"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-भाग १ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश
"भारतीय असणे म्हणजे काय?" याबाबत एक नवे आणि आणि अगदी 'सोळा आणे' वेगळे संशोधन करणे हाच हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे! असे संशोधन फक्त भारतासाठीच नव्हे तर सार्‍या जगाच्या बाबतीतही तदनुषंगिक आणि प्रसंगोचित आहे. एकवीसाव्या शतकात सहातला एक मनुष्य भारतीय असणार आहे. भारतीय बाजार हा जागतिक बाजारपेठेत दुसर्‍या क्रमांकावर असणार आहे. त्यात खरेदी करण्याची ऐपत असलेल्या मध्यमवर्गीयांची संख्या ५० कोटीला पोचेल. खरेदीसामर्थ्यात समानता आणल्यावर (purchasing power parity) भारताची अर्थव्यवस्था आताच जगात चौथ्या क्रमांकावर आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्याबाबतीत (gross national product) भारत पहिल्या दहात आहे. जगात सर्वात विशाल लोकशाही राबविणारा भारत आता अण्वस्त्रसज्ज असून आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान मिळविण्याचा आपला हक्क तो बजावू पहात आहे.
या शिवाय भारतीय उपखंडात दूरगामी व्यापक बदल होत आहेत. फ्रान्सच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त पदवीधर आज भारतात असून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताला जागतिक मान्यता मिळालेली आहे. आज सॉफ्टवेअरची निर्यात (२००४ सालची) ५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतीय लोक आज सार्‍या जगभर पसरले असून अशा तर्‍हेच्या जगभर पसरलेल्या नागरिकांच्या बाबतीत (Diaspora) भारत चीनखालोखाल दुसर्‍या क्रमांकावर आहे. मूळच्या भारतीय लोकांचा जनसमुदाय आज अमेरिकेतला सर्वात जास्त श्रीमंत समुदाय बनलेला आहे. इंग्लंड आणि मध्यपूर्वेतल्या राष्ट्रांत व इतरत्रही भारतीय लोकांचे वैभव व श्रीमंती वाढत आहे. या नव्या शतकात जगातील जनतेला-मनापासून असो वा मनाविरुद्ध-पण भारतीयांशी संबध ठेवावेच लागतील. म्हणूनच "भारतीय असणे म्हणजे काय?" हे जास्तच सुस्पष्टपणे व प्रामाणिकपणे जाणून घेणे जरूरीचे आहे.

