"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग २ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण पहिले, भाग-२
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

----------------------------------------------------
कुठल्याही गोष्टीचे पुन्हा मूल्यमापन करताना सर्वात पायाभूत गरज असते ती प्रामाणिकपणाची. ज्या देशात एकाद्या व्यापार्‍याला "महाजन" म्हटले जाते, ज्याचे नागरिक धनाची आणि वैभवाची देवता असलेल्या लक्ष्मीची मनःपूर्वक आराधना करतात व ऐहिक सुखांना व अर्थार्जनाला आयुष्याचे मुख्य ध्येय मानतात त्या देशाच्या नागरिकांना अध्यात्माची आवड असलेले कां समजले जाते? आपण अध्यात्मिक कसे आणि ज्या अध्यात्मिकतेची आपण इतकी बढाई मारतो ती आपल्या आयुष्यात कुठली भूमिका पार पाडते? जात, संस्कृती आणि भाषा याबाबत इतकी विविधता असलेला आपला देश अद्याप एकसंध कसा राहिला? तो असा एकसंध राहिला ते भारतीयांचा 'आत्मा' एक असल्यामुळे कीं आपल्यातल्या ’सकल-भारतीयत्वा’च्या वाढत्या जाणीवा बळे-बळे जोपासलेल्या उच्चतेच्या जाणीवेमुळे नसून या उलट आपण खरेखुरे कसे आहोत याची पक्की जाणीव झाल्यामुळे आहेत?

