होमिओपॆथी एक थोतांड

होमिओपाथी एक थोतांड*

लान्सेट या नियतकालिकातील एका लेखाने होमिओपाथीचे थोतांड परत उघडे केले आहे. होमिओपाथीवर स्वतंत्रपणे झालेले हे एकटेच संशोधन नाही. आता पर्यंत कमीत कमी बारा वेळा असे संशोधन झाले आहे. या सर्व संशोधनातून एकच निष्पन्न झाले आहे की होमिओपाथीची औषधे ही प्लासेबोपेक्षा आÆधक गुणकारी नाहीत. प्लासेबो म्हणजे औषध नसलेली पण औषधासारखी भासणारी वस्तु. ही वस्तु रोग्यास दिली तर केवळ मनाने उभारी येऊन तो बरा होऊ शकतो. पण या बरे होण्यात प्लासेबोचा सहभाग नसतो. चाचण्यां मधून प्लासेबो वा औषधे रोग्यास (न सांगता) दिली जातात. जे औषध प्लासेबोपेक्षा जास्त गुणकारी दिसते ते औषध चाचणीत पास करतात.

होमिओपाथीची तत्वे, इतिहास व औषध बनवण्याची पद्धत या सर्वातून होमिओपाथी हे एक थोतांड कसे आहे हे कळायला अडचण येत नाही. वैज्ञानिक विश्वात होमिओपाथी ही एक अंधश्रद्धाच मानली जाते. भारत वा अन्य काही देश सोडल्यास बहुतेक देशांमधे होमिओपाथीचे सरकारमान्य वा विश्वविद्यालयीन शिक्षण दिले जात नाही. केवळ होमिओपाथी शिकलेल्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास बऱ्याच देशात बंदी आहे. भारतातही अशा पद्धतीवर निर्बंध असायला हवेत.

इतिहास:

होमिओपाथीची सुरुवात ख्रिश्चन हानमन या वैद्यकाने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस केली. या सुमारासचे वैद्यकशाðा हे विज्ञानाभिमुख नव्हते. रोगी माणसाला जखम करुन त्याचे रक्त वाहु देण्यासारख्या उपचार पद्धती त्यावेळेला प्रचलीत होत्या. अशा वेळी एका निराळ्या मार्गाने उपचार करण्याची पद्धत त्यांनी तयार केली. होमिओ म्हणजे सम किंवा सारखे पाथी म्हणजे यातना वा संवेदना (संवेदना) हा शब्द त्यांनी प्रचारात आणला. त्यावेळच्या गैर व तापदायक उपचार पद्धतीला त्यांनी विरोध केला व नाव ठेवले अॅलो म्हणजे विरुद्ध पाथी. औषधे कशी निवडावीत, कशी तयार करावीत व कुठल्या आजारास कुठली औषधे द्यावीत याबद्दलचे निकष त्यांनी तयार केले.

ज्या पदार्थाने रोगाची लक्षणे निरोगी माणसात येतात तोच पदार्थ त्या रोगाचे औषध असतो हा त्यातील पहिला निकष. या निकषामुळेच त्यांनी आपल्या उपचार पद्धतीचे नाव होमिओ असे ठेवले. औषध जेवढे कमजोर (dilute) तेवढे प्रभावी हा त्यातला दुसरा निकष. हे दोनही निकष होमिओपाथीचे आजचे आधारस्तंभ आहेत. सुरुवातीच्या काळात हानमन हा जितक्या कमजोर प्रमाणात देत होता त्यापेक्षाही अधिक कमजोर प्रमाणात औषधे देण्यास होमिओपाथांनी सुरुवात केली. सध्या हे प्रमाण अशा पातळीवर पोचले आहे की होमिओपाथीच्या औषधांमध्ये औषधच उरले नाही.

औषध तयार करायची पद्धत.

होमिओपाथी म्हणजे साखरेच्या गोळ्या हे बहुतेकांच्या मनात समीकरण दडलेले आहे. या साखरेच्या गोळ्यात नेमके किती औषध असते हा फार महत्वाचा प्रश्न आहे. विचार करा की तुमच्या कडे हिंदी महासागराएवढे पाणी वा द्राव आहे. यात तुम्ही एक चमचाभर औषध टाकले व ते द्रावण व्यवस्थित ढवळले व त्यातील थोडा भाग घेऊन साखरेच्या गोळ्यांमधे टाकले तर ते होमिओपाथीचे औषध होईल. या वर्णनात अतिशयोक्ति असेल तर ती पाणी कमी सांगितल्याची असु शकते. प्रत्यक्षात अर्थातच या पेक्षा वेगळी पद्धत वापरली जाते. दहाच्या पटीत वा शंभराच्या पटीत औषधे कमजोर केली जातात. दहाच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांच्या नंतर एक्स तर शंभराच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांनंतर सी हे अक्षर लावले जाते. ३०, ६० वा २०० या एक्स ची औषधे आपल्या कडे सर्रास वापरली जातात. ३० एक्स याचा अर्थ औषध एक घेतले तर पाणी वा अल्कोहोल एकावर तीस शून्ये असतील एवढे घ्यावे असा आहे.

विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना ऎवगार्डो संख्या माहित असते. अठरा ग्राम पाणी घेतले तर त्यात सहा वर तेवीस शून्य एवढे रेणु असतात. जर का आपण तीस टन तीस एक्स औषध घेतले तर कदाचित तुम्हाला होमिओपाथीतील औषधाचा एक रेणू मिळू शकेल. ६० व २०० एक्स मधे हे औषधाचा रेणु मिळण्यास बहुदा सूर्यमालेतील सर्व द्राव औषध म्हणून घ्यावा लागेल. हे प्रमाण बघितल्यावर होमिओपाथीच्या साखरेच्या गोळ्यांमधे मूळ औषध नसतेच. त्यामुळे प्लासेबो आणि होमिओपाथीच्या औषधांच्या गुणांमध्ये काहीच फरक का येत नाही हे कळते.

होमिओपाथीच्या औषधावरचे लेबल काढल्यास ते कुठचे औषध होते हे कळण्यास काहीच उपाय नसतो. कारण त्यात मूळ औषध थेबालाही उरले नसते. याच कारणाने होमिओपाथीचे लेबल काढलेले औषध ओळखा व दशलक्ष डॉलर मिळवा असे आव्हान ही दिले गेले आहे. हे आव्हान अजुन तरी स्वीकारले गेले नाही.

निकृष्ट निदान व उपचार पद्धती:

सम लक्षणे तयार करणारे पदार्थ औषधे असतात व औषधांचे कमजोरीकरण हेच सबलीकरण ही दोनही तत्वे वैज्ञानिक पद्धतीवर सिद्ध झालेली नाहीत. कदाचित यामुळेच होमिओपाथी या पंथात अंतर्गत मतभेद व पंथ उपपंथ झाले आहेत. बाराक्षार, इलेक्ट्रोपाथी, आयसोपाथी, मिश्र होमिओपाथी अशी त्यातील काही नावे. औषध सिद्ध करताना लक्षणांचा मोठा अभ्यास केला जातो. पण बहुतांशानी ही लक्षणे प्सोरा वा खाज या प्रकारात मोडतात. ताप, आवाज, रक्तचाचणी, एक्सरे या सारख्यांमुळे मिळालेल्या माहितीचा यात समावेश कमीच असतो. या मुळे ही निदान पद्धती मोठया प्रमाणात ढिसाळ आहे. रोग्यांबरोबर जास्त बोलायचे बरेचदा खूप जाणून घ्यायचे पण निदानात आधुनिक उपकरणांचा वा चाचण्यांचा वापर करायचा नाही. अशी निदान पद्धत निकृष्टच ठरते.