पाश्चात्य लोकांना भारतीय कसे दिसतात?
यापूर्वी अशा तर्‍हेच्या संशोधनात दोन गोष्टींमुळे अडचण येत असे. पहिली होती कीं सारे परदेशातील लोक भारतीयांकडे "एका छापातून बनविलेले लोक" अशा नजरेने पहात. आणि दुसरी होती भारतीय लोक स्वतःची प्रतिमा जगापुढे कशी ठेवीत ही. भारतात असताना परदेशी लोक भारतीयांकडे एक 'आ' करून तरी पहात रहातात किंवा आवंढा तरी गिळतात. साधारणपणे भारतातल्या श्राव्य व दृश्य अनुभवांमुळे ते पार भारावून जातात. याबद्दल खूप उदाहरणे देता येतील पण कांहींसे भावनांनी भारावून गेल्याचे एक बोलके उदाहरण पुरेसे व्हावे.मार्क ट्वेन यांनी एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी भारताच्या दिलेल्या आपल्या भेटीनंतर लिहिले आहे, "अद्भुतरम्य स्वप्नांचा आणि प्रणयाचा, प्रचंड वैभव आणि कमालीचे दारिद्र्य असलेला, भुताखेतांचा, आत्म्यांचा, राक्षसांचा आणि अल्लादीनच्या जादूच्या दिव्यांचा, हत्ती-वाघांचा, शंभर जिभांचा आणि शंभर 'देशां'नी बनलेल्या 'राष्ट्रा'चा, वीस लाख देव-देवतांचा, मानवतेची जन्मभूमी असलेला, मानवी बोलीभाषेला जन्म दिलेला, इतिहासाची जननी, आख्यायिकांची आजी आणि रूढींची पणजी असलेला हा खरा भारत आहे."
साम्राज्यशाहीच्या कालावधीत भारताबद्दलचे समज काहींसे वेडेवाकडे, दिशाभूल करणारे झाले होते. यालाच एडवर्ड सेड यांनी (Edward Said) पश्चिमेचे पौर्वात्यीकरण असे नांव दिले होते. पाश्चात्यांच्या मते पौर्वात्य देश म्हणजे जगाची अपरिचित अशी 'दुसरी' बाजू होती व त्यांना अपरिचित असे वेगळे आणि चमत्कारिक लोक तिथे रहात. भारतीय लोक म्हणजे एक अतीशय आनंदी किंवा धिक्कारक्षम लोक अशीच भावना बहुतेक सर्व इंग्लिश लोकांच्या मनात असे. न जोडता येण्याइतक्या ठिकर्‍या झालेले, परमार्थात श्रेष्ठ असलेले, राज्य करण्यास अतीशय अवघड किंवा विनासायास आत्मनिर्भर असलेले, पैशाचा अत्यंत लोभाने कुठलेही दुष्कृत्य करायला तयार असलेले किंवा सर्व ऐहिक गोष्टींबद्दल पूर्णपणे उदासीन असलेले, पूर्णपणे गूढ किंवा अंतरंग पूर्णपणे उघड करणारे राष्ट्र असे भारताचे परस्परविरोधी विविध पैलू पाश्चात्यांना दिसत. तसेच त्यांच्या मते भारतीय म्हणजे एक शताळशी किंवा विस्मय वाटण्याइतके मेहनती-उद्योगी, अतोनात अंधश्रद्ध किंवा असामान्यपणे विकसित, किळस येण्याइतका लांगूलचालन करणार किंवा नेहमीच बंडखोर असलेला, अतीशय गुणवान किंवा उघड-उघडपणे नक्कल करणारा, अतीशय सुसंस्कृत किंवा अतीशय गरीब, म्हणजेच थोडक्यात सर्वगुणसंपन्न! ब्रिटिशांची हुशारी एकाद्या विशिष्ट गोष्टींबद्दल असे. उदा एकाद्या प्रदेशातल्या वनस्पती किंवा प्राणिजात किंवा भूगोलासंबंधीचे लिखाण. पण बर्‍याचदा विशिष्ठ गोष्टी लिहिताना असल्या निवेदनांत सहजपणे सर्वसाधारण, न अभ्यासलेली वर्णनेही घुसडली जात. संस्कृतचा गाढा व्यासंगी असलेला आणि हिंदू तत्वज्ञान अभ्यासण्यासाठी सारे आयुष्य भारतात व्यतीत केलेला जर्मन अभ्यासक मॅक्समुल्लर नेहमी "भारतीय लोक अतीशय प्रामाणिक असतात" असा दावा तावातावाने करीत असे.
स्वातंत्र्ययुद्धात महात्मा गांधींचे नेतृत्व, जातीय एकोप्याब्द्दलची त्यांची वैयक्तिक बांधिलकी आणि ब्रिटिशांना हरविण्याचे डावपेच म्हणून त्यांनी अंगिकारलेले अहिंसेचे व्रत या सर्व गोष्टींमुळे जगात भारताची 'सहिष्णु आणि अहिंसक राष्ट्र' अशी एक नवीन प्रतिमा निर्माण झाली. पं. नेहरू खूप वर्षें पंतप्रधानपदी राहिले व त्यांच्या कारकीर्दीत कोट्यावधी लोकशाहीप्रेमी भारतीय लोक सांप्रदायिकता सोडून आधुनिकतेकडे वाटचाल करण्याची खटपट करत आहेत असे एक नवे चित्र जगाला दिसले. तरीसुद्धा या देशात स्पष्ट दिसणारे वैविध्य आणि सांस्कृतिक रूढींमधील गुंतागुंत या दोन गोष्टींमुळे भारताबद्दल अचूक आणि सखोल ज्ञान/ओळख होण्यात अडचणी येत होत्या. नेहरूंचे मित्र असलेले व भारतात राहिलेले अर्थतज्ञ श्री. जॉन गॉलब्रेथ यांनी भारताचे "व्यवस्थित चालणारी अंदाधुंदी" असे वर्णन केले आहे. (कांहीं वर्षांनी त्यांनी ते सनसनाटी विधान केवळ स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी केले होते हे मान्य केले.)

