वैदिक ऋचांचे रसग्रहण (मण्डूकसूक्त ७:१०३)

उपक्रमावर "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले" या मालिकेत सध्या ऋग्वेदाबद्दल चर्चा चालू आहे. त्यात ऋग्वेदाबद्दल भारावून टाकणारे साहित्य अशा प्रकारचा उल्लेख आला आहे. कोणाकोणाला रोचक ऋचा माहीत असतील तर त्या आपण एकमेकांना सांगूया, म्हणून हा चर्चाप्रस्ताव सुरू करत आहे. सुरुवात मी "मण्डूकसूक्ता"ने करतो.

बेडकांच्या आवाजासाठी मंत्रपठनाची उपमा मी पहिले ऐकली ती पु. ल. देशपांडे यांच्या "तुझे आहे तुजपाशी" नाटकामध्ये. हल्लीच ऋग्वेदातले "मण्डूकसूक्त" वाचले, तसे मनात आले - इथून तर या उपमेचे बीज आपल्या संस्कृतीत रुजले नसेल ना? (पु. ल. यांचे आजोबा ऋग्वेदाचे गाढे अभ्यासक होते, त्यांच्याबद्दल पु. ल. यांचा "ऋग्वेदी" हा गौरवलेख पुष्कळांनी वाचलाच असेल.)

सूक्ताची कथा अशी सांगतात :
वसिष्ठ ऋषीने पर्जन्याची स्तुती केली, पाऊस पडला, तशी बेडके गाऊ लागली. बेडकांच्या आवाजाने भारावून जाऊन वसिष्ठाने हे सूक्त रचले. सूक्ताचे मूलपाठ्य येथे मी देत आहे, आणि मराठीतून सैल भावानुवादही देत आहे. (स्वरांसह मूलपाठ्याचा दुवा; ग्रिफिथ यांच्या इंग्रजी अनुवादाचा दुवा.; भावानुवाद अष्टाक्षरी छंदात बसवायचा प्रयत्न केल्यामुळे अधिकच सैल झाला आहे, क्षमस्व.)

- - -
ऋषि: - वसिष्ठः मैत्रावरुणि:, देवता: - मण्डूका:, ऋक् १ - अनुष्टुप्, ऋचः २-९ - त्रिष्टुप्
- - -
सं॒व॒त्स॒रं श॑शया॒ना ब्रा॑ह्म॒णा व्र॑तचा॒रिण॑:।
वाचं॑ प॒र्जन्य॑जिन्वितां॒ प्र म॒ण्डूका॑ अवादिषुः॥ ७.१०३.०१

जणू ब्राह्मण व्रतस्थ वर्षभर झोपलेले
बेडके बोलली शब्द पावसाने जागलेले

दि॒व्या आपो॑ अ॒भि यदे॑न॒माय॒न्दृतिं॒ न शुष्कं॑ सर॒सी शया॑नम्।
गवा॒मह॒ न मा॒युर्व॒त्सिनी॑नां म॒ण्डूका॑नां व॒ग्नुरत्रा॒ समे॑ति॥ ७.१०३.०२

चामडे का अचेतन? सुकलेले सरोवर!
दिव्य वर्षावाची धार धोधो आली त्याच्यावर
वासरांच्या मायी गायी येथे ना ज्या हांबरती
बेडकांच्या डरकाळ्या भरलेल्या आसमंती

यदी॑मेनाँ उश॒तो अ॒भ्यव॑र्षीत्तृ॒ष्याव॑तः प्रा॒वृष्याग॑तायाम्।
अ॒ख्ख॒ली॒कृत्या॑ पि॒तरं॒ न पु॒त्रो अ॒न्यो अ॒न्यमुप॒ वद॑न्तमेति॥ ७.१०३.०३

हे होते आसुसलेले होते नि तहानलेले
वर्षाऋतु जैसा आला कैसे भिजले भिजले
आनंदाने हुर्यो हुर्यो म्हणत म्हणत भेटे
येऊन एकामेकाला जैसे काही बापबेटे

