काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा...

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी...
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश..
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे..
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो..
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली...

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात..
(इथे ऐका)

बाकीबाबांच्या 'नाही चिरा, नाही पणती' या कवितेच्याच धर्तीवरची कुसुमाग्रजांची एक उत्कृष्ट कविता..

ऐकायला अगदी सहजसुंदर परंतु गाण्यास तेवढीच अवघड, अशी खास हृदयनाथ मंगेशकरी धाटणीची चाल आणि एखादी विराणी ऐकतोय असं वाटावं अश्या पद्धतीची थेट हृदयाला भिडणारी दिदींची गायकी! यमनचं एक वेगळंच स्वरूप!

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी..!

ह्या ओळीतील 'उठिनिया जाशी' या शब्दातील सुरावट आणि गायकी 'आयुष्यातून उठणे', 'संसारातून उठणे' ह्या शब्दप्रयोगाकरता अक्षरश: चपखल बसते! दिदी जेव्हा 'उठिनिया जाशी' हे शब्द गातात तेव्हा आतून खूप काही तुटल्यासारखं वाटतं.

'मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा' किंवा 'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान' ह्या ओळीतील हंसध्वनीचा स्पर्ष, शुद्ध मध्यमाचा कण आणि कोमल रिषभावरचा प्रसन्न न्यास कानांना सुखावतो.

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

हे शब्द केवळ कुसुमाग्रजच लिहू शकतात..!

काळोखातूनी विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

ह्या ओळीतील 'तुजला' हा शब्द दिदी ज्या तर्‍हेने गातात तिथे शब्दच संपतात!

कुसुमाग्रज, पं हृदयनाथ मंगेशकर आणि दिदी या तीन दिग्गजांचा परीसस्पर्ष झालेलं हे गाणं श्रोत्यांना अतिशय श्रीमंत-समृद्ध करतं, त्या असंख्य अनाम-अज्ञात वीरांबदल हुरहूर लावतं आणि जीव थोडथोडा होतो!

सलाम...!

-- तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

गाणं उत्तम

पण कुसुमाग्रजांची ही नितांतसुंदर कविता 'एक्स्प्लेन' करण्याच्या नादात , गाण्याच्या नोटेशनचं वर्णन फक्त एकाच ओळीबद्दल आलं?
शैली बदललीस की काय तात्या तू?
अर्थात, सुरावटी एक्स्प्लेन करण्यापेक्षा कवितेचे शब्द एक्स्प्लेन करणं आम्हा गरीब बिचार्‍या वाचकांना अधिक सुसह्य आहे हे खरंच. स्वरांचं वर्णन करून त्यांची गोडी समजत नाही. शब्दांची समजू शकते.
या उत्क्रांतीबद्दल अभिनंदन!!!

--अदिती
प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत हे ओठावरी
मी तुझ्या हृदयात आहे तू असावे अंतरी

पूर्णतः सहमत नाही..

स्वरांची समज असल्यास इतर कुणी त्याच्या गोडीबद्दल, टेक्श्चरबद्दल लिहिल्यास निश्चितच आनंद होतो. माझ्या मते काही वेळेला नुसत्या शब्दाचं वर्णन करता येत नाही परंतु त्याची स्वरयोजना अतिशय सुरेख असते, जसे 'रेषा' किंवा 'यशोगान' या शब्दावरील शुद्ध रिषभाचा न्यास! 'यशोगान' हा शब्द सुरेखच आहे परंतु त्याचा शुद्ध रिषभावर न्यास ठेवल्यामुळे तो अधिक देखणा झाला आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि तेच मी मांडलं आहे!

स्वरांचं वर्णन करून त्यांची गोडी समजत नाही. शब्दांची समजू शकते.

पूर्णत: सहमत नाही...

वर म्हटल्याप्रमाणे स्वरांची समज असल्यास इतर कुणी त्याच्या गोडीबद्दल, टेक्श्चरबद्दल लिहिल्यास निश्चितच आनंद होतो.

उदाहरणार्थ,

'रैना बिती जाए,
शाम न आए
निंदिया न आए'

या गाण्यात दिदींच्या पहिल्या आलापीपासून ते 'रैना बिती जाए, शाम न आए..' इथपर्यंत तोडी हा राग प्रस्थापित होतो, श्रोत्यांच्या मनाचीही तोडीची बैठक होते. परंतु 'निंदिया न आए' या ओळीत अचानकपणे शुद्ध धैवत, शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधार या तोडी रागातील संपूर्णपणे वर्ज्य स्वरांचा वापर पंचमदा करतात तेव्हा 'निंदिया न आए' ह्या शब्दांचं वर्णन करण्यापेक्षा त्यातील अनपेक्षितपणे बदललेल्या, काहिश्या चमत्कृतीपूर्ण परंतु तेवढ्याच सुरेख स्वरावलीचं वर्णन करणंच मला अधिक श्रेयस्कर वाटतं!

