धर्म-संकृती-जीवनपद्धती

धारयती इति धर्मः अशी धर्माची व्याख्या आहेच. पण प्रचलित व्याख्या मात्र 'रिलिजन' ह्या अर्थाने वापरली जाते. नक्की धर्माची व्याख्या कशी करावी?

हिंदू धर्मावर अथवा हिंदुत्वाची चिकित्सा करण्यचा कुणी प्रयत्न केल्यास हिंदूत्वाचे पाठीराखे लगेच हिंदू हा मूळात धर्मच नाही ती एक जीवन पद्धती आहे असा युक्तिवाद करताना दिसतात. मागे एका चर्चेत मलाही असे काही जणांनी प्रतिसादातून पिडले होते. हिंदू धर्मावर टीप्पणी करण्या अगोदर हिंदू म्हणजे कोण? त्याची व्याख्या काय? ते स्पष्ट करा असा हट्ट धरला होता. मी काही कुणी धर्म अभ्यासक नाही त्यामुळे ह्या व्याख्या मी तरी करू शकत नाही पण त्यासंदर्भात एक उत्कृष्ट अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळाला.

लेखाचा दुवा : http://nirmukta.com/2009/05/11/hinduism-religion-culture-or-way-of-life/

हिंदू हा धर्म आहे? संस्कृती आहे? जीवनपद्धती आहे? की नक्की काय आहे? ह्यावर स्पष्ट विचार मांडण्यात आलेले आहेत.

उपक्रमींची ह्यावर काय मते आहेत ते जाणून घ्यायला आवडेल.

Comments

उत्तम लेख

(खूप खोलवर वाचला नाही, पण नुसताच चाळ्ण्याच्या पलिकडे गेलो)
मला हा लेख विशेष आवडला याचं कारण म्हणजे लेखिकेने या शब्दांचं अवडंबर सोडून धर्म - संस्कृती - आचारपद्धती यात समान गोष्टी काय आहेत यावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. तिचं धर्मांवर (विशेष करून हिंदू धर्मावर) प्रेम नाही त्यामुळे ती धर्माच्या अनुयायी बांधून ठेवण्याच्या पद्धतीवर अधिक भर देते असं वाटलं.

माझ्या मते हा प्रश्न "ससा हा गुबगुबीत आहे, मऊ आहे की रेशमी आहे? एकच पर्याय स्वीकारा..." अशासारखा निरर्थक वाटतो. (हत्ती हा सूप आहे, दोरी आहे, की खांब आहे यात थोडं तरी नाविन्य आहे...)

इतक्या भुसभुशीत शब्दांच्या तलवारी घेऊन का बरं लढावं?

राजेश

शब्दोच्छल

धर्म हा शब्दोच्छलाचा विषय आहे. जेवढा शब्दोच्छल तेवढ्या व्याख्या/संकल्पना/मांडणी/विचार. अरेबिक लोकांना सिंधुनदी पलिकडचे असे म्हणण्यासाठी हिंदु शब्द वापरला. त्यांच्यात सिंधुतल स उच्चार ह होतो.
शरीर धर्म, मातृधर्म पितृ धर्म,शेजारधर्म,गुणधर्म अशा धर्मात मुल्ये धारण होतात
हिंदुत्व म्हणजे नेमके काय हे शब्दात पकडता येत नाही. जो तो आपल्या सोयीने घेतो.
प्रकाश घाटपांडे

अरेबिक (?)

प्रकाशराव, अरेबिया कुठे आणि सिंधुनदी कुठे? :-) हे अरेबिक कोण उपटले मध्येच? ;-)

आक्रमण

हिंदुस्थानावर झालेल्या आक्रमणात हिंदु शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पुण्यातील धर्ममार्तंडाच्या व्याखानात काही ठिकाणी हे ऐकले आहे. विकिवर मिळालेला आधार http://en.wikipedia.org/wiki/Hindu
प्रकाश घाटपांडे

मी अरबांबद्दल बोलत होते

हिंदु शब्दाची व्युत्पत्ती मलाही माहित आहे. :-) पण मी अरबांबद्दल बोलत होते. कारण स चे ह झाले तेव्हा अरबांमुळे नाही फारश्यांमुळे आणि विकीचा संदर्भ देण्यापेक्षा आपले उपक्रम आहे ना. शरदरावांचा हल्लीचाच लेख वाचला की बोध होईल.

