभ्यासक्रमातून काढून टाकला पाहिजे असे तुम्हाला वाटते काय?
~ नाही. काहीही विविद्य नाही. हनुमानाला "टायनी मंकी" म्हटले गेले ते पाताळात आणि तेही पिशाच्चांकडून. मग पाताळ नामक संस्था आपल्या हिंदू संस्कृतीला मान्य असेल तर मग तेथील संस्कृतीनुसार अचानक समोर आलेल्या त्या वानराला, जो अगदी बिंदूएवढा दिसतो, "लहान मर्कट" म्हणणार हे गृहीत धरले गेले पाहिजे. असा भाग अभ्यासक्रमातून टाकला म्हणजे पाताळलोकात मारूतीचा मारुतराव होईल अशा भ्रमात राहू नये.
३. हा लेख कॉलेजात इतिहास ऑनर्स शिकणार्या मुला-मुलींना, व त्यांना शिकवणार्या दिल्ली विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांमा खूप जड जाण्यासारखा आहे का?
~ दिल्लीचा उल्लेख केला आहे म्हणून सांगतो की, दिल्ली विद्यापीठातील इतिहासच का पण कोणत्याच फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला हा लेख जड जाणार नाही, इतकी राजधानी सक्षम आहे. विद्यापीठातील संबंधित् शिक्षकाना [त्यातही अहिंदू] हा निबंध मनापासून शिकविणे काहीसे जड गेले असणार (आता तो निबंधच काढून टाकल्याने या मुद्याचे तसे प्रयोजन राहिलेले नाहीच) हे नक्कीच. त्यालाही या प्रश्नाला राजकीय डूब तेथील राजकारणाने दिली असल्याने. लक्षात घेणे आवश्यक आहे की अभाविपच्या डीयू शाखेने ज्यांच्या केबिनमध्ये घुसून गुंडागर्दी केली ते प्राध्यापक मुस्लिम होते. त्यांच्या दृष्टीने हा निबंध शिकविणे केव्हाही जड जाणारीच घटना असणार.
४. निबंध वाचल्यावर तो "भारतीय संस्कृती: एक ऐतिहासिक अभ्यास" नामक कोर्स मध्ये योगदान काय असू शकेल? असे लेख वाचून भारतीय संस्कृतीच्या इतिहासाबद्दल काय शिकायला मिळू शकेल?
~ निर्लेप मनाने इतिहासाबद्दल शिकावेच आणि विद्यापीठ परीक्षा झाल्यानंतर वाटल्यास स्वतंत्रपणे त्या विषयावरील सखोल संशोधनाबाबत विचार करावा. भारतीय संस्कृतीचा इतिहास हे एक अगम्य असे गूढ आहे आणि कॉलेजच्या परीक्षेत १०० मार्क्ससाठी त्याचा अभ्यास करून तुम्ही संस्कृतीचा खर्या अर्थाने मागोवा घेऊ शकत नाही ही बाब समजली तरी इतिहास दिशाकडे जाण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल.
५. एखाद्या लेखातील मजकूर आणि लेखकाचा युक्तीवाद कसा समजून घ्यावा? कॉलेजात निबंध वाचणे म्हणजे नेमके काय करणे अभिप्रेत असते?
~ मी रामानुजन याना मानतो पण या निबंधातील तर्काबाबत मला शंका आल्यास मी त्या अनुषंगाने या क्षेत्रातील अन्यांकडून - जे युनि.क्युरिक्युलमशी संबंधित नाहीत - समजून घेण्याचा यत्न करीन, रेफरन्सेस् शोधीन. वेळप्रसंगी, संबंधित लेखक हयात असेल तर, त्यांच्याशी पत्र-फोनद्वारे संपर्कही साधेन. मी टीचिंग फिल्डमध्ये नसल्याने वरील मुद्यातील दुसर्या भागाविषयी अधिकृतपणे टीपण करू शकत नाही, तरीही मी असे एकदोन वरीष्ठ पातळीवरील प्राध्यापक पाहिले आहेत जे इतिहासावरील निबंध वा चर्चा अत्यंत दिलखुलासपणे करीत असत. विद्यार्थ्यांनी सिलॅबसबाहेरील विचारलेल्या शंकांचेही ते तितक्याच समर्थपणे निरसन करीत. प्रसंगी अवांतर वाचनासाठी विद्यापीठ ग्रंथालयातून चांगली पुस्तके स्वत:च्या नावे देत असत.
