राजकिय विचार - विकृती की आपली आवड?

नमस्कार मंडळी,

हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? या चर्चेमध्ये बरेच प्रतिसाद आले. वाद प्रतिवाद झाले. मुळात आवड-निवड सापेक्ष असल्याने या आणि अशा विषयांना अंत नाही. या चर्चांच्या निमित्ताने एक विषय मात्र डोक्यात आला. तो म्हणजे, राजकिय नेते हे समाजतल्या मानसिकतेचे चेहरे असतात. कोणाला कोणता नेता आणि विचार आवडावेत अथवा आवडू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनेक वैयक्तिक एकत्र येऊन समाज बनतो आणि विचारधारांचा अभ्यास होण्या ऐवजी दुसर्‍याचे उणेपण दाखवणे जास्त होते. राजकारणावर चर्चा करणे ठिक आहे. पण आपल्याला खरच या राजकिय नेत्यांसारखे बनणे जमणार आहे का? हा एक विचार आहे. कोणामध्ये इतकी हिंमत आहे की जाऊन आजचे राजकिय वैचारिक चित्र बदलता येणार आहे? कोण हरीचा लाल आहे जो म्हणतो आज भारतात सर्व छान चालले आहे अथवा सुरळीत चालले आहे?

घरापासून ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या निवडी पर्यंत जो विरोध असतो तोचमुळी वैचारिक असतो. खास करून राष्ट्राचा जेंव्हा विचार असतो तेंव्हा राष्ट्राचे हित, विकास हेच सर्वांचे ध्येय असते. पण विचार प्रवाह मात्र वेगळे असतात. कोणाला कोणत्या विचार प्रवाहात सामील व्हायचे आहे तो वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्यासाठी आपण आपल्या विचारांचे समर्थन करणे योग्य. दुसर्‍याचे मुद्दे चुकीचेच आहेत असे मोठ्याने ओरडून आपले मुद्देच बरोबर आहेत असे नक्कीच सिद्ध होत नाही.

वर म्हटल्या प्रमाणे हे असे विषय अंतहिन आहेत. त्यापेक्षा या राजकिय नेत्यांच्या यशापयशाचा विचार केल्यास आपल्याला अनेक नवे अथवा अभ्यासपूर्ण मुद्दे मिळतील. खाली एक छोटी यादी देतो आहे. त्यातले काही नेते अलिकडचे आहेत. पण त्यांच्या राजकिय विचारांचा प्रभाव बराच परिणाम कारक आहेत. एखाद्या नेत्या बद्दल लिहिताना आपण थोडा अभ्यास करू आणि मगच लिहू. उगाच वैयक्तिक आकसापोटी नको.

  1. गांधीजी - जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.
  2. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी - या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
  3. हिटलर - चर्चिल - हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
  4. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
  5. लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे? एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का? की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा? तुम्हाला काय वाटते?

Comments

माझी पिंक

आता तेच दळण दळायचच आहे तर देतोच माझं मत ;)

1. गांधीजी - जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये.

गांधीच्या किंवा कोणत्याही नेत्याच्या कोणत्याहि विचारांमुळे एखाद्याला विकृत ठरविले जाताना दिसत नाहि.. मात्र एखादा विचार एखाद्या नेत्यानी (येथे गांधींनी) बोलून दाखवला आहे केवळ म्हणून त्याला विरोध होताना दिसतो आणि मग अश्या विरोधकांना तथाकथित अनुयायी विकृत ठरविताना दिसतात.

पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे.

होय हे सत्य आहे.

आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.

आडनावाचा करिष्मा हा महात्मां गांधींच्या बाबतीत नसून नेहरू-गांधी घराण्यासाठी आहे असे वाटते. त्यामुळे हा मुद्दा महात्मांगांधीच्या बाब्तीत अप्रस्तूत वाटतो.

2. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी - या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?

१. असे बोस, सावरकर यांना एका गटात बघून काहिसे आश्चर्य वाटले. असो.
२. वैचारिक अपयश नक्की कसे मोजले आहे याची कल्पना नाहि पण जर जनसामान्यांमधे प्रभाव व प्रसार ह्या निकषांवर यशापयश मोजले तर हे विचार मोठ्या वर्गाला प्रभावित करताना दिसतात मात्र काहि विचारांप्रमाणे त्याचा (कृतीशील) प्रसार झालेला दिसत नाहि (आपलेही म्हणणे हेच असावे असे गृहित धरले तर) याचे कारण हे विचार ज्या कृतीकडे निर्देश करतात ती कृती सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसणे हे असावे असे वाटते. जसे (एक उदा.) सर्वसामान्यांना केवळ हिंदुराष्ट्रासाठी क्रांतीवगैरे करून आयुष्य वेचणे फार मोठी किंमत वाटत असावी.. या विचारांचा प्रभाव खूप असला तरी रिवार्डस मे नॉट बी टेम्टींग इनफ फॉर द कॉज्.

3. हिटलर - चर्चिल - हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता?

कारणे अनेक असू शकतील.. दोघांबद्दलहि इतका अभ्यास नाहि. फक्त मागे एकदा हिटलरबद्दलचे माझे मत (न राहवून) उद्दृत करतो की "हिटलर चांगला वाईट आहे नाहि यात मला रस नाहि. त्याचे गुण त्याने चांगल्या कामासाठी वापरले नाहित हे नक्की. त्यामुळे तथाकथित चांगल्या गुणांचा काय फायदा?"

लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण?

जेता नेहमीच महान असतो.. आणि हरलेला विकृत ;)

फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?

नाहि ते विकृत नाहि .. मात्र तसे युद्ध आता झाले तर ते चूकच!.. महानतेचे निकष काळानूसार बदलतात. महाकाव्यांच्या काळात युद्धांत पराक्रम गाजवणे महान होते. हल्लीच्या महानतेचे निकष दुसर्‍या काळातील घटनांना का बरे लावावे?

4. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत?

लोकशाहीत (येनकेनप्रकारेण) लोकप्रियता हा एकच गुण असावा लागतो. तो ओसरला की इंदिरा गांधींनाहि पराभव चाखावा लागतो.

पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?

पर्यायी नेतृत्त्व भारतात नेहमीच उभे राहिले आहे. वाजपेयींसारख्या अकाँग्रेसी नेत्याने पूर्ण मुदतीचे सरकार यशस्वीपणे चालवून दाखवलेले आहे. लाल बहादूर शास्त्री, पीव्ही नरसिंह राव आदी अनेक अ-गांधी काँग्रेसी नेते लोकप्रियही झाले आहेत. तेव्हा लोकांना दुसरे कोणी नको आहे असे वाटत नाहि. आताही "सोनिया गांधी पंतप्रधान होतील" असे ज्या निवडणूकीत म्हटले गेले त्यापेक्षा यंदाच्या "श्री. सिंग पंतप्रधान होतील" म्हटल्यावर काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या आहेत हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

5. लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

या बाबतीत न बोलणे पसंत करेच चर्चा या अंगाने गेली तर तेव्हा मत नोंदवेनच

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

धन्यवाद

ऋषिकेश, प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

जेता नेहमीच महान असतो.. आणि हरलेला विकृत ;)

येथे अनेकदा आपण गल्लत करतो. हरलेला हा जेत्या इतकाच तुल्यबळ असतो. बाकी तु अनेक मुद्दे तुला ज्या प्रकारे योग्य वाटतात त्या प्रकारे मांडले आहेसच.
अमेरिकेने युद्धे पुकारणे आणि ती चिघळत ठेवणे हे सुद्धा अलिकडच्या काळातले महानचे लक्षण मानले गेले आहे. या युद्धांना जगातल्या अनेक राष्ट्रांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पाठिंबा आहेच. नाही का? त्यामुळे काळाचा निकष योग्यच आहे. इंदिरा गांधींना पराभवाची चव का चाखावी लागली हा अभ्यासाचा विषय आहेच. पण हे सुद्धा मोठे सत्य आहे की भारतात काँग्रेसला विरोध म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार असे चित्र उभे केले गेले आहे. आणि हिंदूत्व म्हणजे भारतीय लोकशाहीला बाधा असे चित्र नेहमीच रंगवले जाते. त्याच प्रमाणे हिंदुत्वाचा पुकार करणार्‍यांना जातीयवादी का म्हणतात हे देखील अनाकलनीय आहे. हिंदूत्व आणि जातियवाद यांची सांगड नक्की काय आहे?






राजकारण

ही चर्चा ज्या वसुलि यांच्या प्रस्तावावर आधारित आहे त्या प्रस्तावाचा मूळ उद्देश आपल्या लक्षात आलेला दिसत नाही. "हिटलर किंवा नथुरामाचे समर्थन करणारे हिंदुत्ववादी (मराठी ब्राह्मण) विकृत असतात" असा मूळ अर्थ आहे. खरे तर हिटलर किंवा नथुराम ही निमित्ते आहेत. "हिंदुत्ववादी (मराठी ब्राह्मण) विकृत असतात" इतकाच अर्थ आहे.

हिटलर - चर्चिल - हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?

सुभाषचंद्र बोस खुद्द हिटलरला भेटले त्यावेळी ज्यूंच्या हत्याकांडाबद्दल निषेध केला नाही. उलट हिटलरची थोडीशी तोंडदेखली स्तुतीच केली. ही विकृती नाही कारण सुभाषचंद्र बोस हिंदुत्ववादी (मराठी ब्राह्मण) नव्हते. १९३३ मध्ये गांधीजी आमरण उपोषणाला बसले त्यावेळी आंबेडकर म्हणाले होते" म्हातारा मेला तरी बिघडत नाही". ही विकृती नाही कारण आंबेडकर हिंदुत्ववादी(मराठी ब्राह्मण) नव्हते.

मग विकृत कोण? कधीकाळी ज्यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणल्याबद्दल हिटलरबद्दल कौतुकोद्गार काढले ते सावरकर. बिचारे कोकणस्थ ब्राह्मण आणि वर हिंदुत्ववादी.दुसरे विकृत लोक म्हणजे सेवानिवृत्तीनंतर "नाझी भस्मासुराचा उदयास्त" सारखी पुस्तके वाचूक हिटलरबदल कौतुकोद्गार काढणारे साठे, दातार, अश्या आडनावांचे लोक. मुसोलिनीला भेटणारे डॉ. बाळकृष्ण मुंजे नक्कीच विकृत. कारण.. .. जाऊ दे...परत परत तेच तेच काय सांगायचे?

विनायक

माझीही पिंक (मताची!)

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे?

माझ्या मते हे आवश्यक आणि महत्वाचे, दोन्ही नाही. जेव्हा मुद्द्यांवरून एखाद्या व्यक्तीची, विशेषतः राजकीय नेत्याची बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा त्या व्यक्तीची सर्व मते आपल्याला पटतीलच असे नाही. कुठल्याही प्रदेशात (यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं काही आलं) अनेक प्रश्न असतात. सर्व प्रश्नांवर आपल्याला पटेल अशी बाजू उचलून धरणारा नेता सापडणे विरळाच. सर्वसामान्य जनता तिच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जो तिला पटेल अशी बाजू उचलून धरेल अशाच नेत्याला पाठिंबा देते. समजा क्ष या मुद्द्यावर नेत्याची अमुक भूमिका आहे आणि य या मुद्द्यावर त्याचीच भूमिका तमुक आहे. जर सामान्य माणसासाठी क्ष हा मुद्दा जास्त जवळचा/अधिक प्राधान्याचा असेल, तर तो य मुद्द्यावरच्या नेत्याच्या भूमिकेकडे, जरी ती त्याला न पटणारी असेल तरीही, सोयिस्करपणे दुर्लक्ष करेल.

