काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश..

प्रथम धर घ्यान दिनेश..
(उमराव जान चित्रपटातील रागमाला - इथे ऐका)

प्रथम धर घ्यान दिनेश..

राग रामकली. भैरवाशी नातं सांगणारा रामकली. भल्या सकाळी एकटंच किनार्‍यावर उभं असावं, मनात काहीबाही विचारांचं काहूर आणि त्यातच एखादी लाट जवळच्याच खडकावर जोरात आदळून फुटावी आणि चित्त भानावर यावं!

अब मोरी नैय्या पार करो..

राग तोडी. हिंदुस्थानी रागसंगीतात याला अन्य तोड नाही! करूणरसाने ओथंबलेला तोडी!

सुजन विचार आयो मन..

राग शुद्ध सारंग. दुपारच्या टळटळीत उन्हाच्या तल्खलीत वाटेवर अचानक एखादा विशाल वृक्ष दिसावा आणि घटकाभर त्याची मायेची सावली लाभावी असा शुद्ध सारंग!

बिरज मे धुम मचायो कान्हा-

राग भीमपलास. रामकली, तोडीने भारलेली सकाळ सरली, दुपारची उन्हं आता कलू लागली आणि वातावरण अधिकाधिक सुखद होऊ लागलं. वृंदावनातील कृष्णाच्या लीलांना भीमपलासीची प्रासदिकता लाभली, सात्विकता लाभली!

दरसन दे हो शंकर महादेव-

रागांचा राजा! राग यमन..! माणसातलं माणूसपण म्हणजे यमन, गाण्यातलं गाणंपण म्हणजे यमन..! हिंदुस्थानी रागसंगीतातले हिरे-पाचू-माणिक-मोती म्हणजे यमन! हिंदुस्थानी रागसंगीताची ओळख म्हणजे यमन!

पकडत बैय्या मोरी...

राग मालकंस. घरात एखादा कर्तृत्ववान बुजूर्ग असावा, तसा हिंदुस्थानी रागसंगीताच्या परिवारातील एक बुजूर्ग राग. मालकंसाने आज्ञा करावी आणि इतर रागांनी ती झेलावी. मालकंसाची तपस्याच तेवढी मोठी!

बासुरी बाज रही..

राग भैरवी! भैरवी म्हणजे भारतीय संस्कृतीचं सार! जिथे सारे भारतीय एक होतात अशी भैरवी! जिथे शब्द संपतात आणि फक्त सूर उरतात अशी भैरवी! हिंदुस्थानी रागसंगीताचं उद्यापन म्हणजे भैरवी..!

-- तात्या अभ्यंकर.

Comments

संपादकांना विनंती..

संपादकांना विनंती..

भैरचाशी नातं सांगणारा रामकली.

या ओळीत 'भैरवाशी' असा शब्द हवा. तिथे चुकून 'भैरचाशी' असे झाले आहे!

धन्यवाद..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

आभार..

आवश्यक ती दुरुस्ती केल्याबद्दल संपादकांचे आभार...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा - वेगळीच दृष्टी मिळाली

ही गीतमाला आजवर मी केवळ "मुलगी वयाने-अंगाने आणि कलेने वाढत आहे" या दृष्टीने, चित्रपट-दिग्दर्शनाच्या अंगानेच बघत-ऐकत होतो.

आता दिग्दर्शनाबरोबर संगीत-दिग्दर्शनाकडेही लक्ष जाते आहे. आस्वादाची रुंदी दुप्पट झाली.

+१

+१ + काही

सहमत आहे.

शिवाय दुव्यावरील चित्रफीत चित्रपटापासून वेगळी पाहताना संगीत दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, नेपथ्य , प्रकाश योजना, चित्रीकरण या सार्‍याच बाबी खूपच बारकाईने हाताळल्या गेल्या आहेत याची वेगळी - नवी जाणीव झाली.

सहमत..

शिवाय दुव्यावरील चित्रफीत चित्रपटापासून वेगळी पाहताना संगीत दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, नेपथ्य , प्रकाश योजना, चित्रीकरण या सार्‍याच बाबी खूपच बारकाईने हाताळल्या गेल्या आहेत याची वेगळी - नवी जाणीव झाली.

