प्लॅसिबो

रुग्ण-उपचारक नाते दृढ करून रुग्णाचा विश्वास वाढविणे हा प्लॅसिबो या उपचारप्रकाराचा उद्देश असतो. 'प्लॅसिबो' या शब्दाचा अर्थ, 'माझ्यामुळे बरे वाटते' असा आहे. आंतरिक स्वतोमूल्य नसलेल्या पदार्थ, कृती-उपचार (प्रोसीजर) किंवा शस्त्रक्रियांमुळे जर रुग्णाला "माझ्या तक्रारींकडे लक्ष देण्यात आले असून उपचार होत आहेत" असे वाटले तर त्याच्या रोगलक्षणांमध्ये सुधार पडतो. अशा उपचारांना प्लॅसिबो म्हणतात.
आदरणीय व्यक्तिमत्वाच्या विश्वासार्ह व्यक्तीने, किंवा पांढर्‍याशुभ्र कपड्यांतील, काचेच्या आणि चकचकित फरशांच्या इमारतीतील, वातानुकूलित खोलीतील व्यक्तीने उपचार केल्यास प्लॅसिबो परिणाम अधिक होऊ शकतो. कोणता रुग्ण नेमक्या कोणत्या व्यक्तीमुळे आणि कोणत्या प्रकारच्या उपचारांमुळे अधिक प्रभावित होईल ते सांगता येणार नाही. ते रुग्णाच्या मानसिकतेवर अवलंबून राहील. साधारणतः, असामान्य अनुभवाचा प्रभाव अधिक असतो (देवाकडे राजा मागणार्‍या बेडकांची एक कथा इसापनीतीत आहे). लघवी रंगीत करणारे ब२ जीवनसत्व, शरीर गरम करणारे कॅल्शियमचे इंजेक्शन, विरेचके, वमनके, अशी औषधे पूर्वी वापरली जात.
प्लॅसिबो परिणाम घडण्याचा एक मार्ग म्हणजे चांगल्या मनःस्थितीमुळे मेंदूत स्त्रवणारी अफूसारखी रसायने होत. या रसायनांचा प्रभाव बंद पाडणारे औषधे दिली तर प्लॅसिबो परिणामही बंद पडतो. या रसायनांमुळे रोगांवर काही थेट परिणाम होत नाही पण रुग्णाला 'बरे' वाटते.

"प्लॅसिबो परिणामांमुळे का होईना पण जर रोग्याला बरे वाटणार असेल तर प्लॅसिबो ठरलेले उपचार वापरण्यात अडचण आहे?" असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. प्लॅसिबो उपचारांमध्ये मला सहा अडचणी सापडतात.

