सत्यम् , शिवम् , सुंदरम् !

फोर्थ डायमेन्शन - 19

सत्यम् , शिवम् , सुंदरम् !
एकदा अचानकपणे प्रत्यक्ष परमेश्वरच एका तत्वज्ञासमोर येवून उभा राहिला. तत्वज्ञ गडबडला.
" मी या जगाचा स्वामी आहे. तुझा ईश्वर. जगात जे काही चांगले घडते ते माझ्यामुळेच. ईश्वराची हकालपट्टी करणारे हे तुझे नीतीचे तत्त्वज्ञान माझे अस्तित्व मान्य का करत नाही? "
"देवा, तुझ्या या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी तुला काही प्रश्न विचारावे लागतील. तू आम्हाला सत्कार्य करण्याची नेहमीच प्रेरणा देत असतोस. सत्कार्य म्हणजे नेमके काय याविषयी अजूनही माझ्या मनात गोंधळ आहे. तुझ्या प्रेरणेमुळे आम्ही केलेले कार्य सत्कार्य असते की ते मुळातच सत्कार्य असते म्हणून ते करण्याची प्रेरणा तू देत असतोस?"
एक क्षणभर विचार करून "मी प्रेरणा देतो म्हणून ते सत्कार्य ठरते. " परमेश्वराचे उत्तर.
"परमेश्वरा! हे निखालस चूक आहे. तू सांगतो म्हणून ती खरोखरच चांगली गोष्ट ठरत असल्यास तुझ्याच इच्छेप्रमाणे या जगात नरबळी दिल्या नसत्या. निष्पाप बालकांची हत्या झाली नसती. मूक जनावरं मेले नसते."
"अगदी बरोबर. मी तुझी सत्व परीक्षा घेत होतो. तू त्यात पास झालास. तरीसुध्दा तुम्हा तत्वज्ञांना मी चांगले करू शकतो यावर विश्वास का नाही? "
"जे मुळातच चांगले आहे तेच करण्यास तू सांगत असतोस. याचा अर्थ त्यातील चांगुलपणाचा व तुझा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. मुळातच ती चांगली असते. त्यामुळे चांगुलपणाच्या व नीतीच्या संदर्भात तुझ्या असण्या-नसण्याची आम्हाला गरज वाटत नाही. "
-----Source: Euthyphro by Plato (380 BC)------