नानासाहेबांशी सहमत आहे. संपूर्ण चित्रपटाऐवजी त्यातले फक्त एखादे गाणे किंवा एखादाच प्रसंग पाहून संगीत दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, नेपथ्य , प्रकाश योजना, चित्रीकरण इत्यादींबद्दल समजून घेण्यास अधिक मदत होऊ शकते..

आपला,
(चित्रपटप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

फारच छान आहे रागमाला.

ह्यातले गायक-गायिका कोण आहेत?
जसराज-लता? की कुणी खांसाहेब आहेत?

खांसाहेब तवायफ दोघेही धर्माने मुसलमान
मात्र गाताहेत हिंदु देवदेवतांच्या स्तुतीचे गान

हा एक भारतीय अभिजात संगीताचा अनोखा संगम आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रश्न

संगीतात धर्म कशाला? प्रतिसाद कळला नाही. तसा तर भारतीय चित्रपट सृष्टीत संगमांचा सुकाळ आहे. तरी सुद्धा नग्न नट्या दाखवणारा राजकपूर म्हणतो, बोल राधा बोल संगम होगा की नही?
प्रश्न विचारायचे होते. पण सदर लेखन प्रश्नांना उत्तर देण्याचे सोडून भलतीकडेच विषय नेतो असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे माझा या विषयांबद्दल रसभंग झाला आहे.
बायदवे, एखाद्याला राग येतो म्हणजे काय होते?


भीमसेन आणि रामभाऊ

भीमसेन आणि रामभाऊंनी "महंमदशा दरबार", "अल्ला जाने" गायलं आहेच की ! मुसलमान बादशाहांच्या पदरी असलेले हिंदू गायक अल्लास्तुतीपरच गायचे.

--- उपक्रमी

आव्हान

"बनारसी १२०, कच्ची सुपारी, वेलची सोलून.." अशी ऑर्डर वर सांगितलेल्या रागात कशी द्यायची त्याचे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेत तर शास्त्रीय संगीत जिवंत आहे असे आम्ही मान्य करू. अन्यथा शास्त्रीय संगीत संस्कृतप्रमाणेच मृत आहे असे समजू.

बाय द वे - विशिष्ट जमातीने शास्त्रीय संगीत ताब्यात घेतल्याने त्याचा अध:पात सुरू झाला असे माझे स्वतःचे मत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते.

विनायक

विशिष्ट जमात

विशिष्ट जमातीने शास्त्रीय संगीत ताब्यात घेतल्याने त्याचा अध:पात सुरू झाला असे माझे स्वतःचे मत आहे.

हल्लीच आम्हाला शा. सं आवडू लागले आहे. या विषयावर अधिक चर्चा झाल्यास ती समजण्यासाठी खालील काही शंकांचे निरसन करावे.
१. ही विशिष्ट जमात कोणती?
२. संगीत ताब्यात घेणे म्हणजे काय? एखाद्या राग गाण्याचा कॉपीराईट घेणे अभिप्रेत आहे काय?
३. संगीताचा अधःपात म्हणजे काय? मूळ गाण्याचे रिमिक्स केले की जुन्या गाण्याचा अदःपात वगैरे असे काही का?उदाहरण?
४. अधःपात होतोय हे दर्शवणारा काही संदर्भ आहे का?

अभिजित यादव
कर्‍हाड.

उत्तरे

१. ही विशिष्ट जमात कोणती?

इतके दिवस उपक्रमावर राहूनही तुला हा प्रश्न पडावा हे आश्चर्य आहे.

धम्मकलाडूने बरोबर उत्तर दिले आहेच. पण तरीही आणखी काही हिंट्स देतो.

*संस्कृत भाषा ज्या विशिष्ट जमातीने ताब्यात घेतल्याने तिचा (पक्षी: संस्कृतचा,जमातीचा नाही) अधःपात झाला तीच ही जमात बरे.

*ज्या विशिष्ट जमातीच्या लोकांनी इतरांचे आर्थिक शोषण करून वारेमाप पैसा कमावला आणि तरीही दरिद्री असल्याची लोकांची खोटी समजूत करून दिली तीच ही जमात बरे

अधःपात होतोय हे दर्शवणारा काही संदर्भ आहे का?

