अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येते. केवळ भाषे च्या नावाने राजकारण करत स्वतः च्या तुंबड्या भरत, कोटुंबिक भांडणाची राज्याच्या वेशीवर लक्तरे धुवत न बसता, अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला , नुसताच अभ्यासक्रम सुरु केला नाही तर या साठी आवश्यक असणारी ग्रंथ संपदा सुद्धा तेथील विद्यापीठांनी तय्यार करून प्रकाशित केली आहे. हिंदीच्या नावाने देश की एकात्मिका की एकमात्र भाषा हिंदी ही है असे धेडगुजरी हिंदीत ढोल पिटणाऱ्या भारत सरकारला सुद्धा गेल्या ६० वर्षात हिंदी भाषेत हे अभ्यासक्रम सुरु करण्याची हिम्मत झाली नाही , व्यवस्था करता आली नाही. हे देशाचे दुर्देव आहे.

महाराष्ट्रात मराठीचे नुसते नाव जरी काढले तरी डोळे वाटरनारे केंद्रीय सरकार , बिमारू राज्याचे भ्रष्ट्र राजकारणी, उटपटांग बातम्या देणारा, वटवट करणारा मिडिया, विचारवंत,साहित्यिक लगेच देशाचे तुकडे होतील म्हणून बोमबाबोम सुरु करतात आणि महाराष्ट्रीय नेते शेपूट घालून पुरणपोळी किंवा इतर उत्सव साजरे करण्यात मश्गुल होतात. आंदोलने अर्ध्यावर सोडून आम्हीच कसे हुशार म्हणत भाषणबाजी सुरु करतात. गेल्या साठ वर्षातील साहित्यिकांनी मराठी भाषे करता फक्त भाषण बाजी करत सरकारच्या फेकलेल्या अनुदान, शिष्यवृत्ती,परदेशी अकेडमीत भरती होत मराठीला अपमानित करण्याचेच काम केले . नेत्यांनी गळ्यात हात टाकताच हे त्यांचे भाट झाले . या नेत्यांनी तमिळ नेत्यांची शिकवणी स्वभाषेचा मान कसा राखावा या साठी आवश्य लावावी. उगीच नाही, केंद्र आणि हिंदीचे मुजोर नेते दक्षिणे समोर शेपूट हलवत गप्प बसून राहतात. तमिळ भाषेत शिक्षण दिल्या मुळे शैक्षणिक दर्जा खालावेल , देशाचे तुकडे होतील म्हणून बोंबा मारण्याची यांची हिम्मत झाली नाही. आणि मिडिया भुंकायचे सोडून पेकटात लाथ बसलेल्या कुत्र्यावाणी कोपऱ्यात गप्प पडून राहिला.

तामिळनाडू जे केले ते १००% बरोबर केले.याचा चांगला परिणाम स्थानिक पातळीवरील जनतेला होईल. आपल्या मातृ भाषेत डॉक्टर शिकल्या मुळे सामान्य जनतेशी रुग्णांशी आजार पणा बद्दल तो त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकेल रुग्णानाही डॉक्टर काय उपचार करत आहे हे समजेल. संपूर्ण युरोपातील देश, चीन जपान स्वतःच्या मातृ भाषेत ( इंग्रजी नव्हे ) व्यवहार करतात भाषा अभिमान बाळगतात पण आपण अजून इंग्रजाची गुलामगिरी सोडत नाही.

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

उधृत

माझा एक मित्र तमिळ आहे. त्याचे उधृत इथे देत आहे
"आम्हाला पहिल्यापासूनच तमिळ एके तमिळ शिकवलं गेलं.. सगळा अभ्यास आधी तमिळ आणि नंतर इंग्रजीतून केला.. एके काळी आमच्या इंग्रजी चा आम्हाला कोण अभिमान होता. आता मात्र जेव्हा आम्ही नोकरीसाठी तमिळनाडू सोडतो तेव्हा ह्या देशातच परके वाटते. आम्हाला तमिळ भाषिकसोडून इतरांशी मनमोकळं बोलता सुद्धा येत नाहि. आता आपल्या प्रोजेक्टमधे म्हणा किंवा बीयुमधे म्हणा जवळजवळ प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे पण फक्त मी सोडल्यास प्रत्येकाला हिंदी येते अगदी कानडी, तेलुगु, मल्याळम लोकांना देखील! तेव्हा लोक जेव्हा कामाविषयी बोलत नसतील, तेव्हा बोलता बोलता सहज हिंदी सुरु करतात.. खरच जर तमिळनाडूबाहेर जन्म झाला असता तर बरं झालं असतं असं वाटतं कधी कधी"

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

घरचा आहेर

हा अजून एक घरचा आहेर!

