मनोव्यवस्थापन
मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥
भरल्या संसारातील मन उभ्या पिकातल्या गुरासारखेच नाठाळ असते. त्याचेवर ताबा मिळवणे सोडाच पण केवळ ते स्थिर ठेवणेही अवघड असते. ते अस्थिर होते. कसे? तर काही लोकं खुर्चीत बसल्यावर सारखा हात अथवा पाय हलवत राहतात. काही लोकं एक काही बोललेले असतील तर त्यावरील प्रतिसादाची प्रक्रिया पुरी होण्याच्या आतच लगेच त्यांना दुसरे काहीतरी वेगळेच बोलायचे असते. काही लोकं एकापाठी एक असंबद्ध विषय चर्चेला घेत असतात. तर अनेकांना समोर कुणी पाहुणा येऊन बसताच मोबाईलवर बोलायचे असते. कित्येक लोकांशी त्यांच्या घरी भेटायला जाऊनही त्यांच्याशी चार शब्द बोलणे केवळ दुरापास्त होऊन बसते. कारण ते टी.व्ही पाहत असतात. जाहिरात लागेपर्यंत आपण फक्त बसून राहायचं. हव तर टी.व्ही. पाहायचा. आणि लोकंच अशी वागतात असे नसून आपणही अनेकदा ह्या प्रकारच्या वागणुकीचे नमुने ठरत असतो. अशा प्रकारची वागणूक इतरांस देणे म्हणजे खराब मनोव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना होय.
आमच्या योगशिक्षिका ध्यानधारणेस बसतांना मोबाईल बंद करण्यास सांगत. फोन येईल अशा अपेक्षेत असलेले मन कुठल्याही कामात क्वचितच एकाग्र होऊ शकते. त्या म्हणत जे काम करत असाल, त्याव्यतिरिक्त सर्व कामे तात्पुरती पण पूर्णपणे थांबवा. शिवाय (लटकेच का होईना पण), जे काम करत आहात ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ (ऑल द टाईम इन द वर्ल्ड- अहो हल्ली प्रत्येक गोष्ट इंग्रजीत पुन्हा एकदा सांगावीच लागते! काय करणार?) उपलब्ध आहे असे समजा. मुळीच घाई-गडबड नाही, असेही माना. ते काम पूर्ण इतमामानिशी आणि शांत मनाने पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला कुठलेच काम करण्याची गरज भासणार नाही अशीच भूमिका घ्या. असे साधल्यास मनाची जी निश्चयात्मक अवस्था होत असते तीच साधणे हे ध्यानधारणेचे प्रमुख उद्दिष्ट असते.
एका वेळेस एकच काम. जे करत असू त्याव्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी त्यावेळी दुर्लक्ष. स्वस्थचित्त होणे. सावधचित्त होणे. दत्तचित्त होणे. म्हणजे ज्या गोष्टीकरता वेळ दिलेला असेल तिचाच विचार, आचार आणि व्यवहार त्या वेळी करणे. ही एकाग्रतेची प्रमुख साधने आहेत.
आमच्या बसमध्ये एक गृहस्थ दररोज घर ते ऑफिस सर्ववेळ एका छोट्याशा डायरीत राम राम राम राम असे लिहीत बसलेले दिसून येत. केवढी प्रचंड एकाग्रता त्यामुळे त्यांना साधलेली होती. ह्यात नामसामर्थ्य, जपसामर्थ्य पारंपरिक अर्थाने कितपत निर्माण झाले मला माहीत नाही मात्र ते गृहस्थ कार्यालयात नक्कीच कुठलेही काम एकाग्रतेने करू शकत असले पाहिजेत. विशेषतः त्यांचा व्यवसाय जर लेखनिकाचा असेल तर ते त्यातही कौशल्य मिळवून असावेत हे स्पष्टच आहे. कुठल्याही गोष्टीचा स्वाध्याय आणि अभ्यास माणसाला त्या गोष्टीबाबत परिपूर्ण करतात.