वरील प्रश्नांची उत्तरे थंड डोक्याने देणे जरूरीचे आहे. हे प्रश्न टीकेचे मोहोळ उठविण्यासाठी किंवा कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी विचारलेले नाहींत. त्या प्रश्नाचे तसे मूल्य कांहींच नाहीं, ते केवळ आपले मूल्यमापन पुन्हा करण्यास भाग पाडण्यासाठी आहेत. या प्रश्नाची उत्तरे देता-देता या पुस्तकाचा दडलेला उद्देशही उलगडेल आणि तो उद्देश इथेच सारांशाने सांगणे हितावह होईल असे वाटते. भारतीय लोक सत्तेच्या समीकरणाबाबत अतीसंवेदनाशील असतात. सत्ता मिळविणे म्हणजे आयुष्याची एक कायदेशीर ध्येयपूर्ती आहे असे ते समजतात आणि सत्तेशी तडजोड करण्यात, तिच्याशी जुळवून घेण्यात आणि सत्तेचा केंद्रबिंदू शोधण्यात ते आपला धूर्तपणा वापरतात. ते सत्ताधार्‍यांबद्दल आदर बाळगतात आणि त्यांच्याबरोबर स्वार्थापोटी सहकार्य आणि संगनमत करायला उत्सुक असतात. सत्तेसाठी गटबाजी करायला किंवा कारस्थाने शिजवायला ते एका पायावर तयार असतात. सत्तेच्या मोहाचा व प्रलोभनाचा त्याग करतात त्यांचा ते आदर करतात. पण हा आदर त्यांच्या या वृत्तीचे अनुकरण करण्यासाठी नसतो तर केवळ त्यांच्या अशा मोहावर विजय मिळविणार्‍या वृत्तीच्या आदरापोटी!
अलीकडे झालेल्या बदलांची चर्चा आपण (या पुस्तकात) नंतर करू पण हे बदल जरी झाले असले तरी भारतीय लोकांचा कल अधिकारपदाच्या क्रमवारीला अतोनात मान देण्याकडे असतो. ज्यांना ते स्वतःपेक्षा वरिष्ठ समजतात त्यांच्यापुढे ते जरूरीपेक्षा जास्त झुकतात आणि ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी ते बेपर्वाईने वागतात, त्यांना उपेक्षितात किंवा त्यांची हेटाळणी करतात. त्यामुळे स्वतःच्या सामाजिक स्थानानुरूप असणार्‍या स्वतःबद्दलच्या सन्मानाच्या कल्पना आणि स्वतःची वैयक्तिक प्रतिमा याचे भारतीयांच्या लेखी भरमसाट महत्व असते. त्यांची उपजत प्रवृत्तीनुसार आणि स्वभावतः त्यांचा कल लोकशाहीकडे नाहीं. इथे लोकशाही इतकी सहजासहजी रुजली याचे कारण या पद्धतीने झटपट मोठे होता येते आणि वैयक्तिक सत्ता, शक्ती आणि वैभव प्राप्त करून घेता येते याची त्यांना झालेली जाणीव!
भारतीय नागरिक इहलोकापलीकडचा विचार करणारे कधीच नव्हते किंवा कधीच असणारही नाहींत. त्यांना जगात उपलब्ध असलेल्या ऐहिक सुखसोयींचा प्रचंड सोस असतो आणि ते श्रीमंतांकडे आदराने पहातात. ते नफ्यामागे इतरांपेक्षा जास्त चिकाटीने लागतात. त्यामुळे ते धूर्त व्यापारी किंवा कल्पक आणि चतुर व्यवसायी बनू शकतात. त्यांची पावले खंबीरपणे जमीनीवर असतात आणि डोळे आपल्या जमाखर्चाच्या कीर्दवहीवर! (As in the case of temporal power) इहलोकाच्या 'कायद्या'नुसार भारतीय लोक अंतिम यशस्वी निकालाला महत्व देतात, तो मिळविण्यासाठी अनुसरलेल्या मार्गाला नाहीं. भारतीयांचा अध्यात्मिक कल जरी एक तत्वज्ञानाचा भाग म्हणून उदात्त असला तरी भारतीय लोक त्यांचा आपल्या धार्मिक चालीरीतींत केवळ सत्ता आणि वाईट मार्गाने वैभव मिळविण्यासाठी समावेश करतात. वाईट काळातून जाताना या तत्वज्ञानाचा उपयोग होतोच कारण त्यामुळे भारतीयांची चिकाटी वाढते. बहुतेक भारतीय इहलोकाच्या पलीकडीचा जो विचार करतात तो केवळ त्यांना स्वतःला ताबडतोब मिळाणार्‍या फायद्याशी संबंध नसलेल्या त्यांच्या भोवतालच्या सामाजिक वातावरणाबद्दलच्या औदासीन्याचा भाग असतो.
समाजातील असमता, गलिच्छपणा आणि मानवी हाल-अपेष्टां यांचा आश्चर्य वाटावे इतक्या सहजपणे स्वीकार करण्याच्या त्यांच्या वृत्तीचा पुरावा म्हणजे त्यांचा स्वतःत पूर्णपणे गुंतून जायचा स्वभाव! भारतीय लोक व्यवहारी असतात आणि त्यांचा दृष्टिकोन स्वाभाविकपणे अनैतिक असतो. हिंदु धर्मात पराकोटीच्या पापाची कुठलीही व्याख्या नाहीं. कुठल्याही कृतीचे ठराविक संदर्भात समर्थन करता येते आणि हिंदू लोक देवाला नित्यनेमाने 'लांच' देतात! भारतात भ्रष्टाचार बोकाळला आहे कारण आपले ईप्सित साध्य होत असेल तर भ्रष्टाचार ही चुकीची गोष्ट असे मानलेच जात नाहीं. भ्रष्टाचार पकडला गेला तर त्यावर जो नैतिक गदारोळ उठतो त्याची तीव्रता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात स्वीकारण्याजोगा असतो त्याच्या विषम प्रमाणात असते. नैतिकतेची कल्पना आणि उच्च विचारसरणीचे तत्व भारतीयांना एक तात्विक पातळीवर आवडते पण रोजच्या आचरणात तत्व ते अव्यवहार्य म्हणून दुर्लक्षिले जाते[२].
नेहरूंच्या किंवा पाश्चात्यांच्या व्याख्येनुसर 'आधुनिकता' म्हणजे कुठल्याही विषयावर बुद्धीचा वापर करून पूर्वग्रहाशिवाय विचारपूर्वक प्रतिसाद देणे. अशी आधुनिकता हे सुशिक्षित भारतीयांचे लोकांत सांगायचे ध्येय आहे. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय आणि वस्तुनिष्ठपणे असे म्हटता येईल कीं असे ध्येय अंगावर चढविलेली आधुनिकतेची झूल आहे व या झुलीच्या खाली भारतीयांवर सातत्याने असलेली रूढींची पकड लपविली जाते असे. भारतीयात आधुनिकता आणि रूढी ज्या पद्धतीने एकत्र नांदतात ती पद्धती खरोखर अनोखी आहे. शेवटी हिंदू हे हाडाचे अहींसावादी नसून ते व्यवहारीपणे हिंसेच्या मर्यादा समजून घेतात. जिवंत रहाण्याच्या अंतिम ध्येयासाठी ते हिंसा टाळायला तयार असतात. आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात. त्यांची इतर धर्मांबाबतची ऐतिहासिक सहिष्णुता-खास करून लष्करी शक्तीचे पाठबळ असलेल्या धर्मांबाबतची-या संदर्भात समजण्यासारखी आहे. भारतातही जातीय दंगली होतात आणि जरी त्या ज्या पद्धतीने दाखविल्या जातात त्यांना 'प्रमाण' मानता येणार नाहीं. साधारणपणे ज्या हिंसेमुळे कांहीं प्रमाणात का होई ना अस्थिरता किंवा अराजक निर्माण होऊन समाज व्यवस्थेला भीती निर्माण होऊ शकते अशा हिंसेच्या भारतीय लोक विरुद्ध असतात. पण जातीय उच्च-नीचतेची किंवा शुद्धतेची अंमलबजावणी करण्याच्या नियंत्रित वातावरणात-ज्यात हिंसेला परंपरागत अनुज्ञा असेल किंवा जिथे आपल्या संख्येचे प्राबल्य असेल तिथे हिंदूही इतरांइतकेच हिंसक बनू शकतात!
कांहीं ठळक स्वभाववैशिष्ट्ये वर दिलेली आहेत पण ते त्यांचे संपूर्ण वर्णन नव्हे. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मनुष्यस्वभावात अगणित वेगवेगळ्या सूक्ष्म छटा असतात आणि स्वभाववैशिष्ट्यांत नेहमीच विशिष्ट तफावत असू शकते. भारतीय स्वभाववैशिष्ट्यांचे हे शब्दचित्र म्हणजे एक टीकात्मक समालोचनाचा प्रयत्नही नव्हे. हे शब्दचित्र आणि आपल्या स्वत:बद्दलच्या परंपरागत प्रतिमा यात नक्कीच फरक आहे. पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.