भारताचे वाढते महत्व आणि चुकीची प्रतिमा
१९९१ सालची आर्थिक सुधारणा व १९९८साली केलेली अण्वस्त्रचांचणी या दोन घटनांमुळे भूगोल आणि राजकारण यांच्या सहाय्याने व्यूहरचना करण्यात आणि आर्थिक बाबीत प्राविण्य असलेल्या पाश्चात्य विशेषज्ञांच्या 'रडार'वर भारताचा ठिपका जरा ठसठशीत दिसू लागला. 'इकॉनॉमिस्ट' या वृत्तपत्राने 'शेवटी एकदाचा जागा होऊन बाजारपेठेकडे डुलत चाललेला हत्ती' असे भारताचे वर्णन केले. स्टीफन कोहन यांनी एक सुरेख संदर्भासह लिहिलेल्या लेखात "भारत आता सुपरपॉवर बनण्याच्या दृष्टीने वाटलाल करेल कीं नेहमीप्रमाणे 'येणार-येणार'चा मंत्रच जपत राहील" असा जाहीर प्रश्न उपस्थित केला होता. पण असे अस्तित्वासंबंधींचे प्रश्न सर्वसाधारण पर्यटकांना पडत नाहींत. पण दुर्दैवाने असे लोक जितक्या संख्येने यायला हवेत असे भारताला वाटते तितक्या प्रचंड प्रमाणात येत नाहींत. जे येतात ते मुख्यतः भारताची प्राचीन संस्कृती पहायला येतात आणि ती संस्कृती त्याना दुर्लक्षित आणि चोहीकडे विखुरलेल्या स्मारकात दिसते. अशा पर्यटकांनी अध्यात्मिक भारताबद्दल वाचन केलेले असते आणि ते हा अध्यात्मिक भारत दक्षिणेतील मंदिरांच्या उत्तुंग शिखरात पहातात किंवा गंगेच्या पवित्र पाण्यात झटपट आंघोळ करणार्‍या यात्रेकरूंत पहातात. भारताच्या पोषाखतील आणि आहारातील वैविध्याने त्यांच्या कॅमेर्‍यातील चित्रफितींची रिळेच्या रिळे संपतात[१]. भारताला येतांना डोक्यात असलेले अद्भुतरम्य चित्र साठवून ठेवण्यासाठी ते हस्तकलेच्या वस्तु स्वस्तात घेतात. सफाईने इंग्रजी बोलण्यार्‍या भारतीय लोकात आणि शहरातील गगनचुंबी इमारतीत ते अर्वाचीन भारत पहातात. त्यांना फसविणारे दलालांना ते अविकसित देशांत सगळीकडे पसरलेल्या भ्रष्टाचाराचा पुरावा समजतात. घाण आणि गरीबी त्यांना घृणास्पद वाटली तरी अशा घाणीचा व गरीबीचा उगम त्यांना अध्यात्मात गढून गेलेल्या भारतीयांच्या इहलोकापलीकडील कल्पनांचा परिणाम वाटतो. मग शांतिप्रिय म्हणवून घेणारा हा देश अण्वस्त्रचांचणी कशी करू पहातो याबद्दल वादविवाद त्यांच्यात चालतो. पण त्यानंतर लवकरच त्यांची भारतभेट संपत येते आणि ते पर्यटक "एवढा विशाल देश एकसंध कसा राहिला आहे आणि या देशातील गरीब व धड वस्त्रें न ल्यायलेले लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदानात भाग घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत" याबद्दल विचार करत स्वदेशी परततात.
परदेशी पर्यटकांच्या अशा तहेच्या समजुती बर्‍याच प्रमाणात अचूक असतात. भारतातील सत्य परिस्थिती एकाच वेळी पारदर्शकही असते आणि अपारदर्शकही! जे दिसते त्यातही सत्याचा भाग असतो आणि जे दिसत नाहीं त्यातही! परदेशी लोक जे उघड आहे ते पहातात आणि हे पाहिलेले चित्र आपल्या थोर भारतीय संस्कृती आणि शिष्टतेबद्दलच्या आधीपासून बनविलेल्या कल्पनांशी जोडतात. या प्रकारात बरीचशा गृहीतकांची चिकित्सकपणे सखोल छाननी होत नाहीं आणि बरेच निष्कर्ष निखालस चुकीचे असतात किंवा अंशतःच बरोबर असतात. पण एकवेळ आपण परदेशी पर्यटकांना क्षमा करू शकतो. पण भारतीयांना कशी क्षमा करणार? गेली कित्येक वर्षें भारतीय नेत्यांनी आणि शिकल्या-सवरलेल्या भारतीयांनी भारतियांबद्दलची एक चुकीची प्रतिमा जगापुढे मुद्दाम उभी केली आहे व ती चुकीची आहे हे माहीत असूनही तिला सजवून चांगल्या हेतूने आलेल्या आणि कांहींशा भोळसट परदेशी निरीक्षकांना व कधीकधी अभ्यासकांनाही ही चुकीची प्रतिमा स्वीकारण्यासाठी मुद्दामहून प्रोत्साहन देतात. याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते स्वतःच या खोट्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले आहेत आणि ती प्रतिमा चुकीची आहे हे मान्य करायला तयार नाहींत!
ही प्रतिमा विचारपूर्वक मारलेल्या एका मोठ्या उडीमुळे निर्माण झालेली आहे, "काय आहे"च्या जागी "काय असायला हवे" ही विचारसरणी वापरून केलेली एक हातचलाखीच आहे! भारताने १९४७ सालापासून संसदीय पद्धतीची लोकशाही राबविली आहे. याचाच अर्थ असा कीं भारतीय लोक हे स्वभावाने व प्रवृत्तीने लोकशाहीवादी आहेत हे कुणीच नाकारू शकणार नाहीं. कित्येक धर्म भारतात जन्मले, फुलले आणि वाढले. म्हणजेच भारतीय लोकांचा दृष्टिकोन नक्कीच अध्यात्मिक आहे. वेगवेगळ्या धर्मांना भारतात आसरा मिळालेला आहे त्यावरून भारतीय लोक स्वभावाने खूपच सहिष्णु आहेत हे उघड होते. गांधीजींनी अहिंसेवर विसंबून ब्रिटिशांना हरविले. म्हणजेच भारतीय लोक शांतताप्रिय आणि हिंसाविरोधी आहेत हे दिसते. हिंदूंच्या तत्वज्ञानानुसार आजच्या जगाला एक तात्पुरते व क्षणभंगूर जग आहे. त्यामुळे हिंदूंचे इहलोकानंतरच्या जगाकडे लक्ष असते व ऐहिक वैभवाच्या विचारांबद्दल ते उदासीनच असतात. भारताने अनेक तर्‍हेचे वैविध्य पोसले आहे. यावरून भारतीय लोक सर्व धर्मातील चांगल्या बाबी निवडणारे आणि उदारमतवादी असतात हे उघड आहे.

