असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या
आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे! साध्याच शैलीत लिहितो.
उपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.
काही शतके विशिष्टीकृत व्यवसाय आणि अंतर्समूह विवाह करणार्या समाजांमध्ये उत्क्रांतीदत्त जनुकीय वैशिष्ट्ये शिरतात. ज्यू लोकांना सावकारीव्यतिरिक्त फारसे पर्याय नसल्यामुळे त्यांची गणितात (जनुकीय) प्रगती झाली असे दावे आहेत. ज्यूंना नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता इतरांच्या ३०० पट असते. मानवी त्वचेची उत्क्रांती काही हजार वर्षांपूर्वीच झाली. चश्मा लागण्यासाठी कारणीभूत जनुके असलेल्या बालकांना कमी वयात वाचन/लेखन शिकता येते, काही शतके बैठी कामे करणार्या घराण्यांमध्ये अशी जनुके टिकून राहू/वाढू शकतील; घराबाहेर काम करणे आवश्यक असल्यास तशी जनुके अडचणीची ठरू शकतील. अधिक काळ शेती केलेल्या किंवा जंगलात राहणार्या समाजांना क्रीडाप्रकारांमध्ये अधिक यश मिळते. "ऑल मेन (अँड विमेन) आर इक्वल" हा गेल्या शतकांतील आशावाद भाबडा आहे.
अर्थात, क्षमतांच्या कमतरतेची कारणे गौण आहेत. एखादे शिक्षण किंवा नोकरी पार पाडण्याची कुवत आहे की नाही, हाच मुख्य मुद्दा आहे. येथे अनेक पोलिटिकली इन्करेक्ट (येट ट्रू) विधाने करता येतील. ठेचकाळलेला हापूस आणि रायवळ आंबा या दोन्हींची किंमत हापूसपेक्षा कमी असते. अन्यथा, बुद्धिमत्तेची जनुके असलेल्या मुलाला अपघातात मतिमंदत्व आले तरी पुढच्या इयत्तांमध्ये ढकलले गेले असते. कमकुवत उमेदवाराच्या अपयशामागे त्याचा दोष नसला (कदाचित त्या खापरपणजोबावरील अन्यायामुळे त्याला अपयश आले असेल) तरी अन्यायाचे परिमार्जन करून त्याला डॉक्टर बनविल्यास त्याच्या रुग्णांवर पुन्हा अन्यायच होणे शक्य असते. तसा अन्याय होऊ नये म्हणून "आरक्षित जागांवरील विद्यार्थी आणि अनारक्षित जागांवरील विद्यार्थी यांच्या क्षमतांमधील तफावत पुरेशी कमी होते काय?" या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आवश्यक आहे. वैयक्तिक निरीक्षणांनुसार, वैद्यकीय शिक्षणामध्ये (घोकंपट्टीला महत्व असल्यामुळे?) आरक्षित जागांवरील विद्यार्थी प्रगती करतात* पण, अभियांत्रिकी शिक्षणात (गणिताला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिक महत्व?) मात्र त्यांच्या गळतीचे प्रमाण खूपच अधिक असते. आयआयटी दिल्लीतून इतक्या आरक्षित विद्यार्थांना हाकलले गेले की त्या निर्णयावर जातिद्वेषाचा आरोप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
कल्याणकारी समाजाच्या रचनेत, कमी क्षमताधारींनाही सन्मानाने वागविण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही, त्यांच्या आयुष्याचा दर्जा बलवानांइतका करण्याचे ध्येयच नसते, नसावे. (येथेही अनेक पोलिटिकली इन्करेक्ट उदाहरणे देता येतील.) स्वस्त धान्यांच्या दुकानांतील धान्यांचा दर्जा, शासकीय रुग्णालयांमधील उपलब्ध औषधे, यांच्यावरून असे दिसते की सर्वोत्तम दर्जाचे जीवनमान मिळविण्यासाठी 'मदत' दिली जात नाही. संसाधनांच्या उपलब्धतेनुसार ही 'वरची मर्यादा' ठरविता येते. "आरक्षण काय केवळ झाडूवाल्यांच्या जागांसाठीच द्यायचे काय?" असा प्रश्न (बहुदा) डॉ. मुणगेकर यांनी विचारला होता असे स्मरते. सामान्य वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये आणि एम्स, आयआयटी, आयआयएम, इ. मध्ये फरक करावा असे मला वाटते.
आपत्कालीन वैद्यकीय उपचारांमध्ये 'ट्रियाज' ही एक पायरी असते. अतिगंभीर जखमींना (हताशपणे) आणि किरको़ळ जखमींना (निर्धास्तपणे) केवळ वेदनाशामक औषधे देऊन मध्यम प्रतीच्या जखमा झालेल्यांवर तातडीचे उपचार केले जातात. एखाद्या अतिगरजूला अतिविशिष्ट उपचार देण्याच्या खर्चात/वेळेत अनेक कमी-गरजूंना मदत करता येते.
* मी जमविलेली माहिती:
ज. जी. रुग्णालय आणि ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून २००४ साली एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण होणार्या विद्यार्थांची काही माहिती मी जमविली होती. एमबीबीएस तृतीय वर्ष भाग २ या परीक्षेच्या गुणांनुसार त्यांची क्रमवारी पुढीलप्रमाणे होती.
क्रमगट | अनारक्षित समाज | इ. मा. व. | अनु. जा. | अनु. ज. | भ. ज. | वि. जा. | माहिती सापडली नाही |
---|---|---|---|---|---|---|---|
01 to 20 | 17 | 1 | 1 | 0 | 1 | 0 | 0 |
21 to 40 | 15 | 4 | 1 | 0 | 0 | 0 | 0 |
41 to 60 | 14 | 3 | 1 | 0 | 1 | 1 | 0 |
61 to 80 | 10 | 7 | 3 | 0 | 0 | 0 | 0 |
81 to 100 | 12 | 4 | 2 | 0 | 1 | 1 | 0 |
101 to 120 | 11 | 4 | 3 | 1 | 0 | 1 | 0 |
121 to 140 | 5 | 7 | 3 | 0 | 4 | 1 | 0 |
141 to 160 | 6 | 5 | 1 | 0 | 0 | 0 | 8 |
161 to 180 | 11 | 0 | 3 | 0 | 2 | 0 | 4 |
181 to 192 | 1 | 2 | 1 | 0 | 0 | 0 | 8 |
गृहीतक**: १९९९ साली आरक्षित समाजांच्या सर्वच उमेदवारांनी आरक्षित जागांवरून प्रवेश घेतला होता.
निष्कर्ष: संधी मिळाल्यास आरक्षित विद्यार्थी काही प्रमाणात प्रगती करतात.
हा निष्कर्ष फसवा असल्याचे ठरवू शकणार्या काही परिस्थिती (कन्फाउंडर्स):
- अपुर्या आकाराचे आत्त
- आकडे जमविण्यात माझ्याकडून गफलती होणे
- ** आरक्षित समाजांतील काही उमेदवारांनी अनारक्षित (=उच्च) जागांवरून प्रवेश घेतला होता (संख्या अनुपलब्ध). (त्या उमेदवारांचा 'तसा' उद्देश नसतो. उमेदवारांना निवडपर्याय दिलेच जात नाहीत. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी आरक्षित (७०%) जागा वापरून मला प्रवेश देणे शक्य होते परंतु माझ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुली (३०%) जागा वापरली गेली. मला प्रवेश देणार्या कर्मचार्याला विदर्भ/मराठवाडाद्वेष्टा ठरवावे काय?)
- २००३ साली अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी येथे गणले जाणे (संख्या अनुपलब्ध). त्यांना अभ्यासासाठी दोन वर्षे वेळ मिळाला.
- निवड परीक्षांमध्ये डॉक्टर बनण्याची कुवत (=अंतिम परीक्षेतील यश?) तपासलीच जात नाही. धावणे/चित्रकला/चमचालिंबू स्पर्धा आयोजित करून, त्यांच्या विजेत्यांना वैद्यकीय शिक्षणात प्रवेश दिल्यास तेही पुरेसे चांगले डॉक्टर बनतील काय? तृतीय वर्ष भाग २ या परीक्षेतील यशाचा वीस वर्षांनंतरच्या आर्थिक परिस्थितीशी किंवा २०० वर्षांनंतरच्या सन्मानाशी संबंध असतो काय? नोकरी किंवा शिक्षणासाठी नेमकी किती कुवत आवश्यक असते, नाकारल्या गेलेल्या सर्वोत्तम उमेदवाराची कुवत त्यापेक्षा अधिक नसते काय, इ. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नसुद्धा आवश्यक आहे.
