दुसरा वसाहतवाद
ब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत. त्यांच्या देशात होणाऱ्या व्यवसायासाठी त्यांनी आपल्या देशाचा वापर आयती बाजारपेठ म्हणून केला. आपल्याला त्यांची 'वसाहत' या नात्याने वापरले. ह्या धोरणाचे सत्य स्वरूप लक्षात आल्यावर, इथल्या पुढाऱ्यांनी परदेशी कापडाच्या होळ्या करून, स्वदेशीचे महत्त्व लोकांना पटवून देऊन त्या धोरणाचा प्रतिकार केला. तो एक स्वातंत्र्यलढ्याचाच भाग होता.
हृदयविकाराचे वाढते प्रमाण, त्यावरील उपाययोजनांचे फुटलेले पेव, पाश्चात्य वैद्यकीय प्रणालीच्या दावणीला बांधलेली आपल्या सरकारची धोरणे; आणि बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांची आक्रमक विक्रीसंहिता ह्यांच्या परिणामस्वरूप, आज मला 'दुसरा वसाहतवाद' अवतीर्ण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कसा ते संगतवार पाहू या.
२००४ सालच्या उत्तरार्धात माझा रक्तदाब १६०/१०० असा राहत असे. तसा तो गेले वर्षभर राहत होता. मी आयुर्वेदिक उपचार घेत होतो. मात्र माझ्या वैद्यांना खऱ्या उपचारप्रणाली माहितच नव्हत्या, हे आज स्पष्टपणे जाणवत आहे. म्हणूनच वर्षभर त्यांची औषधे, पथ्थ्ये करूनही रक्तदाब नियंत्रणात येऊ शकला नव्हता. ऍलोपॅथिक प्रणाली फिटनेस सर्टिफिकेट देणार (ही मक्तेदारी तिला आपल्याच मायबाप सरकारने दिलेली आहे). त्यांनी ते दिले नाही. कारण त्यांच्या मानदंडांप्रमाणे रक्तदाब ढिसाळपणे (पुअर बी.पी. मॅनेजमेंट) सांभाळल्या जात होता. म्हणून त्यांनी ताणचाचणी, हृदयधमनी आरेखन, हृदयधमनी रुंदीकरण इत्यादी सोपस्कार उरकून मला फिट ठरवले. मी कामावर रुजूही झालो. मात्र सारे 'फसाद का ज़ड' रक्तदाब, तो खाली उतरायला तयार नव्हता. तो असे १३०/९०, १४०/१०० असा. थोडासा कमी झालेला होता. त्याला शस्त्रक्रियेचे फलित मानित. जास्त वाढला तर गोळ्या वाढवून देण्याची ताकीद (धमकी?) देत. मग मी चौकशी केली. रक्तदाब शस्त्रक्रियेने उतरणार नव्हताच. तो उतरणार होता, केवळ सम्यक जीवनशैली परिवर्तनांनी. आणि हेही मला प्रतिबंधक हृदयोपचार शाखेकडे पोहोचल्यावर समजले. एरव्ही कळते ना.
आता रक्तदाब ढिसाळपणे (पुअर बी.पी. मॅनेजमेंट) सांभाळल्या जात असल्याचा आरोप ऍलोपॅथीवर करण्याची वेळ माझ्यावर आलेली होती. मात्र नुसत्या दोषारोपांनी माझे आरोग्य परतणार नव्हते. उपाय हवा होता. आणि तो केवळ 'सम्यक जीवनशैली परिवर्तन' हाच असल्याची आता माझी खात्री पटलेली होती. मग मी जीवनशैलीगत परिवर्तनांचा स्वीकार केला. ती कर्मठपणे पाळली. आणि आहाराचे सक्त नियंत्रण केले. मग माझा रक्तदाब तीन महिन्यात १२०/८० वर राहू लागला. हा तर 'आहाराने रोग हरा' म्हणणाऱ्या आयुर्वेदाचाच उपाय होता. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की तो माझ्या आयुर्वेदिक वैद्यांना -ज्यांच्यावर मी अतुट विश्वास ठेवला होता, ज्यांची पथ्थ्ये मी थकता पाळत असे त्या वैद्यांना- तेव्हाही ज्ञात नव्हता, आजही नाही, आणि आणखी किती रुग्णांची त्यामुळे फसगत होईल हे सांगता येणे कठीण आहे.
२००५ च्या मध्यात, रोगावर उपाय गवसलेला होता. आरोग्य परतत होते. पण एका नवीनच समस्येला मी तोंड देत होतो. हृदयधमनी रुंदीकरण झालेल्या रुग्णांना रु.७५०/- दरमहा किंमतीची औषधे घ्यावीच लागतात. रक्तदाबावरील, धमनीविस्फारक, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीची आणि हो रक्ततरलक (शस्त्रक्रियेमध्ये धमनीत बसविलेल्या विस्फारकाभोवती कीट साठू नये म्हणून घ्यावी लागणारी अतिरिक्त काळजी) औषधे. म्हणजे सालीना रु.९,०००/- बिनबोभाटपणे बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांच्या हवाली करायचे. भरमसाठ औषधांच्या अवांछनीय उपप्रभावांची भीती सतत वाहायची. आणि जीवनशैली परिवर्तने स्वीकारलेली नसतील तर आपला विकार वाढवत राहायचा. हृदयविकाराला प्रगतील विकार म्हणतात, ऍलोपॅथीत. हे काही माझ्या समस्येचे समाधान नव्हते. मला याहून चांगला निसर्गनिकट मार्ग हवा होता.
ज्या साध्या-सोप्या उपायानी मी आज बरा झालेलो आहे, तो मला त्याकाळी कुणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हते. आज मी सांगू शकतो. सांगतो आहे. ज्याप्रमाणे कुत्र्याला गळ्यात पट्टा बांधून आपण सोडून देतो, आणि आपला समजू लागतो, त्याप्रमाणेच ऍलोपॅथीने माझी अँजिओप्लास्टी करून सोडून दिले होते, ती मला आपला मानू लागली होती. पूर्वी कधीच लागली नसती अशी (रक्ततरलक) औषधे जन्मभर घेत राहण्यासाठी. आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची धने करत राहण्यासाठी. मला हे मानवणारे नव्हतेच. तेव्हाही, आणि आजही.
दरम्यान मी माझ्या आसपासच्या लोकांची अशाच प्रकारच्या अनुभवांसाठी चाचपणी करीत होतोच. आश्चर्याची गोष्ट अशी की मला माझ्या आसपासच तसले अनेक जण आहेत, ही माहिती नव्यानेच समजली. अनेकजण असेही म्हणातांना आढळले की हल्ली हृदयविकाराचे प्रमाण फारच वाढले आहे. एकाच्या, गेल्या सहा वर्षात दोन अँजिओप्लास्ट्या आणि एक बायपास झालेली होती (हे सद्गृहस्थ आज हयात नाहीत). एकाची, तीन वर्षांच्या काळात एक अँजिओप्लास्टी होऊनही अडथळे वाढतच राहीलेले होते. म्हणून बायपास करण्यात आलेली होती. मीही तोच मार्ग आक्रमणार होतो का? नाही! मुळीच नाही!! मी दचकलो. जागा झालो. माझ्या मनात एकदम प्रकाश पडला. साक्षात्कारच झाला (डॉ. अभय बंग म्हणतात तसा 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'). ज्याने मला जाणीव करून दिली की मला मुळी ह्या शस्त्रक्रियेची गरजच नव्हती.
