कुश्टोबा राणे - गोव्याचा रॉबिन हूड
कोण हा कुश्टोबा? कुठला हा कुश्टोबा? कधीचा? काय केले कुश्टोबाने?
माझे लहानपण गोव्यातले आहे, पण कुश्टोबाबद्दल मी लहानपणी काहीच ऐकले नव्हते. त्याची कारणे दोन - माझ्या घरचे संस्कार सर्व महाराष्ट्रीय होते, हे एक. आणि दुसरे कारण असे, की माझे शालेय शिक्षण बहुतेक गोव्याच्या "नव्या कोन्क्विस्तीं"मधल्या दिवचल आणि फोंडा तालुक्यांत झाले. त्यामुळे "जुन्या कोन्क्विस्ती"तली लोकगीते मला क्वचितच ऐकायला मिळाली. खूप ऐकली असती, तर कुश्टोबाचे नाव मी ऐकले असतेच. कुश्टोबाच्या कथेशी संबंधित एकच लोकगीत मी ऐकले होते, त्यात "कुश्टोबा" असे नाव नव्हते. ("फारार फार" हे गीत पुढे दिलेले आहे.)
गोव्याची संस्कृती ही आजूबाजूच्या प्रांतांपेक्षा स्वतःचा वेगळेपणा राखून असली, तरी तिच्या अंतर्गत दोन मोठे विभाग आहेत. पोर्तुगिजांनी १५०५-१५१५ काळात आजकालचे बारदेश, तीसवाडी, मुरगांव आणि सासष्टी तालुके जिंकले. या जुन्या कोन्क्विस्तींमध्ये पोर्तुगीज शासनाने मोठ्या प्रमाणात बाटवाबाटवी केली. या भागातील लोकांना पलीकडील आपल्या हिंदू नातेवाइकांबाबत ममत्व आहे, पण त्या काळात ते पार तुटून बाजूला पडले. पुढे पोर्तुगाल शासनानेच हुकूम काढून बाटवाबाटवी बंद केली. तब्बल दोन-अडीचशे वर्षांनी (१७५० काळात आणि पुढे) पोर्तुगिजांनी गोव्याचा बाकीचा भाग काबीज केला. या नव्या कोन्क्विस्तींत आणि आदल्या जुन्या कोन्क्विस्तींत (कुठल्याही एका धर्मसमाजामध्येसुद्धा) भाषेचा, संस्कृतीचा पुष्कळ फरक आहे.
जुन्या कोन्क्विस्तींमध्ये लोकांनी काही प्रमाणात पोर्तुगिजांच्या ठशाला स्वीकारले, पण जमेल तितकी आपली संस्कृती, आपले स्वत्व टिकवायचा प्रयत्न केला. त्यातून जे संगीत उद्भवले आणि टिकले त्यात देखणी, दुल्पदे वगैरे गीतप्रकार आहेत. आणि या गीतांमध्ये लोकांची दुखणी-खुपणी, हर्षोल्लासाचे प्रसंग आहेत, तसेच काही ऐतिहासिक प्रसंग आणि व्यक्तिमत्त्वेसुद्धा आढळतात.
काही गीते अगदी नव्या कोन्क्विस्तीत राहूनसुद्धा मी ऐकली होती. पैकी एक आहे "फारार फार". म्हणावे तर यातली घटना नव्या कोन्क्विस्तींमधल्या सत्तरी भागातली आहे. पण यातले ऐतिहासिक पडसाद काही मला माहीत नव्हते - इतकेच काय शब्दांकडेसुद्धा मी नीट लक्ष दिले नव्हते.
गाण्याचा हा मथितार्थ मला फार पुढे कळला. गाणे असे :
फारार फार.mp3 - धनंजय
(शब्दांबद्दल आणि सुरावटीबद्दल आभार - माएस्त्रो लूदिन्य बार्रेतो; त्यांचे गोंयचे गीत आंतरजालावर उपलब्ध करून दिल्याबद्दल लुरेन्सु द नोरोन्य यांचे आभार.)
मूळ कोंकणी पाठ्य | मराठी भाषांतर |
फारार फार जातांय रानांतु फारार फार जातांय रानांतु राणे मात्तांय पाकल्यांकु पाकले मात्तांय राण्यांकु फारार फार जातांय रानांतु फारार फार जातांय रानांतु |
स्फोटांवर स्फोट (फैरींवर फैरी) होत आहेत रानात स्फोटांवर स्फोट (फैरींवर फैरी) होत आहेत रानात राणे मारतायत गोर्यांना गोरे मारतायत राण्यांना स्फोटांवर स्फोट (फैरींवर फैरी) होत आहेत रानात स्फोटांवर स्फोट (फैरींवर फैरी) होत आहेत रानात |
अत्यंत मिताक्षरांत, विरोध कुठल्याही शब्दात स्पष्ट न सांगता विरोध गाण्याचा हा नमुना आहे. (गोरे राण्यांना मारत आहेत, आणि राणे गोर्यांना मारत आहेत, हे गोर्यांच्या राज्यात तटस्थपणे सांगणे, म्हणजे काय!)
