दुसरा वसाहतवाद

ब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत. त्यांच्या देशात होणाऱ्या व्यवसायासाठी त्यांनी आपल्या देशाचा वापर आयती बाजारपेठ म्हणून केला. आपल्याला त्यांची 'वसाहत' या नात्याने वापरले. ह्या धोरणाचे सत्य स्वरूप लक्षात आल्यावर, इथल्या पुढाऱ्यांनी परदेशी कापडाच्या होळ्या करून, स्वदेशीचे महत्त्व लोकांना पटवून देऊन त्या धोरणाचा प्रतिकार केला. तो एक स्वातंत्र्यलढ्याचाच भाग होता.

हृदयविकाराचे वाढते प्रमाण, त्यावरील उपाययोजनांचे फुटलेले पेव, पाश्चात्य वैद्यकीय प्रणालीच्या दावणीला बांधलेली आपल्या सरकारची धोरणे; आणि बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांची आक्रमक विक्रीसंहिता ह्यांच्या परिणामस्वरूप, आज मला 'दुसरा वसाहतवाद' अवतीर्ण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. कसा ते संगतवार पाहू या.

२००४ सालच्या उत्तरार्धात माझा रक्तदाब १६०/१०० असा राहत असे. तसा तो गेले वर्षभर राहत होता. मी आयुर्वेदिक उपचार घेत होतो. मात्र माझ्या वैद्यांना खऱ्या उपचारप्रणाली माहितच नव्हत्या, हे आज स्पष्टपणे जाणवत आहे. म्हणूनच वर्षभर त्यांची औषधे, पथ्थ्ये करूनही रक्तदाब नियंत्रणात येऊ शकला नव्हता. ऍलोपॅथिक प्रणाली फिटनेस सर्टिफिकेट देणार (ही मक्तेदारी तिला आपल्याच मायबाप सरकारने दिलेली आहे). त्यांनी ते दिले नाही. कारण त्यांच्या मानदंडांप्रमाणे रक्तदाब ढिसाळपणे (पुअर बी.पी. मॅनेजमेंट) सांभाळल्या जात होता. म्हणून त्यांनी ताणचाचणी, हृदयधमनी आरेखन, हृदयधमनी रुंदीकरण इत्यादी सोपस्कार उरकून मला फिट ठरवले. मी कामावर रुजूही झालो. मात्र सारे 'फसाद का ज़ड' रक्तदाब, तो खाली उतरायला तयार नव्हता. तो असे १३०/९०, १४०/१०० असा. थोडासा कमी झालेला होता. त्याला शस्त्रक्रियेचे फलित मानित. जास्त वाढला तर गोळ्या वाढवून देण्याची ताकीद (धमकी?) देत. मग मी चौकशी केली. रक्तदाब शस्त्रक्रियेने उतरणार नव्हताच. तो उतरणार होता, केवळ सम्यक जीवनशैली परिवर्तनांनी. आणि हेही मला प्रतिबंधक हृदयोपचार शाखेकडे पोहोचल्यावर समजले. एरव्ही कळते ना.

आता रक्तदाब ढिसाळपणे (पुअर बी.पी. मॅनेजमेंट) सांभाळल्या जात असल्याचा आरोप ऍलोपॅथीवर करण्याची वेळ माझ्यावर आलेली होती. मात्र नुसत्या दोषारोपांनी माझे आरोग्य परतणार नव्हते. उपाय हवा होता. आणि तो केवळ 'सम्यक जीवनशैली परिवर्तन' हाच असल्याची आता माझी खात्री पटलेली होती. मग मी जीवनशैलीगत परिवर्तनांचा स्वीकार केला. ती कर्मठपणे पाळली. आणि आहाराचे सक्त नियंत्रण केले. मग माझा रक्तदाब तीन महिन्यात १२०/८० वर राहू लागला. हा तर 'आहाराने रोग हरा' म्हणणाऱ्या आयुर्वेदाचाच उपाय होता. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की तो माझ्या आयुर्वेदिक वैद्यांना -ज्यांच्यावर मी अतुट विश्वास ठेवला होता, ज्यांची पथ्थ्ये मी थकता पाळत असे त्या वैद्यांना- तेव्हाही ज्ञात नव्हता, आजही नाही, आणि आणखी किती रुग्णांची त्यामुळे फसगत होईल हे सांगता येणे कठीण आहे.