अर्थात, हे सर्व ज्याला/जिला स्वरांची/रागांची काही एक समज आहे त्याच्या/तिच्याकरता! त्याचप्रमाणे ह्या लेखमलिकेचं नावच 'काही शब्दचित्रे,काही स्वरचित्रे' असं आहे त्यामुळे या लेखनात स्वरांचा (मला मुद्दामून उल्लेख करण्याजोगा वाटलेल्या!) उल्लेख येणे अपरिहार्य आहे!

असो, प्रत्येकाची मतं, प्रत्येकाचे समज!

प्रतिसादाखातर आभारी आहे.

धन्यवाद..

तात्या.

अवांतर वाटलेला भाग संपादितः संपादक

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सुंदर

हा भाग जरा उशीराच आला..
मात्र सुंदर कविता, सुंदर चाल आणि छान गायन ऐकवल्याबद्दल आभार.. लेख आवडला

लेखमाला विविध अंगांनी बहरतेय
मस्त!..

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

असेच म्हणतो

सुंदर गाणे आणि कवितेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एक (आता बदललेला) प्रतिसाद बघून विचार आला : एके काळचे लोकप्रिय कवी आणि गीतकार बा. भ. (बाकीबाब) बोरकर निवर्तून २४-२५ वर्षे झालीत. आता कित्येक व्यासंगी मराठी वाचकांनासुद्धा "बाकीबाब" नावाचा संदर्भ स्पष्ट वाटेनासा झाला आहे. त्या प्रतिभावंत कवीची ही गत तर तुम्हा-आम्हासारख्या सामान्यांचे काय - असा विचार येऊन नैराश्य वाटते. आता बोरकरांना "अनाम कवी" म्हणावे का? **गोवेकर बोरकरांनी महाराष्ट्राच्या भाषेत कविता लिहून नाहक विस्मरण प्राप्त केलेले दिसते. कोंकणी पाठ्यपुस्तकांत बाकीबाबांची ओळख झालेले कोंकणीभाषक अजून विसरलेले नाहीत. महाराष्ट्रासाठी मराठी कविता लिहायचे सोडून बाकीबाबांनी १००-१५० अधिक कोंकणी कविता गोवेकरांसाठी लिहिल्या असत्या तर बरे, असे आज वाटू लागले आहे.**

धन्याशेठ,

एक (आता बदललेला) प्रतिसाद बघून विचार आला

'आता बदललेला' नव्हे, 'आता काढून टाकलेला!' असे म्हटल्यास अधिक योग्य होईल! ;)

आता कित्येक व्यासंगी मराठी वाचकांनासुद्धा "बाकीबाब" नावाचा संदर्भ स्पष्ट वाटेनासा झाला आहे. त्या प्रतिभावंत कवीची ही गत तर तुम्हा-आम्हासारख्या सामान्यांचे काय - असा विचार येऊन नैराश्य वाटते. आता बोरकरांना "अनाम कवी" म्हणावे का? **गोवेकर बोरकरांनी महाराष्ट्राच्या भाषेत कविता लिहून नाहक विस्मरण प्राप्त केलेले दिसते.

मी व्यासंगी मराठी वाचक आहे असे नव्हे, परंतु मी बाकिबाबांचा (किंवा बाकिबाब यांचा. सोयीसाठी बाकिबाबा असे केले होते ते कुणा चोखंदळ आणि व्यासंगी उपक्रमीला रुचले नाही. अर्थात, उपक्रम प्रशासनाला त्यांचा तो प्रतिसादच रुचला नाही हा भाग वेगळा! ;) मात्र फ्यॅन आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे आजही अनेकानेक महाराष्ट्रीयन्स त्यांचे फ्यॅन आहेत..

महाराष्ट्रासाठी मराठी कविता लिहायचे सोडून बाकीबाबांनी १००-१५० अधिक कोंकणी कविता गोवेकरांसाठी लिहिल्या असत्या तर बरे, असे आज वाटू लागले आहे

धन्याशेठ, असे म्हणू नका प्लीज.. बोरकर जितके गोव्याचे आहेत त्याहूनही अधिक ते महाराष्ट्राचे आहेत. आणि माहाराष्ट्रीय रसिकतेचा मानबिंदू आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी बोरकरांचा वेळोवेळी सन्मान केला आहे, गुणगान गायले आहे हेही विसरून चालणार नाही.

