होमिओपॆथी एक थोतांड

होमिओपाथी एक थोतांड*

लान्सेट या नियतकालिकातील एका लेखाने होमिओपाथीचे थोतांड परत उघडे केले आहे. होमिओपाथीवर स्वतंत्रपणे झालेले हे एकटेच संशोधन नाही. आता पर्यंत कमीत कमी बारा वेळा असे संशोधन झाले आहे. या सर्व संशोधनातून एकच निष्पन्न झाले आहे की होमिओपाथीची औषधे ही प्लासेबोपेक्षा आÆधक गुणकारी नाहीत. प्लासेबो म्हणजे औषध नसलेली पण औषधासारखी भासणारी वस्तु. ही वस्तु रोग्यास दिली तर केवळ मनाने उभारी येऊन तो बरा होऊ शकतो. पण या बरे होण्यात प्लासेबोचा सहभाग नसतो. चाचण्यां मधून प्लासेबो वा औषधे रोग्यास (न सांगता) दिली जातात. जे औषध प्लासेबोपेक्षा जास्त गुणकारी दिसते ते औषध चाचणीत पास करतात.

होमिओपाथीची तत्वे, इतिहास व औषध बनवण्याची पद्धत या सर्वातून होमिओपाथी हे एक थोतांड कसे आहे हे कळायला अडचण येत नाही. वैज्ञानिक विश्वात होमिओपाथी ही एक अंधश्रद्धाच मानली जाते. भारत वा अन्य काही देश सोडल्यास बहुतेक देशांमधे होमिओपाथीचे सरकारमान्य वा विश्वविद्यालयीन शिक्षण दिले जात नाही. केवळ होमिओपाथी शिकलेल्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्यास बऱ्याच देशात बंदी आहे. भारतातही अशा पद्धतीवर निर्बंध असायला हवेत.

इतिहास:

होमिओपाथीची सुरुवात ख्रिश्चन हानमन या वैद्यकाने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस केली. या सुमारासचे वैद्यकशाðा हे विज्ञानाभिमुख नव्हते. रोगी माणसाला जखम करुन त्याचे रक्त वाहु देण्यासारख्या उपचार पद्धती त्यावेळेला प्रचलीत होत्या. अशा वेळी एका निराळ्या मार्गाने उपचार करण्याची पद्धत त्यांनी तयार केली. होमिओ म्हणजे सम किंवा सारखे पाथी म्हणजे यातना वा संवेदना (संवेदना) हा शब्द त्यांनी प्रचारात आणला. त्यावेळच्या गैर व तापदायक उपचार पद्धतीला त्यांनी विरोध केला व नाव ठेवले अॅलो म्हणजे विरुद्ध पाथी. औषधे कशी निवडावीत, कशी तयार करावीत व कुठल्या आजारास कुठली औषधे द्यावीत याबद्दलचे निकष त्यांनी तयार केले.

ज्या पदार्थाने रोगाची लक्षणे निरोगी माणसात येतात तोच पदार्थ त्या रोगाचे औषध असतो हा त्यातील पहिला निकष. या निकषामुळेच त्यांनी आपल्या उपचार पद्धतीचे नाव होमिओ असे ठेवले. औषध जेवढे कमजोर (dilute) तेवढे प्रभावी हा त्यातला दुसरा निकष. हे दोनही निकष होमिओपाथीचे आजचे आधारस्तंभ आहेत. सुरुवातीच्या काळात हानमन हा जितक्या कमजोर प्रमाणात देत होता त्यापेक्षाही अधिक कमजोर प्रमाणात औषधे देण्यास होमिओपाथांनी सुरुवात केली. सध्या हे प्रमाण अशा पातळीवर पोचले आहे की होमिओपाथीच्या औषधांमध्ये औषधच उरले नाही.

औषध तयार करायची पद्धत.

होमिओपाथी म्हणजे साखरेच्या गोळ्या हे बहुतेकांच्या मनात समीकरण दडलेले आहे. या साखरेच्या गोळ्यात नेमके किती औषध असते हा फार महत्वाचा प्रश्न आहे. विचार करा की तुमच्या कडे हिंदी महासागराएवढे पाणी वा द्राव आहे. यात तुम्ही एक चमचाभर औषध टाकले व ते द्रावण व्यवस्थित ढवळले व त्यातील थोडा भाग घेऊन साखरेच्या गोळ्यांमधे टाकले तर ते होमिओपाथीचे औषध होईल. या वर्णनात अतिशयोक्ति असेल तर ती पाणी कमी सांगितल्याची असु शकते. प्रत्यक्षात अर्थातच या पेक्षा वेगळी पद्धत वापरली जाते. दहाच्या पटीत वा शंभराच्या पटीत औषधे कमजोर केली जातात. दहाच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांच्या नंतर एक्स तर शंभराच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांच्या पटीत कमजोर केलेल्या औषधांनंतर सी हे अक्षर लावले जाते. ३०, ६० वा २०० या एक्स ची औषधे आपल्या कडे सर्रास वापरली जातात. ३० एक्स याचा अर्थ औषध एक घेतले तर पाणी वा अल्कोहोल एकावर तीस शून्ये असतील एवढे घ्यावे असा आहे.

विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना ऎवगार्डो संख्या माहित असते. अठरा ग्राम पाणी घेतले तर त्यात सहा वर तेवीस शून्य एवढे रेणु असतात. जर का आपण तीस टन तीस एक्स औषध घेतले तर कदाचित तुम्हाला होमिओपाथीतील औषधाचा एक रेणू मिळू शकेल. ६० व २०० एक्स मधे हे औषधाचा रेणु मिळण्यास बहुदा सूर्यमालेतील सर्व द्राव औषध म्हणून घ्यावा लागेल. हे प्रमाण बघितल्यावर होमिओपाथीच्या साखरेच्या गोळ्यांमधे मूळ औषध नसतेच. त्यामुळे प्लासेबो आणि होमिओपाथीच्या औषधांच्या गुणांमध्ये काहीच फरक का येत नाही हे कळते.

होमिओपाथीच्या औषधावरचे लेबल काढल्यास ते कुठचे औषध होते हे कळण्यास काहीच उपाय नसतो. कारण त्यात मूळ औषध थेबालाही उरले नसते. याच कारणाने होमिओपाथीचे लेबल काढलेले औषध ओळखा व दशलक्ष डॉलर मिळवा असे आव्हान ही दिले गेले आहे. हे आव्हान अजुन तरी स्वीकारले गेले नाही.

निकृष्ट निदान व उपचार पद्धती:

सम लक्षणे तयार करणारे पदार्थ औषधे असतात व औषधांचे कमजोरीकरण हेच सबलीकरण ही दोनही तत्वे वैज्ञानिक पद्धतीवर सिद्ध झालेली नाहीत. कदाचित यामुळेच होमिओपाथी या पंथात अंतर्गत मतभेद व पंथ उपपंथ झाले आहेत. बाराक्षार, इलेक्ट्रोपाथी, आयसोपाथी, मिश्र होमिओपाथी अशी त्यातील काही नावे. औषध सिद्ध करताना लक्षणांचा मोठा अभ्यास केला जातो. पण बहुतांशानी ही लक्षणे प्सोरा वा खाज या प्रकारात मोडतात. ताप, आवाज, रक्तचाचणी, एक्सरे या सारख्यांमुळे मिळालेल्या माहितीचा यात समावेश कमीच असतो. या मुळे ही निदान पद्धती मोठया प्रमाणात ढिसाळ आहे. रोग्यांबरोबर जास्त बोलायचे बरेचदा खूप जाणून घ्यायचे पण निदानात आधुनिक उपकरणांचा वा चाचण्यांचा वापर करायचा नाही. अशी निदान पद्धत निकृष्टच ठरते.

उपचारासाठी जे औषध द्यायचे ते किती द्यायचे याचे होमिओपाथीत फारसे निकष नाही. त्यामुळे रुग्ण एकावेळी वेगवेगळ्या संख्येने गोळ्या घेतात. औषधाचा कमजोर पणा हा निकष आहे. त्यामुळे वेळ पडली तर एका गोळीचे तुकडे करुन घेतले तरी ती चालेल असे असते. होमिओपाथीची औषधे लक्षणांवर आधारित असल्याने ती केवळ लक्षणांवर उपाय करणारी पद्धत आहे असेही म्हणता येईल.

विचित्र औषधे

आपण खातो ते मीठ होमिओपाथीतील एक औषध आहे. लॅक्रिमा फिलिआ नावाचे औषध लहान मुलींच्या अश्रुंपासून बनविले जाते. सीमेक्स लेक्टुरालीस तर कुट केलेल्या ढेकणापासून बनवितात. काही प्राण्यांचे मल मूत्र (मेफिटीस) माणसाचे मूत्र (ऑसिडम युरीकम), कोळीष्टके अशी ही औषधे होमिओपाथीत आहेत. अर्थात या सर्वांचे भरपूर कमजोरीकरण केल्याने ती प्रत्यक्षात पोटात जात नाहीत हा भाग वेगळा.

