त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण

जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया वाचून मी ही प्रतिक्रिया दिली.ती खाली देत आहे.
जगातील सर्वात जुना असा हा व्यवसाय होता, आहे आणि भविष्यात राहणार आहे.पण मध्यम वर्गीयांचा प्रोब्लेम म्हणजे ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे किंवा मी नाही त्यातली कडी लावा आतली असा आहे. आज हा व्यवसाय आहे म्हणूनच आपल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे आपण विसरतो. हा व्यवसाय या स्त्रिया कांही मजेखातर करत नाही.त्यांचीही मजबुरी असते. समाजाच्या गरजे प्रमाणे व्यवसाय निर्माण होत असतात.यामुळे इतर व्यवसाय कडे आपण ज्या स्वच्छ नजरेने बघतो तसे या व्यवसाया कडे पाहीले तर यातील धोके,फसवणुकीचे प्रकार थांबतील पण असे झाले तर यातील दलालांचे नुकसान होईल यात समाजातील अनेकांचे हितसंबंध नोकरशाही, पोलीसवर्ग, राजकारणी वर्ग यांचे गुंतलेले आहे. त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण सर्व यांच्या कमाई वर होते. पण दुर्देव्य ते लोक सुद्धा यांचा तिरस्कार करतात. जर ह्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देवून, या स्त्रियांना अधिकार दिले तर पिळवणूक करणाऱ्यांचे हितसंबंध धोक्यात येतील.म्हणूनच या व्यवसायासा संबंधी अनेक गैरसमज पसरवले जातात. अखेरीस एकच प्रश्न yaar hamaari baat suno aisaa ik insaan chuno jisane paap naa kiyaa ho jo paapi naa ho.

Sanjeev says:
जून 23, 2010 at 1:40 pm
ठणठणपाळ, मानलं तुम्हाला ! १००% सत्य! आपण नैतिकतेचे ढोल फ़ार वाजवतो, पण कायदा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यावर मौन बाळगतो.

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

स्वसंपादन

श्री ठणठणपाळ लेखाच्या आशयाशी थोडाफार सहमत आहे.

जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर

यावरून SEX WORKER नावाचे वर्तमानपत्र असावे असा समज होऊ शकतो. स्वसंपादन केल्यास अशा चुका टाळता येतील.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

या बाबतीत आठवले

या अनुषंगाने मिसळपावावर मी केलेली ही चर्चा आठवते (दुवा - वेश्याव्यवसायाची नैतिकता).

वेश्याव्यवसाय

आज हा व्यवसाय आहे म्हणूनच आपल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे आपण विसरतो.

समाजातील वेश्यांची संख्या वाढवली तर आया-बहिणींवर होणारे हल्ले, छेड काढण्यासारखे प्रकार, बलात्कार कमी होतील असे ठोस सांगता येते काय? विदा नसला तरी अशा घटना किंवा प्रसंगातून उदाहरणे देता आली तरीही चालेल.

तसेच, ही वेश्यांची संख्या वाढून समाज सुरक्षित होईल असा विश्वास असल्याने आया-बहिणींना त्यात भाग घेण्यास उद्युक्त कराल काय?

सहमत

वेश्यांची संख्या वाढल्यास स्त्रियांविरुद्ध होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल या विधानाविषयीच्या साशंकतेशी सहमत आहे.

तसेच, ही वेश्यांची संख्या वाढून समाज सुरक्षित होईल असा विश्वास असल्याने आया-बहिणींना त्यात भाग घेण्यास उद्युक्त कराल काय?

सैनिकांमुळे देशाचे नागरिक सुरक्षित जीवन जगतात, असे विधान कोणी केल्यास त्या व्यक्तिने जवळच्या नातलगांना सैन्यात जाण्यास उत्तेजन द्यावे, असे आवश्यक नसावे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

दांभिकपणा

सैनिकांमुळे देशाचे नागरिक सुरक्षित जीवन जगतात, असे विधान कोणी केल्यास त्या व्यक्तिने जवळच्या नातलगांना सैन्यात जाण्यास उत्तेजन द्यावे, असे आवश्यक नसावे.

येथे प्रश्न आवश्यकतेचा नाही तर दांभिकतेचा आहे. खाली राजेश यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. ९/११ नंतर इतर नागरिकांच्या पोरांनी सैन्यात सामिल व्हायला आवाहन करणार्‍या अमेरिकन नेत्यांची स्वतःची पोरे सैन्यात नसल्याचा दांभिकपणा मायकल मूरने दाखवून दिला होता.

सैनिकांमुळे देशाचे नागरिक सुरक्षित जीवन जगतात, असे विधान ठासवून सांगणार्‍या (घरात केले तर जाऊ द्या पण चार चौघांत असे विधान करणार्‍या) माणसाला समोरच्याने हा प्रश्न करणे सयुक्तिक आहे. प्रश्नाचे उत्तर "हो किंवा नाही" मध्ये अपेक्षित आहे आणि "नाही" असे उत्तर असल्यास "का नाही?" हा पुढला प्रश्न देखील सयुक्तिक आहे. ("का नाही?" या प्रश्नाचे उत्तरही सयुक्तिक असू शकते पण येथे तो मुद्दा नाही.)

सहमत

येथे प्रश्न आवश्यकतेचा नाही तर दांभिकतेचा आहे. खाली राजेश यांनीही त्याचा पुनरुच्चार केला आहे. ९/११ नंतर इतर नागरिकांच्या पोरांनी सैन्यात सामिल व्हायला आवाहन करणार्‍या अमेरिकन नेत्यांची स्वतःची पोरे सैन्यात नसल्याचा दांभिकपणा मायकल मूरने दाखवून दिला होता.

अगदी बरोबर.. आम्रिकेतच काय महाराष्ट्रातही मुलांच्या काळजीने नुकत्याच मुख्यमंत्र्याला भेटलेल्या नेत्यासकट सगळ्या "मराठी" जनतेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांच्या आणि एकूणच मराठीच्या नावे अश्रु ढाळणार्‍या सगळ्या नेत्यांनीच त्या शाळांचे श्राद्धा केव्हाच घातले आहे आणि आपली मुले इंग्रजी शाळांत घातली आहेत.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दांभिकपणा?

येथे श्री ठणठणपाळ यांनी इतर कोणाला शरीरविक्रयाचा व्यवसाय करा असे आवाहन केलेले नाही. तेव्हा ९/११ नंतरचे उदाहरण तसेच मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे उदाहरण हे गैरलागू आहेत.

सैनिकांमुळे देशाचे नागरिक सुरक्षित जीवन जगतात, असे विधान ठासवून सांगणार्‍या (घरात केले तर जाऊ द्या पण चार चौघांत असे विधान करणार्‍या) माणसाला समोरच्याने हा प्रश्न करणे सयुक्तिक आहे.

का संयुक्तिक आहे?

