इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ३)
नमस्कार.
ह्या पूर्वीचे भागः- भाग २ http://mr.upakram.org/node/3203
भाग् १ http://mr.upakram.org/node/3196
हा भाग तिसरा. तिसऱ्यावरून आठवलं इब्राहिमी धर्मही महत्त्वाचे तीन आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे प्रेषित ती
यहुदी/ज्यू (प्रेषित मोझेस), ख्रिश्चन ( प्रकटनकर्ता जीझस ) आणि इस्लाम ( अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर).
येशू क्रुसावर मारल्यावरही पुनर्जीवित झाला ते तीन दिवसांनंतरच.
सर्व प्रथम श्री प्रसन्न केसकर ह्यांचे आभार. ह्या आणि पुढच्या काही भागात जे मला मांडायचं होतं, त्यातला बराचसा भाग त्यांच्याकडे आधीच उपलब्ध होता, प्रचलित ज्यू- ख्रिश्चन मान्यतांशी अगदी जुळणारा असा तो आहे. मी तो पुन्हा एकदा इथे मांडतोय. त्यांच्याकडून घेतलेलं लिखाण हे इटॅलिक्स मध्य असेल. मला त्यात काही भर घालावीशी वाटली तर ती मी घालेन. मागील काही प्रश्न पुन्हा लिहितोय.
४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला?
ह्यात अजून थोडं लिहायला हवं होतं. बायबलचे भाग दोनः- ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट( जुना व नवा करार (देवाने मानव प्रतिनिधींसोबत केलेला)). ज्यू ओल्ड बायबलला प्रमाण मानत असले तरी त्यातील लिखाणाचे ३ विभाग त्यांनी केलेतः-
तौरात (दैवी सूचना व आदेश), नेविम (प्रेषित व भविष्यवेत्ते/मार्गदर्शक/sooth sayers) केतुविम (संकीर्ण लिखाण, घटना कथा ह्यांचा संग्रह)मात्र ख्रिश्चन हे वेगळे विभाग न मानता एकाच "जुन्या करार" ह्या विभागात त्याचा उल्लेख करतात.
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
हा प्रश्न असा मांडुयातः- आपल्या/सृष्टीच्या निर्मितीबद्दल ह्यांच्या काय कल्पना आहेत?
तर कल्पना अशी आहे की पूर्वी/सुरुवातीस सृष्टीनिर्माण होण्यापूर्वी दिवसही नव्हता. रात्रही नव्हती. प्रकाशही नव्हता. अंधारही नव्हता. आकाशही नव्हतं! जल, भूमी हे ही बनायचे होते. अगदी काहीच म्हणजे काहीच नव्हते. It was absolute NULL. फक्त अनादी अनंत ईश्वर तेव्हढा होता.
तर सृष्टीनिर्मितीबद्दल ही एक(तौरात मधील, जेनेसिस ह्या भागातील) कथा :-
प्रारंभी देवाने पृथ्वी निर्माण केली तेव्हा वायुरुप पृथ्वी अंधाराने वेढलेली होती आणि देवाचा आत्मा जलाशयांवर पाखर घालत होता. देवाने शब्द उच्चारले, `प्रकाश होवो' आणि प्रकाश अस्तित्वात आला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने अंधारापासुन प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला दिनसमय आणि अंधाराला रात्रसमय म्हणले. हे सर्व पहिल्या दिवशी घडले.
नंतर देवाने शब्द उच्चारले, 'जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि अंतराळामुळे वरचे वायुरुप जलाशय आणि खालचे जलाशय अशी विभागणी होवो.' त्यानुसार घडवुन आणल्यावर देवाने अंतराळास आकाश असे नाव दिले आणि हे सर्व दुसर्या दिवशी घडले.
पुन्हा देवाने शब्द उच्चारले, `अंतराळाखालील जले एकत्र येऊन त्यांचे महासागर निर्माण होवोत आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो' तसेच घडल्यावर देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि जलाशयांस सागर अशी नावे दिली. मग देवाने शब्द उच्चारले, 'गवत, बीज देणार्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळझाडे भूमी उपजावो' आणि तसेच घडुन आले. हे सर्व तिसर्या दिवशी घडले.
त्यानंतर देवाने शब्द उच्चारले, 'दिवस आणि रात्र भिन्न करण्यास आकाशात ज्योती होवोत व त्या चिन्हे, ऋतु, दिवस आणि वर्षे दाखवणार्या होवोत' आणी तसे घडुन आहे. देवाने सुर्य व चंद्र या मोठ्या ज्योती आणि तारेही प्रकाश व अंधार वेगळे करण्यासाठी निर्माण केले. हे चौथ्या दिवशी घडले.
पुढे देवाने शब्द उच्चारले `जलांमधे जीवजंतुंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार करोत.' त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर, पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा. वृद्धी पावा.' हे पाचव्या दिवशी घडले.
