एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ५ - भाष्य

भाष्य

जीवशास्त्रातील उत्क्रांतीविषयी जी आधारसामग्री आहे, ती फार विस्तृत आहे. म्हणून येथला प्रयोग एका मनोरंजक शब्दखेळाबाबत आहे. याचा फायदा म्हणजे जीवशास्त्रापेक्षा यातील आधारसामग्री मर्यादित आहे. सर्वच्या सर्व आत्त (डेटा) सहज आवाक्यात येण्यासारखे आहे. आधारसामग्री मिसळपावाच्या वाचकांनीच कौल देऊन बनवलेली आहे, त्यामुळे प्रगतीचा आणि निवडीचा हेतू काय होता, ते आपल्याला थेट समजू शकते - जैव उत्क्रांतीबद्दल हेतू सांगणारा साक्षीदार उपलब्ध नाही. प्रयोगाची चौकट पूर्णपणे मुक्तस्रोत (ओपन-सोर्स) असल्यामुळे प्रयोग सुयोग्य रीतीने झालेला आहे, हे कोणीही स्वतंत्रपणे कस लावून बघू शकते. मिळालेली आधारसामग्रीसुद्धा मुक्तस्रोत असल्यामुळे विश्लेषण करण्यासही पुरती मुक्तता आहे.

१०व्या पिढीतल्या विजेत्या वाक्याचे रसग्रहण
दहाव्या पिढीमध्ये सर्वाधिक मते मिळवलेले वाक्य खूप पिढ्यांपर्यंत जगलेले आहे. "फूल उडते आस्ते वेडे, मोहरून झोपला शाहाणा राजा."
त्यातला शब्दालंकार म्हणजे आघातस्वरांना लय आहे. "वेडे" विरुद्ध "शाहाणा" हा विरोधाभासाचा अर्थालंकार सुद्धा दिसतो आहे. पहिल्या वाक्यार्धात "वेडे" आणि दुसर्‍या वाक्यार्धात "शाहाणा" हा विवक्षित परस्परपोषक शब्दजोड असण्याची संभवनीयता फारच थोडी आहे - केवळ १%. परंतु हे संभनीयतेचे गणित या ठिकाणी योग्य नाही. अनेक यादृच्छिक वाक्ये बनवताना कुठल्यातरी वाक्यात कुठलातरी अर्थालंकार येणे त्या मानाने फारच संभवनीय होते, त्याबद्दल पुढे अधिक सांगतो.

या विरोधाभासाबरोबर असे दिसते की दोन्ही वाक्यार्धांतले लडिवाळ शब्द आणि मृदु ध्वनी एकमेकांना पोषक आहेत - "वेडे फूल", "मोहरणे". यामुळे एखादा काव्यमय अनुभव सहज मनात येऊ शकतो. उदाहरणार्थ, हे वाक्य पुढील अंगाईगीताचा भाग असू शकते -

आली बघ गाई गाई
शेजारच्या आंगणात
आंगणात पारिजात
घालतसे फूल-सडा

फूल उडे आस्ते वेडे
मोहरून झोपे शाणा राजा!

असे कुठलेही सौम्य-मधुर अर्थसंदर्भ या वाक्यातून वाचकाला स्फुरू शकतील.

पिढ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे अवयव-परस्पर-साहाय्य सापडणे
सर्व आधारसामग्री बघता असे दिसते की एक वेगळा साहाय्यभाव दिसणारे - "वेडे फूल - लाघवी राजा" घटक असलेली वाक्ये पुष्कळ यशस्वी होती. काही पिढ्यांमध्ये या वाक्यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे असे दिसते, की "वेडे" हा घटक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य करू शकतो. म्हणूनच पश्चाद्-बुद्धीने फक्त "वेडे-शहाणे" याचीच संभवनीयता बघणे अयोग्य आहे.

प्रगती एकदिक् नव्हती
वाक्यांची प्रगती एक दिशेने पुढे रेटत जाणारी पूर्वहेतुक नव्हती. जर खेळाडूंना शेवटी जिंकलेल्या वाक्यांकडेच जायचे असते, तर "लाघवी" शब्द असलेली वाक्ये इतक्या पिढ्या खेळाडूंनी चालवून घेतली नसती. "वेडा-शाहाणा" जोडीलाच वेगवेगळ्या आनुषंगिक शब्दांचे पर्याय शोधले असते. दोन पिढ्यांमध्ये "शाहाणा" ऐवजी "लाघवी" असलेल्या वाक्यालाच अधिक मते मिळाली नसती.

वरील विवेचनावरून असे दिसते की (१) अवयव वेगवेगळ्या प्रकारे परस्परसाहाय्य करू शकतात, आणि त्यामुळे कुठलेतरी परस्परसाहाय्यक अवयव उत्क्रांतीमध्ये दिसतील, याची संभवनीयता पुष्कळ असते. अमुक एक शेवटी टिकलेली अवयवजोडीच किती संभवनीय आहे, हे गणित नि:संदर्भ आहे.
(२) उत्क्रांतीमधील प्रगती निर्हेतुक असते. शेवटचे वाक्य अर्थपूर्ण आणि सालंकृत असले, तरी खेळाडूंचा नेमके तेच वाक्य बनवायचा हेतू सुरुवातीपासून नव्हता.

"सहेतुक प्रगती" या गैरसमजुतीमधून आलेल्या दोन्ही टोकांच्या मताचे तार्किक दोष स्वतःच्या अनुभवातून आपल्याला दिसून आलेले आहेत.

उत्क्रांतीप्रक्रियेची कार्यक्षमता
आता आपण बघूया की या शब्दखेळात उत्क्रांतीची प्रक्रिया थोडीबहुत कार्यक्षम का ठरली? सुरुवातीचा १०*८ तक्ता बघितला, तर यातून १० = १० करोड वेगवेगळी वाक्ये बनू शकतात. त्यातली काही वाक्ये आस्वादयोग्य आहेत, आणि बहुतेक वाक्ये टाकाऊ आहेत. प्रत्येक वाक्य कौल देऊन पडताळणे केवळ अशक्य. दिलेल्या उत्क्रांती चौकटीमध्ये वेगवेगळ्या निवडीच्या शक्यता बघता शोध-क्षेत्र १० कोटीचे नसले तरी आदमासे ४*३ = ~ ७५,००० वाक्ये इतके आहे. (हे गणित आदमासे आहे, वाक्यांच्या यादृच्छिक पुनरावृत्तीमुळे शोधक्षेत्र ४*३=७८७३२ वाक्यांपेक्षा कमी आहे.) इतकी वाक्ये घेऊन सुद्धा कौल व्यवहार्य नाही. सुरुवातीपासून ज्या वाक्यांना फारसा वाव नाही, त्यांना कौल देणार्‍यांनी खुंटवले, आणि प्रत्यक्षात केवळ ३४ वेगवेगळी वाक्ये कौलामध्ये निवडीसाठी समोर आलीत. या शोधक्षेत्रात सर्व सुंदर वाक्ये येऊ शकत नाहीत - स्फूर्ती म्हणून घेतलेले विंदा करंदीकरांचे वाक्य तर या शोधक्षेत्रातच नव्हते. परंतु कोणीही आधी विचारात न घेतलेले एक अर्थपूर्ण आणि आस्वाद्य वाक्य आपल्याला या प्रक्रियेमधून सापडले. १० कोटीपैकी कुठलीही ३४ वाक्ये घेतली असती तर खचितच असे काही मिळाले नसते. हे वाक्य सापडल्याचे कारण हेच - शोधक्षेत्र केवळ ३४ नसून ~७५,००० होते.

कापडाच्या छापांचे डिझाइन करताना "कॅलायडोस्कोप" नावाचे यंत्र वापरतात. यातसुद्धा वेगवेगळे यादृच्छिक आकार तयार होतात. पैकी काही सुंदर आकार असे असतात, की कापड-कलाकाराच्या मनात ते उत्पन्न होण्याची काहीएक पूर्वशक्यता नव्हती. रामोन-ल्युलचे हे यंत्र संगणकीकृत प्रणालीत बनवले, तर एकटा खेळाडूसुद्धा हा खेळ खेळू शकेल. कवितेची किंवा लघुकथेची नवी बीजे उत्पन्न करू शकेल काय?

