काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे..

मनमोहना बडे झुटे.. (इथे ऐका)

सुरेख षड्जाने झालेली आलापाची सुरवात. ज्यावरून तानपुरा मिळवावा असा षड्ज! सुरेख आकार, गळ्यात वसलेला तानपुर्‍यातील गंधार! सारंच दैवी..!

लतादिदीचं जयजयवंती रागातलं हे गाणं ऐकतांना एखादं चित्रपटगीत ऐकत नसून जयजयवंतीमधली मध्यलयीची एखादी जमलेली बंदिशच ऐकत आहोत असं वाटतं. पहिल्याच आलापीतील लागलेला तार षड्ज हा केवळ एक चमत्कार मानावा लागेल. गाण्यातील मध्यलय एकतालाचा लयदार, वजनदार ठेकाही सुरेख...!

मनमोहना बडे झुटे
हार के हार नही माने!

जयजयवंती रागाला साजेसे सुरेख लडिवाळ शब्द. अत्यंत स्वाभाविक-नैसर्गिक असलेला, लयीला कुठेही न दुखावता 'मनमोहना' तल्या 'ना' चा आकार जेव्हा 'मोहना' या शब्दावर सम गाठतो तेव्हा अतिशय उच्च दर्जाच्या गायकीचा अनुभव मिळतो. एखाद्याच्या पाठीवर सहजच आपुलकीने हात ठेवावा अशी ही 'मोहना' ची सम. क्या केहेने..!

बने थे खिलाडी पिया, निकले अनाडी
मोसे बेईमानी करे, मुझसे ही रुठे!

अंतर्‍यातील शब्दांचे लयदार उच्चारण, हरकती, या गोष्टी तर केवळ शब्दातीत. 'तरलता' या शब्दाची व्याख्या काय असावी याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण ठरावं! अंतरा संपवून अत्यंत अवघड तान घेऊन 'मनमोहना' या शब्दावरची तिहाई आणि 'मोहना' या शब्दावर गाठलेली सम, ही गोष्ट लता मंगेशकर या व्यक्तिला 'दैवी चमत्कार' म्हणायला भाग पाडते! गाण्याच्या शेवटी लय थोडी वाढवून घेतलेल्या दाणेदार ताना तर केवळ विद्युल्लतेला लाजवतील अश्या!

लतदिदी, संगीतकार शंकर जयकिशन, आणि चेहेर्‍यावरची रेषन् रेष बोलकी असलेल्या नुतनच्या सात्विक सौंदर्याला सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.

Comments

मस्त!

तात्या एका अवीट गोडीच्या गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
पुनःप्रत्ययाचा अनुभव घेताना मस्त वाटले.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

हरकती

आमची काय बी हरकत नाई ब्वॉ. सारेगम मध्ये आमाला तो शब्द कळाला. अर्थ अजुन शोधतो आहे. स्वरांना घेतलेले अर्थाचे ऑब्जेक्शन नाही ना? कि उलट?
प्रकाश घाटपांडे

सुंदर गाणे

ऐकेकाळी भुलेबिखरे गीत असा विविधभारतीवर कार्यक्रम असायचा त्याची आठवण झाली.

मस्त लेख.

छान!

फाँटचा आकार आणि रंग बदलल्या बद्दल आभार! डोळ्यांसा सुसह्य झाले आहे.
ह्यासाठी फोटोशॉप वापरले का?

गाणे आवडतेच,

नीट ऐकेन आणि षडज समजतो आहे का पाहीन!

लय, ताल इत्यादींबद्दल माहिती देणार्‍या ध्वनिफिती करून इथे टाकल्यात तर आम्हाला समजायला अधिक सोपे जाईल.

लेखमाला उत्तम आहे.

लय-ताल विचार..

लय, ताल इत्यादींबद्दल माहिती देणार्‍या ध्वनिफिती करून इथे टाकल्यात तर आम्हाला समजायला अधिक सोपे जाईल.

तेवढा वेळ मिळेल असं वाटत नाही. माझ्या वकुबानुसार इथेच थोडाफार खुलासा करण्याचा प्रयत्न करतो.