प्रतिमा बदलण्याची गरज
भारत आज खूपच महत्वाचा देश बनला आहे व येणार्‍या पुढील कांहीं दशकात स्वतःचे सामर्थ्य लक्षणीयरीत्या वाढविण्याची क्षमता भारतीयात आहे. त्यामुळे भारताने अशा सुलभ कपोलकल्पित दंतकथा पसरवणे योग्य नाहीं. १९४७ साली अशा दंतकथांच्या वाढींना प्रोत्साहन देण्याची कदाचित गरज असेल. नव्यानेच स्वतंत्र झालेला भारत जगेल काय, टिकेल काय याबद्दल खूपच आशंका जगाला होत्या. आपली राज्यसंस्थाही सुसंघटित नव्हती. फाळणीमुळे जातीय ऐक्य कितपत टिकेल याबद्दलची आशाही खूप रोडावली होती. आपले राष्ट्र एकसंध राहील याबद्दल छातीठोकपणे सांगणे अशक्य होते.
अशा परिस्थितीत सगळीच राष्ट्रे जनतेत ऐक्य निर्माण करण्यासाठी अशा कपोलकल्पित दंतकथा वापरतात. आणि भारताला असे ऐक्य निर्माण करण्याची गरज इतर राष्ट्रांपेक्षा खूपच जास्त होती. पण एका नव्याने जन्मलेल्या व नव्याने उभ्या राहिलेल्या राष्ट्राच्या सरकाराला सोयीचा असलेला हा उपाय पुढे सार्‍या राष्ट्राची जाणून-बुजून केलेली कायमची फसवणूक होऊन बसला. अशा दंतकथांमध्ये कणभर सत्याचा अंश असल्यामुळे मूळचे कापड आणि त्यावरील विणकाम यातला फरक समजायला हुशार निरीक्षकांनाही जरा वेळ लागला. पण प्रतिमा बनविणार्‍या व्यवसायिकांनी केलेल्या ढोंगांवर फक्त टीका करणे पुरेसे नाहीं कारण ही बाब त्याहून खूपच जास्त गंभीर आहे. सत्यस्वरूपाला मुद्दाम देण्यात आलेले हे विकृत रूप दोन क्षेत्रात भारताच्या लांबच्या पल्ल्याच्या हितांना हानीकारक आहे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे. पहिले आहे नजीकच्या भविष्यकाळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीयांमधील अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांना आणि त्यांच्या क्षमतेला हेरणे आणि दुसरे आहे भारताच्या आणि भारतीयांच्या क्षमतेचे अचूक मूल्यमापन जगापुढे सादर करणे कारण जगाचा भारताशी आणि भारतीयांशी जवळचा संबंध येणे अपरिहार्य आहे.
भूतकाळातील खोट्या समजुतींचे निर्मूलन परिणामकारकपणे करण्यासाठी मोठे धैर्य लागते कारण असे करणे म्हणजे सरकारच्या प्रस्थापित विचारसरणीला आव्हान देण्यासारखे आहे. पण हे काम लांबणीवर टाकून किंवा थातुरमातुर पद्धतीने उरकून चालणार नाहीं कारण असे करण्याने भारताचे खूप नुकसान होणार आहे. आजच्या परिस्थितीत अशा एका बौद्धिक तेजाबाची गरज आहे जो आपल्या बेगडी विश्वावर निर्भर रहाणार्‍या वेडगळ कल्पनांना विरघळवून टाकू शकेल आणि कांहीं मूलगामी प्रश्न स्वतःलाच विचारायला भाग पाडेल. ५००० वर्षांच्या संपन्न संस्कृतीच्या मुशीतून बाहेर पडलेल्या भारतीय उच्चभ्रू समाजाने इतक्या सहजपणे गुलामगिरी कशी पत्करली आणि ते मॅकॉलेचे आदर्श विद्यार्थी कसे बनले? आपल्या अहिंसाप्रिय स्वभावामुळे आक्रमकांना आपल्यावर वारंवार स्वारी करून आपल्यावर विजय मिळविणे शक्य झाले? कीं आपल्याहून जास्त बलवान असलेल्या शत्रूचे वर्चस्व स्वीकारण्याच्या आणि त्याच्याबरोबर संगनमत करण्याच्या स्वभावामुळे आपण गुलाम बनलो? आपण भारतीय संपन्न व शक्तिशाली शत्रूसमोर इतक्या क्षुद्रपणे लोटांगण कां घालतो? तसेच आपल्यातील गरीबांच्या आणि दुर्बलांच्या हाल-अपेष्टांबाबत आपण इतके उदासीन कां असतो?

