पेशवेकालीन तांडव गणपती
इतिहास हा बहुतेकांचा एक उत्सुकता असणारा विषय असतो तसा तो माझाही आहे. २००३ मध्ये ५३ व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर मी शिवाजीमहाराज व संभाजी राजे तसेच पेशवाई वरील अगणित पुस्तके वाचली मात्र त्यावेळी त्या वाचनाचा उद्देश केवळ टाईम पास हाच होता. कालांतराने मी अमरावतीहून कायम पुण्यास राहावयास आलो. आणि प्रथम संपर्क भारतिय इतिहास संशोधक मंडळाशी मोडी शिकण्याच्यानिमित्ताने आला. त्यानंतर इतिहास जाणून घेण्याची लालसा निर्माण झाली. नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलना निमित्त इतिहासाचीपुस्तके विकत घेण्याची प्रबल ईच्छा निर्माण झाली व श्री प्रमोद ओक यांचे पेशवे घराण्याचा इतिहास, यं. न. केळकर यांचे मराठेशाहितील वेचकवेधक व इतिहासातील सहली तसेच डो. अ रा कुळकर्णी यांचे जेधे शकावली- करिना ही पुस्तके विकत घेतली. पेशवे घराण्याचा इतिहास या श्री प्रमोद ओक लिखीत पुस्तकातील माहिती माझ्या साठी खुप नवीन होती. यात पेशवेकालीन तांडव गणपती बद्दल दिलेली माहिती इतरांना हि व्हावी याउद्देशाने त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे. या संदर्भात काही नवीन माहिती असल्यास त्यावर् प्रकाश टाकावा ही अपेक्षा. :-
"सन १७६५ नंतर कधीतरी श्रीमंत रघुनाथ राव दादासाहेब पेशव्यांमुळे पेशवा परिवारांच्या संपर्कात आलेली अघोरी तांडव गणपतीची मूर्ती हाएक विलक्षण प्रकार होता. या मूर्तीशी संपर्क आलेल्या कोणाचेही भले झाले नाही. या मूर्तीची थोडी माहिती इतिहासात उपलब्ध आहे. थोरल्या माधवरावांचे दुखणे बळावत चालल्यामुळे उपचार करणाऱ्या वैद्यांची, प्रकृती सुधारण्याबद्दलची आशा मावळत चालली होती. त्यामुळेरघुनाथरावांची पेशवेपदाची हाव वाढून ते पेशवाईची स्वप्ने पाहू लागले. ही लालसा पुरी व्हावी म्हणून रधुनाथराव स्वतःजवळील तांडव नृत्यकरणाऱ्या उग्र गणपतीची, अघोरी मांत्रिकाच्या व कपट विद्येत पारंगत असलेल्या लोकांच्या नादी लागून , कडक उपासना करू लागले. नारायणपेशवे गारदी मागे लागले असतांना जीव वाचविण्यासाठी केविलवाणे किंचाळत रघुनाथरावांकडे धावले , त्या वेळी रघुनाथराव याच गणपतीचीपुजा करीत होते. म्हैसुर प्रांतातील कोणी कोत्रकर नावाचे गृहस्थ अघोरी विद्येच्या बाबतीत रघुनाथरावांचे गुरू होते. त्यांनी ही तांडव गणपतीची मूर्तीरघुनाथरावांना उपासनापूर्वक अनुष्ठान करण्यासाठी खास कर्नाटकातून आणून दिली होती, मूर्ती पंचधातुची असून उंची सुमारे दिड फूट आहे. निजामावर स्वारी करण्याच्या निमित्ताने सन १७७३ च्या अखेरिस रघुनाथरावांनी पुण्यातून पळ काढला त्यावेळी, त्यांच्या शेडाणीकर नावाच्याआश्रिताने मूर्ती शनिवारवाड्यातून लांबविली व शेडाणी गावात नेऊन एका पिंपळाकाली मूर्तीची स्थापना केली. थोड्याच दिवसात मूर्ती तेथूननाहीशी झाली. ती चिंचवड , वाई या ठिकाणी