प्रयोगाच्या मर्यादा
हा प्रयोग मुद्दामूनच मर्यादित आवाक्याचा बनवला होता. "यदृच्छेने सहायक अवयवांची वाक्ये बनू शकतात का?" आणि "प्रत्येक पिढीत सहेतुक कौल देणारेसुद्धा अनेक पिढ्यांपुढले वाक्य सांगू शकत नाहीत, सहेतुक प्रगती करू शकत नाहीत" हे दोन मुद्देच दर्शवण्यापुरता ऐवज प्रयोगात होता. येथील माझ्या एका मित्राने सांगितले, की दोन कडवी जुळवणारा प्रयोग का नाही बनवला? माझ्या मते १०-२० पर्यायांचे कौल, फक्त दहा कौल-पिढ्या, आणि फक्त १०-२० खेळाडू -- अशी महत्त्वाकांक्षा राखणे योग्य नव्हे. जैव उत्क्रांतीचा आवाका या प्रयोगात नाही, हे खरेच.

जैव उत्क्रांती ही सेंद्रिय प्राण्यांमध्ये रासायनिक बदलांमुळे, अन्न-प्रजननाच्या स्पर्धेतल्या निवडीमुळे होते. येथील प्रयोग संगणकीय शब्दांच्या कौल-स्पर्धेमुळे उत्क्रांत झाला. या प्रयोगातून फक्त शुद्ध तार्किक तितके निष्कर्ष जैव उत्क्रांतीपर्यंत पोचवता येतील. तपशीलवार ज्ञानाकरिता जीवशास्त्रातली आधारसामग्री बघूनच परिशीलन करावे लागेल.

कोणी म्हणेल की खेळात मराठी भाषेचे व्याकरण वापरले, म्हणजे खरे तर वाक्ये यादृच्छिक निर्मितीची नव्हेत. मात्र आस्वाद्य वाक्ये ठरवण्यासाठी व्याकरणाचे कुठले नियम नाहीत. प्रयोग आस्वाद्य-वाक्यांच्या उत्पादनाबद्दल होता. जीवशास्त्रातही कार्बन-ऑक्सिजन-नायट्रोजन यांच्या रासायनिक संघटन-विघटनाच्या प्रक्रिया "व्याकरण" आहेत. पण त्या नियमामधून अवयवी प्राणी निर्माण करण्यासाठी कुठलाच नियम नाही.

इतिवाक्ये
या मनोरंजक शब्दखेळामधून उत्क्रांतीबद्दल काही ढोबळ निष्कर्ष काढण्यापुरती आधारसामग्री मिळते. "उत्क्रांती ही सहेतुक आणि प्रगतिशील आहे" या गैरसमजामधून येणारी टोकाची तत्त्वतः सिद्धांत नसल्याचे दर्शवलेले आहे.

- - -
मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे
लेखाच्या भागांची अनुक्रमणिका दुव्यांसह खालील एका प्रतिसादात देणार आहे.
- - - समाप्त - - -

Comments

लोक

लोक् एक मेकाकाना मोबाइल करून थरवत नवते ना नक्की?
आमच्या इथे मत देताना आमी लगेच मोबाइल् करतो, फायनल पैशे भेटले त्यालाच मत्!
म्हनून् तसं विचारतो.

आसतील् कदचित आता सायटीवर मेल करत आसायचे.

पन् एकुन् चाम्गला प्रयोग आहे. मला आवाड्ला.

पहिले राजाचे वाक्य समजले नाही, पन् समजाय्चे कारनच नाही हे पन नन्तर् कलले.
म्हन्जे झाड वाडते तशी प्रानी मान्स वाडतात . (नाहीतर विरुद्द)
त्याला कुनाचे कुनी ताबेदार नाही.
म्हन्जे जो तो आपल्या नशिबाने राहतो म्हना ना राव सरल एका वाक्यात.
त्याच्यासाठी इतका कुटाना कशाला करायचा?

बरोबर् का?

आपला
अण्णा

नाही अण्णा

म्हन्जे झाड वाडते तशी प्रानी मान्स वाडतात . (नाहीतर विरुद्द)
त्याला कुनाचे कुनी ताबेदार नाही.
म्हन्जे जो तो आपल्या नशिबाने राहतो म्हना ना राव सरल एका वाक्यात.
त्याच्यासाठी इतका कुटाना कशाला करायचा?

बरोबर् का?

झाडं झाली त्यापरीच मान्संपन झाली आसं म्हन्लय. कोनीच कोनाला बनिवलं न्हायी. देव, दैव, याच्या थोडं पलिकडलं हाय हे. ल्वाकांना समजत न्हाय म्हून इतका कुटाना.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बरोबर्

/झाडं झाली त्यापरीच मान्संपन झाली आसं म्हन्लय. कोनीच कोनाला बनिवलं न्हायी. देव, दैव, याच्या थोडं पलिकडलं हाय हे. ल्वाकांना समजत न्हाय म्हून इतका कुटाना./

बरोबर् ना,
मी आसा का

आसा प्र्शन आल्यावर आपन् काय् म्हन्तो - नशिब् - त्यालाच् आम्ही नशीब् म्हन्तो.
कुनी मानूस आसा का झाला? कारन् नशिब -
उत्तर् त इथेच भेटले मग

आनि देवाचा पलिकदे काय असतो? देवच. जिथ काहीच नसत त्यालाच आपन देव नाही तर नशीब आसलच् काही म्हन्तो ना? का आजून काही?
आता आपन् माकडातून मानूस झालो, हत्तीतून नाही. का नाही - नशीब आजून काय

मला तर् लगेच समजला- मी लोकात नसनार् का

आपला
अण्णा

एक शंका

हा प्रयोग आणि त्यावरील भाष्य फार विचारप्रवण आहे. सोप्या वाटणार्‍या खेळातून मूलगामी विचार करता येतो हे समजते.
धनंजय यांचे अभिनंदन.

मात्र आस्वाद्य वाक्ये ठरवण्यासाठी व्याकरणाचे कुठले नियम नाहीत

हे जरी खरे असले तरी मराठी भाषेत मराठी भाषिकांसाठी , मराठी भाषिकांकरवी असा प्रयोग केल्याने निर्माण होणार्‍या वाक्यांचा 'अर्थ' अधिकाधिक संयुक्तिक व्हावा आणि दोन वाक्यांच्या जोडीतून मराठी भाषेत समजणारी 'चांगली' कल्पना निर्माण व्हावी असे प्रयोगात भाग घेणार्‍या प्रत्येकाला वाटत असावे.(त्यांच्यावर झालेल्या भाषिक संस्कारांचा वाटा असू शकतो.)
हा प्रयोग या अर्थाने यादृच्छिक म्हणता येईल का?
न समजणार्‍या भाषेतली काही व्यंजने आणि स्वर घेऊन त्यातून त्या भाषेत काही अर्थपूर्ण शब्द/वाक्य निर्माण होते का - असा प्रयोग केल्यास...
असो.

अशक्य

सतत एकाच दिशेने ढकलणारी 'परिस्थिती' असल्याशिवाय उत्क्रांती होणार नाही.
हा प्रयोग वीझल प्रयोगावरून प्रेरित आहे का?

निर्मिक???

डॉकिन्सच्या वीजल प्रयोगाबद्दल वाचले.
प्रयोगाच्या शेवटी कोणते वाक्य तयार व्हावे? ते कोण ठरवणार?
जर तसे वाक्य अस्तित्त्वातच नसेल आणि ते वाक्यच हवे असे म्हणणारा कोणीच नसेल तर सतत एकाच दिशेने (ती दिशा कोणती?) ढकलणारी परिस्थिती
का आणि कशी निर्माण होईल?

तेच म्हणतो

मतदारांच्या मनात सुप्तपणे 'ब्येष्ट कवितेची' व्याख्या असते. तिच्यावर आधारित दिशेने त्यांच्या निवडी होणार.

वीझल प्रयोग

सतत एकाच दिशेने ढकलणारी 'परिस्थिती' असल्याशिवाय उत्क्रांती होणार नाही.

