बिंदू, म्हणे माना?

मागे एका छायाचित्रावरून
शेंदूर लावलेला दगड म्हणजे देव काय अशी काहीशी चर्चा झाली होती.
ही चर्चा परत आठवली कारण विनोबांचे गीता-प्रवचने हे पुस्तक वाचत होतो.
त्यात तत्सम संदर्भाचा उल्लेख आहे.

या पुस्तकातील गीतेच्या पाचव्या अध्यायाचे विवरण मांडतांना आणि स्पष्टीकरण करतांना विनोबांनी काही सुंदर उदाहरणे दिली आहेत.
ही उदाहरणे एखाद्या माणसाच्या सोई साठी 'शालीग्रामाच्या पींडीत परमेश्वर माना' या संकल्पनेच्या पुष्ट्यर्थाने दिली आहेत.
कारण काही गोष्टी 'मानल्या' शिवाय पुढे जाता येत नाही. किंवा विषय स्पष्ट होत नाही.

विनोबा म्हणतात, '
जसे भूमितीमध्ये म्हणतात ना की अ, ब, क हा त्रिकोण आहे असे 'समजा'. समजा का? कारण, या त्रिकोणातील रेखा यथार्थ रेखा नाहीत म्हणून. रेखेची मुळीं व्याख्यांच अशी आहे की तिला लांबी आहे पण रुंदी नाही. ही लांबी रुंदी शिवाय लांबी फळ्यावर काढायची कशी? लांबी आली की रुंदी आलीच. जी रेखा काढाला तिला थोडी तरी रुंदी राहणारच. म्हणून भुमितीशास्त्रात रेखा 'मानल्या' शिवाय चालतच नाही. भक्तिशास्त्रात असेंच नाही का? तेथेही या लहानशा शालिग्रामाच्या पिंडीत सर्व ब्रह्मांडाचा धनी आहे असे 'माना', असे भक्त म्हणतो कोणी जर असे म्हणेल , हें काय खूळ? तर त्याला सांगा, तुझें हें भूमितीचे काय खूळ आहे? चांगली ठसठसशीत जाड रेखा दिसत आहे व म्हणे 'ही रुंदी शिवायची माना' हे काय खूळ आहे?'

विनोबा इतरही गोष्टींचा उहापोह करतात, जसे की परमेश्वर तर तुटत नाही फुटत नाही, मग पिंड पण फुटायला नको... पण ते योग्य नाही, आपटली तर पिंड फुटणार, कारण त्यात परमेश्वर 'मानलेला' आहे.

पुढे विनोबा भूमितीतील बिंदू चा आढावा घेतांना म्हणतात, 'बिंदू म्हणे माना. आणि फळ्यावर बिंदू काढतात. बिदु कसचा? ते चांगले वर्तुळच असते. बिंदुची व्याख्या म्हणजे ब्रह्माचीच व्याख्या.* बिंदूला लांबी रुंदी जाडी काहीच नाही. परंतु त्याची अशी व्याख्या करून तो फळ्यावर मात्र काढतात. बिंदू तर अस्तित्वमात्र आहे, त्रिपरिमाणरहित आहे. सारांश खरा त्रिकोण, खरा बिंदू हे व्याख्येतच आहेत. परंतु ते आपणास गृहीत धरावे लागते. भक्तिशास्त्रातही शालिग्रामात न फुटणारा सर्वव्यापी देव मानावा लागतो.' (पान ४४-४५:विनोबा).

भक्तीशास्त्रा प्रमाणे - हो विनोबा भक्तिला शास्त्रच म्हणत आहेत - मात्र जुन्याकाळी या सार्‍याच गोष्टींना शास्त्र अशीच संज्ञा होती -
नवीन शास्त्राच्या संकल्पनेत ही बसत नाही पण तूर्तास ते बाजूला ठेवायला हरकत नाही!
तसेच इतरही अनेक ज्ञानशाखांत असे 'मानणे' गरजेचे ठरते.

परंतु मला बिंदू व्याख्येप्रमाणे दिसत नाही, रेखा व्याख्येप्रमाणे दिसत नाही म्हणून मी भूमितीच नाकारली तर?
जेथे रेखाच अस्तित्वात दाखवता येत नाही, तेथे पायथागोरसचे प्रमेय ही एक भंपक कल्पना आहे,
असे म्हणू लागलो तर ती आत्मवंचना ठरेल. माझ्या फाद्यासाठी, ज्ञानासाठी तेथे संकल्पना 'मानून' पुढे जाणेच मला योग्य आहे.

