प्लॅसिबो

रुग्ण-उपचारक नाते दृढ करून रुग्णाचा विश्वास वाढविणे हा प्लॅसिबो या उपचारप्रकाराचा उद्देश असतो. 'प्लॅसिबो' या शब्दाचा अर्थ, 'माझ्यामुळे बरे वाटते' असा आहे. आंतरिक स्वतोमूल्य नसलेल्या पदार्थ, कृती-उपचार (प्रोसीजर) किंवा शस्त्रक्रियांमुळे जर रुग्णाला "माझ्या तक्रारींकडे लक्ष देण्यात आले असून उपचार होत आहेत" असे वाटले तर त्याच्या रोगलक्षणांमध्ये सुधार पडतो. अशा उपचारांना प्लॅसिबो म्हणतात.
आदरणीय व्यक्तिमत्वाच्या विश्वासार्ह व्यक्तीने, किंवा पांढर्‍याशुभ्र कपड्यांतील, काचेच्या आणि चकचकित फरशांच्या इमारतीतील, वातानुकूलित खोलीतील व्यक्तीने उपचार केल्यास प्लॅसिबो परिणाम अधिक होऊ शकतो. कोणता रुग्ण नेमक्या कोणत्या व्यक्तीमुळे आणि कोणत्या प्रकारच्या उपचारांमुळे अधिक प्रभावित होईल ते सांगता येणार नाही. ते रुग्णाच्या मानसिकतेवर अवलंबून राहील. साधारणतः, असामान्य अनुभवाचा प्रभाव अधिक असतो (देवाकडे राजा मागणार्‍या बेडकांची एक कथा इसापनीतीत आहे). लघवी रंगीत करणारे ब२ जीवनसत्व, शरीर गरम करणारे कॅल्शियमचे इंजेक्शन, विरेचके, वमनके, अशी औषधे पूर्वी वापरली जात.
प्लॅसिबो परिणाम घडण्याचा एक मार्ग म्हणजे चांगल्या मनःस्थितीमुळे मेंदूत स्त्रवणारी अफूसारखी रसायने होत. या रसायनांचा प्रभाव बंद पाडणारे औषधे दिली तर प्लॅसिबो परिणामही बंद पडतो. या रसायनांमुळे रोगांवर काही थेट परिणाम होत नाही पण रुग्णाला 'बरे' वाटते.

"प्लॅसिबो परिणामांमुळे का होईना पण जर रोग्याला बरे वाटणार असेल तर प्लॅसिबो ठरलेले उपचार वापरण्यात अडचण आहे?" असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प्लॅसिबो उपचारांमध्ये मला सहा अडचणी सापडतात.

  1. प्लॅसिबोने आजार कायमचे बरे होत नाहीत. रोगाच्या मूळ कारणावर परिणाम होत नाही पण ताप, वेदनाशमन, दमा, पोटदुखी, रक्तदाब, इ. रोगलक्षणांवर थोडा परिणाम होऊन रुग्णाला तात्पुरता आराम मिळतो. कोणत्या रुग्णाला किती आराम मिळेल याची खात्री देता येत नाही. भोळसर रुग्णाला अधिक फायदा होऊ शकतो.
  2. "मी प्लॅसिबो उपचार घेणार आहे" हे वाक्य निरर्थक आहे. उपचार हे प्लॅसिबो असल्याचे रुग्णाला समजले की प्लॅसिबो परिणाम पूर्णपणे थांबतो. त्यामुळे, "मला माहिती आहे की दगडाची पूजा केली तरी दगड काही करत नाही. मलाच प्लॅसिबो परिणामामुळे मानसिक बळ मिळते." हे वाक्य चूक आहे. अर्थात, त्या मूर्तीमध्ये आंतरिक स्वतोमूल्य असू शकते आणि तिचा फायदा होऊ शकतो हे मान्यच आहे. "आंतरिक स्वतोमूल्य म्हणजे 'पेशवेकालीन तांडव गणपती' सारखा काही जादूटोणा अपेक्षित नाही पण त्या मूर्तीचा चेहरा, ढब, यांकडे बघून आश्वस्त वाटू शकते. चित्रपटातील थरारक दृष्ये खोटी असल्याचे माहिती असले तरी ती दृष्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवू शकतात. कलाकारांच्या भावना खोट्या असल्या तरी त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खर्‍या भावना उद्युक्त होऊ शकतात. पण असे घडण्याचे कारण असे की त्या स्थूल (टँजिबल) निरीक्षणामुळे प्रेक्षकांच्या मेंदूत विशिष्ट आठवणी/कोरिलेशन घडू शकतात. परंतु अशा घटनेला प्लॅसिबो परिणाम म्हणू नये कारण त्या वस्तूमध्ये एक व्यक्तिसापेक्ष स्वतोमूल्य असल्यामुळे तिचा मेंदूवर परिणाम घडलेला असतो. इतर एखाद्या व्यक्तीने मूर्ती बघून तिला काहीही फायदा न होणे शक्य आहे. कुबडीचे रूपक येथे योग्य ठरेल असे वाटते.
  3. प्लॅसिबो उपचार केवळ फसवूनच देता येतात. न्यायवैद्यकीय नियमांनुसार, कोणताही उपचार रुग्णाला आधी समजावून सांगावा लागतो. उपचाराचे धोके रुग्णाला मान्य असल्याची अनुमती घेऊनच उपचार करावे लागतात. विमा आणि मेडिक्लेमच्या युगात तर बिल बघूनच रुग्णाला उपचारांचा प्लॅसिबोपणा समजेल. एखाद्याचे भले करण्यासाठी का होईना, पण फसवणूक करणे अनैतिक आहे. त्यात एक उच्च-नीच भाव दडलेला आहे. मानसोपचाराच्या आमच्या पाठ्यपुस्तकात दिले होते की पौर्वात्य समाजांत वैद्य-रुग्ण नाते हे गुरू-चेला असे असमानतेचे होते. वैद्यावर विश्वास टाकून रुग्णाने निमूट उपचार स्वीकारणे अपेक्षित होते.
  4. डोक्याला मार लागलेल्या रुग्णाला झोपेच्या गोळ्या देऊ नयेत, रोगनिदान झाल्याशिवाय पोटदुखी थांबवू नये, असे वैद्यकीय शिक्षणात शिकविले जाते. त्यामागचा उद्देश असा असतो की लक्षणे दडली तर रोगाची तीव्रता वाढल्यास समजणार नाही. असा गाफीलपणा (फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी) प्लॅसिबोनेही येऊ शकतो कारण प्लॅसिबो परिणाम रुग्णाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतो. प्लॅसिबो परिणामाने रोगलक्षणांचे कितपत शमन होईल याचा अंदाज येणार नाही. 'रोगाची तीव्रता घटल्यामुळे लक्षणे कमी झाली' आणि 'प्लॅसिबो परिणामामुळे लक्षणे कमी झाली', यांपैकी योग्य निष्कर्ष शोधणे डॉक्टरांना त्रास झाल्यास पुढील उपचारांची दिशा ठरविण्यात अडचण होऊ शकते.
  5. प्लॅसिबो परिणाम बेभरवशाचा आहे. ख्रिश्चनधर्मीय टेंपलटन प्रतिष्ठानने एक शास्त्रीय प्रयोग केला. त्यात काही हृद्रोग्यांसमोर धर्मगुरूंनी करुणा भाकली. प्रयोगांति असे दिसले की इतर हृद्रोग्यांपेक्षा अशा हृद्रोग्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये अधिक गुंतागुंती झाल्या. संशयवादी मायकेल शर्मर यांनी असे भाष्य केले की "माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची वेळ आली म्हणजे मी मरणार" या विचारांनी रुग्णांवर नोसिबो परिणाम (प्लॅसिबो परिणामाची उलट दिशा) झाला.
  6. सर्व आधुनिक औषधांची उपयुक्तता डबल ब्लाइंड पद्धतीने तपासली जाते. काही रुग्णांना प्लॅसिबो दिले जाते तर काहींना वास्तव औषध. कोणत्या रुग्णाला प्लॅसिबो दिले आणि कोणत्या रुग्णाला वास्तव औषध ते रुग्णांना तर माहिती नसतेच, पण त्यांची प्रगती मोजणार्‍या डॉक्टरांनाही सांगितले जात नाही. (रुग्णाला औषध दिले आहे की प्लॅसिबो ते डॉक्टरांना समजले तर त्यांची निरीक्षणे चुकू शकतात.) अशा प्रकारे चाचणी घेतल्यावर जर वास्तव औषध दिलेल्या रुग्णांना प्लॅसिबो दिलेल्या रुग्णांपेक्षा अधिक फायदा झाल्याचे सिद्ध झाले, आणि हा अतिरिक्त फायदा जर [वास्तव उपचारांसाठी आलेला खर्च - प्लॅसिबो उपचारांसाठी आलेला खर्च] या आकड्यापेक्षा अधिक असेल तरच त्या औषधाला बाजारात उतरविले जाते. खर्‍या औषधाचा परिणाम प्लॅसिबोपेक्षा खूपच अधिक असतो. तुसड्या डॉक्टरने जरी ते औषध दिले तरी प्रेमळ डॉक्टरच्या प्लॅसिबोपेक्षा रुग्णाला अधिक फायदा होईल. डॉक्टरने नीट वागावे ही अपेक्षा योग्य असली तरी त्यातून प्लॅसिबोचे समर्थन होत नाही. प्रेमळ डॉक्टरने खरे औषध दिले तर सर्वाधिक फायदा होईलच.