Comments

छान

पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.

ब-याच वेळेला आपल्या राष्ट्राचा (राजकारणी लोकांचा) गोंधळ उडतो व गोंधळलेले निर्णय घेतले जातात. आपल्या राष्ट्राचा फायदा नेहमी बघायचा हे राज्यकरते नेहमी विसरतात - ते स्वतः स्टेटस्मन होण्यासाठी किंवा नोबल कमावण्यासाठी वाटेलते करतात. कधी कधी हानीकारक पण - एक उदाहरण - जसे पाकिस्तानला ५५ कोटी रु देऊ केले आपल्याला स्वतंत्र्य मिळाल्या मिळाल्या.

अवांतर

जसे पाकिस्तानला ५५ कोटी रु देऊ केले आपल्याला स्वतंत्र्य मिळाल्या मिळाल्या.

कॉलिंग थत्तेचाचा!
--
मूळ लेखः लेखकाने अजून नेमका काय संदेश द्यायचा आहे त्याची दिशा नीट स्पष्ट केलेली दिसत नाही.
काळे यांना विनंत्या: कृपया आधीच्या प्रकरणांचे दुवे दर भागात द्यावे, संदर्भांचा उल्लेख ज्या भागात असेल तेथेच संदर्भ द्यावा.

अव्व्हेर + सुधारणा

अव्हेरः
५५ कोटी या विषयावर बोलण्याचा मक्ता माझ्याकडे नाही.

सुधारणा:
(स्टेट्समनशिपसाठी किंवा पारितोषिकासाठी काही केले हे वक्तव्य लूज कॉमेण्ट म्हणून सोडून दिले तरी) स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या ५५ कोटी देऊ केले हे म्हणणे योग्य नाही. डिव्हिजन ऑफ ऍसेट्स च्या करारानुसार ७५ कोटी द्यायचे स्वातंत्र्यापूर्वी ठरले होते. त्यातले २० कोटी देऊनही झाले होते. नंतर ५५ कोटी देणार नाही अशी नेहरू आणि पटेल यांनी भूमिका घेतली.