अ॒न्यो अ॒न्यमनु॑ गृभ्णात्येनोर॒पां प्र॑स॒र्गे यदम॑न्दिषाताम्।
म॒ण्डूको॒ यद॒भिवृ॑ष्टः कनि॑ष्क॒न्पृश्नि॑: सम्पृ॒ङ्क्ते हरि॑तेन॒ वाच॑म्॥ ७.१०३.०४

भेटतात एकमेका आनंद वाहाते पाणी
ठिपक्याने मिसळली हिरव्याशी आहे वाणी

यदे॑षाम॒न्यो अ॒न्यस्य॒ वाचं॑ शा॒क्तस्ये॑व॒ वद॑ति॒ शिक्ष॑माणः।
सर्वं॒ तदे॑षां स॒मृधे॑व॒ पर्व॒ यत्सु॒वाचो॒ वद॑थ॒नाध्य॒प्सु॥ ७.१०३.०५

एकमेकांची बोलून सशक्त झाली शिकून
वाढीला लागली वाणी पाण्यापाशी सोकावून

गोमा॑यु॒रेको॑ अ॒जमा॑यु॒रेक॒: पृश्नि॒रेको॒ हरि॑त॒ एक॑ एषाम्।
स॒मा॒नं नाम॒ बिभ्र॑तो॒ विरू॑पाः पुरु॒त्रा वाचं॑ पिपिशु॒र्वद॑न्तः॥ ७.१०३.०६

हांबरती गाय एक कोकले बकरू एक
ठिपकाळ असे एक हिरवट असे एक
नाव एक "बेडूक" हे, रूप वेगवेगळाले
आवाजही करतात वेगळेच बोललेले

ब्रा॒ह्म॒णासो॑ अतिरा॒त्रे न सोमे॒ सरो॒ न पू॒र्णम॒भितो॒ वद॑न्तः।
सं॒व॒त्स॒रस्य॒ तदह॒: परि॑ ष्ठ॒ यन्म॑ण्डूकाः प्रावृ॒षीणं॑ ब॒भूव॑॥ ७.१०३.०७

"अतिरात्र" यज्ञामध्ये मंत्र ब्राह्मण म्हणती
पूर्ण सोम-घडा मध्ये बैसलेले त्याभोवती
वर्षामध्ये वर्षावाच्या पहिल्यावहिल्या दिशी
भोवताली तलावाच्या बैसली बेडके तशी

ब्रा॒ह्म॒णास॑: सो॒मिनो॒ वाच॑मक्रत॒ ब्रह्म॑ कृ॒ण्वन्त॑: परिवत्स॒रीण॑म्।
अ॒ध्व॒र्यवो॑ घ॒र्मिण॑: सिष्विदा॒ना आ॒विर्भ॑वन्ति॒ गुह्या॒ न के चि॑त्॥ ७.१०३.०८

उच्चै:स्वरे घोष करी ब्रह्मवृंद सोमयाजी
घामेजले अध्वर्यूही प्रकटले काहिलीशी

दे॒वहि॑तिं जुगुपुर्द्वाद॒शस्य॑ ऋ॒तुं नरो॒ न प्र मि॑नन्त्ये॒ते।
सं॒व॒त्स॒रे प्रा॒वृष्याग॑तायां त॒प्ता घ॒र्मा अ॑श्नुवते विस॒र्गम्॥ ७.१०३.०९

बारामासक्रम दैवी पाळे नाही त्यात त्रुटी
काहिलीला मिळे मुक्ती वर्षाअंती येता वृष्टी

गोमा॑युरदाद॒जमा॑युरदा॒त्पृश्नि॑रदा॒द्धरि॑तो नो॒ वसू॑नि।
गवां॑ म॒ण्डूका॒ दद॑तः श॒तानि॑ सहस्रसा॒वे प्र ति॑रन्त॒ आयु॑:॥ ७.१०३.१०