वनवास भोगून सातारला एका ब्राम्हणाच्या घरी असल्याचे आढळले. या अघोरी मूर्तीच्या अशुभकरणीला त्रासून त्या पोटार्थी ब्राम्हणाने जुन्या पडक्या विहिरीत मूर्तीला जलसमाधी दिली. या गोष्टीला ५०-६० वर्षे उलटून गेल्यानंतर साताराशहरातिल प्रसीद्ध संन्यासी गोडबोले शास्त्री (नाथपंथीय स्वामी स्वच्छंदानंद) यांच्या स्वप्नात ती मूर्ती आली. स्वामीनी आपले शिष्य श्रीवामनराव कामत यांना मूर्तीचा शोध घेण्याची आज्ञा केली. चौकशी अंती श्री वामनराव कामत यांना मूर्तीचा कुप्रसिद्ध इतिहास समजला. सातारचा तो ब्राम्हण निः संतान वारल्याचेही कामतांना समजले. त्यामुळे श्री कामत गुरुंजींची आज्ञा पाळण्याबद्दल टाळाटाळ करू लागले. इकडे गोडबोलेशास्त्रींना (स्वामी स्वच्छंदानंद) वारंवार दृष्टांत होऊ लागले. अखेर नाइलाजाने कामतांनी मूर्ती बाहेर काढली. आपल्याच देवघरात तिची स्थापना करून श्री कामत पूजाअर्चा करू लागले. यानंतर ८-१० वर्षातच कामत कुटुंबातील मंडळी एक एक करून वारली. यामुळे या वेळेपर्यंत निः संतान झालेले श्री. कामत हाय खाऊन सुमारे १९३८ साली वारले. यानंतर त्यांच्या लांबच्या नात्यातील त्याच घरात राहणाऱ्या एका बाईंनी त्या मूर्तीचे स्थलांतर देवघरातून वाड्याच्या ओसरीतील कोनाड्यात केले.
पुढे १९४३ सालच्या सुमाराला कै. कामतांच्या गुरुभगिनी ताई चिपळुणकर यांनी ब्राम्हणाकरवी तांडव गणपतीची पूजा सुरू केली. मूर्तीने या बाईंनाही चांगलाच हात दाखवल्याचे कळते. या बाई अखेरच्या काळात अर्धांगाने जर्जर झाल्या होत्या. दरम्यान मुंबईचे डॉ. मोघे यांना पुराणवस्तू (क्युरिओज) जमवण्याचा विलक्षण नाद होता. या मूर्तीची हकीगत कानांवर येताच मोघ्यांनी स्वतःचे मित्र धुंडिराजशास्त्री बापट यांना मूर्ती मिळविण्यासाठी ताई चिपळुणकरांकडे सातारला पाठवले. बापटांचे मित्र नानासाहेब सोनटक्के यांनी खास टैक्सीने मूर्ती पुण्याला आणली. नंतर रात्रीचा प्रवास नको म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला निघायचे ठरले. आश्चर्य असे की अचानक त्या रात्री सौ. सोनटक्केया पोटशुलाने हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी वेदना असह्य झाल्या. श्री. सोनटक्के मूर्तीसह टैक्सीने मुंबईला निघाले. ती टैक्सी दूर जाताच इकडे बाईंची पोटदुखी एकदम थांबली. यानंतर २-३ वर्षे मूर्ती मूंबईला डॉ. मोघ्यांच्या घरी राहिली. पुढे डॉ. मोघ्यांना मुलगा झाला पण तो वेडसर निपजला . तसेच डॉ. मोघे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे त्रासून मोघ्यांनी प्रैक्टीस बंद करून मुंबई सोडली. मोघ्यांच्या गरी विद्यार्जनासाठी विद्यार्थी ठेवण्याची जुनी पद्धत होती. तशा विद्यार्थ्यांपैकी केशवराम अय्यंगार हा कर्मठ ब्राम्हण विद्यार्थी एक होता. मुंबई सोडतांना डॉ मोघ्यांनी गणेशाची मूर्ती इतर संग्रहासह, सर्व इतिहास सांगून अयंगार ला दिली.