छान

लेख वर वर वाचला. मलाही आवडला. त्याचबरोबर निर्मुक्त.कॉम ह्या सुंदर साईटची ओळखही झाली. बरेच वाचनीय लेख ह्या साईटवर दिसत आहेत.

रोचक लेख

श्री लिमये, लेख रोचक आहे. बरीचेशी मते मला पटली. हिंदुत्व आणि भारतीय समाजाचे एकजिनसी नसणे यांची सांगड घालणे हिंदुत्ववाद्यांना आवश्यक वाटते. अन्यथा हिंदुत्वास व्यापक पातळीवर स्विकारले जाणे कठीण आहे आणि हे हिंदुत्ववादी ओळखून असावेत. पण तरीही संज्ञांच्या या गदारोळात (धर्म - संस्कृती - आचारसंस्कृती) हिंदुत्ववादाचा संकुचितपणा लपत नाही.

माझे मत

विसाव्या व एकविसाव्या शतकातला, एकसंध भारतातला, हिंदू धर्म हा वेगळा आहे. आपण ह्या अर्वाचीन हिंदू धर्माबद्दल विचार केला तरी हिंदू धर्माला जीवनपद्धती म्हणता येईल काय ह्याबद्दल शंकाच आहे. मेघालय ते मुंबई, काश्मीर ते कन्याकुमारी कुठला समान धागा हिंदूना एकत्र जोडतो? रीती आणि रिवाज सर्वत्र सारखे नाहीत. गायीला महाराष्ट्रात पवित्र मानले जात असेल. पण अनेक ठिकाणी गोमांस अतिशय आवडीने खातात. इथे महाराष्ट्रात दत्ताची पूजा करतो तिकडे मेघालयात, मणिपुरात श्वानाचे मांस 'लज़ीज़' समजले जाते. काही जातीत मामाच्या मुलीशी लग्न करतात. तर काही प्रदेशात मामा भाचीशी लग्न करतो. एकंदरच हिंदू धर्म हा हॉचपॉच किंवा खिचडी धर्म आहे असे मला वाटते.

"मी हिंदू असलो तरी माझी जात माझ्यासाठी अधिक महत्त्वाची" हा विचार अजूनही भारतात टिकून आहे. असंख्य जातीजमाती असलेल्या हिंदू धर्मात खरेतर दोनच जाती असायच्या. एक 'स्वतची' (जसे चित्पावन). दुसरी 'इतर'. अजूनही काही जण ह्या गोष्टी मानतातच. कडवा पटेल समाजाताला बाबू बजरंगी हा एकीकडे हिंदुत्ववादी आहे आणि दुसरीकडे जातीयवादीही. घरचांच्या इच्छेविरुद्ध, जातीबाहेर पण हिंदू धर्मातच, लग्न करणाऱ्या मुलींचे अपहरण करून त्यांचे 'पुनर्वसन' करण्याचे कार्य बाबू करत असतो. दुसरीकडे इतर जातीतल्या दंगेखोर हिंदूच्या खांद्याला खांद्याला लावून खूनखराबाही.

हे सगळे विरोधाभास बघितले की एकंदर हिंदू धर्माला काय म्हणावे हे कळत नाही. सावरकरांची व्याख्या कधी कधी सुखावूनही जाते कुणाकुणाला. पण तसे काही नसते. आणि मुंबई ही मराठी माणसाचीच असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खिचडी धर्म ?