प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या 'होमिओपॆथी एक थोतांड' या धाग्यात प्लॅसिबोविषयी काही मते व्यक्त केली गेली होती तसेच प्लॅसिबोविषयक काही दुवेही देण्यात आले होते. तेथे अवांतर चर्चा करण्याऐवजी वेगळा धागा काढला आहे.

Comments

बरे झाले

बरे झाले, की एक स्वतंत्र धागा सुरू करून प्लॅसिबोची माहिती सांगितली. प्लॅसिबोची सविस्तर माहिती सांगण्यासाठी धन्यु.
||वाछितो विजयी होईबा||

असेच

खूप ठिकाणी 'प्लॅसिबो' हा शब्द वाचण्यात येत होता, पण अर्थ काही कळत नव्हता.
आता आलं लक्षात! धन्यवाद.

मोगॅंबो व प्लासिबो

मला इतके दिवस मोगॅंबो फक्त (मिस्टर. इंडिया नावाच्या एका चित्रपटामुळे) माहिती होता. त्याचा हा जोडीदार बराच रोचक दिसतो आहे.
चन्द्रशेखर

प्लासिबो

स्वतंत्र चर्चा चालु केली हे बरे झाले.
आमचे फ्यामिली डॉक्टर सांगायचे की कित्येकजणांना फारसे कहि झालेले नसते. त्यांना चार पेपरमिंटच्या गोळ्या देखील डॉक्टरांनी दिल्या तर बरे वाटु लागते. मात्र त्या ऐवजी एखाद्या डॉक्टरने तुम्हाला काहिहि झालेले नाहि हे सत्य (न्यायवैद्यकानूसार) रुग्णाला सांगितले तर तो "आता मी संगतोय मला काहितरी होतंय तर हा डॉक्टर नाहि होत कसं म्हणतो? याला काहिच येत नाहि बहुतेक" असा समज करून घेतो.

इतकेच काय आमच्या फ्यामिली डॉक्टरांनी प्रॅक्टीस बंद केल्यावर गेले ४ वर्षे आमच्याघरी मंडळी आजारी पडायला घाबरून व्यायाम/आहारावर नियंत्रण वगैरे ठेऊ लागली आहेत ;)
नेहमी ऐकु येणारा संवाद "अरे, आता आजारी पडल्यास नवा डॉक्टर शोधावा लागेल व हल्लीच्या किंवा इतर डॉक्टरांना क्काही क्काही कळत नाहि, नुसते चाचण्यांवर चाचण्या करतात. आपले डॉ. क्ष कसे नुसता स्टेथस्कोप लावला न लावला बरोब्बर औषध द्यायचे. हातालाच गुण होता त्यांच्या. शिवाय जर फारच सिरीयस असले तर लगेच ओळखून योग्य डॉक्टर सुचवायचे"

यामुळे हल्लीचे (तरुण) डॉक्टर फार टेस्टस् करतात त्यामुळे आधीच्या डॉक्टरांनी निर्माण केलेला -प्रसंगी प्लासिबो - विश्वास ते मिळवू शकत नाहित का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शक्य

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य/आधुनिक विचारांतील फरकामुळे हे घडते आहे ;)

मान्य

वरील व्याख्या मान्य आहेत. पण प्लासिबो अजूनही पूर्णपणे समजलेला नाही असे वाटते. परत तोच दुवा देत आहे.

दुवा

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हम्म

दुवा बहुधा कुणी वाचलेला नाही किंवा इतका फालतू आहे की वाचायची गरज नाही. असो.
माझ्या मते प्लासिबोवर इतके संशोधन चालू असताना त्यावर ठाम मत देणे योग्य नाही. जर प्लासिबो इफेक्ट ठिकाण, कल्चर, संस्कृती यासारख्या गोष्टींवर अवलंबून असेल तर एकूणातच मामला गंभीर वाटतो आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

शंका

एकदाचा वाचून झाला. कंटाळवाणा होता. फार काही महत्वाची नवी माहिती नाही. (तुटलेला हात प्लॅसिबो परिणामाने परत उगवत नाही पण) मानसिक रोगांमध्ये प्लॅसिबो परिणाम अधिक भूमिका बजावेल हे अपेक्षितच आहे. पूर्वीपेक्षा प्लॅसिबो परिणाम वाढला कारण आऊटसोर्सिंगमुळे चाचण्यांचा दर्जा घटला (सौम्य रोग असलेल्यांना चाचणीत घेणे, रोगाची व्याख्या न पाळणे, इ.) असे दिले आहे. त्याशिवाय, प्लॅसिबो परिणाम होण्याचे अनेक मार्ग आणि ते टाळण्याच्या कॢप्त्या दिल्या आहेत. तुम्ही कोणत्या विशिष्ट दाव्यासाठी हा लेख उल्लेखिला होता काय?