कालांतराने अय्यंगार ने म्हैसूरच्या प्रसिद्ध मूर्तीकाराकडून मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती तयार करवून आणली. दोन्ही मूर्ती कांचीपूरमचे शंकराचार्यांना अर्पण करण्याचे ठरविले. स्वामींनी परवानगी देताच, गरोदर पत्नीची नाजूक अवस्थाही नजरेआड करून अय्यंगार दोन्ही मुर्ती घेऊन कांचीपूरमला गेले. स्वामींनी मूर्तीकडे क्षणभरच दृष्टीक्षेप टाकला व प्रतिकृती ठेवून घेतली व अघोरी मूर्ती परत केली. निराश मनाने अय्यंगार मूर्तीसह मद्रासला परतले. तोच त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीची बातमी समजली. पण मुलगा वेडसर निपजला. अय्यंगारांची अवस्था ऐकून त्यांचे स्नेही मद्रासच्या गणेश बुक एजन्सीचे मालक श्री. सुबय्या यांनी श्री अय्यंगार नको म्हणत असतानाही मूर्ती स्वतःजवळ ठेवली. पुढे सुबय्यानी ही मूर्ती मद्रासच्या लंबूचेट्टी स्ट्रीटवरील शंकरमठाला अर्पण केली. यानंतर वर्षभरातच श्री सुबय्या कैलासवासी झाले. या प्रकारे मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते. "
आधार - भा. इ. सं. मंडल त्रै. २८-१-२
केसरी वृत्तपत्र-२६-३-१९७८ आणि ९-७-७८.
Comments
रोचक माहिती
माहिती खूपच रोचक आहे. परंतु हवे असल्यास या पद्धतीने कोणत्याही निर्जीव गोष्टीचा फक्त वाईट किंवा चांगल्याच घटनांशी संबंध लावणे कसे शक्य आहे याचे एक उदाहरणच मिळाले. चांगल्या व वाईट अशा घटना घडतच असतात त्यांचा संबंध द्रविडी प्राणायाम करून कसा कोणत्याही निर्जीव वस्तूशी लावणे शक्य आहे हे वाचून करमणूक झाली.
वाचन्द्रशेखर
करमणुक
वाचून करमणूक झाली.
+१
या मूर्तीशी संपर्क आलेल्या कोणाचेही भले झाले नाही.
सावधान आता उपक्रमशी या मूर्तीचा संबंध आला आहे.
मूर्ती शंकरमठातच आहे असे समजते.
या शंकर मठाचा पत्ता मिळाला तर बरे होईल. (निदान मुर्त्यांच्या पोकळ चमत्कारांचा प्रसार करुन धमकी घालणाऱ्यांचे पितळ तरी उघडे पडेल.)
कथा आवडली
तांडव गणपतीची कथा रोचक आहे. मला अशा गोष्टी आवडतात. येथे दिल्याबद्दल धन्यवाद. :-)
तांडव गणपती सध्या खरेच शंकरमठात आहे का? त्याची रवानगी भ्रष्ट नेते, खेळाडू, भायलोग यांच्याकडे करायला हवी. ;-)
आवड
>>मला अशा गोष्टी आवडतात.
हे वाचून पहा. शेम टू शेम आहे.
त्याच्या खालच्या एका प्रतिसादात या गणपतीविषयीपण आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
फारच प्रसिद्ध
कंदिलाची गोष्ट ना. ती फारच प्रसिद्ध आहे. ;-) मी वाचायची सोडली असणे अशक्य आहे. :-)
हया शक्यता तपासून पाहिल्या काय?
मला असे वाटते की एखादे घटित (जसे या गणपती च्या संपर्कात आलेल्यांना अकाली मृत्यु, वेडसर मुले होणे, भले न होणे, इ.) आणि त्याचे कार्यकारणात्मक विवेचन (मूर्ती न लाभणे, कोप होणे, किंवा अन्य काही) यांबद्दल स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक आहे.
पहिला प्रश्न असा की ही सर्व घटिते खरी आहेत काय? खोटी असली तर प्रश्नच संपला. वादाकरता आपण असे समजू की ती खरी आहेत. किंवा असे मानू की भा. इ. सं. मं. चे लेखकवर्य व त्यांचे संदर्भ हे विश्वसनीय आहेत.
आता या सर्व घटितांचे अनेक संभाव्य कारणांपैकी निर्विवाद कारण (कारणे) शोधणे हे बाकी रहाते. सर्व कारणांत दैवी प्रकोप हे सर्वात लोकप्रिय कारण आहे. एकतर जनसामान्यांना समजायला सोपे. खोटे ठरवणे विविध कारणांनी जवळजवळ अशक्यच. अन्य काही करायची गरज नाही. खरे कारण शोधायचे तर कोण व्याप. वर्णन करणारांनी तर त्या मूर्तीचा सर्व घटितांशी निर्विवाद संबंध होता असे गृहीत धरून सारी मांडणी केलेली आहे. ज्यांचा या दैवी शक्तीवर विश्वास नाही त्यांच्यावर अन्य कारणे शोधण्याची जबाबदारी येते. आणि समस्येला सुरुवात होते. जी काही अन्य कारणे असू शकतील त्यांसंबंधीची माहितीच नोंदली नसेल किंवा गहाळ झाली असेल तर अश्या विवेकवैचारिकांचा (rationalist) निरुपाय होतो. प्रस्थापित अशास्त्रीय विचारांचा विजय झाला असे वाटते. सामना खडाख़डीवर अनिर्णित रहातो. मनुष्यजात शहाणी होत नाही.