सत्तरीच्या जंगलांमध्ये १८५०-१९०० काळात राणे नामक सरदार कुटुंबाने परत-परत बंडाळी उठवली. तिथे जाऊन लढताना पोर्तुगिजांच्या नाकी नऊ आले. पुढे पोर्तुगिजांनी राण्यांशी करार करून त्यांना शांत केले. याच राणे कुटुंबांपैकी गोव्यातील हल्लीचे काही राजकीय पुढारी आहेत.
पण कुश्टोबाबद्दल काय? कुश्टोबाचा नामोनिर्देश अनेक गाण्यांमध्ये होतो, पण ती मी लहानपणी ऐकली नव्हती. त्यांच्यापैकी एक गाणे मी येथे देत आहे.
|
(शब्दांबद्दल आणि सुरावटीबद्दल आभार - माएस्त्रो लूदिन्य बार्रेतो; त्यांचे गोंयचे गीत आंतरजालावर उपलब्ध करून दिल्याबद्दल लुरेन्सु द नोरोन्य यांचे आभार.)
राजकारणापेक्षा या गाण्यात कुश्टोबाची वीर-रम्य कथा सांगितलेली आहे.
कथा रक्तरंजित आहे, आणि त्याकाळच्या जातींच्या तिढ्याशी संबंधित आहे - वाचकांनी हे जाणून पुढील भाग वाचावा.
मूळ कोंकणी पाठ्य | मराठी भाषांतर |
कुश्टोबा - मिराशी इंदियेचो तेरोरु गोंयचो, कोन्फ्लित पोवांचो, इन्मिंगो बोटांचो तेरोरु गोंयचो, कोन्फ्लित पोवांचो, इन्मिंगो बोटांचो |
कुश्टोबा - मिराशी इंडियेचा आतंक गोव्याचा, चलवळ्या लोकांचा, शत्रू भटांचा आतंक गोव्याचा, चलवळ्या लोकांचा, शत्रू भटांचा |
"दांउणींतल्यान सुटुन बोटांची गोमटी उडोइन कापून" |
"दावणीतून सुटून भटांची मान उडवेन कापून" |
बोटांकु माल्ल्-म्हूण आपल्या घोरांत चोवकोश पावोइलीं सोगळ्या गांवांत ओफिस पाटोयलो फिसिकालांक कुश्टोबाक घालूंक आर्सेनालांक |
भटाला मारले म्हणून आपल्या घरात चौकशी पोचली सगळ्या गावांत अंमलदार पाठवला तपास करायला कुश्टोबाला तुरुंगामध्ये घालायला |
"होरी, म्होज्या होरी, म्होज्या पायांच् गेल्याय काती जाईन हांव जाईन, जातीन बोंडारी, बोटांच् कापून गोमटी" |
"हरी, माझ्या हरी, माझ्या पायांची गेलीये चामडी होईन मी होईन, जातीने भंडारी, भटाची कापून गोमटी (मान)" |
बोटांकु माल्ल्-म्हूण ... | भटाला मारले म्हणून... |
गोयां वोंइचें वाटेर, वाकड्यो-तिकड्यो मेरो बोटांच्या फाउरान, ज्विझाच् सेंतेन्सान, पायांत घाल्याय सांकळ्यो |
गोव्याला जायच्या वाटेवरती वाकडेतिकडे शेतावरचे बांध भटाच्या पक्षपाताने, जज्जाच्या निकालाने, पायात घातल्या साखळ्या |
कुश्टोबाचे वैयक्तिक बंड कसे सुरू झाले त्याची दंतकथा अशी काही सांगतात -
एका भटाने कुश्टोबाच्या घराच्या आब्रूवर डाग लावला होता. "या अपमानाचा सूड घेईन" असा चंग कुश्टोबाने बांधला. भटाने कुश्टोबाचा काटा काढायचे ठरवले. "कुश्टोबा आणि त्याच्या बापाने मिळून कोणाचातरी खून करून प्रेत जंगलात पुरताना आपण पाहिले आहे," अशी तक्रार त्याने पोर्तुगिज पोलिसांमध्ये केली. त्याच्या बाजूने आणखी काही भट खोटे साक्षीदार म्हणून उभे राहिले. कुश्टोबाला आणि त्याचा बापाला अटक केली गेली आणि न्यायालयाने कोठडीत टाकले. कोठडीत अनेक दिवस खितपत पडल्यानंतर कुश्टोबा तिथून कसाबसा निसटला. खुन्नस पेटून त्याने त्या भटाचा खून केला.