हांबर्‍याने कोकर्‍याने ठिपक्याने हिरव्याने
दिले धन शेकड्याने गायी आणि आयुष्माने

- - -

सोमघटाभोवती बसलेले ब्राह्मण, एकमेकांना कडाडून भेटणारे बापलेक, एकमेकांचे शिकून बुलंद होणारे आवाज, गायीसारखे हांबरणारे- बकर्‍यासारखे बेंबटणारे बेडूक... कितीतरी उपमा. सुंदर आहेत, पण खास म्हणजे उपमा हासर्‍या आहेत. आणि मंत्रपाठ करणार्‍या ब्राह्मणांची थोडी मिष्किलपणे खेचली असल्याचाही भास होतो.

तर चला मंडळी - तुमच्या आवडीच्या ऋचांचे रसग्रहणही जरूर द्या.

Comments

उत्तम

उपक्रम आणि भावानुवाद. ७.१०३.०५ ही ऋचा 'सहनाववतु, सहनौभुनक्तु'चं तत्व सांगते का? 'काहिली'चा दुहेरी अर्थवापरही आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

फारच छान

तुमचा लेख वाचून स्वतःला संस्कृत येत नसल्याचा अतिशय खेद झाला. असो. तुम्ही दिलेले भाषांतर वाचताना मजा आली. आणखी असे लेख् येऊद्यात
चन्द्रशेखर

उत्तम

धनंजय, उपक्रम आणि अनुवाद दोन्ही आवडले.

उत्तम भावानुवाद

उत्तम भावानुवाद. अष्टाक्षरी छंदात भावानुवाद बसवताना आशयहानी होणार नाही यासाठी लागणार्‍या कसरतीत यशस्वी.
आमचे मते धनंजय हाच एक उपक्रम आहे.
प्रकाश घाटपांडे

+१

>>आमचे मते धनंजय हाच एक उपक्रम आहे.
सहमत.

नितिन थत्ते

पूर्णपणे सहमत

आमचे मते धनंजय हाच एक उपक्रम आहे.

असेच. अष्टाक्षरी तर मस्तच आहेत. मजा येते आहे वाचताना.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

सहमत आहे!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अप्रतिम भावानुवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
...अष्टाक्षरी छंदातला अप्रतिम अनुवाद|
.....धनंजयांनी रचिला कैसी द्यावी शब्दीं दाद|

मंडूकसूक्तांचा श्री.धनंजय यांनी केलेला भावानुवाद अप्रतिम आहे.त्यांनी हा लेख लिहिला नसता तर आपण या आनंददायी काव्याला मुकलो असतो.
लहानपणी कोकणात असताना पावसाच्या दिवसांत पाणी भरलेल्या शेतांत ठेक्यात चालणारे हे मंडूकांचे साद-प्रतिसाद अनेकदा आवडीने ऐकले आहेत.(कोकणात बेडकाला मांडूक म्हणतात.बेडूक शब्द पुस्तक वाचू लागल्यावर समजला.)
..दुर्दैवाची गोष्ट अशी की आता कोकणात हे दर्दूरबोल क्वचितच ऐकू येतात. पैसे मिळतात म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर बेडूक पकडून मुंबईतील हॉटेलांसाठी विकले.

मस्त!

भावानुवाद आवडला. अधिक येऊ द्यात.

ऋग्वेदातली शेवटची ऋचा

समानी व: आकूति: समाना हृदयानि व: ।
समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ॥