आपला,
(बोरकरप्रेमी महाराष्ट्रीयन) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चालायचेच

आजकाल ज्ञानोबा तुकारामांचीही हीच गत आहे. कालपरवाच लोकमानसमध्ये वाचले की एका त्या वर्तमानपत्रातील लेखात नामदेवांचा एक अत्यंत लोकप्रिय अभंग तुकारामांच्या नावावर खपवण्यात आला होता. असे करणारी व्यक्ती ही मराठीतील एक लेखिका होती.

(प्रतिसाद दुरुस्त केला आहे.)

हे पत्र वाचा---

तीन महत्त्वाच्या मराठी वाहिन्या, वृत्तपत्रे तसेच पुस्तक प्रकाशन समारंभ या संदर्भातली, गेल्या काही महिन्यांतली निरीक्षणे अस्वस्थ करणारी होती. एका वाहिनीने एका कार्यक्रमात दैनंदिन स्पर्धा ठेवली होती. त्यात संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते, हा प्रश्न होता व ‘आळंदी, देहू, नरसीबामणी’ हे उत्तरासाठी पर्याय होते. दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करताना ‘नरसीबामणी’ हा पर्याय योग्य असल्याचे सांगण्यात आले आणि त्याप्रमाणे एका स्पर्धकाला बक्षीसही जाहीर झाले. वास्तविक ते संत नामदेवांचे जन्मगाव आहे. तातडीने वाहिनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवल्यावर, दुसऱ्या दिवशी ही चूक सुधारण्यात आली; पण काही न पटणाऱ्या किरकोळ सबबी देऊन.
अन्य एका वाहिनीवर गणपती उत्सवाच्या कार्यक्रमाचे निवेदन करताना ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ ही ओळ उद्धृत करत कीर्तन परंपरेच्या प्रारंभाचे श्रेय संत तुकारामांना दिले गेले. मात्र ते श्रेय अर्थातच संत नामदेवांकडे जाते.
असाच विपर्यास एका प्रथितयश लेखिकेने एका वृत्तपत्रातील लेखात केला. ‘श्री ज्ञानेश्वरीतला श्लोक’ असे तिने उद्धृत केले होते. ‘ओवी ज्ञानेशाची’ हेही लेखिकेला माहीत नसावे का?
नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभाच्या प्रारंभी म्हणण्यात आलेले ‘मधुराष्टक’ निवेदिकेने बेधडक श्रीशंकराचार्याचे असल्याचे सांगितले. अर्थात या ‘मधुराष्टका’च्या निर्मात्या श्रीवल्लभाचार्याना त्याचे सुखदु:ख निश्चितच नाही!
मला आलेले हे काही थोडेसे अनुभव. असे कितीतरी अनुभव वाङ्मयाशिवाय इतर अनेक विषयांसंदर्भात सुज्ञांस येत असतील. शेवटी विषादाने म्हणावेसे वाटते, की हल्ली फक्त ‘प्रगटावे’ एवढेच उरत चालले आहे का? ‘अभ्यासे प्रगटावे’चा लोप होत जाणार का?
(ता. क. - ५ मेच्या ‘सारेगम’ कार्यक्रमात कौशल इनामदार, ‘घनु वाजे घुणघुणां’ ही संत ज्ञानेश्वरांची विराणी, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथात समाविष्ट करून मोकळे झाले. अभ्यासू पं. हृदयनाथ मंगेशकरांनी ही चूक तिथल्या तिथे सुधारली म्हणून! नाही तर.)
आशा धारप, माहीम, मुंबई


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१ सहमत

सुंदर कविता, सुंदर चाल आणि छान गायन ऐकवल्याबद्दल आभार

तात्याराव, पुढिल वेळी "यह दिल और यह उनकी निगाहों के साये" या कर्णमधुर व चित्ताकर्षक गाण्याचे गायकीच्या अंगाने विश्लेषण येऊ दे. ते गाणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील शास्त्रीय संगीताच्या उपयोगाचे आदिबीज म्हणता येईल :)
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

प्रयत्न करेन..

तात्याराव, पुढिल वेळी "यह दिल और यह उनकी निगाहों के साये" या कर्णमधुर व चित्ताकर्षक गाण्याचे गायकीच्या अंगाने विश्लेषण येऊ दे.

