काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो..

(मेरी सांसो को जो.. येथे ऐका)

अचल पंचमासहीत, तीव्र मध्यमाचं आणि कोमल रिषभाचं अधिक प्राबल्य असलेलं एक जबरदस्त गाणं! पुरियाधनाश्री, पुरिया, मारवा, आदी सांध्यकालीन रागांची सुरेख छटा या गाण्यात दिसते. आणि या विविध रागसदृष स्चरसंयोजनामुळेच गाणं विलक्षण प्रभावी झालं आहे.

मेरी सांसो को जो मेहेका रही है
ये पेहेले प्यार की खुशबू
तेरी सासोसे शायद आ रही है..!

गाण्याच्या सुवातीलाच मारव्यातली कोमल रिषभावर न्यास असणारी आलापी! अगदी तंतोतंत रागानुरूप नाही म्हणता येणार परंतु ढोबळ मानाने पुरियाधनाश्रीचा मूळ पाया ठेऊन लक्ष्मीप्यारेंनी शुद्ध धैवताचा जो प्रयोग केला आहे तो दाद देण्याजोगाच आहे. परंतु उत्तरांगात केवळ शुद्ध धैवताकडेच सत्तेच केन्द्रीकरण केलेलं नसून कोमल धैवताचाही जागता पहारा ठेवला आहे. पहिल्याच अंतर्‍यात याची झलक दिसते..

शुरू ये सिलसिला तो उसी दिन से हुआ था..

या ओ़ळीत कोमल धैवताचा जबरदस्त प्रभाव दिसतो जो गाण्याला पुरियाधनाश्री कडे घेऊन जातो, तर

अचानक तुने एक दिन मुझे यू ही छुआ था..

या ओळीत फाटा बदलतो आणि शुद्ध धैवताचा प्रभाव दाखवत गाणं मारव्यात शिरतं/शिरू पाहतं! लेहेर जागी जो...या पुढच्याच ओळीत षड्ज ते शुद्ध निषादापर्यंत पुन्हा एकदा स्वरांची छान गुंफण पाहायला मिळते. लक्ष्मीप्यारेंनी या गाण्याची बुद्धिवादी स्वरयोजना केली आहे असंच म्हणावं लागेल. गाण्याची लय देखील थोडी ठायच ठेवली आहे जी रंग जमवते परंतु गाण्याकरता तशी अवघड ठरते, जमूनच गावी लागते!

रीना रॉय, जितूभाई आणि ऋषी या त्रयीवर चित्रित झालेलं, दिदी -महेंदर कपूरने गायलेलं हे गाणं त्याच्यातील बुद्धिप्रधान सुरावटीमुळे आजही अनोखं वाटतं! 'एक चमत्कृतीपूर्ण परंतु जमलेला प्रयोग!' असंच या गाण्याचं वर्णन करावं लागेल!

-- तात्या अभ्यंकर.

Comments

लेख

लेख आवडला. ८०च्या दशकातले हे गाणे आवडते आहे.
लक्ष्मीप्यारे यांची शास्त्रीय संगीतावर आधारित इतर अनेक गाणी आठवतात. "सांझ ढले , गगन तले , हम कितने एकाकी " ( उत्सव) , " मेघा रे मेघा रे , मत परदेस जा रे" (चित्रपट ?) अशी चटकन आठवणारी इतर काही. एकूण, व्यावसायिक दृष्ट्या , ७५-९० काळातल्या या सर्वाधिक लोकप्रिय संगीतकाराना , अशा प्रयोगशील , सोल्-सर्चिन्ग रचना फारच कमी करता याव्यात हे जाणवले.

बुद्धीप्रधान सुरावट

व्यक्तीगत घेऊ नये पण काही वाक्प्रयोगांचा अर्थ समजला नाही. बुद्धीप्रधान सुरावट आणि बुद्धीवादी स्वरयोजना म्हणजे काय? गाण्याची लय देखील थोडी ठायच ठेवली आहे याचा अर्थही समजला नाही. लेखकानेच उत्तर दिले पाहिजे असा आग्रह नाही. कोणीही उत्तर दिले तरी चालेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मला समजलेले अर्थ

बुद्धीप्रधान सुरावट आणि बुद्धीवादी स्वरयोजना : intelligent composition. (सर्वसामान्य, सरधोपट नव्हे, अशी). आता सर्वसामन्य, सरधोपट स्वरयोजना म्हणजे काय असा प्रश्न उभा राहणार. तेव्हा थोडक्यात (आणी काहीसे जनरलायझेशन करण्याचा दोष पत्करून)-- रवि, भप्पी लाहिरी ह्यांच्या अनेक रचना, मराठीतील अशोक पत्की ह्यांच्या अनेक रचना ह्या अगदी (माझ्या मते) सर्वसामान्य, सरधोपट झाल्या.