नक्की काय व्हायला हवे?

सुनील यांनी दिलेला दुवा इंग्रजीतील आहे.
स्थानिकभाषेला जरा झुकते माप मिळाले,
की देशी इंग्रजी येणार्‍यांना लगेच अपचन होते ते हे आपण गेली अनेक वर्षे पाहतोच.
त्यात काय ते खास?

ऋषिकेश बहुदा तौलानिक विचार करूनच लेखन करतो.
एखादे मत नोंदवतांना विचारपुर्वक मांडलेले असते.
त्याने असे उद्धरण येथे दिल्याने मी जरा बुचकळ्यात पडलो आहे.

मग भाषेसाठी नक्की काय करायला हवे?
मातृभाषेतून शिक्षण नको?
मातृभाषेतून शिक्षण हवे?
चीनी सरकारने सर्व काही संवाद चीनी भाषेतूनच असावे अशी ताठ आणि कठोर भुमिका घेतली नसती, तर आज चीनी भाषा इतकी मोठी झाली असती काय?
इंग्लंडाच्या राणीने सगळे राज्य इंग्रजीमधूनच चालावे अशी अढ्यातेखोर अशी भुमिका घेतली नसती, तर इंग्रजीचे काय झाले असते?

भाषा जगवण्यासाठी सरकारकडून नक्की काय व्हायला हवे असे तुम्हाला वाटते?
(येथे राजकारण या अर्थाने प्रतिसाद अपेक्षित नाही. धोरण या अर्थाने येथे पाहावे)

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

भाषा

बंगाली लोकांमध्येही असाच प्रवाद ऐकला आहे. (बंगालीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यामुळे नुकसान).

शालेय शिक्षण मातृभाषेतून असावे हे योग्य. महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजीतून असावे हे उत्तम.

भाषा टिकवण्यासाठी सरकारने काहीही करू नये. (सरकारनेच नेहमी काहीतरी कशाला करायला हवे?)

>>चीनी सरकारने सर्व काही संवाद चीनी भाषेतूनच असावे अशी ताठ आणि कठोर भुमिका घेतली नसती, तर आज चीनी भाषा इतकी मोठी झाली असती काय?

चीनी तरुणही कदाचित पुढेमागे असेच दु:ख करतील काय? (इंग्रजी न आल्यामुळे आयटी मध्ये मागे पडलो).

इंग्रजीची वाढ/विकास हा राणीच्या आढ्यताखोर धोरणातून झालेली नसून इंग्रजांनी जग जिंकण्यामुळे झाली आहे. जग जिंकण्यास इंग्रजी भाषा विकसित/समृद्ध असण्याचा काही उपयोग झाला नसावा. इंग्रजांनी जग जिंकले नसते तर राणीचे आढ्यताखोर धोरण इंग्लंडातच ठेवायची वेळ आली असती. वाढ होण्याचा प्रश्नच आला नसता.
(प्रश्नः इंग्लंडचे राज्य हे इंग्रजीच्या वाढीचे कारण आहे ही इंग्रजीची वाढ हे राज्य वाढण्याचे कारण आहे?. धनंजय तर म्हणतात की कारण-कार्य असे काही नसतेच. धनंजय यांनी ह घेणे).

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

थोडक्यात

सामान्यतः एखादे उद्धरण देताना मी त्याच्याशी सहमत असेनच असे नाहि , यावेळी मात्र मी वरील उद्धरणातील भावनांशी सहमत आहे.

मराठीवर (पक्षी आपल्या मातृभाषेवर) प्रेम असणं, त्याचा प्रचार करणं वगैरे योग्य आहेच. फक्त स्वभाषेवर प्रेम म्हणजे इतरांचा दुस्वास अथवा इतरांवर बंदी हा होत नाहि.

मातृभाषेतून शिक्षण नको?
मातृभाषेतून शिक्षण हवे?

मातृभाषेतून शिक्षणाचा विकल्प हवाच! सक्ती हवी की नाहि माहित नाहि.. मात्र इथे मुद्दा असा आहे की आपण मातृभाषे विषयी बोलतोय.. राज्याच्या अधिकृत कामकाज भाषेविषयी नाहि. तेव्हा जर मातृभाषेत शिक्षण हवे असा आग्रह असेल् तर एखाद्या बंगाली मुलाला महाराष्ट्रात बंगाली शाळा उपलब्ध करणे गरजेचे होईल.

बाकी चिन/ जपान वगैरेंशी तुलना यासाठी नको की
१. त्यांच्या देशात मोजक्या भाषा आहेत.
२. चीनी भाषा इतकी मोठी आहे म्हणजे किती? माझ्यामते जगात एका प्रांतात एकवटलेली भाषा मोठी कशी म्हणता येईल (केवळ किती लोक ती भाषा बोलतात आवर भाषा मोठी / लहान ठरवावे का?)

भाषा जगवण्यासाठी सरकारकडून नक्की काय व्हायला हवे असे तुम्हाला वाटते?

सरकारने राज्यभाषेच्या प्रगतीच्या आड येणार नाहित व शक्य तिथे योग्य प्रयत्नास प्रोत्साहन मिळेल असे धोरण ठरवावे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दुर्देवाने महाराष्ट्रातील विचारवंत आणि उच्चभ्रू या सुरात सूर मिळ

मी इतर भाषेचा दु:स्वास करत नाही. महाराष्ट्रात मराठीचा वापर करायचा म्हंटले की देल्ही पासून एकजात सर्व हिंदी नेते.हिंदी मिडिया महाराष्ट्रीयन लोग देश का तुकडे कर रहै म्हणत २४ तास बोंब मारत असतात. दुर्देवाने महाराष्ट्रातील विचारवंत आणि उच्चभ्रू या सुरात सूर मिळवून मराठी माणसा बद्दल, गेरसमज पसरवितात. मुळातच देशाची राज्याची रचना भाषावार तत्वावर झाली आहे. इतर राज्ये त्यांची भाषा समृद्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतात.त्यात कांही चूक नाही मग देल्ही आणि या बिमारू राज्याच्या नेत्यांचा महाराष्ट्रावर राग का? उलट महाराष्ट्र एव्हढे सर्वजणांना सामावून घेणारे कोणतेही राज्य नाही भारतात नाही.
जी गोष्ट तामिळनाडू करू शकते, ती महा. का करू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेने मराठी भूमीपुत्रांचा विचार करणे भारतातील कोणत्या कायद्याने गुन्हा आहे? हे समजेल का? मातृभाषेतून शिक्षण झाल्या मुळे नुकसान झाले असे म्हणणे याला मातृद्रोह हा एकच शब्द आहे. महाराष्ट्रातील बंगाली मुलाने बंगाली भाषेत शिक्षण घ्यावे याला कोणी अडथला आणणार नाही. मातृभाषेत शिक्षण याचा अर्थ इतर भाषेला बंदी असा होत नाही. इतर भाषा शिकण्यास महाराष्ट्र एवढ्या संधी भारतात कोठेच नाही. सर्वांच्या मतान वरून महाराष्ट्राचा दुश्मन इतर भाषी नसून सो काल्ड विचारवंत,साहित्यिक, आणि उच्चभ्रू महाराष्ट्रीयनच आहे.

किरकोळ् विरोध

व्यवसाय् करणार्‍यांना स्वत:चे पोट कसे भरायचे ते चांगले माहित असते. हे पहा एअरटेलने आजच दररोज तिरुक्कुरळ ऐकण्याची सोय उपलब्ध केली.
स्थानिक भाषांना महत्त्व मिळू लागले, की इंग्रजाळलेल्या स्वयंमन्य लोकांचा पोटशूळ उठतो. कारण मग ज्ञानभाषा आणि 'नेटिव्ह' भाषेचा भेद संपतो. संबंधित लेखाखालील प्रतिक्रिया यासंबंधात बोलक्या आहेत.
तमिळनाडूत तमिळमधून शिकायची सक्ती करण्यात येत आहे. अन्य भाषा शिकण्यास मनाई केलेली नाही. दुवा असे अनेक लोक चेन्नईत हिंदी शिकताना मी पाहिले आहेत. त्यामुळे तमिळ भाषकांची कैफियत मला तरी लटकी वाटते.

 
^ वर