आता असे समजा की अन्य कारणे धुंडाळण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरलेले आहेत. आणि ती मूर्ती हा महत्वपूर्ण समान घटक उरला आहे. हे विधानही निव्वळ वादाकरिता नसून त्याला जुजबी संख्याशास्त्रीय आधारही आहे - जसे घरातील माणसांचे अकाली निधन, मुले अपंग निपजणे यासारख्या घटना पुनःपुनः या मूर्तीच्या सान्निध्यात घडतांना दिसत आहेत. संख्याशास्त्रीय दृष्ट्या हे निव्वळ यदृच्छेने पुनःपुनः घडणे कठीण आहे. (वैद्यकीय तपशील नोंदलेले असते तर नेमके विधान करता आले असते.) मूर्तीमुळे हळूहळू होणारा काही वर्षांनंतर दिसणारा काही छोटामोठा परिणाम नाकारता येत नाही. शेरलॉक होम्सच्या भाषेत सांगायचे तर, "शक्य वाटणा-या सर्व गोष्टी वगळल्यावर जे उरते ते कितीही अशक्य वाटले तरी खरेखुरे कारण असते." विज्ञान व तंत्रज्ञानात वरकरणी अशक्य वाटणारे शोध याच मार्गाने लागले. विज्ञानातील तत्काळ आठवणारे म्हणजे बेक्वेरेलचे अणु किरणोत्सर्जन, रॉटजेनचे क्ष किरण, फ्लेमिंगचे पेनिसिलिन. तंत्रज्ञानातदेखील वरकरणी वेडगळ वाटणारी निरीक्षणे सत्य आहेत अशी श्रद्धा बाळगूनच कसे शोध लागले हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
खरा मुद्दा आता सुरू होतो. थोडक्यात सांगायचे तर आपला समाज एकतर दैववादी किंवा बुध्दिप्रामाण्यवादी यांच्यात विभागलेला आहे. पहिले मूर्तीत दैवी शक्ती आहे या (अन्य समाजधुरीणांच्या) मतावर विसंबतात. दुसरे मूर्तीचा संबंध (आपल्या) बुद्धीला पटत नाही म्हणून निरीक्षणापासून सगळेच नाकारतात. हे दोन्हीही विचार अंतिमतः व्यक्तिनिष्ठ आहेत. वैज्ञानिक कारणे शोधायला वस्तुनिष्ठ विचार लागतो. तो प्रयोगप्रामाण्यातूनच येतो. कार्ल पॉपरच्या मताप्रमाणे "मूर्तीचा परिणाम होतो " असा पूर्वपक्ष मांडून तो प्रयोगाने खोटा ठरवणे हाच वैज्ञानिक राजमार्ग होय. असा काही प्रयोग करण्याची दैववाद्यांना गरजच उरलेली नसते. मूर्तीचा परिणाम खोटा ठरवायचा तर तो होतो कसा हे आधी ठरवावे लागते. मग तो मोजायचा कसा, कसा प्रयोग करायचा, आणि प्रयोगात काय घडले म्हणजे मूर्तीचा परिणाम खोटा ठरला असे समजायचे हेही ठरवावे लागते. बुद्धिप्रामाण्यवादी हा विचारच करायला नकार देतात. पण तो आवश्यक आहे. नाहीतर कुठला प्रयोग कसा प्रयोग हे कसे ठरणार?
त्यासाठी विज्ञाननिष्ठेशी तडजोडी न करता तथाकथित अवैज्ञानिक निरीक्षणाचा सहानुभूतिपूर्ण विचार करावा लागतो. या साठी बर्नार्ड शॉची उक्ति फारच उपयुक्त आहे. तो म्हणतो, "सगळे 'असे कसे?' म्हणत आश्चर्यमुग्ध असतात तेव्हा मी ' असेच असावे' असा विचार करू लागतो." मूर्तीमुळे आजारपणे कशी येत असतील याबद्दलच्या प्रयोगांनी सिद्ध् वा असिद्ध करता येतील अश्या काही कल्पना.