माझ्यासारख्या मध्यमवयीन, सुखवस्तू, सद् गृहस्थाला केवळ आरोग्यकारी सम्यक जीवनशैली कोणती हे कळण्याची नितांत गरज होती. मी ती कर्मठपणे पाळू शकणाऱ्यांपैकी एक होतो. तो सल्ला मिळालाच नाही (इतर अनेक मिळाले त्यांची चर्चा ह्यापूर्वीच केलेली आहे). त्यानेच वाढता रक्तदाब ठिकाणावर आला असता. आताही त्यानेच आलेला आहे. मात्र, अजिबात गरज नसलेली शस्त्रक्रिया माथी मारण्यात आली. आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्याच्या नावाखाली बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांचा 'गुलाम' करण्यात आले. माझ्या, ही गुलामी लक्षात आली.
हजारो इतर समकक्ष रुग्णांच्या मनात असले काहीही येण्याची सुतराम शक्यता नाही. याची कारणे दोन. एक म्हणजे त्यांना शस्त्रक्रियेची मुळीच गरज नव्हती ही माहिती त्यांना मुळीच नसते. आणि दोन म्हणजे परिणामांची जाणीव हळूहळूच होत राहते.
पहिल्या वसाहतवादानंतर उपाय म्हणून 'स्वदेशी' चा नारा देण्यात आला. ह्या वसाहतवादास उत्तर म्हणून मी 'निसर्गनिकट' जीवन जगण्याचा नारा देत आहे. मी आज सातपैकी पाच गोळ्या कायमच्या बंद करवण्यात यशस्वी झालेलो आहे. उरलेल्यांचीही गरज राहू नये अशी माझी धारणा आहे. मी ह्या गुलामीतून सुटका करून घेण्याच्या फार जवळ आलेलो आहे. तेव्हा तुम्हीही सांभाळा. गुलाम होऊ नका. आप्तस्वकीयांना गुलाम होऊ देऊ नका. चुकून गुलाम झालेले असाल तर जाणीवपूर्वक सुटका करून घ्या!
Comments
अतिरेकी विचारसरणी
हा लेख वाचल्यावर एका विशिष्ट (लेखकाची स्वत:ची) केसमधे ऍलोपाथिक उपाययोजना तितकीशी प्रभावी ठरली नाही व त्या ऐवजी जीवन शैलीतील बदलांनी सध्या गुण आल्यासारखे वाटते आहे या एवढ्याच निरिक्षणावरून अऍलोपाथिक औषधयोजना व बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांवर एवढ्या प्रमाणात ताशेरे ओढणे तितकेसे योग्य वाटत नाही.
मी स्वत: गेली 10 वर्षे ऍलोपथिक रक्तदाब नियंत्रक गोळ्या घेत आलो आहे. माझा रक्तदाब अतिशय उत्तम रित्या (125-80) या गोळ्यांनी नियंत्रणात गेली 10 वर्षे राहिलेला आहे. मी ज्या गोळ्या घेतो त्यातील 3 पैकी 2 बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेल्या नसून भारतीय औषध कंपन्यांनी (डॉक्टर रेड्डीज, रॅनबॅक्सी) बनवलेल्या आहेत. व या सर्व गोळ्या फारशा महाग आहेत असे मला वाटत नाही.
जीवन शैली सम्यक ठेवावी या बाबत विवाद असण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने यासाठी प्रयत्त्न करणे आवश्यक आहे. परंतु म्हणून ऍलोपथिक औषध योजना अयोग्य आहे हे मला पटत नाही.
पूर्वी लहान मुलांना सौम्य औषध योजना केली जात असे. आता अनेक नवीन व्हायरस (उदा. एच1 एन1)व बॅक्टेरिया तयार झाले आहेत. त्यांच्यावर प्रभावी औषधयोजना फक्त ऍलोपथीनेच शक्य आहे. असा रोग झालेल्या लहान मुलांच्या आई-वडीलांना लेखकाने आपले विचार सांगून बघावेत. त्यांच्याकडून काय प्रतिसाद ये ईल हे मी सांगण्याची गरज नाही.
थोडक्यात म्हणजे टोकाची भूमिका न घेता सर्व प्रकारच्या औषधप्रणालीतून आपल्याला परवडेल, प्रभावी होईल व अशी औषध योजना डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर. फुली मारून टाकाऊ आहे असे ठरवणे योग्य होणार नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
जीवन शैली सम्यक ठेवावी या बाबत विवाद असण्याचे काहीच कारण नाही
अर्थपूर्ण प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!
अतिरेकी विचारसरणी >>>> ढासळलेले संतुलन साधायचे असेल तर दुसरे टोक गाठावेच लागते!
एवढ्याच निरिक्षणावरून ऍलोपाथिक औषधयोजना व बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांवर एवढ्या प्रमाणात ताशेरे ओढणे तितकेसे योग्य वाटत नाही. >>>> त्यांना माझा मुळीच विरोध नाही. सहज उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपचारांचे वैयर्थही मी उघड केलेले आहे. त्यावर आपण काहीच कसे बोलला नाहीत? सध्या भारतात प्रचलित असलेल्या उपचार प्रणालींमध्ये ऍलोपाथिक औषधयोजना सर्वाधिक स्वीकारार्ह आहे, यात मुळीच संशय नाही. ऍलोपाथिक प्रणालीचाच एक भाग प्रतिबंधक हृदयोपचारांचा आहे. त्याविषयी तुमचे काय मत आहे?
माझा रक्तदाब अतिशय उत्तम रित्या (125-80) या गोळ्यांनी नियंत्रणात गेली 10 वर्षे राहिलेला आहे. >>>> उच्च रक्तदाब नामशेष करणे तुमचे उद्दिष्ट नाही काय? केवळ 10 वर्षे "नियंत्रणात" राखण्यातच खरे यश सामावलेले आहे असे तुम्हाला वाटते काय? कदाचित उच्च रक्तदाब नाहीसा करणे शक्य असल्यावर तुमचा विश्वास नसेल! पण ते १००% शक्य आहे असे माझा अनुभव सांगतो. ज्या गोळ्या तुम्ही सालोसाल घेत आहात त्यांच्या दुष्परिणामांची तुम्हाला कल्पना आहे काय? तुम्ही जर मेदविदारक गोळ्या घेत असाल तर मूत्रपिंडावर त्या विपरित परिणाम करतात ह्याची तुम्हाला जाणीव आहे काय?
जीवन शैली सम्यक ठेवावी या बाबत विवाद असण्याचे काहीच कारण नाही. >>>> तुमच्या मते सम्यक जीवनशैली म्हणजे काय? मीही माझे विचार इथे सविस्तर लिहीण्याच्या विचारात आहेच.
सर्व प्रकारच्या औषधप्रणालीतून आपल्याला परवडेल, प्रभावी होईल अशी औषध योजना डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर. फुली मारून टाकाऊ आहे असे ठरवणे योग्य होणार नाही. >>>> सत्य वचन!
काही मुद्दे
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या काही मुद्यांबाबत खुलासा.
उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक उपचारांचे वैयर्थही मी उघड केलेले आहे. त्यावर आपण काहीच कसे बोलला नाहीत?
मला आयुर्वेदिक औषधांचा फारसा अनुभव नाही. मात्र काही आयुर्वेदिक औषधे अतिशय प्रभावी असतात. उदा. सूतशेखर किंवा कूटजारिष्ट. मला या उपचार प्रणालीचा अनुभव नसल्याने त्यावर भाष्य करणे मला योग्य वाटले नाही.
उच्च रक्तदाब नामशेष करणे तुमचे उद्दिष्ट नाही काय?