मग देवाने शब्द उच्चारले, `गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत' आणि तसेव घडले. मग देवाने जमीनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरुप असा मानव निर्माण केला आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातुन त्याच्यात आत्मा "किंवा प्राण" फुंकला आणि आशीर्वाद दिला, `फलदृप व्हा, बहुगुणीत व्हा आणि पृथ्वी व्यापुन टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशु, प्रत्येक पक्षी तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणुन मी हिरवी वनस्पती देत आहे.' हे सर्व सहाव्या दिवशी घडले. निर्मितीचे कार्य पुर्ण करुन सातव्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. (हाच दिवस म्हणजे सब्बाथ/ शब्बाथ. या दिवशी काम करणे "ज्यू " धर्माला अमान्य आहे.)
नंतर देवाने पुर्वेकडे एदनमधे बाग केली व त्यात मानवाला ठेवले. जीवनवृक्ष व बर्यावाईटाचे ज्ञान देणारे वृक्ष बागेच्या मध्यभागी लावले. बागेला पाणि देण्यासाठी नदी केली व मनुष्याला बागेची मशागत व राखण करण्यास ठेवले. त्यावेळी त्याने मनुष्याला आज्ञा केली की बर्यावाईटाचे ज्ञान देणार्या वृक्षाचे फळ तु खाऊ नकोस. मनुष्याची मदतनीस म्हणुन त्याने स्त्री निर्माण करण्याचे ठरवले. त्याने मानव झोपेत असताना त्याच्या छातीची फासळी काढुन स्त्री बनवली. तेव्हा मानव म्हणाला, "ही माझ्या हाडांचे हाड, मांसाचे मांस आहे. ती नरापासुन बनवलेली आहे म्हणुन तिला नारी म्हणतील. याकारणे पुरुष आपल्या आईवडीलांना सोडुन पत्नीशी जडुन राहील आणि ती दोघे एकदेह होतील." बायबलच्या मते पृथ्वीतलावरील मानवांची पैदास याच पुरुष (आदम/ आदाम/ अॅडम) व स्त्री (हव्वा/ इव्ह/ इव्हा) यांच्यापासुन झाली.
बहुतांश अशीच काहीशी कल्पना इस्लाम मध्येही आहे. पण प्रमुख फरक हा की सृष्टी निर्माण सहा "दिवसात" झाली की नाही ह्याबद्दल फरक आहे. अरेबीमधील सहा "यौम" मध्ये सृष्टी बनली. "यौम" चा अर्थ केवळ दिवस असाही होतो, तसाच तो ठराविक पिरियड/कालावधी असाही होतो. म्हणजे सहा "भागात/कालावधीत" निर्माण झालेलं आहे असं ते म्हणू शकतात. हा एक कालावधी "एक दिवसच" आहे असं कुठेही नाही. तो इश्वरी कालावधी आहे, त्यावर मानवी बंधनं आणि अपेक्षा नाहीत.
सब्बाथ/शब्बाथ म्हणजे शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा दिवस ज्यूंमध्ये पवित्र समजतात. ईश्वराने विश्रांती घेतली तशीच आपण ह्या दिवशी घ्यावी आणि ईश्वराचं चिंतन/प्रार्थना करावी असा दैवी आदेश आहे.
मात्र इस्लाम मध्ये सर्वाधिक पवित्र मानला गेलेला आठवड्यातील काळ म्हणजे शुक्रवारचा पूर्ण दिवस.
ह्या दिवशी परमेश्वर अधिक मेहेरबान असेल, जुम्माच्या दिवशी प्रार्थनेला/नमाजला विशेष महत्व असेल अशी ईश्वराची आज्ञा आहे. ह्या दिवशी तुम्ही नमाज पढताय की नाही हे बघण्यासाठी साक्षात देवदूत मशिदीच्या दारात उभे असतात. येणाऱ्यांची ते नोंद ठेवतात. अशी श्रद्धा आहे. आमच्या इथल्या एका बुजुर्ग इस्लामिक श्रद्धावंताला विचारल्यावर त्यानं हे ही सांगितलं- "देवानं मानव/आदम निर्माण केला तो दिवस जुम्माह. आदम जेव्हा जन्नत मध्ये गेला तो ही शुक्रवार, म्हणजे जुम्माच. ज्या दिवशी जगाचा अंत आणि अंतिम निर्णय होईल तो ही जुम्माच असेल. (अंतिम निर्णयः- कयामत, जेव्हा सर्व पाप्यांना पापांची शिक्षा व श्रद्धावंतांना सत्कर्माची फळे मिळतील)"
ख्रिश्चनांसाठी सर्वात पवित्र दिवस रविवार आहे(catholic church). पण तो कशासाठी हे अजून शोधतोय.
अवांतर
सृष्टीनिर्मितीची इब्राहिमी कल्पना वाचली आणि सहज नासदीय सूक्त आठवलं. (ऋग्वेद, मंडल १० वे,सूक्त् १२९. )
सगळं वाचलं नाही तरी चालेल पण त्यातल्या १ ते ४, ६, १३, १४ (इथे चटकन कळावं म्हणून हिंदीमध्ये देतोय. "भारत् एक् खोज " मध्ये ऐकल्या होत्या) ह्या ओळींकडे जरा लक्ष देऊन बघा बरं.
सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं १
अंतरिक्ष भी नहीं, आकाश भी नहीं था। २
छिपा था क्या कहाँ, किसने ढका था ३
उस पल तो अगम, अटल, जल भी कहाँ था ४
सृष्टी का कौन है कर्ता कर्ता है वा अकर्ता ५
ऊंचे आकाश में रहता सदा अध्यक्ष बना रहता ६
वही सचमुच में जानता, या नहीं भी जानता ७
है किसी को नहीं पता नहीं पता नहीं है पता नहीं है पता ८
वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान ९
वही तो सारे भूतजात का स्वामी महान १०
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर ११
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १२
जिस के बल पर तेजोमय है अंबर १३
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर १४
स्वर्ग और सूरज भी स्थिर १५
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर १६
गर्भ में अपने अग्नी धारण कर पैदा कर १७
व्यापा था जल इधर उधर नीचे ऊपर १८
जगा चुके वो ऐकमेव प्राण बनकर १९
ऐसे किस देवता की उपासना करें हम हवी देकर २०
ॐ! सृष्टी निर्माता स्वर्ग रचियता पूर्वज रक्षा कर २१
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर २२
फैली हैं दिशाएँ बाहू जैसी उसकी सब में सब पर २३
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २४
ऐसे ही देवता की उपासना करें हम हवी देकर २५
......
Comments
चोप्य् पस्ते
मनोबा,
लेख इथे आणि तिथेही टाकता ते ठीक पण चोप्य्-पस्ते करताना जरा काळजी घ्या. कोण प्रसन्न केसकर? ते मिपावर असतात ना? उपक्रमावर लेख लिहिताना त्यांनी मदत कशी केली ते लिहा, नाहीतर संदर्भ लागायचे कसे?
Torah चा नेमका उच्चार कसा आहे? मी तो सहसा तोराऽऽ (ह सायलंट) असा करते पण तौरात असा उच्चार आहे का?
असो थोडीशी अवांतर माहिती:
तोराऽला हिब्रू बायबलही म्हटले जाते. वाचकाने किंवा भक्तांनी त्याला स्पर्श करायचा नसतो. (म्हणजे बोट ठेवून वाचणे इ.) त्या एवजी यद (yad, पुन्हा नेमका उच्चार माहित नाही.) या लहानशा काठीचा उपयोग केला जातो.
का बरे? हे तर वेल नोन आहे ना!
१. त्या दिवशी क्रूसावरून उतरवलेला जीजस पुन्हा उठला.
२. त्याला देवाचा पुत्र अशी मान्यताही रविवारी मिळाली.
३. आठवड्याचे सहा दिवस काम केल्यावर रविवारी विश्रांती घेऊन इश्वराचे चिंतन करावे अशी काहीशी धारणा आहे ना.
सुट्टी
>>३. आठवड्याचे सहा दिवस काम केल्यावर रविवारी विश्रांती घेऊन इश्वराचे चिंतन करावे अशी काहीशी धारणा आहे ना.
देवानेही सहा दिवसात सृष्टी निर्मान केली आणि रविवारी सुट्टी घेतली होती म्हणे.
नितिन थत्ते
......
लेख इथे आणि तिथेही टाकता ते ठीक पण चोप्य्-पस्ते करताना जरा काळजी घ्या.
बरं बै.घेतो . माझं जालिय अस्तित्व् अत्यल्प आहे. मला फारसं लॉग्-इन् करणं जमत नाही आणि कुणाशी दोस्ती करुन् कोण् कुठल्या स्थळावर् आहे ते लक्षात ठेवणं कर्मकठीण वाटतं. शिवाय ( इतर जणही माझ्यासारखच जास्तित जास्त ऑडियन्स पर्यंत पोचायला सगळीकडे असतील् असं मला वाटलं. पण ते तसं नसावं असं वाटतय.
आता इथे प्रतिसादात लिहितो. प्रसन्न केसकर हे मीम व मिपा वर् असतात. त्यांच्याकडे आधीच तसा काहीसा मसूदा तयार होता. हां, त्यात इस्लामिक श्रद्धांची भर् मला घालावी लागतिये, पण बाकी बायबलच्या काही गोष्टी त्यांच्याकडे मायमराठीतुन् आधीच तयार् आहेत, त्या मला मिळाल्या त्यांची परवानगीही मिळाली.(एक् दोन् ठि़काणी, इजिप्त्- मोशे संघर्ष वगैरे बद्दल मूळापासुन् लिहावं लागेल् असं दिसतय.)
Torah चा नेमका उच्चार कसा आहे? मी तो सहसा तोराऽऽ (ह सायलंट) असा करते पण तौरात असा उच्चार आहे का?
