विहारा वेळ द्या जरा !

हालचालींची स्वायत्तता

विहार म्हणजे चालणे, फिरणे, सहल, क्रीडा, हालचाल, शरीर-संचालन. आपल्या शरीरास निरंतर हालचाल करण्याची सवय असते. किंबहुना तसे केल्यासच ते तल्लख राहू शकते. स्वस्थ राहू शकते. मनाला जसे स्वातंत्र्य आवडते तशी शरीरास मोकळीक आवडते. अपुर्‍या जागेत, अवघडून राहावे लागल्यास शरीराचा तात्पुरता अथवा कायमस्वरूपी र्‍हास होतो. वज्रासनात कपाळ जमिनीवर टेकवून, हात शरीरालगत खेटून जमिनीवर तळवे टेकून ठेवले असता शरीरास कमीत कमी जागा लागते. समजा अशा अवस्थेत ते मुटकुळे तेवढ्याच आकाराच्या एका पिंजर्‍यात ठेवले. तर कायमस्वरूपी हानी न होता शरीर किती काळ स्वस्थ राहू शकेल? फार काळ नाही. हे केवळ कल्पना यावी म्हणून लिहिले आहे.

हल्लीच्या राहणीमानात शरीर सुटे, मोकळे, हालचाली करण्यास स्वायत्त राहणेच दुरापास्त झालेले आहे. आनंदाने किंवा दु:खाने नाचणे केवळ नाटक सिनेमात होते. प्रत्यक्षात ते होत असे, तो काळ शतकानुशतके मागे पडला आहे. जंगलात चरतांना हरीण जसे क्षणोक्षणी मान फिरवत असते, कान टवकारत असते, आधीच मोठे असलेले डोळे आणखीनच विस्फारून पाहते तद्वत्‌ हालचाली मानवी शरीरासही एके काळी आवश्यक होत्या, शक्य होत्या, जमत होत्या. ती स्वायत्तता (डिग्री ऑफ फ्रीडम) जसजशी अशक्य ठरू लागली, अनावश्यक वाटू लागली, अवास्तव वाटू लागली, नागरीकरणाच्या, सभ्यतेच्या निर्बंधांखाली तिच्यावर मर्यादा घातल्या जाऊ लागल्या, तसतशी ती नाहीशी होत गेली. आजची बव्हंशी मानवी शरीरे हालचालींतील स्वायत्तता गमावल्यामुळे अस्वस्थ झालेली दिसून येतात.

उदाहरणार्थ कामावर येता जातांना दोन दोन तास वाहनावर जखडलेल्या अवस्थेत आपल्यापैकी बव्हंशी लोकांना राहावे लागते. कार्यालयात केवळ खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत तासचे तास काढणे अनिवार्य होते. आणि मजुरापासून तर मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच किती काळ, दररोज केवळ प्रतीक्षेत काढावा लागतो ह्याची गणतीच नाही. आपण अगदी शाळेपासून आपल्या शरीरांना तशी सवय जडविण्याचा आटापिटा करत असतो. सार्वजनिक जागी हसायचे नाही, मोठ्या आवाजात बोलायचे नाही, नैसर्गिक प्रेरणांचा दीर्घकाळ अवरोध करायचा. शरीराच्या हातापायांसारख्या मोठ्या स्नायूंच्याच हालचाली जिथे मर्यादित झालेल्या, स्वायत्तता गमावलेल्या झाल्या आहेत, तिथे हृदय आणि फुफ्फुसांच्या छोट्या स्नायूंना अवघडून राहणे जास्त पसंत पडू लागले आहे ह्यात आश्चर्य ते काय?

ह्या सार्‍यांचे पर्यवसान असे होते की आपण आपली श्वसनक्षमता फक्त १० ते १५ टक्केच काय ती उपयोगात आणू शकतो. त्यातून आपल्या विहाराच्या जागा म्हणजे राहण्याच्याच जागा खरे तर, एवढ्या बारक्या झालेल्या आहेत की एकाने हात पसरले तर दुसर्‍यास अडचण व्हावी. सारे जीवनच विहारानुकूल राहिलेले नाही. शिवाय मनसोक्त विहार करावा तर त्याकरता स्वतःचा असा मुक्त, अनिर्बंध वेळ हवा ना? तो कुठे मिळतोय आपल्याला?