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

पुरस्कार

सर्वात जुना व्यवसाय, या व्यवसायाशी संबंधित मध्यमवर्गीय ताकाला जाऊन भांडे लपवतात, या व्यवसायाचा तिरस्कार करू नयेत, अनेक पांढरपेशांची घरे त्यावर चालतात, त्यांच्या भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण सर्व यांच्या कमाई वर होते. (यासाठी किती विदा गोळा केला ते कळणे कठिण. अशा प्रकारचे लेख मांडायचे झाले तर मुलगी वेश्या आहे हे कळल्यावर तिच्या घरचे तिच्या कमाईवर थुंकतात, असे टाळ्याखाऊ वाक्ये इतरही मांडू शकतात.) ठणठणपाळ व्यवसायाचा पुरस्कार करत आहेत असे त्यांच्या वाक्यावरून जाणवते म्हणून त्यांना हा प्रश्न योग्य आहे.

का संयुक्तिक आहे?

जर एखादी गोष्ट एखाद्याला पटत असेल आणि तो ती जाहीर मांडत असेल तर तू ती करू इच्छितोस का असा प्रश्न विचारण्यात काहीही गैर वाटत नाही म्हणून. उत्तर हो किंवा नाही असू शकते हे आधीच स्पष्ट केले आहे.

गैर नाही । संभावित उत्तर

जर एखादी गोष्ट एखाद्याला पटत असेल आणि तो ती जाहीर मांडत असेल तर तू ती करू इच्छितोस का असा प्रश्न विचारण्यात काहीही गैर वाटत नाही म्हणून. उत्तर हो किंवा नाही असू शकते हे आधीच स्पष्ट केले आहे.

जॅनिटर्स असल्याने स्वच्छता ठेवता येते. तो व्यवसाय मला आवडत नाही पण त्याचे महत्त्व मान्य आहे. तद्वत मी त्या व्यवसायात जाण्यासाठी प्रयत्नशील नाही. तसा प्रयत्न माझ्या परिचयातील कुणाला करण्यासही मी उत्तेजन देणार नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

अनैतिक

जॅनिटर्स असल्याने स्वच्छता ठेवता येते. तो व्यवसाय मला आवडत नाही पण त्याचे महत्त्व मान्य आहे. तद्वत मी त्या व्यवसायात जाण्यासाठी प्रयत्नशील नाही. तसा प्रयत्न माझ्या परिचयातील कुणाला करण्यासही मी उत्तेजन देणार नाही.

वेश्याव्यवसायाशी संलग्न सैनिकी किंवा साफसफाईचे व्यवहार दाखवून प्रश्न सुटत नाही, उत्तर मिळत नाही. :-( वेश्याव्यवसाय अनैतिक मानला जातो. तसे इतर व्यवसाय नाहीत. जर, संलग्न व्यवसाय शोधायचे असतील तर ड्रग्ज विकण्याबाबत संबंध दाखवता येईल असे वाटते.

अनैतिकता सापेक्ष

अनैतिक समजले जाणारे व्यवसायही सांगता येतील. स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करण्यात मला काहीही अनैतिक वाटत नाही. तेव्हा व्यवसायाच्या अनैतिकतेबाबत भिन्न मते असू शकतात हे मान्य करूया. गर्भपात करणारे डॉक्टर्स अमेरिकेतील बर्‍याच लोकांना अनैतिक कृत्ये करणारे वाटतात. गर्भपात करणारे डॉक्टर्स अस्तित्त्वात असावेत असे माझे मत आहे. मला स्वत:ला तसा डॉक्टर होण्याची इच्छा नाही. माझ्या परिचितातील कोणाला तसा डॉक्टर होण्यास उद्युक्त करणार नाही. परंतु कोणी तसा डॉक्टर होत असल्यास (किंवा स्वेच्छेने देहविक्रय करण्यास तयार असल्यास) त्यास आडकाठी घालणार नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

स्वेच्छा

वेश्याव्यवसायापुढे स्वेच्छेचे लेबल लावावे लागते यातच बरेच आले.:-) स्वेच्छेने गर्भपात करून देणारे डॉक्टर असले तरीही गर्भपात ज्या समाजात बेकायदेशीर/अनैतिक समजला जातो तेथे तो अनैतिकच आहे. उलटपक्षी, असेही काही देश/ समाज असतील (कल्पना नाही असे देश युरोप वगैरेमध्ये असल्यास) जेथे वेश्याव्यवसाय अनैतिक मानला जात नाही तेथे त्याला अनैतिक मानता येणार नाही.

कोणी तसा डॉक्टर होत असल्यास (किंवा स्वेच्छेने देहविक्रय करण्यास तयार असल्यास) त्यास आडकाठी घालणार नाही.

पुन्हा, डॉक्टर होणे आणि वेश्या होणे हे सारखे व्यवसाय नाहीत. :-) डॉक्टरांच्या समूहातील मोजके डॉक्टर गर्भपात करवून देत असतील. ही अपवादात्मक स्थिती झाली. या अपवादाचे खापर डॉक्टरकीच्या व्यवसायावर फोडता येत नाही. या व्यवसायाला अनैतिक ठरवता येत नाही. वेश्यांच्या समूहातील काही मोजक्याच वेश्या स्वेच्छेने हा उद्योग करतात. ही देखील अपवादात्मक स्थिती झाली. त्यामुळे, संपूर्ण वेश्याव्यवसायाला नैतिक ठरवता येत नाही.

मला वाटते स्वेच्छेने देहविक्रय करायला तयार असणारी व्यक्ती माझ्यापुढे आली तर मी तिला समजावण्याचा प्रयत्न करेन. व्यवसायातले धोके किंवा व्यवसायाचा अल्पकाळ समजावून सांगेन. या व्यवसायामुळे होणारे तिचे आणि कदाचित ग्राहकाचे नुकसान समजावून सांगेन. त्याचा फायदा त्या व्यक्तिला झाल्यास उत्तम आहे. अन्यथा, प्रत्येक सज्ञान व्यक्तीस आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहेच.

मुळात अनैतिकता किंवा पळवाटा सर्वच धंद्यात आहेत. त्यांचे उदात्तीकरण कोणीच करू नये. परंतु, याचा अर्थ सर्व धंदेच अनैतिक आहेत असे म्हणता येणार नाहीत. अर्थात, वेश्याव्यवसायाला यात गणलेले नाही.

स्लिपरी स्लोप

स्वेच्छेने काहीही करण्याचे (विशेषतः कोणत्याही आर्थिक व्यवहारांचे) स्वातंत्र्य व्यक्तीस असावे का? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास वरील प्रश्न सुटेल असे वाटते. उदा.

  • केस विकण्याचे स्वातंत्र्य (ह्यूगोची द मिझरेबल/'कडू गोष्टी' या पुस्तकातील 'दु:खी' किंवा ओ हेन्रीची 'गिफ्ट ऑफ मॅजाय' यांवरून हाही एक ओल्ड प्रोफेशन असल्याचे दिसते)
  • रक्त विकण्याचे स्वातंत्र्य
  • मूत्रपिंड विकण्याचे स्वातंत्र्य
  • दोन्ही मूत्रपिंडे विकण्याचे स्वातंत्र्य
  • स्वेच्छामरणाचे स्वातंत्र्य
  • गर्भ विकण्याचे स्वातंत्र्य
  • मानवमांसभक्ष्य बनण्याचे स्वातंत्र्य
  • मूल विकण्याचे स्वातंत्र्य

अशी अनेक उदाहरणे विचारता येतील. की 'व्यक्तीचे काही भाग नष्ट करण्याची अनुमती व्यक्तीस नाही' अशी अट घालणे आवश्यक आहे?
मुद्दा असा आहे की या व्यवहारांमध्ये शोषण हा अपरिहार्य भाग राहू शकेल.