गाण्याची लय देखील थोडी ठायच ठेवली आहे : ठाय म्हणजे धीमी. ह्या गाण्याची लय मुद्दाम ठाय ठेवल्याने गायक-गायिकांना विस्तार करण्यास वाव दिला आहे, असे लेखलाला अभिप्रेत असावे.

बुद्धीप्रधान सुरावटी आणि काही अवांतर विचार

वर प्रदीप यांनी म्हटल्याप्रमाणे बुद्धीप्रधान सुरावट म्हणजेच सरधोपट मार्गाने न जाणारी रचना. साधारणपणे सामान्य वकूबाचा एखादा संगीतकार असता तर त्याने गाण्यात एकतर शुद्ध धैवताचा मारवा वापरला असता किंवा कोमल धैवताचा पूरिया धनाश्री वापरला असता. हे दोन्ही राग त्यांच्या रंजकतेमध्ये कोठेही कमी आहेत असे नाही, परंतु त्या दोहोंचा मिलाफ करण्याचा प्रयोग हा नेहेमीपेक्षा वेगळा आहे. इथे संगीतकाराची सृजनशीलता अथवा बुद्धी दिसते. हे त्या गाण्याचं / रचनेचं वेगळेपण. खाली तात्यांनी म्हटल्याप्रमाणे पंचमदा किंवा हृदयनाथ मंगेशकरांच्या अनेक गाण्यांमध्ये असे निरनिराळे प्रयोग आपल्याला दिसतात. आणि असे प्रयोग फक्त रागांच्या मिलाफातूनच होतात असे नाही. उदा. लयीत, तालाच्या रचनेत - पंचमदांच्या संगीतात हा प्रकार बर्‍याच ठिकाणी दिसतो; वाद्यांच्या वापरात, गाण्याच्या साउंड मधे (आजकाल याचे प्रस्थ फार वाढले आहे. 'अमेझिंग साउंड' अशी प्रतिक्रिया बर्‍याच गाण्यांना येते. गाणं सुर लयीच्या दृष्टीने सुमार असलं तरी प्रयोगाच्या दृष्टीने हा ही प्रकार बुद्धीवादीच मानायला हवा) - ए.आर.रेहमान यांच्या संगीतात हे प्रयोग प्रकर्षाने जाणवतात; अनवट रागांचा वापर, रागांमध्ये विवादी स्वरांचा वापर - हृदयनाथ मंगेशकरांच्या गाण्यांमध्ये हे प्रयोग बर्‍याचदा पाहायला मिळतात (सुरांच्या चमत्कृती हा बहुधा त्यांना मिळालेला दीनानाथांचा वारसा असावा), इ.इ.

साधारण शास्त्रीय संगीताबद्दल जरी बोलायचं झालं तरी जेव्हा आपण म्हणतो की 'किशोरी आमोणकरांचे / कुमार गंधर्वांचे गाणे आत्यंतिक बुद्धीवादी आहे' तेव्हा त्यामागचा अर्थ हाच की आपल्या गाण्यामधून ते सुपरिचित रागाचे असे काही वेगळे पैलू दाखवतात जे सर्वसाधारण गायक/गायिका दाखवू शकत नाहीत. वर ज्या प्रयोगांबद्दल लिहिले आहे त्या प्रकारचे प्रयोग/चमत्कृती शास्त्रीय संगीतात शक्य नसतात (इथे उपशास्त्रीय संगीताचा विचार अपेक्षित नाही) कारण रागाची, तालाची, लयीची चौकट ठरलेली असते. त्याच्या बाहेर जाताच रंगचा बेरंग होण्याची शक्यता असते. या सर्व बंधनांमध्ये राहूनही श्रोत्यांपर्यंत काहीतरी वेगळा आणि तरीही रंजक श्रवणानुभव पोहोचवणे ही गाण्यातली बुद्धिमत्ता.