उच्च रक्त दाब अनेक कारणांमुळे असू शकतो. त्यातील एक कारण हे जनुकीय असते. अशा प्रकारचा उच्च रक्तदाब नैसर्गिक कोणत्याही उपायाने कधीही कमी होत नाही. मी सर्व चाचण्या करून घेतल्यावर मला उच्च कॉलेस्ट्रॉल किंवा मधुमेह किंवा लठ्ठपणा या सारखा कोणताही विकार नाही हे लक्षात आले. हृदयविकार किंवा धमन्यांना काठिण्य आल्याचेही दिसले नाही. त्यामुळे माझा उच्च रक्त दाब केवळ जनुकीय कारणांनी असावा असे डॉक्टरांचे मत झाले व म्हणून ही औषधे हयात असेपर्यंत घ्यावी असे त्यांनी सुचवले. त्याप्रमाणे मी ती घेत आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे या औषधांनी माझा रक्तदाब नियंत्रणात राहिलेला असून कोणतेही वाईट परिणाम गेल्या 10 वर्षात तरी दिसलेले नाहीत.
तुमच्या मते सम्यक जीवनशैली म्हणजे काय?
साम्यक जीवन शैलीची माझी व्याख्या तुम्ही सांगितलेल्या व्याख्येपेक्षा बरीच निराळी आहे. कोणताही अतिरेक न करता, कोणतेही पथ्यपाणी न करता व कोणतीही हवीशी वाटणारी गोष्ट न नाकारता जीवनातील सर्व गोष्टींचा आनंद उपभोगत जीवन जगणे याला मी साम्यक जीवन शैली म्हणतो. आपण आपल्या आधीच्या लेखात जो दिनक्रम दिला आहे तो फारतर काही कालासाठी पथ्य म्हणून आचरणे मला मान्य होईल. परंतु पाऊस पडत असताना मला जर भजी खावीशी वाटली व ती मला खाता येणार नसली तर त्याला काही साम्यक जीवन शैली म्हणता येणार नाही. अर्थात हवीशी वाटली म्हणून बशीभर भजी खाल्ली हे ही साम्य्क जीबन शैलीत बसणार नाही हे नक्की. कोणत्याही गोष्टीचा ती कितीही आवडत असली तरी अतिरेक हा होताच कामा नये.
माझे विचार कदाचित आपणास अशास्त्रीय व वेडगळ वाटण्याची शक्यता आहे परंतु ज्या जीवनातून आपल्याला आनंद लुटता येत नाही अशी जीवन शैली सम्यक असू शकत नाही असे मला वाटते. आपण दिलेला जीवनक्रम मी अनुसरला तर त्या मुळे येणारी बंधने हा जीवन जगण्यातला आनंद नक्कीच कमी करतील असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
जनुकीय कारणांनी "हृदयविकार" कोणत्या वयात होऊ शकतो?
जनुकीय कारणांनी "हृदयविकार" कोणत्या वयात होऊ शकतो?
वयाची तीशी गाठण्याच्या आतच जर हृदयविकाराने गाठलेले असेल आणि इतर कारणे सशक्त नसतील तर जनुकीय कारणे महत्त्वाची ठरतात. वृद्धापकाळाने मरणार्या बहुतांश रुग्णांच्या मृत्यूचे कारण "हृदयक्रिया बंद पडून मृत्यू" असे दिले जाते, तो जनुकीय हृदयविकार म्हणावा काय? तसे असेल तर सर्वच लोक जनुकीय हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे समजावे लागेल.
सशक्त जनुकीय कारणे असूनही हृदयविकाराने न गाठलेली माणसे अस्तित्वात असू शकतात. असतातच.
जनुकीय कारणे अस्तित्वात असलेल्या रुग्णांनीही हृदयविकार नामशेष करण्याचे उद्दिष्ट राखणे निरर्थक आणि असंभवनीय नाही.
उच्च रक्त दाब आणि हृदय विकार
जनुकीय कारणांनी कोणताही आजार कोणत्याही वयात येऊ शकतो. परंतु जनुकीय कारणांनी येणारा उच्च रक्त दाब व हृदय विकार यात फरक आहे असे मला वाटते. या प्रकारच्या उच्च रक्त दाबाला इंग्रजीमधे हायपरटेन्शन असे नाव आहे व तो आजार समजला जात नाही. योग्य औषधयोजना करून हायपरटेन्शन नियंत्रणात ठेवता येते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
:)
तरीही पॅकेज डील नाही म्हणाले!
And I thought my jokes were bad. - Joker
क्ष्
दुष्परिणाम
माझा अलोपथीचा फार अभ्यास नाही पण असे वाचल्याचे स्मरते कि "अलोपाथीचे दुष्परिणाम हे कालांतराने जाणवतात, काही पिढ्यानंतर अलोपथीमुळे जेनेटीक म्युटेशन होऊन कर्करोगाची शक्यता वाढू शकते म्हणूनच पाश्चात्य देशात कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे".
ह्या विधानासाठी मला हवा तो संदर्भ सापडला नाही, प्रयत्न करीत आहे.
बाकी आज काही गोष्टींसाठी अलोपथीस पर्याय नाही ह्यास सहमत.
शक्य
वैज्ञानिक वैद्यकामुळे आयुर्मानात बरीच वाढ झालेली असते. पेशीच्या प्रत्येक विभाजनात म्यूटेशनचा थोडा धोका असतोच, जितक्या अधिक वेळा पेशीचे विभाजन होईल तितका धोकाही वाढेल. अपघात, जंतुसंसर्ग, कुपोषण, ही कारणे कमी होऊन वयोमर्यादा वाढली की कर्करोगाचे प्रमाण वाढणारच!
+१
+१
वृद्धापकाळी होणार्या जुनाट रोगांचा मुळापासून प्रतिबंध बालमृत्यूमुळे होतो. आणि शिरच्छेदाने अर्धशिशीची तक्रार कायमची संपते.
बैलगाडी?
माझा अलोपाथीला पूर्ण विरोध आहे असे नाही पण हा थोडा टोकाचा सपोर्ट आहे, अलोपथी पूर्णपणे नैसर्गिक उपचारपद्धती नाही व त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होणारच व ते फक्त वृधापाकालामुळेच होतात असे नाही.
जर काही शतकांचा काळ जमेस धरल्यास हे जनुकीय बदल ग्लोबल वार्मिंग प्रमाणेच भासू शकतात, जसे आज उपलब्ध सोयी साधने गरजेची वाटतात पण त्यांचे दुष्परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत त्याचप्रमाणे ह्या जनुकीय बदलांचे देखील दुष्परिणाम भोगावे लागतील.
मी अमुक एका उपचारपद्धतीला सपोर्ट करत नसून अलोपाथीला विकल्प असणे गरजेचे आहे असे म्हणतो आहे.
ग्लोबल वार्मिंग नको म्हणून बैलगाडी बरी असे कोणी म्हणाल्याचे ऐकिवात नाही :)
अधिक काटेकोर चर्चा हवी
अधिक काटेकोर चर्चा हवी. माझा कशाला टोकाचा सपोर्ट आहे ते कळायला हवे आहे :-)
- - -
"ऍलोपथी" या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थांनी मी संभ्रमित झालेलो आहे. एक अर्थ आहे "आधुनिक वैद्यकात जे-जे काय करतात, ती ऍलोपथी. आहार आणि व्यायाम सुयोग्य करावा, याबाबत आधुनिक वैद्यक जे म्हणते, ते बाजूला काढायचा अट्टाहास करून मग उरलेल्या भागांना ऍलोपथी म्हणायचे, असा एक पंथ दिसतो.
मी स्वतः "ऍलोपथी" हा नानार्थक शब्द वापरणे टाळतो. "प्रमाणांनी सिद्ध केलेले पर्याय मानणारे वैद्यक" असा जरा बोजड शब्दप्रयोगही उपलब्ध आहे. याचा मी "टोकाचा समर्थक" आहे.
