मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां? भाग - २
श्री. वसुलि ह्यांनी मांडलेल्या चर्चाप्रस्तावामध्ये ह्याच प्रश्नाची मांडणी काही अशा प्रकारे झालेली होती की त्यात सदस्यांचे दोन गटात विभाजन होणे हे अनिवार्य होते. असे झाल्याने काही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र निष्कारण ’आपण स्वत: अमुक मत मानित नाही’ किंवा ’तमुक मत मानित नाही’ किंवा ’दोन्ही मते थोड्याअधिक प्रमाणात मानतो’ असे काहीसे दाखविण्यासाठी धडपडावे लागते. त्यातच श्री. अल् बिरूनी ह्यांच्या एकांगी विधानाचा विचार करावा लागल्यामुळे मूळ चर्चेतील मुद्दा काहीसा दुर्लक्षिला जावून एकूणच चर्चेत चित्तभ्रांति उत्पन्न झाली. ह्यामुळे मूळ मुद्दा पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करीत आहो.
हिन्दुधर्मतत्त्वज्ञानात 'मूर्तीपूजन करणे आवश्यक अथवा बंधनकारक आहे' असे मत नसतानादेखील हिन्दुधर्माच्या काही अनुयायांमध्ये मूर्तिपूजा ही परंपरेने चालत आलेली आहे. धर्माधिष्ठित मूर्तिपूजनाचे साधारणत: दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे मंदिरात केली जाणारी मूर्तिपूजा तर दुसरा म्हणजे घरी केली जाणारी मूर्तिपूजा होय. भारतात आणि अन्य ठिकाणी जेथे म्हणून मूर्तिपूजा परंपरेने चालत आलेली आहे, तेथे ती तेथील समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग झाली असल्याचे लक्षात येते.
'मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो स्वार्थी प्राणी आहे' ह्या सर्वमान्य मतास मान्य करतांना, 'ज्या गोष्टींचा त्याच्या प्रगतीसाठी (पक्षी : समाजाच्या प्रगतीसाठी) काहीएक - काडीमात्र उपयोग होत नाही त्या गोष्टी तो सर्वप्रथम त्यागतो.' ह्याही मतास मान्य करणे आवश्यक ठरते. समाजास मताधिक्याने ज्या प्रथा सर्वथा निरुपयोगी वाटतात त्या त्यागल्या जातात हे वास्तव आहे. विचार करतां एक गोष्ट लक्षात येते ती अशी की ज्या गोष्टींचा समाजासाठी काहीतरी व्यावहारिक उपयोग होतो, त्या गोष्टी तो समाज कितीही काहीही झाले तरीही त्यागत नाही. उलटपक्षी ज्या गोष्टींचा समाजासाठी काहीही व्यावहारिक उपयोग होत नाही, त्या गोष्टी तो कोणीही काहीही म्हटले तरीही त्यागतो. भारतात अनेक निरुपयोगी प्रथा त्यागल्या गेल्या असल्याचा इतिहासही आहे. त्या मुख्यत: उपद्रवी प्रथा होत.
परंतु मूर्तिपूजनासारख्या न त्यागल्या गेलेल्या प्रथा वरकरणी विचार करतां (पक्षी : व्यक्तिसापेक्ष विचार करतां) निरुपयोगी वाटत असल्या तरी सखोल विचार करता (पक्षी : व्यक्तिनिरपेक्ष आणि समाजसापेक्ष विचार करतां) त्या निरुपद्रवीही आहेत असे लक्षात येते. अशा प्रथा समाजाने त्यागल्या नाहीत ह्याचा अर्थ समाजास मताधिक्याने त्या निरुपयोगी वाटत नाहीत असा होतो काय? म्हणजेच, अशा प्रथांचा समाजास काही व्यवहार्य उपयोग आहे काय?