उपचारासाठी जे औषध द्यायचे ते किती द्यायचे याचे होमिओपाथीत फारसे निकष नाही. त्यामुळे रुग्ण एकावेळी वेगवेगळ्या संख्येने गोळ्या घेतात. औषधाचा कमजोर पणा हा निकष आहे. त्यामुळे वेळ पडली तर एका गोळीचे तुकडे करुन घेतले तरी ती चालेल असे असते. होमिओपाथीची औषधे लक्षणांवर आधारित असल्याने ती केवळ लक्षणांवर उपाय करणारी पद्धत आहे असेही म्हणता येईल.

विचित्र औषधे

आपण खातो ते मीठ होमिओपाथीतील एक औषध आहे. लॅक्रिमा फिलिआ नावाचे औषध लहान मुलींच्या अश्रुंपासून बनविले जाते. सीमेक्स लेक्टुरालीस तर कुट केलेल्या ढेकणापासून बनवितात. काही प्राण्यांचे मल मूत्र (मेफिटीस) माणसाचे मूत्र (ऑसिडम युरीकम), कोळीष्टके अशी ही औषधे होमिओपाथीत आहेत. अर्थात या सर्वांचे भरपूर कमजोरीकरण केल्याने ती प्रत्यक्षात पोटात जात नाहीत हा भाग वेगळा.

बरे होणे

होमिओपाथीने लोकांना (निदान काही संख्येने) बरे वाटते असे त्या लोकांचे व होमिओपाथांचे मत आहे. औषध कितीही कमजोर केले असेल तरी हरकत नाही, कार्यकारणभाव माहित नसला तरी चालेल, वाटेल ते औषध दिले तरी चालेल पण बरे वाटते ना? तेवढे पुरेसे आहे असे काहींचे यावरचे मत असू शकेल. लँसेट किंवा तत्पूर्वी केलेल्या संशोधनांमधे हेच तपासले गेले आहे. की होमिओपाथीने बरे वाटते का? वैज्ञानिक चाचण्यांमधून तरी हे सिद्ध होत नाही की होमिओपाथीने बरे वाटते.

मग लोकांना जे बरे वाटते ते का म्हणून. यावरचे उत्तर ते प्लासेबो परिणामाने वाटते असे आहे. कित्येक रोग असे आहेत की ज्यांचे अस्तित्व मानसिकतेवर अवलंबून असते. मानसिक ताण हे काही रोगांचे कारण असते. प्लासेबो घेतल्यावर मानसिक समाधानाने रोग्यांना बरे वाटू शकते. होमिओपाथी हा त्यातलाच एक भाग आहे.

बरे होणे हे एकच निष्पन्न, आणि तेही वैज्ञानिक चाचण्यांमवर टिकत नाही. त्यामुळे होमिओपाथ या चाचण्यांवरच टीका करतात. खरे तर एखादे वचन वैज्ञानिक आहे की नाही हे सिद्ध करायची जबाबदारी त्याच्या उद्गात्याने घेतली पाहिजे. एखादे विधान प्रयोगाद्वारे खोटे ठरविण्याचा प्रयत्न करुनही जर खोटे ठरले जाऊ शकत नसेल तर ते वैज्ञानिक विधान असते असे वैज्ञानिक पद्धती मानते. अशा तऱ्हेने होमिओपाथीतील विधाने सिद्ध करण्याचा प्रयत्न होमिओपाथ करताना दिसत नाही.

औषध जेवढे कमजोर कराल तेवढे ते शक्तिशाली होते हा होमिओपाथीचा सिद्धांत अशातऱ्हेने सिद्ध करणे यासाठी जरुरी आहे. जेंव्हा कमजोर करण्याची क्रिया औषधाचा एक ही रेणू शिल्लक ठेवत नाही तेंव्हा त्यात काय उरते? होमिओपाथांचे यावरचे उत्तर आहे की त्याचे भूत (इंग्रजीत स्पिरिट) राहते हे आहे. हे उत्तर मजेखातर नसून ते पूर्ण पणे विचारपूर्वक दिले गेले आहे. एखादा मांत्रिक व होमिओपाथ यात यामुळे फारसे अंतर राहत नाही. फरक असलाच तर एक इथला मूळचा व रोखठोक अंधश्रद्धा जोपासणारा तर दुसरा परेदेशातून आलेला, वैज्ञानिक भासणारा पण वास्तविक अंधश्रद्धांची जोपासणी करणारा.

होमिओपाथीचे दुष्परिणाम.

होमिओपाथी ही कमजोर केलेल्या औषधांमुळे कुठलाही परिणाम न करणारी आहे. त्यामुळे त्यात दुष्परिणाम ते काय असा प्रश्न पडु शकतो. रोग्यांना सुयोग्य औषधांपासून वंचित ठेवण्याचा दुष्परिणाम मात्र त्यात होत असतो. याशिवाय काही सामाजिक स्तरावरचे दुष्परिणाम भारतात दिसतात.

होमिओपाथीचे शिक्षण हे आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर करावयाचे स्पेशलायझेशन असावे असा प्रघात इंग्लंड मधे आहे. यामुळे असे होमिओपाथ हे आपले पूर्व प्रशिक्षण न विसरता व होमिओपाथीच्या मर्यादा लक्षात घेऊन उपचार करतात व आÆत गंभीर क्षणी रोग्यांना दुसरे उपचार घ्यायला सांगतात.

भारतात होमिओपाथीचे शिक्षण हे या पद्धतीने दिले जात नाही. समज नसलेल्या तरुण वयात, फारसे काही माहित नसताना लोक या पद्धतीच्या शिक्षणाकडे वळतात. जेंव्हा असे तरुण व्यवसायाकडे वळतात तेंव्हा त्यांच्या लक्षात येते की हा धंदा फारसा चालत नाही. मग हेच तरुण डॉक्टर या नावाखाली सर्रास आधुनिक वैद्यकाची औषधे देऊ लागतात. ही औषधे देण्याचा ना त्यांना आÆधकार असतो ना शिक्षण असते. यामुळे मोठया प्रमाणात गैरप्रकार होतात. वैद्यकाने आपली जाहिरात करायची नसते अशी प्रथा आहे. काही होमिओपाथ वर्तमानपत्रातून मोठया जाहिराती देत असतात हा ही एक गैरप्रकारच आहे.

होमिओपाथीत तथ्ये असण्याचा संभव फार कमी आहे. याचा अर्थ कोणी त्यात संशोधन करु नये असा नाही. ही मुभा विज्ञान सर्वांनाच देत असतो. मात्र असे संशोधन वैज्ञानिक निकषांवर सिद्ध होईपर्यंत या प्रणालीचा सार्वत्रिक उपयोग सरकारी खर्चाने केला जाऊ नये ही अपेक्षा करणे मुळीच गैर नाही.

प्रमोद

* काही वर्षांपूर्वी (2005) हा माझा लेख लोकसत्तेत आला होता.

Comments

छान लेख

छान लेख. आता प्रतिसादांची मजा इथे बसून निवांत बघावी म्हणतो. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

दवा आणि दुवा

लोकसत्ताच्या संस्थळावर या दुव्यावर तुमचा लेख आहे आणि आणि या दुव्यावर 'त्यांचा' ;)
'या लोकांना' चर्चा, वैज्ञानिकांकडून तपासण्या नकोच आहेत. वृत्तपत्रीय कात्रणे 'त्यांच्या' संस्थळावर येथे आहेत.

उत्तर

आपल्या लोकसत्तामध्ये आलेल्या लेखावर आलेल्या 'सर्चच्या' आक्षेपांना उत्तरे देण्याऐवजी परत तुमचा शिळा लेखच येथे देण्याचे प्रयोजन काय आहे हो नक्की?