हे विधान जास्त बंधनकारक आहे. सतत एकाच ऐवजी, सर्वसाधारणपणे कुठच्या ना कुठच्या दिशेला (अधिक पिलं, अधिक प्रजननक्षमता, अधिक टिकण्याची क्षमता इ.) ढकलणारी परिस्थिती आवश्यक आहे हे खरं आहे. पण काही मर्यादित व बंद सिस्टिम्सचे अपवाद वगळता ती कायम असते. जास्त पिलं होणारे प्राणी पुढच्या पिढ्यांत जास्त प्रमाणात आढळतील, या तत्वासाठी कुठचीही परिस्थिती असण्याची गरज नाही. जास्त पिलं होण्यासाठी कुठचे गुण आवश्यक आहेत हे तत्कालिन परिस्थितीवर अवलंबून असतं.

वीझल प्रयोगाशी या प्रयोगाची, किंवा उत्क्रांतीच्या प्रक्रियेशी सरसकट तुलना होऊ नये. वीझल प्रयोग अतिशयच मर्यादित कल्पना स्पष्ट करण्यासाठी होता. शेक्सपिअरचं समग्र लिखाण लिहिण्यासाठी अनंत (किंवा अतिप्रचंड संख्येने) माकडं अनंत (किंवा कल्पनातीत) काळपर्यंत टंकत राहावी लागतील. तेव्हा काहीतरी 'सार्थ' निर्माण होण्यासाठी पुरेसा वेळ नाही, तद्वतच ही सृष्टी म्हणजे कोणा जादूगाराची किमया आहे असा दावा खोडून काढण्यासाठी वीझल प्रयोग आहे. त्या प्रयोगात निरर्थक अक्षरांपासून सुरूवात करून झालेल्या 'सुधारणा' कायम ठेवल्या तर काही पिढ्यांमध्येच वाक्य बनतं हे दाखवलं आहे. माकडांच्या यदृच्छतेतल्या कल्पनातीत लांब काळाऐवजी यदृच्छ बदल + पुनरुत्पादन + निवडयंत्रणा या तीनमुळे झपाट्याने बदल होतात हे अधोरेखित करायचं आहे.

त्या प्रयोगाची मर्यादा अशी आहे की निवडयंत्रणा ही 'एका विशिष्ट वाक्याकडे जाणारी', सदिश आहे. ती तशीच असली पाहिजे असं बंधन नाही. वरच्या प्रयोगात ती तशी सदिश नाही. जैविक उत्क्रांतीमध्ये ती तशी सदिश नाही.
आधीची पिढी + 'चांगले बदल' - 'वाईट बदल' = पुढची पिढी
हे चक्र अव्याहतपणे चालत राहिलं तर सर्वसाधारण क्लिष्टतेच्या रचनांपासून असंभाव्य वाटतील अशा क्लिष्ट रचना (रेणूंपासून सचेतन) तयार होऊ शकतात हे उत्क्रांतीचं तत्व आहे. 'चांगले बदल' - 'वाईट बदल' म्हणजे नक्की काय याची व्याख्या बदलू शकते. वरच्या प्रयोगात आधीची पिढी म्हणजे काव्यगुण असलेली वा नसलेली वाक्यं. तर 'मिपावरील वाचकांच्या काव्यमयतेच्या सरासरी कल्पनांना भावणारे ते चांगले बदल' अशी व्याख्या आहे.

थोडं दूरचं उदाहरण द्यायचं तर 'आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं' याचा अर्थ बघा. 'आकाशामधून पडणारं पाणी जसं शेवटी समुद्रालाच मिळतं...' पाणी वरून खाली पडतं, जमिनीवर साचंतं. गुरुत्वाकर्षणाने उंचावरून अव्याहतपणे खाली येतं. नद्या तयार होतात. ओढे त्यांना मिळतात. गुरुत्वाकर्षणाचं बल एका अर्थी सदिश असलं तरी सर्व जल सागरालाच मिळेल अशी त्या बलाची 'इच्छा' नसते. नद्या कुठे कशा होतील हे गुरुत्वाकर्षणाने 'ठरवलेलं' नसतं. भौगोलिक आकारांमुळे ते आपोआप होतं. (हे रूपक फार ताणू नये) त्याचप्रमाणे कुठच्या दिशेचे बदल टिकून राहातील हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

दिशा

जास्त पिलं होणारे प्राणी पुढच्या पिढ्यांत जास्त प्रमाणात आढळतील, या तत्वासाठी कुठचीही परिस्थिती असण्याची गरज नाही. जास्त पिलं होण्यासाठी कुठचे गुण आवश्यक आहेत हे तत्कालिन परिस्थितीवर अवलंबून असतं.

क्युम्युलेटिव बदल होण्यासाठी दिशा हवीच ना? अन्यथा टायपिका आणि कार्बोनेरिया या पाकोळ्यांतील उत्क्रांतीसारखे दोलायमान लंबक हाती येईल. प्रगती कशी होईल?

हे रूपक फार ताणू नये

हॅ हॅ हॅ. मग मी लाप्लासचा डिटर्मिनिझम कसा घुसवू?

न समजणार्‍या भाषेतला प्रयोग

न समजणार्‍या भाषेतली काही व्यंजने आणि स्वर घेऊन त्यातून त्या भाषेत काही अर्थपूर्ण शब्द/वाक्य निर्माण होते का - असा प्रयोग केल्यास...

असा प्रयोग जरूर करता येईल. तरी असा प्रयोग करण्यासाठी "निवडीचा रेटा" म्हणून काय बरे असेल? कदाचित निवड करणारे कुठलातरी वेगळा रेटा वापरतील. स्वरव्यंजनांची लय, ताल, मृदुता... कोणास ठाऊक. तो जो काय रेटा असेल, त्यास अनुसरून कुठलातरी आस्वाद्य ध्वनिसमूह तयार होईल.

एक कल्पना : कदाचित स्वरव्यंजने न वापरता सांगीतिक स्वर वापरता येतील. संगीतशास्त्राचा अभ्यास नसणार्‍या लोकांकडून निवड करवता येईल. अशा निवडीमध्ये "अस्फुट सांस्कृतिक वारसा + कर्ण-इंद्रियाची जीवशास्त्रीय रचना" यांच्या मिश्रणाचा निवडीचा रेटा दिसेल.

उदाहरणार्थ "पाय"चेच घातांक-८ मध्ये अंक घेतल्यास, ०-१-२-३-४-५-६-७ या चिह्नांना अनुक्रमे सा-रे-ग-म-प-ध-नि-सां मानल्यास, चार-चार स्वर असे निघतील :

१ १ ० ५
रे रे सा म

७ ५ ५ २
सां ध ध ग

४ २ १ ०
प ग रे सा

२ ६ ४ ३
ग नि प म
(वगैरे)
कोणास ठाऊक अस्फुट सांस्कृतिक वारशामुळे कोणी उत्तर भारतीय निवडकर्त्री "प ग रे सा" या भूप रागातल्या अवरोही पकडीची निवड करेल! कोणा पाश्चात्त्य ऐकणार्‍याला "मायनर" स्वरमेळ भावुक करत असेल, तो "सां ध ध ग" निवडेल.

किंवा निवड करणारे कुठलीतरी वेगळीच धुन निवडतील. जी काही धुन निवडतील त्यातून त्यांना जाणवणारे पण स्पष्ट न-सांगता येणारे आस्वादतत्त्व प्रतीत होते.

- - -

मात्र "न समजणार्‍या भाषेतले" असा विचार चरमार्थाने घेतल्यास अशा प्रयोगामधून "समजाणारे आस्वाद्यवाक्य" पुरते यादृच्छिक होते. त्यात "नाविन्य" तितके असते, काही खास निवडून निघण्याची पूर्व-अपेक्षा नसते. या प्रयोगासाठी खर्‍याखुर्‍या आस्वादकांची गरज नाही. "मराठी येत नसलेल्या" संगणकाकडून रँडम आकडे उचलून हा प्रयोग मी केलेला आहे. अशा दहा हजार यादृच्छिक-निवड-प्रयोगांमधले काही निष्कर्ष येथे (रंगांचे डिस्ट्रिब्यूशन) दिसतील.