आपल्या शारीरिक स्वायत्ततांचा जो क्रमशः निरंतर र्‍हास होत आहे त्याची आपण शहरी लोक कल्पनाच करू शकत नाही. सार्वजनिक सभांत (हल्ली क्वचितच होतात) मांडी घालून फार वेळ बसता येत नाही. गावाकडे पाटावर बसून ताटातले जेवतांना तर हातातोंडाशी आलेल्या घासाशीच ताटातूट होते की काय अशी अनावस्था गुदरते. रोजच्या जीवनात वाकायचा प्रसंगच येत नाही, त्यामुळे वाकून नमस्कार करताना हातसुद्धा पदस्पर्श करत नाहीत. आता काही छोटी छोटी कर्तबे करून पाहा.

छोटी छोटी कर्तबे

१. पायांचे अंगठे जुळवून ताठ उभे राहा. डोळे मिटून घ्या! (सांभाळा हं, पडायला होते!)
२. पाठीमागे हात वळवून नमस्कार करा. दोन्ही हात जमिनीला समांतर.
३. उभे राहून गुडघ्यांत न वाकता, कमरेत खाली वाकून हातांचे तळवे जमिनीवर टेका.
४. ताठ उभे राहून, एकेक हात जमिनीसमांतर शरीरास लंब धरा व त्याच बाजूचा पाय वर उचलून त्यास टेकवा.
५. वज्रासन घाला. जमिनीवर मांडी घालून पद्मासन घाला. हात जमिनीवर टेकवून शरीरास झोके द्या.
६. जमिनीवर उताणे पडा, हळूहळू दोन्हीही पाय जोडीने उचलून प्रथम ४५ अंश मग ९० अंश आणि त्यानंतर १८० अंश वाकवत डोक्याच्या मागे टेकवा.

हे काही तुमची चेष्टा करण्यासाठी सांगत नाही आहे. खरे तर हे सगळे आपल्याला सहज साधायला हवे. प्रत्येक आसन (म्हणजे त्याच्या अंतिम अवस्थेत २ ते ६ मिनिटे टिकाव धरणे) जमायला हवे. कधी एके काळी आपल्या शरीरास प्राप्त असलेली ती स्वायत्तता आज आपण गमावून बसलो आहोत.

छे! मी इथे निव्वळ रडकथाच सादर करणार आहे की काय? मुळीच नाही. मात्र आपल्याला जीवनशैली परिवर्तनाची गरज अचानक कशी काय उद्भवली आहे, ते उमजून यावे ह्यासाठी हा उपद्व्याप होता.

तर मग जीवनास विहारानुकूल करण्याची, विहार करण्याची नितांत गरज आहे हे तर कबूल कराल! मग हे साधावे कसे?

किमान विहार

निदानित हृदयरुग्णांना दररोज किमान तासभर जलदगतीने (ब्रिस्क) चालण्यास उद्युक्त केले जाते. रुग्ण म्हणतात, आम्ही रोजच सकाळी फिरायला जातो. मात्र, ते गप्पा छाटत चालणे म्हणजे विहार नव्हे. चालण्यामुळे सप्ताहात एकूण २,००० कॅलरी ऊर्जा खर्च व्हायला हवी अशी अपेक्षा असते. माणूस सामान्यत: तासाला ४ किलोमीटर चालू शकतो. जलद चालतो तेव्हा तो तासाला ६ किलोमीटर चालावा अशी अपेक्षा असते. ह्या तासभर जलद चालीने अदमासे १०० कॅलरी ऊर्जा खर्च होते. असे सात दिवस दररोज चालल्यास २,१०० कॅलरी ऊर्जा सहज खर्च होऊ शकते. अर्थातच, हे सलग संजीवित -म्हणजेच वायुवीजक- म्हणजेच ऍरोबिक विहारानेच साधते, हे लक्षात घ्यायला हवे. वायुवीजक विहार म्हणजे काय?