असेच काहीसे ज्योतिषातही आहे असे मला वाटते.
त्यात अनेक संकल्पना 'मानल्या' गेल्या आहेत. प्रत्येकच संकल्पनेला 'मूर्त स्वरूप दिसत नाही' म्हणून नाकारतच बसलो तर काहीच हाती लागणार नाही. पण काही काळ 'मानणे' उपयोगात आणले आणि त्या ज्ञानाचा, अनुमानांचा निरपेक्ष आणि स्थिरबुद्धीने आपल्या आयुष्याशी ताळा घेवून पाहिला असता काही गोष्टी मला विस्मयकारक रितीने दिसतात. म्हणून माझा रस त्या क्षेत्रात जागृत झाला. मग अभ्यासाची सुरुवात झाली. जसा पुढे गेलो तसा त्याची व्याप्ती कळू लागली. माझे खुजेपणही जाणवू लागले.

येथे मला ज्योतिष्याचे समर्थन करायचे नाही.
परंतु ते ज्ञान नाकारूनच टाकण्यानेही आपल्या हाती काही पडेल असे वाटत नाही.

माझा स्वतःचा प्रवास ज्योतिष विरोधक ते 'यात काही तरी तथ्य आहे काय ते यातले फालतू विचार दूर सारून ते शोधले पाहिजे' असाच झाला आहे.

राहता राहिला विषय ज्योतिषातल्या भंपक लोकांचा.
मग मी असे विचारतो की, कोणत्या क्षेत्रात भंपक लोक नाहीत?
मला काही अतिशय भंपक आणि कोणतीही शास्त्रीय ज्ञानाची बैठक नसलेले म्याकॅनिकल इंजिनियर्स माहिती आहेत.
म्हणून मी म्याकॅनिकल इंजिनियरींग ही शाखाच भंपक आहे असे म्हणू लागलो तर काय अर्थ आहे?

कदाचित वितंडवाद घालून मला तत्क्षणी विजयीही होता येईल, पण त्यात नुकसान माझेच असेल, असे मला वाटते.

कोणत्याही क्षेत्रात काही खडे असायचेच.
पण खडे आहेत म्हणून तांदूळ टाकून द्यायचे की खडे बाजूला करून
तांदूळाचा भात करायचा हे आपणच ठरवायचे असते.

आपला
गुंडोपंत

संदर्भः
विनोबा, गीता प्रवचने (१९३२) आवृत्ती ४६, परंधाम प्रकाशन, पवनार, प्रकाशन वर्ष २००७.

*येथे विनोबा ब्रह्म म्हणजे काय? हे किती छान सांगून गेले आहेत!

लेखनविषय: दुवे:

Comments

लै भारी

ट्रुथ इज आउट देअर!!

शोधा शोधा शोधा!!! सापडले की मात्र सांगा :-)

तो वर बिंदू गा!!

सुंदर्

सुंदर मतप्रदर्शन...

ब्रह्म म्हणजे काय

पंत
सुंदर लेख
संदर्भ दिल्यामुळे अधिक वाचनात भर पडेल. सर्वानि जर संदर्भ दिले तर किती बरे होईल.
संजीव

बिंदू आम्हाला आवडते

बिंदू आम्हाला आवडते. तिला माना - आपल्या सुनिल शेट्टीची बायको - का मानावे बरें?

-राजीव.

रेखा है या बिंदू है | गर्व से कहो हम हिंदू है ||

रेखा है या बिंदू है | गर्व से कहो हम हिंदू है ||
रेखा है या बिंदू है | गर्व से कहो हम हिंदू है ||

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लैच भारी स्फूट लेखन


कोणत्याही क्षेत्रात काही खडे असायचेच.
पण खडे आहेत म्हणून तांदूळ टाकून द्यायचे की खडे बाजूला करून
तांदूळाचा भात करायचा हे आपणच ठरवायचे असते.

पंत विचार पोहचला. तांदळाचा भात केला पाहिजे. :)

-दिलीप बिरुटे
[तांदळातले खडे दाखवणारा]

डज्झड सक्कयकव्वं सक्कयकंव्वच निम्मियं जेण |
वंसहरम्मि पलित्ते तडयडतट्टत्तणं कुणइ ||

मस्त प्रकटन

काहि लेखन विचारांना चालना देणारे -उद्युक्त करणारे असते, तर काहि लेखन हे विचार करायला लावणारे (कंपल्शन) लेखन असते.
प्रस्तूत प्रकटन हे दुसर्‍या वर्गातील आहे.
इतके छान लिहिले आहे की प्रतिवाद विचारपूर्वक/प्रयत्नपूर्वक कदाचित करताही येईल पण प्रतिवाद करावासाच वाटत नाहि कारण असं लिखाण कुठेतरी विचारचक्र जोरात फिरवतं.

