मनोकायिक आजार आणि आपण

नमस्कार मंडळी,
नैराश्यावरती चालू असलेल्या चर्चेमध्ये मनोकायिक आजार हा विषय निघाला आणि त्यावर काही अजून उहापोह करावा असे वाटल्याने हा नवा प्रस्ताव मांडत आहे.

मी वैद्यक, शरीर, मन या पैकी कोठल्याच विषयात अभ्यास किंवा काम करत नाही. पण माझ्या निकटवर्तीयांपैकी काही समाजसेवा-छंद म्हणून समस्याग्रस्तांना समुपदेशन करतात. त्या योगे मी विविध मानसिक समस्यांमुळे ग्रासलेले काही लोक पाहिले आहेत. त्यांच्यात होणारे बदल अनुभवलेले आहेत. त्यांचे माझ्या परिने नीरिक्षण केले आहे. स्वभावातल्या गुण-दोषांमूळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे पाहिली आहेत आणि ती पुन्हा सांधली जाताना सुद्धा अनुभवली आहेत. माझी खालील मते ही सामन्या माणसाची निरीक्षणे आहेत.

ताण तणाव, नैराश्य, काळजी, अपमान, मनासारखे न होणे, भीति या सारख्या अनेकविध कारणांनी आपल्या मनावर परिणाम होत असतो. तो चिडचिड, झोप उडणे, कशात लक्ष न लागणे, अन्नावरची वासना उडणे आश्या सारख्या मनावरिल परिणामांतून व्यक्त होत असतो. मनावर झालेले हे आघात अनेकदा लवकरच भरुन येतात आणि आपण पूर्वस्थितीमध्ये येतो. मनामध्ये तयार झालेली ही अव्यवस्था अधीकधी जास्त काळ टिकते अथवा तीव्र असते आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. अर्थातच मनाच्या स्थितीचा परिणाम शरीराबर झालेला दिसणे यामध्ये काळ किती जावा याचे गणित नाही. कधी कधी तो परिणाम लगेच दिसतो. तो काही काळ टिकतो जसे घशाला कोरड पडणे, तर कधी दीर्घकाळ टिकतो जसे रक्तदाबाचा विकार जडणे.

परिक्षेला जाताना भूक नसणे, पेपर समोर आल्यावर डोळ्यासमोर अंधारी येणे, मळमळणे, घाम फुटणे ही लक्षणे उत्तरे देता यायला लागल्यावर नाहिशी होतात. म्हणजे शरीराने जी प्रतिक्रिया दिली ती कमी काळासाठी होती. (हा अनुभव मी अनेक वर्षे अनेक वेळा घेतला आहे :)
भीतीने अंगावर काटा येणे, चेहरा पांढरा पडणे, हातपाय लटपटणे, हातापायातला जीव जाणे, चक्कर येणे आणि शेवटी बेशुद्ध पडणे.
निराशेने झोप उडणे, अन्न न पचणे, वजन घटणे.
दु:खातिरेकाने रडायला येणे, आतडी पिळवटून निघणे, रक्तदाब वाढणे हे सुद्धा आपल्या अनुभवाला येते.

अनेकदा अचानक बसलेल्या मानसिक धक्याने काहींची रक्तातली साखर वाढते, रक्तदाब वाढतो, अर्धांगवायूचा झटका येतो, हृदयविकाराचा झटका येतो. असे गंभीर परिणाम मात्र शरीरावर पुढे अनेक वर्षे टिकतात आणि दुर्दैवाने कधीकधी शेवटपर्यंत साथ देतात.
वारंवार किंवा नेहमीच सोबत असलेली सर्दी, कोरडा खोकला यांचे सुद्धा मुळ काही वेळा मनात दडलेले असते.
अचानक आलेल्या अपयशाने अथवा इतर कारणाने मनाला धक्का बसून काही वेळा कोलायटिस सारखे आजार होतात तर कावीळ अथवा पंचनसंस्थेचे इतर आजार होवू शकतात.

लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला या सारख्या गोष्टी दिसतात. लहान मुलांवर कुटुंबातले बेबनाव, तणाव, भांडणे, अबोले खुप परिणाम करत असतात. आपल्याला अनेकदा वाटते की त्यांना हे समजले नसेल. पण तपशील कळाले नाहित तरी घरातल्या मानसिक वातावरणाचा त्यांच्यावर लगेच परिणाम होत असतो. अश्या स्थितीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने तोंडात बोट घालणे, तोत्रेपणा, अनेक काळ टिकणारा बोबडेपणा, रात्री अंथरुण ओले होणे असे शारीरिक परिणाम दिसू लागतात.