वायुविरहित आणि वायुवीजक विहार

आता वायुवीजक विहार म्हणजे काय? तर शरीर दोन प्रकारे ऊर्जानिर्मिती करू शकते. 'वायुविरहित' प्रणालीत प्राणवायू लागत नाही आणि 'वायुवीजक' प्रणालीत तो आवश्यक असतो. वायुविरहित प्रणाली सदा तत्पर असते. जलद धावणे, गाडी पकडणे यांसारख्या अल्पवेळ चालणार्‍या, दृतगती तीव्र ऊर्जास्फुरण लागणार्‍या गरजांसाठी ती निर्माण केलेली असते. पण ती तुलनेने अपुरी असते आणि ऊर्जानिर्मितीप्रक्रियेत ती मोठ्या प्रमाणात लॅक्टिक आम्लासारख्या टाकाऊ पदार्थांची निर्मिती करते, ज्यांच्यामुळे स्नायूंना वांब येतो, ते आखडतात आणि दु:ख होते. तर, वायुवीजक प्रणाली तिच्यापेक्षा बरीच जास्त कार्यक्षम असते. मात्र ती गरज पडताच ताबडतोब कार्यास सिद्ध होऊ शकत नाही. तिला कार्यान्वित होण्याकरता एक-दीड मिनिटांचा अवधी लागतो. तोपर्यंत तुम्हाला वायुविरहित प्रणालीवर विसंबून राहायचे असते. ती असते तुलनेने क्षीण. म्हणून सत्वर सिद्ध होऊन, भारी कर्तब करण्याचे सर्व प्रयत्न तत्पश्चात शरीरास दुःख देतात. काही मिनिटांहूनही अधिक व्यायाम तुम्ही करता तेव्हा वायूवीजक प्रणालीच तुम्हाला ऊर्जा पुरवू शकते, बव्हंशी ऊर्जा पुरविते.

विहाराची पूर्वतयारी आणि विरामानुकूलन

जेव्हा तुम्ही विहारास सुरूवात करता तेव्हा, किंवा उच्च तीव्रतेचे अल्पवेळ चालणारे व्यायाम करता तेव्हा शरीर वायुविरहित जैव स्त्रोतांचा आधार घेते. पहिल्या मिनिटानंतर वा त्यासुमारास तुमच्या स्नायुंना प्राणवायुभारित रक्ताचा वाढता पुरवठा होऊ लागतो. त्या क्षणानंतर वायुवीजक प्रणाली सुरू होते. व्यायामाअगोदर पूर्वतयारी करणे का महत्वाचे असते हे ह्या दोन प्रणालींमधील फरक समजून घेतल्याने स्पष्ट होते. जर तुम्ही पूर्वतयारीविना त्वरेने व्यायामास सुरूवात कराल तर, वायुविरहित प्रणालीकडून खूप ऊर्जेची अपेक्षा कराल. त्यामुळे तुम्ही बरेच लॅक्टिक आम्ल तयार कराल आणि थकून जाल. त्याचप्रमाणे व्यायामानंतर काही मिनिटे विरामानुकूलन केल्यास शरीरास पूर्वस्थिती प्राप्त करण्यास वेळ मिळतो. म्हणजे असे की विहार, व्यायाम खाटकन थांबवू नये. अचानक परिश्रम थांबवून बसू वा आडवे होऊ नये. गती मंद करून, तीव्रता कमी करून, सावकाशपणे शरीर विश्रांत अवस्थेप्रत न्यावे. यामुळे वायुवीजक प्रणाली बंद करून, शरीराची वायुविरहित प्रतिसाद प्रणाली पुन्हा सक्रिय करण्याकरता हे आवश्यक असते. त्यामुळे तत्पश्चात येऊ शकणार्‍या, अवचित मागणीस सादर होण्याकरता, वायूविरहित प्रणाली पूर्वपदास प्राप्त करू शकते.

वायुवीजक ऊर्जा प्रणालीच्या नियमित कार्यान्वयनाने ती जास्त कार्यक्षम होते. ह्यास 'शिक्षणप्रभाव' म्हणतात. तो प्राप्त करण्यासाठी तुम्ही जो विहारप्रकार निवडाल त्यात मोठ्या स्नायूगटांचा जसे की हात आणि पाय ह्यांचा समावेश असावा. तो लयबद्ध असावा.

म्हणून पूर्वतयारी, विहार आणि विरामानुकूलन ह्यांसकट केलेला दररोज किमान तासभराचा विहार अत्यावश्यक. ह्याशिवाय, खरे तर संगीताच्या तालावर केलेले व्यायामप्रकार (हे करणे मी अजूनही सुरूच केलेले नाहीत हो!), प्रत्येक तासाला आपल्या स्थितीतून बाहेर पडून आळोखेपिळोखे देणे, बैठ्या, उभ्या इत्यादी दीर्घकाळ चाललेल्या अवस्थांना विराम प्राप्त करून देणे (यू नीड अ ब्रेक!), प्रतीक्षेचा काळ सुसह्य करणार्‍या कारनाम्यांना अंजाम देणे, आणि हो, सतत कार्यरत राहणे, सलग संजीवित हालचाल जेवढी निरंतर करता येईल तेवढी करत राहणे आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊ शकेल हे उमजून घेणे आवश्यक आहे.