Part of the problem was that response to placebo was considered a psychological trait related to neurosis and gullibility rather than a physiological phenomenon that could be scrutinized in the lab and manipulated for therapeutic benefit. But then Benedetti came across a study, done years earlier, that suggested the placebo effect had a neurological foundation.

भोळसटपणा मेंदूत असतो हा नवा शोध आहे काय?क्ष्

माझा तरी

तुटलेला हात प्लॅसिबो परिणामाने परत उगवत नाही पण
माझा तरी झाला बॉ. अल्युपथीवाल्याने ग्राफ्टींग करायला सांगितले होते. साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्या आणि हाडे जुळून आली. :)

तुम्ही कोणत्या विशिष्ट दाव्यासाठी हा लेख उल्लेखिला होता काय?
विशिष्ट दाव्यासाठी नाही मला सगळा लेख रोचक वाटला. जर प्लासिबो इतका सरळ साधा आहे तर Merck, Lilly, Pfizer, AstraZeneca, GlaxoSmithKline, Sanofi-Aventis, Johnson & Johnson, या सर्व कंपन्या त्याच्या संशोधनाला पैस का पुरवत आहेत असाही प्रश्न पडला.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

तसे नव्हे

तुटलेला हात प्लॅसिबो परिणामाने परत उगवत नाही पण

माझा तरी झाला बॉ. अल्युपथीवाल्याने ग्राफ्टींग करायला सांगितले होते. साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्या आणि हाडे जुळून आली. :)

हात उगवणे हे येथे दिलेल्या अर्थाने अपेक्षित होते.

विशिष्ट दाव्यासाठी नाही मला सगळा लेख रोचक वाटला. जर प्लासिबो इतका सरळ साधा आहे तर Merck, Lilly, Pfizer, AstraZeneca, GlaxoSmithKline, Sanofi-Aventis, Johnson & Johnson, या सर्व कंपन्या त्याच्या संशोधनाला पैस का पुरवत आहेत असाही प्रश्न पडला.

प्रादेशिक फरकांमुळे प्लॅसिबो परिणाम बदलतो असे सिद्ध झाल्यामुळे आऊटसोर्सिंग केलेल्या चाचण्यांच्या आधारे अमेरिकेत मान्यता मिळणार नाही अशी त्यांची भीती आहे. केवळ "प्लॅसिबोपेक्षा अधिक चांगले" या खात्रीवर विसंबून राहण्यापेक्षा चाचणीत प्लॅसिबो परिणाम होऊच नये अशी त्यांची इच्छा आहे. त्या लेखात दिलेले नॅलॉक्सोन हे प्लॅसिबोविरोधी औषध जुनेच आहे. मी वर मूळ लेखात अफूविरोधी औषध म्हणून तेच सूचित केले होते.

हात उगवला??

माझ्या माहिती प्रमाणे तुमचा हात तुटलेला नव्हता, हाड मोडले होते. जे जुळून येण्यासाठी तसेही कसल्याच औषधाची गरज नसते. हाडे जुळून येणे ही एक संपूर्ण नैसर्गिक प्रक्रिया आहे. औषधे दिली जातात ती फक्त वेदना कमी करायला.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

मग

जे जुळून येण्यासाठी तसेही कसल्याच औषधाची गरज नसते. हाडे जुळून येणे ही एक संपूर्ण नैसर्गिक प्रक्रिया आहे.
मग मला ग्राफ्टींगचा सल्ला का देण्यात आला? एक्सरे घेतल्यावर हाडांमध्ये फट दिसत होती आणि ती भरून येणार नाही असे डॉक्टरांचे मत होते. अर्थात तुम्हीही त्यावेळी तिथे असाल बहुधा त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती असण्याची शक्यता आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

तज्ञ

मी तुमचा एक्स रे पाहिलेला नाही तसेच मी काही कोणी अस्थीशल्य विषारदही नाही. त्यामूळे तुम्हाला ग्राफ्टींगचा सल्ला का देण्यात आला हे नेमके सांगू शकत नाही. माझ्या अंदाजा प्रमाणे फट लवकर भरून येण्यास डॉक्टरांना ग्राफ्टींगची गरज वाटली असावी. ग्राफ्टिंग केले नाही तरीही नैसर्गिकरीत्या हाडे जुळून आली असतीच.

ग्राफ्टींग विषयी खालिल माहिती वाचा:

Bone grafting is possible because bone tissue, unlike most other tissues, has the ability to regenerate completely if provided the space into which to grow. As native bone grows, it will generally replace the graft material completely, resulting in a fully integrated region of new bone.

तरीही मी ह्यातला तज्ञ नाही. तेव्हा नेमकी केस काय होती हे तुम्ही तज्ञांना (सेकंड ओपिनिअन) एक्सरे दाखवून विचारायला हवे. पण साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्याने हाडे जुळली हे मात्र हास्यास्पदच आहे एवढे सांगू शकतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdooक्ष्

सहमत

ग्राफ्टचा पदार्थ स्पंजप्रमाणे असून तो हाडाच्या पेशींना उभे राहण्याची जागा (मेट्रिक्स) देतो. अशा छोट्या छोट्या पोकळ्यांना वरील उदाहरणात स्पेस असे संबोधिले असावे. आरागॉर्न यांच्या हाडातील गॅप बरीच मोठी असण्याची शक्यता आहे. तेथे व्रण प्रकारची 'डीफॉल्ट' जोडक ऊति (कनेक्टिव टिश्यू) जमली असेल.

"when you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth" हे होम्सचे विधान प्रसिद्ध आहे पण डॉक्टरांपैकी काहीजण लबाड असल्याची उदाहरणे आहेत (!=eliminated the impossible), होमिओपॅथीचा उपयोग झाल्याची उदाहरणे नाहीत. मायकेल शर्मर म्हणतो तसे "before you say that something is out of this world, let's first make sure that it is not in this world".क्ष्

निदान

नेमके काय झाले होते याचे रिमोट डायग्नोसिस झाल्यावर मलाही कळवा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdooक्ष्

अरेरे

मी तुमचा एक्स रे पाहिलेला नाही तसेच मी काही कोणी अस्थीशल्य विषारदही नाही.
ग्राफ्टिंग केले नाही तरीही नैसर्गिकरीत्या हाडे जुळून आली असतीच.

मी खरे तर तुमचाच सल्ला घ्यायला हवा होता. पुढच्या वेळी नक्की तुमच्याकडेच येईन.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

चर्चा

बरीच गमतीदार चर्चा सुरु आहे. (गमतीदार इतरांसाठी, आरागॉर्न यांच्या साठी नाही)
यावर मला एक आठवण आली. (गोष्ट पूर्ण खरी आहे. आठवणीत चुका होऊ शकतील.)