मस्त अजून येऊ दे

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

मानणे | भंपक कोण? | खडेभात

मानणे

परंतु मला बिंदू व्याख्येप्रमाणे दिसत नाही, रेखा व्याख्येप्रमाणे दिसत नाही म्हणून मी भूमितीच नाकारली तर?
जेथे रेखाच अस्तित्वात दाखवता येत नाही, तेथे पायथागोरसचे प्रमेय ही एक भंपक कल्पना आहे,
असे म्हणू लागलो तर ती आत्मवंचना ठरेल. माझ्या फाद्यासाठी, ज्ञानासाठी तेथे संकल्पना 'मानून' पुढे जाणेच मला योग्य आहे.

अभ्यासाच्या सोयीसाठी संकल्पना मानली तरी त्याचे 'परिणाम' आणि 'उपयोजन' मानलेले नाहीत, ते प्रत्यक्ष पाहता येतात, त्याचे तर्कसंगत स्पष्टीकरण देता येते, त्याला सर्व परिस्थितीत लागू होणारे नियम लावता येतात आणि त्याचा तटस्थपणे पडताळा घेता येतो. "काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग त्याच्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो". ("असतो असे मानू" नव्हे!!). पायथॅगोरसचा सिद्धांताचा पडताळ घेण्यासाठी एक कागद, एक फूटपट्टी आणि एक पेन्सिल एवढे पुरेसे आहे! आणि कोणीही, कधीही याचा पडताळा घेऊ शकतो. 'मानलेल्या' संकल्पना याच्या आड येत नाहीत.

असेच काहीसे ज्योतिषातही आहे असे मला वाटते.

ग्रहांचा मानवांवर होणारा 'परिणाम' मानून कसा चालेल? "ग्रहांच्या अवकाशातील भ्रमणाचा मानवांवर परिणाम होतो" असे ("काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग त्याच्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो" च्या चालीवर) म्हणत असाल तर त्याची सिद्धता नको? त्याचे तर्कसंगत स्पष्टीकरण नको? पुन्हा "वेगवेगळ्या ग्रहांचा वेगवेगळा आणि अमुक असा परिणाम होतो" हे एक गृहीतक. त्यावर "वेगवेगळ्या ग्रहांच्या अवकाशातील वेगवेगळ्या स्थानांवरून (युती वगैरे) पुन्हा वेगवेगळे परिणाम" हे गृहीतक. त्यावर पुन्हा "प्रत्येक मनुष्याच्या जन्मवेळेनुसार प्रत्येक ग्रहाचा आणि त्यांच्या स्थानाचा वेगवेगळा परिणाम!" ही सर्व एकमेकांवर आधारलेली गृहीतकेच आहेत. यांची सिद्धता आणि तर्कसंगत स्पष्टीकरण काय? मुळात असा परिणाम होतो हे कोणी ठरवले आणि कसे काय ठरवले? राहू-केतू यांना तर रुढार्थाने अस्तित्वच नाही! मग त्याचा 'परिणाम' मानवांवर होतो हेही मानायचे?

उदा. "हा योग आईच्या कुंडलीतून, पंचमातून असेल तर जन्म होतांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते" असे विधान तुम्ही इतरत्र केले आहे ते कश्यावरून? का हेही मानायचे? देवी, गोवर, कर्करोग इ. विशिष्ट ग्रहयोगांमुळे होतात असे संजीव नाईक म्हणतात हे खरे आहे का? का हेही मानायचे? देवीचा रोग आता कोणाला होत नाही मग तो ग्रहयोग हल्ली येत नाही की काय?

भंपक कोण?

राहता राहिला विषय ज्योतिषातल्या भंपक लोकांचा.
मग मी असे विचारतो की, कोणत्या क्षेत्रात भंपक लोक नाहीत?
मला काही अतिशय भंपक आणि कोणतीही शास्त्रीय ज्ञानाची बैठक नसलेले म्याकॅनिकल इंजिनियर्स माहिती आहेत.
म्हणून मी म्याकॅनिकल इंजिनियरींग ही शाखाच भंपक आहे असे म्हणू लागलो तर काय अर्थ आहे?