---(ऋग्वेद मंडल १०, सूक्त १९१, ऋचा चौथी)
ऋग्वेदातली ही शेवटची ऋचा. लोकमान्य टिळकांनी ’गीतारहस्या’चा उपसंहार करताना शेवटी हाच मंत्र उद्‍धृत केला आहे.
व:-तुमची. आकूति:-भावना, अभिप्राय. हृदयानि--हृदये, अंत:करणे. सुसह असति-उत्तम हितासहित(साहित्य) असोत.
राष्ट्राचे संविधान रचून विश्वाची उत्तम कार्ये करणार्‍या राष्ट्रपुरुषाला व त्या राष्ट्राच्या प्रजाजनांना, ऋग्वेद संहितेच्या या अंतिम ऋचेत साहित्‍याची भावना ठेवून संहितेच्या रूपाने वेदमातेने शुभाशीर्वाद देताना म्हटले आहे:
हे राष्ट्रपुरुष आणि प्रजाजनहो, तुम्हां सर्वांचे अभिप्राय( भावना, हेतु, इच्छा) एकसारखे, सर्वांचे हित करणारे असोत. तसेच तुम्हां सर्वांची हृदये परस्परांविषयी सख्य-भावनेचे जतन करोत. तुम्ही सर्व प्रजाजन अन्य राष्ट्रांच्या प्रजाजनांसह, एकत्र बसून हितकारी-साहित्य-गोष्टी कराव्या. त्या योगाने त्यांच्याशी तुमची मने जोडली जावोत.
--वाचक्‍नवी

ऋग्वेदसार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे आचार्य विनोबांनी संपादित केलेले पुस्तक मजजवळ आहे .त्यात विनोबांनी ऋग्वेदातून निवडलेले १३१९ मंत्र आहेत. प्रस्तावनेत म्हटले आहे की ऋग्वेदात एकूण १०५५२ ऋचा आहेत. त्यांतील १/८ निवडल्या आहेत. त्या २५० ऋषींनी रचल्या आहेत. या दोनशे पन्नासांत १९ ऋषिका(स्त्रिया) आहेत.या एकोणीस जणींची नावेही दिली आहेत.
पण अडचण अशी की एकाही मंत्राचा अर्थ दिलेला नाही.कठिण शब्दांचे अर्थही दिलेले नाहीत.विनोबाजी म्हणतात" शब्द हेच प्रमाणभूत आहेत.अर्थ तर अनेक होऊ शकतात.म्हणून अर्थ दिलेला नाही. ऋषींनी आपल्याला शब्द दिले हाच त्यांचा मोठा उपकार आहे." पण अर्थच समजत नसेल तर केवळ शब्दांचा काय उपयोग?

ऋग्वेदाचा अनुवाद

भीमराव कुलकर्णी(वय ८७) या गृहस्थांनी केलेला ऋग्वेदाचा मराठी अनुवाद काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. अनुवाद पाच खंडांत आहे, एकूण पाने ४५००. छापील किंमत रुपये ३७५०. वीस टक्के सवलतीत उपलब्ध आहे. (मी अजून पाहिलेला नाही.)
प्रकाशक: म्हैसकर फ़ाउन्डेशन(वसई?) फ़ोन:९१-२५०-२८६३६२०--वाचक्‍नवी

सुंदर सूक्त

उन्हाळ्यानंतरच्या वळीवाच्या म्हणाव्याश्या धो धो पावसात, झोपड्यांत आगोटीभोवती बसून, सोमरस पीत वेदकालीन लोक मोठ्यांदा हे सूक्त म्हणत आहेत अशी कल्पना केली. मजा आली. निसर्गाशी जोडलेल्या प्रार्थना, देव, धर्म नष्ट व्हायला नेमकी केव्हा सुरुवात झाली असेल असा विचार मनात आला.

माहितीसाठी आणि सुंदर अनुवादासाठी मनःपूर्वक धन्यवाद.

यज्ञ...

कित्येक महिन्यांच्या कोरडेपणानंतर, ज्याची आतुरतेने डोळे लावून वाट पाहिली तो पाऊस शेवटी आला. आणि त्यातून होणारा आनंद काय वर्णावा? तो साजरा करण्यासाठी या चराचर सृष्टीनेच यज्ञ मांडला. आणि त्या यज्ञातले मंत्र म्हणजे हे बेडकांचं ओरडणं. ते कुरूप दिसतात, कर्कश ओरडतात यावर जाऊ नका... या क्षणी त्यांचे बोल म्हणजे साक्षात वेदमंत्रच आहेत. हे मध्ये साठलेलं पाणी म्हणजे सोमरसाचा घट आहे, त्यात तितकीच तृप्तीची शक्ती आहे. कारण तहानही तशीच आहे. त्या बटबटीत, कर्कश स्वरांतून, चाललेला आनंद सोहोळा पहा... तो अनुभवून तुम्हाला जे मिळेल ते कुठल्याही यज्ञात मिळणार्‍या शेकडो गाईंच्या दानाइतकंच मूल्यवान आहे... तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारं आहे. हे वर्षामागून वर्षं चाललेलं आहे. हाच निसर्गक्रम...