कल्की महाराज नावाचे एक तामिळनाडूतील तेलुगु बाबा सध्या सत्यसाईबाबा एवढे प्रसिद्धीत आहेत. (आमचे एक मित्र विश्वनाथ स्वामी यांनी त्यांच्याविरुद्ध मोठी आघाडी उघडली आहे.) आमच्या ऑफिसमधला एक जण त्याच्या काही समस्यांमुळे या बाबाच्या दर्शनाला जाणार होता. त्याला परावृत्त करण्यासाठी (या बाबांचे दर्शन घेण्याचे मोठे तिकीट असते.) मी काही प्रयत्न केले. एक बाई या कल्की महाराजांची भक्त. तिचा हा दावा होता की अम्मामहाराज (कल्कीमहाराजांची बायको) तिच्या स्वप्नात आल्या आणि त्यांनी तिला लोकांना बरे करण्याची शक्ति मिळाली. या बाईंच्या घरी कल्की महाराजांच्या लाकडी पादुका होत्या. (ज्या त्यांच्या आश्रमात हजार रुपयांच्या आसपास विकत मिळतात.) या पादुकांवर हात ठेवला की जर इच्छा पूर्ण होणार असेल तर त्या हलतात. असा एक चमत्कार मुलुंडच्या एका भागात प्रसिद्ध होता.

माझा सहकारी या हलणार्‍या पादुकांवर लुब्ध होता. त्याने हा चमत्कार पाहण्यासाठी मला बोलावले. (हा चमत्कार फारसा दर्जेदार नव्हता. त्यामुळे मला त्यात खूप रस वाटला नाही.) मी येणार याची कल्पना कल्कीमहाराजांच्या भक्त बाईंना त्याने दिली होती. मी येणार म्हणून या बाईंनी चांगली तयारी केली होती. पादुकांसोबत त्यांनी इतर दोघाचौघांना बोलावले होते. हे दोघे चौघे त्यांच्या कृपाप्रसादाने भारावलेले होते. त्यातील एका बाईचा लहान मुलगा कुठल्यातरी गंभीर आजाराने ग्रासला होता. त्याला महाराजांचा कृपाप्रसाद लाभल्याने तो सुखावला होता.

एक इंजिनियर झालेला मुलगा, त्याची आई व मामा असे आले होते. (यांची गोष्ट थोडीफार आपल्या चर्चेला जुळती आहे म्हणून आठवण.) भक्त (पॉवर मिळालेल्या) बाईंनी आल्या आल्या सांगितले की हा मुलगा जो दारातून आपला आपला चालत येत आहे तो माझ्या (गुरु) मुळे. मी याला माझ्या हाताने (रेकीसारखा एक विधी) बरे केले. नाहीतर तो जन्माचा अपंग राहिला असता. त्या मुलाने, आईने या गोष्टीला दुजोरा दिला. नंतर कळले की तो कुठल्याशा अपघातात हाडाचे काही वाईट करून आला होता. डॉक्टरांनी त्याला असाध्य रोग असे सांगितले होते. या बाईंच्या सान्निध्यात आल्यावर त्याचा प्रश्न पूर्ण मिटला.

मी नंतर या मुलाशी बोलु लागलो. पहिल्यांदा विचारले की मला तुझी सर्व तपासणी दरम्यानची कागदपत्रे क्ष-किरण रिपोर्ट वगैरे पहायचे आहे. त्याशिवाय ज्या डॉक्टरने तुला असाध्य असे सांगितले होते त्याला भेटायचे आहे. हे ऐकल्यावर भक्त बाईंकडून विरोध झाला. तो मुलगा मात्र सरळ होता. त्याने अगदी मोकळेपणी सर्व हकिकत सांगितली. त्याच्या अपघातानंतर जी दुखापत झाली होती त्यानंतर त्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. (सर्व तपासण्याकेल्यावर) पण त्याने तो फारसा मानला नाही. त्यामुळे त्याचे दुखावणे बळावत गेले. शेवटी त्याला आलेली सूज व दु:खामुळे त्याची हालचाल खुरडत जाण्यासारखी झाली होती. परत डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी त्याला वरील प्रमाणे (असाध्य सल्ला) दिला. मग तो या ऑण्टीचा उपचार घेऊ लागला व काही दिवसात त्याला आराम पडला. आता तो बराच मोकळेपणे हिंडू शकतो.

माझी डॉक्टरला भेटण्याची इच्छा, कागदपत्रे (मी दुसर्‍याकडून तपासणार होतो.) तपासण्याची इच्छा या सर्वांनी अमान्य केली. (एवढा उद्योग मला पण जमला नसता. पण माझ्या सहकार्‍याच्या हितासाठी मी ते केले असते.) त्यांच्या मते डॉक्टरने काहीपण (आता असाध्य वरून ते खाली आले होते) सांगितले असले तरी कल्की महाराजांच्या उपचारात तथ्य आहे.

माझ्या सहकार्‍याला यातील तथ्याचा उलगडा होत असावा. (हल्ली तो त्यांच्या नादी लागलेला नाही. व इतरांना परावृत्त करतो असे सांगतो.) त्यामुळे मी फार पुढे काही न करता परतलो. एक चूक केली. त्या मुलाचा मोबाईल नंबर घ्यायला पाहिजे होता. या बोलण्यामुळे त्याने आपल्या म्हणण्याचा पुनर्विचार केला की नाही याबद्दल कळले असते.

आता आरागॉर्न यांच्या दुखण्याविषयी. या बाबतीत वसुली वा रिकामटेकडा यांचे रिमोट डायग्नोसिस (?) मला फारसे मान्य नाहीत. पण केसपेपर असतील तर हा भाग अभ्यासाचा म्हणून घेता येईल. या दुखण्यावर केसपेपर बघून व होमिओपॅथीची गोष्ट न सांगून वा इतर व्यावसायिक प्रामाणिकता जपणार्‍या अस्थिरोग तज्ञांशी बोलता येईल. व त्यांचे मत जाणता येईल.

आता दुसर्‍या बाजुने. होमिओपॅथी देणारे; कुठले औषध दिले व ते हाडे जुळण्यासाठी इतरत्र वापरता येईल का याबद्दल ही विचार व्हावा. त्याचा प्रयोग व्हावा. म्हणजे एक औषध सर्वांसाठी मिळेल. त्यांचे केसपेपर (होमिओपॅथी डॉक्टरने काय चाचण्या केल्या व त्यांचे निकाल.), औषधाचा निर्णय का केला (कुठल्या ग्रंथाप्रमाणे केला.) हे ऍलोपाथी अस्थिरोग तझा एवढे खुले असेल का?

प्रमोद

इतके

इतके कोण करते हो? सध्या गूगल पांडित्य जोरात आहे. केसचे कुठलेही डिटेल्स माहीत नसताना (किती महिने वाट पाहिली, किती वेळा एक्स रे काढला, आणखी तज्ञांचे मत घेतले का, इतर कॉम्प्लिकेशन्स इ.) हाडे जुळून आली असतीच असा दुर्दम्य आत्मविश्वास पाहून डोळे पाणावले.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

गंगा जमुना डोळ्यांत उभ्या कां?

दुर्दम्य आत्मविश्वास पाहून डोळे पाणावले.

डोळे पूर्ण पाणावले की अंमळ पाणावले?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हल्ली

हल्ली मराठी सायटींवर रूमाल घेऊनच यावे लागते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अंशतः असहमत

आता आरागॉर्न यांच्या दुखण्याविषयी. या बाबतीत वसुली वा रिकामटेकडा यांचे रिमोट डायग्नोसिस (?) मला फारसे मान्य नाहीत.