- आरक्षित जागांवरील काही विद्यार्थी अंतिम वर्षापर्यंत पोहोचलेच नसणे (आयआयटी दिल्ली प्रमाणे) शक्य आहे.
बहुतेक मजकूर इतरत्र पूर्वप्रकाशित आहे.
Comments
जनुकीय प्रगती
जनुकीय प्रगती बाबत सहमत. म्हणजे काही गट खेळात यशस्वी, काही गणितात तर काही कलेत यशस्वी असणे शक्य आहे. पण खेळात यशस्वी गटात गणितात हुशार कोणी निपजणारच नाही असे नाही. गटागटात पंक्तीप्रपंच करण्यापेक्षा सगळ्यांना समान दर्जा द्यावा हा नियम सोपा आहे.
आरक्षणामागे एक विचार असा आहे की अधिकारी स्थानावर असलेल्या एका गटातील लोकांच्या विचारसरणीचा निवडप्रक्रियेवर अन्याय्य परिणाम होऊ नये.
असहमत आणि स्वानुभव
मी स्वतः अनुसूचित जमाती ( अधिक काळ शेती केलेल्या किंवा जंगलात राहणार्या समाजांपैकि एक) मधिल एक. (आदिवासीच म्हणा)
माझ्या घराण्यात् कुठेही अंतर्समूह विवाह नाही त्यामुळे "जनुक" शिरण्याचा प्रश्नच नाही.आरक्षणा मुळे शिकू शकलो. रडत खडत ४ वर्षात अभियंताही झालो.
काहि विषय वगळता अभियांत्रिकी शिक्षणातही घोकंपट्टीच आहे. चारही वर्षे महाविद्यालयात आम्ही सरकारचे जावई म्हणुन हिणवलो गेलो (उच्च जातीय मिंत्रा कडुनही). झक मारली आणि लायकि नसताना प्रवेश घेतला असे वाटत असे. ही जाणिव होस्तोवर उशिरही झाला होता. न्युनगंड बराच वाढला. ही अवस्था बरयाच आरक्षित विद्यार्थि मित्रांची होती. ( गळतिचे हेही कारण असु शकते)
IT मध्ये नोकरीच्या प्रथम काहि वर्षातच स्वःताची क्षमता समजते, कारण तिथे कुवत लागते. पहिली नोकरी वगळता कुठेही कमी गुणांचा अडथळा आला नाही. तेव्हा जनुकीय प्रगती (एकाधा विशेष समाजाची) याबाबत असहमत. अहो हिटलरनेही हिच चुक केलि होति.
टिपः आमची पुढची पिढी आरक्षणाचा फायदा घेणार नाही याची काळजी घेणार आहोत.
गैरसमज
अंतर्समूह म्हणजे "आंतरसमूह नाहीत ते". त्यांच्यातही म्यूटेशनने जनुके शिरतात.
माहितीबद्दल धन्यवाद.
हे वाचून वाईट वाटले.
मान्य.
तुमचा गैरसमज झाला आहे.
"काही समाज कमकुवत असतात म्हणून त्यांना संधीच नकोत" असा माझा युक्तिवाद नाही. परंतु, "काही समाज परीक्षांमाध्ये मागे दिसतात त्याचे कारण १००% परिस्थितीजन्य असून ०% जनुकीय आहे" या विधानाला माझा विरोध आहे. शिवाय, सरासरी बघितली तर 'मागे दिसतात' अशा समूहांमध्येही काहीजण 'पुढे दिसणार्या' समूहांमधील काहीजणांच्या पुढे असतात. दोन गॉशियनसदृष आलेख शेजारी ठेवले आणि एकाची सरासरी दुसर्यापेक्षा अधिक असली तरी दुसर्याचे काही घटक हे पहिल्याच्या काही घटकांपेक्षा मोठे असू शकतात, व्यक्तींच्या कुवतीची तपासणी वैयक्तिक परीक्षेनेच करावी लागते. असे म्हणू की एका पेटीत क्ष% चांगले आणि १००-क्ष% ठेचकाळलेले/रायवळ आंबे आहेत, तर दुसर्या पेटीत क्ष-१% चांगले आणि १०१-क्ष% ठेचकाळलेले/रायवळ आंबे आहेत.
सहमत
सहमत.
"संधीमध्ये समान दर्जा द्यावा" हे मत असू शकते परंतु त्यासाठी "कुवत समान असतेच" हे गृहीतक आवश्यक नाही. आलेख ऋण अनंत ते धन अनंत असू शकतात पण त्यांचे परमबिंदू, सरासरी, अर्धबिंदू वेगवेगळे असू शकतात, स्क्यू असू शकते.
होय, परंतु ते एकच कारण नसावे, कुवतीही कमी-अधिक असू शकतात असा माझा युक्तिवाद आहे.
उपयोगी तक्ता
उपयोगी तक्ता.
लेख हळूहळू वाचतो आहे. दिसायला लहान असला तरी बरीच सामग्री आहे.
हम्म
धन्यवाद. तेव्हा मला फारसे स्क्रिप्टिंग येत नव्हते. एकएक आसनक्रमांक संस्थळावर टंकून परीक्षार्थींचे एकूण गुण आणि जात शोधली होती.
बचाऽव.
जनुकीय परिच्छेद फार अघळपघळ वाटतो
जनुकीय परिच्छेद फार अघळपघळ वाटतो.
याबद्दल अधिक काळजीपूर्वक निरीक्षणे बघायला आवडतील. विश्लेषित-आकडा आकडा असा एकच दिसतो. ज्यू वंशाच्या लोकांची नोबेल पारितोषिक जिंकण्याची तुलनात्मक शक्यता.
कालनिहाय शक्यता बघता २०व्या शतकाच्या आदल्या भागात कमी दिसते, पुढल्या भागात अधिक दिसते. हा एक आकडा सुद्धा तकलादू आहे. काही शतकांत जनुकीय बदल होऊ शकतील असे लेखकाचे प्रतिपादन आहे. पटत नाही. रिफ्रॅक्टिव्ह-एरर बद्दल कयास आहे. निरीक्षणे बघायला आवडतील. काही कयास निरीक्षणांच्या भाषेत मांडलेले आहेत. उदा. :
असे निरीक्षण असलेच तर ते अप्रसिद्ध आहे.
टोकाच्या उदाहरणात पटण्यासारखे आहे. मूकाला वाचाळ व्हायचे नसेल, आणि पंगूला गिरी लंघायचा नसेल. ठीक आहे.
मात्र "पालकांकडे संसाधने नाहीत" हे कायमचे पंगुत्व म्हणून मानले आहे, तसे नसावे.
नंतरच्या सारांशाच्या (ट्रियाज) परिच्छेदात मी हरवलेलो आहे.
सामान्य वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये आणि एम्स, आयआयटी, आयआयएम, इ. मध्ये फरक करावा असे मला वाटते.
हा प्रमुख क्रियाशील सारांश ("बॉटमलाइन कॉल-टु-ऍक्शन") आहे काय?
खुलासे
जनुकीय दावे:
आश्केनाजी ज्यू लोकांविषयी काही पेपर मी वाचले होते. शोधतो. मेंदूतील स्निग्ध पदार्थांतील बिघाडांमुळे मतिमंदत्व आणणारी जनुके कमी प्रमाणात असतील तर मज्जातंतूंच्या संदेशवहनाचा वेग वाढतो असेही वाचले होते.
जन्मतः बहुतेक मुलांना दूरदृष्टिता या प्रकारचा दोष असतो, २-३ वर्षांपर्यंत डोळ्याची वाढ होऊन तो बराचसा दुरुस्त होतो. ही माहिती ज्ञात आहे. प्रौढांना होतो त्यापेक्षा मुलांना (बाहुलीचे स्नायू खूपच सक्षम असल्यामुळे) दूरदृष्टितेचा कमी त्रास होतो हे मान्य केले तरी 'ज्या मुलांची दूरदृष्टिता थोडीशी कमी तीव्र असेल तर त्यांना वाचनामध्ये अधिक एकाग्रता करता येईल' हा माझा कयास आहे. मुळात दूरदृष्टिता कमी तीव्र असल्यास, डोळ्याची वाढ झाल्यावर त्यांना र्हस्वदृष्टिता होईल हे माझे दुसरे तर्कट आहे. (र्हस्वदृष्टिता समाजांत वाढते आहे, र्हस्वदृष्टिता असलेली मुले खेळांपेक्षा वाचनात रस दाखवितात असे मी वाचलेले आहे. शोधतो.)
वेगवेगळ्या वंशांमध्ये वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचे कौशल्य आहे या दाव्यात आश्चर्यकारक काय आहे? लाल रक्तपेशी, लाल/पांढर्या स्नायूपेशी, इ. मधील जनुकीय गुणवत्तांविषयी अनेक पेपर आहेत. शारिरीक कष्टांची आवश्यकता या नैसर्गिक निवड तत्त्वाव्यतिरिक्त इतर कोणत्या कारणाने ही जनुके काही समाजांमध्येच वाढली असतील? (समाजवादी जीवशास्त्रज्ञ या कयासांना 'जस्ट सो स्टोरी' म्हणतात.)