मग बंडखोर होऊन श्रीमंत भटांना आणि पोर्तुगिजांना त्याने आतंकित केले... अशी काही गाण्याची कथावस्तू आहे.
पुढे कुश्टोबाला मारण्यात पोर्तुगीज पोलिसांना यश मिळाले. पोर्तुगिज पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला लढत-लढत मारला. परंतु लोकप्रवाद असा आहे, की कुश्टोबाची 'बुलें' नावाची रखेल पोर्तुगिजांना फितुर झाली, आणि तिने कुश्टोबाला पोलिसांच्या हाती दिले.
अशा या कुश्टोबाच्या आतंकाचे कौतुक करणारी काही लोकगीते अजूनही गोव्यात प्रचलित आहे.
बंडाबद्दल लेखी इतिहास काय आहे? राण्यांनी तह करून ते पोर्तुगिजांचे अंकित झाले. म्हणजे त्यांचा कागदोपत्री इतिहास सलोख्याचा आहे - आम्ही पोर्तुगिजांकडून न्याय मिळवून त्यांचे मित्र झालो - असा काही. पोर्तुगिजांच्या कोर्टाच्या, पोलिसांच्या आलेखात काही तारखा वगैरे सापडतील. तपशील तथ्य असले, तरी कोरडे, पोर्तुगिजांच्या दृष्टिकोनांतले. या बंडखोरांबद्दल लोकांमध्ये जी काही भावना होती, ती त्या आलेखांत सापडणार नाही. सनावळी नसलेल्या, तपशील कदाचित चुकलेल्या अशा गोव्याच्या लोकगीतांत मात्र त्या घटनांचा रोमांच खराखुरा उतरला आहे.
Comments
लोकगीत
लोकगीताच्या, किंवा एकूणच लोकवाङ्मयाच्या, आधारे इतिहासाचा वेध घेण्याचा प्रयत्न आवडला, पण अजून तपशीलवार मांडणी हवी होती, असे वाटते आहे.
तंट्या
लेख वाचून बाबा भांड यायच्या 'तंट्या' भिलाची ध्यान आली.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)
त्रिकाल नावाचा चित्रपट आणि कुश्टोबा राणे
लोकगीताद्वारे केलेली इतिहासाची मांडणी आवडली.
कुश्टोबा राणे हे नाव ऐकल्यासारखे वाटत होते पण नेमके कुठे ते मात्र आठवत नव्हते कारण या नावाचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ मी वाचलेले नाहीत म्हणून थोडासा शोध घेतला आणि पत्ता लागला. :-)
फारा वर्षांपूर्वी त्रिकाल नावाचा श्याम बेनेगल यांचा चित्रपट पाहिला होता. त्यात कुलभूषण खरबंदाने कुश्टोबा राणेची (किंवा त्याच्या भूताची) भूमिका केली होती. मला कथा अजिबात आठवत नाही पण आवडीचा एक प्रसंग आठवतो :-) तो असा की, पोर्तुगीज नायिका आपल्या मेलेल्या नवर्याच्या आत्म्याला बोलावण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या नवर्याऐवजी कुश्टोबाचे भूत तेथे प्रकट होते. कुश्टोबाचा मृत्यू तिच्या नवर्याच्या हातून झालेला असतो किंवा तो कटात सहभागी असतो असे काहीतरी असावे. चित्रपट गोव्यातील असून १९६१ चा कालखंडच असावा असे वाटते.
वा!!!
लेख आवडला. खास धनंजयी शैली. लोकगीत / लोककला वगैरेंच्या सहाय्याने इतिहास मस्त मांडलाय. धन्यवाद.
कुश्तोबा (की कुश्टोबा) राणे हे नाव त्रिकाल चित्रपटात प्रथम ऐकले होते. नामवैचित्र्यामुळे आणि त्या चित्रपटात दाखवलेल्या त्याच्या भूतामुळे या व्यक्तिबद्दल विलक्षण कुतूहल होते मनात. पण कधी फारशी माहिती ऐकली नव्हती. पण आज बरीच माहिती कळली. परत धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
फारार फार गाण्याची एम पी ३
फारार फार गाण्याची एम पी ३
लेखातील "इमीम" विजेट चलत नाही असे दिसते, म्हणून येथे ईस्निप्स विजेट देत आहे. हे चालत असल्यास संपादकांनी लेखात घालावे ही विनंती.