मेकॅनिकल इंजिनियरिंग या विषयात सांगितलेली तत्त्वे/नियम यांचे तर्कसंगत स्पष्टीकरण/सिद्धता उपलब्ध आहे. यांची तटस्थपणे पडताळणी घेता येऊ शकते. टू स्ट्रोक इंजिनाचे काम कसे चालते हे कोणालाही समजून घेता येऊ शकेल, प्रत्यक्ष पाहता येऊ शकेल आणि या तत्त्वावर आधारीत कोट्यावधी वाहने प्रत्यक्षात पाहता येतील. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनियरिंग खरे आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी प्रत्येक मेकॅनिकल इंजिनियराची साक्ष काढण्याची गरज नाही. (म्हणूनच कदाचित "मेकॅनिकल इंजिनियरिंग शास्त्र की थोतांड?" अश्या चर्चा होत नाहीत) असे स्पष्टीकरण तुम्ही फलज्योतिषाविषयी देऊ शकलात तर ज्योतिषी चांगला की भंपक याने फलज्योतिषाला काही फरक पडणार नाही.

खडेभात!

कोणत्याही क्षेत्रात काही खडे असायचेच.
पण खडे आहेत म्हणून तांदूळ टाकून द्यायचे की खडे बाजूला करून
तांदूळाचा भात करायचा हे आपणच ठरवायचे असते.

मुळात तांदूळ असावे लागतात. तांदूळ आहेत असे 'मानू' असे म्हणून भात केला तर तो भात असेल का? :)

या सर्वांचा विचार आपण केला असेल अशी अपेक्षा करतो. नसेल तर करावा अशी विनंती. हे प्रश्न तुम्ही लिहिलेल्या लेखावरच असल्याने त्यांची उत्तरे देण्याचे सौजन्य दाखवाल अशी आशा करतो.

उत्तरे

नमस्कार,

मला असे वाटते आहे की वरील लेखातील मजकूर वाचतांना सुटला असावा.
विनोबा म्हणत आहेत की रेखेच्या व्याख्येनुसार रेखा कागदावर काढताच येत नाही. आपण रुंदीशिवायची रेखा कागदावर सोडा, पण येथे काढून दाखवलीत की मलाही पटेल. आपण एकदा रेखा आणि बिंदू व्याख्येनुसार काढून दाखवले की मी आपलेच म्हणणे प्रमाण मानू लागेन अशी ग्वाही मी आपणांस देतो. या शिवाय विनोबांचे मत तुम्हाला पटले नसेल तर तुमचा वाद विनोबांशी आहे, माझ्याशी नाही!

माझ्या असेही लक्षात आले आहे की आपण 'मला' प्रश्न विचारत आहात. इतका काळ माझा समज होता की तुम्ही सर्वांनाच चर्चेच्या निमित्ताने प्रश्न विचारत आहात. या आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी पण फार फार उत्सुक आहे.

मात्र आपल्या प्रश्नांना उत्तरे मिळण्यासाठी आधी काही तांत्रीक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
आपण प्रश्न 'मला' विचारला आहे त्यासाठी आपल्याला माझी दक्षिणा द्यावी लागेल.

ज्योतिषातील कोणत्याही ज्ञानाला अनमोल किंमत माझ्या लेखी आहे.ज्ञान कितीही अनमोल असले तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही तरी 'टोकन' अशा स्वरूपात का होईना त्याचे अल्प स्वल्प मोल मी करण्याचा प्रयत्न करित आहे.

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला देण्यासाठी, मला खालील गोष्टींची पूर्तता करून द्यावी.

1.1 भारतातील पुणे शहरातील पु. ल. देशपांडे फौंडेशन, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांना प्रत्येकी एक लाख ब्रिटिश पौंड (GBP 100000) देणगी दाखल द्यावे लागतील.
1.2 मालेगाव येथे सूत कामगारांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची शाळा चालविणार्‍या संस्थेला १०० मुलांच्या वसतीगृहाची आणि शाळेची इमारत बांधून द्यावी लागेल.
1.3 नाशिक येथील निराधार महिला आधाराश्रमाला एक लाख ब्रिटिश पौंड (GBP 100000) देणगी दाखल द्यावे लागतील. तसेच निराधार महिलांसाठी १०० निवासस्थाने बांधून देवून त्याच्या पुढील दहा वर्षांच्या दुरुस्ती आणि मेंटेनंस ची जबाबदारी घ्यावी लागेल.
1.4 नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरातील उसतोड कामगारांच्या मुलांसाठी विना नफा तत्त्वावर मोसमी शाळा चालवणार्‍या संस्थांना २ एकर जागा आणि शाळेची इमारत बांधून द्यावी लागेल.
1.5 डांग जिल्ह्यात काम करणार्‍या वनवासी कल्याण आश्रमाला एक लाख ब्रिटिश पौंड (GBP 100000) देणगी दाखल द्यावे लागतील.

1.6 या शिवाय उपरोल्लेखीत संस्थांना आपल्या देणेगीमुळे भरावा लागणारा आयकरही वेगळ्या देणगीमध्ये द्यावा लागेल.