बरे होणे

होमिओपाथीने लोकांना (निदान काही संख्येने) बरे वाटते असे त्या लोकांचे व होमिओपाथांचे मत आहे. औषध कितीही कमजोर केले असेल तरी हरकत नाही, कार्यकारणभाव माहित नसला तरी चालेल, वाटेल ते औषध दिले तरी चालेल पण बरे वाटते ना? तेवढे पुरेसे आहे असे काहींचे यावरचे मत असू शकेल. लँसेट किंवा तत्पूर्वी केलेल्या संशोधनांमधे हेच तपासले गेले आहे. की होमिओपाथीने बरे वाटते का? वैज्ञानिक चाचण्यांमधून तरी हे सिद्ध होत नाही की होमिओपाथीने बरे वाटते.

मग लोकांना जे बरे वाटते ते का म्हणून. यावरचे उत्तर ते प्लासेबो परिणामाने वाटते असे आहे. कित्येक रोग असे आहेत की ज्यांचे अस्तित्व मानसिकतेवर अवलंबून असते. मानसिक ताण हे काही रोगांचे कारण असते. प्लासेबो घेतल्यावर मानसिक समाधानाने रोग्यांना बरे वाटू शकते. होमिओपाथी हा त्यातलाच एक भाग आहे.

बरे होणे हे एकच निष्पन्न, आणि तेही वैज्ञानिक चाचण्यांमवर टिकत नाही. त्यामुळे होमिओपाथ या चाचण्यांवरच टीका करतात. खरे तर एखादे वचन वैज्ञानिक आहे की नाही हे सिद्ध करायची जबाबदारी त्याच्या उद्गात्याने घेतली पाहिजे. एखादे विधान प्रयोगाद्वारे खोटे ठरविण्याचा प्रयत्न करुनही जर खोटे ठरले जाऊ शकत नसेल तर ते वैज्ञानिक विधान असते असे वैज्ञानिक पद्धती मानते. अशा तऱ्हेने होमिओपाथीतील विधाने सिद्ध करण्याचा प्रयत्न होमिओपाथ करताना दिसत नाही.

औषध जेवढे कमजोर कराल तेवढे ते शक्तिशाली होते हा होमिओपाथीचा सिद्धांत अशातऱ्हेने सिद्ध करणे यासाठी जरुरी आहे. जेंव्हा कमजोर करण्याची क्रिया औषधाचा एक ही रेणू शिल्लक ठेवत नाही तेंव्हा त्यात काय उरते? होमिओपाथांचे यावरचे उत्तर आहे की त्याचे भूत (इंग्रजीत स्पिरिट) राहते हे आहे. हे उत्तर मजेखातर नसून ते पूर्ण पणे विचारपूर्वक दिले गेले आहे. एखादा मांत्रिक व होमिओपाथ यात यामुळे फारसे अंतर राहत नाही. फरक असलाच तर एक इथला मूळचा व रोखठोक अंधश्रद्धा जोपासणारा तर दुसरा परेदेशातून आलेला, वैज्ञानिक भासणारा पण वास्तविक अंधश्रद्धांची जोपासणी करणारा.

होमिओपाथीचे दुष्परिणाम.

होमिओपाथी ही कमजोर केलेल्या औषधांमुळे कुठलाही परिणाम न करणारी आहे. त्यामुळे त्यात दुष्परिणाम ते काय असा प्रश्न पडु शकतो. रोग्यांना सुयोग्य औषधांपासून वंचित ठेवण्याचा दुष्परिणाम मात्र त्यात होत असतो. याशिवाय काही सामाजिक स्तरावरचे दुष्परिणाम भारतात दिसतात.

होमिओपाथीचे शिक्षण हे आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर करावयाचे स्पेशलायझेशन असावे असा प्रघात इंग्लंड मधे आहे. यामुळे असे होमिओपाथ हे आपले पूर्व प्रशिक्षण न विसरता व होमिओपाथीच्या मर्यादा लक्षात घेऊन उपचार करतात व आÆत गंभीर क्षणी रोग्यांना दुसरे उपचार घ्यायला सांगतात.