ड्रॉ द लाईन

केस विकण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. तिरुपतीहून केसांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते असे ऐकले आहे. रक्तदान करुन पैसे मिळवण्याचे स्वातंत्र्यही असावे, अमेरिकेत त्यासाठी पैशाचा मोबदला मिळू शकतो हे पाहिले आहे.
'अवयव विकणे' हा मुद्दा मात्र अधिक क्लिष्ट असून त्याची तुलना शरीर/केस/रक्त विक्रय इत्यादी विक्रींशी होऊ शकत नाही (कारण अवयव विकणे ही प्रक्रिया इर्रवर्सिबल आहे).

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

आवश्यक आहे.

'व्यक्तीचे काही भाग नष्ट करण्याची अनुमती व्यक्तीस नाही' अशी अट घालणे आवश्यक आहे?

होय.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ठणठणपाळ यांना नक्की काय म्हणायचे आहे?

(लेखासारखेच प्रतिसादाचेही लांबलचक शीर्षक). ;)

हा व्यवसाय सगळ्यात जुना असल्याचा जावईशोध कोणी लावला आहे हे कळत नाही पण एक पॉप्युलर पंचलाईन म्हणून तो फेमस आहे हे खरे.

बाकी प्रियालींशी सहमत आहे.

हा व्यवसाय कुठल्याच प्रकारे डिझायरेबल नाही. व्यवसाय या शब्दात अपेक्षित असलेली स्वेच्छा इथे फारच कमी आहे. (इथे काही स्त्रिया खुशीने हा व्यवसाय करीत असतील हे शक्य/मान्य आहे).

(प्रत्यक्षात वेश्या हा व्यवसाय करीत नसून तिचे मालक/मालकिणी, दलाल वगैरे लोक व्यवसाय करीत असतात. पूर्वीच्या काळी राजे, उमराव वगैरे लोकांकडे गुलाम असत आणि त्यांची द्वंद्वयुद्धे-जीवघेणी- आनंदाने पाहिली जात असत. ते गुलाम काही द्वंद्वयुद्धाचा व्यवसाय करीत नव्हते).

फक्त हा व्यवसाय करणार्‍यांना(?) गुन्हेगार समजू नये एवढे म्हणणे मान्य आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

कश्टमर रिक्वायरमेंट

प्रत्यक्षात वेश्या हा व्यवसाय करीत नसून तिचे मालक/मालकिणी, दलाल वगैरे लोक व्यवसाय करीत असतात. पूर्वीच्या काळी राजे, उमराव वगैरे लोकांकडे गुलाम असत आणि त्यांची द्वंद्वयुद्धे-जीवघेणी- आनंदाने पाहिली जात असत. ते गुलाम काही द्वंद्वयुद्धाचा व्यवसाय करीत नव्हते.

याचबरोबर, प्रत्येक व्यवसाय हा ग्राहकाच्या मागणीनुसार फुलत असतो.

समजा मला एक नवा व्हॅक्यूम-क्लिनर घ्यायचा आहे आणि माझी गरज पुढीलप्रमाणे आहे -

१. आकाराने लहान
२. काम करताना आवाज न करणारा
३. रिचार्जेबल - दिवसातून २-३ वेळा वापरूनही बॅटरीचार्ज शिल्लक राहील असा
४. हेवीड्यूटी
५. हाताळण्यास सोपा

तर असे उपकरण उपलब्ध केले जाईल. (म्हणजे तसे ते आता आहेच.)

आता वरील गोष्टी, वेश्याव्यवसायालाही लावून बघा :-). हा उद्योग नेमका कोणामुळे चालतो हे लक्षात येईल.

पुरवठा पुरवणी

प्रत्येक व्यवसाय हा ग्राहकाच्या मागणीनुसार फुलत असतो.

तसेच पुरवठादारांनी ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तु किंवा सेवा पुरवल्यास त्यांच्या नफ्यात वाढ होते. अशा प्रकारची वस्तु/ सेवा पुरवण्यासाठी बाजार निर्माण होतात. एखाद्या वस्तु अथवा सेवेस बेकायदेशीर ठरवल्यास मागणीवर परिणाम होत नाही पण गैरवैधानिक समांतर व्यवस्था निर्माण होण्यास पाठबळ मिळते. (उदा. प्रॉहिबिशन व बुटलेगिंग वगैरे) बेकायदेशीर न ठरवल्यास अशा प्रकारच्या व्यवसायांमुळे सरकारला कर मिळतो, अशा व्यवसायांचे नियमन शक्य होते तसेच पिळवणुक व शोषण यांचे प्रमाणही कमी होते.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

आउट ऑफ कंटेक्स्ट

हे वेश्याव्यवसायाचे समर्थन आहे का?

होय

हे वेश्याव्यवसायास कायदेशीर मान्यता मिळावी याचे समर्थन आहे.

प्रतिसाद आउट ऑफ काँटेक्स्ट वाटत असल्यास कृपया खरडवहीतून कारणासहीत कळवावे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

असहमत

वस्तु अथवा सेवेस बेकायदेशीर ठरवल्यास मागणीवर परिणाम होत नाही पण गैरवैधानिक समांतर व्यवस्था निर्माण होण्यास पाठबळ मिळते.

मागणीवर परिणाम होऊ शकतो. बहुतांश मानवी मनात अधिकारवाणीला थोडातरी भाव देण्याची सक्ती करणारी यंत्रणा असते. शिवाय पुरवठ्यावरही परिणाम घडतो.
मी याच धाग्यात इतरही काही व्यवसायांची उदाहरणे दिली आहेत. 'स्वतःशी काहीही करण्याचे स्वातंत्र्य' हा तुम्हाला स्लिपरी स्लोप वाटत नाही का? तुमचाच युक्तिवाद त्या व्यवसायांच्याही समर्थनार्थ करता येईल.

प्रतिसाद आउट ऑफ काँटेक्स्ट वाटत असल्यास कृपया खरडवहीतून कारणासहीत कळवावे.

कळविले होते.

स्वातंत्र्य

'स्वतःशी काहीही करण्याचे स्वातंत्र्य' हा तुम्हाला स्लिपरी स्लोप वाटत नाही का?

वाटत नाही. तुम्ही दिलेले व्यवसाय अस्तित्त्वात असतील. मला कल्पना नाही. पण असतील तर त्यांना कायदेशीर मान्यता दिली जावी, याचे मी समर्थन करीन.

मागणीवर परिणाम होऊ शकतो. बहुतांश मानवी मनात अधिकारवाणीला थोडातरी भाव देण्याची सक्ती करणारी यंत्रणा असते.

बेकायदा ठरवल्यास वस्तु/ सेवा यांच्या भक्षणावर निश्चितच परिणाम होतो. हा परिणाम होण्याचे कारण अधिकारवाणी नसते असे माझे मत आहे. वस्तु/ सेवा बेकायदेशीर केल्यास वस्तु/ सेवा यांच्या निर्मीतीचा व वितरणाचा खर्च वाढतो. या वाढलेल्या खर्चामुळे पुरवठादारांना किंमत वाढवावी लागते. या वाढलेल्या किंमतीस मागणी कमी असते.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

अंशतः सहमत

वाटत नाही. तुम्ही दिलेले व्यवसाय अस्तित्त्वात असतील. मला कल्पना नाही. पण असतील तर त्यांना कायदेशीर मान्यता दिली जावी, याचे मी समर्थन करीन.