आपणास आर्थिक चिंता असतील तर वरील आयकर देणगी देतांना त्यावर १ टक्क्याची (१%) सूट घेण्यास माझी मुभा आहे.

या देणग्या आपण दिल्या आहेत व त्या मिळाल्या आहेत असे प्रतिज्ञा पत्र मला तुमच्या कडून तसेच त्या संस्थेच्या संचालकांकडून आल्यानंतर मी आपल्याला माझे करारपत्र पाठवेन त्यावर आपण भारतीय अथवा ग्रेट ब्रिटन येथिल सरकारी न्यायाधिशा समोर सही करून व तशी त्याचे प्रमाणपत्र घेवून मला पाठवावे लागेल.वरील सर्व टपाल खर्चाची जबाबदारी आपली राहील.
एकदा या छोट्या मोठ्या तांत्रीक बाबींची पूर्तता केली की, आपण येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा मार्ग सुकर होईल.

या शिवाय अजून वेगळे प्रश्न विचारायचे असल्यास आपले आनंदाने स्वागत आहे. त्याची दक्षिणा मी आपल्याला कळवेनच. वर उल्लेखलेली दक्षिणा ही फक्त उपरोल्लेखीत प्रश्नांसाठीच आहे याचीही नोंद घ्यावी.

ही तयारी आपण केली आहे, असे आपण मला कळवलेत की आपण पुढील चर्चा सुरू करू या.
इतरही अनेक माझे चाहते प्रश्न विचारत असल्याच्या कार्य बाहुल्यामुळे मला कोणत्याही इतर / आवांतर प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

आपला
गुंडोपंत

लेखकालाच प्रतिसाद

लेख 'तुम्ही' लिहिला आहे. त्यामुळे कोणी 'तुम्हाला' प्रश्न विचारले तर हरकत असू नये.

ज्योतिषाच्या 'अनमोल' ज्ञानाबद्दल दक्षिणा द्यायला हरकत नाही. परंतु नवीन यांनी जे प्रश्न विचारले आहेत ते जातक या नात्याने ज्योतिष्याला विचारलेले नाहीत. ते ज्योतिषाच्या पायाविषयी आहेत. त्यासाठी दक्षिणेची अट मान्य होण्यासारखी नाही.

>>या शिवाय विनोबांचे मत तुम्हाला पटले नसेल तर तुमचा वाद विनोबांशी आहे, माझ्याशी नाही
तुम्ही विनोबांच्या मताचा आधार घेऊन लेख लिहिला आहे. त्यामुळे तुम्हाला विनोबांचे मत पटले आहे असा नवीन यांचा समज झाला असावा. आणि आपल्या उपक्रमावरील एखाद्या सदस्याने (विनोबांच्या का असेना) चुकीच्या युक्तिवादावर विसंबून व्यवहार करू नये असे वाटून नवीन यांनी तुमचे प्रबोधन केले असण्याचा संभव आहे.

(हा प्रतिसाद नवीन यांनी द्यायच्या ऐवजी दुसर्‍याच कोणीतरी दिला म्हणून तुम्ही दुर्लक्ष करायला हरकत नाही).

नितिन थत्ते

अरेच्या!!...अरेरे!!!

अरेच्या! नवीन यांच्या मुद्देसुद प्रश्नांना चक्क बगल? तेही गुंडोपंतांकडून ?! अरेरे!!

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

विनोबांचे बोल? | गमतीशीर प्रयत्न

विनोबांचे बोल

या शिवाय विनोबांचे मत तुम्हाला पटले नसेल तर तुमचा वाद विनोबांशी आहे, माझ्याशी नाही!

"परंतु मला बिंदू व्याख्येप्रमाणे दिसत नाही, रेखा व्याख्येप्रमाणे दिसत नाही म्हणून मी भूमितीच नाकारली तर?
जेथे रेखाच अस्तित्वात दाखवता येत नाही, तेथे पायथागोरसचे प्रमेय ही एक भंपक कल्पना आहे, असे म्हणू लागलो तर ती आत्मवंचना ठरेल. माझ्या फाद्यासाठी, ज्ञानासाठी तेथे संकल्पना 'मानून' पुढे जाणेच मला योग्य आहे.

असेच काहीसे ज्योतिषातही आहे असे मला वाटते."

असे तुम्ही म्हटले आहे की विनोबांनी? मग हे तुम्हाला कश्यावरून वाटते? फक्त 'काही गोष्टी मानलेल्या आहेत' हे एक साम्य आहे म्हणून भूमिती खरी असेल तर फलज्योतिषही खरे हा हास्यास्पद आणि निराधार तर्क आहे. मान्यवर व्यक्तींच्या काही विधानांचा टेकू घेऊन आपले मत मांडून लोकांनी त्यातील विसंगती दाखवली की 'मी कुठे म्हटले, हे तर त्यांनी म्हटले, त्यांना विचारा' असे म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही.