नोंद घेतली आहे. अवश्य प्रयत्न करेन..

ते गाणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील शास्त्रीय संगीताच्या उपयोगाचे आदिबीज म्हणता येईल

या बाबत काही अधिक खुलासा केल्यास बरे होईल..

तात्या.

अवांतर वाटलेला भाग संपादितः संपादक
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

काल

या बाबत काही अधिक खुलासा केल्यास बरे होईल..

लिहिताना मनात काहीतरी संदर्भ होता पण तो आज आठवत नाही. त्यामुळे खुलासा देणे थोडे कठिण होऊन बसलेले आहे. कळावें.

_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

ओके..

लिहिताना मनात काहीतरी संदर्भ होता पण तो आज आठवत नाही. त्यामुळे खुलासा देणे थोडे कठिण होऊन बसलेले आहे. कळावें.

ओके..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

श्लेष

तात्याराव, पुढिल वेळी "यह दिल और यह उनकी निगाहों के साये" या कर्णमधुर व चित्ताकर्षक गाण्याचे गायकीच्या अंगाने विश्लेषण येऊ दे. ते गाणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील शास्त्रीय संगीताच्या उपयोगाचे आदिबीज म्हणता येईल
हा हा. मराठीतील अलंकारांवर लिहिणार्‍यांनी श्लेषाचे उत्तम उदाहरण म्हणून सदर वाक्य वापरावे अशी शिफारस करावीशी वाटते.
सन्जोप राव

सुस्पष्टता

एकंदरीत लेखमालेचे स्वरुप भावनिक असल्याने अर्थातली सुस्पष्टता, शुद्धलेखन याबाबत लेखकाने स्वातंत्र्य घेतलेले दिसते. 'दीदी' हा शब्द 'दिदी' असा लिहिणे, 'यमनचं' हा व्याकरणदृष्ट्या चुकीचा उल्लेख, एकदा 'उठोनिया' तर एकदा 'उठिनिया' हा सूक्ष्म फरक, 'स्पर्ष' या शब्दातली अनावश्यक पोटफोड अशी उदाहरणे आहेत, पण त्यांकडे दुर्लक्ष करुन कुठे काय तुटते आणि कुठे काय संपते अशा आशयगर्भ गोष्टींकडे लक्ष द्यावे अशी लेखकाची रास्त अपेक्षा दिसते. कृपया तिला मान द्यावा.
स्वरांचं वर्णन करून त्यांची गोडी समजत नाही. शब्दांची समजू शकते.

या विधानाला असहमती दाखवताना लेखकाने जे सोदाहरण स्पष्टीकरण केले आहे, त्याचे कुणीतरी मराठीत भाषांतर करावे ही विनंती, अन्यथा आमच्यासारख्या पामरांना या रसोत्पत्तीपासून वंचित रहावे लागेल.
सन्जोप राव

असेच म्हणतो

रावसाहेबांशी सहमत आहे... घटत्या व्याजदराच्या कालखंडात तव सुखांच्या ठेवींवरील इंटरेष्टही कमी झाला आहे असे दिसते. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विनंती..

एकदा 'उठोनिया' तर एकदा 'उठिनिया' हा सूक्ष्म फरक,

उठोनियाच्या ऐवजी उठिनिया असे चुकून झाले आहे. संपादकांनी कृपया ही चूक सुधारावी...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अहाहा

सुरेख विवेचन !

अवांतर : बाय द वे, ऑनलाइन म्युझीकचा दुवा चालत नाही का ?

-दिलीप बिरुटे

रीअल प्लेअर..

अवांतर : बाय द वे, ऑनलाइन म्युझीकचा दुवा चालत नाही का ?

सर, माझ्या माहितीप्रमाणे त्याकरता आपल्या संगणकात रीअल प्लेअर असणे आवश्यक आहे. तो आंतरजालावर विनामूल्य उपलब्ध आहे. आपण तो आपल्या संगणकावर उतरवून घेतला आहे का?

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

रिअल प्लेअर/हेलिक्स प्लेअर

म्युझिक इंडिया ऑनलाईन, रागा किंवा तत्सम स्ट्रीमींग गाणी ऐकवणार्‍या संकेतस्थळांसाठी रिअल प्लेअर किंवा त्यापेक्षाही चांगला असा हेलिक्स प्लेअर असणे आवश्यक आहे.