शिवाय रिकामटेकड्याने तो लेख दाखवला नसता, काहीच उत्तर न देता आल्याने 'तुमचा पोपट झाला होता' हे ही कळले नसते! ;)

अशा एकांगी लेखनातून आणि आपलेच ते खरे अशा प्रकारच्या प्रचारातून, सुधारकाचे संपादक म्हणून, विश्वासार्हता वाढत असावी का?

असले भंपक संपादक असल्यावर कसे चालावे ते मासिक?

आपला
गुंडोपंत

खुलासा

शिवाय रिकामटेकड्याने तो लेख दाखवला नसता, काहीच उत्तर न देता आल्याने 'तुमचा पोपट झाला होता' हे ही कळले नसते! ;)

लोकसत्ताला आम्ही दोघांनीही स्वतंत्रपणे प्रतिवाद पाठवला होता. (त्यानंतरच आमचा परिचय झाला असे स्मरते.) तो प्रसिद्ध झाला नाही. घरी जाईन तेव्हा माझे ते पत्र मी शोधणार आहे.

सुधारकचे संपादकत्व

माफ करा गुंडोपंत तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो.
मी केवळ एका अंकासाठी 'आजचा सुधारक'चा संपादक (अतिथी) होतो.

वरील लेखात माझे काही चुकले असेल तर कळवावे. मी दुरुस्ती निश्चित करेन. दुसरी बाजु लिहिणे हे मला जमणार नाही. तुम्हाला जमले तर नक्की वाचेन.

शेवटी या लेखाच्या प्रत्युत्तराबद्दल. हा लेख लोकसत्तेने छापला हेच माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. असे (तुमच्या भाषेत एकांगी) लेख सहसा वर्तमानपत्रात छापले जात नाही. त्यावर तिखट प्रतिक्रिया विशेषतः व्यावसायिकांची येणे साहजिकच होते. ती आल्यावर मला उत्तर देणे भाग होते. माझे उत्तर छापले गेले नाही. (या प्रकारास माझा पोपत झाला असे तुमचे म्हणणे असेल तर ते मला मान्य आहे.) ते उत्तर येथे मी डकवू शकतो. पण अजूनतरी कोणी व्यावसायिक होमिओपॅथीक वैद्यक या चर्चेत सहभागी होताना दिसत नाही तेव्हा त्याचे प्रयोजन नाही असे वाटते. या उत्तरावर देखील तुम्ही एकांगी व भंपकपणाचा आणि प्रयोजनशून्यतेचा आरोप करू शकाल.

प्रमोद

ता.क. सांगायचे राहिलेच. आजचा सुधारक मधे कधीतरी एका होमिओपॅथीच्या डॉक्टरांची ओळख आली होती.

होमिओपॅथी

भारतात अद्यापही होमियोपॅथीचे शिक्षण देणार्‍या संस्था/ मेडिकल कॉलेजे राजरोस चालू आहेत काय? मध्यंतरी असे ऐकले होते की भारतातही होमियोपॅथी करून नंतर ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांवर निर्बंध लावले आहेत. बाकी फारशी माहिती नाही.

अमेरिकेत पूर्वी होमिओपॅथीची औषधे वगैरे आणण्यास बंदी होती असे आठवते. कस्टमचेकच्या वेळेस तपासले जाई. बाहेर फार्मसी वगैरेमध्ये ती उपलब्ध नसत. परंतु हल्ली मला होमिओपॅथी औषधे दिसलेली आहेत. अर्थात, त्या साबुदाण्यासारख्या गोड गोळ्या नाहीत. स्प्रे किंवा लिक्विड पाहिलेले आहे. हे बदल का आणि कसे झाले याची माहिती आहे का कोणाला?

असो.

अधिक माहिती ;-) : हल्लीच हा नवा चित्रपट येऊ घातला आहे असे दिसते. परीक्षणाखाली दिसणार्‍या प्रतिक्रिया रोचक आहेत. :-)

प्लासिबो

प्लासिबोवर इथे एक चर्चा झाली आहे
प्रकाश घाटपांडे

प्लासिबो

प्लासिबोवर आणखी एक लेख.

इतर तज्ञ डॉक्टरांना धमक्या देतो

एका गावात घडलेल्या प्रसंगातील माहितीनुसार, एक होमियोपाथ त्याचा धंदा त्याच गावातील एका जुन्या ख्यातनाम डॉक्टरच्या प्रॅक्टीसमुळे चालत नाही म्हणून ख्यातनाम डॉक्टरच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणाऱ्या इतर तज्ञ डॉक्टरांना धमक्या देतो.

?

या प्रतिक्रियेतुन नेमक आपल्याला काय सांगायचे आहे.
प्रकाश घाटपांडे

एखादी नियंत्रण संस्था आहे का?

इंडीयन मेडीकल असोशियेशन सारखी ह्यांची एखादी नियंत्रण संस्था आहे का? अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोण नियंत्रण ठेवते?

आहे

आयुष ही संस्था सार्‍या 'पर्यायी' उपचारांचे 'कारभार' सांभाळते.
गैरप्रकारांना आळा? मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया असूनही ऍलोपॅथीत गैरप्रकार आहेतच की! शिवाय केतन देसाई प्रकरण आहेच.

नियंत्रक संस्था

मेडिकल कौन्सिक ऑफ इंडिया ही शासनाची नियंत्रक संस्था आहे. प्रत्यक्ष काय काम करते कुणास ठाउक?
प्रकाश घाटपांडे

मनोकायिक

या निमित्ताने
मनोकायिक आजारावर उपक्रमावर यापुर्वी झालेली चर्चा आठवते
समजा होमिओपाथी ही थोतांड आहे हे सिद्ध झाले पुढे काय? पर्यायी उपचार पद्धती या अशास्त्रिय आहे असे म्हटले तरी शास्त्रीय उपचार पद्धती ही भारतातील ( सोयीसाठी आपला देश) लोकांना पुरी पडणार आहे का? शास्त्रीयता हा एकमेव निकष लावुन चालणार नाही. लोक आपण व्याधीमुक्ती होतो कि नाही हा भाग म्हणजेच उपयुक्तता महत्वाची मानतात.

प्रकाश घाटपांडे

बोकुड

हाच निकष जत्रेतील बळीप्रथेला लावायचा का?
लोकांना कमस्सल मालाचे ज्ञान झाल्यावरही त्यांनी विकत घेतला तर ठीक अन्यथा ती फसवणूक आहे.

फसवणुक

हीच तर शोकांतिका आहे. त्रस्त ग्रस्त माणुस चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही. बोकुड बळी दिला नाही तर काहीतरी विपरित होईल ही भीती. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक बनतात. प्रबोधन, तसेच काही काळ जावा लागेल या मानसिकतेतुन बाहेर पडण्यासाठी.
प्रकाश घाटपांडे

म्हणूनच

होमिओपॅथी खोटी असल्याचा प्रचार (ज्यांची प्रबोधन स्वीकारण्याची कुवत नसेल त्यांच्यासाठी) झाला पाहिजे.

भारतीय होमियोपॅथी महाविद्यालयातील शिक्षण

छान आणि ज्ञानात भर घालणारा लेख. या आधी होमियोपॅथी बद्दल अनुकूल प्रतिकूल असे कुठलेच मत नव्हते ते आता याचर्चेअंती ठरु शकेल. असो.