भारतात होमिओपाथीचे शिक्षण हे या पद्धतीने दिले जात नाही. समज नसलेल्या तरुण वयात, फारसे काही माहित नसताना लोक या पद्धतीच्या शिक्षणाकडे वळतात. जेंव्हा असे तरुण व्यवसायाकडे वळतात तेंव्हा त्यांच्या लक्षात येते की हा धंदा फारसा चालत नाही. मग हेच तरुण डॉक्टर या नावाखाली सर्रास आधुनिक वैद्यकाची औषधे देऊ लागतात. ही औषधे देण्याचा ना त्यांना आÆधकार असतो ना शिक्षण असते. यामुळे मोठया प्रमाणात गैरप्रकार होतात. वैद्यकाने आपली जाहिरात करायची नसते अशी प्रथा आहे. काही होमिओपाथ वर्तमानपत्रातून मोठया जाहिराती देत असतात हा ही एक गैरप्रकारच आहे.

होमिओपाथीत तथ्ये असण्याचा संभव फार कमी आहे. याचा अर्थ कोणी त्यात संशोधन करु नये असा नाही. ही मुभा विज्ञान सर्वांनाच देत असतो. मात्र असे संशोधन वैज्ञानिक निकषांवर सिद्ध होईपर्यंत या प्रणालीचा सार्वत्रिक उपयोग सरकारी खर्चाने केला जाऊ नये ही अपेक्षा करणे मुळीच गैर नाही.

प्रमोद

* काही वर्षांपूर्वी (2005) हा माझा लेख लोकसत्तेत आला होता.

Comments

वा

सुंदर रितीने मत प्रदर्शन केले आहे.

आजही बरेचश्या रोगांवर ऍलोपाथी मात करु शकतेच असे नाही. भले एका वर्गात ऍलोपाथी नामक विद्यार्थी पहीला येत असेल पण आयुर्वेद व होमिओपाथी हे फक्त नापास होणारे विद्यार्थी आहेत असे वाटत नाही.


सहमत आहे!

असे एकांगी वाटू शकतील असे लेख येणे थांबेल अशी आशा
हेच तर म्हणतो.

हा लेख म्हणजे तर निव्वळ स्टंट - प्रसिद्धी साठी केलेले फेकू लिखाण आहे हो!

आपला
गुंडोपंत

वैयक्तिक रोखाचा मजकूर संपादित.

सहमत.

"किंवा निदान प्लासीबो हाच प्रभावी उपचार समजावा जो समजा होमिओपाथी उत्तम करु शकते. शेवटी रोग व्यवस्थित बरे होणे महत्वाचे नाही का? "
+१ माझ्याही मनात हेच विचार येत होते.

"आजही बरेचश्या रोगांवर ऍलोपाथी मात करु शकतेच असे नाही. भले एका वर्गात ऍलोपाथी नामक विद्यार्थी पहीला येत असेल पण आयुर्वेद व होमिओपाथी हे फक्त नापास होणारे विद्यार्थी आहेत असे वाटत नाही."

१००% सहमत.

होमिओपथीवरील विश्वासाचा असाही परिणाम

होमिओपथी हे प्लासिबो उपचार आहेत हे मान्य करून मग पुढे लिहितो.-

मैत्रीतील एका कुटुंबात होमिओपथीवर पूर्ण विश्वास आहे.
ते त्यांच्या लहान मुलांना अलोपथीचे उपचार कधीच देत नव्हते.
केवळ होमिओपाथ जी देईल तीच औषधे देत असत.
मी मात्र अलोपथीवर विश्वासून माझ्या लहान मुलांना डॉक्टरने सांगितलेले उपचार ताबडतोब देत असे.

आता काही वर्षांनंतर त्या कुटुंबातील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती माझ्या मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीपेक्षा अधिक आहे असे आढळून येते.(यामुळे होमिओपथी प्लासिबो आहे हे सिद्ध होते असे वाटते. कसे? ते व्यनिने... ;))

हा वैयक्तिक अनुभव आहे आणि असे असूनही माझा अलोपथीवर विश्वास आहे हे नमूद करतो.
केवळ तिच्या गैरवापरावर माझा आक्षेप आहे.

जुने प्रत्युत्तर

होमिओपाथी एक थोतांड: प्रतिक्रियांना उत्तर

होमिओपाथीला थोतांड म्हटल्याने अनेकांना राग येणे साहजिकच होते. बरेचदा या रागातून आपण अंतर्मुख होतो व दुसऱ्या बाजुने विचार करु लागतो. असे काहिसे होण्यासाठी लोकांचा राग पत्करुन मला होमिओपाथीला थोतांड म्हणणे भाग पडले. लोकसत्तेला मिळालेल्या लिखित वा मौखिक प्रतिक्रियांमधून मला हा राग जाणवला. यापुढची पायरी म्हणजे अंतर्मुख होण्याची ती माझे मित्र गाठतील याविषयी मला आशा वाटते. होमिओपाथीवर केलेली टीका ही काही जणांच्या व्यवसायाच्या आड येत असल्याने ती त्यांना अधिक बोचरी वाटणे हेही साहजिक आहे. ३ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील प्रतिक्रिया हेच दर्शवते.

