माय मराठी महोत्सव- निळु दामल्यांशी गप्पा


मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.अक्षरधारा तर्फे मराठी वाचकांसाठी सातत्याने काही उपक्रम राबवले जातात. त्यात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा हा प्रमुख कार्यक्रम असतो. काल निळू दामल्यांची मुलाखतीचा कार्यक्रम पहायला/ ऐकायला टिळकरोडच्या मराठा चेंबर्सच्या सभागृहात गेलो. अक्षरधारा व परचुरे प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मायमराठी महोत्सवातला एक कार्यक्रम होता. कार्यक्रम अगदी औपचारिकतेला फाटा देउन थेट चालु केला. हा प्रकार आपल्याला जाम आवडला ब्वॉ!
निळू दामले म्हणजे एक अवलिया पत्रकार. पारंपारिकतेची जोखड झुगारुन मनस्वी लेखन भ्रमंती करणारा मुक्त लेखक पत्रकार. मुलाखत कसली अगदी अनौपचारिक गप्पाच झाल्या. एकदम संवादी शैली, तरुणाईची भाषा. बोजड विद्वत्ताप्रचुर भानगड नश्शे. आयुष्यावर बोलू काही हाच मानस. प्रशांत दिक्षित हे सामाजिक राजकीय भाष्य करणारे पत्रकार म्हणुन वाचकांना माहीत आहेत त्यांनी निळू दामल्यांना श्रोत्यांच्या वतीने बोलत केल.बदलता अमेरिकन या त्यांच्या पुस्तकाच्या संदर्भाने तेथील वर्णद्वेष, सामान्य नागरिक,गुन्हेगारी,राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर दिलखुलास सोदाहरण भाष्य निळु दामले करीत होते. रात्री ट्रेन मधे प्रवास करताना आई मुलीचे भांडण चाललेले त्यांनी पाहिल्यावर त्यांना अगदी आपल्या भारतात आल्यासारखे वाटले. त्यांच्यातला उत्सुक पत्रकार जागा झाला. मुलीला भारतात येउन संस्कृतचा अभ्यास करायचा होता. दामल्यांनी भारतीय असल्याचा फायदा घेउन त्यांना बोलते केले व त्या कुटुंबातला एक हितचिंतक सदस्य बनले. अमेरिकेत आणि भारतात माणसे मुलभुत सारखीच. फरक फक्त चाकोरीबाहेर जगण्याची मानसिकता व तेथील भौतिक सुख सुविधांबाबत आग्रही असणारा नागरिक. तो धर्म तिथे आड येत असेल तर धर्माला बाजुला करतो. तिथल बेसिक जगण अ‍ॅश्युअर्ड आहे.
समलैंगितेला पाश्चात्य जगात मानाचे स्थान आहे तो त्यांचा अधिकार म्हणुन. त्यांच्यात असलेल्या जिनियस वृत्तीला आर्थिक सुबत्तेची जोड मिळाली. मॆंचेस्टर च गे सिटी त्याच उदाहरण आहे. समलैंगिकतेला ख्रिश्चनिटी मधे पण विरोध होता तो नंतर कसा मोडुन निघाला हे सांगताना त्यांनी उपयुक्तता मुल्याचा वापर करुन समलिंगी लोकांनी उपेक्षित जगण्यातुन कसे स्वत:ला वर आणले हे सांगितले. लैंगिक मानसिकते बद्दल वेगळेपण हाच काय तो फरक. मला धनंजयच्या कोणार्कच्या मंदिराची शिल्पे ची आठवण झाली.