ट्रियाज:
पालकांनी खर्च करण्याविषयी चर्चा नसून सरकारने मदतीचा हात देण्याविषयी चर्चा आहे. स्टीफन हॉकिंग यांना एका खास विमानात उडताना (फ्री फॉल) अनेक वर्षांनी खुर्चीतून उठता आले. पण बेडसोरच्या प्रतिबंधासाठी सरकारी खर्चाने उपग्रह सोडले जाणार नाहीत.
तत्त्वतः आरक्षण मान्य केल्यावर केवळ तपशीलाविषयी चर्चा शक्य आहे.
'आरक्षणे अपराधी भावनेतून (गिल्ट कॉन्शन्स) नसतात, तो एक हेल्पिंग हँडच आहे' हे प्रेमिस आहे.
क्षमतांच्या कमतरतेचे एक कारण जनुकीय असल्याचा दावा आहे.
'मदतीचा हात' कधीच १००% नसतो हा एक युक्तिवाद आहे.
सवलत मिळाल्यामुळे फायदा होतो की नाही याचा तपास आवश्यक आहे हा दुसरा युक्तिवाद आहे.
सवलतींचा, काही परिस्थितींमध्ये, काही प्रमाणात लाभ होतो असे निरीक्षण आहे.
निवड पद्धत सदोष असल्याची शक्यता मान्य केली आहे.
सोपा युक्तिवाद शक्य आहे
ठीक. (याची सिद्धता किंवा असिद्धता करायची नाही, हे सत्य मानायचे आहे = प्रेमिस.)
ठीक. "कारण" शब्दाचा काहीतरी ढोबळ अर्थ घेतलेला आहे, म्हणून "ठीक" म्हटले आहे. त्या ढोबळपणातही "अनेक कारणांपैकी एक" असे म्हणायचे असेल, असे वाटते. जर कारणांचे वाटे सांगितले, तर किती टक्के वाटा जनुकीय आहे, हे सांगितलेले नाही. युक्तिवादातील पुढच्या वाक्यासाठी असा काही अंदाज करणे आवश्यक आहे.
ठीक. किती टक्के असतो? १%, ५०%, ९९%? अंदाजे तरी ढोबळ टक्केवारी हवी.
ठीक.
ठीक.
ठीक.
(समाजातील सर्वच धोरणात्मक निर्णय सदोष असतात. नुसते हे एकच वाक्य सांगितले असते, तर कुठल्याही युक्तिवादाची आवश्यकता राहिली नसती. परंतु तुमचा हेतू त्यापेक्षा काही अधिक असावा. सध्याचे धोरण जितके सदोष आहे, त्यापेक्षा कमी दोष असलेले धोरण समाजाने राबवावे, असा काहीसा हेतू असावा. मात्र येथे वेगवेगळ्या धोरणांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप अपेक्षित आहे. तुमचे वरचे वाक्य क्रियाशील नाही.)
क्रियाशील असा काय निष्कर्ष आहे? समाजात आज करतो त्यापेक्षा वेगळे काय करावे?
राज्यसरकारच्या महाविद्यालयांत आरक्षण असावे, आणि केंद्रीय महाविद्यालयांत आरक्षण नसावे, असे एक वाक्य तुमच्या लेखात आलेले आहे. हा तुमचा क्रियाशील निष्कर्ष आहे काय? (प्रश्नाची अपेक्षित उत्तरे : (१) होय, हा क्रियाशील निष्कर्ष आहे; (२) नाही, हा क्रियाशील निष्कर्ष नाही, (३) हा क्रियाशील निष्कर्ष आहे की नाही त्याबद्दल पुरेशी माहिती नाही [लेखकालाच माहिती नसेल तर वाचक पामर काय करणार!], (४) प्रश्न नि:संदर्भ आहे.)
- - -
जर हा असा क्रियाशील निष्कर्ष असेल तर जनुकांबद्दल सामान्यीकृत युक्तिवाद उगाचच दिला. शिक्षणसंस्थांचे आणि आरक्षणाचे फलित काय आहे, ते सांगावे (तुमच्या प्रेमिसमध्ये). फलिताचे मोजमाप कसे करावे, ते सांगावे. अमुक आरक्षण-धोरण फलप्राप्तीसाठी कार्यक्षम असल्यास मोजमापे अशी दिसतील, पर्यायी धोरण कार्यक्षम असल्यास मोजमापे तशी=वेगळी दिसतील, असे भाकित करावे. राज्य-केंद्र सरकारच्या संस्थांमधील स्नातकांमध्ये मोजमाप करावे. तुम्ही भाकित केल्यापैकी जे काय पर्याय दिसतील, त्यांच्या अनुषंगाने कुठला क्रियाशील निष्कर्ष अमलात आणण्याबद्दल/न-आणण्याबाबत चर्चा करावी.
अमुक राष्ट्राच्या राज्यघटनेत केंद्र, राज्य अशी एकके असतात... वगैरे असल्या तपशिलांचा जनुकांसारख्या मूलभूत विश्लेषणाशी इतका अति-दूरचा संबंध आहे, की भाकिते करणे व्यवहार्य नाही, असे मला वाटते.
- - -
आणि जनुकीय-उत्क्रांती उपन्यासांची सिद्धता करायची असेल तर कयास कशाला करायचा? उत्क्रांतीचे विज्ञान निरीक्षणसिद्ध असते. निरीक्षणे तत्त्वतः सोपी आहेत :
१. असे निरीक्षण दाखवा की व्यक्ती-व्यक्तीमध्ये (ह्रस्वदृष्टीत) जो फरक आहे, तो अनुवांशिक आहे - इथे "जात"-अनुवांशिकता पेक्षा "आई-बाप->मूल" अनुवांशिकतेचे निरीक्षण अपेक्षित आहे.
२अ. असे निरीक्षण दाखवा की भेद असला तर पौगंडावस्थेपर्यंत जगण्याची शक्यता बदलते
२आ. असे निरीक्षण दाखवा की भेद असला तर अपत्य-प्राप्तीसाठी जोडीदार मिळवणे कमी-अधिक होते.
२इ. असे निरीक्षण दाखवा की भेद असला तर गर्भधारणेतले यश कमी-अधिक होते.
(२अ, २आ, २इ... पैकी एक किंवा अनेक निरीक्षणे असली तर चालते.)
३. असे निरीक्षण दाखवा की बदल झालेली जनुके आदल्या पिढीपेक्षा पुढल्या पिढीत अधिक प्रमाणात दिसतात.
१+२+३ निरीक्षणे दाखवली, तर झाली सिद्धता जनुकीय उत्क्रांतीची. कयास वगैरे करायची गरज नाही.
सहमत
जर हा असा क्रियाशील निष्कर्ष असेल तर जनुकांबद्दल सामान्यीकृत युक्तिवाद उगाचच दिला.
सहमत हेच म्हणतो.
प्रमोद
खुलासा
ते संसाधनांनुसार आणि दात्यांच्या गरजांनुसार ठरते.
"आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे" नोंदविणे इतकाच लेखाचा उद्देश होता. या विषयावर दोन्ही बाजूंपैकी कोणत्याही बाजूने अभिनिवेशविरहित मते क्वचितच सापडतात. "समाजात आज करतो त्यापेक्षा वेगळे" 'विचार करावे' असे मी सुचवितो आहे.
"क्षमतांच्या कमतरतेची कारणे गौण आहेत."="जनुकांबद्दल सामान्यीकृत युक्तिवाद उगाचच दिला."
"सगळे सारखे जन्मतात" या गृहितकाला नाकारले की "ज्याअर्थी विषमता आहे त्याअर्थी अन्यायच आहे आणि समता येईपर्यंत नुकसानभरपाई द्यावी" हा निष्कर्ष निराधार होतो. जनुकांचा उल्लेख प्रेमिसच्या पुष्ट्यर्थ आहे.
कुवती जनुकांनी कमी असोत किंवा परिस्थितीमुळे (कौटुंबिक वातावरण, सामाजिक उपेक्षा) कमी होवोत, परंतु जर कुवतीची कमतरता भरून येण्याची आशा नसेल तर सवलत देणेही चूक ठरते हा विचार सर्वांना पटतो काय हे तपासणे हा या लेखाचा एक प्रमुख उद्देश आहे. परंतु वैद्यकीय विद्यार्थ्यांचे जे निरीक्षण मी नोंदविले आहे त्यानुसार "कुवतींतील तफावत कमी होऊ शकतो" असे मला वाटते.
