येत्या दशकाची भाकिते - स्वामिनाथन अय्यर

स्वामिनाथन अय्यर आपल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या आणि प्रसंगी वादग्रस्त लेखनामुळे ओळखले जातात. मागे उपक्रमावर त्यांच्या "काश्मीरचा स्वातंत्र्यदिन" (भाग आणि ) लेखाचा अनुवाद मी दिलेला होता. नुकताच त्यांचा येत्या दशकाविषयी भाकितांचा मजेशीर लेख वाचण्यात आला. तो थोडक्यात इथे देत आहे. यावरून तुम्हाला काय वाटते? काय पटण्यासारखे आहे, काय न पटण्यासारखे आहे, काय अगदीच अशक्य/अतर्क्य आहे? येत्या दशकात काय काय होऊ शकेल असे तुम्हाला वाटते?

लेखाचे शीर्षक "२०२० पर्यंत भारत चीनला मागे टाकेल" असे आहे.

पूर्वीच्या दशकांमध्ये भूकबळी, आंतरराष्ट्रीय मदत, लाचखोरी, भ्रष्टाचार इत्यादीमध्ये भारत आघाडीवर होता. अत्यंत अकार्यक्षम अश्या या देशाचे गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत 'उदयास येणारी जागतिक महासत्ता' असे रूपांतरण झाले. येत्या दशकात आणखी काय होऊ शकेल याविषयीची ही आठ भाकिते:

  1. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत चीनला मागे टाकेल. वाढत्या वयाच्या आणि कमी होत जाणार्‍या कामगारवर्गामुळे चीनच्या वाढीचा वेग कमी होईल. चीनला आपल्या चलनाचे फेरनियमन करावे लागेल. ८० च्या दशकात सर्वार्थाने प्रगतीपथावर असलेल्या जपानचा वाढीचा वेग ९० च्या दशकात मंदावला तसेच. चीनची निर्यातावर आधारित अर्थव्यवस्था मोडकळीस येईल कारण चीनचे निर्यात उत्पादन पचवण्याची जगाची क्षमता कमी होईल (किंवा त्या गतीने वाढणार नाही.) याउलट भारताला अधिकाधिक शिक्षित कामगारवर्गामुळे फायदा होईल. भारतातील मागासलेली राज्ये हळुहळू प्रगत होतील आणि भारताचा विकासदर २०२० मध्ये १०% वर पोहोचेल आणि चीनचा विकासदर मात्र ७-८% पर्यंत कमी होईल.
  2. अमेरिकेला मागे टाकून भारत जगातील सर्वात मोठा इंग्रजी बोलणारा देश होईल. जागतिक प्रकाशन व्यवसाय त्यामुळे भारताकडे अधिकाधिक आकर्षित होईल. रुपर्ट मरडॉक चे वंशज त्यांचा कोसळणारा व्यवसाय भारतीय व्यावसायिकांना विकतील. न्यू यॉर्क टाइम्स एका मोठ्या भारतीय प्रकाशन संस्थेचा हिस्सा बनेल.
  3. २००० साली भारताला अण्वस्त्रसज्ज प्रगत देशांच्या समूहात स्थान मिळाले. २०२० पर्यंत भारतीय कंपन्या या अणुतंत्रज्ञान सामग्री बनवणार्‍या/विकणार्‍या आघाडीच्या कंपन्या असतील.
  4. भारतात स्थायुरूपातील नैसर्गिक वायू (गॅस हायड्रेट्स) चा जगातील सर्वात मोठा साठा आहे. अमेरिका आणि कॅनडाच्या मदतीने भारत त्यातून नैसर्गिक वायू (नॅचरल गॅस) बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करेल आणि जगातील सर्वात मोठा उत्पादक बनेल. वीज उत्पादनात दगडी कोळश्याची जागा नैसर्गिक वायूने घेतल्याने भारताचे कार्बन-उत्सर्जन कमी होईल.
  5. गंगेचे खोरे, आसाम, राजस्थान आणि गुजरात येथे विशिष्ट प्रकारच्या दगडांतून मिळणार्‍या नैसर्गिक वायूंचे (Shale gas) प्रचंड साठे मिळतील. नव्या तंत्रज्ञानामुळे या प्रकारचा वायू मिळवणे सोपे झाले आहे त्यामुळे भारत जगातील आघाडीचा उत्पादक आणि निर्यातदार होईल. इराणमध्ये मुल्लांची इस्लामी सत्ता उलथून टाकून लोकशाही सरकार अस्तित्वात येईल. त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग वाढून इराणमध्ये नैसर्गिक वायूंचा तुटवडा होईल. इराण-भारत वायुवाहिनीचा उपयोग भारतातील वायू इराणकडे नेण्यासाठी होईल.
  6. भारतातील अनेक विभाग स्वतंत्र राज्याची मागणी करतील. २०२० पर्यंत भारतात सध्याच्या २८ ऐवजी ५० राज्ये असतील. नवीन राज्ये लहान असतीलच असे नाही.
  7. भारताच्या वाढत्या प्रभावाने चिंतित होऊन चीन उत्तर सीमेवर तणाव निर्माण करेल. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटपासून चीनच्या दुष्काळी भागाकडे वळवण्याची चीन धमकी देईल. तर भारत असा कोणताही प्रकल्प बॉम्बने उडवून देण्याची धमकी देईल. हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीकडे जाईल.
  8. इस्लामी मूलतत्त्ववादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आपल्या ताब्यात घेतील. अमेरिका आपले सैन्य या भागातून काढून घेईल आणि भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारताला वाढत्या आतंकवादाचा सामना करावा लागेल पण अर्थव्यवस्थेची वाढ होतच राहील. कसे काय? दर वर्षी ३००० लोक मुंबईच्या लोकल ट्रेनमधून पडून मरतात पण त्याने मुंबईची वाढ थांबत नाही. आतंकवादाने भारत त्रस्त झाला तरी विकास थांबणार नाही.