मी वसुलि यांना प्रतिसाद देऊन शक्यता (स्पेक्युलेशन) व्यक्त केली. नॉन युनिअन या प्रकारात काय घटते त्याचे मी वर्णन केले ("Since the process of bone healing is quite variable, a nonunion may go on to heal without intervention in a very few cases." -- विकिपिडिया पांडित्य) आणि ग्राफ्ट का सांगितला असेल त्याविषयी दोन अंदाज सांगितले: एकतर डॉक्टर लबाड असेल किंवा नैसर्गिक मार्गांनी नॉन युनिअन चे युनिअन मध्ये रूपांतर होण्यामध्ये रुग्णाला जो त्रास होतो (मॉर्बिडिटी), जो वेळ लागतो, तो कमी करण्याची इच्छा असेल.
माझा युक्तिवाद असा आहे की 'काहीही माहिती नसताना', वरील दोन शक्यता खुल्या असेपर्यंत होमिओपॅथी बरोबर असल्याच्या शक्यतेचा विचार करण्याची गरज नाही.
"कधीकधी हाडे जुळून येतात" आणि "हाडे जुळून आली" ही दोन निर्विवाद सत्ये असल्यामुळे, "हाडे जुळून आली असतीच" हे विधान स्वीकारार्ह वाटते.

पण केसपेपर असतील तर हा भाग अभ्यासाचा म्हणून घेता येईल. या दुखण्यावर केसपेपर बघून व होमिओपॅथीची गोष्ट न सांगून वा इतर व्यावसायिक प्रामाणिकता जपणार्‍या अस्थिरोग तज्ञांशी बोलता येईल. व त्यांचे मत जाणता येईल.

+१

डायग्नोसिस??

आता आरागॉर्न यांच्या दुखण्याविषयी. या बाबतीत वसुली वा रिकामटेकडा यांचे रिमोट डायग्नोसिस (?) मला फारसे मान्य नाहीत.

आम्हा दोघांपैकी कुणीही रिमोट डायग्नोसिस करत आहे असा समज (तुमचाही) कसा काय झाला? (डायग्नोसिस म्हणजे काय हो?)

साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्याने हाडे जुळून आली असा दावा आरागॉर्न ह्यांनी केला आहे. साबुदाण्याच्या गोळ्या खाल्ल्याने हाडे जुळून येण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तसेच हाडे बर्‍याच वेळेला नैसर्गिकरीत्या जूळून येतात ही फ्याक्ट आहे. अशावेळेस हाडे कशी काय जुळून आली? असे विचारले असता सर्वात प्रथम कोणत्या शक्यतेचा विचार कराल? आणि साबुदाण्याच्या गोळ्याच का? दरम्यानच्या काळात एखाद्याने बंगाली बाबाचा जप केला असेल, रस्त्यावर मिळणारी जडीबुटी चोळली असेल, जीवनात अनेक गोष्टी घडल्या असतील पण त्या सर्वांचा संबध हाडे जुळण्याशी लावणे ह्याला 'योगायोग' म्हणतात. असे कोरिलेशन लावणे हे नुसतेच अवैज्ञानिक नसून हास्यास्पदही आहे.
--
ज्यांच्या खिशात काड्याची पेटी असते त्यांना फुफुसाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. मी स्वत: बघीतले आहे.
आरागॉर्न अनुमान: खिशात काड्यापेटी ठेवणे म्हणजे फुफुसाच्या कर्करोगास निमंत्रण देणे आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

रिमोट डायग्नोसिस

तुमचा (व रिकामटेकडा यांचा) प्रतिसाद नीट वाचल्यावर लक्षात आले की तुम्ही निदान केले नव्हते. त्यामुळे रिमोट डायग्नोसिस शब्द वापरण्यात माझी चूक झाली.

मात्र तशी तुम्हाला हाड तुटल्याची माहिती होती. ही माहिती आरागॉर्न यांनी स्वीकारली असती तर प्रश्न नव्हता. ते ती स्वीकारत नाहीत असे दिसते. आता यावरून काय समजू?

तुम्ही तुमच्या जवळील माहितीनुसार एक अनुमान काढले ते सयुक्तिक वाटते. त्याच बरोबर आरागॉर्न यांनी स्वतःच्या माहितीवरून एक अनुमान काढले. ते विश्वसनीय वाटले नसले तरी एक घटना म्हणून बाजुला काढता येणार नाही. बरे हा प्रसंग फार दूरच्या भूतकाळात घडला नसल्याने त्याची शहानिशा करणे सहज शक्य आहे. समजा त्यांचे अनुमान बरोबर असेल तर होमिओपॅथीवर एक वेगळा प्रकाश पडेल. त्यांचे सहकार्य लाभले तर हे जमण्यासारखे आहे.

प्रमोद

शहानिशा

समजा त्यांचे अनुमान बरोबर असेल तर होमिओपॅथीवर एक वेगळा प्रकाश पडेल. त्यांचे सहकार्य लाभले तर हे जमण्यासारखे आहे.

तीच तर मेख आहे ना. होमिओपथीवाले, भविष्यवाले, आयुर्वेदवाले असल्या चाचण्यांना कधीच सामोरे जात नाहीत.
जर होमिओपथी औषधांनी ह्या चाचण्या पास केल्या असत्या तर त्यांना नुसतीच 'औषधे' नसते का म्हंटले?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

म्हणजे काय?

मात्र तशी तुम्हाला हाड तुटल्याची माहिती होती. ही माहिती आरागॉर्न यांनी स्वीकारली असती तर प्रश्न नव्हता.
त्यांची हाड तुटल्याची माहिती मी स्वीकारायची म्हणजे नेमके काय?

बरे हा प्रसंग फार दूरच्या भूतकाळात घडला नसल्याने त्याची शहानिशा करणे सहज शक्य आहे.
घटना २००० मध्ये घडली.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

माझा अनुभव

कोणता रुग्ण नेमक्या कोणत्या व्यक्तीमुळे आणि कोणत्या प्रकारच्या उपचारांमुळे अधिक प्रभावित होईल ते सांगता येणार नाही. ते रुग्णाच्या मानसिकतेवर अवलंबून राहील.

अगदी सहमत आहे.
irritable bowl syndrome हा माझ्या बाबतीत आढळून आला. अर्थात अशा प्रकारचे नाव मला उशीरा समजले. सुरवातीला माझा पोटाचा आजार हा ऍसिडिटी वगैरे बाबी मुळे दुर्लक्षला गेला. गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्पेशालिस्ट चे उपचार घेतले तेव्हा त्यांनी हे सायकोसोमॅटिक आहे असे सांगितले. मी यात शारिरिक भाग किती व मानसिक किती असा प्रश्न विचारला. थेट उत्तर टाळले. पण हे मानसिक आहे.त्यांच्या उपचारानी फारसा फरक पडला नाही. मला ते ट्रायल व एरर प्रकारचे वाटत. मी त्यांना तसे सांगत असे. त्यावर ते म्हणाले कि स्केप्टिक लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आढळला आहे. पुण्यातील एका जेष्ठ व प्रसिद्ध मानसोपचार तज्ञाकडे गेलो. एका कागदावर माझा आरोग्य इतिहास टंकुन घेतला होता. पाच मिनिटाच्या अवधीत त्यांनी तो वाचला व नंतर वेळ देतो सांगितले. फी ८००/-. दोन् दिवसांनी गेलो. माझे ऐकून घेतले. औषध काही देणार नाही. त्याची आवश्यकता नाही. माझ्या संशयवादी वृत्तीची कल्पना त्यांना होतीच. पुन्हा मी यात शारिरिक भाग किती व मानसिक किती असा प्रश्न विचारला. उत्तर टाळले. इंटर नेटवरुन माहिती घेणे सोडा. कोणावर तरी श्रद्धा ठेवा. त्याचा सल्ला प्रमाण माना. बास झाली चिकित्सा. खाण्यापिण्याच्या सुटेबल सवयी नोंद करा. त्याची डायरी ठेवा व मला दाखवायला आणा. हे मान्य असेल तरच पुढे या.कसे काय करायचे हे नंतर काय ते सांगेन. तुम्ही सांगता तशी श्रद्धा ( किंवा अश्रद्धा देखील) आमच्यात निर्माण होणे हे माझ्या हातात नाही असे त्यांना सांगितले. कालावधी १५ मिनिटे फी ५००/-

