भाकरीचा चंद्र

प्रस्तावना: उपक्रमावर पाककृती हा वेगळा विभाग नाही. खरेतर, पाककृतींना प्रसिद्धी मिळावी यासाठी उपक्रमाची निर्मितीच नाही परंतु देश-विदेशातील खाद्य संस्कृतींवर चर्चा किंवा लेख येणे हे उपक्रमावरील विषयांना पूरक वाटते. 'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणणारी आपली संस्कृती भारतीय अन्नाच्या सर्वसमावेशकतेवर नेहमी भर देते. पोळी, भात, भाजी हे आपल्याला अगदी भारतीय वाटणारे पदार्थ इतर देशांतही माहित आहेत का? ते त्यांच्या अन्नातील मुख्य घटक आहेत का? त्यांच्या परंपरेत ते बसतात का इ. चा उहापोह खालील लेखात केला आहे.


"जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे" हा प्रश्न माझ्यासारख्या खवय्यांना विचारला तर उत्तर कोणते मिळेल ते वेगळ्याने सांगायची गरज वाटत नाही. गरीबाची भूक असो वा श्रीमंताची भूक किंवा सुर्व्यांच्या कवितेतील अगतिकताही शेवटी भाकरीपर्यंत येऊन विसावते. ज्या भाकरीपायी जगण्याला अर्थ लाभतो ती भाकरी, पोळी, चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील, गरीबांपासून श्रीमंतांना परवडणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. इंग्रजीत अशा अन्नाला स्टेपल फूड असे म्हणतात. उपलब्ध धान्याच्या पिठापासून तयार केलेल्या पाव (ब्रेड) आणि चपाती (फ्लॅटब्रेड) जगातील अनेक देशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. या ब्रेड आणि चपातीची ओळख जगाला नेमकी कधी पटली हे शोधणे तसे कठिण आहे परंतु माणसाने अन्न शिजवायला सुरुवात केल्यावर लवकरच त्याने पाव आणि चपाती बनवायला सुरुवात केली असावी असे मत मांडले जाते. जगातील बहुतांश देशांत (अतिपूर्वेकडील काही देश वगळता, चू. भू. दे.घे) पाव आणि त्याचे विविध प्रकार मुख्य आहारात घेतले जातात. या लेखात जगभरातील काही प्रसिद्ध चपात्यांची (फ्लॅटब्रेड्स) ओळख करून घेता येईल.

गव्हाचे पीठ करून (आणि मैद्यापासून ) प्रामुख्याने चपातीची निर्मिती होते हे सर्वांना माहीत असावे. याचबरोबर प्रादेशिक धान्यापासूनही चपाती बनवली जाते. जसे तांदूळ, ज्वारी, बाजरी, बार्ली, ओट, राय, मका इ. च्या पिठांपासूनही जगातील विविध भागांत चपाती बनवली जाते.
गहू हे मूळचे वायव्य आशियातील धान्य आहे. इ.स.पू. ५००० च्या सुमारास ते भारतात आल्याचे सांगितले जाते. पाव आणि चपातीही त्याच सुमारास भारतात आली असावी आणि पश्चिमेकडील इतर देशांतही उदा. इजिप्तमध्ये गेली असावी. इजिप्तमधून ग्रीस आणि ग्रीसमधून युरोपात तिचे मार्गक्रमण झाले असावे. तत्कालीन लोक आधी गहू फक्त चावून खात असत. कालांतराने ते चेचले असता आणि त्याचे पाण्यातील मिश्रण विस्तवावर शेकले असता तयार होणारा पदार्थ अधिक चवदार आणि टिकाऊ असतो याचे त्यांना आकलन झाले. नंतर त्यात यीस्ट मिसळून फुगणारे पाव किंवा यीस्ट न मिसळता चपाती बनवण्यात येऊ लागली. इजिप्तच्या प्राचीन पिरॅमिड्समधून पाव सापडल्याची नोंद होते.

ख्रिश्चन आणि यहुदी धर्मांत या चपातीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. काही विधींत चपातीचे तुकडे भक्तांना भरवण्याची प्रथा या धर्मांत दिसते. भारतात पुरणपोळीसारखे पदार्थ नैवेद्याला दाखवले गेले तरी चपातीला धार्मिक महत्त्व नाही असे वाटते. (चू. भू. दे. घे.)

जगभरात चपाती ही विविध पद्धतींनी खाल्ली जाते.

१. पातळ रश्श्यात बुडवून किंवा भाजीचा घास भाकरीने उचलून (स्कूपिंग). उदा. भाकरी, पोळी, पुरी
२. भाजी/ सारण चपातीवर पसरवून उदा. पिझ्झा
३. भाजी/ सारण चपातीत गुंडाळून उदा. मेक्सिकन बरिटो, इटालियन स्ट्रॉम्बोली किंवा कॅलझोन
४. भाजी किंवा सारण चपातीच्या आत भरून उदा. आलू पराठा, पनीर पराठा, पुरणपोळी, पिटा.

यापैकी लेखिकेला प्रिय असणार्‍या काही प्रमुख चपात्यांचा परामर्श या लेखात घेतला आहे.

पुरी, पोळी, पराठा, रोटी आणि इतर भारतीय चपात्या

भारतीय जेवण हे चपात्यांशिवाय अपूर्ण आहे. उत्तरेकडे रोटी, पराठे, भटुरे. महाराष्ट्र, गुजराथ आणि इतर प्रदेशांतील भाकरी, पोळी, पुरी, फुलके. दाक्षिणात्यांचे तांदूळ किंवा कडधान्यांचे डोसे आणि बंगाल, ओरिसात पुरी आणि लुची. भारतात इतरही अनेक चपात्या बनवल्या जातात.

उत्तरेत तंदूर भट्टीत चपात्या भाजण्यात येतात. भारताखेरीज पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणपर्यंतच्या प्रांतातही नान किंवा रोटी भाजण्यासाठी तंदूरचा वापर करतात. ही भट्टी मोहेंजेदाडो आणि हडप्पाच्या उत्खननातही सापडल्याचे (तेवढी जुनी प्रथा असल्याचे) सांगितले जाते. यापैकी नान हा पदार्थ मूळचा इराणी. भारतात, मुघल काळात तो अतिशय प्रसिद्ध झाला. यासह, मुघल काळापासून प्रसिद्ध अशी आख्यायिका असणारी दिल्लीला चांदनी चौकाजवळ परांठेवाली गली आहे. अनेक प्रकारच्या भाज्या, डाळी, पनीर आणि मसाले वापरून बनवलेले सुमारे ४०-५० प्रकारचे तेलात तळलेले किंवा तंदूरमध्ये भाजलेले आणि दही आणि लोणच्यासोबत वाढले जाणारे परांठे या गल्लीत मिळतात.

पं नेहरू, विजयालक्ष्मी आणि इंदिरा परांठेवाली गलीत खाताना

महाराष्ट्र, गुजराथ आणि कर्नाटकात हाताने थापल्या जाणार्‍या भाकर्‍या आणि त्यासोबत खाल्ला जाणारा कच्चा कांदा, ठेचा, पिठले आणि झुणक्याचा स्वाद वाचकांना नव्याने वर्णन करायला नको. गुजराथी रोटल्या किंवा विस्तवावर फुलवलेले फुलकेही पश्चिम भारतात विशेष प्रसिद्ध आहेत.