मूर्तीमध्ये काही किरणोत्सर्गी द्रव्य किंवा धातू आहे काय?
मूर्तीच्या धातूमध्ये आर्सेनिक, शिसे, कॅडमियम यासारखी अशुद्धे आहेत काय? (दाट शक्यता)
मूर्तीचे ओतकाम करताना पारा वापरला आहे काय?
मूर्तीच्या पूजाविधीत मूर्तीचा माणसांशी कसा संपर्क येतो? उदा. मूर्ती ला अभिषेक केलेले पाणी तीर्थ म्हणून प्यायले जाते काय?
ही यादी फारच अपुरी ठरण्याची शक्यता आहे. अन्य उपक्रमींना आणखी काही सुचेल. पण हे सर्व प्रयोग करता येतील काय? मला नाही वाटत.
नैधृव कश्यप
मेंदू बाहेर पडेल एवढे खुले मन नसावे
"अनीस दाभोळकरांनी ही मूर्ती घरी ठेवून दाखवावी" असे काही आ(वाह|व्हा)न वगैरे?
असे म्हणणारे कोण टिक्कोजीराव?
नल हायपोथिसिस प्रस्थापितांच्या बाजूचा ठेवा असे ऑकॅमचा वस्तरा सांगतो.
नाथमाधव...
मूर्तीची कथा खूपच रोचक. नाथमाधवांच्या एका कादंबरीत अशाच एका रत्नजडित शिवलिंगाची कथा होती असं अंधुकसं आठवतंय. सातवीत असताना ती वाचली होती - तेव्हा त्या जादूई, रक्तपिपासू मूर्तीने मोहून टाकलं होतं.
हे मात्र पटलं नाही. निव्वळ प्रोबॅबिलिटी थिअरीवरून काही मूर्तींच्या बाबतीत असलं काही तरी घडणार हे सिद्ध करता येतं. जर पाच ते सहा हस्तांतरणं झालेल्या मूर्ती बघितल्या तर प्रत्येक हस्तांतरणानंतर काही महिन्यात काहीतरी वाईट घटना घडण्याची मर्यादित शक्यता आहे. हजारो, लाखो मूर्ती असतील तर अशा 'अशुभ मूर्ती' सापडणं सहज शक्य आहे - काही कार्यकारणभाव संबंध नसतानाही. मग उगाच भलतेसलते प्रयोग करण्याची जबाबदारी का डोक्यावर घ्यावी? ज्यांना मूर्तींमध्ये अशी जादू आहे असं म्हणायचं असेल त्यांनी ती सहज-संभवनीयतेच्या पलिकडील घटना आहे असं सिद्ध करावं.
तोपर्यंत या रोचक कथेचा आपण लुत्फ उठवू.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हेच म्हणतो
एन्रिको फर्मी आस्क्ड जनरल Leslie Groves, द हेड ऑफ मॅनहॅटन प्रोजेक्ट, what इज द definition ऑफ ए “ग्रेट” जनरल. Groves रिप्लाईड दॅट एनी जनरल हू हॅड won five बॅटल्स इन ए row might safely बी कॉल्ड ग्रेट. फर्मी देन आस्क्ड हाऊ मेनी जनरल्स आर ग्रेट. Groves सेड अबाऊट थ्री आऊट ऑफ every हंड्रेड. फर्मी conjectured दॅट इफ द चान्स ऑफ विनिंग one बॅटल इज 1/2 देन द चान्स ऑफ विनिंग five बॅटल्स इन a row इज (1/2)^5 = 1/32. “सो यू आर right, General, अबाऊट ३ आऊट ऑफ every हंड्रेड. मॅथेमॅटिकल प्रोबॅबिलिटी, नॉट जिनिअस.”
पेशवाईच्या शेवटी
नारायणरावांच्या खुनानंतर अनेक अफवा उठल्या असाव्यात (उदा. नारायणरावाचे भूत) , त्यात ही अजून एक अफवा असावी.
दुर्दैवाने घडलेल्या गोष्टींशी या मूर्तीचा संबंध लावला गेला असू शकतो.
माझ्या लहानपणी अशा गोष्टींचा भानामती, करणी यावर काही शेजार्यांचा गाढ विश्वास असल्याचे पाहिले आहे.
स्वतःला आलेल्या दुर्दैवी अनुभवांचा संबंध करणी, भानामती यांच्याशी लावून उत्तरे शोधण्याचे आणि घडत असेल त्यात कोणालातरी दोष लावण्याचे प्रकार सुरू होतात असेही पाहिले आहे.