नितिन थत्ते

५५ कोटी

नंतर ५५ कोटी देणार नाही अशी नेहरू आणि पटेल यांनी भूमिका घेतली.

हे रुपये नंतर देऊ केलेच ना. पाकिस्तान प्रेरीत लोकांनी १९४८ मध्ये भारतावर (काश्मीरवर) चाल करुन आल्यावर सुद्धा. ह्याचे जास्त वाईट वाटते. जसा काही भारताने आपल्यावर चाल करण्यासाठी जो खर्च पाकिस्तनला आला त्याची भरपाई केली.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

वेळ नाही

यावर आत्ता वाद घालायला वेळ नाही.

मी भारत सरकारने आपणहून ५५ कोटी देऊ केले हे चूक आहे एवढेच म्हटले.

नितिन थत्ते

घ्या साहेब!

Introduction: http://mr.upakram.org/node/3119
Chapter 1-Part-1: http://mr.upakram.org/node/3134
शेवटी हिंदू हे हाडाचे अहींसावादी नसून ते व्यवहारीपणे हिंसेच्या मर्यादा समजून घेतात. जिवंत रहाण्याच्या अंतिम ध्येयासाठी ते हिंसा टाळायला तयार असतात. आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात. त्यांची इतर धर्मांबाबतची ऐतिहासिक सहिष्णुता-खास करून लष्करी शक्तीचे पाठबळ असलेल्या धर्मांबाबतची-या संदर्भात समजण्यासारखी आहे. भारतातही जातीय दंगली होतात आणि जरी त्या ज्या पद्धतीने दाखविल्या जातात त्यांना 'प्रमाण' मानता येणार नाहीं. साधारणपणे ज्या हिंसेमुळे कांहीं प्रमाणात का होई ना अस्थिरता किंवा अराजक निर्माण होऊन समाज व्यवस्थेला भीती निर्माण होऊ शकते अशा हिंसेच्या भारतीय लोक विरुद्ध असतात. पण जातीय उच्च-नीचतेची किंवा शुद्धतेची अंमलबजावणी करण्याच्या नियंत्रित वातावरणात-ज्यात हिंसेला परंपरागत अनुज्ञा असेल किंवा जिथे आपल्या संख्येचे प्राबल्य असेल तिथे हिंदूही इतरांइतकेच हिंसक बनू शकतात!
कांहीं ठळक स्वभाववैशिष्ट्ये वर दिलेली आहेत पण ते त्यांचे संपूर्ण वर्णन नव्हे. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मनुष्यस्वभावात अगणित वेगवेगळ्या सूक्ष्म छटा असतात आणि स्वभाववैशिष्ट्यांत नेहमीच विशिष्ट तफावत असू शकते. भारतीय स्वभाववैशिष्ट्यांचे हे शब्दचित्र म्हणजे एक टीकात्मक समालोचनाचा प्रयत्नही नव्हे. हे शब्दचित्र आणि आपल्या स्वत:बद्दलच्या परंपरागत प्रतिमा यात नक्कीच फरक आहे. पण एकाद्या विशिष्ट नैतिक मापनदंडाने मोजल्यास कुठलीच राष्ट्रे 'चांगली किंवा वाईट', 'प्रबळ किंवा दुर्बळ' नसतात.
१०टक्क्यापेक्षा जास्त इंग्रजी चालत नसल्याने ही युक्ती केली!
___________
जकार्तावाले काळे

वाचते आहे

वाचते आहे आणि गोंधळते आहे. लेखकाने मोजक्या परिच्छेदात अनेक कल्पना (उगीच) ठासून भरल्याने गोंधळ वाढतो आहे पण वाचनीय आहे.

ज्यांना ते स्वतःपेक्षा वरिष्ठ समजतात त्यांच्यापुढे ते जरूरीपेक्षा जास्त झुकतात आणि ज्यांना आपल्यापेक्षा कनिष्ठ समजतात त्यांच्याशी ते बेपर्वाईने वागतात

मला वाटतं अशा भावना सर्वांच्या एकमेकांविषयी असतात. (मागे अमेरिकन आडवळणाने बोलतात या विषयी चर्चा झाली होती.) माझ्यामते भारतीयांबाबर वरचे निरीक्षण बर्‍यापैकी योग्य आहे. या उलट, अमेरिकनांबाबत मला दिसते की काही ठिकाणी गॅप ठेवायची गरज असते असे भारतीय मानतील (उदा. बॉससमोर) तिथे ही मंडळी नको तितकी जवळीक दाखवतात.