विहारासाठी योग्य वेळ कोणती? जेवणानंतर की जेवणाआधी? शरीर प्रच्छन्न विहारासाठीच निर्मिले आहे! तेव्हा विहार मन चाहेल तेव्हा करा. हवा तेवढा करा. मात्र किमान उपरोल्लेखित प्रमाणात तरी करायला हवा. सकाळची वेळ सर्वात उत्तम. एरव्ही कधीही. सकाळी केल्यास प्रभातफेरी. जेवणानंतर केल्यास शतपावली आणि सतत केल्यास विनोबा एक्सप्रेस! मात्र सततच विहार करत राहिल्यास, स्वस्थता सतत वाढतच राहते का? तर नाही!

खूप वेळ विहार केल्याने खूप लाभ होत नाही

'डॉ.ऑर्निशस प्रोग्रॅम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज' ह्या पुस्तकात ते लिहीतात की 'रोज एक ते दीड तास चालण्यामुळे आयुष्य दीड वर्षे वाढते असे लक्षात आलेले आहे. मात्र सरासरी आयुष्यात त्यासाठी तुम्ही जो वेळ चालण्यात गमावता तोही त्यासारखाच (दीड वर्षे) असतो. म्हणून आयुष्य वाढविण्यासाठी चालू नका. चालल्यामुळे दिवसाच्या उर्वरित वेळात जर तुम्हाला ऊर्जस्वल वाटत असेल, उत्साही वाटत असेल तर चाला.’ सारांश काय की आपल्या आयुष्यात काय साध्य करायचे आहे ते साधण्यास लागणारी स्वस्थता मिळवण्यासाठी आवश्यक तेवढाच वेळ विहारात घालवा.

आणि सर्वात मुख्य म्हणजे, आपले आयुष्य आपल्या निसर्गनियमित दिनक्रमाच्या शतप्रतिशत मिळते जुळते असेल तर आपल्याला वेगळ्याने विहार, वेगळ्याने व्यायाम असे करण्याची मुळीच गरज राहत नाही. तेव्हा हे कसे साधता येईल ह्याचा निरंतर शोध घ्या! आपला निसर्गनियमित दिनक्रम काय असावा ह्याचा प्रामाणिकतेने शोध घ्या. मानवनिर्मित कृत्रिम आयुष्यापासून पूर्वपदावर येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. उत्तम आयुरारोग्य कमवा.

आपण काय करू शकतो?

आपल्या बैठ्या जीवनात, ज्यावेळी आपण एक तासाहून जास्त काळ खुर्चीत बसून असतो, तेव्हा खुर्च्यासनाचा बिमोड करून, किलोमीटरभर चालून येण्याची नवी प्रथा आपण सुरू करू शकलो तर ती सगळ्यात जास्त उपकारक ठरेल.

मागे एकदा डॉ.आर्चिक यांचे डोंबिवलीच्या ब्राम्हणसभेत भाषण झाले होते. त्यांनी १०,००० (steps) पावलांचे सूत्र सांगितले होते. म्हणजे आपण जर कर्त्या वयात, दररोज १०,००० पावले चालत असू (म्हणजे सुमारे ७.५ किमी) तर वाढत्या वयात सांधेदुखी होत नाही. यात पावले टाकणे म्हणजे घरातल्या घरात केलेली चाल असो, चढल्या उतरलेल्या पायर्‍या असोत किंवा जलद चालणे असो, काहीही असू शकते.

मायबोलीवर वर्षूनी एक लेख लिहिलेला होता. “व्हाट स्पोर्ट डू यू प्ले?”. प्रत्येकाने किमान एक तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे ह्या अपेक्षेने, तिला चीनमध्ये एका स्त्रीनेच विचारलेल्या ह्या प्रश्नाने, आपण सगळेच स्तिमित झालो होतो. परवा माणिक मुंढे यांच्या “हे घडेल का महाराष्ट्रात” या मोदींवरील एका लेखात गुजराथमधील “खेलोत्सवा”ची माहिती वाचली. प्रत्येकाने एक तरी खेळ खेळावाच. त्यामुळे आपापल्या शरीरांतील दीर्घकाळ सूप्त असलेल्या स्वायत्तता आणि शक्ती पुन्हा उजागर होऊ शकतील.

