"रेड सन"

(हा लेख इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आहे. माझ्या लेखनाची शैली प्रामुख्याने ललित अंगाने जाते, त्यामुळे मी तो येथे प्रसिद्ध केला नव्हता. 'उपक्रम'चे सदस्य प्रकाश घाटपांडे मला म्हणाले, "हा लेख उपक्रमावरही यावा. इतर संकेतस्थळांवर नसणारे काही सदस्य केवळ उपक्रमावर आहेत. त्यांच्याही समोर लेख जावा, त्यावर चर्चा व्हावी." किंचित संपादन करून हा लेख उपक्रमाच्या बैठकीत बसवता येतो, असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यानुसार ललित अंगाने जाणारा थोडा मजकूर वगळून हा लेख प्रसिद्ध करत आहे. 'इतर संकेतस्थळांवर आधी प्रसिद्ध झालेला लेख' अशा स्वरूपाचा काही आक्षेप असेल तर संपादकांनी लेख अप्रसिद्ध करावा.)
***
नक्षलवाद. रेड कॉरिडॉर. माओवादी. चीन-नेपाळ. आदिवासी. विकास. दुर्गम प्रदेश. सलवा जुडूम. रोजची मृत्यूशी लढाई. क्रौर्य. काही आकडे, मेलेल्या माणसांचे.
साधारणपणे हे काही घटक, नक्षलवादाच्या प्रश्नाला घेऊन, एखादी जळजळीत घटना घडली की होणार्‍या चर्चेत येणारे. त्यापलीकडे, एखादा थोडंफार वाचन असणारा असेल तर, चारू मुझुमदार, कानू संन्याल अशी नावं त्यात येतात. यानंतर आणखी एक घटक असतो अशा चर्चेमध्ये - "मानवीहक्कवाले". बहुदा निषेधासाठीच त्यांचा उल्लेख होतो. एवढी आवर्तनं झाली की ही चर्चा संपते. चर्चा संपताना सरकारच्या नावे चार शिव्या घालून आपण सारेच मोकळे होत असतो. पुढच्या घटनेपर्यंत.
दर घटनेगणीक घडणार्‍या चर्चांच्या या गदारोळात ही समस्या गवसलेलीच नसते. समस्येचं मूळ कशात आहे हे तर लांबच असतं. आजकाल इंटरनेट असलं तरी, समस्येचं मूळ सापडेलच असं नाही. अशावेळी कामी येतात ते काही रिपोर्ताज. 'रेड सन' अशापैकीच एक.
पुस्तक हाती आलं, पहिला परिच्छेद वाचला आणि मग प्रदीर्घ काळानंतर असं काही अस्सल वाचत असल्याच्या आनंदाबरोबरच ही समस्या समजून घेण्याचा एक अस्सल स्रोत गवसल्याची समृद्धी मिळत जाते.
अस्सल पत्रकाराच्या लेखणीतून पुस्तकाचा आरंभ होतो. एका पहाटे. दंतेवाडात. तेच दंतेवाडा, ज्या जिल्ह्यात अलीकडंच एक मोठी घटना घडली. 'दंतेवाडात पहाटही थोडी ना-ना करतच येते. पहाट होतीये ती अर्धचंद्राच्या साक्षीनं. रात्रभराची थंडी आहे,' सुदीप चक्रवर्ती लिहित जातात, 'गाव छोटंच, एक मुख्य रस्ता असलेलं. जिल्ह्याचं केंद्र. जंगलाच्या अगदी परिघाला खेटून वसलेलं. अनेकांच्या लेखी गाव ओलांडलं की माणसाची वस्तीही संपलेली असते. (उरतं फक्त जंगल).'
सुदीप चक्रवर्ती मूळचे पत्रकार. प्रथितयश दैनिक, नियतकालिकातील मोठा अनुभव. आता पूर्ण लेखनकामाठी. साधारण २००६ च्या सुरवातीला त्यांनी या पुस्तकाचं काम सुरू केलं. आजच्या घडीला भारतात ज्याला रेड कॉरिडॉर म्हणतात, त्या प्रदेशाचा प्रवास आणि त्या-त्यावेळी टिपत गेलेली तथ्यं हे या पुस्तकाचं स्वरूप. त्यातून या समस्येचं त्यांना झालेलं आकलन ते पुस्तकात स्पष्टपणे मांडतात. त्यांच्याच शब्दांत (अनुवाद माझा),