एखादी व्यक्ति ’कशासाठी मूर्तिपूजा करते’ हा ह्या अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे श्रद्धेपोटी वैयक्तिकरीत्या अथवा सार्वजनिकरीत्या मूर्तिपूजा करणे योग्य आहे काय किंवा कसे हा प्रश्न येथे सर्वस्वी भिन्न आहे. मूर्तिपूजेचे औडंबर माजले आहे काय, ते कोणी कशासाठी माजविले हाही विषय येथे सर्वस्वी भिन्न आहे. मूर्तिपूजा अथवा सगुणोपासना हाच मार्ग उत्तम आहे काय असेही ह्या प्रश्नाचे स्वरूप नाही, त्यामुळे एका गटाकडून मूर्तिपूजेचे समर्थन केले जाणे आणि दुसर्या गटाकडून मूर्तिपूजेचे खंडन केले जाणे अशा प्रकारची चर्चा येथे अपेक्षित नाही. तर अशा केल्या जाणार्या मूर्तिपूजेचा ’समाजास व्यवहारात नेमका काय उपयोग होत असावा ज्यामुळे समाजाने ही प्रथा अजूनही चालू दिलेली आहे’ असा प्रश्न आहे. ह्या प्रश्नावर तटस्थ दृष्टीकोनातून चर्चा व्हावी.
’व्यवहार’ ह्या शब्दाचा मराठीभाषेत प्राप्त झालेला अर्थ 'केवळ आर्थिक व्यवहार' असा गृहित न धरता शक्यतो व्यापक अर्थ गृहित धरावा. तसेच 'समाज' असे म्हणतांना मराठीभाषेत त्या शब्दांस नवीन राजकीय अर्थ 'जात' असा जो प्राप्त झालेला आहे तो गृहित न धरता अनेकविध जाती-उपजाती-प्रजाती ह्यांचा एकसंघ समूह असा पूर्वीचा अर्थ गृहित धरावा.
’जात’ ह्या शब्दावरून एक सांगता येईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाने फार पूर्वीच ’मूर्तिपूजा करण्याचा अधिकार हा केवळ एका जातीमध्ये जन्मास आलेल्या व्यक्तीची अथवा ती व्यक्ती प्रतिनिधीत्त्व करीत असलेल्या जातिसमूहाची मक्तेदारी नाही’ असा निर्णय केलेला आहे. त्याआधीपासूनही भारतातील विविध हिन्दुधर्मीय मंदिरांमध्ये विविध जातिसमूहाच्या व्यक्तींस पूजारी म्हणून नेमण्यात आले असल्याचे सर्वज्ञात असावे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मंदिरात इतर जातिसमूहाच्या व्यक्तींची नेमणूक होते की नाही आणि त्यांना मूर्तिपूजा करण्याचा अधिकार मिळतो की नाही ह्या गोष्टीची तपासणी करण्याचे आणि त्याचा अहवाल बनविण्याचे काम प्रस्तुत लेखकाने स्वत: amicus curiae ह्या नात्याने केलेले आहे. अर्थात, ’विविध जातिसमूहाच्या व्यक्तींना संधी मिळाली आणि ते एकदा पूजार्याच्या भूमिकेत शिरले तरी ते पूर्वापार चालत आलेल्या परंपराच पुढे चालवतात, व्यवस्थेमध्ये काही बदल होत नाही’ अशी कूरबूर होतेच, परंतु येथे तोही सर्वथा भिन्न विषय आहे.
मुळांत समाजास (मूर्तिपूजेसारख्या) एखाद्या गोष्टीची उपयुक्तता असेल, तर ती पुढे चालविण्याची आवश्यकता निर्माण होते. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी समाजाकडूनच पूजारी इत्यादि कार्यनिर्वाहणाधिकार्यांची नेमणूक होते. ’समाजास ह्या व्यवस्थेची काडीमात्र व्यावहारिक उपयुक्तता नसेल तर ही व्यवस्थाच निर्माण होणार नाही’ असे समाजशास्त्राभ्यासकांचे मत असते. मूर्तिपूजा घरी केली काय किंवा मंदिरांत केली काय, त्याअनुषंगाने येणार्या व्यवस्थेची समाजास काही व्यावहारिक उपयुक्तता असेल तर ती काय ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. ह्यामुळे नव्या समाजव्यवस्थेमध्ये ह्या व्यवस्थेला कितपत महत्त्व देता येईल असा एक प्रश्न अभ्यासता येईल.