आमच्या एका होमिओपॅथी डॉक्टर मित्रांना ( ते सुरूवातीपासूनच अलोपॅथीची उपचार पद्धती वापरतात) मी एकदा धाडस करुन
तुम्हाला अलोपॅथी कॉलेजला असतांना शिकवली जाते का?
असे विचारले होते. त्यांनी एमबीबीएस आणि बीएचएमएस यांच्या अभ्यासक्रमात एखाददूसरा विषय सोडला तर फारसा फरक नसतो असे सांगितले. म्हणजे भारतात तरी बीएचएमएस वाल्यांना जी अलोपॅथीमध्ये प्रॅक्टीस करायची कायद्याने मुभा आहे त्या मागे कदाचित हे एक कारण असावे.
( तशी मुभा बीएएमएस वाल्यांना ही आहे. ती कोणत्या आधारावर हे ही माहितगारांकडून जाणून घ्यायला आवडेल. )

समान अभ्यासक्रम?

एखाद दुसरा विषय सोडून बाकी अभ्यासक्रम समान असतो म्हणजे काय हे कळत नाही.

समजा अलोपथी*च्या अभ्यासक्रमात रोगविज्ञान असेल आणि आयुर्वेदाच्याही अभ्यासक्रमात असेल तर दोन्हीमध्ये सारखेच शिकवतात का? की अलोपथीत क्षयरोग हा अमुक जंतूंमुळे होतो आणि आयुर्वेदात तो कफ-वात-पित्त यांचे संतुलन बिघडल्याने होतो असे वेगवेगळे शिकवतात?

तसेच अलोपथीच्या फार्मॅकॉलॉजी मध्ये औषधाचे गुणधर्म, ते घेतल्यावर त्याचे शरीरातले शोषण कसे होते, कोणत्या अवयवावर ते कसे परिणाम करते, ते किती काळ शरीरात राहते आणि कशा प्रकारे शरीरातून बाहेर जाते वगैरे बाबी शिकवल्या जात असाव्यात. आयुर्वेदातल्या फार्मॅकॉलॉजीत हे अशाच प्रकारे शिकवतात का? (आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात पॅरसिटॅमॉल शिकवतात का?)

आयुर्वेदाचे समर्थक बर्‍याचदा अलोपथी लक्षणांवर उपचार करते आणि आयुर्वेद मूळ कारणावर उपचार करतो असा दावा करतात.
वरच्या उदाहरणात जंतू हे मूळ कारण आणि कफ-वात-पित्त यांचे बिघडलेले संतुलन हे रोगाचे लक्षण म्हणावे लागेल. हे पाहता आयुर्वेद लक्षणांवर उपचार करतो आणि अलोपथी मूळ कारणावर उपचार करते असे म्हणावे लागेल. (१९५० मधल्या अलोपथीबाबत कदाचित असे म्हणता येत असेल).
[क-वा-पि यांचे संतुलन बिघडल्यामुळे ते तुमचे जंतू वरचढ होतात असे स्पष्टीकरण देऊन तेच मूळ कारण आहे असेही म्हणता येईल]

*ऍ बघायला आवडत नाही म्हणून अलोपथी असे लिहिले आहे.
डिस्क्लेमर : मी डॉक्टर, वैद्य, होमिओपाथ काहीही नाही. वरची सगळी माहीती ऐकीव/वाचीव आहे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

हो

जंतुसंसर्ग हे लक्षण, त्रिदोष हेच मूळ कारण, असे सांगतात. सूक्ष्मदर्शकाआधी चश्म्याचा शोध लागतो. ऋषिमुनींना जीवाणू कसे माहिती असणार?
'ऍ ऐवजी अ‍ॅ' टंकण्यासाठी स्क्रिप्ट वापरून बघितलेत काय?

मुभा

( तशी मुभा बीएएमएस वाल्यांना ही आहे. ती कोणत्या आधारावर हे ही माहितगारांकडून जाणून घ्यायला आवडेल. )

माझ्या समजूतीप्रमाणे तशी मुभा नाही. एके काळी मिश्र पद्दतीचे (एकाच वेळी दोन पद्धती) शिक्षण व्हायचे असे मी ऐकतो. तो अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना दोन्ही वैद्यकांची प्रॅक्टीस करण्याची मुभा होती. हा विषय सुप्रीम कोर्टात गेला होता आणि प्रत्येक वैद्यकाने आपली उपचार पद्धती सोडून दुसर्‍यात प्रॅक्टीस करण्यास बंदी घातली होती.

अर्थात आपल्याकडे फारसे कायद्याचे राज्य नसल्याने हे प्रत्यक्षात चालु असते.

प्रमोद

शंतनु अभ्यंकर

डॉ शंतनु अभ्यंकर या होमिओपाथीतुन ऍलोपथी कडे गेलेल्या डॉक्टरचे अनुभव कथन वाचनीय आहे. हे वाईचे रॅशनालिस्ट डॉ. शरद अभ्यंकर यांचे ते सुपुत्र आहेत.

प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

डॉ शंतनु अभ्यंकरांचे आत्मकथन अप्रतिम आहे. या वाचनानंतर होमिओपॅथीवरची सर्व चर्चा थांबल्यासारखीच आहे. --वाचक्‍नवी

खरे आहे.

+१
हेच म्हणतो.

प्रमोद

लेख

सापडत नाही

असेच असेच असेच...

शंतनू अभ्यंकरांचा लेख अप्रतिम आहेच आणि त्याने होमिओपॅथीवरची चर्चा थांबवली आहेच पण तो अतिशय स्फूर्तिदायकही वाटला. या दुव्याबद्दल अनेक आभार.

-सौरभ.

==================

+

+२

बरोबर आहे.
||वाछितो विजयी होईबा||

डॉ. जी.डी. आपटे

डॉ. जी.डी. आपटे हे १९३० ते १९६० या काळात पुण्यामधे एक अतिशय विख्यात डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. या डॉक्टरांनी एम.बी.बी.एस करून काही वर्षे ऍलोपाथीची प्रॅक्टिस केल्यावर ती थांबवून होमिओपाथीचा अभ्यास सुरू केला व सर्व रोग्यांना तीच ट्रीटमेंट ते देऊ लागले. मी स्वत: त्यांची औषधे वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत घेत आलो आहे. नंतर मी पुणे सोडले व नाईलाजाने ऍलोपाथी औषधे घ्यावी लागली. होमिओपाथी औषधांचा प्रभावीपणा मी स्वत: अनुभवलेला आहे.
गंभीर आजार किंवा सीव्हीअर लक्षणे असताना होमिओपाथी औषधे घ्यावी असे कोणीच सांगणार नाही. पण काही विशिष्ट चिवट रोगांवर होमिओपाथी सारखी औषधे नाहीत असे मला वाटते. काही रोगांच्यावर तर ऍलोपाथीमधे औषधेच नसतात. अशा ठिकाणी होमिओपाथी औषधे रोग्यांना खूपच उपयुक्त ठरतात. अर्थात कोणती उपाययोजना करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे तर खरेच आहे. बाकी टिंगल टवाळी तर काय कोणत्याही गोष्टीची करता येतेच.

चन्द्रशेखर

सुंदर

सुंदर प्रतिसाद!

उदाहरण माहिती होते, पण उगाच कशाला टंका म्हणून टाकले नव्हते. टकल्यांच्या नंदनवनात टकला म्हणून राहणेच योग्य अशा विचाराने ;))

बाकी टिंगल टवाळी तर काय कोणत्याही गोष्टीची करता येतेच.
सहमत आहे.

आपला
गुंडोपंत

अनफॉल्सिफाएबल

ज्या दाव्यांची तपासणी करणे आता कोणालाही शक्य होणार नाही ते करण्यात काय अर्थ? तुम्ही अनुभवले म्हणून जरी ते सत्य मानले तरी पुढे काय? तो एक व्यक्तिसापेक्ष दावा आहे. इतर कोणीही सोम्यागोम्या होमिओपॅथ त्या व्यक्तीसारखे उपचार करू शकत नसेल तर ते विज्ञान नव्हे!
'ऍलोपॅथी'चे दावे असे व्यक्तिसापेक्ष नसतात. डॉक्टरच्या 'हाताला' गुण नसतो.