हाताने थापल्या जाणार्‍या भाकर्‍या आणि पोळपाटावर लाटण्याने लाटल्या जाणार्‍या पोळ्यांपेक्षा दाक्षिणात्यांचे डोसे (किंवा दोसे) किंचित वेगळे वाटतात पण या डोशांचे विविध प्रकार ऐकून तोंडाला पाणी सुटेल. तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून डोसे बनतात. याखेरीज रवाडोसा, मूगडाळीचा डोसा, मैद्याचा डोसाही बनवला जातो. या डोशांपासून बनलेले मसाला डोसा, उत्तप्पा, ओनिअन डोसा, चीज डोसा विशेष प्रसिद्ध आहेत. कुरकुरीत डोशासोबत सांबार, चटणी, कोंबडी किंवा मटणाचा रस्सा वाढला जातो.

पापड ही देखील भारतात बनणारी सुप्रसिद्ध चपाती गणता येईल.
.
.
.

इटलीचा पिझ्झा

पिझ्झा ही जगातिकीकरणाच्या युगात अल्पावधीत प्रसिद्ध झालेली मूळ इटलीतील चपाती. पिझ्झ्याचा शोध कसा लागला असावा याविषयी काही मजेशीर अटकळी बांधल्या जातात. काही चिनी रहिवाशांच्या मते, इटलीचा प्रसिद्ध मुसाफिर मार्को पोलो चीनला राहून इटलीत परतला तेव्हा त्याला चीनमधील कांदापोळीची राहून राहून आठवण येत असे. तो प्रकार इटलीत करून पाहताना त्याला पिझ्झ्याची पाककृती सुचल्याची आख्यायिका सांगितली जाते परंतु तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट खरी नसावी.

सांगितले जाते की रोमन, ग्रीक आणि पर्शियन सैनिक आपल्या भाकरीवर कांदा, लसूण आणि तेल पसरवून ती खात. बहुधा, युद्धातील धामधुमीत असे अन्न खाणे त्यांना सोयिस्कर पडत असावे. पिझ्झ्याचे मूळ या पदार्थात असणे शक्य आहे. तसेच, भूमध्य सागरी देशांत फोकाचिया नावाची एक भाकरी अतिशय प्राचीन समजली जाते. तिच्यावर कांदा, लसूण आणि ऑलिवच्या फळांचे तुकडे पसरवून ती भट्टीत भाजली जाते. तिलाही पिझ्झ्याची प्राचीन पाककृती मानता येईल. १६व्या शतकांत टॉमेटो द. अमेरिकेतून युरोपात आल्यावर १८ व्या शतकाच्या अखेरीस टॉमेटोची पेस्ट भाकरीवर पसरवून खाण्याची प्रथा इटलीतील गरीब जनतेत मूळ धरू लागली. आज जो पिझ्झा खाल्ला जातो तो अशाप्रकारे अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते.

आज जगभरात अनेक प्रकारे पिझ्झा बनवला जातो. कोंबडी आणि इतर लाल मांसाचे तुकडे, कांदा, भोपळी मिरची, ऑलिवची फळे, आंचोविज मासे, अननसाच्या, सफरचंदाच्या फोडी, मक्याचे दाणे, पनीर, यांनी पिझ्झा सजवला जातो तरी पिझ्झ्यावर पसरवले जाणारे प्रमुख पदार्थ टॉमेटोचा सॉस आणि चीज हे होत. इटलीतील दोन प्रमुख प्रकारचे पिझ्झा हे मूळचे समजले जातात...

१. मरिनारा - हे विशेष करून मासे पकडणार्‍या कोळ्यांचे खाद्य (गरीबांची भाकर) म्हणून मरिनारा हे नाव पडले.

२. मार्गारेटा - चपातीवर पसरवलेले मोझरेला चीज, टॉमेटो सॉस आणि बेसिलची पाने यापासून बनलेला पिझ्झा इटलीची राणी मार्गारेट हिला भेट देण्यात आला होता. इटालियन झेंड्याशी जवळीक साधणारा हा पिझ्झा राणीचा आवडता ठरला आणि पुढे तिच्या नावाने ओळखला जाऊ लागला.

पिझ्झ्याची चपाती करंजीप्रमाणे बंद करून तयार होणारा कॅलझोन आणि चपातीत चीज आणि इतर पदार्थ गुंडाळून तयार होणारी इटालियन गुंडाळी स्ट्रांबोलीही प्रसिद्ध आहेत.

ग्रीक पिटा आणि अरबी खबूस

ग्रीक पिटा आणि त्यासदृश असणारी खबूस नावाची जाड अरबी चपाती मूळ इराणची पण अरबस्तानात अतिशय प्रसिद्ध आहे. रोजच्या खाण्यातील एक महत्त्वाचा घटक समजली जाते. ग्रीस आणि आजूबाजूचे भूमध्यसागरी प्रदेश, इराण, अरबस्तान, अफगाणिस्तान अशा अनेक देशांत ही "पिटा" चपाती खाल्ली जाते.

ही चपाती दिसताना चपट दिसली तरी यीस्ट घालून थोडीशी फुगवलेली असते. खाताना तिचे पापुद्रे फाडून खिसा तयार केला जातो आणि त्यात मांस, भाज्या, फलाफल, कबाब, अरबी हामूस इ. भरले जाते. ग्रीसमध्ये ही चपाती वापरून तयार केलेले गायरोज आणि अरबस्तानात हामूस, ताहिनी आणि मांस भरून तयार केलेले शवर्मा (किंवा श्वर्मा) अतिशय प्रसिद्ध आहेत.

श्वर्मा कॉर्नर

भारतात गल्लोगल्ली जशा चाटच्या गाड्या उभ्या दिसतात तशा अरबस्तानात श्वर्माचे कोनाडे आणि गाड्या दिसतात. बाजूला जे श्वर्मा कॉर्नरचे चित्र आहे त्यात आचारी, सुरीने शिजवलेले मांसाच्या थप्पीतून थोडे मांस कापून घेताना दिसत आहे. हे मांस खबूसमध्ये भरून त्यासह हामूस (काबूली चण्याची पेस्ट), ताहिनी (तिळाची पेस्ट), काकडी, खारवलेली विनेगरमधील लोणची, फ्रेंच फ्राईज इ. भरतो. ग्रीसमध्ये मिळणार्‍या गायरोजची पाककृती थोड्याफार प्रमाणात अशीच. फक्त चपातीत भरलेले पदार्थ, मसाले बदलतात. अतिशय चविष्ट लागणारा हा पदार्थ भूमध्य सागरी प्रदेश आणि अरबस्तानातील सुप्रसिद्ध फास्टफूड गणले जाते.