मूळ लेख: India to overtake China in 2020: Swaminathan Aiyar

Comments

प्रताधिकार?

ह लेख टैम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातील एका लेखाचे भाषा॑तर आहे.
या साठी प्रताधिकार घेतला आहे का?

या वृत्तपत्राने आपल्या संस्थळाने आपल्या मजकूराचे सर्व अधिकार राखिव ठेवले आहेत.

माझ्या मते भाषांतराची परवानगी घेतली नसेल तर येथे प्रताधिकार परवानगी नियमाचा सरळ सरळ भंग होतो आहे.

संपादक याकडे लक्ष देतील काय?
उपक्रम यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडू शकेल असे वाटते.
(किंबहूना लेख प्रकाशिअ झाला आहे त्यामुळे तसा भंग झालाच आहे, त्यामुळे सापडलेच आहे!)

उपक्रमावर लेखन करतांना लेखन व विचार शुचितेच्या
नावाने सदैव जागरूक असणार्‍या (शंख करणार्‍यांकडून?) तरी अशी अपेक्षा नव्हती!

आपण या साठी आधीच प्रताधिकार घेतला असल्यास, हा प्रतिसाद बाद समजावा!

आपला
गुंडोपंत
असो,
एकुण कसा का होईना पण
भाकित या प्रकारात आपला रस जागृत झाल्याचे पाहून अंमळ गंमत वाटली.

आमचे भाकीत

संपादक याकडे लक्ष देतील काय?
उपक्रम यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडू शकेल असे वाटते.
(किंबहूना लेख प्रकाशिअ झाला आहे त्यामुळे तसा भंग झालाच आहे, त्यामुळे सापडलेच आहे!)

आमचे भाकीत असे कि अशी इष्टापत्ती उपक्रमावर येण्याचे भाग्य उपक्रमाला नाही अशी उपक्रमाची पत्रिका सांगते. फेअर युज नावाचा ग्रह लेखकाच्या व उपक्रमाच्या पत्रिकेत असल्याने तो असे भाग्य वाट्यास येउ देत नाही.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद | कळकळ कश्याची? | अंमळ गंमत

माझ्या मते भाषांतराची परवानगी घेतली नसेल तर येथे प्रताधिकार परवानगी नियमाचा सरळ सरळ भंग होतो आहे.