मनावरचा पहिला परिणाम अनेकदा आपल्या पचनसंस्थेवर झालेलाच आपल्याला अढळतो. म्हणजे आपल्या भरणपोषणाची जी प्रमुख संस्था आहे तीच अनेकदा मनाच्या असमतोलामुळे प्रभावित होते.

अनेकदा वेगळ्या कारणाने झालेले आजार मानसिक अस्वस्थ्यामुळे बाळावू शकतात अथवा बरे होण्यास जास्त काळ घेतात.

मनाच्या या विचित्र अवस्थेचा शरीरावरचा सर्वात मोठा आणि भयानक परिणाम म्हणजे आत्मघात ! दुर्दैवाने वेळीच उपचार न मिळालेले कितीक लोक या परिणामाला बळी पडलेले आपण वृत्तपत्रात वा प्रत्यक्षात पाहतो.

तर मंडळी, या सारख्या अनेक समस्या ज्यांचे मूळ मनात आहे, आपल्या अनुभवास येतात. या समस्यांची जंत्री करणे हाच फक्त या चर्चेचा हेतू नाही. पण मनाचा शरीराचा काय संबंध? मानसिक अस्वस्थ्याने दुखणे कसे लांबेल? शरीराच्या दुखण्यासाठी मनाला औषध घेणे हे हस्यास्पद आहे ! वगैरे मते आपण ऐकत असतो. तर शरीर-मनाचा संबंध अधोरेखित करावा हा मुख्य हेतू आहे.

आपण या विषयातले तज्ञ असाल तर माझ्या मुद्द्यांचे खंडन-मंडन कारावे. आपला तो अधिकारच आहे. तज्ञ नसाल तरी आपले अनुभव सांगावेत. त्यावर केलेल्या उपचारांचा उहापोह करावा, जालावरील माहितीचे दुवे द्यावेत. आपले स्वागत् आहे.

पुन्हा एकदा सांगतो की माझी वरील मते ही सामन्य माणसाची निरीक्षणे आहेत. कोणाही तज्ञाची मदत न घेता चर्चेसाठी मी मते मांडली आहेत. आपली भर मोलाची आहे.

आपलाच,
-- लिखाळ.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

छान लेख,
मला आवडला.

-निनाद

+१

खूप चांगला लेख आणि विषय. यावर प्रतिक्रिया वाचायला आवडतील.
त्यातून काही सुचले तर नक्कीच लिहीन.

धन्यवाद

अंधश्रद्धा

मनोकायिक आजार व अंधश्रद्धा यांचा जवळचा संबंध आहे. मन आजारी पडू शकतं हे समाजात अजून फारसं पटत नाही. वेड हाच एक मानसिक आजार आहे अशी समजूत दिसते. ज्या रोगाची लक्षणे शारिरीक आहेत पण मूळ मात्र मनात आहे. अशा मनोकायिक वा सायकोसोमॅटिक आजारांवर बर्‍याचदा बुवा बाबा यांचा आधार घेतला जातो. सायकियाट्रिस्ट यांची उपलब्धता, खर्च, सोय, बघता सर्वसामान्य माणूस हा सायकियाट्रिस्टच्या नादी लागत नाही.
प्रकाश घाटपांडे

थोडीशी सहमती

अशा बाबतीत कुठल्या वेगळ्या मार्गाने मन शांत झाले, आणि त्यामुळे मनोकायिक व्याधी दूर झाली, तर त्याला "अंध"श्रद्धा म्हणता येणार नाही. कारण बुवांची सेवा->दुखणे कमी झाले, असे दिसल्यास हा प्रत्यक्षप्रत्ययवाद झाला. तो ठीकच आहे. शिवाय जर हा मार्ग उपयुक्त असून सायकियॅट्रिस्टपेक्षा स्वस्त असला, तर आपण याला अर्थशास्त्राचाही पाठिंबा देऊ.