अधोरेखित भागाला सुधरवून सुवर्णमध्य साधणे शक्य असते असे वाटते परंतु कंपनी सीईओला "गेट औट ऑफ हिअर*" असे म्हणणारे साधारण कर्मचारी मी पाहिले आहेत. :-)

* गेट औट ऑफ हिअर चा अर्बन डिक्शनरी मधील अर्थ "चालते व्हा" असे नसून "नो वे", "काय म्हणतोस काय?" किंवा आनंदोद्गारांपर्यंत काहीही असावा. तरीही हे असे बॉसला म्हणणे मला या जन्मात शक्य नाही. ;-)

माझ्या मतें हे स्वभावविशेष सगळ्याच देशांच्या जनतेत असतात

माझ्या मतें हे स्वभावविशेष सगळ्याच देशांच्या जनतेत असतात. पण इथे मी लेखकाची मते शक्य तो जशीच्या तशी मांडत आहे. (पण हे स्वभावविशेष भारतीयात जरासे ठळक असतात असा माझाही अनुभव आहे.)
हेही लक्षात ठेवायला हवे कीं ही मते कांहींशी मूळ लेखकाच्या अनुभवावरून बनलेली आहेत व ते मुख्यतः सरकारी नोकरीत होते. त्यामुळे मनुष्यस्वभावाचा गाभा जरी सारखा असला तरी नोकरी-नोकरीत फरक असणारच.
___________
जकार्तावाले काळे

:-)

>>आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या शक्तीच्या विरुद्ध लढून आणि स्वतःचा आत्मघाती सर्वनाश करून घेण्यापेक्षा अंतर राखून एकत्र रहायला ते तयार असतात.
महापुरे झाडे जाती, तेथ लव्हाळी वाचती.. :-)

हे बरे किंवा वाईट हे (मूळ) लेखक कसे ठरवणार? वरील प्रकारे वागून यश आले तर असे वागणे चांगले समजले जाते, अपयश आले तर आत्मघातकीपणा.

असो. वाचत आहे.

भारतीय समाज हा हजारो वर्षांपासून सरंजामशाही समाज राहिला आहे. वतने देणे/घेणे हे फार जुने आहे.
त्यामुळे ही सामाजिक उतरंड कामातही आली नाही तर नवल. हे लेखकाने चांगले पकडले आहे असे दिसते.
पुढचे भाग काय आहेत याबद्दल उत्सुकता आहे.

२५० पानी पुस्तक १५०० शब्दांच्या तुकड्यात वाचल्यामुळे होत आहे?

प्रियालीताई आणि चित्राताई,
असे कांहींसे हे २५० पानी पुस्तक १५००-१६०० शब्दांच्या तुकड्यात वाचल्यामुळे होत असावे. पण एक संपूर्ण प्रकरण एका बैठकीत वाचायला त्रास होतो अशी कांहीं वाचकांची सूचना आल्यामुळे मी लहान-लहान तुकड्यात ते येथे पोस्ट करत आहे. या पुस्तकाचे पहिले प्रकरण १८ पानी आहे ते मी तीन भागात विभागले आहे. कदाचित् पूर्ण झाल्यावर एका दमात वाचल्यास वेगळे वाटेल.
मला स्वत:ला हे पुस्तक खूप आवडले व म्हणूनच मी ते मराठीत अनुवाद करायला घेतले. पण 'साहेबा'च्या इंग्रजीपेक्षा भारतीयांची इंग्रजी जरा 'जड' असते त्यामुळे वाचताना वाटले नाहींत त्यापेक्षा जास्त कष्ट अनुवाद करताना मलाही जाणवत आहेत. तसेच कांहीं ठिकाणी तेच दोनदा तीनदा लिहिल्यासारखे वाटते. हे प्रकरण आणखी एक भाग लिहिल्यानंतर संपेल. मग एका दमात वाचून पहावे व कांही फरक वाटला कां ते सांगावे.
अशीही शक्यता आहे कीं मला हे पुस्तक आवडले म्हणून ते सर्वांना आवडेलच असे नाहीं.
___________
जकार्तावाले काळे

