हमारा बिज अभियान

“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे

मध्यंतरी पुणे येथे भरवण्यात आलेल्या “हमारा बिज अभियान”च्या राज्यस्तरीय कार्यशाळेस मला उपस्थीत राहण्याची संधी मिळाली होती. या अभियानाचा मुख्य हेतू “बियाणे” या एका नैसर्गीक संसाधनाच्या खाजगीकरणा विरूद्ध जागृती आणि आंदोलन असे होते. या कार्यशाळेतील चर्चेतून पुढे आलेले काही मुद्दे इथे मांडत आहे.
हरीत क्रांतीने धान्याचे उत्पन्न अफाट वाढल्याचे आकडे कायम समोर आल्यामुळे तिच्या तोट्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केल गेल. मात्र हरितक्रांति फक्त काही विशीष्ठ भागापुरतीच, जिथे संसाधनांची उपलब्धता, मुबलक पाणी व कसदार जमीन आहे अशा भागापुरतीच मर्यादीत राहीली, उदा. पंजाब, पश्चिम महाराष्ट्र.
हरीत क्रांतीचा पाया म्हणजे संकरीत बियाणे. पण या जातींचे जास्तीचे उत्पादन पदरात पडण्यासाठी पाणी, किटकनाशके व रासायनिक खतांचा अतीरीक्त वापर करणे गरजेचे ठरले. त्यामुळे उत्पादन खर्च तर वाढलाच पण नैसर्गीक संसाधनेही जास्त प्रमाणात संपवली जाऊ लागली.
रासायनीक खत, किटकनाशके व पाणी यांच्या अतिरीक्त वापराने झालेले काही तोटे
• खत, औषधे, बियाणे यासारखी संसाधने विकत घेणे गरजेचे झाले, शेतीचा उत्पादनखर्च वाढला त्यामुळे कर्जाचे प्रमाण वाढले आणि शेतीचे कंपन्यांवरील अवलंबत्व वाढले.
• पाण्याची गरज वाढली. त्याच्या अती वापराने जमीनींचा पोत बिघडला
• रासायनीक खताच्या वापराने जमीन नापीक होऊ लागली
• दिवसेंदिवस किटकनाशके व रासायनिक खतांचा वापर अगोदरच्या वर्षीपेक्षा जास्त करणे अनिवार्य झाले. उदा. आज पंजाब मध्ये, जिथे भारतातील जमीनीच्या फक्त 1.5% जमीन आहे, तिथे भारताच्या एकूण वापरापैकी 20% किटकनाशके वापरली जात आहेत.
• फवारणीचे काम करणाऱ्यांपैकी दरवर्षी 28000 जणांचा मृत्यू विषबाधेमुळे होतो.
• सुमारे 450 विषारी घटक प्राणी व वनस्पतींच्या जनुकांमध्ये जाऊन बसले आहेत जे पुढील प्रत्येक पिढीत संक्रमित होणार आहेत.
• हरितक्रांतीचे माहेरघर असलेल्या पंजाब प्रांतात दर चार घरांमागे एक कॅन्सर पेशंट आहे त्यामुळे पंजाबला Cancer Capital of India असे म्हणू लागले आहेत.
हरित क्रांतीचे तोटे असे अनेक वर्षांनी समोर येऊ लागले असतानाच “दुसऱ्या हरिक्रांतीचा” आवाज येऊ लागला आहे. त्याची पहीली पायरी म्हणून जनुकीय बदल केलेल्या बियाण्याचा (Genetically Modified Seeds) उदो उदो केला जाऊ लागलाय. पण याही वेळेस त्याचे व्यवस्थीत संशोधन होऊन हे तंत्रज्ञान निसर्गास घातक नाही हे ठरण्या आगोदरच त्याचा वापर चालू झाला आहे.
ह्या प्रकारात जनुक अभियांत्रीकीच्या सहाय्याने जनुकांच्या पातळीवर DNA मध्ये बदल केले जातात. जनुकबदल पिकाचे एकंदर तिन प्रकार सांगीतले जातात.
1. पिकातील अन्नद्रव्यांमधे फरक केलेले पिक – उदा. गोल्डन राईस: Vit A असलेले भात, प्रोटॅटो: प्रोटीनचे प्रमाण जास्त असलेला बटाटा.
2. अंतर्गत किटकनाशक तयार करणारे पिक – उदा. BT कापूस, BT मका.
3. तणनाशकांचा परीणाम न होणारी पिके – उदा. GM सोयाबीन, GM मका, GM वांगी.
असे तिन प्रकार असले तरी पहील्या अतीमहत्वाच्या प्रकारात हे दोन अर्धवट प्रयोग सोडले तर काहीच काम झालेले नाही. या विषयातले सगळे काम मोठ्या कंपन्यांच्या मदतीने, त्यांना फायदा होईल त्याच क्षेत्रात म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारातच झालेले आहे. वरील उदाहरणातील बाजारात आलेल्या या GM पिकां मागोमाग अशा प्रकारची 54 पीके येऊ पहात आहेत. या तंत्रज्ञानाचे फायदेही मोठ्या कंपन्याच जास्त प्रमाणात घेऊ लागल्या. उदा. BT Cotton बियाण्याच्या किमतीतील 60% भाग Monsanto कंपनी रॉयल्टी म्हणून घेते.
जनुकबदल पिके ही घातक नसल्याचे व वाढत्या जगाची भुक भागवण्याचे एकमेव साधन असल्याचे नेहमीच सांगीतले जाते पण अनेक तोटे आपल्यासमोर येतच नाहीत. उदा. या पिकांमुळे येणारी ऍलर्जी, जमीनीत मिसळल्यानंतरही कायम राहणारे किटकनाशक प्रोटीन, इ.
अशा प्रकारच्या बदलांचा इतर प्राणी-वनस्पतींवरील परीणाम आभ्यासण्यासाठी पुरेसा वेळ न देता हे तंत्रज्ञान चांगलेच असल्याची ग्वाही काही कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनीच नेमलेल्या शास्त्रज्ञांमार्फत देत आहेत.
उदा. Frost Resistant Tomato: टोमॅटो जास्त काळ फ्रिजमध्ये रहावा यासाठी अतीथंड पाण्यात राहणाऱ्या एका माश्यामधले जनुक टोमॅटोत घालून हे बियाणे एक यशस्वी प्रयोग म्हणून बाजारातही आणले. मात्र पुनःपरीक्षणाच्यावेळी हे टोमॅटो आतल्या बाजूने सडतात असे लक्षात आले शिवाय प्रयोगातील उंदरांनी ते खाण्याचेही नाकारले आणि शेवटी ती जात बाजारातून मागे घ्यावी लागली.
हे बदल परागीभवना मार्फत इतर वनस्पतींमध्ये नैसर्गीकरीत्या पसरू शकतात त्या मुळे जर काही वर्षांनी एखादा गुणधर्म घातक असल्याचे कळले तरी ते बियाणे नष्ट करून प्रश्र्न सुटणार नाही कारण तोपर्यंत हे बदललेले DNA परागीभवनामार्फत कोठे पोहोचलेले असतील ते कळणारच नाही. थोडक्यात हा ‘न परतीचा मार्ग’ आहे.
दुसरे म्हणजे उपासमार व कमी उत्पन्नाचा मुद्दा: खरे तर भारतात आजपर्यंत कधीही माणसांच्या गरजेपेक्षा म्हणजेच 2400 Cal / day / Person पेक्षा कमी झालेले नाही. आपल्याकडील उपासमार ही सावकारी व गलथन वितरण व्यवस्था यांच्यामुळे झालेली आहे. इतकेच काय पण बंगालच्या दुष्काळाच्या वेळचेही असे संदर्भ मिळत आहेत की त्यावेळीही सरकारने नेहमीपेक्षा जास्त सारा वसूली केली होती आणि त्या धान्याचा वापर इतरत्र म्हणजे सैन्यासाठी केला होता.
उत्पन्नाबद्दल म्हणावे तर आपल्याकडील काही ठिकाणचे उत्पन्नाचे आकडे आश्चर्यचकीत करणारे आहेत. उदा. तंजावूर (तामिळनाडू) मध्ये गेली कित्येक वर्षे संपुर्ण सेंद्रीय पद्धतीत भाताचे उत्पन्न हेक्टरी सुमारे 9 टन इतके घेतात.
अशा प्रकारच्या पिकाची प्रतीकूल परीस्थीतीशी झगडण्याची ताकद कमी असते. हे पिक घेतलेल्या जमीनीतील सुक्ष्म जीवांची संख्या कमी झाल्याचेही सिद्ध झाले आहे.
जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेता जनुकबदल पिके धोकादायक असण्याची नुसती शक्यता निर्माण झाली तरी Precautionary principle च्या आधारे या बियाण्यांवर बंदी घातली गेली पाहीजे.
या सर्वांवर कडी म्हणजे IPR (Intellectual property rights) मध्ये “बियाणे” सामील केले जात आहे. असे झाल्यास एका नैसर्गीक संसाधनाचे खाजगीकरण होऊन भारतीय शेतीव्यवस्थेचा कणाच मोडण्याची शक्यता निर्माण होईल.

Comments

बराच खुराक

अधिक माहिती मिळवण्यासाठी बराच खुराक दिलेला आहे.

धन्यवाद.

उत्तम माहिती

अजुन कच्चाच आहे तरी माहिती मात्र पक्की आहे.

या सर्वांवर कडी म्हणजे IPR (Intellectual property rights) मध्ये “बियाणे” सामील केले जात आहे. असे झाल्यास एका नैसर्गीक संसाधनाचे खाजगीकरण होऊन भारतीय शेतीव्यवस्थेचा कणाच मोडण्याची शक्यता निर्माण होईल.

हा मुद्दा खरा चर्चेचा आहे.लोकसंख्या वाढत॑ आहे पण लागवडी योग्य जमीन मात्र वाढत नाही तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे.
प्रकाश घाटपांडे

बिज का बीज

बिज हा शब्द असा लिहायचा का बीज असा लिहायचा? जाणकारांनी भाष्य केल्यास खुलासा होईल.
तसेच हा लेख संकरित बियाणी वापरण्यातील तोटेच दर्शवितो. या बियाणांनी भारताला केवढ्या मोठ्या महासंकटातून वाचवले आहे याची लेखक महोदयांना बहुदा कल्पना नसावी. नॉर्मन बोरलॉग या व्यक्तीने भारताला या संकटातून सोडवले होते. बोरलॉग यांच्या कार्याबद्दल ज्यांना रस असेल त्यांनी माझा हा ब्लॉग जरूर बघावा. अशा एकांगी लेखांनी उगीचच गैरसमज पसरण्यास मदत होते. लेख लिहिण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करून लेख लिहावा असे मला वाटते.
चन्द्रशेखर

एकांगी संशोधन

खरा प्रश्न एकांगी आणी आपल्या फायद्याचे संशोधन माथी मारणार्‍या माँसेंटोचा आणि त्या सारख्या कंपन्यांचा आहे.
या कंपनीला आणि तीच्या बगल बच्च्यांना गचांडी द्यायला हवी किंवा कंपनीचे धोरण भारतीय शेतकर्‍यांना हीताचे होईल असे तरी पाहिले पाहिजे.
(अमूल/आणंदच्या कुरियन यांनी इतर काही कंपन्यांच्या बाबतीत असे घडवून आणल्याचे वाचले आहे.)

येथे कृषीखाते नक्की काय करत असते हे पाहणेही मनोरंजक असेल असे वाटते. कुणी खात्याच्या जनुकिय बियाण्यांच्या धोरणांविषयी काही सांगू शकेल का?

लेख संकरित बियाणी वापरण्यातील तोटेच दर्शवितो कारण तोटे व्यवस्थितपणे बाजूला ठेवण्यासाठी 'म्यानेज' केले जातात.
काही जणांना वाटला तरी हा काही 'तसा' एकांगी लेख वाटला नाही.
उत्तम विचार खाद्य आहे. लेख आवडला.
अजून असे वाचायला आवडेल.

आपला
गुंडोपंत

तोटे

आमचेही म्हणणे दुसरे काहीच नाही. ज्यागोष्टी आजपर्यंत फक्त चांगल्याच आहेत असे ठासून सांगीतले गेलेय त्याचे तोटेही समोर येऊद्यात.
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या कामाबद्दल आम्हालाही आदरच आहे. पण रासायनीक खते, भरपूर पाणी आणि मजबूत किटकनाशके या मदती विना जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती असूच शकत नाहीत का ? (मासानोबू फुकूओका यांनी अशी एक भाताची जात आसाम मधून नेल्याचा उल्लेख आहे.)
आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती भारतात नाहीतच का ? (एकेकाळी भाताच्या संशोधन केंद्रावर ‘गोळा’ केलेल्या जातींची संख्या फक्त 19000 होती. )

...........
अजुन कच्चाच आहे

अधिक माहिती द्यावी

या सर्वांवर कडी म्हणजे IPR (Intellectual property rights) मध्ये “बियाणे” सामील केले जात आहे.

ह्याबद्दल अधिक माहिती द्यावी. मला असलेल्या तुटपुंज्या माहितीनुसार बासमती, स्कॉच, आंबमोहोर, दार्जिंलिग चहा ह्यासारखी धनधान्ये व कृषी उत्पादने ह्यांचा भौगोलिक चिन्हांमध्ये (जिओग्राफिक इंडिकेशन) समावेश व्हावा. थोडक्यात संरक्षण उपलब्ध आहे. तसेच कडुनिंबापासून तयार केलेल्या कीटनाशकांना -- म्हणजेच पारंपरिक ज्ञानातून उपजलेल्या उत्पादनांना -- एकस्व (पेटंट) अधिकार मिळणे कठीणच आहे. चूभूद्याघ्या.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

हे

लोकमत् मधील् लेख

लोकमत मधील लेख

...........
अजुन कच्चाच आहे

 
^ वर