मस्त!!
गाणी तर मस्तच. गाणी कुणी म्हटली आहेत बरे. ह्या सगळ्या सुरावटी अगदी पाश्चिमात्य वाटत आहेत. एकंदर लेख फार आवडला. वेदांतल्या ऋचा तेव्हाच्या संस्कृतीबाबत, समाजाबाबत काय म्हणतात हे जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आभार
सर्व वाचकांचे आभार मानतो.
या लेखाचा (लेखमालेचा) पूर्वेतिहास असा काही आहे :
दुसर्या कुठल्या लेखाच्या संदर्भात एका प्रतिसादकाने मला गोव्यातील पाश्चात्त्य धर्तीच्या गाण्यांबद्दल माहिती विचारली. पण याबद्दल मला काहीच सांगता आले नाही म्हणून वाईट वाटले.
आंतरजालावर शोधाशोध करता मला गोव्यातील (मुख्यतः जुन्या कोन्क्विस्तींमधील) लोकगीतांची पर्वणी सापडली. (म्हणून काही वैयक्तिक ज्ञान मिळाले असे नाही...) लुरेन्स द नोरोन्य यांनी गीतांच्या सुरावटींच्या अनेक पुस्तकांची प्रकाशमुद्रणे (स्कॅन) लेखकांच्या परवानगीने त्यांच्या संकेतस्थळावर चढवलेली आहेत. त्यात सुखद आश्चर्य म्हणजे स्व. माएस्त्रो लूर्दिन्य बार्रेतो यांचे "गोंयचे गीत" हे पुस्तकही होते.
माएस्त्रो बार्रेतो हे गोव्याच्या कला आकादमीच्या पाश्चिमात्य संगीत विभागाचे प्रमुख होते, आणि कला आकादमी वाद्यवृंदाचे निदेशकही होते. (या वाद्यवृंदात काही सोपे वाद्यवादन मीसुद्धा केले आहे. कमकुवत वादकांमुळे वृंदाचे संगीत बिघडू नये, तरी सर्व विद्यार्थ्यांना थोडीतरी संधी मिळावी, ही तारेवरची कसरत त्यांनी कशी जमवली, ते माएस्त्रो बार्रेतोच जाणोत.) माझे वाद्यवादन सुधारायची शिकवणी त्यांनी मला द्यायची तयारी दाखवली, पण मी फायदा घेतला नाही. त्यामुळे त्यांना माझे गुरू म्हणणे योग्य नाही. पण गुरुतुल्य होते, हे खरे. त्यांना श्रद्धांजली देण्याची माझी सांगीतिक लायकी नाही.
काही नाही तर त्यांच्या पुस्तकामधील काही गीतांची ओळख मराठी संकेतस्थळांवर करून देऊन त्यांच्या आठवणी मनात ताज्या कराव्यात अशी माझी मनीषा होती. त्या निमित्ताने मराठी संकेतस्थळांवरील वाचकांना गोव्याच्या गीतांचे वैविध्य मी सांगावे. माझ्या तोकड्या माहितीमधून काही वाचकांना कुतूहल वाटून वाचक स्वतः अधिक माहिती मिळवण्यास उद्युक्त होतील, अशी आशा होती.
मराठी संकेतस्थळांचे बहुसंख्य वाचक पाश्चिमात्त्य पद्धतीने लिहिलेल्या सुरावटी वाचू शकत नसतील, ही शक्यता मनात आली - मग काय करावे? यूट्यूबवर किंवा गूगलवर शोधून या गाण्यांची ध्वनिमुद्रणे किंवा चित्रफिती मला मिळाल्या नाहीत. शेवटी हिय्या करून मी स्वतःच ध्वनिमुद्रणे करून द्यायची ठरवली. काही म्हटले तरी ही लोकगीते आहेत. कुशल गायकांनी गायली तर छानच, पण साधारणपणे मपल्या-तुपल्यासारखे सामान्य न-गायक गाणार. थोडीफार सुरात गायली, वाजवली; लय थोडीफार सांभाळली, तर संकेतस्थळावरील श्रोत्यांना धुन काय आहे, ही कल्पना येईल. मग ती ध्वनिमुद्रणे करून माझे (वैयक्तिक) थोडे हसे झाले, तरी फार मोठे नुकसान नाही.