अनफॉल्सिफाएबल

डॉक्टरच्या हाताचा गुण म्हणजे एक्झॅक्टली काय? असे जर मला विचारले तर मी त्याचे उत्तर असे देईन की रोग्याला काय विकार आहे हे अचूक जाणून त्या प्रमाणे ओषध योजना करण्याची क्षमता त्या डॉक्टरात असणे. अशी क्षमता असलेले डॉक्टर कोणत्याही 'पाथी' मधे असतातच. गुंतागुंतीचा विकार असलेल्या रोग्याला कोणताही सोम्या गोम्या ऍलोपाथी डॉक्टर ओषध योजना प्रभावीरित्या करू शकणार नाहीच. डॉक्टरची क्षमता हा काही त्या उपचार पद्धतीचा गुणदोष असू शकत नाही. होमिओपाथी विज्ञान आहे की नाही हे सांगण्यासाठी आवश्यक ज्ञानपातळी माझी नसल्याने मी त्या विषयावर बोलू शकत नाही. मी माझा स्वानुभव फक्त येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
चन्द्रशेखर

आवश्यक ज्ञानपातळी

होमिओपाथी विज्ञान आहे की नाही हे सांगण्यासाठी आवश्यक ज्ञानपातळी माझी नसल्याने मी त्या विषयावर बोलू शकत नाही.

होमिओपथी विज्ञान आहे की नाही हे सांगण्याइतपत भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र तुम्हाला नक्कीच कळत असावं असं तुमच्या लेखनावरुन वाटतं. पाण्याला 'स्मृती' असते ह्या पायावर होमिओपथीचा डोलारा उभा आहे. विचार करा, आजकालच्या रिसायकलींगच्या दुनियेत पाण्याला जर खरोखरच स्मृती असती तर किती भयंकर प्रसंग ओढवला असता.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

झोमिओपॅथीचे विख्यात डॉक्टर्स

माझ्या परिचयाचे होमिओपॅथीचे अनेक विख्यात डॉक्टर्स होते. नागपुरातले डॉ. पेंढारकर हे त्यातले एक. माझ्या लहानपणी मी कित्येकदा त्यांच्या दवाख्यान्यात गेलो आहे. याच सुमारास आमच्या घराशेजारी एक होमिओपॅथीच्या डॉक्टर होत्या. त्यांच्या दवाख्यान्यात माझे रोजचे जाणे येणे असायचे. हल्ली नागपूरात एका इंजिनियरने हा व्यवसाय सुरु केला आहे. आणि तो निष्णात डॉक्टर (?) म्हणून प्रसिद्ध आहे असे ऐकतो.

यातील पहिल्या दोघांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. त्यांच्या प्रामाणिकतेविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही. मात्र त्यांची उपचाराची, तपासण्याची पद्धत एकदम भिन्न होती. डॉ.पेंढारकरांची अशी पद्धत होती की ते प्रश्न विचारत आणि जशी उत्तरे मिळत तसतसे एक एक बाटली काढून त्यातील काही औषध ते एका ठिकाणी टाकत. सहसा अशा चारपाच बाटल्या झाल्या की त्यांचे औषध तयार होई. अशा एकत्रित गोळ्यांना ते एका बाटलीत भरत. त्या बाटलीला हलवत आणि मग सांगायचे चार-चार गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ. आणि म्हणायचे औषधोपचार चालू असताना कॉफी पिऊ नका. या उलट आमच्या शेजारच्या डॉक्टर नेहमी वेगवेगळ्या पुड्या करून द्यायच्या. त्यांची औषधे एकत्रित केलेली नसायची, मी त्यांना या दोन् पद्धतीतला फरक असण्याचे कारण विचारले. तर त्या म्हणाल्या होत्या की त्यांचे 'बायोकेमी' आहे त्यात असे चालते.

तुम्हाला आपटे डॉक्टरांनी दिलेल्या होमिओपॅथीच्या औषधांचा खूप फायदा झाला. ठिकठिकाणी अनेक होमिओपॅथीचे डॉक्टर्स प्रॅक्टीस करत असतात त्यांच्याकडे तुम्हाला जावेसे वाटले नाही. यातच त्या वैद्यकाचे सार आले असे मला वाटते. या उलट आधुनिक वैद्यकातल्या डॉक्टर्स कडे आपण त्यांचे नाव नीट न पाहता जाऊ शकतो. (वेगळ्या गावी गेल्यावर.) एकाचा सल्ला दुसर्‍यास दाखवू शकतो त्याचे मत घेऊ शकतो. माझ्या माहितीच्या सर्व निष्णात होमिओपॅथीच्या डॉक्टर्स नेमके काय औषध देतात, काय झाले आहे (निदान) असे ते म्हणतात या बद्दल रोग्यांना फारसे माहित नसते. केवळ गुण येतो हेच माहित असते.

मी असे मानायला तयार आहे की होमिओपॅथीचे अमुक औषध अमु़क रोगावर गुणकारी असू शकेल. मात्र हे माहित असेल तर त्यावर सहज चाचण्या होऊ शकतात. याला मेडिकल एथिक्स कमिटीचा फारसा विरोध नसणार. ही चाचणी कुठे विदेशात करायची गरज नाही. आपल्या कडे सहज ही होऊ शकेल. पण हे करण्यास कोणीच तयार नसतो असा माझ्या अनुभव आहे. या चर्चेदरम्यान अशी चाचणी करण्याची कोणाची तयारी असल्याचे कळले तर त्याचे मी स्वागत करीन.

प्रमोद

होमिओपथी प्रात्यक्षिक

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

होमिओपाथी एक थोतांड

'होमिओपाथी एक थोतांड' अगदी बरोबर!
वा! काय ओपण डोळे उघडणारा लेख आहे. फार सुंदर!

बाकी जे काही इंग्लंडात आहे ते १००% खरे असणार, यात संशय नाही!
ते आपण घेतले पाहिजे.

त्या होमिओपाथीच्या आजिबात नादी लागू नये.

काय अधिकारवाणीने लिहिलेला लेख आहे, वा!
मी म्हणतो, सर्व लेखकांनी याची दखल घेतली पाहिजे.

असो, तुम्ही कोणत्या प्रकारचे वैद्य आहात हो साहेब?

आपला
गुंडोपंत
~काही वेळा काही लोकांना 'हो ला हो' केले बरे असते. कुठे डोके लावत बसा? आधुनिक वैद्यकाच्या संधीसाधूंनी खिसा आणि गळा कापला, की हे 'फुकट' तोंडपाटिलकी करणारे आपसूक गपचित बसणार!~

इंग्लंडातील खरे

होमिओपॅथीचा जनक व त्यानंतरचा मुख्य प्रवर्तक हे जर्मनी आणि अमेरिकेतले होते. तेव्हा तुमच्या इंग्लडाचा वार त्यांनाही लागतो.

मी कुठल्याही प्रकारचा वैद्य नाही. अभियंता आहे.

प्रमोद

अपत्यप्राप्तिसाठी होमिओपथी .....?

खी खी खी

विनोदी चित्र. ऍलोपथीसाठी हेच चित्र काढायचे झाले तर बेंबीत इंजेक्शन खुपसणारा एम एस सर्जन दाखवावा लागेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

होमिओपथी हे थोतांड असावे...