अवांतर - गो. नी. दांडेकरांचे एक पुस्तक आठवते. मला वाटते घाशीराम कोतवालाच्या काळात रेखलेली काल्पनिक कथा असावी. सोने प्रसवणारा शाळिग्राम, एक कन्नड गायिका/गणिका आणि उत्तरेकडचे मारेकरी अशी काही तरी ती गोष्ट होती- मस्त लिहीली होती.
पेशवेकालीन तांडव गणपती
कुठल्याही प्रकारचे समर्थन अथवा खंडन न करता मला असे म्हणावेसे वाटते की या जगात बर्याचशा अशा घटना घटतात की त्याचा वैद्न्यानीक दृष्ट्या अर्थ लावता ये त नाही तरी त्या घटत असतात. जसे पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तीचे मंगळ नसलेल्या व्यक्तीशी लग्न झाल्यास मंगळ नसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतणे. पत्रीकेत भकुट दोष असल्यास तो संसार सुखाचा होत नाही वगैरे. या गोष्टीचे समर्पक उत्तर् ज्योतिष्य् शास्त्राशिवाय कुठल्याही इतर प्रकारे देता येत नाही मग या गोष्टी वास्तवात वारंवार घडत असतांना खोट्या संमजाव्यात काय?
विश्वास कल्याणकर
:(
>से पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तीचे मंगळ नसलेल्या व्यक्तीशी लग्न झाल्यास मंगळ नसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतणे. पत्रीकेत भकुट दोष असल्यास तो संसार सुखाचा होत नाही वगैरे
बाप रे.. !
मंगळ लैच भारी दिसतो डायरेक्ट जीव घेतो म्हणजे... !
तद्दन फालतुपणा आहे हा सगळा.. !!
* अभिषेक आहे ना अजून :?
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
भित्यापाठी ब्रह्मराक्षस
असावे किंवा त्या घटनांची वैज्ञानिक विश्लेषणे आपल्यापर्यंत पोहोचत नसावीत. शेवटी, ज्याला जे मानायचे आहे ते तो मानत राहतो.
विश्वासराव, कुंडली आणि मंगळ या गोष्टी भारतातच पाहिल्या जातात ना पण लग्ने तर भारताबाहेर अनेकांची होतात. त्यांनाही मंगळ असावेत. त्या सर्वांच्याच काय जिवावर बेतते का? विमानाला अपघात होऊन अनेक लोक मरतात, भूकंपात अनेक मरतात, बॉम्बस्फोटात मरतात त्यातले विवाहीत काय मंगळाच्या जोडीदाराशी लग्न केलेले असतात का? हे सर्व आफ्टरमॅथ असते. आपल्या दु:खाचे समाधान/ विश्लेषण लोक शोधत असतात. मग त्या बिचार्या मंगळाला, शनीला दोष द्यायचा. '
भित्यापाठी सतत ब्रह्मराक्षस असतोच असे नाही पण घाबरटाला त्याच्याशिवाय करमतही नसावे. :-)
मंगळ व भकुट
हा विषय खरे तर इतका वादग्रस्त आहे कि यावर भाष्य न करणे बरे. कारण ज्यांचा ज्योतीष्य शास्त्रावर विश्वास नाही त्यांना हे पटणे कधीही शक्य नाही. माझे एक साढ भाउ आहेत त्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. आज त्यांचे वय ७० वर्षांचे आहे. त्यांची एक मुलगी लग्नाची आहे. तिच्या पत्रिकेत मंगळ आहे हे त्यांना या दरम्यान कळले. आता ते पत्रिका पहातांना मंगळ असणारा मुलगाच शोधत आहेत कारण अनुभव. तेंव्हा स्वानुभवानंतरच यावर विश्वास बसतो. अर्थात मला त्या वादात पडावयाचे नाहि. सहज सुचले म्हणुन लिहीले.
विश्वास कल्याणकर
रोचक कथा
अतिशय रोचक कथा आहे. रात्री वीज गेल्यावर, कंदिलाच्या प्रकाशात विशेषतः एखाद्या गावात ऐकायला मजा येईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून मात्र हे सत्य मानता येत नाही.
रोचक कथा पण विश्वसनीय?
अतिशय रोचक कथा. पण काही दुवे कच्चे दिसतात. अधिक प्रकाश टाकता येईल का?