तुमचे मत नोंदवल्याबद्दल धन्यवाद. हे लेखन फेयर यूज अंतर्गत मोडावयाला हरकत नाही. तसेच तुम्ही दिलेल्या दुव्यावरही नॉन-कमर्शियल यूज चालेल असे दिले आहे. कुतूहल म्हणून अधिक शोध घेतला असता भारत सरकारच्या एका संकेतस्थळावर खालील माहिती आढळली

If copyright protection is applied rigidly, it can hamper progress of the society. However, copyright laws are enacted with necessary exceptions and limitations to ensure that a balance is maintained between the interests of the creators and of the community.
....
Subject to certain conditions, a fair deal for research, study, criticism, review and news reporting, as well as use of works in library and schools and in the legislatures, is permitted without specific permission of the copyright owners
....
Some of the exemptions are the uses of the work
1. for the purpose of research or private study,
2. for criticism or review,
3. for reporting current events,
4. in connection with judicial proceeding,
5. performance by an amateur club or society if the performance is given to a non-paying audience, and
6. the making of sound recordings of literary, dramatic or musical works under certain conditions.
....

असो. मला यात अधिक शिरायचे नाही. उपक्रमच्या व्यवस्थापकांना वाटले तर ते योग्य तो निर्णय घेतील.

लेखन व विचार शुचिता म्हणजे काय? नेमकी कळकळ कश्याची?

उपक्रमावर लेखन करतांना लेखन व विचार शुचितेच्या नावाने सदैव जागरूक असणार्‍या (शंख करणार्‍यांकडून?) तरी अशी अपेक्षा नव्हती!

काही मुद्द्यांवरील वैचारिक विरोधाला व्यक्तिविरोधाचे रूप देऊन, संधी मिळेल तेथे पॉइंट स्कोअर करण्याचा प्रयत्न करणे याची तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी काय? तसेच "लेखन व विचार शुचिता" म्हणजे काय? निराधार दाव्यांना हे कश्यावरून असे विचारणे (उदा. ग्रहयोगांमुळे होणारा रक्तस्राव, देवी, गोवर इ.), संदर्भ मागण्यात केला जाणारा दुटप्पीपणा दाखवणे (उदा. प्रतिसाद), तुमच्या लेखात मांडलेल्या तर्कातील विसंगती (सभ्य वगैरे शब्दात) दाखवणे (उदा. प्रतिसाद १, प्रतिसाद २, प्रतिसाद ३) म्हणजे "लेखन व विचार शुचितेच्या नावाने शंख करणे" असे आहे काय?

यावरून तसेच या प्रतिसादाच्या एकंदर आवेशावरून तुमची कळकळ प्रताधिकार कायद्याविषयी आहे, उपक्रमाविषयी आहे की आणखी कश्याविषयी आहे हे कोणाला वेगळे सांगायची गरज नाही.

भाकितांतला रस आणि 'अंमळ गंमत'

भाकित या प्रकारात आपला रस जागृत झाल्याचे पाहून अंमळ गंमत वाटली.

तुम्हाला कश्यामुळे 'अंमळ गंमत' वाटावी हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. पण भाकित (फोरकास्ट/प्रेडिक्शन) हे बहुतेक सर्व क्षेत्रात करावे लागतेच. अत्याधुनिक वैज्ञानिक क्षेत्र असो, संगणक व्यावसायिक असोत, बँका/वित्तिय संस्था असोत किंवा छोटे उद्योजक व्यापारी असोत सर्वांना प्रसंगी फोरकास्टिंग करावे लागते. भाकितामध्ये आम्हाला रस आहेच, म्हणूनच कोणीही केलेली भाकिते आम्ही बारकाईने पाहतो, हे निष्कर्ष कसे काढले, याला काय आधार आहे, तर्क काय, काय निरीक्षणे नोंदवली आहेत इ. इ. पण तुम्ही केलेल्या संतती लाभ, जन्म होताना रक्तस्राव इ. दाव्यांना आम्ही तेच निकष लावले तर त्यावेळी तुम्हाला 'अंमळ गंमत' वाटत नाही. इतर काही 'नच संशोधन ही तर कला' अशी भूमिका घेतात. पण म्हणून कोणी "देवी, गोवर इ. रोग विशिष्ट ग्रहयोगाने होतात" असे किंवा "लग्नीराहु म्हणजे पुर्व-ईशान्य, पुर्व, पुर्व आग्नेय भागात संडास, बाथरुम नक्की असणार." असे किंवा "चतुर्थची बुधरास व गुरुची सप्तमात दुष्टी असल्याने मुख्य करुन घराचे प्रवेश व्दार उत्तरेस आणि संकुलाचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिणेस असणार व मुख्य जीना पश्चिमे कडुन पुर्वकडे असणार" अशी भाकिते करू लागले तर त्याची चिकित्सा करणे आवश्यक आहे, नुसती 'अंमळ गंमत' वाटून कसे चालेल?

