आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 5

ऋग्वेद काल

ऋग्वेद हा ग्रंथ आपल्या धर्मग्रंथांपैकी एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद हा जरी धर्मग्रंथ असला तरी तो जमिनीवर घट्ट पाय रोवून असलेला धर्मग्रंथ आहे. हे भौतिक जग सोडून पारमार्थिक सुखाचा मार्ग, भक्ती किंवा साधनेच्या मार्गाने आचरावा असे हा ग्रंथ कोठेही सुचवत नाही. किंबहुना भौतिक सुखे मिळवण्यासाठीच धर्माचा मार्ग आहे असेच हा ग्रंथ सुचवतो. (पुस्तक संदर्भ 1). आरोग्य, संपत्ती, दीर्घ आयुष्यमान व पुत्रपौत्रप्राप्ती या भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठीच हा ग्रंथ देवांची प्रार्थना किंवा आराधना करण्याचे सुचवतो. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांपेक्षा, ऋग्वेद हा ग्रंथ संपूर्णपणे भिन्न आहे. अनेक ऋषींनी केलेल्या रचनांचा हा एक संग्रह आहे असे म्हणता येईल. ऋग्वेदात, एक मुख्य कथासूत्र किंवा नायक, खलनायक वगैरे काहीही आढळत नाही. मुख्यत्वे, आर्यांची कर्मकांडे करण्याची पद्धत व त्यावरील टीपाटिप्पणी सांगणारे हे एक Manualआहे. जाताजाता, विश्वाची निर्मिती कशी झाली असेल हे सांगणार्‍या (10.129) ऋचेपासून किंवा विश्वपुरुषाच्या अवयवांच्या हविर्भागातून झालेली विश्वनिर्मिती (पुरुषसुक्त 10.90) या सारख्या अतिगहन विषयांपासून ते बिनधोक गर्भावस्था व प्रसुती होण्यासाठी जपण्याच्या मंत्रापर्यंतचे(10.184) कोणतेही विषय या धर्मग्रंथात येतात.

या धर्मग्रंथाची भाषा अतिशय रांगडी आहे. अर्वाचीन वाड़्मयामधल्या सभ्यतेच्या मर्यादा मनात ठेवून हा ग्रंथ वाचला तर या ग्रंथाबद्दल मनात संभ्रम निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. एकच उदाहरण देतो. पहाटेच्या सूर्यबिंबाचे वर्णन करताना ऋग्वेदातला कवी त्याला उषेच्या अनावृत्त वक्षस्थलाची उपमा देतो(1.92). स्त्रीपुरुष संबंध हे पुत्रपौत्रप्राप्तीचा मार्ग असल्याने, लैंगिक संबंधांचे या ग्रंथाला वावडे नाही. सख्या बहिणीने तिच्या भावाकडे तिला बहिण न समजता स्त्री म्हणून समजावे ही केलेली मागणी(10.10) किंवा पुरुरवा आणि उर्वशी यांच्यातील संभाषण (10.95)ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ऋग्वेदातले मुख्य देव म्हणजे इंद्र, वरूण, मरुत, अग्नी आणि सोम. या देवांना, माणसासारखेच राग, लोभ, विषयवासना, हे गुण-अवगुण असल्याचे या ग्रंथात दिसते. दिवास्वप्ने दाखवणारा (Hallucinations) सोमरस यातले देव व त्यांचे आराधक पितात. हे पिण्याने त्यांची काय अवस्था होते याचेही वर्णन(8.48, 10.136) या ग्रंथात आहे.