मूल विकण्याचे स्वातंत्र्य दिल्यास मुलाच्या स्वातंत्र्यावर अन्याय होणार नाही का?

वस्तु अथवा सेवेस बेकायदेशीर ठरवल्यास मागणीवर परिणाम होत नाही पण गैरवैधानिक समांतर व्यवस्था निर्माण होण्यास पाठबळ मिळते.

मागणीवर परिणाम होऊ शकतो. बहुतांश मानवी मनात अधिकारवाणीला थोडातरी भाव देण्याची सक्ती करणारी यंत्रणा असते.

बेकायदा ठरवल्यास वस्तु/ सेवा यांच्या भक्षणावर निश्चितच परिणाम होतो. हा परिणाम होण्याचे कारण अधिकारवाणी नसते असे माझे मत आहे.

अनेक कारणांपैकी एक कारण अधिकारवाणी आहे. लोकांवर अधिकारवाणीचा खूप परिणाम होतो.

वस्तु/ सेवा बेकायदेशीर केल्यास वस्तु/ सेवा यांच्या निर्मीतीचा व वितरणाचा खर्च वाढतो. या वाढलेल्या खर्चामुळे पुरवठादारांना किंमत वाढवावी लागते. या वाढलेल्या किंमतीस मागणी कमी असते.

हेही मागणी कमी होण्याचे अजून एक कारण आहे. अर्थात, शोषण टाळणे, गुणवत्ता नियंत्रण, इ. काळज्या घेण्याची सक्ती केली तर कायदेशीर मालाची किंमत बेकायदेशीर मालाच्या किमतीपेक्षा अधिक होऊ शकते. या युक्तिवादाचा निष्कर्ष असा की बेकायदेशीर जाहीर केलेल्या सेवेची मागणी वाढू शकते! तुम्ही असा युक्तिवाद कराल असे मला अपेक्षित होते. त्यावर उत्तर देण्यासाठी तुम्ही दिलेला "वस्तु/ सेवा बेकायदेशीर केल्यास वस्तु/ सेवा यांच्या निर्मीतीचा व वितरणाचा खर्च वाढतो. या वाढलेल्या खर्चामुळे पुरवठादारांना किंमत वाढवावी लागते. या वाढलेल्या किंमतीस मागणी कमी असते." अशा प्रकारचा युक्तिवाद मी करणार होतो. मागणीवर विरुद्ध परिणाम घडविणार्‍या या दोन बलांपैकी कोणते बल अधिक प्रभावी ठरेल ते "वस्तु/सेवा यांची निर्मिती/पुरवठा करण्यावर शासनास किती काटेकोर नियंत्रण ठेवणे शक्य आहे" यावर ठरते. दारू बनविणे आणि पिणे अत्यंत छोट्या गटांना शक्य आहे पण मुली पुरविणे, जाहिरात करणे, इ. साठी अधिक मोठे रॅकेट लागते. त्यामुळे दारूला कायदेशीर बनवून मागणी कमी करता येईल तर वेश्याव्यवसायाची रॅकेट्स बेकायदेशीर करून मागणी कमी करता येईल.

तपशीलातील फरक

मागणीवर परिणाम होत नाही, हे मागणीचा आलेख बदलत नाही असे वाचावे. मागणीच्या तत्त्वानुसार किंमत वाढल्यास मागणीच्या आलेखावरच (डिमांड शेड्युलवर) हालचाल होते. अधिक किंमतीस मागणी (क्वांटिटी डिमांडेड) कमी होते. (हे तपशीलवार लिहिता येऊ शकेल. पण मला तितकासा उत्साह नाही.)

अनेक कारणांपैकी एक कारण अधिकारवाणी आहे. लोकांवर अधिकारवाणीचा खूप परिणाम होतो.

अधिकारवाणीचा परिणाम लोकांच्या एखादी गोष्ट करावी किंवा करू नये यावर (विलिंगनेसवर) होत असावा. त्या परिणामाचे क्वांटिफिकेशन केले गेले असल्यास पाहण्यास आवडेल. कमीत कमी गेली तीसेक वर्षे (चूभूद्याघ्या) अमेरिकेत अंमली पदार्थांची (गांजाबाबत काही राज्यांचे धोरण शिथिल आहे) विक्री व भक्षण करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे मागणीच्या आलेखावर परिणाम झाला आहे का? झालेला असू शकेल पण मी तसे अंदाज पाहिलेले नाहीत. याउलट सिगरेट विकणे, पिणे बेकायदा नाही पण एकूणात सिगरेटच्या मागणीचा आलेख (सिगरेटच्या दुष्परिणामांमुळे) बदलत आहे व त्यामुळे मागणीचे प्रमाण कमी होत आहे. अंमली पदार्थांबाबत तसे घडू शकले असते का? हा प्रश्न आहे. माझ्या मते होय. अंमली पदार्थांचे सेवन व विक्री कायदेशीर केल्यास मागणीचा आलेख बदलण्याची शक्यता आहे. सरकारला त्यापासून कर मिळू शकेल. या कराचा महसूल लोकशिक्षणावर वापरता येईल व मागणीचा आलेख बदलण्यास मदत होऊ शकेल.

अर्थात, शोषण टाळणे, गुणवत्ता नियंत्रण, इ. काळज्या घेण्याची सक्ती केली तर कायदेशीर मालाची किंमत बेकायदेशीर मालाच्या किमतीपेक्षा अधिक होऊ शकते. या युक्तिवादाचा निष्कर्ष असा की बेकायदेशीर जाहीर केलेल्या सेवेची मागणी वाढू शकते! तुम्ही असा युक्तिवाद कराल असे मला अपेक्षित होते.

कायदेशीर मालाचा पर्याय उपलब्ध असल्यास हे आर्ग्युमेंट बरोबर आहे. (उदा. हातभट्टीची स्वस्त दारु विरुद्ध प्रमाणित देशी दारू) पण वेश्याव्यवसाय बेकायदेशीर ठरवला गेल्यास तीच सेवा कायदेशीरपणे मिळण्याची सोय आहे का?

दारू बनविणे आणि पिणे अत्यंत छोट्या गटांना शक्य आहे पण मुली पुरविणे, जाहिरात करणे, इ. साठी अधिक मोठे रॅकेट लागते. त्यामुळे दारूला कायदेशीर बनवून मागणी कमी करता येईल तर वेश्याव्यवसायाची रॅकेट्स बेकायदेशीर करून मागणी कमी करता येईल.

वेश्याव्यवसाय सुरू करण्यास फारशा भांडवलाची गरज नाही. नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ करायची असल्यास सेवेची प्रत वाढविणे, जाहीरात करणे गरजेचे ठरते.
.................

मूल विकण्याचे स्वातंत्र्य दिल्यास मुलाच्या स्वातंत्र्यावर अन्याय होणार नाही का?

