मिसळ

कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.

स्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्‍या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्‍यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.

मिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.

मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री! 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां!) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं! हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं! त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात! असो.

नासिकमध्ये श्यामसुंदर, तुषार,गंगा टी हाऊस, कमला विजय, अंबिका, भगवंतराव या प्रस्थापित मिसळींशिवायदेखिल अनेक मिसळस्थाने आहेत. गंगापूर रोडवर Modern Cafe, विहार, रेणुका, अंकल्स, मेनरोडवर अगत्य, मखमलाबाद गांवात सुदर्शन हॉटेल, सणसणीत रश्शासाठी आडगांव नाक्यावर ओमसाई नाहीतर नेहरु गार्डन, सिडकोत शिवाजी चौकांत भामरे, साक्षी गणेश जवळ ओम टी हाउस, म्हसरुळ- पेठरोड रस्त्यावरचं सोहम्, सीतागुंफेच्या पुढे प्रविण टी उर्फ देवा, रविवार कारंजावरची बाळासाहेबांची मिसळ, रविवार पेठेतली लोकमान्य, कथडा भागातली सीतामाईंची हिरव्या रश्शाची मिसळ, बागवानपुर्‍यांत शिरसाट ही काही नांवे.

Comments

तिकडे

हा लेख 'तिकडे' हवा होता का?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

वा!

वा सुंदर लेख.

रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.
सहमत आहे. या शिवाय चवच लागत नाही हेमंतराव!...

'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां!) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते,

हो वाहतोच आहे! :))

सदरलेखात नाशिकमध्ये मिसळ मिळण्याच्या ठिकाणांची माहिती असल्याने हा लेख माहितीपूर्णच आहे म्हणून उडवला जाउ नये अशी माझी संपादकांना विनंती आहे.

आपला
श्यामसुंदर, तुषार,गंगा टी हाऊस, कमला विजय, अंबिका, भगवंतराव, रविवार कारंजावरची बाळासाहेबांची मिसळ, रविवार पेठेतली लोकमान्य, कथडा भागातली सीतामाईंची हिरव्या रश्शाची मिसळ, बागवानपुर्‍यांत शिरसाट.
यांचा भक्त
-गुंडोपंत-

आमचा त्यांचा इतिहास

मिसळ ’आमचा त्यांचा इतिहासा’त मोडते? नाशकातल्या या मिसळींना पुणेरी मिसळ म्हणतात की आणखी काही?

--वाचक्‍नवी

आमचाच!!

मिसळीला इतिहास असला तर तो आमचाच असेल. त्यांच्या इतिहासात मिसळीसदृश पदार्थ मिळाले तरी मिसळ मिळणार नाही असे वाटते परंतु असे पदार्थ पाश्चात्यांकडे करत असल्यास (सलाड वगैरे या प्रकारांत असतेच) आमचा आणि त्यांचाही होईल.

मोड आलेल्या कडधान्याचे सलाड

बाकी, लेखन थोडे ललित लेखनाकडे झुकणारे वाटते. उपक्रमाच्या धोरणांप्रमाणेही खाद्यपदार्थांवर लेख लिहिता येईल असे वाटते.

अशाचप्रकारे माझाही एक लेख आमच्या त्यांच्या इतिहासात बसवला होता त्याची आठवण झाली.

मिसळ आणि सरमिसळ

मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो.

बऱ्यापैकी मोड आलेली उसळ आणि तर्री आलेला झणझणीत रस्सा यांचे मिश्रण म्हणजे मिसळ. आता फाकडू बनवणारे माझ्या माहितीतले हे घटक-
काल दिवसभर जाडी ,बारीक जी काही शेव विकली तिच्यातला विकला न जाऊ शकलेला चुरा
कालची न विकली गेलेली साबूदाणा खिचडी
कालची उरलेली हाताने कुस्करुन घेतलेली भजी
ताजा चिरलेला कांदा
रश्शाला कायम मंद आहूती चालू असल्याने ही मिसळ कायमच गरमागरम मिळते

असो हा लेख कशासाठी आणि त्याहून हा प्रतिसाद कशासाठी या विषयी बऱ्याच विचारांची सरमिसळ झाली आहे.