शिवाय "उपचारांसाठी उपलब्ध काळ मर्यादित असतो, म्हणून प्रमाणांनी सिद्धता पूर्ण होण्यापूर्वी अनुमानधपक्याने उपचार निवडावा लागतो, म्हणून त्यातल्या त्यात बरा उपचार निवडावा" हे व्यावहारिक तत्त्व मला मान्य आहे. त्यामुळे व्यवहारात "प्रमाणसिद्ध वैद्यका"पेक्षा "प्रमाणसिद्ध+थोडेफार प्रमाण असल्यास आदमासे पर्याय निवडणारे वैद्यक" असे असावे. म्हणजे व्यवहारात "टोकाचे" असे कसले समर्थन नाही.
- - -
"नैसर्गिक नाही" म्हणजे नेमके काय म्हणत आहात? स्टेनलेस स्टीलचे (कुठल्याही धातूचे) भांडे नैसर्गिक की अनैसर्गिक? अन्न शिजवण्याची रासायनिक प्रक्रिया नैसर्गिक की अनैसर्गिक? (अन्न शिजवण्याने त्यातील घटकांवर परिणाम होतो त्याने स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. काही चांगले, तर काही दुष्परिणामही. म्हणून ही विचारणा निरर्थक नाही.)
- - -
भविष्यातील अमुक एक स्थिती व्हावी अशी व्यक्तीची किंवा समूहाची इच्छा असते, आणि ती स्थिती घडून यावी याकरिता प्रयत्नांचे अनेक पर्याय असतात. भविष्यात फक्त तोच एक तपशील नसतो, तर अनेक प्रकारे भविष्य वर्तमानापेक्षा वेगळे असते. म्हणजे निवडलेल्या पर्यायाचे फायदे आणि तोटे असतात. अतिशय नैसर्गिक गोष्टींचेही "दुष्परिणाम" असतात. प्राणवायू रासायनिकदृष्ट्या फार क्रियाशील आहे, म्हणूनच ज्वलनप्रक्रिया करू शकतो, म्हणूनच तर तो जीवनासाठी आवश्यक आहे. पण रासायनिक क्रियाशीलतेमुळे तो नको तिथे ज्वलनप्रक्रिया करतो म्हणून शरिराला हानीसुद्धा होते. क्रियाशीलता असते तिथे फायदे, हानी अशी होणारच. पण प्राणवायूच्या मदतीने ज्वलनक्रियेचे फायदे इतके जास्त असतात, की त्याच्या तोट्याच्या ज्वलनक्रियेने पुढे कॅन्सर होतो, काही मुलांची फुफ्फुसे(का फुप्फुसे*) निकामी होतात तो तोटा पुष्कळ कमी मानला जातो.
"ज्वलनक्रिया तिथे दुष्परिणाम" हे तत्त्व अगदी-खरे असले तरी अगदी-निरुपयोगी आहे.
हे "अनैसर्गिक तिथे दुष्परिणाम" तत्त्व असेच काही असावे अशी माझी कल्पना आहे.
निरुपयोगी नाही, असे विश्लेषण काय असते? जमेल तितपत प्रत्येक उपलब्ध पर्यायाबाबत तो हिशोब करायचा असतो. भविष्यात इष्ट परिस्थिती येण्याची शक्यता सर्वाधिक व्हावी, आणि फायद्या-तोट्याचा हिशोबही सह्य असावा असे निर्णयतंत्र मी पसंत करतो. मग त्यात उजवा उतरणारा पर्याय काही का असेना.
खुलासा
>> "प्रमाणांनी सिद्ध केलेले पर्याय मानणारे वैद्यक" असा जरा बोजड शब्दप्रयोगही उपलब्ध आहे. याचा मी "टोकाचा समर्थक" आहे
मी तुमचा रूढ अर्थाने असलेल्या अलोपाथीला सपोर्ट आहे असे मानून प्रतिसाद दिला होता, तो आता थोडाफार गैरलागू आहे. मी देखील ह्या संकल्पनेचा समर्थक आहे पण आपण आता मुद्दे मांडले आहेत तर मी माझे मत व्यक्त करतो.
टोकाचा सपोर्ट - हा मुद्दा अर्धशिशी किंवा बालमृत्यू ह्या वाक्याला उद्देशून होता. तो तसा अलिखित आहे असे जाणवते. पण तो आहे आणि नाही असे दोन्हीही अर्थ त्यातून निघू शकतात अशा प्रकारचे ते वाक्य असू शकते.
नैसर्गिक - माझ्या माहितीप्रमाणे शरीरातील घटक शरीरात उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीचा सामना करीत असतात, तशी ती रचना आहे, ह्या घटकांना बलवान करून अंतर्गत रचनेमार्फतच परिस्थितीशी सामना करणे हे नैसर्गिक आहे निदान शरीर माध्यमासाठी. अलोपथीमधील काही घटक शरीरातील ह्या घटकांचे काम करतात जे कि अनैसर्गिक आहे व त्याचे दुष्परिणाम जाणवण्यासारखे आहेत. आता उपलब्ध काळ हा कमी असतो, अशी परिस्थिती प्रत्येक वेळी असेलच असे नाही. उदा. वर श्री गोळे ह्यांच्या लेखात त्यांच्याकडे सम्यक जीवनशैली अंगीकारण्याइतपत वेळ होता व त्यांना त्याचा निश्चित फायदा झाला. त्यामुळे प्रत्येक वेळी केवळ उपचार पद्धतीस लागणारा वेळ हा निर्णायक घटक असू शकत नाही. लस हे एक नैसर्गिक उपचार पद्धतीचे चांगले उदाहरण आहे.
>>हे "अनैसर्गिक तिथे दुष्परिणाम" तत्त्व असेच काही असावे अशी माझी कल्पना आहे ( हे तत्त्व अगदी-खरे असले तरी अगदी-निरुपयोगी आहे)
भविष्यातील स्थिती - आपण अनैसर्गिक गोष्टींसाठी दिलेली उदाहरणे देखील एका अर्थाने टोकाचीच आहेत :). मी दिलेले ग्लोबल वार्मिंगचे उदाहरण मला इथे परत सांगावे वाटते, आपण केवळ साधनांची गरज आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून "अनैसर्गिक पण आत्ता गरजेचे"* असे काहीसे करतो आहोत, किंवा नुसतेच प्रवाहबरोबर वाहत आहोत, मग ह्यात मांडलेले हिशोब देखील प्रवाहाच्या सोयीचे असू शकतात आणि ते तसे जस्टीफाय केले जाऊ शकतात. :)
>>जमेल तितपत प्रत्येक उपलब्ध पर्यायाबाबत तो हिशोब करायचा असतो. भविष्यात इष्ट परिस्थिती येण्याची शक्यता सर्वाधिक व्हावी, आणि फायद्या-तोट्याचा हिशोबही सह्य असावा असे निर्णयतंत्र मी पसंत करतो
--शिरच्छेद हा उपाय ह्यापैकीच एक होता का? :प (ह. घ्या)
श्री गोळे ह्यांनी सांगितलेली जीवनशैली व "हल्लीच्या" अनैसर्गिक उपचार पद्धतीस विरोध कदाचित आपल्या ह्या निर्णय तंत्राचेच अपत्य असावे. त्यासंदर्भात मी एक प्रतिसाद दिला त्यास आपला उपप्रतिसाद हा टोकाचा वाटला म्हणून मी तो प्रपंच केला.
* "अनैसर्गिक पण आत्ता गरजेचे आणि हानिकारक"
** वैद्यकीय शास्त्रातून उद्भवणाऱ्या समस्या - (कोरिलेशन इज कॉजेशन? :))
समजले नाही - लसीचे उदाहरण घेऊ
हा परिच्छेद समजला नाही.