भारतीय शास्त्रीय संगीताचे सौंदर्य याच गोष्टीत आहे की नियमांच्या चौकटीत हवे तेवढे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य कलाकाराला मिळते. आणि त्याहीपेक्षा मजेदार गोष्ट म्हणजे कलाकाराला मिळणारे स्वातंत्र्य हे संपूर्णपणे त्याच्या कुवतीवर अवलंबून असते. अन्यथा यमन म्हणजे एखाद्यासाठी केवळ 'नी रे ग म ध नी सां; सां नी ध प म ग रे सा' एवढंच असेल आणि रागाचे वादी-संवादी स्वर आणि पकड यातून निर्माण होणार्‍या ठराविक स्वरसंगतींपलिकडे तो रागाचा विचार करू शकणार नाही. याउलट खरोखर प्रतिभावान कलाकार या स्वरांमधील परस्पर संबंध शोधेल, विलंबित एकतालाच्याच लयीत दुप्पट-तिप्पट करून वेगळ्या लयीचा आभास निर्माण करेल, निरनिराळ्या तर्‍हेने समेवर येऊन काही चमत्कृती दाखवेल, वगैरे. ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी पुन्हा इथे लिहिण्याचे कारण म्हणजे तात्यांनी सुरू केलेली ही गाण्यांच्या रसास्वादाविषयीची मालिका आणि त्याला आलेले काही प्रतिसाद. संगीताचा रसास्वाद अगदी गोड-गोड (फ्लॉवरी?) शब्दांत लिहायचे काही कारण नसले तरीही त्याची अगदी स्वरांच्या फ्रीक्वेन्सीपर्यंत जाऊन चिरफाड करण्याचीही काही गरज नाही असे मला वाटते. पण या लेखमालेस आलेल्या काही प्रतिसादांतून मला असे जाणवले की गाण्याला एका मर्यादेत बसवण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा त्याचे सौंदर्य क्वांटिफाय करण्याचा प्रयत्न होतो आहे. माझा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण घ्यायचे झाले तर 'गायकाने यमनच्या आलापात नी रे ग म प ही स्वरसंगती घेतली' असे जर वाक्य लिहिलेले असेल तर प्रतिसादकर्त्यांची अशी अपेक्षा दिसली की नी रे ग म प ही स्वरसंगती लेखकाने शब्दांत स्पष्ट करून सांगावी. आता असे करायचे म्हणजे काय करायचे? संगीत ही शेवटी एक कला आहे आणि प्रत्यक्ष अनुभूती ही त्याची अभिव्यक्ती जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. एका मर्यादेपर्यंतच त्याच्या सौंदर्याचे शब्दांत विवेचन करणे शक्य आहे. चर्चेस योग्य मुद्दा असा आहे की मर्यादा कोणती आणि ती ठरवायची कशी? संगीताचा आस्वाद घेणारे लेखन करताना कोणते मापदंड पाळले जावेत जेणेकरून असे लेखन संगीताचा आस्वाद घेणारे आणि त्याचवेळी काही ज्ञान देणारेही होऊ शकेल?

माझा संगीतसमीक्षेचा अभ्यास नसल्याने माझे या पुस्तकांचे वाचनही नाही. परंतु पाश्चात्य संगीतामधे नोटेशनला खूप महत्व आहे आणि संगीतकार रचना करताना सोबत त्याचे नोटेशनही करतात. त्यामुळे संगीत समीक्षकांना कदाचित या नोटेशनची मदत होत असेल. परंतु भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचे आयाम (स्पेसेस्) पूर्णपणे वेगळे आहेत, त्यामुळे त्यांच्या आस्वादपर लेखनातही फरक असणारच हे नक्की. भारतीय संगीतावर असे विपुल लिखाण झाल्याचे ऐकीवात नाही, आणि त्यातूनही मराठी भाषेत तर फारच कमी. जे झाले असेल ते डॉक्टरेटच्या प्रबंधांमधेच आणि साहाजिकच ते बाहेर प्रकाशित होत नाही. पाश्चात्य जगतात असे लेखन कशा स्वरूपाचे आहे यावर जर कोणी प्रकाश टाकू शकले तर उत्तम होईल.

जाताना: उपक्रमावरील लेखन कसे असावे या चर्चेची ही एक उपचर्चा मानता येईल.

थोडं अजून बाहेर जाताना: या प्रतिसादामुळे थोडे विषयांतर होण्याची शक्यता आहे पण तरीही या विषयाबद्दल लिहिण्याचे स्वातंत्र्य मी घेतो आहे. अवांतर वाटल्यास प्रतिसाद काढून टाकावा.