वैद्यावर विश्वास टाकून रुग्णाने निमूट उपचार स्वीकारणे अपेक्षित होते.

अशा मुळे आमचे व कोणत्याही डॉक्टरचे जमत नाही. आयुर्वेद वैद्याने सुद्धा तुमची श्रद्धा नाही. म्हणुन उपयोग होत नाही असे सांगितले. मी म्हटले मी फरक पडला तर पडला म्हणणार नाही तर नाही म्हणणार. नंतर वैद्याकडे गेलो नाही.

खर्‍या औषधाचा परिणाम प्लॅसिबोपेक्षा खूपच अधिक असतो. तुसड्या डॉक्टरने जरी ते औषध दिले तरी प्रेमळ डॉक्टरच्या प्लॅसिबोपेक्षा रुग्णाला अधिक फायदा होईल. डॉक्टरने नीट वागावे ही अपेक्षा योग्य असली तरी त्यातून प्लॅसिबोचे समर्थन होत नाही. प्रेमळ डॉक्टरने खरे औषध दिले तर सर्वाधिक फायदा होईलच.

पुर्वी एका तुसड्या डॉक्टरने परिणामकारक औषध दिले होते.हे आयबीएस असुन शारिरिकच प्रथम आहे. अधिक चिकित्सा करत फिरला तर बाहेरचे डॉक्टर म्हणतील बरा बकरा सापडला. त्यांना असा बकरा हवाच असतो असेही सांगितले होते. नंतर गेलो नाही त्यांच्याकडे. आता प्रेमळ व खरे औषध देणारा डॉक्टर कसा काय सापडायचा बॉ. दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे.
प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

मीदेखील अश्रद्ध, संशयखोर वृत्तीमुळे आता तिसराच डॉक्टर शोधला आहे. आणि त्याच्यावरही पूर्ण विश्वास बसलेला नाही. :(((

प्रत्येक डॉक्टर म्हणतो गोळ्या घ्या व रेग्युलर मला भेटा. (प्रतिभेट 250 रुपये). माझे म्हणणे असे की कोणत्याच रिपोर्टमध्ये काही सापडत नाही म्हणजे मला काहीच झालेले नाही तर गोळ्या का घेऊ व तुला का भेटू? वेगवेगळ्या स्पेशालिस्टकडे चकरा मारुन बरेच पैसे खर्च केले आहेत. पाहूया आताचा डॉ. काय म्हणतो ते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बापरे

प्रतिभेट २५० रु. ??????

तुमच्या घराच्या आसपास कोणी जनरल प्रॅक्टिशनर नाही का?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

जनरल प्रॅक्टिशनरची फी

प्रतिभेट २५० रु. ??????
तुमच्या घराच्या आसपास कोणी जनरल प्रॅक्टिशनर नाही का?

मालक, ही जनरल प्रॅक्टिशनरचीच फी आहे. स्पेशालिस्ट लोक वर प्रकाशकाकांनी सांगितल्याप्रमाणे 500 पासून पुढे फी आकारतात.
एमबीबीएस-एमडी जनरल प्रॅक्टिशनर असेल तर पहिली भेट 300-350 रुपयांना पडते व नंतरच्या भेटी 150-250 ला पडतात. हे दर त्यांच्या रेप्युटेशननुसार आहेत.

आयुर्वेदिक, होमिओपथीवाले किंवा वैदू लोक यापेक्षा कमी पैसे घेतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

खेडे-शहर फरक असावा

असेल बुवा.

आमच्या ठाणे बुद्रुक खेडेगावात जी पी (एम् बी बी एस्) ४०-५० रु घेतात.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

स्वस्त आहे.

ठाणे भलतेच स्वस्त दिसते.

इथे माझ्या ओळखीचा आयुर्वेदिक डॉक्टर कसल्याकसल्या पुड्या बांधून देतो. तो सुद्धा जनरल प्रॅक्टिसच्या नावाखाली 130 रुपये प्रतिभेट घेतो.

40-50 रुपये एमबीबीएस डॉक्टरने घेणे मी तरी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही. पुण्यात बऱ्यापैकी हॉस्पीटलच्या ओपीडीची किमान फी 200 रुपये आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्तम

उत्तम माहिती. धन्यवाद.

चांगली माहिती आहे.

>> प्लॅसिबो उपचारांमध्ये मला पाच अडचणी सापडतात.<<
पण सहा मुद्दे लिहीले आहेत! ;-)

आणखी एक प्रश्न आहे:
प्लसिबोचा परिणाम होतो का शरीर स्वतःच छोट्या आजारांना विरोध करून स्वतःचा बचाव करून घेतं? जसा साधा सर्दी-खोकला आपोआप बरा होता.

खुलासा

पण सहा मुद्दे लिहीले आहेत! ;-)

:P
निष्काळजीपणा.

प्लसिबोचा परिणाम होतो का शरीर स्वतःच छोट्या आजारांना विरोध करून स्वतःचा बचाव करून घेतं? जसा साधा सर्दी-खोकला आपोआप बरा होता.

प्लॅसिबो घेतले/न घेतले, खरे औषध घेतले/न घेतले, शरीर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतेच. प्लॅसिबो/नोसिबोमुळे या बचावप्रक्रियेवर थेट परिणाम होत नाही. म्हणून "प्लॅसिबोचा थेट परिणाम शून्य असतो" असे म्हणता येईल. प्लॅसिबोमुळे केवळ रोगाची लक्षणे कमी-अधिक होऊ शकतात, बचावप्रक्रियेवरील मेंदूचे नियंत्रण कमी-अधिक होऊ शकते. त्यामुळे बचावप्रक्रियेतही फरक पडू शकतो. "शरीर स्वतःच छोट्या आजारांना विरोध करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते (प्रयत्नांची दिशा चुकू शकते)" असे म्हणता येईल.

प्लॅसिबो

प्लॅसिबो हि श्रध्दा कि अंध श्रध्दा ?

सहमत

मी पुर्ण सहमत आहे.