हा ग्रंथ अतिशय दुर्बोध आहे. यातल्या कित्येक ऋच्यांचा अर्थ तर ज्ञानी पंडितांनाही लावणे जमलेले नाही. ज्या ठिकाणी अर्थ सोपा वाटावा तिथे अत्यंत गहन अर्थ निघतो. या बाबतीत एकच उदाहरण देतो. इंद्र, इंद्राणी, वृक्षकपी नावाचा वानर व त्याची पत्नी यांचे संभाषण असलेली एक ऋचा (10.86) आहे. अत्यंत प्राथमिक पातळीवर, हे संभाषण चार व्यक्तींमधील वाटते. या संभाषणातील काही पंक्ती तर अश्लील म्हणता येतील अशा स्वरूपाच्या आहेत. परंतु याच ऋचेचा आणखी तीन पातळ्यांच्यावर विचार केला तर नवेच अर्थच नजरेसमोर येतात.(पुस्तक संदर्भ 1 पृष्ठ 258).
लोकमान्य टिळकांनी 1893 मधे ओरायन (पुस्तक संदर्भ2) नावाचा एक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथासंबंधी जास्त माहिती आपण पुढे पहाणार आहोत. या ग्रंथात लोकमान्यांनी एक संपूर्ण प्रकरण या ऋचेवर लिहिले आहे. (पृष्ठ क्रमांक 166). या ऋचेचा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा अर्थ लोकमान्यांनी या प्रकरणात विशद केला आहे.
ऋग्वेदातल्या काही ऋच्यांच्यात कोड्यांचा प्रभावी उपयोग केलेला दिसतो. त्याचा अर्थ लावणे अतिशय कठिण कार्य वाटते. उदाहरणार्थ अदिती आणि देवांचा जन्म (10.72) या ऋचेत असे म्हटले आहे की "अदितीपासून दक्षाचा जन्म झाला आणि दक्षापासून अदितीचा जन्म झाला”. याचा अर्थ लावणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.

ऋग्वेदाइतके आव्हानात्मक पुस्तक माझ्यातरी पहाण्यात आलेले नाही. या ग्रंथाचे प्रत्येक वाचन तुम्हाला नवनवीन आनंद मिळवून देते यात शंकाच नाही. थोडक्यात असे म्हणता येईल की मानवी आयुष्य हा जीवनाचा एक आनंदोत्सव आहे व हा आनंदोत्सव जास्त जास्त कसा प्रभावीपणे साजरा करता येईल हे सांगणे हेच ऋग्वेदाचे प्रमुख सूत्र आहे.

ऋग्वेदाच्या निर्मितीकालाचा काही अंदाज बांधता येतो का हे पुढील भागात बघू.

संदर्भ
1.Rig-Veda by Wendy Doniger O' Flaherty
2.Orion by B.G.Tilak

लेखनविषय: दुवे:

Comments

अर्थ्?

ऋग्वेद दुर्बोध आहे असे तुम्ही म्हणता पण त्याआधी काही ऋचांचा अर्थ आश्चर्यकारक आहे असे म्हणता. ते अर्थ वादातीत आहेत का?

टीझर

लेख अगदी वरचरचा वाटला.. प्रत्येक विषयाला स्पर्श करण्याच्या नादात कोणत्याच विषयावर लेख निश्चित माहिती देत नाहि (नुसताच विषय सूरू होतो आणि संपतो..). थोडक्यात सांगायचं तर आधीच्या लेखांच्या विपरीत हा लेख कोणतीही खास माहिती न देता हा लेख केवळ उत्सुकता चाळवणारा वाटला. (अर्थात लेख संदर्भ सुची म्हणून वापरता येईल ... ह्. घ्यालच ;) )

आता उत्सूकता चाळवली गेली आहेच तेव्हा पुढील भागाची वाट पाहतो आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

त्रोटक माहिती.

लेख ऋग्वेदाच्या काळाचा परिचय करुन देतो का ? नाही.
लेखातून ऋग्वेद सुक्तांची [ऋचांचा अर्थ] काही माहिती मिळते का ? नाही.
ऋग्वेदाची व्यवस्था महर्षि व्यास किंवा अन्य ऋषींनी केली त्याबद्दल काही माहिती मिळते का ? नाही.
लो.टीळकांचे ऋग्वेदाबद्दल काय मत होते ते लेखातून स्पष्ट होते का ? नाही.
ऋग्वेदात किती सुक्ते आहेत,ऋचांची संख्या किती याची माहिती मिळते का ? नाही.
'ऋग्वेद' आव्हानात्मक पुस्तक आहे, वरील लेखातून स्पष्ट होते का ? नाही.
'देवांचा जन्म' किंवा 'अदिती' वरुन ऋग्वेदात किती देव कल्पना आहेत माहिती मिळते का ? नाही.

वरील प्रश्नांची उत्तरे एक वाचक म्हणून मला मिळत नसतील तर ऋग्वेदावरचा एक उत्तम परिचय करुन देणारा लेख वाचायला मिळाला, असे कसे म्हणू...!

-दिलीप बिरुटे
[स्पष्ट आणि थोडीफार केवळ माहिती असलेला]

त्रोटक पण उत्सुकता वाढवणारा

ऋषीकेश आणि बिरुटे यांच्या प्रतिसादांशी बहुतांशी सहमत आहे. केवळ वाचक प्रतीक्षेत आहेत म्हणून लेख लिहिण्यापेक्षा लेख, मालिकेची आणि हाती घेतलेल्या उपक्रमाची अपेक्षा पूर्ण करतो का यावर थोडाबहुत विचार करून भाग टाकावेत.

हा भाग रोचक वाटला पण मालिकेशी थोडा विसंगत वाटला.

रोचक

लेखाला "ऋग्वेदातील आशयवस्तू आणि कथानके" असे काही उपशीर्षक दिले असते, तर याच लेखात कालनिर्णयासंबंधी चर्चा होणार आहे, अशी अपेक्षा निर्माण झाली नसती.

काही उद्धृत ऋचांची उदाहरणेसुद्धा दिली असती तर अधिक मजा आली असती.

उदाहरणार्थ :
कामुक उपमेचे एक (मला आवडलेले) उदाहरण महाभाष्याबद्दलच्या लेखमालेत दिलेले आहे. वाणी ही तिला जाणणार्‍याला कामिनी पतीसाठी वस्त्रे काढल्यासारखे आपले रूप दाखवते...

उत त्वः पश्यन्न ददर्श वाचमुत त्वः शृण्वन्न शृणोत्येनाम्।
उत त्वस्मै तन्वं वि सस्रे जायेव पत्य उशती सुवासाः॥ १०.०७१.०४
(एक कोणी वाचेला बघून बघत नाही, एक कोणी हिला ऐकून ऐकत नाही, [पण] कोण्या एकाला ही अंग उघडते, जणू पतीसाठी कामिनी पत्नीने सुंदर वस्त्रे फेडावीत.)

विश्वाच्या उत्पत्तीबद्दलच्या नासदीय सूक्ताबद्दल उपक्रमावर चर्चा झाली आहे. (त्याचा दुवा कोणी द्यावा.)

वगैरे.

चार-पाचच उदाहरणे दिली असती, तर अन्य ठिकाणी फक्त सूक्त-ऋचेचा निर्देश पुरला असता.

क्या बात है

वाहवा. श्री. धनंजय, शब्दालंकारांच्या वेळीच अशी उदाहरणे द्यावयास पाहिजे होतीत. अजूनही असे मोती काढा ना!
शरद्

सर्वांचे आभार

हा लेख प्रत्यक्षात खूपच मोठा झाला आहे. काही वाचकांचे असे म्हणणे असते की लेख फार मोठा झाला की वाचनास तितकासा आल्हदकारक वाटत नाही. त्यामुळे लेखातील फक्त् पहिला भाग (ऋग्वेदाची तोंडओळख) इथे दिली आहे. पुढच्या भागात बाकीच्या मुद्यांचा समावेश होईलच. ऋग्वेदातील उदाहरणे देण्याचे याच कारणास्तव टाळले. हवे असल्यास यावर नंतर स्वतंत्र लेख लिहिता येईल.हा ग्रंथ मला इतका प्रिय आहे की काय लिहू व नको असे होते. त्यामुळे मी कमीत कमी वाक्यात ही ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
चन्द्रशेखर

 
^ वर