ह्या संकेतस्थळांवरुन गाणी ऐकण्यासाठी फायरफॉक्स ब्राऊझर हा सर्वोत्तम. त्याचबरोबर ब्राऊझर व रिअल/हेलिक्स प्लेअर यांची एकमेकांशी जोडणीही व्यवस्थित हवी.

फायरफॉक्सच्या खिडकीत about:plugins असे टाईप करुन दिसणार्‍या पानावर रिअल मिडियासाठी कोणते प्लगिन वापरले जाते ते तपासून पाहिल्यास या अडचणीचे निराकरण करणे सोपे जाईल.

उबुंटुवर ही संकेतस्थळे वापरण्यासाठी काय करावे याची उत्कृष्ट माहिती http://abhinay.wordpress.com/tag/raaga/ येथे मिळेल


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभार..

ऋषिकेश आणि बिरुटेसर,

आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार..!

अन्य मंडळींच्या प्रतिक्रियाही रोचक आहेत आणि उपक्रमाच्या सृजनशीलतेला व रसिकतेला साजेश्याच आहेत. त्यांचेही आभार..!

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

प्रतिसाद

मा. संपादक उपक्रम,
मी इथे दिलेला प्रतिसाद का उडवण्यात आला हे कळेल का?
(प्रश्नार्थी) बेसनलाडू

चूक...

सदर गाण्याचे संगीत दिग्दर्शक पं हृदयनाथ मंगेशकर नसून वसंत प्रभू हे आहेत हे नुकतेच समजले. हे गाणे हृदयनाथांचे आहे अशी माझी कल्पना/माहिती होती जी अर्थातच चुकीची आहे.

ऐकण्यास सहजसुंदर व सोपे परंतु गाण्यास अत्यंत कठीण ही हृदतनाथांची खासियत या गाण्यात प्रभूसाहेबांनी जपली आहे हे निश्चितच विशेष म्हणावे लागेल.

उपक्रम प्रशासनाला विनंती की त्यांनी योग्य ते बदल करावेत. ज्याचे/जिचे जे श्रेय ते त्याला/तिलाच गेले पाहिजे. उपक्रम प्रशासनाला होणार्‍या संपादनाच्या त्रासाबद्दल आणि वाचकांना चुकीची माहिती पुरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो..

उपक्रमी प्रदीप यांनी ही चूक माझ्या निदर्शनास आणली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हृदयनाथांची खासियत प्रभू कसे काय जपू शकतात

हा एक मूलभूत प्रश्न माझ्या मनात आहे... वसंत प्रभू हे मंगेशकरांच्या तुलनेत जुने. त्यामुळे प्रभू यांची खासियत मंगेशकरांनी जपली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मात्र भविष्यकाळात हृदयनाथ अशा चाली देतील(?) हे ओळखून प्रभू यांनी खास हृदयनाथ मंगेशकरी चाल दिली आहे हे उदाहरण न पटण्यासारखे आहे.

असे म्हणणे म्हणजे ब्र्याडमनने खास तेंडुलकरी ष्टाईल जपली होती असे म्हणण्यासारखे वाटते. मेजर क्रोनोलॉजिकल मिष्टेक.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चुकीचे वाक्य

ऐकण्यास सहजसुंदर व सोपे परंतु गाण्यास अत्यंत कठीण ही हृदतनाथांची खासियत या गाण्यात प्रभूसाहेबांनी जपली आहे हे निश्चितच विशेष म्हणावे लागेल.

आपल्याला पहिल्याने या गाण्याचे संगीतकार हृदयनाथ आहेत असे वाटले होते पण ते चुकीचे असून वसंत प्रभू आहेत असे जाणकारांनी लक्षात आणून दिल्याने आपण असे वाक्य लिहिले आहे तेही निखालस चुकीचे आहे. वसंत प्रभू मराठी संगीत विश्वात हृदयनाथांपेक्षा वयाने आणि अधिकाराने बरेच मोठे होते त्यामुळे जर कुठे या दोघांमध्ये साम्य असलेच तर "प्रभूसाहेबांची खासियत हृदयनाथांनी जपली आहे" असे म्हणायला हवे.

विनायक

सहमत..

वसंत प्रभू मराठी संगीत विश्वात हृदयनाथांपेक्षा वयाने आणि अधिकाराने बरेच मोठे होते त्यामुळे जर कुठे या दोघांमध्ये साम्य असलेच तर "प्रभूसाहेबांची खासियत हृदयनाथांनी जपली आहे" असे म्हणायला हवे.

अगदी सहमत आहे. मनापासून आभार..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हा हा हा!!

झकास.

आपला
गुंडोपंत

 
^ वर