अमेरिका रहिवाशांना हे दोन्ही पदार्थ थोड्याफार चौकशीने आजूबाजूच्या परिसरांत मिळण्याची शक्यता आहे. चाखून पाहाल तर प्रेमात पडाल याची खात्री देता येईल.
.
.
.
.
.

मेक्सिकन टॉर्टिया

मेक्सिकन आहार हा मला भारतीय आहाराशी बराचसा मिळता जुळता भासतो. चेपलेल्या राजम्याची आणि इतर कडधान्यांची उसळ, ऍवोकॅडोची हिरवीगार चटणी, टॉमेटो-कांद्याची कोशिंबीर, आंबवलेले घट्ट दही, मांस पेरून केलेली किंवा फक्त कांदा, भोपळी मिरची, टॉमेटो चिरून परतलेली मुख्य भाजी , वाफाळणारा मेक्सिकन पुलाव आणि मऊसूत मेक्सिकन चपात्या- टॉर्टिया.

मूळ द. अमेरिकेतील पण संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी टॉर्टिया ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक द. अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला टॉर्टिया असे नाव दिले. द. अमेरिकेतील वेगवेगळ्या देशांत अशा चपात्या कधी भाजून तर कधी तळून बनवल्या जातात.

टॉर्टिया बनवणारी मेक्सिकन स्त्री

अमेरिकेत किडोबा, चिपोट्ले अशा मेक्सिकन ग्रिल्स किंवा पारंपरिक मेक्सिकन उपहारगृहांत, बायका स्वयंपाक करतानाचे एखादे पारंपरिक मेक्सिकन भित्तिचित्र नजरेस पडले तर पोळपाट, लाटण्याने चपात्या लाटणार्‍या बाया, लसूण आणि कांद्याच्या गड्ड्या, टॉमेटो, मिरच्या अशा भाज्या आणि चुल्हाणावर भाजल्या जाणार्‍या चपात्या हे सर्व हमखास नजरेस पडेल.

या चपात्यांत सारण भरून त्याची गुंडाळी केली असता त्यांना बरिटो, टॅको आणि विविध नावांनी ओळखले जाते. अमेरिकेत प्रसिद्ध असणारा बरिटो मात्र मेक्सिकोवासियांचे आवडते अन्न नाही. इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणे अमेरिकन सोपस्कार होऊन हा पदार्थ पक्का अमेरिकी बनला आहे.

जगभरात मुख्य अन्न समजल्या जाणार्‍या अनेक पद्धतीच्या चपात्या बनतात. आंबोळी किंवा दोश्यांप्रमाणे दिसणार्‍या इथोपियन चपात्या इंजेरा, सिरिया आणि लेबनानची मार्कूक, चीनमधील बिंग, भारतातील तळून खाण्याची चपाती - पापड आणि त्यासारखेच मेक्सिकोत बनणारे टॉर्टिया चिप्स असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. या लेखात लेखिकेने आपल्या आवडत्या चपात्यांची माहिती थोडक्यात दिली आहे. तुमच्या आवडत्या चपात्यांची माहितीही करून घ्यायला आवडेल.
.
.
.


१ यहुदी प्रथेबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.
२ राणी मार्गेरिटाबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.

  1. नेहरूंचे परांठेवाली गलीतील चित्र www.tribuneindia.com येथून आणि बाकीची चित्रे विकिवरून घेतली आहेत.
  2. देश-परदेशांतील चपात्यांविषयी अधिक माहिती येथे मिळेल.
  3. परांठेवाली गलीविषयी एक हौशी चलचित्र येथे मिळेल.

Comments

गोड पदार्थ

बेल्जीयन वॅफेल्स बरोबर आइसक्रिम छान लागते.

तसेच पॅनकेक्स मधे स्ट्राबेरी - क्रीम, किंवा पॅनकेक्स - बनाना आणी सिनॅमन शुगर असा ब्रेकफास्ट..... फस्क्लास्!!

वाह!

प्रियालीताई,
अगदी आवडत्या विषयाला हात घातलात. :)
या पिटाब्रेड मधे जे बाबा हामुस, बाबा घनुस आश्या नाना पेस्टस् घालून "फलाफल / फेलाफेल"बनवतात यासाअरखा दुसरा स्वादिष्ट व्हेज अरबी पदार्थ माझ्या खाण्यात नाहि ;)
बाकी जे वेगवेगळे मांस वापरतात त्यात काहि गाडीवाल्याकडे खास वेगळं अरबी मांस असतं (प्राणी कुठला ते माहित नाही आणि कधी मुद्द्दामहुनच विचारला नाही ;) ). तुमची त्या गाडिवाल्याशी खास ओळख झाल्यावर एक दिवस तो हळूच ते दाखवतो आणि चाखवतो. त्याची चव बाकी बाहेर मांडलेल्या कोणत्याही मांसापेक्षा प्रचंड वेगळी आणि मस्त असते. आणि मग तुम्हाला तेच मांस नेहेमी लागतं :)

बाकी मुंबईत ज्यांना चांगले मेक्सिकन खायचे आहे त्यांनी माटुंगा सर्कलला (७-११ च्य समोर) "टिप टॉप" नावाचे छोटे हॉटेल आहे (म्हणजे दिड वर्षापूर्वी पर्यंत तरी होते) ते ट्राय करा

(खवैय्या) ऋषिकेश

भरल्या पोटाने.....!!!

भरल्या पोटाने अगा जर आम्हीही चंद्र पाहतो तर आम्हीही कोणाची याद केली असती- अशीच काहीतरी नारायण सुर्व्यांची कविता आहे.
खरे तर त्यांनी नुसते या पोळ्या,गायरोज,पीझ्झा, खबूस,टॉर्टिया चिप्स आणि वरील वर्णन जर वाचले असते तरी रिकाम्या पोटी त्यांना बरेच काही सुचले असते. लेखिकेला प्रिय असणार्‍या प्रमुख चपात्यांचा परामर्श आवडला.
बाय द वे, खानदेशात एक मांडे एक प्रकार आहे म्हणतात ( मनात मांडे खाणे एक वाक्प्रचारही आहे ) हातावर भाकरी थापतात तसा पोळीचाचा एक प्रकार नुसते हातातल्या हातात थापून भाजतात ती पोळीच ना !!!! लेख नेहमीप्रमाणेच संदर्भासहीत माहिती देणारा.....अगदी चवदार झालाय !!!

मनात मांडे खाणे

मांडे, हळदीच्या पानातील पोळी, केळीच्या पानातील पोळी असे अनेक भारतीय पदार्थ आहेत. सध्या त्यांची आठवण काढून मनात मांडे खाणे इतकेच नशीबी आहे. :-(

वाक्प्रचार

मांडे मी एकदाच खाल्लेत, आणि चव फार लक्षात नाही. पण स्वयंपाक करताकरता टेलिफोन उचलण्यासाठी हात धूताना हा वाक्प्रचार आवर्जून लक्षात येतो : मांडे करणारीचे नाक पुसावे लागणे...

छान विषय निवडलात माहिती देण्यासाठी. पोळ्या हा माझा आवडता प्रकार! (मला करायला जमत नाहीत, तीच तर रड आहे.)