रघुनाथरावांकडे असलेली मूर्ती अज्ञातवासात जाते. (१७७३ साली)
सातारला एका ब्राह्मणाकडे असते. तो ती विहीरीत टाकून देतो. (१८६० सालानंतर?)
गोडबोलेशास्त्री यांना ती स्वप्नात दिसते व विहीरीतून कामत ती बाहेर काढतात (१९२० नंतर). यानंतरचा प्रवास पूर्ण ज्ञात दिसतो.
ही एकाच मूर्तीची गोष्ट आहे का? तसे असल्यास काय कसोट्या वापरल्या? वर यात एक प्रतिकृतीची भानगड आहेच.
मूर्तीने गोडबोलेशास्त्रींना दृष्टांत दिला, कामत त्याबद्दल नाखूष होते. दोघेही सातारचेच. मग मूर्ती गोडबोलेशास्त्रींकडे का राहिली नाही? त्यांनीच ती बाहेर का काढली नाही?
अनेक जणांना अशा मूर्त्या मिळतात. पण त्याचे श्रेय नंतर दृष्टांताला देण्यात येते. या गोष्टीत हे घडले नाही याबद्दलचे हे प्रश्न आहेत.
प्रमोद
इतिहास
मराठी इतिहास तसाही अगम्य आहे. कारण पुर्वी घटना लिहुन ठेवणे ही पधद्त फारशी अस्तित्वात नव्हती. शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या जन्मसालाबद्दल चा वाद आता आता पर्यंत होता. मराठी इतिहासाची १४ लाख पाने मोडीतील ही अद्याप अप्रकाशीत आहेत्. असे असतांना आपण इतिहासातील प्रत्येक गोष्टी बाबत पुराव्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सध्या सुरु असलेला रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते अथवा काय याला देखील पुरावा सापडणे अवघड आहे. पण तत्कालीन पत्रे किवा घटना यावरुन च या संबधाबद्दल कयास करावा लागतो. तिच गोष्ट् मुर्तीबाबत. सध्या ज्यांच्याजवळ ही मुर्ति आहे असे आढळले तिथुनच किवा त्यांच्या मार्फत च या मुर्तीचा पुढील प्रवास कळु शकेल.उपलब्ध माहिती द्वारे पुढील गोष्टींचा तपास करणे याला जिद्न्यासा च आवश्याक असते. आणी प्रत्येकात ती थोड्या फार प्रमाणात असते म्हणुनच इतिहास हा हळु हळु उकलत असतो.
विश्वास कल्याणकर
पुरावा पूर्ण नसतानाची विधाने
पूर्ण पुरावा नसणे हे शक्य असते. तो नसताना वस्तुनिष्ठतेतून आपण वेगळी विधाने करतो.
मूर्तीचे पेशवेकालीन वर्णन (संदर्भ) व आताची मूर्ती यात विलक्षण साम्य आहे म्हणून हा माझा कयास आहे.
मूर्तीची घडणावळ पेशवेकालीन दिसते (संदर्भ) म्हणून ती तेथील असावी.
रघुनाथरावांच्या नंतर ती काही दिवस अज्ञातवासात राहिली आणि नंतर ती एका ब्राह्मणाकडे पोचली अशी आख्यायिका (संदर्भ) आहे.
मूर्तीने गोडबोलेशास्त्रींना दृष्टांत दिला अशी अमुक माणसाची (संदर्भ) आठवण आहे.
मूळ लेखात अशी विधाने नव्हती त्यामुळे पुरावे मागितले.
एकंदर तीन संदर्भ दिले आहेत. त्यातील एक अभ्यासपूर्ण नियतकालिकाचा व दोन वृत्तपत्रातील आहे. यातील पहिल्याकडून ही अपेक्षा करणे साहजिक आहे. आणि ते तसे करत नसतील तर दर्जा खालचा आहे असे धरण्यास वाव आहे. वृत्तपत्रात मात्र असे लिहिले जात नाही व ते स्वाभाविक आहे. जेव्हा वृत्तपत्र त्याकाळचे नाही (गोडबोले, कामत असतानाचे) तेव्हा त्यांची माहिती ही प्रथम दर्जाचा पुरावा मानला जाणार नाही.
