एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग १ - लेखनसार

(या लेखात सांगितलेल्या प्रयोगाचे बीज उपक्रमावरील एका चर्चेत उद्भवले. प्रयोग अन्य संकेतस्थळावर झालेला असला, तरी त्या प्रयोगाचे निष्कर्ष वाचण्यास उपक्रमावरील काही वाचकांना कुतूहल वाटेल. म्हणून निष्कर्ष येथेही प्रकाशित करतो आहे. हा लेख वैज्ञानिक मासिकात लिहावा तसा लिहिलेला आहे. लेखनसारामध्ये तांत्रिक बोजडपणा कमीतकमी ठेवला आहे. पुढील भाग मात्र काहीसे तांत्रिक आहेत, तपशीलवार आहेत.)

लेखनसार
प्रस्तावना : उत्क्रांतीचे (evolution) तत्त्व जीवशास्त्रज्ञ (biologist) वापरतात ही माहिती लोकप्रसिद्ध आहे. मात्र "उत्क्रांती म्हणजे हेतुसाधक आणि प्रगतिशील असे मूलतत्त्व आहे" या गैरसमजामुळे लोकांत उत्क्रांतीबद्दल काही अग्राह्य मते पसरलेली आहेत. जैव उत्क्रांतीच्या अभ्यासाचा आवाका अतिविस्तृत आहे. त्यामुळे येथे शब्दांच्या उत्क्रांतीचा एक प्रायोगिक खेळ खेळला. मिसळपावावरील वाचकांनी कौल देऊन त्यास तडीस नेले.
प्रयोगचौकट : खेळाच्या चौकटीमध्ये यादृच्छिक (random) शब्दयोजनेने वाक्ये बनवली गेली. खेळाडूंच्या निवडीने ती वाक्ये १० पिढ्यांपर्यंत उत्क्रांत झाली. चौकट पूर्णपणे मुक्तस्रोत आहे.
प्रयोग निष्पत्ती : (१) पहिल्या पिढीनंतर कौलातली पर्यायी वाक्ये एखाद्या-एखाद्या शब्दाच्याच फरकाची होती. असे असूनही निवड झालेली बहुतेक वाक्ये मोठ्या बहुमताने निवडून आली. यावरून असे दिसते की अर्थ आणि आस्वादाच्या बाबतीत खेळाडूंचे काहीतरी सूक्ष्म मत जुळत असावे. (२) खेळाडूंनी अनेक पर्यायांना अनेक पिढ्यांपर्यंत जसेच्या तसे निवडले, पण बहुतेक पर्यायांना (२६/३४) लगेच छाटले. (३) काही पर्यायांमध्ये अनेक फरक व्हायला खेळाडूंनी वाव दिला, तर अन्य पर्यायांच्या बाबतीत फरक न झालेले वाक्यच निवडले. (४) जे वाक्य दहाव्या पिढीत नि:शेष नाश पावले झाले, ते आदल्या काही पिढींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होते. (५) जिंकलेल्या वाक्याचे वाक्यार्ध परस्पर-आश्रित अलंकारिक होते.
भाष्य : या प्रयोगात यादृच्छिक शब्दयोजनेस अदूरदर्शी हेतूची जोड मिळाली. गुंतागुंतीचा अर्थ असलेले परस्पर-सहायक शब्दांचे वाक्य निर्माण झाले. काही मूलभूत तार्किक गैरसमजांचे या प्रयोगाने निरसन होते. जैव उत्क्रांतीच्या पुढील अभ्यासासाठी मात्र जीवशास्त्रातले प्रयोग आणि आधारसामग्री वापरणे आवश्यक आहे.

मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे
लेखाच्या भागांची अनुक्रमणिका दुव्यांसह खालील एका प्रतिसादात देणार आहे.

Comments

रोचक, वेगळी

फारच रोचक लेखमाला दिसते आहे.

मात्र "उत्क्रांती म्हणजे हेतुसाधक आणि प्रगतिशील असे मूलतत्त्व आहे" या गैरसमजामुळे लोकांत उत्क्रांतीबद्दल काही अग्राह्य मते पसरलेली आहेत.

चर्चा नकारात्मकरीत्या भरकटणार नसल्यास हे जाणून घ्यावेसे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहेतुक

याचे एक सोपे उदाहरण जिराफाची लांब मान हे आहे.
जिराफाची मान लांब झाली हे खरे असले तरी उंचावरची पाने खाण्यासाठी "मान लांब व्हायला हवी" अशी सहेतुक उत्क्रांती होत नाही. जनुकीय चुकांमध्ये काही प्राणी लांब मानेचे निर्माण झाले आणि ते टिकून राहिले कारण ती लांब मान फायदेशीर होती.

यात पुन्हा प्रथम थोडी लांब मान असलेले प्राणी निर्माण झाले असतील. त्यांनाही तुलनात्मक थोडा फायदा झाला असेल. पण "अरे वा !! लांब मानेचा फायदा आहे हां ! अजून लांब व्हायला हवी" अशा हेतूने पुढचे बदल झाले नाहीत.

त्याच प्रमाणे काही प्राणी आधीपेक्षा आखूड मानेचेही बनले असतील पण तेही टिकून राहिले असतील उदा हरणे. कमी लांबीच्या मानेच्या प्राण्यांचा संपूर्ण नाश असेही होत नाही. (सहेतुक असेल तर तसे व्हायला हवे. खरे तर सहेतुक उत्क्रांतीतताअता अमीबा निर्माणच व्हायला नकोत).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

धन्यवाद

धन्यवाद नितीनराव. छान सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. प्रास्ताविक कळण्यास मदत झाली.
धनंजय, प्रास्ताविकही वाचले. पुढच्या भागाकडे वळतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रश्न योग्य आहे

प्रश्न योग्य आहे, चर्चा नकारात्मक भरकटणार नाही. श्री. नितिन थत्ते यांनी वर स्पष्टीकरण दिलेलेच आहे. पुढच्या "प्रस्तावना" भागात हा मुद्दा अधिक तपशीलवार सांगितलेला आहे.

या गैरसमजुतीमधून उत्क्रांतीतत्त्वाचा विरोध आणि उत्क्रांतीतत्त्वाचा उदोउदो या दोन टोकांची मते ऐकायला मिळतात, त्या दोन्ही टोकांचे वर्णन "प्रस्तावना" भागात केलेले आहे.

 
^ वर