निळुभाउंनी भारतातील समकालीन परिस्थितीव भाष्य करताना उपदेशाचे डोस न पाजता साध्या साध्या संकल्पना राबवण्यावर भर दिला. अभिमत विद्यापीठांची उत्पत्ती व त्यातील लागेबांधे यावर मिष्किल व रोखठोक भाष्य केल. येथील ए आय सी टी, नॅक च्या मान्यता घेण्यातील भ्रष्टाचार मांडला. नॅक मान्यता प्राप्त कॊलेज मधे संडास बाथरुम नाहीत. ज्या कॊलेजच्या संडासांमधे जाणे हेल्दी नाही अशा कॊलेजना ही मान्यता कशी मिळते? असा प्रश्न उपस्थित केला आहे अमेरिकेत जेव्हा अस काही घडत तेव्हा ब्लॊगच्या माध्यमातुन अशा गोष्टींची वाट लावतात. NIKE या कंपनीत मुलांना कमी पगार देउन शोषण करणा‍र्‍या प्रकरण एका एमाआयटी तील ब्लॉगर विद्यार्थ्याने उघड्कीस आणले.आपल्याकडेही ते माध्यम उपलब्ध आहे आपण ते वापरु शकतो. हे ऐकताना मला नीधप यांच्या स्वच्छतेच्या बैलाला या ब्लॉगिंगच्या माध्यमातुन केलेला स्तुत्य प्रयत्नाची आठवण झाली. नीधप जेव्हा मराठी ब्लॉगर्स मेळाव्याला आल्या होत्या तेव्हा मी व्यक्तिश: भेटुन त्यांच स्वत:हून (या बाबतीत) कौतुक केल होत बर का! असो तर सांगायचा मुद्दा हा कि निळु दामल्यांनी ब्लॉगर्स मधे असलेली ताकद वापरण्याचे आवाहन केल.
गप्पा मारताना त्यांनी वाचन संस्कृतीत लंडनमधील बुक स्टॊलविषयी उदाहरण दिल. तिथ शेजारीच कॆफे मधे व्हिस्की मिळते आणि चक्क विस्की महोत्सव साजरा करतात. इथे पुण्यात पाथफाईंडर मधे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मला तेथील कॆफे मधे कॊफी बरोबर बिअर किंवा वाईन पण ठेवली असती तर काय मजा आली असती असा विचार चाटुन गेला होता. निळू दामल्यांनी चक्क आमच्या मनातील हीच वाईन महोत्सवाची कल्पना मांडली त्यामुळे आपण त्यांच्यावर एकदम खुश झालो ब्वॊ.
अक्षरधाराने १००० रुपयांच्या पुस्तकावर ३०० रु ची वाईन फ्री अशी कल्पना राबवली तर मजा येईल. नाहीतरी तुम्ही ३०% देताच कि!
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत दिक्षितांनी वर्षा दोन वर्षांनी जेव्हा भेटु तेव्हा पुस्तक महोत्सवाबरोबर वाईन महोत्सवही असेल अशी आमच्या मनातील आशा व्यक्त करुन एक आनंददायी गप्पांचा शेवट केला. आम्ही पुणेरी पद्ध्तीने चपळाईने पुढे येउन मराठी ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीने आभार मानुन लक्ष वेधुन घेतले व मराठी ब्लॉगिंग विषयी थोडक्यात माहीती दिली. आता कुणी याला टिमकी वाजवुन घेतली असे म्हणले तर म्हणोत बापडे!
तुम्हाला या गप्पा मात्र टिचकीसरशी गप्पा ऐकता येतील. ऐका!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