"माओवाद हे सर्वांत गंभीर देशांतर्गत संकट/धोका नव्हे. दारिद्र्य, शासकीय अस्तित्त्वहीनता, अ-न्याय आणि भ्रष्टाचार हे देशांतर्गत गंभीर धोके आहेत. देशाच्या एक तृतियांश भागात माओवादी आहेत, हे एक देश म्हणून आपण अपयशी कसे ठरलो आहे याचेच प्रतिबिंब आहे. अनुदारपणे वागवली गेलेली, जीवनस्रोत, न्याय आणि देशाच्या घटनेत मांडलेले आदर्श संकल्पना नाकारलेली माणसे या चळवळीत आहेत. या माणसांचं नेतृत्त्व करणार्‍यांना हे पक्कं ठाऊक आहे की, देशातील सद्यस्थिती त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही, आणि यातूनच हिंसेच्या मार्गानेच परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या धारणेला बळ मिळतं."
चक्रवर्तींनी हे जे लिहिलं त्यातील शेवटच्या वाक्याच्या परिणामाशी सारेच सहमत होणार नाहीत. अगदी त्या भागांत फिरून, आपल्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिल्यानंतरही अनेक जण सहमत होणार नाहीत. पण त्याआधीची वस्तुस्थिती? ती कशी नाकारता येईल? कारण ती डोळ्यांत अंजन घालत असते तिथं गेल्यानंतर. मग ती ठसठशीत दिसू लागतेही. समजून घेतलीच पूर्ण तर फक्त अस्वस्थता डोक्यात घर करून राहते.
(माझी मतं इथं यासंदर्भात थोडी वेगळी आहेत: प्रश्न तसा साधाच असतो. एक रस्त्यापुरतं उदाहरण. काही वर्षं झाली, मी गावाला रस्ता असावा म्हणून भांडतोय. पण रस्ता होत नाही. आज मी राहतो तिथं भूगर्भात काही खनिजं आहेत हे समजल्यानंतर मात्र माझ्या गावात रस्ता येत असेल तर तो मी स्वीकारावा? स्वीकारला की मी बेघर होणार हे नक्की! कारण आत्ताच्या स्थितीत मला उठवणं शक्य नाही. रस्ताच नाहीये. कोण येणार आहे तिथं? खनिजं काढण्यासाठीही कोणी येणार नाही. त्यांना येण्यासाठी आधी रस्ता लागतोच लागतो. मी या रस्त्याला विरोध करायचा कसा? पन्नास वर्षे कागदी खेळणी खेळून झाली आहेत. आता मी कागदी खेळण्यानं खेळणार नाही. मी साधा-सरळ आहे. माझी रोजची लढाई मृत्यूशीच आहे. त्या लढाईची तीव्रता माझ्यासाठी वाढत नसतेच. वास्तवाचा हा एक भाग आहे. पण हेही खरं आहे की, माओवादी-नक्षलवादी यासाठी हिंसा करत नसतात. हिंसा हाच त्यांचा मार्ग असतो. त्यामुळं, हिंसेचं तत्त्वज्ञान करणारे नेमके कोण हे तपासायचं की वंचनेतून आलेल्या स्थितीमुळं या तत्वज्ञानाला बळी पडणार्‍यांनाही देशाचा मोठा अंतर्गत धोका समजून मारत सुटायचं? माझ्यातला मी जेव्हा या मीकडं पाहतो तेव्हा त्याची मतं स्वच्छ असतात. हाती शस्त्र घेतलेल्या या 'मी'ला मी दोष देऊ शकत नाही. आता अर्धं अंतर चालत जाणं ही इथल्या राज्यसंस्थेची जबाबदारी आहे, हे माझं मत असतं. पण त्याचवेळी हा 'मी' चुकतोय. हाती शस्त्र घेतल्यानं त्याचे प्रश्न थोडेच सुटणार आहेत, असंही मन बजावत असतंच. याला कन्फ्यूजन म्हणा, चालेल. पण हे असं आहे!)
पुस्तकात नकाशे आहेत, त्यावरून रेड कॉरिडॉर कसा विस्तारतोय हे कळतं. नेपाळचा प्रदीर्घ अनुभव आहे. माओवाद्यांच्या अर्बन पर्स्पेक्टिव्ह प्लॅनमधील काही तपशील आहेत. डोळ्यांसमोर एक भयचित्र उभे करणारे. लेखनाच्या ओघात जागोजागी इतर संदर्भ विखुरलेले आहेत. आकडेवारी आहे. अर्थात, या संदर्भांचा बाऊ केलेला नाही. त्याहीपेक्षा भर आहे तो अनुभवावर. मुख्य म्हणजे २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाची २००९ मध्ये सुधारित आवृत्ती करण्यात आली आहे. म्हणजेच, मधल्या काळाशी ते सुसंगत आहे.