गमतीशीर प्रयत्न

माझ्या असेही लक्षात आले आहे की आपण 'मला' प्रश्न विचारत आहात. इतका काळ माझा समज होता की तुम्ही सर्वांनाच चर्चेच्या निमित्ताने प्रश्न विचारत आहात. या आपल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी पण फार फार उत्सुक आहे. मात्र आपल्या प्रश्नांना उत्तरे मिळण्यासाठी आधी काही तांत्रीक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आपण प्रश्न 'मला' विचारला आहे त्यासाठी आपल्याला माझी दक्षिणा द्यावी लागेल.

उत्तरे देण्यास आपण उत्सुक आहात हे स्पष्टच आहे पण उत्तरे माहीत नसल्यामुळे की काय आपल्याला गैरसोयीच्या मुद्यांना बगल देण्याचा हा प्रयत्न पाहून फारच गंमत वाटली :)

समाजसेवेची गरजच काय?

पण तुमच्या फलज्योतिषानुसार जर ग्रहांच्या प्रभावामुळे जर कोणी व्यक्ती व्यसनाधीन, निराधार, विधवा झाली असेल आणि त्याचे दुष्परिणाम भोगत असेल तर त्याला समाजाने मदत करून ते बदलणे शक्य नाही ना? तसेच अश्या एखाद्या व्यक्तीचे ग्रहमान चांगले झाले तर ती व्यक्ती त्यातून बाहेर येईलच की! एवढे सर्वशक्तिमान ग्रह असताना आपण कोणाला मदत करण्यात काय हशील आहे? काहीही! :)

आपल्या मान्यतांची तपासणी आणि सत्य स्वीकारण्याचे धैर्य

माझ्या असेही लक्षात आले आहे की आपण 'मला' प्रश्न विचारत आहात.

हो. इतरांनी लिहिलेल्या गोष्टींवर तुम्हाला उद्देशून प्रश्न विचारले तर "कृपया पुढील वेळी प्रश्न विचारतांना मी काय लिहिले आहे हे वाचून मग त्या संदर्भातच प्रश्न विचारावेत" असे तुम्ही म्हटले होते. पुढे तुम्ही लिहिलेल्या गोष्टींवर प्रश्न विचारले तर त्यांचीही उत्तरे तुम्ही दिली नाहीत (पाहा तुमच्या विश्वासार्हतेचे काय?). आणि आता हे!

इतरत्र संदर्भ/पुराव्यांविषयीची आग्रही भूमिका, या लेखातही निरपेक्षता वगैरेचा उल्लेख इ. वरून तुम्ही वेळ पडली तर आपल्या मान्यता निरपेक्षपणे तपासून घेणारे आणि आपण म्हणतो ते चुकीचे आहे असे समजल्यास ते मान्य करण्याचे धैर्य दाखवणारे आहात की काय असे वाचणार्‍यांना वाटू शकते.

कालापव्यय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.नवीन यांनी प्रभावी प्रतिवाद केला आहे. त्यांची मांडणी तर्कसंगत आणि बुद्धीला पटणारी आहे. त्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न विषयाला धरून अगदी समर्पक असेच आहेत.ते अजून अनुत्तरित आहेत. तसेच वादविवादाची सर्व तत्त्वे त्यांनी पाळली आहेत.विषयाला सोडून भरकटणे नाही,वारेमाप विधाने नाहीत, प्रतिपक्षाच्या प्रतिसादातील विधानांचा आपल्याला हवातसा अर्थ ओढून ताणून लावून वेड पांघरून पेडगावला जाणे नाही.श्री.नवीन यांची बिंदुगामी संयमित लेखन शैली प्रशंसनीय आहे.
मात्र ज्यांना वस्तुरूप अस्तित्वच नाही अशा राहू-केतूंच्या विशिष्ट स्थानांमुळे एखाद्या बाईला रक्तस्राव होतो असल्या वेडगळ विधानाच्या प्रतिवादासाठी असे लेखन करणे निरर्थक आहे.केवळ कालापव्यय आहे. जे असली अचरट विधाने खरी मानतात अशा श्रद्धाळूंना काही पटवून देण्याचा प्रयत्‍न करणे व्यर्थ होय.

हेच

जे असली अचरट विधाने खरी मानतात अशा श्रद्धाळूंना काही पटवून देण्याचा प्रयत्‍न करणे व्यर्थ होय.