होमिओपथी हे थोतांड असावे हे मत चाकोरीबद्ध विचार केला तरी पटू शकते. पण 'डॉक्टरचा हातगुण', 'डॉक्टरवरील विश्वास' या गोष्टी अलोपथीलाही लागू पडतात.
आज-कालतर अलोपथिक 'डॉक्टरवरील विश्वास' ही गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे.
एकतर बर्‍याच अलोपथिक डॉक्टरांकडे योग्य निदान करण्याचे ज्ञान नसते. सर्व तर्‍हेच्या चाचण्या करूनही त्यांना रोगनिदान करता येतेच असे नाही.
अर्धवट रोगनिदानावर ते वेगवेगळ्या औषधांचा मारा करून पहातात.(तापासारख्या आजारावरही स्पेशालिस्ट डॉक्टर्स चाचपडताना दिसतात.
हृद्रोगासारख्या जुनाट आजारावर तर कधीकधी गरज नसतानाही तातडीच्या शस्त्रक्रियेचा सल्ला मिळतो.)
रोगनिदान करता आले तरी योग्य उपचार काय असावेत? याबद्दल ज्ञान नसते.-किंवा- आपल्या आर्थिक फायद्यासाठी ते भलतेच महागडे उपाय सुचवतात.
यामुळेच विज्ञानावर 'श्रद्धा' असलेले आणि अलोपथी हे विज्ञान आहे असे जाणणारे लोकही एका डॉक्टरच्या सल्ल्याची खात्री दुसर्‍या डॉक्टरकडून करून घेतात.
(सेकंड, थर्ड, ... एन्थ ओपिनियन).
एका दृष्टीने अलोपथिक डॉक्टर्स आणि वैदू यांच्यातला फरकच नाहीसा होत चालला आहे.

विज्ञान योग्य मार्ग दाखवू शकते. पण त्यावर चालण्याची सद्सद्विवेकबुद्धी शिकवू शकत नाही. कारण विज्ञान ही आचारप्रणाली नाही.
सामान्य लोकांना अवैज्ञानिक रोगनिदान आणि उपचारपद्धतींकडे ढकलण्यास अलोपथीचा अशास्त्रीय आणि अंधाधुंद वापर कारणीभूत होत आहे काय?
याचाही विचार व्हावा असे वाटते.

दवा की नही दुवाँ की जरुरत है

एका दृष्टीने अलोपथिक डॉक्टर्स आणि वैदू यांच्यातला फरकच नाहीसा होत चालला आहे.

पूर्णपणे सहमत. भरमसाट फिया आकारणारे डॉक्टर नेमके निदान का करु शकत नाहीत हा प्रश्नच आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणखी

अलोपथिक 'डॉक्टरवरील विश्वास' ही गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे.
याचे आणखी एक कारण म्हणजे स्वतःचे औषध खपवण्यासाठी औषध कंपन्या कुठल्या थराला जातील सांगता येत नाही.

हेच म्हणतो

सामान्य लोकांना अवैज्ञानिक रोगनिदान आणि उपचारपद्धतींकडे ढकलण्यास अलोपथीचा अशास्त्रीय आणि अंधाधुंद वापर कारणीभूत होत आहे काय?
याचाही विचार व्हावा असे वाटते.

विसुनाना हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या जबरदस्त फीया, तपासण्यांचे चक्र, फॉलो अप साठी जाणे या चरकात सामान्य माणुस थकुन जातो/ पिळून निघतो. मग तो पर्यायी उपचार पद्धतीकडे वळतो.
प्रकाश घाटपांडे

ही गोष्ट थोडीफार खरी आहे.

जेव्हा बरेच दिवस अ‍ॅलोपथीचे उपचार घेऊन दुखणे बरे होत नाही, तेव्हा रोगी नाइलाजाने दुसर्‍या उपचारपद्धतीचा विकल्प स्वीकारतो. याबद्दलची दोन उदाहरणे देण्यासारखी आहेत.
एक बाळ जन्माला आले तेव्हा त्याने एकच डोळा उघडला होता आणि दुसरा एक दिवसाने. पुढे तो दुसरा डोळा लहानच राहिला आणि मूल चारपाच वर्षाचे असताना त्या डोळ्यात एक बारीक पुटकुळी(Sty) उपटली. महिनादोन महिने अ‍ॅलोपथी नेत्रतज्‍ज्ञाने सांगितलेली औषधे डोळ्यात टाकून स्थितीत काहीही फरक पडला नाही. शेवटी त्याच अ‍ॅलोपॅथिक डोक्टराने होमिओपथी डॉक्टराकडे पाठवले. एका आठवड्यात साबूदाण्याच्या गोळ्या खाऊन पुटकुळी अर्धी झाली, आणि पुढे आणखी दोन आठवड्याने पूर्ण वितळली. अगदी असेच दुखणे असलेल्या अमेरिकेतल्या एका रोग्याच्या डोळ्यातली पुटकुळी अ‍ॅलोपथी उपायांनी अनेकदा बरी झाली, पण पुनःपुन्हा उद्भवत राहिली. शेवटी औषधांनी डोळ्याचे पारपटल(Cornea) खराब झाले आणि पुनरारोपणसकट अनेक शस्त्रक्रियांनंतर डोळा कायमचा गेला.

पायाला झालेल्या फोडांमुळे डॉक्टरच्या वार्‍या करणार्‍या एका रोग्याला, ज्या रिक्षाने तो चालला होत्या त्या रिक्षाचालकाने सागरगोट्यांची पूड (बहुधा मधातून)खाण्याचा सल्ला दिला. दुखणे कायमचे बरे झाले. आता पेशंटने आपल्या घरात सागरगोट्याचे झाड लावले आहे.

अर्थात ही किरकोळ वैयक्तिक उदाहरणे. यावरून कुणीही ठोस निष्कर्ष काढू नये. --वाचक्‍नवी

संभाव्य दुष्परिणाम आणि खर्चांचा हिशोब

संभाव्य दुष्परिणाम आणि खर्चांचा हिशोब हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.

"बाजारात प्लासिबोची किंमत सुयोग्य कशी काय ठरवावी?" हे कोडे मला थोडेसे बेजार करते आहे.

- - -
माझ्या मित्राने हल्लीच मला ही दु:खांत कथा सांगितली. त्याच्या जवळच्या नात्यातली एक तरुणी अनपेक्षित लहान वयात मेली. तिला अनेक वर्षे "र्‍ह्युमॅटॉइड" संधिवाताचा त्रास होता, आणि "ऍलोपॅथी"चा औषधोपचार चालू होता. औषधोपचार आयुष्यभर चालू राहाणार असे काहीसे माहीत होते.

पुढे तिच्या वडलांना नैसर्गिक कंदमुळांच्या उपचाराबद्दल अतिशय रुची निर्माण झाली. ते गृहस्थ त्याचा अभ्यासही करू लागले. हा औषधोपचार घेण्यासाठी ऍलोपॅथिक औषध थांबवावे लागते. त्यातून केवळ दाबलेली विषे बाहेर पडतात, दुखणे बरे होण्यापूर्वी वाढू शकते, असे म्हणतात. (ही बाब काही होमियोपथी-वालेही सांगतात, म्हणून ही कथा येथे अवांतर वाटू नये.)

औषधे बंद केल्यावर काही काळाने मुलगी फार आजारी पडली. (मित्र डॉक्टर असल्यामुळे त्याने ज्या हॉस्पिटलात मृत्यू झाला तिथून अधिक माहिती मिळवली - यकृत आणि प्लीहा ही इंद्रिये खूप सुजली, रक्तातील धवलपेशींचे प्रमाण खूप कमी झाले. मित्राच्या मते "फेल्टी"ने वर्णन केलेला संधिवाताचा विकोप होता. याचा उपचार शक्य आहे, उपलब्ध आहे.) "दुखणे बरे होण्यापूर्वी वाढते" म्हणून आई-वडील धीर धरून बसले. जीव हातातोंडाशी आला तेव्हा हॉस्पिटलात मुलीला भरती केले. नसेतून औषधे, रक्त देणे वगैरे उपचार सुरू झाले, पण काही दिवसांत मुलीस मृत्यू आला.

