विकास आराखडा

विकास आराखडा की आखाडा

कुठलाही आराखडा म्हटला की त्याला नियोजन लागते. नियोजनासाठी काहीतरी प्रयोजन लागते. पुण्याचा विकास आराखडा १९८७ पासून कागदावर आहे. लोकशाही मूल्यांच्या चौकटीत राहून शहराचा विकास करायाचा हे खूप कठीण काम आहे. खरं तर तो कठीण वसा आहे.

बरं विकास तरी कशाला म्हणायचं? विकासाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळया आहेत. समजा संकल्पनाविषयी एकमत झाले तरी प्राधान्यक्रम वेगळे आहेत. शहरासमोर आज अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, गुन्हेगारी, झोपडपट्टयांची बेसुमार वाढ, शहरात वाढणारे लोकसंख्याचे लोंढे, प्रदूषण, वाहतूक, मूलभूत सुविधांचा अभाव असे कितीतरी प्रश्न प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या एकमेकांशी गुंतलेले आहेत. या प्रश्नात वाहतूक हा प्राधान्य क्रमावरचा प्रश्न आहे. वाढलेले वाहनांची संख्या आणि रस्त्यांचे क्षेत्रफळ यांचा काहीतरी प्रमाणित गुणोत्तर असते. त्याला रोड व्हेईकल इंडेक्स म्हणतात असं ऐकलय. त्याचा बट्टयाबोळ वाजलाय हेही ऐकलयं. गतिमान जीवनशैलीकडे मानवी जीवन झपाटयाने झुकतं चाललयं. त्यामुळे वाहनांची संख्या तर काही कमी होणार नाही. मग राहिले रस्त्यांचे क्षेत्रफळ. नवीन रस्त्यांचे जाळे वाढवून क्षेत्रफळ वाढवणे हा उपाय आहे. वाहतूक किंवा अन्य कुठलीही समस्या काही एका रात्रीत निर्माण झाली नाही. त्यामुळे त्याचे निराकरण ही एका रात्रीत होणार नाही. ही मानवनिर्मित समस्या आहे. बदलत्या काळानुसार शहररचनेत विकसनाद्वारे सुनियोजित बदल घडवून आणणे यासाठी शासनाचे नगररचना हे स्वतंत्र खातेच आहे. नगरनियोजन हे भविष्यात समस्या येउ नये म्हणून केलेली तरतूद असते. पण प्रत्यक्षात ती समस्या म्हणून वर्तमान काळातच येते. पुढे तिचे चित्र हे भूतकाळापासून असलेली समस्या असे होते. रस्त्यांच्या नियोजनाबाबत हेच घडताना दिसते. प्लॅनिंग ते अंमलबजावणी हा काळ किती असावा याला काहीच मर्यादा नाहीत. नागरिकांचा कृतिशील सहभाग असल्याशिवाय अंमलबजावणी शक्य होत नाही. काहीतरी प्रस्थापित करताना काहीतरी विस्थापित हाणार हा निसर्ग नियम आहे. विस्थापितांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. कारण बहुसंख्य जनतेसाठी त्यांनी केलेला तो त्याग असतो. पण ज्या जनतेचा विकास करायचा आहे त्या जनतेची मानसिकताच जर अविकसित राहिली तर विकास हाच त्यांना अडथळा, अडचण वा अन्याय वाटू लागतो. म्हणूनच विकासप्रक्रियेत जनतेलाही सहभागी करुन घेतले पाहिजे.

र.धो.कर्वे या द्रष्टया समाजसुधारकाने लोकसंख्येचा विस्फोट या समस्येचे गांभीर्य त्या काळात जाणले होते. तेव्हापासून लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी संतती नियमनाची गरज त्यांनी जाणली. त्यासाठी सतत जनप्रबोधन केले. जनतेचा रोषही पत्करला. पण त्यानंतरच लोकांची मानसिकता ही संतती नियमनासाठी अनुकूल झाली हे विसरुन चालणार नाही.