अशा निवड-रेटा नसलेल्या स्थितीचा उत्क्रांतीच्या तत्त्वाशी संबंध नाही. तत्त्व थोडक्यात असे :
निर्हेतुक बदल + वर्तमानकालिक कार्य साधणारी खरोखरची निवड => भविष्यातील हेतू साधल्याचा आभास

या "ज्यांना मराठी भाषा समजते त्यांची अस्फुट आस्वादमूल्ये" हा या प्रयोगामधील निवडीचा रेटा आहे. मात्र या प्रयोगात दाखवले आहे, की निवडीचा परिणाम फक्त प्रस्तुत वर्तमान पिढीवरून झाला तरी उत्क्रांती होते - भविष्याबद्दल दूरदृष्टी लागत नाही, आणि भविष्यातल्या कुठल्या विवक्षित एककाच्या सृजनाबद्दल हेतू असू शकत नाही. तरी भविष्यातला हेतू साधल्याचा आभास होतो - अर्थात या प्रयोगात वेगवेगळ्या वाक्यार्धांमध्ये परस्परपोषक शब्द "वेडे/शहाणा" दिसणे.

जैव उत्क्रांतीमध्ये "भौतिक-रासायनिक पिंडांचा आपोआप नाश होण्यापूर्वीचे प्रजनन" ही वर्तमानकालिक कार्य साधणारी निवडप्रक्रिया आहे. निर्हेतुक अवयवबदलांना या निवडीची जोड मिळाली की त्यातून भविष्यातला हेतू साधल्याचा आभास होतो. येथेसुद्धा निवड यादृच्छिक केली (म्हणजे "न समजणार्‍या भाषेतली निवड" असा विचार चरमार्थाने घेतल्यास) उत्क्रांती अशी काही होणार नाही.

ग्रीडी

दूरदृष्टी दाखविल्यास अधिक फायदा होणार असता तरी तात्कालिक फायद्याला उत्क्रांतीमध्ये महत्व असते.
स्वयंप्रज्ञा असलेली जनुके न जिंकण्याचे तेच कारण असते ना?

निर्हेतुक बदल + वर्तमानकालिक कार्य साधणारी खरोखरची निवड => भविष्यातील हेतू साधल्याचा आभास

परिस्थिती बराच काळ कायम राहिली तरच भविष्यातील हेतू साधल्याचा भास होतो, नाही का?

"स्वयंप्रज्ञा" हा थोडासा गोंधळात पाडणारा प्रकार

परिस्थिती बराच काळ कायम राहिली तरच भविष्यातील हेतू साधल्याचा भास होतो, नाही का?

होय. परिस्थिती "फार" बदलली नाही, तोपर्यंतच भविष्यातील हेतू साधल्याचा आभास होतो.

"फार" म्हणजे काय -पूर्वी कार्य साधणारे अवयव नवीन परिस्थितीत कार्यात आडथळा आणू लागले तर तसा बदल "फार" असे आपण म्हणू शकतो.

उदाहरणार्थ कस्तूरीमृग - याच्याबद्दल आधारसामग्री उपलब्ध आहे. नराच्या कस्तूरीच्या पसरणार्‍या गंधामुळे नर-मादींच्या भेटीचे कार्य उत्तम तर्‍हेने होत होते. याच कस्तूरीच्या गंधामुळे शिकार्‍यांशीच जेव्हा या मृगाच्या भेटीगाठी वाढू लागल्या, तेव्हा परिस्थिती "फार" बदलली. कस्तूरी-इंद्रियामुळे भविष्यातील हेतू साधल्याचा आभास भंगतो.

- - -

वरील शब्दखेळाचा प्रयोग मर्यादित आवाक्याचा आहे. तरी जितपत तर्क ठामपणे निघू शकतात तितके मी सांगितलेले आहेत. त्या तर्कांमधून काही लोकप्रवादांचे खंडन होते. एका लोकप्रवादाप्रमाणे "कुठलाच साहाय्यक-अवयवीभाव उद्भवू शकणार नाही" असा तर्क केला जातो. तो प्रवाद सुदृढपणे खोडला जातो. दुसरा लोकप्रवाद आहे की "कुठलाही साहाय्यक-अवयवीभाव दिसला, तर तो परिपूर्णतेकडे जाणाराच असतो." हा प्रवादही सुदृढपणे खोडला जातो.

मानवाच्या किंवा अन्य कुठल्या प्राण्याच्या अमुक अवयवाबद्दल किंवा तमुक स्वभावाबद्दल चर्चा करायची असेल, तर मानववंशशास्त्रातली, जीवशास्त्रातील मूळ आधारसामग्री वापरणे आवश्यक आहे.

- - -

स्वयंप्रज्ञा असलेली जनुके न जिंकण्याचे तेच कारण असते ना?

स्वयंप्रज्ञा असलेली जनुके जिंकली आहेत की हरली आहेत त्या मुदलाबद्दल मला काहीच माहिती नाही. त्यामुळे "न-जिंकण्याचे कारण" वगैरे व्याज कल्पनांबद्दल तर मी पूर्णपणे गांगारलेलो आहे.

(१) "स्वयंप्रज्ञा" नेमका काय प्रकार आहे, तो प्रकार कसा मोजावा-जोखावा, हे मला माहीत नाही.
(२) "तात्कालिक फायदा", "भविष्यकाळातील हेतू" वगैरे मोजताना काळाची इयत्ता ("टाइम-स्केल" या अर्थी) साधारणपणे "दोन पिढींमधील काल-अंतर" अशी असते. "स्वयंप्रज्ञा" या स्वभावाच्या दूरदर्शित्वाची काल-इयत्ता याच्याशी कितपत मिळते-जुळते?

- - -
काल-इयत्ता आणि दूरदर्शिता : काही प्रौढ लोक दिवसभर काहीतरी व्यवसाय करतात आणि दिवसाच्या विशिष्ट वेळीच अन्न खातात. भूक लागली तरी खाण्याची वेळ पुढेमागे करतात. हे "दूर"दर्शित्व आहे. त्याची काल-इयत्ता तास-दिवस क्षेत्रातली आहे. तसेच कित्येक आईवडील मुलांची काळजी घेताना स्वतःच्या गरजांकडे थोडेसे दुर्लक्ष करतात. ही सुद्धा दशक क्षेत्रातली दूरदर्शिता आहे. सध्या मनुष्याच्या जनकत्वाची काल-इयत्ता वर्ष-दशक क्षेत्रातली आहे, आणि जीवन-मरणाची काल-इयत्ता दशक-शतक क्षेत्रातली आहे. वेगवेगळ्या दूरदर्शित्वाचे प्रजननासाठी कमीअधिक फायदे असतात. म्हणून काल-इयत्तेकडे दुर्लक्ष करून "दूरदर्शित्वा"बद्दल तर्क चालवणे योग्य नव्हे.

- - -

स्वयंप्रज्ञा असलेली जनुके : येथे बहुधा "प्राण्याला अधिक स्वयंप्रज्ञ बनवणारी जनुके" असे म्हणायचे आहे. कारण प्राण्याच्या अन्य जनुकांशी बद्ध नसलेली जनुके (त्यांच्यावर भावनेचा आरोप केला तर ही जनुके अन्य जनुकसमूहाबद्दल उदासीन असतात, "स्वयंप्रज्ञ" असतात) म्हणजे कित्येक विषाणू, किंवा पुनःपुनरावृत्त लघुजनुके (शॉर्ट टँडम रिपीट डी.एन.ए) ही बरीच टिकाऊ असतात.
प्राण्याला स्वयंप्रज्ञ बनवणारी जनुके म्हणजे नक्की काय असते? हल्लीच्या एका चर्चेत असे काही वर्नन होते, की यामुळे प्राणी अधिक एकाकी होतात.

मनुष्येतर वानर (इंग्रजीमध्ये "एप" म्हणायचे आहे) - या सर्वांचा पूर्वज एकच होता. (मनुष्यांचाही.) पण त्यांच्यापैकी ओरांग-उटान एकाकी राहातो, तर अन्य वानरजाती वेगवेगळ्या प्रकारच्या टोळ्या करून राहातात, टोळीने शिकार करतात. (बहुपत्नीत्व, बहुपतीत्व वगैरे वेगवेगळे प्रकार). जर "स्वयंप्रज्ञ=एकाकी स्वतंत्र" असे असेल, तर अशा तर्‍हेची उत्क्रांती झालेली उदाहरणे आपल्याला मानव-वानर वंशातच दिसतात. मग "एकाकी व्यक्ती मरून निर्वंश होतील" अशा कल्पनारम्य तर्काला काही जागा नाही.