तेव्हा चला. सज्ज व्हा. एकतरी शारीरिक, सांघिक, मैदानी खेळ खेळू या! अगदीच अशक्य वाटले तर निदान चाला, पळा, पदभ्रमण करा, दादरे चढा-उतरा पण सतत हालत राहा. हे सारे स्वयं-प्रेरणेने, उत्साहाने, चढाओढीने करण्याचा प्रयत्न करा. विहार करा. विहारा वेळ द्या जरा!

http://aarogyasvasthata.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Comments

बशेपणा/बैठेपणा

हा लेखदेखील छान. बशेपणा/बैठेपणा ही नव्या युगाची समस्या आहेच त्यामानाने खाणे कमी झालेले नाही, ते मात्र उलट वाढलेलेच आहे.
_________________________________
नेटफ्लिक्सवरील "ओबेसिटी - अ किलर ऍट लार्ज" हा माहीतीपट सर्वांनी आवर्जून पाहण्यासारखा आहे. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असा हा चित्रपट सर्वांनी जरूर पहावा. स्थूलपणामुळे निर्माण होणारे मधुमेह, हृदरोग, मूड-स्विंग्स आदि भयानक रोग यांचा तसेच स्थूलपणाच्या विविध अंगांचा फार अभ्यासपूर्ण आढावा या माहीतीपटात घेण्यात आला आहे.

सत्वर प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

बशेपणा/बैठेपणा ही नव्या युगाची समस्या आहेच त्यामानाने खाणे कमी झालेले नाही, ते मात्र उलट वाढलेलेच आहे.>>>>

खरंय! आम्ही जात्यातून बाहेर पडलेले आहोत. सुपातल्यांनी आधीच विचार कराव हे बरे!

अचूक निदान, योग्य क्रम

स्थूलपणामुळे निर्माण होणारे मधुमेह, हृदरोग, मूड-स्विंग्स आदि भयानक रोग यांचा तसेच स्थूलपणाच्या विविध अंगांचा फार अभ्यासपूर्ण आढावा या माहीतीपटात घेण्यात आला आहे.

माहीतीपूर्ण प्रतिसाद. अचूक निदान, योग्य क्रम. ते राव की काय ते कोण साहेब आठवले. असो अश्या रुग्णांना सहानुभूती दाखवणे भाग आहे असे माहीतीपटात सांगीतले आहे बहुतेक.

गोळेकाका चांगला लेख.

छान

छान लेख.
माणूस सामान्यत: तासाला ४ किलोमीटर चालू शकतो. जलद चालतो तेव्हा तो तासाला ६ किलोमीटर चालावा अशी अपेक्षा असते. ह्या तासभर जलद चालीने अदमासे १०० कॅलरी ऊर्जा खर्च होते. असे सात दिवस दररोज चालल्यास २,१०० कॅलरी ऊर्जा सहज खर्च होऊ शकते.
कसे काय बुवा? ७ * १०० = ७००?
वज्रासनात कपाळ जमिनीवर टेकवून, हात शरीरालगत खेटून जमिनीवर तळवे टेकून ठेवले असता शरीरास कमीत कमी जागा लागते.
खरे आहे. 'माणसाला अशी किती जागा लागते?' हे आठवले.
जंगलात चरतांना हरीण जसे क्षणोक्षणी मान फिरवत असते, कान टवकारत असते, आधीच मोठे असलेले डोळे आणखीनच विस्फारून पाहते तद्वत्‌ हालचाली मानवी शरीरासही एके काळी आवश्यक होत्या, शक्य होत्या, जमत होत्या.
हे वाचून मान फिरवून बघीतली. ते जमले. आरशात बघून डोळे विस्फारुनही झाले. कान टवकारणे बाकी जमले नाही :-(
प्रतीक्षेचा काळ सुसह्य करणार्‍या कारनाम्यांना अंजाम देणे,
तेव्हा विहार मन चाहेल तेव्हा करा.
अरेरे! व्हेअर गोल्ड रस्टस, व्हॉट अबाऊट आयर्न?
'रोज एक ते दीड तास चालण्यामुळे आयुष्य दीड वर्षे वाढते असे लक्षात आलेले आहे. मात्र सरासरी आयुष्यात त्यासाठी तुम्ही जो वेळ चालण्यात गमावता तोही त्यासारखाच (दीड वर्षे) असतो.
ये हुई ना पते की बात! The advantage of exercise is that you die fiter!

सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

चुका केल्याने प्रतिसाद मिळत असतील तर चुका कराव्यात!

संजोप,

चुका केल्याने प्रतिसाद मिळत असतील तर चुका कराव्यात, असे मला वाटू लागले आहे.

भल्या सकाळी उठून हा लेख वाचलात, अभिप्राय दिलात, चूक लक्षात आणून दिलित आनंद झाला.