शहरात वाढणारी लोकसंख्या, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वाढता वेग व लोकाभिमुखता यांमुळे नियोजनाचा अंदाज करता येणे अवघड झाले. काही ठिकाणी नियाजन असफल झाले तर काही ठिकाणी सोल्युशन असफल झाले. ब्रिटीशांनी केलेल्या मुंबईतील रस्त्यांचे वा लोहमार्गाचे नियोजन हे आपल्याला दीर्घकाळ पुरलयं.

एखादी गोष्ट प्रस्थापित झाली की तिचे विस्थापन करणे ही बाब समाजमनाला खटकते. याच गोष्टीचा फायदा घेउन काही धूर्त लोक आपले पाय घट्ट रोवतात व आम्ही अगोदरपासूनच प्रस्थापित आहोत असे दाखवतात. अनधिकृत वा बेकायदेशीर ठरणारी झोपडपटटी व बांधकामं ही मानवतेच्या दृष्टिकोणातून अशीच अधिकृत व कायदेशीर बनतात. विकास आराखडयाच्या नियोजित राखीव जागांवर रात्रीतून अनधिकृत बांधकाम होते. काही कायद्यातील पळवाटा वा प्रशासकीय तांत्रिक बाबींचा फायदा, परस्पर उपयुक्तता, अकार्यक्षमता, उदासीनता, भ्रष्टाचार या बाबी प्रस्थापितांना प्रस्थापित होण्यास अनुकूल असतात. काही अल्पसंख्यांकांच्या फायद्यासाठी बहुसंख्यांकांची सोय वेठीस धरली जाते. कारण बहुसंख्य हे संख्येने बहु असले तरी विखुरलेले आहेत तसेच उदासीन आहेत व अल्पसंख्य हे संख्येने अल्प असले तरी संघटीत आहेत व कार्यक्षम आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांचे उपद्रवमूल्य हे बहुसंख्यांच्या उपयुक्तता मूल्यापेक्षा अधिक असते. एखादी गोष्ट प्रलंबित करायची असल्यास तिला न्यायप्रविष्ट करण्याचा सोपा व लोकशाही मूल्यांच्या चौकटीत बसणारा मार्ग सर्रास वापरला जातो. अनेक गुन्हेगार हे लोकप्रतिनिधी म्हणून उजळ माथ्याने वावरताना दिसतात कारण आरोप सिद्ध होईपर्यंत तो निरपराध आहे असेच मानले जाते. ते नैतिक व कायदेशीर दृष्टया योग्यही आहे. अपराध सिद्ध होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत त्याचे आयुष्य सुद्धा सरुन जाते. न्यायालयाचा निकाल लागून समजा दोषारोप सिद्ध झाला तरी त्यामुळे जे काही 'गमवावे` लागते ते 'कमावले`ल्याच्या मानाने नगण्य असते. त्यामुळे हा 'सौदा` घाटयाचा होत नाही.

विकास आराखडा असो किंवा कुठलीही लोकहिताची योजना असो, इच्छाशक्ती, नियोजन व अधिकार या तीन गोष्टी एकत्र आल्या तरच यशस्वी होउ शकतात. कुठल्याही एका गोष्टीचा जरी अभाव असला तरी परिणाम हा अर्थशून्य. पुणे शहराचा आराखडा हा जर विकासाच्या दृष्टिने आखला असेल तर तो यशस्वी करण्यासाठी त्याचा ध्यास घ्यावा लागेल. प्रशासनाला कधी सामंजस्याने तर कधी कर्तव्यकठोर बनून निर्णय घ्यावे लागणार आहेत. नागरिकांनीही हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. हक्काचे वेळी पुढे आणि कर्तव्याच्या वेळी मागे असा कावेबाजपणा सोडून दिला पाहिजे.