धम्मकलाडूचा प्रतिसाद वाचलास तर शास्त्रीय संगीत या विशिष्ट जमातीच्या लोकांनी ताब्यात घेतल्याचे समजेल. आता त्यांनी ताब्यात घेतले हीच गोष्ट अधःपात झाल्याचा पुरावा नाही का? असे असताना तुला वेगळा पुरावा कशाला हवा? आणि अधःपात अजून झाला नसेल तर उद्या नक्की होईल.

संस्कृतबद्दल वर उल्लेखिलेले विधान केले आहे त्या व्यक्तीकडून "संस्कृत ताब्यात घेणे म्हणजे काय? आणि संस्कृतचा अधःपात म्हणजे काय?" या प्रश्नांची उत्तरे आली की लगेच तुला उरलेल्या दोन प्रश्नांची उत्तरे देईन.

व्यक्तिगत रोखाचा काही मजकूर संपादित.

नारायणराव बोडसांची जमात का?

  1. ही विशिष्ट जमात कुठली
  2. अधःपात म्हणजे काय

हे कळल्याशिवाय काय वाटते हे सांगणे शक्य नाही.

पण वझेबुवा, वसंतराव देशपांडे, नारायणराव बोडस, बखलेबुवा, पलुस्करांची, अभ्यंकरांची तर ही जमात नव्हे! ब्राह्मणांनी त्यातही चित्पावनांनी शास्त्रीय संगीत ताब्यात घेऊन त्याची वाट लावली आहे असे आपल्याला वाटते का? तूर्तास (ह्या लेखावरून तरी ) तुम्हाला असेच म्हणायचे आहे असे वाटते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काका, तुमचे मत

विशिष्ट जमातीने शास्त्रीय संगीत ताब्यात घेतल्याने त्याचा अध:पात सुरू झाला असे माझे स्वतःचे मत आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते.

तुमचे स्वतःचे मत मांडून त्यावर दुसर्‍यांना आव्हान कसं देता येतं हो काका? काहीतरीच.

रंगसंगती भडक आहे. डोळ्यांना त्रासही होतो आहे. फक्त राग ओळखण्यापेक्षा ते कसे ओळखावेत तेही सांगा.

-राजीव.

संस्कृत आणि शास्त्रीय संगीत

वा वा वा !

आता चर्चा रंगणार !

--- उपक्रमी

धन्यवाद..

धन्याशेठ, प्रमोदकाका,

आपल्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे.

प्रमोदकाका, गायकाचं नांव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे अशी माझी माहिती आहे. ज्या शिष्यवर्गाने कोरस गायला आहे ती मंडळी कोण आहेत हे मला माहीत नाही.

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मुस्तफा

सोनू निगम हे गुलाम मुस्तफा खांसाहेबांचे एक शिष्य. पण ते उमराव जान च्या वेळी खूप लहान असावेत.

--- उपक्रमी

शिष्यवर्गाची नावे

ज्या शिष्यवर्गाने कोरस गायला आहे ती मंडळी कोण आहेत हे मला माहीत नाही.

शाहिदा (शहिदा) खान आणी रूना प्रसाद. संदर्भ
इथे पहा

आभार...

माहितीबद्दल आभारी आहे..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

वा!

गुलाम मुस्तफा खां म्हणजे तर बेसच आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

रागमाला आवडली.

रागमाला आवडली. छान दुवा आहे. उत्तम संगित आणि साक्षात रेखा!!!!

बिपिन कार्यकर्ते

शंका

हिंदुस्तानी संगीतातील गाण्यांचे शब्द कायमच हिंदी का बरे? मराठी, गुजराती वगैरे का नाहीत? कर्नाटकी संगीतात तेलुगू-कन्नड-तमिळ ह्या तिन्ही भाषांमधील गीते (किंवा जी काही शास्त्रीय संज्ञा आहे ती) असतात. (विशेषतः तेलुगू गाणी बरीच जास्त आहेत असे ऐकले आहे).

श्री. पलुस्कर यांनी हिंदुस्तानी संगीताच्या अभ्यासाची अधिकृत सुरुवात केली असे ऐकले आहे. पलुस्कर यांना मराठी शब्द असलेल्या रचना मिळाल्या नाहीत काय?