Comments

संडास तिथे विकास

चांगला माहितीपूर्ण लेख! धन्यवाद.

मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.

करा जाहिरात. किती डिस्काउंट हो?

नॅक मान्यता प्राप्त कॊलेज मधे संडास बाथरुम नाहीत. ज्या कॊलेजच्या संडासांमधे जाणे हेल्दी नाही अशा कॊलेजना ही मान्यता कशी मिळते? असा प्रश्न उपस्थित केला आहे अमेरिकेत जेव्हा अस काही घडत तेव्हा ब्लॊगच्या माध्यमातुन अशा गोष्टींची वाट लावतात.

संडास आणि विकास ह्यांतील जवळचा संबंध पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाला आहे. थोडक्यात संडास तिथे विकास !

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

निळू दामले

हे पत्रकार, लेखक म्हणून परिचित, आवडीचे आहेत. तथापि त्यांचे 'धर्मवादळ' आवडले नाही. अगदी एकांगी वाटले.असो.
एआयसीटीई, नॅकमधील भ्रष्टाचार या विषयावर धीटपणे बोलल्याबद्दल निळूभाऊंचे अभिनंदन ( आणि मोठ्या प्रमाणावरचे निखिल वागळे होऊ नका हा सावधानतेचा इषारा!). अर्जुनसिंगांचे कोणी स्टिंग ऑपरेशन केले तर त्यांना इतके पैसे ठेवायला जागा तरी कुठून मिळाली याचे उत्तर मिळेल.
प्रकाशराव, स्वेच्छानिवृत्तीनंतरचा वेळ सत्कारणी लावताय. लेख तर आवडलाच पण बेरजेचे राजकारणही आवडले. कार्पोरेशनच्या निवडणुकीत मनसेकडून डहाणूकर कॉलनी मतदार संघातून उभे रहाताय की काय?
धम्मकलाडू यांच्या प्रतिसादाबद्दल काय लिहावे? 'अर्धचित्काक' हा शब्द सुचतो.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

उत्तम/सामान्यीकरण

लेख आवडला. गप्पा ध्वनिमुद्रित करून ऐकायची संधी दिल्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक आभार. भाषणाचा आढावा उत्तम घेतला आहे. सुरुवातीचा उत्स्फूर्ततेवर भर, मनसोक्त जगणे, विनय/साधेपणा/पडतेपणा घेऊनही आपला वेगळेपणा अधोरेखित करणे इ. ऐकून अवचटांच्या मुलाखतींची जोरदार आठवण आली ;)

लेखात म्हटल्याप्रमाणे एकंदरीत गप्पा, त्यांतील अनौपचारिकता आणि सहज मारलेल्या गप्पांसारखा संवाद आवडला. खोडच काढायची झाली तर, पाश्चात्य समाजात तुलनेने अधिक आढळणार्‍या जिज्ञासू वृत्तीमागे केवळ साधनसंपत्ती, वेगवेगळी फाऊंडेशन्स इत्यादींची कारणं देण्याऐवजी अधिक खोलवर, थोडं इतिहासात शिरणं (धार्मिक स्वातंत्र्यासाठी युरोप सोडून आलेले सुरुवातीचे रहिवासी, नवीन खंडाची आयती मिळालेली नैसर्गिक संपदा, यादवी युद्ध इ.) आवश्यक वाटलं. म्हणजे मला वाटतं, भारतीय समाजात वेगळ्या विचाराला न मिळणारं प्रोत्साहन, वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर असणार्‍या पाठिंब्याचा अभाव आणि त्याअभावी प्रतिभेचं चीज न झालेले अनेक लोक यांची उदाहरणं परिचित आहेत; केवळ त्यांची जंत्री देऊन फारसं काही पदरात पडत नाही.

छिद्रान्वेषीपणाचा आळ पत्करून या मुलाखतीतल्या खटकलेल्या काही गोष्टी येथे मांडतो -

  1. न्यूयॉर्करमध्ये आलेला धारावीचा लेख भाषांतर करून मराठी वृत्तपत्रात छापलं जाण्याचं उदाहरण योग्य आहे; मात्र त्याच संदर्भात युनिक फीचर्सचा आणि विशेषतः 'अर्धी मुंबई' या पुस्तकाचा उल्लेख आला नाही याचं आश्चर्य वाटलं.
  2. मँचेस्टरमधलं भरमसाठ बेकारी भत्त्याचं उदाहरण टोकाचं आहे. डावीकडे झुकणार्‍या, छोट्या, कट्टर डेमोक्रॅटिक राज्यांत कदाचित हे शक्य असेल. मात्र दक्षिणेकडच्या मोठ्या, तुलनेने गरीब राज्यांत चित्र बरंच वेगळं आहे.
  3. समलिंगी संबंधांना मान्यता दिल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते हे लक्षात आल्यामुळेच ते स्वीकारले गेले हे (प्रशांत दीक्षित यांचे) विधान वरवरचे वाटले. जसं समलिंगीपणा ही विकृत मनोवृत्ती आहे हे चुकीचं सरसकट सामान्यीकरण झालं; त्याचप्रकारे ते जीनियस, बुद्धिमान असतात हेही दुसर्‍या टोकाचं झालं; असं मला वाटतं. अर्थात याने कदाचित एकंदरीत स्वीकृतीला मदत होईल, पण चांगलं/वाईट असं कुठल्याही तर्‍हेचं सरसकट सामान्यीकरण (पिजनहोलिंग) करू नये असं वाटतं.
  4. "अमेरिकन ड्रीम म्हणजे लक्षात घ्या...भारतातल्या लोकांचं ड्रीम कसं असतं? मी मेल्यावर माझी राख समुद्रात पसरावी. अमेरिकन माणसं राखबिख पसरवायचं नाही ड्रीम करत." हे निळू दामलेंचं विधानही असंच टोकाचं.