जुन्या वाडयात भाडेकरु व घरमालक यांचे वाद पाहिले तर मुलामुलींच्या नावावर सदनिका घेउन त्या भाडयाने देउन स्वत: भाडेकरु म्हणून गैरसोयीसुद्धा सहन करत हक्क गाजविणारे भाडेकरु काही कमी नाहीत. घरमालकच विस्थापित होउन कटकट नको म्हणून दुसरीकडे राहायला जाणारी उदाहरणेही कमी नाहीत. अन्याय होत असल्याचा कांगावा करुन न्यायप्रक्रियेलाच वेठीस धरण्याचे काम काही धूर्त लोक करीत असतात. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्यास शिक्षा होता कामा नये या तत्वावर आधारलेल्या न्यायसंस्थेला फारच जागरुक रहावे लागते. त्यामुळे विकास आराखडयात बहुसंख्यांचा विकास करताना अल्पसंख्याकांचा बळी तर जाणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे विकास ही जनमताच्या रेटयांची लढाई बनते. त्यावर पोळी भाजून घेणाऱ्या स्वार्थाची लढाई बनते. लोकशाहीत त्याला जनहिताचे परिमाण द्यावे लागते. स्वार्थ आणि परमार्थ यांचे गुणोत्तर ठरविणारी राजकीय गणित वा समीकरणं तयार होउ लागतात. पुढे हा राजकारणातला मुद्दा बनतो पण प्रशासनातला गुंता बनतो.
चला तर तुम्ही आम्ही आपण सगळेच या शहराच्या विकासात हातभार लाउ या. आपापसातले हेवे दावे, प्रतिष्ठा, मानापमान बाजूला ठेउन शासनास सहकार्य करु या. आपण हे केले नाहीत तर आपली पुढची पिढी आपणांस कधीही माफ करणार नाही हेच आमचे भाकित.

[ पुर्वप्रसिद्धी दै. लोकसत्ता १४ फेब्रुवारी २००५] याची फोटोप्रत इथे बघता येईल

Comments

दृष्टी

कोणत्याही गोष्टीचे नियोजन हे महत्वाचे आहेच. त्यात जर तो शहराचा गावाचा विकास आराखडा असेलत तर तो सर्वात जास्त महत्वाचा आहे. पण हे आम-आदमीला समजणे जरा अवघडच. तसेच नियोजनासाठीची दुरदृष्टी खरच कितपत दुर असते हा एक चर्चेचा मुद्दा आहे. माझे वैयक्तिक मत असे आहे कि पुढच्या काही पिढ्यांचा विचार व्हायला हवा. पण भारतात नियोजन हे अनेकदा चुकलेल्या आराखड्यावरच्या तात्पुरत्या उपाय योजनांवरच होते. त्यामुळे तेल ही गेले तुप ही गेले हाती धुपाटणे आले अशी अवस्था आहे.

मराठीत लिहा. वापरा.

हं

>>आपण हे केले नाहीत तर आपली पुढची पिढी आपणांस कधीही माफ करणार नाही हेच आमचे भाकित.

खरे आहे. नातवाने आमच्या आजोबांनी २००५ मधे लिहिले पत्र आजही किती लागू होते असे म्हणून पुर्नप्रकाशीत केले तर ती आपल्यासाठी नक्कीच लज्जास्पद बाब असेल. मला वाटते ह्याबाबत कोणाचे दुमत नसेल.

>>चला तर तुम्ही आम्ही आपण सगळेच या शहराच्या विकासात हातभार लाउ या. आपापसातले हेवे दावे, प्रतिष्ठा, मानापमान बाजूला ठेउन शासनास सहकार्य करु या.

मग ह्या पुढची चर्चा ठोस प्रस्ताव, आपण आपल्यापरीने काय करू शकतो ते विकल्प अशी चालू ठेवायची का?

आपण लोकशाही म्हणतो, लोकनियुक्तसरकार म्हणतो पण त्यांच्यात ही धमक आहे का, कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची? शहरविकास हा शेवटी नोकरशाही, प्रशासन ह्यांच्या हातूनच होणार. राजकीय नेतृत्व थोडेफार दिशा व कालावधी ठरवणार. कधीकधी वाटते की अजून एक्, दोन पिढ्यांनी जेव्हा किमान ७०% जनता "साक्षर् व जाणती" असेल् तेव्हा तिला ह्याचा कंटाळा येईल कारण प्रसार् माध्यमातून इतर सगळे देश "नगर रचना"करून पुढे गेलेले दिसतील मग जाण येईल.