या पुस्तकानं काही ठिकाणी मला अगदी सम-अनुभूती दिली. मी अशा अनेक संघर्षशील समुदायांत जात असतो. तिथं त्यांच्या अशा काही शिस्ती असतात. उजव्या हाताची मूठ बांधून तो उंचावत 'झिंदाबाद' म्हणणं ही अशीच एक. मधला शब्द बदलतो. 'झिंदाबाद'च्या ऐवजी 'लाल सलाम' येतं किंवा आणखी काही. चारू मुजुमदारांच्या मुलासमवेत ते चारूंचे एक कॉम्रेड पंजाबराव यांना भेटून येतात (पंजाबराव मूळचे महाराष्ट्रातील. सैन्यातील नोकरीनिमित्त तिकडं गेले आणि तिकडचेच झाले). त्या भेटीतून परतताना चक्रवर्ती त्यांना हात उंचावून लाल सलाम करतात. "एखाद्या नवागतासारखा मी तो करतो. आवाजात खंबीरपणा नाहीच. हात उंचावताना जडावलेला. आपल्याला अभिनयही जमत नाही. पण पंजाबराव (मनःपूर्वक) प्रतिसाद देतात तेव्हा मात्र एक विचित्र समाधान वाटतंच. या माणसाच्या गुरूचं चौतीस वर्षांपूर्वी निधन झालंय, पण आजही तो एक धर्म पाळत चालला आहे."
हे लेखन थोडं वेगळ्या जातकुळीचं आहे हे दाखवणाराच हा दाखला. अर्थात, चक्रवर्ती इथंच थांबत नाहीत. त्यांचे सासरेही पूर्वी सशस्त्र चळवळीत होते. सासर्‍यांची मुलाखत घेताना चक्रवर्ती थोडे 'दशमग्रह' झाले आहेत. तीच गोष्ट गदर यांची मुलाखत घेताना. कानू संन्यालांच्या मुलाखतीवेळीही थोडं तसंच. उलटे प्रश्न ते करतात. सौम्यपणे करतात. पण ठामपणे करतात. सारीच उत्तरं मिळत नाहीत. पण उत्तरं मिळावीत असे हे प्रश्नही आहेत हे पुरेसं असतं वाचकासाठी.
या कालखंडात आपल्या अनुभवातून, अभ्यासातून भविष्य कसं असेल याविषयी त्यांच्या काही कल्पना तयार झाल्या आहेत. तसेही ते फ्युचरिस्ट म्हणूनही काम करतातच. इन-लँड आणि आऊट-लँड ही त्यातील एक उपपत्ती. इन-लँड म्हणजे शहरं. जिथं सारं झगमगाटी आहे. सारं आहे. आऊट-लँड म्हणजे शहरांच्या बाहेरचा प्रदेश. तिथं असं काही नसतं. हे सारं भविष्यात भारतात होऊ घातलं आहे, असा त्यांचा इशारा आहे. इशारा असं म्हणायचं; कारण, या आऊट-लँडमध्ये त्या काळात अक्षरशः समुहागणीक 'हमारे गावमें हमारा राज'सारखी सरकारे असतील. पुढची कल्पना ज्याने-त्याने करावी.
लिहिताना, खरं तर हे अनुभव घेताना, सुदीप चक्रवर्तींमधला खेळकर पत्रकार जागा असतो. मग कालिम्पॉंगहून परतताना जीपमध्ये शेजारचा सहप्रवासी झोपेत जेव्हा सारखा आपल्यावर रोलू लागतो तेव्हा ते त्याच्या कानात 'माओवादी' हा शब्द कुजबुजून त्याची झोप उडवतात. हैदराबादच्या एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कॉन्फरन्सवेळी एडीबी-समर्थक आणि एडीबी-विरोधक तिथं जमलेले असतात. त्यांच्यात चक्रवर्ती तुलना करून साम्यस्थळं दाखवतात. हे सारं गंमतीचं नाही. वाचताना किंचित एन्जॉय करता येतं हे खरं, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या पद्धतीच्या लेखनातून या प्रश्नाचे वेगळे पैलूही समोर येतात.
लेखकानं कितीही म्हटलं तरी पुस्तकाचा फॉर्म प्रवासवर्णनाचा नाही. खचितच नाही. पण प्रवचनाचाही नाही. म्हणून हे लेखन मनात घर करत जात असावं. कारण पुस्तकात कुठंही कसलाही पवित्रा नाही. एकमेव, रामबाण मार्ग आपल्यालाच समजला आहे असले धडेही लेखकाने दिलेले नाहीत. उलट, माओवाद - नक्षलवादाच्या समस्येवरचे उत्तर साधे सरळ नाही ही त्याची जाणीव पक्की आहे. म्हणूनच तर काही तथ्यं वाचकांसमोर ठेवण्याचं आपलं काम लेखक प्रामाणिकपणे करत जातो. एकच दाखला आहे. लेखक स्वतः मणिपालच्या शैक्षणिक संस्थेत अभ्यागत शिक्षक आहे. तिथल्या बैठकीवेळीच त्या परिसरात कुठं तरी नक्षलवाद्यांकडून एका शिक्षकावर हल्ला होतो. त्याच काळात लेखक आपल्या परिचितांसह जेवण घेत असताना चर्चा