हेच सांगण्याचा मी कधी पासून प्रयत्न करत होतो. कशाला याच्या मागे लागता?
पण कधी कधी,
'स्वतः कधी काही लिहायचे नाही इतरांनी लिहिले तर ते मात्र वितंडवाद घालत खोडत बसायचे'
अशा पद्धतीशय अतिशय ज्ञानी, संयमीत माणसांची मति चालत नसावी हेच खरे...
असो, कुंडलीतील बिघडलेल्या बुधाचे आणि नीच गुरूचे प्रताप असावेत हे असे म्हणून सोडून द्यायचे - अजून काय म्हणणार मी?

असो, आजही जर कुणी मला रुंदी विरहीत रेखा व्याख्ये प्रमाणे काढून दाखवण्याची वाट पाहतो आहे.

आपला
गुंडोपंत आचरट

प्रताप

असो, कुंडलीतील बिघडलेल्या बुधाचे आणि नीच गुरूचे प्रताप असावेत हे असे म्हणून सोडून द्यायचे

हॅहॅहॅ ! गुंडोपंत आम्हाला शामभट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत मधिल
दुस-या भागात शामभट्ट व बटो हे भद्या व मंगळ्या या शेतावरच्या राखणदारांकडून बेदम मार खातात. याला ते अपशकूनाचा परिणाम म्हणतात.पुरंदरच्या प्रवासात भौगोलिक परिस्थिती उंच सखल असल्याने घोड्यावरील प्रवासात चुकामुक होते.झोपेत टांगेखालून घोडे निघून जाते; याला तो शनीचे प्रताप समजतो, व बटोने पाहिलेल्या ख-या परिस्थितीला तो स्वप्न समजतो. नेहमीप्रमाणे बटोला माघार घ्यावी लागते.
प्रकाश घाटपांडे

हा हा हा!

हा हा हा!
आयुष्यात पुढे जाऊन 'हे का घडले हे' मानण्यासाठी काहीतरी तरी निमित्त असावे ना?
काहीच नाही तर हे बरे...
म्हणजे आपले क्वांटम फिजिक्स म्हणतोय मी... तुम्हाला काय वाटले ज्योतिष?

आपला
गुंडोपंत

रेखा

>>असो, आजही जर कुणी मला रुंदी विरहीत रेखा व्याख्ये प्रमाणे काढून दाखवण्याची वाट पाहतो आहे.

खालील जागेत अशी रुंदीविरहित रेखा व्याख्येप्रमाणे काढलेली आहे. परंतु रुंदीविरहित असल्याने तुम्हाला ती दिसणार नाही (आणि मलाही). पण ती काढली आहे हे मात्र निश्चित.

हा हा हा.

नितिन थत्ते

म्हणजे मानणे आले?

रेखा दाखवता येत नाही?

हंम्म्!

म्हणजे तेथे रेखा आहे असे मानू म्हणताय?

मग अर्थातच पुढील सर्व भाग त्या मानण्यावर आधारीत आहे असे म्हणताय?

आपला
गुंडोपंत

खरोखर आहे.

मानू नका. ती तिथे आहेच.
नितिन थत्ते

माझे वाक्य

तुम्हीच उधृत केलेले माझे वाक्य -
असो, आजही जर कुणी मला रुंदी विरहीत रेखा व्याख्ये प्रमाणे काढून दाखवण्याची वाट पाहतो आहे.
यात मी दाखवणे स्पष्टपणे अपेक्षिले आहे.
कदाचित नजरचुकीने ते वाचनातून सुटले असावे किंवा दाखवणे झेपले नसावे!

असो, हा वाद वितंडवादाकडे जातो आहे दिसते म्हणून मी येथेच थांबतो आहे.

आपला
गुंडोपंत

वितंडवाद

>>हा वाद वितंडवादाकडे जातो आहे दिसते

मुळात आपण उधृत केलेले विनोबांचे प्रतिपादनच 'वितंडवाद' या स्वरूपाचे आहे. आपण जे बोलत आहोत ते समोरचा निमूट ऐकून घेणार आहे असे निश्चित माहिती असताना हे प्रतिपादन केले तरच टिकू शकेल.

(दगडात देव मानावा की नाही हा मुख्यत्वे सगुणभक्तीवादी आणि निर्गुणभक्तीवादी या दोन सश्रद्धांमधला वाद आहे. तो सश्रद्ध आणि अश्रद्ध यांच्यातला वाद नाही).

अश्रद्ध जेव्हा दगडात देव आहे असे कसे मानायचे असे म्हणतो तेव्हा तो दगडात असलेल्या देवाविषयी अविश्वास नसून तो कुठेही असलेल्या देवाबद्दलचा अविश्वासआसतो आणि तो मानलेला देव ज्या करामती करतो असा दावा असतो त्याविषयीचाच अविश्वास असतो.