मुळात डॉ.ऑर्निश यांच्या पुस्तकात" एक मैल चालण्यास १०० कॅलरी " खर्च होतात असा उल्लेख आहे.
त्यावरूनच ही आकडेमोड केलेली असल्याने, या वाक्यात १०० च्या आधी "दर मैलास" असायला हवे होते.

http://urjasval.blogspot.com/2010/05/blog-post_4883.html#links
या दुव्यावर इतर कामांना लागणार्‍या ऊर्जांची सारणी दिलेली आहे.
तपशीलात रुची असणार्‍यांनी अवश्य पाहावी.

प्रतीक्षेचा काळ सुसह्य करणार्‍या कारनाम्यांना अंजाम देणे,
तेव्हा विहार मन चाहेल तेव्हा करा.
अरेरे! व्हेअर गोल्ड रस्टस, व्हॉट अबाऊट आयर्न?
>>>>> छे! व्हाय द गोल्ड विल रस्ट?

एकेकाळच्या सर्वात मोठ्या हिंदी राज्याच्या राजधानीत राहत होतो.
आमच्या भांडणाचा शेवट हिंदीत होतो.
उत्तम दाद देण्यास त्यामुळेच "माय मरो आणि मावशी जगो" हे धोरण पत्करून हिंदी लिहिले जाते. चरैवैति| चरैवैति||

'ती' चूक नाही, व 'ते' चूक दाखवणे देखील नाही.

गोळेसाहेब,
प्रत्येक नकारात्मक प्रतिसाद हा चूका दाखवणाराच असतो, असे नाही.

प्रत्येकाची लिखीत लिखाणाचा आस्वास घेण्याची पद्धत वेग-वेगळी असते. श्री. संजोप राव (माझ्या मते) आस्वाद फळ खाण्यासारखा करतात. त्यांनी दिलेल्या प्रतिसादात फळ खावून ठेवलेल्या 'बिया' आहेत. 'बीया ताटात ठेवून गेले'('थूकून गेले' असे मी इथे म्हणत नाही) अशी भावना यजमानाची, ज्याच्या लिखाणावर असा प्रतिसाद मिळतो त्याला असे वाटू शकते. पण त्याचे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.

चाहणे

तेव्हा विहार मन चाहेल तेव्हा करा.
मराठीत चाहणे हे क्रियापद आहे.

The advantage of exercise is that you die fiter!
हं. अधोरेखित शब्द मात्र विंग्रजीत नाही असे दिसते. तुम्हाला कदाचित फायटर म्हणायचे असावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

फायटर नसून फिटर असावे

Fitter असे असावे. Fit - Fitter - Fittest


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

फिटर?

>>फायटर नसून फिटर असावे

तुम्ही कानशीने कधी लोखंड घासलेलं दिसत नाही. :(

नितिन थत्ते

प्रक्टिस्.....

तुम्ही कानशीने कधी लोखंड घासलेलं दिसत नाही. :(

>>>>एक्सर्साइज केल्यावर जमेल कि!

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

फिटरच

फिट-फिटर-फिटेस्ट मधले फिटर. एक टी खाल्ला गेला. त्यात किती कॅलरीज होत्या माहिती नाही!
सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

व्यासंग

धम्मकलाडू यांच्या जालव्यासंगाचे आम्हांस सदैव कवतुक वाटते. प्रिय व्यक्तींना डिफेंड करताना त्यांच्या व्यासंगाला विशेष धार चढते असे आमचे निरीक्षण आहे.
सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

चुकीचे निरीक्षण

धम्मकलाडू यांच्या जालव्यासंगाचे आम्हांस सदैव कवतुक वाटते. प्रिय व्यक्तींना डिफेंड करताना त्यांच्या व्यासंगाला विशेष धार चढते असे आमचे निरीक्षण आहे.
हाहाहा. रावसाहेब, तुमचे निरीक्षण चुकीचे आहे, काही विधाने अनटेनेबल आहेत तर आम्ही काय करावे?

धम्मकलाडू
तुमचा स्वभाव कसा आहे? साखर वाढण्यापूर्वी कसा होता?

पटले नाही

चाहिले/चाहले, चाहेल/चाहील, चाहायचा, इ. रूपे सवयीची नाहीत. त्यापेक्षा वांछिणे/इच्छिणे/अपेक्षिणे ही क्रियापदे थोडी अधिक सवयीची वाटतात. सवयीची नसली तरी गीर्वाण शब्द मराठीत प्रच्छन्नपणे वापरता येतात, उंटिणीचे दूध मात्र परकेच म्हणावे असे मला वाटते.