६. एखाद्या लेखातील, पुस्तकातील मजकूर व तर्क न पटल्यास, विवाद्य वाटल्यास, काय करावे?
~ म्हणजे नेमके तुम्हाला काय अभिप्रेत आहे इथे, हे समजले नाही. तर्क न पटल्यास वर्गात प्राध्यापकासमवेत वाद घालता येईल एखाद्या मुद्द्यावरून. पण लेखकासमवेत अधिक खुलाशासाठी फक्त पत्ररूपानेच संवाद साधू शकेन. वार्षिक परीक्षेच्यासमयी त्या भागावर लिहिणे अपेक्षित असेल तर शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मग तिथे जे तर्कट मांडले आहे त्याच्या अनुषंगानेच उत्तर पानावर येईल. नाईलाज आहे.
७. निबंध व कोर्स काढून टाकण्याने काय सिद्ध होते? हा फक्त राजकारणाचा भाग आहे, की अभ्यासक्रमातून मजकूर काढून घेण्याला सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व देखील आहे?
~ राजकारणाचाच भाग आहे हे मी पहिल्या प्रतिसादात लिहिले आहेच. त्या दडपशाहीला विद्यापीठातील कौन्सिल बळी पडले ही दुर्दैवाची गोष्ट.
त्या निबंधाला विरोध झाला तो योग्यच!
निबंध सुरवातीला व्यवस्थित वाचला नंतर कंटाळा आला म्हणून वरचेवर नजर फिरवली. श्री. रामानुजन ह्यांनी केवळ वेगवेगळ्या भाशेत वा प्रांतात वेगवेगळे रामायण-व त्यातील कथा वेगवेगळ्या कशा आहेत ह्यावर निबंधातून आपले कश्ट सादर केले आहेत. मला ते सगळे निरर्थक वाटले. त्या निबंधाचा महाविद्यालयातील पाठ्यक्रम होण्यास जो विरोध झाला त्यास माझे समर्थन आहे.
जास्त खाल्ले म्हणजे जास्त रक्त, मास इत्यादी तयार होत नाही.
जास्त माहिती मिळवली म्हणजे ज्यास्त कळते असे होत नाही.
अगदी तसेच वेगवेगळ्या छटा असलेल्या रामायणांचा अभ्यास केला म्हणजे त्यातून जास्त काहि कळेल असे होणे नाही.
रामानुजन ह्यांनी त्यांच्या लेखातून त्यांनी जी विविध माहिती मिळवली त्यातून काही समान नियम शोधत, हुडकत जे माहित नसलेले असे व जे आजपावेतो गुढ असलेली रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांचा लेख रहस्यांचा उबंरठा ओलांडून पुढे जात नाही, तो तिथल्या तिथेच घुटमळत राहतो. अशा 'उंबरठ्यातच घुटमळणार्या' लेखाचा अभ्यास कशासाठी करायचा?
इतिहासात महेश्वरी संकेतपद्धतीतून विकसित झालेल्या ब्राह्मी लिपीच्या वापरातून ह्या भारत देशात लिहीण्याची पद्धतीत एक सामाईकता प्रस्थापित झाली होती व कालांतराने त्या सामाईकतेत विविधता येण्याने वेगवेगळ्या लिपी ह्या देशात विकसित झाल्या. अगदी तसेच रामायण, महाभारत या अशा महाकाव्यांचे झाले असावे. लिपींच्या वैविध्यतेचा आभ्यास कॅलिग्राफीमध्ये होतो, काव्यांच्या वैविध्यतेचा अभ्यास कोणत्या शाखेत होतो? विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करून काहि उपयोग आहे कां?
ऍलिस आणि हनुमान
अवांतर: निबंधातील अंगठी शोधायला गेलेल्या हनुमानाचे वर्णन वाचून सशामागे त्याच्या बिळात गेलेली ऍलिस आठवली.
रामानुजन् सुरूवातीला म्हणतात: He (Hanuman) had the power to become the smallest of the small and larger than the largest thing. मग नंतर त्याला जेवणाच्या ताटात ठेवल्यावर तो मोठा का होत नाही? असा प्रश्न पडला.