सुंदर..

विद्यार्थीसाहेबांचा पुन्हा एकदा सुरेख प्रतिसाद..

त्यांच्या प्रतिसादामुळे ही लेखमाला स्फूट स्वरुपात न राहता अधिक माहितीपूर्ण आणि विस्तृत होते आहे!

जियो..!

आपला,
(आभारी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

+१

हेच म्हणतो !
माठ विद्यार्थी यांचे प्रतिसाद फारच सुरेख आहेत ! एखाद्या विषयाबद्दल सांगोपांग माहिती देणारे. त्यांची काही डेमॉन्स्ट्रेशन्स् त्यानी तूनळीवर टाकावीत :-)

प्रतिसाद आणि डेमॉन्स्ट्रेशन्स

योग्य वयात शास्त्रीय संगीताची गोडी लागल्याने आणि अधिकारी गुरूकडून थोडे शिक्षण मिळाल्याने मला शास्त्रीय संगीताचा आस्वाद कसा घ्यावा याची थोडीफार माहिती आहे परंतु डेमॉन्स्ट्रेशन हा विषय वेगळा आहे. माझे गाण्याचे प्रयोग मलाच ऐकवत नाहीत, त्यात मी ते इथल्या सदस्यांना ऐकवून माझे उपक्रमावरील सदस्यत्व रद्द करून घेण्याचा धोका पत्करू इच्छित नाही. धन्यवाद. :-)

धन्यवाद!

उपक्रमावरील लेखन कसे असावे या चर्चेची ही एक उपचर्चा मानता येईल.

खरे आहे. चर्चेतील इतर प्रतिसादही अद्याप उपक्रमावरील लेखन कसे असावे असेच दर्शवणारे आहेत असे वाटते.

असो, या अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व! विषयात गती नसल्याने मूळ विषयावर काहीही बोलणे योग्य दिसत नाही.

स्वरलेखन

माझा संगीतसमीक्षेचा अभ्यास नसल्याने माझे या पुस्तकांचे वाचनही नाही. परंतु पाश्चात्य संगीतामधे नोटेशनला खूप महत्व आहे आणि संगीतकार रचना करताना सोबत त्याचे नोटेशनही करतात. त्यामुळे संगीत समीक्षकांना कदाचित या नोटेशनची मदत होत असेल. परंतु भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचे आयाम (स्पेसेस्) पूर्णपणे वेगळे आहेत, त्यामुळे त्यांच्या आस्वादपर लेखनातही फरक असणारच हे नक्की. भारतीय संगीतावर असे विपुल लिखाण झाल्याचे ऐकीवात नाही, आणि त्यातूनही मराठी भाषेत तर फारच कमी. जे झाले असेल ते डॉक्टरेटच्या प्रबंधांमधेच आणि साहाजिकच ते बाहेर प्रकाशित होत नाही. पाश्चात्य जगतात असे लेखन कशा स्वरूपाचे आहे यावर जर कोणी प्रकाश टाकू शकले तर उत्तम होईल.