स्वर, लय आणि ताल ह्या गोष्टी प्रत्येकच गाण्यात असतात. ह्या तीन गोष्टी म्हणजे संगीताचा आत्मा आहेत. ह्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लय. लयीचा विचार किंवा लयीचा शोध हा प्रकार अवकाशाप्रमाणे अनंत आहे, अफाट आहे. स्वराचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यासोबत लयीचाही जन्म होतो. लयीला स्वरापासून वेगळे काढताच येत नाही/येणार नाही. परंतु स्वरा-लयीचा पसारा जरी अनंत असला तरी त्याला कुठेतरी एक बंधन हवं. एखाद्या ठिकाणाहून स्वर-लय निघाले की ते तसेच विनादिशा अनंताकडे जाऊ शकत नाहीत. त्यांचा परतीचा प्रवासही आवश्यक आहे अन्यथा गाण्यातली मेलडी ज्याला म्हणतात ती उत्पन्नच होणार नाही. वर म्हटल्याप्रमाणे हे जे आवश्यक बंधन आहे ते बंधन म्हणजेच ताल. प्रत्येक तालाला स्वत:चं असं एक वजन असतं, त्या वजनातच त्या लयमिश्रित स्वरावलीचं एक आवर्तन पूर्ण होतं/केल जातं आणि 'मेलडी'चा जन्म होतो.

असो..

लय-ताल विचार हा विषय खूप मोठा आहे. याचा अभ्यास करण्याकरता सारं आयुष्यदेखील पुरी पडत नाही. या बाबतील मीदेखील अद्याप विद्यार्थी अवस्थेत आहे, अजून शिकतो आहे, धडपडतो आहे, शोधतो आहे, समजून घेतो आहे.

वरील विचार हे मला वेळोवेळी बाबूजी, भारतरत्न, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी, स्व. पं फिरोज दस्तूर, पं अच्युतराव अभ्यंकर, पं यशवंतबुवा महाले, पं मधुकर जोशी या गुरुजनांकडून मिळाले आहेत..

गाण्यातली लय ह्या विषयावर मी 'गाण्यातली लय - तात्या उवाच!' ही एक लेखमाला सुरू केली आहे. सवड मिळेल तशी पूर्ण करीन..

आपला,
(संगीताचा एक विद्यार्थी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लय आणि लयकारी

लय आणि लयकारी याविषयावर वसंतराव देशपांडे यांनी दिलेले एक व्याख्यान आपल्याला इथे ऐकता येईल.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

नक्की ऐकेन..

विद्यार्थीसाहेब,

दुव्याबद्दल धन्यवाद. जालाचा वेग कमी असल्यामुळे ध्वनिमुद्रण तूर्तास एकसारखे खंडीत होत आहे. पुन्हा सवडीने ऐकेन. डॉ वसंतखा देशपांडे हा लय आणि लयकारी ह्या विषयातला दादा माणूस! बादशहाच!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

दुव्याबद्दल धन्यवाद

विद्यार्थीपंत,

दुव्याबद्दल धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

अगदी सामान्य रसिकाशी संवाद साधतात या भाषणात. कुठे श्रोत्याला कठिण तांत्रिक शब्द अडल्यामुळे अर्थ कळला नाही, असे होणार नाही, अशी काळजी घेतात. पण लक्षात येता येता या मूलभूत कल्पना निसटत आहेत. हे भाषण अनेक वेळेला ऐकल्याशिवाय मला समजणार नाही.

दुवा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

(उप)प्रतिसाद कसा द्यावा? त्याचा वस्तुपाठ

भाषण ऐकले.
धनंजयांचा हा उपप्रतिसाद म्हणजे प्रतिसाद कसा द्यावा त्याचा आदर्श वस्तुपाठ आहे - असे विधान मी का करत आहे ते भाषण ऐकल्यावरच कळेल. :)

छान

उत्तम जयजयवंतीवरचा उत्तम लेख.