एखाद्या नेत्याच्या वैयक्तिक करिष्म्याबद्दलही कदाचित हेच होत असावं. त्यामागे त्या नेत्याच्या स्वतःच्या अथवा घराण्याच्या पूर्वपुण्याईची पार्श्वभूमी असेल तर जनता त्याच्या इतर भूमिकांकडे दुर्लक्ष करेल. इथे सध्याची दोन उदाहरणे दिल्यास ती अप्रस्तुत ठरू नयेत -
१) सोनिया गांधी - गांधी घराण्याची पूर्वपुण्याई, सोनिया गांधींनी स्वतःची उभी केलेली प्रतिमा, काँग्रेसचा आम आदमीसोबत असलेला हात वगैरे जर सामान्य जनतेला भावत असेल तर इतर मुद्द्यांवर जनता सो.गां.च्या भूमिकेकडे दुर्लक्ष करेल/करत आहे.
२) नरेंद्र मोदी - नरेंद्र मोदींनी ते मुख्यमंत्री असताना गुजराथचा खूप विकास घडवून आणल्याचे आपण ऐकतो. एखाद्या सर्वसामान्य गुजराथी माणसासाठी जर हा विकास जास्त महत्वाचा असेल तर तो न.मों.च्या मुस्लिमविरोधी भूमिकेकडे दुर्लक्ष करेल/करत आहे.

एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का?

गुण हा अधिक वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे असे वाटते. पण एकूणात विचार करता एखादी राजकीय व्यक्ती आवडणे आणि त्याची मते आवडणे/पटणे हे प्रश्न एकमेकांपासून एका मर्यादेपलिकडे वेगळे काढता येत नाहीत असे वाटते.
(अवांतरः एखाद्या विवाहित व्यक्तीलाही तिच्या जोडीदाराचे सर्व गुण आवडतील आणि मते पटतीलच असे नाही. त्यातूनही जास्तीत जास्त मते आणि आवडी (गुणांच्या) जुळणार्‍या जोडप्यांचे विवाह यशस्वी होताना दिसतात. हीच ऍनालॉजी अधिक लूज स्वरूपात वरील बाबींत लागू होते असं वाटते)

की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा?

माझे तरी असेच मत आहे. वर लिहिल्याप्रमाणेच 'या फेपरवाल्याचे अन् माझे मत्तं बराब्बर जमतात. मागल्या विलेक्षनी त्याचे न् माझे समदे घोडे विनमंदी' अशी व्यक्ती भेटणे विरळाच. राजकारणात तर नाहीच.
-- येडा बांटू

हिटलर

विनायक यांनी जात काढलीच आहे म्हणून काही गोष्टी स्पष्टपणे लिहितो.

ज्या जातीचा/जातिसमूहाचा त्यांनी उल्लेख केला आहे त्यांतच माझा जन्म झाला असल्याने त्यांच्या विचारसरणीविषयी मला चांगलीच माहिती आहे. म्हणून त्यांच्याविषयी अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार मला आहे हे मान्य व्हावे.
त्यांच्या विचारसरणीची दिशा पुढीलप्रमाणे असते.

१. खरे तर आम्ही जन्मतःच श्रेष्ठ पण या मतांच्या राजकारणामुळे आम्हाला विचारतोय कोण? हे मत कसेबसे मॅट्रिक झालेल्या आणि कारकुनी करून आयुष्य घालवलेल्या व्यक्तींचेही असते.

२. हिटलरने कसा ज्यूंचा नायनाट केला? तसा खरे म्हणजे **चा ...... (हे विधान मी माझ्या जवळच्या ओळखीच्या ब्राह्मणांकडुन ७ डिसेंबर १९९२ रोजी ऐकले आहे. हिटलर आवडण्याचे खरे कारण हे आहे. हिटलरने जर्मनीचा विकास घडवून आणला म्हणून आम्हाला हिटलर आवडतो वगैरे बाहेर सांगण्याच्या गोष्टी आहेत).

पहिल्या कारणामुळे हे लोक मनातून लोकशाहीविरोधी असतात. आपले परंपरागत श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यासाठी हुकुमशाहीला पर्याय नाही हे जाणूनच ते हुकुमशाहीचा पुरस्कार करतात.

खाली ऋषिकेश यांनी म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद काढून टाकायला माझी हरकत नाही. विनायक यांनी (वरील) प्रतिसाद काढला की मीही लगेच तो काढीन. त्यासाठी मला व्यनि पाठवावा. कारण सतत ऑनलाईन असणे शक्य नसते.

नितिन थत्ते

प्रकाटाआ?

श्री विनायक व श्री खराटा,
चाणक्य यांच्या चर्चेचा सूर जातीयवादी खचितच नाहि (वसुलि यांचा असेल तर ते त्या चर्चेत लिहावे)
तेव्हा ह्या चांगल्या प्रकारे मांडलेल्या (विविध विचार मांडता येतील अश्या) ह्या चर्चेला विपरीत दिशेचे वळण लागू नये असे वाटते. आपापले प्रतिसाद आपण स्वतःच प्रकाटाआ करून टाकावेत असे सुचवावेसे वाटते

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

असहमत

चाणक्य यांच्या चर्चेचा सूर जातीयवादी खचितच नाहि (वसुलि यांचा असेल तर ते त्या चर्चेत लिहावे)
तेव्हा ह्या चांगल्या प्रकारे मांडलेल्या (विविध विचार मांडता येतील अश्या) ह्या चर्चेला विपरीत दिशेचे वळण लागू नये असे वाटते. आपापले प्रतिसाद आपण स्वतःच प्रकाटाआ करून टाकावेत असे सुचवावेसे वाटते

एखाद्या विषयाच्या अनुषंगाने जातविषयक दृष्टीकोण समोर येत असेल तर त्यात काही वावगे नाही असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझी भूमिका

इथे ब्राह्मणद्वेष्ट्यांच्या विचारातल्या विसंगती दाखवल्या की अनेकांना मानसिक त्रास होतो आणि ते प्रतिसाद काढून टाकायची मागणी करताना दिसतात. मात्र ब्राह्मणद्वेष्टे लोक ब्राह्मणविरोधी गरळ ओकत असताना मात्र या राधासुतांचा धर्म कोठे गेला होता असे विचारावेसे वाटते.