तसाच अमूक ग्रहाचा अमुक परिणाम होतो हे नुसते मानण्यावर कुणाचा आक्षेप नसून त्या मानण्यावर विसंबून कृती करण्यावर आक्षेप असतो.

नितिन थत्ते

मान ना मान?

हेच सांगण्याचा मी कधी पासून प्रयत्न करत होतो. कशाला याच्या मागे लागता?

मग "हा योग आईच्या कुंडलीतून, पंचमातून असेल तर जन्म होतांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते" इति गुंडोपंत, "देवी, गोवर, कर्करोग इ. विशिष्ट ग्रहयोगांमुळे होतात" इति संजीव नाईक, हे आणि असले अनेक निराधार दावे खरे आहेत असे मानून शांत राहावे का?

'स्वतः कधी काही लिहायचे नाही इतरांनी लिहिले तर ते मात्र वितंडवाद घालत खोडत बसायचे'

म्हणजे लिहिणार्‍याने काही वाट्टेल ते लिहिले तरी फक्त ' त्याने लिहिले तरी आहे ना' असे म्हणायचे का? आणि 'लिहिले तरी आहे' म्हणून 'जे लिहिले आहे ते बरोबर आहे' असे म्हणायचे का? काहीही!

कुंडलीतील बिघडलेल्या बुधाचे आणि नीच गुरूचे प्रताप असावेत हे असे म्हणून सोडून द्यायचे - अजून काय म्हणणार मी?

आधीच्या दोन प्रतिसादात आणि त्याआधीच्या अनेक प्रतिसादांत (तुम्ही केलेल्या विधानांवर/दाव्यावर) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येत नाही आहेत हा कश्याचा प्रताप (की 'प्रतापाचा अभाव') म्हणायचा?

आजही जर कुणी मला रुंदी विरहीत रेखा व्याख्ये प्रमाणे काढून दाखवण्याची वाट पाहतो आहे.

बिंदू आणि रेषा व्याख्येप्रमाणे काढून दाखवता येत नाही. माझा पहिला प्रतिसाद वाचलात तर तुम्हाला कळेल की

अभ्यासाच्या सोयीसाठी संकल्पना मानली तरी त्याचे 'परिणाम' आणि 'उपयोजन' मानलेले नाहीत, ते प्रत्यक्ष पाहता येतात, त्याचे तर्कसंगत स्पष्टीकरण देता येते, त्याला सर्व परिस्थितीत लागू होणारे नियम लावता येतात आणि त्याचा तटस्थपणे पडताळा घेता येतो. "काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग त्याच्या दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो". ("असतो असे मानू" नव्हे!!). पायथॅगोरसचा सिद्धांताचा पडताळ घेण्यासाठी एक कागद, एक फूटपट्टी आणि एक पेन्सिल एवढे पुरेसे आहे! आणि कोणीही, कधीही याचा पडताळा घेऊ शकतो. 'मानलेल्या' संकल्पना याच्या आड येत नाहीत.

व्याख्येप्रमाणे बिंदू आणि रेषा काढता येत नाहीत यावरून काय सिद्ध होते असे तुम्हाला वाटते? फक्त 'काही गोष्टी मानलेल्या आहेत' हे एक साम्य आहे म्हणून 'भूमिती खरी असेल तर फलज्योतिषही खरे' हा हास्यास्पद आणि निराधार तर्क आहे. तुम्ही भूमितीचे उदाहरण घेतले आहे त्याची फलज्योतिषाची तुलना करून सांगा. ज्योतिषशास्त्रात मानलेल्या गोष्टी कोणत्या? सिद्धांत कोणते? त्यांची सिद्धता काय? पडताळा काय?

उदा. पायथॅगोरसच्या सिद्धांताचा पडताळा मी किंवा कोणीही कधीही घेऊ शकतो/ते. तसे "हा योग आईच्या कुंडलीतून, पंचमातून असेल तर जन्म होतांना रक्तस्राव होण्याची शक्यता असते" इति गुंडोपंत, "देवी, गोवर, कर्करोग इ. विशिष्ट ग्रहयोगांमुळे होतात" इति संजीव नाईक याबद्दल करता येईल का?

आवाक्याबाहेरचा विषय...

आवाक्याबाहेरचा विषय. लेख पार डोक्यावरूनच गेला...

असो,

तात्या.

--
अरे शाम, ठेव बाबा ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तेवढे थोर! आपली पट्टी काळी दोन. काळी तीन, काळी चार जमायची कशी? (इति काकाजी, नाटक - तुझे आहे तुजपाशी)

 
^ वर