झुटे आणि भुले

शब्दांचा उच्चार दीर्घ असेल तर त्याचे लिखित स्वरुपही दीर्घ असले पाहिजे. (या बाबतीत अद्याप तरी 'उपक्रम' ने शुद्धलेखनाला फाट्यावर मारलेले दिसत नाही!) 'झूट' हा शब्द उच्चारताना ओठांचा चंबू होतो आणि त्यातून हवा बाहेर फेकली जाते. हा शब्द 'झूट' असाच लिहिला पाहिजे. 'स्फुट' असे म्हणताना त्यातला 'स्फु' हा तुटक, तोडल्यासारखा आहे, म्हणून तो शब्द र्‍हस्व लिहिला पाहिजे. 'भूले' (भुले नव्हे) या शब्दाबाबतही तसेच आहे.
अवांतरः हा प्रतिसाद असंबद्ध वाटल्यास प्रशासनाने (?) कुणाच्या चिथावणीची वाट न पहाता काढून टाकावा, ही विनंती.
सन्जोप राव

आभार..

प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्वांचेच मनापासून आभार. लेख संगीतविषयक आहे असे मला वाटते परंतु भाषा, नाम, सर्वनाम, विशेषण, शुद्धलेखन इत्यादींबद्दल मार्गदर्शन करणारे, टिप्पणी करणारे प्रतिसाद विशेष उल्लेखनीय!

पुन्हा एकदा सर्वांचे आभार..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लेखनशैली आणि माहिती

या लेखामुळे गाण्यातील काही विशेष आस्वादस्थानांकडे माझे लक्ष गेले. धन्यवाद.

मा. ठ. विद्यार्थी यांच्या प्रतिसादात दिलेल्या दुव्यातून मात्र मला उत्तम माहिती मिळाली. त्या दुव्यात जयजयवंती, किंवा चित्रपट यांच्याविषयी माहिती नसली, तरी तो प्रतिसाद या धाग्यात योग्य वाटला. या गाण्याचे निमित्त करून संवाद विधायक दिशेने पुढे केल्याबद्दल मा. ठ. विद्यार्थी यांचे आभार.

**लेखकाच्या लेखनशैलीबद्दलच्या प्रतिसादांमधून मला वेगळ्या आस्वादस्थानांबद्दल माहिती कळलेली नाही, किंवा याच आस्वादस्थानांबद्दल वेगळा अनुभव मिळावा अशा प्रकारची दिशाही मिळाली नाही. पैकी काही प्रतिसादांत लेखातील वाक्ये उद्धृत करून लेखाच्या विषयाशी संबंध दाखवलेला आहे. इतक्या स्पष्ट निर्देशानंतरही असे मला वाटते: काही प्रतिसाद "लेखन कसे असावे" आणि "प्रतिसाद कसे असावेत" या धाग्यांमध्ये हलवलेत, तर त्यांचा संदर्भ सुसूत्रपणे लागू शकेल.
एखादा प्रतिसाद लेखातील उद्धृत वाक्ये असूनही या धाग्यातला वाटत नाही, एखादा प्रतिसाद लेखातील एक शब्दही उद्धृत न करता मला सुसंबद्ध वाटतो - काय हे आकलनवैचित्र्य! असा अनुभव दुसर्‍या कुठल्या वाचकाला या धाग्याबद्दल येत असल्यास, कृपया मला खरडवहीतून सांगून काळजीमुक्त करावे.
**

धन्यवाद..

या लेखामुळे गाण्यातील काही विशेष आस्वादस्थानांकडे माझे लक्ष गेले.

धन्यवाद...

या गाण्याचे निमित्त करून संवाद विधायक दिशेने पुढे केल्याबद्दल मा. ठ. विद्यार्थी यांचे आभार.

हेच म्हणतो..

लेखकाच्या लेखनशैलीबद्दलच्या प्रतिसादांमधून मला वेगळ्या आस्वादस्थानांबद्दल माहिती कळलेली नाही, किंवा याच आस्वादस्थानांबद्दल वेगळा अनुभव मिळावा अशा प्रकारची दिशाही मिळाली नाही.
एखादा प्रतिसाद लेखातील उद्धृत वाक्ये असूनही या धाग्यातला वाटत नाही, एखादा प्रतिसाद लेखातील एक शब्दही उद्धृत न करता मला सुसंबद्ध वाटतो - काय हे आकलनवैचित्र्य!