>>एकंदरच हिंदू धर्म हा हॉचपॉच किंवा खिचडी धर्म आहे असे मला वाटते.
उचलली जीभ लावली टाळूला म्हणतात ते असे. अर्धवट माहितीच्या आधारे आपली मते मांडायची आणि आपल्याला खूप कळते अशा नादात असणार्‍यांची मते वाचली की कीव करावीशी वाटते. प्रत्येक धर्माचे आधार वेगवेगळे आहेत. हिंदू धर्माचे आधार वेद,स्मृती,आणि काही शिष्टाचार आहेत.अमूक एक गोष्ट करावी आणि अमूक गोष्ट करु नये असे विधिनेषधपर नियम सुसंगतपणे हिंदूधर्मात आलेले नसतील पण अनेक विषयांचा अंतर्भाव हिंदू धर्मात होतो. ज्या काही गोष्टी 'हिंदू धर्म' म्हणून सांगितले आहेत त्याला काही आधार आहेत. हिंदू धर्म रुढी, परंपरा, त्याचे आधार यांना माननारा आहे. परंपरेने सांगितलेला विचार तो पाळण्याचा प्रयत्न करतो. एकाच वेळी तो अन्यधर्मीयांच्या विचारांचे [जीवनपद्धतीचे] आचरण करत नाही. उदा. हिंदू विवाह, त्याचे प्रकार,संपत्तीची विभागणी,पुजा,संस्कार,अध्यात्म, या गोष्टी तो पाळत असतो.त्यात काटेकोरपणा नसेलही. पण, म्हणून हिंदुधर्माला 'खिचडी धर्म' कोणतेही संदर्भ न देता म्हणने मला मुर्खपणाचे विधान वाटते.

-दिलीप बिरुटे

माझ्यासारखाच आणखी एक मूर्ख

प्रा. डॉ., तुमचा वरील प्रतिसाद सविस्तर प्रतिसाद देण्याचा योग्यतेचा (लायकीचा नव्हे) आहे की नाही ह्याचा विचार करतो आहे. तूर्तास माझ्यासारख्याच एका मूर्खाची काही व्यक्तव्ये बघा: दुवा क्र. १,दुवा क्र. २.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

'भारतीय समाजरचना' पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेली पुस्तके आपण वाचली तर वाचनाने विविध धर्माबद्दलची जाण आपल्यामधे [ज्ञान नव्हे] निर्माण होईल असे वाटते. अर्धवट दुव्यावरुन आपली मतं वाचण्यापेक्षा काही संदर्भ पुस्तके वाचून 'खिचडी धर्मावर' आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा नक्कीच एक वाचक म्हणून करतो. बाकी, तुमच्या दुवा क्रमांक एक चाळला आणि त्यातील ''"Previously we were Hindus. Now we are Hare Krishnas," यावरुन इस्कॉनचा विचार समजून येतो.

अजून एक गोष्ट, हिंदु धर्मातील तत्त्वे सर्व व्यापक व सर्वसमावेशक आहेत. 'मानवता' त्याचे सूत्र आहे. प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार वागून मोक्ष मिळवावा, हा हिंदु धर्माचा संदेश आहे. कोण्या एका व्यक्तीमुळे हा धर्म जन्माला आलेला नाही. आणि अन्यधर्मियांना आपापल्या धर्माची काही तत्त्वे हिंदू धर्मात दिसत असतील तर तो काही हिंदुधर्माचा दोष नाही, नसावा.

-दिलीप बिरुटे

मानवतेची व्याख्या

'मानवता' त्याचे सूत्र आहे.

हिंदु धर्माची अथवा आपली, मानवतेची व्याख्या ऐकायला उत्सुक आहे. कुठच्या व्याख्येनुसार ८० टक्के समुदायाला (स्त्रिया व शूद्र) इतकं पायदळी तुडवण्याचा कायदेशीर हक्क मिळतो हेही कळेल...

काळाशी विचारांची सांगड

मानवता म्हणजे कृतज्ञता, मानवता म्हणजे अस्मिता, मानवता म्हणजे तेजस्विता, भावमयता असे अनेक गुण हिंदुधर्मातील शिकवणीतून पहावयास मिळतात. [आता संदर्भ नाही] पण, भगवंताबद्दल, ऋषींबद्दल, गुरुबद्दल, आई-वडिलांबद्दल, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मी करु शकतो, मी बनू शकतो, असे अस्मितेचे भान हिंदुधर्मातील विचार देतात. ज्याच्या जीवनात उच्च आदर्श आहेत तो तेजस्वी. मानवी जीवन भावांनी भरलेले आहे,भावजीवन फुलविण्याचे शिक्षण हिंदुधर्मातील विचारांमधे दिसते.आणि मी तरी तो मानवतेचा विचार समजतो.

गतकाळात सांगितलेले प्रत्येक विचार आजच्या काळात तोलून पाहणे न्यायाला धरुन होणार नाही असे वाटते.

-दिलीप बिरुटे

जागे व्हा.