प्रतिसाद

दुसर्‍या एका संस्थळावर मी दिलेला प्रतिसाद इथे देत आहे.
पहिली गोष्ट म्हणजे मी इथे जी उत्तरें देतो ती लेखकाची मतें मला जितकी समजली आहेत त्यावर आधारित आहेत. मते श्री. वर्मांचीच आहेत, पण मला बर्‍याच प्रमाणावर पटली नसती तर या पुस्तकाचा अनुवाद करायच्या फंदात मी पडलोच नसतो! (हा अनुवाद करताना मी माझा भरपूर वैयक्तिक वेळ कारणी लावत असतो.)
माझ्या मते ही मते फक्त भारतीयांनाच लागू होतात असे नाहीं तर सार्‍या मनुष्यजातीला लागू पडतात. भारतीयांना जरा जास्त लागू होतात, पण आपल्यापेक्षा पाकिस्तानच्या लोकांना जास्तच लागू होतात असे मला वाटते.
माझ्या अनेक बॉसेसपैकी एक अमेरिकन बॉस होता (सध्या स्वगृही परतला आहे). जेंव्हां मला आपल्या सरकारच्या कांहीं गोष्टी आवडत नसत व मी त्या बोलून दाखवीत असे त्यावेळी तोही म्हणायचा कीं ब्रिटिश लोकशाही ७००-८०० वर्षे जुनी आहे, अमेरिकन लोकशाही २००+ वर्षे जुनी आहे तर भारताची लोकशाही (त्यावेळी) ५०-५५ वर्षाची आहे तिला प्रौढ व्हायला वेळ लागेल हे लक्षात ठेव. हे मला आजही आठवते व पटते.
हा बॉस भारतात अनेक वेळा आलेला व त्याने भारतीयांशी अनेक वर्षें व्यवहार केलेला होता आणि त्याने सांगितलेल्या बर्‍याच 'कथा' मला या पुस्तकात दिसतात. (ही १९९४-९६ ची गोष्ट आहे, हे पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झालेले आहे.)
शेवटी आपण भारतीय असे आहोत काय?
प्रत्येक भारतीय असा नक्कीच नाही. नाहींच. नाहीं तर आपला देश आज superpower व्हायच्या उंबरठ्यावर नसताच! भारतीयांच्या creativityला तोड नाहीं. अनेक आपत्ती असूनही आज भारत असा मोठा झालेला आहे!
पण वर्मांची कांही वाक्ये मात्र हृदयाला घरे पाडतात, माझ्या तरी. उदा. ५००० वर्षांपेक्षा जास्त जुन्या संस्कृतीच्या मुशीत तयार झालेले आपण भारतीय प्रत्येक आक्रमकांचे अगदी सहजपणे, विनासायास गुलाम कसे झालो? गुलामच झालो नाहीं तर आपण त्यांच्याशी संगनमत केले, फंद- फितुरी केली, त्यांना जिंकायला मदत केली आणि नको ती माहिती पुरवून त्यांचे राज्य भक्कम केले. मग ते बहामनी साम्राज्य असो, मोगल असोत, ब्रिटिश साम्राज्य असो, मराठेशाही असो वा पेशवाई असो. आपली गद्दारी सगळीकडे स्पष्ट दिसते.
आजही आपले लोक गद्दारी करतच आहेत, त्याचे समर्थनही करताना दिसतात. मग ते २६/११च्या हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तान्यांना मदत करणारे कलकत्त्याचे लोक असोत किंवा इथे झालेल्या इतर दहशतवादी हल्ल्यांत त्यांना मदत करणारे भारतीय असोत किंवा आपल्या अमेरिकेबरोबरच्या अणुविद्याकराराला चीनच्या बाजूने विरोध करून विलंब लावणारे साम्यवादी असोत.
आजही "Being Indian"मध्ये उदाहरण म्हणून दिलेली माणसे आपल्यात वावरत आहेतच! अगदी ताजे उदाहरण म्हनजे PDP सरकारने केलेल्या Power Point Presentation मध्ये अक्साईचिन आणि काराकोरमचा भाग चीनचा दाखविला आणि काश्मीरचा कांहीं पाकव्याप्त भाग पाकचा दाखवला. (आपला म्हणून दाखविलाच नाहीं!) वर त्याचे समर्थनही महबूबा मुफ्ती करतात. http://tinyurl.com/5rc5zxl हा दुवा उघडा आणि वाचा.
असे पुस्तक वाचून (किंवा वाचायला लावून) कांहीं वर्षांनी तरी आपण बदलू अशी मला आशा काय अगदी खात्री वाटते.
हे पुस्तक वाचताना आपल्याला आला तसा मलाही प्रथम राग आला. पण मग लक्षात आले कीं आपण आरशात पहात आहोत. कुणावर रागवायचेच असेल तर आपण स्वतःवरच रागावले पाहिजे.
पुढे जेंव्हा लेखक आपल्या फंदफितुरीसारख्या विषायवर येतील तेंव्हां तर अंगाचा तिळपापड होतो!