शिवाय उदारमतवादी, पुरोगामी अमेरिकेबरोबरच जवळजवळ तितकीच कट्टर अमेरिका अस्तित्वात आहे. डार्विनचा उत्क्रांतीवाद, समलिंगी संबंध इतकेच नव्हे तर पृथ्वी गोल आहे हे नाकारणारेही काही लोक आहेत. एका संपूर्ण राष्ट्राचं चित्र उभं करताना दुसरी बाजूही यायला हवी. फायदा होतो म्हणून योगा शिकवणार्‍या अमेरिकन चर्चेसचं उदाहरण ही एक बाजू झाली, तर सिनेटची सुरुवात हिंदू प्रार्थनेने होऊ नये म्हणून सभागृहात विरोध करणारे लोक ही दुसरी.

अभिमत विद्यापीठाचा, नायकेतील अन्यायाचा, ब्लॉग्जच्या ताकदीचा मुद्दा चांगला मांडला आहे. वॉटरगेट प्रकरण/'ऑल द प्रेसिडेंट्स मेन'ची आठवण करून देणारे.

मात्र एकंदरीत निळू दामलेंची अमेरिकेबद्दलची मतं, तिथे वेगवेगळ्या संशोधनाला मिळणार्‍या पाठिंब्याचं केलेलं कौतुक; सामान्य भारतीय आणि अमेरिकन कुटुंबांत फारसा फरक नाही हे निरीक्षण (लेखकाने वर उदाहरण दिलं आहेच) मराठी आंतरजालावर यायला हवं हे नक्की ;)

+१

दिलखुलास गप्पा आवडल्या, पण पुष्कळदा निष्कर्ष काढताना समाजाच्या गुंतागुंतीचा पूर्ण विचार केला नसल्याचे जाणवले. (नंदन म्हणतात तसे वरवरचे सामान्यीकरण जाणवले).

लोचा काय आहे?

श्री घाटपांडे, श्री दामले यांची मुलाखत ऐकली. धन्यवाद. परंतु श्री दामले यांच्या 'लोचा काय आहे?' या पत्रकारितेच्या भुमिकेबद्दल काही खटकणारे मुद्दे जाणवले. श्री फ्रिडमन यांच्या 'वर्ल्ड इज फ्लॅट' या पुस्तकात जसे मुलभूत अज्ञान आढळते तसेच श्री दामले यांच्या मुलाखतीत आढळले. पत्रकारांच्या सखोल अभ्यासाचा अभाव हा पत्रकारितेचा दोष नेहमीच जाणवतो.

वुडी ऍलन हा पक्का अमेरिकन आहे

श्री वुडी ऍलनला अमेरिकन मानसिकतेचे प्रतिनिधी मानणे हे हास्यास्पद आहे. आपल्या मैत्रिणीच्या (मिऍ फॅरो) दत्तक मुलीशी लग्न करणारे ऍलन बर्‍याच लोकांना अनैतिकतेचे प्रतिक वाटतात. (मी इंडियाना नावाच्या तुलनेने कर्मठ राज्यात सध्या राहतो. यापुर्वी इलिनॉय, ल्युजियाना, नॉर्थ कॅरोलायना आणि न्युयॉर्क राज्यात राहीलो आहे. तेथेही यापेक्षा वेगळे मत ऐकलेले नाही. येथे उच्चशिक्षित लोकांची मते अपेक्षित नसून सामान्यांची मते अपेक्षित असावीत.)