मानवता म्हणजे कृतज्ञता, मानवता म्हणजे अस्मिता, मानवता म्हणजे तेजस्विता, भावमयता असे अनेक गुण हिंदुधर्मातील शिकवणीतून पहावयास मिळतात. [आता संदर्भ नाही] पण, भगवंताबद्दल, ऋषींबद्दल, गुरुबद्दल, आई-वडिलांबद्दल, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मी करु शकतो, मी बनू शकतो, असे अस्मितेचे भान हिंदुधर्मातील विचार देतात. ज्याच्या जीवनात उच्च आदर्श आहेत तो तेजस्वी. मानवी जीवन भावांनी भरलेले आहे,भावजीवन फुलविण्याचे शिक्षण हिंदुधर्मातील विचारांमधे दिसते.आणि मी तरी तो मानवतेचा विचार समजतो.

प्रा. डॉ.! बिरुटेसाहेब!!! जागे व्हा. भानावर या आपण उपक्रमावर आहोत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मला सर्व संकेतस्थळे सारखीच...

>>प्रा. डॉ.! बिरुटेसाहेब!!! जागे व्हा. भानावर या आपण उपक्रमावर आहोत.
मला उपक्रम, मिसळपाव, मायबोली,[मिमवर अजून गेलो नाही. पण लवकरच पोहचतो तिकडेही ] तेव्हा संकेतस्थळ कोणतेही असो, आम्हाला जे वाटतं ते आम्ही लिहितो. कोणाला काय वाटतं याचा विचार आम्ही कधीच करत नाही. मात्र, अभ्यासपूर्ण विचार मांडणार्‍यांचा विचारांसहीत व्यक्तीचाही पूर्ण आदर करतो.

-दिलीप बिरुटे

होमवर्क करून या बघू

'भारतीय समाजरचना' पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेली पुस्तके आपण वाचली तर वाचनाने विविध धर्माबद्दलची जाण आपल्यामधे [ज्ञान नव्हे] निर्माण होईल असे वाटते.
प्रा. डॉ. तुमचा अभ्यास पदवीपर्यंतचाच दिसतो आहे आणि तोही धड दिसत नाही.

तुमच्यासाठी होमवर्क

  1. ग्रंथालयात जाऊन काही चांगली पुस्तके मागवा. तूर्तास ए. एल. बॅशम ह्यांचे वंडर दॅट वज इंडिया वाचा. डी. एन. झा ह्यांची काही पुस्तके वाचा. (एक चांगला इंग्रजी-मराठी शब्दकोश व इंग्रजी-इंग्रजी शब्दकोश जवळ असू द्या. फायदाच होईल.)
  2. हिंदू धर्मांत नवनवीन देवदेवतांचे आगमन, परंपरांचे असिमिलेशन कसे झाले ते पाहा.
  3. आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो हिंदू कधीपासून झाला ह्याचा अभ्यास करा.

अर्धवट दुव्यावरुन आपली मतं वाचण्यापेक्षा काही संदर्भ पुस्तके वाचून 'खिचडी धर्मावर' आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा नक्कीच एक वाचक म्हणून करतो. बाकी, तुमच्या दुवा क्रमांक एक चाळला आणि त्यातील ''"Previously we were Hindus. Now we are Hare Krishnas," यावरुन इस्कॉनचा विचार समजून येतो.
इस्कॉन चळवळीच्या संस्थापकानेही हिंदू धर्माबाबबत हॉजपॉज/हॉचपॉच आणि खिचडी हे शब्द वापरावेत, ह्याचे मला अप्रूप. बाकी तुमचे चालू द्या.

अजून एक गोष्ट, हिंदु धर्मातील तत्त्वे सर्व व्यापक व सर्वसमावेशक आहेत. 'मानवता' त्याचे सूत्र आहे.