तोवर आपण जनहीत याचीका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाकडून . त्यातल्या त्यात जाणत्या राजकीय नेतृत्वाकडून, वजनदार (प्रभावी) उद्योजकांकडून जरा तरि सुसह्य परिस्थीती करवून घेण्यात वेळ घालवणार. एक् दोन पिढ्या परहॅप्स

आत्त्ताचे शहर भरवून टाकणारे स्थलांतर टाळण्यासाठी , उपशहरे विकास तसेच ग्रामीणविकास जोरदार केला पाहीजे. तसेच अगदी नवीन नगररचना विकास आराखड्यानेच नवीन शहरे निर्माण केली पाहीजेत जेणे करून ह्यापुढे जो विकास् होईल त्याची योग्य दिशा पक्की झाली पाहीजे.

--------------------------------------------------------------------------------------------
बरेचदा अमुक लोकांचे लांगुलचालन, अनुनय केल्याने अमुक तमुक ऐकतो. मला वाटते भारतीय सर्व राजकीय नेतृत्वाने नेहमीच आपापल्या मतपेट्यांचे लांगुलचालन, अनुनय व वैयक्तिक तुमड्या भरण्यात सर्व राजकीय प्रवास् केला आहे. खूप थोडे द्र्ष्टे नेतृत्व (राजकीय तसेच नोकरशाही)मिळाले आहे. लोकशाहीने लोकांना (पर्यायाने स्वतःला) खुश करण्याच्या नादात "सत्य, न्याय, (भविष्याच्या दृष्टिने)योग्य "गोष्टी करणे टाळले आहे. असो सुजाण लोकशाही येईपर्यंत हे असेच चालायचे. संक्रमणाच्या काळात आहोत हेच खरे. सध्यातरी जातीयवाद निर्मुलन, मानवी हक्क ह्या अश्या सामाजीक सुधारणा गोष्टींवर काम करण्यात धन्यता. त्याही तेवढ्याच महत्वाच्या आहेत म्हणा.

आघाडी सरकारे

आपण लोकशाही म्हणतो, लोकनियुक्तसरकार म्हणतो पण त्यांच्यात ही धमक आहे का, कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची?
जोवर भारताता आघाडी सरकारे आहेत तो वर हे अवघड आहे. अशक्य नाही. असे निर्णय घेण्यासाठी एकाच पक्षाचे आणि अत्यंत स्पष्ट बहुमत असणारे सरकार हवे. आणि असे सरकार असणे हि नागरिकांची जबाबदारी आहे.

मराठीत लिहा. वापरा.

हं

आघाडी सरकारे असण्यातच राजकीय पक्षांचा फायदा आहे का हे जरा बघीतले पाहीजे.

खरे आहे की बहुमत असेल तर अवघड निर्णय घेणे सोपे होईल. म्हणूनच मी मागे तामीळ मतदारांचा उल्लेख केला होता. तसे करायला हरकत नाही.

पण मला एकदा असेही वाटते की बघा भाजप, काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन महीला आरक्षण, अजून काही मुद्यांवर एकत्र येऊन बराच काळ भिजत असलेली घोंगडी वाळत टाकायला लागली तर काय तोटा होणार आहे ह्या पक्षांचा मला कळत नाही. चांगली, योग्य कामे करायला ती संसदेतील ५५२ मंडळी का बरे एकत्र येऊ शकत् नाहीत (जसे संसदसदस्यांच्या पगारवाढीला एकत्र येतात)? नगरविकास ह्या सारखी महत्वाची कामे जर सर्वच जण एकत्र येऊन करू लागली तर कुणा एकाचा तोटा नसेल ना त्या अप्रिय निर्णयात. पणा स्वहीतापुढे देशहीत गौण आहे त्यांना बहूतेक.