- - -
स्वयंप्रज्ञ-दूरदर्शी हा संबंध
स्वयंप्रज्ञ प्राणी हा अस्वयंप्रज्ञ प्राण्यापेक्षा अधिक दूरदर्शी असतो, अशी काही "स्वयंप्रज्ञ" शब्दाची व्याख्या आहे काय? मग "स्वयं+प्रज्ञ" हा सामासिक शब्द नाहक गोंधळात टाकणारा आहे. स्वतःच्या मतीने निर्णय घेणे दूरदर्शी असते, की दुसर्‍या कुठल्या कारणाने निर्णय घेणारा दूरदर्शी असतो, हे मला माहीत नाही.
दूरदर्शी प्राणी मरून निर्वंश होतात, असे काही म्हणणे आहे काय? शक्य आहे. दूरदर्शितेची काल-इयत्ता प्रजननाच्या काल-इयत्तेपेक्षा, जीवनमरणाच्या काल-इयत्तेपेक्षा लांब असली, तर असे प्राणी कदाचित निर्वंश होतील. (म्हणजे शंभर वर्षांनी पूर येणार म्हणून आजच वाळवंटात जाऊन तडफडून एखादा प्राणी मरेल.) पण हे सर्व कल्पनेचे खेळ आहे. वास्तवातील मनुष्यवंशशास्त्राशी, किंवा जीवशास्त्राशी यांचा संबंध दाखवण्यासाठी मनुष्यवंशांचा अभ्यास, किंवा अश्मजीवशास्त्राचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. (असे मनुष्य होते, आणि ते मेले असे अवशेष सापडले, तरच असा तर्क कल्पनारम्यतेमधून विज्ञानामध्ये परिवर्तित होतो.)

विषयांतराबद्दल क्षमस्व

दूरदर्शीपणा असला तरी स्वयंप्रज्ञा नसेल तर प्राणी इतरांसोबत जाऊन तोटा (कमी फायदा) स्वीकारेल. त्यामुळे त्याची प्रजननक्षमता घटेल की वाढेल ते परिस्थितीवर ठरेल.
टाईम-स्केलविषयक स्पष्टीकरण आवडले.

खरेच

प्रयोग झकासच आहे.
विसुनानांशी सहमत आहे.

निर्हेतुक बदल + वर्तमानकालिक कार्य साधणारी खरोखरची निवड => भविष्यातील हेतू साधल्याचा आभास

या प्रमाणे जैवीक प्रगती निर्हेतुक असेल तर अण्णांचे नशीबाविषयी जे म्हणणे आहे ते योग्य आहे का?
म्हणजे माकडातून माणूस झालो, पण हत्तीतून हाणूस झालो नाही,
याला कारण फक्त त्याकाळी सहजतेने जुळत गेलेल्या प्रगतीच्या जोड्या इतकेच?
की उत्क्रांती अशी काही होतच नाहीये?
की निव्वळ अपघातानी चाललेली आणि मग पुढे सुरु राहिलेली ही एक रासायनिक प्रक्रीया आहे?

कुणी सोप्या रीतीने सांगू शकेल का?

(की माझे विचार करण्यातच मूलतः काही चुकते आहे?)

आपला
गुंडोपंत

(धनंजयने दिलेला - मानवाच्या किंवा अन्य कुठल्या प्राण्याच्या अमुक अवयवाबद्दल किंवा तमुक स्वभावाबद्दल चर्चा करायची असेल, तर मानववंशशास्त्रातली, जीवशास्त्रातील मूळ आधारसामग्री वापरणे आवश्यक आहे.
हा डिस्क्लेमर लक्षात आहे!)

पुढे

>>की निव्वळ अपघातानी चाललेली आणि मग पुढे सुरु राहिलेली ही एक रासायनिक प्रक्रीया आहे?

यातला अपघाताने चाललेली हा भाग बरोबर. 'पुढे सुरू राहिलेली' यात पुन्हा हेतू असल्याचा आरोप नसेल तर तेही बरोबर. म्हणजे 'पुढे' या शब्दाचा देअरआफ्टर असा अर्थ आहे- फॉरवर्ड असा दिशादर्शक नाही हे लक्षात असणे आवश्यक.

(स्वगतः ही संकल्पना मला हल्लीच म्हणजे घासकडवींची मालिका वाचल्यावरच क्लिअर झाली आहे.... मी त्यावर अधिकारवाणीने का बोलत आहे?)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

दिशाच

पुढे सुरु राहिलेली या मध्ये पुढे जाणे किंवा प्रगत होणे अशा अर्थाने मी म्हणालो नाही. वरील रिकामटेकडा यांच्या प्रतिसादातून स्पष्ट झाल्याप्रमाणे 'पुढे जाणे' हा प्रकिया पाहिल्यावर होणारा एक आभास आहे. तेव्हा या विचारासाठी आपण एकाच नावेत आहोत असे वाटते.

आता या कल्पनेला दिशाच नसल्याने काय फॉरवर्ड आणि काय बॅकवर्ड उरतेय?

सगळे 'असणे' जर 'अपघात' किंवा निव्वळ रसायनाने घडलेली घटना (मालिका) म्हणूनच असेल तर अण्णांच्या नशीब या कल्पनेवर उतरण्याशिवाय उत्क्रांतीवादाला (किंवा खरे तर त्या वादाच्या कल्पनेला - विचाराला) पर्याय नाही?

यावर अजून विस्तृत स्वरूपात पण सोप्या भाषेत मते आली तर आवडेल.
कारण मला अजूनही शंका येतेय की मला हे कळलेच नाहीये.

आपला
गुंडोपंत

प्रगती

जर परिस्थिती बदलली नाही तर उत्क्रांतीमुळे बनलेले नवे प्राणी त्या परिस्थितीत अधिकाधिक यशस्वी होतील. म्हणजेच एका आदर्श शरीररचनेच्या दिशेने खरोखरीच पुढे जातील. अशा प्राण्यांना त्या परिस्थितीसापेक्ष 'प्रगत' म्हणण्यास मी तयार आहे.

पण

पण धनंजय म्हणतो की,

जैव उत्क्रांतीमध्ये "भौतिक-रासायनिक पिंडांचा आपोआप नाश होण्यापूर्वीचे प्रजनन" ही वर्तमानकालिक कार्य साधणारी निवडप्रक्रिया आहे. निर्हेतुक अवयवबदलांना या निवडीची जोड मिळाली की त्यातून भविष्यातला हेतू साधल्याचा आभास होतो. येथेसुद्धा निवड यादृच्छिक केली (म्हणजे "न समजणार्‍या भाषेतली निवड" असा विचार चरमार्थाने घेतल्यास) उत्क्रांती अशी काही होणार नाही.

येथे आभास होतो हे महत्त्वाचे ठरते. म्हणजे तशी उत्क्रांती होतच नाही.

याच वेळी तुम्ही 'परिस्थिती बदलली नाही तर उत्क्रांतीमुळे बनलेले नवे प्राणी त्या परिस्थितीत अधिकाधिक यशस्वी होतील' या गृहीतकावर आधारीत म्हणत आहात का? मग सापेक्ष रीतीने विचार केला तर मलाही तुमचे मत पटू शकते.

पण त्याला 'प्रगतीच' म्हणायचे का, या विषयी मतांतर असू शकते.

आपला
गुंडोपंत

अविचल म्हणजे यादृच्छिक नसलेली

"यादृच्छिक परिस्थितीत उत्क्रांती होणार नाही" हा सुलभीकृत दावा आहे. नेमके वाक्य असे हवे की "यादृच्छिक परिस्थितीत दर पिढीला एका वेगळ्याच गुणधर्माच्या प्राण्याची प्रजननक्षमता वाढेल आणि अनेक पिढ्यांनंतर निरीक्षण केल्यास अपेक्षा (expected value) ही असेल की भिन्न भिन्न गुणधर्माच्या प्राण्यांचे तौलनिक प्रमाण मूळचेच येईल.". (ब्राउनियन हालचालीप्रमाणेच) निरीक्षण जितके अधिक पिढ्यांनी केले जाईल तितकी अशी शक्यता वाढते की प्रमाण मूळचेच न राहता वेगळे सापडेल. परंतु 'अपेक्षित प्रमाण' कायम तेच राहील कारण प्रमाणातील बदल सममितीने (सिमेट्री) होण्याचे गृहीतक आहे.