या शोकांतामध्ये कडवट व्यंग्याची घटना त्याने सांगितली : तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला नातेवाइकांचे दोन तट पडले (गुपचूप-गुपचूप. भांडणे नाहीत.) एकात असे की ज्या औषधांवर तिचा जुनाट आजार स्थिरावला होता, ती बंद करण्यात वडिलांनी चूक केली. दुसर्‍या तटात असे की रोग बरा होण्यापूर्वी वाढत होता. अशा परिस्थितीमध्ये तिला पुन्हा हॉस्पिटलात आणून वडिलांनी चूक केली!
- - -

जुनाट दुखणी, "जीवनमाना"ची दुखणी, अशा बाबतीत माझा असा विचार असे... "अस्मि"ता आणि स्वयं-नियंत्रणाची भावना वाढवणारे प्लासीबो असतील, तोटे फार कमी असतील, तर फायद्या-तोट्याच्या हिशोबात फायद्याचेच पारडे थोडेसे भारी येऊ शकेल.

मात्र हा हिशोब करणे कठिणच. आणि अन्य उपचार करणार्‍यास किती मोबदला वाजवी असतो? हादेखील कोड्यात टाकणारा प्रश्न आहे.

होमीओपथि-मर्यादा आणि विपरीत परीणाम

वैद्यकशास्त्रात एक म्हण आहे, " जो बरा करतो, तो बरोबर असतो ".त्यामुळे ज्या उपचारपद्धतीने रोग बरा होतो, ती योग्य व विश्वास ठेवण्यासारखी,तसेच तो/ती वैद्य/ डॉक्टर रोगनिदान बरोबर (अचूक )करतो/करते असे रोग्याला वाटते.सर्वच रोगांच्या बाबतीत असा अनुभव येईल असे नाही.पूर्वीच्या आजीबाईंच्या बटव्यात लहान-सहान दुखणी ( सर्दी,खोकला,पोटदुखी,इ.) बरी करता येतील अशी घरगुती औषधे असायची.हल्लीच्या आई-वडीलांना ती औषधे ठाऊक नसतात, सुशिक्षित असल्यामुळे त्यावर विश्वासही नसतो.मग त्वरीत परीणाम दाखवणारी ,पण ओव्हरडोसेसमुळे शरीराचे संतुलन बिघडवणारी औषधे व ते देणारे डॉक्टर ( जे बहुतेकवेळा रोग्याच्या शरीरप्रकृति/ प्रवृत्ति/सवयी याची चिकित्सा करतच नाहीत) यांच्यावर अवलम्बून राहतात.वेळेचा अभाव आणि जास्तीचा पैसाही याला कारण होतो.होमिओपथिक डॉक्टर रोग्याच्या प्रकृति चिकित्सा करण्यावर रोगाचे मूळ शोधण्यासाठी भर देतात.निष्कर्ष /निदान व औषधाची मात्रा/योजना अनुभवावरच ठरते.( मी डॉक्टर नाही.)

लक्षणांवर उपचार करणारी होमिओपॅथी

होमिओपॅथीत औषध शोधनाची एक स्वतःची पद्धत आहे. त्याला ते प्रुविंग असे म्हणतात.

या पद्धतीत औषध मूळ स्वरुपात निरोगी व्यक्तिंकडून खाल्ले जाते. त्यानंतर ती निरोगी व्यक्ति आपल्याला काय काय होते याची नोंदणी करते. अगदी बारिबारिक खाज त्यात नोंद केली जाते. उदा. मीठ खाल्यावर शरीरावर काय परिणाम होतात याचा शोध घेताना जवळपास १०० लक्षणे (आकडा माझ्या आठवणीतून) नोंदली गेली.
सुमारे १००-१२५ वर्षापूर्वी अमेरिकेत यावर भरपूर प्रयोग झाले. असे म्हणतात की काही निरोगी लोकांनी आर्सेनिक सारखे विष खाऊन लक्षणे नोंदवली. काही लोकांच्या प्रकृतीवर याचा गंभीर परिणाम झाला.

या लक्षणांपासून उपचार कसा केला जातो. हेच होमिओपॅथीचे सार आहे. त्यांचे म्हणणे असे की जेंव्हा औषधे पूर्ण स्वरूपात घेतली जातात आणि जी लक्षणे येतात; तीच लक्षणे कुठल्या रोगात येणार असतील तर त्या रोगावर ते औषध असते. म्हणजे समजा मिठाने अमुक ठिकाणी खाज सुटत असेल आणि कुठल्याशा रोगात तशीच खाज सुटत असेल तर त्या रोगावर मीठ हे औषध ठरू शकेल. ज्याकाळी ही औषधे प्रूव केली गेली त्याकाळी बाह्य लक्षणांवरून त्यांच्या नोंदी होत असत. (अजूनही तेच होत असावे. किंवा प्रुव करण्याचे कष्ट कोणी घेत नसतील.)

आता होमिओपॅथी ही रोगाच्या लक्षणांवर उपचार न करता ती मुळावर घाला घालते हे कुठल्या तर्कशास्त्रात बसते हे माहित नाही. रोगाचे मूळ कुठले याविषयी त्यांच्या ग्रंथात काही लिहिले आहे का? आणि ते कसे दूर केले जाते यावर त्यांचा काही विचार आहे का? अर्थात अशी चर्चा करण्यास होमिओपॅथ समोर लागतो. तोच नसल्यावर काय करणार.

प्रमोद

-१

टिपिकल साहित्यिक थाटाचा प्रतिसाद.
>>पूर्वीच्या आजीबाईंच्या बटव्यात लहान-सहान दुखणी ( सर्दी,खोकला,पोटदुखी,इ.) बरी करता येतील अशी घरगुती औषधे असायची

मान्य. पण लहान सहान दुखणी हे शब्द महत्त्वाचे. प्रत्येक आजीबाईकडे तो बटवा (ज्ञान) असायचाच असे नाही.

>>हल्लीच्या आई-वडीलांना ती औषधे ठाऊक नसतात,

ठाऊक असतात.

>>सुशिक्षित असल्यामुळे त्यावर विश्वासही नसतो.

असे काही नाही. आम्ही तरी वापरून पाहतोच. (हिंग, पादेलोण, ओवा, लवंग, मेथी, लसूण आणि सूतशेखर, त्रिभुवनकीर्ती, कुटजारिष्ट, अडुळसा इत्यादि) आमची मुलगी २-३ वर्षांची होईपर्यंत म्हणजे तिला नक्की काय होत आहे ते ती नीट सांगू शकत नसे तेव्हा ती आजारी पडल्यावर आम्ही तिला डॉक्टरकडे नेत असू. तेव्हा डॉक्टर जे काही औषध देईल ते तिला देत असू. ती ५ वर्षाची झाल्यापासून प्रत्येकवेळी आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जावे लागत नाही. घरगुती औषधे आणि/किंवा अलोपथीतली साधारण औषधे घेऊन काम भागते. लहानपणी 'मोठी' औषधे घेतल्याने आता 'साध्या' औषधांनी गुण येत नाही असे झालेले नाही. तसेच शरीराचे संतुलनही बिघडलेले दिसत नाही. हीच गोष्ट आम्हा उभयतांबाबतही खरी आहे.