रुमाली तोटी

हातावर थापून व थापताना वारंवार वर उडवून करतात ती रुमाली रोटी!--वाचक्‍नवी

रूमाली रोटी

रूमाली रोटीचा उल्लेख लक्षात ठेवूनही विसरले. ही रोटी पालथ्या कढईवर भाजतात. घडी केल्यावर रुमालाप्रमाणे दिसते. काही ठिकाणी पिझ्झा चपातीही असाच उडवून तयार केली जाते.

मांडे आणि आयते

मोठ्या माठाच्या खापरावर मांडे भाजतात. रुमाली रोटीला ला जसे पालथ्या कढईवर भाजतात तसेच माड्यांना खापरावर किंवा कढईवर भाजतात म्हणे. आणि या मांड्याना बनवतांना हातांच्या मनगटांवर ज्या अदाकारीने बनविले जातात ते मात्र अफलातूनच असते, म्हणतात. आयते, ज्वारीच्या पीठाला भीजत घालून त्यात मिठ,मीर्ची,मसाला टाकून तव्यावर तेल टाकून करतात म्हणे. ( म्हणजे थालपीठ तर नसेल.)

रूचकर

फारच रुचकर लेख आहे. व्हर्चुअल रिऍलिटीच्या या आधुनिक जगात काही वर्षात अशा लेखांबरोबर लेखिकेला या पाककृतींचे नमुनेही देता येतील अशी आशा करूया. :)
मेक्सिकन आहार भारतीय आहाराशी बराच मिळताजुळता आहे. अशीच भावना काही ग्रीक पदार्थ खातानाही झाली होती. पिझ्झाचा उगम इटलीमधील नेपल्स येथे झाल्याचे मानले जाते. आणि नेपल्समधला पिझ्झा खाल्लात तर बाकी सर्व पिझ्झे विसरायला होते. विशेष म्हणजे हा पिझ्झा खाण्यासाठी नेपल्सलाच जावे लागते. इटलीच्या इतर भागात खास 'नेपल्स पिझ्झा' विकत मिळतो पण त्यात राम (जीझस?) नसतो. नेपल्सची आणखी एक खासियत म्हणजे काही ठिकाणी एक मीटर लांब पिझ्झा मिळतो. हा पिझ्झा मागवल्यावर वेटर लोक एकामागून एक लांबच्या लांब पिझ्झे घेउन येतात आणि त्याचे तुकडे वाढत रहातात. तुम्ही बास म्हणेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे येतच रहातात. बिल मात्र ठराविक किंमतच असते, मग तुम्ही कितीही पिझ्झे खा.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

वा! व्वा!

नेपल्सची आणखी एक खासियत म्हणजे काही ठिकाणी एक मीटर लांब पिझ्झा मिळतो. हा पिझ्झा मागवल्यावर वेटर लोक एकामागून एक लांबच्या लांब पिझ्झे घेउन येतात आणि त्याचे तुकडे वाढत रहातात. तुम्ही बास म्हणेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे येतच रहातात. बिल मात्र ठराविक किंमतच असते, मग तुम्ही कितीही पिझ्झे खा.

वा! व्वा! अगदी अस्सेच नाही पणअमेरिकेतही असे पिझ्झा बुफे आढळतात. कितीही खा. किंमत मात्र ठराविक असते. तर अशा एका रेस्टॉरंटच्या चालकाला आम्ही लाल मांस खात नाही हे माहित असल्याने (आम्हीही नेहमीचे गिर्‍हाईक) बरेचदा तो खास आम्हाला आवडेल असा भाज्या आणि चिकन घालून पिझ्झा बनवतो.

अशीच भावना काही ग्रीक पदार्थ खातानाही झाली होती.

मागे एकदा एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये आम्ही भेंडीची भाजी खाल्ली होती. आपल्या देशांत भेंडी-मसाला या नावाखाली जी भाजी बनते तिच्या शतपटीने ती रूचकर होती.

व्हर्चुअल रिऍलिटीच्या या आधुनिक जगात काही वर्षात अशा लेखांबरोबर लेखिकेला या पाककृतींचे नमुनेही देता येतील अशी आशा करूया.

नमुने कशाला? अमेरिकेचे आमंत्रण घ्या. घरगुती पिझ्झ्यापासून सर्व खाऊ घालता येईल.

तूर्तास एक टिपः भारतातील भारतीय पिझ्झे खाऊन पिझ्झा बेसवर चिकन टिक्का मसाला (ग्रेव्हीसकट) आणि त्यावर मोझरेल्ला किंवा पिझ्झा चीज पसरून भाजलेला पिझ्झा अप्रतिम लागतो. घरी करून पाहता येईल.

आणखी एक

मी सध्या आहे त्या भागात, म्हणजे जेनोव्हा आणि आसपासच्या भागात एक वेगळ्या प्रकारचा ब्रेड लोकप्रिय आहे, त्याचे नाव फोकाच्या. (पुण्यात हा प्रकार आला तर रोज यावर शंभर एक पीजे सहज पडतील.) पहिल्यांदा खाल्ला आणि लगेच त्याच्या प्रेमात पडलो. पिझ्झाप्रमाणे हा ही वेगवेगळ्या प्रकारात मिळतो. काही न घालता किंवा चीजबरोबर किंवा कांदे पेरून वगैरे. याचे तुकडे सकाळी न्याहारी म्हणून किंवा चार वाजता कॉफीबरोबर किंवा दुपारी जेवणात असे (वाट्टेल तिथे) खाता येतात.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

फोकाच्या

मला उच्चार फोकाचिया वाटत होता. अमेरिकेतही मिळतो. मलाही दुपारच्या चहाबरोबर आवडतो.

सुपर टारगेटमध्ये हमखास मिळतो. इतरत्र ग्रोसरी सुपरमार्केटमध्येही पाहिला आहे. पिझ्झ्याचा जनक हाच ब्रेड मानला जातो.

दिसला

लेख वाचताना भूक लागली होती त्यामुळे उल्लेख दिसला नाही. :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

फोकाचिया

असाच उच्चार असावा असे मलाही वाटते. ह्यावरून आठवले, चियाबाटा हा ब्रेडचा प्रकार ह्याहीपेक्षा चविष्ट असतो. पण हे सर्व विषयांतर झाले.

उच्चार

इटालियनमध्ये cci म्हणजे च्च आणि a म्हणजे आ. त्यांच्या संगम होउन उच्चार फोकाच्या आणि फोकाचिआ यांच्यामध्ये कुठेतरी असतो. बोलताना चिआ असे सलगपणे बोलले जात नाही.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

ब्रेडचे भारतीय प्रकार.

चौकोनी कागदबंद असतो तो (सॅन्डविच)ब्रेड, एकमेकांना चिकटलेले असतात ते (लादी)पाव, कच्छी दाबेलीसाठी लागतात व सर्व बाजूंनी पांढरे असतात ते दाबेली पाव, वर्तुळाकार बनपाव, बटर व कडक असलेले मुसलमानांमध्ये प्रिय ते ब्रून(बुरून); भाजी भरून हॉटडॉग करण्यासाठी लागतात तसले लांबडे पाव, आणखी ब्राउनब्रेड, जिरापाव वगैरे वगैरे अन्य भारतीय प्रकार.