भाषा समजणारे मतदार, किंवा स्थिर परिस्थिती मात्र खरीच उत्क्रांती (अनेक पिढ्यांनंतरही टिकणारे प्रमाणबदल) घडवून आणतात. जोवर परिस्थितीचा रेटा एकाच दिशेला कायम राहतो तोवर अशा प्राण्यांना 'परिस्थितीसापेक्ष प्रगत' म्हणावे असा माझा युक्तिवाद आहे. व्याख्या स्वयंसिद्ध वाटते कारण ती तशीच आहे. पॉपरचे मेटॅफिजिकल रिसर्च प्रोग्रॅमविषयक युक्तिवाद त्याने नंतर उत्क्रांतीविषयात मागे का घेतले ते मला समजत नाही.

थोडे खोलात जावे लागेल

गुंडोपंतांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जरा खोलात जावे लागेल.

म्हणजे माकडातून माणूस झालो, पण हत्तीतून हाणूस झालो नाही,

या वाक्यात अनपेक्षित संदिग्धपणा आहे. चर्चेतील कल्पनांची जोडणी नाविन्यपूर्ण आहे. म्हणून कल्पनांसाठी वापरलेल्या शब्दांमध्ये नेमकेपणा असणे बरे.

कुटुंबांच्या वंशावळीत असा नेमकेपणा आपल्याला सहज समजतो, म्हणून एका वंशावळीचे उदाहरण वापरतो.

माझ्या स्वतःच्या वंशावळीत मागे एकदा एका पूर्वजाने आडनाव बदलून व्यवसायाचेच नाव आडनाव म्हणून घेतले होते. त्या जनरीतीचा थोडा जास्तच वापर करून मी पुढील पुरुष-वंशावळीचे उदाहरण देत आहे.

----------------------
विश्वंभर भट
--------------------------|
---------|--------------------------------------|
-----अंजनीसुत हणमंते----------------------धरणीधर भट
---------|--------------------------------------|
--|----------------|-----------------|---------------------|
नरेश मानव-----कपीश हणमंते--------वराहमिहिर भट----------गजानन भट

येथे पूर्वीच्या "अंजनीसुत हणमंते" याच्यापासून "नरेश मानव" उपजला आहे.
"हणमंत्यांच्या वंशात मानव आडनावाचे लोक उद्भवतात" असे जर म्हटले, तर जरा संदिग्धता येते. म्हणजे काय कपीश हणमंत्याच्या अपत्यांत कोणी "मानव" निघणार आहे?
तर नाही. कपीश हणमंते आणि नरेश मानव यांच्यापैकी कोणीही एकमेकांची अपत्ये नव्हेत. आणि दोघेही "अंजनीसुत हणमंते" यांची अपत्ये आहेत.

("माकडातून माणूस झालो" या गुंडोपंतांच्या वाक्यात ही संदिग्धता नसावी म्हणून हे स्पष्टीकरण.)

त्याच प्रमाणे गजानन भटांच्या अपत्यांपैकीसुद्धा कोणी नरेश मानव (किंवा भानव) निघेल अशी कल्पना आपण करत नाही.
("हत्तीमधून हाणूस [?माणूस] झालो नाही" हे गुंडोपंतांचे वाक्य, अशा तर्‍हेने बघावे.)

नरेश आणि कपीश बंधू आहेत, तर नरेश आणि गजानन चुलतबंधू आहेत.
नरेश आणि कपीश दोघे अंजनीसुत यांचे वंशज आहेत, पण धरणीधर यांचे वंशज नाहीत.
गजानन हे धरणीधर यांचे वंशज आहेत, पण अंजनीसुत यांचे वंशज नाहीत.
नरेश, कपीश, वराहमिहिर आणि गजानन हे सर्व विश्वंभर यांचे वंशज आहेत.

संदिग्धता टाळण्यासाठी गुंडोपंत यांचे वाक्य असे लिहिले तर चालेल का?
हल्लीचा माणूस आणि हल्लीचे माकड हे दोन्ही एकाच द्विपद-पूर्वजाचे वेगवेगळे वंशज आहेत, पण हल्लीचा हत्ती हा त्या द्विपद-पूर्वजाचा वंशज नाही. हल्लीचा हत्ती त्या पूर्वकाळातल्या एका शुंडदंती-पूर्वजाचा वंशज आहे, पण हल्लीचे माणूस व माकड या शुंडदंती पूर्वजाचे वंशज नव्हेत. हल्लीचे माणूस, माकड, हत्ती हे सर्व अतिपूर्वकाळातल्या एका सस्तन-अतिपूर्वजाजे वंशज आहेत. (कारण) द्विपद-पूर्वज आणि शुंडदंती-पूर्वज हे त्या सस्तन-अतिपूर्वजाच्याच वंशवृक्षाच्या शाखा होत. द्विपद-पूर्वजांच्या माणूसवंशजांपैकी एक "धनंजय" हा खुद्द "धनंजय"बद्दल उल्लेख करताना "मी" असा ध्वनी वापरतो. (यापुढचे थोडे कठिण आहे - गुंडोपंत मदत करतीलच.) शुंडदंती पूर्वजाच्या हत्तीवंशजांपैकी एक "अप्पू" हा खुद्द "अप्पू"बद्दल उल्लेख करताना "ही" असा ध्वनी वापरतो-वापरत नाही त्याचा "नशीब" संकल्पनेशी काही संबंध आहे. (???)

अजून गुंडोपंत यांच्या प्रश्नाचे उत्तर मी दिलेले नाही. त्याचे कारण की नशीब आणि उत्क्रांतींना जोडणारा विचारांचा दुवा मला नीट समजलेला नाही.
१. मी "धनंजय" माझ्या बापाचा पुत्र आहे आणि मी माझ्या चुलत्याचा पुत्र नाही.
२. माझा चुलतभाऊ माझ्या चुलत्याचा पुत्र आहे, आणि तो माझ्या बापाचा पुत्र नाही.
३. माझ्या आई-बापांचे दोघांचे डोळे काळे आहेत, आणि माझेही डोळे काळे आहेत.
४. माझ्या चुलत्याचे डोळे भुरे आहेत, चुलतीले निळे आहेत, चुलतभावाचे घारे आहेत.

वरीलपैकी वाक्ये १ व २ वंशावळीतल्या नावांबद्दल आहे - त्यालाच "नशीब" म्हणतात का? मला माहीत नाही. मी अमुक एकाच पुरुषाचा औरस पुत्र आहे, वेगळ्या कुठल्याही पुरुषाचा औरस पुत्र नाही - या स्थितीपेक्षा वेगळी स्थिती मला आकळत सुद्धा नाही. "सर्व पुरुष कुठल्या-ना-कुठल्या एकाच पुरुषाचे पुत्र असतात" असा सामान्य नियम सांगता येतो. मात्र अमुक विवक्षित नाव असलेला "धनंजय" जगातील सर्व पुरुषांचा पुत्र नसून कोण्या एकाच विवक्षित पुरुषाचा औरस पुत्र आहे - या तपशिलाला "नशीब" असे नाव देऊन ज्ञानात काय भर पडली? शब्दकोशात शब्द वाढला. पण "अमुक विवक्षित पुत्राचा तमुक विवक्षित बाप" या आधीच माहीत असलेल्या तपशिलाहून अधिक काहीही कळलेले नाही.
वरीलपैकी वाक्ये ३ व ४ वंशगत शरिरावयवांबद्दल आहेत, आणि त्यांच्याबद्दल काही जीवशास्त्रीय कार्यकारणभाव सांगता येतो. अन्य कुठल्याही आईवडलांच्या डोळ्यांच्या रंगावरून पुत्राच्या डोळ्यांबाबत संभवनीयता सांगता येते. त्यामुळे आदल्या तपशिलापेक्षा वेगळे, भाकिते करून तपासण्यायोग्य ज्ञान मिळते.