अमेरिकन मिडिया फार थोर नाही. ते लफड्यांची चर्चा करतात

श्री दामले यांनी न्युयॉर्कर या नियतकालिकाचा उल्लेख केला आहे. त्यासारख्या दर्जेदार नियतकालिकातील सिमुर हर्ष वगैरे पत्रकारांचे लेख उडत उडत चाळले असते तर त्यांना या विधानातील फोलता जाणवली असती. ग्रॉसरी स्टोअर्समध्ये नजरेस पडणारी नियतकालिके आणि केबल न्युज चॅनल्स यांच्या आधारावर त्यांनी वरील मत ठरवलेले दिसते. श्री दामले भारतीय पत्रकारितेविषयीसुद्धा तक्रार करतांना आढळतात पण त्याचवेळी स्वतः स्थानिकांच्या मुलभूत हक्कांना धाब्यावर बसवणार्‍या लवासासारख्या प्रकल्पांच्या समर्थनार्थ लेख लिहितात. हे दुर्दैवी आहे. त्यांच्या दुतोंडीपणाचा मुलाखत ऐकतांना संताप आला.

अमेरिकेच्या युद्धखोरीबद्दल, त्यास वेळोवेळी प्रासंगिक का होइना पण मोठ्या प्रमाणावर लाभलेल्या सामान्य जनांच्या पाठींव्याच्या अनैतिकतेबद्दल भाष्य न करता त्या समाजातील प्रॅग्मॅटिजमचे कौतुक करणे हे सर्व श्री दामले यांच्या अपरिपक्वतेचे द्योतक आहे. त्यांच्या अमेरिकेच्या निरीक्षणासंदर्भात अनेक आक्षेप आहेत पण ते सर्व इथे देण्याइतपत धीर माझ्यापाशी नाही. कुठल्याही समाजाचे सामान्यीकरण करणे हे सुलभीकरण आहे. या सुलभीकरणास नेहमीच पत्रकार बळी पडतात. यामागे लिहिण्याची खाज आहे की त्या व्यवसायाचाच हा उपजत दोष आहे हे कळत नाही.

पत्रकारिता

कार्यक्रमानंतर अन्य लोकांशी बोलताना लवासाच्या लेखावर अनेकांच्या शिव्या बसल्या असे दामले म्हणत होते. मला उपक्रमावरील खरच लवासा एवढे सालसपणे वागेल ? या लेखाची आठवण आली तसेच प्रकाश बाळांचा विरोधक आणि समर्थक दोघंही एकांगीच! या लेखाची आठवण आली.

मला वाटतं, भारतीय समाजात वेगळ्या विचाराला न मिळणारं प्रोत्साहन, वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर असणार्‍या पाठिंब्याचा अभाव आणि त्याअभावी प्रतिभेचं चीज न झालेले अनेक लोक यांची उदाहरणं परिचित आहेत; केवळ त्यांची जंत्री देऊन फारसं काही पदरात पडत नाही.

अक्षयच्या मताशी अगदी सहमत आहे.
आम्हाला उदरनिर्वाहासाठी देहविक्रय करणार्‍या स्त्रिया व बुद्धीविक्रय करणारे लेखक/विचारवंत यात फरक काय? असा प्रश्न नेहमी पडतो. यात विक्रय शब्द एक वाईट अर्थाची छटा देतो. पण सेवा करण व सेवामुल्य घेण यात वस्तु श्रम बुद्धी शरीर या सर्व बाबी आल्याच.
कुणी शरीर वापरु देत तर कुणी बुद्धी. यात नैतिक अनैतिक कस काय ठरवणार?
मला वाटत कुठलाही माणुस वा उत्तर कायमस्वरुपी विवेकी वा अंतिम असु शकत नाहीत.
अवांतर-आपल्याला वाईन महोत्सव नाही झाला तरी शास्त्रापुरती वाईन प्यायला नक्कि आवडेल.
स्वगत- च्यायला इथे लोक अन्नाला महाग आहेत. ७७% लोकांच दर डोई उत्पन्न २० रु आहे आन् हा वाईन प्यायच्या गप्पा करतोय. काय हा देशद्रोह/अनैतिकता?