वाल्मिकी रामायण: ग्रिफिथ प्रत
अहिल्येच्या पातिव्रत्याविषयी थेट ग्रिफिथ प्रतीत जाऊन पडताळता येते. पण इंद्राचे अंडकोष जमिनीवर पडणे वगैरे* सापडत नाही. रामानुजन् यांनी दिलेल्या संदर्भसूचीत त्यांनीच भाषांतरीत केलेले पुस्तक आहे. इंद्राच्या गोष्टीचा स्वतंत्रपणे कुणी पडताळा केला आहे का?
*ग्रिफिथ प्रतितील ओळी
Because my form thou hast assumed,
And wrought this folly, thou art doomed,
For this my curse to thee shall cling,
Henceforth a sad and sexless thing'
No empty threat that sentence came,
It chilled his soul and marred his frame,
His might and godlike vigour fled,
And every nerve was cold and dead.
बालकाण्ड १-४८-२८ व २९
(विकीसोर्सवरून बालकाण्डातले ४८वा सर्ग)
मम रूपम् समास्थाय कृतवान् असि दुर्मते ।
अकर्तव्यम् इदम् यस्माद् विफलस् त्वम् भविष्यति ॥१-४८-२८॥
वाईट मतीच्या! माझे रूप घेऊन तू न-करावेसे हे करता झाला आहेस - त्यामुळे भविष्यात तू विफल होशील. ("भविष्यति" ऐवजी "भविष्यसि" अधिक सहज होते. पण "भविष्यति"चासुद्धा अन्वय लावून घेता येतो.)
गौतमेनैवम् उक्तस्य स रोषेण महात्मना ।
पेततुर् वृषणौ भूमौ सहस्राक्षस्य तत्क्षणात् ॥१-४८-२९॥
महात्मा गौतमाने रागाने असे बोलता तत्क्षण सहस्राक्षाची वृषणे जमिनीवर पडली.
(जय महाजाल! पूर्वी अशी खात्री करून घ्यायला मला कित्येक दिवस लागले असते, आणि बहुतेक करून मी प्रयत्नही केला नसता. मात्र विकिसोर्सवरील पाठ्याचे प्रूफरीडिंग करायला हवे... काही शुद्धलेखनाच्या चुका असाव्यात असे वाटले.)
ग्रिफिथने भावार्थ सांगण्याचे ठरवले, आणि इंग्रजीसाठी नैसर्गिक असे यमके असलेले आयॅम्बिक टेट्रामीटर वृत्त निवडले आहे. "sad and sexless thing" म्हणजे "विफल"शी थोडेफार समांतर; आणि "marred his frame" हे वृषणे जमिनीवर पडण्याशी समांतर असावे. मात्र "this folly" "chilled his soul", "godlike vigour fled", "every nerve ... cold and dead" हे ग्रिफिथचे स्वतंत्र कवित्व आहे. भाव मुळातलाच आहे असे म्हणण्यास जागा आहे.
(ऋग्वेदाच्या भाषांतरासाठी मात्र ग्रिफिथने वृत्त-यमके नसलेली शैली निवडली. त्यात शब्दशः किंवा "शब्दप्रयोगशः" भाषांतर आहे. ऋग्वेदाचे भाषांतर संस्कृताच्या/भारतीय संस्कृतीच्या इंग्रजीभाषक अभ्यासकांसाठी होते, आणि रामायणाचे भाषांतर इंग्रजीभाषक रसिकासाठी होते, असे मला वाटते.)
ग्रिफिथ आणि विक्टोरिअन मानसिकता
ग्रिफिथकृत भाषांतर मूळ रामायणाशी ताडून पाहिले की आणखीहि काही गोष्टी जाणवतात.
पहिले म्हणजे हे शब्दश: केलेले आणि अन्य विद्वानांसाठी केलेले भाषांतर नाही तर सर्वसामान्य सुशिक्षित ब्रिटिशांना आवडेल असा रामायणाचे स्वैर रूपान्तर आहे. रूपान्तरासह मूळ संस्कृत रामायण जोडलेले नाही ह्यावरूनहि हे दिसून येते.