सुरू असते. ही चर्चा दिल्लीच्या दिशेनं वळते आणि भ्रष्टाचार या राष्ट्रीय विषयाकडं येते. फाटकन त्यावर उपाय सांगितला जातो, साल्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे. असे रामबाण उपाय सांगण्यात मध्यमवर्गीय (आता येथे मध्यमवर्ग म्हणजे केवळ आर्थीक अंगाने नव्हे, मानसीक स्तरावरही हे वर्ग असतातच) पुढे असतोच. त्याचे गांभीर्य आपल्यालाही अनेकदा जाणवत नसते. माओवादी करतात ते काही वेगळे नाही. त्यांनी काही प्रश्नांवर हे असेच उपाय काढले आहेत याची चक्रवर्तींची जाणीव पक्की आहे. म्हणून त्या बैठकीत ते हे तथ्य सांगतात तेव्हा त्यांच्यावर बाजू उलटवण्याचा प्रयत्न होतो, "तुम्ही कम्युनिस्ट आहात का?" प्रश्नकर्ता एका वृत्तसंस्थेचा प्रमुख आणि त्या बैठकीचा अध्यक्ष आहे. चक्रवर्तींचं उत्तर अर्थातच, "नाही सर, मी पत्रकार आहे" हेच असतं. पण या विषयाकडं पाहण्याच्या या तटस्थ, समग्र दृष्टिकोनांचाही कसा संकोच होत चालला आहे हे त्या प्रश्नातून उघड झालं आहे हे नागडं सत्य असतं.
पुस्तक हाती आल्यानंतर काही दिवस गेले. पुस्तक वाचत होतो. प्रवासात सोबत हे पुस्तक असायचंच साथीला. असाच पुन्हा मुंबईत गेलो होतो. दुपारच्या सुमारास माझं काम संपवलं आणि मित्राच्या डेस्कवर गेलो. सहजच इंटरनेटवर बातम्या पहात असताना अंगावर आली ही बातमी - दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून ७५ सैनिकांची हत्या! मित्राशी बोलणं सुरू झालं. दोनेक दिवसांपूर्वीच गृहमंत्र्यांनी लालगढमधून केलेली वक्तव्यं आठवली. सलवा जुडूमच्या महेंद्र कर्मांची एक मुलाखत अलीकडेच वाचली होती, ती आठवली. या मित्राशी तो त्याच्या आणि मी माझ्या भूमिकेतून केलेले वाद आठवले. पण ते वरवरचं. मनात घर करून बसलं होतं ते हेच पुस्तक. कारण चक्रवर्ती लिहितात,
"प्रादेशिक अस्मिता, वांशीक अस्मिता, अगदी सामाजिक-आर्थिक अस्मिता हव्या असणार्‍या समुदायांचे प्रश्न आऱक्षणासारख्या प्रश्नांच्या तोडग्यातून निकाली काढता येतात. पण निखळ दारिद्र्य आणि वंचना यांच्याबाबत असे तोडगे नाहीत. तेथे भौगोलीक सीमाच नाहीत की ज्याविषयी एका मेजावर बसून चर्चा करता येईल. मग अशावेळी जिथं-कुठं सामाजिक असंतोष असेल तो आपल्यात सामावून घेण्याचा एककलमी कार्यक्रम लालसैनिक करत जातात. एका व्यवस्थेचा ते द्वेष करतात, पण त्यांच्याकडेही पर्याय नाही. हे म्हणजे अगदी, 'लोकांना सोसावं किंवा भोगावं लागतंय हे उत्तम. एके दिवशी ते जागे होतील आणि आम्ही जे सांगतोय ते त्यांना पटेल' असे म्हणण्यासारखेच आहे. फक्त या दरम्यान जनता सोसत किंवा भोगत राहते."
पुस्तकाच्या अखेरीला दंतेवाडाच्या पोलीस प्रमुखांनी कधी तरी 'हिंदुस्थान टाईम्स'ला सांगितलेलं वाक्य वाचकासमोर येतं, "मी नक्षलवाद्यांचा सामना करू शकतो, नक्षलवादाचा नाही. नक्षलवादाशी सामना विकासाच्या माध्यमातूनच करावा लागेल."
हे सारं वाचलं की कळतं, 'दंतेवाडा' ही एक घटना नाही. अशा आणखी घटना घडणार आहेत. निश्चितपणे घडणार आहेत. डोळे उघडे असतील, कान ऐकण्याच्या स्थितीत असतील तर अशा आणखी काही घटना नक्कीच घडणार आहेत, हे कळेल. पण...
या मधल्या आवाजांना कोणी प्रतिसाद देणार आहे का?
***
रेड सन - ट्रॅव्हल्स इन नक्षलाईट कंट्री
सुदीप चक्रवर्ती
पेंग्विन प्रकाशन, २००९.
पृष्ठे - ४०९.
मूल्य - ३५० रुपये