उत्तम मिसळ मिळणारी ठिकाणे

नाशिकसहित उत्तम मिसळ मिळणारी आणखी काही ठिकाणे:
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड, पुणे
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड, पुणे
७) श्री- शनिपारा जवळ, पुणे
८) नेवाळे- चिंचवड, पुणे
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. पुणे
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे, दादर
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड, पुणे
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार, मुंबई
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.मुंबई
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल, पुणे
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाही मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास' पुणे
५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी
६०) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर) रत्नागिरी
६१) जोगळेकर दौंड

बापरे!

प्रभाकर नानावटी, तुम्ही दुसरे काही खाता की नाही? :-)

==================

+

असेच

म्हणतो. व्यासंग 'इम्प्रेसिव्ह' आहे. :)

अवांतर : लेखाचे शीर्षक वाचून वेगळीच समजूत झाली होती :)

-
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अवांतर

शाकाहाऱ्यांबद्दल दिलगीरी व्यक्त करुन.

महाराष्ट्रात मच्छीफ्राय (पापलेट, सुरमई, बांगडा आणि गोड्या पाण्यातील इतर) स्वस्त आणि मस्त कुठे कुठे मिळेल.

सारस्वत आणि सीकेप्यांच्या घरी

महाराष्ट्रात मच्छीफ्राय (पापलेट, सुरमई, बांगडा आणि गोड्या पाण्यातील इतर) स्वस्त आणि मस्त कुठे कुठे मिळेल.

मुंबईला सारस्वत आणि सीकेप्यांच्या घरी सर्वात स्वस्त आणि मस्त मच्छीफ्राय मिळेल. गोड्या पाण्यातले मिळेल का सांगता येत नाही पण पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबिल, मांदेली वगैरे निश्चितच. दोन्ही जाती पक्क्या मासेखाऊ आणि अगत्यशील त्यामुळे मस्त आणि स्वस्त नक्कीच मिळेल. :-)

अर्रर्र! पाठारे प्रभू राहीलेच. त्यांच्याही घरी भेट द्या. :-)

मच्छीफ्राय...

औरंगाबाद पुणे रस्त्यावर प्रवरासंगम नावाचं गाव आहे. इथेच दोन नद्या एकत्रही येतात. गोदावरी नदीच्या बाजूला 'पंचशील' नावाचं एक हॉटेल आहे. तिथे राहू, वामट, मर्‍हळ, या गोड्या पाण्यातील ताजे मासे आणि त्यांचे चांगले फ्राय करुन मिळतात. दरही स्वस्त आहे. पंचेचाळीस रुपयात एका प्लेटमधे तीन पीस देतात. या रस्त्याने कधी गेलात तर मला कॉल करा. मी येथेच्छ पाहूनचार करीन. :)

-दिलीप बिरुटे
[चिकन कंटकी आणि मच्छीफ्रायचा दिवाना]

आता पुण्याला गेल्यावर या गाडीला या गाडीला नक्की भेट देण्यास विसर

http://72.78.249.126/esakal/20100529/images/5056036657406196734/48241972... ३०/०५/१० आजच सकाळ मध्ये चमचमीत आणि चरचरीत मिसळ! खाण्याच्या एका ठिकाणाची माहिती आली. कर्वेरस्त्यावरून प्राप्तिकर सदनाकडे जाताना अशीच मस्त आणि चमचमीत मिसळ खायला मिळते. या रस्त्यावरील सीड इन्फोटेक कंपनीच्या बाजूला हेमंत भाडाईत हा त्याची मिसळीची गाडी लावतो आणि आपल्या चवदार मिसळीनं पुणेकरांच्या दिवसाला सुरवात करतो. आता पुण्याला गेल्यावर या गाडीला या गाडीला नक्की भेट देण्यास विसरू नका.

नवे भिडू

पुण्यात संजीवनी हॉस्पिटलच्या गेटसमोर भागवतांची मिसळीची गाडी आहे. अलिकडच्या काळात मी खाल्लेली बेहतरीन मिसळ. रस्सा अगदी जाळ नाही पण घशाला मस्त उब आणण्याइतका तिखट. पुन्हापुन्हा घेण्याजोगा. सकाळी ९ ते ११ याच वेळेत गेल्यास मिसळ मिळते. रविवारी तर सकाळी सव्वा दहालाच मिसळ खल्लास. गाडीभोवती उभे राहून् खावी लागते. घरी घेऊन जाणार्‍यांची गर्दी असते.

छान लेख

ह्या वरुन आठवले , पुर्वि चित्र मंदिर च्या मागे "माहाराजाचि" प्रसिध्द् मिसळ मिळत असे

 
^ वर