आपण लहानपणी शाळेत, घरात देवाची प्रार्थना करत असताना जगात जे काही चांगले आहे ते सर्व ईश्वरीकृपेमुळेच घडत असते; ईश्वर म्हणजेच सुंदर, ईश्वर म्हणजेच सत्य या अर्थाची पदे सामूहिकरित्या म्हणत असू. प्रार्थनेच्या शेवटी परमेश्वराला शरण जा असे म्हणत प्रार्थना संपवत असू.
मुळातच ईश्वर म्हणजे चांगले यातच संदिग्धता आहे. जसे बिस्किट चांगले, अमुक एक जण चांगला असे म्हटल्यासारखे आपण ईश्वर चांगला असे म्हणत असतो. पाणी गढूळ आहे, प्लेटोने पुस्तक लिहिले, यासारख्या वाक्याप्रमाणे ईश्वर चांगले करतो हे पण वाक्य आहे. यातील क्रियापद कर्ता व कर्म याना जोडणारा आहे. परंतु आपल्या प्रार्थनेतील ईश्वर हा प्रेम करण्याची क्रिया करणारा नसून ईश्वर म्हणजेच प्रेम या अर्थाने वापरलेला असतो. ईश्वरामुळे सौंदर्य नसून ईश्वरच सुंदर. ईश्वरामुळे सत्य नसून ईश्वरच सत्य. अशाप्रकारे चांगुलपणाचा गुणविशेष ईश्वराला चिकटविलेले असल्यामुळे चांगुलपणा व ईश्वर यांच्यात अत्यंत घनिष्ठ संबंध आहे असेच सूचित केले जात असते. जर हेच खरे असल्यास ईश्वराशिवाय नीतीची कल्पना गुंडाळून ठेवावी लागेल. चांगुलपणा, नीतीमत्ता व देवत्त्व यांना आपण वेगळे करू शकत नसल्यास देवनिरपेक्ष नीती हे मृगजळ ठरेल, विसंगत ठरेल.
परंतु वर उल्लेख केलेल्या ईश्वराबरोबरच्या संवादातून फारच वेगळा अर्थ ध्वनित होतो. ईश्वर हा चांगला असल्यामुळे त्याची निवड (नेहमीच) चांगली असणार. त्यामुळे कदाचित ते गुणविशेष समर्पक ठरू शकेल. परंतु ईश्वरानी निवडली म्हणून ती चांगली ठरेल याला काही आधार नाही.
काहींना ही तर्कसंगती रुचणार नाही. ईश्वरापासून चांगुलपणा तोडताच येत नाही; ते दोन्ही समानार्थी शब्द आहेत असे वाद करतील. परंतु सामान्यपणे आपल्याला जे चांगले आहे त्याची पूर्ण कल्पना असते. कदाचित त्यानुसार आपली कृती नसेलही. उघड उघड आपण ते मान्यही करत नसेल. चांगले काय, वाईट काय याचे आडाखे आपल्या मनात असतातच. त्यामुळे आपण चांगुलपणाला नेहमीच देवत्त्व बहाल करण्यास आसुसलेलो असतो. जर ईश्वर हिंसेला प्रेरणा देत असल्यास आपण ते चांगले नाही असेच म्हणणार. शोषणाला वाव देणारा ईश्वर, ईश्वर या व्याख्येला काळिमा फासणारा ठरणार. त्यामुळे जगातील चांगुलपणासाठी, चांगले करण्यासाठी, चांगुलपणाच्या शोधासाठी ईश्वराच्या कुबडीची गरज पडत नाही. आपण ती नैसर्गिकरित्या सहजपणे करू शकतो. त्याउलट वाईट करण्यासाठी फार श्रम घ्यावे लागतात. वाईटाला चांगले ठरविण्यासाठी मात्र ईश्वराची साक्ष काढावी लागते.
त्यामुळे ईश्वरनिरपेक्ष नीतीमत्ता असू शकते असे छातीठोकपणे सांगण्यास घाबरण्यासारखे काही नाही!

Comments

वादग्रस्त

त्यामुळे जगातील चांगुलपणासाठी, चांगले करण्यासाठी, चांगुलपणाच्या शोधासाठी ईश्वराच्या कुबडीची गरज पडत नाही. आपण ती नैसर्गिकरित्या सहजपणे करू शकतो. त्याउलट वाईट करण्यासाठी फार श्रम घ्यावे लागतात. वाईटाला चांगले ठरविण्यासाठी मात्र ईश्वराची साक्ष काढावी लागते.

यावर नक्कीच वाद होउ शकतो. विनाश करण्यास वेळ लागत नाही पण सुंदर निर्मिती करण्यास मात्र वेळ लागतो. हिरोशिमा नागासाकी वर अणुबॉम्ब टाकला तेव्हा बेचिराख व्हायला किति वेळ लागला. चांगुलपणाच्या शोधासाठी इश्वराच्या प्रेरणेचे सर्वांना गरज लागेलच असे नाही. फारतर एखादा अस्तिक म्हणेल कि बाबा तु नको इश्वर मानु पण तुला चांगुलपणाची जी प्रेरणा किंवा तुझी आंतरिक उर्मि असेल त्यालाच आम्ही ईश्वरी प्रेरणा म्हणतो.

त्यामुळे ईश्वरनिरपेक्ष नीतीमत्ता असू शकते असे छातीठोकपणे सांगण्यास घाबरण्यासारखे काही नाही!

हे मान्य.
प्रकाश घाटपांडे

सत्य

यावर डॉ. अभय बंग यांनी सुंदर विवेचन केले आहे. गांधीजींच्या म्हणण्यानुसार ईश्वर व्यक्ती नसून तत्व आहे. God is Truth असे म्हणण्यापेक्षा Truth is God असे म्हटल्यास बरेच सोपे होते. सत्य हेच ईश्वर याचा अर्थ आजूबाजूला जे सर्व आहे तेच ईश्वर आहे. असे म्हटल्यास यात नीतीमत्तेचा प्रश्न येऊ नये असे वाटते. (चूभूद्याध्या)

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

लेख आवडला

विचारांना चालना देणारा लेख आवडला.

 
^ वर