होमिओपाथी विषयी मी जे काही लिहीले त्याला योग्य त्या संदर्भांचा आधार होता. त्या संदर्भांची यादीही लेखाशेवटी दिली होती. हे संदर्भ डोळ्याखालुन घातल्यास मी जे काही लिहिले त्यांचा आधार नेमका कोठे आहे हे समजण्यास कठीण नव्हते. यातील एक संदर्भ माहितीजालातला (इंटरनेट) मधील होता. त्यामुळे तो मिळण्याची विशेष अडचण नसावी असे मी मानतो. मला विचारलेल्या बहुतेक प्रश्नांमधे हा जावईशोध कोठून लावला अशा धर्तीचे प्रश्न आहेत, संदर्भ आधीच दिले असल्याने ते परत देण्याची आवश्यकता नाही.

होमिओपाथीवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. हानमन, केण्ट यांचे ग्रंथ हे होमिओपाथांसाठी महत्वाचे ग्रंथ समजले जातात, त्यात उपचार व औषधांबद्दल बरीच माहिती आहे. गावच्या मांत्रिकाचे असले ग्रंथ नसतात हे खरेच. पण केवळ असे ग्रंथ असणे होमिओपाथीला विज्ञान ठरवत नाहीत. तसे असते तर ज्योतिषशाðा, हस्तसामुद्रिक, अल्केमी, न्युमरोलॉजी, क्रिएशनिझम आणि गूढविद्या अशासारख्या विषयांना सहज विज्ञान म्हणता येईल. होमिओपाथीवर अनेकांचा विश्वास आहे हे ही त्यास विज्ञान ठरवु शकणार नाही. म्हणूनच एखाद्या सार्वजनिक इस्पितळात होमिओपाथीची गर्दी असणे, हे याविषयी काहीच सांगत नाही. कदाचित अशाच ठिकाणी कोणी अल्पदरात भविष्य सांगण्याचा व्यवसाय केला तर तो ही असाच यशस्वी होईल.

होमिओपाथीला विज्ञान म्हणण्यासाठी हे सर्व महत्वाचे नाही. महत्वाचे आहे की त्यातील संकल्पना परत परत करुन पाहता येणाऱ्या प्रयोगातून त्यातील संकल्पनांना सबळ पुरावे मिळाले पाहिजेत. होमिओपाथीला नेमके हेच जमले नाही. आतापर्यंतच्या चाचण्यात होमिओपाथीच्या पदरात निराशाच पडली आहे. मी यापुर्वी दिलेल्या माहितीजालातील संदर्भात हे व्यवस्थित दिले आहे.

माझ्या पात्रतेचा काढलेला प्रश्न, व माहिती केवळ पात्र माणसाच देऊ असे सांगणे हे दुर्दैवी आहे असे मी समजतो. विज्ञानाची ही रीत नाही. माहितीचा मुक्त प्रसार, किंबहुना ती प्रकाशित करणे हीच विज्ञानाची परंपरा आहे. यात अपवाद फक्त व्यावसायिक गुपितांचा होतो. सर्च संस्थेच्या होमिओपाथांनी जर कर्करोग झालेल्यांना बरे केले असेल तर त्यांनी आपले संशोधन नेचर वा लँसेट सारख्या नियतकालिकाकडे पाठवावेत वा पेटंट सारख्या मार्गाचा अवलंब करुन आपले व्यावसायिक हित जपावे. हे दोन्ही मार्ग विज्ञानास सयुक्तिक ठरतील. सर्चने केलेले संशोधन यशस्वी ठरेल व कर्करोगग्रस्तांना त्याचा फायदा लवकर मिळेल अशी मी आशा करतो. मात्र हे दोन्ही न करता केवळ वृत्तपत्रांच्या द्वारे आपल्या व्यावसायिक यशाबद्दल बोलले जात असेल तर ते योग्य नाही. असे करणे हे जाहिरात देण्यासारखेच आहे. वैद्यकांच्या व्यावसायिक नीतिमत्तेत ते बसत नाही.