मी लिहिले त्यात काहीही गैर नाही. तरीही संपादकांना गैर वाटत असेल तर ते काढतीलच. ज्यांना त्रास होतो त्यांनी संपादकांना काढण्याची विनंती करावी, तत्परतेने मान्य होईल याची खात्री आहे.

श्री. चाणक्य यांचा लेख जातीयवादी नक्कीच नाही मात्र ज्या लेखावर आधारित आहे तो नक्कीच जातीयवादी आहे (कदाचित् उपक्रमाच्या पुरोगामीपणाच्या व्याख्येप्रमाणे नसेलही). इथे प्रतिसाद अशासाठी लिहिला की चाणक्य यांनी आधीच्या लेखकाची मनोवृती समजावून घेऊन उगीच वाद घालण्यात आपली शक्ती वाया घालवू नये.

विनायक

स्पष्टीकरण

इथे प्रतिसाद अशासाठी लिहिला की चाणक्य यांनी आधीच्या लेखकाची मनोवृती समजावून घेऊन उगीच वाद घालण्यात आपली शक्ती वाया घालवू नये.

विनायकराव, माझ्या लेखात/चर्चेत मी शक्य त्या प्रमाणे या लेख/चर्चेवर माझे विचार मांडले आहेत. या आधीच्या चर्चेचा फक्त संदर्भ घेतला आहे. चर्चा आणि वाद यात फरक असतो असे माझे वैयक्तिक मत आहे. आपल्याला येथे चर्चा अपेक्षीत आहे वाद नाही. नुसताच वाद घालायचा असेल तर मी म्हटले आहे त्या प्रमाणे या विषयांना अंत नाही.
सर्वसामान्य माणसांसाठी नेते हे त्यांचे आदर्श असतात. किंबहुना प्रत्येकाचा कोणी ना कोणी आदर्श असतो. समजा आपल्या अनेकांचा आदर्श आपले पालक असतात, जर कोणाला आदर्श म्हणून इतरांचे पालक आवडत असतील तर त्यात गैर आहे का? की अनेकांचा आदर्श आपापले पालक असल्याने जर क्वचित एखाद्याला दुसर्‍याचे पालक आदर्श वाटले तर ते त्या पालकांची संतानच नाही अथवा काही तरी व्यभिचार आहे असा अर्थ काढणे हे ज्याच्या त्याच्या वैचारिक कुवतीचे प्रकार आहेत. म्हणून कोणाची कुवत जास्त अथवा कमी हा चर्चेचा मुद्दा नाही. सदर लेखकाचे प्रतिसाद मला सुद्धा आले होते. मी माझी मते मांडून मोकळा झालो. ती इतरांना पटावीतच हा माझा हट्ट नाही. अथवा इतरांची मला पटावीत हा हट्ट सुद्धा मला मान्य नाही. मी या लेखात/चर्चेत माझे मुद्दे स्पष्ट मांडले आहेत असे मला वाटते आणि त्यावर चर्चा होऊ शकते. बाकी संपादक त्यांचे काम करतीलच.
या लेख/चर्चेच्या निमित्ताने इतर विषय निघत असतील तर नक्कीच चर्चा करण्याचे विषय आहेत यात दुमत नाही. पण मग त्यावर वेगळी चर्चा होणे गरजेचे आहे. सुदैवाने उपक्रमावर चांगल्या चर्चा होतात असा आजवरचा अनुभव आहे.
मी येथे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या बद्दल चर्चा व्हावी असे मला मनापासून वाटते. बाकी ज्याला त्याला आपले विचार आहेतच.
धन्यवाद






टाइमपास

श्री. चाणक्य यांचा लेख जातीयवादी नक्कीच नाही मात्र ज्या लेखावर आधारित आहे तो नक्कीच जातीयवादी आहे

कसे काय? जातीयवाद्यांना शिव्या देणारा/देताना लेखही जातीयवादीच होतो का? समर्थनही करणारे ब्राह्मण, शिव्या घालणारेही ब्राह्मण. एकंदरच हा लिमये, थत्ते, गोरे, कुलकर्णी, देशपांडे, जोशी आदी मंडळींचा टाइमपास आहे. दुसरे काही नाही. हातावर पोट नाही ना म्हणून गमज्या सुचत आहेत.

अवांतर
विनायकपंत, उपक्रमाच्या दिवाळी अंकाला लेख दिला का? नावच विनायक म्हटल्यावर तुमचा लेख पहिला हवा. करा तर श्रीगणेशा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दुसरी पेशवाई

काही मजकूर संपादित.

बाकी माझ्या लेखाची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही स्वतःचे संकेतस्थळ काढा, आम्ही लेख घेऊन तयार आहोत.

विनायक

हे काय आता नविन?

श्री. चाणक्य यांचा लेख जातीयवादी नक्कीच नाही मात्र ज्या लेखावर आधारित आहे तो नक्कीच जातीयवादी आहे

तो लेख कसा काय जातियवादी आहे बुवा? नेमका कुठल्या जातीचा उल्लेख आहे त्या लेखात? दिलेली मासलेवाईक विधाने एका विशीष्ठ (पोट) जातीतुनच येतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का? जरा अधिक स्पष्टीकरण द्याल का?