एकदा एका बाइच्या पोटात दुखत असताना डॉक्टरांनी तिला तपासले असता त्यांना काहि विशेष अढळले नाही. त्यावर त्यांनी तीला कोटाचे बटन न बघुन चावत बसण्यास सांगितले, त्या बाईचा असा समज झाला की त्यामुळे ती बरि होत आहे. खरेतर तिला काहिच झाले नव्हते, त्यामुळे हुशार डॉ. नी असले औषध दिले. व ती बाई खडखडीत बरी झाली.

मानसिक दुखणे आणि मानसिक उपचार

प्रश्न क्र. १ - आर्थ्रायटीस न झालेल्या इ. निरोगी व्यक्तीचे सांधे दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन) अशा आजारात 'बायोफीडबॅक' नामक यंत्राकरवी मानसिक आजाराचे उपचार मनानेच केले जातात.
प्लासिबो असाच परिणाम करतो का?-किंवा- बायोफीडबॅक हा प्लासिबो इफेक्टचा उपचार आहे का?
प्रश्न क्र.२ - शारिरीक आजारात मनाचा फार मोठा वाटा असतो.(हे मान्य आहे का? असेल तर - ) हृद्रोगात महत्त्वाचा घटक 'मनावरील ताण' हा आहे. मनावर ताण वाढला की रक्तचाप/रक्तदाब वाढतो, हृदयगती वाढते, ज्यामुळे हृद्घात (हार्ट ऍटॅक/ इश्केमिया/कार्डियाक मसल फेल्युअर) होण्याची शक्यता वाढते. 'प्लासिबो'मुळे जर रोग्याचे मनस्वास्थ्य चांगले राहून ताण कमी झाला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला हृद्घात होण्याचा धोका कमी झाला तर त्याला प्लासिबो एफेक्ट म्हणता येईल का?

खुलासा

बायोफीडबॅक हा प्लासिबो इफेक्टचा उपचार आहे का?

सर्व प्रकारच्या बायोफीडबॅकसाठी सर्वंकष उत्तर कठीण आहे पण प्रथमदर्शनी 'होय' हेच उत्तर वाटते आहे.

'प्लासिबो'मुळे जर रोग्याचे मनस्वास्थ्य चांगले राहून ताण कमी झाला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला हृद्घात होण्याचा धोका कमी झाला तर त्याला प्लासिबो एफेक्ट म्हणता येईल का?

तसेच माझेही मत आहे.

हल्ली चे रुग्ण

हल्लीचे (तरुण) डॉक्टर फार टेस्टस् करतात
याचा अर्थ पूर्वीचे डॉक्टर प्राथमिक उपचार म्हणून प्लॉसिबो ची मदत घेत असावेत असे वाटते.
हल्लीच्या डॉक्टरांमध्ये जसा व्यावसायिक ;) बदल झाला आहे तसेच आजकालचे रुग्ण ही बरेच बदललेले आहेत.
उदा.
डोके दुखणे, मळमळ होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे (गंभीर विकाराचा इतिहास नसतांना), पोट दुखणे, अंगात कचकच वाटणे (बारीक ताप) अशा आजारांसाठी डॉक्टर कडे आजकाल फारच थोडे जण जातात. बऱ्याच लोकांना पॅरासिटेमॉल, सायक्लोबाम, लिमोटीन, असिलॉक, सेट्रीजिन, एलथ्रोक्सीन, आयब्युप्रोफीन (उच्चार बोलण्यातले आहेत) या आणि इतर अनेक औषधांची नावे माहित असतात आणि ती सरळ मेडीकलच्या दुकानातून घेतली जातात व काम भागवले जाते. औषध विक्रेत्यांनाच आजाराची लक्षणे सांगून औषधी घेण्याचे प्रमाण तर ग्रामीण व शहरी भागातही खुप मोठे आहेत. यामागे हल्लीच्या डॉक्टरांचा पैशाचा हव्यास आणि रुग्णांचा बचतखोरपणा या दोन्हीही गोष्टी कारणीभूत आहेत.

(साध्या पोटदूखीवर अपचनाच्या अंदाजाने औषधी देण्याऐवजी सोनोग्राफी, एन्डोस्कोपी अशा चाचण्या, कंबरदूखी, पाठदूखीवर एक्स रे, डोकेदुखीवर सीटीस्कॅन, अशक्तपणासाठी रक्ततपासणी व तत्सम चाचण्या या सर्व बाबी पेशंटच्या झकपकपणाकडे पाहून गरज नसतांना सर्रास घेतल्या जातात. (अर्थात अशा चाचणीची गरज आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार प्रत्येकवेळी डॉक्टरांकडेच असायला हवा हे ही खरेच) गरीबातला गरीब रुग्ण जर दवाखान्यात गेला तर मात्र त्याची फिस आणि थोडक्यातली औषधे इतक्यावर सुटका होते.

औषधीविक्रेत्यांकडूनही घेतलेल्या औषधांनी प्लॉसिबोचा फायदा मिळायला अडचण येत नाही हे ही यात आलेच.

उत्तम चर्चा आणि प्रतिसाद

सध्या वेळ नसल्याने इतकेच किंवा चालू द्या!

वाचते आहे.

प्लॅसिबो उपचार: एक भ्रम

प्लॅसिबो उपचारातून रोगी बरा होऊ शकतो हा एक निव्वळ भ्रम आहे. या बोधनिक ( cognitive) वर्तनाच्या उपचारामुळे आजारपणाच्या वेदना दूर होत नाहीत; उलट रोगनिदानात अडथळा ठरू शकते. मुळात या प्रकारात रूग्ण वेदनेला देत असलेल्या प्रतिसादात बदल करतो. आजाराकडे वा वेदनेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल होतो. अतीव वेदनेच्या सूचना मज्जांना पोचत असतात. परंतु बदललेल्या जाणीवेमुळे रुग्णाला हा उपचार हवा हवासा वाटू लागतो.
वेदनेचा अनुभव व वेदनेला लावलेला अर्थ रुग्णसापेक्ष असतात. प्लॅसिबोमध्ये रुग्णाचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जात असतो. वेदनेला वेगळा अर्थ कल्पिल्यामुळे उपचार परिणामकारक आहेत असे (उगीचच!) वाटू लागते. मानसिक समाधानामुळे आपण रोगमुक्त झालो वा रोगमुक्त होत आहोत असे एक फीलींग त्यात असते. याचाच खुबीने वापर करून प्लॅसिबोची तरफदारी केली जात आहे.
आता तर याची भली मोठी साखळी तयार होत आहे:

  • प्लॅसिबो सर्जरी ही प्लॅसिबो इंजेक्शनपेक्षा चांगले,
  • प्लॅसिबो इंजेक्शन प्लॅसिबो गोळ्यापेक्षा चांगले,
  • sham अक्युपंक्चर प्लॅसिबो गोळ्यापेक्षा चांगले,
  • कॅप्सूल्स गोळ्यापेक्षा बरे,
  • मोठ्या आकाराच्या गोळ्या लहान आकाराच्या गोळ्यापेक्षा बरे,
  • जास्तीत जास्त डोझ केव्हाही बरे,
  • महागडी (परदेशातून import केलेली!) औषधं जास्त परिणामकारक,
  • काळ्या - राखी रंगाच्या गोळ्यापेक्षा पिवळ्या - पांढऱ्या गोळ्या जास्त परिणामकारक,
  • कदाचित या घेतल्यामुळे तुझ्या वेदना कमी होतील असे सांगण्यापेक्षा या तुझ्या वेदना नक्कीच दूर करतील असे (खोटे खोटे!) सांगणे हितकारक.