चाहता

चाहिले/चाहले, चाहेल/चाहील, चाहायचा, इ. रूपे सवयीची नाहीत.
चाहता हा शब्द आहे ना सवयीचा?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धम्मकलाडू धन्यवाद! देरसे लेकिन .... दुरुस्त!

धम्मकलाडू यांच्या जालव्यासंगाचे आम्हांस सदैव कवतुक वाटते. प्रिय व्यक्तींना डिफेंड करताना त्यांच्या व्यासंगाला विशेष धार चढते असे आमचे निरीक्षण आहे.>>>>>> सत्य वचन!

रावांच्या या विधानाने मला जाग आली. देरसे लेकिन... दुरुस्त!

चांगला लेख

साध्या सहज आणि सातत्याने केलेल्या चलनवलनांच्या प्रकारांनीही खूप मदत होते असे वाटते.

शरीरातले साखरेचे प्रमाण वाढले की काहीजणांचे मानसिक संतुलन घसरते असे हल्लीच पाहण्यात आले आहे. त्यांनी लेखात सांगितल्याप्रमाणे विहार केल्यास (नेटावर नाही हं!) त्यांना शारीरिक आणि मानसिक फायदा होईल असे वाटले.

शारिरिक संतुलन

शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले तरी सुद्धा मानसिक संतुलन बिघडू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेही यांच्या बाबतीत ही अडचण ज्यास्त प्रमाणात येऊ शकते. या बाबत लेखकाचे काय मत आहे हे वाचण्यास आवडेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मत सांगतो, मात्र माझा त्यावर अभ्यास नाही हे लक्षात घ्या!

मानसिक संतुलन हे शारीरिक संतुलनाचे पर्यवसान असते.
म्हणूनच योगाचार्य केशव कृष्णाजी कोल्हटकर यांनी त्यांच्या गौरवान्वित पुस्तकाचे नाव
"भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन" असे ठेवलेले आहे.
पाचशेहून अधिक पानांच्या ह्या अद्भूत ग्रंथात आपल्या जीवनातील अनेक साखळलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडतात.

हृदयविकार जसा आहार-विहारातील "अतिरेका"मुळे उद्भवतो,
तसा मधुमेह आहार-विहारातील (विशेषत: विहारातील) "निष्क्रियते"मुळे उद्भवतो,
असे माझे आवडते मत आहे.

इन्सुलीनची शरीरांतर्गत निर्मिती आणि बाह्य इन्सुलीनचा शरीरातील सक्षम वापर याकरता
शरीराच्या सतत सक्रियतेची गरज असते.

हृदयविकार नामशेष करता येतो हे निश्चित.
मात्र, मधुमेह केवळ सांभाळावा लागतो अशी आजवरची मान्यता आहे. मलाही त्याबाबत अधिक काही माहीत नाही.

अभ्यास प्रत्येकाचाच असतो

"अभ्यास नाही" असे कोणीच म्हणू नये, प्रत्येकाचा व्यासंग कमी-अधिक असेल पण काहीतरी माहिती असतेच.

पाचशेहून अधिक पानांच्या ह्या अद्भूत ग्रंथात आपल्या जीवनातील अनेक साखळलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडतात.

उदाहरणार्थ?

हृदयविकार जसा आहार-विहारातील "अतिरेका"मुळे उद्भवतो,
तसा मधुमेह आहार-विहारातील (विशेषत: विहारातील) "निष्क्रियते"मुळे उद्भवतो,
असे माझे आवडते मत आहे.

'उद्भवतो' हे सत्य परिस्थितीचे वर्णन करणारे क्रियापद आहे. "अतिरेकामुळे हे रोग उद्भवावेत" किंवा "उद्भवितात असे आढळल्यास मला आवडेल" अशी विधाने असतील तर 'आवडणे' ठीक आहे. कल्पनाविलास सांगण्याचा हेतू आहे की तुमच्या मते सत्य असलेली विधाने सांगण्याचा हेतू आहेत ते कृपया ठरवा.

आवडते

>>'उद्भवतो' हे सत्य परिस्थितीचे वर्णन करणारे क्रियापद आहे. "अतिरेकामुळे हे रोग उद्भवावेत" किंवा "उद्भवितात असे आढळल्यास मला आवडेल" अशी विधाने असतील तर 'आवडणे' ठीक आहे.
आतासुद्धा ठीकच आहे असे माझे मत आहे.
१. रिटे आंबा खातो आणि रीटा आंबा खाते.
२. रिटे आंबा चोरुन खातो आणि रीटाही.
यातील दुसरे मत माझे आवडते आहे असे मी नक्कीच म्हणु शकते.