आपण म्हणता ते खरे आहे. पण पाश्चात्य संगीतात एका स्वरावरून जाताना पहिला स्वर् सोडून दुसरा लावला जातो. थोडक्यात पायर्‍यापायर्‍यांची रचना असते. याउलट मींडकाम म्हणजेच एका स्वरावरून आस न सुटू देता दुसर्‍या स्वरावर जाणे हे भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे मींडकाम, एका मात्रेतले दोन किंवा अधिक स्वर , कणस्वरांचे जोडकाम ( कण स्वर अर्थात ग्रेस नोट म्हणजे एक सूर लावताना दुसर्‍या स्वराला स्पर्श करणे ) इ. गोष्टी स्वरलिपीमधे लिहिल्या तरीही संपूर्णपणे लिहिता येणे अंमळ अवघडच असते. पाककृती लिहिताना साहित्य जरी ग्रॅम/किलो अशा ठाशीव - ठोकळ मापात दिले तरी तिखट/ मीठ / साखर इ. चवीप्रमाणे घालावेच लागते तसेच भारतीय संगीताचे स्वरलेखन केले तरी ते संगीत पूर्णांशाने त्या नोटेशन मधे पकडता येत नाही असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे. चुकीचे असल्यास तात्याप्रभृती जाणकार तसे सांगतीलच.
रागसंगीतात चौकटीमुळेच सौंदर्य निर्माण होते /खुलते या आपल्या मताशी सहमत आहे. संगीत ही अनुभवायची गोष्ट असल्यामुळे तिथे गायकाची तान आणि श्रोत्याचे कान यांच्यातच संवाद होऊ शकतो असे मलाही वाटते. फारफारतर अमकी स्वररचना तमक्या स्वररचनेपेक्षा चांगली होती अशा अर्थाची विधाने शक्य आहेत पण तीही व्यक्तिसापेक्ष असतात असे वाटते.
तशीही सिनेसंगीतात रागांचे शुद्धस्वरूप अबाधित राखून बांधलेली गाणी अत्यल्प असतात. बहुतांश गाण्यांमधे एखाद्या रागाची छटा प्रामुख्याने दिसते. त्यामुळे त्या गाण्यात रागाच्या दृष्टीने विवादी स्वराचा वापर केला तर ऐकताना अनपेक्षित काहीतरी कानी पडल्याने एक धक्का बसतो हे खरे आहे आणि श्रोत्याच्या समजेनुसार, आवडीनुसार हा धक्का सुखद असू /नसू शकतो. पण ज्याला संगीतविषयक परिभाषेत वापरले जाणारे शब्द ( सुरावट, ढाला स्वर , मूर्च्छना , विलंबित लय, विवादी स्वर , ओडव - षाडव जाती वगैरे वगैरे) माहीतच नाहीत त्याला त्या शब्दांतील विवेचन ऐकवल्याने त्याला त्या गाण्यातली सौंदर्यस्थळे चांगली आस्वादता येण्याऐवजी 'काय कटकट लावली आहे' अशा आशयाने , त्या तांत्रिक शब्दांना अडखळून तो वाचक वाचनच सोडून देण्याचा धोका उद्भवतो असे वाटते. नाहीतर ज्याला मुद्दलातली तोडीच माहीत नाही त्याला 'अमकं गाणं वास्तविक आहे बिलासखानी तोडीतलं , कारण शुद्ध मध्यम अगदी जीवघेणा लागला आहे पण मधूनमधून बहादुरी तोडीचा भास होतो ' असली वाक्ये ऐकवून काय अर्थबोध होणार ? त्यानंतर ते गाणं ऐकताना त्याला 'फणसाचे गरे टाकून उरलेला भाग तर चावायला घेतला नाही ना! ' अशी शंका येण्याचीच शक्यता जास्त आहे असे विनोदाने म्हणावंसं वाट्तं.
मला वाटतं वरील प्रतिसादांमधे विचारल्या गेलेल्या शंका या प्रामुख्याने अशा तांत्रिक शब्मंमुळे होत्या. हा माझा प्रतिसाद उपक्रमाच्या धोरणांच्या आड येत असेल तर खुशाल काढून टाकावा. पण तात्यासारख्या शास्त्रीय संगीतावर विवेचन करणार्‍या लेखकमहोदयांनी माझा मुद्दा जरूर लक्षात घ्यावा अशी मात्र कळकळीची विनंती आहे.
प्रस्तुत् गाणे मी ऐकले नसल्यामुळे ते ऐकल्याशिवाय माझे मत देणे योग्य नाही. ऐकल्यावर माझे मत योग्य ठिकाणी पोचेल याची मी काळजी घेईन.
--(विवादी)अदिती

मुद्दलातला तोडी...!

त्याला त्या गाण्यातली सौंदर्यस्थळे चांगली आस्वादता येण्याऐवजी 'काय कटकट लावली आहे' अशा आशयाने , त्या तांत्रिक शब्दांना अडखळून तो वाचक वाचनच सोडून देण्याचा धोका उद्भवतो असे वाटते.

मला यात काहीच धोका वाटत नाही. ज्या वाचकांना इंटरेस्ट वाटेल, काही एक आस्वादता दिसेल तेच वाचतील, ज्यांना हे लेखन दुर्बोध अथवा बोअरिंग वा कटकटीचे वाटेल ते वाचणार नाहीत. किंबहुना त्यांनी वाचूच नये असेही मी म्हणेन!

नाहीतर ज्याला मुद्दलातली तोडीच माहीत नाही त्याला 'अमकं गाणं वास्तविक आहे बिलासखानी तोडीतलं , कारण शुद्ध मध्यम अगदी जीवघेणा लागला आहे पण मधूनमधून बहादुरी तोडीचा भास होतो ' असली वाक्ये ऐकवून काय अर्थबोध होणार ?