भारतीय पिझ्झा

भारतातील भारतीय पिझ्झे खाऊन पिझ्झा बेसवर चिकन टिक्का मसाला (ग्रेव्हीसकट) आणि त्यावर मोझरेल्ला किंवा पिझ्झा चीज पसरून भाजलेला पिझ्झा अप्रतिम लागतो. घरी करून पाहता येईल.

शिमला मिर्चीची छान पैकी जिर्‍याची फोडणी देऊन केलेली भाजी, चिज ऐवजी भरपूर चोपडलेले बटर आणि पिझ्झा सॉस ऐवजी चक्क भारतातला मॅगी टोमॅटो सॉस घालून बनवलेला पिझ्झा भारतात घरोघरी खाल्लेला आहे. :)

देवा मला 'पाव'

वा! लेख छान झालाय. रोजच्या खाण्याबरोबरच या पाव/चपातीला संस्कृतीतही स्थान मिळालं आहे. आपल्या सहनौभुनक्तुचे न्यू टेस्टामेंट मध्ये 'लेट अस ब्रेक द ब्रेड टुगेदर' मध्ये रुपांतर होते, पंजाबात तंदुरला गावाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचं स्थान मिळतं आणि तोच ब्रेड भारतात पोर्तुगीज राजवटीत धर्मांतराचे कारण ठरतो.

बाकी फार वर्षांपूर्वी कालनिर्णयच्या मागील पानांवर छापून येणार्‍या लेखांत दुर्गाबाई भागवतांनी घडीच्या पोळ्या कशा कराव्यात (४ किंवा त्याहून अधिक पदरांच्या) याची पाककृती दिली होती आणि ह्या पोळ्या बनवायची पद्धत सध्या लुप्त होत आहे, त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. अगदी शाही प्रकारे बनवायचे म्हटले तर, कणकेत साध्या पाण्याऐवजी नारळाचे पाणी व/वा दूध घातले तर पुर्‍या अधिक मऊ होतात असेही कुठेतरी वाचल्याचे आठवते (बहुधा बंगाली लुचींच्या बाबतीत). बाकी डोशांतील वेगवेगळ्या प्रकारांबरोबरच पेसारुट्टू हा आंध्रप्रदेशीय अवतार आणि सुक्या, खोबरे घातलेल्या चिकनसोबत येणारे बन्ट्स (उ. शेट्टी) जमातीची कोरी रोटी हे खाद्यप्रकारही मस्तच.
तळकोकणात होणार्‍या तांदूळ-उडीद डाळ मिश्र पिठाच्या खापरोळ्या नारळाच्या दुधात डुंबून येतात. त्यांच्या चवीचे वर्णन करणे हा अशक्य मामला आहे!

इटालियन पिझ्झाचाच ब्रुश्चेटा/ब्रुशेटा हा भाऊबंद असावा. बाकी टॉर्टिया, पिझ्झा, पिटा हेही अतिशय आवडते प्रकार आहेत. अजून एक आवर्जून उल्लेख करण्यासारखा प्रकार म्हणजे इथिओपियन खाण्यातला इंजेरा. आपल्या पश्चिम किनार्‍याशी इथिओपायाचा प्राचीन काळापासून व्यापार होत असल्याने त्यांच्या मसाल्यांवर, खाद्यपदार्थांवर जाणवण्याइतका भारतीय प्रभाव आहे. इंजेरा हा आपल्या आंबोळ्यांसारखाच जाळीदार मऊसूत प्रकार. त्यावर येडोरो वोट नामक चिकन किंवा लॅम्बच्या सुक्या ग्रेव्हीज पसरून तो वाढला जातो. सोबत अजून थोड्या इंजेराज सुरळी करून सोबतीला देतात.

नुसत्या पावाचेच वेगवेगळे प्रकार चाखण्याचे आवडते ठिकाण म्हणजे पनेरा.
Panera Counter

पावांबरोबरच वेगवेगळे सूफलेज् ही तिथे उत्कृष्ट मिळतात.

A perfect breakfast

मुंबईत वरळीची सिटी बेकरी आणि नानाचौकातील वॉर्डन बेकरी याही अशाच भरून 'पाव'लेल्या जागा :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

पनेरा आणि इंजेरा

कालच पनेरा ब्रेड्समध्ये पनिनी खाल्ली. :-) हा लेख फुगवलेल्या पावासंबंधी फारसा नसल्याने क्रॉइसंट इ. ना चाट दिला आहे. ;-)

आमच्याकडे इंडियन स्टोअरमध्ये इंजेरा विकायला असते. मी ती चाखून पाहिलेली नाही अद्याप.

मुंबईला असताना दूध संपल्यावर त्या भांड्यात मी पीठ मळत असे. भारतात दूध तापवावे लागत असल्याने त्याचा अंश सायीसारखा भांड्याला चिकटतो. पोळ्या हमखास मऊ होतात हे सत्य आहे.

चित्र मस्त आहेत.

साम्बुसा

साम्बुसाच असावा. काळी डाळ किंवा खिमा केलेल्या पोर्क/बीफचा असतो.

एका ताटात जेवणाची पद्धत मुस्लिम धर्मविशिष्ट नसून स्थलविशिष्ट (अरेबिया, उ. आफ्रिका) असावी. दादा धर्माधिकारींच्या एका पुस्तकात विनोबांची एक गोष्ट सांगितली आहे. त्यात बंधुभाव वाढीला लागावा म्हणून एक हिंदू आणि एक मुस्लिम एकाच ताटातून जेवत असतात. (प्रथेचे अनुकरण म्हणून) तेव्हा विनोबा, ही प्रथा अरबस्तानात असणार्‍या पाण्याच्या टंचाईमुळे आणि जेवण मुख्यकरून सुके असल्याने तेथे रूढ झाली असावी; ती जशीच्या तशी भारतात/भारतीय जेवणाला लागू करणे चुकीचे आहे - असा सल्ला देतात असे वाचल्याचे आठवते.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

हाहाहा! मलाही...

'पानिनी' हा शब्द एके काळी 'पाणिनी' असा वाचत असल्याने गहिवरून येत असे.

मलाही! अद्यापही येते, कधीतरी वर्तकी गुण आपल्यात कायम ठेवावेत. आपल्या वंशजांना हे पाणिनीचे आवडते खाद्य होते असे सांगता येईल. किंवा अष्टाध्ययीचे नियम निश्चित करताना जेवणात वेळ दवडू नये म्हणून पाणिनी सँडविच खात असे. -- ह. घ्या.

इथियोपिया हा देश किंवा तेथील संस्कृती तर इस्लामी नाही. मग हे कसे?

इथिओपिया मुस्लिमी नाही असे नाही. मला तर गल्फला फक्त इथिओपियन मुस्लिमच भेटले आहेत. लेबनॉनमध्येही बरेच ख्रिश्चन आहेत पण एकंदरीत गल्फ आणि अफ्रिकेतील हे ख्रिश्चन-मुस्लिम अभावाने ओळखू येतात.