पात्रता, योग्यता आणि हितसंबंध यांचा मेळ बरेचदा बसत नाही. माझ्या सर्चच्या मित्रांना कुठली व्यक्ति पात्र वाटते हे कळल्यास बरे झाले असते. ही पात्रता अंगी बाळगण्यासाठी होमिओपाथीचे शिक्षण महत्वाचे असेल तर हा प्रश्न निकालात निघतो. पण याच न्यायाने गावचा मांत्रिक सांगु शकतो की माझ्या गुरुची बारा वर्षे सेवा करुन ज्ञान मिळवा आणि मगच माझ्याशी बोला. जर इतर वैद्यकीय पात्रता वा फार्मसी सारख्या विषयाशी संबंध पुरेसा असेल तर अशा व्यक्तिवर हितसंबंधांबाबत आरोप करता येतात. या व्यतिरिक्त पात्रता चालत असेल तर पात्रतेचा प्रश्न गौण ठरतो. माझी पात्रता यामुळे बिनमहत्वाची ठरते.

जर होमिओपाथीची औषधे प्लासेबोपेक्षा बरीच अधिक गुणकारी ठरली असतील तर त्याचे योग्य ते पुरावे, वापरलेली रीत व हा प्रयोग परत परत कसा करता येईल याची माहिती वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध करावी हेच जास्त श्रेयस्कर. माझ्यासारख्या एकटया दुकटयाचे प्रमाणपत्र मिळविण्याची तसदी घेण्याची यात आवश्यकता नाही. असा शोधनिबंध प्रकाशित झाल्यावर व अनेकांनी तसेच प्रयोग करुन त्यावर शिक्कामोर्तब केल्यावर होमिओपाथी हे प्लासेबोपेक्षा जास्त गुणकारी आहे हे मला मान्य होईलच.

होमिओपाथांचे असे म्हणणे असते की पोटेन्सी वाढविण्यासाठी डायल्यूशन करणे जरुरी असते. कधी दहाच्या पटीत वा कधी शंभराच्या पटीत हे केले जाते. हानमन ज्याप्रमाणात डायल्युशन्स करायचा त्यापेक्षा कितीतरी आÆधक प्रमाणात केण्ट या अमेरिकन होमिओपाथने ते वापरात आणले. हानमनच्या काळात अवागाद्रो संख्या ज्ञात नव्हती पण ती केण्टच्या काळात (१८४९ ते १९१६) माहित होती. रेणुंच्याही पलिकडे जाणाऱ्या या औषधांमध्ये काय उरते हा प्रश्न त्यामुळे केण्टच्या काळात जास्त महत्वाचा होता. या प्रश्नाचा हानमनने विचार केला होता व त्याचे उत्तर होते की त्यात डायनामिस राहते. या जर्मन शब्दाचा अर्थ जैविक शक्ति वा आत्म्यासारखे तत्व असा होतो. होमिओपाथी इन परस्पेक्टीव मिथ अॅण्ड रियलिटी लेखक अॅन्थनी कॅम्पबेल या होमिओपाथने लिहिलेल्या पुस्तकात याची माहिती आहे. हे पुस्तक माहिती जालात उपलब्ध आहे. केण्ट हा दैवी शाक्तिंना मानत असे. इम्यान्युल स्वीडनबोर्गच्या दैवी शक्तिपंथांचा त्याच्यावर प्रभाव होता. हानमन व केण्ट या होमिओपाथीच्या प्रमुख उद्गात्यांवर अशाच विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. होमिओपाथीच्या औषधात औषधाचे भूत असते असे होमिओपाथ म्हणतात ते याच कारणाने.

होमिओपाथीच्या औषधांमधील मूळ औषध जरी गेले तरी त्याचा गुण त्यात राहतो हे सर्चचे म्हणणे देखील याच घरातले. वाण जाते व गुण राहतात हे म्हणणे जर वैज्ञानिक जगतात मान्य झाले तर तो अतिशय महत्वाचा शोध ठरेल. नेचर या नियतकालिकात यापूर्वी खळबळजनक लेख आला होता. अधिक तपासानंतर रेणुंच्या पलिकडील डायल्युशन्सबद्दलचा दावा खोटा ठरला होता. या विषयावर जर कोणी प्रयोगात्मक पुरावे दिले तरे वैज्ञानिक जगतातील एका मोठया शोधाचे ते मानकरी ठरतील. होमिओपाथांची याला तयारी आहे का?

दशलक्ष डॉलर्स मिळविण्याची संधी जेम्स रॅण्डी एज्युकेशनल फाउंडेशनने होमिओपाथना दिली आहे. होमिओपाथी अंधश्रद्धा आहे हे म्हणणे या आव्हानामुळे सहज शक्य झाले आहे. ही रक्कम थोडी नसल्याने सर्चने हे आव्हान स्वीकारावे असे वाटते.