अगदी खरे आहे. सबब, या लेखमालेपुरते बोलायचे झाल्यास ज्याला मुद्दलातला तोडी माहीत आहे केवळ अश्यांकरताच हे लेखन आहे.

पण तात्यासारख्या शास्त्रीय संगीतावर विवेचन करणार्‍या लेखकमहोदयांनी माझा मुद्दा जरूर लक्षात घ्यावा अशी मात्र कळकळीची विनंती आहे.

ह्यात मुद्दाम लक्षात ठेवावे असे मला काहीच वाटत नाही. सदर लेखमाला ही ठराविक वाचक वर्गाकरताच आहे/असू शकेल याची पूर्वकल्पना/जाणीव ही लेखमाला सुरू करतांना मला होतीच/आजही आहे!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पारिभाषिक शब्द

ज्याला संगीतविषयक परिभाषेत वापरले जाणारे शब्द ( सुरावट, ढाला स्वर , मूर्च्छना , विलंबित लय, विवादी स्वर , ओडव - षाडव जाती वगैरे वगैरे) माहीतच नाहीत त्याला त्या शब्दांतील विवेचन ऐकवल्याने त्याला त्या गाण्यातली सौंदर्यस्थळे चांगली आस्वादता येण्याऐवजी 'काय कटकट लावली आहे' अशा आशयाने , त्या तांत्रिक शब्दांना अडखळून तो वाचक वाचनच सोडून देण्याचा धोका उद्भवतो असे वाटते.

मुळात जिज्ञासू वाचक बहुतांश वेळा या सर्व शंकांचे निरसन करून घेण्यास प्रवृत्त होतील. उपक्रमावर येणारे सर्व माहितीपर लेख आणि त्यातील संज्ञा सर्वांना समजतीलच असे नाही. बर्‍याचदा एखाद्या क्षेत्रातले ज्ञान आपल्याला असताना त्यातील पारिभाषिक शब्द आपण सहजगत्या वापरतो, परंतु लेखन करताना काही वेळा त्या क्षेत्राशी संबंधित नसणार्‍या वाचकांना त्या शब्दांचा अर्थ समजणार नाही याचे भान राहात नाही. परंतु त्यासंदर्भात अशी विचारणा झाल्यास संबंधित संकल्पना किंवा 'जार्गन' लेखकाने विशद करून सांगावे असे वाटते.

ज्याला मुद्दलातली तोडीच माहीत नाही त्याला 'अमकं गाणं वास्तविक आहे बिलासखानी तोडीतलं , कारण शुद्ध मध्यम अगदी जीवघेणा लागला आहे पण मधूनमधून बहादुरी तोडीचा भास होतो ' असली वाक्ये ऐकवून काय अर्थबोध होणार ?

सहमत. यासाठी मुद्दलातल्या रागाची लक्षणे सांगणारी एखादी ध्वनिफीत लेखासोबत जोडण्याचा प्रयोग करून पाहावयास हरकत नाही. परंतु यामधेही काही अडचणी उद्भवू शकतात. आपण वर म्हटल्याप्रमाणे गाणी ही रागांवर 'आधारित' असतात, त्यामुळे रागाचे सर्व नियम त्यात पाळलेले असतीलच असे नाही. तसेच काही वेळा एका गाण्यात एकापेक्षा अधिक राग वापरलेले असू शकतात. या सर्वांमुळे वाचक गोंधळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा प्रयोग करतानाही 'इन्फर्मेशन ओव्हरलोड' होणार नाही तारतम्य बाळगावयास हवे.

माहितीपूर्ण

प्रतिसाद आवडला. शास्त्रीय संगीतावर अच्युत गोडबोले आणि सुलभा पिशवीकर लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत लिहित असत. लोकसत्तामध्येच मुकुंद संगोराम कधीकधी शास्त्रीय संगीतावर लिहितात. मा.ठ. विद्यार्थी यांचा प्रतिसाद वाचून संगोराम यांची आठवण येते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ठाय विषयी (अवांतर)