सहज शंका म्हणून विचारले. पलुस्कर यांच्याबद्दल मला आदर आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इतर भाषा

हिंदुस्तानी संगीतातील बरीच गाणी ब्रज भाषेत आहेत.
इतर भाषांमधली उदाहरणे कमी आहेत - पण नाही असे नाही
काही उदाहरणे - १. चंगे नैनवालियाँ (भीमसेन - तोडी) - पंजाबी
२. साडे नाल वे (अभिषेकी - भीमपलास) - पंजाबी
३. माई सावरे रंग राची (जसराज - भैरवी) - राजस्थानी / मारवाडी
मराठी मधल्या रचना फार प्रचलित नाहीत हे खरे.

चू भू द्या घ्या.

अमित

धन्यवाद

माहितीबद्दल आभारी आहे. मात्र पलुस्कर यांनी संगीताचा शास्त्रीय अभ्यास सुरु करताना ज्या मूळ रचना लिहिल्या असतील त्यांसाठी त्यांनी मराठी शब्द का वापरले नसावेत ही एक उत्सुकता मनात आहे. यामागे काही विशेष कारण आहे काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठीत् रचना का नाहीत्?

श्री. पलुस्कर यांनी हिंदुस्तानी संगीताच्या अभ्यासाची अधिकृत सुरुवात केली असे ऐकले आहे.

हे वाक्य काहीसे बरोबर आहे. संपूर्णपणे नाही. थोरल्या पलुसकरांनी संगीताचा अभ्यास केला हे तर खरे, पण तो अभ्यास ते संगीत लोकांपर्यंत पोहोचवणे जास्त सोपे कसे होईल या दृष्टिकोनातून केला, उदा. स्वरलेखनाची (नोटेशन करण्याची) त्यांनी शोधून काढलेली पद्धत. जुन्या-पुराण्या चिजा/रचना जमवणे अथवा त्यांचे स्वरलेखनासहित 'डॉक्युमेंटेशन' करणे वगैरे गोष्टी भातखंड्यांनी प्रामुख्याने केल्या. त्यांचा 'हिंदुस्तानी संगीत पद्धती' हा ग्रंथराज भारतीय शास्त्रीय संगीतावरील एक महान कृती (अ ग्रेट वर्क - मराठी शब्द?) मानली जाते. त्यांनी भारतभर प्रवास करून निरनिराळे राग, त्यातील विविध रचना गोळा केल्या, त्यांचे स्वरलेखन केले. आणि मुख्य म्हणजे त्यांनी आधी काहीशा विस्कळीत असलेल्या हिंदुस्तानी रागपद्धतीला वेगवेगळ्या थाटांमध्ये वर्गीकृत करण्याचा प्रयत्न केला, ज्यायोगे नवीन शिकणार्‍यांना रागपद्धती समजणे सोपे जाईल. पण वैयक्तिक आयुष्यात भातखंडे सामान्यांशी संगीताविषयी बोलण्यास फारसे उत्सुक नसत. याउलट विष्णु दिगंबरांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना करून, निरनिराळ्या ठिकाणी संगीत संमेलने आयोजित करून तत्कालीन महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताच्या प्रसार-प्रचारास स्वतः तसेच शिष्यांकरवी हातभार लावला. काहीही असले तरी या दोन विष्णूंचे (पक्षी- विष्णु दिगंबर पलुसकर आणि विष्णु नारायण भातखंडे) भारतीय शास्त्रीय संगीतावर खूप मोठे उपकार आहेत. सौ. अंजली कीर्तने यांनी मागे लोकप्रभामधे (बहुतेक, युनिकोड नसलेले ते एकमेव स्थळ आहे) शास्त्रीय संगीताच्या महाराष्ट्रातील प्रवासावर एक उत्तम लेखमाला चालवली होती. ती वाचनीय आहे.

पलुस्कर यांना मराठी शब्द असलेल्या रचना मिळाल्या नाहीत काय?