बाकी, इंजेराच्या विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.

अवांतरः आमच्या ज्या इंडियन स्टोअरात इंजेरा मिळते, तेथे इतर इथिओपियन मसाले, पदार्थही मिळत असावेत. कारण या लोकांना तेथे येताना मी अनेकदा पाहिले आहे. एवढेच नव्हे तर सर्व हिंदी चित्रपट ते अतिशय आवडीने पाहतात. हिंदी चित्रपटांच्या डिविडी, कॅसेट्स घेऊन जातात हेही पाहिले आहे.

+१

पाणिनी आणि पानिनी चा संदर्भ आवडला आणि ह घे. :D (तशी शक्यता नाकारता येत नाही.. कोणास ठाऊक.. )

बाकी छान माहिती.. btw लहानपणी प्रश्न पडायचा की हे इंग्रज भाकरी खात नाहीत तर नुसत्या सफेद पावावर कसे जगत असतील.. :)

खापरपोळ्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांचा स्वानुभवाधारित माहितीपूर्ण सचित्र लेख वाचला. त्यांचे खाद्यविश्व वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. त्यांनी लिहिलेली माहिती विश्वासार्ह आणि अधिकृत आहे असे वाचतानाच प्रतीत होते.या लेखावर सविस्तर अभिप्राय लिहावा म्हणून प्रतिसाद वाचत होतो.त्यांत श्री. नंदन यांच्या प्रतिसादात पुढील वाक्य आढळले:

...."तळकोकणात होणार्‍या तांदूळ-उडीद डाळ मिश्र पिठाच्या खापरोळ्या नारळाच्या दुधात डुंबून येतात. त्यांच्या चवीचे वर्णन करणे हा अशक्य मामला आहे! "...

खापरोळ्या (खापरपोळ्या ) आणि काहिलोळ्या (काहिलपोळ्या) ही दोन खास तळकोकणातील (सिंधुदुर्ग जिल्हा) पक्वान्ने आहेत.खापरोळ्यांची अप्रतिम चव अंधुक अंधुक आठवते. विसरूनच गेलो होतो. नंदन यांच्या प्रतिसादात खापरोळ्या शब्द वाचला आणि स्मृती चाळवल्या.

माहितीपूर्ण!

मस्त लेख. स्वयंपाकघरात कुठचाही ब्रेड, चपाती/ पोळी बनत असतानाचा सुवास काही औरच! कालच आमच्या ओळखीच्या पोर्तुगीज बाईने ड्राय फ्रूट घातलेला गोडसर घरगुती ब्रेड दिला तोही मस्त लागला.

बेगल हाही एक अमेरिकेत मिळणारा पावाचा प्रकार. मागे लग्न नवे नवे असताना (नवर्‍याला आपल्या अंगच्या कलागुणांनी इंप्रेस करून काही फरक पडतो असे भाबडेपण असण्याच्या काळात :-)) एकदा मी बेगल घरी करूनही पाहिले होते, आणि चक्क मस्त झाले होते!

घावन, दशमी इ.

'घाटल्या'बरोबर खायचे घावन, गुळवणीबरोबरचे किंवा पाठीवर मारून मारून करतात तसले दिसणारे धिरडे, दूध घालून जाडसर पोळी करतात ती दशमी, नान सारखा असणारा पंजाबी कुलछा, रुमाली रोटी. रोट-रोटीपेक्षा जाड, असा भवानीआईला वाहतात तो, किंवा हत्तीचे अन्न असावे असा रोडगा, हे प्रकार वरील लेखांप्रतिसादांत दिसले नाहीत. गुजराथी 'भाकरी' गव्हाच्या पिठाची असते. बाजरीची करतात तेव्हा त्याला ते रोटला म्हणतात. शिवाय गुजराथी थेपला, चहाबरोबर खायचा खाकरा... मराठी थालपीठसुद्धा ज्वारी, भाजणीचे साधे, व राजगिरा, शिंगाड्याचे पीठ किंवा अशाच प्रकारच्या पिठाचे असते तेव्हा ते उपासाचे.. तसेच धपाटे.. मराठी भाकर्‍या देखील तांदूळ, नाचणी, जोंधळा किवा बाजरीच्या पिठाच्या करतात. पानावर करतात ती पानगी. सरसोंका सागबरोबर खायची पंजाबी मक्कईकी रोटी वेगळी! यांच्या सर्वांच्या उल्लेखांशिवाय लेखाला परिपूर्णता येणार नाही. --वाचक्‍नवी

आता आली :)

यांच्या सर्वांच्या उल्लेखांशिवाय लेखाला परिपूर्णता येणार नाही.

सर्व थोडक्यात लिहिताना काय घ्यावे आणि काय गाळावे हे कळत नव्हते. प्रतिसादांतूनही ही माहिती येण्याचे आपेक्षित होते.

हे प्रकार वरील लेखांप्रतिसादांत दिसले नाहीत.

तुमच्या प्रतिसादाने ते आता आले. :)

पोळीचे प्रकार?

पोळी/पुरणपोळी आली, तरी गुळाची पोळी, खव्याची पोळी, सांज्याची पोळी इत्यादी पोळीप्रकार राहिलेच. निखार्‍यावर भाजायचा गाकर, गवर्‍यांवर भाजायचे बाटे, लाटून करायच्या पुर्‍या, साटोर्‍या, चिरोटे आणि सिंधी छोल्याबरोबर जाणारा भटुरा?--वाचक्‍नवी

यासोबत

यासोबत आपली कोंडीची पोळी ही असू द्या.

-- आजानुकर्ण

कोंड्याची पोळी.

हे नाव कित्येक दिवसांनी ऐकले. असले पदार्थ आता जवळजवळ विस्मरणात गेले आहेत. यावरून आणखी एक पोळी आठवली..
गुजराथी स्त्रिया आंब्याच्या रसाबरोबर खाण्याकरता एक खास चपाती करतात. कणकेचे दोन छोटे गोळे एकावर एक ठेवून, लाटून त्याची पोळी करतात. भाजलेली पोळी उभी दुभंगून तिच्या दोन वर्तुळाकार पोळ्या होतात. ही पोळी अर्धपारदर्शक म्हणावी इतकी पातळ असते. ज्या दिवशी आमरस (केरीनो रस) असतो त्या दिवशी ही पोळी हमखास असते.
धारवाडी मांडे आणि खानदेशी मांडे बहुधा सारखेच असावेत. आंध्रप्रदेशात मच्छलीपट्टणमला एक मांड्याचा वेगळा प्रकार मिळतो. त्याचे तिकडचे नाव आता मला आठवत नाही. पण, पांढर्‍या शुभ्र ट्रेसिंगपेपरच्या जाडीच्या, साखर लावलेल्या पापुद्याच्या एकावर एक चौकोनी घड्या घालून केलेला, चिरोट्याच्या आकारातला हा मांडा आगगाडीत विकायला येतो. प्रत्येक पापुद्रा पारदर्शक असतो. या शिवाय, विशाखापट्टणमला आंब्याच्या पोळ्या मोठ्या प्रमाणात विक्रीला असतात. कोकणातली आंबापोळी आणि फणसपोळी प्रसिद्ध आहेच. मुंबईत मराठी बायका खजूरपोळी देखील करतात. --वाचक्‍नवी

पोत्रेकू?