मूर्तीपूजन म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे कां किंवा मूर्तिपूजन करणारा समाज अप्रगल्भ-मागास असतो काय ह्या आणि तत्सम इतर प्रश्नांवर विचार होण्यापूर्वी सदर प्रश्नाचा विचार होणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याअनुषंगाने इतर प्रश्ने सुटणे सोपे होऊ शकेल असे वाटते.
धन्यवाद.
-
Comments
उत्तरे
आपण सगळे तात्विकच चर्चा करतो आहोत, खरे आहे. आणि मूर्तीपुजा करणार्या लोकांना ते केवळ मूर्तीपूजा करतात म्हणून मी मागासलेले समजत नाही, माझी पध्दत वेगळी आहे असे समजते. जसे मी मांसाहारीही असल्याने शाकाहारी लोकांना मागासलेले समजत नाही, माझ्याहून वेगळ्या आवडीनिवडींचे समजते तसेच हे आहे. त्यामुळे चर्चेचे उत्तर मी माझ्या मते देऊन झाले आहे.
गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणे ही प्रथा देखिल समाज उपयोगीच आहे. त्यातून कुणालाही उपद्रव नसून उलट मंदीरातील गर्दी वाढणे, पुजारी, फुलवाले, दुग्धव्यावसायीक ह्यांचा धंद्यात बरकत येणे असे व्यावहारीक फायदे देखिल आहेत. असे असुनही इथले बहुसंख्य लोक गणपतीला दूध पाजणे ही गोष्ट मागास समजतात. त्याचे कारण काय असावे? गणपती दूध पितो ही कल्पना मागास वाटत असेल तर तो फुलं वाहल्याने, नैवेद्य दाखवल्याने प्रसन्न होतो ह्यात तात्विक दृष्ट्या काय फरक आहे?
गणपतीला दूध पाजणे ही प्रथा नाही, ती एका दिवशी घडलेली गोष्ट होती.
फुले/पाने/दुर्वा/नारळ वाहणे ही प्रथा आहे. आणि ती टिकून आहे कारण त्यावर आजही अनेक लहान उद्योग अवलंबून असतात. हे शांतादुर्गेच्या देवळाबाहेरचे चित्र पहा. नुकतीच तेथे जाऊन आल्याने काही आठवणी ताज्या आहेत. बाहेर ताटल्या विकणार्या मुली/स्त्रिया होत्या, कमरकं कापून तिखट-मीठ लावून देणार्या होत्या, सोले विकणार्या होत्या. अशा सर्वांसाठी ते देवस्थान (आत्तातरी) महत्त्वाचे आहे. त्यांना देण्याचे उद्योग हे एका दिवसात तयार करण्याचे काम नाही. हे सर्व देवळाशी संबंधित दुर्वा फुले विकत नसतील, पण ते देवळामुळे गावात येणार्या बाहेरच्या ट्रॅफिकवर नक्कीच अवलंबून आहेत. या गावातील पर्यटकांचे आकर्षण नुसतेच गोव्याचे बीचेस नसतात, तर हे देवांसाठीचे पर्यटन आणि इतरही बरेच काही असते, असे वाटते. काहींच्या जुन्या वाटणार्या चालिरीतींना ठोकताना आर्थिक संबंधांकडे दुर्लक्ष होऊ नये एवढेच मत व्यक्त करायचे होते. किंबहुना त्या चालिरीती येण्याचे कारण स्थानिक उत्पादनाशी संलग्न असावे असे वाटते.
उत्तर
मान्य. पण तुम्ही घडला प्रकार मागासलेपणाचे लक्षण मानता का?