आता तर प्लॅसिबो सर्जरीचे पेव फुटले आहे. पार्किन्सन आजारासाठी रुग्णाच्या डोक्यात दोन चार भोकं पाडून प्लॅसिबो सर्जरीचे काही प्रयोग केल्यानंतर त्या फसल्या हे लक्षात आल्यावर मामला थंड झाला आहे. परंतु काही महत्वाकांक्षी वैद्यकीय संशोधकांच्या अट्टहासामुळे या उपचाराचे भलावण करणार्‍या बातम्या अधून मधून जालावर प्रसिद्ध होत असतात.
शहा्ण्याने अशा अघोरी प्रकारापासून दूर राहिलेले बरे!

चांगली चर्चा

चर्चा चांगली आहे.

"अपेक्षेप्रमाणे तात्पुरता परिणाम येणे" हा प्रकार सुखावह किंवा दु:खदायकही असू शकतो. "प्लॅसीबो" शब्दाचा मूळ लॅटिन अर्थ (मी सुखावेन) आता अप्रचलित आहे. "प्लॅसीबो" या एकाच शब्दाने अपेक्षापूर्ती, मग ती सुखवह असो की दु:खद असो, कुठल्याही प्रकारचा परिणाम सांगितल्यास हरकत नाही.

लॅटिन अर्थामुळे घोटाळा होऊ नये काही लोक दु:खद अपेक्षापूर्ती करणार्‍या वस्तूला "नोसीबो" (nocebo, = "मी दुखावेन") असा शब्द वापरतात. पेशवेकालीन तांडव गणपतीच्या उदाहरणामुळे हा शब्दप्रयोग आठवला.

अशाच प्रकारे "भोजनातला कुठलातरी पदार्थ सडला होता" अशी अफवा उठताच अनेक लोकांना अपचन होते, जुलाब होतात. मग मुळात अफवा खरी नसली तरी चालते. किंवा सडलेला पदार्थ कुठला, ते शोधून खरेच सापडल्यावर मग समजते - जुलाब झालेल्या काही लोकांनी तो पदार्थ खाल्लाच नसतो!

गंमत म्हणजे "प्लॅसीबो-कंट्रोल" वैद्यकीय चाचणीमध्ये प्लॅसीबो घेणार्‍यांपैकी काही लोकांना न-दिलेल्या औषधाचे अनपेक्षित/दुष्परिणाम (साईड- किंवा ऍडव्हर्स-इफेक्ट) जाणवतात. या परिणामांची यादी आणि गणना चाचणीच्या अहवालामध्ये साधारणपणे दिलेली असते.

"ऍलोपथीच्या औषधांचे दुष्परिणाम माझ्या अंगावर येतात", "ऍलोपथीने माझे पित्त उलटते" वगैरे काही (सर्व नव्हे) लोकांचे स्वानुभव नोसिबो-परिणाम असू शकतील, अशी माझी शंका आहे. (या शंकेस वरील उदाहरण सबळ टेकू म्हणजे "चाचण्यात प्लॅसीबो घेणार्‍यांना होणारे दुष्परिणाम", हा होय.)

+१.

चर्चा चांगली आहे.

+१.

अशाच प्रकारे "भोजनातला कुठलातरी पदार्थ सडला होता" अशी अफवा उठताच अनेक लोकांना अपचन होते, जुलाब होतात. मग मुळात अफवा खरी नसली तरी चालते. किंवा सडलेला पदार्थ कुठला, ते शोधून खरेच सापडल्यावर मग समजते - जुलाब झालेल्या काही लोकांनी तो पदार्थ खाल्लाच नसतो!

हाउस एम डी असा एक कार्यक्रम सद्ध्या फार गाजतोय्. त्यातील्, एअरबोर्न, सीझन् ३ एपिसोड १८ मध्ये डॉ. हाउस असेच विमानात क्ष व्हायरसाची बाधा झाली आहे असे सांगतो. त्याची लक्षणे सांगतो आणि एकदम सगळ्यांना ती लक्षणे जाणवु लागतात. ह्याची आठवण झाली.

-Nile

कार्यक्रम कशाला?

शाळेत जीवशास्त्राच्या तासाला वेगवेगळ्या रोगांची लक्षणं शिकायला लागायची. मला नेहेमीच माझ्यात सगळ्या व्हीटॅमिन्सची कमतरता आहे, त्यामुळे होणारे रोग आणि इतरही अनेक रोग झाले आहेत असं वाटायचं.

कॉरोनरी कंट्री

शाळेत जीवशास्त्राच्या तासाला वेगवेगळ्या रोगांची लक्षणं शिकायला लागायची. मला नेहेमीच माझ्यात सगळ्या व्हीटॅमिन्सची कमतरता आहे, त्यामुळे होणारे रोग आणि इतरही अनेक रोग झाले आहेत असं वाटायचं.

यावरुन 'द हार्ट अटॅक' मधला जॉर्ज कुस्टान्झा आठवला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हॅहॅहॅ

सगळ्या व्हीटॅमिन्सची कमतरता आहे, त्यामुळे होणारे रोग

याला MBBS द्वितीय वर्ष सिंड्रोम म्हणतात.

इतरही अनेक रोग झाले आहेत असं वाटायचं.

नो कॉमेंटस.

आर्थर कॅनन डॉयलचा विनोद

असाच विनोद आर्थर कॅनन डॉयल याने सांगितला आहे (त्या काळात वैद्यकाच्या पहिल्या वर्षात रोग होत...)

"ए मेडिकल डॉक्युमेंट" या लघुकथेत पुढील संवाद होतो :

सर्जनने टिप्पणी केली : "एका अधिकाराच्या स्रोताने सांगितलेले आहे हे... पहिल्या वर्षाचा प्रत्येक विद्यार्थी चार दुखण्यांच्या यातना गुपचूप सहन करत असतो. अर्थातच, पहिले म्हणजे हृदयाचे दुखणे. दुसरा रोग (गालातल्या) पॅरोटिड लालाग्रंथीचा कर्करोग. उरलेले दोन रोग मी विसरलो."
"ही पॅरोटिड लालाग्रंथी तेव्हा कशी काय उतते-मातते?"
"ओ... ते ना! शेवटची अक्कलदाढ येत असते!"

अमोल

अमोल पालेकरचा एक चित्रपटही आहे ज्यात त्याला आपल्याला अन्जायना पेक्टोरिस झाला आहे असे वाटत असते. नाव विसरलो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मेरे बीवी की शादी

"मेरे बीवी की शादी" असे काहीतरी नाव होते.
अमोल पालेकरच्या पात्राला वाटते आपल्याला अंजायना पेक्टोरिसचा विकार असल्यामुळे आपण मरणोन्मुख आहोत, बायकोचे काय होईल... बायकोला वाटते "अंजायना" नावाची प्रेयसी नवर्‍याचे लक्ष विचलित करते आहे... धमाल.

 
^ वर