Comments

चांगली ओळख

या लेखाला ललित का म्हणावयाचे ? उत्तम माहिती देणारा लेख. आणखीही लिहा.
शरद

धन्यवाद

उत्तम पुस्तक परिचय व आनुषंगिक माहिती. श्रावण मोडकांचे लेख हा बर्‍याच दा रिपोर्ताज स्टाईलचा असतो. त्यांचे लेखन पाहिले कि हे विशेष करुन जाणवते. त्यांनी पत्रकारितेत अनेक वर्षे काढल्यानंतर तेथील काही मर्यादांमुळे अव्यक्त राहिलेली लेखणी अशा लेखनात मुक्त झालेली आढळते. कार्यकर्ता पत्रकार व निव्वळ व्यावसायिक पत्रकार यातील फरक इथे जाणवतो. उपक्रमावर सामाजिक विषयावरील पुस्तक परिचय व त्यानिमित्त होणारी चर्चा हा उपक्रमच मानला जातो. या पुर्वी अन्यत्र यावर चर्चा झाली आहे ती देखील चोखंदळ वाचकांना वाचता येईल.
प्रकाश घाटपांडे

स्वागत

उपक्रमावर स्वागत.
बाकी उपक्रमावर मराठीत माहितीपर यावे हे उद्दीष्ट आहे असे वाटते. अपवादात्मक परिस्थितीत इथे ललित अंगाने जाणारे लेखनही टिकून आहे.
आजी आजोबांच्या गोष्टी लिहिण्याआधी मलाही ही भिती होती. पण उपक्रमाने त्या लेखमालेला दूर करणे सोडाच, ते पुस्तक रूपाने बांधून ठेवले आहे.

तेव्हा लिहीत रहा.. तुमचा अनुभव इथल्या अनेक चर्चांद्वारे / लेखांद्वारे मांडा.. उपक्रमावरचे प्रतिसाद वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मिळतील याची खात्री बाळगा. :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

लिव्हित राव्हा

च्यामारी एकच पुस्तकाची वळख तिसर्‍यांदा वाचून राह्यलो.
बरं सांगाला कोण म्हणी तर ते घाटपांडे.
त्यायला बी एकच लेख सतरा ठिकाणी टाकाची सोवय. :-)

वरच्या पुस्तकात ललित लेखाच्या अंगाने जाणारं काय हाय
उमजले नाय ? नक्षलवाद हा काय नवीन इषय नाय.

देशात जोळपास ४० हजार नक्षलवादी हायेत.
आन पन्नास हजार सक्रीय कार्यकर्ते आन त्यायचे लक्षावधी समर्धक.
(पेपरात वाचलं व्हतं )
त्यायच्या समस्या, त्यायचे इचार, त्यायच्या द्वेष लय येगळ्या गोठी हायेत.
ते काय बूकातून समजणार हाय का ?

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

अनोळखी

माझ्यासाठी अनोळखी जगाची ओळख. धन्यवाद.

 
^ वर