हा हा हा...चालायचंच! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

लेखनाविषयी सूचना

उपक्रमावर लेखाच्या किंवा चर्चेच्या विषयाशी संबंधित नसलेले, व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे आणि परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाचे लेखन होणे अपेक्षित नाही याची कृपया नोंद घ्यावी. अप्रकाशित करूनही वारंवार हेतुपुरस्सर अश्या स्वरूपाचे लेखन होत असेल तर तसे करणार्‍यांच्या सदस्यत्वावर नाइलाजाने काही निर्बंध आणणे आवश्यक होऊ शकते. तेव्हा सर्व सदस्यांनी कृपया या गोष्टीचे भान ठेऊन उपक्रमाच्या धोरणाशी सुसंगत असेच लेखन आपल्याकडून होईल असे पाहावे.

लय भारी

लय भारी गानं. "सारी दुनिया का बोझ हम उठाते है" हे आमचं आवडतं गाण. त्याविषयी लिहा. आमच्या हमाल बंधूंना आवडेल.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

थॉट प्रोसेस

जयजयवंती रागामध्ये बांधलेल्या गाण्यांचा शोध घेता आणखी काही गाणी मिळाली ती अशी.
१. बैरन हो गयी रैन - देख कबीरा रोया
२. जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है
३. ये दिल की लगी कम क्या होगी - मुगले आझम
४.सूनी सूनी सांस के सितार पर - लाल पत्थर
५. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया - बापूराव पलुस्कर तसेच लता मंगेशकर

तर आपण कुठल्या आधारावर गाण्याचे सिलेक्शन करता? त्यामागची थॉट प्रोसेस समजावून सांगता येईल का? "मनमोहना बडे झूटे" हे बापूराव पलुस्करांच्या "ठुमक चलत रामचंद्र" पेक्षा चांगले आहे हे आमच्यासारख्या असुर (आणि डोक्यात अकलेचा खडखडाट असलेल्यांना) समजावून सांगता येईल असा काही मार्ग आहे का?
बापूराव तसेच लताबाईंचे "ठुमक चलत" इथे ऐका

एकापेक्षा एक

इनायकराव,

अहो तात्यारावांनी कुठ सांगितल की सर्वात चांगल्या गान्या विषयी लिहू. आपन लिहिलेल्या गान्यात एकापेक्षा दुसरं चांगलं म्हणणं म्हन्जे अडानीपनाचं लक्षन. आमच्या हमाल बंधूंना इचारल की त्येंना सूटकेस पाठीवर घ्याला आवडते की वळकटी, तर काय उत्तर देनार ? पाठीवर काय वाहाव लागत त्याच्यामागे थाट प्रोसेस नस्ते बगा. घेतल तर घेतल. ह्येच्यापेक्षा त्ये का नाई घेतल, ह्येला काय उत्तर नाय.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

तुलना योग्य नाही...

आपन लिहिलेल्या गान्यात एकापेक्षा दुसरं चांगलं म्हणणं म्हन्जे अडानीपनाचं लक्षन.

अडाणीपणाचे लक्षण आहे किंवा नाही याबद्दल मला माहीत नाही, परंतु गाण्यामध्ये एकापेक्षा दुसरे अधिक चांगले/कमी चांगले अशी तुलना करणे हेच मुळात माझ्या मते चुकीचे आहे. प्रत्येक गाण्याचे सौंदर्य वेगळे. शिवाय गाण्याची आवड ही गोष्ट व्यक्तिसापेक्षही आहे. एकाला जे गाणे अधिक आवडेल तेवढेच ते दुसर्‍यालाही आवडेल असे सांगता येणार नाही. कदाचित आवडणारही नाही!

पाठीवर काय वाहाव लागत त्याच्यामागे थाट प्रोसेस नस्ते बगा.

हमालीच्या बाबतीत मला अनुभव नसल्यामुळे कल्पना नाही, परंतु गाण्याच्या संदर्भात माझी तरी अशी काही थॉट प्रोसेस वगैरे नसते. जे गाणे मला आवडले, मनापासून भावले त्याबद्दल लिहिणे एवढेच मी जाणतो.

असो.

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रतिसाद काढला आहे

कळावे

 
^ वर