पहिले वाक्य समजले नाही. आणि त्याचा जर शेवटचा "लस" वाक्याशी संबंध लागत असेल, तर मुळीच समजला नाही. आजकाल ज्या गोष्टीला आपण "लस" म्हणतो, ती औषधे कारखान्यात वेगवेगळी रसायने वापरून बनवतात, ना? "लस" शब्दाचा इतिहास गमतीदार आहे, हे खरे आहे. तुर्कस्तानामध्ये अशी प्रथा होती - अन्य काही देशांतही असेल - देवीचा आजार झालेल्या व्यक्तीच्या अंगावरच्या खपल्या अर्धवट सुकल्या असतात, तेव्हा त्या अलगद उचकटायच्या. त्याच्या खालचा भाग लसीने लिबलिबीत असतो. (जखमेतून पाण्यासारखा पातळ पाण्यासारखा पदार्थ स्रवतो, त्याला लस म्हणतात.) मग ज्या व्यक्तीला अजून देवीचा रोग झालेला नाही, त्यांची कातडी खरचटून काढायची. त्या खरचटलेल्या जागेवर मग ती लिबलिबीत खपली लावायची. रोगाची लस निरोगी व्यक्तीत जाते. पुष्कळदा देवीपासून संरक्षण मिळते.
मात्र हा प्रकार मोठा बिनभरवशाचा असे. कधीकधी लस लावलेल्या व्यक्तीला लगेच घातक देवी होई. तर कधी लसीतून पुरेसे इमुनायझेशन न झाल्यामुळे पुढे देवीचा संसर्ग होई.
काही का असेना. त्या काळचा शुद्ध नैसर्गिक प्रकार बघता हल्लीची रासायनिक प्रक्रिया, शुद्धता वगैरे केलेली लस परवडली.
आणि घोड्याच्या रक्तावर किंवा अंड्यावर रासायनिक प्रक्रिया, शुद्धता वगैरे केलेली, कारखान्यात बनवलेली लसही "नैसर्गिक" मानूया, असे म्हणता? तर वनस्पती/जीवाणू वगैरेंवर रासायनिक प्रक्रिया, शुद्धता करून बनवलेल्या औषधांमध्ये नेमके काय वेगळे आहे?
मला वाटते की मी टोकाची उदाहरणे घेत आहे, असे तुमचे मत प्रामाणिक आहे. पण ते समजावून सांगण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगचे उदाहरण न घेता खाद्यपदार्थ आणि औषधे यांचीच उदाहरणे घेऊया. ग्लोबल वॉर्मिंगमधील पर्यायांचे वैद्यकाशी सामांतर्य लावता-लावता नाकी नऊ येतील. साक्षात औषधांची आणि खाद्यपदार्थांचीच उदाहरणे घेतली, तर सामांतर्य लावण्याचा वृथा प्रयास टाळता येईल. म्हणून लसीच्या उदाहरणावरून पुढे गेलो.
- - -
आता पुन्हा - रासायनिक प्रक्रिया केले ते चांगलेच असे माझे मत नाही. (मला वाटते की "टोकाचे समर्थन" म्हणताना "माझे रासयनिक प्रक्रिया चांगल्याच असे मत आहे" असे तुम्हाला वाटत असावे. तसे नाही.)
माझे मत आहे की रासायनिक प्रक्रियांचा मुद्दा नि:संदर्भ आहे. फायदा-तोटा यांचा हिशोब तितका सुसंदर्भ आहे.
जास्त घातक विरुद्ध जास्त उपकारक असे पदार्थ "नैसगिक"ही सापडतात, रासायनिक प्रक्रियाजन्यही सापडतात, आणि अगदी शरिराच्या अंतर्गत प्रक्रियांमध्येही सापडतात.
मान्य...लस
मान्य.
>>पहिले वाक्य समजले नाही.
शरीरारची रोग प्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढविणे व औषधाने स्वतः बॅक्टेरियाशी लढणे ह्यातला फरक सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. लस* शरीर-रोगप्रतिकारक शक्तीला रोगाची ओळख करून देते व त्यामुळे शरीर औषधाशिवाय रोगाचा सामना करू शकते हे सेमी-नैसर्गिक आहे.
मान्य.
तुमचे प्रमाण सिद्ध वैद्यकाला समर्थन आहे हे लक्षात आले माझ्या पण रूढ अर्थाने सांगितलेली अलोपाथीची औषधे केवळ रोगावर मात करतात म्हणून चांगली असे न म्हणता त्यांचे कालानुरूप काय दुष्परिणाम होणार आहेत ह्याची जाणीव ठेवणे देखील महत्वाचे आहे हा माझा मुद्दा होता. माझ्या दृष्टीने अलोपथी हे एक क्विक-फिक्स आहे, त्यानुसार त्याचे फायदे तोटे देखील आहेत. त्यामुळे फक्त अलोपाथीस समर्थन असणे ह्यास माझा विरोध आहे.
*A vaccine is a biological preparation that improves immunity to a particular disease. A vaccine typically contains an agent that resembles a disease-causing microorganism, and इस* often made from weakened or killed forms of the microbe or its toxins. The agent stimulates the body's immune system to recognize the agent as foreign, destroy it, and "remember" it, so that the immune system can more easily recognize and destroy any of these microorganisms that it later encounters.
ऍलोपॅथी
ऍलोपॅथी नावाची कुठलीही झानशाखा नाही.
होमिओपॅथीचे जनक हानीमन यांनी वापरलेला हा शब्द आहे. 'लक्षणांच्या विरुद्ध काम करणारी औषधे देणारी' असा काहीसा अर्थ ध्वनित केला होता. (अवांतर याविरुद्ध होमिओपॅथी ही लक्षणकारक औषधांनी बनलेली असते.) सध्याच्या वैद्यकशास्त्राला बहुतेककरून 'मेडिसिन आणि सर्जरी' (औषध आणि शस्त्रक्रिया शास्त्र) म्हटले जाते.
ऍलोपॅथी हा शब्द भारतात प्रामुख्याने वापरला जातो तो देखील जास्त करून होमिओपॅथी वैद्यकांमुळे. 'ऍलोपॅथीत' सतत विरुद्ध आणि तीव्र औषधे वापरली जातात हा समज देखील मूळ अर्थाशी सुसंगत वाटतो. रोगप्रतिबंध करण्यासाठी काय काय करावे (उदा. ह्रद्रोग), जीवनशैली कशी बदलावी, रोग ताब्यात ठेवण्यासाठी (उदा. मधुमेह) काय काय टाळावे, लसीकरण, शस्त्रक्रिया इत्यादी सर्वांच्या बाबतीत सध्याचे वैद्यकशास्त्र 'विरुद्धोपचार' करत नाहीत. असे असूनही केवळ विरुद्ध उपचार करणारी एखादी ज्ञानशाखा अस्तित्वात आहे अशी भलामण चालू असते.
आपले पारंपारिक उपचार टाळणारी/नाकारणारी/वा हिणवणारी अशी ही पद्धती आहे असे वाटून ही असूया निर्माण झाली असेल. त्यातच ती 'औषधकंपन्यांचे कुटील कारस्थानामुळे' आलेली उपचार पद्धती आहे या समजाची भर पडली आहे.
धनंजय यांनी "प्रमाणांनी सिद्ध केलेले पर्याय मानणारे वैद्यक" ही व्याख्या अगदी चपखल दिली आहे. त्यात पारंपारिक पद्धती पुरावा असल्यास नाकारली जात नाही ना त्यात 'औषध कंपन्यांचे कुटील कारस्थान आहे.'.
प्रमोद
मान्य..पण
>> सध्याच्या वैद्यकशास्त्राला बहुतेककरून 'मेडिसिन आणि सर्जरी' (औषध आणि शस्त्रक्रिया शास्त्र) म्हटले जाते
आता ह्यातील अनैसर्गिक औषधशास्त्राला विरोध आहे, ते अनैसर्गिक कसे हे मी वरील प्रतिसादात नमूद केले आहे. त्याची गरज आहे हे मलाही मान्य आहे पण त्याला नैसर्गिक विकल्प हवा हा मुद्दा आहे.