२००५ च्या मध्यात, रोगावर उपाय गवसलेला होता. आरोग्य परतत होते. पण एका नवीनच समस्येला मी तोंड देत होतो. हृदयधमनी रुंदीकरण झालेल्या रुग्णांना रु.७५०/- दरमहा किंमतीची औषधे घ्यावीच लागतात. रक्तदाबावरील, धमनीविस्फारक, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीची आणि हो रक्ततरलक (शस्त्रक्रियेमध्ये धमनीत बसविलेल्या विस्फारकाभोवती कीट साठू नये म्हणून घ्यावी लागणारी अतिरिक्त काळजी) औषधे. म्हणजे सालीना रु.९,०००/- बिनबोभाटपणे बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांच्या हवाली करायचे. भरमसाठ औषधांच्या अवांछनीय उपप्रभावांची भीती सतत वाहायची. आणि जीवनशैली परिवर्तने स्वीकारलेली नसतील तर आपला विकार वाढवत राहायचा. हृदयविकाराला प्रगतील विकार म्हणतात, ऍलोपॅथीत. हे काही माझ्या समस्येचे समाधान नव्हते. मला याहून चांगला निसर्गनिकट मार्ग हवा होता.

ज्या साध्या-सोप्या उपायानी मी आज बरा झालेलो आहे, तो मला त्याकाळी कुणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नव्हते. आज मी सांगू शकतो. सांगतो आहे. ज्याप्रमाणे कुत्र्याला गळ्यात पट्टा बांधून आपण सोडून देतो, आणि आपला समजू लागतो, त्याप्रमाणेच ऍलोपॅथीने माझी अँजिओप्लास्टी करून सोडून दिले होते, ती मला आपला मानू लागली होती. पूर्वी कधीच लागली नसती अशी (रक्ततरलक) औषधे जन्मभर घेत राहण्यासाठी. आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची धने करत राहण्यासाठी. मला हे मानवणारे नव्हतेच. तेव्हाही, आणि आजही.

दरम्यान मी माझ्या आसपासच्या लोकांची अशाच प्रकारच्या अनुभवांसाठी चाचपणी करीत होतोच. आश्चर्याची गोष्ट अशी की मला माझ्या आसपासच तसले अनेक जण आहेत, ही माहिती नव्यानेच समजली. अनेकजण असेही म्हणातांना आढळले की हल्ली हृदयविकाराचे प्रमाण फारच वाढले आहे. एकाच्या, गेल्या सहा वर्षात दोन अँजिओप्लास्ट्या आणि एक बायपास झालेली होती (हे सद्गृहस्थ आज हयात नाहीत). एकाची, तीन वर्षांच्या काळात एक अँजिओप्लास्टी होऊनही अडथळे वाढतच राहीलेले होते. म्हणून बायपास करण्यात आलेली होती. मीही तोच मार्ग आक्रमणार होतो का? नाही! मुळीच नाही!! मी दचकलो. जागा झालो. माझ्या मनात एकदम प्रकाश पडला. साक्षात्कारच झाला (डॉ. अभय बंग म्हणतात तसा 'माझा साक्षात्कारी हृदयरोग'). ज्याने मला जाणीव करून दिली की मला मुळी ह्या शस्त्रक्रियेची गरजच नव्हती.

माझ्यासारख्या मध्यमवयीन, सुखवस्तू, सद् गृहस्थाला केवळ आरोग्यकारी सम्यक जीवनशैली कोणती हे कळण्याची नितांत गरज होती. मी ती कर्मठपणे पाळू शकणाऱ्यांपैकी एक होतो. तो सल्ला मिळालाच नाही (इतर अनेक मिळाले त्यांची चर्चा ह्यापूर्वीच केलेली आहे). त्यानेच वाढता रक्तदाब ठिकाणावर आला असता. आताही त्यानेच आलेला आहे. मात्र, अजिबात गरज नसलेली शस्त्रक्रिया माथी मारण्यात आली. आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्याच्या नावाखाली बहुराष्ट्रीय औषधकंपन्यांचा 'गुलाम' करण्यात आले. माझ्या, ही गुलामी लक्षात आली.