>>मग त्वरीत परीणाम दाखवणारी ,पण ओव्हरडोसेसमुळे शरीराचे संतुलन बिघडवणारी औषधे व ते देणारे डॉक्टर ( जे बहुतेकवेळा रोग्याच्या शरीरप्रकृति/ प्रवृत्ति/सवयी याची चिकित्सा करतच नाहीत) यांच्यावर अवलम्बून राहतात.

परिणामच न दाखवणार्‍या औषधांपेक्षा बरे. दुसरे म्हणजे हल्लीचे डॉक्टर किरकोळ आजारावर 'मोठी' औषधे देतात असा काहीसा समज पसरलेला दिसतो. आपण जर नेहमी एकाच डॉक्टरकडे जात असू तर डॉक्टर व्यवस्थित उपचार करतात असा माझा अनुभव आहे.

भारतात डॉक्टरला ज्ञानाची फी देण्याची पद्धत नाही. "जा, तुला काही विशेष झालेले नाही, दोन दिवस रात्री इसबगोल घे" असे सांगून डॉक्टरने ५० रु मागितले तर पेशंटला ते रुचत नाही. पण काहीतरी औषधे देऊन १०० रु मागितले तर पेशंटला ते चालते. या वास्तवाचाही परिणाम डॉक्टरांवर होत असावा.

त्वरित परिणाम दाखवणार्‍या औषधांची गरज रोग्यालाही सध्याच्या सामाजिक + आर्थिक वास्तवाने वाटत असावी. काही वर्षांपूर्वी ग्रामीणभागात जाऊन प्रॅक्टिस करू पाहणार्‍या डॉक्टरांची आत्मवृत्ते प्रसिद्ध झाली होती.त्यातही अशाप्रकारे इंजेक्शनचा आग्रह धरणार्‍या पेशंटविषयी लिहून ते कसे मूर्ख आहेत असे म्हटले होते. खरे तर त्या पेशंटांचीही त्वरित आराम ही आर्थिक गरज असावी. साधे औषध आणि तीन-चार दिवस विश्रांती हे ऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये काम करणार्‍यांनाच शक्य आहे-तेही नव्या अर्थव्यवस्थेत अवघड होत चालले आहे. अन्-ऑर्गनाइज्ड सेक्टरमधल्यांना दणदणित औषध, एक दिवस विश्रांती आणि दुसर्‍या दिवशी कामावर हेच परवडू शकते.

होमिओपाथीचे डॉक्टर रोगाचे मूळ शोधतात हा अगदीच पोकळ दावा आहे. दुसर्‍या एका प्रतिसादात हे दाखवले गेलेच आहे. रोगाचे मूळ शोधण्याचा दावा खुद्द हॅनेमन यांनी पण कधी केला नाही. 'लक्षणांसारखेच परिणाम घडवणारी द्रव्ये' हाच होमिओपाथीचा पाया.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

उत्तरे

अशा चर्चेने काही साध्य होईल असे वाटत नाही. प्रमोद सहस्रबुद्धे आणि रिकामटेकडा यांनी सर्चच्या दाव्यांना दिलेली उत्तरे इथे पहायला मिळाली तर चर्चा पुढे सरकेल.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

+१

खरे आहे. होमिओपाथीच्या औषधांबद्दल जो आक्षेप आहे त्याची दुसरी बाजू होमिओपाथीवाल्यांकडून आल्याशिवाय इथे प्रमोद सहस्त्रबुद्दे यांचे आक्षेप व मते इतकाच अर्थ आहे.

होमिओपाथीचा चांगला अनुभव काही उपचारात जेव्हा कोणाला आला आहे, त्याला सगळ्यालाच प्लासीबो म्हणणार असतील तर मग सहस्त्रबुद्देंच्या कथनावर तितका विश्वास नाही.

अर्थात निदान होमिओपाथीची जी औषधे निर्विवाद गेली काही वर्षे व्यवस्थित काम करत आहेत त्याची यादी वेगळी केली पाहीजे.

किंवा निदान प्लासीबो हाच प्रभावी उपचार समजावा जो समजा होमिओपाथी उत्तम करु शकते. शेवटी रोग व्यवस्थित बरे होणे महत्वाचे नाही का?

आजही बरेचश्या रोगांवर ऍलोपाथी मात करु शकतेच असे नाही. भले एका वर्गात ऍलोपाथी नामक विद्यार्थी पहीला येत असेल पण आयुर्वेद व होमिओपाथी हे फक्त नापास होणारे विद्यार्थी आहेत असे वाटत नाही.

समजा एखादी अतिशय गुंतागुंतीची केस असेल तर एखादा उत्तम/ प्रतिथयश / ज्याच्याबद्दल ऐकले आहे असे ऍलोपाथी, होमिओपाथी, आयुर्वेद, (अजुन काही ऐकलेले भारी) अश्या सगळ्या डॉक्टरांना एकत्र करुन जे योग्य वाटते ते उपचार करायला लावणे. सर्व औषधे एकमेकांना सांगुन सवरुन की जेणे करुन कुठली दोन भिन्न औषध विपरीत परीणाम करणार नाही. अर्थात वर लेखात असलेले एकांगी विचार करणारे कोणतेही डॉक्टर या टिममधे नसतील हे.वे.सां. न.ल.

नेहमीच्या काही आजारांवर उपचार करु शकतील अशी औषधे होमिओपाथीत असावीत असे वाटते. अर्थात हे सिद्ध झाले तर कट्टर विरोध होणे थांबेल. त्यामुळे हे असे एकांगी वाटू शकतील असे लेख येणे थांबेल अशी आशा. किंवा आले तरी ते खालील उदाहरणाप्रमाणे वाटतील.

लहान मुल रडत आहे, त्याला आई-वडील छू मंतर, जादू मंतर, उंदीर पळाला म्हणून शांत करत असतील. व ही कसली २१व्या शतकात जादूटोणा व उंदीर नाहीच आहे. हे कसले खोटारडे आई-वडील. असला आदर्श मुलांसमोर नकोच. ह्या आईवडलांकडून मुलाचा ताबा काढून स्टेट रन चाइल्ड केअरमधे टाका. जादू नाही, उंदीर नाही हे सिद्ध झाले आहे आई-वडील तुरुंगात जाउ दे. ह्या असल्या कट्टर युक्तिवादाचा अजुन उपक्रमींना कंटाळा कसा काय नाही आला?

एखाद्या आजारावर अगदी "प्लासीबो इफेक्ट" असल्याने योग्य उपाय होत असेल तर चांगलेच आहे की. त्यात वाईट काय?

काय् वाईट?

एखाद्या आजारावर अगदी "प्लासीबो इफेक्ट" असल्याने योग्य उपाय होत असेल तर चांगलेच आहे की. त्यात वाईट काय?

वाईट काय याचे उदाहरण धनंजय यांनी दिले आहे. तुम्ही मी प्लसिबो म्हणुन होमिओपथीचे औषध घेतले तरी फार गंभीर रोगांवर असे औषध् घेणार् नाही. पण ज्यांचा "होमीओपॅथीचा गुण् फार् चांगला आहे" (दिल्लीतील् होमीऑपॅथ कॅन्सरचे रुग्ण बरे करतो असा दावा करायचा हे मी भारतात असताना त्याच्याच तोंडी (टीव्हीवर) ऐकले, पण त्याच्या औषधाला तेव्हा मान्यता,स्वीकृती मिळाली नाही हे ही आठवते.) असे म्हणुन् जर् औषधे घेत राहिले तर् फार नुकसानकारक् आहे.

त्याशिवायही, प्लसिबो इफेक्ट खरेच होतो का वगैरे वादाचे मुद्दे आहेतच.

होमिओपथीची औषधे काम करु शकतात् असे प्रयोगाने सिद्ध करणे हाच् योग्य मार्ग् आहे असे मला वाटते.

-Nile

 
^ वर