कोण संकेतस्थळांचा वाद उकरतोय कोण जातीयतेचा मुलामा देतोय. कठीण आहे!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

माझी उत्तरे

गांधीजी - जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे?

हा प्रश्न मला नीट समजलेला नाही. गांधींच्या विचारांच्या विरोधकांना "विकृत" म्हणविले जावे असे गांधींच्या विचारात नेमके काय असावे , असा हा प्रश्न आहे का ?
गांधीविरोधकांना चटकन् "विकृत" इत्यादि म्हणणे हे सहजसाध्य आहे कारण :

गांधींची हत्या झाली. हे कृत्य निंदनीय, माणुसकीला काळिमा फासणारे होतेच. पण त्याबरोबर , हिंदुत्ववादी विचारसरणीला प्रचंड नुकसान करणारे होते. या एका कृत्यामुळे अनेक संघटनांवर बंदी आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे , या विचारधारेची सगळी विश्वासार्हता धुळीस मिळाली. त्यामुळे , आजही , "गांधींचे अमुक निर्णय पाकिस्तानचा अनुनय करणारे होते" किंवा "त्यांच्या अमुक कृत्यामुळे हिंदु-मुस्लिम झगड्याचा गुंता वाढला, तेढ वाढली" असल्या विधानांना , त्यामागील कारणीमीमांसेला चटकन् रक्तलांच्छित आणि विकृत म्हणणे सहज शक्य झाले असावे.

सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी - या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
सुभाषचंद्रांचा हिंदुत्वाशी संबंध नाही (माझ्या माहितीप्रमाणे.) सावरकर हिंदुत्ववादी विचारसरणीचे अध्वर्यु बनल्यासारखे होते. तर मग सुभाषचंद्र आणि सावरकर या दोधानाही एकाच विभागात घालण्यासाठीचे मुद्दे कुठले ? तर १. शस्त्रसज्जतेवरचा त्यांचा विश्वास २. युरोपातल्या किंवा जपान सारख्या सत्तांची मदत घेण्याची त्यांची तयारी. या दोन मुद्यांना सार्वकालिक मान्यता मिळणार नाही असे दिसते.

हिटलर - चर्चिल - हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण?
इथे थोडी गल्लत होते असे वाटते. हिटलर युद्धखोर म्हणून विकृत नव्हे. कोट्यावधी लोकांना यमसदनास धाडणारा म्हणून तो विकृत. बाकी त्याची वक्ता, नेता, राष्ट्रपुरुष इत्यादि इत्यादि बिरुदे या कृत्यासमोर निरर्थक ठरतात. ब्रिटीशांचा वसाहतवाद अर्थातच काळाच्या खानेसुमारीमधे निंदनीय ठरलेला आहे. वसाहतींच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास याचीच ग्वाही होय. चर्चिलला काही अर्थाने या वसाहतवादाचे एक प्रतिक मानता येईल. (त्याच्या विचारांमधून त्याचा वांशिक वर्चस्वाला मानणारा , वसाहतवादी चेहरामोहरा स्पष्ट दिसतोच) पण अर्थातच ही वॉज द मॅन ऑफ द आवर. दोस्तांना आणि रशियाला हिटलरला रोखण्यात थांबवण्यात अपेश आले असते तर किती कोटी जीव प्राणास मुकले असते याची कल्पना करणे कठीण आहे. ज्युंबरोबरच समलैंगिक, जिप्सी इत्यादि अनेक गटांवर नाझींची कुर्‍हाड कोसळली होती. "खर्‍या आर्यवंशीयां"शिवाय बाकी कोण त्या कुर्‍हाडीतून वाचले असते , माहिती नाही.

फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
या प्रश्नांची उत्तरे माझ्या कुवतीबाहेरची आहेत. पाच हजार वर्षांचा इतिहास युद्धाचा का ? युद्धे काय साध्य करतात ? युद्धस्य कथा: रम्या: ... वगैरे वगैरे गोष्टी फार वेगळ्या क्षितिजावरच्या आहेत.

नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?

भारतीयांमधली व्यक्तीपूजा, घराणेशाहीला मान तुकविणारी वृत्ती , काँग्रेस संस्कृती, तिचा वर्षानुवर्षे पडलेला प्रभाव अनेक कारणे दिली जातात. "यापैकी कुठलेच नाही" किंवा "या सर्व कारणांचा समुच्चय" असेही म्हणता येईल. माझ्या मते नेहरू -> इंदिरा -> राजीव -> सोनिया या अनुक्रमामधे व्यक्तीपूजा , एकाच व्यक्तीचे प्रभावक्षेत्र याला क्रमाक्रमाने उतरती कळा लागलेली आहे हे एक आशेचे चिन्ह मानायला हरकत नाही. नेहरूंच्या काळात "ते बोलतील ती पूर्व" अशी म्हणे परिस्थिती देशभर होती. इंदिराबाईंच्या अखेरीपर्यंत दक्षिणेची राज्ये, बंगाल आणि इतर राज्यांमधे काँग्रेस पडली. राजीव दोनेक वर्षे विरोधकांमधे बसले आणि आता तर सत्तेचे प्रांतवार, भाषावार , जातिनिहाय अशी विविधरंगी गोधडे बनलेले आहे. नेहरूंनी उपभोगलेली सर्वंकष सत्ता आणि सोनियाबाईंचे अभिक्षेत्र यात बराच फरक पडला आहे. (मात्र सरंजामशाही संपत नाही हे खरे आहे . )