ठाय विषयीः

ठाय म्हणजे धीमी हा अर्थ माझ्यासाठी नवा होता. देव दिसे ठायी ठायी मधील ठाय किंवा अगा चरणाच्या ठायीं, तरी गति तेचि पाही, अधोद्वारी दोहीं, क्षरणे तेचि... मधील ठाय यांचा अर्थ स्थान असाच होता. मात्र तुमच्या प्रतिसादानंतर मोल्सवर्थ मध्ये पाहिले असता ठाय चा अर्थ Slow time (in singing the ध्रुपद, in beating the tabor &c.) असा मिळाला.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

बुद्धीप्रधानचे इंटेलिजंट असे स्पष्टीकरण मला न पटण्यासारखे वाटले. मात्र त्याविषयी चर्चा इथे नको.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणखीही काही न समजलेले

आजानुकर्णाप्रमाणेच सांगतो. व्यक्तिगत घेऊ नये. लेखकाने उत्तर द्यावेच असा आग्रह नाही. तरीही काही शब्दांचे अर्थ समजले नाहीत.

कोमल रिषभावर न्यास असणारी आलापी

परंतु उत्तरांगात केवळ शुद्ध धैवताकडेच सत्तेच केन्द्रीकरण केलेलं नसून कोमल धैवताचाही जागता पहारा ठेवला आहे.

यामधील ठळक शदांचे अर्थ न समजल्याने लेख दुर्बोध झालाआहे असे वाटते.

विनायक

लेख आवडला !

मेरी सांसो को जो मेहेका रही है
ये पेहेले प्यार की खुशबू
तेरी सासोसे शायद आ रही है..!

अहाहा ! काय सुंदर गाणे ऐकायला मिळाले.

-दिलीप बिरुटे
(शास्त्रीय गाण्यातला 'ढ' रसिक )

आभार/उत्तरे..

बुद्धीप्रधान सुरावट आणि बुद्धीवादी स्वरयोजना म्हणजे काय?

पहिल्या सुरावटीनंतर येणारी दुसरी सुरावट जर पहिल्या सुरावटीला थोडी कोन्ट्राडिक्टरी जाणारी असेल तर जाणकार श्रोत्यांना त्यातून एक चांगला खुराक मिळतो. अश्या पद्धतीच्या अनवट किंवा कॉन्ट्राडिक्टरी सुरावट असलेल्या गाण्यांकरता/गायकी करता मी बुद्धीप्रधान सुरावट आणि बुद्धीवादी स्वरयोजना हे शब्द वापरतो.. मला कुठल्याच संगीतकाराची अन्य कुणा संगीतकाराशी तुलना करायची नाही परंतु पं हृदयनाथ मंगेशकर, मदनमोहन आणि पंचमदा या मंडळींच्या स्वरयोजनेत मला अशी बुद्धिप्रधान स्वरयोजना पाहायला मिळते!

गाण्याची लय देखील थोडी ठायच ठेवली आहे याचा अर्थही समजला नाही.

प्रदीप यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेच आहे. सर्वसाधारणपणे सिनेसंगीतातल्या गाण्यांची जी एक ओघवती लय असते किंवा प्रवाही लय असते त्यापेक्षा थोडी धीमी लय मला या गाण्यात जाणवली. लयीच्या परिभाषेत यालाच 'ठाय' लय असे म्हणतात.

कोमल रिषभावर न्यास असणारी आलापी

एखाद्या सुरावटीमध्ये किंवा आलापीमध्ये सर्वात शेवटी जो स्वर येतो त्याला 'न्यास स्वर' असे म्हणतात. उदाहरणार्थ - 'डोगरदरीचे सोडून घरटे' या ओळीतला 'डोंगरदरीचे' हा शब्द पाहू. याची सुरावट आहे - पमगरेसानी़ध़नी़रेरेगमध. यात धैवत हा न्यास स्वर आहे किंवा धैवतावर न्यास ठेवला आहे असे म्हटले जाते.

परंतु उत्तरांगात केवळ शुद्ध धैवताकडेच सत्तेच केन्द्रीकरण केलेलं नसून कोमल धैवताचाही जागता पहारा ठेवला आहे.
यामधील ठळक स्बदांचे अर्थ न समजल्याने लेख दुर्बोध झालाआअहे असे वाटते.

याकरता सप्तकाचे पूर्वांग आणि उत्तरांग, स्वरांशी तोंडओळख किंवा स्वरज्ञान या विषयीची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्याला हे लेखन दुर्बोध वाटू शकेल!

प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल सर्वांचे आभार..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

एखाद्यालाच हे लेखन सुबोध वाटू शकेल!