श्रेय

मुद्दा श्रेय लाटण्याचा असतो. तिथेच घोडे अडते. खरतर, हे दोन पक्ष काही काळा करता देश हितासाठी एकत्र आले तर बाकिचे पक्ष नाहिसे होण्यात मदत होइल. पण हे म्हणजे सुर्य पश्चिमेला उगवण्याची भाषा करण्यासारखे आहे. परत मुद्दा तोच येतो ना? या दोन पक्षांनी एकत्र येण्याची अपेक्षा करण्या पेक्षा राष्ट्रीय पातळीला २ अथवा ३ पक्षांनाच निवडणुक लढायची तरतुद व्हायला हवी. बाकिच्यांना प्रदेशा पुरते मर्यादित ठेवायला हवे. याने प्रदेश आणि देश या दोहोंचा विकास होण्यास मदत होइल. देश पातळीवरचे प्रश्न आणि राज्याचे प्रश्न वेगवेगळे आहेत.
या पेक्षा राजकिय पक्षांनी समंजसपणा दाखवणे जास्त योग्य वाटते. समविचारी पक्षांनी आपापसात निर्णय घेउन कोण राज्य पातळीवर आणि कोण राष्ट्रीय पातळीवर असे ठरवल्यास बहुमताकडे वाटचाल जास्त सोपी होइल. काही प्रमाणात राजकिय बदल होत आहेत. पुण्यात कलमाडींना बाजुला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना एकत्र आलेच. कोणा एकाची सत्ता येणे फारसे सोपे नव्हते हे प्रत्येकाला माहित होते. या पावसाळ्यात पुण्यात मागच्या पावसाळ्यासारखे रस्ते नव्हते हे खरे आहे.
मजेशीर गोष्ट ही आहे कि, भाजपाने आमच्या बरोबर युती करायची इच्छा दर्शविली होती म्हणणारे राज ठाकरे पुण्यात मात्र काँग्रेसला साथ द्यायला तयार होते.

मराठीत लिहा. वापरा.

ऍन्टीइन्कन्बन्सी

जोवर भारताता आघाडी सरकारे आहेत तो वर हे अवघड आहे. अशक्य नाही. असे निर्णय घेण्यासाठी एकाच पक्षाचे आणि अत्यंत स्पष्ट बहुमत असणारे सरकार हवे. आणि असे सरकार असणे हि नागरिकांची जबाबदारी आहे.

एखाद्या पक्षाला मत देणे म्हणजे याचा अर्थ मतदार त्या पक्षाला अनुकुल आहे असे नाही. Anti-incumbency बद्द्ल ( मराठी प्रतिशब्द सुचवा) http://www.reference.com/browse/wiki/Anti-incumbency इथे वाचा. जेव्हा कॉंग्रसच्या पराभवाची जबाबदारी घ्यायची कुणी हा प्रश्न आला त्या वेळी ही आयडिया सुचली.
आणि राजकारणात कुणी कुणाचा कायम मित्र नाही वा शत्रु नाही जनतेला थुका लावणे हा समान कार्यक्रम एकमताने यशस्वी होतो.
प्रकाश घाटपांडे

सामाजिक जाणीव

घाटपांडे साहेब,

आपला लेख वाचून आपल्यापतली आपल्या समजाप्रती असणारी तळमळ दिसून येते. आपल्यासारखे सामजिक बांधिलकी असणारे लोक अजूनही अजूबाजूला आहेत हे पाहून आनंद झाला.

या नगरविकास खात्यांचे नेतृत्व आपल्या सारख्या सामाजि़क जाणीव असणार्‍या माणसाकडे सोपवले पाहिजे. कारण ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याकडे इच्छाशक्तिचा अभाव असल्याने व विकासापेक्षा त्याच्या श्रेयावरच डोळा असल्याने आराखड्यांचे आखाडे होत आले आहेत. हे थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी मिळून समाजप्रबोधन केले पाहिजे जेणेकरून आपल्यासारखा सामाजिक जाणीव असणार्‍या व्यक्तिकडे जनता अधिकार सोपवेल.

वर चर्चेत म्हटल्याप्रमाणे आपण सारे मिळून सुरुवात करु या. बोला सुरुवात कशी कोठून करायची?

आपला,
(पुणेरी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

आपण करायचे काय ?