याच्यात २-३ गोष्टी आहेत.
१) मुळात 'हिंदुस्तानी संगीत' महाराष्ट्रात आले, येथे निर्माण झाले नाही. या संगीताची जडणघडण नावाप्रमाणेच मुख्यतः उत्तर भारतात झाली. साहाजिकच त्यातल्या सार्‍या रचना हिंदुस्तानीमध्ये अथवा ब्रजभाषेत आहेत.
२) या रचनांमधले साहित्यविषयही तत्कालीन उत्तरभारतीय संस्कृतीचा प्रभाव असलेले आहेत. पूर्वी राजदरबारात संगीताला प्रवेश मिळण्याच्याही आधी ध्रुपद संगीत (जे आजच्या ख्याल गायकीचे मूळ आहे) मंदिरांत गायले जात असे. त्यामुळे त्यातील रचनांचे बरेचसे विषय हे राम-कृष्णादी देवता आणि त्यांचे जीवन/पराक्रम/गुणवर्णन यांच्यापर्यंत मर्यादित आहेत. विरह, परदेशी गेलेला प्रियकर, वाईट्ट मेल्या सासवा-नणंदा, कृष्ण-गोपी, त्यांचे रास-नृत्य, होळीमध्ये रंग खेळणे आणि एकूणातच त्यातला रोमँटिक अँगल हे नंतर आले असावेत असे मानायला हरकत नाही (जेव्हा देव्हार्‍यातल्या देवाऐवजी सिंहासनावरच्या अथवा तख़्तावरच्या देवाला रिझवायची वेळ येऊ लागली). अगदी नवीन काळात झालेल्या रचनांनाही या विषयांनी खाद्य पुरवले आहे. अण्णासाहेब रातंजनकर, जगन्नाथबुवा पुरोहित, सी.आर.व्यास वगैरे तुलनेने नजीकच्या भूतकाळात होऊन गेलेल्या गायकांनीही ज्या रचना केल्या त्यातले साहित्यविषय बर्‍याच अंशी असेच आहेत.
३) आणि शेवटचे म्हणजे (हे विधान वादग्रस्त वाटू शकेल तरीही) एकूणच उत्तर भारतीय भाषेचा, विशेषतः ब्रजभाषेचा जो काही लहेजा आहे, जो डौल आहे तो शास्त्रीय संगीताला अधिक जवळचा आहे. मराठीत ती मजा नाही. स्वरप्रधान गायकी असल्याने बर्‍याचदा शब्द काहीसे ट्विस्ट करून म्हटले जातात, शब्दांतले आकार-उकार-इकार यांचा वापर स्वरांचे न्यास करण्यासाठी केला जातो (विशेषतः विलंबित तालात गाताना). या सगळ्यात ब्रजभाषा/हिंदुस्तानी अगदी फिट्ट बसते. मराठी रचना करण्याचे प्रयोग झाले, खुद्द विनायकराव पटवर्धनांनी केले. पण ते लोकप्रिय होऊ शकले नाहीत.

जाता जाता : अहद बेळगाव-धारवाड तहद लाहोर (आजकाल तर स्यान होजे-सीऍटल) दौरे करणारी मंडळी होती ही. सगळीकडेच मराठी चालत नाही, त्यामुळे मराठी रचनांना मार्केट कुठून असायला? हा थोडा भागही त्याच्यात असावा असे वाटते. :)

सहमत..

विस्तृत आणि अतिशय सुरेख प्रतिसाद..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उत्तम प्रतिसाद

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद. आभारी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मार डाला..

एकसेएक सॉल्लिड हमखास-टाळ्याघेऊ आणि "सर्वसमावेशक" वाक्यं आहेत. नतमस्तक.

"माणसातलं माणूसपण म्हणजे यमन, गाण्यातलं गाणंपण म्हणजे यमन..! "

निव्वळ मार डाला..
एकंदर टाक साखरपाकाच्या शाईत बुडवून लिहिल्यासारखी ही माहिती आवडली.

(गुळाचा गणपती) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ह्या लेखनातील फाँट साइझ आणि बटबटीत रंगसंगती हे जिथून उचलले आहे तिथे साजेशी असली तरी उपक्रमावर रुचणारी नाही. तेव्हा ह्यात कृपया योग्य ते बदल करावेत, अशी संपादकांना विनंती करावीशी वाटते आहे.

रंगसंगती

ह्या लेखनातील फाँट साइझ आणि बटबटीत रंगसंगती हे जिथून उचलले आहे तिथे साजेशी असली तरी उपक्रमावर रुचणारी नाही. तेव्हा ह्यात कृपया योग्य ते बदल करावेत, अशी संपादकांना विनंती करावीशी वाटते आहे.