प्रकाश घाटपांडे

स्थायी विवेक

मला वाटत कुठलाही माणुस वा उत्तर कायमस्वरुपी विवेकी वा अंतिम असु शकत नाहीत.

खरे आहे. पण लवासा हा स्वतंत्र किंवा नव्याने उभा राहिलेला प्रश्न नाही. नर्मदा प्रकल्प, सिंगुर - भारतात उदाहरणांची कमतरता नाही तसेच विस्थापितांचीही. प्रत्येकवेळी आपल्या व्यवस्थेत विस्थापितांच्या पुनर्वसनात गोंधळ आढळतो. पुनर्वसनातील गोंधळ बाजूला ठेऊ या. पण स्थानिकांच्या विश्वाचे काय? त्यांनी कोणत्या न्यायाने विस्थापिताचे जीणे पत्करावे? हे प्रश्न भारतात बर्‍याच आधीपासून अस्तित्त्वात आहेत. पुरेशा काळापासून की जेणेकरून त्याविषयी एखाद्याची न्याय्य भुमिका तयार व्हावी. (ज्यांचा विवेक नेहमीच 'जिप्सी' किंवा अस्थिर अवस्थेत आहे त्यांना मात्र अशी भुमिका तयार करणे शक्य नसावे. ) असे असतांना श्री दामले याबाबत उदासीन आहेत हे कशाचे लक्षण आहे? रेल्वेच्या प्रवासात अमेरिकन माता-कन्येच्या वादात स्वतःच्या समाजाशी असलेले साधर्म्य दिसते पण लवासामुळे विस्थापित होणार्‍या लोकांचे प्रश्न दिसत नाही, हा विरोधाभास कसा स्विकारावा? उपक्रमी श्री मोडक यांनी लिहिलेल्या या लेखात विस्थापितांच्या प्रश्नांबाबत लिहिले आहे. शक्य असल्यास श्री दामले यांना श्री मोडक यांच्या लेखाची प्रत दाखवावी.

पुनर्वसन

एखादी गोष्ट प्रस्थापित होताना मूळ गोष्टीचे विस्थापन होतेच. काही लबाड लोक त्याचा गैरफायदा घेतात हे आम्ही विकास आराखडा या लेखात म्हटले आहेच. मुद्दा असा आहे कि विस्थापितांच्या पुनर्वसनात न्याय्य प्रकिया किती जलद गतीने होते. विस्थापितांना आपले पुनर्वसन नाही झाले तर? हा मुद्दा असण्याचे भय हे कायम आहे.
विस्थापितांना न्याय द्यायचा म्हणजे जास्तीतजास्त विस्थापितांवर कमीतकमी अन्याय कसा होईल एवढेच पहाणे. जेव्हा विस्थापन होणे हाच अन्याय असतो त्याचे परिमार्जन कसे होणार? भरपाई देणे हाच त्यातल्यात्यात एक मार्ग आहे. लवासासारख्या ठिकाणी तर तोही प्रश्न कायद्याच्या तांत्रिक कचाट्यातुन सोडवला(?) आहे
९०% लोकांना १००%न्याय देउन एखादा सार्वजनिक प्रश्न सोडवला तरी उरलेल्या १०% लोकांवर तो १००% अन्यायच असतो.
दामलेंना मेल करुन पाहतो चर्चेसाठी येताहेत का? किमान श्रामोंचा लेख तरी वाचायला पाठवतो. मी दामल्यांना कार्यक्रमाच्या दिवशी पहिल्यांदा पाहिले. त्यांचा माझा परिचय नसल्याने आग्रह करता येणार नाही.
प्रकाश घाटपांडे