>>आपले पारंपारिक उपचार टाळणारी/नाकारणारी/वा हिणवणारी अशी ही पद्धती आहे असे वाटून ही असूया निर्माण झाली असेल. त्यातच ती 'औषधकंपन्यांचे कुटील कारस्थानामुळे' आलेली उपचार पद्धती आहे या समजाची भर पडली आहे
ह्याचे कारण श्री गोळे ह्यांनी दिलेल्या ह्या वाक्यात सापडते -मात्र सारे 'फसाद का ज़ड' रक्तदाब, तो खाली उतरायला तयार नव्हता. तो असे १३०/९०, १४०/१०० असा. थोडासा कमी झालेला होता. त्याला शस्त्रक्रियेचे फलित मानित. जास्त वाढला तर गोळ्या वाढवून देण्याची ताकीद (धमकी?) देत. मग मी चौकशी केली. रक्तदाब शस्त्रक्रियेने उतरणार नव्हताच. तो उतरणार होता, केवळ सम्यक जीवनशैली परिवर्तनांनी. आणि हेही मला प्रतिबंधक हृदयोपचार शाखेकडे पोहोचल्यावर समजले. एरव्ही कळते ना.
आता हे औषध शास्त्र सम्यक जीवन शैली पळू नका असे सांगत नाही हे जरी खरे असले तरी समाजात दिसणारे चित्र तसे नाही म्हणून असा समाज होणे स्वाभाविक आहे.
नामकरण आणि पॉलिसी
सर्वसामान्यतः ऍलोपथी म्हटल्या जाणार्या उपचारपद्धतीला मी वैज्ञानिक वैद्यक म्हणतो कारण त्यात सर्वच (आणि केवळ) 'योग्य' उपचारांचा समावेश होतो. त्यात नसलेले सर्वच उपचार अवैज्ञानिक असतात ;)
कृपया हे पहा.
--
कोणत्याही संघटनेत उच्चपदस्थ असलेल्या व्यक्तीवर दुराचाराचा आरोप सिद्ध झाल्यास तिला वार्यावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. "त्या व्यक्तीच्या विचार, कृतींना आमची सहमती नव्हती" असे पश्चातबुद्धीने (पोस्ट फॅक्टो) म्हणणे शक्य असते. हे धोरण राजकीय पक्ष, धर्म, व्यावसायिक कंपन्या, इ. सारेच वापरतात. तद्वतच, अप्रामाणिक डॉक्टरांच्या किंवा औषधकंपन्यांच्या सल्ल्याला/वागणुकीला 'अवैज्ञानिक/दुर्वर्तन' असे जाहीर करून 'विज्ञानाचे' पावित्र्य अबाधित ठेवता येते.
पश्चातबुद्धी
कोणत्याही संघटनेत उच्चपदस्थ असलेल्या व्यक्तीवर दुराचाराचा आरोप सिद्ध झाल्यास तिला वार्यावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात येतो. "त्या व्यक्तीच्या विचार, कृतींना आमची सहमती नव्हती" असे पश्चातबुद्धीने (पोस्ट फॅक्टो) म्हणणे शक्य असते. हे धोरण राजकीय पक्ष, धर्म, व्यावसायिक कंपन्या, इ. सारेच वापरतात. तद्वतच, अप्रामाणिक डॉक्टरांच्या किंवा औषधकंपन्यांच्या सल्ल्याला/वागणुकीला 'अवैज्ञानिक/दुर्वर्तन' असे जाहीर करून 'विज्ञानाचे' पावित्र्य अबाधित ठेवता येते.
अंशतः सहमत.
कधी कधी असे नसते. म्हणजे काही विचारसरणीत दोष असतो. उदा. आयुर्वेदातील भस्म औषधे. ही औषधे दिल्यामुळे आयुर्वेदात दुर्वर्तन होत नाही. एखाद्या धर्मात 'अमुक लोकांना' वाईट वागवा' असे तत्व (उदाहरणे कित्येक) त्या वागणुकीस दुर्वर्तन म्हणून बाजूला करू शकत नाही.
व्यावसायिक वैज्ञानिक वागणुकीत समजा असे घडत असले तर त्या व्यक्तिस दुर्वर्तनी न म्हणता ते तत्व अयोग्य म्हणून काढून टाकले जाते.
प्रमोद
मान्य
सहमत आहे.
पण जेव्हा विचारसरणीविषयीच प्रश्न विचारले जातात तेव्हाही काही बचाव उभे करण्यात येतात असे दिसते:
"संदर्भ (काँटेक्स्ट) पहा": उदा., "काफिरांना मारा", "मंगळ वाईट असतो", इ. विधानांचे "सार्वत्रिक अर्थ घेऊ नका" असे म्हणून एका अर्थी त्या विधानांना डिसओनच केले जाते.
"पुरावे नष्ट झाले": उदा., "भस्म बनविण्याची अचूक प्रक्रिया कालौघात भ्रष्ट झाली आहे अन्यथा भस्मे चांगलीच असतात", इ.
"भाषांतर चुकीचे आहे": उदा., "७२ कुमारिका नव्हे, ७२ द्राक्षे मिळतील", "डुकराचे मांस नाही, भूछत्र खाऊन मेला", "सहा दिवसांत जग बनविले, पण 'दिवस' म्हणजे २४ तासांचा दिवस नव्हे", इ.
--
परंतु, विज्ञान या विचारसरणीची व्याख्या "योग्य असेल ते करावे" अशी देता येते. तिच्यात कधीच चूक सापडणार नाही. तुम्ही म्हणता तसे केवळ अयोग्य तत्त्व काढून टाकले की झाले!
पॉलिसी...हि तर फॉलसी :)
>>सर्वसामान्यतः ऍलोपथी म्हटल्या जाणार्या उपचारपद्धतीला मी वैज्ञानिक वैद्यक म्हणतो कारण त्यात सर्वच (आणि केवळ) 'योग्य' उपचारांचा समावेश होतो. त्यात नसलेले सर्वच उपचार अवैज्ञानिक असतात ;)
मान्य. हे फारच सोयीस्कर आहे :प
>>कृपया हे पहा.
'योग्य' - हि तर फॉलसी आहे. ;)
खुलासा
ती विज्ञानाचीच व्याख्या आहे!
होय, "नैसर्गिक ते चांगले" आणि "अनैसर्गिक उपचार केवळ अपरिहार्यता म्हणूनच करावे अन्यथा अनैसर्गिक ते वाईट" हे तुमचे विचार हे त्या फॅलसीचीच उदाहरणे आहेत म्हणून तो दुवा दिला. विज्ञानाच्या धोरणाशी (पॉलिसीशी) त्याचा संबंध नाही (दोन्ही मुद्यांमध्ये मी "--" अशी खूण दिली होती).
मान्य
:) तुमची व्याख्या मान्य, मी देखील तेच म्हणतो आहे.
"नैसर्गिक ते चांगले" ह्यावर मी ठाम आहे तुम्ही दिलेल्या उदाहरणात नैसर्गिक च्या व्याख्येवर मारामारी आहे, त्यामुळे तो एक शब्द खेळ आहे. नैसर्गिक काय हे मी वर दिले आहे ते त्यामुळे हा सिद्धांत लागू होत नाही.
?
ती सोयिस्कर आहे हे मला मान्य आहे.
"नैसर्गिक ते चांगले" या संकल्पनेत "निसर्ग देवाने बनविला" हे गृहीतक (किंवा किमान, गाया तत्त्व) दडलेले आहे इतके नोंदविले की मग हे गृहीतक सिद्ध होईपर्यंत 'नैसर्गिक ते चांगले" या दाव्याकडे दुर्लक्ष करावे लागते.
काहीही शाब्दिक खेळ नाही.
सुगरिणीचा खोपा, बीवरचे धरण, इ. रचना अनैसर्गिक आहेत काय?