आपल्यातील कांहीं ठळक चुका
सामाजिक आणि आर्थिक पद्धतींत इतके ढळढळीत वैषम्य असूनही स्वातंत्र्य मिळवताना किंवा ते मिळाल्यानंतरही कुठल्याही प्रकारची रक्तलांछित हिंसक राज्यक्रांती भारतात झाली नाहीं. हेसुद्धा आपल्या मूलभूत अहिंसक स्वभावाचे द्योतक आहे काय? कीं त्याचे उत्तर इतरत्र शोधावे लागेल? महात्मा गांधींसारझे उत्तुंग व्यक्तिमत्व ज्या देशाला एक सचोटीचे आदर्श म्हणून लाभले आहे त्या देशाने इतक्या अल्पकाळात इतक्या अविश्वसनीय पातळीवर भ्रष्ट कां व्हावे? योग्य साधनांचाच उपयोग करण्याबद्दल कटाक्ष ठेवून आपले ईप्सित त्यानुसार बेतण्याऐवजी आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कुठलेही बरे-वाईट साधन वापरायला आपण तयार झालो आहोत?
आपल्या धर्मातील बहुसंख्य असलेल्या एका समाजावर ज्या हिंदूंनी अस्पृश्यता लादली आणि चातुर्वण्याच्या नावाखाली त्या समाजाला दूर ठेवण्यासाठी जगातील एक सर्वात कडक अशी प्रणाली राबविली त्या समाजाला स्वतःला सहिष्णु म्हणवून घ्यायचा दावा करायचा हक्क तरी आहे काय? जर नसेल तर हा देश असा निधर्मी कसा राहिला आहे? आणि येत्या कांहीं वर्षात तो आणखी मजबूत होण्याची अपेक्षासुद्धा आपण कशी करू शकतो? समाजातील पदक्रम आणि स्थान यांचे महत्व जाणून ते मानणारे आणि अशा विषमतेला स्वीकारणारे आपण स्वतःला लोकशाही प्रवृत्तीचे कसे म्हणवून घेतो? आणि जर म्हणवून घेत नसू तर आपल्या देशात सांसदीय लोकशाही जगलीच नव्हे तर बहरली कशी? ज्या देशातले सुशिक्षित लोक घरकामाला असलेल्या नोकराना ते अर्धमेले होईपर्यंत मारतात, ज्यांच्यावर खटला चालू आहे अशा लोकांकडून कबूलीजबाब काढण्यासाठी त्यांना अंध करतात किंवा जास्त हुंड्यासाठी बायकांना ठार मारतात असे लोक स्वतःला अहिंसक म्हणून मिरवू शकतात कां? जर नसेल तर गांधीजींचे जुने अहिंसेचे डावपेच कसे काय यशस्वी झाले आणि नेताजी आणि भगतसिंग यांच्यासारख्यांच्या क्रांतिकारी उन्मादाला इतके मूठभरच अनुयायी कां मिळाले? (क्रमशः)