धन्यवाद

प्रतिसाद आवडला. नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा आणि तो अशा चर्चा-प्रतिसादांमधून होत आहे.
राजकिय महानतेचे मोजमाप रक्तपाताच्या तीव्रतेवरुन सुद्धा होते असे काहीसे माझे मत होत चालले आहे. रक्तपात योग्यच आहे असे माझे मत नाही. पण हिटलरने केलेला रक्तपात पाहताना जर गांधीजींच्या चष्मा लावला तर हिटलर विरोधकांनी केलेला रक्तपात सुद्धा मान्य होता कामा नये. असो, पण हे सगळे मुद्दे म्हणून मांडायला ठिक आहेत. कशाचे समर्थन म्हणून नाही. मला स्वतःला ब्रिटिशांची सर्वच कृत्ये निंदनीय वाटतात आणि त्याही पेक्षा सध्याच्या भारतीय राजकारण्यांची.
बोस, सावरकर इत्यादी नेत्यांची आपण भर घातल्यास आज भारत कदाचित वेगळा दिसला असता. त्यांची राष्ट्रीय आणि भारतासाठी त्यांची परराष्ट्रीय धोरणे कदाचित जास्त चांगली पडली असती. नेहरूंनी अलिप्ततावाद जपला. पण आज अमेरिका आणि इतर भारतविरोधी शक्ति या भारताच्या सीमांवर युद्ध सज्ज आहेत. आपण आज घरात बसून कळ फलक बडवत आहोत. पण एकिकडे एका धर्म प्रेरित दहशतवादाकडे झुकलेला आंतरराष्ट्रीय समुदाय आणि त्यांचा विरोधी समुदाय यामध्ये भारताची अवस्था दयनीय आहे असे म्हणावेसे वाटते. त्यामानाने आपण काय करतो आहोत? परत इतिहासात जाऊन विचार केला तर जे राजकिय नेते दुर्लक्षिले गेले त्यांची कमी जाणवते. स्वतंत्र भारताला त्यांची खुपच गरज होती असे मला तरी वाटते. पण वर म्हटल्या प्रमाणे व्यक्तिपुजेचा पगडा एवढा जबरदस्त आहे की या जर तर प्रकाराला काहीच अर्थ नाही. थोडे नकारात्मक वाटेल पण भारताच्या इतिहासातील राजकारण्यांचा आणि आत्ताच्या राजकारण्याचा एकत्रित विचार केल्यास फारसे आशादायक चित्र नक्कीच दिसत नाही. सध्याचे अंतर्गत राजकारणाचे चित्र परकियांना दिलासा देणारेच वाटते.






विचारसरणीपेक्षा कृतीशीलता महत्त्वाची!

माझ्या दृष्टीने या चर्चाप्रस्तावातील अनुक्रमांक नसलेले शेवटले प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का?
कोणत्याही विचारशील मनुष्याला कोणत्याही इतर विचारशील मनुष्याची 'सर्व' मते तंतोतंत पटतील हे शक्य वाटत नाही.

हे कितपत महत्वाचे आहे?
मी सर्वसामान्य माणूस आहे. इतिहास वाचून त्यातील व्यक्तीमत्त्वांच्या काय चुका झाल्या यावर टिप्पणी करू शकतो. त्यांच्यावरील भाष्ये वाचून माझे मत बनवू शकतो. माझी विचारसरणी बनवू शकतो. पण तितकी गरज पडल्यास त्यावर ठाम राहू शकेन की नाही ते माहित नाही. त्यामुळे एखाद्या राजकीय अथवा सामाजिक नेत्याची काही मते माझ्या विचारांशी मिळती जुळती असली तरी तो नेता त्या विचारांवरील कृतीमुळे महान झालेला असतो आणि त्याच्या महानतेचा माझ्या विचारधारेशी (किंवा माझ्या अहंभावाशी)अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो हे मला कळून चुकले आहे.

एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का?
'सगळेच गुण' म्हणजे काय? एखादी प्रसिद्ध व्यक्ती केवळ खरेच बोलण्याचा 'गुण' बाळगून असेल तर तो गुण मला 'परवडणारा' नाही. माझी आवडनिवड माझ्या सोयीने असते.

की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा?
वर म्हटल्याप्रमाणे आपल्या विचारधारेशी साम्य दाखवणार्‍या प्रसिद्ध व्यक्तीचे/ आवडत्या व्यक्तीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी एका विशिष्ट वयात (१५ ते २५?) प्रयत्न केले जातात. परंतु त्या गुणांचा व्यक्तीगत आयुष्यात उपयोग होवो न होवो, अनुभवाअंती
तेच गुण कसे योग्य आहेत/तीच विचारसरणी कशी योग्य आहे हेच इतरांवर ठसवण्याचा सर्वसामान्य माणूस 'माझी विचारधारा' म्हणून मांडू लागतो. हे 'ममत्त्व' दुहेरी असू शकते. कधी त्या विचारधारेतला फोलपणा कळल्यानंतर आलेल्या न्यूनगंडातून किंवा त्या विचारधारेवर काहीच कृती न करता केवळ शाब्दिक पांडित्य मिळवल्याच्या अहंगंडातून.

त्यामुळे कोणत्याही 'इतर' व्यक्तीच्या गुणांबद्दल जरूर कौतुक असावे पण त्यांच्या विचारधारेपेक्षा त्यांच्या कृतीशीलतेवर जास्त लक्ष द्यावे.
त्यांच्याकडे केवळ विचार असते (जसे माझ्याकडे आहेत) तर तेही (माझ्यासारखेच) सर्वसामान्य राहिले असते. विचारसरणीपेक्षा कृतीशीलता महत्त्वाची!