बर्‍याच प्रमाणात वंशपरंपरेने येणार्‍या, पण काही प्रमाणात यादृच्छिक फरकाच्या कार्यक्षम निवडीमुळे बदलणार्‍या अवयवधर्मांबाबत "उत्क्रांतीचे" तत्त्व आणि गणित आहे. यात भाकिते असतात, आणि ती तपासता येतात. मात्र द्विपदपूर्वजाचा वंशज मानव पण शुंडदंती पूर्वजाचा वंशज मानव नाही, या तपशिलाला "नशीब" हे नाव दिले, तर केवळ शब्दकोशातला एक शब्द वाढतो. आधीच माहीत असल्याल्या वंशावळीच्या तपशिलावेगळे नवीन कुठलेच ज्ञान मिळत नाही.

नशीब शब्दाचा अर्थ काही लोक "विधिलिखित" किंवा "पूर्वनियोजित पश्चात्स्थिती" असा लावतात. तो तर येथे गुंडोपंतांना अपेक्षित नाही. कारण "पूर्वनियोजन नाही" असेच काही त्यांचे मत दिसते. शिवाय या प्रयोगातही "पूर्वनियोजन नाही" असाच निष्कर्ष निरीक्षणामधून कळतो आहे.

मी अजून उत्तर दिलेले नाही, हे मलाच दिसते आहे. पण प्रश्नाबद्दल वाटणारी संदिग्धता समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती संदिग्धता दूर करून गुंडोपंत त्यांचा प्रश्न पुन्हा समजावून सांगतील काय?

काल

(धांदरटपणे विधाने कारायची सवय जात नाही. शिवाय उत्सुकता!)

मला वाटते की यात मी काल पण किती गृहीत धरला आहे हे आधीच स्पष्ट करायला हवे होते.

येथे माझ्या मनात अनादी कालापासून (म्हणजे जीव बनण्याची सुरुवात झाली या क्षणापासून म्हणावे का?) असे गृहीतक होते. धनंजयने मागितलेले स्पष्टीकरण कसे मांडावे या विचार करतांना ही मुळ विचारात न नोंदवलेली ही तृटी माझ्या लक्षात आली.

आता माकडापासून माणूस आणि हत्तीपासून हाणूस या कल्पने विषयी -

जीवांची सुरुवात
|
|
द्विपाद प्राणी चतुष्पादांपासून वेगळे व्हायला एक(?) जैवीक जुळणी (अपघाती?)
|
|
|-शुंड दंती किंवा हत्तींची सुरुवात तसेच वानरांचीची सुरुवात
|
|
०|० वेगळे व्हायला एक(?) जैवीक जुळणी (अपघाती?)
|
|
*|* अजून अनेक वेगवेगळ्या अनैच्छिक जैवीक जुळण्या
|
|- उत्क्रांत होत सध्याचा माणूस
|

याच वेळी जेथे ०|० ही खुण आहे तेथे जर काही वेगळे घडले असते तर शुंडदंती आणि वानरांची सुरुवात 'वेगळी' [येथे वेगळी म्हणजे 'पुढे' जाणारी उत्क्रांती असे नाही (कारण पुढे म्हणजे कुठे याला उत्तरच नाही - म्हणजेच दिशाहीन)] झाली असती. आणि तेथून (कदाचित जर शुंडदंती जीवांच्या बाबतीत काही जैवीकजुळण्या झाल्या असत्या तर) 'हा'णूस या वंशजाची सुरुवात झाली असती. तसेच *|* येथे काही अजून वेगळे घडले असते तर सद्य माणूस वंशजाचे स्वरूप वेगळे असले असते (हे वाक्य या आधी धरलेले वरील सर्व विवेचन बरोबर असेल, तर असा माझा कयास/अंदाज.) [टीप: |___| ही रेषा कालरेषा मानावी. ]

मानवी स्वरूपात आलेल्या प्राण्यांच्या घडण्याला निव्वळ एक अपघात हेच कारण असेल तर 'नशीब'* होते म्हणून सुरुवात झाली. नसते तर सुरुवात झालीच नसती असे विधान मांडायचे आहे.

*आता नशीब - नशीब हा शब्द येथे खरा योग्य नाही असे म्हणता येते, कारण सहज(?) अनैच्छिकरीतीने(?) घडलेल्या प्रयोगाला काय म्हणावे?
'पूर्वनियोजन नाही' हे बरोबर याच अर्थाने संधी म्हणून* त्यासारखा दुसरा शब्द मलाही मिळाला नाही.
*(संधीही म्हणता येत नाही कारण संधी मध्ये प्रगतीचे गृहीतक धरल्याचा भास आहे - येथे ते अपेक्षित नाही)
या पुढे जाऊन 'प्रगती' या दृष्टीकोनातून कोणतेही कारण न देता, [तसेच कोणत्याही प्रकारे भासमान रीतीने येणार्‍या दिसून येणार्‍या परिणांना बाजूला करून पाहतांना] घडलेल्या रासायनिक क्रियांमुळे जी काही सद्य निर्मिती आहे, त्याला कोणतेही कारण जर देता येत नसेल तसेच अनाकलनीय घटनांच्या सकारण भासणार्‍या मांडणीमुळे जे दिसून येते त्याला तर त्याला नशीब असे येथे म्हंटले आहे.

आशा आहे की आता मी येथे कल्पना व्यवस्थित उलगडून सांगू शकलो आहे.

[याच वेळी अजूनही मला उत्क्रांतीवादाचा या प्रयोगातील मुळ विचार बरोबर समजला/तो आहे की नाही विषयी मी साशंक आहे.]

विस्तृत उदाहरणामुळे माझ्या विचारातला महत्त्व असलेला भाग गाळला गेला ते मात्र कळले.

आपला
गुंडोपंत

इतिहास वेगळा असता, तर सद्यस्थिती वेगळी असती - बरोबर

याच वेळी जेथे ०|० ही खुण आहे तेथे जर काही वेगळे घडले असते तर शुंडदंती आणि वानरांची सुरुवात 'वेगळी' [येथे वेगळी म्हणजे 'पुढे' जाणारी उत्क्रांती असे नाही (कारण पुढे म्हणजे कुठे याला उत्तरच नाही - म्हणजेच दिशाहीन)] झाली असती.

इतिहास वेगळा असता तर सद्यस्थिती वेगळी असती, बरोबर.
माझ्या आईची एक बहीण बालवयात मरण पावली. (अधोरेखित वाक्य सत्य आहे, पुढील वाक्ये जर-तरच्या कल्पना :) तिला त्या जंतूची लागण झाली नसती, तर ती कदाचित मोठ्या वयापर्यंत जिवंत राहिली असती, तिला कदाचित मुले असती. माझ्या आईला मीच झालो असतो, तर मला त्या मावशीची औरस मावसभावंडे असती. कदाचित माझ्या आईला लहानपणी फार आजार झाला असता, आणि त्यामुळे तिला मुले झाली नसती, तर मी (लिहिणारा) अस्तित्वात नसतो. त्या "मावशी"ची पुत्री कदाचित जिवंत असती आणि मराठी संस्थाळावर लिहीत असती. किंवा मराठी पूर्णतः विसरून तमिळ लिहीत असती. शक्यतांच्या संवादी-विसंवादी शाखांना अंत नाही.

"वंशाचा इतिहास वेगळा असता तर" या प्रास्ताविक गृहीतकानंतर वंशाच्या सद्यस्थितीबद्दल काही तर्कार्ध करणे तसे रोचक असले, तरी वंध्य असते. कारण जो काही युक्तिवाद करू त्याच्या नंतर - "पण इतिहास वेगळा घडला नाही" असा तर्काचा द्वितीयार्ध सांगितल्यामुळे हल्लीची स्थितीच पुन्हा सिद्ध होते.