दुवा

भारत सरकारच्या एका संकेतस्थळावर खालील माहिती आढळली

दुवा रोचक आणि अतिशय उपयुक्त आहे, या शोधाबद्दल धन्यवाद!
मी वर माझ्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे माझा प्रतिसाद बाद समजायला हरकत नाही.
पण बेनेट आणि कोलमन कंपनीच्या लेखाचा हा उपयोग बेनेट आणि कोलमन कंपनीला कळवणे बंधनकारक आहे का या विषयी मात्र काही कळले नाही.

यात वसंतराव आणि तुम्हीही म्हणत असल्या प्रमाणे स्कोर वगैरे सेटल करण्याचा काही भाग नव्हता, अन्यथा मी प्रतिसाद बाद समजावा असे विधान केलेच नसते.
असो, मर्जी आपली आपली.

या प्रतिसादाच्या एकंदर आवेशावरून कोणता आवेश? कोणत्या शब्दात तुम्हाला जाणवला हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

काही मुद्द्यांवरील वैचारिक विरोधाला व्यक्तिविरोधाचे रूप देऊन, संधी मिळेल तेथे पॉइंट स्कोअर करण्याचा प्रयत्न करणे याची तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी काय?

आपण काय अपेक्षा ठेवावी हे ठरविणारा मी कोण? व्यक्तीविरोध मात्र नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो.
बाकी तुमचे आणि आणि वसंतरावांचे शब्द सारखेच येत असलेले पाहून परत मौज वाटते आहे.
तसेच पुराव्याअभावी लोकांची जाणूनबुजून दिशाभूल करणारे लेखन उपक्रमावर असावे का?

असे तुमचेच वाक्य होते ना? या तुमच्या वाक्याबद्दल आणि वरील लेखाचे स्वरूप या बद्दल विचार शुचितेच्या नावाने शंख करून
वादही मला सुरु करता आला असता.
पण मी तसे काहीही केले नाही. यावरून तुम्हाला स्पष्ट व्हावे की मला व्यक्तीविरोध अपेक्षित नाही. असो, तुम्ही काय लिहावे या बद्दल मला काही म्हणायचे नाही/नव्हते त्याबद्द्ल मी काहीही लिहिलेले नाही.

तुमच्याच वाक्या प्रमाणे असेल तर वरील लेखाला कसले पुरावे आहेत ते मला दिसले नाहीत. इतकेच नाही खाली अनेक प्रतिसादात इतर सदस्यांनी वरील दावे कसे फोल आहेत, असु शकतात हे पण दिले आहे. पण मी तो वाद टाळला आहे, माझ्या वर्तणूकीतील हा चांगला भागही दिसायला काय हरकत आहे, असा मला प्रश्न पडला आहे.

तुमचा वाद असलाच तर त्या त्या प्रतिसादकर्त्या सदस्यांशी असु शकतो, माझ्याशी नाही, कारण माझा प्रतिसाद बाद आहे हे जाहिर आहेच! माझ्या सारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाच्या मागे लागण्यापेक्षा, झेपत असेल तर खाली आलेल्या प्रतिसादांना उत्तरे द्या ना. आणि माझ्या सारख्या मठ्ठ माणसाला गप्प करणे सहजच सोपे आहे, त्यात काय ते विशेष?

बाकी देवी, गोवर आणि दिशा आणि शुभ अशुभा विषयीचे दुसर्‍या कुणाचे विचार माझ्या तोंडी घालू नका. मी कधीच असले दावे केलेले नाहीत. मी जे काही म्हणालो आहे ते शक्यतेच्या स्वरूपात आहे. त्यामागची कारणे हवी असतील तर त्याची पद्धत मी स्पष्टपणे दिली आहे. या उप्पर तुम्हाला जे काही प्रश्न असतीत ते त्या त्या सदस्याला विचारा, मला नाही!
सदस्य नावात आणि प्रतिसादात गल्लत होत असेल तर माझे नाव गुंडोपंत आहे हे मी स्पष्ट करू इच्छितो!

माझ्या लेखात विनोबांचे उदाहरण होते त्याप्रमाणे रुंदी विरहीत रेखा काढताच येत नाही तेथे कागद आणि पेन्सिल घेवून अनुमान काढून दाखण्याची भाषा केल्यावर मला हसूच आले. त्याला मी काय उत्तर देणार? तुम्ही हुषार आहात, महान आहात, तुमचे लॉजिक ग्रेट आहे, चालू द्या...! अजून काय म्हणू शकतो मी? मी कसे वागायचे हा निर्णय मी घेतला आणि मला हेकट वाटणार्‍या वादापासून दूरच राहणे पसंत केले.

आणि या शिवाय मी माझ्या अल्पबुद्धीला अनुसरून, मला जमतील तशी सर्व उत्तरे त्या त्या वेळी दिलेली आहेत.
जेथे शक्य नव्हते तेथे स्पष्टीकरण दिले आहे. उपक्रमवर प्रत्येक गोष्टीला वाचकांच्या समाधानापर्यंत उत्तरे दिलीच पाहिजेत असा नियम असल्याचे मला माहिती नाही, मला कुठेही दिसला नाही, वाचनात आला नाही. शिवाय मी त्या विषयातला विद्यार्थीच आहे अधिकारी नाही!

इतर सदस्यांपुढे मी सुमार बुद्धीचा माठ आहे हे जाणून, नम्रपणे आणि गमतीत 'ऐकुन घेतो म्हणून' माझ्या मागे त्याच त्या प्रतिसादांची परत परत भुणभुण लावायची नाही!

आपला
गुंडोपंत
(अविश्वासार्ह, कुडमुड्या)

फेअर यूज

जालावर जेंव्हा दुसर्‍या संकेतस्थळाचा दुवा किंवा संदर्भ दिला जातो तेंव्हा त्या मजकूराचा मूळ स्त्रोत कोण आहे हे समजत असल्यामुळे तो फेअर यूज होतो असे वाटते. भाषांतर करण्यासाठी मूळ स्त्रोताची परवानगी घेणे आवश्यक असावे.
चन्द्रशेखर

विकासदर

विकासदर जितका जास्त तितका देश अधिक पुढारलेला असे अजिबात नसते. किंबहुना सर्व प्रगत देशांचा विकासदर हा किरकोळच असतो. त्यामुळे भारताने विकासदरात चीनला मागे टाकले म्हणजे सरसकट India to overtake China असे म्हणणे हा स्वामिनाथन ह्यांचा चावटपणा आहे. जपान आणि अमेरिका ही प्रगत राष्ट्रे आहेत त्यांचा विकासदर चीनच्या तुलनेत नगण्य आहे पण म्हणून कोणी "चायना हॅज ओव्हरटेकन यू.एस अँड जपान" असे म्हणत नाही.

असो..लेखाचा अनुवादित सारांश इथे दिल्याबद्दल आभारी आहे. मागचे स्कोर सेटल करण्यासाठी दिलेले आकसपूर्ण प्रतिसाद दुर्लक्षीत करावेत.
उपक्रमाला कसलाही धोका नाही (हे कायदा तज्ञांशी सल्लामसलत करुन सांगत आहे)

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विकासदर आणि विकास

विकासदर जितका जास्त तितका देश अधिक पुढारलेला असे अजिबात नसते. किंबहुना सर्व प्रगत देशांचा विकासदर हा किरकोळच असतो. त्यामुळे भारताने विकासदरात चीनला मागे टाकले म्हणजे सरसकट India to overtake China असे म्हणणे हा स्वामिनाथन ह्यांचा चावटपणा आहे.

अगदी बरोबर. स्वामिनाथन असोत किंवा इतर अनेक विशेषज्ञ (विशेषतः वृत्तवाहिन्यांवर येणारे) असोत त्यांच्या विश्लेषणातून विकासदर म्हणजे प्रत्यक्ष विकासाचा निदर्शक असे चित्र उभे राहते की काय असे वाटते. भूतान, इथियोपिया, रवांडा यांचा विकासदर भारताच्या विकासदरापेक्षा जास्त आहे याउलट अनेक विकसित देशांचा विकासदर भारतापेक्षा कमी आहे. त्यामुळे तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे.

विशफुल थिंकिंग

स्वामीनाथन अय्यर यांची भाकीतं रोचक आहेत, मात्र बर्‍याच ठिकाणी 'विशफुल थिंकिंग'चा पगडा जाणवतो. कदाचित येत्या अर्धशतकाबद्दल विचार केला तर ती अधिक सयुक्तिक ठरतील. वर विकासदराबद्दल आलंच आहे; तेच थोड्याफार फरकाने जागतिक प्रकाशन व्यवसाय/न्यू यॉर्क टाईम्सबद्दल म्हणता येईल. सर्वाधिक कॅथलिक लोकसंख्या द. अमेरिका खंडात असल्यामुळे पुढचा पोप त्या भागातूनच येईल, या भाकीताच्या ठिसूळ पायासारख्या गृहीतकावर त्यांनी हा मुद्दा मांडलेला दिसतो. शेवटचे दोन-तीन मुद्देही पटकन उरकल्यासारखे वाटले.

अवांतर - कॉपीराईट कायद्याच्या फेअर/नॉन-कमर्शियल यूजच्या तपशीलाच्या दुव्याबद्दल आभार. संदर्भासाठी अतिशय उपयुक्त आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

मनोरंजनमूल्य, नाट्यमयता

विशफुल थिंकिंग तर आहेच पण काही प्रसंगात मुद्दामून नाट्यमयता आणण्याचा (न्यूजव्हॅल्यू, मॅन बाइट्स डॉग) प्रयत्न केला आहे (टाइम्स ऑफ इंडियाच्या सध्याच्या लौकिकाला साजेसे) हेही जाणवू शकते. उदा. प्रकाशन व्यवसायात भारताचे महत्त्व वाढेल हे पटण्यासारखे आहे पण त्यामुळे भारतीय व्यवसायच पुढे जातील हे काही सांगता येणार नाही. उलट भारतीय ग्राहक मिळाल्याने परदेशी व्यवसाय अधिक वृद्धिंगत होतील असेही होऊ शकते. युनिलिव्हर, पी ऍण्ड जी, ह्युंडाई, सुझुकी, होंडा, नोकिया, सॅमसंग, डेल, एच. पी. इ. अनेक परदेशी कंपन्यांचा वाढत्या भारतीय ग्राहकांमुळे फायदाच होत आहे.

भारत-चीन मधील संघर्षासंबंधीचा मुद्दाही असाच नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न वाटतो. भारत-चीन दरम्यानचे संबंध ताणले जातील असे वाटत असले तरी नेमका स्वामिनाथन यांनी म्हटल्यासारखा संघर्ष होईल असे वाटत नाही.

मुळात स्वामिनाथन यांनाही नव्या दशकानिमित्त मनोरंजनमूल्य, नाट्यमयता अधिक असणारा, वाचकांनी विथ अ पिंच ऑफ सॉल्ट घेण्यासाठीच लिहिला असावा असे वाटते.

विकास (स्टॉक) तर विकासदर (फ्लो)

विकासदर (ग्रोथ रेट ऑफ जीडीपी (ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट (राष्ट्रीय उत्पन्न))) अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर दर्शवतो तर विकास (सध्याचे राष्ट्रीय उत्पन्न) झालेल्या वाढीचे परिमाण आहे. म्हणजेच विकासदर अधिक असणे म्हणजे देश जास्त विकसित आहे असे नाही. साधारणत: विकसनशील किंवा अविकसित देशात विकासदर विकसित देशांपेक्षा जास्त असतो. विकासदराचा आलेख नेमका कसा असतो याविषयी अर्थशास्त्रात विविध मते आहेत. सुरूवातीला वाढ नंतर वाढ मंदावणे असे काहीसे समान सूत्र जगातील विकसित देशांबाबत जाणवते पण विकसनशील देशांबाबत असे घडेलच असे नाही तसेच अनेक अर्थतज्ज्ञ वेगळे मतही मांडतांना दिसतात. चीनची अर्थव्यवस्था (वा कुठलीही अर्थव्यवस्था) २०२० मध्ये काय दराने वाढेल याविषयी अनेक मतमतांतरे आढळतात.

श्री अय्यर यांचे मत चीनचा निर्यातदर मंदावणार या गृहीतकावर आधारीत आहे. चीनची लोकसंख्या भारताप्रमाणे वाढत नसल्याने देशांतर्गत मागणी भारताइतक्या झपाट्याने वाढणार नाही अशी त्यांची कारणमिमांसा असावी. ती पूर्णपणे चुकीची नसली तरी त्यांची गृहीतके चूकीची ठरण्याची शक्यता अधिक आहे. उदा. लोकसंख्या झपाट्याने वाढणार नसली तरीही चीनमधील असलेली लोकसंख्या आपले दरडोई भक्षण (पर कॅपिटा कन्झम्प्शन) झपाट्याने वाढवू शकतात. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. तसेच इतर देशांमधून चीनमध्ये होणारे स्थलांतर ते विचारात घेतांना दिसत नाहीत. आफ्रिकेचा विकासदर वाढल्यास चीममधून होणारी निर्यात मंदावेलच असे नाही. तसेच भारताच्या विकासदरसंदर्भात श्री अय्यर जास्तच आशावादी आढळतात. भारताचा विकासदर अजुनही मोठ्या प्रमाणात मौसमी पावसावर अवलंबून आहे. दहा वर्षात यात कितपत स्थित्यंतर होईल याविषयी साशंकता आहे. भारतात पायाभूत सुविधांविषयी (उदा. वीजेचे उत्पादन, जलनियोजन फक्त रस्ते नाही) अजुनही उदासिनता आहे. असे असतांना त्यांची भाकिते जास्तच आशावादी वाटतात. बाकी भारतीयांनी वृत्तपत्रे विकत घेणे वगैरे हास्यास्पद आहे. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल होत असल्याने त्याविषयी भाकिते करण्याचा नसता उद्योग न करणेच योग्य.

त्यांची इतर भाकिते भू-राजकिय संदर्भात आहेत. अफगानिस्तान, पाकिस्तान, इराण, दहशतवाद यावर फारतर नजिकच्या भविष्यात (दोन-तीन वर्षात) काय घडेल याबाबत काही विश्वसनीय भाष्य करणे शक्य आहे पण त्यावर आधारीत निर्णय घेणे हे अनिश्चितता विचारात घेऊनच करावे लागेल.

श्री अय्यर यांच्या सदराचा मी एकेकाळी चाहता होतो. पण अलिकडे त्यांचे लेखनही टाइम्स ऑफ इंडियाप्रमाणेच दर्जा गमावून बसले आहे. वर श्री नवीन प्रताधिकाराचा भंग झाला नसल्याचे पटवून दिले आहे. सदर वृत्तपत्रास प्रताधिकाराची कितपत जाण आहे याविषयी मात्र साशंक आहे. स्त्रीयांची उत्ताण चित्रे जेथे उपलब्ध असतील तेथून आणून छापणे यात ते वृत्तपत्र मागील दोन दशके आघाडीवर असल्याचे माझे निरीक्षण आहे. असे करतांना हे वृत्तपत्र प्रताधिकाराचे भान ठेवले असावे असे वाटत नाही.

आफ्रिका | इराण

तुमच्या विवेचनाशी सहमत आहे. येत्या दशकात (आणि पुढेही) आफ्रिका खंडातील देश दुर्लक्षिले जाऊ शकणार नाहीत. उलट येत्या काळात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उत्पादनांचा मागणी/पुरवठा तसेच भू-राजकीय, सामरिक, सामाजिक दृष्टिकोनातून आफ्रिकेला येत्या काळात अनन्यसाधारण महत्त्व येईल असे अनेक विश्लेषकांचे मत आहे.

त्यांची इतर भाकिते भू-राजकिय संदर्भात आहेत. अफगानिस्तान, पाकिस्तान, इराण, दहशतवाद यावर फारतर नजिकच्या भविष्यात (दोन-तीन वर्षात) काय घडेल याबाबत काही विश्वसनीय भाष्य करणे शक्य आहे पण त्यावर आधारीत निर्णय घेणे हे अनिश्चितता विचारात घेऊनच करावे लागेल.

खरे आहे. इराण संबंधीची टिप्पणी मला रिवर्स-इंजिनियर्ड वाटली :)

भारतात साठे सापडतील -> भारत जगातला प्रमुख नैसर्गिक वायू उत्पादक बनेल -> इराण वायुवाहिनी (जी आधीच विविध कारणांनी प्रसिद्ध आहे) आता उलट्या दिशेने वायू वाहून नेण्यास वापरली जाईल -> इराणला स्वयंउत्पादित गॅस कमी पडेल -> (कारण) इराणची झपाट्याने आर्थिक वाढ होईल -> (जी ) इराणच्या मुल्लांची सत्ता उलथून लोकशाही सरकार येईल (यामुळे शक्य होईल.)

रोचक

रोचक. पण पहिली पाच भाकिते शेवटच्या तीनांवर अवलंबून आहेत. त्यापैकी एकात स्वामीनाथन म्हणतात की, दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम भारतावर होणार नाही. हे एक भाकीतच आहे. ते फसले तर उर्वरित भाकिते खरी होण्यात अडथळेच अडथळेच! कारण, स्वामीनाथन यांचे म्हणणे मान्य केले तर, पाय मोडलेला आहे; पण वजन वाढते आहे, यासारखे होते.

गमतीदार

भाकीते गमतीदार वाटली. बहुतांशी नंदन म्हणतो त्या प्रमाणे 'विशफुल थिंकिंग' वाटले.

या निमित्ताने भाषांतर इथे दिलेले चालेल हे कळले. डि.एन्.ए. मधील काहि लेख उत्तम होते... भाषांतरासाठी हुडकून पाहतो :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

रास्त वापर

या निमित्ताने भाषांतर इथे दिलेले चालेल हे कळले.

फेयर यूज ("रास्त वापर"?) कश्याला म्हणावे याची व्याख्या अतिशय सैलसर आहे. कदाचित विशिष्ट विवादामध्ये सर्व परिस्थिती/बाजूंचा विचार करून न्यायाधीशांना/निवाडा करणार्‍यांना योग्य तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी फेयर यूज चे काटेकोर नियम जणूनबुजून ठरवले नसावेत. उपक्रम सारख्या संकेतस्थळांवर criticism or review, for reporting current events अंतर्गत अश्या लेखांवरील टीका, परीक्षण, चर्चा इ. ग्राह्य धरले जाईल असे वाटते. तसेच अश्या वापरातून अर्थार्जन होत नाही (म्हणजे दुसर्‍यांच्या कल्पना, रचना, विचार, इ. इ. आपल्या उत्पादनात वापरून वगैरे), विना-नफा तत्त्वावर वापर आणि मूळ प्रताधिकार धारकाचे आर्थिक नुकसान होत नाही (उदा. नकली डिव्हिडी, पुस्तके इ. मुळे थेट आर्थिक नुकसान वगैरे) हेही या संदर्भात महत्त्वाचे ठरावे. ("The purpose and character of the use, including whether such use is of commercial nature or is for nonprofit educational purposes" आणि "The effect of the use upon the potential market for, or value of, the copyrighted work " वगैरे. संदर्भः http://www.copyright.gov/fls/fl102.html)

पण तरीही अधिक शंकाकुशंकांना जागा राहू नये म्हणून ठळक मुद्देच फक्त उद्धृत करणे, मूळ मुद्द्यांवर आपली टिप्पणी/टीका इ. लेखातच देणे असे यापुढे आपण करू शकतो.

 
^ वर