खरे तर आम्ही आपले सर्व लेखन आवडीने वाचतो, ( क्षणभर:) )विचाराला चालना मिळते आणि अशा प्रश्नाचे एक ठरलेले उत्तर , जाऊ द्या ! आपल्याला काय करायचे आणि सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे असे म्हणतो ,पण अशी सुरुवात करणे जोखमीचे आणि निराशा निर्माण करणारे असते. तुम्ही म्हणाल काय निगेटीव्ह विचाराचा माणूस आहे, पण खरे सांगू का ? लोकनेर्तुत्वानेच विकासाचा विचार केला तर हे शक्य आहे असे वाटते आणि नेत्यांच्या बद्दल आपण बोलून बोलून थकून गेलो आहोत, त्यांना नगरविकास केला पाहिजे हे का कळत नसावे का ? पण संवेदना हरवलेली जनता आणि निगरगट्ट कातडीचे हे नेते ,ज्यांच्या मेंदूत खाण्याचे किडे वळवळत असतात ते काही विकास करु शकतील यावर आमचा विश्वास नाही. स्वार्थाविरहीत एखादी सामाजिक चळवळ आणि त्या नेर्तुत्वाने भविष्यात काही विकासाच्या कल्पना राबवल्या तरच ते शक्य आहे आणि नाहीच जमले तर , विकासाचे स्वप्न पाहण्याचे आपण कुठे थांबवले आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

योग्य मुद्दे

आपले मुद्दे योग्यच आहेत. मला वाटते हा लेख मी आधी वाचला आहे, पण आत्ता जे वाटते आहे ते पटकन लिहीते.

पुण्यातला सर्वात मोठा प्रश्न सध्या वाहतुकीचा आहे. प्रचंड प्रमाणावर दोनचाकी वाहने रस्त्यावर असणे यामुळे वाहतूक आणि रहदारी नको इतकी वाढली आहे. यासाठी काही ठिकाणचे रस्ते रूंद केले गेले, नव्याने रस्ते निर्माण केले तर काहीच प्रश्न नाही. यासाठीच विकासाचे आराखडे लागतात. पण पुण्याचा ८७ चा विकास आराखडा पाहिल्यास त्यानंतर त्यात अनेक राखीव जागा निर्देशित करून त्यात deleted -included in residential zone असे उल्लेख घातलेले आढळतात. आराखड्यात मागाहून दुरुस्त्या होणार हे अर्थातच मान्यच आहे, पण जर त्या स्थानिक जनतेच्या संमतीविना आणि यंत्रणेतील पळवाटा शोधून झाल्या तर त्या आराखड्याला अर्थ उरत नाही. विकासात लोकांना सहभागी करून घ्यायचे असल्यास त्यांना योग्य माहितीही द्यायला हवी. येथील पीडीएफ् फाईली बघा. प्रत्येक खेड्याचा एक नकाशा देऊन विकास आराखडा जाहीर करण्याची ही पद्धत अपुरी आहे (त्यात वापरलेले फॉन्टही योग्य नाहीत). जरी स्थानिक लोकांना आपापल्या जमिनीचे काय होते आहे हे कळत असले तरी पूर्ण गावाचे नक्की काय होते आहे ह्याचे लिखित (डॉक्युमेंटेशन) हवे आणि तेही नकाशांसमवेत असायला हवे. त्यामुळे माझ्या मते खरा प्रश्न हा आहे की हे होणे कसे टाळायचे? यासाठी माझ्या मते कोणत्याही प्रकारे शासनाला लोकाभिमुख करणे हे महत्त्वाचे आहे.

हे सर्व झाल्यावर गावाचा विकास व्हावा म्हणून शासनाला सहकार्य लोक करतीलच. पण त्यासाठी नक्की विकास कोणत्या जागांचा आणि कशा स्वरूपात होतो आहे हे जनतेला कळले पाहिजे. जनमत तयार करताना धरले तर चावते, सोडले तर पळते अशी काहीशी अवस्था असते (लिटरली घेऊ नये, भावार्थ अपेक्षित आहे). त्यामुळे बर्‍याचदा शासन लोकांसाठी निर्णय घेऊन टाकते आणि लोक विरोधात जातात.

 
^ वर