हो. अन्याय होतोच. मुल विकण्याच्या व्यवसायास कायदेशीर मान्यता (कायद्याबाबत नैतिकता महत्त्वाची असल्यास) देऊ नये. मी वरील प्रतिसाद नोंदवतांना तुमच्या यादीतील सर्व व्यवसायांवर विचार केला नाही. 'स्वतःशी काहीही करण्याचे स्वातंत्र्य' यात स्वव्यतिरिक्त एन्टिटीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याने ते उदाहरण माझ्या डोक्यात नव्हते.

पण कायद्याने हा अन्याय पूर्णपणे थांबवला आहे का? बालमजुरी बेकायदेशीर आहे, त्यामुळे चहाच्या टपरीवर चहा वाटणारी मुले दिसणे थांबले आहे का?
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

फॅशन

सिगरेट विकणे, पिणे बेकायदा नाही पण एकूणात सिगरेटच्या मागणीचा आलेख (सिगरेटच्या दुष्परिणामांमुळे) बदलत आहे व त्यामुळे मागणीचे प्रमाण कमी होत आहे. अंमली पदार्थांबाबत तसे घडू शकले असते का? हा प्रश्न आहे. माझ्या मते होय. अंमली पदार्थांचे सेवन व विक्री कायदेशीर केल्यास मागणीचा आलेख बदलण्याची शक्यता आहे. सरकारला त्यापासून कर मिळू शकेल. या कराचा महसूल लोकशिक्षणावर वापरता येईल व मागणीचा आलेख बदलण्यास मदत होऊ शकेल.

अंमली पदार्थांचे दुष्परिणाम वापरकर्त्यावरच होत असल्यामुळे आऊट ऑफ फॅशन जाऊ शकतात पण नष्ट होत नसतील. दारू हजारो वर्षांत कमी झालेली नाही. वेश्याव्यवसायाच्या सार्‍याच दुष्परिणामांपासून गिर्‍हाईकाला सुरक्षित ठेवणे शक्य आहे. म्हणून येथे तंबाखूविषयातील तुलना करायचीच असेल तर विड्या वळणार्‍या (बाल)मजुरांशी करता येईल.

कायदेशीर मालाचा पर्याय उपलब्ध असल्यास हे आर्ग्युमेंट बरोबर आहे. (उदा. हातभट्टीची स्वस्त दारु विरुद्ध प्रमाणित देशी दारू) पण वेश्याव्यवसाय बेकायदेशीर ठरवला गेल्यास तीच सेवा कायदेशीरपणे मिळण्याची सोय आहे का?

माझा तो युक्तिवाद खरा ठरण्यासाठी एकाच कालात दोन्ही सेवा मिळण्याची आवश्यकता नाही. प्रमाणित देशी दारूचा निर्मिती/वितरणखर्च आणि हातभट्टीच्या दारूचा निर्मिती वितरणखर्च एकमेकांच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवर का अवलंबून राहतील?

वेश्याव्यवसाय सुरू करण्यास फारशा भांडवलाची गरज नाही. नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ करायची असल्यास सेवेची प्रत वाढविणे, जाहीरात करणे गरजेचे ठरते.

अल्कोहोल बनविणे कोणालाही शक्य आहे, परंतु (आर्थिक भांडवल/मालमत्ता आवश्यक नसली तरी) सेवा देणारीला शारिरिक ऍसेट्स आवश्यक आहेत, त्या व्यवसायात यश मिळविणे सर्वांनाच जमणार नाही. कोणालाही शक्य असल्यामुळे दारूचे सेवन जाहिरातीशिवाय चालू राहील परंतु वेश्याव्यवसायात सॉलिसिटिंग अत्यावश्यक आहे. शिवाय दारूचे नियमित सेवन करणार्‍या लोकांचा छोटासा गट एखाद्या हातभट्टीचा कायमस्वरूपी आश्रयदाता बनू शकेल परंतु वेश्येला अधिक/नवनव्या गिर्‍हाईकांवर अवलंबून रहावे लागेल आणि कायद्यापासून लपणे अधिक कठीण जाईल.

मी वरील प्रतिसाद नोंदवतांना तुमच्या यादीतील सर्व व्यवसायांवर विचार केला नाही. 'स्वतःशी काहीही करण्याचे स्वातंत्र्य' यात स्वव्यतिरिक्त एन्टिटीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असल्याने ते उदाहरण माझ्या डोक्यात नव्हते.

नरमांसभक्ष्य बनण्याच्या उदाहरणास तुमची अनुमती अपेक्षितो (असे सत्य उदाहरण घडलेले आहे). स्लिपरी स्लोप बहुदा 'गर्भाला एन्टिटी मानावे की नाही' येथे सुरू होतो.
पण केवळ स्वतःशीच संबंध असलेलेही जितके मोठे स्वातंत्र्य देवाणघेवाणजोगे ठरविले जाईल तितकी शोषणाची भीती वाढेल. रॉबिन कुकच्या ब्लाईंडसाईट या कादंबरीत हा विषय आहे. तसेच डॉ. फॉस्ट या लोककथेत नायकाचा आत्माच विक्रीसाठी असल्यामुळे तो मिळविण्यासाठी सैतान किती धडपड करतो ते पहा. मला असे वाटते की शोषणास प्रतिबंध करण्यास सरकार जितके सक्षम असेल तितक्याच प्रमाणात अधिकाधिक महत्वाच्या स्वातंत्र्यांना निगोशिएबल करण्यात यावे.

काही सहमती

कोणालाही शक्य असल्यामुळे दारूचे सेवन जाहिरातीशिवाय चालू राहील परंतु वेश्याव्यवसायात सॉलिसिटिंग अत्यावश्यक आहे. शिवाय दारूचे नियमित सेवन करणार्‍या लोकांचा छोटासा गट एखाद्या हातभट्टीचा कायमस्वरूपी आश्रयदाता बनू शकेल परंतु वेश्येला अधिक/नवनव्या गिर्‍हाईकांवर अवलंबून रहावे लागेल आणि कायद्यापासून लपणे अधिक कठीण जाईल.

वेश्याव्यवसाय बेकायदा असला तरीही अस्तित्त्वात आहेच. बेकायदा असल्याने वेश्यांना सॉलिसिटिंगसाठी, स्वसंरक्षणासाठी वेश्यांना अधिक किंमत मोजावी लागते. कायद्यापासून लपणे कठीण असल्याने कायद्याचे संरक्षण करणारे शोषण (पोलिसांना हफ्ते वगैरे) करतात ते निराळेच. व्यवसाय बेकायदा असल्याने शोषण वाढते.

पण केवळ स्वतःशीच संबंध असलेलेही जितके मोठे स्वातंत्र्य देवाणघेवाणजोगे ठरविले जाईल तितकी शोषणाची भीती वाढेल.

येथे तुम्हाला कायद्याने देवाणघेवाणजोगे ठरविणे असे म्हणायचे आहे, असे गृहीत धरतो. नुसतेच देवाणघेवाणजोगे ठरवायचे असेल तर देवाण घेवाण करणारे दोन पक्ष असल्यास व्यवहार शक्य (कायद्याची संमती असो वा नसो) होईल. शोषण म्हणजे नेमके काय हे कळल्यास त्याची भीती वाढेल की कमी होईल हे ठरवता येईल.