याकरता सप्तकाचे पूर्वांग आणि उत्तरांग, स्वरांशी तोंडओळख किंवा स्वरज्ञान या विषयीची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा एखाद्याला हे लेखन दुर्बोध वाटू शकेल!

अशाने एखाद्यालाच हे लेखन सुबोध वाटू शकेल! हे सप्तकाचे पूर्वांग, उत्तरांग, स्वराशी तोंडओळख वगैरे ठीक आहे. पण आपण कुठल्या वाचकवर्गासाठी, ऑडियन्ससाठी लिहितो आहोत ह्याचे भान लेखकाने ठेवायला हवे. असो.

बाकी 'मेरे सासों को जो महका रही है" हे गाणे लक्ष्मीप्यारे आणि हृदयनाथ ह्यांच्या मैत्रीचा पुरावा आहे. ह्या गाण्यावर मंगेशकरांचे स्पष्ट ठसे आहेत. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गाणे

हे गाणे ऐकायला जितके चांगले वाटते तितके अचल पंचमासहीत, तीव्र मध्यमाचं आणि कोमल रिषभाचं अधिक प्राबल्य, पुरियाधनाश्रीचा मूळ पाया, शुद्ध धैवताकडेच म्हणलं की बाउंसर गेल्यासारखे वाटते. :-(

असो चांगल्या चांगल्या गाण्यांची विवेचनं येउ देत.

http://www.youtube.com/watch?v=KDFtQ2Ssypo

एक फर्माईश - गाणे इश्क हुआ - सिनेमा "आजा नच ले". हे गाणे ऐकायला आवडते. जमल्यास ह्या गाण्याचे रसग्रहण करा.

मजा आली

लेख वाचून सुरावटीकडे लक्ष देऊन काही बारकावे कळू लागले आहेत.

ललित संगीताकडून रागदारीशी संबंध सांगणारी ही लेखमाला फारच चांगली कल्पना आहे.

अदिती म्हणतात त्याप्रमाणे पाश्चात्त्य सुरलेखन पद्धतीत मिंड आणि कणस्वर नेमकेपणे लिहिणे कठिण आहे. पण कित्येकदा एक साधारण आकार लिहिला जाऊ शकतो. यांचा वापरही जुन्या अभिजात-युरोपीय संगीतात कमीच होतो. लोकसंगीतात होतो. मग तसे एखादे गाणे लिखित स्वरूपात समोर असले तरी ते लोक मींड नेमकी कशी देतात हे ऐकून माहिती असले, तरच योग्य तर्‍हेने गाता-वाजवता येते.
मात्र : मात्रेत दोन किंवा अधिक स्वर असले, त्यांतही लयीत वाकडातिकडा फरक असला, तो खूपच नेमकेपण लिहिता येतो.
म्हणजे
२ सुर (८पट लयीत)+१ सुर (दुप्पट लयीत) + ३ सुर (१२पट लयीत) = १ मात्रा
असले काहीही लिहिणे बरेच सोपे आहे. (हा काही मोठा उत्तम गुण आहे असे नाही - कुठलीही लेखनपद्धत कुठल्या-कुठल्या बाबतीत कमी-अधिक सोय देते, असे म्हणायचे आहे. शेवटी सुरलेखन म्हणजे ढोबळ अंगुलिनिर्देशच. लिहिलेल्यापेक्षा ध्वनीच्या निर्माणात आणि श्रवणात कितीतरी अधिक तपशील असतात.)

चांगली लेखमाला!!!

केवळ हा लेखच नव्हे तर ही संपूर्ण लेखमालाच आवडते आहे. त्यातले सगळेच समजते आहे असे नाही, पण खूप नवीन माहिती मिळते आहे हे नक्की. जे समजले नाही ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो.

आणि तेही जमले नाही तरी इतकी सुंदर गाणी परत ऐकायला मिळत आहेत हे काय कमी सुख आहे का?

अवांतर: तात्या, काही फर्माइशी आमच्या पण आहेत हे लक्षात ठेवा.

बिपिन कार्यकर्ते

:)

(काही भाग संपादित)

अवांतर: तात्या, काही फर्माइशी आमच्या पण आहेत हे लक्षात ठेवा.

ओक्के सर! जमेल तश्या पुर्‍या करण्याचा नक्की प्रयत्न करीन..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

सुन्दर्

सुन्दर

 
^ वर