तौरात हा अरेबिक्/उर्दु उच्चार मी तसाच उचलला. एका भाषणात झाकीर नाइक ह्या इस्लामच्या अभ्यासकाशी वाद घालताना एका ज्यूनं "तौरात्" असा (झाकिर सारखाच)उच्चार् करताना मी पाहिलय.
तोराऽला हिब्रू बायबलही म्हटले जाते.
हिब्रू बायबलमध्ये तौरात/तोराह् सोडुन इतर् २-३ पुस्तके येतात, ती वरती लिहिलेली. हिब्रू बायबलचा एक भाग म्हणजे तोराह्/तौरात.
वाचकाने किंवा भक्तांनी त्याला स्पर्श करायचा नसतो. (म्हणजे बोट ठेवून वाचणे इ.) त्या एवजी यद (yad, पुन्हा नेमका उच्चार माहित नाही.) या लहानशा काठीचा उपयोग केला जातो.
आयला. नवीनच ऐकतोय. परमेश्वर अज्ञेय् आहे असे काही लोक् म्हणतात. परमेश्वराच्या आज्ञा "अस्पर्शेय" आहेत हे नव्हतं माहित बुवा. हात लावयचा नसेल तर् पुस्तक कसं उचलत् असतील् बुवा? की फक्त् वाचतानासाठीच तो नियम आहे.
का बरे? हे तर वेल नोन आहे ना!
१. त्या दिवशी क्रूसावरून उतरवलेला जीजस पुन्हा उठला.
पण त्यामुळं फक्त ईस्टर हा दिवस पवित्र असतो, सगळे असतात हे मला माहिती नव्हतं. किंवा तसा एखादा स्वतः येशुचा संदेश(रविवार प्रार्थना दिवस् ठेवायचा) आहे का ते शोधतोय्. ते मिळालं नाही. शब्बाथ पवित्र ठेवण्यबद्द्ल थेट् मोशेच्या लिखाणातुन् संदर्भ् मिळतात्.येशुचा एखादा संवाद किंवा sermone on the mount मध्ये कुठं तसं काही सापडतं? की सपडतं आणि माझं सुटलय्?
२. त्याला देवाचा पुत्र अशी मान्यताही रविवारी मिळाली.
कधी? कुठे? कोणती घटना?
३. आठवड्याचे सहा दिवस काम केल्यावर रविवारी विश्रांती घेऊन इश्वराचे चिंतन करावे अशी काहीशी धारणा आहे ना
हो. पण् तेच् "का" आहे ते कळत नव्हतं.
मनोबा
रविवार
जीजसच्या आयुष्यातील अनेक घटनांचा साक्षीदार रविवार असल्याचे वाचले आहे. अधिक माहिती येथे मिळेलच.
धर्म व त्यांचे कालखंड
वरील लेख वाचून माझ्या मनात काही मूलभूत गोंधळ निर्माण झाले आहेत. माझ्या अज्ञानामुळे ते असावे असे मी धरून चालतो. लेखकाकडून खुलासा मिळाल्यावर गोंधळ दूर व्हावा.
1. येशू ख्रिस्ताने प्रचार केलेला ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकात निर्माण झाला.
2. मोहंमदाने प्रचार केलेला इस्लाम हा सातव्या शतकात प्रचलित झाला.
3. ज्युडाइझम केंवा ज्यु धर्म जरी पहिल्या शतकापासूनच असला तरी सातव्या शतकापासून त्याला एक स्वरूप आले .
4. ऋगेदातील नासदीय सूत्र त्या मानाने बरेच जुने म्हणजे कमीत कमी 3 सहस्त्र वर्षे जुने आहे.
वरील लेखात या चारी धर्मातील साम्यस्थळे दाखवण्याचा प्रयत्न मला समजला नाही. कारण ते समकालीन नाहीत. त्यामुळे फार तर असे म्हणता ये ईल की ऋग्वेदातील कल्पना ख्रिस्ती धर्मात व तेथून इस्लाम मधे घेतल्या गेल्या. परंतु हे असले विचार फारसे मान्य होण्यासारखे नाहीत. त्यामुळे श्री मनोबा यांना या लेखात काय सांगायचे आहे तेच मला समजले नाही.
इब्राहिम ही व्यक्ती कोणत्या शतकात झाली? हे समजले नाही. या व्यक्तीला ज्यू व इस्लाम या दोन धर्मात प्रेषितांचा बाप समजले जाते. त्याचा ख्रिस्ती धर्माशी कसा संबंध जोडता येतो? या सगळ्याशी नासदीय सूत्राचा काय संबंध आहे?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
हो.पण्....
1. येशू ख्रिस्ताने प्रचार केलेला ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकात निर्माण झाला.
म्हणजे "हो" असं म्हणता येइल, पण् प्रचलित ख्रिस्त धर्म, मुख्यतः कॅथोलिक/पश्चिम जगतातील हा पहिल्या शतकात अगदिच बाल्यावस्थेत होता.
तो तिथुन् पुढे काही शतके उत्क्रांत होत राहिला. अगदि न्यु टेस्टामेंट हे एकसंध म्हणुन पहिल्या शतकात बनलं नाही. ४-५ शतकात् कधीतरी एका पोप ने येशुच्या वर्णनांबद्दल असलेली चार पुस्तके अधिकृत् केली, त्याला मान्यता दिली व पुनर्बांधणी केली. येशूच्या अगदि पहिल्या १२ शिष्यांपैकी ४ जणांनी(जॉन, मॅथ्यू,मार्क आणि ल्युक) येशूची शिकवण व त्याचा जीवनप्रवास ह्यांचं वर्णन् केलय्. ह्या चार पुस्तकांचा एकत्रित संग्रह म्हणजे न्यू टेस्टामेंट.
त्यातही ल्युक कृत शुभ वर्तमान(गॉस्पेल) हे अधिक विस्तृत आहे. बहुतांश डोक्युमेंटरी त्यालाच प्रथम रेफर् करतात.
2. मोहंमदाने प्रचार केलेला इस्लाम हा सातव्या शतकात प्रचलित झाला.
होय. मान्य
3. ज्युडाइझम केंवा ज्यु धर्म जरी पहिल्या शतकापासूनच असला तरी सातव्या शतकापासून त्याला एक स्वरूप आले .
नाही. पहिल्या शतकाच्याही आधीपासुन यहुदी धर्म होता. इजिप्तच्या गुलामीत असतानाही ते स्वतःच्या प्रथा परंपरा पाळत होते. इजिप्तमधील त्यांच्या पारत्ंत्र्याचा काळ हा इसपूर्व् १२ वे शतक तरी असावा. तेव्हापासुनच त्यांच्या लिखित आज्ञा होत्या(टेन् कमांडमेंट्स) . त्यालाच निश्चित् स्वरूप म्हणता यावं. आणि खरं तर त्याहीपूर्वीए अनेकानेक ज्यू भविष्यवेत्ते आणि द्रष्ट्यांनी समाजाला स्पष्ट सूचना दिलेल्या आढलतात.(यहोशवा, जखर्या , दाविद्, सोलोमन् वगैरे)
4. ऋगेदातील नासदीय सूत्र त्या मानाने बरेच जुने म्हणजे कमीत कमी 3 सहस्त्र वर्षे जुने आहे.
हो . तितके नक्कीच असावे.
वरील लेखात या चारी धर्मातील साम्यस्थळे दाखवण्याचा प्रयत्न मला समजला नाही. कारण ते समकालीन नाहीत. त्यामुळे फार तर असे म्हणता ये ईल की ऋग्वेदातील कल्पना ख्रिस्ती धर्मात व तेथून इस्लाम मधे घेतल्या गेल्या. परंतु हे असले विचार फारसे मान्य होण्यासारखे नाहीत.
नाही. कुणी कुठुन् घेतलं हे मी सांगु शकत नाही. माझा मूळ उद्देश इब्राहिमींबद्दल लिहिणे इतकाच होता. तसं लिहिताना "सहज" ह्या ओळी आठवल्या. स्वतंत्रपणे दोन् ठिकाणी दोन मानव समूह विचार करताना कधी कधी त्यांचे विचारही जवळ येउ शकतात असं वाटतय.
त्यामुळे श्री मनोबा यांना या लेखात काय सांगायचे आहे तेच मला समजले नाही.
"जग कसं निर्माण झालं" ह्याबद्दल इब्राहिमी श्रद्धा काय आहे, ते लिहित होतो.
इब्राहिम ही व्यक्ती कोणत्या शतकात झाली? हे समजले नाही. या व्यक्तीला ज्यू व इस्लाम या दोन धर्मात प्रेषितांचा बाप समजले जाते. त्याचा ख्रिस्ती धर्माशी कसा संबंध जोडता येतो?
इब्राहिमच्या गोष्टी, नोहाची कथा, ह्या भागात उल्लेख असलेला प्रथम् पुरुष आदम्/ऍडम हे पुढील काही भागात येइल. तिथे साद्यंत वंशावळ असेल.
इथे ढोबळ रूपरेखा घ्या:-
आख्ख्या जगातलं प्रथम जोडपं ऍडम ईव्ह. ह्यांना अनेक अपत्ये झाली, जगभर् विखुरली. त्यापैकी लेवी ह्या मुलाच्या वंशातील एक व्यक्ती इब्राहिम.
इब्राहिमचे दोन् पुत्रः- थोरला इस्माइल, धाकटा इसाक. इस्माइल ला सर्व् अरब आपला पूर्वज् मानतात तर इसाकला सगळे ज्यू.
इसाकच्या वंशातील थोर राजा आणि प्रेषित दाविद. दाविदचा मुलगाही राजा व प्रेषित् सोलोमन/सुलेमान.
ह्या सुलेमान च्याच वंशात काही पिढ्यांनंतर येशू जन्मला.(हे सगळं सिरिया-जॉर्डन-इजिप्त-पॅलेस्टाइन ह्या भागात होत् होतं, क्वचित मेसाअपोटेमिया चाही उल्लेख् येतो.)
इस्माइल आणि त्याच्या पुत्रांनी अरबस्थानात वस्ती केलेली.येशूनंतर काही शतकांत अरबस्थानात मुहम्मद जन्माला आला.
या सगळ्याशी नासदीय सूत्राचा काय संबंध आहे?
थेट् संबंध नसावा. काय आहे हे मी सांगु शकत नाही, ती कथा वाचताना सहज आठवलं आणि टंकलं.
--मनोबा
अब्राहम
इ.स.पूर्व २००० ते १५०० च्या दरम्यान वायव्य आशियात हिब्रूंचे स्थलांतर झाले असे म्हटले जाते. अब्राहम हा मूळचा मेसोपोटेमियातला. देवाच्या आज्ञेवरून त्याने कनानला प्रयाण केले.
यातील मुद्दा तीनमधला ज्यू धर्म हा पहिल्या शतकापासूनच असला या वाक्याचा अर्थ कळला नाही. मोझेस हा सुमारे इ.स.पूव १२०० मधील मानला जातो. (एक्झॉडसचा काळही तोच) तर ज्यू धर्म पहिल्या शतकापासून आहे म्हणायचे विशेष कारण कळले नाही. मोझेससह गेलेल्या लोकांनी पुढे इस्त्राइल आणि जुडाह् अशी दोन राज्ये स्थापन केली. जुडाह् च्या लोकांना पुढे ज्यू म्हणून ओळखले जाऊ लागले. इस्राइलचा विनाश सुमारे इ.स. पूर्वी ७२२ साली झाला तर जुडाहचा विनाश इ.स.पूर्व ५८६ साली झाला. या विनाशात सुलेमानचे मंदिर बेचिराख झाले. त्यानंतर सुमारे १०० वर्षांनी ज्यू परत आले आणि त्यांनी सुलेमानचे मंदिरही पुन्हा बांधले. यानंतर त्यांचा पराभव रोमनांनी केला आणि त्यांना जेरुसलेम सोडून (इ.स. ६६) पळावे लागले. त्यानंतर ज्यूंचे स्थलांतर इतरत्र झाले. तेव्हा सातव्या शतकापासून स्वरूप कसे आले त्याबद्दल थोडा प्रकाश टाकावा.
अब्राहम
माझ्या प्रतिसादातल्या ३ क्रमांकाच्या वाक्यात टाईप करताना थोडी चूक झाली आहे. ते वाक्य असे पाहिजे होते.
3. ज्युडाइझम किंवा ज्यू धर्म जरी पहिल्या शतकाच्या आधीपासून असला तरी सातव्या शतकापासून त्याला एक स्वरूप आले.
मिष्टेक बद्दल स्वारी!
प्रत्यक्षात मला विषयाबद्दल काहीच माहिती नाही. मन यांच्या लेखात इस्लाम, ज्यू व ख्रिस्ती धर्म यांची व वैदिक धर्म यांची मोट बांधलेली दिसली म्हणून विकीवरील हा दुवा मी बघितला. तेंव्हा हे सर्व धर्म निरनिराळ्या वेळी उदयास आले हे लक्षात आले. त्यामुळे मी वरील प्रश्न विचारले होते.
परंतु मन यांचा खुलासा आल्यावरही सबंध नासीदीय सूत्र या लेखात देण्याचे प्रयोजन कळत नाही. नुसता उल्लेख जास्त योग्य ठरला असता. अशा फापटपसार्यामुळे लेखात काय सांगायचे आहे हे समजत नाही. बाकी लेखमाला चांगली चालली आहे. पुढचा भाग वाचण्याची उत्कंठा आहेच.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
ओक्के!
हाहा! आणि मलाही जुजबी माहितीच आहे (वर व्यवस्थित सनावळी वगैरे लिहिल्या आहेत त्या इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहेत. तसे इतिहासाचे पुस्तक सुंदर आहे आणि या लेखमालिकेला पूरक अशी खूप माहिती त्यात आहे.) पण त्या सातव्या शतकातल्या उल्लेखाने गोंधळायला झाले म्हणून मी विचारले. असो. जाऊ द्या!
मान्य आहे. नासदीय सूक्ताची तिथे पूर्ण देण्याची गरज नव्हती त्यामुळे मूळ विषयात विस्कळीतपणा येतो. मन यांना नवे लेखक म्हणून सध्या माफ करू. :-)
माहितीपूर्ण
लेख माहितीपूर्ण झाला आहे. विस्कळीतपणा फारसा जाणवला नाही. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
प्रमोद
अंधश्रद्धा ??
लेख नक्कीच माहितीपूर्ण आहे, बरेच कष्ट आहेत हे देखील जाणवत आहे.
पण हि माहिती तथाकथित अंधश्रद्धेची अजाणता भलावण करणारी नाही काय? जर वर सांगितले तसे काहीच घडले नसेल तर हि माहिती इतिहास असू शकत नाही, जर घडले असेल तर ती अंधश्रद्धा असू शकत नाही. मग काय हे ललित लेखन आहे?
ह्या माहिती आधारे इतर काही गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न (काय सिद्ध करत आहेत हे अजून कळलेले नाही) उचित वाटतो पण केवळ हि माहिती देणे उपक्रमी कसे काय बरे खपवून घेत आहेत?
मी हे उपरोधाने म्हणत नसून मला खरेच हे कुतूहल आहे कि ह्या लेखनावर कोणीच कसा आक्षेप घेतला नाही?
"केवळ अमुक धर्मात काय/काय 'अंधश्रद्धा' पाळल्या जातात ह्याचे माहितीपर लेखन" असे उत्तर असल्यास ते मला मान्य असेल.
आक्षेप घेतला नाही कारण...
आक्षेप घेतला नाही कारण लेखकाने पहिल्या भागातच लेखाचा उद्देश सांगितलेला आहे (निदान तसा प्रामाणिक प्रयत्न केला आहे) इतरांचे ब्रेन वॉशिंग करावे किंवा एखाद्या धर्माची भलावण करावी किंवा अंधश्रद्धांना खतपाणी घालावे असा प्राथमिक उद्देश तरी अद्याप दिसलेला नाही. उपक्रमावर ऐतिहासिक-पौराणिक कथांची माहिती देणे, त्यावर चर्चा करणे हे धोरणांत बसणारे लेखन आहे. अशा अनेक चर्चा या पूर्वी झाल्या आहेत आणि लेखही लिहिले गेले आहेत.
ललित लेखन कशाला? हा इतिहास नाही पण एखाद्या धर्मीयांची समजूत आहे आणि अशी समजूत आहे याला आधार म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथांत तसे नमूद आहे. (नमूद आहे म्हणजे खरे माना असे तर लेखक सांगत नाहीये.)
माझ्यामते ठोस कारण नसेल तर इतरांनी आक्षेप घेऊन चर्चेला वेगळा रंग देऊ नये ही विनंती.
उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळातल्या ह्या चर्चा बघा:-
"अवतार, पुनर्जन्म वगैरे" (http://mr.upakram.org/node/2411?page=1)
त्या चर्चेच्या उद्दिष्टातच पुढील् वाक्ये सापडतातः-
चर्चा कशी अपेक्षित आहे?
•अवतार आणि पुनर्जन्म यांतील नेमका फरक काय?
•महाभारतकालापूर्वीही वेदांत या संकल्पना आढळतात का?
•महाभारताच्या कथेत घोळ आहे की काही वेगळे स्पष्टीकरण येथे आहे?
•अवतार, पुनर्जन्म अशा कल्पना ग्राह्य धरल्याने व्यक्तिपूजेचे स्तोम आपल्याकडे अधिक दिसते का?
दुसरी चर्चा "ओम् फट् स्वाहा|" (http://mr.upakram.org/node/1298?guid=ON) ही चर्चा सुद्धा बघावी.
माझ्या माहितीप्रमाणे विज्ञानाविरुद्ध काही लिहिलं जात असेल आणि ते खरं असल्याचा दावा केला जात असेल तर् नक्कीच ती अंधश्रद्धा ठरावी.
"अमुक् एका प्रेषिताकडे जा तो तुम्हाला खात्रीदायक मुक्ती देइल" किंवा
"अमुक देवाची तमुक् साधना केल्यास तुम्हाला इश्वरप्राप्ती होण्याची किंवा पुनर्जन्माचं ज्ञान् होण्याची मी खात्री देतो"
किंवा
"तुम्ही इश्वर दयेला पात्र होण्यासाठी अमुक अमुक् आचार केला पाहिजे"
अशी विधानं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ठरु शकतात. पण तेच जर् मी एका विशिष्ट् मानवसमुहाबद्दल सांगुन् त्यांची तशी श्रद्धा होती/आहे असं म्हणत असेन् किंवा त्या भागातल्या लोक कथा कुठल्या आहेत हे सांगत असेन, त्यांच्या नैतिक्-अनैतिकतेच्या कल्पना काय आहेत् ही लिहित असेन, तर् ते लिखाण अंधश्रद्धा प्रसारक कसं बुवा ठरेल?
मागे कुणी तरी "नाडी" बद्दल आणि फलज्योतिषाबद्दल असे जोरदार दावे केले होते, ते लिखाण अजुनही उपक्रमावरच् आहे.
त्यासाठी एकदा http://mr.upakram.org/user/1223/track ह्या दुव्यावर जाउन जे बक्कळ साहित्य मिळेल ते नजरेखाली घालवत अशी विनंती आहे.
थोडक्यात मी आपल्या शेवटच्या वाक्याशी पूर्णतः सहमत आहे, फक्त त्यातला "अंधश्रद्धा " हा शब्द् काढुन मी तिथं "श्रद्धा/संकल्पना " असं लिहितोय.