"एका किमान सन्माननीय आयुष्याच्या पातळीवर पोहोचविणे हे मदतीचे उद्दिष्ट असते" या युक्तिवादाने अभिनिवेशाला विरोध करता येईल असे मला वाटते.
१ आणि ३ ही निरीक्षणे उपलब्ध आहेत. २ या पायरीवरील निरीक्षणे मला माहिती नाहीत (पण डोळ्याच्या उत्क्रांतीविषयी तसेच कयास आहेत). ३ या निरीक्षणाचे काहीतरी स्पष्टीकरण असलेच पाहिजे ना?
उपलब्ध नाही किंवा अप्रसिद्ध
असल्यास अप्रसिद्ध आहेत.
डोळ्यांच्या बाबतीत असे नव्हे. जीवाश्मांत निरीक्षणे उपलब्ध आहेत.
३ हे निरीक्षण उपलब्ध असल्यास अप्रसिद्ध आहे. हल्लीच्या काही हजार वर्षांत नवीन-उद्भवून-जिंकलेली म्यूटेशने मला इन-मिन-तीन माहीत आहेत. उदाहरणार्थ : मलेरियाचा त्रास कमी करणारे (पण रक्तावर अनिष्ट परिणाम करणारे) सिकल सेल अनीमियाचे बदललेले जनुक. (अशी आणखी थोडीच माहीत आहेत.) तुमच्या कयासांना आधार मिळेल अशी उदाहरणे माहीत नाहीत.
१ हे निरीक्षण उपलब्ध आहे, पण बहुतेक मोजमापांची "हेरिटेबिलिटी" ५०%च्या आजूबाजूलाच असते.
"हेरिटेबिलिटी" म्हणजे वेगळ्या कुटुंबा-कुटुंबात मोजमाप जितके वेगळे दिसते, पण कुटुंबाच्या अंतर्गत तितके वेगळे दिसत नाही, त्याबद्दल आदमास. जर कुटुंबां-कुटुंबांत मोजमाप वेगवेगळे असले, कुटुंबाच्या अंतर्गत तंतोतंत एकसारखे असले, तर हेरिटेबिलिटी=१००%. जर कुटुंबाअंतर्गतचा व्हेरियन्स = कुटुंबा-कुटुंबांतला व्हेरियन्स, असे दिसले, तर हेरिटेबिलिटी = ०%
हेरिटेबिलिटीच्या टक्केवारीमध्ये जनुकांचा वाटा येतात, आणि कुटुंबाच्या अंतर्गत अनुभव-शेजार-पर्यावरण सारखे असते, त्याचासुद्धा वाटा येतो.
"उंची"ची हेरिटेबिलिटी ६०-८०% आहे. मात्र जनुके सापडलेली आहेत असे त्यापैकी ~५%च आहे.
हे बुजगावण्याचा आधार काढणे आहे. "सगळे सारखे जन्मतात" हे वाक्य ढोबळ आहे, यात काय शंका आहे? "बरेचसे सारखे जन्मतात" असा मथितार्थ आहे. हे वाद मोजमापांचे (क्वांटिटेटिव्ह) आहेत. "१००% सारखे जन्मतात" असे तुम्हीच खोडण्यासाठी म्हणता, आणि मग खोडता.
आरक्षणाबाबत संसाधने आणि दात्यांची गरज काय आहे?
प्रमुख उद्देशासाठी तुमचा तक्ता पुरेसा होता. जनुकांबद्दल चुकलेला किंवा नि:संदर्भ युक्तिवाद अनावश्यक होता, आणि तुमच्या प्रमुख उद्देशाच्या आड येतो.
("नि:संदर्भ" का म्हटले? तुमचा युक्तिवाद "जनुकांचा परिणाम तंतोतंत ० असतो" या ऍब्सोल्यूट विधानाचे खंडन करतो. मात्र ते ऍब्सोल्यूट विधान कोणीच मानत नाही. त्यामुळे तुमचा युक्तिवाद संवादकांपैकी कोणाचेच खंडन करत नाही.)
माहिती
पायरी १ चे निरीक्षण: विकीपिडियानुसार र्हस्वदृष्टितेची हेरिटेबिलिटी ८९% आहे. (उंचीच्या उदाहरणाप्रमाणेच या उदाहरणातही) नेमकी जनुके सापडणे महत्वाचे नाही.
पायरी २ चे निरीक्षण: र्हस्वदृष्टितेमुळे आयुष्मान वाढणे/सुदृढ जोडीदार मिळणे/गर्भधारणेची शक्यता वाढते यांपैकी काही निरीक्षण मला माहिती नाही. (हे जीवाश्मांवरून तरी कसे समजते?)
पायरी ३ चे निरीक्षण: आधुनिक समाजांमध्ये र्हस्वदृष्टिता वाढली आहे, वाढते आहे. इतरही अनेक उदाहरणे आहेत. उदा. ज्यूंविषयीचा दावा, अन्नपचनातील बदल, त्वचेचा कर्करोग विरुद्ध ड जीवनसत्व, मलेरिया विरुद्ध थॅलेसेमिया, २, ३, ४.
केवळ दोन व्यक्तींमध्ये फरक असल्यास त्याच्याकडे 'ढोबळपणे सारखेपणा' (नॉर्मल वेरिएशन) असे म्हणून दुर्लक्ष करता येते पण दोन गटांमध्ये लक्षणीय फरक (सिग्निफिकंट डिफरन्स) आढळतात असा दावा आहे. रेशियल स्टीरिओटाईप हे पिसाचा कावळा करून बनविले जात असतील ना? "पीसही नाही" असे कसे म्हणता येईल?
"आम्ही हेल्पिंग हँड देणारच" असा जाहीरनामा स्वतःवर लादला तरी मुळात नेमकी किती मदत द्यावी याचा निर्णय संसाधनांवर अवलंबून राहील. सवलत ही क ने ख ला द्यायची असते त्यामुळे देणारा आणि घेणारा असे दोन पक्ष आवश्यक आहेत.
"कमतरता भरून येण्याची आशा नसेल तर सवलत देणेही चूक ठरते" या विचाराला तक्त्याचा निष्कर्ष खोडून काढत नाही.
आम्ही नाही जा
८९% पैकी किती जनुकांमुळे आहे, आणि किती कॉमन एन्व्हायरनमेंटमुळे आहे?
एक पेपर
या पेपरात २:१ असे उत्तर आहे असे वाटते.
दावा आणि अभ्यास
१- दुव्यातल्या अभ्यासात डायझायगोटिक ट्विन्सची आकडेवारी वेगळी दिलेली नाही.
२- सर्व जनुके सारखी असलेल्या मोनोझायगोटिक ट्विन्सची आकडेवारी वेगळी दिलेली नाही (१००% समानता दिसते का वगैरे)
अर्थात संख्याशास्त्र आणि जनुकशास्त्र यांबाबतचे माझे ज्ञान वरवरचे आहे त्यामुळे जास्त भाष्य करता येत नाही.
३- तुमचा दावा नुसता जनुकीय परिणाम असतो एवढाच नाही. तुमचा दावा अशी परिणाम घडवणारी जनुके (उदा. कुवतीची जनुके) विशिष्ट जातीत अधिक असतात असा आहे. त्याबाबत काही अभ्यास झाला आहे का?
[कोकणस्थ ब्राह्मण वेगळे आहेत कारण त्यांच्या कानात स्टॅण्डर्ड एअरफोन नीट बसत नाहीत असा 'अभ्यासपूर्ण जनुकीय निष्कर्ष' एका कोकणस्थाकडून ऐकला आहे :|) बाकीच्यांच्या कानात फिट्ट बसतात असा निष्कर्ष आहे की नाही याची कल्पना नाही.]
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
सहमत
संपूर्ण पेपर मिळविण्याची व्यवस्था करतो.
तसा दावा नाही कारण तसा अभ्यास माहिती नाही. माझा मुद्दा इतकाच की वंशाच्या बाबतीत तसे फरक आहेत, त्यामुळे जातींच्या बाबतीतही फरक सापडल्यास आश्चर्य वाटू नये.
अघळपघळ
धनंजय यांची ही प्रतिक्रिया त्यांच्यासाठीसुद्धा अतिरेकी सौम्य वाटली.
शिरतात म्हणजे काय? ही लामार्कियन विचारसरणी, जनुकांच्या पडद्यांआड लपून आलेली दिसते. त्याला आधार म्हणून काही दावे, काही तर्क... हम्म्म्म... इतक्या टोकाच्या विधानासाठी काही ठोस समाजशास्त्रीय, जनुकीय शोधनिबंधांचा (एक नव्हे, अनेक) आधार आला असता तर बरं झालं असतं.