प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार वागून मोक्ष मिळवावा, हा हिंदु धर्माचा संदेश आहे. कोण्या एका व्यक्तीमुळे हा धर्म जन्माला आलेला नाही. आणि अन्यधर्मियांना आपापल्या धर्माची काही तत्त्वे हिंदू धर्मात दिसत असतील तर तो काही हिंदुधर्माचा दोष नाही, नसावा.
मोक्षाला लागलेला दिसता ! अरेरे, तुमच्याशी वाद घालायला नको होता. मी बँडी केली. माझेच चुकले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आमच्या प्रतिसादाला मोक्ष मिळाला वाटतं :)

>>मोक्षाला लागलेला दिसता !
मोक्षावरुन आठवण झाली. हिंदुधर्मातील पुरुषार्थाची जी संकल्पना आहे, ती फार सुंदर आहे. मला त्यातला मोक्ष आवडतो. मानवी जीवनातील काही उद्दिष्टं ठरवून ती साध्य करायची म्हणजे जीवनाची कृतार्थता. अहो, आयुष्याचं ध्येय काय ? तर परमेश्वराशी एकरुप होणे. [अहाहा, काय सुंदर. इथे मी स्लो मोशनमधे येतोय आणि तिकडून परमेश्वरही स्लोमोशनमधे मला भेटण्यासाठी येतोय. जीवा-शिवाची भेट] दु:ख अडचणीने भरलेल्या जीवनाची सांगता परमेश्वराच्या भेटीने होते. काय सुख असेल ते. [डिवटीला जायचे नसल्यावर जसे आरामात उठायचे, दहा वाजण्याच्या सुमारास मस्त वाफाळलेला चहा घ्यायचा. असेच सुख असेल ते, नाही का ? ] मानवी जीवनाचं ध्येय परमेश्वराच्या चरणावर लीन होण्यात असेल तर, मानवी जीवनात तशी कर्म करावी लागतील हा भागही त्यात दडलेला आहेच. असो...थांबतो.

-दिलीप बिरुटे

खिचडी

प्राध्यापक बिरुटे,

तुम्ही हिंदू धर्माची शिकवण जे काही सांगत आहात, मानवता बंधूभाव वगैरे वगैरे त्यासाठी कोणत्याही धर्माचा पट्टा बांधून घेणे गरजेचे नाही. कोणत्याही धर्माच्या नावाने शोध घ्या, हाच संदेश देताना दिसतील. मूळात त्यासाठी कोणत्याही विशीष्ठ धर्माचे अनुसरण करणे गरजेचे नाही.
we can have fully objective moral truths and the way to get a handle on such moral realities is through philosophical reflection rather than revelation and surrender to divine authority.
अधिक माहितीसाठी संदर्भ : http://www.infidels.org/library/modern/taner_edis/review_of_martin.html

हिंदू धर्म हा अनेक विचारांची खिचडी आहे कारण त्यात असलेल्या अनेक प्रसंगी विरोधाभासी रुढी आणि परंपरा. त्यावर तुमचे मत काय? उदा. सुकर मांस सेवन करणे हे इस्लाम मधे निषिद्ध मानले जाते. इस्लाम धर्माचे आचरण करणारी कोणतीही व्यक्ती ह्याहून वेगळे मत मांडताना दिसणार नाही. ह्याउलट हिंदू धर्मामधे कुणी मांसाहारच निषिद्ध समजतो कुणी फक्त गोमांस निषिद्ध समजतो तर सावरकरांसारखे कट्टर हिंदूत्ववादी गोमांसही निषिद्ध समजत नाहीत. हे सगळे विचार एकाच धर्मात असणे ही 'खिचडी' नाही काय? हे झाले फक्त एका सवयी विषयी असे विरोधाभास असंख्य गोष्टीत दाखवता येतील. त्यावर तुमचे मत काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विरोधाभास असू शकतो

हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे असे म्हणतात. बाकीचे धर्म त्यानंतरचे त्यामुळे इतर धर्मातले विचार हिंदू धर्मात आहेत असे म्हणने संयुक्तिक ठरणार नाही. उपनिषदे, वेगवेगळी सुत्रे, भगवद्‌गीता, वेदांगे, स्मृतिग्रंथ, पुराणे,उपपुराणे असे अनेक हिंदूधर्मीय ग्रंथांनी [धर्माचे आधार ग्रंथ जे असतील ते सर्व ] हिंदूधर्माच्या वाडःमयात भर घातली. ते कोणत्या एका ग्रंथकाराचेच विचार नसल्यामुळे काळाच्या ओघात चालीरीतीमधे त्याचे स्वरुप बदलत गेले. त्यामुळेच रुढी आणि परंपरा यांचा विरोधाभास आपणास दिसून येतो.