हे प्रकार बंद व्हावेत अशी माझे मुळीच म्हणणे नाही हे मी आता जवळपास चौसष्ठव्यांदा सांगत असेन. चालिरीती त्यांची आर्थिक उपयुक्तता हे सगळे मुद्दे ह्या चर्चेत गौण आहेत. मूर्तीपूजा बंद व्हावी का अशी चर्चा असल्यास त्यात हे मुद्दे योग्य ठरतील. इथे नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
मागासलेपण?
मुर्तीपूजा मागासली ठरवताना आमच्या देशाच्या नेत्यांना आणि पर्यायाने आम्हाला पण मागासलेले म्हणले जाते याचा निषेध!
अशा मुर्तीपुजेने वास्तवीक वीररस अंगात खेळू लागतो हेच खालील फोटोत दिसून येते:
आणि हो असा देखीला मुर्तीपुजेचा व्यवहारारा फायदा होवू शकतोचः :-)
सुधारणा
श्री विकास, क्र. ४च्या चित्रात भारताच्या तारणहार कुटूंबात जन्माला आलेले श्री राहूल गांधी दिसत आहेत. ते शीखांच्या धर्मस्थळाबाहेर दिसत आहेत. शीख धर्म मुर्तीपूजेला मानत नसल्याने, देशाचे उगवते नेतृत्त्व श्री राहूल गांधी -ज्यांच्या अनेक पीढ्या भारतावर राज्य करणार आहेत- यांचे चित्र काढण्यात यावे.
सुधारणा
विधानातील अधोरेखित भागास कोणताही आधार अथवा संदर्भ दिलेला नाही. सबब विधानातील अधोरेखित भाग वगळण्यात यावा.
क्षमस्व
श्री पर्स्पेक्टिव, ज्यांच्या अनेक कुटूंबीयांनी भारतास सक्षम नेतृत्त्व दिले आहे असे मला म्हणायचे होते. ज्यांना शक्य असेल त्यांनी ते वाक्य संपादीत करण्यास माझी काहीच हरकत नाही. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
आश्चर्य
देशभरात हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसारख्या पक्षांच्या (जीनाप्रेमी अडवाणी वगळता) एकाही नेत्यामध्ये मूर्तीपूजा करावी वाटण्याइतपतही धार्मिकता शिल्लक नाही हे पाहून आश्चर्य वाटले. निदान आगामी हिंदूहृदयसम्राट व मराठी माणसांचे भावी तारणहार आदित्य ठाकरे किंवा राहूल महाजनचा तरी फोटो सापडायला हवा होता.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अहो
देशभरात हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक उन्माद पसरवणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसारख्या पक्षांच्या (जीनाप्रेमी अडवाणी वगळता) एकाही नेत्यामध्ये मूर्तीपूजा करावी वाटण्याइतपतही धार्मिकता शिल्लक नाही हे पाहून आश्चर्य वाटले. निदान आगामी हिंदूहृदयसम्राट व मराठी माणसांचे भावी तारणहार आदित्य ठाकरे किंवा राहूल महाजनचा तरी फोटो सापडायला हवा होता.
अहो टाळकुट्यांचे कुठे फोटो दाखवायचे? :) ते तर जगजाहीर आहेत. जे माहीत नाहीत असे दाखवले. बाकी जीना प्रेम असले तरी अडवाणींचे विठोबा प्रेम पण आहे हे शास्त्रापुरते दाखवले इतकेच. ;)
हा हा हा... तेही खरेच म्हणा
तेही खरेच म्हणा. तुम्हीही उमद्या मनाने हे मान्य केले हे चांगले झाले.
हे मात्र थोडेसे पटले नाही. सोनियांचे देशावरील व हिंदू संस्कृतीवरील प्रेम आमच्यासारख्या सामान्यजनांना माहीत आहे. मात्र त्यांच्यावर बाहेरच्या म्हणून आरोप करणाऱ्यांनीच त्यांना समजून घेतले नाही.
हाहाहा... अडवाणींना पाहून हा विठोबा पाकिस्तानातील असावा अशी शंका आली. पण नंतर साहावळे सुंदर रुप पाहून शंका मिटली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सोनिया
तुम्हीही उमद्या मनाने हे मान्य केले हे चांगले झाले.