वा. मजा आली.

लहानपणी केशवसूतांच्या कवितेत गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा उल्लेख आला म्हणून तत्कालीन कवींनी "हा काव्यविषय नाही" अशी टीका केली होती असे ऐकल्याचे स्मरते. त्यावेळी हे बेडूक त्यांच्या तोंडावर मारले असते तर बरे झाले असते...

अतिसुंदर!

अतिसुंदर!

मीही संगक्कावियम् चे भावानुवाद करावे म्हणतो! ;-)

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

डॉ बीमराव कुलकर्णी

वेद हे कुणा मानवाने रचले नसून वैदिक काळातील ऋषींना त्यंच्या दिव्यदृष्टीद्वारे ते दिसले व नन्तर त्यांनी ते वाङ्मय स्वरूपात इतरांना दिले असे मानले जाते. हे ऋषी कसे असतील आणि त्यांचे प्रज्ञाचक्षू (दिव्यदृष्टि) कसे असतील याबद्दल मला नेहेमीच प्रश्न पडायचा.

डॉ भीमराव कुलकर्णी यांना, आपल्या ऋग्वेदाच्या शास्त्रीय मराठी भाषान्तराचा अक्खा एक संच मुम्बई विद्यापीठाला भेट म्हणून द्यायचा होता. विद्यापीठाचा एक विद्यार्थी-प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडून तो घेऊन यायचे काम मी केले. हे काम मी केल्याचा आज मला इतका आनन्द होत आहे की तो शब्दांत वर्णन करणे कठीण आहे.

डॉ कुलकर्ण्यांकडे गेल्यावर वैदिक ऋषींबद्दलच्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरं मिळाली.

डॉक्टरांचे वय ८७ वर्षे. मूळ पदवी वैद्यकीय (ऍलोपथिक). भारतातील ६० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्जरीचे अध्यापन. अभियान्त्रिकी इलेक्ट्रॉनिक्स इ. क्षेत्रांत व्यासङ्ग. 'मी संस्कृतवाला माणूस नाही' असं एक पालुपद ते सारखं आळवतात, पण वेदांच्या किमान ६ संहितांचा त्यांचा अभ्यास आहे. संस्कृत नाटके, स्तोत्र श्लोक इ. चा सुद्धा अभ्यास त्यांनी केला असल्याचे बोलण्यातून जाणवते.
वयाच्या ८७ व्या वर्षी ऋग्वेदाच्या मराठी भाषान्तराचे प्राकाशन करण्याची जिद्द असलेला कुणी माणूस आहे हे मी डोळ्यांनी पाहिलं नसतं, तर या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण गेलं असतं.
बरं स्वभाव अत्यन्त ऋजू. आम्ही संस्कृतचे विद्यार्थी असूनही वेदांबद्दल मनात जराशी भीती असतेच कारण एकतर वेदांची भाषा खूप जुनी (साधारण ४-५ ह० वर्षांपूर्वीची) आणि वेदांबद्दल असलेली दिव्यत्वाची पावित्र्याची भावना. पण डॉ कुलकर्ण्यांनी दिलासा दिला. म्हणाले, वेद शिकायला सोवळे नेसूनच बसले पहिजे असे काही नाही. पण वेदांबद्दल आदर मात्र हवा. वेदच काय, तुम्ही जी जी म्हणून गोष्ट शिकता त्याबद्दल मनात आदर नसेल तर ती गोष्ट तुम्हाला पूर्ण कळणार नाही.

वेदांचा अर्थ करताना निरनिराळ्या व्यक्तींचा दृष्टीकोन निरनिराळा असतो.
इ० स० पूर्व ७ व्या शतकातल्या यास्काचार्यांनी निरुक्त हा वेदांतील अवघड शब्दांच्या व्युत्पत्ती सांगणारा ग्रन्थ लिहिला. 'अक्ख्या वेदांचा अर्थ करणे' हा जरी त्यांचा हेतू नसला तरी जिथे आवश्यक तिथे त्यांनी सम्पूर्ण मन्त्राचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. त्यांचा दृष्टिकोन भाषाशास्त्रीय होता.
इ० स० पूर्व ४-३ र्‍या शतकाच्या आसपास पाणिनी होऊन गेले. त्यांनी सम्पूर्ण संस्कृत भाषेचेच व्याकरण लिहिले. यात वैदिक आणि त्यांच्या काळतील बोली संस्कृत, अशा दोन्ही प्रकारांचा समावेश आहे. त्यांचा दृष्टीकोन व्याकरणात्मक आहे.
त्याही नन्तर काही पण्डितांनी वेदांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला असणार, पण त्यांचे ग्रन्थ अजून उपलब्ध नाहीत.
१४ व्या शतकातले हम्पीच्या विजयनगर साम्राज्यातले महामन्त्री सायण (हम्पीचे राज्य स्थापन करण्यात यांचा मोठा सहभाग होता) यांनी चारही वेदांवर भाष्य केले. सुदैवाने ते अक्खे भाष्य आजही उपलब्ध आहे. त्यांचा दृष्टीकोन प्रामुख्याने कर्मकांडात्मक असून जिथे मन्त्राचा कर्मकाण्डाशी काही स्पष्ट सम्बन्ध दिसत नाही तेवढ्यापुरतेच ते तत्त्वज्ञानात्मक स्पष्टीकरण करतात.
१७-१८ व्या शतकात काही पाश्चात्त्य मण्डळींनी (मॅक्स म्युलर इ०) वेदांवर भाष्य केले.
१९व्या शतकात दयानन्द सरस्वती आणि योगी अरविन्द यांनी पुन्हा नव्याने भाष्य केले.
या सर्वांचे भाष्य हे बर्‍यापैकी धार्मिक, तत्त्वज्ञन, पौराणिक वा आध्यात्मिक, म्हणजेच पारम्परिक स्वरूपाचे होते.

पण डॉ० कुलकर्ण्यांचे भाषान्तर मात्र शास्त्रीय (वैज्ञनिक) स्वरूपाचे आहे आणि म्हणून आधुनिक काळात त्याचे महत्त्व जास्त आहे. ऋग्वेदासारख्या प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणार्‍या आणि मन्त्रात्मक असलेल्या ग्रन्थावर चिन्तन करून त्यातले विज्ञान उलगडून सांगणे याच्याकरिता दिव्यदृष्टीच आवश्यक आहे असे मला वाटते.

मी वेद शिकतोय हे ऐकून त्यांनी माझं खूप कौतुक केलं. म्हणाले, कधीही काही अडचण आली तर या. फोन करा. त्यांच्या ८४ वर्षांच्या पत्नीचीही नुकतीच हृदयशस्त्रक्रिया झाली होती, पण त्यांनी पाहुणचारात कसूर केली नाही.

मला वाटते की डॉ कुलकर्णी हेही आधुनिक काळातील एक ऋषीच आहेत. त्यांच्यासारख्या ज्ञानाने समृद्ध झालेल्या व्यक्तीचे नुसते आशीर्वाद जरी मिळाले तरी पुषकळ मिळाल्यासारखे वाटावे.

(हा लेख कदाचित अस्थानी वाटेल पण वरती डॉ० कुलकर्ण्यांबद्दल उल्लेख आलेला आहे म्हणून लिहिले.)

 
^ वर