रंगसंगती मलाही रुचली नाही. बाकी लेख छान!

आभार..

सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल पुनश्च एकदा आभार..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

व्वा !

तात्या, आपले हे लेखन उपक्रमला अधिक समृद्ध करणारे आहे.
शब्दांची रंगसंगती आवडली !

-दिलीप बिरुटे

छान छायाचित्र!

वा! छान छायाचित्र!

अरेच्या लेखही आहे वाटतं.. लक्षच गेलं नाहि :प्

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सर्व व्याकरण दुढ्ढाचार्य गेले कुठे?

ह्या लेखाच्या शीर्षकात आणि इतर ठिकाणी ध्यान ह्या शब्दाऐवजी घ्यान असा शब्द लिहिलेला आहे. माझ्या लेखात एक शब्द किती वेळा चुकीचा आला हे सांगणार्‍यांनी इतर लेखांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले दिसते.

हा आपपरभाव योग्य नाही.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

प्रतिसाद संपादित.

आभार/विनंती..

ह्या लेखाच्या शीर्षकात आणि इतर ठिकाणी ध्यान ह्या शब्दाऐवजी घ्यान असा शब्द लिहिलेला आहे.

सहमत आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि घ्यान ऐवजी ध्यान अशी सुधारणा करावी अशी संपादकांना विनंती करतो..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

तल्खली/तलखी

तल्खलीत

या शब्दाऐवजी "तलखी" असा शब्द असावा. याचा अर्थ
इथे पहावा

विनायक

धन्यवाद,

सूचनेबद्दल धन्यवाद. परंतु मला तल्खली हाच शब्द योग्य वाटतो. सबब, संपादकांनी कोणताही बदल करू नये अशी मी विनंती करतो.

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

एक शंका

"उमराव जान" मधल्या रागमालेमध्ये एक राग संपून दुसरा राग कुठे सुरू होतो हे समजत नाही. याउलट "ममता" या चित्रपटातील "हम गवनवा..., सकल बन गगन..., विकल मोरा मनवा " हे प्रसिद्ध गाणे बालपण, तरूणपण आणि वृद्धापकाळ या अवस्था दाखवण्यासाठी चपखल वापरले आहे. यामध्ये चाल, वाद्यमेळ यावरून एक राग संपून दुसरा सुरू झाल्याचे समजते.

हे गाणे खालच्या दुव्यावर बघता येईल (३.१० मि. पासून ५.१५ मि. पर्यंत). यात स्वतः रोशनने या आणि इतर अनेक गाण्यांबद्दल टिप्पणी केली आहे. ज्यांना रस असेल त्यांना या आणि इतर तीन भागांमध्ये रोशनने संगीतबद्ध केलेली असंख्य दुर्मिळ गाणी, प्रसिद्ध व्यक्तींनी रोशनला वाहिलेली श्रद्धांजलीसह ऐकायला मिळतील.

<इथे पहा>

व्यक्तिगत रोखाचा काही मजकूर वगळला आहे. दुवे देण्यासाठी एखादा टॅग वापरला असेल तो बंद करण्याची कृपया, काळजी घ्यावी.

सुरेख

सुरेख दुवा आहे. सकल बन गगन यापूर्वी या दुव्यावर ऐकले होते, पण त्याचा हा संदर्भ आताच समजला, धन्यवाद.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

रागमाला

>>"उमराव जान" मधल्या रागमालेमध्ये एक राग संपून दुसरा राग कुठे सुरू होतो हे समजत नाही.