त्याचे तिकडचे नाव आता मला आठवत नाही. पण, पांढर्‍या शुभ्र ट्रेसिंगपेपरच्या जाडीच्या, साखर लावलेल्या पापुद्याच्या एकावर एक चौकोनी घड्या घालून केलेला, चिरोट्याच्या आकारातला हा मांडा आगगाडीत विकायला येतो. प्रत्येक पापुद्रा पारदर्शक असतो.

ह्याला पोत्रेकू (किंवा याच्याची ध्वनिसाधर्म्य असणारं ) नाव आहे असं ओझरतं आठवतंय. आगगाडीने आंध्रातून प्रवास करताना खाल्लेल्लं आहे.

कदाचित

>>ह्याला पोत्रेकू (किंवा याच्याची ध्वनिसाधर्म्य असणारं ) नाव आहे असं ओझरतं आठवतंय.<<
हेच नाव कदाचित असेल. कारण उच्चार साधारणपणे असाच ऐकला होता. ते नाव मी माझ्या नोंदवहीत लिहून घेतले होते; नोंदवही सापडल्यावर खात्री करून घेईन.--वाचक्‍नवी

सुंदर

व माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

रोटी हे प्रकरण मलेशियन खाण्यातही आहे. मला वाटते (पण नक्की माहिती नाही) ह्याचा कुठेतरी मुस्लिम धर्माशी संबंध असावा. (पण मग, इंडोनेशियन खाद्यपदार्थात असले काही नाही).

फाहिता पिटाचा उल्लेख राहून गेला.

मलेशियन पराठे

रोटी हे प्रकरण मलेशियन खाण्यातही आहे.

मलेशियन पराठे (फ्रोझन) अमेरिकेत अतिशय प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी फक्त मलेशियन पराठेच मिळत आणि ते भारतीयांत प्रसिद्ध आहेत हे लक्षात आल्यावर दीप, स्वाद, अशोका अशा अनेक भारतीय कंपन्यांनी पराठे बनवण्यास सुरुवात केली. त्यापैकी काही पराठ्यांना भारतात बनवून वर मलेशियन पराठे म्हणून विकले जाते.

जीभेचे चोचले

निसर्गतः जगण्यासाठी खाणे हे कोणालाही मान्य. पण हे वि सरदेसाईंसारखे बरेच लोक म्हणतात आपण सुरुवातीला जे चार घास खातो ते पोटासाठी , नंतरचे सगळे जिव्हाचौचल्य. हे जंक फूड भारतात आल आणी त्याबरोबर ओबेसिटी. आता ओबेसिटी पेशालिश्ट बी पुन्यात निघालेत. ही खवैय्येगिरीला ग्लॅमर देन्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा लई मोठा हात आहे म्हन्त्यात. नंतर ओबेशिटीला बी त्यांचीच औषधे. एकदा ३-४ वर्षांपुर्वी असेल इथे गणपती बंदोबस्ताला कर्तव्यावर होतो. तिथे जवळच एक खेळणी विकणारे गरिब जोडप त्यांची दोनचार चिल्लीपिल्ली पोर, एक गाठोडे त्यात थोडी भांडीकुंडी, एक पत्र्याची ट्रंक एवढाच संसार. संध्याकाळी तीन दगडांच्या चुलीवर स्वैपाक करायला त्या बाईने घेतला. काटक्यांचा जाळ पेटवला. तवा ठेवला, भाकरी थापल्या, भाजल्या. एकिकडे काहीतरी कालवण पातेल्यावर ठेवले. आन बघता बघता या सार्‍याचा असा काही खमंग वास तिथे दरवळला. माझ्या पोटात भुकेचा डोंब उसळला आणि मी त्यांच्याकडे आशाळभुतासारखा बघत राहिलो. मला स्थानक सोडता येत नव्हत.सकाळी स्थानक उभारण्यासाठी मी त्यांनाच तेथुन हाकललं होत. आता मला ते श्रीमंत वाटत होते.
प्रकाश घाटपांडे

भारतीय खाणे जंक फूड नाही?

हे जंक फूड भारतात आल आणी त्याबरोबर ओबेसिटी.

भारतात जंक फूड नाही? आलूपराठा, मसाला डोसा आणि पिझ्झा यांतील जास्त जंक कोणते?

तळलेला बटाटावडा जास्त जंक की फ्रेंच फ्राईज? मैद्याचा तळलेला समोसा अधिक जंक की विस्तवावर भाजलेला टॅको?

ओबेसिटी जंक फूडमुळे वाढते हे खरे पण त्याबरोबर किती प्रमाणात खावे, आठवड्यातून जंकफूड कितीदा खावे, खाल्ल्यावर व्यायाम करावा हे जेव्हा माणसांना कळत नाही तेव्हा जाडेपण वाढते. यात केवळ परदेशी अन्नाचा हात असल्याचे वाटत नाही. विशेषत: भारतातील सुपरमार्केटसमध्ये किंवा बाजारातही किती "देशी" जंकफूडस मिळतात हे पाहिले तर विदेशी कंपन्यांवरच होणारे आरोप किती फोल आहेत याची कल्पना यावी.

जाडेपणासाठी कारणीभूत आळशीपणा, अन्नाची आणि उपकरणांची उपलब्धता (ज्यामुळे कामं यंत्रे करतात) हे मोठे फॅक्टर विसरले जातात.

तीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करणार्‍या बाईला तो स्वयंपाक करण्यासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात याची तुलना ३०० रू.चा पिझ्झा खाऊन दुपारी वामकु़क्षी घेणार्‍या किंवा खुर्चीवर स्थानापन्न होऊन संगणाकाच्या कळा दाबणार्‍या श्रीमंत, नवश्रीमंतांशी आणि हे चोचले परवडणार्‍या उच्चमध्यमवर्गीयांशी करा - फरक लक्षात येईल. मरिनारा पिझ्झा खाणारे इटलीतील कोळी ओबीस होते असे वाटत नाही.

खाद्य विकणार्‍या कंपन्या मात्र खप वाढवण्यासाठी तुम्हाला खाण्याचे अमिष दाखवतात हे खरे. हे आता भारतीय कंपन्यांतही रुजू होऊ लागले आहे. तरीही, फास्टफूड आणि ऑथेंटिक फूड यांत फरक आहे.

असो. लेख देशी-विदेशी चपात्यांच्या साम्यावर आणि संस्कृतींवर आहे याची आठवण करून द्यावीशी वाटली. सदर लेख कोणत्याही प्रकारच्या फास्टफूडची भलामण करण्यासाठी लिहिलेला नसून चपात्या जगात कोठे बनवल्या जातात आणि त्यापासून कोणते पदार्थ निर्माण केले जातात याबद्दल आहे.