"केवळ अमुक धर्मात काय/काय 'अंधश्रद्धा' पाळल्या जातात ह्याचे माहितीपर लेखन" असे उत्तर असल्यास ते मला मान्य असेल.
ह्याला मी
"केवळ अमुक धर्मात काय/काय 'श्रद्धा' पाळल्या जातात आणि कुठल्या संकल्पना आहेत ह्याचे माहितीपर लेखन"
असं लिहितोय.
असो. इतर उपक्रमींची आणि इथल्या कार्यकारिणीची "हा लेख आणि अंधश्रद्धा" ह्याबद्दलची मतं जाणुन् घ्यायला आवडेल.
त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त् उपक्रमींची मूळ लेखाबद्दल मतं जाणुन् घ्यायला आवडतील, त्यांच्या सूचना आणि त्यांच्याशी घातलेले वाद महत्वाच्या असतील.
त्यांनी आधीच्या भागांप्रमाणेच इथही उपयुक्त भर घालावी अशी इच्छा आहे.
अजुन एकः-
ह्या माहिती आधारे इतर काही गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न (काय सिद्ध करत आहेत हे अजून कळलेले नाही) उचित वाटतो पण केवळ हि माहिती देणे उपक्रमी कसे काय बरे खपवून घेत आहेत?
खरं सांगतो. मला काहीही सिद्ध वगैरे करायचं नाहिये. फक्त जशी जशी प्राथमिक माहिती माझ्या ऐकण्यात/वाचण्यात येत् गेली तितकीच मांडायची आहे.
उदा:- "ऑस्ट्रेलियात सापडणारी खनिजे" ह्यावर कुणी छोटसं आर्टिकल लिहिलं तर् तो काय सिद्ध करत असतो? काहीच नाही.
त्याला फक्त स्वतः जवळ असलेली माहिती मांडाविशी वाटते. तशी मी मांडतोय.
माझ्या आर्टिकल मध्ये निश्चित असा एक thought नाहिये किंवा statement नाहीये हा आरोप मला मान्य आहे.
आपण हे वाचलत हे ही नसे थोडके.
फॉर्मल डिस्क्लेमरः- येशू/मोझेस/पैगंबर मुहम्मद ह्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन वाचकांनी करावे असं माझं म्हणणं नाही.
ह्या महात्म्यांनी खात्रीपूर्वक सांगितलेला मार्ग तुम्हाला ईश्वरापर्यंत नेइल की नाही हे मला ठावुक नाही. माझी कधीही सुंता झालेली नाही किंवा बाप्तिस्मा झालेला नाही.
आपलाच
मनोबा
धन्यवाद
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हे माहितीपर लेखन आहे हे मान्यच आहे.
मागील २ भाग निश्चित माहिती/इतिहास स्वरूपाचे होते, त्याबद्दल धन्यवाद, ह्या भागाबद्दल देखील आपले मत माहिती देणेच आहे हेही मान्य.
तरीदेखील वरील लेखनाचे काही उपक्रमींच्या मते अंधश्रद्धा किंवा रंजक माहिती असे वर्गीकरण होते, त्यास उद्देशून मी तो प्रश्न विचारला होता. अन्यथा श्रद्धा/अंधश्रद्धा ह्याच्या व्याख्येत पडावे लागेल ते आपल्या विषयाशी सुसंगत राहणार नाही, तरीदेखील आपणास व इतर उपक्रमींना उत्सुकता असल्यास त्यावर चर्चा होऊ शकते.
@प्रियाली - लेखमाला कुठे तरी इतिहास-मध्यपूर्व सामाजिक मानसिकता ह्यांचाशी जोडल्या गेल्यामुळे लेखाचा अंधश्रद्धेची भलावण करण्याचा उद्देश नाही हे वाटते, पण म्हणूनच मी अजाणता हा शब्दप्रयोग केला. ईश आपटे ह्यांनी जर "शांतपणे" डार्विन वादाचे खंडन केल्यास तो लेख देखील वरील लेखासारखाच वाटेल, नव्हे दोघांचे म्हणणे एकच आहे. मग लेख लिहिण्याचा प्रकार आक्षेपार्ह्य वाटतो असे दिसते, लेखातील कंटेंट काहीही असले तरी चालेल.
असो, रंग बघणारा/वाचणारा देत असतो हे देखील सुचवायचे होतेच.
अजाणता
ईश आपट्यांचा हेतू डार्विनवादाचे खंडन करणे असा नसून "ईश"वादाची भलावण करणे असा आहे. किंबहुना, मन यांचे लेख परिपूर्ण किंवा उपक्रमाच्या ए-१ स्टँडर्डचे नसतील पण त्यांची तुलना ईश आपट्यांच्या लेखांशी करू नये ही विनंती.
अजाणता काय होऊ शकेल याची जबाबदारी लेखकावर टाकणे अयोग्य वाटते. याचे स्पष्टीकरण खरडवहीतून कारण इथे फारच अवांतर होईल.