त्यामुळे विचार बरोबर की चूक ते ठरवण्याचा अधिकार सर्वसामान्य म्हणून आपण जरूर वापरू शकतो पण त्यानुसार बनलेल्या विचारधारेचा पोकळ अभिमान बाळगून वादविवाद करण्यापेक्षा त्यावर आपण प्रत्यक्षात काय कृती करतो ते तपासणे सर्वात महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

उदाहरणः
आज आपण हिटलरची विचारसरणी योग्य की अयोग्य? गांधीची विचारसरणी योग्य की अयोग्य? सावरकरांची विचारसरणी योग्य की अयोग्य? या विषयांवर चर्चा करत आहोत.
हिटलरने 'मेईन काम्फ' लिहिला तेव्हा त्याची विचारसरणी स्पष्ट होती. त्यानुसार तो कृती करत राहिला.
गांधीजींना ज्याक्षणी कळून चुकले की आपण आपल्याला पटेल त्या सत्याच्या मार्गावर चालत रहायचे आहे त्याक्षणी त्यांनी त्या मार्गावर प्रत्यक्ष चालण्यास सुरुवात केली.
'सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेतो झुंजेन' ही प्रतिज्ञा केवळ प्रतिज्ञा न राहता सावरकरांनी ती प्रत्यक्षात उतरवली.

अवांतर :
'मेईन काम्फ' बारकाईने वाचल्यास हिटलरला भारत आणि भारतीय स्वातंत्र्याबद्दल कळवळा होता असे दिसत नाही. उलट त्याला भारतीय आणि त्यांचे नेते यांविषयी घृणा होती असे दिसते. इथे तो म्हणतो - "And if anyone imagines that England would let India go without staking her last drop of blood, it is only a sorry sign of absolute failure to learn from the World War, and of total misapprehension and ignorance on the score of AngloSaxon determination.", "Indian agitators, however, will never achieve this. ",
आणि-"in spite of everything, rather see India under English rule than under any other."

कळवळा

'मेईन काम्फ' बारकाईने वाचल्यास हिटलरला भारत आणि भारतीय स्वातंत्र्याबद्दल कळवळा होता असे दिसत नाही.

कळवळा असता तर आश्चर्यकारक होते. हिटलरच्या विचारसरणीशी (गोरा रंग, निळे डोळे असणारे आर्य सर्वात श्रेष्ठ!) हे सुसंगतच आहे.

दुव्याबद्दल आभार. आपण उधृत केलेल्या वाक्याचा पूर्वार्धही रोचक आहे. "How hard it is to beat England, we Germans have sufficiently learned. Quite aside from the fact that I, as a man of Germanic blood, would, in spite of everything, rather see India under English rule than under any other."

इथे भारत दुसर्‍या कुठल्या अधिपत्याखाली असण्यापेक्षा ब्रिटीश अधिपत्याखालीच हवा असे मत आहे. सरळ अर्थ : भारत स्वतंत्र नसावा/ भारतामध्ये स्वतंत्र होण्याची कुवत नाही.

---
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माझे उत्तर

# गांधीजी - जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.

मुक्तसुनीत प्रमाणेच मला देखील हा प्रश्न नीटसा समजला नाही. विकृत हा शब्द वास्तवीक मी आधी मिसळपाववरील वेगळ्याच चर्चेत आणि नंतर येथील आपण दुवा दिलेल्या चर्चेत ऐकला आहे. गांधीजींच्या विचाराचे जर कोणी विरोधक असले तर त्याचा अर्थ ते लगेच नथुरामचे समर्थक आहेत असे म्हणायचे कारण नाही. सावरकर जर कुणाला पटले नाहीत तर याचा अर्थ ती व्यक्ती काही लगेच अँटीहिंदू ठरत नाही. पण आपण अशा लोकांना देवाच्या स्थानी ठेवले आहे. वास्तवीक जे ह्या वादात विशेष घेऊन चव घेतात ते बहुतेक वेळेस किमान जन्माने तरी हिंदू असतात. म्हणजे त्यांना एका पेक्षा अनेक देवांची सवय आणि गरज असली पाहीजे. पण होताना भलतेच दिसते.

मात्र एक गोष्ट बर्‍याचदा आपण हिंदू असल्याप्रमाणे जरूर पाळतो ती म्हणजे वैचारीक भोंदूगिरी अथवा दांभिकता. म्हणजे असे की जर गांधीजींना कोणी मानत असेल तर त्यांचे बाकी सगळे जाउंदेत किमान सत्य बोलणे तरी आचरणात आणले पाहीजे पण दिसताना भलतेच दिसते. सावरकरांना मानणारे हिंदूत्ववाद म्हणत त्यांचे वैज्ञानिक आणि सामाजीक सुधारणांचे व्रत न घेता त्यांनी आयुष्यभर झिडकारलेली कर्मकांडेच धरून बसतात. ही साधी उदाहरणे झाली. दोन्हीबाजूने असे बरेच काही सांगता येईल. परीणामी "बडव्यांच्या तावडीत सापडलेल्या विठोबाची अवस्था" या दैवतांची झाली आहे. :) सावरकरप्रेमींना गांधीजी आणि गांधीभक्तांना सावरकर न आवडण्याचे बर्‍याचदा जे कारण असते ते ही त्यांच्या समर्थकांची आचरणशून्य भोंदूगिरी....

# सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी - या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
सावरकरांबद्दल म्हणायचे झालेच तर एकतर त्यांचा बराचसा काळ हा तुरूंगामुळे आणि स्थानबद्धतेमुळे सक्रीयराजकारणापासून दूरच राहीला. तो पर्यंत गांधीजींचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले होते. सावरकरांनी त्या विरुद्ध अथवा गांधींंजीविरुद्ध कधी आवाज उठवल्याचे ऐकीवात नाही. परीस्थितीने मर्यादा पडलेल्या असताना त्यात जे काही करता येईल ते काम त्यांनी सुरू केले, त्यात त्यांनी कुठलेही राजकीय (स्वार्थी) मुत्सद्दीपणा न ठेवता सुधारकाची भुमिकाच घेतली. कधी कधी वाटते जर आगरकर हयात असते तर त्या दोघांचे चांगले जमू शकले असते. सुभाषबाबूंनी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले होते मात्र नंतर त्यांच्याशीच त्यांचे एकदम विरोधक असल्यासारखे विचार झाले. तरी देखील त्यांच्या आझाद हिंद सेनेने ध्वजावर चरखाच ठेवला आणि गांधीजींनाच राष्ट्रपिता म्हणले. थोडक्यात गांधीजी हे या ना त्या प्रकारे या दोघांसाठीच नाही तर इतर सर्वांसाठी हिमालयाची सावली झाले. यात त्यांचा (गांधीजींचा) दोष नाही. तर आपल्या एकंदरीत जीवनपद्धतीत असलेला एकदा का वडील म्हणले की अती आदर देण्याचा जो प्रकार घरात असतो, राजाचे राजेपण मानले की त्याच्या पुढे जायचेच नाही हा प्रवृत्ती असते त्याचेच हे एका अर्थी उदाहरण आहे. याला अपवाद फक्त त्या आधीच्या काळात लोकमान्य टिळक होते.

# हिटलर - चर्चिल - हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?

महानतेचे प्रतिक असे एकच एक काही नसते. जो कोणी त्या त्या वेळेस समाजासाठी, राष्ट्रासाठी गरजेनुसार स्वत:च्या स्वार्थाबाहेर जाऊन निर्णय घेतो, पदरी पडणार्‍या टिकेस, धोक्यांना सामोरी जाण्याची तयारी दाखवतो तो बर्‍याचदा महान होतो. मात्र स्वतःचे विचार हेच आदर्श आहेत, बरोबर आहेत असे म्हणत भले दूरदृष्टी आहे असे म्हणत पण आत्ता समाजातील जनसामान्यांचे हाल मान्य करतो तेंव्हा सगळी गोची होते... हिटलर कदाचीत सुरवातीस जर्मनांना योग्य वाटला असेल. पण त्याने जेंव्हा लाखो ज्यू आणि त्याहूनही अधिक जिप्सिंना मारले आणि ते करत असताना स्वत:च्या जनतेचे हाल केले. आजही त्या राष्ट्रास सैन्य ठेवण्याच्या बाबतीत तहनाम्याप्रमाणे वागावे लागत आहे, तेंव्हा कसला आला आहे महानपणा? जगाला लुटणारे ब्रिटीश हे चोर, व्यापारी आणि कधीकधी घृणास्पद कृत्यांमुळे विकृत ठरू शकतील. एका बाँब स्फोटामुळे काय होते हे तसेच जपान शरणागती पत्करण्यास तयार आहे हे समजल्यावर देखील नागासाकीवर दुसरा बाँब टाकणारे अमेरिकन सरकार पण विकृतच अथवा हिंसक म्हणायला हवे. पण असा शिक्का कायमचा राष्ट्रांना आणि समाजाला लावणे अयोग्य आहे. एकाच्या गैर कृत्यामुळे संपुर्ण समाजाला सातत्याने नावे ठेवणे हे चूकच आहे. अमेरिकेने ते जर्मनीबरोबर केले नाही, जपानबरोबर केले नाही, इराक अथवा अफगाणिस्तानबरोबर देखील केले नाही. तेच उलट देखील आहे.

# नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
जनतेचा प्रश्न नाही काँग्रेसमन्स मधे कुवत नाही. त्यांचा तंबू हा नेहरू-गांधी घराणे आणि आडनावाच्या खांबावर उभा रहातो. रावसरकारच्या वेळेस काहीतरी वेगळे होऊ शकले होते. वास्तवीक अर्थव्यवस्था देखील चांगली होऊ शकली. पण हरल्यानंतर त्यांचे काय झाले हे माहीत आहेच. साधे त्यांना अंत्यदर्शनासाठी काँग्रेसकचेरित पण नीट ठेवले गेले नाही की पूर्ण दहन देखील झाले का हे पाहीले नाही. इतर पक्ष जेंव्हा जास्त परीपक्व होतील तेंव्हा गोष्टी बदलू शकतील आणि मला खात्री आहे तशा त्या बदलत आहेत. लोकशाही आहे, एका रात्रीत बदल घडत नसतात...

# लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

त्यांना कोणी विकृत म्हणलेले नाही. बाळ ठाकर्‍यांचे एक "मार्मिक" वाक्य आहे, "केवळ नेभळटच अजातशत्रू असतो." थोडक्यात कुणाला आवडोत न आवडोत बाळासाहेब आजही लोकप्रिय आहेत, त्यामुळे त्यांचे विरोधक त्यांचा अजूनच द्वेष करतात...लालू, मायावती आणि मुलायम यांना एकाच पद्धतीने तोलणे योग्य वाटत नाही. यात मुलायम नक्कीच (वैचारीकतेने नाही!) उजवे आहेत. लालू आणि मायावतींबद्दल् काय बोलणार? वास्तवीक मायवतींना थोडे कर्तुत्व आणि थोडे दैव यांनी नक्कीच मिळालेले आहे पण कर्मानेच ते राहील का अशी शंका आहे...राज ठाकरे अजून कोणीच नाहीत. त्यांची योग्यायोग्यता ठरायला वेळ आहे.

बाकी वरील अथवा इतरत्र कुठल्याही लहान मोठ्या ठिकाणी व्यक्ती कशी आहे ह्याचा उहापोह करताना, कायम मला लि़ंकनचे खालील वाक्य आठवते: Nearly all men can stand adversity, but if you want to test a man's character, give him power.
या वाक्यावर विचार करा, बरीच उत्तरे मिळत जातील...

 
^ वर