मला आणखी असेहि वाटते की लेखनाचा अपेक्षित वाचकवर्ग (उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गातील काही थोडेफार शिक्षण घेतलेले ब्रिटनमधील आणि अन्य इंग्रजीभाषिक लोक, हिंदुस्तानात सरकारी नोकरी वा अन्य व्यवसायासाठी आलेले तसेच लोक आणि अशा सर्वांच्या घरातील स्त्रिया) डोळयासमोर ठेवून हे रूपान्तर करण्यात आलेले आहे. राल्फ टी. एच. ग्रिफिथ स्वत: १८६१-७६ ह्या काळात बनारसच्या संस्कृत कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि रामायणाचे प्रस्तुत रूपान्तर १८७१-७४ ह्या वर्षात छापले गेले आहे. हा 'वि़क्टोरिअन काळा'चा मध्याह्नच मानला पाहिजे. आपले रामायणाचे रूपान्तर ह्या वाचकांच्या पसंतीस पडवयाचे असेल तर त्यामध्ये त्यांना आक्षेपार्ह वाटेल असे काहीहि येता कामा नये हे ओघानेच आले. ग्रिफिथ स्वैर रूपान्तर करीत असल्याने प्रतिश्लोक भाषान्तर द्यायची त्यांच्यावर जबाबदारी नव्हतीच. आणि म्हणून गौतमाच्या शापातील इंद्राची लैंगिक क्षमता नष्ट होणे आणि त्याची वृषणे जमिनीवर पडणे ह्यांचा अनुल्लेख ओघानेच आला. मूळ श्लोक आणि ग्रिफिथकृत स्वैर रूपान्तर ह्यांची तुलना केली की हा विक्टोरिअन 'चोरटेपणा लगेच लक्षात येतो. पहा:
मम रूपं समास्थाय कृतवानसि दुर्मते।
अकर्तव्यमिदं यस्माद्विफलस्त्वं भविष्यसि॥ १-४८-२७
गौतमेनेवमुक्तस्य सरोषेण महात्मना।
पेततुर्वृषणौ भूमौ सहस्राक्षस्य तत्क्षणात्॥ १-४८-२८
Because my form thou hast assumed,
And wrought this folly, thou art doomed,
For this my curse to thee shall cling,
Henceforth a sad and sexless thing.
तू 'विफल' म्हणजे 'मूल जन्माला घालण्यास अपात्र' झाला आहेस असे स्वच्छ न म्हणता ते केवळ सुचविलेले आहे.
ह्याच विचारपद्धतीचे दर्शन थोडे शोधल्यावर अजून एका ठिकाणी सापडले. पंचवटीमध्ये कपटवेषाने गेलेला रावण सीतेच्या शारीरिक सौदर्याचे वर्णन असे करतो:
समाः शिखरिणः स्निग्धाः पाण्डुरा दशनास्तव।
विशाले विमले नेत्रे रक्तान्ते कृष्णतारके॥ ३-४६-१८
विशालं जघनं पीनमूरू करिकरोपमौ।
एतावुपचितौ वृत्तौ संहतौ संप्रगल्भितौ॥ ३-४६-१९
पीनोन्नतमुखौ कान्तौ स्निग्धतालफलोपमौ।
मणिप्रवेकाभरणौ रुचिरौ ते पयोधरौ॥ ३-४६-२०
चारुस्मिते चारुदन्ति चारुनेत्रे विलासिनि।
मनो हरसि मे रामे नदीकूलमिवाम्भसा॥ ३-४६-२१
करान्तमितमध्याऽसि सुकेशी संहतस्तनी।
ह्या सर्वाचे रूपान्तर ग्रिफिथसाहेबांनी त्रोटकपणे इतकेच केले आहे:
Bright as the dazzling jasmine shine
Thy small square teeth in level line.
Like two black stars aglow with light
Thine eyes are large and pure and bright. 3-46-18
Thy charms of smile and teeth and hair
And winning eyes, O thou most fair,
Steal all my spirit, as the flow
Of rivers mines the bank below. 3-46-21
How bright, how fine each flowing tress! How firm those orbs beneath thy dress! That dainty waist with ease were spanned, 3-46-22 (a)
(श्लोकांचे आकडे मूळचे नाहीत. मुद्दा स्पष्ट कळावा म्हणून मी ते घातले आहेत.)
तत्कालीन वाचकाला उत्तान वाटेल असे सीतेच्या स्तनांचे इ. वाल्मीकिकृत वर्णन, म्हणजे श्लोक १९ आणि २०, संपूर्ण वगळण्यात आले आहेत.