खुलासा
आता "नैसर्गिक" ला माझा टोकाचा सपोर्ट आहे असे मत झालेले दिसते.
नाही नैसर्गिक म्हणजे देवाने बनविलेला हे गृहीतक नाही, गाया तत्वाशी माझी ओळख नाही म्हणून मी त्यावर काही बोलणार नाही.
गाया तत्वाशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
सुगरिणीचा खोपा, बीवरचे धरण, इ. रचना अनैसर्गिक आहेत काय?
सुगरिणीला खोप्याच्या ऐवजी लाकूड किवा एखाद्या धातूपासून बनविलेला खोपा दिल्यास ते देखील नैसर्गिक असेल काय? सुगरिणीचा खोपा हा सेमी-नैसर्गिक आहे. जी गोष्ट निसर्गाचा समतोल किंवा तत्वे बदलत नाही ती निसर्गाच्या जवळ जाणारी आहेत. माझा विरोध अनैसर्गिक गोष्टीस आहे जेव्हा त्या गोष्टी मूळ व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवतात, उदाहरणार्थ अलोपथीची औषधे. तसे पाहता लस देखील शरीरात बदल घडवते पण तो बदल आणि औषधामुळे होणारा बदल ह्यातल्या फरकाला माझा विरोध आहे.
तरीही
सपोर्ट किंवा विरोध असे काहीच करू नये असे मला वाटते.
मग, नैसर्गिक वस्तू चांगल्या असण्याची शक्यताच अधिक असण्याची अपेक्षाच बिनबुडाची होते.
पक्षी प्लॅस्टिकचे तुकडे/धागे वापरूनही घरटी बनवितात असे मी पाहिलेले आहे.
निसर्गाच्या म्हणजे कशाच्या जवळ? नुसते बसून रहावे काय? निसर्गाची काही शाश्वत स्थिती नसते. प्रत्येक सजीव निसर्गावर हुकूमत गाजविण्याचा प्रयत्न करतो आणि 'समतोल' आपल्याला फायद्याच्या दिशेने वाकवितो.
नैसर्गिक अवस्था आपल्याला सुखाची असेल असे का गृहीत धरावे?
गर्भपातालाही विरोध? ;)
"शरीर ही रचना (देवाने बनविलेली असल्यामुळे) आदर्श आहे आणि तिच्यात (क्षुद्र मानवी) ठिगळे लावणे वाईट आहे" असे गृहीत धरू नये.
काही अंशी सहमत
ते कसे? निसर्गाचे चांगले वाईटपण देवावर अवलंबून आहे काय?
ते मानव निर्मित निसर्गाच्या जवळ जाणारे आहे, इथे मानव निर्मित निसर्गच अनैसर्गिक आहे तर ह्या बद्दल काय ते बोलणे. हा खोपा मूळ खोप्यापेक्षा किती लोकांना आवडेल ह्याबद्दल मी साशंक आहे.
नैसर्गिक अवस्था आपल्याला सुखाची असेल असे का गृहीत धरावे?
नैसर्गिक अवस्था आपल्याला सुखाची असेल असे मी पण मनात नाही पण त्यातील बदल हा जर त्या नैसर्गिक रचनेविरुद्ध असल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतील असे माझे मत आहे.
एक उदाहरण देतो - एक बिल्डिंग आहे त्यातील एका सदनिकाधारकाला त्याच्या सदनिकेमध्ये काही बदल करावे वाटले जे केल्यास मूळ इमारतीच्या रचनेत बदल होण्याची शक्यता आहे, खिडक्या बदलणे, भिंत पाडणे वगैरे. हा बदल इमारतीच्या नैसर्गिक रचेनेविरुद्ध आहे ते चूक आहे. पण अधिक दरवाजे बसवणे/काढणे, खिडक्यांना ग्रील बसवणे, गॅलरीस छत बसवणे हे बदल मूळ इमारतीच्या रचनेत अमुलाग्र बदल करत नाहीत व ते त्यामुळे सेमी नैसर्गिक वाटतात.
हो, एकार्थी विरोध आहेच. अविचाराचे परिणाम भोगावे लागू नये म्हणून केलेला बदल आहे तो. केवळ अविचार कोणाचा व परिणाम कोण भोगतो हे लक्षात घेऊन त्यास पाठींबा आहे.
मान्य, पण तो बदल शरीराच्या रचनेशी सुसंगत असावा. ते ठिगळ वाटू नये.
खुलासा
तशी कल्पना तरी करता येते आहे. अन्यथा, निसर्गाकडून चांगुलपणाची अपेक्षा करण्यासाठी इतर काहीच कारण सुचत नाही.
आदेश बांदेकरकडून बक्षीस मिळविण्यासाठी खोपा विणलेला नसतो. पक्ष्यासाठी युटिलिटी वाढली (प्लॅस्टीक कुजणार नाही, इ.) तर कुरूपच चांगलेच!
हे मुद्देही केवळ सौंदर्यदृष्टीचे वाटतात.
खुलासा
अपेक्षा नाहीच पण जे जसे आहे ते तसेच चांगले असते, त्यात बदल केलाच तर तो त्याच्या मूळ तत्व विरुद्ध नसावा हि इच्छा.
आदेश हल्ली हे पण करतात कि काय? मुंबईला हल्ली काहीही चालतं ;)
अधोरेखित वाक्यच पुरेसे आहे. कुजणार नाही आणि नष्ट होणे देखील अवघड. हाच तर मुद्दा आहे.
ठैविले अनंते तैसेचि रहावे
जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा ही होगा|
पक्षी त्याची पर्वा करीत नाहीत. त्यांचा खोपा अधिक काळ टिकेल ना? तर मग "ते स्वार्थ बघतात" असेच म्हणावे लागेल!
मान्य
>>"नैसर्गिक ते चांगले" ह्यावर मी ठाम आहे
पुढील गोष्टी अनैसर्गिक समजून त्याज्य ठरवाव्या असे वाटते.
नितिन थत्ते
:)
:) जसे माझ्या "नैसर्गिक ते चांगले" ह्या विधानातून तुम्ही "अनैसर्गिक ते फक्त वाईट" हा अर्थ काढलात त्याप्रमाणे तुमच्या प्रतिसादातून "नैसर्गिक ते वाईट" असा अर्थ काढला जाऊ शकतो.
तसा तो काढावा असे आपल्याला अपेक्षित आहे असे सांगा मग मी माझे मत देतो.
>>२. न्याय आणि समानतेवर आधारित समाज बनवण्याचा प्रयत्न करणे.
विवेक किंवा कॉमन सेन्स अनैसर्गिक गोष्ट आहे काय?
?
"नैसर्गिक की अनैसर्गिक?" यावरून "चांगले की वाईट?" याविषयी काहीही ठरविता येत नाही असे 'आमचे' मत आहे. नैसर्गिक गोष्टी कधी चांगल्या असतात तर कधी वाईट, मानवी निर्मिती कधी चांगल्या असतात तर कधी वाईट!
स्वार्थ/हाव (उदा., लुबाडणे किंवा अनेक माद्यांपासून अनेक२ अपत्ये प्रसविणे) हा बहुतेक सर्वच प्राण्यांच्या उद्देश असतो.
क्षमता
नाही, नैसर्गिक गोष्टी वाईट नसतात त्यांचा केला जाणारा उपयोग चांगला किंवा वाईट असू शकतो. नैसर्गिक गोष्टी मुळात वाईट कश्या हे सांगणारे एखादे उदाहरण द्याल काय? कदाचित ते माझ्या लक्षात आले नसेल.
प्राणी? माझ्या मते मनुष्य सोडल्यास बाकी जीवित गोष्टींमध्ये फायद्या-तोट्याचा विचार करण्याची क्षमता मर्यादित असते. त्यामुळे लुबाडणे वगैरे प्रकार प्राण्यांमध्ये घडत असतील हे सिद्ध करणे आवघड आहे.