होमिओपाथीचा, आयुर्वेदाचा वा युनानी पद्धतीचा अभ्यास केल्यावर त्याच पद्धतीतून आपला व्यवसाय करावा हे नैतिक दृष्टया योग्य आहे. आम्ही ८० टक्के आधुनिक वैद्यकीचे ज्ञान घेतो तेंव्हा आम्हाला आधुनिक वैद्यकीचा व्यवसाय करु द्या हे म्हणणे आर्जवाचे आहे व होमिओपाथीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. या संदर्भात सरकारला व न्यायालयांना कायदे करावे लागले, असा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी लागते, गरीब वस्तीत आधुनिक वैद्यकाच्या दवाखान्यां ऐवजी पर्यायी उपचार करणाऱ्यांचे दवाखाने दिसणे हे सर्व आधुनिक वैद्यकासमोर होमिओपाथी वा इतर पर्यायी उपचार पद्धती टिकत नाहीत असेच दर्शवते. या सर्वाऐवजी सर्वांनी प्रथम आधुनिक वैद्यकीय पदवी (एम्‌ बी बी एस्‌) प्राप्त करावी आणि मग आपल्यास आवड असल्यास पर्यायी उपचार व चिकित्सा पद्धती कडे वळावे हे समाजाच्या दृष्टीने जास्त योग्य राहील. या योगे लोक नाहक गैरउपचारांना बळी पडणार नाहीत.

प्रमोद

ओके!

ओके!
मान्य आहे - होमिओपाथी एक थोतांड आहे!
बास? झाले समाधान?
आता पुरे करा!

जे औषध आम्हाला घ्यायचे ते आम्ही घेउ,
तुम्ही नका त्रास करून घेउ जीवाला!
;)

आपला
गुंडोपंत

~काय ताप असतो एक एक लोकांचा - यांना वैद्यकीय ताप तर त्यांना विवेकवादाचा ताप!~

.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdooक्ष्

व्यक्तिस्वातंत्र्यावरील उपाय

अहो गुंडोपंत, अडचण अशी आहे की आम्ही आहोत व्यक्तिस्वातंत्र्यवादी. त्यामुळे मूर्खांनी स्वतःचे वाटोळे करून घेतले तर त्यांना अडवू शकत नाही. पण त्यांचे भले व्हावे ही इच्छा तर आहे ना! मग काय करावे? पंचतंत्रात एक गोष्ट आहे बघा - बोकडाला कुत्रा ठरवितात त्याची? इथे तर आम्ही केवळ कुत्र्यालाच (तशी आमची प्रामाणिक समजूत आहे) कुत्रा ठरविण्यास इच्छुक आहोत. त्यामुळे मग आम्ही अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरून वारंवार टीका करणारच!

सर्च आणि लान्सेट

सर्चने लान्सेटला जे आव्हान दिले होते, त्याचे काय झाले? लान्सेटने स्वीकारले की चूक कबूल केली?--वाचक्नवी

आह्वानाबद्दल अधिक माहिती द्याल काय

हे आह्वान काय होते?

(नियतकालिकाला आह्वान देणे म्हणजे नेमके काय, हेसुद्धा समजून घ्यायचे आहे. नियतकालिकाचे काम "पियर रिव्ह्यू" आणि प्रकाश, असे काही आहे. संपादकीये त्या विषयात तज्ञ पाहुण्या संपादकांना लिहिण्याची विनंती होते. "पियर रिव्ह्यू" मध्ये चूक असेल तर नियतकालिक माफी मागते. मुळात पाठवलेल्या लेखातली साधनसामग्री खोटी असेल, तर मूळ लेखकाकडून लेख परत घेतला जातो, आणि खोटेपणा सिद्ध झाल्यास असे करवून घेण्याची जबाबदारी नियतकालिकाची असते. हे सर्व खरेच. पण तरी आह्वान कसले दिले होते - याबद्दल कुतूहल वाटते आहे.)

संदर्भ

सर्च या संस्थेच्या संस्थळावर थोडी माहिती मिळू शकेल.

गमतीदार

गमतीदार स्थळ. यात १८३२ ची कॉलेरा महामारी वगैरे उल्लेख आहेत.

अशा प्रकारचे संदर्भ श्री. दफ्तरी यांच्या पुस्तकातही वाचले होते (प्रकाशनस्थळ नागपूर, पुस्तक हातात नाही. श्री. दफ्तरी यांनी त्या काळच्या "सेंट्रल प्रॉव्हिन्सेस" राज्यात होमियोपथी शिक्षणव्यवस्था सुरू केली होती.) श्री दफ्तरी यांनी १८८०-१८९० काळातले फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क शहरातील आकडे दिलेले होते.