>>कल्पनाविलास सांगण्याचा हेतू आहे की तुमच्या मते सत्य असलेली विधाने सांगण्याचा हेतू आहेत ते कृपया ठरवा.
हे मात्र ठरवावे लागेल.

मत म्हणजे काय?

मत हा शब्द साधारणतः सत्यपरिस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरला जात नसून सत्यपरिस्थितीविषयी अंदाज व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. संशय घेताना 'मत आहे' असे म्हणावे, चोरीचा पुरावा सापडला की 'निरीक्षण आहे' असे म्हणावे.

उलट देखील

मानसिक संतुलन हे शारीरिक संतुलनाचे पर्यवसान असते.

तसेच मानसिक संतुलन आधी ढळणे आणि नंतर त्याचा शरीरावर परिणाम होणे हे देखील आढळले आही. (ताण असलेला माणूस जास्त खाण्याची शक्यता असते.)

पातंजल योगसुत्रे इथे सापडतात. तुम्ही म्हणता त्याचा त्यात उल्लेख आहे का?

प्रमोद

अभिप्रायार्थ मनःपूर्वक धन्यवाद!

साध्या सहज आणि सातत्याने केलेल्या चलनवलनांच्या प्रकारांनीही खूप मदत होते असे वाटते. शरीरातले साखरेचे प्रमाण वाढले की काहीजणांचे मानसिक संतुलन घसरते असे हल्लीच पाहण्यात आले आहे. त्यांनी लेखात सांगितल्याप्रमाणे विहार केल्यास (नेटावर नाही हं!) त्यांना शारीरिक आणि मानसिक फायदा होईल असे वाटले. >>>>> खरंय!

ओक्के

साध्या सहज आणि सातत्याने केलेल्या चलनवलनांच्या प्रकारांनीही खूप मदत होते असे वाटते. शरीरातले साखरेचे प्रमाण वाढले की काहीजणांचे मानसिक संतुलन घसरते असे हल्लीच पाहण्यात आले आहे. त्यांनी लेखात सांगितल्याप्रमाणे विहार केल्यास (नेटावर नाही हं!) त्यांना शारीरिक आणि मानसिक फायदा होईल असे वाटले. >>>>> खरंय!

>>>>> अस्सं अस्सं! ठिकाय .... चांगली महिती

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

चांगली

चांगली माहीती. अमेरिकेत दुसर्‍या महायुद्धानंतर समृद्धीच्या पाठोपाठ अनेक बैठ्या संस्कृतीमुळे आजारही आले. भारतातही तशी परिस्थिती येत आहे/आली आहे असे वाटते.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

'वायुविजन' शब्दाचा अर्थ आता कळला!

हा लेख मला आकलताना (भाशेमुळे) किचकट वाटला होता. काहि मुद्द्यांकडे वाचूनही दुर्लक्श झाले होते. 'विचारा वेळ द्या जरा!' ह्या चर्चेतील श्री. प्रमोदजींचा प्रतिसाद वाचला अन् तुम्हाला, विहारात वायुविजन असे जे काहि म्हणत आहात त्याचा अर्थ कळला.
तुम्ही जो व्यायामाचा प्रकार म्हणून जे सांगत आहात. ते मी अनेक वर्शांपासून करीत आहे. पण ते व्यायाम म्हणून करत नाही.
मुंबईत ट्रेनने प्रवास करावा लागतो. ट्रेनने प्रवास करण्यासाठी अनेकदा पटापट जिने चढावे-उतरावे लागतात. सावध न होता पटापट जिने चढल्यानंतर आपल्याला चांगलीच धाप लागते. पण मी त्यावर तुम्ही जे वायुविजन म्हणताहात ते करतो. म्हणजे मला जर थोड्या वेळात जिने पटापट किंवा नेहमीप्रमाणेच चढायचे असतात, तेंव्हा आधिपासूनच माझ्या श्वसनाचा वेग फुफुसं फुलवत हळू-हळू (आवाज करत, कोणाला ठळकपणे दिसेल, अशा पद्धतीने नाही हं!) वाढतवत नेतो. मग त्या वाढलेल्या श्वसनवेगातच मी जीने चढतो-उतरतो. ते काम झाल्यानंतर मी पुन्हा श्वसनाचा वेग जो आधि जास्त होता, तो कमी-कमी करीत सामान्यावस्थेत आणवतो.
ये आपूनका ट्रिक है!

 
^ वर