>> हिंदू धर्मामधे कुणी मांसाहारच निषिद्ध समजतो

मांसाहार निषिद्ध समजल्या जात असेल, पण काही धर्म ग्रंथात कशाचे मांस भक्षण करावे याबाबत सांगितले आहे असे स्मरते. धर्म विचार सांगणा-यांचे काळाच्या ओघात योग्य-अयोग्य यावरही त्यांचे मतमतांतरे झाले असतील, त्यामुळे अनेक गोष्टी काळाच्या ओघात बदलत गेल्या. त्याबद्दल काही शंका नसावी.

-दिलीप बिरुटे

'' काय 'राव' ! संकेतस्थळाच्या खच्चीकरण करण्याच्या 'उपक्रमा'त तुमचा सहभाग गृहीत धरु ना? ''

खिचडी

ते कोणत्या एका ग्रंथकाराचेच विचार नसल्यामुळे काळाच्या ओघात चालीरीतीमधे त्याचे स्वरुप बदलत गेले. त्यामुळेच रुढी आणि परंपरा यांचा विरोधाभास आपणास दिसून येतो.

ह्यालाच आपण खिचडी म्हणतो ना?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

खिचडी?

हिंदू धर्माचे स्वरूप 'खिचडी'सारखे आहे यातून काय सिद्ध करायचे आहे? किंवा यातून काय सिद्ध होते असे तुम्हाला वाटते? आणि हिंदू धर्माचे स्वरूप जर खिचडीसारखे असेल तर त्यामुळे नक्की काय होते?

हिंदू धर्माच्या चालीरीतींमध्ये अधिक विरोधाभास आहे आणि तो इतर धर्मात नाही असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांना वाचन/अभ्यास वाढवण्याची आवश्यकता आहे असे वाटते. आणि विरोधाभास असल्याने काय सिद्ध होते तेही कळाले नाही. माफ करा, पण इथे नुसता शब्दांचा गोंधळ सुरू आहे असे वाटते. कृपया तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे जरा समजावून सांगावे.

खिचडी

खिचडी या शब्दातून हे सूचित होते की (दहा तोंडी संघटनेप्रमाणेच) हिंदू धर्म असा पण आहे आणि तसा पण आहे म्हणता येते. आणि असा आहे म्हणून कुणी टीका करू लागले की तो असा नाही असेही धर्मातले वचन दाखवता येते. त्यामुळे कोणतीही बिंदुगामी चर्चा टाळली जाते आणि फक्त गोल-घुमाऊ वक्तव्ये घडतात.

वसुलिंच्या मूळ चर्चाप्रस्तावाचा उद्देश हेच दाखवून देण्याचा आहे.

सूर्यकेंद्री सिद्धान्त आर्यभटाने मांडला म्हणून आपल्या पूर्वजांचे (आर्यभटाचे नव्हे) कौतुकही करता येते आणि उद्या ते चुकीचे आहे असे आढळून आले तर त्यावरील भाष्यग्रंथातून 'आर्यभटाला खरे तर तसे म्हणायचे नव्हते' हे ही दाखवता येते.
हे उदाहरण धर्माशी संबंधित नाही. पण एकूण वस्तुस्थिती दाखवणारे आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

प्रॉब्लेम स्टेटमेंट | उद्देश, कृती?

नक्की काय म्हणायचे आहे याचा साधारण अंदाज येतो पण स्पष्ट होत नाही. नेमकी अडचण सोप्या शब्दात (प्रॉब्लेम स्टेटमेंट) मिळवता आली तर बरे होईल.

असा आहे म्हणून कुणी टीका करू लागले की तो असा नाही असेही धर्मातले वचन दाखवता येते.

यातून 'हिंदू धर्माचे स्वरूप "खिचडी"सारखे असल्याने टीका करता येत नाही' हे एक कळले.

त्यामुळे कोणतीही बिंदुगामी चर्चा टाळली जाते आणि फक्त गोल-घुमाऊ वक्तव्ये घडतात.

'बिंदुगामी' चर्चा होत नाही' हे दुसरे कळले.

'हिंदू धर्माचे स्वरूप "खिचडी"सारखे असल्याने टीका करता येत नाही. 'बिंदुगामी' चर्चा होत नाही' हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे का? (नसल्यास कृपया योग्य ते बदल करावेत.)

हे प्रॉब्लेम स्टेटमेंट मानले तर: ही अडचण नेमकी कोणती कृती करताना येते? (क), आणि त्या कृतीचा (आणि 'बिंदुगामी' चर्चा करण्याचा) नेमका उद्देश काय आहे? (ख) हे कृपया स्पष्ट करावे.

उदाहरणादाखल काही उत्तरे सुचतात ती अशी (फक्त कल्पनेच्या भरार्‍या, यात काही तथ्य आहे असे दावा नाही):
'हिंदू धर्मावर टीका करणे' ही कृती आणि हाच उद्देश. (क आणि ख) (हा उद्देश इतर काही उद्देशांची उपपत्ती असू शकतो.)
हिंदू धर्मातील आपल्याला न पटणार्‍या/आवडणार्‍या गोष्टी चुकीच्या कश्या आहेत हे सिद्ध करणे हा उद्देश (ख). आणि त्यातून 'हिंदू धर्मावर टीका करणे' ही कृती (क).
हिंदू धर्मातील आपल्याला न पटणार्‍या/आवडणार्‍या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करणे हा उद्देश (ख१). या गोष्टी चुकीच्या कश्या आहेत हे सिद्ध करणे (ख२). आणि त्यातून 'बिंदूगामी चर्चा करणे', 'हिंदू धर्मावर टीका करणे' ह्या कृती (क).
हिंदू धर्माविषयी ज्यांना आदर/प्रेम आहे त्यांच्यावर टीका करणे, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणे, त्यांना हिंदू धर्मातील दोष दाखवून मान्य करायला लावणे (आणि या सर्वातून स्वतःसाठी आनंद मिळवणे) हे उद्देश (ख). आणि त्यातून 'हिंदू धर्मावर टीका करणे' ही कृती (क).

सत्यशोधकाने सेंटी होऊ नये


उदाहरणादाखल काही उत्तरे सुचतात ती अशी (फक्त कल्पनेच्या भरार्‍या, यात काही तथ्य आहे असे दावा नाही):
'हिंदू धर्मावर टीका करणे' ही कृती आणि हाच उद्देश. (क आणि ख) (हा उद्देश इतर काही उद्देशांची उपपत्ती असू शकतो.)
हिंदू धर्मातील आपल्याला न पटणार्‍या/आवडणार्‍या गोष्टी चुकीच्या कश्या आहेत हे सिद्ध करणे हा उद्देश (ख). आणि त्यातून 'हिंदू धर्मावर टीका करणे' ही कृती (क).
हिंदू धर्मातील आपल्याला न पटणार्‍या/आवडणार्‍या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करणे हा उद्देश (ख१). या गोष्टी चुकीच्या कश्या आहेत हे सिद्ध करणे (ख२). आणि त्यातून 'बिंदूगामी चर्चा करणे', 'हिंदू धर्मावर टीका करणे' ह्या कृती (क).
हिंदू धर्माविषयी ज्यांना आदर/प्रेम आहे त्यांच्यावर टीका करणे, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणे, त्यांना हिंदू धर्मातील दोष दाखवून मान्य करायला लावणे (आणि या सर्वातून स्वतःसाठी आनंद मिळवणे) हे उद्देश (ख). आणि त्यातून 'हिंदू धर्मावर टीका करणे' ही कृती (क).

वरील उद्देश (तुमच्या कल्पनेच्या भराऱ्या) आवडले. शुभेच्छा. आपण आपल्यापरीने सत्यशोधनाचे काम करावे. ते करता करता आपले उद्देश साध्य होत असल्यास उत्तमच. सत्यशोधकाने सेंटी होऊ नये.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सेंटी सत्यशोधक

वरील उद्देश (तुमच्या कल्पनेच्या भराऱ्या) आवडले. शुभेच्छा.

धन्यवाद.

आपण आपल्यापरीने सत्यशोधनाचे काम करावे. ते करता करता आपले उद्देश साध्य होत असल्यास उत्तमच. सत्यशोधकाने सेंटी होऊ नये.

सत्यशोधन वगैरे ते करणारे जाणोत. यात सेंटिमेंट्सव्यतिरिक्त काही 'मीट' (दम?) आहे का हे शोधण्याचा प्रयत्न म्हणा हवे तर. नंतरचा सत्यशोधकांना सल्ला चांगला आहे. सत्यशोधकांनी त्याचा (सेंटी न होता) विचार करावा.

 
^ वर