ओबेसिटी आणि जाडेपणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातासाठी वेगळी चर्चा सुरु करता येईल.

बहुतांशी सहमत

प्रियाली म्याडमच्या प्रतिक्रियेशी बहुतांशी सहमत आहे.

ओबेसिटी आणि जाडेपणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातासाठी वेगळी चर्चा सुरु करता येईल.

ही बी चर्चा जंगी होउन जाउ द्यात.
(पुन्यात आल्याव चहाबरोबर पाव खायला भेटतोय म्हणुन पुणे आवडणारा)
प्रकाश घाटपांडे

मसाला डोसा?

मसाला डोसा जंक आहे की नाही ते माहीत नाही, पण डोसा नक्कीच नाही. मसाला डोसा जंक असेल तर बटाटा जंक होईल. म्हणजे सबंध युरोप आणि अमेरिका खंड, जंक आणि फक्त जंकच खातात. आणि आपण एकादशीला जंकफूड खाऊन उपाशी राहतो.--वाचक्‍नवी

एकादशी


आपण एकादशीला जंकफूड खाऊन उपाशी राहतो

हॅ हॅ हॅ !!!!म्हणुनच 'एकादशी आणि दुप्पटखाशी' हा वाक्य प्रयोग आला असावा. जंकफूडची आहारशास्त्रानुसार नेमकी व्याख्या काय? कुठले पदार्थ जंकफूड सदरात मोडतात कुठले नाही? इ. वर एक वेगळा लेख होउ शकेल.
प्रकाश घाटपांडे

भाकरीचा चंद्र

मुम्बईतल्या नागपाडा, भेन्डिबाजार, मो. अली रोड ई. भागात गेल्यास मुस्लिम पारंपरिक पाव जसे लंबा पाव, पावाचे नान (हे प्रकार किन्चित आंबट असतात्) मिळतात. त्यावर विविध प्रकारचे मांस, भाज्या पसरुन देतात.

ह्याच भागात खास रोट्यांचे खास भटारखाने आहेत. इथे विविध प्रकारच्या रोट्या मिळतात. येथून रोट्याघेवून दूसर्‍या रेस्टारन्ट् मधुन भाज्या / मांस घेउन खावे. इथे ईराणी, उ. प्र. , ई. प्रकारची मुस्लिम रेस्टारन्ट्स आहेत. बरीचशी रस्त्यावरच असतात. प्रत्येकांच्या पदार्थाना वेगवेगळी चव असते.

संजय अभ्यंकर

अप्पम

या यादीमध्ये पॅनकेक बरोबर भारतीय पॅनकेक अप्पमही हवा :)
अप्पमबरोबर माशाचे कालवण (म्ह. फिश करी हो) मस्त लागते.

-- आजानुकर्ण

रोडगा

रोडगा आला आहे का हो या चर्चेत? नसेल तर कोणी घालु शकेल का माहितीत भर?

हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

रोडगा

रोडगा वरती 'घावन, दशमी' या प्रतिसादात येऊन गेला आहे.--वाचक्‍नवी

मसाला भाकरी

वर आलेल्या अनेक 'फॅन्सी' पदार्थांच्या गर्दीत हा एक अगदी साधा, सोपा, गावाकडचा पदार्थ.

मसाला भाकरीची कृती:
मसाला: शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेला कांदा, आमटीचा गोडा मसाला, तिखट, मीठ हे सर्व कालवावे. त्यावर तेलाची मोहरी, हिंग, हळद याची फोडणी घालून पुन्हा कालवावे. (ज्यांना गोडूस चव आवडत असेल त्यांनी थोडा गूळ घालावा.)

ज्वारीची भाकरी करून घ्यावी. तिचा संपूर्ण पापुद्रा हलकेच सोडवून घ्यावा. भाकरीवर मसाला पसरून पुन्हा पापुद्रा त्यावर ठेवून थोडा दाबावा. थोड्या वेळाने उलथन्याने किंवा सुरीने त्याचे चतकोर, नितकोर करून तसेच हातात घेऊन खावेत. (आमच्याकडे भाकरी चांगली तवाभर करतात. म्हणून खाण्याच्या सोयीसाठी असे तुकडे करावे लागतात.)

विकि

आपन विकि लेखिका आहातच.. पण तरीही आगावूपणा करून विचारतोच विकिवर टाकला आहे ना?

विकीवर टाकते

प्रतिसादाबद्दल आणि आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद निनाद. अद्याप विकीवर टाकला नाही. हॅपी हॉलिडेज अनुभवत होते. ;-) आज टाकते.

विकि

आपन विकि लेखिका आहातच.. पण तरीही आगावूपणा करून विचारतोच विकिवर टाकला आहे ना?

वा

मस्त लेख आणि मस्त प्रतिसाद. वाचून बरेच प्रबोधन झाले. मी आजपर्यत साध्या पोळ्या, पुरणपोळ्या, सांज्याच्या पोळ्या आणि भारतात मिळणारा पिझ्झा हे सोडता वर उल्लेखलेले काहीच खाल्ले नसल्याने इतकेही पदार्थ असतात असा विचार मनात येऊन अप्रूप वाटले.

अवांतरः दोन महामूर्ख प्रश्न- (पण ते मला बरेच दिवसांपासून छळत आहेत.)
१- नान आणि कुलछा यात फरक काय?
२- रेड मीट म्हणजे काय? बीफ हे रेड मीट मधे गणले जाते असे ऐकले आहे. पण असे का?

राधिका

रेड मीट

२- रेड मीट म्हणजे काय? बीफ हे रेड मीट मधे गणले जाते असे ऐकले आहे. पण असे का?

साधारणतः सस्तन प्राण्याचे मांस हे रेड मीट म्हणून समजले जाते. पोर्क, बीफ, मटण आदी प्रकार हे वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांची असल्याने ते रेड मिट. पण चिकन, टर्की, डक, क्रॅब आदी पक्षी/उभयचर आणि मासे, प्रॉन्स वागैरे जलचर हे व्हाईट मीट मधे येतात. काहि जण व्हाईट मिट आणि सी फूड यांचे वेगळे वर्गीकरण करतात. पण सी फुड हे नदी, तळे यातुनही आलेले असु शकते ;)
तसंही बर्‍याचशा सस्तन प्राण्याचे मांस नावाप्रमाणे लाल असते.

-ऋषिकेश

धन्यवाद

धन्यवाद :)

राधिका

वॉलमार्टात दिसले नाही??

डुकराचे मांस कच्च्या अवस्थेत पाहण्याचा योग अजूनपर्यंत आला नसल्यामुळे याच्या कारणाची प्रत्यक्ष ग्वाही देणे अशक्य आहे.

असं कसं बॉ? वॉलमार्टात किंवा अन्य कोणत्याही ग्रोसरी स्टोअरात दिसले नाही का कधी? मीट सेक्शनमध्ये शोधा. ते गुलाबी असते. गायीच्या मांसाएवढे लाल नसते हे निश्चित.

नमुना:

 
^ वर