परंतु त्या काळात "बिगर-होमियोपथी" मध्ये "नसेतून रक्तस्राव करवणे" वगैरे उपचारपद्धती होत्या. त्या उपचारपद्धतींपेक्षा "काहीच न करणे+ पोक्त-दयाळू व्यक्तीचा सहवास" हे निश्चितच उजवे. मला आकड्यांबद्दल शंका नाही. मात्र त्या आकड्यांचा आता काय संबंध? असा विचार माझ्या मनात आला.

बरोबर

+१ हेच म्हणतो.

प्रत्यक्षात याबाबत ब्रिटीश जर्नल (?) मध्ये हेच लिहिले आहे अशी ती मूळ बातमी होती. अघोरी उपचारापेक्षा बिनउपचाराची होमिओपॅथीने लोकांचे जीव वाचवले.
रक्त काढणे, चटका देणे या पद्धती भारतात १९१० पर्यंत चालु असाव्यात. कुठल्या तरी पुस्तकात हा उल्लेख वाचला होता. हे उपचार कसे संपले याबद्दल उत्सुकता आहे.

प्रमोद

सर्च बरोबरील पत्रव्यवहार

या दरम्यान माझा व्यनि स्वरुपात सर्च बरोबर पत्रव्यवहार झाला. त्यावेळी माझ्याकडे व्यवस्थित (विदेश संचार निगमचे) नेट कनेक्शन नसल्याने तो मी नीट राखून ठेवला नाही. माझ्या आठवणीत त्यांनी प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. (खाली दिलेली माझी आठवण आहे. चुका असू शकतील.)

मी त्यांना विचारले होते की भारताबाहेरील होमिओपॅथीच्या शिक्षण देणार्‍या संस्था कुठल्या? या संस्थातून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना (ज्यांनी आधुनिक वैद्यकाची परवानगी घेतली नाही अशा) आरोग्य व्यवसाय कुठल्या देशात करू दिले जातात? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती.

मी असेही विचारले होते की औषधाचा गुण एवढ्या डायल्युशन्स नंतर राहतो यासाठी त्यांच्या कडे पुरावा आहे का? त्यांचे म्हणणे असे होते की भरपूर पुरावे आहेत (मात्र दिले नाहीत) पण ते यामधे रॅन्डीचे आव्हान घ्यायला कबूल नव्हते.

दोन मुद्यांवर प्रामुख्याने वाद झाला. मी त्यांना विचारत होतो की ज्या कॅन्सर रुग्णांना बरे केले असा सर्चचा दावा होता त्यांचे विवरण द्यावे. (त्यासाठी येणारा खर्च मी करीन.) हा मुद्दा अमान्य झाला. इकडे पात्रतेचा प्रश्न आला.

दुसरा मुद्दा असा.

होमिओपॅथ जे औषध देतात त्यात रोगा पेक्षा रोग्यावर उपचार करणारे असते. (होलिस्टिक, रोगाच्या मुळावर). आधुनिक वैद्यकात रोगाचे एकच नाव असले तरी त्यावरील होमिओपॅथीचे उपचार भिन्न असतात. त्यामुळे अमुक रोगावर अमुक औषध असे होमिओपॅथ सांगू शकत नाहीत. यामुळे लॅन्सेटने निर्देश केलेले शोधनिबंध रद्दबातल ठरतात.
हे त्यांचे म्हणणे मान्य केले तर डबल ब्लाईंड टेस्टमधून ते सुटतात.

अशी थोडीफार चर्चा झाली. एकंदर चर्चेचा सूर सोहार्दपूर्ण नव्हता.

प्रमोद

..

माझा काका आर्मी मध्ये अलोपथी डॉक्टर आहे. (कर्नल आर आर जोशी) त्याने हैदराबाद मधील डी आर डी ओ मधील २५०० लोकांवर मधुमेहाचा त्याचा अभ्यास बराच गाजला आहे... पण किडनी स्टोन साठी तो होमिओपॅथी चाच सल्ला घ्या असे सुचवतो (त्याचा स्वत:चा अनुभव)...

माझी मावशी औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात Surgery Dept. मध्ये HOD आहे. पण ती सुद्धा स्वत: कधीच अलोपथी औषधे घेत नाही आणि शक्यतो घरगुतीच उपाय सांगते...

 
^ वर