आणि तेथून (कदाचित जर शुंडदंती जीवांच्या बाबतीत काही जैवीकजुळण्या झाल्या असत्या तर) 'हा'णूस या वंशजाची सुरुवात झाली असती. तसेच *|* येथे काही अजून वेगळे घडले असते तर सद्य माणूस वंशजाचे स्वरूप वेगळे असले असते

हा वरील तर्काचा पूर्वार्ध होय.
माझ्या आईची बहीण ०|० येथे मरण पावली नसती, आणि उलट माझी आई जायबंदी झाली असती, तर माझ्या आईच्या लग्नाच्या आडनावाच्या वंशाऐवजी त्या मावशीचे जे काय लग्नानंतरचे आडनाव असते - "हाणूस", त्या आडनावाचा वंश चालू असता." तसेच *|* या ठिकाणी माझ्या आईवडलांच्या मीलनाच्या काळात काही वर्षांचा फरक झाला असता, तर त्यातून उपजलेला "मनंजय" वंशज हल्ली जो "धनंजय" आहे, त्याच्याशी काही साम्य असूनही काहीसा वेगळा असता.

"अपघात"/"नशीब"/"यदृच्छा" :
या शब्दांमध्ये बहुधा काहीतरी साम्य आहे. मात्र त्यांच्यात भावना-आशय वेगवेगळा आहे असे मला वाटते. त्यातल्या त्यात "यदृच्छा" शब्दामध्ये भावनेचा आशय कमीतकमी आहे. ("अप"घात मधील "अप" उपसर्ग अशुभसंकेती आहे. "नशीब" मध्ये "अज्ञात पण तरी विधिनिश्चित"चा सांस्कृतिक संदर्भ आहे. "यदृच्छा" मध्ये तसे भावनिक संदर्भ आणि अर्थवलये नाहीत.)

मानवी स्वरूपात आलेल्या प्राण्यांच्या घडण्याला निव्वळ एक अपघात हे कारण असेल

"निव्वळ एक" आणि "हे", हे बरोबर नाही. अनेक जीव-वृक्षाच्या खोडाला अनेक फांद्या यादृच्छिक उपजल्या. आणि त्या फांद्यांपैकी एक ही सद्यस्वरूपातला मानव आहे. पण त्या अनेकांपैकी ही फांदी टिकण्याचे कारण "निसर्गात टिकण्याची विवक्षित निवड" होय. "निसर्गात टिकण्याची निवड" नसती, तर यदृच्छेतून काही साध्य होत नाही - त्यामुळे "निव्वळ एक यदृच्छा" हे एक कारण नाही.

उदाहरणार्थ दोन काचपात्रांमध्ये जीवाणूंचा पैदास करणारी द्रावणे घेऊया. पहिल्यामध्ये "क्ष" प्रतिजैविक (अँटिबायोटिक) अगदी कमजोर मात्रेत घालूया, तर दुसर्‍या काचपात्रात "य" हे वेगळेच प्रतिजैविक अगदी कमजोर मात्रेत घालूया.
"क्ष" प्रतिजैविकाच्या (अँटिबायोटिकच्या) कमजोर द्रावणात जीवाणूंची (बॅक्टेरियाची) उपज केल्यास काही पिढ्यांच्या नंतर त्या "क्ष" प्रतिजैविकाला निष्प्रभ करणारी जीवाणू संतती टिकलेली दिसून येते. "य" प्रतिजैविकाच्या द्रावणात जीवाणूंची पैदास केल्यास "य" प्रतिजैविकाला निष्प्रभ करणारी जीवाणू संतती टिकलेली दिसून येते.
"क्ष" प्रतिजैविकाच्या द्रावणात "निव्वळ एकाच यादृच्छिक बदलामुळे" त्या वेगळ्या "य"विरोधी जीवाणूंचा वंश दिसत नाही. "क्ष" आणि "य"चा निर्बंध करणारे यादृच्छिक बदल पहिल्या "क्ष" आणि दुसर्‍या "य"च्या दोन्ही काचपात्रांत होतच असतात. तरी पहिल्या काचपात्रात "क्ष"विरोधी जीवाणूंची निवड होते - हा अपघात नाही. बदल यादृच्छिक असले, तरी निवड विवक्षित असते.

मानवी स्वरूपात आलेल्या प्राण्यांच्या घडण्याला निव्वळ एक अपघात हेच कारण असेल तर 'नशीब'* होते म्हणून सुरुवात झाली. नसते तर सुरुवात झालीच नसती असे विधान मांडायचे आहे.

हे बदलून
मानवी स्वरूपात आलेल्या प्राण्यांच्या घडण्याला निवडून येण्याइतपत मोठ्या प्रमाणात यादृच्छिक बदल आणि तशी निवड करणारी विवक्षित (यादृच्छिक नव्हे) परिस्थिती असेल तर या दोहोंमुळे* होते म्हणून सुरुवात झाली. अशी ऐतिहासिक प्रक्रिया नसती तर सद्यस्थिती दिसली नसती. असे विधान मांडायचे आहे.

असे करूया.
*"या दोहोंमुळे : दही आणि पोहे एकत्र करून दहीपोहे बनवतात. दही नसते, तर दहीपोहे बनवता येत नाहीत. पोहे नसले तर दहीपोहे वनवता येत नाहीत. "निव्वळ" आणि "एकच" हे शब्द त्यामुळे हवेत तितके नेमके नाहीत. "मोठ्या प्रमाणात यादृच्छिक बदल"+"विवक्षित परिस्थितीमुळे निवड" असे दोन्ही कारणस्वरूप आहेत. कुठल्याही एका घटकाशिवाय उत्क्रांती होत नाही.

अनाकलनीय घटनांच्या सकारण भासणार्‍या मांडणीमुळे

घटना अनाकलनीय नाहीत. कुठल्या रासायनिक प्रक्रियांमुळे जैव वंशसूत्रात बदल होऊ शकतात, त्या माहीत आहेत. "आकलनीय यादृच्छिक घटनांच्या तात्कालिक विवक्षित (?विवक्षित = सकारण?) निवडीमुळे भविष्यकालीन हेतूचा आभास झाल्यामुळे..."
"कारण" आणि "हेतू" यांच्यामधला आदलाबदल झाल्यामुळे विचारांची सरमिसळ होऊ देता कामा नये.

परिस्थिती

धनंजयच्या दोन बरण्यातल्या उदाहरणासारखेच एक उदाहरण घेतो. एका मचूळ पाणी असलेल्या विहिरीत मासे आहेत.अर्थातच त्या पाण्याची जी क्षारता आहे त्यात टिकण्याचा गुण त्यांच्यात आहेच. पण समुद्राएवढ्या खार्‍या पाण्यात राहण्याचा गुण आत्ता नाही तसेच क्षाररहित गोड्या पाण्यात राहण्याचा गुणही नाही. त्यांची जी पिल्ले होत आहेत त्यांच्यात यादृच्चिक बदलातून अशी पिल्ले तयार झाली आहेत की ज्यांना खारट पाण्यातही राहता येते. आणि काही पिले अशी आहेत की ज्यांना अगदी गोड्या पाण्यात पण राहता येते. पण एकदम खारट आणि एकदम गोड अशा दोन्ही पाण्यात राहण्याची कुणाचीच क्षमता नाही.

जोपर्यंत पाण्याची क्षारता स्थिर आहे (परिस्थिती बदलली नाही) तोवर तीनही प्रकारचे मासे टिकू शकतात.
आता जर पाण्याची क्षारता काही कारणाने वाढली तर गोडे पाणीवाले मासे नष्ट होतील. उलट झाले तर खारे पाणीवाले मासे नष्ट होतील. पश्चात बुद्धीने आपण म्हणू की खारे पाणीवाले मासे टिकले कारण त्यांना परिशितीशी जुळवून घेता आले.
(परिस्थितीशी जुळवून घेणे हा बहुधा चुकीचा वाक्प्रचार आहे). परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आहे म्हणून जनुकीय बदल होत नाहीत. बदल चुकूनच होतात. ते सुटेबल असले तर टिकून राहता येते नाहीतर नष्ट होणे हाच मार्ग असतो.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मस्त!!

गृहीतक परिचयाचे आहे, पण विशेष आहे ती त्याची सिद्धता! डाटा घेऊन सोदाहरण स्पष्ट केल्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन!! मस्त झालिये लेखमाला :)

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

 
^ वर