___________
जकार्तावाले काळे

फ्रेड रिग्ज

फ्रेड रिग्ज हा लोकप्रशासनातील एक विचारवंत असून त्याने विकसनशील देशाबद्दल मांडलेलं प्रारुप भारताच्या सामाजिक, राजकिय व आर्थिक परीस्थितीला अगदी चपखल लागू पडतं.

या प्रारूपाचे तपशील दिल्यास वाचायला आवडेल!

पाटीलसाहेब,
फ्रेड रिग्ज यांच्या प्रारूपाचे तपशील दिल्यास वाचायला आवडेल!
___________
जकार्तावाले काळे

फ्रेड रिग्ज

वर्षभरापूर्वी Mpsc चा अभ्यास करताना लोकप्रशासनाशी ओळख झाली. तुलनात्मक लोकप्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी रिग्जने आपले पर्यावरणात्मक प्रारुप मांडले. त्याला त्याने लोलकिय प्रारुप व साला बझार कँटिन प्रारुप अशी नावे दिली.पैकी लोलकीय प्रारुपामध्ये त्याने राजकिय व सामाजिक अवस्थांविषयी भाष्य केले तर साला प्रारुपामध्ये त्याने अर्थव्यवस्थेविषयी भाष्य केले आहे. त्याने आपल्या प्रारुपांमध्ये विविध देशांचे वर्गीकरण अविकसित, विकसनशील व विकसित असे केले आणि प्रत्येकाची काहि वैशिष्ठे सांगितली. तो म्हणतो की प्रत्येक देशाला या तिन्ही अवस्थांमधुन जावे लागते व त्याप्रमाणात त्यादेशाला त्या अविकसित , विकसनशील अथवा विकसित अवस्थांची वैशिष्ठे लागु होतात .त्याने जगभरच्या प्रशासनांचा तुलनात्मक अभ्यास करुन हे निष्कर्ष मांडले. अधिक माहितीसाठि लोकप्रशान By माहेश्वरि वाचावे.

'बीइंग इंडियन' हे पुस्तक प्राचीन आणि अर्वाचीन भारताबद्दल आहे

धन्यवाद, पाटीलसाहेब! तुम्ही लिहिलेले पटण्यासारलखे आहे व तो लेख वाचण्याची इच्छा आहे. 'लोकप्रशान' कुठे मिळेल याची मीही चौकशी करेन किंवा आपण सांगितल्यास आभारी राहीन.
कदाचित द्विरुक्ती होत असेल पण अगदी असेच मत माझ्या भूतपूर्व अमेरिकन बॉसनेही मांडले होते. तो नेहमी म्हणायचा कीं भारताची लोकशाही अद्याप बाल्यावस्थेत आहे आणि त्या मानाने अमेरिकेची जास्त अनुभवी आणि इंग्लंडची तर खूपच जुनी आहे. म्हणून त्यांच्याशी तूलना करून मी वाईट वाटून घेऊ नये असे तो मला नेहमी म्हणे.
अर्थात् 'बीइंग इंडियन' हे पुस्तक अर्वाचीन भारताबद्दल नसून प्राचीन आणि अर्वाचीन अशा दोन्ही भारताबद्दल आहे व ते लेखकाच्या वाचनावर आणि स्वत:च्या विचारांवर आधारित आहे.
___________
जकार्तावाले काळे

 
^ वर