मी पहिल्यांदा जेव्हा योगसाधनेसाठी बसलो. मला डोळे मिटून घेण्यास सांगण्यात आले. पण काय आश्चर्य. माझे डोळे मिटेचनात. सारी सृष्टी केवळ डोळ्यांच्याच आधारे अनुभूत करण्याची लागलेली चमत्कारिक सवय सुटता सुटेना. डोळ्यांव्यतिरिक्त इतरही इंद्रिये आपल्याला आहेत हे भान मला तेव्हा आले. आंधळे कसे काय जगत असतील कोण जाणे. मी मात्र महत्प्रयासाने तेव्हा डोळे मिटू शकलो. उत्तरोत्तर प्रगती होत, आता मी ध्यानधारणेसाठी योग्य त्या प्रकारे म्हणजे अर्धोन्मिलीत डोळे ठेवून राहू शकतो. त्यासाठी कष्ट पडत नाहीत. आजूबाजूला काय घडत आहे ते डोळे किलकिले करून पाहावेसे वाटत नाही. शिक्षिकेच्या, तोंडी मार्गदर्शनाबरहुकूम योगासने करीत असतांनाही, डोळे मिटलेले असूनही, आता हात कशाला धडकणार तर नाहीत, ही व्यर्थ भीती मन हल्ली बाळगेतनासे झालेले आहे. सकारात्मक विचार करायला शिकविणे हा संस्कृतीचा भाग झाला. मात्र एके दिवशी
'बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले पाच रे एक पिल्लू हरवले, पोलिसाला सापडले' हे गाणे मी एका मुलाला
'बदका बदका नाच रे, तुझी पिल्ले पाच रे एक पिल्लू हरवले, पोलिसाने पकडले'
असे म्हणतांना ऐकले.
मुलाचे मन नकारात्मक विकल्पास किती पटकन पकडू शकले हे जाणवून माझे मन स्तिमित झाले. नकारात्मक विकल्पांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवण्याची साधने आपल्या प्रथा-परंपरांमध्ये प्रच्छन्नपणे गुंफिलेली आपल्याला दिसून येतात. त्यांचा वापर मुलांसाठीच नव्हे तर आपल्यासाठीही करून घेण्याचे दिवस आलेले आहेत.
तशीच गोष्ट आहे एकाकीपणाची. एकत्र कुटुंबे विभक्त होऊ लागली. विभक्त कुटुंबांमध्येही एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद साधायला वेळच मिळेतनासा झाला. कित्येकांच्या घरात नवरा-बायकोला एकमेकांचे निरोप समजावेत म्हणून पाटी-पेन्सिल ठेवलेली मी पाहिलेली आहे. हृदयविकार हा जसा अतिरेकाचे पर्यवसान ठरणारा रोग आहे. तसाच तो एकाकीपणाचे पर्यवसान ठरणाराही आहे.
आपल्याला आरोग्यपूर्ण जगायचे असेल तर आयुष्याचा वेग कमी करा. थांबा थोडे. बोला घरच्यांशी. बाहेरच्यांशी कार्यालयातल्यांशी. कुठल्याही विषयावर. मोकळेपणाने. वितंडवाद न घालता. आपल्याला आवडणारे त्याचे गुण त्याला वर्णन करून सांगा. केवळ चांगल्या गोष्टीच हुडका. आणि त्यांची स्तुती करा.
मनुष्याची भाषा ही अभिव्यक्तीचे उत्तम साधन आहे. तिच्या आधारे. वस्तू, परिस्थिती, काळ, त्यांचे परस्परसंबंध, पर्यवसान इत्यादींबाबतची वर्णने करता येतात. वर्णने एकतर स्तुतीपर असतात, वस्तुनिष्ठ असतात किंवा निंदाव्यंजक असतात. यांमधील निंदाव्यंजक वर्णने टळावित म्हणून संस्कृतीची गरज भासते. भारतीय संस्कृतीत ह्यावर शोधलेला उपाय म्हणजे चांगल्याची स्तुतीस्तोत्रे. अशी असंख्य स्तुतीस्तोत्रे आपल्या आठवणीत असतील. मात्र निंदाव्यंजनाची गीते आपल्या स्मरणत कितीशी आहेत? तुम्ही 'रावणनिंदा' अशा प्रकारचे काव्य ऐकलेले आहे का कधी? कारण ते निषिद्धच मानलेले आहे. तेव्हा निंदाव्यंजनापासून दूरच राहावे हे बरे.
रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करा की आज आपण कोणती सृजनात्मक गोष्ट केली. काय महत्त्वपूर्ण साध्य केले. उद्या सृजनात्मक, महत्त्वपूर्ण काय करावे ह्याचाही विचार करा. स्वतःसाठी नव्हे अक्ख्य्या मानवतेसाठी. हळूहळू नवनवीन गोष्टी सुचतील. मनोव्यवस्थापन रंगत आणेल.
.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
Comments
सहमत आहे साहेब
सगळे खरे आहे.
पण
- कळते पण वळत नाही व ह्यातच आयुष्य जाते
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।। ६.५ गीता।।
काय झालेय
सर, तुम्हाला हे काय झालेय मधेच?
विल्कप
मोहन राव
सगळ्यांनीच असा विचार केला तर आपल जगणे कीती सुन्दर होईल
नाही का?
डायरी भेट म्हणून द्यावी काय? :(
व्यवस्थापन | विज्ञान | वैद्यकशास्त्र | तत्त्वज्ञान | सामाजिक | अनुभव | माहिती | विचार