"अंध"श्रद्धा कधी होईल?
१. वेगळा उपाय सायकियॅट्रिस्टपेक्षा महाग असला, पण त्याच्याकडे दुखणेकरी दुर्लक्ष करेल तर
२. वेगळा उपाय करून दु:ख कमी झाले, पण दूरगामी दु:ख वाढले तर. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरच्या वेदनांमध्ये मनोकायिक अंशही असतो. तो अंश वैद्यकावेगळ्या उपचाराने कमी झाला म्हणून जर दुखणेकर्‍याने मूळ रोगाच्या विकोपाकडे दुर्लक्ष केले तर, दूरगामी नुकसान होऊ शकते.

असे काही नसेल तर अंधश्रद्धा नाही, असे मला वाटते.

अंशतः सहमत


तो अंश वैद्यकावेगळ्या उपचाराने कमी झाला म्हणून जर दुखणेकर्‍याने मूळ रोगाच्या विकोपाकडे दुर्लक्ष केले तर, दूरगामी नुकसान होऊ शकते.

असे काही नसेल तर अंधश्रद्धा नाही, असे मला वाटते.


सहमत आहे.


१. वेगळा उपाय सायकियॅट्रिस्टपेक्षा महाग असला, पण त्याच्याकडे दुखणेकरी दुर्लक्ष करेल तर

या बाबत मत भिन्नता आहेत. यावर डॉ सुधीर कक्कर यांचे एक पुस्तक मनोविकार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी अनुवादित केले आहे त्याचे नांव ' अन्न औषध व उतारा' असे काहिसे आहे. त्यात बुवा बाबा यांच्या बद्दल लिहिले आहे. बेअर फूट डॉक्टर सारखे बाबा बुवा यांचा उपयोग अशी संकल्पना आहे.
भाकित: भविष्यात सायकियाट्रिस्ट हेच बाबा ,बुवा ,महाराज, माताजी. तांत्रिक,मांत्रिक यांना पर्यायी वा पूरक अशी व्यवस्था असणार आहे. प्लासिबोया नमः||
प्रकाश घाटपांडे

वा

भाकित: भविष्यात सायकियाट्रिस्ट हेच बाबा ,बुवा ,महाराज, माताजी. तांत्रिक,मांत्रिक यांना पर्यायी वा पूरक अशी व्यवस्था असणार आहे. प्लासिबोया नमः||

काय बोललात घाटपांडे साहेब! प्लासिबोया नमः

समाजाला काहीतरी मुल्य्वान मिळाल्याशिवाय समाज कोणत्याही व्यक्तीला श्रद्धास्थान बनवत नाही.
मुहुर्तासाठी ज्योतिषा कडे जाऊन काही ग्रेट घडत नाही पण माझ्या साठी महत्वाच्या असलेल्या कामाला या निसर्गातल्या शक्तींचीही जोड आहे हा विचार खूप बळ देणारा असतो.

हा परिणाम मनोकायिकही असु शकतो. "अहो हा साडेसातीचा परिणाम होता शनी जाणार पुढच्या आठवड्यात मग ही तुमच्यावर आलेली रोगराईपण जाणार. आणि रवीची दृष्टी आहे. ठणठणीत बरे होणार असे ज्योतिषाने अधिकारवाणीने सांगितल्यावर अगदी बेडरिडन असलेली माणसेही बरी झालेली पाहिली आहेत.

त्यामुळे मनोविकार असतात असे मानण्यापेक्षा भारतीय विचार पद्धातीनुसार विकार मनोकायिक असतात असेच म्हणणे योग्य.
(मन व शरीर एकाच प्रकारचे आहे व दोघांना नियमनाने काबूत आणता येते हे महत्वाचे.)

आपला
गुंडोपंत

खरे आहे.

सायकियाट्रिस्ट यांची उपलब्धता, खर्च, सोय, बघता सर्वसामान्य माणूस हा सायकियाट्रिस्टच्या नादी लागत नाही.
खरे आहे.
मानसोपचार तज्ञाकडे जावे असा सल्ला जर मित्राने अथवा नातेवाईकाने दिला तर, 'मला वेडे ठरवायला टपले आहेत' असाच सूर ऐकू येतो अनेकदा.

'अगं बाई अरेच्चा' या चित्रपटात नायकाला त्याचा मित्र मानसोपचार तज्ञाची भेट घेण्यास सुचवतो आणि नायक ते लगेच ऐकतो हा मला सुखद धक्का होता :)

समुपदेशकाला अनेकदा आलेल्या मनुष्याला मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा सल्ला देताना तो रुग्ण आणि त्याच्या इतर नातेवाईकांच्या मनाची तयारी करावी लागते. कारण एकदा मानसोपचारतज्ञाकडे गेलो की वेडेपणाचा शिक्का कपाळावर बसेल अशी समजूत असलेले लोकही असतात.

सायकोलॉजीस्ट आणि सायकीयाट्रीस्ट यात भेद असलेला सुद्धा अनेकांच्या लक्षात आलेले नसते. आपल्या आसपास समाजसेवा म्हणुन समुपदेशन करणारे लोक सुद्धा असतात याची सुद्धा जाणिव नसते.

अवांतर : हल्ली शहरातले मानसोपचर तज्ञ समुपदेशन न करता यांत्रिक पणे आलेल्या रुग्णाला औषधे देत राहतात त्यामुळे तो रुग्ण भांबावलेल्या अवस्थेत राहतो अशी सुद्धा तक्रार ऐकली आहे.

-- लिखाळ.

खरे आहे!

अवांतर : हल्ली शहरातले मानसोपचर तज्ञ समुपदेशन न करता यांत्रिक पणे आलेल्या रुग्णाला औषधे देत राहतात त्यामुळे तो रुग्ण भांबावलेल्या अवस्थेत राहतो अशी सुद्धा तक्रार ऐकली आहे.

हे खरे आहे व मी स्वतः नाशकातल्या एका प्रतिष्ठीत एकारांत डॉ. तज्ञा कडे पाहिले आहे.
नंतर विचारल्यावर - "अरे आता वेळ नाहीये मला नंतर पाहू... तोवर जरा गप्पा बसेल म्हणून देतोय"
असे उत्तर दिले होते.

आपला
गुंडोपंत

उत्तम

उत्तम विषय. आवाका बराच मोठा आहे. शरीरावर मनाच्या परीणामांचे सर्वात सोपे उदाहरण म्हणजे परीक्षा किंवा इंटर्व्ह्यूला जाताना आपल्या नाडीचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो. आदिम काळात आपल्या पूर्वजांवर वाघ/सिंह धावून आले तर लवकरात लवकर पळून जाण्यासाठी मेंदूमध्ये विशिष्ट यंत्रणा होती, जिच्यामुळे जीव वाचवता येणे शक्य होते. त्या यंत्रणेचे काही अवशेष अजूनही आपल्या मेंदूत शिल्लक आहेत. फरक इतकाच की आता आपल्यावर येणारी संकटे इतकी जीवघेणी क्वचितच असतात. पण हे मेंदूला ठाउक नसते. मास्तरांना किंवा बॉसला बघून काळजाचा ठोका चुकणे, हातांना घाम येणे यामागचे हे कारण आहे. अशा वेळी ज्या प्रसंगाचा आपण सामना करत आहोत/करणार आहोत त्याचे नेमके स्वरूप लक्षात घेणे आणि त्यानुसार योग्य तो प्रतिसाद देणे हा एक उपाय असू शकतो.
मनोकायिक आजारांमध्ये अल्सर, दमा, इत्यादींचा समावेश आहे. याखेरीज लेखात बरीच उदाहरणे आलीच आहेत. घाटपांडेंनी म्हटल्याप्रमाणे सामान्य माणूस अशा बाबतीत सायकियाट्रीस्टच्या नादी लागत नाही.

संदर्भ : विषादयोग - डॉ. आनंद नाडकर्णी
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

समाज

सायकियाट्रिस्ट यांची उपलब्धता, खर्च, सोय, बघता सर्वसामान्य माणूस हा सायकियाट्रिस्टच्या नादी लागत नाही.

म्हटल्याप्रमाणे सामान्य माणूस अशा बाबतीत सायकियाट्रीस्टच्या नादी लागत नाही.

हे खरे असले तरी भारतातील समाजाला अधिक लागू असावे असे वाटते कारण आपल्या समाजातील घट्ट नातेसंबंधांमुळे एखाद्याला मानसिक का परंतु एखादा असाध्य शारिरीक विकार असला तरी लपवून ठेवावे लागते. एक उत्तम उदाहरण म्हणून खूप लहान असताना पाहिलेली एक घटना विशद करते.