मला असे वाटते की शोषणास प्रतिबंध करण्यास सरकार जितके सक्षम असेल तितक्याच प्रमाणात अधिकाधिक महत्वाच्या स्वातंत्र्यांना निगोशिएबल करण्यात यावे.

सहमत. सरकार अक्षम असल्यास सरकारने निगोशिएबल केले अथवा केले नाही तरी देवाणघेवाण करणारे करतच राहतील.

माझा तो युक्तिवाद खरा ठरण्यासाठी एकाच कालात दोन्ही सेवा मिळण्याची आवश्यकता नाही.

कायद्यानुसार बनवलेली वस्तु व कायद्याचे उल्लंघन करणारी वस्तुअ एकाच प्रकारची गरज भागवत असल्यास त्या आर्ग्युमेंटसाठी त्या एकाच वेळी उपलब्ध असायला हव्यात.

प्रमाणित देशी दारूचा निर्मिती/वितरणखर्च आणि हातभट्टीच्या दारूचा निर्मिती वितरणखर्च एकमेकांच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवर का अवलंबून राहतील?

दोन्हींना लागणारे इन्पुट्स सारखेच असतील तर त्या इन्पुट्सच्या किंमती दोन्ही प्रकारच्या (हातभट्टीसाठी व प्रमाणित देशी दारूसाठी) मागणीवर ठरतील. त्या अर्थाने कमीतकमी निर्मिती खर्च 'एकमेकांच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवर' अवलंबून राहतील.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

माझे मत

वेश्याव्यवसाय बेकायदा असला तरीही अस्तित्त्वात आहेच. बेकायदा असल्याने वेश्यांना सॉलिसिटिंगसाठी, स्वसंरक्षणासाठी वेश्यांना अधिक किंमत मोजावी लागते. कायद्यापासून लपणे कठीण असल्याने कायद्याचे संरक्षण करणारे शोषण (पोलिसांना हफ्ते वगैरे) करतात ते निराळेच. व्यवसाय बेकायदा असल्याने शोषण वाढते.

पण बेकायदा असल्यामुळे आणि लपणे कठीण असल्यामुळे ही कृती करण्याची हिंमत जेवढ्यांना होते त्यापेक्षा खूपच अधिक लोक कायदेशीर केल्यास या व्यवसायात उतरतील असे मला वाटते. शोषण पकडणे सोपे वाटत नाही. प्रत्यक्ष प्रयोगांचा निष्कर्ष अधिक खात्रीचा असेल पण असे सामाजिक 'प्रयोग' कसे करता येतील?

येथे तुम्हाला कायद्याने देवाणघेवाणजोगे ठरविणे असे म्हणायचे आहे, असे गृहीत धरतो. नुसतेच देवाणघेवाणजोगे ठरवायचे असेल तर देवाण घेवाण करणारे दोन पक्ष असल्यास व्यवहार शक्य (कायद्याची संमती असो वा नसो) होईल. शोषण म्हणजे नेमके काय हे कळल्यास त्याची भीती वाढेल की कमी होईल हे ठरवता येईल.

सरकार अक्षम असल्यास सरकारने निगोशिएबल केले अथवा केले नाही तरी देवाणघेवाण करणारे करतच राहतील.

हे पटत नाही. देवाणघेवाणीवर सरसकट बंदीच लावणे अधिक सोपे आहे कारण प्रत्यक्ष देवाणघेवाण गुप्त ठेवणे शक्यच नाही. शोषणाचा सुगावा लावणे अधिक कठीण वाटते. शोषण होते की नाही ते प्रत्येक प्रकरणात कसोशीने तपासणारी यंत्रणा नसली तरी केवळ देवाणघेवाणीचे निरीक्षण करून शिक्षा देणे हे मात्र दुबळ्या सरकारलाही शक्य होईल.

कायद्यानुसार बनवलेली वस्तु व कायद्याचे उल्लंघन करणारी वस्तुअ एकाच प्रकारची गरज भागवत असल्यास त्या आर्ग्युमेंटसाठी त्या एकाच वेळी उपलब्ध असायला हव्यात.

दोन्हींना लागणारे इन्पुट्स सारखेच असतील तर त्या इन्पुट्सच्या किंमती दोन्ही प्रकारच्या (हातभट्टीसाठी व प्रमाणित देशी दारूसाठी) मागणीवर ठरतील. त्या अर्थाने कमीतकमी निर्मिती खर्च 'एकमेकांच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवर' अवलंबून राहतील.

हे मान्य आहे पण त्याने माझ्या युक्तिवादाला बळकटी मिळते. (शक्यता १: फक्त कायदेशीर दारूची निर्मिती, शक्यता २: केवळ बेकायदेशीर दारूची निर्मिती, शक्यता ३: शोषणविरहित, सुरक्षित दारूनिर्मितीस कायदेशीर परवानगी आणि सोबतच बेकायदेशीर दारूची निर्मिती). शक्यता २ मध्ये शक्यता ३ पेक्षा उत्पादनखर्च कमी येईल (याची इतर उदाहरणे, हवाला व्यवस्था आणि परकीय मुद्रा विनिमय केंद्र यांची तुलना किंवा चित्रपटांच्या कायदेशीर आणि बेकायदेशीर प्रती यांची तुलना, ही आहेत. हवालाची सेवा स्वस्त असते.)

बेकायदा

हस्तिदंताचा व्यवसाय, शस्त्रास्त्र विकणे, बालमजुरी, हुंडा देणे-घेणे बेकायदेशीर आहे. या गोष्टींची देवाणघेवाण सुरुच आहे, त्यामुळे शोषणही होतेच आहे. एखाद्या प्रकारचे व्यवहार सरकारने बेकायदा ठरवल्यास ते थांबतात असे तुमचे मत असल्यास ही चर्चा पुढे लांबवण्यातून फारसे साध्य होणार नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

तसे नाही

थांबतात असे नाही पण कमी होतात. शिवाय कायदेशीर केल्यामुळे शोषणाला आळा बसेलच असेही नाही. व्यवहारांवर बंदी घालण्यासाठी जितके सक्षम सरकार लागते त्याहून अधिक सक्षम सरकारच व्यवहार शोषणविरहित असल्याची खात्री करू शकते. माझ्या या तीन विधानांचा एकत्रित अर्थ असा की कायदेशीर केल्याने व्यवहारांची संख्या वाढेल पण सरकार पुरेसे सक्षम नसल्यास सोबतच शोषणही वाढू शकेल. व्यवहार जितका मूल्यवान असेल तितके शोषण शोधणे कठीण होते. म्हणून कमी सक्षम सरकारला तशा व्यवहारांवर सरसकट बंदी घालूनच शोषितांची संख्या कमी करता येईल.

दोन भुमिका

व्यवहार जितका मूल्यवान असेल तितके शोषण शोधणे कठीण होते. म्हणून कमी सक्षम सरकारला तशा व्यवहारांवर सरसकट बंदी घालूनच शोषितांची संख्या कमी करता येईल.

सरसकट बंदी घालून व्यवहार कमी होतात. व्यवहार कमी झाल्याने शोषण कमी होते. बंदी घातल्याने शोषणाचे नवे मार्ग उपलब्ध होत नाही. झाले तरी त्यामुळे होणारे शोषण हे व्यवहार कायदेशीर केल्यास होणार्‍या अतिरिक्त शोषणापेक्षा कमी असते. बंदी घालणारे सरकार हे शोषण शोधून त्यावर कारवाई करणार्‍या सरकारपेक्षा अधिक सक्षम नसले तरी चालते. अशी गृहीतकांची (ही टेस्टेबल हायपोथेसिसेही आहेत पण आतापर्यंत तरी तसा विदा समोर आलेला नाही) साखळी मान्य केल्यास बंदी घालण्याचे समर्थन होऊ शकते.

दोन व्यक्तिंस (किंवा संस्था) व्यवहार करून फायदा वाढत असल्यासच व्यवहार होतो (एजवर्थ बॉक्स). व्यवहार होण्यासाठी व्यवहार कायद्याने मान्यता दिलेला आहे किंवा नाही याची गरज नसते. कायद्याची मान्यता नसल्यास व्यवहारातील एकूण फायदा (निर्मितीखर्च वाढल्याने, व्यवहार लपवण्याच्या खर्चामुळे) कमी होतो. हा कमी झालेला फायदा सरकारला मिळत नाही. त्यावर इतर बेकायदा व्यवस्थांचे प्रस्थ (मेक्सिको, कोलंबियातील ड्र्ग कर्टेल्स) वाढते. कायदेशीर मान्यतेने व्यवहाराच्या समाजाच्या दृष्टीकोनातून अनडिजायरेबल घटकांचे नियमन करता येते. कररुपाने महसूल मिळवून त्याचा वापर लोकशिक्षणासाठी, शोषण कमी करता येण्यासाठी करता येतो, असे माझे मत आहे. माझ्या बाजूने विदा सादर करण्याची गरज आहे. तसे करणे शक्य आहे. ते करावे इतका उत्साह माझ्यापाशी नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

?

कळलं नाही.

वस्तू उपलब्ध होईल हे बरोबर.
माझा उद्देश व्यवसाय कोण करीत आहे हे दाखवणे हा होता. तुमच्या उदाहरणात वॅक्यूम क्लीनर व्यवसाय करीत नाही....कोणीतरी दुसरा करीत आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पुरवणी

मी तुमच्या प्रतिसादाला पुरवणी दिली.

ग्राहकाच्या मागणीप्रमाणे धंदा फुलतो एवढेच सांगायचे होते.

व्यवसाय

प्रत्यक्षात वेश्या हा व्यवसाय करीत नसून तिचे मालक/मालकिणी, दलाल वगैरे लोक व्यवसाय करीत असतात.

हे तितकेसे बरोबर नाही. वेश्येच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा दलाल वगैरेंना जात असला तरी 'व्यवसाय' हा वेश्याच करते. काही उदाहरणांमधे हे दलाल इ. लोक मधल्या मधे सगळे पैसे खाऊन वेश्येच्या पदरात काहीच पडत नसेल पण अशी लुबाडणूक सगळ्याच धंद्यांमधे होते.वेश्याव्यवसाय हा बेकायदेशीर असल्याने त्यात अधिक होत असावे इतकेच. तुमचा आक्षेप हा निव्वळ ह्याच गोष्टीस असल्यास वेश्याव्यवसाय कायदेशीर बनवून त्यात रेग्युलेशन्स आणणे हेच त्यावर उत्तर आहे. (मालक/मालकिणी ह्या केस मधे ती दोनवेळचे जेवण, निवारा आणि माफक कमाई ह्या मोबदल्यावर 'नोकरी' करत असते )

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

धंदा है पर गंदा है ये

वेश्येच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा दलाल वगैरेंना जात असला तरी 'व्यवसाय' हा वेश्याच करते.

वेश्या दलालाकडे नोकरी करते असे वाक्य बदलल्यास व्हॅक्युम क्लीनर, कोण विक्रेता, कसली वस्तू वगैरे प्रश्न निकालात निघतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रतिसाद

प्रतिसाद अंमळ मनोरंजकच आहेत... :) :) :) लोक कशाचा विदा मागतील, कशाची उदाहरणे मागतील आणि कशाचे पुरावे मागतील सांगता येत नाही. वाचून डोळे निवले.

+१

प्रतिसाद मनोरंजक आहेत याच्याशी सहमत. खालचा सतीश रावले यांचा प्रतिसाद तर भयानक मनोरंजक आहे.

विदा मागितला तर ते योग्यच आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

पर्यायी उत्तर!

कागदावर लेख 'लिहीणं' म्हणजे कागदावर 'हगणं' असतं. लिहीताना एखाद्याने या जगाकडून काय घेतलंय त्यावर तो/ती काय लिहीणार हे अवलंबून असते. कसं लिहीणार? हे अवलंबून असतं ते तो/ती हे मिळवलेलं किती पचवलंय ह्यावर! चांगले खाल्लेले असले,खाल्लेले चांगले पचवले असले तर हगलेल्या
मलाचा दर्जा 'ठोस' असतो. चांगले न खल्लेल्या, खल्लेले न पचवून हगलेल्या मलाचा दर्जा 'भरसकट','चिकट' असतो.
हा लेख वाचून मला ही येथे -----/ 'लिहावेसे' वाटले. आपल्या लिहिण्याने जग बदलले जाणार नाही हे मी मानतो. पण लिहिल्यामुळे मला ही इतरांसारखे 'मोकळे झाल्यासारखे वाटते' त्यासाठीच हा प्रतिसाद.
------------------- -
पैसे देवून खूनाची सुपारी देणं हा व्यवसाय देखील जगातील सर्वात जुना व्यवसाय आहे. आणि त्याच्यावर देखील बंदी घालण्यास सरकार सक्षम नाही. तसं असेल तर असा व्यवसाय देखील समाजमान्यतेच्या कक्षेत घ्यायचा का?

'वेश्याव्यवसाय करणं' हि समस्या नसून 'वेश्यागमन करावे लागते.' हि समस्या आहे. वेश्यागमन कशासाठी केले जाते?
कुतुहुल म्हणून, (मित्रांच्या दबाबामुळे) माहिती व अनुभव मिळावा म्हणून, दबलेली उर्जा (फ्रस्टेशन)बाहेर काढण्यासाठी, विषयवासनेत अडकले म्हणून.

हि कारणं कशी टाळता येतील?

वयात येतानाच मुला-मुलींना त्याविशयी माहिती पुरवून...
पहीला टप्पा :
लैगिंकतेबाबत माहीती देणं/मिळवणं.
हा विशय 'शरीरशास्त्र व तेजोवलय शास्त्र' यांची सरमिसळ करून शिकवता येईल.
प्रत्येक माणसाभोवती एक तेजोवलय असते. त्या तेजोवलय हे त्या व्यक्तीच्या शाररीक, मानसिक आरोग्याचे कवच असते. त्या कवचाचे रक्षण करण्यासाठीच आपले शरीर स्वच्छ ठेवायचे असते. आरोग्यदायी पदार्थच खायचे व प्यायचे. तसेच वर सांगितल्या प्रमाणे - .''अनोळखी वा ओळखीच्या कोणकडुनही खाऊ वा खेळणी घेउ नये. जर कोणा ओळखीच्यांकडुन घेतलीच तर आधी घरी येउन सांगयचे. त्यांनी का दिली हे सांगावे. कोणी काका, दादा, मामा...आपल्या विशिष्ठ अंगाना हात लावू देवू नये. तसे केले तर आपले तेजोवलय दुषित होते व तसे झाल्याने आपल्या शरीर व मनाचे आरोग्य बिघडते.''
असे वा अशाप्रकारचा निकोप दृष्टीकोन बाळगूनच काय शिकवायचे ते ठरवता येईल.
मुख्य उद्देश "लहान मुलां-मुलींच्या निरागसतेला कोणताही ओरखडा न लावता/लागू देता त्यांना माहीती देणं." हा ठेवावा लागेल.