शतकांमध्ये उत्क्रांतीचे परिणाम (कृपया कुत्र्यांचं उदाहरण देऊन बुद्धीमत्तेचा अपमान करू नये) दिसून येतात हे प्रचंड धाडसी विधान. सुमारे दहा ते पंधरा पिढ्यांत काय होणार आहे? डिफरेन्शियल सिलेक्शनचं गणित करून दाखवा...
त्यात त्या परिणामांतून किती प्रमाणात कुठची जनुकं निवडली जातात, हे पाहू. तुमच्या दाव्याप्रमाणे, उदाहरणार्थ,
१. लोहारकाम, कुंभारकाम वगैरे करणाऱ्या लोकांमध्ये 'हुशारीची' किंवा 'गणिताची' जनुकं नष्ट होतील... कारण थोडा अधिक हुशार व कमी बलवान लोहार हा अधिक बलवान व कमी हुशार लोहारापेक्षा अधिक यशस्वी होईल. अहो, लोहारकाम म्हणजे केवळ दणके घालणं एवढंच असतं, विशेषतः गेल्या काही शतकांमध्ये असा आपला समज आहे का? बरं ते यश इतकं असलं पाहिजे की काही शतकांत पहिल्यापासून अनेक पट अधिक संतती मागे ठेवली पाहिजे. बुद्धीमान लोहार ते धंद्यात यशस्वी/अयशस्वी होतात म्हणून नाही, तर इतर कारणांमुळे अधिक संतती ठेवू शकतात.
२. शक्तीमान ब्राह्मण थोडा कमी हुशार असेल तर तो कमी शक्तिवान पण अधिक हुशार ब्राह्मणापेक्षा मागे पडेल, इतकंच नव्हे तर शक्तीची जनुकं ब्राह्मणांच्या जनुकसंचांतून नाहीशी होतील... हेही कैच्या कैच. शक्तीवान ब्राह्मण, ते धंद्यात यशस्वी/अयशस्वी होतात म्हणून नाही, तर इतर कारणांमुळे अधिक संतती ठेवू शकतात.
३. दुसरं गृहितक असं आहे की लोहारकाम करणाऱ्याचा प्रत्येक पोर लोहारकामच करतो. किंवा ब्राह्मणाचा प्रत्येक पोर भिक्षुकीच करतो. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांच्या इतर उद्योगांविषयी भरपूर लिहिलेलं आहे. मग विशिष्टीकृत व्यवसाय देखील बाराच्या भावात जातं.
४. याहीपलिकडे गृहितक असं आहे की सध्याचा अभियांत्रिकीचा वा वैद्यकीचा अभ्यासक्रम इतका कठीण आहे की सध्याच्या लोहार (कुंभार, इ. इ.) समाजाला तो आत्मसात करायला जनुकीय मर्यादा आहेत. हे गृहितक कृपया काहीतरी विदा देऊन सिद्ध करावं, किंवा ते गृहितक आहे हे मान्य करावं.
५. सुमारे तीन शतकांपूर्वी सर्वच जग शेती वा अन्य अ-गणिती व्यवसाय करत असे. मग गणितं करण्याची जनुकं मुळात सर्वांच्यात होती असं म्हणणं आहे व ती काहींच्यातनं नष्ट झाली... की नवीन गणिती जनुकं निर्माण झाली?
६. सरतेशेवटी, धंद्यात यशस्वी होणं हाच एकमेव बहुसंख्य पिलावळ मागे सोडण्याचा मार्ग आहे असंही गृहीतक दिसतं. ते नसेल तर तुमचा डिफरेन्शियल कमी कमी होत जातो...
या पलिकडे जाऊन जगातल्या अनेक वाईट गोष्टींची जबाबदारी जनुकीय फरकांपेक्षा सामाजिक परिस्थितीवर टाकणारे अनेक शोधनिबंध आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेतले काळे व गोरे यांची तुरुंगातली (गुन्हेगारांची संख्या) बघितली तर काळे प्रमाणापेक्षा अधिक गुन्हे करतात असा निष्कर्ष निघतो. पण त्याच लोकसंख्येचं गरीबी व शिक्षण या समसमान पार्श्वभूमीचे लोक बघितले तर ती तफावत नष्ट होते.
उद्धृत केलेल्या टेबलात अनारक्षित विद्यार्थी प्रवेशाआधी परीक्षा देण्यात हुशार होते व त्यानंतरही ते होते, एवढंच दिसतंय. मुळात जर या टेबलाची तुलना प्रवेशाआधीच्या रॅंकिंगशी केली तर आरक्षितांमध्ये सुधारणा नाही असं म्हणायला वाव आहे का?
एकंदरीत उत्क्रांती म्हणजे काय, सामाजिक जडणघडण म्हणजे काय याबाबतच्या अपुऱ्या ज्ञानावर लिहिलेला लेख वाटतो.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
खुलासे
म्यूटेशन, एखादा आंतरसमूह संबंध, इ.
ज्यू समाजांविषयी अनेक पेपर आहेत. शोधेन. शारिरीक वैशिष्ट्यांविषयीसुद्धा तुम्हाला संशय आहे काय? की केवळ बौद्धिक वैशिष्ट्यांविषयीच चर्चा अपेक्षित आहे?
--------
जनुके 'नष्ट होतील' असा माझा दावाच नाही. त्यांचे प्रमाण कमी होईल इतकाच दावा आहे.
आर्थिक सुबत्तेमुळे संततीची संख्या वाढण्यापेक्षा अपत्यमृत्यूंवर निश्चितच परिणाम होतील असे वाटते.
या deus ex machina ने तर संपूर्ण उत्क्रांतीवादाला निकालात काढता येईल.
नवी माहिती. साशंकपणे मान्य. इतर उद्योग किती टक्के ब्राह्मण करीत याविषयी काही आकडे आहेत काय?
हे गृहितक/विधान/प्रतिपादन माझ्या लेखात नाही. माझा युक्तिवाद केवळ इतकाच आहे की काही समाजांच्या बाबतीत कमी व्यक्तींमध्ये कुवत असेल तर त्यात आश्चर्य वाटू नये.
कैच्याकै: शूल्बसूत्रे, पंचांगे?
माहिती नाही.
"१९९९ साली आरक्षित समाजांच्या सर्वच विद्यार्थ्यांनी केवळ आरक्षित जागांवरून प्रवेश घेतला होता." हे गृहितक स्वीकारले तर "प्रवेशावेळी अनारक्षित समाजांतील सर्वच विद्यार्थी आरक्षित विद्यार्थ्यांच्या वर होते" असा कयास निघतो. उद्धृत तक्त्यात मात्र आरक्षित समाजांतील अनेक विद्यार्थी वरच्या क्रमांकांवर आहेत. "आरक्षितांमध्ये सुधारणा नाही असं म्हणायला वाव नाही" असा निष्कर्ष मी स्वतःच दिला आहे.
अपुरा कालखंड
मी कुठचाच deus ex machina आणत नाहीये. प्रत्येक गुणधर्माचे जिवाला फायदे असतात. त्यामुळे शक्तीवान हात व बुद्धीमान मेंदू या दोन गुणांमधल्या फायद्याचा फरक - यातून त्यातल्या एकाच्या निवडीची गती ठरते. मला दाखवून द्यायचं होतं की या बाबतीत निवडीचा प्रभार हा अत्यंत कमी आहे. त्यात वर्णशुद्धीचं गृहीतक, एकाच समाजातल्यांनी तोच व्यवसाय कायम करण्याचं गृहीतक, यांमुळे तो डिफरेन्शियल हा छोटा छोटा होत जातो. त्यामुळे काही शतकं हा पुरेसा कालावधी नाही.
मानवी समाजात अनेक उत्क्रांतीय खबदाडं आहेत. म्हणजे लोहाराला शक्ती व बुद्धी दोन्ही आवश्यक असतात. त्यामुळे शक्ती थोडी कमी असली, व बुद्धी अधिक असेल तर तो कमी संतती सोडेल हे पटण्यासारखं नाही. मुळात लोहार ही प्रजाती नव्हे, अनेक हरहुन्नरी लोहारपुत्र इतर उद्योग सुरू करू शकतात. ते आपली जात लोहारच लावतील, आणि त्याच समाजात लग्न करतील. पण लोहारकाम न करणारे लोहार जातीतले असणं सहज शक्य आहे.
कुवतीबद्दलच्या व्यापक युक्तिवादाला, व्यापक समाजाबद्दल विरोध नाही. ऑल मेन आर नॉट इक्वल हेही मान्य. माझा मुद्दा असा आहे की ऑलिंपिकमध्ये धावण्याच्या शर्यतीच्या बाबतीत जनुकीय मुद्दे निश्चितच महत्त्वाचे ठरतात. पण धावता येण्याची आवश्यकता सैनिकांनाही असते. तेवढं धावणं आत्मसात करण्यासाठी जनुकांकडे जवळपास दुर्लक्ष करून भागतं. अमुक ब्राह्मण असेल तर त्याला सैन्यात घ्यायचं नाही, अशा प्रकारचं धोरण चुकीचं व हास्यास्पद ठरेल. (तुम्ही तशा धोरणाची मागणी करत आहात असं म्हटलेलं नाही, पण रोख तसा वाटतो)
शैक्षणिक आरक्षणाबाबतीत माझ्या मते तरी १. दारीद्र्य, २. गेल्या काही पिढ्या अशिक्षित, ३. आसपासच्या वातावरणात शिक्षणाच्या संस्कारांचा अभाव, अशा निकषांवर ते आधारलेलं असलं पाहिजे. जात-जमात हे त्यांसाठी फर्स्ट अॅप्रॉक्झिमेशन होतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
ठीक
ज्यूंच्या बाबतीत काही शतकांमध्येच फरक पडल्याचे दावे आहेत.
नवी माहिती. पण जातिव्यवस्थेवरीहीक सर्वात मोठी टीका तर अशी आहे की त्यात जन्मानुसार व्यवसाय ठरतात. छोट्याछोट्या फरकांचे व्यवसायही वेगवेगळ्या जमाती करीत (आणि एकमेकांच्या मोनॉपोलीला जपत) असे रामचंद्र गुहा यांनी नोंदविले आहे असे स्मरते.
तसा रोख नाही. यशाचे प्रमाण वेगवेगळे सापडल्यास त्याचा अर्थ 'परिस्थितीजन्य उपेक्षा/अन्याय' असाच गृहितू नये इतकेच माझे सांगणे आहे.
जनुके जनुके आणि जनुके
जनुके म्हणजे मनुकांसारख्या इथेतिथे वाटता येणारा प्रकार काहो काका?
बायको एक बटक्या अनेक. बायकोबाबत जात पाळणे, बटक्यांबाबत सर्वधर्मसमभाव. यातून किती जनुके कुठून कुठे वाहत गेली त्याचा हिशेब केला काय हो कोणी?
-राजीव.
सहमत
+१
सहमत!
गुणोत्तर
त्या काळी सेक्स रेश्यो किती होता?
माझे वय २८ वर्षे आहे. त्यामुळे 'काका' हे संबोधन औपरोधिक ठरेल.
एक लोहारकी...
हा एकदम 'एक लोहारकी' घाव झाला.
हेच सोद्यांविषयीही लागू होतं. माझा मुद्दा हाच आहे. वर्ण/जाती शुद्ध नाहीत, व्यवसाय एकच मानला गेला असला तरी त्याबाबतही तीन पिढ्यांपलिकडे कोणाला फारशी माहिती नाही. कोणी लोहाराने आपल्या शक्तीच्या करामतीवर शेत विकत घेऊन पुढे सधन शेतकरी झाला ही शक्यता नाकारता येत नाही... तर कोणी लोहाराने धंदा चालत नाही म्हणून सैन्यात भरती होऊन दुसऱ्याच जातीच्या मुलीवर बलात्कार केलेला असणंही अशक्य नाही... मग असल्या जनुकं-व्यवसाय कोरिलेशनला किती भाव द्यायचा? बरं हे विश्वनाथन आनंदच्या दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याच्या शिक्षणाबाबत नाही, साधे रूटिन काम करणारे डॉक्टर, इंजिनियर तयार करण्यासाठी. त्यातही पंधरा वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर दूध आणि पाणी वेगळं होतंच की.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
नाही
सध्या स्त्री-पुरुष गुणोत्तर १.०६ आहे, पूर्वी त्यापेक्षा चांगले होते ना? वॉलरसच्या कळपात ९६% माद्या मोजक्याच नरांकडे असतात आणि बाकीचे कोरडेच राहतात. तसे काही भारतात असे काय?
पण "वर्ण/जाती अस्तित्वातच नाहीत" असे तर नाही ना?
जातिव्यवस्थेवरील एक महत्वाचा आरोप होता की असे ट्रॅक चेंज प्रतिबंधित होते.
ही संख्या मोजकीच होती हे तुम्हाला मान्य असेल असे गृहीत धरतो.
अशा बॉटलनेकमुळे म्यूटेशनसारखाच परिणाम होतो, म्यूटेशन न होताही नव्या जनुकांना चंचुप्रवेश मिळतो आणि 'चांगल्या' जनुकांना वाढण्याची संधी मिळते.
५०% जागा सोडलेल्या
खरे म्हणजे जे अनारक्षीत म्हणवतात त्यांच्यासाठी ५०% जागा सोडलेल्या (आरक्षीत) असतात. तुम्ही जो संदर्भ घेतला आहे, तो नक्की कोणत्या आरक्षीत गटाचा आहे?
विसंगत माहिती
"आरक्षित समाजांतील उमेदवार आणि अनारक्षित समाजांतील उमेदवार यांच्यासाठी मिळून ~५०% जागा 'खुल्या' असतात" हे मी खात्रीने सांगतो. उर्वरित ~५०% जागांवर (=१९+१३+७+८+३% असे विभाजन असते असे स्मरते) आरक्षित समाजांतील उमेदवारांचा हक्क असतो.
सगळेच आरक्षीत
"आरक्षित समाजांतील उमेदवार आणि अनारक्षित समाजांतील " असे काही असते हेच मला पटत नाही. सगळेच आरक्षीत नव्हेत काय?
नाही
५०% जागांना खुला प्रवर्ग म्हणतात.
शब्दप्रयोग व भावार्थ
तो शब्दप्रयोग व भावार्थ वेगवेगळे आहेत असे म्हणायला वाव आहे.
नाही
तुमची माहिती नक्कीच चुकीची आहे.
अधिपत्य
खुला प्रवर्ग म्हणजे काय? त्यावर कोणाचे अधिपत्य चालते?
उदाहरण
जर १०० जागा असतील तर पहिल्या ५० उमेदवारांना प्रवेश मिळतो. (त्यांची जात कोणतीही असू शकते.) त्यानंतर अनारक्षित समाजांतील उमेदवारांना प्रवेश मिळत नाही. त्यानंतर उर्वरित ५० उमेदवारांना प्रवेश मिळतो.
५०% चे आरक्षण
मग असे असेल तर - जे आरक्षीत गटातले ह्या गटात येऊन प्रवेश घेतात && जे आरक्षीत गटातील असुनही क्रीमी लेयर मुळे आरक्षीत जागा घेऊ शकत नाहीत
अशा मुलांमुळे ५०% चे जे आरक्षण आहे त्यावर गदा येते असे म्हणता येईल का?
समजले नाही
तुमचा प्रश्न कृपया अधिक स्पष्ट करून सांगा.
उरलेल्या ५०% जागांवरील हक्कांवर गदा
जे आरक्षीत गटात असलेल्या जाती-धर्माचे आहेत पण त्यांना आरक्षण मंजुर नसल्यामुळे ते "ओपन" मधे प्रवेश घेतात आणि जे आरक्षीत गटात आहेत पण क्रीमी लेयरच्या मर्यादेमुळे आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांमुळे ज्यांना उरलेल्या ५०% जागांवरील हक्कांवर गदा आल्यासारखे वाटते का?
का?
हे काय आहे?
त्यांना आरक्षित गटात समजूच नये!
त्या मार्गाने जात नाहीत
---आरक्षण मंजुर नसल्यामुळे
--हे काय आहे?
अरे, तुम्हाला माहीती नाही? बरेच लोक (आरक्षणाला पात्र असुनही) त्या मार्गाने जात नाहीत. कारणे काय असतील ती मला माहीती नाहीत.
नवी माहिती
माहितीबद्दल धन्यवाद. 'बरेच' या शब्दाच्या पुष्ट्यर्थ काही संदर्भ आहे काय?
"त्यांच्यामुळे अनारक्षित विद्यार्थ्यांच्या जागेवर गदा येते" हे मला मान्य आहे परंतु मी लेखात नमूद केले आहे की त्यात मला काही आक्षेपार्ह वाटत नाही.
२
मला २ असे लोक निश्चीतपणे माहीती आहेत. प्रत्येकाने आजुबाजुला पाहावे- दिसतील.
असा ठराविक क्रम नसतो
पहिल्या ५० उमेदवारात असूनही मागासवर्गीय उमेदवार, तुलनेने हुशार, खुला प्रवर्गातच प्रवेश घेतो असे नाही. आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तो आरक्षित जागांमधूनच प्रवेश मिळवत असतो.
उर्वरित ५० उमेदवारात (तुलनेने कमी हुशार) आरक्षित- अनारक्षित अश्या दोघी सामाजातील उमेदवार असू शकतात.
असतो
शासकीय शिक्षणसंस्थांच्या प्रवेशप्रक्रियेबद्दल मला खात्री आहे.
एकाचे दर्दभरे गाणे मी अनेकदा ऐकले आहे: वैद्यकीय प्रवेशपरीक्षेत दोन मित्रांचा लागोपाठ क्रम लागला. आधीच्या क्रमांकाचा मुलगा आरक्षित समाजाचा होता. आरक्षित समाजाच्या प्रवर्गातील सर्व जागा रिकाम्या ठेवून त्याने टो. ना. महाविद्यालयाची शेवटची खुली जागा 'बळकावली'. दुसर्या मुलाला ज. जी. सारख्या फालतू महाविद्यालयात जावे लागले म्हणून त्यांच्या मैत्रीत दरार आली =))
"आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी" म्हणजे काय? त्याला जागा मिळाल्याशी कारण! उलट, 'आपल्या लोकांसाठी' एक अतिरिक्त जागा 'बनविण्याची' इच्छा 'नैसर्गिक' नाही काय?
"आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी", म्हणजे
आरक्षणासोबत मिळणाऱ्या इतर सवलती. उदा. शिष्यवृत्ती, वसतिगृह व खानावळ यांच्या दरात मिळणाऱ्या सवलती. अनारक्षित जागेतून प्रवेश घेवून, भविष्यात मिळणाऱ्या सवलतींवर पाणी सोडण्याची इच्छा ही नक्किच नैसर्गिक नाही, असे वाटते.
'आपल्या लोकांसाठी' ? आपल्या लोकांची आपण काय व्याख्या करतात? अ. जा. किंवा अ.ज. हे वर्ग आहेत त्यात कित्येक जाती-पोटजातींचा समावेश होतो. मग त्यात आपले लोक कोणते?
तरिही आपल्या प्रश्नाला उत्तर द्यावेसे वाटते. अशी कसलिही नैसर्गिक इच्छा असेल असं वाटत नाही. वर सांगितल्याप्रमाणे, दुसऱ्याला अतिरिक्त जागा बनवण्यापेक्षा, स्वत:ला भविष्यात मिळणाऱ्या सवलती उमेदवराला जास्त महत्वाच्या वाटत असाव्यात असे वाटते. असो, तुम्ही दिलेल्या उदाहरणाप्रमाणे अपवाद असू शकतात.
वेगळी माहिती
अनारक्षित जागेतून प्रवेश घेणार्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह व खानावळ यांच्या दरात मिळणाऱ्या सवलती मिळत नाहीत याविषयी काही संदर्भ देऊ शकाल काय?
खुली जागा 'बळकावली'
---महाविद्यालयाची शेवटची खुली जागा 'बळकावली'. ---
हेच ते कारण, ज्याने मला वाटते की, प्रत्येक जण आरक्षीत असतो व् जो-तो आपपल्या गटाचे संरक्षण करत असतो.
चर्चा
आरक्षणाचे तत्व, आरक्षणाचे वास्तव व आरक्षणाचे राजकारण यावर भाष्य करणारे काही दुवे
जात-आरक्षण
आरक्षण
हा विषय नाजुक आहे.
रिकामटेकडा यांच्या या धाग्याला 'ब्राह्मणी कावा' असे विद्रोहीवाद्यांकडुन मतप्रदर्शन होउ शकते.
प्रकाश घाटपांडे
रोचक
रोचक माहिती आहे. पण जो निष्कर्ष काढायचा आहे त्यासाठी काही उपयोगाची नाही.
१ काही समाज दहावी बारावी सीईटी आदि परीक्षांमध्ये अधिक यशस्वी होताना दिसतात याची संभाव्य कारणे.
१अ- काही समाजात दहावी बारावी आदि परीक्षांमध्ये गुण मिळवण्यात अधिक यशस्वी होण्याची परंपरा असल्यासारखी दिसते. असे गुण मिळवता येणार्यांमध्ये खूप गुणवत्ता असते आणि ते मिळवता न येणार्यांमध्ये गुणवत्ता नसते असा समज पसरलेला आहे. असा समज पसरण्याचे कारण म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचे प्रवेश अप्टिट्यूड टेस्ट वगैरे न घेता * केवळ या (ठरीव साच्यात वर्षानुवर्षे घेतल्या जाणार्या) परीक्षांमध्ये (सरावाने) मिळवलेल्या गुणांवरून दिले जातात.
*टीप- सदर लेखातील अनुभव प्रांजळपणे लिहिणार्या व्यक्तीची खिल्ली उडवण्याचा मुळीच हेतू नाही
१ ब- काही समाजात दहावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास मिळतोच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या समाजाचा ऐतिहासिक आढावा घेतला तर फार जुन्या काळापासून अशी परिस्थिती नव्हती. खरेतर सर्वांना फर्स्टक्लास ही स्थिती नवीन १०-२-३ सिस्टिम आल्यानंतर झाली आहे. त्या आधीच्या सिस्टिममध्ये सर्वजण पास होतात एवढीच प्रगती होती. ही 'सर्वजण पास' ही स्थिती सुद्धा स्वातंत्र्यानंतर विद्यापीठाची परीक्षा बंद होऊन एस् एस् सी बोर्ड सुरू झाल्या नंतरची म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धत 'या समाजाभिमुख' झाल्या नंतरची आहे. त्या आधी मोठ्या प्रमाणावर या समाजातले विद्यार्थी सुद्धा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास होत असत. माझ्या आधीच्या पिढीच्या नातेवाईकांमध्ये मॅट्रिक पास होऊ न शकलेले अनेक नातेवाईक होते. तेव्हा ही जी काही प्रगती दिसते आहे ती स्वातंत्र्यानंतर शिक्षणव्यवहाराची सूत्रे बाय डिफॉल्ट हाती आल्यावर शिक्षण-परीक्षापद्धतीला वाकवून-त्या समाजाच्या परंपरेला साजेशी पाठांतरप्रधान करून- झालेली आहे.
जनुकीय बदल बहुधा इतक्या कमी काळात होत नसावेत.
२ इंजिनिअरिंग मेडिकल आदि कोर्सेस मध्ये जाण्याची अपेक्षा असण्याची सामाजिक कारणे.
२अ-रिकामटेकडा यांनी मांडलेल्या थिअरीप्रमाणे पिढ्यानपिढ्या सुतारकी करणार्या सुताराच्या समाजात असे जनुकीय बदल झाले असतील की त्याने केलेले सुतारकाम कोणा दुसर्याला जमणारच नाही. या जनुकीय थिअरीनुसार कोणत्याही ब्राह्मणात इंजिनिअर होण्याची कुवत असूच नये. कारण इंजिनिअरिंग हे मुळातच शूद्रांच्या- लोहार, कासार, सुतार, गवंडी- व्यवसायावर आधारलेले आहे. आणि ती जनुके पिढ्यानपिढ्या श्लोक आणि मंत्रपठण करनार्या ब्राह्मणांमधून लुप्त झाली असणार. पण तसे तर दिसत नाही.
(रिकामटेकडा यांची थिअरी बरोबर असू शकेल. पाठांतराची जनुके ब्राह्मणांच्यात भरपूर स्ट्राँग असावीत. म्हणून पाठांतरप्रधान परीक्षांमध्ये त्यांना अधिक यश मिळत असावे).
२ब- वरील थिअरी प्रमाणे सुतारकाम सुताराची जनुके असलेल्यानेच करावे असे म्हणायला हरकत नाही. (त्यानुसार जनुकतपासणी करून इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याची पद्धत विकसित करावी). पण प्रश्न सामाजिक प्रतिष्ठेचाही येतो. सुताराला सुतार म्हणून मिळणारी प्रतिष्ठा इंजिनिअरइतकीच असेल तर प्रश्न उद्भवणार नाही. तसे होत नसल्यानेच इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जाण्याची चढाओढ 'वाइल्डलाईफ फोटोग्राफीत प्रवीण असलेल्याची' सुद्धा होते.
अनेक कलाक्षेत्रांत प्रवीण होऊन पैसा व प्रतिष्ठा मिळणे शक्य असते. पण त्या क्षेत्रांतली प्रतिष्ठा आणि पैसा टॉपच्या काहींनाच मिळते. इतरांच्या आयुष्यात बराच अंधार असतो. तसे या क्षेत्रांत अगदी कारकुनीतही नसते. देशातल्या पन्नासाव्या क्रमांकावर असलेल्या एखाद्या खेळाडूला देशात क्रम लावल्यास दहाहजाराव्या क्रमांकावर बसेल अशा डॉक्टर/इंजिनिअर् इतका पैसा मिळत नाही.
३ या अनुषंगाने आरक्षणाची आवश्यकता/अपरिहार्यता
शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत स्वातंत्र्योत्तर काळात जे आरक्षण आले त्याचे एक कारण "त्यांच्यात कुवत नाही पण आपण त्यांना संधी द्यायला हवी" असे नव्हते. ऐतिहासिक काळात (आजपर्यंत) त्यांना शिक्षण आणि वरचे समजले जाणारे व्यवसाय यांपासून वंचित केले गेले. त्याचे कॉम्पेन्सेशन काही प्रमाणात केले जावे. ज्याला आपणच लंगडा केले आहे त्याला धडधाकटांच्या शर्यतीत धावण्याची सक्ती न करता त्याच्यासाठी शर्यतिचे नियम शिथिल करावे अशी भूमिका होती.
त्याचबरोबर आंबेडकर वगैरे उच्चशिक्षित असलेल्या मागासवर्गीयांनाही समाजात वावरताना जे अनुभव येत होते त्यामुळे कुवत असूनही पूर्वग्रहांमुळे डावलले जाण्याची शक्यता स्पष्ट दिसत होती. त्यामुळे नोकर्यांमध्ये आरक्षण ठेवण्याची गरज निर्माण झाली. आजही गैरसरकारी आस्थापनांमध्ये मागासवर्गीयांना नोकरीवर ठेवण्याचे टाळण्याची प्रवृत्ती सर्रास दिसते.
------------------------------------------------------------------
आता थोडे लॅटरल थिंकिंग
या लेखात "कुवत नसताना आरक्षणाच्या सहाय्याने" डॉक्टर / इंजिनिअर होण्यावरच आक्षेप घेतलेला आहे. "कुवत नसताना पैशाच्या सहाय्याने" डॉक्टर/इंजिनिअर होण्यास आक्षेप दिसला नाही. किंवा त्यामुळे रुग्णावर अन्याय होतो असे प्रतिपादन दिसले नाही.
त्याअर्थी सगळा प्रश्न सरकारी कॉलेजातील सबसिडाईज्ड शिक्षणाचाच असावा. मग असाही विचार करायला हवा. माझे आजोबा सबसिडाइज्ड शिक्षण घेऊन डॉक्टर झाले, माझे वडील अणि मी सुद्धा सबसिडाइज्ड शिक्षण घेऊन इंजिनिअर झालो. तेव्हा आमच्या तीन पिढ्यांनी सबसिडाइज्ड शिक्षनाचा लाभ उठवला आहे. म्हणून माझ्या मुलीला क्रीमी लेयर समजून सबसिडाइज्ड शिक्षण नाकारायला हवे. तिला ६० % मार्क मिळोत की ११०%; तिला सबसिडाइज्ड शिक्षण घेण्याचा हक्क नाही. तिला सरकारी कॉलेजात प्रवेश देता कामा नये.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
अंशतः सहमत
निवड परीक्षा सदोष आहेत ही शक्यता मला मान्य आहे.
बाय डीफॉल्ट असे का म्हणता? मुळात, ब्राह्मणांच्या हातात सूत्रे आहेत या दाव्याला तरी काही आधार आहे काय? सध्या शिक्षणाची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत त्यांनी काय दिवे लावले? पाठांतराची जनुके वाढू शकतात तर बुद्धिमत्तेच्या इतर पैलूंची जनुके का नाही?
विद्वानांनी हाती काम न केल्यामुळे भारताची मध्ययुगीन अधोगती झाली हा दावा मला मान्य आहे. परंतु बलुतेदार डोक्याने काम करीत हा दावाही खरा वाटत नाही. काहीही रीसर्च न करता पिढ्यान्पिढ्या तीचतीच उत्पादने होत नसत काय? लिखित ज्ञानाशिवाय संशोधनावर खूपच मर्यादा येतात.
प्रत्येक समाजात सर्वच कौशल्ये कमी-अधिक प्रमाणात असतात. (डोंबार्यांच्या अंतःकर्णाचे, छोट्या मेंदूचे आणि स्नायूंचे तपास केले गेले पाहिजेत.) मानवाचे स्पीशीएशन झाल्याचा दावा मी केलेला नाही, वंश हा फरक सबस्पीशीजपेक्षाही छोटा आहे. 'जात हा फरक असूच शकत नाही' असा अभिनिवेश ठेवावा काय?
आर्थिक सुबत्तेची सर्वात चांगली संधी म्हणून या व्यवसायांना महत्व आहे हा दावा मान्य आहे पण संदर्भ समजला नाही.
ती रॅशनल होती असा दावा आहे काय? 'आपणच' म्हणजे काय? विहार बदलून मंदिरे, मंदिरे/चर्च बदलून मशिदी बनविल्या गेल्या ते सगळे 'अनडू' करावे काय? (५० प्रतिसादांची सोय ;) )
जुगार प्रकारच्या घोड्यांच्या शर्यतीत स्वाराचे वजन कमी असेल तर घोड्याला अधिक वेगात धावता येते. तसे होऊ नये म्हणून घोड्याच्या पाठीवर हँडिकॅप नावाचे वजन ठेवण्यात येते. एफ १ प्रकारच्या शर्यतीत वाहनांच्या वेगांवर मर्यादा लादण्यात येतात. हे सारे योग्य आहे काय? सायक्लॉप्स राक्षस उंच लोकांचे पाय कापायचा त्या कथेची आठवण होते. त्याउलट, पॅराऑलिंपिक वेगळे का ठेवले जाते?
सन्माननीय आयुष्य जगण्यासाठी किमान पात्रतेपर्यंत मदत देणेच योग्य वाटते. (ही किमान पात्रता संसाधनांनुसार ठरते.)
मान्य. या प्रकाराचा समावेश 'परिस्थितीमुळे कुवत (तात्पुरती) कमी होणे (=प्रतिपादिली जाणे)' या प्रकारात करता येईल.
मान्य आहे.
हा तपशीलाचा मुद्दा आहे. हा नियम संसाधनांवर अवलंबून राहील. सर्वांना समान नियम असल्यास तत्त्वतः मान्य. 'प्रवेशच नाही' पेक्षा 'अधिक शुल्क' हा नियम योग्य वाटतो.
उत्तरे
>>निवड परीक्षा सदोष आहेत ही शक्यता मला मान्य आहे.
मग कुवत नसते हा निष्कर्ष कसा काढला?
>>बाय डीफॉल्ट असे का म्हणता?
इंग्रज गेल्यावर त्यावेळी जे शिक्षण क्षेत्रात होते त्यांच्या हाती बाय डिफॉल्ट सूत्रे आली. यात संशय कोणता आहे?
>>विद्वानांनी हाती काम न केल्यामुळे भारताची मध्ययुगीन अधोगती झाली हा दावा मला मान्य आहे. परंतु बलुतेदार डोक्याने काम करीत हा दावाही खरा वाटत नाही. काहीही रीसर्च न करता पिढ्यान्पिढ्या तीचतीच उत्पादने होत नसत काय?
मग जनुकीय वैशिष्ट्यांचा दावा करायला आधार काय आहे? तथाकथित पिढिजात कामे हा प्रकार ५००० वर्षांपेक्षा जुना नसावा. एवढा काल जनुकीय वैशिष्ट्ये निर्माण व्हायला पुरेसा नसावा असे माझे मत आहे. काही कौशल्ये सवयीने चांगली जमतात हे खरे पण त्यात जनुकीय वैशिष्ट्य काही नसते. ऍबिलिटीत फरक असतो हे खरे पण त्यात जातीविषयक वैशिष्ट्य नसते असे वाटते. बालपणापासून तिखटजाळ जेवणार्यांना त्याची
सवय होते पण त्यांचे मूल जन्मतः तिखट सहन करण्याची शक्ती घेऊन येत नाही.
>>ती रॅशनल होती असा दावा आहे काय? 'आपणच' म्हणजे काय?
अशीच रॅशनल आरक्षण देण्याच्या मागे होती. ' आपणच' या शब्दात ब्राह्मण फक्त नसून सर्व उच्चवर्गीय आहेत. म्हणूनच उच्चवर्गीयांपैकी शिक्षणात पुढे नसलेल्यांनीही स्वतःला आरक्षण घेतले नाही.
>>या प्रकाराचा (शिक्षित आंबेडकरांचा अनुभव) समावेश 'परिस्थितीमुळे कुवत (तात्पुरती) कमी होणे (=प्रतिपादिली जाणे)' या प्रकारात करता येईल.
नाही. कुवत तात्पुरती कमी किंवा तसे प्रतिपादन वगैरे नसून कुवत उच्च असली (आणि ती सिद्ध केली असली) तरी त्याला कमी लेखण्याचे (कुवतीपेक्षा जात महत्त्वाची असल्याचे दाखवण्याचे) उदाहरण आहे.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)