आम्ही रहात असलेल्या परिसरात मुंबईला नोकरीनिमित्त बदलून आलेल्या एका तरुण मुलाचे लग्न झाले. मुलगा चांगल्या सुधारक घरातला. शिकलेला आणि सद्गुणी होता. लग्न ठरवून झाले तेव्हा बायकोही शिकलेली, चांगल्या घरातली आणि व्यवस्थित मॉडर्न दिसेल (आखूड कापलेले केस, फॅशन इ. इ.) होती. दोघांनाही लग्न पसंत होते, इतरांनाही जोडी अनुरुप वाटेल अशीच होती.

लग्नानंतर काही दिवसांतच दर शुक्रवारी या मुलीच्या अंगात देवी येऊ लागली. ही देवी आली की ही मुलगी कपाळावर मळवट भरून काही अर्तक्य बोलत बसल्या जागी घुमत राही. हा प्रकार पाहून या मुलाचे धाबे दणाणले. त्याने आपल्या आणि तिच्या आईवडिलांना बोलवून घेतले. त्यातून कळले की लग्नाआधी या मुलीला असा प्रकार कधीच झाला नव्हता. मग तिच्या आईवडिलांनी याचे खापर राहत्या जागेवर फोडायला सुरुवात केली की या जागेतच काहीतरी असावे. इथून जागा बदला. आता मुंबईतली जागा बदला म्हटल्यावर बदलता येणे थोडे कठिण असते.मग या मुलीच्या आईने बाबा-बुवा उपचार सुरु केले.

पुढे त्या मुलाला त्याच्या काही मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याने मानसिक तज्ज्ञांची भेट घेतली आणि बायकोला तिथे नेले. त्यातून असे बाहेर पडले की या मुलीला शारिरीक संबंधांची इतकी भीती होती की शेवटी देवी अंगात येऊ लागली.

असो, ती जे काही करत होती ते नाटक नव्हते. मनाच्या सुप्त गाभार्‍यात बहुधा देवीला "विषयाने" हात लावणे निषिद्ध मानल्याने तो विचार तिच्या मना शरिरावर राज्य करत असावा. दुर्दैवाने, 'आमची फसवणूक केलीत. मुलाचे नुकसान केलेत' या भावनेतून मुलाकडच्या नातेवाईकांनी ते लग्न मोडले. याचा दोष त्या मुलाला किंवा नातेवाईकांना देणे योग्य नाही कारण तो तरुण मुलगाही मुंबईत एकटा राहत असता, एक परकी मुलगी येऊन घरात आणि समाजात अशी शोभा करू लागते त्याचा कुठेतरी भयंकर त्रास त्यालाही झालाच असावा कारण आपल्या आजूबाजूच्या समाजाला (शेजारी, मित्र, सहकारी) या गोष्टींची कितीही नाही म्हटले तरी उत्तरे द्यावीच लागतात. ज्या आशेने माणूस लग्न करतो आणि अगदी शपथा घेतल्या तरी लग्न झाल्या झाल्या हे आपल्या नशिबी येईल ही कोणाची इच्छाही नसते.

यावरून असे वाटते की

  • प्रत्येक मनाची आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची पद्धत वेगळी असते.
  • समाजरचना आणि सामाजिक मूल्ये मानसिक उपचारांच्या कधीतरी आड येतात.

पुर्णत:सहमत


यावरून असे वाटते की

प्रत्येक मनाची आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची पद्धत वेगळी असते.
समाजरचना आणि सामाजिक मूल्ये मानसिक उपचारांच्या कधीतरी आड येतात.


शब्द अन शब्दाशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

आभार

आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार.

अंगात येणे हे मनाचा कोंडमारा झाल्यामुळे, त्यातून आलेल्या गंडामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी घडते असे मी सुद्धा ऐकले आहे. पण मला या विषयी काही माहिती नाही.

यावरून असे वाटते की
प्रत्येक मनाची आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची पद्धत वेगळी असते.
समाजरचना आणि सामाजिक मूल्ये मानसिक उपचारांच्या कधीतरी आड येतात.
होय मी सहमत आहे. अनेकदा साध्या व्याधी सुद्धा लोक काय म्हणतील या विचाराने निराकरण न करता हळूहळू उग्र रुप धारण करतात.

--लिखाळ.

फारच छान लेख

फारच छान लेख. एकूणच ज्ञानात भरच पडली. पुलेशु.

 
^ वर