स्पष्टता

कार्यक्रमानंतर अन्य लोकांशी बोलताना लवासाच्या लेखावर अनेकांच्या शिव्या बसल्या असे दामले म्हणत होते.
हा दामल्यांच्या अभिमान आहे की विषाद? कसेही असो, शिव्या का बसल्या? दामल्यांनी त्याविषयी काही सांगितले का? सांगायला हवे होते. त्याची काही कारणं आहेत. दामल्यांनी त्यांच्या लेखात जे लिहिले, त्यापेक्षा वास्तव वेगळे आहे. ते दामल्यांनी किती तपासले? कायद्याला गुंडाळून ठेवत जमिनींचे झालेले हस्तांतर काय सांगते? ज्या गतीने जमिनींचे व्यवहार झाले आहेत, तशी गती एरवी सामान्य माणसाला अनुभवता येते का? तीच गोष्ट मुद्रांक माफीची. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून लिहिलेल्या उदो-उदो लेखावर शिव्या बसणारच. त्यांच्या जागी मी असतो तर मीही त्या शिव्या खाल्ल्या असत्या. खाव्याच लागल्या असत्या. त्यामुळे त्याविषयी कौतूक किंवा विषादही वाटून घेण्याचे कारण नाही.
'विरोधक आणि समर्थक दोघंही एकांगीच' या प्रकाश बाळ यांच्या लेखावरही असेच बोलता येते. प्रकल्पाच्या विरोधकांमध्ये थोडा फरक करू. प्रत्यक्ष हितसंबंध असणारे विरोधक (म्हणजेच ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यातील मंडळी) आणि त्यांच्यावतीने झगडणारे विरोधक. वतीने झगडणाऱ्यांना बाजूला ठेवू. असं म्हणूया की ते एकांगीच असतात, आहेत, होते, असतील... हितसंबंध असणाऱ्या विरोधकांचे काय? तेही एकांगीच? ज्यांच्या जमिनी फसवून घेतल्या (आपण असे म्हणूया की, ही मंडळी एकूणात फक्त ५ टक्के आहेत), तेही एकांगीच? हसावे की रडावे? किंवा मग असं म्हणूया की ५ टक्के (किंवा अशा काही प्रमाणातील) अन्याय्य व्यवहार हा बाकीच्या हिशेबात माफ आहे. म्हणजे मग या जमिनी गमावलेल्यांवरचा एकांगीपणाचा आरोप अधिक सक्षमपणे लावता येईल. आणि एकदा हा पवित्रा स्वीकारला तर पुढे 'आय फॉर अॅन आय'ला आक्षेप घेण्याचे कारणही राहणार नाही. ज्याची ताकद मोठी तो थोर. अनेक प्रश्न निर्माणच होणार नाहीत. जे होतील ते चुटकीसरशी (खरं तर फटक्यासरशी) सोडवता येतील.
विस्थापित वगैरेंचे इश्यू आले की, एक तर इकडचा किंवा तिकडचा पवित्रा घेतला जातोच. मध्यममार्गाचाही अपवादात्मक पवित्रा असतो. या पवित्र्यांमध्ये त्या विस्थापितांचा प्रश्न खरंच कुठे सामावलेला असतो का? लवासामध्ये तर त्यांना विस्थापित तरी कायद्याच्या भाषेत म्हणता येते की नाही हा प्रश्न आहे. कारण तिथं जमिनी संपादित झालेल्या नाहीत. खासगी स्तरावर त्या 'खरेदी केल्या आहेत.' प्रश्नाचे पैलू असे अनेक असतात. नीट तपासणी करून मग लवासाची भलामण जरूर करावी. लवासाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य भाव दिला असेल तर लवासाला विरोधाला सामोरे जावे लागण्याचे कारणच नाही.
भ्रष्टाचार आणि ब्लॉगींग हे भारतापुरते बोलायचे तर किंचित भाबडेपण आहे. विचार, कल्पना म्हणून उत्तम. पण असे प्रयत्न सातत्यपूर्णतेने चालू राहण्यासाठी त्यामागे जो जोर लागतो तो भारतात कितपत मिळेल याची खात्री आत्ताच देता येत नाही. माहितीच्या अधिकाराइतके प्रभावी हत्यारदेखील अद्याप त्या अर्थी आंतरजालावर पूर्णपणे आलेले नाही. त्या क्षेत्रात राबणाऱ्यांची सातत्यपूर्णता केवळ कौतुकास्पद आहे. कायदा असूनही त्यांना जे काही करावं लागतं ते पाहिलं तर भ्रष्टाचारविरोधातील कायद्याची स्थिती ध्यानी घेता ब्लॉगींगमध्ये कितपत यश येईल याची साशंकता असणं गैर नाही. जागल्याचा कायदाही अद्याप पूर्णपणे आलेला नाही. अशात स्वतः काही तपास करून ब्लॉगच्या माध्यमातून लिहायचे आणि त्याचा पाठपुरावा करायचा याला रस्त्यावरच्या भाषेत सांगायचे तर खाजच असली पाहिजे.