कसचं कसचं :)
सोनियांचे देशावरील व हिंदू संस्कृतीवरील प्रेम आमच्यासारख्या सामान्यजनांना माहीत आहे.
अहो मी काही फक्त सोनियाजींचाच फोटो दिलेला नाही आहे त्यात (अडवाणी सोडूनही) इतरही नेते आहेत की पण काय गंमत आहे सोनियांच्यापुढे इतर कोणी दिसतच नाही. :(
सोनियांचे (तसेच इतरांचे) हिंदू संस्कृतीवर आणि देशावर प्रेम आहे का नाही हा प्रश्न नसून ते देखील पुर्तिपूजक आहेत म्हणून मागासलेले ठरवले जात आहेत म्हणून मी त्याचा निषेध करतो असे म्हणले.
काळजीपूर्वक पाहिल्यास
काळजीपूर्वक पाहिल्यास फक्त सोनियाच मूर्तीपूजा करत आहेत असे दिसेल. लालूप्रसाद पाणी सोडत आहेत आणि बाकीचे नेते फोटोसाठी पोज देऊन उभे आहेत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अस कसं
असं कसं म्हणता? शंकररावांच्या, आबांच्या हातात नारळ दिसतोय, विलासराव, सुशीलकुमार हात जोडलेले दिसत आहेत इत्यादी... आता तितक्यात फोटोग्राफर ने शुकशुक केले म्हणून लक्ष तिकडे वळवले ही झाली भारतीय पद्धत...
राहूलचे काय?
श्री विकास, राहूल गांधींचे चित्र काढले जावे, ही मागणी मी पुन्हा एकदा करतो.
क्षमस्व
राहूल गांधींचे चित्र काढले जावे, ही मागणी मी पुन्हा एकदा करतो.
पहीली गोष्ट म्हणजे मुर्तीपुजाचा अर्थ तुम्ही जरी मुर्तीएकेमुर्ती घेतला असला तरी मी तसा घेतलेला नाही तर सांप्रदायिक (रीलीजियस) पुजा असा घेतला आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी विविध प्रकारचे नेते हे तशा पुजेत असताना अथवा तशा गोष्टींचे समर्थन करताना दाखवले आहेत. त्यामुळे मला तो काही काढावासा वाटत नाही. अर्थात खाली प्रतिसाद आल्यावर सदस्यांना संपादीतही करता येत नाही हा अजून एक वेगळा भाग.
चर्चाप्रस्तावातील मुर्तीपूजा
श्री विकास, खरडचर्चेतून मी तुम्हाला चर्चाप्रस्तावकाचा मुर्तीपूजेचा अर्थ दाखवून दिलेला आहे. माझा असा तो अर्थ नाही. तेव्हा ते श्रेय मला देऊ नये. प्रस्तावातील अर्थानुसारच चर्चा व्हावी या अट्टाहासाचे श्रेय घेण्यास मात्र मी तयार आहे. तुम्ही संपादकांनांही विनंती करू शकता.
ही बातमी पहा
Rahul Gandhi, YSR pray at Tirupati temple
बाकी तेथे जाऊन वाचू शकता. तेथे छायाचित्र नाही आहे. बाकी चर्चाप्रस्तावकाला काही हरकत असेल तर ते तसे कळवतीलच. बरं इतरत्र अशाच मूळ विषयाशी संबंध नसलेल्या उपचर्चेत भाग घेताना असे आक्षेप घ्यावेसे वाटले नव्हते वाटतं...
उपचर्चेतील सहभाग
उपचर्चेतील सहभाग अनिच्छेने घेतल्याचे नोंदविले आहे. यावरही तुम्हाला आक्षेप असल्यास माझा प्रतिसाद काढून टाकता येईल. शीख बांधवांच्या प्रार्थनाबाहेरील चित्र चुकीचे आहे, एवढेच मत आहे. प्रतिसादांवर केवळ चर्चाप्रस्तावकांनीच आक्षेप नोंदवावा, असा काही नियम किंवा येथील शिष्टाचार असल्यास माझी मागणी मागे घेतो. श्री राहूल गांधी इतरत्र मुर्तीपूजा करण्याचे चित्र जरूर डकवावे.