इतिहास म्हणजे काय? (व्हॉट इज हिस्टरी?) हे टेलर (?) यांचे पुस्तकाची आठवण होते. उदा. समजा मला आणिबाणीची, मनमोहनसिंगांच्या आर्थिक नीति बद्दलचा इतिहास लिहायचा आहे. तर मी न वाचलेल्या पानांची संख्या ही मोडीच्या न वाचलेल्या पानांच्या संख्येपेक्षा जास्त होईल. यात घडलेले प्रत्येक प्रसंग हे माझ्या पुस्तकात आले तर माझे पुस्तक हे विश्वकोश एवढे होईल. त्यातील बरेचसे मला जे म्हणायचे आहे त्यास गैरलागू होईल. याचा अर्थ इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटनांची जंत्री नाही तर ती इतिहासकाराने निवडलेल्या घटनांची जंत्री आहे.
ही निवड करणे हे इतिहासकाराचे कसब आहे. एकदा निवड केली की मात्र त्यासाठीचा पुरावा शोधनाची जबाबदारी त्या इतिहासकाराची असते. त्यासाठी १४ लाख (?) मोडीपत्रातील नेमके पत्र त्यानेच हुडकून काढायचे असतात. कोणा एका माणसाने १४ लाख पत्रे वाचून इतिहास लिहिण्यास सुरुवात करावी ही अपेक्षा करणे चूक आहे.
एका विशिष्ट हेतूने इतिहासकार लेखन करीत असतो. आणि भिन्न हेतू असलेले दुसरे त्यात खोड्या काढतात हा पॉपरच्या सिद्धांतासारखाच प्रकार आहे.
प्रमोद
१४ लाख पाने
झाकली मूठ १४ लाखांची.
(रामदास शिवाजीचे गुरू होते का? १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत).
(तुकाराम आणि शिवाजीची भेट कधी झाली होती का? १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत).
(आनंदीबाईने खरेच ध चा मा केला का? १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत).
(अ ही घटना घडली होती का? १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत).
(ब घटना घडली होती का? १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत).
(!@#$ %^&*? १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत).
औरंगजेबाने शिवाजीला पळून जा व राज्याभिषेक करून घे असा सल्ला आग्र्यात असताना दिलेरखानाकरवी दिला होता. याला पुरावा काय? मराठी इतिहासाची १४ लाख पाने मोडीतील ही अद्याप अप्रकाशीत आहेत्. असे असतांना आपण प्रत्येक गोष्टी बाबत पुराव्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
असो. "कारण पुर्वी घटना लिहुन ठेवणे ही पधद्त फारशी अस्तित्वात नव्हती" आणि "मराठी इतिहासाची १४ लाख पाने " ही वाक्ये अगदीच विसंगत आहेत. म्हणजे घटना लिहून ठेवण्याची पद्धत फारशी अस्तित्वात नव्हती हे म्हणायचे असेल तर १४,००,००० पानांमध्ये ऐतिहासिक काही लिहिले असण्याची शक्यता कितीशी मानावी? १४,००,००० पाने इतिहासाची आहेत असे माहिती असेल तर लिहून ठेवायची पद्धत नव्हती हे म्हणणे कितपत बरोबर?
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
भारी प्रतिसाद
भारी प्रतिसाद ! १४ लाख मोडीतील पाने अजून वाचायची राहिली आहेत हे कळले. पण रुमालांचे काय? ही पाने त्या रुमालांत असतात का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नकली मूर्ती
श्री सुबय्यांचे काहीच कसे बरेवाईट झाले नाही. वेडसर मुलगा निपजणे वगैरे.. माझ्यामते ही मूर्ती नकली असावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
कांची कामकोटी पीठाचार्यांनासुद्धा त्रास
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना झालेला त्रास आठवला. (जयेंद्र सरस्वती यांच्या बाजूचे संकेतस्थळ, २००४ मध्ये इंडियन एक्स्प्रेअसमधली बातमी.) त्यांच्यावर खुनाचा आरोप आला होता.
प्रतिकृती नसून मूळ मूर्तीच शंकराचार्यांनी ठेवून घेतली असल्याची शक्यता आहे. अथवा प्रतिकृती इतकी हुबेहूब बनवली असावी, की त्याचे अघोरी गुण कमी प्रमाणात प्रतिकृतीमध्येही उतरले असावेत. (म्हणून १९५३ ते २००४ इतक्या दीर्घकाळाने दुष्परिणाम झाला.)
ललित मोदीलासुद्धा त्रास!
कदाचित आय पी एल् फेम ललित मोदीकडे मूळ मूर्ती वा प्रतिकृती असण्याची दाट शक्यता आहे!
पाठवा
क्रुपया हि मुर्ति जेम्स लेन या माणसास भेट दिलित तर बरे होइल