  1. प्लॅसिबोने आजार कायमचे बरे होत नाहीत. रोगाच्या मूळ कारणावर परिणाम होत नाही पण ताप, वेदनाशमन, दमा, पोटदुखी, रक्तदाब, इ. रोगलक्षणांवर थोडा परिणाम होऊन रुग्णाला तात्पुरता आराम मिळतो. कोणत्या रुग्णाला किती आराम मिळेल याची खात्री देता येत नाही. भोळसर रुग्णाला अधिक फायदा होऊ शकतो.
  2. "मी प्लॅसिबो उपचार घेणार आहे" हे वाक्य निरर्थक आहे. उपचार हे प्लॅसिबो असल्याचे रुग्णाला समजले की प्लॅसिबो परिणाम पूर्णपणे थांबतो. त्यामुळे, "मला माहिती आहे की दगडाची पूजा केली तरी दगड काही करत नाही. मलाच प्लॅसिबो परिणामामुळे मानसिक बळ मिळते." हे वाक्य चूक आहे. अर्थात, त्या मूर्तीमध्ये आंतरिक स्वतोमूल्य असू शकते आणि तिचा फायदा होऊ शकतो हे मान्यच आहे. "आंतरिक स्वतोमूल्य म्हणजे 'पेशवेकालीन तांडव गणपती' सारखा काही जादूटोणा अपेक्षित नाही पण त्या मूर्तीचा चेहरा, ढब, यांकडे बघून आश्वस्त वाटू शकते. चित्रपटातील थरारक दृष्ये खोटी असल्याचे माहिती असले तरी ती दृष्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवू शकतात. कलाकारांच्या भावना खोट्या असल्या तरी त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात खर्‍या भावना उद्युक्त होऊ शकतात. पण असे घडण्याचे कारण असे की त्या स्थूल (टँजिबल) निरीक्षणामुळे प्रेक्षकांच्या मेंदूत विशिष्ट आठवणी/कोरिलेशन घडू शकतात. परंतु अशा घटनेला प्लॅसिबो परिणाम म्हणू नये कारण त्या वस्तूमध्ये एक व्यक्तिसापेक्ष स्वतोमूल्य असल्यामुळे तिचा मेंदूवर परिणाम घडलेला असतो. इतर एखाद्या व्यक्तीने मूर्ती बघून तिला काहीही फायदा न होणे शक्य आहे. कुबडीचे रूपक येथे योग्य ठरेल असे वाटते.
  3. प्लॅसिबो उपचार केवळ फसवूनच देता येतात. न्यायवैद्यकीय नियमांनुसार, कोणताही उपचार रुग्णाला आधी समजावून सांगावा लागतो. उपचाराचे धोके रुग्णाला मान्य असल्याची अनुमती घेऊनच उपचार करावे लागतात. विमा आणि मेडिक्लेमच्या युगात तर बिल बघूनच रुग्णाला उपचारांचा प्लॅसिबोपणा समजेल. एखाद्याचे भले करण्यासाठी का होईना, पण फसवणूक करणे अनैतिक आहे. त्यात एक उच्च-नीच भाव दडलेला आहे. मानसोपचाराच्या आमच्या पाठ्यपुस्तकात दिले होते की पौर्वात्य समाजांत वैद्य-रुग्ण नाते हे गुरू-चेला असे असमानतेचे होते. वैद्यावर विश्वास टाकून रुग्णाने निमूट उपचार स्वीकारणे अपेक्षित होते.
  4. डोक्याला मार लागलेल्या रुग्णाला झोपेच्या गोळ्या देऊ नयेत, रोगनिदान झाल्याशिवाय पोटदुखी थांबवू नये, असे वैद्यकीय शिक्षणात शिकविले जाते. त्यामागचा उद्देश असा असतो की लक्षणे दडली तर रोगाची तीव्रता वाढल्यास समजणार नाही. असा गाफीलपणा (फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी) प्लॅसिबोनेही येऊ शकतो कारण प्लॅसिबो परिणाम रुग्णाच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतो. प्लॅसिबो परिणामाने रोगलक्षणांचे कितपत शमन होईल याचा अंदाज येणार नाही. 'रोगाची तीव्रता घटल्यामुळे लक्षणे कमी झाली' आणि 'प्लॅसिबो परिणामामुळे लक्षणे कमी झाली', यांपैकी योग्य निष्कर्ष शोधणे डॉक्टरांना त्रास झाल्यास पुढील उपचारांची दिशा ठरविण्यात अडचण होऊ शकते.
  5. प्लॅसिबो परिणाम बेभरवशाचा आहे. ख्रिश्चनधर्मीय टेंपलटन प्रतिष्ठानने एक शास्त्रीय प्रयोग केला. त्यात काही हृद्रोग्यांसमोर धर्मगुरूंनी करुणा भाकली. प्रयोगांति असे दिसले की इतर हृद्रोग्यांपेक्षा अशा हृद्रोग्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये अधिक गुंतागुंती झाल्या. संशयवादी मायकेल शर्मर यांनी असे भाष्य केले की "माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची वेळ आली म्हणजे मी मरणार" या विचारांनी रुग्णांवर नोसिबो परिणाम (प्लॅसिबो परिणामाची उलट दिशा) झाला.
  6. सर्व आधुनिक औषधांची उपयुक्तता डबल ब्लाइंड पद्धतीने तपासली जाते. काही रुग्णांना प्लॅसिबो दिले जाते तर काहींना वास्तव औषध. कोणत्या रुग्णाला प्लॅसिबो दिले आणि कोणत्या रुग्णाला वास्तव औषध ते रुग्णांना तर माहिती नसतेच, पण त्यांची प्रगती मोजणार्‍या डॉक्टरांनाही सांगितले जात नाही. (रुग्णाला औषध दिले आहे की प्लॅसिबो ते डॉक्टरांना समजले तर त्यांची निरीक्षणे चुकू शकतात.) अशा प्रकारे चाचणी घेतल्यावर जर वास्तव औषध दिलेल्या रुग्णांना प्लॅसिबो दिलेल्या रुग्णांपेक्षा अधिक फायदा झाल्याचे सिद्ध झाले, आणि हा अतिरिक्त फायदा जर [वास्तव उपचारांसाठी आलेला खर्च - प्लॅसिबो उपचारांसाठी आलेला खर्च] या आकड्यापेक्षा अधिक असेल तरच त्या औषधाला बाजारात उतरविले जाते. खर्‍या औषधाचा परिणाम प्लॅसिबोपेक्षा खूपच अधिक असतो. तुसड्या डॉक्टरने जरी ते औषध दिले तरी प्रेमळ डॉक्टरच्या प्लॅसिबोपेक्षा रुग्णाला अधिक फायदा होईल. डॉक्टरने नीट वागावे ही अपेक्षा योग्य असली तरी त्यातून प्लॅसिबोचे समर्थन होत नाही. प्रेमळ डॉक्टरने खरे औषध दिले तर सर्वाधिक फायदा होईलच.

प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या 'होमिओपॆथी एक थोतांड' या धाग्यात प्लॅसिबोविषयी काही मते व्यक्त केली गेली होती तसेच प्लॅसिबोविषयक काही दुवेही देण्यात आले होते. तेथे अवांतर चर्चा करण्याऐवजी वेगळा धागा काढला आहे.

Comments

अशोक सराफ

अशोक सराफ आहे तोच हा सिनेमा का हो?

होय तोच सिनेमा

हिंदी व्याकरण सुधारून :-) नाव :
मेरी बीवी की शादी
होय, यात अशोक सराफही आहे.

टोरेंट

याचे टोरेंट आहे का? मिळाले नाहि ..
ज्यांना माहित असेल त्यांनी कृपया खरडावे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगला लेख

मोजकी व्याख्या देऊन नेमका ऊहापोह करणारा.

मराठीत बरे होणे व बरे वाटणे यासाठी एकच शब्द आहे. त्यामधला फरक म्हणजे औषध व प्लासिबो असा ढोबळमानाने म्हणता येईल. अर्थात हेही तितकं अचूक नाही, कारण वेदनाशामक हे औषधच आहे, जरी त्याने मूळ आजार बरा न होता वेदना कमी होतात. किंबहुना वेदना या आजारावरचं औषध म्हणता येईल. असो.

चित्रपटातील थरारक दृष्ये खोटी असल्याचे माहिती असले तरी ती दृष्ये प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवू शकतात.

तिथेही सस्पेंशन ऑफ डिसबिलिफ असतोच. मला वाटतं प्लासिबोवरचा विश्वास हेही काहीसं अविश्वास (तर्क) टांगणीवर ठेवूनच करता येत असावं. ज्यांना हे सहजी जमतं ते सुखी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

थोडा फरक

वेदनाशामक हे औषधच आहे, जरी त्याने मूळ आजार बरा न होता वेदना कमी होतात. किंबहुना वेदना या आजारावरचं औषध म्हणता येईल.

सहमत. शिवाय कधीकधी वेदनांमुळे स्नायू आकुचन पावतात. त्यामुळे रक्ताभिसरणावरोध होऊन वेदना टिकू शकतात. अशा दुष्टचक्राला तोडल्यास मूळ आजार (स्नायूंचे आकुंचन) बरा होण्यास मदतही होऊ शकते.

मला वाटतं प्लासिबोवरचा विश्वास हेही काहीसं अविश्वास (तर्क) टांगणीवर ठेवूनच करता येत असावं. ज्यांना हे सहजी जमतं ते सुखी.

तीन पातळ्या पहाता येतील:

  • विश्वासातून

उदा. प्लॅसिबो उपचाराच्या डीफॉल्ट गोळीमुळे मनामध्ये थेट सुखद भावना वाटण्याचे काही कारण नाही. 'माझ्यावर उपचार झाले' या आश्वस्त अवस्थेमुळे बरे वाटते.

  • विश्वास ठेवण्याची परिस्थिती नसताना स्वतःला फसवून (सस्पेंशन ऑफ डिस्बिलीफ)

उदाहरण माहिती नाही. प्लॅसिबो उपचार हा प्लॅसिबो असल्याचे ज्ञान झाले तर प्लॅसिबो परिणाम बंद पडतो. त्याअर्थी अशी स्वतःची फसवणूक जमत नसावी.

  • पदार्थाच्या आंतरिक मूल्यामुळे

उदा. चित्रपट बघून ज्या भावना मिळतात त्या चित्रपटातील दृष्यांशी संबंधित असतात. या प्रतिसादात आरागॉर्न यांनी दिलेल्या लेखात असे नमूद केले आहे की लाल रंगाच्या प्लॅसिबोमुळे भूक चांगली लागते तर पिवळ्या रंगाच्या प्लॅसिबोमुळे अधिक नैराश्य दूर होते.

 
^ वर