क्या बात हैं!
क्या बात हैं!
धन्यवाद श्री. विकास राव! तेलुगुभाषेत एक उक्ती आहे. 'ఒక చిత్రము వెయ్యి మాటలు కన్నా ఎక్కువ అర్థాలు చెపుతున్నది'/'ओक्क चित्रमु वेय्यि माटलु कन्ना एक्कुव अर्त्थालु चेपुतुन्नदि'. (अर्थ: एक चित्र शंभर वाक्यांच्याहीपेक्षा अधिक अर्थ बोलून जाते.) आपण विचारात घेता येऊ शकेल अशा सबल पुराव्याची अनेक चित्रे सादर करून चर्चेमध्ये प्राण आणलात, त्याबद्दल धन्यवाद.
बाकी श्री. राहुल गांधी ह्यांच्या चित्राबाबत म्हणावयाचे झाले तर विविध गुरुद्वारांमध्ये ग्रंथपूजा चालते हे मी स्वतः पाहिलेले आहे. ती मूर्तिपूजेपेक्षा भिन्न असावी का हा प्रश्न निराळा, परंतु दोहोंच्या मागील संकल्पना (काही असल्यास) एकच असावी. तसेच 'उपयुक्तता काय' हा प्रश्न दोन्ही ठिकाणी सामायिक आहे. त्यामुळे मूळ विषयाशी असंबंधित आहे असे प्रतिपादन करता येणार नाही.
आतां ह्या चित्रांतील लोकांस 'मागास' म्हणता येईल काय हा प्रश्न पडेल, आणि 'मागास' ह्या शब्दाच्या आत्तापर्यंत कोठेही अनुल्लेखितच राहिलेल्या व्याख्येत बदल येऊ घालतील असे वाटते!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
व्याख्या
आतां ह्या चित्रांतील लोकांस 'मागास' म्हणता येईल काय हा प्रश्न पडेल, आणि 'मागास' ह्या शब्दाच्या आत्तापर्यंत कोठेही अनुल्लेखितच राहिलेल्या व्याख्येत बदल येऊ घालतील असे वाटते!
ही व्याख्या काय हे जाणून घेण्यासाठी बर्याच सदस्यांनी जंग-जंग पछाडल्याचे समजते. :प्
जंग-जंग
जंग-जंग
ज्या कल्पनांची समाजास सर्वमान्य अशी व्याख्या होणे शक्य नसेल त्या कल्पना ह्या संकल्पनेमध्ये रूपांतरित होत नसतात असे समाजशास्त्राभ्यासकांचे साधारण मत असते. अशा कल्पनांचा विचार करतांना 'कल्पना' म्हणूनच विचार करावा, 'संकल्पना' म्हणून नव्हे असे वाटते.
बाकी, ज्यांनी म्हणून 'मागास' हा शब्दप्रयोग केला आहे, त्यांना जंग-जंग पछाडूनदेखील त्यांनी त्याची व्याख्या न देण्याचे हेच कारण की व्याख्या सर्वमान्य होणार नाही ही भीति. त्यामुळे व्याख्या न देता (फसवी) उदाहरणे देवून कार्य चालविले जाते. एखादे मत व्यक्त करताना त्यातील मूलभूत बाबींची व्याख्या स्वतः अभ्यासक काय करतात हे जाणून घेण्यासाठी सदस्यांनी जंग-जंग पछाडलेच, तर अभ्यासकांनी उलटपक्षी त्यांनाच 'तुमची व्याख्या काय' असे विचारावे हेही येथे नवीनच समजले! :P
अवांतर : काहींची तर व्याख्या करताना जिचा उपयोग होऊ शकतो ती कल्पनाशक्तीदेखील मर्यादित असू शकण्याची एक शक्यता असू शकते!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!