या वाक्याचा अर्थ समजला नाही. आपण दिलेल्या रोशनसाहेबांच्या गाण्यातही रागांमधले सांधे तितकेच खडखडाट करणारे आहेत जितके मूळ लेखनविषय असणार्‍या गाण्यात आहेत. 'उमराव जान'मधे हा प्रवास सकाळचे राग ते रात्रीचे राग असा सरळसोट रेखाटला आहे. शिवाय नायिका संगीत शिकत असल्याचे दाखवल्याने सकाळचे भैरवांगाचे सपाट राग ते आपल्याला हवे तसे स्वरूप देता येणारी - म्हणूनच किचकट समजली जाणारी - भैरवी म्हणजेच पर्यायाने नायिकेची संगीतनिपुणतेकडील वाटचाल या रागांच्या प्रवासातून नीट व्यक्त होते आहे. रोशनसाहेबांनी गाण्याच्या ३ भागांच्या केवळ रागांच्या नव्हे तर लयीच्या फरकातूनसुद्धा कौमार्य ते वार्धक्य या मधला फरक दाखवला आहे. पण दोन्ही गाण्यांमधून जर एखाद्या रागाचा तुकडा काढून ऐकला तर तो कधीच संदर्भ सोडून काढल्यासारखा वाटणार नाही (जसे - नंदन यांचा वरील प्रतिसाद). तसेच गाण्याचा व्हिडीओ समोर असल्याशिवाय त्यामागील कल्पनाही समजणार नाही, कारण दोन्ही गाण्यांत शब्द तसे मुद्दामून एखाद्या परिस्थितीचे वर्णन करणारे नाहीत. त्यामुळे या गाण्यांत तुलनात्मक फरक करणे शक्य होणार नाही. किंबहुना अशी तुलनाच येथे अयोग्य ठरेल.

रागमाला हा तसा चमत्कृतीपूर्ण (ट्रिकी) प्रकार आहे. जर जवळजवळचे राग जोडत गेले तर आपण आक्षेप घेतल्याप्रमाणे रागांमधले स्थित्यंतर समजावयास जड जाते परंतु त्यात 'खडखडाट' होत नाही. याउलट जर एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न असलेले राग एकापुढे एक जोडले तर त्यामधील स्थित्यंतर लवकर समजते पण मग सुरांचा 'खडखडाट' होतो, कारण अशा रागांचे येणे-जाणे, प्रकृती आणि भाव भिन्न असतात. त्यामुळे रागमाला बनवणे हे अत्यंत अवघड काम आहे. कारण त्यात रागांमधील स्थित्यंतरे, रागांचे चलन, त्यांची प्रकृती - स्वभाव हे सारेच ध्यानात ठेवून रचनेमध्ये एक प्रकारचे संतुलन साधणे आवश्यक असते.

रागमाला

रागमाला हा प्रकार "जितका खडखडाट कमी", तितका अधिक चांगला. मालिनी राजुरकरांची "दुर्गामाता, दयानी देवी" ही रागमाला म्हणजे "रागमाला कशी असावी" ह्याची ब्ल्यूप्रिंट आहे.

--- उपक्रमी
(मराठी संकेतस्थळांवरील सर्व सदस्य तमाशाप्रेमी असतात. काही उघडपणे तमाशा बघतात/करतात, तर काही चोरून, एवढाच फरक!)

आभार..

विद्यार्थी आणि उपक्रमी या दोघांचेही प्रतिसाद आवडले. मुख्य म्हणजे त्यांचे प्रतिसाद हे मूळ लेखनाच्या विषयाशी संबंधित आहेत याचे विशेष अप्रूप वाटते. उपक्रमावर (निदान माझ्या लेखांना तरी!) मूळ विषयानुरूप प्रतिसाद येणे ही अलिकडे माझ्या दृष्टीने अप्रूप वाटण्याजोगीच गोष्ट आहे!

असो, उपक्रमी आणि विद्यार्थी साहेबांचे आभार..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सन्गित कट्यार काळजात घुसली मधील रागमाला या निमित्त्ताने कोणा

सन्गित कट्यार काळजात घुसली मधील रागमाला या निमित्त्ताने कोणी तरी लिन्क् येथे देउ शकेल काय ?

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

सुरत पिया की

न छिन बिसुराये
हर हर दम उनकी याद आये....

Get this widget | Track details | eSnips Social DNA

***वरील दुव्याची प्रत्यक्ष ऐकून तपासणी केलेली आहे.

प्रथमेश

प्रथमेशचे सादरीकरण इथे.

असाच प्रकार स्वरसम्राज्ञी नाटकात पण आहे काय ?

धन्यवाद् !
अविनाश रायकर
दूर्जनांच्‍या दुष्‍कृत्‍यांपेक्षा सज्‍जनांची निष्क्रीयता जास्‍त भयावह

 
^ वर