पूर्ण सहमत

श्री मोडक यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत. पत्रकारिताच करायची आहे तर (शोषित) लोकांमध्ये जायला हवे. श्री मोडक यांचा लेख वाचल्यास बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो. मला अशा पत्रकारितेचेच कौतुक वाटते.

कळीचा मुद्दा

लवासाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य भाव दिला असेल तर लवासाला विरोधाला सामोरे जावे लागण्याचे कारणच नाही.

हा योग्य भाव ठरवताना "योग्य' कसे ठरवणार? जेव्हा कितीही भाव दिला तरी मला जर जमीन द्यायचीच नसेल तर काय? साम दाम दंड भेद अशा नितींचा वापर करुन भुखंडमाफिया जमीनींची खरेदी करतात. आम्हाला जमीन खरेदी करायची आहे. इतके इतके पैसे तुम्हाला मिळतील अशी आदेश वजा धमकी देउन तुम्हाला विकायची आहे कि नाही हा पर्यायच ठेवत नाहीत. श्रामो आपल्यासारखे लोक लेखणी परजुन लिखाण करतात म्हणुन थोडातरी वचक बसतो अन्यथा अल्पभुधारकांची हाकच माध्यमांपर्यंत पोहोचली नसती.
अवांतर- डॉ विश्वंभर चौधरी यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर् विषयावर परिसंवादात हे विषद केले आहे. त्याचे रेकॉर्डिंग माझेकडे उपलब्ध आहे. जालावर चढवीन
प्रकाश घाटपांडे

योग्य भाव

हा योग्य भाव ठरवताना "योग्य' कसे ठरवणार?

कळीचा प्रश्न. पुण्याजवळच याचे दोन दाखले बऱ्यापैकी तयार झालेले आहेत. मगरपट्टा सिटी आणि नांदेड सिटी! योग्य या शब्दाची काही व्याख्या तेथून तयार होऊ शकते. भाव या शब्दाचीही मांडणी बदलू शकते.
शेतजमिनीशी संबंधित प्रत्येक मोठ्या प्रकल्पाने पहावेच (केवळ सारे काही आदर्शच आहे अशा अर्थाने नव्हे, तर गडबड असेल तर तीही कोठे असेल आणि कशी दूर करता येईल यासाठीही) असे हे दाखले. त्याचबरोबर भारत फोर्जच्या सेझबाबतही फार मोठा (फार मोठा हे शब्द महत्त्वाचे, कारण थोडाफार विरोध झालेला मीही ऐकला आहे) विरोध झालेला दिसत नाही. त्याचेही कारण तपासता येते.

लोच्याच लोचा

ते दामल्यांनी किती तपासले? कायद्याला गुंडाळून ठेवत जमिनींचे झालेले हस्तांतर काय सांगते? ज्या गतीने जमिनींचे व्यवहार झाले आहेत, तशी गती एरवी सामान्य माणसाला अनुभवता येते का? तीच गोष्ट मुद्रांक माफीची.

म्हणजे दामल्यांना हे माहीत नव्हते की दामले अति-भाबडे आहेत. दीक्षितांनी हा प्रश्न विचारायला हवा होता.

अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून लिहिलेल्या उदो-उदो लेखावर शिव्या बसणारच. त्यांच्या जागी मी असतो तर मीही त्या शिव्या खाल्ल्या असत्या. खाव्याच लागल्या असत्या. त्यामुळे त्याविषयी कौतूक किंवा विषादही वाटून घेण्याचे कारण नाही.

अरे बापरे! दामल्यांनी बराच लोच्या केलेला दिसतो. लोच्याच लोचा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर