काश्मीरचा स्वातंत्र्यदिन (स्वामिनाथन अय्यर यांच्या लेखाचा अनुवाद) - १

१५ ऑगस्ट रोजी भारताने ब्रिटिश साम्राज्यापासून मिळालेले स्वातंत्र्य साजरे केले. पण काश्मीरी लोकांनी भारतापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बंद पुकारला. भारतातील साम्राज्यवाद संपल्याचा निदर्शक असणारा दिवस काश्मीरातील भारतीय साम्राज्यवादाचा निदर्शक ठरला.

एक स्वातंत्र्यवादी या नात्याने लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर राज्य करणे मला आवडत नाही. खरे आहे की एखादे राष्ट्र घडवणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि सुरुवातीला होणारा प्रतिकार नाहीसा होऊन प्रांतिक अस्मितेचे व्यापक राष्ट्रीय भावनेत रूपांतर होऊ शकते. तमिळ फुटिरतावादाचा अंत याचे उत्तम उदाहरण आहे.

एकेकाळी मी काश्मीरच्या भारताशी एकरूप होण्याविषयी आशावादी होतो, पण सहा दशकांच्या प्रयत्नानंतरही दुरावा कधी नव्हे इतका वाढला आहे. भारताला काश्मीरला सामावून घ्यायचे आहे, साम्राज्यवादी प्रवॄत्तीने राज्य करायचे नाही. पण तरीही ब्रिटिशांचे भारतावरील राज्य आणि भारताचे काश्मीरवरील राज्य यांच्यातील साम्यस्थळे मला अस्वस्थ करू लागली आहेत.

अनेक भारतीय म्हणतात काश्मीरच्या राजाने विलिनिकरणाच्या करानाम्यावर स्वाक्षरी केल्यापासून काश्मीर कायदेशीररीत्या भारताचा अविभाज्य भाग बनला. दुर्दैवाने परिस्थिती बदलल्यावर अश्या कायदेशीर गोष्टी निरर्थक ठरतात. भारतीय राजे महाराजे यांनी अश्याप्रकारे ब्रिटिशांचे राज्य स्वीकारले होते. भारतीयांनी स्वातंत्र्य चळवळ सुरू केल्यावर ते सर्व करारनामे निरर्थक ठरले.

कित्येक दिवस ब्रिटिशांचा असा दावा होता की भारत त्यांच्या साम्राज्याचा अविभाज्य अंग आहे. त्यांच्या मुकुटातील मुकुटमणि आहे आणि त्यावरील हक्क सोडून चालणार नाही.

महाराजाने स्वीकारलेल्या विलिनीकरणाच्या तात्विकदृष्ट्या बरोबर असलेल्या गोष्टीचे आणखी एका प्रसंगाशी साधर्म्य आहे. जसे काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिमांवर राज्य करणारा हिंदू राजा होता तसाच जुनागड मध्ये बहुसंख्य हिंदूंवर राज्य करणारा मुस्लिम नवाब होता. हिंदू महाराजाने भारतात विलीनीकरण स्वीकारले आणि मुस्लिम नवाबाने पाकिस्तानात.

भारताने काश्मीरचे विलिनीकरण ग्राह्य मानले पण जुनागडचे विलिनीकरण अमान्य केले. भारताने जुनागडमध्ये सैन्य पाठवले तसेच पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य पाठवले. फरक इतकाच की पाकिस्तानकडे जुनागडमध्ये हस्तक्षेप करण्याइतके लष्करी सामर्थ्य नव्हते, दरम्यान भारताने आपले सैन्य श्रीनगरमध्ये पाठवले. जुनागडचा नवाब पाकिस्तानात आश्रयाला गेला पण काश्मीरचा राजा मात्र जागेवरच राहिला. जुनागड आणि काश्मीर यांच्याबद्दलचा भारताचा दुटप्पीपणा अचंबित करणारा आहे.

जुनागडचे लोक पाकिस्तानच्या सहा दशकांच्या प्रामाणिक प्रयत्नानंतरही पाकिस्तानाशी एकरूप होऊ शकले असते असे तुम्हाला वाटते का? नाही? मग तुम्हाला खरोखर असा विश्वास आहे की काश्मिरी लोक स्वातंत्र्याची मागणी सोडून भारताशी एकरूप होतील?

ब्रिटिश भारतात न बोलावता आले. याउलट काश्मीर मधील सर्वात लोकप्रिय नेते शेख अब्दुल्लांनी काश्मीरच्या भारतात विलिनीलकरणाला, सार्वमताच्या अटीवर मान्यता दिली. पण त्यांच्या मनात स्वतंत्र काश्मीरचीच अभिलाषा होती आणि त्यांनी नंतर त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. नेहरूंनी शेख अब्दुल्लांना तुरुंगात टाकले आणि घोषित केले की काश्मीरचे भारतात विलिनीकरण झाले आहे आणि सार्ममताची गरज नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी देश असल्याने काश्मीरात मुस्लिम बहुसंख्य आहेत हे वास्तव दुर्लक्षले गेले.

(भाग १ समाप्त)

क्रमशः

Comments

दिशाभूल

या लेखात अनेक ठिकाणी दिशाभूल केली गेली आहे... ज्याला मी तथाकथीत बुद्धीवाद्यांचा बुद्धीभेदपणा म्हणतो. त्यात सर्वच बुद्धिवादी नसतात हे परत आधीच स्पष्ट करतो.

कदाचीत मी या प्रतिसादात नंतर अजून पण संपादन करेन. म्हणून कृपया याला प्रतिक्रीया नविन प्रतिसाद म्हणून द्यावीत ही विनंती.

कित्येक दिवस ब्रिटिशांचा असा दावा होता की भारत त्यांच्या साम्राज्याचा अविभाज्य अंग आहे. त्यांच्या मुकुटातील मुकुटमणि आहे आणि त्यावरील हक्क सोडून चालणार नाही.

ब्रिटीश बाहेरून आले आणि आपली संपत्ती बाहेर नेत होते ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा ती भारतावरील परकीय सत्ता होती हे त्यांचे इतिहासकर पण मानतात. त्या उलट काश्मिरसंदर्भात उलटे झाले आहे हे स्वामिनाथनच्या वक्तव्यातच दिसते. तरी देखील असले विधान शहाणपणाचे म्हणून करणे आणि आम्हाला मानायला सांगणे हे जरा अतीच झाले..

जसे काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिमांवर राज्य करणारा हिंदू राजा होता तसाच जुनागड मध्ये बहुसंख्य हिंदूंवर राज्य करणारा मुस्लिम नवाब होता. हिंदू महाराजाने भारतात विलीनीकरण स्वीकारले आणि मुस्लिम नवाबाने पाकिस्तानात.

परत एकदा बुद्धीभेदी अर्धसत्य संदर्भहीन ठोकताळे. वास्तव काय आहे? - सर्वप्रथम संस्थानांच्या विलीनीकरणासंदर्भात असे ठरवले गेले होते की जी राज्ये नवीन सीमेवर आहेत त्यांना कुणाबरोबर जायचे कुणाबरोबर नाही अथवा दोन्हींबरोबर तटस्थ राहायचे या संदर्भात निर्णय घेण्याची शक्ती राहील. काश्मिरच्या राजाने दोन्ही देशांबरोबर तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला. तसा करार त्यांनी दोन्ही देशांशी करायचा प्रयत्न केला. पाकीस्तानने तो मान्य केला आणि भारतसरकारने त्यासाठी वेळ मागीतला. त्या वेळातच पाकीस्तानने दगाबाजी करून तो करार मोडला आणि पाकीस्तानी सैन्य "ट्रायबल्सच्या" नावाखाली घुसवले. मग महाराजा भारतसरकारकडे आला आणी विलीनीकरण मान्य केले.
जुनागडच्या बाबतीत एक ही सीमा पाकीस्तानला लागलेली नव्हती हा एक भाग झाला. त्याने आजूबाजूच्या (हिंदू राज्यकर्ते असलेल्या) संस्थांनाच्याशी कुरापती चालू केल्या. त्या नंतर भारत सरकारने हल्ला केला आणि नवाब त्याच्या कुटूंबाबरोबर पळून गेला. त्यातही २० फेब्रुवारी १९४८ ला तेथे प्लेबिसाईट घेण्यात आले आणि नव्वद टक्क्यांहून (लाखो मते) ही भारताच्या बाजूने पडली. पण स्वामीनाथन ही गोष्ट सांगायला तयार होत नाहीत. कदाचीत त्यांच्या डून स्कूलच्या शिक्षणपद्धतीत असे काही शिकावे/सांगावे हे बसत नसेल.

मग तुम्हाला खरोखर असा विश्वास आहे की काश्मिरी लोक स्वातंत्र्याची मागणी सोडून भारताशी एकरूप होतील? ...नेहरूंनी शेख अब्दुल्लांना तुरुंगात टाकले आणि घोषित केले की काश्मीरचे भारतात विलिनीकरण झाले आहे आणि सार्ममताची गरज नाही

त्यासाठी आधी तेथे सर्व काश्मिरी जायला हवेत. त्यातआत्याचार झालेले काश्मिरी पंडीतपण येतात. पाकव्याप्त काश्मिरमध्ये फक्त काश्मिरी रहायला हवेत (तेथे गव्हर्नर पण काश्मिरी नसतो ही वस्तुस्थिती आहे!). सार्वमताची मागणी मान्य कधी केली होती? तर जेंव्हा संपूर्ण काश्मिर भारताच्या ताब्यात होते तेंव्हा. त्यात पाकव्याप्त काश्मिर आणि चीनच्या ताब्यात पाकीस्तानने दिलेले काश्मिरपण येते. नेहरूंच्या वेळेस हा तिसरा तुकडा नव्हता. पण पाकव्याप्त काश्मिर भारताच्या स्वाधीन करा आणि मग सार्वमत घ्या असा मूळ मान्य केलेला मुद्दा पाकीस्तान पाळायला तयार नवह्ते. त्यामुळे केलेला करार रदबातल ठरला.

यातील काही माहीती संदर्भासहीत भारतीय वकीलातीच्या या दुव्यावर पहाता येईल.
....

 
^ वर