धन्यवाद
ग्रिफिथ प्रतिच्या वेगळेपणावर प्रकाश टाकल्याबद्दल धनंजय आणि अरविंद यांचे अनेक आभार. याचिका दाखल करतांना असे भंपक आक्षेप का नोंदवले असावेत असे प्रथम वाटले पण मग अर्थातच लक्षात आले.
अजून एक नवा दृष्टिकोण
स्वपन दासगुप्तालिखित २३ ऑक्टोबर २०११ ह्या तारखेचा हा ब्लॉग आताच योगायोगाने पुढे आला. त्यामध्ये एक नवा दृष्टिकोण मांडला आहे असे वाटते.
विद्यापीठान्तर्गत अभ्यासक्रमात कोणतेहि पुस्तक prescribed reading म्हणून नेमणे योग्य का अयोग्य? असे करण्यामूळॅ दोन प्रतिस्पर्धी विचारधारांना आपले विचार prescribed reading च्या मार्गे विद्यार्थ्यांच्या गळी उतरविणे/त्यांना विरोध करून राजकारण साधणे हे करण्याची आयती संधि मिळते. कोठलेहि prescribed reading न ठरवता वेगवेगळया विचारांची अनेक पुस्तके suggested reading म्हणून नेमणे आणि त्यांचे आकलन विद्यार्थ्यांना कितपत साधले आहे ह्याची परीक्षा करणे हा मार्ग त्यात सुचविला आहे. ह्या मार्गाने गेल्यास तथाकथित progressive आणि reactionary असे दोन्ही विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले जाऊन शिक्षणाचे राजकारणीकरण कमी होईल.
प्रिस्क्राइब्ड रीडिंग
प्रिस्क्राइब्ड रीडिंग म्हणजे मुलांनी जे सत्य असे मानून घेतले पाहिजे ते, आणि सजेस्टेड म्हणजे वेगवेगळ्या मतप्रवाहातले लेखन, हा दासगुप्तांचा युक्तीवादच चुकीचा आहे. प्रिस्क्राइब्ड म्हणजे जे महत्त्वाचे, वाचलेच पाहिजे ते; ते एकाच मतप्रवाहाचे असावे, किंवा त्यातील सर्व मजकूर शिक्षकाला पटतोच, किंवा त्यात फक्त इतिहासाचे फॅक्ट्स असतात असे नसते. मुलांनी ते वाचून फक्त फॅक्ट्स पाठ केले की इतिहास समजला आणि कोर्सचे काम झाले असे ही नसते. विद्यापीठाने सर्वात महत्त्वाचे असे लेखलेले, जे तो विषय समजण्यास अवश्यक आहे, ते असते - त्यात परस्पर विरोध असू शकतात; असतातच. प्रत्येक लेखाची पार्श्वभूमी, जमेची बाजू, वीकनेसेस, हे समजावणे, मुलांना लेख क्रिटिकली कसा वाचावा हे शिकवणे शिक्षकाचे काम असते. ते नीट होत नसले तर वेगळी गोष्ट आहे, पण प्रिस्क्राइब्ड रीडिंग्ज काढूनच टाकून फक्त सुचविलेले लेखच नेमणे हे त्याचे सोल्यूशन होत नाही. सजेस्टेड यादीमध्ये सहसा लांबलचक, तोडेसे अवांतर पण रोचक, आणि जास्त तपशीलवार लेख नेमले जातात. दिल्ली विद्यापीठाचा माझा प्राथमिक परिचय नाही, पण दहा-बारा वर्षे वेगवेगळ्या इतिहासविभागात नोकरी करून माझा हा अनुभव आहे. दासगुप्तांना या पद्धतीची किती प्राथमिक, आणि किती ऐकीव ओळख आहे, हे माहित नाही.
प्रिस्क्राइब्ड लेखांद्वारा एकाच मतप्रवाहाचे लेख मुलांना मिळतात हे प्रथमदर्शनी तरी खरे नाही (दासगुप्तांचा नेहमीसारखाच कटाक्ष मार्क्सवादी इतिहासकारांवर आहे).दिल्ली विद्यापीठाचाच एन्शंट इंडियाचा सिलेबस पहा. मी या विषयात स्पेशलिस्ट वगैरे अजिबात नाही. पण प्रथमदर्शनी एसेंशियल रीडिंग मध्ये ए. एल्. बॅशम व नीलकंठ शास्त्री, के. पी अग्रवाल वगैरेंची नावे आहेत. ते मार्क्सवादी नव्हेत. उलट, कोसंबी या मार्क्सवादी इतिहासकाराला एसेंशियल व सजेस्टेड अशा दोन्ही याद्यांत जागा नाही! राजकीय एकसूरीपणापेक्षा यादी आर्केऑलॉजी, सांस्कृतिक, भाषिक भंडार, जागतिक स्थलांतराचा आढावा, लोह-युग, वेदकाल-बुद्धकाल, या विषयांची मुलांना ओळख करून द्यायचा उद्देश्य समोर ठेवून तयार केलेली दिसते. आता हे लोह-युग, त्याचे सामाजिक स्तरांशी आणि राजकीय सत्तेच्या प्रगल्भतेशी जडलेले नाते, गौतमाने वैदिक जीवनाची केलेली मीमांसा, इत्यादी विषय या कालाच्या आकलनासाठी महत्त्वाचे आहेत की नाही, हे ठरवायला हवे. विद्यापीठाने ते आहे, असे ठरवले आहे. इतिहासात हे विषय विशिष्ट राजकीय, वैचारिक प्रवाहांमुळे, घडामोडींमुळे आले आहेत. त्यातच मार्क्सवादीदेखील आहेत. म्हणून हा शिक्षणाच्या नावाखाली कोता राजकीय वर्चस्व दाखवण्याचा खेळ नव्हे. तसेच मध्ययुगीन भारताच्या, आणि आधुनिक भारताच्या अभ्यासातही मार्क्सवाद्यांच्या मुद्द्यांना हाणून पाडणारे बरेच नवीन लेखन वाचले व शिकवले जाते.
दासगुप्ता "कल्चर वार" ची टर उडवताहेत, पण ते या लढाईतले मुरलेले लढवय्ये आहेत!
दासगुप्तांच्या ब्लॉगाच्या निमित्ताने
दासगुप्तांच्या ब्लॉगावर दिल्ली विद्यापीठाच्या एका इतिहासाच्या विद्यार्थ्याने केलेली तक्रार मला चिंताजनक वाटली. सर जदुनाथ सरकार, आर. सी. मुजुमदार किंचा ए. एल्. श्रीवास्तव यांचे निबंध वाचनासाठी लावले जात नाहीत आणि रामानुजन यांचे लावले जातात असे त्या तक्रारीत म्हटले आहे. इतिहास म्हणजे नेमके काय? तर ज्या घटना घडल्या आहेत असे पुराव्यानिशी सांगता येते अश्या घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास. ही व्याख्या जर योग्य असेल तर रामानुजन यांचा निबंध बी. ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमात वाचनासाठी लावला जाण्याची तार्किक संगती कशी लावायची? रामायण इतिहास नाही. राम होऊन गेला ही फक्त हिंदूंची श्रद्धा आहे. त्याला पुरावे नाहीत. मग रामायणाच्या निरनिराळ्या आवृत्त्यांचा अभ्यास करणारा निबंध अभ्यासक्रमात लावूच नये का? तर जरूर लावावा, फक्त बी. ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमात नको. बी. ए. साहित्याच्या अभ्यासक्रमात चालेल. इतिहासाच्या कोर्समध्ये फक्त पुराव्यानिशी सिद्ध होणार्या घटनांशी संबंधित असेच निबंध लावावेत. अभाविपचा विरोध अर्थातच या मुद्द्यावर नाही, तर देवतांची टवाळी किंवा अपमानकारक उल्लेख असलेले निबंध इतिहासाच्या कोर्सला लावले जातात म्हणून आहे. कदाचित हे उल्लेख इतिहास म्हणून शिकवले जातात म्हणूनही विरोध असेल तर तो अयोग्य नाही असे मी म्हणणार नाही कारण विद्यापीठाने हा निबंध बी. ए. इतिहासाच्या अभ्यासक्रमाला लावून त्यांच्या हातात कोलीत दिले आहे. जर हा निबंध बी. ए. साहित्याच्या अभ्यासक्रमात लावला तर निदान चुकीचा इतिहास शिकवला जातोय या तक्रारीला जागा राहणार नाही.