About the author of "Being Indian"
Pavan K. Varma graduated with honours in History from St. Stephen's College, Delhi, and took a degree in Law from Delhi University. A member of the Indian Foreign Service, he has served in Moscow, in New York at the Indian Mission to the United Nations, and as India's High Commissioner in Cyprus. He has been Press Secretary to the President of India, Official Spokesman for the Foreign Office, and is at present our ambassador to Bhutan.
He is the author of Ghalib: The Man, The Times; Kruhna: The Playful Divine; YuJhishtar and Draupadi: A Tale of Lovt, Passions and the Riddles of Existence; The Great Indian Middle Class; The Rook of Krishna; and Maximize Your Life (with Renuka Khandckar), all published by Penguin. He has also translated Kaifi Azmi (Selected poems) and Atal Bihari Vajpayee (21 Poems} into English for Penguin.

Comments

छान विषय (अनेकवचन)

एकेका भागातून चार-चार धागे कातता येतील इतका प्रक्षोभक माल आहे. परंतु हल्ली येथे खेळाडू कमी आहेत.

एक एक धागा गुंफी....

मला तर एक एक क्वेष्चन म्हणजे एक धागा वाटतोय....
त्याहीपुढे थिसीस् साठी विद्यार्थाने यातील एक एक प्रश्न घ्यावेत...
संपूर्ण भारतात् यातील एकतरी प्रकरण अभ्यासाठी शाळेत ठेवावे...

________________________________________________
कबीराचे विणतो शेले.....
कौसल्येचा राम...बाइ कौसल्येचा राम्...

+

पवन वर्मा यांचे ग्रेट इंडियन मिड्लक्लास वाचले आहे. त्यात मध्यमवर्गाने सर्व सरकारी धोरणे स्वतःला अनुकूल करून घेऊन कशाप्रकारे फायदे उपटले हे दाखवले आहे.

नितिन थत्ते

मध्यमवर्ग हा भारताचा एक तर्‍हेने कणाच आहे

नितिन,
'ग्रेट इंडियन मिड्लक्लास' या पुस्तकाबद्दल खूप ऐकले आहे. खरं तर मध्यमवर्ग हा भारताचा एक तर्‍हेने कणाच आहे. आता हातातले काम आटोपले कीं बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यात हे पुस्तकही आहे.
लिहायचे म्हटले कीं वाचन खंडते. त्यामुळे पंचाईत झाली आहे खरी!
___________
जकार्तावाले काळे

स्वपीडन

स्वपीडन. भालचंद्र नेमाडे ह्यांचे हिंदू धर्मावरील पुस्तक वाचावे. त्यात सगळी उत्तरे मिळतील.

वेळ काढून वाचेन.

'असा मी असामी'-साहेब,
धन्यवाद! वेळ काढून वाचेन.
___________
जकार्तावाले काळे

 
^ वर