हजारो इतर समकक्ष रुग्णांच्या मनात असले काहीही येण्याची सुतराम शक्यता नाही. याची कारणे दोन. एक म्हणजे त्यांना शस्त्रक्रियेची मुळीच गरज नव्हती ही माहिती त्यांना मुळीच नसते. आणि दोन म्हणजे परिणामांची जाणीव हळूहळूच होत राहते.

पहिल्या वसाहतवादानंतर उपाय म्हणून 'स्वदेशी' चा नारा देण्यात आला. ह्या वसाहतवादास उत्तर म्हणून मी 'निसर्गनिकट' जीवन जगण्याचा नारा देत आहे. मी आज सातपैकी पाच गोळ्या कायमच्या बंद करवण्यात यशस्वी झालेलो आहे. उरलेल्यांचीही गरज राहू नये अशी माझी धारणा आहे. मी ह्या गुलामीतून सुटका करून घेण्याच्या फार जवळ आलेलो आहे. तेव्हा तुम्हीही सांभाळा. गुलाम होऊ नका. आप्तस्वकीयांना गुलाम होऊ देऊ नका. चुकून गुलाम झालेले असाल तर जाणीवपूर्वक सुटका करून घ्या!

Comments

हो. हा लेख प्रचारकी थाटाचाच आहे. पटेल त्याने मानावा!

नरेंद्र यांचा प्रस्तुत लेख (वसाहतवाद वगैरे) प्रचारकी थाटाचा असून ऍनेक्डोटल पुरावा (जो ग्राह्य धरता येणार नाही) सोडून कुठलाही पुरावा देण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. >>>> सत्य वचन!

ठीक

हेतू स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. लेखाचा विषय निवडतांना 'विज्ञान', 'वैद्यकशास्त्र' असे विषय न निवडल्यास वाचकांचे गैरसमज होणार नाहीत.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

ही सूचना लेखकास समजायची, की प्रशासकांस विनंती?

ही सूचना लेखकास समजायची, की प्रशासकांस विनंती?

माझ्या मते उपलब्ध विषयांपैकी सर्वात उचित विषयच मी निवडले आहेत.
तेव्हा तुमची सूचना मला केलेली असेल तर, ती उपयोगाची नाही.

तुमची प्रशासकांना, "अशाप्रकारे अनुचित विषय निवडणारी" लिखाणे निषिद्ध करावित अशाप्रकारची काही सूचना असेल तर, प्रशासकांनी त्याचा अवश्य विचार करून मला योग्य तो निर्देश द्यावा.

आपण स्वतःही रिकामपणात काही मूळ लेखन करत असल्यास त्याचाही दुवा अवश्य द्यावा. वाचायला हवे!

सूचना लेखकासाठी

योग्य विषय निवडण्याची सूचना प्रस्तुत लेखाच्या लेखकासाठी आहे.

माझ्या मते उपलब्ध विषयांपैकी सर्वात उचित विषयच मी निवडले आहेत.
तेव्हा तुमची सूचना मला केलेली असेल तर, ती उपयोगाची नाही.

विषयांची निवड उचित नाही असे माझे मत आहे. तुमचे मत वेगळे आहे हे ध्यानात आल्याने सूचनेचा काहीएक उपयोग झालेला आहे - म्हणजे तुम्ही चुकून विज्ञान, वैद्यकशास्त्र विषय निवडलेले नसून सारासार विचार करून निवडलेले आहेत.

आपण स्वतःही रिकामपणात काही मूळ लेखन करत असल्यास त्याचाही दुवा अवश्य द्यावा. वाचायला हवे!

या संकेतस्थळावर मी केलेले लेखन मूळच आहे कारण मी इतरत्र कुठल्याही ठिकाणी ते लेखन केलेले नाही. माझ्या सदस्यनामावर व त्यानंतर 'वाटचाल' या शब्दावर टिचकी मारल्यास लेखन वाचण्यास मिळू शकेल. अवश्य वाचा.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

साक्षात्कार

केवळ आपल्यालाच ती जाणीव का झाली असावी बरे?? याबाबत काही अंदाज आहेत का आपले?? ती जाणीव इतरांना का होउ शकलि नाही किंवा होउ दिली गेली नाही. याबाबतही आपले मत असावे असे वाटते.
या निसर्गनिकट जगण्याला कोणत्या पाथीत समाविष्ट करणार आपण? या जगण्याचेही काही धोके असु शकतात का?
नाहीतच् असे ठामपणे म्हणु शकता का आपण?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

 
^ वर