(@धम्मकलाडू - ध्वनिमुद्रणातील आवाज आणि वाद्यवादन माझेच आहे. ज्या ठिकाणी दोन लोकांनी धुन गायची आहे, तिथे मीच दोनदा गायलो आहे, आणि ध्वनिफिती मिसळल्या आहेत.)
मराठी संकेतस्थळावर दिलेले तीन लेख येणेप्रमाणे :
१. आगे नारी - एक कोंकणी लोकगीत : या लेखातून हिंदी सिनेमातल्या "ना मांगूं सोना चांदी" गाण्यामार्फत गोव्याच्या लोकगीताचा परिचय करून द्यायचा होता.
२. गोणेस्पोती राया - सासष्टीमधील एका आरतीची चाल : या लेखाद्वारे हे दाखवायचे होते, की ही "ख्रिस्ती" समाजातील लोकगीते तशी कप्प्यात बसत नाहीत. लोकगीतांमध्ये हिंदू देवदेवतांची गीतेसुद्धा आहेत.
३. वरील "कुश्टोबा" लेख : या लेखाद्वारे दाखवायचे होते की लोकगीतांमध्ये ऐतिहासिक उल्लेख येतात.
(@बाबुराव : तंट्याचे उदाहरण - या लोकगीताबद्दल अधिक सांगावे, ही विनंती.)
तीन लेखांमधून मला जी ओळख करून द्यायची होती ती खोलात जाणारी नव्हती, पण वैविध्य दाखवणारी होती. ज्या विषयाबद्दल मला खुद्दच ओळख अगदी हल्ली होऊ लागली आहे, त्यात खोलात काय जाणार?
(@श्रावण मोडक : कुश्टोबाबद्दल लोकगीते आणि राण्यांच्या बंडाचा इतिहास या बाबतीत माझे ज्ञान फार थोडे आणि हल्ली मिळवलेले आहे. त्यामुळे विस्तार करणे माझ्या कुवतीबाहेर आहे. प्रतिमा कामत यांचे "फारार फार" हे [इंग्रजी] पुस्तक मिळवून वाचण्याचा माझा विचार आहे.)
प्रियाली आणि बिपिन कार्यकर्ते, दोघांनी "त्रिकाल" चित्रपटाची आठवण करून दिली. हा चित्रपट मी लहानपणी कमजोर प्रसारणाच्या कृष्णधवल दूरदर्शनवरती बघितला होता. त्यातील तपशील मी विसरून गेलो होतो. मी तो पुन्हा यूट्यूबवरती बघितला, तेव्हा तो किती उत्तम दर्जाचा चित्रपट आहे, ते पुन्हा जाणवले. यात कुश्टोबाच्या भुताचे पात्र येते हे मी पूर्णपणे विसरलो होतो. (@बिका : हिंदीत "कुश्तोबा" असावे. मराठमोळ्या, कोकण्या [आणि संस्कृत] शब्दांत "श्त" उच्चार कधी सापडत नाही. हिंदी कुश्ती->मराठी कुस्ती.)
"त्रिकाल" चित्रपटात कुश्टोबाच्या कथेचा वेगळा प्रकार सांगितला आहे. यात बंडखोर कुश्टोबाला पोर्तुगीज पोलीस त्याच्या बाईच्या घरात पकडतात, पण ती फितूर नव्हती, असे कथानक दाखवले आहे. अर्थात लोकप्रवादांमध्ये असेही काही असेल. पण लोटली गावच्या सुआरिश-दिसुझा घराण्याचा कुश्टोबाला धरण्यात-मारण्यात हात होता, हा तपशील बहुधा काल्पनिक आहे. (असे कुठले घराणे खरोखर असल्यास! - बहुधा काल्पनिक आहे.)
अवांतर : "त्रिकाल" चित्रपटाच्या सुरुवातीला पोर्तुगीज गायिका आमालिया रुद्गीगिश हिचे ध्वनिमुद्रण आहे. ही पोर्तुगीज "फादो" या करुण गायनप्रकाराची साम्राज्ञी होती. त्या अनुषंगाने आंतरजालावर तिची गाणी शोधून ऐकली. हा लेख लिहिण्याचा असा हा अनपेक्षित वरकड फायदा मला झाला.
पुनश्च : सर्व वाचकांचे आभार व्यक्त करतो.
धन्य झालो !
ज्या ठिकाणी दोन लोकांनी धुन गायची आहे, तिथे मीच दोनदा गायलो आहे, आणि ध्वनिफिती मिसळल्या आहेत.
धन्य झालो! आमच्यामते धनंजय हेच कोरस, वाद्यवृंद व डीजेही आहेत. ('आमच्यामते धनंजय हाच एक उपक्रम आहे'च्या धरतीवर)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"