उदाहरणे
जंतुसंसर्ग, जन्मजात रोग, अन्नसाखळीतील क्रौर्य, ही उदाहरणे आहेतच पण 'शरीररचनेतील दोषांमुळे सर्वांना होणारे त्रास' या प्रकारची उदाहरणे तुम्हाला सर्वात शक्तिशाली वाटतील.
मला तर वाटते की मानवाचीही क्षमता मर्यादितच असते ;)
गंभीर उत्तर असे की मेंदू असे गणित करतो की जनुके करतात ते महत्वाचे नाही. मेंदू वापरून लुबाडण्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
मान्य..पण.
जंतुसंसर्ग मान्य नाही, तो अस्वच्छतेमुळे होतो किंवा रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यास देखील होऊ शकतो. जन्मजात रोग काही अंशी मान्य पण योगयोग पहा जन्मजात रोगासाठी असलेले/मानले गेलेले एक कारण ऍन्टीबायोटीक्सं आहे.
मर्यादित क्षमतेमध्ये एवढा धुमाकूळ आहे..मर्यादितच ठीक आहे ;)
एखादा दुवा असू शकेल काय?
खुलासा
एबोला, रेबीज, इ.?
त्यांच्याशिवायही होतातच की!
कोकिळा फसवणूक करते. सरडा रंग बदलतो. अनेक भक्षक हे त्यांच्या भक्ष्याच्या भक्ष्यासारखे दिसतात आणि भक्ष्य जवळ आल्यावर पकडतात. अनेक भक्ष्ये मेल्याचे नाटक करीत पडून राहतात. किडे/पक्षी यांना फसविण्यासाठी मधुर फुलांसारखे रंग धारण करून काही फुले स्वतःचे परागीकरण करवून घेतात.
किंबहुना, विक्टोरियन शैलीत लिहिलेल्या जीवशास्त्राच्या पुस्तकांत वर्णन केलेल्या परस्परसहाय्य (सिंबायोसिस) या नात्यांतही खरे तर प्रत्येक भागीदार कायमच कामचुकारपणाचा/लबाडीचा प्रयत्न करीत असतो. 'एक चिडिया अनेक चिडिया' या गाण्यातल्यासारखे "बन गयी मुठ्ठी, बन गयी ताकत" असे उदात्त काही नसते.
नैसर्गिक स्वभाव
फसवणूक करायची म्हणून केली जात नसावी तो नैसर्गिक स्वभाव आहे असे मला वाटते.
"नैसर्गिक ते चांगले" ह्यावर मी ठाम आहे
तंबाखू, गांजा, अफू हे रासायनिक प्रक्रिया न केलेले पदार्थ पूर्णपणे नैसर्गिकच आहेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सेवन ?
त्यांचे सेवन वाईट. कि त्या गोष्टी वाईट?
सुविचार
Puris Omnia Pura
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
विचार
माइंड सीज व्हाट इट वानट्स टू सी.
हे पण होत असते
बरीच अॅलोपथीची औषधे (उदा. निमुलसुलाईड वगैरे आणखिन बरिच) खुप जाहिरात करुन लोकप्रिय होतात व जेव्हा फार्मास्यटीकल्सचा खुप नफा करुन झाल्यावर कधी तरी अशी बातमी येते की आता हे हानिकारक आहेत व प्रगत देशांनी म्हणुन प्रतिबंधित केली आहेत. मग आपला देश पण प्रतिबंध घालतो (तो पर्यंत सगळे गुण गात असतात) मग अशीच कहाणी दुस-या औषधाची होते. मागे एकदा सर्व्हाईकल कॅन्सर वर लशीचे हेच बघायला मिळाले.
मी डॉक्टर नाही एक साधा माणुस ह्या नात्याने माझे जे मत झाले ते सांगितले.
http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com
चर्चा वाचत आहे
मला चंद्रशेखर, रिटे आणि धनंजय यांचे मत पटते. ऍलोपथीचे दुष्परिणाम असले तरी तिला पूर्णपणे वर्ज्य करणे शक्य नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मान्य
मान्य आहे. पण हे असले वाद शाकाहार - मांसाहार, श्रद्धा - अंधश्रद्धा या पातळीवरच चघळले पाहिजे असे नाही.
अरे हो, त्या स्वाईन फ्लूचे काय झाले? मध्ये एकदम हाहाकार माजला होता. पण वाटते की ऍलोपथीच्या देवदुताने - या दानवावर मात केली आहे. :)
स्वाईन फ्लु
निलगिरीच्या तेलाला काय भाव आला होता विचारु नका.
माझ्या समजुतीनुसार परिस्थिती तात्काळ आटोक्यात आणण्यासाठी ऍलोपथीला पर्याय नाही. आयुर्वेद किंवा इतर औषधोपचार पद्धती जुनाट रोगाचा समूळ नाश करत असाव्यात.
डिसीज आणि डिसऑर्डर (याला मराठी शब्द आठवला नाही म्हणून डिसिजसुद्धा इंग्लिश वापरला) मध्ये आयुर्वेद डिसऑर्डर बर्या करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरत असावा.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
एलोपाथी
हा शब्द मी महाजालावर खूप धुंडाळला. पण त्याचा कोठेही उल्लेखसुद्धा आढळला नाही. त्याविषयी अधिक माहिति देणारे दोन तीन दुवे असतील तरि चालेल.
हा शब्द होमिओपॅथीचा जनक हनीमन ने आपल्या पाथीचा वेगळेपणा दाखवण्यासाठी शोधुन काढला एवढेच् कळाले. बाकी कुठेही उल्लेखही नाही या शब्दाचा. तुम्हाला मिळाल्यास मदत करावी.
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
स्टॅन्ले ऍडम्स
या संदर्भात "ऍडम विरुद्ध रोश" (रोश कंपनी) ही साधारण ८० च्या दशकातील घटना आणि त्यावर त्याच नावाचे पुस्तक आठवले.
बाकी हा प्रश्न केवळ औषधाच्या कंपन्यांचाच नसून विस्तारवादी भांडवलशाही उद्योगांचा आहे, मग ते अंतर्गत असोत अथवा बाहेरून आलेले. महीन्याला सत्तर लाख रुपयांची वीज स्वतःच्या पेडर रोडला असलेल्या घरासाठी जाळणारे रिलायन्स हे काही कमी वसाहतवादी नाहीत.
धोका
खरा धोका नफा मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणार्या औषध कंपन्यांकडून आहे असे वाटते.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
धोका व फायदा
औषधे विकसीत करतांना मनुष्यहानी होणारच व ती कमीत कमी व्हावी म्हणून प्रयत्न करायला हवेत हे मान्य. पण नविन औषधे निर्माण झाल्याने किती प्राण वाचणार आहेत हेही विचारात घ्यायला हवे. औषध कंपन्यांना विरोध करणार्या बर्याच लोकांचा सूर औषध कंपन्या सरसकट वाईट आहेत असा असतो. औषध कंपन्या 'कुठल्याही थराला' जाऊ नये म्हणून यंत्रणा अस्तित्त्वात आहेत.
नरेंद्र यांचा प्रस्तुत लेख (वसाहतवाद वगैरे) प्रचारकी थाटाचा असून ऍनेक्डोटल पुरावा (जो ग्राह्य धरता येणार नाही) सोडून कुठलाही पुरावा देण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.
सहमत
तात्विकदृष्ट्या सहमत आहे. मात्र औषध कंपन्या कुठल्याही थराला जाऊ नयेत म्हणून ज्या यंत्रणा अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्येच अदचणी आहेत असे लेखात म्हटले आहे. औषधांचा १००% त्याग करता येणे शक्य नाही हे मान्यच आहे.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/