मुलं-मुली सद्न्यान झाल्यानंतर....?
'सायकलबद्दल माहीती देणं' वेगळं, 'सायकल चालवायची कशी?' हे वेगळं! 'सायकल चालवायची कशी?' हे मात्र प्रत्यक्षच शिकवावे लागेल.

दुसरा टप्पा : कोणत्याही 'क्रिये'ला काहीतरी 'कारण' असते, असावे लागते.
म्हणूनच प्रणयाचा उंबरठा कोणत्या 'कारणासाठी' ओलांडायचा?
- नैसर्गिक उर्मीतून/ प्रेमात पडल्यामुळे,
- कुटुंब व्यवस्थेसाठी (कारण त्यातून मिळणार्‍या सुरक्षिततेसाठी)
- समाजात राहतो तेव्हा बहुतेक जण जे करतात म्हणून तेच करावे म्हणून.

----
विशयाचा एक पैलू :
अध्यात्मिक द्न्यानाचे - ब्राह्मणांचे युग येऊन गेले, तलवारीचे - क्षत्रियांचे युग ही येवून गेले, जागतिक व्यापार केंद्र W.T.C. पडले आणि वैश्यांचे युग

ही संपले, आता आले शुद्रांचे युग.
शुद्रांचे मुख्य गुण: 'कोणासाठी तरी काम करीत राहणे' , 'एखाद्या विद्येत पारंगत होवून स्वत:चे मन रिझवणे' .
शुद्रांचा मुख्य अवगुण: 'क्षणिक आनंद देणार्‍या एखाद्या क्रियेत अडकून पडणे, त्यातून बाहेर येता न येणे.'

सुखप्राप्ती साठी व दु:ख टाळण्यासाठी त्या-त्या युगात त्या-त्या युगाचे नियम पाळून राहणे क्रमप्राप्त असते.

----
विशयाचा दुसरा पैलू:
प्रणयात समर्पण कसे करायचे? जोडिदाराला कशा प्रकारे समर्पित करायला लावायचे?
ह्या टप्प्यावर दोघंही अनाडी असून चालत नाही. एकाला अनुभव असावाच लागेल. मग 'अनुभव असावा' असे म्हटले तर, 'तो आधि कोणाला असायला
हवा?'
(गृहित अटः फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन')
नक्कीच, 'तो पुरुषाला असायला हवा?' पण मग, 'पुरुषाला प्रणयाचा अनुभव देणार कोण?' तरमग नक्कीच, 'ती अनुभवी स्त्री असावी लागणार!'

पण मग, 'त्या स्त्रीला, जेव्हा ती निरागस व कुमारीका असणार तेव्हा त्या वेळी तिला कोण अनुभव देणार?'

-----
पर्यायी उत्तर:
हे प्राणयिक शिक्षण एकाच जातीतील निरोगी, सदृढ व निरोगी विवाहीत स्त्रीकडून त्याच जातीतील वयात येणार्‍या/ आलेल्या 'सद्न्यान व निरोगी' तरूणास त्याच्या पालकांच्याच प्रयत्नाने, पुढाकाराने मिळाले तर....!

अशी परंपरा चालू झाली तर काही वर्षातच कोणती जातीचे पुरुष 'किती समजूतदार व शहाणे' आहेत, तसेच कोणत्या जातीतील स्त्री 'धीट व संभाषण कलेत चतूर' आहे ते स्पष्ट होवू शकेल.

ह ह पु

लय भारी... मजा आली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बाप रे!!

हे काय आहे??
एकाच प्रतिसादात काय काय सांगितलंय?

पहिला परिच्छेद कुणाला आक्षेपार्ह वाटला नाही का? मला तरी तो वाचून कसेतरीच झाले. उपक्रमराव, तेवढं काढून टाकता आलं तर बघा...

कोण म्हणतं उपक्रम रूक्ष आहे?

प्रत्येक माणसाभोवती एक तेजोवलय असते. त्या तेजोवलय हे त्या व्यक्तीच्या शाररीक, मानसिक आरोग्याचे कवच असते. त्या कवचाचे रक्षण करण्यासाठीच आपले शरीर स्वच्छ ठेवायचे असते.

हाहाहाहाहा! प्रतिसाद वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर नानाविध रंगाची वलये तरंगून गेली.

रावले, तुम्ही प्लीज पुढचे काही दिवस मीठ-मसाले न घालता उकडलेल्या भाज्या खा. मलनि:सारणातून "ठोस" दर्जा निघाला तर फरक आम्हाला कळून येईलच.

धन्य

धन्य तो मूळ लेख, धन्य ते प्रतिसाद, धन्य ते उपप्रतिसाद - आणि हे सर्व वाचणारा मीही धन्य.
लिहिल्यावर कसं मोकळं वाटलं. जग बदलेल ही अपेक्षा नाहीच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हे पुस्तक कुणी वाचलंय का?

मित्रहो,
तुमच्यापैकी कुणी हे पुस्तक वाचले आहे का? नसेल तर आवर्जून वाचा.

'सेक्स वर्कर', मूळ लेखिका : नलिनी जमिला, मराठी अनुवाद : सुप्रिया वकील, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

सुरक्षित

आज हा व्यवसाय आहे म्हणूनच आपल्या आई बहिणी सुरक्षित आहेत हे आपण विसरतो.

याइतकं दांभिक वाक्य खूप खूप दिवसात ऐकलेलं नाही. मुळात स्त्रीच्या लैंगिक आचरणावरून तिची, तिच्या कुटुंबियांची, आणि एकंदरीतच समाजाची नीतीमत्ता मोजायची. ही जपण्यासाठी तरुण, तरुणींच्या निसर्गसुलभ ऊर्मी दाबून ठेवायच्या. मग त्या उफाळून येतात म्हणून त्यांना 'वाट' देण्यासाठी म्हणून लाखो मुलींचं आयुष्य बालपणापासूनच कुस्करून टाकणारी व्यवस्था बनवायची. आणि ती आहे म्हणून आपण 'सुरक्षित' आहोत म्हणून आनंद व्यक्त करायचा! एक पाय लाकडाच्या खोक्यात बांधून खुरटतो, म्हणून् तोल सांभाळण्यासाठी दुसराही खुरटवायचा हा समाजाचा अजब न्याय आहे.

लेखकाचा वेश्यांची परिस्थिती सुधारण्याचा मनोदय स्तुत्य आहे, पण तो ही व्यवस्था जपण्याच्या विचारातून आलेला असल्यामुळे कितपत स्वीकारार्ह आहे हे कळत नाही. पुरोगामी सुधारणा व्हाव्यात, प्रतिगामी सुधारणा नकोत.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर